(भाग २- https://www.maayboli.com/node/86617)
महिना उलटून गेला होता. आता मिहिर बऱ्यापैकी रूळला होता. तिथे गरजेचं म्हणून ड्रायव्हिंग शिकून घेतलं होतं. लायसन्सही मिळालं. मग प्रॅक्टिस व्हावी म्हणून कमल रोज त्यालाच गाडी द्यायचा आणि स्वतः आरामात बसून जायचा यायचा. मग वीकेंडचं शॉपिंग असो वा मंडई. हळूहळू मिहिरचं बेबी-सिटींग संपून तो आता गोष्टी आत्मविश्वासपूर्वक करायला लागला होता. यात महत्त्वाचं म्हणजे आता त्याला स्थानिक लोकांची बोलीभाषा बऱ्यापैकी कळू लागली होती. त्यामुळे संवादाची अडचण सुटली होती.
मिहिर एक जुनी सिस्टीम नव्या टेक्नॉलॉजीत आणत होता. जुन्या टेक्नॉलॉजीचा, सिस्टीमचा एक्स्पर्ट कमल होता, नव्या टेक्नॉलॉजीचा मिहिर. कमल सिनिअर, त्यामुळे या प्रॉजेक्टचा लीड कमल. त्याचं काम म्हणजे मिहिरच्या टेस्टिंगला जो लागेल तो डेटा आणून देणं. आता पुढचे तीन ते सहा महिने दोन्ही - नवी आणि जुनी - सिस्टीमा साईड-बाय-साईड चालवायच्या. आणि येणारे रिझल्ट चेक करायचे. जर फरक असेल, तर तो का? मग काय फिक्स करायचे ते करायचे. अशी तीनेक महिने नवी सिस्टीम न सांडता सुरळीत चालली, तर जुनी बंद करायची, आणि नवी वापरायला घ्यायची. याला पॅरलल रन म्हणतात. तर मग या साठी जो जुन्या सिस्टिमचा डेटा लागतो तो ऑटोमॅटिकली मिळाला तर कामं भराभरा होणार. तिथे कमलचे टेक्निकल ज्ञान उपयोगी होतं. सुरवातीला मिहिरला जुन्या सिस्टीमचा गंध नसल्यानं, कमलचा खूप आधार होता. पण हळूहळू त्याला त्या सिस्टीमचीही माहिती होत होती. मग तो बऱ्याचशा गोष्टी स्वतःच करून घ्यायला लागला. बाकी काही बाबी कमलनं तयार करून दिल्या होत्याच. मग कमलचं बरंचसं काम कस्टमर सोबत बोलणं आणि प्रॉजेक्ट मॅनेजमेंट हेच होतं. तोही त्यात खूष होता.
एका विशिष्ट प्रसंगानंतर मिहिरविषयी कस्टमरला कॉन्फिडन्स वाटायला लागला. झालं असं, की एक महत्त्वाची प्रॉसेस दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी रन होत असे. या महिन्याचा शेवटचा दिवस शनिवारी होता. तसं रविवारी सुट्टी असल्यानं काम लवकर संपवायची घाई नव्हती. पण त्या प्रॉसेसच्या महत्त्वामुळे मिहिर सकाळी लवकर उठून त्याचं टेस्टिंग करायला ऑफिसला पोहोचला. आणि त्याला लक्षात आलं की आपले रिझल्ट्स चुकताहेत. जुन्या सिस्टीमचे रिझल्ट्स निराळे आहेत. त्यानं चारचार वेळा सगळ्या गोष्टी तपासल्या. पण त्याच्या रिझल्ट्स मध्ये काही चुकीचं वाटत नव्हते. मग जुनी सिस्टीम चुकते आहे? सहजासहजी विश्वास बसण्यासारखी ती गोष्ट नव्हती. पण मिहिरचा त्याच्या सिस्टीमवर पूर्ण भरवसा होता. त्यानं कमलला फोन लावला. "कमल, यार देखोगे क्या, ये रिझल्ट्स क्यूं गलत आ रहे है?”
कमलनं त्याला उडवून लावलं. "कुछभी भकते हो क्या? लाईव्ह सिस्टम गलत कैसे हो सकती है?! तुझी सिस्टम नीट चेक कर.”
