वांगे अमर रहे…!
कॉलेज संपवून शेती करायला गेलो तेव्हा गावातील इतरांकडे नाही ते ज्ञान आपल्याकडे आहे असा माझा दृढ समज होता आणि त्याच आविर्भावात मी शेतीची सुरुवात केली. या सर्व जगाच्या लेखी मूर्ख असलेल्या शेतकर्यांना स्वानुभवाने शहाणे करण्यासाठी भरघोस उत्पन्न घ्यायचे ठरविले. दोन महिन्यांत नगदी पैसा मिळवून देणारे पीक म्हणून वांगीची निवड केली आणि ५ एकरात वांगीची लागवड केली. मेहनत,जिद्द सर्वस्व पणाला लावलं. मेहनत फळा आली. भरघोस पीक आलं. अन्य शेतकरी घेतात त्याच्या १-२ नव्हे चक्क ५-६ पट उत्पादन मिळालं. आणि इथेच माझे ग्रह फिरले.
माझी वांगी बाजारात गेली आणि स्थानिक बाजारात वांगीचे भाव गडगडले. ५ रुपयाला पोतं कुणी घेईना. वाहतूक,हमाली,दलाली वजा जाता जो चुकारा मिळाला ते पैसे बसच्या तिकिटालाही पुरले नाहीत. शेतात घेतलेली मेहनत आणि वांगी फुकटात गेली. असे काय झाले? काहीच कळत नव्हते. प्रारंभीच म्हटल्याप्रमाणे माझ्या नजरेत इतर शेतकरी अडाणी,मूर्ख असल्याने त्यांच्याशी सल्लामसलत करण्याचा प्रश्नच नव्हता. शेवटी निष्कर्ष निघाला की मार्केटमध्ये गरजेपेक्षा जास्त माल गेल्यामुळे भाव पडले. कारण ग्राहकाला जेवढी गरज असेल तेव्हढीच तो खरेदी करेल. माझी वांगी खपावी म्हणून ग्राहक पोळी, भात, भाकरीऐवजी नुसतीच वांग्याची भाजी खाऊन पोट थोडीच भरणार आहे? स्थानिक बाजारात गरज, मागणीपेक्षा जास्त माल गेल्याने ही स्थिती झाली त्याला जबाबदार मीच होतो. इतर शेतकर्यांनी सायकलवर आणलेली अर्धा पोतं वांगी सुद्धा माझ्या मुळे बेभाव गेली होती. सायकलवर अर्धा पोतं वांगी आणून उदरनिर्वाह करणारे माझ्यामुळे अडचणीत आले.
झाली चूक पुन्हा करायची नाही म्हणून दुसर्या खेपेस वांगी आदिलाबादला न्यायचे ठरवले. माझ्या गावाहून १५० किमी अंतरावर मोट्ठी बाजारपेठ असलेले आंध्रप्रदेश मधील आदिलाबाद शहर. ६० पोती वांगी न्यायची कशी? स्पेशल वाहनाचा खर्च परवडणार नव्हता म्हणून माल बैलबंडीने हायवे क्रं. ७ पर्यंत नेला. रायपुर – हैदराबाद जाणार्या ट्रकला थांबवून माल भरला. तिथे हमाल किंवा कुली नव्हताच त्यामुळे मीच ट्रकड्रायव्हरच्या मदतीने माल चढविला. ६० पोती प्रत्येकी वजन ५०-५५ किलो. अनुभव नवा होता. मजा वाटली (?) शेतकरीcumहमाल.Two in One.
आदिलाबाद गाठले.
तिथल्या मार्केटची गोष्टच न्यारी. मार्केटमध्ये पाय ठेवायला जागा नव्हती.
वांगेच वांगे.
अत्र तत्र सर्वत्र वांगेच वांगे.
जिकडे तिकडे चोहीकडे, वांगेच वांगे गडे, आनंदी आनंद गडे.
मार्केट वांग्यांनी भरलं होतं. त्या संदर्भात एका शेतकर्याला विचारले.
“यंदा हवामान वांगी साठी फारच अनुकूल असल्याने वांगीचं भरघोस उत्पादन आलंय.” तो शेतकरी.
“भाव काय चाललाय?” माझा प्रश्ऩ.
“सकाळच्या लिलावात ५-६ रुपये भाव मिळाला.” तो शेतकरी.
“किलोला की मणाला?” माझा प्रश्ऩ.
“किलोला? अरे यंदा किलोला विचारतो कोण? पोत्याचा हिशेब चालतो.” तो शेतकरी.
“म्हंजे? पोतभर वांगीला ५-६ रुपये?” माझा प्रश्ऩ.
“पोतभर वांगीला नाही, पोत्यासहित पोतभर वांगीला.” तो शेतकरी.
“रिकाम्या पोत्याची किंमत बाजारात १५ रुपये असताना पोत्यासहित पोतभर वांगीला ५-६ रुपये? “मी मलाच प्रश्न विचारीत होतो. हे कसं शक्य आहे?
"१५ रुपये किंमतीच्या रिकाम्या पोत्यात ५०-५५ किलो वांगी भरली की वांगीसहीत पोत्याची किंमत घटून ती ५ रुपये एवढी होते" हे समिकरण मला कुणी शिकवलंच नव्हतं.
विश्वासच बसेना, पण समोर वास्तव होतं.
“आता लिलाव केव्हा होईल?” माझा प्रश्ऩ.
“इथे नंबरवार काम चालतं, मी काल आलो, माझा नंबर उद्या येईल कदाचित.” तो शेतकरी.
“तोपर्यंत वांगी नाही का सडणार?” माझा प्रश्ऩ.
यावर तो काहीच बोलला नाही. मूक होता. डोळे पाणावले होते, एवढ्या मेहनतीने पिकविलेलं वांगं सडणार म्हटल्यावर त्याचा जीव कासावीस झाला होता.
आता माझ्याही मनात कालवाकालव व्हायला लागली.
