मेघे ढका तारा (भाग ४)

Submitted by Abuva on 13 April, 2025 - 05:08

(भाग ३ - https://www.maayboli.com/node/86619)
प्रोजेक्ट थोडासा ओव्हरशूट झाला होता. पण डिलेज मॅनेजेबल होते. मिहिरला सूत्रं मिळाल्यावर त्यानं बरंच सावरून घेतलं होतं. एक प्रश्न उपस्थित झाला. डॉक्युमेंटेशन! पुण्याला परत पाठवणं शक्य नव्हतं, कारण इथे बरेच चेंजेस झाले होते. कमलनं चक्क नकार दिला. मिहिरला करणं अशक्य नसलं तरी त्याचं काम बघता, ते इतर कोणी करणं सोयिस्कर होतं. विचार करताना मिहिरसमोर नाव आलं - सरोज! पण त्या दिवसापासून सरोज त्याच्याशी जरा आढ्यतेनंच वागत होती. झटकून टाकत होती. विचारावं का तिला, मिहिर दुग्ध्यात पडला.
त्यादिवशी कमलच्या एका प्रोसेसचं टेस्टिंग ठरलं. त्यामुळे त्याला उशीर होणार होता. तो मिहिरला म्हणाला, सरोजला आज सुपरमार्केटमधे जायचंय. मला उशीर होणार आहे. तूच घेऊन जा तिला. ही एक इष्टापत्तीच होती.
मिहिरनं बेल वाजवली, तेंव्हा सरोजनंच दार उघडलं. त्यानं किल्ल्या पुढे केल्या. "कमल नाही आला?”
"नाही, त्याला काम आहे.”
ती सटकलीच. तिचा आवाज चढला. "जरा बाहेर जाऊ म्हटलं तर याला काम! आम्ही घरात सडतोय, पण यांची कामं महत्त्वाची! मुलाकडे लक्ष नाही, बायकोकडे नाहीच, फक्त काम, काम आणि दारू. वीट आलाय या सगळ्याचा... तू काय तोंड बघत उभा आहेस? तुझं काम होतंय ना, तू मोकळाच आहेस की मग! फिर हिच्याबरोबर, तिच्याबरोबर...”
"सरोज..”
"चूप बैठो"
"सरोेज, आपण जायचं का सुपरमार्केटला?”
"का? तू काय नवरा आहेस माझा?” मिहिर गुमान मागे वळला.
"मिहिर, आत ये.” तिचा आवाज मावळला होता. "तू नाहीयेस, मितूही गेली... आता खूप एकटं वाटतंय रे, दिवसा घर खायला उठतं... अब मै क्या बताऊं...” रडवेल्या आवाजात ती म्हणाली. तिचं हे रूप मिहिरला नवं होतं. 'काय झालंय हिला?’
तो म्हणाला, "जाऊन यायचं का? एक काम तेवढंच आटपेल...”, आणि शिशिरला घ्यायला गेला.
खरेदी वगैरे झाली. आता सरोजचा मूड जरा सुधारला होता. ती म्हणाली, "आपण कमलला घेऊनच घरी जायचं का?” मिहिरनं गाडी ऑफिसकडे घेतली. कमलला खालून फोन केला तर तो म्हणाला दहा-पंधरा मिनिटं लागतील अजून. मग मिहिर सरोजला म्हणाला, "वरती चलतेस का? अजून थोडा वेळ लागेल कमलला". त्या दोघांना घेऊन मिहिर वरती आला. सहजच त्यानं आपलं सॉफ्टवेअर तिला दाखवायला सुरूवात केली. तिला थोडा इंटरेस्ट वाटलाय हे बघून मिहिर हळूच म्हणाला, "एक विचारू का?” सरोजनं मान डोलावली. "तू याचं डॉक्युमेंटेशन करशील?”
सरोजला आश्चर्य वाटलं, “मला करता येईल?”
"का नाही? तुझी भाषा चांगली आहे, तुला देशोदेशीच्या माणसांचे वेगवेगळे अनुभव आहेत. तुला नक्की करता येईल!”
"पण... शिशिरचं काय?”
"ते सगळं बघता येईल. पण तुला करावसं वाटतंय का?”
सरोजनं मिहिरच्या नजरेत नजर मिळवली. तो मंद हसत होता. "माझ्या संध्याकाळच्या ओरडाआरडीवरून म्हणतो आहेस ना तू?”
"नाही गं! म्हणजे ते आहेच, पण मी अगोदरच याचा विचार केला होता. खरं सांगतोय! मला वाटतं तुला हे जमेल. तू ट्राय तर कर...” सरोजनं त्याचा हात पकडला. "खरं खरं सांग मला...”
मिहिर जरा गंभीर झाला. "सरोज, हे काम खूप दिवस रेंगाळलंय. हे संपवायलाच हवं आहे. आणि या कामाला एका फिनिशरची गरज आहे. मला वाटतं की त्याला लागणारा ऍटिट्यूड तुझ्याकडे आहे.”
काय योगायोग बघा, अचानक शिशिरनं मान हलवत हां, हां, हां असा आवाज काढला. आख्खा हात तोंडात घालण्याचा तो प्रयत्न करत होता.
"बघ, बघ, तो सुद्धा हो म्हणतो आहे! करू दे ना हे काम आईला?” त्यानं परत एकदा तोच आवाज काढला. दोघंही हसले. वातावरण रिलॅक्स झालं. तेवढ्यात कमल आला. मिहिर कमलला म्हणाला, "कमल, मै सरोज को रिक्वेस्ट कर रहा था की वो अपने लिये डॉक्युमेंटेशन करे. शिशिरभी हां बोल रहा है!"
"शिशिर हॉ बोला?! तो फिर हामको क्या प्रोबलेम! क्या सोरोज?”, त्यानं हसत हसत शिशिरला घेतलं. सरोजनं गंभीरपणे विचारलं, "कमल, तू मला मदत करणार असशील तर मी यात पडते. नाही तर..”
कमल तडक म्हणाला, "त्याची तू काळजी करू नकोस. मी आहे तुझ्याबरोबर. हा प्रॉजेक्ट जितक्या लवकर संपेल तितके आपण लवकर मोकळे होऊ. चला, चला, आता वेळ घालवू नका. शिशिरला भूक लागलेली दिसतेय. त्यानं हात खायच्या आधी घरी पोहोचू या...”
मिहिरच्या डोक्यावरचं एक ओझं उतरलं होतं. आणि मनावरची मणामणाची ओझी...

