Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Anantakshari - logical (Marathi)

Hitguj » General Time Pass » अंताक्षरी » Anantakshari - logical (Marathi) « Previous Next »

अंताक्षरीचे नियम

१. गाण्याची सुरूवात ही सुरूवातीपासून केली जावी. फक्त सुरूवातीचे आलाप किंवा गुणगुणणे वगळावे. गाण्याचे धृपद पूर्ण लिहीले जावे. धृपद पूर्ण लिहीले नसेल किंवा गाण्याची सुरूवात सुरूवातीपासून केली नसेल तर गाणे बाद धरले जाईल.
२. गाणं त्या पानावरुन वाहून गेल्याशिवाय त्याची पुनरुक्ती करु नये.
३. दोन किंवा अधिक गाणी एकाच वेळी किंवा काही अंतराने पण एकाच अक्षरापासून लिहीली गेली तर सर्वात आधी आलेलं गाणं ग्राह्य धरुन पुढील गाणे लिहावे.
४. अ, आ, ओ सारखे स्वर स्वतंत्रपणे वापरले जावेत अपवाद इ / ई आणि उ / ऊ चा).
५. नवीन गाण्याची सुरूवात आधीच्या गाण्याच्या शेवटच्या अक्षराने किंवा शेवटच्या एक अथवा अधिक शब्दांनीही करता ये_ईल. शेवटचा शब्द घ्यायचा असेल तर तो आहे तसाच घेतला जावा. त्याची रूपे किंवा समानार्थी शब्द घे_ऊ नयेत.
६. फक्त मराठी अंताक्षरीमध्ये शेवटचे अक्षर ल\' असल्यास, पुढचे गाणे एकतर, \'ल\' पासूनच लिहावे, किंवा उपांत्य अक्षरापासून लिहावे. हा नियम हिंदी अंताक्षरीसाठी लागू नाही
७. मराठी अंताक्षरीमध्ये शेवटचे अक्षर ठ' असेल तर ते गाणे लिहीणार्‍याने पर्याय द्यावा अन्यथा पुढील गाणे लिहीणार्‍याने उपांत्य अक्षरापासून पुढचे गाणे लिहावे.
८. मराठी अंताक्षरीमध्ये सहज टाळता येण्यासारख्या काही चुका

८.१. 'पाहुनी रघुनंदन सावळा' ही गाण्याची सुरूवात आहे, 'लाजली सीता स्वयंवराला' नव्हे.
८.२. 'निंबोणीच्या झाडामागे' ही सुरूवात बरोबर आहे लिंबोणीच्या झाडामागे' नव्हे.

Lajo
Monday, March 03, 2008 - 10:49 pm:   Edit Post Delete Post  Link to this message

मृगनयना रसिक मोहिनी
कामिनी होती ती मंजुळमधुरालापिनी
मधुर मोहिनी...



Dineshvs
Tuesday, March 04, 2008 - 12:42 pm:   Edit Post Delete Post  Link to this message

देव दिनाघरी धावला, हे कोल्हटकरांचे लोकप्रिय नाटक. नाटकाचा विषय कृष्ण सुदामा भेटीचा.
यात हि दोन गाणी रेकॉर्डवर वाजाव्त असत. ऋणानुबंधाच्या, गाण्यावर प्रत्यक्ष स्टेजवर कृष्ण आणि रुक्मिणी असत. उठि उठि गोपाळा च्या वेळी, स्टेजवर सुंदर सजावट असे. या नाटकात पहिल्यांदा एक मोठा पडदा आणि त्यावर रंगवलेले महाद्वार असे. दाराशी जय आणि विजय हे द्वारपाल असत. बराच वेळ ते अगदी पुतळ्यासारखे उभे असत. उठी उठी गोपाळा गाण्यानंतर हा पडदा उघडत असे.