आपला नंबर तीन दिवस लागला नाही तर अर्धी वांगी नक्कीच सडणार. डोळ्यादेखत वांगी सडताना पाहणं मानसिकदृष्ट्या पीडादायक ठरणार होतं. मी मनातल्या मनात गणित मांडायला सुरुवात केली. तीन दिवसात किमान अर्धी वांगी नक्कीच सडणार. उरलेली ३० पोती गुणिला ५ वजा तीन दिवस जेवणाचा, निवासाचा खर्च बरोबर उणे पंधरा ( -१५) म्हणजे वांगी विकण्यासाठी मला जवळून १५ रुपये खर्च करावे लागणार होते.
काय करावे मला सुचत नव्हतं, डोकं काम करीत नव्हतं, माझं सर्व पुस्तकी ज्ञान उताणं झोपलं होतं.
आता पुढे काय?
निर्णय घेतला. एकदा डोळेभरुन त्या वांगीकडे पाहिलं. गुलाबी-गुलाबी, तजेल आणि टवटवीत. कुणाचीही दृष्ट लागावी अशी. ते दृश्य डोळ्यात साठवलं, एका झटक्यात वांगीकडे पाठ फिरविली आणि गावाचा रस्ता धरला. गावाजवळ आलो तेव्हा दिवस उतरणीला आला होता. आणि आता मला एका नव्या समस्येने ग्रासले होते. गावांतील शेतकरी मला यासंदर्भात विचारतील त्याला उत्तर काय द्यायचे? मूर्ख शेतकर्यांच्या नजरेला नजर भिडविण्याचे धाडस विद्याविभूषित शहाण्याकडे उरले नव्हते. मग एका चिंचेच्या झाडाखाली विसावलो. तेथेच टाईमपास केला. गावातील सर्व लोक झोपी गेले असतील याची खात्री झाल्यानंतरच गुपचिप चोरपावलाने गावात प्रवेश केला.
आजही मला दिसतात.
..ते ..वांगे..
गुलाबी-गुलाबी, तजेल आणि टवटवीत. कुणाचीही दृष्ट लागावे असे, अजूनही न सडलेले.
आणी माझ्या दृष्टिपटलावर अमर झालेले.
गंगाधर मुटे
………… **…………..**…………..**…………..**………….
दिनांक : ११-०२-२०११
मेहता पब्लिकेशन हाऊस आणि मी मराठी.नेट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
लेखन स्पर्धा २०१० या स्पर्धेचा आज निकाल आला असून
या स्पर्धेत "वांगे अमर रहे...!"
या लेखाला उत्तेजनार्थ पारितोषक जाहीर झाले आहे.
माझी वांगंमय शेती तोट्यात गेली पण वांङ्मय शेतीला बरे भाव मिळत आहेत.
----------------------------------------------------------------------------
प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे
प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार..
वांगी ही भाजी माझ्या आवडीची
वांगी ही भाजी माझ्या आवडीची नाही. घरी केली की मी नाक मुरडते. पण ह्या लेखाने माझे डोळे खरंच उघडले. आपण पैसे फेकून भाजी घेतो पण त्यामागे किती प्रचंड कष्ट आणि मेहनत असते, जिचा मोबदलासुध्द्दा ह्या देशात मिळत नाही.
मला ताटावर बसून नाकं मुरडायला काय जातंय. पण आजपासून बंद. सगळ्या भाज्या खायचा मनापासून प्रयत्न करणार आहे. बघू कितपत जमतंय ते. गंगाधर मुटे धन्यवाद!
कोणीतरी माल फेकून
कोणीतरी माल फेकून देण्यापेक्षा निम्म्या दरात गोरगरीबाना विकण्याची सूचना केली आहे. दिसायला फारच रोमँटिक वाटते ते. पण फसवे. मला लहानपणी वाटायचे नोटा म्हणजे पैसा. मग गरिबी दूर करण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणावर नोटा का छापत नाही.? एकदम गरिबी हटाव. तसे वैयक्तिक ग्राहकाला जो माल विकला जातो त्याला हात विक्री असे म्हनतात आणि ते किरकोळ व्यावसायिक करतात. त्यावर त्याच्या दिवसाच्या श्रमाचे मूल्य मिळते. तसेच कुठलाही किरकोळ भाजी वेक्रेता केवळ वांगी , केवळ टोमेटो विकत नाही. सर्व भाज्या थोड्या थोड्या विकतो. १०० तले १० च ग्राहक वांगी साधारण पने नेतात असे मानले तरी फार स्वस्त मिळताहेत म्हणून कुणी नुसती वांगी खात सुटत नाही.त्यामुळे त्या ग्राहक संख्येत फार तर दिडेक पटीने फरक पडेल. (शेपूची भाजी अगदी एक पैशाला किलो दिली तरी ती मी घेनार नाही. ) शिवाय शेतकर्याने पाच दहा पोती वांगी हातविक्रीवर विकणे शक्य नाही. शिवाय त्याला विक्रयकला अवगत असणे प्रत्येक वेळी शक्य नाही .तेही वेगळे स्किल आहे. त्याला मनुष्यबळही लागते. त्याने शेती करावी की तराजू काटा घेऊन बसावे? वितरण व्यवस्थेचे समाजात आणि अर्थव्यवस्थेत वेगळे स्थान आहे. अन्यथा कारखानदारानी डिलर्सना कमिशन देण्याऐवजी कारखान्याच्या बाहेरच दुकाने लावून निम्म्या किमतीत साबण, प्रसाधने , टीव्ही दिले असते. नाशवन्त मालाच्या बाबतीत ज्यात मिनिटामिनिताला मालाची किंमत कमी होत जाते त्यात तर ही सूचना एकदम अशक्य आहे......