वरतून फिलॉसॉफी सुनवली, "भाई एसा है के, यू डू नॉट डाऊट युवर वाईफ!" मिहिर दचकला. म्हणजे काय म्हणतोय हा? "मतलब?"
"अभी तुम्हारी शादी नै हुई है, तो तुम मुआमला नै समजोगे... हा हा हा. मतलब ये, की ज्या गोष्टीवर आजपर्यंत तुम्ही विश्वास ठेवला आहे, त्याच्यावर विनाकारण संशय घ्यायचा नाही. समझे?”
हुश्श!
पण मिहिर हटून बसला. त्यानं ऑन-कॉल प्रोग्रामरला कॉल केला. त्याला नीट सगळं समजावून सांगितलं. त्यानं सगळं ऐकून घेतलं. आणि सांगितलं, "यू आर करेक्ट. देर इज ऍन एरर इन लाइव्ह सिस्टम...". ह्या प्रसंगानं कस्टमर कडे सगळ्यांचं मत त्याच्यविषयी पॉझिटिव्ह झालं. याचं कमलला, त्यानं दाखवलं नाही तरी वैषम्य वाटल्या वाचून राहिलं नाही.
---
दिवस जात होते. पॅरलल रन्स चालू होते. पण म्हणावी तशी प्रगती नव्हती. मग कस्टमरनं मीटिंग बोलवली. कमल, मिहिर अर्थातच होते. कस्टमरचे लोकं होती. यांचा कंट्री हेड उपस्थित होता. चर्चा, वितंडवाद झाल्यावर लक्षात आलं, की कमलनं जे ऑटोमेशन करणं अपेक्षित होतं, ते केलं नसल्यानं प्रॉजेक्ट मागे पडत होतं. कस्टमरला थातुरमातुर कारणं देऊन कंट्री हेडनं थोपवून धरलं. बाहेर येऊन मात्र त्यानं कमलची खरडपट्टी मिहिरसमोरच काढली. पार धारेवर धरला. आणि जखमेवर मीठ चोळावं तसं मिहिरला त्या ऑटोमेशनची जबाबदारी सोपवली. नशीब कमलचं, की त्याला लीड म्हणून काढलं नाही.
---
आता सरोज आणि मिहिर अशी जोडी छान जमली होती. कुठेही मार्केटमध्ये जायचं तर सरोज पहिल्यांदा मिहिरला विचारायची, मग कमलला! कमल तसाही बैठ्या वृत्तीचा असल्यानं त्याला पथ्यावरच पडलं होतं. वीकेंडला आठदहा बीअरचा तरी फडशा पाडायचा हे त्याचं ठरलेलं असायचं. ते झालं, की त्याचा वीकेंड झकास गेला म्हणायचं. सरोजचा शब्द कधी मिहिर खाली पडू द्यायचा नाही. मग काम सोडून यावं लागलं तरी बेहत्तर... मग काय, शिशिरला कडेवर घेऊन हे दोघं निघायचे. कधी नव्हे ते सरोज इतकी बाहेर फिरू लागली होती. बाकी टीम मेंबरना ते लक्षात आलं नव्हतं असं नाही.
यावर कोणी तरी कोटी केलीच की, 'सरोज म्हणजे सूर्यविकासी कमळ का रे?’
'माहित नाही. का रे?’
'नाही, मिहिर म्हणजे सूर्य. तो आल्यापासून सरोज चांगलीच खुलली आहे!’
तिच्याही वागण्यात बदल झालाच होता ना! आता तिच्याशी गप्पा मारायला, हास्यविनोद करायला, कामं विभागून घ्यायला आणखी एक जण मिळाला होता. तिच्या आणि कमलमध्ये तसं वयाचं अंतर होतंच. त्यांच्या वृत्तीत तर कमालीचा फरक होता. तिच्या उत्साहाला, ऊर्जेला इतकी वर्षं कधी वाव मिळाला नव्हता, तो आता मिळत होता. मिहिरलाही - का कुणास ठावूक - तिची संगत भावत होती. सुपरमार्केटमधे आता तिच्याबरोबर कमल दिसला तर लोकं विचारायचे, काय आज मिहिर नाही?! एक अनाम नातं खुलत होतं.