याच नाटकात उदयराज गोडबोले, पण भुमिका करत असत. ते गायक असल्याने, त्यांच्या आवाजात छुन्नक छुन्नक असे एक छान गाणे होते. तसेच तिसर्‍या अंकात रुक्मिणी आणि सुदाम्याची बायको, जात्यावर दळण दळतात, त्यावेळी सुंदर ओव्या गायल्या जात. पण हि दोन्ही गाणी, प्रयोगानंतर मी कधीच ऐकली नाही.
वसंत देसाई यानी, कुमारजींच्या गायकिचा सुंदर उपयोग करत या चाली बांधल्या होत्या. त्यावेळी त्यांची फ़ेव्हरिट असणारी, वाणी जयराम पण, कुमारजींच्या सोबत गायली आहे.

मलयगिरीचा चंदनगंधित धूप तुला दाविला
स्वीकारावी पूजा आता, उठी उठी गोपाला

पुर्व दिशेला गुलाल उधळून ज्ञानदीप लाविला
गोरस अर्पुनी अवघे गोधन, गेले यमुनेला
धूप दीप नैवेद्य असा हा, षडोपचार चालिला

रांगोळ्यानी सडें सजविले, रस्त्यारस्त्यातून
सान पाऊली वाजती पैंजण, छुनु छुनु, छुनछन
कुठे मंदिरी ऐकु येते, टाळांची किणकिण
एकतानता कुठे लाविते, एकतारीची धून
निसर्गमानव तूझ्या स्वागता, असा सिद्ध जाहला

राजद्वारी घडे चौघडा, शुभःत्कार जाहला
वन वेळूंचे वाजवी मुरली, छान सूर लागला
तरूशिखरावर, कोकिलकविने पंचम स्वर लाविला

- - - -

ऋणानुबंधाच्या जिथुन पडल्या गाठीं
भेटीत रुष्टता मोठी.

त्या कातरवेळां थरथरती कधिं अधरी
त्या तिन्हिसांजा, त्या आठवणी त्या प्रहरी
कितींदा आलो, गेलो, रमलो
रुसण्यावाचुनी, परस्परांच्या कभी न घडल्या भेटी.

कधि तिने मनोरम रुसणे, रुसण्यात उगीच ते हसणे.
म्हणुनि ते मनोहर रुसणे, रुसणे हसणे, हसणे रुसणे
हसण्यावरतीं रुसण्यासाठी, जन्मोजन्मीच्या गाठी

कधि जवळ सुखाने बसलो, दुःखात सुखाला हसलो
कधि गहिंवरलो, कधी धुसफुसलो
सागरतीरी आठवणींनी, वाळुन मारल्या रेघा.

जन्मासाठी जन्म जन्मलो, जन्मात जमली ना गट्टी.

या गाण्याला कृष्ण रुक्मीणीच्या प्रेमाची पार्श्वभुमि आहे. असाच एक प्रदिर्घ प्रवेश सौभद्र नाटकात पण आहे. पण त्या नाटकातली रुक्मिणी, गायिका नसल्याने, सर्व पदं कृष्णाच्या तोंडीच आहेत.
नच सुंदरी करु कोपा, नभ मेघानी आक्रमिले आणि प्रिये पहा, हि सगळी पदं याच प्रवेशातली. आणि या पदांशी छोटा गंधर्वांचे नाव, अतुटपणे जोडले गेले आहे.



Dineshvs
Friday, March 07, 2008 - 5:02 am:   Edit Post Delete Post  Link to this message

स्वरसम्राज्ञी हे नाटक मी पाचवेळा बघितलय. विद्याधर गोखल्यांचे हे नाटक, पिग्मॅलियन वर बेतलेलं ( पुलंचे ती फ़ुलराणी पण त्यावरच बेतलेलं ) इथे त्याला संगीताची डुब दिली आहे.