---

चार दिवसांचा लॉन्ग वीकेंड आला. वर्षातून एकदाच मिळणारी संधी. सगळ्या दादा-वैन्यांचं कित्येक दिवस प्लॅनिंग चाललं होतं यासाठी. त्या प्रॉजेक्टच्या रेट्यात गेल्या महिन्या-दोन महिन्यांत कोणाशी धड भेट झाली नव्हती, का गप्पा. आता सगळा बॅकलॉग भरून काढायचा होता मिहिरला.
सकाळी सकाळी गाड्या भरून मंडळी गंतव्यस्थळी रवाना झाली. कमलच्या गाडीत नेहमीचे यशस्वी कलाकार होते - मिहिर आणि मितू! ये है प्यार का सफर अशी सगळ्यांची अवस्था होती... दोन-अडीच तासांच्या सुरेख ड्राइव्ह नंतर मंडळी पोहोचली.
शुभ्र पांढऱ्या वाळूचा मैलोंगणती पसरलेला समुद्रकिनारा, समोर अनंत सागराची अथांग निळाई, किनाऱ्याची आस धरून धावत येणाऱ्या अविरत लाटा, माथ्यावर तळपता सूर्य, आणि पुळणीअलिकडे माडाच्छादित शॅक्स! वाळूवर पहुडलेली, छत्र्या लावून पडलेली, टॉवेल टाकून सांडलेली, खुर्च्यांवर लोळणारी माणसं... आईबापांशेजारी वाळूचा किल्ला करणारी बालकं, समुद्राच्या लाटांवर स्वार होऊ पहाणारी मुलं, लाटांशी लीलया झुंजणारे युवक-युवती, अंगावर लाटा घेत फतकल मारून बसलेले प्रौढ स्त्री-पुरूष... समुद्राच्या गाजेला लाजवणारा आवाज करत पाण्याचे फवारे उडवत नखऱ्यात इकडून तिकडे जाणाऱ्या जेट स्की, पॅरासेलिंग करणाऱ्या स्पीडबोटी... या सगळ्या पसाऱ्यात आपले कथानायक नायिकाही बघता बघता हरवून गेले...

