* * * केत्याची लॉटरी * * *

Submitted by ऋयाम on 27 February, 2010 - 06:32

-------------------------------------------------------------------------------------------------------------
सदर कथा ही मानसी(रेईको लॉज) च्या पात्रांबद्दल आहे, पण ती भयकथेचा पुढचा भाग नाही.

"मानसी!!" (रेईको लॉजः भाग २)
(मुळ भयकथा इथे आहे: - http://www.maayboli.com/node/13380 ) ..... धन्यवाद.
-------------------------------------------------------------------------------------------------------------

....थंडी हळुहळू कमी होऊ लागली होती...
दिवस पालटु लागले तसे "रेईको लॉज" आणि त्यानंतर परत "आकाकुरा"ला जाणे वगैरे प्रकार, बर्‍याच अंशी सारेजण विसरले. अमित पुर्वीप्रमाणे परत कामात बुडुन गेला...
मानसीनं "लो-कॅलरी" जपानी जेवण बनवण्यात नवाच इंटरेस्ट शोधला होता.
आणि त्यासाठी आवश्यक "जपानी भाषा शिका" उपक्रम पण चालु होते.

गिरीश आणि केतन, खरं तर वेळ मिळेल तेव्हा "खायला काही मिळतंय का?" अशा भावनेनं त्यांच्याकडं जात असत, पण मानसीच्या "लो-कॅलरीच्या" वेडापायी चित्रविचित्र पदार्थ ताटात दिसु लागल्यानं त्यांचं येणं जरा कमी झालं होतं. गिरीशला विशेष आवड नसली, तरी खासा विरोधही नव्हता. केतनचा मात्र एकुणच जपानी गोष्टींना विरोध असल्यानं " 'अम्मा'कडं जेवायला?" ला तो आजकाल नाहीच म्हणत होता.. अमितला ऑप्शन नव्हता..
(अम्मा: अमित+मानसी)

केतनच्या "जपानी विरोधाला" देखील कारण होतं, जे त्याच्या मते रास्तही होतं.
"मी इंजिनीअर आहे. ही 'चिंगच्युंग' भाषा का शिकावी मी?
मला कुठेतरी 'प्रॉपर' फॉरेनमधे, आय मीन 'युएस' किंवा 'युके' ला जायचं होतं. 'ऑस्ट्रेलिया' पण चाललं असतं..
आणि माझा चान्सपण होता पुढच्याच वर्षी.
तेवढयात टोक्यो ऑफिसला रिक्वायरमेंट आली आणि मला इकडं पाठवलं. "कंपनीच्या वेलफेअरसाठी" म्हणे...
कसंतरी करत त्याचंही काम चालु होतं..

पण आज केतनचा वाढदिवस! बाकी काहीही असो, स्वतःच्या वाढदिवशी आनंदात नसलेला माणुस विरळाच!
या नियमाप्रमाणे तोही खुश होता...
"चल, अम्माकडं जाउया. " गिरीश म्हणाला.
"तुझ्या मारी तुझ्या... वाढदिवसाला पण उकडलेली रताळी खायला घालणारेस काय?" वैतागत केतन म्हणाला.
"नाही रे.. तिच्याकडे फक्त कॉफी घ्यायची. जरा बसुन मग बाहेरच जायचंय जेवायला. एक अमेरिकन रेस्टॉरंट आहे. तुला वाटेल एकदम तुझ्या अमेरिकेत गेल्यासारखं.. मस्त "चिकन फिंगर्स", "बफेलो विंग्स" खाता येईल. क्या बोल्ता??",
'दे टाळी' करत गिरीश म्हणाला.
"वा." हे ऐकुन केतनही खुश झाला.

"अरे हो, ते तुझं लॉटरीचं तिकीट घेतलंस काय? आज संध्याकाळी फुटणार आहे.", गिरीश.
"जानी..." खिशातलं तिकीट काढुन दाखवत, गिरीशकडे 'तिरपा कटाक्ष हुश्शार' टाकुन केतन बोलला.
"संध्याकाळी ६:३०ला फुटेल. पण आपण तुझ्या पार्टी मधे असु. उद्याच कळेल.. "
.. "किंवा रात्री ऑनलाईन बघु..आजच्या दिवसाला महत्त्व आहे. राईट? " .. गिरीश
गुरुनं चेल्याला काही नवं शिकवलं आणि चेल्यानं ते बरोब्बर पिकअप केलं की गुरु जसा खुश होईल, तसा खुश होत, "राईट..." केतन बोलला.

