सदस्य प्रवेश |
फुल गेंदवा न मारोअगदिच फुलाफुलांचा नाही पण... होत होता तो घालून निघाले, आपला इंडियन पंजाबी ड्रेस, हो... ओढणीसकट. हात-बीत नीट हलवता येतायत ना ते पाहिलं. 'मग? माझ्यामते ह्या ड्रेसात लांब उडी, उंच उडी, बेडुक उडी सगळं करता येतं.... फक्तं या वयात नाही... पण आपण ड्रेस विषयी बोलतोय', मी... 'हाच होतोय' हे दोन शब्दं टाळत टाळत जितकं बोलता आलं तितकं बोलले. ’आई, ड्रेसचं ठीकय.... पण ते सगळं उगीच करून बघू नकोस..... ह्यातलं बरचसं इथे अप्लाय होत नाही’, हा माझा लेक ना.... हा आत्ता अजून जमिनीतून पूर्णं उगवला नाही, तर मला सांगतोय. मी गप्पं बसले. म्हटलं... ’तू तुझा वेगळा क्लास कर, माझ्या बॅचला नको’, असं म्हणाला तर तर काय घ्या? ते जाऊदे. सांगत काय होते की, मुलाने बॅडमिंटन शिकायचं जरा मनावर घेतलं... शिकवणारा चायनीज आहे, जाम कडक आहे, त्यामुळे नेहमीचा लेकाचा कोचिंग पार्टनर ड्रॉप झालाय....आणि लेकाला पार्टनर हवा आहे! कोर्टवर पोचलो. माझे रबरी सोलचे नवीन शूज, लाकडी फ़्लोअरवर च्युईक च्युईक आवाज करत होते. कुठल्याही वयात औत्सुक्य असतंच माणसाला...बायकांची नजर जरा जास्तं चौकस इतकच... इकडे तिकडे बघत चालताना सरळ एका कोर्टवर जेव्हा जाळ्यात आपणहून चालत गेले तेव्हा मात्रं लेकाने हात धरला. श्रावण बाळासारखी कावड-बिवड नव्हती इतकच. दिसायला जेट ली पण वागायला मि. मियागी सारख्या ह्या लेकाच्या गुरूला मी दोन्ही हात जोडले. ’गूड गूड....नमस्टे... लाईट?’ (मी हसून मान हलवली) मी तत्परतेने नाव सांगितलं, ’शलाका’ मी एकदा ’व्वा’, एकदा ’नाही’, परत एकदा ’नाही’, मग ’हो’ आणि शेवटी थकून ’नरो वा कुंजरो’ अशी मान हलवली. भलत्या भलत्या वाक्यांचे पाय एकात एक गुंतवून त्यांचा नुडल्स सारखा गोळा, जो ’गूड गूड’ ने सुरू होतो आणि शेवटी ’लाईट?’ चं टोक लोंबतं.... करून काटाचमच्यावर दिल्यावर आपण काय करणार? गप गुमान तोंडात सरकवणार... तसच. ’ओ, यु वीअल इंडियन?’, मी अजून माना हलवण्याच्याच फेजमध्ये जमेल तितकं हसत, ओढणी सावरत ’हो’. आपले पांढरे स्वच्छ दात जराही न दाखवता तो पुढे म्हणाला, ’गूड, गूड... यु वीअल इंडियन फॉर बॅडमिंटन,’ मग आपल्याभोवती गरारा दाखवत पुढे म्हणाला, ’गाऊन... गाऊन? पाल्टी गाऊन? विल बी डिफ़िकल्ट टू प्ले. बट शॉल्ट्स ऑर पँट आय सजेस्ट टू ऑल... गुड फॉर एवलीथिंग.’ हं! हा दिसतो तितका चपटा नाहीये.... बयापैकी तिरपी धार आहे..... पुढल्यावेळी पँट घालायला हवी. ’यू प्ले एनी गेम्स? नॉट नाऊ... आय सी दॅट....व्हेन लिटल? लिटल?’ त्याचं बोबडं लिटल आम्हाला कळत नसल्यासारखं हाताने इवलं इवलं दाखवत म्हणाला.. तरी बरं मी प्रत्यक्षात तीन-चार इंच उंचच होत्ये त्याच्यापेक्षा. मी सध्या काहीही खेळत नाही ह्याचा साक्षात्कार ह्याच्या पॅनोरॅमिक पापण्यांमागच्या फटींतून झालाच असणारच व्यवस्थित..... लहान असताना काही खेळलेय काय... केस हिस्टरी विचारतोय.... ह्याला माझ्या लेकाला गडबडीने उत्तर द्यायची काही म्हणजे काही गरज नव्हती. त्याला नक्की वाटलं असणार हिला इंग्रजी येत नसणार बहुतेक. नंतर विचारलं तर गधडा म्हणाला की ’तुझं काही खरं नाही... तुझ्या शाळेतलं लंगडी, खोखो सांगत बसशील... नाहीतर ते फुगड्या, टोडच्या उड्या... कायतरी’ मग काय.... परत लेकालाच त्याने विचारलं, ’हाऊ इज हर हँड अँड आय को-ओल्डिनेशन?’ आपली तयारी असेल चौथीची आणि लेकाच्या उत्तरावर उगीच हा आपल्याला बिगरीत नेऊन बसवेल म्हणताना... मीच चटकनी पुढे होऊन सांगितलं, ठणठणीत इंग्रजीत... 'कितीही काळोख असला तरी घास नाकात जात नाही म्हटलं'... काय घाबर्तेय काय? (कपाळावर हळूच हात मारतानासुद्धा बल्ल्या कित्ती माझ्यासारखं करतो.... ह्यांचं आपलं काहीतरीच) ’गूड गूड.....’ गुडुदेव पुढे म्हणाले, ’सकाला, लुक आट दॅट हँडसम यंग मॅन...’ माझ्या नावाची लागलेली वाट कानाआड करून, मी अभिमानाने माझ्या तगड्या लेकाकडे बघितलं.... कोणत्या चक्कीचा आटा... इंडियन कुकिंग.... व्वा! छानच तब्येत केलीये लेकाची.... वगैरे इंग्लजीत ऐकायला मिळणार असं मनात म्हणून पूर्णं करायच्या आधीच तो म्हणाला, ’फॉलो हिम.... अँड डू द सेम स्ट्लेचेस....’ कपाळाकडे वेगाने जाणार्या हाताने जमेक तितक्या शांतपणे केस मागे सारून बघितलं.... लेक जरा जास्तच जोर लावून स्ट्रेचेस करत होता का काय.... कुणास ठाऊक. स्ट्लेचेस तल स्ट्लेचेस! मी मस्तंपैकी कथ्थक वगैरेला बांधतात तश्शी ओढणी कसली.... आणि केलं बाई कसंतरी. मग कुठे त्याने हातात बॅट दिली. किती आनंद झाला म्हणून सांगू.... नकळत मी ती तलवारीसारखी पेलली, चालवली असणार.... पण मग लक्षात आलं की, ती बॅट, तलवार, भाला, दांडपट्टा, झाडू किंवा अगदी तळणीचा झारा ह्यापैकी कोणत्याच स्टाईलमध्ये धरायची नाहीये.... कशी धरायची ती दाखवण्यासाठी काढून घेतली त्याने.... पण फुलं काही दिसेनात आजूबाजूला... नुस्त्या झार्याचं काय करायचं बाई? तर ’नुस्ती पळापळ’! पहिले काही दिवस काही ढांगांतच कोर्टावर वेगवेगळ्या दिशात कोर्टाची हद्द न ओलांडता पळता यायला पाहिजे ह्याचीच प्रॅक्टिस करायला लावतो हा. हे म्हणजे व्हायोलीनच्या क्लासला जाऊन, ’नुस्ती बो फिरवायची प्रॅक्टिस करा ह्याच्यावर’ असं म्हणून तारा काढलेलं व्हायोलीन हातात देण्याइतकं दुष्टपणाचं. मुलगा त्या बाजूला, मी ह्या बाजूला... पळापळ सुरू... दिसत नसलेला उंदीर मारायला करतो ना... तसलच काहीसं. (आपल्याला कुठे मार्टिना नवरातिलोवा व्हायचय... आपणहून इतकं कुठे पळणार होतो? लेकाचा (म्हणजे माझाच लेक) अडीच ढांगांत नेटपाशी येतोय.... मला साडेचार आत्ताच लागतायत... मागे कोकणात एकदा आग्या मोहोळाच्या माश्या मागे लागल्या होत्या तेव्हा असेच पळालो होतो घरापर्यंत.... तेव्हा नव्हता इतका दम लागत.... हा ओरडतोय कशाला? चायनीजमध्येही हा बोबडं ओरडत असेल का? जरा जोरात आपटली गेली बॅट तर काय होतं? मग एक काठीच दे म्हणावं हातात.... आणि बघच तू...) माझा नाकपुड्या आणि तोंड ह्यातही न पुरता ओसंडून वहाणारा श्वास ऐकून आणि त्याहीपेक्षा सैरावैरा पळणं बघून तो म्हणाला, ’शकालाका...’ (मला मोठ्ठ्याने ’बुम’ ओरडावसं वाटलं).... यू जस्ट वॉच टूडे.... ओके?’ जस्ट वॉच? मग आत्तापर्यंत काय ’टांग टिंग टिंगाक’ नाचत होत्ये का काय? आत्तापर्यंत नाकातून येणाया वाफा, आता रागाचा धूर बनून कानातून येणार असं वाटलं.... इतक्यात लेकाने एक मोठ्ठा हारा आणलेला बघितला.... हारा भरून पांढरी शूभ्र फुलं... हरखुनच गेले. पण गुरूदेव म्हणालेत तर थांबूया... आधी हा श्वास ताब्यात येऊदे मग चालवू दोन-चार हात. कोच, कोर्टच्या एका बाजूला आणि माझ लेक दुसया. मस्तपैकी विंबल्डनमध्ये ते खेळाडू झुलतात ना, हत्तीसारखे?... अगदी तस्सा! हार्यातून एकेक फुल काढून कोच नुस्ता दुसर्या बाजूला वेगवेगळ्या ठिकाणी ती पडतिल अशी उडवत होता. कोच आणि फुलांचा हारा एकाच जागी.... घामाघूम लेक आणि त्याने उडवलेली फुलं सर्वत्रं. जवळ जवळ सगळीच त्याला बर्यापैकी झेलता, उडवता, टोलवता आली. बरा खेळतो की... मी मनात म्हटलं. लेकाच्याही तोंडातून तसलेच अगम्य श्वासोद्गार येईपर्यंत त्याला दमवून, गुरूदेवांनी ’सगळी फुलं गोळा करून ठेवा आता’, म्हणून सांगितलं.... आज एकही आपल्या नशिबात नाही?... माझा चेहरा वाचून आणि मोहरा बघून घाईघाईने, ’आई, ह्याला जाऊदे... मी तुला प्रॅक्टिस देतो’, असं लेकाने मराठीत समजावलं.... ’गूड गूड... ओके.... सी यू नेस्ट संडे... सेम टाईम... अँड.... वेल डन, श्लीलंका, द केदाल्स मदर...’... त्याला सुधारण्याची संधीही न देता 'जेट'लीच्या वेगाने गेलाही. माझाच अत्त्याग्रह.... मुलगा तरी काय करेल... त्याने आपली आधी जरा खरी प्रॅक्टीस द्यायचा प्रयत्नं केला... मी ह्या बाजूला हातात शस्त्रं घेऊन इकडून तिकडे आणि तिकडून इकडे... थोडक्यात सगळीकडे... स्वैर संचार... थांब ही बॅट नको... तुझी दे ह्या आणि असल्या अजून चौतिस तरी सूचना केल्या असतिल... पण आईचं ऐकेल तो मुलगा कसला.... बोला-फुलाची म्हणतात तितकीही फुल-झार्याची गाठ नाही. आजूबाजूला अनेक धारातीर्थी पडली होती, ती फुलं उचलण्याचंसुद्धा त्राण नव्हतं हातात. कोर्टवर आले तेव्हा दोन होते, आता किती उरलेत कुणास ठाऊक असं आपल्याच पायांविषयी वाटून गेलं. ह्यातल्या बर्याचशा प्रकारांची आधीच कल्पना असल्याने हे घ्यायलाच आले होते.... हे गाडीत असल्याने मी बोलले नाही नाहीतर केदारला सांगणारच होत्ये.... अरे, तू मला खोखो खेळताना बघायला हवं होतस, ह्यांचं ना, मग काळ-वेळ न बघता सुरू होतं.... अरे तुझ्या आईच्या शाळेत चमचा-गोटी वगैरेच्या कसल्या