<< वितरण व्यवस्थेचे समाजात
<< वितरण व्यवस्थेचे समाजात आणि अर्थव्यवस्थेत वेगळे स्थान आहे. >>
रॉबीनहूड,
कोणीतरी माल फेकून देण्यापेक्षा निम्म्या दरात गोरगरीबाना विकण्याची सूचना केली आहे. यात त्यांचा भावनिक आणि प्रामाणिक हेतु आहे. शेतकर्यांच्या व्यथांची जाणिव झाल्यावर सहज आणि स्वाभाविक व्यक्त झालेली भावना आहे.शेतकर्याविषयीची तळमळ आणी आपुलकी आहे.
पण गंभीर बाब अशी की तुम्हाला जे कळते ते अजुनपर्यंत या देशातील हायलेव्हल पुढारी ,शेतीतज्ज्ञ आणि नामांकित अर्थतज्ज्ञांनाही कळलेले नाही.ही अर्थशास्त्रातील मुलभुत बाब असताना, अजुनपर्यंत या देशातील हायलेव्हल पुढारी ,शेतीतज्ज्ञ आणि नामांकित अर्थतज्ज्ञांनाही कळलेले नाही असे जेव्हा मी म्हणतो तेव्हा त्याचे तुम्हाला नवल वाटेल किंवा मी उपहासाने अथवा अतिरेकाने बोलतो असे वाटेल.पण हे सत्य आहे.
शेतीविषयावरची यांची सल्ले तपासा म्हणजे मी यांच्या सल्ल्यांना मुक्ताफळे का म्हनतो हे लक्षात.येइल.
शेती कसतो तो शेतकरी,शेतकरी म्हनजे उत्पादक.शेतीमालाची विक्री करणे म्हणजे विक्रेता/वितरक.
शेतीमध्ये एकच व्यक्ती एकाच वेळी उत्पादन आणि विपणन हे दोन्ही विभाग नाही सांभाळू शकत.जे असे करायला गेले ते त्यांची गत "ना घरका ना घाटका" अशी झाली. कारण हे दोन्हीही स्वतंत्र आणि पुर्णवेळ विभाग आहेत, आणि नेमके हेच कोणी समजुन घ्यायला तयार नाही.
जो उत्पादन सोडून वितरनाकडे गेला तो वितरक/विक्रेता झाला,तो शेती कसत नाही,म्हनजे शेतकरीच नाही.
शेती कसत नाही पण नांवाने शेतीचा ७/१२ असेल तर शेतीमालक म्हणता येईल.
जेव्हा आपण शेतकर्यांच्या समस्या म्हणतो तेव्हा त्या उत्पादकाच्या भुमिकेत असलेल्या शेतकर्यांच्या समस्या असतात. हे ज्या दिवशी राज्यकर्त्यांना/प्रशासनाला कळेल त्या दिवसापासून शेतीच्या समस्या सुटायचा प्रारंभ होईल. तो पर्यंत राज्यकर्त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या शवावर हारफुले चढवुन शोकसभेत भाषने ठोकीत राहावे अशी त्यांना विनंती करुया.
वाचून खूप सुन्न वाटले. पदरचे
वाचून खूप सुन्न वाटले. पदरचे पैसे देवून सुद्धा शेवटी हातात काही लागले नाही. कष्ट,हाल हे चालूच आहे शेतकर्यांचे.
मालाची वाहतूक, स्टोरेज आणि
मालाची वाहतूक, स्टोरेज आणि फ्रोजन/पॅकेज्ड फूड इन्डस्ट्री यात वाढ, सुधारणा झाली तर हा प्रॉब्लेम कमी होऊ शकेल का? परदेशात फ्रोजन फूड मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. ती टेक्नॉलॉजीही प्रगत आहे. लगेच फ्रीझ केलेले पदार्थ हे कधी कधी 'ताज्या' हून ताजे असतात. 'एअर फ्रीझ' मध्ये तरी फारसा पाण्याचा अंशही पदार्थात जात नाही. असे फ्रीझ केलेले मांसही मिळते. (भरतासाठी भाजलेल्या वांग्याचा तयार गर मिळणार असेल तर घेऊ की.
) तिथे फ्रोजन फूड्ला कितपत मागणी असेल माहित नाही आणि हे खर्चिकही आहे. पण केले गेले तर अन्न फुकट जाणार नाही आणि शेतकर्यांना मोबदला मिळेल.
तिथल्या अडचणींची कल्पना नाही पण लेख वाचून जे वाटले ते लिहिले.
शर्मिला... भारतात अजुन
शर्मिला...
भारतात अजुन प्रोसेसड फुड ची लोकांना सवय नाही. ताजं ह्या शब्दाला जो लोकांचा प्रतिसाद मिळतो ते डब्यातळ्या शिळ्या ला मिळत नाही. परदेशात कॅन फुड बिनधास्त वापरले जाते आपल्या कडे नाही! जरी डबाबंद खाणे आरोग्याला चांगले असले तरी ते अजुन आपल्या अडाणी जनतेला कळलेले नाही...दुर्दैव. ह्या बाबतीत भारत सरकार काही पावले टाकत आहे, जसे प्रोसेसड फुड पार्क साठी खास झोन केले आहेत अन तिथे अश्या कंपन्यांना प्रोत्साहन्पर सवलती दिल्या जात आहेत.... पण वेळ खुप लागणार आहे, कारण मुळ वापरणार्यांच्या बेसिक मधी राडा आहे. त्यावर लोकप्रबोधन होणे गरजेचे आहे....त्यावर जी कंपनी हा माल बनवते तिला च जाहीराती साठी खुप पैसे खर्च करावे लागतात, अन मग मार्जिन कमी होतो वा पुन्हा गंमत तोत्यात जाते...
उदा. गोदरेज चे फ्रूटी हे फळाच्या रसांचे पेय अजुनही खुप महाग आहे, कारण लोक १० रु ला कोला पितात पण १२ रु चे फ्रुटी पीत नाहीत. जर हेच लोक फ्रुटी प्यायला लागले तर ते नक्कीच ६-८ रुपयापर्यंत खाली येईल! ..