हे नाटक म्हणजे, संगीताची मेजवानीच आहे. संगीत निलकंठबुवा अभ्यंकर यांचे. तुज वंदन गानशारदे, सप्तसूर सूरगंगा अशी पारंपारिक चालीतली गाणी ( गायक आधी विश्वनाथ बागुल मग शरद गोखले ) तर होतीच. पण त्याशिवाय, मंगलमुर्ती रंगराज या ही नांदी आणि त्याला जोडुन येणारा गण, मग टुमदार कुणाची छान, नवति भरज्वान, हि शाहिरी लावणी, मग राधिके तूने कैसे जादू किया, हि ठुमरी, श्रीकृष्णा सारंगधरा, हि पठ्ठे बापुरावांची लावणी, इथे मांडला इष्कबाजीचा अन शृंगाराचा डाव, हि एक ढंगदार लावणी, आजा रे मनमोहन श्याम आणि बलमा आये रंगिले, हे दोन ख्याल, एकलीच दिपकळी मी अभागिनी, हे शिवरंजनी रागातले भावगीत अशी विविध बाजाची गाणी यात आहेत. यात प्रमुख भुमिका किर्ती शिलेदार करत असे, तिची बहिण लता शिलेदार उर्फ़ दिप्ती भोगले हि पण यात एका तहेवाईक गायिकेची भुमिका करत असे, तिच्या तोंडी करत जान कुर्बान हा एक ख्याल होता. ( गाणे कसे सादर करु नये, याचा ती नमुना पेश करत असे. ) तसेच हे नाटक आणीबाणीच्या काळात आल्याने, त्यात इंदिरा केदार, अश्या एका खास रागातली रचना होती. याच नाटकात जयमालाबाई, केवळ लेकीना साथ देण्यासाठी, स्टेजवर येऊन पेटी वाजवत असत. ( एरवी त्या विंगेतून साथ देत असत )

हे नाटक खास किर्तीसाठीच लिहिले होते आणि तिच्या सूरेल गायनाने नाटक खुपच रंगत असे. एका तमाशा कलावतीचा शास्त्रीय गायिकेपर्यंतचा प्रवास यात होता. यात पहिल्यांदा ती चक्क नाचतही असे.

या नाटकातल्या दोन रचना. पहिली किर्ती आणि शरद गोखले एकत्र गातात. दुसरी किर्ती गात असे. अगदी अलिकडे या नाटकाचे नव्याने प्रयोग झाले, पण मी तरी किर्तीच्या जागी इतर कुणाला बघू वा ऐकू शकत नाही.


कशी केलीस माझी दैना, रे मला तुझ्या बिगर करमेना
घडीभरी माझिया मना, चैन पडेना, नीज येईना, रे मला

तु राघू, तुझी मी मैना, माझं रूप बिलोरी ऐना
अंगी इष्काचा आजार, करी बेजार, कमती होईना, रे मला

तु हकिम होवुन यावे, एकांती औषध द्यावे
दे चुंबन साखरपाक, मिठीचा लेप, मजसि साजणा, रे मला


* * * *

रे तुझ्यावाचून काही, येथले अडणार नाही

गर्व तव हा व्यर्थ, मी केले असे, केले तसे
चोच देई पाखराना, तोच चारा देतसे
एकहि घरटे, तूझ्याविण मोडुनि पडणार नाही

तानसेनावाचुनि, किंवा सदारंगाविणा
काय मैफ़ल या जगाची, रंगली केव्हाच ना
कोण तू, तुजविण वीणा, बंद हि पडणार नाही



Sanskruti
Friday, March 07, 2008 - 12:09 pm:   Edit Post Delete Post  Link to this message

दिनेश्जी नमस्ते
इकडे तर मेजवानीच आहे.


Dineshvs
Tuesday, March 11, 2008 - 3:00 am:   Edit Post Delete Post  Link to this message

पुर्वी वर्तमानपत्रातील जाहिरातींचे तंत्र तितकेसे सुधारलेले नव्हते. फोटो वगैरे छापणे अवघड असावे. म्हणुन मृच्छकटिक नाटकाच्या जाहिरातीतले ते नाव वाचुन उगाचच घाबरायला व्हायचे.

या शब्दाचा अर्थ खुप उशीरा कळला. हि संधि आहे मृदा अधिक शकटिक अशी.
मृदा म्हणजे माती आणि शकटीक म्हणजे छोटी गाडी.
वसंतसेना आणि चारुदत्त यांचे हे नाटक. ( बरोबर, रेखाचा उत्सव आठवला ना ? त्या सिनेमाला हे नाव दिले असते तर !!!!)
गणिका हा एक समाजमान्य व्यवसाय होता त्या काळातली हि कथा. थोडेसे प्रेम मग थोडासा गैरसमज आणि अति ताणण्यापुर्वी गोड शेवट असे कथानक.

