कार्यकर्ते, समर्थक, भक्त, अनुयायी इ.

राजकारणातल्या आणि अराजकारणातल्या कार्यकर्ते, समर्थक, भक्त, अनुयायी
या सर्वांची हात जोडून माफी मागून!!
***
-- बापु, 'कार्यकर्ते' म्हणजे काय?
-- बाबू, सोपं आहे! कार्यकर्ते म्हणजे 'कार्य' करतात, ते. म्हणजे काम करणारे लोक!
-- बापु, पण कसलं काम?
-- बाबू, सरकार तयार करण्यासाठी वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार उभे राहतात, निवडून येतात. या निवडणुकांमध्ये खुप कामे करावी लागतात. पोस्टरं लावणं, पत्रकं वाटणं, सभा भाषणांची तयारी करणं, वाड्यावस्त्यांवर जाऊन पोटतिडकीने आपल्या पक्षाबद्दल बोलणं, इलेक्शनच्या वेळी सामानाची ओझी वाहणं, सभा-मोर्चांत बेंबीच्या देठापासून ओरडून घोषणा देणं- अशी बरीच कामं फक्त सुक्या किंवा ओल्या फराळाची अपेक्षा बाळ्गून हे लोक करीत असतात. आपल्या नेत्यांवर त्यांचं प्रचंड प्रेम, विश्वास असतो; त्यामुळे त्याच्यासाठी काहीही करायला कार्यकर्ते तयार असतात. कार्यकर्ते जास्त असलेला नेता किंवा पक्ष जास्त पॉवरफूल असं सरळ समीकरण असतं. पक्षाचं 'तळागाळापर्यंत' पोचणं, किंवा 'गाळात' जाणं हे सर्वस्वी कार्यकर्त्यांवर अवलंबून असतं. हेच कार्यकर्ते लोक आपापल्या नेत्याला विजय मिळवून देतात; विधानसभेत, लोकसभेत पाठवतात, कळलं बाबू?
-- हो बापु, कळलं.