अशोकाच्या कितीतरी फ्रोजन
अशोकाच्या कितीतरी फ्रोजन भाज्या उत्तम असतात. त्याला मार्केट इथे तरी चांगले आहे. भारतात कसे आहे?
प्रिझर्वेटिव घातलेले फ्रुटी
प्रिझर्वेटिव घातलेले फ्रुटी का प्यावे लोकानी. ? त्यापेक्शा ताजं पन्हं का पिऊ नये? सीझन नसेल तर त्या सीझनचे फळे खावीत. ताजं शब्दाला जो प्रतिसाद मिळतो तो का मिळावा शिळ्याला? परदेशी फूड हॅबिट्स फार आरोग्यदायी आहेत का? मला तर फ्रोजन समोसे हा प्रकारही असह्य वाटतो..डबाबन्द फूड आरोग्यदायी आणि चविष्ट आणि विटामिन्स शिल्लक राहिलेले असते असे म्हणायचे का चम्पकराव?
<< मालाची वाहतूक, स्टोरेज आणि
<< मालाची वाहतूक, स्टोरेज आणि फ्रोजन/पॅकेज्ड फूड इन्डस्ट्री यात वाढ, सुधारणा झाली तर हा प्रॉब्लेम कमी होऊ शकेल का? परदेशात फ्रोजन फूड मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. ती टेक्नॉलॉजीही प्रगत आहे. लगेच फ्रीझ केलेले पदार्थ हे कधी कधी 'ताज्या' हून ताजे असतात.>>
शर्मिला यांनी 'वांगे अमर रहे !' हा लेख वाचुन वर जो प्रश्न उपस्थीत केला तो प्रश्न नसुन उत्तरच आहे असे मला वाटते.
कारण जोपर्यंत मालाची वाहतूक, स्टोरेज आणि फ्रोजन/पॅकेज्ड फूड इन्डस्ट्री यात वाढ, सुधारणा होत नाही तो पर्यंत हा प्रॉब्लेम कमी होणारच नाही. परदेशात फ्रोजन फूड मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. ती टेक्नॉलॉजीही प्रगत आहे. लगेच फ्रीझ केलेले पदार्थ हे कधी कधी 'ताज्या' हून ताजे असतात. जे तंत्रज्ञान आज परदेशात वापरले जाते तसे तंत्रज्ञान आमचा देश कृषीप्रधान्,अर्थव्यवस्थेचा कना वगैरे असुनही विकसित का करु शकला नाही?.
विदेशी तंत्रज्ञान जसेच्या तसे स्विकारण्यापेक्षा देशातील लोकांना रुचेल आणि देशात ज्या शेतमालाची अधिक पैदावार होते त्यावर आधारित तंत्रज्ञान विकसित व्हायला पाहीजे. उदा.
१) बोरावर आधारित बोरकुट
२) लिंबावर आधारित सरबते
३) टोमॅटो सास
या व्यतिरिक्त अजुन बरेच काही करता येण्यासारखे आहे पण या सर्व पदार्थांना देशी सुगंध हवा, तरच ते लोकांच्या पसंतीस उतरेल.सामान्य लोकांनी प्रक्रिया उद्योग उभारले तरच त्याची किंमतही आटोक्यात राहु शकते,वेगवेगळ्या भागात स्थानिक शेतमालाची उपलब्धता आणि त्या भागातील लोकांची रुची लक्षात घेवुन पाऊल टाकावे लागेल.
हे सर्व उद्योग मोठ्या किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांनी करुन उपयोगाचे नाही कारण त्यामुळे शेतकर्यांना अथवा बेरोजगारांना फायदा होणार नाही.
मागे बायोडिझेल निर्मिती बद्दल बरीच चर्चा झाली.जेट्रोपा लागवड उपयोगी ठरली असती.
शेती विषयक तंत्रज्ञानामध्ये लहान-लहान देश पुढे-पुढे जात असतांना आमचा भल्ला मोठा देश मागे-मागे का पडतो?. स्टोरेज आणि फ्रोजन/पॅकेज्ड फूड इन्डस्ट्री अन्य देशांत स्थापित अवस्थेमध्ये वावरत असतांना आम्ही या विषयात अजुन पहिले पाऊल सुद्धा नीट टाकायला सुरुवात केलेली नाही. आणि आम्हाला तशी गरजही वाटत नाही. कदाचित असे तर नाही की उगीच माथापच्ची करुन नवनिर्माण करत बसण्यापेक्षा इतरांनी विकसित केलेले तंत्रज्ञान चोरुन-लपुन मिळवायचे,त्यात जुजबी फेरबदल करायचे आणि मेड इन इंडिया असा शिक्का मारला की आम्हीही जगाच्या समांतरच आहो हे भासविण्याचा सरळसोट 'शॉर्टकट' आम्ही निवडलाय?. हा माझा दावा नाही उगीच शंका आहे,परमेश्वर करो आणि माझी शंका खोटी ठरो.
तरी एक प्रश्न कायमचा कायमच राहतो,आम्ही त्यादिशेने पावले का टाकीत नाही?. जसे शर्मिला यांना वाटते तसे आमच्या राज्यकर्त्यांना का वाटत नाही?.
भारत हे कृषीप्रधान राष्ट्र आहे असे मी म्हणतो.एक दिवस विचार केला की मी असे का म्हणतो,तर उत्तर मिळाले की पुस्तकात वाचले म्हणुन म्हणतो.पुस्तकात लिहिणार्यानेही कुठे तरी वाचले असणार म्हणुन लिहिले असणार,त्याच्या आधीच्यानेही कुठे तरी वाचले असणार म्हणुन लिहिले असणार... ही यादी किती लांब आहे देवच जाणे.