---
ऑफसाईटला रोटेशन कायम चालू असायचंच. दुसऱ्या एका प्रॉजेक्टवरचा एक मुलगा परत चालला होता, आणि त्याच्या जागी एक मुलगी पुण्याहून येणार होती. तिथल्या शिरस्त्याप्रमाणे, मिहिर आता त्या मुलाच्या पार्टनर बरोबर शिफ्ट होणार होता आणि ती नवी मुलगी कमल-सरोज यांच्यासोबत रहाणार होती. मिहिरनं विचार केला, या दोघांनी आपल्याला इतकं सांभाळलं, खाऊपिऊ घातलं, कधी परकं वाटू दिलं नाही, यांच्यासाठी काही तरी केलं पाहिजे. त्याला आयड्या सुचली. श्रीखंड! करता येईल श्रीखंड? मग एक मराठी वहिनी होत्या त्यांना विचारलं, हे योगर्ट वापरतो तेच वापरू का दही लावता येईल? वहिनी खूष झाल्या - पोरगा एवढं सगळं करणार म्हणून! त्यांनी सांगितलं, मी देते विरजण. झालं, बेत ठरला. श्रीखंड-पुरी, फ्लॉवर-बटाटा भाजी, मटारभात आणि पुण्याहून आणलेली चटणी. मग दूध किती लागेल? वहिनी म्हणाल्या, दोन लिटर घे. तीन लिटर घेतलं, तापवलं, विरजण लावलं. जास्त का? वहिनींनी मदत केली आहे, त्यांना द्यायला नको का?! मग दुसऱ्या दिवशी चक्क्याची तयारी. आता ते फडकं कुठे मिळणार मग घ्या दोन मोठे रुमाल, असे दोन. रात्री दही टांगून ठेवलं. अर्ध्या रात्री जाग आली म्हणून पाहिलं तर म्हणावं तसं घट्ट झालं नव्हतं. शक्य तेवढं पिळून घेतलं. मग बांधलं तोंड करकचून. सकाळी चक्का झक्क तयार! थोड्या दुधात केशर टाकलं, मुरू दिलं. झकास रंग आला! वहिनींनी जायफळ दिलं होतं. ते किसून घेतलं. मग एका पातेल्यात चक्का, जेवढ्यास तेवढी साखर घेतली, आणि घोट घोट घोटलं! मधेच ते केशर घातलं, आणि जायफळ! उम्म फान्टाश्टिक... घरची आठवण करून देईल अशी चव आली होती. सरोजला अजिबात पाऊल टाकू दिलं नाही किचनमध्ये. म्हणजे शिशिरचं खायचं काय लागलं ते सोडून, हां. ब्रेकफास्टला चहा, पोहे. मग कुकरात फोडणी करून मटारभात, खरं तर खिचडीच! ते एकीकडे शिजतंय तंवर तिकडे भाजी फोडणीला टाकली. मग मोठा चॅलेंज होता ते म्हणजे पुरीसाठी पीठ मळायचं! तिथे मात्र पुरी फजिती झाली. मग सरोज आली. तिनं सावरून घेतलं, आणि मिहिरला किचनमधून हाकललं, मी करते पुऱ्या. त्याचीही हौस तोपर्यंत भागली होतीच म्हणा! असं करून मस्त मराठी पद्धतीचं जेवण करून कमल-सरोजला त्यानं खायला घातलं! तिघांनीही ते खूप एन्जॉय केलं. फॉर वन्स, कमल सकाळी बीअर प्यायला नव्हता...
---
मैत्रेयी पोहोचली होती. त्या दिवशी संध्याकाळी ऑफिसमधून परत आल्यावर मिहिरला सरोजचा फोन आला, तिला भेटायला ये. आटपलं आणि आला. दरवाज्यातच शिशिरनं सरोजच्या कडेवरून त्याच्याकडे झेप घेतली! बोळकं पसरून, हातपाय झाडून शिशिरनं त्याची खुषी जाहीर केली. मिहिरनं त्याला वरती फेकला, झेलला, गुदगुल्या केल्या; शिशिर खिदळत होता... मैत्रेयी बघतच राहिली. साधारणतः तिच्याच वयाचा मुलगा, पण किती सहजतेनं वावरतोय इथं! सरोजनं ओळख करून दिली, "ही मैत्रेयी, मितू"
"हाय मैत्रेयी, मी मिहिर"
मितूनं तोंड वाकडं केलं, "ए मैत्रेयी काय म्हणतोस एवढं लांबच्या लांब, मितू म्हण!”