***

-- बापु, 'समर्थक' म्हणजे काय?
-- बाब्या लेका, किती वेळा सांगावं, नसत्या अन न कळणार्‍या बातम्या वाचू नयेत म्हणून! अभ्यास कर जा बघू..
-- बापु करतो, पण मन नाही लागणार. बघा ना, आज केवढे फोटो, राड्याच्या बातम्या आल्यात. पेपरमध्ये बघावं तिकडे समर्थकच! सांगा ना प्लीज..
-- अरे बेटा, हीच तर समर्थक या शब्दाची करामत आहे. पेपरवाल्यांनी जपून पण पुन्हा पुन्हा छापावा, चॅनेलवाल्यांनी प्रत्येक 'ब्रेक के बाद' फोटोसकट अख्खी कुंडली दाखवावी; आपल्यासारख्या सामान्य माणसांनी अदबीने, आदराने उच्चारावा असा हा जादूई शब्द! ज्याच्या नावाआधी हा चिकटला, तयाचा 'उध्दार' झालाच म्हणून समज. प्रत्येक राजकीय पक्षाला तळमळीचे कार्यकर्ते लागतात, तसेच पक्षाच्या पुढार्‍यांना हे समर्थक लागतातच. निवडणुका, पक्षबदल, बंडखोरी अशा वेळी तर समर्थक सर्वात महत्वाचे. अशा वेळी 'अंदाज' चुकल्यास नेत्यासकट समर्थक भिकेलाही लागू शकतात, पण ते क्वचितच. एकंदरितच समर्थकांचे सामर्थ्य मोठे!
-- पण बापु, तुम्ही म्हणता- सगळी कामं कार्यकर्ते करतात. मग समर्थक काय करतात?
-- बाळा, निवडणूकीच्या वेळी प्रत्येक पुढार्‍याला खुप काही करावं लागतं. तिकीट वाटपाआधी, वाटपाच्या वेळी अन नंतर भरपूर 'शक्ती-प्रदर्शन' करावं लागतं. गंमत अशी, की तिकीट मिळलं तर शक्तीप्रदर्शन, अन नाही मिळलं तर त्यापेक्षा जास्त शक्तीप्रदर्शन; असा हा मामला असतो.
-- पण बापु, शक्तीप्रदर्शन कशासाठी?
-- विरूध्द पार्टीच्या उरात धडकी भरविण्यासाठी. पण आपल्याच पार्टीला घाबरविण्यासाठीही त्याचा उपयोग केला जाऊ शकतो! जास्त समर्थक असलेला नेता जास्त डॅशिंग, लोकप्रिय मानला जातो. त्यातही त्याचे समर्थक 'काय काय' करतात यावरही बरचसं अवलंबून असतं. उठसुट 'अंगार-भंगार', 'विश्वास-बकवास' स्टाईलच्या शिवराळ अन आक्रमक घोषणा देणं, पुतळे-प्रतिमा जाळणं, मोर्चे काढणं, बंद-संप घडविणं, गाड्या जाळणं, काचा फोडणं, मारामार्‍या-राडे करणं, आपल्या नेत्याला नोटांचा अन दुसर्‍या नेत्यांना चपलांचा हार घालणं अशी अवघड कामं हे समर्थक पार पाडत असतात.
-- बापु, पण हे सगळं कशासाठी?
-- लेका, यालाच तर शक्तीप्रदर्शन म्हणतात! हवं ते पदरात पाडून घेण्यासाठी अन लोकांना आपली लोकप्रियता दाखविण्यासाठी नेत्यांना हे करावंच लागतं!!
-- पण बापु, समर्थकांना त्याबदल्यात काय मिळतं?
-- भोळा रे भोळा! अरे आपले भावी नेते, आमदार, खासदार त्यातूनच तयार होत असतात. गल्लोगल्ली जागा मिळेल तिथे लहान-मोठी-भव्य-अतिभव्य पोस्टरं बघतोस का? समर्थक लोक स्वतःच खर्च करून नेत्यांच्या अभिनंदनासाठी ती लावतात. त्यात स्वत:चीही नावं अन फोटो टाकतात. जितकं मोठं पोस्टर, तितका मोठा फोटो, अन तितकी जास्त दहशत- म्हणजे लोकप्रियता! ही पोस्टर संस्क्रूती फक्त अध्यक्ष, मंत्री, आमदार, खासदार यांच्यापुरती मर्यादित न राहता गल्लीबोळातील 'उगवते तारे', 'भाग्यविधाते', 'युवा नेत्रुत्व' यांच्यापर्यंत पोचली आहे. गंमत म्हणजे अशी पोस्टरं लावण्यासाठी कोणतीही जागा तर चालतेच, पण निवड होण्यापासून बाप होण्यापर्यंत अन वाढदिवसापासून डास चावण्यापर्यंत कोणतेही कारण चालते. आता या पोस्टरांवर अतिक्रमणापासून ते शहर विद्रूप करण्यापर्यंत अनेक आरोप काही सामान्य अन मुर्ख लोक करतात. पण खरं तर ही पोस्टरं लोककल्याणासाठीच असतात. कोण कोणाचे समर्थक आहेत, कोण पॉवरफूल आहेत, कोणाची 'हवा' आहे- अशी अमुल्य माहिती जनतेला त्यातून मिळत असते. विशेषतः 'युवा' अन 'उगवत्या' नेत्रुत्वांना या पोस्टरांची महती जरा जास्तच कळलेली असते. त्यामुळे मिसरूडही न फुटलेले, स्वतःचं नावही नीट न लिहू शकणारे अनेक सुघड-अवघड, तरूण-तडफदार, अनेकरंगी-बहूढंगी, कळकट-तलवारकट, हिरोस्टाईल-सडकछाप चेहरे चोकाचोकांतून या पोस्टरांतून जनतेला अव्याहत दर्शन देत असतात. हेच समर्थक आपल्यसारख्या सामान्यांचे भावी नेते. कळलं? आता प्रश्न विचारू नकोस.
-- हो बापु.