जबरदस्तं शर्यती व्हायच्या माहितिये.... वगैरे वगैरे. **************************************************************************** आपल्याला कोणी आवाज दिला की आपण मागे हटत नाय.... अगदी ’प्राण जाय पर वचन न जाय’... वगैरे लेव्हलचं अगदी निकराचं नाही पण... सहजासहजी सोडणार नाय आपण. ’छे छे... एकदा घेतलं हातात की पूर्णं करणारच... तुम्हाला माहितीये माझा स्वभाव कसा आहे तो...’, अवसान हे बहुतेकदा घात करण्यासाठीच येतं... असा माझा अनुभव आहे. पण नवरा आणि मुलगा आपल्याला तोंडघशी पाडायला किती तत्पर असतात ते मी विसरलेच होते.... ’अगं, मला माहीतीये ना तुझा स्वभाव?... म्हणून मी आधीच आणून ठेवलीत फुलं.... आपला तो शिध्या... अगं तो त्याच फॅक्टरीत आहे ना... अगदी हसत हसत आणून दिली त्याने हाराभर... वैनींना म्हणावं, कमी पडली तर सांगा असं सांगून गेलाय’. अजून टकलावर गंगा अवतीर्ण झाली नाहीये असा, पान-पराग खाऊन दातांच्या कडा रंगवलेल्या तोंडाचा ह्यांचा शिधये नावाचा मित्रं माझ्या हातच्या न खाल्ल्या मिठाला (शिधयेला हाय ब्लड प्रेशर आहे) नको तिकडे नको तेव्ह्ढा जागला.... हे म्हणजे भलतच झालं. त्या आठवड्यात लेकाची एकही परिक्षा नाही, एकही प्रोजेक्ट, असाईन्मेंट नाही. सगळेच्या सगळे मित्रं कुठे कुठे तोंड घेऊन गेलेत... माझ्या ऑफिसचं नूतनीकरण चालल्यानं सगळेच घरून काम करतायत... मला एकदम 'जाये तो जाये कहा'... झालं. ’कोर्टवर कशाला, आपल्या अंगणात करू प्रॅक्टिस म्हटलं.... फरशी घालून बरं समतल केलय’, विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात ती अशी. बॅटी, नेट-बीट घेऊन आम्ही अंगणात गेलो. ह्यांनी इतक्या गडबडीने मदत केली की मला 'दाल मे काला' नव्हे तर एकदम रस्समच दिसायला लागलं... काळंकुट्टं... डाळ कुठे नाहीच. आंघोळ न करता, हातात ई-सकाळचा प्रिंट घेऊन पुण्यातल्या पेंन्शनरांसारखे अंगणात खुर्ची टाकून बसले... अस्सा राग आला होता... म्हटलं आज मुळीच बधायचं नाही. जिरवायचीच ह्यांची. लेकाला म्हटलं... ती फुल-झार्याची प्रॅक्टीस ना, आपण नंतर करू आज मला फक्तं ती पोज घेऊन उभं कसं रहायचं ते दाखव.... ’कोणती? आता कोणती काय? इथे काय गरबा नाचायला आलोय आपण?’ मी तडकलेच.... ’अगं, सर्व्हिस करताना आणि फ़ेस करताना वेगवेगळे स्टॆंड घ्यायचे असतात....’, ह्यांनी इतकं समजूतीच्या स्वरात ते म्हटलं ना, की मला रागच आला.. म्हणजे अजून राग आला. म्हटलं, 'आत्ता आधी फ़ेस कसं करायचं ते दाखव'... त्यानं दाखवलं... तो दाखवतोय आणि मी पोझ घेतेय.... एकदा, दोनदा, तीनदा..... माझ्याच लक्षात येत होतं की एकदा अमेरिकन स्वातंत्र्यदेवीचा पुतळा... हो! त्या टॉर्चसकट, एकदा चक्क स्वर्गीय इंदिरा गांधीं सारखंही, मग झालच तर झाशीची राणी लक्ष्मीबाई, संतोषीमाता, लाटण मोर्च्यातली बाई, हे सगळे अवतार दाखवून झाले... प्रत्येक ह्यांनी बर्रोबर ओळखला आणि इथे सिडनीत वाढलेल्या लेकाला व्यवस्थित एक्स्प्लेन करूनही दाखवला... ’आहेस तश्शीच उभी रहा... थांब हलू नकोस... इतकं विचारतोय आपल्या संस्कृतीबद्दल तर जरा कळू दे की...’ हे वर आणखी. ’पूरे’, म्हटलं , ’हे रवीवारी गुलूदेव शिकवतील... तू .... आता सर्व्हिस ची पोज दाखव..’ ’पोज नाही... ऍक्शन आहे ती!’ लेकाने अक्कल पाजळली.... ’म्हणजे त्यात हलायचं आहे’, इ-सकाळची पहिली दोन पानं हवा घातल्या सारखी हलवत हे म्हणाले. बघितली ऍक्शन!... सोप्पं नाहीये. हे सगळं म्हणजे त्याला ते करताना बघून मी मनातल्या मनात केलेली जोडणी हं.... ते सगळं करून अनेक फुलं गाळण्याचा कार्यक्रम झाला.... केल्या नाहीत कधी, पण खरच सांगत्ये बुंदी गाळणं सोप्पं असणार... हे त्या ई-सकाळच्या ढाली आडुन आत्तापर्यंत बघत होत्ये,.... काही सुचना इथे तिथे.... पण आता, सक्रीय आणि त्यांच्यामते पॉझिटीव्ह क्रिटिसिझमच्या मुडात शिरले..... ’अगं असं नाही... सईऽऽऽल धर बॅट... खाटकाच्या सुरी सारखी धरलीयेस.’, ला सुचना सुरू होऊन जेव्हा ’दोन्ही हात, पाय आणि डोळे तुझेच ना?’ इथपर्यंत बात आल्यावर.... तरा तरा समोर जाऊन उभी राहिले.... हातातला ई-सकाळचा पेपुरडा काढून घेतला आणि बॅट दिली हातात... म्हटलं... 'दाखवा... कसं ते... दाखवाच तुम्ही.... हा सूर्यं हा जयंद्रथ... होऊन जाऊदे.... तिथे बसून सूचना करणं ना... सोप्पय.... खेळून दाखवा म्हणते मी... तू बाजूला हो रे.... ते सर्व्ह करतायत तर मी फ़ेस करतेच.... आधी हे नेट ओलांडून ह्या बाजूला फुलं आली तर ना....’ लेकाने मला आवरलं का नाही कळलं नाही पण स्वस्थपणे बाबाच्या रिकाम्या खुर्चीत जाऊन मूव्ही बघायला बसतात तस्सा जाऊन बसला.... मग जे काय झालं ते झालं.... शांतपणे ह्यांनी पायातल्या चपला काढल्या. तो अजूनही भरलेला हारा जवळ घेतला आणि एका मागोमाग एक सर्व्ह्ज करायला सुरूवात केली.... आधी मला जरा मारता येतील अशा.... पण माझं हात आणि डोळे को-ऑल्डिनेशन अगदीच 'कोल्ड' असल्याचं लक्षात आल्यावर... मग मात्र एकदम बॉडीलाईन सर्विस.... अहो, अहो... म्हणत मी कुठेही पळाले तरी फुलं पाठलाग करतातच आहेत... ओरडून आणि हसून हसून लेकाचा घसा बसायला आला.... मी कचर्याच्या डब्याच्या मागे लपल्यावर ह्यांनी हातातली बॅट म्यान केली आणि ऐटीत चालत आपल्या स्थानाशी गेले... परत एकदा विजयी नजरेने आजूबाजूला पडलेल्या सड्याकडे बघत शांतपणे परत त्या खुर्चीत बसले.... एव्हाना माझा अवतार बघून हसू आवरून लेकाने बरीचशी फुलं हार्यात गोळा केली होती. माझ्याकडे एक ’नजर’ टाकून ह्यांनी परत ई-सकाळमध्ये डोकं घातलं. त्या संधीचा फायदा घेऊन मी अख्खा हारा ह्यांच्या डोक्यावर उपडी केला आणि घरात पळ काढला.... समाप्त. (ह्यातली सगळीच पात्रं आणि/किंवा सगळ्याच घटना खर्या नाहीत |