आमचे एफबीआयचे खाते भलतेच नाणावलेले आहे. ऑर्कूटवरचे फेक प्रोफाईल पकडणा-या पथकाचा मी प्रमुख होतो. सध्या माझी बदली गुप्तवार्ता विभागात झालेली आहे. ग्लोबलायझेशन मुळे आमच्यावर कामाचा ताण वाढलाय. भारत नामक देशांत सीबीआय नावाची एक तपासयंत्रणा आहे. ही यंत्रणा पुरावे नष्ट करण्याचे काम करते. गुन्हेगाराला वाचवण्यासाठी ही यंत्रणा जगामधे अव्वल मानली जाते. आमचे काम मात्र त्याला पकडणे हेच झालेय...!!
भारतात राजकीय, सामाजिक प्रवाह, अंतर्प्रवाह आणि सुप्तप्रवाह नेहमीच वेगवेगळ्या डोंगरउतारावरून वाहत असतात. या प्रवाहांनी त्सुनामी आणू नये म्हणून तेथील शासन दक्ष असते. सध्या आम्हाला अशाच क्षेत्रातील गुप्तवार्ता काढण्याचे काम सोपवलेले आहे. तपासादरम्यान आम्हाला असे आढळून आले कि या राजकिय आणि सामाजिक उतारांवरती आत्मचिंतन नावाची एक भयंकर उलथापालथ चालू आहे.
आमच्या प्रतिनिधीच्या अहवालातील काही भाग आम्ही इथे फोडत आहोत.. ( आदेशावरून !!)
--------------------------------------------------
आत्मपरीक्षण - एका दलित नेत्याचे
जयभीम,
आमचे आत्मपरीक्षण जे आम्ही करत आहोत ते आम्ही आमच्या साहेबांबरोबरच मिळून करणार होतो ( तॉ वर जोर देऊन गाणे म्हटल्यासारखा सूर ). आत्मपरी़क्षणासाठी आम्ही पंढरपूर हे तीर्थक्षेत्र सोयीचे ठिकाण म्हणून निवडले होते. पण साहेबांनी आमच्या त्या जागेवर खुंटी मारून आमचा तंबू शिर्डीत ठोकला. तुम्ही पुढे व्हा मी आलोच असे सांगून साहेब जे गेले ते हातावरच्या घडयाळाला चावी भरूनही पुन्हा आलेच नाहीत. दहा वाजून दहा मिनिटांचा मुहूर्त आम्हाला अपशकुनी ठरल्याने आम्ही ते घड्याळच काढून फेकून दिले.
आत्मपरीक्षणास आमचा कधीच नकार नव्हता. हाय काय अन नाय काय ? पुण्याच्या शिवाजी स्तेडियममधे माझी आणि अकोलकरांची कुस्ती लावा. आम्ही अंगाला लाल रंगाची माती लावून तयारच आहोत, पण ज्याच्या संघटनेच्या नावातच संघ आहे तो पहिलवान आत्मपरीक्षणास तयारच होत नाही. नाही आम्ही त्यांना अस्मान दाखवले तर पुन्हा आत्मपरीक्षण करणार नाही !
आम्ही आत्मपरीक्षणासाठी जत्रा हरवली. सामूहिकरित्या आत्मपरीक्षण करावे असे ठरले. सगळे आले हो. मोठ्ठी सभा झाली मुंबईत. विदर्भातले एक गायक (ज्यु) आणि आम्ही स्वतः, यांनी विचारपीठावरच एकमेकांचे यथेच्छ आत्मपरीक्षण केले. त्याचा राग येऊन गायक मॅडमच्या हातात हात घालून नांदेडला गेले. जाईनात का गेले तर.. पण आमचा गेम कसा झाला हे आता सांगणार आहे.. बारामतीचे बेभरवशाचे जे घड्याळ आम्ही फेकून दिले होते ते त्या अकोल्याच्या भगोड्या पैलवानाने दुरूस्त करून स्वतःच्या हातात बांधले..
समाजाच्या हितासाठी जे घड्याळ आम्ही फेकून दिले होते ते पुन्हा शोधून आणून चालू करून देणा-या या प्रवॄत्तींचे जाहीर आत्मपरीक्षण आपण सर्वांनी करावे... अशी आमची नम्र विनंती आहे...
( आत्मपरीक्षण संपले. फुलाफुलांचा नवा शर्ट चढवण्यासाठी नेते निघून जातात )
पुढच्या भागात