मिहिर जरा संकोचला, "नाही म्हणजे आपली तशी ओळख नाही, मग एकदम... म्हणजे... मला जरा ऑकवर्ड वाटलं!"
सरोज म्हणाली, "खरंच गं, मला लक्षातच नाही आलं हे इतके दिवस! मिहिर, अभीसे तुम मुझे सरोज बुलाओगे, सरोजजी नही!”
ह्या अनपेक्षित हल्ल्यानं मिहिर गांगरला. "नै, पण...”
त्यानं कमलकडे पाहिलं. तो नुस्ताच हसत होता! "ह्याला तू एकेरी कमल म्हणतोस, मग मला का जी लावतोस?”, सरोज म्हणाली. "आता ठरलं, म्हंजे ठरलं!”
सगळा माहौल कसा खेळीमेळीचा, घरगुती होता... मैत्रेयीला, आपलं मितूला, ऍडजस्ट व्हायला काहीच अडचण आली नाही!
---
एका शनिवारी सरोजनं सगळ्यांना रसगुल्ले करून खायला घातले. बढिया! सगळ्यांनी ताव मारला. जेवून सुस्तावून सगळे पडले असताना कमल म्हणाला त्याला मराठी पदार्थातले बेसन लाडू सगळ्यात जास्त आवडतात. मितू लगेच म्हणाली, मग करू की आपण मला येतात. पण मिहिर तुझी मदत लागेल जरूर. हा आठवडाभराचा खटाटोप ठरला. अहो, साजूक तूप? दुधाचं दही, दह्याचं ताक, ताकात लोणी, लोण्याचं तूप... एकदम बयजवार! शेवटी अशाच एका शनिवारी दुपारी तो बेत झाला एकदाचा.
नंतर गप्पा मारत बसले होते सगळे. मराठी, बंगाली अन उडिया संस्कृतीची गंमत जंमत चालली होती. कमल होता तसा बंगाली, पण दोनचार पिढ्या ओरिसात गेल्यानं उडियाच झाला होता. सरोजनं बोलता बोलता सांगितलं, "मिहिर, तुला माहिताय? माझे पूर्वज मराठी होते!”
"काय सांगतेस?!”
"होय, आमचं मूळ गाव विदर्भात आहे, म्हणजे माझ्या आईकडून.”
मराठ्यांच्या एका स्वारीबरोबर आलेले तिचे खापर-खापर का कुणीसे पणजोबा ओरिसातच मुक्कामी झाले होते. "माझी आजी तिच्या आईला आई म्हणायची. पण तेवढंच मराठीपण शिल्लक राहिलं होते"
कमल जरा नाखुशीनं म्हणाला, "ऑज तक बतॉयॉ नही कोभी तुमने?”
"अरे गोष्ट छोटीशी होती. कधी डोक्यातच आली नाही!”
"मग आजच का?”
"विषय निघाला म्हणून आठवलं. म्हणून सांगितलं”
"पण हे तू मला अगोदर सांगायला हवं होतंस!”, कमल जरा चिडून बोलत होता.
"कमल, यात चिडण्यासारखं काय आहे?”
"है, जोरूर है! त्यावेळी मराठ्यांनी माझ्या पूर्वजांची हत्या केली होती. आमच्या घराण्यात त्याची आठवण शिल्लक आहे.”
"आता साताठ दहा पिढ्यांपूर्वी काय झालं यावरून आपण भांडणार आहोत का?”
कमल उठून निघून गेला. मैफिलीचा मूडच गेला. फार काही न बोलता, मिहिरनं काढता पाय घेतला. मितू तिच्या खोलीत गेली. नंतर सरोज आणि कमलचं भांडण मितूला बराच वेळ ऐकू येत होतं. बऱ्याच वेळानं इंग्लिश गाणी ऐकू येऊ लागली, याचा अर्थ कमल बीअर घेऊन बसला होता.
---
संध्याकाळी मितू बाहेर पडली. सरोजचा मूड नव्हताच. स्विमींग पूलवर तिला मिहिर भेटला. तिनं एकंदर परिस्थिती सांगितली. "आज संध्याकाळी मॉलला जायचं का? तिथेच काही तरी खाऊ.”
