भाषेच्या गमती-जमती

Submitted by अभय आर्वीकर on 4 March, 2010 - 21:25

भाषेच्या गमती-जमती
दोन महिण्यापुर्वीपर्यंत मी व्याकरणामध्ये फारच ढ्यॅ होतो हे तुम्ही जाणताच. माझ्या कवितांमधील व्याकरणाच्या चुका शोधून "त्यांनी" मला कसं धुतलं,पिळलं आणि वाळायला घातलं याचे तुम्ही जीते-जागते, चालते-बोलते साक्षीदार आहात. मात्र माझ्या व्याकरण अज्ञानामागे "हा विषय रटाळ" आहे एवढेच कारण नाही तर या विषयीची पराकोटीची चिड हे एक प्रमुख कारण आहे.
त्याचं काय झालं...
पाचव्या-सहाव्या इयतेत असतानाची गोष्ट. प्रशांतने इंग्रजीच्या मास्तरांना एक शंका विचारली. की Cut म्हणजे कट असे होते तर Put म्हणजे पट असे का होत नाही किंवा Put म्हणजे पुट होत असेल तर Cut कुट का होत नाही? यावर मास्तरांनी उत्तर देण्याऐवजी रागाने लाल होऊन असा काही जरब असलेला जबरी नेत्रकटाक्ष टाकला की प्रशांत हादरलाच. एवढा हादरला की त्याच्या हृदयाचे पाणी-पाणी झाले. त्याच्या हृदयाचे एवढे पाणी झाले की ते त्याच्या पायजाम्याखालून ओघळत ओघळत डाव्या पायाच्या आधाराने चक्क जमिनिवर उतरले.
व्याकरण एवढे जहाल आणि निर्दयी असते असे मला त्या दिवशी प्रथमच समजले. आणि "ह्रुदयाचे पाणी होणे" याचा अर्थही समजला. Lol
त्यामुळे व्याकरणविषयक कुठल्याही प्रश्नाचे उत्तर मी कधिच कुणाला विचारले नाही आणि म्हणुन माझे व्याकरण कच्चे राहीले.
खालील शब्दांचा मला अजुनही निटसा उलगडा झालेला नाही.
१) पायात चप्पल घालायची की चपलेत पाय घालायचे?
२) अंगात सदरा घालायचा की सदर्‍यात अंग घालायचे?
३) मामाची पत्नी मामी तर मेव्हण्याची पत्नी मेव्हणी का नाही?
४) हातात बांगड्या भरायच्या म्हणजे पोत्यात धान्य भरतो तशा भरायच्या?
असे अनेक प्रश्न अजुनही अनुत्तरित आहे.
जाणकारांनी उत्तरे द्यावीत.
वाचकानींही "भाषेच्या गमती-जमती" येथे लिहाव्यात.
......................................................................
भाषेच्या गमतीजमती-भाग-२
......................................................................

गुलमोहर: 

मास्तरांनी उत्तर देण्याऐवजी रागाने लाल होऊन असा काही जरब असलेला जबरी नेत्रकटाक्ष टाकला की प्रशांत हादरलाच.
--- आपल्या कडे मुलांमधे असलेली जिज्ञासा लहानणीच ठेचली जाते... Sad

तुमच्यासारखेच मला पण २ प्रश्न इयत्ता ६ वी पासून त्रास देतायत..
प्रगट आणि प्रकट हे दोन्ही शब्द भाषेत प्रचलित आहेत
पण प्रगट केव्हा वापरायचा आणि प्रकट केव्हा वापरायचा ते अजून समजत नाही.. Sad
तीच गत सिंह आणि सिंव्ह ची.. Uhoh
म्हणताना प्रगट आणि सिंव्ह म्हणायचं
आणि लिहिताना मात्रं प्रकट आणि सिंह असं लिहायचं का?

चिकटवणे कि चिटकवणे ... हा ही एक शब्द फसवाच लिहीताना फार त्रास द्यायचा. तसेच, झ्याक, भारी, लय हे बोली शब्द कधी, आणि कोणासमोर वापरायचे हे एक भान ठेवावं लागतं ....