---

उन्हं कलायला लागली होती. दुपारी उन्हाचा जो तडाखा जाणवत होता, तो आता कमी झाला होता. कमल आणि सरोज आता शिशिरला घेऊन पाण्यात उतरले होते. कमल त्याला घेऊन गुडघाभर पाण्यात उभा होता. लाट आली की शिशिरचे पाय पाण्यात बुडवत होता. शिशिरही त्याची मजा घेत होता... सरोजनं बराच काळ कंट्रोल ठेवला होता. केंव्हाचे तिचे हातपाय शिवशिवत होते. असा समुद्र, असा नजारा तिला खुणावत होता... त्यात सगळी यंग जनता आणि दादले पाण्यात यथेच्छ, यथाशक्ती खेळत होते. पण सगळ्या वैन्या मात्र उगाच प्रोक्षण केल्यासारख्या पाण्यात पाय बुडवून चार थेंब अंगावर उडवून सावलीला येउन स्थानापन्न झाल्या होत्या. शिवाय शिशिरपण होता ना. त्यामुळे कंट्रोल, कंट्रोल असा तिनं मनाशी धोशा लावला होता. पण एकदा पाण्यात उतरल्यानंतर मात्र तिचा धरबंद सुटला... ते स्वच्छ, उबदार पाणी, आजूबाजूला उत्साही जनता... सर्रकन सूर मारत ती पाण्यात घुसली. सपासप हात मारत ती खोल पाण्यात पोहोचली. आता ती होती आणि तो सागर. जगात दुसरं काहीच नव्हतं. येणाऱ्या प्रत्येक लाटेवर आरूढ होत तिनं सागराला जणू आव्हान दिलं. येणारी प्रत्येक लाट एक हर्डल होतं. आणि पलिकडे ती फिनिश लाईन. कधीच जवळ न येणारी, पण कधी लांबही न जाणारी, कायम टप्प्यापलिकडे रहाणारी... खुणावणारी, पण भुलवणारी... दृष्यमानही, आभासीही... त्या अमर्याद आनंदाचं ती आकंठ रसपान करत होती.
कुठेतरी उंडारून मिहिर परत आपल्या ग्रुप जवळ आला. त्याला कमल शिशिरला घेऊन पाण्यात उभा असल्याचं दिसलं. सरोज लाटांमध्ये लहरत होती तेही त्यानं पाहिलं. झटकन तो कमलपाशी गेला, "घेऊ का शिशिरला? आप बैठो.”
कमलला काय, पडत्या फळाची आज्ञा.. मिहिर गळ्यापर्यंत पाण्यात शिशिरला घेऊन उतरला. येणाऱ्या प्रत्येक लाटेला पाठ देऊन, लाटेबरोबरच उसळी घेऊन त्यानं शिशिरला तरंगवायचा खेळ सुरू केला. तोही मस्त एंजॉय करत होता.
मनसोक्त पाण्याशी खेळल्यावर सरोज मिहिरजवळ आली. तिनं शिशिरला घेतलं, आणि कंबरभर पाण्यात येऊन बसली. मिहिरही शेजारी बसला. तिनं शिशिरला हात धरून पाण्यात उभं केलं होतं. आता शिशिर लाटांना पाय लावायचा खेळ खेळत होता. मिहिरचं लक्ष अभावितपणे किनाऱ्यावर तारुण्य मिरवित चालणाऱ्या गौरांगना, कृष्णांगनांकडे जात होतं. सरोजनं त्याला प्रश्न विचारला. त्याचं लक्षच नव्हतं! तो एका डोळे मोडत चाललेल्या राधेच्या सौष्ठवाची वळणं पार करून, वारियाने उडणाऱ्या सोनेरी केसांत जरा गुरफटला होता, एवढंच! सरोजनं चापटी मारून त्याचं लक्ष वेधलं. तो लाजलाच. त्याचा गोरापान चेहेरा लालबुंद झाला.
सरोज म्हणू लागली, "सागर किनारे, दिल ये पुकारे...”
बावचळून तो उठू लागला. त्याचा हात धरून सरोजनं त्याला खाली बसवलं. "अरे लाजू नकोस! लक्ष नव्हतं का तुझं? कुठे होतं लक्ष?!” तिनं त्याला डिवचलं.
तो पार भंजाळला होता. पण शहाणपणा करून तो आता किनाऱ्याकडे पाठ करून बसला. सरोज मनसोक्त हसली. तिनं शिशिरला त्याच्या हातात दिलं, आणि त्याच्यावर पाणी उडवण्याच्या मिषानं मिहिरवर पाणी उडवून घेतलं. जवळ बसलेल्या सरोजचा चेहेरा मावळतीच्या सूर्यप्रकाशात उजळला होता. अनेक दिवसांनी घराच्या चार भिंतीतून बाहेर पडलेल्या, मोकळ्या हवेत स्वच्छंद विहार करायला मिळालेल्या सरोजला झालेला आनंद तिच्या चेहेऱ्यावरून ओसंडून चालला होता. नव्हे, तो तिच्या अंगाप्रत्यंगातून प्रतीत होत होता. ओलेती, सोनेरी वाळू चिकटलेली सरोज त्या मावळतीच्या किरणांत एखाद्या मोरपंखी वर्खाच्या मासोळीसम भासत होती. मिहिर अनिमिष नेत्रांनी तिच्या सौंदर्याचा आस्वाद घेत होता. त्याच सूर्यकिरणांनी खुलवलेला गोऱ्यापान मिहिरचा बोलका चेहरा, अंतरीच्या गोडव्याची ओळख पटवणारे डोळे, त्याचा सुडौल बांधा- सरोज त्याच्या सतेज तरुणाईचं उत्कट अवगाहन करत होती. शिशिरच्या लाटांवर पाय मारण्यानं दोघेही भानावर आले.
तेवढ्यात मितू त्यांना हाक मारत आलीच. चला चला, सगळे आता व्हिलावर चाललेत. "जाऊ देत त्यांना, मितू, चल आपण पाण्यात खेळू या", असं म्हणत सरोजनं तिला खेचलं. त्या दोघी पाण्यात जाऊन मिहिरवर पाणी उडवायला लागल्या. शिशिर हातात होता, त्यामुळे त्याला काही करता येई ना. तो ताबडतोब उठला, आणि धावत जाऊन त्यानं शिशिरला कुणा एका वहिनींच्या हातात सोपवला. "वैनी, घ्या याला. मी त्या मुलींना धडा शिकवून येतो”, असं सांगून परत लाटांत घुसला...