आजच्या दिवसाचं महत्त्व जे आहे, ते केतन साठी. कारण आज त्याचा वाढदिवस!!
"जन्म झालेली तारिख माणसासाठी अत्यंत महत्त्वाची असते! ", हे पहिलं वाक्य होतं केतननं आणलेल्या 'न्युमरॉलॉजीच्या' पुस्तकात. त्यानं पन्नासदा हे गिरीशला सांगितल्यामुळं त्यालाही हे पाठ झालं होतं.
"जपानमधे ट्रेनचा प्रवास फार.." म्हणुन केतननं भारतातुन येताना काही पुस्तकं आणली होती, त्यातच हेही होतं.
आधी आधी कुतुहल होतं, पण जसजसं त्याचा अभ्यास वाढला, तसतसा त्याचा विश्वास वाढत गेला आणि आता
दृढ झाला होता.

गिरीश: -
जन्मतारिख २३ जुलै १९८१.
प्रारब्ध अंक ४. म्हणजे २३ चे (२+३) जुलै चे (७) आणि १९८१ चे (१९)=३१(३+१)=४.
भाग्यांक ५. म्हणजे २३ चे २+३

गिरीशला इंजिनीअरींगला अ‍ॅडमिशन मिळाले ती तारिख २३ जुलै.
पहिला जॉब मिळाला तेव्हा वयः २३.
गिरीश जपानला आला, ती तारिख २३ जुलै २००६. योगायोग की न्युमरॉलॉजी?
अर्थात न्युमरॉलॉजी!

अशाच प्रकारे त्यानं आपल्या खास मित्रांचा स्टडी चालु केला होता.
काही लोक चेष्टाही करत. पण "अशांच्या नादी लागायचं नाही" असा केतनचा दृष्टीकोन होता.

आपण रहातो त्या घराचा नंबर! हाही किती महत्त्वाचा आहे, हे केतनला माहीत होतं.
तोही ४ होता. गिरिशसाठी परफेक्ट. केतनचा स्वतःचा 'भाग्यांक' ४ नसला, तरी ४ हा त्याच्या 'भाग्यांकाचा मित्र अंक' असल्यानं त्याला धोका नव्हता. एकच प्रॉब्लेम होता, 'बिल्डींगचे नाव'. नावात एक "ए" कमी होता. तसं, "बिल्डींगचं नाव बदलावं " अशा विचाराचा तो होता, पण त्यासाठी "जपान्यांना न्युमरॉलॉजी समजावा" वगैरे प्रकार आले असते, म्हणुन तो ते टाळत होता. मात्र, स्वतः पत्ता लिहीताना तो कमी पडणारा "ए", तो न चुकता 'अ‍ॅड' करत होता.

'अम्मा' लोकांनाही हे विशेष पटत नाही हे केतनला माहित होतं. एक गिरीशच होता, ज्याला इंटरेस्ट होता. म्हणुनच त्यानं केतनला लॉटरी घेण्याबद्दल सुचवलं होतं. तसं २-३ वेळा त्यांनी एकत्र जाऊन लॉटरी घेतली होती.
तीनपैकी दोन वेळा "१००" येन लागले होते. पहिल्या वेळी फुकट गेले होते पैसे.
हे कसं काम करतं तर: -
"२००येन" चं एक तिकीट. त्याच्यावर सहा आकडे खरडायचे. जर आपले आणि त्यांचे आकडे जुळले, तर 'जय हो!'
असा साधा सरळ हिशोब होता. महिन्यातुन दोनदा "सोडत" असते...

"काय आकडे खरडतोस", "कुठल्या दिवशी खरेदी करतोस" आणि, "लॉटरी कधी फुटणार?" अशा तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत..... केतन गिरीशला म्हणाला होता.
'तिनही गोष्टी बघुन' तिकीट घेऊनही मागच्या वेळेसही फक्त "१०० येनच" लागले, म्हणुन गिरीश नाराज होता.
केतनकडे मात्र यावर उत्तर होतं.
"थोडा थांब. 'भाग्यांक' बरोबर त्याचं काम करतो आहे. त्याचेच हे १००येन.
पण 'भाग्यांक' आणि 'प्रारब्ध अंक' एकत्र काम करु देत. मग बघ..." केतन.
"म्हणजे?? " गिरिशला काही कळेना.
"म्हणजे, माझा वाढदिवस. तो असाही माझ्यासाठी प्रचंड लकी असेल. वर्षात सर्वात लकी! विसरलास?"...केतन.
"आयला केत्या. लय भारी रे..'भाग्यांक' आणि 'प्रारब्ध अंक' एकत्र काम करणार!! जिंकलाय्स भावा!" गिरीश..
"यु जस्ट वेट अँड वॉच बडी...", गिरीशकडे 'तिरपा कटाक्ष हुश्शार' टाकत केतन बोलला...