देशाचे चित्र डोळ्यासामोर ठेवुन स्वयंप्रेररणेने 'भारत हे कृषीप्रधान राष्ट्र आहे' असे ज्याला वाटते त्याच्या वैचारीक बैठकीमध्ये आणि कृतिशील हालचालीमध्ये हे प्रतिबिंब नक्कीच उमटत असते..
"कृषीक्षेत्राला भारतिय अर्थव्यवस्थेचा कणा" मानले गेले. गेली अनेक वर्षे मी हा 'अर्थव्यवस्थेचा कणा' शोधायचा प्रयत्न करतो परंतु गवसतच नाहीये. अर्थव्यवस्थेचा दिवाळीचा सन म्हणजे केंद्रिय अर्थसंकल्पच ना? तिथे तर ह्या 'कण्या'पेक्षा रेल्वेसुद्धा जास्त महत्व खावुन जाते. रेल्वे इतका मान सुद्धा या 'अर्थव्यवस्थेच्या कण्याला' मिळतांना दिसत नाही. धोरणात्मक निर्णयांमध्ये शेती विषयाचा शेवटून पहिला नंबर लागतो.
मग ज्या देशात शेतीक्षेत्र एवढे दुर्लक्षित असेल त्या देशात स्टोरेज आणि फ्रोजन/पॅकेज्ड फूड इन्डस्ट्री सारख्या इंडस्ट्रीज कशा उभ्या राहतील?. या ठीकानी एखाददुसरे किंवा तुरळक उदाहरण नव्हे तर व्यापकतेने देशातील ८० % जनतेचा विचार करावा लागेल. कारण पाचपन्नास युनिट उभारल्याने देशाचा प्रश्न सुटनार नाही.
त्याशिवाय अशी प्रक्रिया युनिटस उभारायला स्किल्,कौशल्य,व्यावसायज्ञान,अनुभव्,आर्थिक पाठबळ आणि मनुष्यबळ लागेल. आमच्याकडे मनुष्यबळ सोडल तर बाकी गोष्टींचा प्रचंड दुष्काळ आहे. मनुष्यबळ आहे पण त्यात बुद्धीबळ कमी आणि बाहुबळ जास्त आहे. जे काही बुद्धिबळ आहे त्यात व्यवहारज्ञान/व्यावसायिक ज्ञान कमी आणि पुस्तकी किंवा कारकुनी ज्ञान जास्त आहे. म्हणुन कारखाने काढायला कोणी सामोर येत नाही पण कारखाना निघनार म्हटल्यावर रांगा लागतात. याला आजचे युवक अजिबात जबाबदार नाहीत,असलोच तर आम्ही प्रौढ मंडळी जबाबदार आहोत. आमची शिक्षणपद्धती जबाबदार आहे.आजची शिक्षण प्रणाली म्हणजे कारकुन घडवणारे आणि बेरोजगार निर्माण करण्याचे कारखाने ठरले आहेत.शाळा कॉलेज किंवा उच्च शिक्षणाचे मुख्य सुत्र 'लाथ मारीन तिथे पाणी काढीन' असा विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देईल एवढे ताकदवार असायला हवे.याबाबतीत वैद्यकिय शिक्षणाचा 'मॉडेल' म्हणुन उपयोग होवु शकतो.मला वाटते की कदाचीत 'डॉक्टर' हा एकमेव विद्यार्थी असावा ज्याच्यामध्ये डिग्री हाती पडताक्षणीच आपले आयुष्य स्वबळावर जगण्याचा आत्मविश्वास आलेला असतो. बाकी क्षेत्रासाठी आपण एवढी आत्मविश्वास देणारी शिक्षणप्रणाली जर अमलात आणली तर आज गंभिर वाटणारे प्रश्न अत्यंत सुलभ होवु शकतात.दुर्दैवाने तसे होतांना दिसत नाही.
या देशावर वसाहतवादी राज्यसत्ता चालविण्यासाठी इंग्रजांना कारकुनांची गरज होती त्यानुरुप कारकुन तयार करणारी शिक्षणप्रणाली त्यांनी स्थापित केली.आम्ही इंग्रजांना घालवले पण त्यांची शिक्षणपद्धती आजतागायत कवटाळून बसलोच आहोत.
शाळा कॉलेज शिकतांना विद्यार्थी,त्याचे पालक,शिक्षण व्यवस्था या सर्वांचे मिळून अंतिम ध्येय काय असते,त्याने शिकुन सवरुन या देशाच्या प्रशासन व्यवस्थेचा एक हिस्सा होणे.अगदी कलेक्टर पासुन चपराशापर्यंत कोणतीही नोकरी मिळाली तरी चालेल पण सरकारी कारकुन व्हायचं.३ % नोकरीच्या जागा असतांना १०० % विद्यार्थ्यांना आम्ही एकाच मार्गाने ढकलतो.किमान ५० % विद्यार्थ्यांना व्यावसायीक शिक्षण द्यायला काय हरकत आहे?.
यासंदर्भात 'राजा हरिश्चंद्राचे' उदाहरण फारच बोलके आहे. राज्य गेल्यानंतर पोटाची खळगी भरण्यासाठी काहीतरी कामधंदा करावा म्हणुन राजा हरिश्चंद्र मजुरांच्या बाजारात जावुन उभा राहिला.त्तुला काम काय करता येते ? या प्रश्नावर हरिश्चंद्राचे उत्तर होते. "मला राज्य चालविता येते". पण ज्यांना मजुर हवे होते त्यांच्याकडे 'राज्य' कुठे होते,याला चालवायला द्यायला?. राजा हरिश्चंद्रास कामच मिळेना. शेवटी स्मशानात राहुन प्रेताची रखवाली करावी लागली.
राज्य चालविण्याखेरिज इतर कसलेच कौशल्य नसलेला राजा हरिश्चंद्र आणि प्रशासन चालविण्या खेरिज कसलेच कौशल्य अवगत नसलेला पदवीधर यांच्यात फरक काय उरतो?