***

-- बापु, भक्त म्हणजे काय?
-- बाबू, केवढा रे जिज्ञासू तू! हे बघ, ऐक. भक्त या शब्दाला फार मोठा पौरणिक अन ऐतिहासिक संदर्भ आहे. प्रल्हादापासून ते जनाबाईपर्यंत अन नामा-तुका-गोरोबापासून शिवाजी महाराजांपर्यंत अनेक महान भक्त या भुतलावर होऊन गेले. पण काळ बदलला अन भक्तही! 'विठ्ठलाचे' भक्त बंड करू लागले अन स्वामी-बाबा-महाराज इ.चे भक्त पंतप्रधानपदीही बसू लागले. भक्त बनणे ही फॅशन बनली!
-- बापु, पण हे कसं झालं?
-- बाबू, झालं काय; की जमाना बदलला, अन आपलं आयूष्य जास्त धावपळीचं, ताणतणावांचं झालं. समस्या, दु:खं वाढू लागली, आणि मग काही विद्वान बुवा-बाबा-बापू-स्वामी-ताई-माता-महाराज यांनी सामान्य गरीब पामरांचे प्रश्न सोडवण्याचा ठेका घेतला. लोकांना आकर्षित करण्यासाठी किर्तन-प्रवचन, चमत्कार-जादूटोणा, गंडा-दोरा-ताईत, आयूर्वेद-योगा, मधाळ वक्त्रुत्व अशी वेगवेगळी माध्यमे वापरली. लोक बिचारे त्यांच्या मागे लागले. भान हरपून, उद्योग सोडून त्यांचे शिष्य बनले. नेते-अभिनेते, स्टार क्रिकेटपटू, उद्योगपतींमधली 'गुरू' बनविण्याची प्रथा गरीब बिचार्‍या सामान्यांत आली आणि ते कुणाचे ना कुणाचे 'भक्त' बनले..
-- समजलं, बापु.

***

-- बापु, अनुयायी म्हणजे काय?
-- अगं ऐकलंस का? आपला बाबू खुप हुशार निघणार बरं! एवढ्याशा वयात किती अवघड प्रश्न त्याला पडतात बघ!
-- बापु, सांगा ना, अनुयायी म्हणजे काय?
-- ऐक पुत्ररत्ना, श्रोत्या महाराजा, गुरूमाऊलीचं निरूपण ऐक! समर्थक या शब्दाची जितकी जादू अपार, तितकीच अनुयायी या शब्दाची महती अगाध! वास्तविक संत-महंतांपासून महात्मा गांधींपर्यंत अन विनोबांपासून जयप्रकाश नारायणांपर्यंत अनेक दिग्ग्जांना अनुयायी लाभले. पण तेव्हा 'अनुयायी' शब्दाचा अर्थ- महान व्यक्तींचे तत्वज्ञान प्रत्यक्षात आणणारे त्यांचे शिष्य- असा होता. काळ बदलला, त्याहीपेक्षा वेगाने अनुयायी! गांधींचे अनुयायी वेड्यात निघाले, तर जे.पी. सारख्यांचे अनुयायी जनावरांचा चारा स्वतःच खाऊ लागले! काळाची लीला एवढी अगाध, की पुढेपुढे अनुयायी संप, निदर्शने; एवढेच नव्हे, तर समर्थकांचीही कामे, म्हणजे घोषणाबाजी, तोडफोड, जाळपोळ अन मारामार्‍या करू लागले...
-- पण बापु, का?
-- असं बघ बाबू, गुरू लोकांचे अतिप्रामाणिक शिष्य भक्त बनले, तसे अतिउत्साही भक्त पुढे 'अनुयायी' झाले. या अनुयायांकडून 'गुरू' लोकांची आपोआपच जाहिरात होऊ लागली. शिष्य, भक्त वाढू लागले, तसे गुरूंची प्रसिध्दी, पैसाही वाढू लागला. त्याचा वापर करून हुशार गुरू लोक आपल्या अनुयायांची संख्या वाढवू लागले. मग या बुवा-बाबा-माता-स्वामी-गुरू लोकांनी काहीही केले तरी अनुयायी त्यांच्या पाठीमागे उभे राहू लागले. कुणची दाढी-मिशी, कुणाची लुंगी-कफनी तर कुणाचे धर्मदंड आदराचा विषय होऊ लागले. संन्यासी बनलेले हे निर्मोही गुरू लोक मग अगदी विरक्तपणे मर्सिडीज् आन विमानातून प्रवास करू लागले. मग विमानातून अमूक दंड्-काठी घेऊ दिली नाही किंवा त्यांचे उदार-अनुदार उद्गार पेपरांत छापले म्हणून विमानतळांच्या अन पेपरवाल्यांच्या काचा फुटू लागल्या!
-- मग काय बापु?
-- मग काय बाबू? याच बातम्या पेपरमध्ये, टीव्हीवर येऊ लागल्या अन या महान गुरू लोकांचे आणखी नाव झाले, प्रसिध्दी मिळाली! हे सर्व कुणामूळे शक्य झालं, सांग बघू?
-- अनुयायांमुळे!
-- शाब्बास. हुशार माझा बाळ तो. अगं ऐक जरा, आपल्या बाबूला खाऊ दे पाहू!