५ तारखेला दोघं गुपचुप लॉटरी सेंटरला गेले.
गिरीशच म्हणाला होता.. "गुपचुप जाऊ. 'अम्मा'लोकांना कळलं तर चेष्टा करतील..."
'५' हा गिरीशच्या भाग्यांक!
"अरे, ही लॉटरी कधी फुटणार आहे?" गिरीश.
"१० तारखेला..." हसत केतन म्हणाला.
ते ऐकुन गिरीशचे डोळे चमकले! '१' हा केतनचा भाग्यांक. एकुण काय? दोघांनाही दिवस एकदम चांगला होता.
पण केतनला हमखास 'लॉटरीचा योग' होता..
त्यानं केत्याला मुजराच ठोकला... "महाराज, मी आपला सेवक आहे. ही लॉटरी आपली, आणि केवळ आपलीच आहे. ही लागल्यानं आपण अजुनच मोठे व्हाल, पण तरीही या पामराला विसरु नका हीच कळकळीची विनंती.
आणि फार नाही, 'दहा एक लाख' माझ्या खात्यावर जमा करावेत, ही विनंती...
"महाराजांचा विजय असो.. केतनरावांचा विजय असो...." हसत तो म्हणाला....
"बर थांब. तुझा बड्डे आहे ना? मी पण तुला एक गिफ्ट देतो. हे एक तिकीट माझ्याकडुन. असं म्हणत, त्यावर काही नंबर खरडुन एक तिकीट त्यानं केतनला दिलं..."
"आभार!!" , केतन हसत म्हणाला..

आणि आज, केतनचा वाढदिवस! '१० तारिख'. सारं सेट झालं होतं. त्यातुन रविवार होता. 'शुभ दिवस', न्युमरॉलॉजीप्रमाणे. '५ तारखेला' तिकीट काढलं. तो केतनच्या '१०' अर्थात '१' चा 'मित्र अंक'. '१' वाल्यांचा शुभ रंग 'पांढरा'. म्हणुनच त्यानं आपला 'शालजोडी'तला 'पांढरा' शर्ट घातला...
"काही विशेष आहे असं दाखवु नकोस", असं गिर्‍यानंच त्याला बजावलं होतं. नाहीतर आज तो स्पेशल 'केशरी' शर्ट घालणार होता, जो 'पांढर्‍यापेक्षा जास्ती शुभ' होता...

अमेरिकन रेस्टॉरंटमधे जेवण छान झालं.
'अम्मा' लोकांनी आणलेलं गिफ्ट मिळताच केतननं गिर्‍याकडं बघितलं.
'न्युमरॉलॉजी!', केत्या काहीही न बोलता गिर्‍याच बोलला.. केत्या खुलला..
अंदाज होताच, त्याप्रमाणं बराच उशीर झाला.
"पाच मिनीटं घरी येऊन जा" असं बोलणं होत होत गिर्‍या आणि केत्या 'अम्मा' लोकांकडे आले.
दुपारी येतो म्हणले होते, पण उशीर झाल्यानं ते जमलं नव्हतं..
गिर्‍या केत्याला सारखा खुणा करत होता. केत्यालाही ते समजलं होतं.
त्यानं डोळ्यांनीच गिर्‍याला 'थांब.. मी बघतो..' असा इशारा केला.
गिर्‍याला लॉटरीचा निकाल बघायची उत्सुकता लागली होती.

अमित हातपाय धुवायला बाथरुम मधे गेला आणि मानसी कॉफी बनवायला स्वैपाकघरात.
केत्या आणि गिर्‍या.. दोघांचंही लक्ष शेजारीच टेबलावर ठेवलेल्या लॅपटॉपवर गेलं.
'गाणी लावतोस का रे केत्या?', भोळ्या आवाजात गिर्‍या त्याला म्हणाला.
हो. अरे, पण 'लिंक' तर सांग.. केत्या वैतागत, पण वैताग न दाखवता म्हणाला.
गिर्‍यानं लिंक टाईप केली. केत्याला 'बड्डे गिफ्ट' म्हणुन घेतलेल्या 'लॉटरीचे नंबर्स लिहीलेला कागदही' ठेवुन लगेचच तो मानसीशी बोलायला निघुन गेला. मुळ कागद त्यानं घरी सुरक्षित ठेवला होता.