छोटा गंधर्वांची या नाटकातली गाणी फ़ार गाजली. तेचि पुरुष दैवाचे, नभ भरले वगैरे पदे त्यांची.
जेथ मित्रा तत्वार्थहि पहाया
शक्ति नसते भूपाल लोचना या

हि भैरवी पण ते सुरेख गात असत.
सखि शशि वदने गे, हे ललित रागातले पद, जितेंद्र अभिषेकिंच्या आवाजात ऐकले असेलच. तेही यातलेच.

याच नाटकातले, वसंतसेनेच्या तोंडचे एक पद.

माडिवरी चल गं गडे, जाऊ झडकरि
गं सखे जाऊ झडकरि
पाहु सदय दानशुर, मुर्ती ती बरी
होईल सुख मजसि तया, पाहिल्यावरी

संस्कृत नाटकात, प्रकरण म्हणुन एक प्रकार असतो. हे नाटक त्या प्रकारातले.
याचे गद्य रुपांतर, मातीच्या गाड्याचे प्रकरण, नावाने काहि वर्षांपुर्वी आले होते, त्यात नीना कुलकर्णी, नायिकेच्या भुमिकेत होती.


Dineshvs
Saturday, March 15, 2008 - 8:02 am:   Edit Post Delete Post  Link to this message

प्रीतीसंगम, हे आचार्य अत्र्यांचे नाटक. मूळ संचात ज्योत्स्ना मोहिले, विश्वनाथ बागुल आणि उदयराज गोडबोले भुमिका करत असत. संत सखुच्या जीवनावर आधारित हे नाटक होते त्यात थोडेफ़ार ट्रिकसीन्सही होते. याला संगीत वसंत देसाईंचे होते. ज्योस्ना मोहिलेच्या आवाजातले, किती पांडुरंगा साहू, संसाराचा भार हे सुंदर गाणे याच नाटकातले. या नाटकाच्या लेखनात, अत्र्यानी आधी प्रसिद्ध झालेल्या एका कादंबरीतून चोरी केली, असे एका समीक्षकाने सप्रमाण सिद्ध केले होते.

या नाटकाचा अलिकडे, सुयोगने डॉ. क्षमा वैद्य, प्रशांत दामले आणि मोहन जोशी, यांच्यासह प्रयोग केले होते पण ते अजिबातच चालले नाहीत.

या नाटकात एक सुंदर युगुल गीत आहे, याची चाल आणि गायन दोन्ही छान आहेत. ( संगीत नाटकात युगुल गीते अगदी मोजकीच होती ) त्याचे शब्द असे. हे गाणे विश्वनाथ बागुल आणि ज्योत्स्न मोहिले, यांच्या आवाजात आहे.

आज आपुल्या प्रथम प्रीतीचा, संगम हा झाला
प्रेमफ़ुलांच्या गळ्यात घालुनि, गुंफ़ुया माळा

पहा कोयना इकडुन येई, समोरुन ती कृष्णामाई
प्रीतीसंगम सखे असा हा, जगामधे पहिला

नाचती झाडे, नाचती हवेली, रानपाखरे वेडी झाली
सृष्टीवरती स्वर्ग धरेला, भेटाया आला



Dineshvs
Wednesday, March 19, 2008 - 8:53 am:   Edit Post Delete Post  Link to this message

संगीत नाटकांची नावे घेताना, स्वयंवर आणि सौभद्र हीच नावे पहिल्यांदा घेतली जातात.

स्वयंवर म्हणजे रुक्मिणीचे स्वयंवर. खरे तर हे स्वयंवर होतच नाही. रुक्मि आणि शिशुपालामुळे ते मोडते. संपुर्ण नाटकात तणावच आहे. पण तरिही हे नाटक गाजले ते नाट्यपदांमुळे.