***

-- बापु..
-- आता काय?
-- बापु, ओरडू नका ना. एक प्रश्न विचारतो आहे..
-- बाब्या लेका, प्रश्न विचारण्यासाठी तुला कुणी पैसे तर नाही ना दिले?
-- म्हणजे काय बापु?
-- पुन्हा प्रश्न! अरे आपल्या खासदारांना नाही का मिळ्त पैसे एखादा विशिष्ठ प्रश्न संसदेत विचारण्यासाठी! तुझ्या आईने तर नाही दिले तुला मघाशी खाऊऐवजी पैसे?
-- नाही बापु. बघा ना, हातात लाडू आहे.
-- मग ठीक. विचार. पण आता शेवटचा प्रश्न. डोकं दुखतंय..
-- बापु, आज पेप्रात आलंय; आमचे 'साहेब' म्हणजे 'विठ्ठ्ल' होते म्हणून..
-- बाब्या, उगाच डोकं खाऊ नकोस. त्यात न समजण्यासारखं काय आहे?
-- बापु, ते कळ्लं हो; पण त्याच बातमीत आणखी एक शब्द आहे. बापु, 'बडवे' म्हणजे काय?

***
***
समाप्त
***


साजिरा... असेच लिहा म्हणजे मायबोलिकर आपले ' भक्त' होतील



एकदम झक्कास..... खुप आवडल....



"दारू म्हंजे काय रे भाऊ?...."
पुलंची आठवण झाली!
मस्त!
..प्रज्ञा



हाहा लै भारी!



खो खो
साजिरी खिल्ली उडविली आहेस रे.
प्रज्ञाला मोदक. "दारु म्हणजे.." ची आठवण खुप झाली.



मोहनप्यारे, येड्या, प्रज्ञा, किंग, रमणी..
प्रतिक्रियांबद्दल हार्दिक आभार.
तुमच्या प्रतिक्रियांमुळे हुरळून जाऊन यापुढेही 'काहीबाही' लिहिलं, तर प्लीज, सहन करा..
तुम्हीही लिहा, वाट बघतो...



सुन्दर



साजिरा,
बापू मी तुझा "फॅन" झालो.. अंहं म्हणजे पंखा नाही, भक्त ...!!
........................अज्ञात



साजिर्या मस्त लिहलय.



क्या बात है !

पाय लागो !



समजल बर का भावु.. लई मंजा आला... झक्क्कास बापो...

येऊ दे....