मिहिरला एकदम उत्साह संचारला, म्हणाला, "त्यापेक्षा मग लॉन्ग ड्राईव्हला जाऊ! तिकडे सीशोअर ला जेवण घेऊ.”
"कशाला? उगाच खूप महाग असतं ते!”
"अगं... बरं, मग परत येऊन मॅकडीत जाऊ या!" ठरला बेत. मिहिर कमलकडे गाडी मागायला गेला. सरोजनंच दार उघडलं. तिचा चेहेरा ओढलेला होता. "सरोज, गाडी मिलेगा क्या? या आज तुम दोनो कही बाहर जानेवाले हो?”
"क्यूं?”
"मी आणि मितू लॉन्ग ड्राईव्हला जायचं म्हणतोय”
ते ऐकून सरोज चिडलीच! "आमच्या दोघांत भांडण लावून आता पळून जाताय काय? माझी आठवण नाही आली तुम्हाला? मितूचं ठीक आहे, पण तुलाही काही वाटलं नाही का रे?” तिनं वळून मागची किल्ली उचलली आणि त्याच्या हातात आपटलीच. मिहिर चाचरत म्हणाला, “यायचं का तुला पण?”
"अब क्या...” असं म्हणून त्याला बाहेर ढकलून तिनं दार लोटलं. तिच्या डोळ्यांत पाणी होतं का? मिहिर तिथेच किंकर्तव्यमूढ अवस्थेत उभा होता, किती तरी वेळ! सरोज आजवर त्याच्यावर अशी कधीच चिडली नव्हती. पुन्हा जाऊन दरवाजा ठोठवायची त्याची काही हिम्मत होत नव्हती.
'जाऊ दे, आता मितूला म्हटलंय ना जाऊ म्हणून, चला जाऊ...’, हताश होतात्सा तो वळला.
---
एअरपोर्टच्या पलिकडे सगळा सागरकिनारा होता. बऱ्यापैकी शांत भाग होता तो. तासा-दीड तासाच्या अंतरावर एक छान रेस्टरॉं होतं. मिहिर गेला होता पूर्वी तिथे, पण ते कमल-सरोज बरोबर. एकट्यानं जायची ही पहिलीच वेळ होती.
चढावरून गाडी वळली, आणि डोंगरपायथ्यानं जाणारा वळणावळणाचा रस्ता दिसू लागला. संध्याकाळ होत होती. पश्चिमक्षितिजाकडे झुकलेलं नारिंगी सूर्यबिंब, नारळा-आंब्याच्या झाडांमधून दर्शन देत होतं. पांढऱ्या भिंतींची, हिरव्या रंगवलेल्या लाकूडकामाची आणि लाल कौलांनी साजिरी दिसणारी घरं खेळण्यांसारखी ओळीनं मांडली होती. डोंगरावरची गर्द हिरवाई डोळ्यांना थंडावा देत होती. अजूनही थोडासा दूर असलेला समुद्र मधून मधून लकाकत होता.
त्या माहौलमधे मितूचा मूड बदलला नसता तरच नवल! खिडकीतून य़ेणाऱ्या वाऱ्याशी तिच्या बटा खेळू लागल्या. चेहेऱ्यावरून त्यांना बाजूला करताना तिची धांदल होत होती.
गर्द उतरती संध्याकाळ, सुसाट चाललेली गाडी, जोडीला एक सुंदर मुलगी, तिचा उत्साही चिवचिवाट, सागराची सोबत... मन कसं पिसासारखं हलकं हलकं झालं होतं.
मागची काळजी उरली नाही,
पुढची चिंता जाणवत नव्हती,
होता तो फक्त हा अपूर्व क्षण,
पूर्वानुभवांच्या सगळ्या कक्षांपार नेणारी स्वप्नवत सांज...
(क्रमशः)
छान चालू आहे कथा.
छान चालू आहे कथा.
लग्नामुळे घुसमटणारी अजून एक सरोज...
पटपट भाग येत आहेत, हा मोठा बोनस ..
छान चाललीय कथा.. आवडतेय.
छान चाललीय कथा.. आवडतेय.
आवडतंय
आवडतंय
तिन्ही भाग वाचले . मजा येते
तिन्ही भाग वाचले . मजा येते आहे