कोबीची कोशिंबीर

Submitted by ऋतुराज. on 17 March, 2025 - 11:31

कोबीची कोशिंबीर
कोबी आवडणारे आणि न आवडणारे अनेक जण आहेत.
कोबीची भाजी सर्रास होते पण झटपट होणारी ही कोशिंबीर कोबी न आवडणाऱ्यांना देखील आवडेल.
साहित्य:
कोबी १५० ग्रॅम भाजीला चिरतो तसा चिरून
कढीपत्ता, कोथिंबीर, दोन हिरव्या मिरच्या, जिरे, मोहरी, हिंग, तेल, मीठ, लिंबू आणि अर्धी वाटी डाळिंबाचे दाणे
कृती:
प्रथम कढईत तेल तापवून घ्यावे. त्यात हिंग, जिरे मोहरीची फोडणी द्यावी. यातच कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकावी. आता एका भांड्यात चिरलेला कोबी घ्यावा त्यावर वरील फोडणी टाकावी. चवीनुसार मीठ टाकावे व लिंबू पिळावे. सगळ्यात शेवटी सर्व्ह करताना डाळिंबाचे दाणे व कोथिंबीर टाकावी.

20250312_205952.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोबीची कचकच आवडते.
अगदी फ्रेश माल दिसतोय..
या सोबत तोंडी लावायला थोडे चिकन तंदूरी मिळाले तर अजून मजा येईल.

दिसतेय छान 👌

पण करणार नाही, कोबीचा उग्र वास आवडत नाय Happy

मस्त रंगीबेरंगी दिसते आहे कोशिंबीर!

मी कोबी बारीक चिरून त्यात ओलं खोबरं, दाण्याचं कूट, बारीक चिरून हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, लिंबूरस आणि साखर घालून करते. अट एकच - हाताने कालवायची, चमच्याने नाही!
वरून फोडणी ऑप्शनल.

हो.
ह्यात बरेच व्हेरिशन करू शकतो.
लिंबाऐवजी दही पण वापरून पहा. वेगळी चव लागते.

छान रेसिपी Happy
.
सोमवार आहे म्हणून कोबीच सापडला तुम्हाला? Light 1
.
सगळ्यात शेवटी सर्व -> सर्व न करता सर्व्ह केले तर चालेल? Proud

ही छान आहे.
कोबी मला बारीक चिरता येत नाही, किसायला घेतला तरी दोन मिनिटांत तो कोबीचा तुकडा जीव टाकून वेगळा वेगळा होतो.
मी अशीच करतो. लिंबू आणि मीठ + इतर काय असेल ते ऑप्शनल.
असंच कॉस्कोचं ब्लूचीज वालं सॅलड ही आवडतं. कोबीच्या या कोशिंबिरीवर ब्लूचीज + क्रम्स कधी आणलं तर घालून बघितलं पाहिजेत.

मी पण अशीच करते फक्त कोबी भाजी सारखा न चिरता चायनीज ला अगदी बारीक चिरतो तसा चिरून (म्हणजे दाताला फार व्यायाम होत नाही)वरून गरम फोडणी.
थोडीशी साखर,कूट घालूनही छान लागते ब्राम्हण पद्धतीने.
कोशिंबिरी चा फोटो फ्रेश आलाय.

Happy मस्त दिसत आहे कोशिंबीर. डाळिंबाने शाही झाली आहे.
मी वाफवून करते, फोडणी, दाण्याचा कूट, लिंबू घालते, दही घालत नाही. कोलस्लॉचे पाकीट असले की झटपट होते पचडी/ कोशिंबीर.

आम्ही पण दाकु घालून कोशिंबिरवाले. पण मला कोल स्लॉही खूप आवडतं आणि तोनकात्सुबरोबर पातळ चिरलेला कोबी देतात तो ही आवडतो.

भारी दिसतेय डिश. करून पाहीन. कच्चा कोबी कधी खाल्ला नाही .

( रच्याकने ललित लेखनात धागा असल्याने दवणीय टाईप लेख असेल असे वाटून धागा उघडला नव्हता . Light 1 Biggrin )

धन्यवाद,
स्वाती, rmd, किल्ली अमितव, सिमरन, अस्मिता, सायो, धनि, कुमार सर, अश्विनी के, जाई

यात कोबीचा क्रंचीपणा महत्त्वाचा आहे.
तसेच डाळिंबाचे दाणे फक्त सजावटीसाठी नसून त्याची वेगळी चव येते.

छान दिसतेय.

आम्ही कोबीची पचेडी करतो. कोबी किसून किंवा बारीक चिरुन, त्यात दाण्याचं कुट घालून लिंबूरस घालतो. मिरच्या, कढीलिंब पाने फोडणी करतो वरुन, मग कालवतो. मी चार मेथीदाणेही घालते फोडणीत, कोबीत थोडं आलं घालते, किंचित मीरपुड, ओवा घालते, वरुन कोथिंबीर. कधी लिंबाऐवजी दही घालते, कधी ओलं खोबरंही घालते. मेन दाण्याचं कुट हवंच मात्र.