---

या सगळ्यांनी समुद्राकाठीच एक भला मोठा व्हिला बुक केला होता. सगळे एका ठिकाणी असल्यानं धमाल मजा येत होती. पण दिवसभर पाण्यात खेळल्यानं, उन्हात तापल्यानं बहुतेक सिनियर ढपले होते. दोन चार जणं आली शॅकवर बीअर किंवा कॉकटेल घ्यायला, पण जाऊ दे, उद्या निश्चित एंजॉय करू असं ठरवून परतले. आपापल्या बेडरुममध्ये जाऊन एसी समोर घरंगळले!
अस्ताला जाणाऱ्या सूर्याला साक्षी ठेवून कमलनं चौथा पेग सुरू केला... त्याच्या सोबतीला आता मिहिर आला. पीटरनं (बारटेंडर) विचारलं काय घेणार? मिहिर म्हणाला कॉकटेल! बढिया! कोणतं? भाई तू बोल कौनसा अच्छा है? जादा स्वीट थोडा बिटर? हां चलेगा! तो ये ले - सेक्स ऑन द बीच!
पीटर म्हणाला, वर बसता का? नजारा खूब दिखेगा, हवाभी आयेगा! चला, गच्चीत बसू!
डुलत डुलत कमल वर गच्चीत आला. मिहिरनं खुर्ची ओढली‌ आणि भिंतीला तंगड्या लावून चिअर्स करता झाला. तेवढ्यात त्याला शोधत मितू आली. त्यानं वरुनच पीटर-मॉनला आवाज दिला, भाई, एक ब्लडी मेरी भेज देना उपर!
सूर्यास्ताचे रंग गहिरे होत काळवंडले. आणि रात्रीचा अंमल चालू झाला. यांच्या व्हिलात निद्रेने हातपाय पसरले, पण बाकी बीच वर शाम ही से कुछ हो जाता है मेरा ही जादू जवां असा रॉकिंग माहौल होता.
पाचवा का सहावा पेग हातातून सांडला तेंव्हा कमल ऑफिशिअली आऊट झाला होता. मिहिर म्हणाला, मी सोडून येतो याला रूमवर. त्यानं हात देऊन कमलला उठवलं. कमल झोपेतून जागा झाला. त्यानं मिहिरकडे पाहिलं. तू? तू मेरा जॉब लेनेवाला है ना? मेरा जॉब? तू कौन होता है रे? त्याचं बरळणं चालू झालं. क्या नाम है तुम्हारा? माझ्या घरात कसा घुसलास तू? वाईफ, निकाल दो इसको. कहां है मेरी वाईफ? असं करून त्यानं मोठ्यांदा हाक मारली, सोरोज!
हळूहळू त्याला बाबापुता करत मिहिर व्हिलात घेऊन गेला. सरोजच्या बेडरूमवर टकटक केली. तिनं दरवाजा उघडला. कमलची परिस्थिती पाहून डोक्याला हात लावला.
याला झोपवायला मला मदत कर, तिनं मिहिरला सांगितलं.
कमलला मधनंच जाग येत होती, वाईफ, इसको बाहर निकाल. ये मेरा जॉब लेनेवाला है. कैसे घुसा मेरे घरमें? गेट आऊट... वगैरे चाललंच होतं.
मिहिरला तशीही चढली नव्हतीच, पण जी होती तीही उतरली. कमलच्या मनात खोल दडलेलं शल्य म्हणा, सुप्त भीती ही अशा रितीनं बाहेर येत होती...
एक शब्दही न बोलता, मान खाली घालून मिहिर तडक बाहेर पडला.