डीग्री घेवुन १०० विद्यार्थी बाहेर आले की त्यात ३ लोकांना नोकरी मिळते,ते मार्गी लागतात.उरलेले ९७ नोकरीच्या शोधात भटकत फिरतात. कारण १५-२० वर्षे शाळा कॉलेजात घालवुनही व्यवसाय,स्वयंरोजगार वा अन्य उद्योग करण्यासाठी लागणारे कौशल्य,व्यावसायिक ज्ञान आणि मुख्य म्हणजे आत्मविश्वास यापैकी त्याच्याकडे काहीही आलेले नसते. उद्योग व्यवसाय करायचे म्हटले तर बँका कर्ज देत नाही कारण बँकेला माहीत असते हा शंभराचे साठ करणार. म्हणुन बँका टाळाटाळ करतात.पदवी मिळवल्याने व्यवसायज्ञान मिळाले हे बँकेलाही मान्य नसते.
शेवटी एक दिवस घरात खायचे वांदे पडायला लागलेत किंवा लग्नाचे वय घसरायला लागले की मग मिळाला तो रोजगार करण्याशिवाय गत्यंतर नसते आणि आमच्या तरुणाईचे खच्चीकरण होते.त्यासोबतच असे प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणावर काढण्याचे प्रयत्नही निष्फळ ठरते.
हे सगळे बदलायचे असेल तर आहे त्या व्यवस्थेमध्ये आमुलाग्र बदल करावे लागतील आणि या बदलासाठी प्रचंड इच्छाशक्ती लागेल.. वरना कुछ नही होनेवाला...... असंभव....!
..
......गंगाधर मुटे
कदाचीत 'डॉक्टर' हा एकमेव
कदाचीत 'डॉक्टर' हा एकमेव विद्यार्थी असावा ज्याच्यामध्ये डिग्री हाती पडताक्षणीच आपले आयुष्य स्वबळावर जगण्याचा आत्मविश्वास आलेला असतो.
देकनी बायकू दुसर्याची , तसंच हाय ह्ये बी....
<< देकनी बायकू दुसर्याची ,
<< देकनी बायकू दुसर्याची , तसंच हाय ह्ये बी.... >>
साहेब,
कॉलेजमध्ये घेतलेले शिक्षण व्यवसायामध्ये उपयोगी पडते किंवा शिक्षणाच्या बळावर व्यवसाय करता येतो,नोकरीसाठी वणवण भटकायची गरज पडत नाही,असे मला म्हणायचे आहे.
मेहेरबान हुजुर माननीय
मेहेरबान हुजुर माननीय रॉबीनहुड साहेब ह्यांचे समोर सादर.....
जिथे खायला पोटभर अन्न मिळत नाही अन ढिगाणी अन्न वाया जाते आहे, तेंव्हा विटॅमिन, कार्बोहायड्रेट, मिनरल अन फायबर वर चर्चा करणे हा काही लोकांचा आवडता छंद आहे. (मनोरा समोरच्या पंचतारांकित हाटेलात जेवणावळी झडवुन मेळघाट च्या कुपोशितांवर चर्चा करणारे सरकारी नोकर अन लोकप्रतिनिधी बघितले कि जळफळाट होतो हो!
असो. )
थोडे दिवस थांबा..... सबंध महाराष्ट्रातील नद्यांमधली वाळु मुंबई पुण्यातील महाकाय टावर बांधायला वापरली जाते आहे, अन महसुल अन पोलीस फक्त हफ्ते वसुली चे काम करते आहे,.. हे बघता काही दिवसाने सधन म्हणवल्या जाणार्या पस्चिम महाराष्ट्रातील शेतकर्यांवर देखील सामुदायीक आत्महत्येची वेळ येणार आहे. (मी ही त्यातलाच एक असेल).... तोवर तुमचे चालु द्या.... कागदं काळे करायचे काम! हाय काय अन न्हाय काय!
झुलेलाल | 6 December, 2009 -
झुलेलाल | 6 December, 2009 - 21:42
<< शेतकर्यांच्या आत्म्हत्यांच्या समस्येचे मूळ इथेच आहे. आता तर बीटी वांगी येणारेत म्हणे. बीटी कापसाने शेतकर्याची वाट लावली, आणि अनेकांनी जग सोडले. वांग्यांच्या बाजारची हीच तर्हा असेल, तर बीटी वांग्यानी हलाखीत आणखी भर पडणार.
(मलाही कधीकधी वाटते, लोकं ऊस घेतात, आपण वांगी-टोमेटो का घेऊ नयेत. मागे आम्ही पपईचा प्रयोग केला होता. पण तो फक्त अनुभवातून शहाणपणा शिकण्यासाठी....) >>
झुलेलालजी, योग्य बोललात.
उत्पादन वाढल्याने उत्पन्न वाढत नाही.
उत्पादन वाढल्यावर ते खपायला पाहीजे त्यासोबत भावही टीकुन राहायला पाहीजेत. नाहीतर उत्पादन वाढ शेतकर्याला शाप ठरतो.
बीटीमुळे प्रतिकुल परिणाम होणारच,उत्पादन वाढणारच.
उत्पादन वाढ शासकिय धोरणामुळे शेतकर्याला शाप ठरते.
प्रॉडक्शन आणि मार्केटिंग हे
प्रॉडक्शन आणि मार्केटिंग हे एकाच वेळी जमणे अवघड, हे खरेच. मोठ्या प्रमाणावर उत्पादन असेल, तर नाहीच. एखादी भाजी निम्म्याच किंमतीत मिळत असली तरी एकदम १०-२० किलो कोण घेणार विकत? शिवाय एखाद्या ठिकाणी असे अर्ध्या किंमतीत विकले जात आहे, हे लोकांना कसे कळणार? त्यासाठी जाहिरात करणार का, अन त्याचा खर्च कोण, कसा करणार?