यात कृष्ण आणि रुक्मिणीचे आईवडील, सगळेच गायक. भय न मम मना हे महाराजांच्या तोंडचे तर लपविला लाल दिनकर, हे महाराणींच्या तोंडचे पद. या भुमिकात जयराम आणि जयमाला शिलेदार हि दादा मंडळी असल्याने, हि पदे रंगणार याबाबत शंकाच नसे. खास करुन, मोहे लिनो देख नजरियाने जिया मोरा, या ठुमरीवर आधारित हे पद जयमालाबाई, फ़ारच सुंदर गात असत. ( मी जयमालाबाईंचा निस्सिम भक्त आहे. त्याना प्रत्यक्ष भेटलो आहे आणि पाठीवरुन त्यानी प्रेमानी हातहि फ़िरवला आहे. त्यांच्यापेक्षा कुणीही अगदी किर्तीदेखील छान गाऊ शकेल, यावर मी सहजी विश्वास ठेवणार नाही, पण पुढे हेच पद मी कल्याणी देशमुखांच्या आवाजात ऐकले. तब्बल साडेसात मिनिटांचे गायन आहे हे. आयुष्यात पहिल्यांदाच मला जयमालाबाईना, सवाई असे कुणीतरी ऐकल्यासारखे वाटले. पण मी बघितलेल्या प्रयोगात जयमालाबाईनी साठीनंतर भुमिका केली होती. )

स्वयंवराचा नायक कृष्ण, पण या नाटकात कृष्णाला कमी गाणी आहेत. त्यातल्या त्यात कांता मजसी तुच, हे गाजले.
पण हे नाटक गाजवते ती रुक्मिणी, त्यातली काहि पदे बघा.

नाथ हा माझा मोहि खला
शिशुपाला भारी झाला
वीर रुक्मि शिशुसम आणिला
वीरा लोळवी मग हळु धरुनी
कर रत्नासी जणु हा ल्याला

* * * *

मम आत्मा गमला हा
सहज नेत्र भिडे, सहज मोह पडे
सहजची करी, मम हृदय हे वेडे
विलिन लोचन माझे, सहज करी

* * * *

रुप बलि तो नरशार्दुल साचा
क्षणी विनाशित रिपुभाव मनीचा
स्वभाव रिपुचा

( हे पद, कौन तर्हासे तुम खेलत होरी हो, या ठुमरीवर आधारित आहे )

* * * *
एकला नयनाला विषय तो झाला
अवयव सगळे नयनी जमले
यदुवर दिसता डोळा

* * * *

मम सुखाची ठेव देवा
तुम्हापाशी ठेवा

* * * *
अनृतची गोपाला
मृत्यु आला

सुर मल्हारमधल्या, अरज सुनो मोरी, या चीजेवर हे पद आधारित आहे.

* * * *

सूजन कसा मन चोरी
अग हा चोरी यदुकुल नंदन

हे पद, फ़ुलन सेज सँवारुँ, या ठुमरीवर आधारित आहे

* * * *

स्वकुल तारक सूता, सुवरा
वधुनि वाढवी वंश वनिता
ऐसी कांता नर करता

तेंडेरे नाल वसैया, या पंजाबी ठुमरीवर आधारित हे पद आहे. शब्द विचित्र वाटतील, पण आपल्या स्वयंवराच्या वेळी आपला भाऊ रुक्मि आणि कृश्ण यांच्या लढाई जुंपलेली पाहुन, रुक्मिणी स्वतःच स्वयंवर रद्द करते. ती म्हणते जर मी चांगली कन्या आणि चांगली भगिनी नसेल, माझ्यामूळे कुलनाश होणार असेल, तर अश्या मुलीशी कोण लग्न करेल ? असा या पदाचा मतितार्थ

* * * *

आणि या नाटकाचा सर्वोत्तम बिंदु असलेले

नरवर कृष्णासमान
बहुत नृपति ते, आले गेले
परि मनाला यदुवर झाला
झाला मंत्र महान

घेतसे जन्मा, भाग्य उदेले
सुखवी सुकर्मा
स्वयंवर मोडल्यावरहि, कृष्ण ज्यावेळी तिला विवाहाचे वचन देतो, त्यावेळी रुक्मिणी आनंदाने बेहोष होवुन हे पद म्हणते. यात बहुत नृपति ते आले गेले, या ओळींवर किर्ती शिलेदार अशी काहि कारागिरी करते, कि स्वयंवराला आलेल्या राजांची अर्कचित्रे डोळ्यासमोर उभी राहतात.



