मी, शेखचिल्ली आणि साबण

Submitted by भरत. on 19 April, 2010 - 14:19

आज सकाळी मी माझ्या लेकीच्या, स्नेहाच्या आंघोळीची तयारी करत होते आणि, अरे देवा , साबणच नव्हता की हो घरात. म्हणजे तसे थोड्या वापरून झालेल्या दोन वड्या होत्या, पण आम्ही , म्हणजे मी आणि माझी लेक एक वडी फार तर ३-४ दिवस वापरतो. अहो का म्हणून काय विचारता?टी व्ही वरल्या जाहिराती पहात नाही का तुम्ही? त्यात कधी तरी कोणी बरबटलेला, झिजलेला साबण वापरताना पाहिलाय का तुम्ही? मग? आपल्या त्वचेची आणि सौंदर्याची काळजी घ्यायची म्हणजे एवढे करायलाच हवे ना?
तर मी काय सांगत होते, स्नेहाची आंघोळ आणि वडी नाही. मग तिला पिटाळले, म्हटले कोपर्‍यावरल्या वाण्याकडे जाऊन पटकन साबण आण बघू. तर पठ्ठी निघालीपण सायकलला टांग मारून.
अरे देवा! स्नेहाला कोणता साबण आणायचा हे तर मी सांगितलेच नाही. म्हणजे ती काही कपडे धुण्याचा किंवा भांडी घासण्याचा साबण आणणार नाही. पण स्नानाच्या साबणाचा ब्रँड सांगायला विसरले की मी ! अरे देवा! असे कसे झाले? आता मी काय करू?. लगेच पायात चप्पल अडकवली आणि धावले तिच्या मागे. (हो, येते मला हळू हळू धावता). तिने भलताच कोणता साबण आणला तर? गेल्या गुरुवारी माझ्या सख्ख्या जुळ्या बहिणीच्या लेकाला डिसेंट्री झाली तर डॉक्टरंनी भर दवाखान्यात तिच्या शॉपींग बॅग मधला साबण उचलून दाखवला आणि तिची लाज काढली इतक्या लोकात.
अरे देवा! मी पळता पळता माझे मनही पळू लागले . साबणाच्या फेसासारखे चित्रविचित्र विचार अविचार मला इथे तिथे लगडू लागले. स्नेहाने भलताच साबण आणला तर? तिची त्वचा खराब खरखरीत होईल,तिच्या चेहर्‍यावर डाग पडतील,तिचे सौंदर्य नष्ट होईल, मग तिला सौंदर्य स्पर्धेत भाग घेता येणार नाही, चित्रपटात कसली जाणार ती? टेनिसची मॅच पण हरेल ती. तिला नोकरी पण मिळणार नाही. आणि मग तिचे लग्न पण जमणार नाही. अरे देवा! धावता धावता माझे मन काळाच्याही पुढे धावत होते.
आले की वाण्याचे दुकान. पण स्नेहा नाही दिसत कुठे. ही गेली सुद्धा साबण घेऊन? अरे देवा!आता पुन्हा घरी परत पळत पळत जाणे आले.रस्ता ओलांडला आणि लक्षात आले वाण्याला विचारायला हवे होते स्नेहाला कोणता साबण दिला ते? आपला नेहमीचा 'तमाम' साबण पण घेऊन जायला हवे होते. पण आधी घरीच पोचते कशी. परत वळले आणि स्नेहाने भलत्या सलत्या साबणाने आंघोळ केली तर? अरे देवा!
आणि हे लोक वाटेत शिड्या लावून काय करताहेत? कसल्या टीव्ही मालिकेचे फलक लावताहेत. कशी कुरूप मुलगी दाखवलीय त्यात. काय बाई नाव तरी! तुझसे लागी लगान. आमिर खानचा लगान माहित होता आता हे लगान कसले? नाही नाही लगन आहे. म्हणजे लग्न की काय? म्हणजे अशा वेड्या विद्र्या मुलीवर पण मालिका काढतात का आताशा?हो ती जस्सी नाही का? आणि बिदाई आणि साथ फेरे मधे पण काळ्याच आहेत की त्या दोघी.म्हणजे सुंदर नसणार्‍या मुलींनाच डिमांड असते का आजकाल टीव्ही वर?….
अरे देवा मग चालेले की स्नेहाने दुसर्‍या कोणत्या साबणाने आंघोळ केली तर. तिचे टी व्ही वर करीअर पक्के.तो तमाम साबण आजपासून तिच्यासाठी बंद.
हुश्श! आले बाई घरी एकदाची. हे काय ? दार उघडेच? (मीच उघडे ठेवले होते वाटते?) आणि हे काय स्नेहा न्हाणीघराचे दार उघडेच ठेवून का आंघोळ करतेय्...अरे देवा त्याच तमाम साबणाने. काय झाले असते तिला वाण्याने दुसरा कुठला साबण दिला असता तर?पण आता बोलायला त्राण कुठी आहे मला?
आणि हे काय सासुबाईही आल्या माझ्या मागूनच त्यांची प्रभातफेरी आटपून. बरोबर शेजारच्या ठमाकाकूही आहेत तर. (नाव त्यांचे उमाकाकू,पण सगळे त्यांना मागून ठमाकाकूच म्हणतात). सासुबाई कशा त्या आयपीएल मधल्या क्षेत्ररक्षकासारख्या नको तिथे,नको तेव्हा पटकन टपकतात.
"अगं सुनबाई हे काय इतकी भिजलीस कशी तू? अगं स्नेहा न्हाणीघरात आहे म्हणून तू बाहेरच का अंगावर पाणी ओतून घेतलेस? बरं का उमाताई, आमच्या सुनबाईंना आघोळीची भारी आवड, दिवसातून दोनदा एकेक तास मन आणि साबण लावून आंघोळ करते हो ती.बाजारात साबणाचा नवा ब्रँड आला की हिने तो आणलाच म्हणून समजा."
सासुबाई पण अशा आहेत ना? कुजकट बोलताहेत की कौतुक करताहेत ते कळतच नाही कधी कधी. काल मला म्हणत होत्या, तुम्हारी बातोंसे तुम्हारी उम्र का पताही नही चलता.(हिंदी मालिका जास्त बघतात ना त्या,आणि त्यांच्यामुळे मी पण)

ते नंतर्..स्नेहाची आंघोळ झाली आहे, तर आपण आंघोळीला जाऊया कशा...आधीच घामाने आंघोळ झालीय

(या लेखाचा हेतू कुणाच्याही धार्मिक, सामाजिक, आर्थिक, वैज्ञानिक...इ.इ.भावना दुखावण्याचा नाही. साबणाच्या फेसासारखाच हा लेख अगदी हलका करून घ्यावा.)

गुलमोहर: 

खुप मस्त लिहीलय भरत...मजा आली वाचताना. त्या त्या जाहीरातींना रिलेट करता आल्यामुळे जास्तं मजा आली.

अरे देवा!
राहिलेच होते वाचायचे!
लोकसत्तात नाही जमले, पण इथे वाचला.. अगदी हलका लेख.. साबणाच्या फेसासारखा!

(अ‍ॅड एजन्सीवाल्यांना दाखवा जमल्यास, खूश होतील.. कदाचित.. माबो ते लोकसत्ता ते टीव्ही.. असाही प्रवास होइल)