चिड नव्हे चीड.. या जन्मी सुटका नाही म्हणायची. Happy
बाफ वाहून जावू नये म्हणून संपादन केले. Happy

दक्षिणा मराठी मध्ये नियम आहेत की कुठल्या अक्षराबरोबर आलेल्या अनुस्वाराचा उच्चार कसा करायचा.
त्यानुसार, अनुस्वाराच्या जागी म, न, औं किंवा व कधी म्हणायचं ते ठरतं.
आधीचा शब्द दंतव्य आहे, औष्ठ्य आहे का टाळूला लागून म्हटला जात आहे वगैरे नुसार कुठला उच्चार नैसर्गिक रित्या येतो - असं काहीतरी लॉजिक ह्या नियमांमागे असावं- असं मला वाटतं

उदाहरणार्थ
अनुस्वारानंतर येणारं दुसरं अक्षर प, फ, ब भ म पैकी असेल तर अनुस्वाराचा म होतो.
अ.मुंबई - मुम्बई (मुन्बई नव्हे)
ब. संपादक - सम्पादक (सन्पादक नव्हे)
क. संभ्रम - सम्भ्रम (सन्भ्रम नव्हे)

तसंच सिंहाचा सिव्ह असा उच्चारच बरोबर आहे.
संवत्सर ( सौवत्सर - सन्वत्सर नाही)
संसार - सौंसार - सन्सार नाही..

सध्या तरी येवढीच उदाहरण आठवताहेत..

उच्चाराच्या बाबतीतली आणखीन एक मजा:
मराठी आणि इंग्रजी मधल्या फ चा उच्चार वेगवेगळा असतो.
फणस म्हणताना ओठ घट्ट दाबून फ म्हटला जातो..
ह्याउलट फ्रेंड म्हणताना ओठ थोडेसे उघडून जीभेचा वापर करून म्हटला जातो..

म्हणून काही लोक इथल्या 'व्फाईव्ह' ला 'फायू' असे म्हणतात. देशकालाप्रमाणे भाषा बदलते.
फायु म्हणणार्‍यांना हसण्याची गरज नाही. एकाच शब्दाचे वेगळे वेगळे उच्चार वेगळ्य वेगळ्या देशात होतात. जसे शेड्युल नि स्केड्युल

परत मराठीकडे -
अनुस्वाराचे आणखी नियमः
अनुस्वारानंतर क, ख, ग, घ, येत असेल तर अनुस्वार ङ असा होतो उदा. कङ्कण
अनुस्वारानंतर च, छ, ज, झ, येत असेल तर अनुस्वार ञ असा होतो उदा. चञ्चल
अनुस्वारानंतर ट, ढ, ड, ढ, येत असेल तर अनुस्वार ण असा होतो उदा. कण्ठ
अनुस्वारानंतर त, थ, द, ध, येत असेल तर अनुस्वार न असा होतो उदा. सन्त
प वर्गाचा नियम वर दिलाच आहे.

सही झक्की.. सगळे नियम एकत्रित केल्याबद्दल..
हे असं सगळ शाळेत दिलं असतं तर अनेकांचा गोंधळ वाचला असता..
मी कुतुहलामुळे इन्जीनीयरिंगला असताना शोधलं.. नाहीतर अगदी नीट कळलच नसतं..

मराठीमधे एखाद्या शब्दातीला शेवटचे अक्षर वेलांटीयुक्त असेल तर नेहमी वेलांटी दीर्धच असावी असा काही नियम आहे का? ( मला शाळेत असताना सरांनी शिकवल्याचे आठवते) .
बघा ना, 'मराठी' ,'गमतीजमती' , 'वेगवेगळी', 'नाही', 'अनोळखी'
असं हिन्दीमधे होत नाही... हिन्दीमधे : 'नीति', संस्कृति' अशा पुष्कळ शब्दांची 'ति' -हस्व असते. मागे हिन्दी टायपिंग करताना यामुळे माझ्या चुका झाल्या होत्या.

<,< हे असं सगळ शाळेत दिलं असतं तर अनेकांचा गोंधळ वाचला असता.. >>
त्यासाठी पहिल्यांदा सर्वच मराठी विषय शिकविणार्‍या मास्तरांना यायला नको? Happy
येथे तर मराठी विषयच ऐच्छीक करण्याचा डाव खेळला जातो.