फार लहाणपणी मला आठवते, की शेतात पिकत असलेल्या भाज्या आठवडी बाजारात शेतकरी स्वतःच विकत. (आपल्या भाजीचे कौतुक करणारी गाणी म्हणत, लोकांना गाणी गाऊन बोलवत.. वगैरेही आठवते). अजूनही ग्रामीण भागातल्या आठवडी बाजारात असे दिसते, पण कमी प्रमाणात. नक्की काय झाले? आधी कुटुंबात भरपूर माणसे होती, त्यामुळे त्यातल्या काहींना बाजारात जाऊन विकत बसण्याची उस्तवार परवडत होती का? की उत्पादन भरमसाठ वाढल्यामुळे असे किलो-अर्धा किलोने विकणे परवडेनासे झाले? की अपेक्षा वाढल्या? की सारे काही सिम्प्लिफाय करण्याच्या प्रयत्नात ही गोची झाली? व्यापारी, आडते मध्ये आल्यामुळे हे सारे झाले का?
नाशिक जिल्ह्यात कांदा आणी द्राक्षे विकण्यासाठी, निर्यात करण्यासाठी शेतकर्यांनी एकत्र येऊन काही प्रयत्न केले, संस्था काढल्या होत्या. त्याचे पुढे काय झाले माहिती नाही.. तेवढा अभ्यास अन माहिती नाही.
मी स्वतः एक तत्व म्हणून भाजी घेताना घासाघीस करत नाही. भाजी विकणारा व्यापारी आहे, की शेतकरी; तो भाग वेगळा. पण अठरा हजार रुपये तोळा सोने मिळत असताना विनातक्रार एक रुपयाही कमी करून न मागता आपण घेतो (हे फकत एक उदाहरण म्हणून). मग पाच रुपयाला पावभर भाजी विकायला असताना 'चार रुपयांत द्या' असे म्हणणे- हे कशाचे लक्षण? स्वतःपासून सुरुवात केली, तर हजारो वर्षांनी का होईना, बदलेलही कदाचित सारे. पण त्यासाठी मुळात सुरुवात तर व्हायला हवी.
पण अठरा हजार रुपये तोळा सोने
पण अठरा हजार रुपये तोळा सोने मिळत असताना विनातक्रार एक रुपयाही कमी करून न मागता आपण घेतो (हे फकत एक उदाहरण म्हणून). मग पाच रुपयाला पावभर भाजी विकायला असताना 'चार रुपयांत द्या' असे म्हणणे- हे कशाचे लक्षण?
अगदी बरोबर आहे... घासाघीस करु नये... कमी किंमतीला ते तयार होतात, कारण भाजी संपवणे त्याना गरजेचे असते, ते त्याना परवडतेच असे नाही...
<< कमी किंमतीला ते तयार
<< कमी किंमतीला ते तयार होतात, कारण भाजी संपवणे त्याना गरजेचे असते, ते त्याना परवडतेच असे नाही..>>
...
या वाक्यावर शेती विपणन शास्त्रासाठी सिद्धांत तयार होवु शकतो...
मी स्वतः एक तत्व म्हणून भाजी
मी स्वतः एक तत्व म्हणून भाजी घेताना घासाघीस करत नाही.
---- त्यांच्या दृष्टिने विचार करणे ह्याला खुप महत्व आहे, आपण नाही त्या ठिकाणि अतोनात पैसे उधळणार आणि गरिब रस्त्यावरच्या भाजीवाल्याकडे घासाघिस करणार, तो बापडा काय करणार संध्याकाळपर्यंत नाही विकल्या गेल्यास वाया जाणार म्हणुन विकणार.
सोने किंवा रेमंडचा कपडा/ सुट विकत घेतांना घासाघिस होत नाही.
आज ही बातमी वाचली
आज ही बातमी वाचली http://epaper.timesofindia.com/Default/Scripting/ArticleWin.asp?From=Arc...
ह्यावर आज लोकसत्तात पण एक लेख आला आहे. http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=37002:2...
धन्यवाद स्वप्नाजी..!!
धन्यवाद स्वप्नाजी..!!
बटाटा अमर रहे ....... मुटे
बटाटा अमर रहे .......
मुटे साहेब आज प्रामाणिक पणे वाटते की शेतीला आयकर नसावा...
काल ७०१० रु. ला आठ क्विंटल बटाटा मोडून आलोय (दर: ८ रु प्रती क्विंटल)
संपूर्ण उत्पादन खर्च १०,६०० रु आला होता.
१०,६०० - ७०१० = ३५९० येवढा तोटा झाला.
पण कमी तोटा झाल्याबद्दल वडील थोडेसे समाधानी होते. इतर लोकांचा तोटा ऐकुन फार वाइट वाटले...
अर्थात एक एकर बटाटा निदान १५ क्विंटल निघेल आणि दर सरासरी १२ रु किलो मिळेल अशी अपेक्षा होती (म्हणजे साधारण १८००० रु). बटाटा पुण्याला आणणार होतो. त्यामुळे वडिल गावाकडून टेंपो पाठवून देणार होते आणि मी येथे व्यवहार करणार होतो. पण प्रत्येक्षात उत्पादन कमी मिळाल्यामुळे माल तिकडेच विकुन टाकला...
असो ... पुन्हा जून मधे प्रयत्न करु... त्यावेळी आम्हाला फायदा होइल
----------------------------------------------------------------------
मला येवढेच सांगायचे आहे की समजा एखाद्या शेतकर्याने गतवर्षी आयकर भरला आणि चालू वर्षी त्याला तोटा सहन करावा लागला तर त्याला शेती कशी परवडेल हो ???
अर्थात माझ्याकडे तोटा सहन करायची ताकत आहे पण ज्यांची नाही त्यानी काय करायचे. माझ्याच मित्राचे उदाहरण द्यावेसे वाटतेय ... त्याने ८ क्विंटल बटाटा लावला होता .. त्याने व मी समान दराने बियाणे खरेदी केले होते (१७५० रु. प्रती क्विंटल. त्याला उत्पादन मात्र ६ क्विंटलच निघाले. त्यात त्याने खासगी सावकारा-कडून कर्ज घेतले आहे...... काय करावे त्याने? पुढच्या वर्षी जास्त फायदा झाला तर आयकर भरावा?