----

त्याला नकोसं वाटत होतं, पण मितू तिथे थांबली होती. म्हणून मिहिर परत शॅकवर गेला. पीटरकडून एक मोहितो घेतलं. गच्चीत मितू त्याची वाटच पहात होती. "अरे किती वेळ? झोपला का तो?"
कमलच्या तमाशा नंतर मिहिर जरा आकसलाच होता. दिवसभराच्या हैदोसानंतर एक शारिरिक थकवा होताच. पण मनावरही उदासीन मळभ आलं होतं. "जागा दे रे”, करत मितू आली, आणि खुर्चीच्या हातावर बसली. मिहिरच्या खांद्यावर रेलली. एक निश्वास सोडत म्हणाली, "इतका छान दिवस गेला आहे आणि आता तू सिरियस होऊन बसला आहेस! छोड दो यार! कमलचं बोलणं कुठे मनावर घेतोस... गोली मारो उसको...”
मिहिर तिच्याकडे बघून हसला, पण त्यात जान नव्हती. मिनिटभर दोघंही शांत होते. "त्यात तथ्य आहे, म्हणून वाईट वाटतंय”, मिहिर म्हणाला. "त्याला सगळं समोर दिसत होतं. पण त्यानं हातचं न राखता मला मदत केलीये. माणूस म्हणून फार चांगला आहे तो...”
"हो, मलाही त्याचा वाईट अनुभव नाही. अरे, पण जो बायकोला सांभाळू शकत नाही, तो कसला...”
"म्हणजे...”
"काहीही! ती तुझ्यावर फिदा आहे, तुला काय सांगायचं"
"मितू...” चटका लागल्यासारखा मिहिर उठला. तो कावराबावरा झाला होता.
मितू खवचट हसली, "तुला माहिती नाही? सगळ्यांना माहितीये, दिसतंय ना... संध्याकाळी किती वेळ डोळ्यांत डोळे घालून बसला होतात... शेवटी मी सांगायला आले!”
मिहिरच्या डोळ्यांत पाणी होतं. मितूला त्याची रिऍक्शन समजलीच नाही. "मिहिर...?”
तो हातात डोकं धरून खुर्चीत बसला. त्याचं शरीर हुंदक्यांनी गदगदा हलत होतं. मितू त्याच्या खांद्याला धरून उभी होती, त्याच्या पाठीवरून हात फिरवत होती. तिला हे अनपेक्षित होतं, निव्वळ अनपेक्षित.
थोड्या वेळानं त्याचा कढ ओसरला. मितूनं विचारलं, "मिहिर, काय झालं रे?” आता तिच्या आवाजात मृदुता होती, आपलेपणा होता. त्या अनपेक्षित रडण्यानं म्हणा, तिच्या मनातली खोट दूर झाली होती.
मिहिरला बोलायला शब्द सुचत नव्हते. "म्हणजे, मी फक्त कमलला त्रास दिला नाहीये, तर... तर... सरोजची बदनामी...” त्याला पुढे बोलावलं गेलं नाही. पुन्हा त्यानं डोकं हातात घेऊन मान खाली घातली.
मितूनं व्हिलाच्या दिशेनं पाहिलं. सरोज त्यांच्या बेडरूमच्या बाल्कनीत एका खांबाला टेकून उभी होती, अधोमुख, विचारमग्न. विमनस्क?

(क्रमशः)

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान चालू आहे कथा. पात्रे आणि वातावरणनिर्मिती एक नंबर! या ऑनसाइट -ऑफशोअर प्रोजे़क्ट्स, त्यातल्या टीमस्चे डायनामिक्स या वातावरणाशी चांगलाच परिचय आहे. या बॅकग्राउंड च्या कथा भारी असतात तुमच्या Happy

नवीन प्रतिसाद लिहा