केत्यानं इंटरनेटवर लिंक उघडली.
सारा 'कचरा' दिसत होता. जपानीमधल्या कागदपत्रांना/कण्टेण्टला तो जाहिरपणे 'कचरा'च म्हणायचा.
पण बरं होतं, की त्याला फक्त त्यातल्या 'सर्वात वर असलेल्या निकालात', आपले आकडे बघायचे होते.
'सर्वात वर असलेला निकाल', हा लेटेस्ट लॉटरीचा निकाल असतो. ', गिर्‍यानं सांगितलं होतं.

त्यानं लिस्ट बघितली. फक्त एक आकडा मिळत होता. म्हणजे ३०० येन मिळाले.
नाही म्हटलं, तरी केत्या थोडा हिरमुसलाच.
त्यानं चिडुन साईट बंद केली.

मग गिर्‍याकडं बघितलं. पण गिर्‍याचं लक्ष नव्हतं.
त्यानं गिर्‍यानं दिलेला कागद घेतला.
त्यावर आकडे आणि लिंकही होती.
आकडे असे होते: - ३, ४, ६, ८, १, ४.
४ दोनदा?? वेडा आहे का गिर्‍या? माझा एक नंबर फुकट घालवला.

साईटवर जाऊन त्यानं परत एकदा निकाल पाहिला.
'३, ४, ६, ८, १'.......... ' आई शप्पथ! ' केत्या ओरडायचाच राहिला होता.
पुर्वी टी.व्ही. वर खरखर आली की थोडंसं 'धाड-धाड' करुन हातानं आपटलं तो ठिक व्हायचा, तसं त्यानं लॅपटॉपला केलं. .. जणु काही स्क्रीन रिफ्रेश होणार होती.
पण असं वाटणं स्वाभाविक होतं, गोष्टच तशी झाली होती.... '३, ४, ६, ८, १'... सहा पैकी ५ नंबर बरोबर होते...
शेवटी भाग्यांक, प्रारब्ध अंक, वार आणि रंग. सार्‍याची ताकद दिसली होती.
केत्या रातोरात २ कोटी रुपयांचा मालक बनला होता.
"आणि हे गिर्‍यानं मिळवुन दिलंय. त्याला आपण देऊ १० लाख... ", केत्या विचार करत होता..

..."खरंच.. कधी वाटलं नव्हतं..
'काडीचाही संबंध नसताना' जपानला आलो.. आपलं नशीब किती खराब म्हणुन रडत होतो.
आणि आज... मला २ कोटी रुपये मिळाले आहेत. हे जपाननं मिळवुन दिलंय... "
"नुसता आराम.. आह.... "
"आधी काय करणार? तर यु-एस ला जाणार..."
"किंवा वर्ल्ड टुर...", अमोल म्हणायचा तसं...
"किंवा मग ठराविक देश... म्हणजे युएस. युके. ऑस्ट्रेलिया. ईजिप्त. रशिया. इटली.. आई शप्पथ.."
"सुख आहे.. पैसा.. सुख.."
"पण आता सगळ्यात आधी मी मस्त घरी जाईन. छान मोठ्ठं घर घेईन... आणि ही लेकाची कंपनी...
मॅनेजरच्या तर गां. वर ला. मारुन तिथुन बाहेर पडणार आहे.
त्याच्यामुळे मी इथे आहे.
आयला! म्हणजे हे त्यानं मिळवुन दिलंय!!" त्याच्या मनात आलं आणि केतन जोरात हसायला लागला.

तसे गिर्‍या आणि 'अम्मा लोक'ही हसु लागले. त्यानं केत्या भानावर आला.
"काय रे? काय झालं? काही जोक सांगितला का कोणी?" केत्या.
"काही नाही. तु एकटाच हसलास म्हणुन आम्ही हसलो..." अमित म्हणाला, "पण तु एवढा का खुश झालायस?
काय लॉटरी-बिटरी लागली की काय?".