शेतीला आयकर नसावा हे मला वाटणे स्वाभावीक आहे ना?
आयकरा ऐवजी कुठले तरी वेगळे धोरण असावे ज्यातून सरकारला फक्त धनाड्य माणसाकडूनच कर मिळावा.
चार माणसाकडून कर घेण्यासाठी उर्वरित लोकांचा का बळी द्यायचा?
(वेळेआभावी हा लेख संक्षिप्त स्वरूपात लिहीला आहे...)
ह्या सगळ्या गोष्टी वाचुन मन
ह्या सगळ्या गोष्टी वाचुन मन सुन्न होत.
हे सर्व वाचून मला घटना
हे सर्व वाचून मला घटना आठवली.... ४-५ वर्षांपूर्वी विरारच्या पुढे सफाळ्याजवळ एका ठिकाणी गेलो होतो... वाडीत भेंडी लगडलेली.... वेलीवर पानं कमी नी भेंडी जास्त! सुकायला आलेली!! वाडीच्या मालकाला विचारलं, "उतरवत का नाही? कधी पाठवणार मार्केटला?" तो बोलला, "एवढी सगळी भेंडी उतरवायला २ माणसं लागतील.. कमीत कमी एक दिवसभर... माणशी पन्नास रुपये मजुरी..... म्हणजे शंभर रुपये खर्च आहे फक्त उतरवायचा..."
"मग?"
"इथे आम्हाला भेंडीला भाव मिळतो एक रुपया किलो... दोघांनी कमीत कमी शंभर किलो माल उतरवला तर त्यापुढे वाहतूक खर्च ......"
त्यावेळी तिथून फक्त ४५ मिनिटांच्या रेल्वे प्रवासावर असलेल्या बोरीवलीत भेंडीचा बाजारात भाव होता... २२ रुपये किलो....!!
खरंच खूप वाईट वाटतं... पण जोपर्यंत स्वत:च दलाल बनून बसलेले आपले राज्यकर्ते आहेत तोपर्यंत मार्केटमधल्या दलालांना कोण हात लावणार?
मला तर फ्रोजन समोसे हा
मला तर फ्रोजन समोसे हा प्रकारही असह्य वाटतो..
>> समोसे हा प्रकारच असह्य आहे!
ह्म्म.. आपण सगळे काय प्रोब्लेम आहे ह्यावर चर्चा करतोय.. पण हा प्रोब्लेम कसा सोडवता येईल ह्यावर काही चर्चा करता येईल का?
मीही भाव करत नाही.. esp मंडईत तर नाहिच नाही.. पण भयानक महाग वाटलं तर घेतही नाही.
(म्हणजे १५०रु किलो असलेली अॅपल्स! फक्त पालेभाज्या १०-१२ रु पेंडी असली तरी घेते (एकदा हॉटेलात खाल्लं तरी ५०रु जातातच - म्हणजे अगदी डोसा, वडा असले पदार्थ खाल्ले असं गृहीत धरून) - मग पौष्टीक गोष्टी खाताना कशाला फालतुचा विचार करायचा - असा विचार करते. फळ मात्र सिझनला येतील तीच खावीत, नाही ते खाण्याचा अट्टाहास करु नये असं वाटतं - त्यातून इम्पोर्टेड फळ तर खाऊच नये अशा मताची मी आहे. कारण आपल्या करता महाग नसलं तरी अशी फळं आपल्या इकोसिस्टीम साठी भयानक महाग आहेत. )
ह्म्म.. आपण सगळे काय
ह्म्म.. आपण सगळे काय प्रोब्लेम आहे ह्यावर चर्चा करतोय.. पण हा प्रोब्लेम कसा सोडवता येईल ह्यावर काही चर्चा करता येईल का?
शेतीला केंद्रस्थानी ठेवुन सगळी शासकिय धोरणांची आखणी व्हायला हवी.
शेतीच्या दुर्दशेला केवळ आणि केवळ शासनच कारणीभुत आहे.
सहावी की सातवीला आम्हाला
सहावी की सातवीला आम्हाला मराठीच्या पाठ्यपुस्तकात 'लाल चिखल' नावाचा एक धडा होता.
त्यात असाच टोमॅटोला आठाणे किलो ही भाव न मिळाल्याने प्रचंड निराश झालेला शेतकरी भर बाजारात, स्वतःचा घाम गाळून पिकवलेला टोमॅटो स्वतःच्या पायांनी तुडवून वेड्यासारखा त्या लाल चिखलात नाचतो >>>>>
अन्गावर काटे.. डोळ्यात पाणी घेउन वाचलेला धडा आठवला
मेहता पब्लिकेशन हाऊस आणि मी
मेहता पब्लिकेशन हाऊस आणि मी मराठी.नेट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
लेखन स्पर्धा २०१० या स्पर्धेचा आज निकाल आला असून
या स्पर्धेत "वांगे अमर रहे...!"
या लेखाला उत्तेजनार्थ पारितोषक जाहीर झाले आहे.
माझी वांगंमय शेती तोट्यात गेली पण वांङ्मय शेतीला बरे भाव मिळत आहेत.
वा वा! मुटे अभिनंदन!! वांगे
वा वा! मुटे अभिनंदन!!
वांगे अमर रहे!
अभिनंदन्.वांग्याची भाजी आवडते
अभिनंदन्.वांग्याची भाजी आवडते म्हणून वाचायला गेले तर एक छान लेख वाचायला मिळाला.जेव्ढ्या निगुतीने वांगी शेती केली.तेव्ह्ढ्याच निगुतीने,लेखही लिहिलेला आहे. खूप छान्.शुभेच्छा.
अभिनंदन
अभिनंदन
Pages