मस्तच दिसतेय.
कोबी चिरून केलेलं असच सॅलड खुप आवडतं , किसून केलेल्या पचडी पेक्षा.

कोबी पात्तळ उभा चिरून घ्यायचा, कांदे, काकडी, बिया काढून टोमॅटो , फुगी मिरची जे असेल ते ही सगळ उभं उभं पातळ चिरून घ्यायचं. थोडे पनीर चे क्युब्ज घालायचे. असले तर, चारोळ्या किंवा बदामाचे तुकडे घालायचे चवीला. तेल, मध, लिंबू रस, मिरी पावडर मीठ असं ड्रेसिंग करून त्यावर ओतयच, कधी तरी इटालियन हर्ब्ज भुरभु रवायचे हलक्या हाताने बदल म्हणून. मिक्स करून लगेच खायचं. वेळ गेला तर मीठामुळे सॅलड मऊ पडतं आणि मजा नाही येत. करून बघा नक्की.

कोबी वाफवून घेतो कोबीचा पाद्रट उग्र वास जायला. कोबीको मध्ये ओलं खोबरं , कच्ची हिरवी मिरची , कोथींबीर व लिंबू पाहिजेच.
मग वरून जीर्‍याची फोडणी. नाहितर नुसते मीठ, दही , कोथींबीर व डाळींबाचे दाणे.

सुंदर दिसतेय.
डाळिंबाचे दाणे गेमचेंजर आहेत.
करून पाहीन. यात गाजर किसून टाकलं तर चालेल का?

अन्जु ममो ताई, झंपी, रानभुली धन्यवाद
अन्जु ममो ताई, झंपी>>>> तुमच्या रेसिपी पण मस्त आहेत.
रानभुली, हो टाकू शकतो यात गाजर पण फार नको.
याच पद्धतीने डाळिंबाचे दाणे वगळून गाजराची कोशिंबीर करता येते.

मी पण करते को ची को , पण कच्चीच. नो वाफ. क्रंची कोबी मस्त लागतो.डाळींब दाणे मात्र कधी या कोशिंबीरीत नाही घातले. बघीन घालून. मी आत्ताच चिरुन ठेवलेली कोबी पचडी करुन संपवली.

कोबी बारीक चिरुन मिरची, कोथिंबीर,दा कु ,लिंबू पिळून आणि वरून फोडणी ही पचडी/ कोशिंबीर. यात व्हेरिएशन साठी कधी दही चालेल.
आणि without फोडणी सॅलेड. म्हणजे अस़च सगळ्यांचं असेल.
बोल मस्त दिसतोय ऋतूराज.उचलून खायला सुरुवात करावी असं. सद्ध्या मी लक्षात ठेऊन आधी सॅलेडस खातेय.

मस्त रेसिपी. डाळिंबाचे दाणे घालून करून पाहीन .
पचडी आणि कोशिंबीर मध्ये नक्की काय फरक असतो ? गाजराची पचडीच्या रेसिप्या बघितल्या तर त्यात मूग डाळ घालायला सांगितली आहे. बरोबर आहे का ? नेहमी दही घालून करते

इंटरेस्टींग... कोबीची कोशिंबीर आमच्याकडे अनेकदा होते पण त्यात डाळिंबाचे दाणे पहिल्यांदाच पाहिले!
>>पण करणार नाही, कोबीचा उग्र वास आवडत नाय>>
अनिंद्यशेठ तुमच्या आणि आमच्या सौभाग्यवतींच्या खाण्या-पिण्याच्या आवडी बर्‍यापैकी समान आहेत (खोबरं आवडत नाही वगैरे वगैरे) हे मला वाटतं मागेच तुम्हाला म्हणालो होतो. तिलाही कोबिचा उग्र वास आवडत नाही, पण वरती अन्जू ह्यांनी म्हंटलय "मी चार मेथीदाणेही घालते फोडणीत, कोबीत थोडं आलं घालते" त्याप्रमाणे तीची मामी सुद्धा फोडणीत मेथीचे काही दाणे आणि आलं घालते, आणि तशी कोशिंबीर केल्यास मात्र (कदाचीत कोबीचा उग्र वास कमी होत असल्याने) ती थोडीफार का होइना, पण खाते बुवा 😀

कधी कधी कोबी फार उग्र असतो, तेव्हा मी ही कच्चा खाऊ शकत नाही , पण कधी छान मिळतो तेव्हा पचेडी किंवा कोशिंबीर इतरही सॅलेडस मिक्स करून करते. यावेळी कोबी छान मिळाला म्हणून केली दोन तीनदा. मेथी दाणे चार मी बरेचदा सगळ्यात घालते आणि आलं आवडतं खूप, मी ते असं ही खाते, माझे बाबाही खायचे.

Btw मी ही माहेरची भावे.

Pages

नवीन प्रतिसाद लिहा