Dineshvs
Friday, March 21, 2008 - 2:00 pm:   Edit Post Delete Post  Link to this message

हे बंध रेशमाचे, हे शांता शेळके यांचे नाटक. संगीत जितेंद्र अभिषेकींचे होते. माझ्या आठवणीप्रमाणे यात, ज्योत्स्ना मोहिले, बकुल पंडीत, क्षमा बाजीकर, रामदास कामत आणि डॉ. वसंतराव भुमिका करत. शीर्षकगीत अभिषेकींच्या आवाजात धवनिमुद्रीत झाले होते. या नाटकाचा विषय, हिंदु मुसलमान एकता असा होता.

बकुल पंडीत यांची गाजलेली गाणी यातलीच.

विकल मन आज झुरत असहाय
नाहि मज चैन, क्षणक्षण झरती नयन
सांगु कोणा
ही चांदरात, नीज न त्यांत
विरह सखी मी, कुठवर साहु

* * * *

का धरिला परदेस, सजणा

श्रावण वैरी, बरसे झिरमिर
चैन पडेना, जीवा क्षणभर
जाऊ कोठे, राहु कैसी
घेऊ जोगिणवेष


रंग न उरला गाली ओठी
झरती आसू, काजळकाठी
शृंगाराचा साज उतरला
मुक्त विखुरले केश

* * * *

बकुल पंडीतानी निदान बाकिच्या नाटकातली गाणी तरी गायली, पण क्षमा बाजीकर हे नाव या नाटका व्यतिरिक्त मी कुठेच ऐकले नाही. त्यांचा आवाजातली हि लावणी ( शब्द मागेपुढे झाले असतील )

दिवस आजचा असाच गेला, उद्यातरी याल का
अन राया अशी जवळ मला घ्याल का

कितीकिती योजिले, होते बोलायचे
हितगुज मनीचे होते खोलायचे
संगतीत तुमच्या, होते उमलायचे
कळ्या आजच्या शिळ्या उद्याला
ओठाशी न्याल का

पैठणी जांभळी जरिकुंद नेसुनी
मी वाट पहाते केव्हाची बैसुनी
- - -
जागरणाने जळती डोळे
काजळ घालाल का

या सरत्या राती तळमळते मी अति
मज रुते बिछाना, नको वाटते उशी
- - -
हवा वाटतो, हात उश्याला
आल्यावर द्याल का

* * *
याच नाटकात ज्योत्स्ना मोहिले यांची पण, जायचे इथुन दूर आणि तळमळ अति अंतरात, अशी दृत लयीत गायलेली सुंदर गाणी आहेत.



Dineshvs
Monday, March 24, 2008 - 12:25 pm:   Edit Post Delete Post  Link to this message

संत कान्होपात्रा, हे नाटक पण बालगंधर्वानी गाजवलेले नाटक. कान्होपात्रा हि मंगळवेढ्यातली एक रुपवान गणिका. तिच्या प्राक्तनाप्रमाणे, कुणा सरदाराची बटिक होवुन राहणे, तिला भाग आहे. संत चोखामेळा, हा तिच्या घरी झाडलोट करणारा पांडुरंग भक्त.
कान्होपात्रा हताश असताना, चोखोबा तिला भक्तीचा मार्ग दाखवतात.

आपल्या सर्व वैभवाचा त्याग करुन ती, पांडुरंगाच्या दर्शनाला जाते. तिथेही तिचे दुर्दैव तिची पाठ सोडत नाही. कशीबशी दर्शनाची परवानगी ती मिळवते आणि आर्त विराणी गात, ती पांडुरंगाच्या पायाशी प्राण सोडते.