आमच्याकडे बोलतांना-लिहितांना "मला जाग आला" असे म्हणतात. मी पण तसेच म्हणतोय.
पहिल्यांदा सुरेश भटांचे "पहाटे पहाटे मला जाग आली" हे गीत ऐकले तेव्हा भटांचे भाषाविषयक ज्ञान कमजोर आहे असाच माझा समज झाला होता.
पण जेव्हा ''जाग" हा स्त्रीलिंगी शब्द आहे हे कळले तेव्हा माझीच बंडी उलार झाली.
आमच्या नागपुरी गावरान भाषेत जाग या शब्दाला "चेव" हा पर्यायी शब्द आहे आणि तोच वापरात आहे.
त्यामुळे "मला चेव आला" हे गांवढळ वाटले तरी शुद्ध वाक्य आहे.
पण जसजसा अशिक्षीत समाज शिक्षीतांच्या सानिध्यात यायला लागला तसतसे त्यांनी नवनवे शब्द ऐकून जाणिवपुर्वक आत्मसात केलेत. शब्द शिकता आलेत पण व्याकरण बोंबलले. कारण त्यांनी
"मला चेव आला" हे वाक्य फक्त शब्दबदल करून "मला जाग आला" असे उच्चारले.
आणि शुद्ध बोलण्याच्या नादात मुळात शुद्ध असलेलं वाक्य अशुद्ध करून टाकलं.
.
करू जाता काय, उलटे झाले पाय. आहे ना गंमत?
.
गंगाधर मुटे

आमच्याकडे चेव हा शब्द स्फुरण ह्या अर्थी वापरतात..
उदा:
एकदम चेव चढला मला... आता करुन बघुयातच ठरवलं मी
वक्ता असा गडबडलेला बघून आधीच हुल्लड करणार्‍या श्रोत्यांना आणखीनच चेव चढला!

आणि शुद्ध बोलण्याच्या नादात मुळात शुद्ध असलेलं वाक्य अशुद्ध करून टाकलं.
>> आधी मलाही असं वाटायचं की न आणि ण चा फरक झाला, असं काही वेगळं बोललं की अशुद्ध!
पण नंतर कळलं.. की ह्यातही गम्मत आहे. इतर भाषांचे इन्फ्लुएन्स होऊन मुळ भाषा कशी बदलते.. एखादा विशिष्ट भाग एखादा शब्द वेगळा का आणि कसा बोलतो वगैरे..
आणि मुळात कसं आहे, हे नियम लिहून ठेवायचं काम सुशिक्षित वर्गानं केलं, त्यामुळे त्यांनी त्यांना योग्य वाटणार्‍या गोष्टींना तसं नियमबद्ध केलं (म्हणजे तेच बरोबर असं कसं म्हणणार? विशेषतः गोष्टीचं लिंग वगैरे ठरवताना /दुसर्‍या भाषेतून काही बदल करून शब्द मराठीत आला असेल तेव्हा वगैरे)
तरिही वेळप्रसंगी मी पण कचाकचा भांडतेच ह्यावरून Wink

मी जेथे राहतो तेथे शुद्ध/प्रमाणभाषा जाऊ द्या, धड वर्‍हाडी किंवा झाडी बोलीभाषा देखील बोलली जात नाही. आमच्या बाजुला हिंदीभाषिक प्रदेश असल्याने आमच्या बोलीभाषेवर हिंदी भाषेचे प्रभुत्व आहे.

हिंदीमध्ये "तेरा साथ" म्हणतात ना म्हणून आम्ही मराठीत आम्ही "तुझा साथ" म्हणत आलोय.

बरोबर.
ते 'तुमची' मदत करण्यासाठीच म्हणताहेत. 'तुम्हाला' मदत केली तर कदाचित मराठी बुडेल Wink

>>
हे घ्या थोडे उत्तर.
३) मामाची पत्नी मामी तर मेव्हण्याची पत्नी मेव्हणी का नाही?

बहिणीचा नवरा बहिणा अन आईचा नवरा आय्या नसतो म्हणूण Proud

बाकीचे प्रश्न पास.

हा धागा कसा काय सुटला होता माझ्या वाचनातून Uhoh

माझ्या विदर्भातली मराठी भाषा ह्या धाग्यावरही मी उल्लेख केला होता ना की विदर्भात माझा पँट, माझी घड्याळी असे काही लिंगबदल होतात.

ते चेव आला प्रकरण भारी आहे. तसेच हिंदीत 'मजा आ गया' चे मराठीकरण काही काही लोक 'मजा आला' असे करतात. मी तरी 'मजा आली' असेच म्हणते.

Pages