"गिर्‍या, थँक्स भावा.." गिर्‍याला मिठी मारत केत्या म्हणाला. "तु.. तु मला गिफ्ट दिलेलं तिकीट.. ते लागलंय..!"
गिर्‍याचा विश्वास बसेना.. "काय? केत्या खरं सांगतोयस?? चेष्टा नाही ना? " गिर्‍य म्हणाला.
हे बघ.. '३, ४, ६, ८, १, ४' ... यातला शेवटचा ४ सोडला, तर बाकी सगळे लागलेत. ४ डबल असल्यानं एक नंबर वाया गेला. सर्वांना साईट दाखवत केत्या बोलला. या क्षणाला तो इतका एक्साईट झाला होता, की त्यानं एखाद्या जपान्यालादेखिल, थेट जपानीमधुन 'जपानी लॉटरी आणि न्युमरॉलॉजीचे माझे प्रयोग' वर शिक्षण दिलं असतं...

"मग? आम्हालापण देणार का नाही १०-१० लाख? मला १०, मानसीला १०?" अमित म्हणाला...
आणि केत्या विचार करु लागला. "आयला. एक मिनीट...... आम्हालापण"
तेवढ्यात मानसी फिसकली...
आणि अमित, मानसी आणि गिर्‍या तिघेही जोरजोरात हसु लागले.
केत्याला काहीच कळेना.
तो आळीपाळीनं तिघांकडं बघत होता.
तिघंही जोरजोरात हसत होते...
"काय झालं गिर्‍या??" केत्या रडायला आला होता.
"गंडवलं लेका तुला..." अमित म्हणाला.

"म्हणजे?? हे नंबर्स...",..... केत्या
"अरे.. ".. पण अमितला हसु आवरेना. "गिर्‍या.. हरामखोर.... सांग तुच...." तो म्हणाला.
"केत्या.. येड्या... मजा आली हा काय एकदम! थँक्स!", गिर्‍या बोलायला लागला. "तु सारखं न्युमरॉलॉजी-न्युमरॉलॉजी करायचास, ते बघुन मला वाटलं जरा गंमत करुया..."
"म्हणुन मी ते प्रारब्ध आणि भाग्यांक वगैरे जरा नीट वाचुन बघितलं आणि हा प्लान बनवला.", गिरिश...
"पण ते नंबर्स?? ते कसे खोटे असतील? वेबसाईट वाल्यांशी पण झोल केलास काय नालायका?? " केत्या गिर्‍यावर ओरडत म्हणाला... "आणि तुम्ही दोघं.. तुम्ही पण हरामखोर लेकाचे.. ", 'अम्मा' लोकांवर चिडत केत्या म्हणाला...

"लॉटरीचे नंबर्स निघाले, तरी साईटवर दुसर्‍या दिवशी अपडेट होतं महाराज. तुम्ही आत्ता ते मागच्या आठवड्यातले निकाल बघताय. म्हणुन तर ५-५ बरोबर आले....." गिरिशनं एका दमात सारंच सांगुन टाकलं होतं..."मागचा निकाल बघुनच मी त्या दिवशी तुझ्यासाठी कागद भरला होता. हे लाल अक्षरात, बोल्डमधे तेच लिहीलंय जपानी भाषेत. सॉरी. काय? 'कचरा' म्हणतोस ना?त्या कचर्‍यानं तुझा कचरा केला बघ.." आणि गिर्‍या जोरात हसायला लागला...

केत्यानं रुमालानं चेहेरा पुसुन घेतला... "गिर्‍या... तुज्यामारी तुझ्या...."
"अरे.... अजुन एक मज्जा ऐक! " गिर्‍या उत्साहात बोलताच, "काय?" केत्या बोलुन गेला.

गिर्‍या बोलु लागला.. "योगायोगाची गोष्ट आहे. पटणार नाही. पण बघ..
'३, ४, ६, ८, १, ४' हे आकडे लिहीले होते मी लॉटरीवर. बरोबर?"
"बरोबर.. पण शेवटचा आकडा: ४ चुकवलास...." केत्या.
"केळ्या.. ऐक.. " गिर्‍या म्हणाला.... '३, ४, ६, ८, १, ४' चं इंग्रजी स्पेलींग केलं तर काय होतं??
हे बघ... कागदावर खरडत गिर्‍या म्हणाला...

S T U P I D
'३, ४, ६, ८, १, ४'

आ वासुन केत्यानं गिर्‍याकडं पाहिलं.
"हॅप्पी बर्थ डे माय डिअर फ्रेंड...", गिर्‍या केत्याला म्हटला... बोलताना त्याचे डोळे विलक्षण चमकत होते.....

टीपः - न्युमरॉलॉजीवर माझा अविश्वास नाही! गंमत म्हणुन विषय घेतला आहे.
जपानी भाषेला शिव्या घालण्याचाही उद्देश नाही.
हे/इतर कोणतेही गैरसमज करुन न घेता, कथा वाचुन घ्यावी ही विनंती.
क. लो. अ. Happy

गुलमोहर: 

अतिशय मनोरंजक.
रईको लॉज भाग एक आणि दोन पण वाचून काढले. अशी कथा फुलवता येणं महत्वाचं. एका बैठकीत वाचून संपवल्या. Happy

रुयाम, जपानमध्ये बसून आकडे लावत असशील अस स्वप्नातही आलं नव्हतं माझ्या. बर झाल सांगितलस ते.
'केशरी पांढर्‍यापेक्षा शुभ्र' अस वाचलं मी आधी. ते स्टूपिड आवडलं. हल्लीच एका न्युमरोलिजिस्टच ओझरतं दर्शन झालं. संजीव कुमार, दिलीपकुमार यांची नाव बदलली नसती तर अभिनयक्षमता असूनही त्याना कोणी भीक घातली नसती हे त्याचं निघता-निघता त्याने केलेले स्टेटमेंट. असो.
कथा गंमतशीर आहे.

धन्यवाद सर्वांना!

मंदार्_जोशी साहेब)
फुल्ल आभार!

शिरोडकर साहेब)
>संजीव कुमार, दिलीपकुमार यांची नाव बदलली नसती तर अभिनयक्षमता असूनही कोणी भीक घातली नसती
"बड्डे ला गिफ्ट मिळतं हे न्यु~ ची कमाल" हेही त्यासारखंच झालं की हो:)

र.च्या.क.
"कृपया आमच्या येथे न्युमरॉलॉजी, पत्रिका, हात, चेहेरा सर्व प्रकारची भविष्ये पाहिजे तशी करुन मिळतील.
हवे तेव्हाचे मुहुर्त काढुन मिळतील. सदर विद्यांचे वर्गही चालु आहेत.
पात्रता: 'धावी पास'. (शक्यतो.)
खास लोकाग्रहास्तव "टॅरोट रिडींग", "सायकिक रिडींग" चे वर्गही लवकरच चालु करत आहोत.
चुक भुल देणे घेणे"
असा बोर्डच करुन घेतला आहे.

>>"सायकिक रिडींग" चे वर्गही लवकरच चालु करत आहोत. "
स्वगत :
अरे देवा, अशा ठिकाणी फिरकायलाही नको.
न जाणो, प्रॅक्टिकलला सब्जेक्ट म्हणून पकडून न्यायचे Uhoh

लहानपणी वाटायचे की आता विज्ञानयुग येऊ घातलेय. नशिबावर विसंबण्याचे प्रकार कमी होतील.
उलट झालेय.
पण यामागे आर्थिक असुरक्शितता हेच असावे वाटते.
..................
र.च्या.क.
<<, "सायकिक रिडींग" चे वर्गही लवकरच चालु करत आहोत.">>
स्तुत्य उपक्रम आहे.....! Happy

अरे मी पण एकदा १०० येनचे एक तिकिट घेतले होते,
असेच गम्मत म्हणून, आम्हाला काही नाही Sad
पण असे बरेच १०० येन लॉटरी विकणार्‍यांच्या नशिबात होते.

फार पुर्वीची गोष्ट.
माझ्या आजिचा मरण्यापुर्वी फोटो काढायचा म्हणुन शहरात गेलो तेव्हा
अनयासे लॉटरीवाला गळ घालत होता म्हणुन आजीच्या हाताने १ रुपयाचे
तिकिट काढले होते.
काही नंबर लागलेत आणि २५० रु. मिळालेत.
त्याच पैशाने घरात इलेक्ट्रीक घेतली होती.
म्हणजे
आजही आमच्या घरात जो उजेड पडतो तो लॉटरीच्या पैशानेच म्हणायचा. Sad

फारच सुंदर! मला खूपच आवडली.
मानसीचे दोन्ही भागही छानच जमलेत. अभिनंदन!
तुमचं इतर लेखन वाचायला मिळेल का?

मस्त