यात अनेक नाट्यपदे होती, नुरले मानस उदास, शर लागला तुझा गे, हि पदे यातलीच, ( नियमित रागदारी संगीत ऐकत असाल तर याच काय बहुतेक नाट्यपदातील राग सहज ओळखु येतात. )

पण या नाटकाचे खरे आकर्षण असते ते यातले अभंग. बालगंधर्वांच्या आवाजात या अभंगाना किती रंग चढत असेल त्याची कल्पनाच केलेली बरी. ( नाहीतरी आपण तेवढेच करु शकतो आता ! )

पतित तु पावना, देवा धरिले चरण, अवघाचि संसार सुखाचा करीन, उस डोंगा परी, किती सांगावेत. ( साधी माणसं चित्रपटामधे हृदयनथ मंगेशकरानी गायलेला, नको देवराया अंत असा पाहु, हा अभंग पण कान्होपात्रेचाच, पण तो या नाटकात नाही.
कान्होपात्रा किणीकर या मराठी रंगभूमीवरच्या ख्यातनाम गायिका, पण त्यानी या नाटकात भुमिका केल्याचे मला स्मरत नाही. त्या खुप सुंदर होत्या आणि मदनाची मंजिरी, हे नाटक, विद्याधर गोखल्यानी खास त्यांच्यासाठी लिहिले होते. मदनाची मंजिरी साजिरी, हे पद खास त्यांचे वर्णन करणारे. )

कान्होपात्रेचा पंडुरंगाजवळचा शेवटचा आक्रोश म्हणजे,
अगा वैकुंठीच्या राया, अगा विठ्ठल सखया
अगा नारायणा, अगा रखुमाईच्या कांता
अगा विष्णु तु गोविंदा, कान्होपात्रा राखी आता

आणि याहिपेक्षा बालगंधर्वानी गाजवलेला अभंग म्हणजे जोहार मायबाप जोहार ( बालगंधर्व प्रेक्षकाना मायबाप म्हणत असत. ) त्या अभंगाचे शब्द असे.

जोहार मायबाप जोहार, तूमच्या महालाचा मी महार
बहु भुकेला झालो, तुमच्या उष्ट्यासाठी आलो
चोखा म्हणे आणिली पाटी, तुमच्या उष्ट्यासाठी आणिली



Gajanandesai
Tuesday, March 25, 2008 - 11:51 am:   Edit Post Delete Post  Link to this message

कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर
चंद्र व्हा हो पांडुरंगा मना करा थोर

दिनेश हे सगळं नाट्यगीतांच्या फलकावर पण डकवा. तिथून वाहून जायचे नाही.
अलीकडेच मी एका कार्यक्रमात 'जोहार मायबाप' ऐकलं. रेश्मा गोडबोलेंनी अगदी दमदार गायलं होतं ते.


Dineshvs
Tuesday, March 25, 2008 - 5:08 pm:   Edit Post Delete Post  Link to this message

गजानन मराठी नाटकांचा विषय निघाला कि मी वहावत जातो. अजुन कसं सगळं लख्ख आठवतेय.
स्मरणशक्ती दगा द्यायला लागली, कि परत हे वाचून मलाच नवसंजीवन मिळेल. पण त्यासाठी इथली जागा अडवणे योग्य होईल का ?


Gajanandesai
Wednesday, March 26, 2008 - 8:54 am:   Edit Post Delete Post  Link to this message

आनंदे नटती
पाहुनी ज्या गृहमयुरपंक्ती

दिनेश तिथे लिहिल्यावर इतरही इच्छुकांना वाचता येईल ना.


Gajanan1
Sunday, March 30, 2008 - 4:33 pm:   Edit Post Delete Post  Link to this message

हे सगळे scraps store करा... आम्हाला हे असले ऐकायची सवय नाही आणि आता बघायचीही सोय नाही. ( आताच one two three cinema बघून आलो! !!!!!!!!!!) निदान वाचता तरी येईल...........

Dineshvs
Monday, March 31, 2008 - 2:52 am:   Edit Post Delete Post  Link to this message

गजानन, अजुन काहि संगीत नाटकांबद्दल लिहिन.

Moderator_10
Monday, March 31, 2008 - 5:27 am:   Edit Post Delete Post  Link to this message

विरंगुळा-अंताक्षरी हे सदर आता नवीन मायबोलीवर हलवण्यात आलेले आह. कृपया पुढील लेखन
या दुव्यावर करावे.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती









 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators