मेघे ढका तारा (भाग २)

Submitted by Abuva on 12 April, 2025 - 09:32

(भाग १ - https://www.maayboli.com/node/86615)
पहिला दिवस असा सुरू झाला. उशीर झाला, पण तसंही कमल लेट लतीफ म्हणून प्रसिद्ध होताच. पहिल्यांदा कस्टमर साईटलाच घेऊन गेला मिहिरला. वेगवेगळ्या लोकांशी ओळख होत होतं होती. हाय हॅलो चालू होतं. मिहिर पुण्याहून सॉफ्टवेअरचं नवं व्हर्जन घेऊन आला होता. त्यामुळे अनेकांना त्याची उत्सुकता होती. खूप गहिरं कारण होतं, दोन अर्थांनी - काहींचं काम सोपं होणार होतं, तर काहींची नोकरी जाणार होती! पण हे मिहिरला त्या क्षणी कळायचं कारण नव्हतंं.
खरं तर त्याची सगळ्यात मोठी अडचण होती ती म्हणजे भाषा! वाक्यातले एखादं दोन शब्द कळायचे. त्यामुळे गोळाबेरीज अर्थ लागला तर ठीक. नाही तर मग कमलला ते त्याला पुन्हा समजवावे लागायचे. आणि उलटूनही - म्हणजे याचं शुद्ध पुणेरी इंग्रजी त्यांना तरी कुठे कळत होतं! मिहिरची चांगलीच कसरत चालली होती. दुपारी तिथेच कॅन्टीनमधे जेवण मिळालं. बाकी इंडियनांची टेस्ट डेव्हलप झाली‌ होती. पण मिहिरला ते घशाखाली उतरत नव्हतं!
जेवण झाल्यावर परत त्याला झोप अनावर झाली‌ होती. कमलनं त्याची परिस्थिती जाणली, आणि त्याला घेऊन बाहेर एका फास्ट फूड रेस्तरॉंमध्ये आला. एक-एक एक्सप्रेसो ब्लॅक कॉफी मागवली.
मिहिरला एक्सप्रेसो म्हणजे जे अपेक्षित होतं त्यापेक्षा वेगळंच काही तरी समोर आलं. कमल म्हणाला, "औषध समजून पी. बाकी काय होईल ते होवो, पण झोप उडेल! नक्की..."
पहिल्या घोटाला तो कडू जहर काढा घशाखाली उतरताना ब्रम्हांड आठवलं. कमल शांत हसत घुटके घेताना त्याची तगमग बघत होता. त्यानं डायलॉग मारला, "जरूरत पड गयी? अब आदत भी हो जायेगी!"
काय ती भाषा, कसलं ते जेवण, आणि कसली ती ब्लॅक कॉफी! मिहिरला सगळंच नवनवं आगळं वेगळं वाटत होतं. काही दिवस या सगळ्याचा त्रास होणार होता, काही दिवसांनी सवय!
मिहिर संध्याकाळी घरी पोहोचला तेव्हा त्याचं भुस्कट पडलं होतं. पंचेंद्रिये झिणझिणत होती. मेंदू भंजाळला होता. पण मग संध्याकाळी त्याला भेटायला कंट्री हेड आला. कोणा मंडळींची पॅकेजेस तो पुण्याहून घेऊन आला होता, ती मंडळी येऊन गेली.  हे सगळं करून रात्री जेवण कसंबसं आटपलं, आणि ऑलमोस्ट हात धुताधुताच झोपला..

---

आठवडा उलटला या रूटीनमध्ये. बॅंकेत अकाउंट उघडणे वगैरे सोपस्कार उरकले. बघता बघता शुक्रवार आला, संपला. पुण्याला होता तो पर्यंत शनिवार ही सुट्टी कधी वाटलीच नव्हती. सुब्बुसर सगळ्यांना बरोबर कामं काढून बोलवायचेच! आणि सुब्बुसरांचा शब्द कोण मोडणार? त्यामुळे शुक्रवारी गाडीतून घरी परत येतानाच कमलचा वीकेंड मूड बनलेला बघून मिहिरला गंमत वाटली. घरी येऊन जरा फ्रेश होऊन त्यानं शिशिरचा ताबा घेतला. सरोजला तेवढीच मदत. ती डिनरच्या तयारीत गुंतली होती. आणि कमलनं लॉनच्या व्हरांड्यात बैठक जमवली! त्यानं इंग्लिश गाणी‌ लावली, एक लार्ज भरला आणि तंद्री लावली. शिशिरचं बॅसिनेट किचनच्या सर्व्हिंग विंडोजवळ ओढून मिहिर सरोजशी गप्पा मारत होता. इतके दिवस मनात होता तो प्रश्न त्यानं तिला विचारला, "सरोजजी, तुम्ही रनिंग काय झकास करता.. म्हणजे, तुम्ही खेळायचा का काही?"
तिनं एक कटाक्ष टाकला मिहिरकडे. काही बोलली नाही. मिहिर चमकला. काही चुकीचं विचारलं का मी?
थोड्या अवकाशानं, सरोज हातातलं काम संपवून वळली. मधल्या विंडोवर हात टेकवून उभी राहिली. एक क्षण तिचा चेहेरा जरा विचारमग्न होता. मग ती थोडी हसली. "दोन वर्षं मी नॅशनल ज्युनिअर चॅम्पियन होते ८०० मीटरची! आणि दोन मेडल्स आहेत मला नॅशनल्स मधे." एक निःश्वास सोडून ती वळली.
मिहिर चकीतच झाला, "ओ माय गॉड, सरोजजी... काय सांगताय! नॅशनल चॅम्पियन? माय गॉड, मी.. मला.."
खांद्यावरून एक नजर टाकत सरोज म्हणाली, "वाटत नाही ना?"
"नाही, नाही, उलट वाटतं, पण.. पी.टी. उषा बरोबर?"
सरोज हसली, "नाही, ती मला ज्युनिअर होती..."
"मग शायनी विल्सन?"
"ती पण ज्युनिअर होती. त्या दोघी बरोबरच्याच. पण ती ज्युनिअर असताना शायनीला हरवलंय मी"
"माय गॉड, मी नॅशनल चॅम्पियन बरोबर बोलतोय, रहातोय!"
सरोजनं वळता वळता एक स्मित दिलं, "पुरानी बातें, मिहिर... अब क्या रहा उसका?"
"असं कसं? वन्स अ चॅम्पियन ऑलवेज अ चॅम्पियन!!" मिहिरला एक नवा उत्साह आला होता! कमलनं तिकडे बसल्या बसल्याच आवाज दिला, "ये चॅम्पियन्स का घर है! मैं भी स्कूलका गाना चॅम्पियन था!"
सगळे हसले. सरोज म्हणाली, " तू सांग, तू काय खेळतोस?"
"छ्या, मी कसला खेळतोय? म्हणजे तुमच्यासमोर काहीच नाही"
ती भाजीचं पातेलं घेऊन बाहेर आली, आणि डायनिंग टेबलवर ठेवलं. "कमल, चलो, जेवण तयारेऽ"
"असं नसतं रे! दिलोजान लगाकर खेलना बडी बात होती है! हार जीत तो होतीही रहती है. पण सांग तू काय खेळायचास?"
"मी शाळेकडून खो खो खेळलोय. आणि क्लब कडून. त्यात मी नॅशनल लेव्हलच्या स्पर्धांमधे खेळतोय..."
"तरीच! तुझी बॉडी स्पोर्ट्समनची आहेच!"
"मलाही तुमची बॉ.. " मिहिर आपला अंदाज सही ठरल्याच्या आनंदात कदाचित लाईन ओलांडत होता त्याला त्याचं एकदम भान आलं. "म्हणजे, तुम्हाला धावताना‌ पाहून मलाही तेच वाटलं होतं!" सरोजनं त्याच्याकडे निसटता कटाक्ष टाकण्याव्यतिरिक्त कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.
मिहिर आणि कमलचं जेवण‌ होईपर्यंत सरोज शिशिरला भरवत होती. मग, तिनं शिशिरला‌ परत तिनं मिहिर कडे दिलं आणि जेवू लागली. कमल ते बघून हसला, "ये अरेंजमेंट अच्छा है. मी याचं बेबीसिटिंग ऑफिस मधे करतो, आणि हा शिशिरचं घरी!" पोट भरल्यावर कमल आणि शिशिर दोघंही झोपाळले. शिशिर लगेच झोपला, आणि कमलनं एक नाईटकॅप म्हणून भरला आणि टीव्ही समोर बसला! मिहिरनं मागच्या आवराआवरीत सरोजला मदत केली. सरोजनं घड्याळ बघितलं, आणि म्हणाली, "चल मिहिर, शतपावली करून येऊ. का तुला झोप आली‌ आहे?"
"नाही"
"कमल, पिल्लाकडे बघ, झोपलाय तो"
लॉन संपलं की बॅडमिंटन कोर्ट होतं, ओपन एअर.‌ मग‌ कंपौंड. तिथे उजेड‌ असायचा. आणि‌ सगळ्या घरांपासून थोडं दूर. त्यामुळे शांती असायची.
मिहिर वाट पहात होता. त्याला जाणवलं सरोजला काही तरी बोलायचय. पण ती बोलत नव्हती. खाली मान घालून लॉन तुडवत होती.
"सरोज जी, बैठना क्या इधर?" तिनं तंद्रीतून मान वर काढली, हलवली. कोर्टाशेजारी एक बाक होता. दोघे बसले. समोर लॉन पलिकडे त्यांची विंग दिसत होती. रात्रीच्या अंधारात अपार्टमेंटच्या खिडक्यादारांतून घरंगळणाऱ्या प्रकाशाची एक जाळीदार नक्षी तयार झाली होती. एका व्हरांड्यात बसलेला कमलही दिसत होता. सरोजची नजर घरावर खिळली होती.
स्वगत उमटावं तशी सरोज बोलू लागली.
"आज तू नॅशनल्सची आठवण काढलीस, आणि कसंसच झालं बघ"
"..."
"मी म्हटलं खरं की खेलनेवाले कभी हारा नहीं करते, पण..." सरोजनं वाक्य अर्धवट सोडलं. कुठलीशी अनन्वित वेदना तिच्या शब्दांत आकंठली होती. जणू मिहिर तिथे नव्हताच. किंवा असलाच तर  त्या भिंतींचा एक दगड.
"खूप जिंकले, त्याहून जास्त हरले, पण त्याचा गम नाही, खूप सुंदर दिवस होते ते, किती आनंदाचे क्षण, किती दुःखाचे. पण क्षण आणि क्षण जगले. घरच्यांना सोडून स्पर्धांना एकटं जायचं! कॅम्पना जायचं. बरोबर असलेच तर पुरूष खेळाडू अन् प्रशिक्षक. काहीही सोय नसायची रे आमच्या वेळी! ह्या उषा आणि शायनी देशापरदेशात जिंकायला लागल्या नं, तेंव्हा कुठे या खेळाकडे लक्ष गेलं लोकांचं. तोपर्यंत सगळा आनंदच होता. त्यात आमची स्टेट! काही विचारू नका..."
सरोज बोलत होती, बोलत होती. जिंकण्याचं वर्णन करत होती, हारण्याची वर्णनं करत होती. तिच्या माइंड्स आय समोर गतआयुष्याचा जणू चलत् चित्रपट फिरत होता. आठवणी गर्दी करत होत्या, माणसं येत होती, जात होती, भावना उसळी मारून वर येत होत्या, विरत होत्या. आईवडील, मित्रमैत्रिणी, प्रतिस्पर्धी होते, प्रशिक्षक होते. ती बोलत होती, अन् मिहिर फक्त ऐकत होता, जिवाचे कान करून! तिच्या त्या आठवणींच्या कल्लोळात मिहिर बुडून गेला होता. आयुष्यात पहिल्यांदाच एका प्रौढ स्त्रीबरोबर त्याचं असं संभाषण घडत होतं. गेला आठवडाभर त्याला दिसली होती ती एक आई, एक कर्तव्यदक्ष गृहिणी. पण आता? ती एक स्त्री म्हणून सामोरी येत होती. कर्तृत्ववान स्त्री! तिला संसारापलिकडे वैयक्तिक इच्छा, आकांक्षा, होत्या, यशापयश होतं.  हो, तो भूतकाळ होता. म्हणूनच आता या पलिकडे जाऊन थोड्या तटस्थतेनं बघणे, तरीही भावनावेग न आवरता येणे... काही तरी हरवल्याची हुरहुर, हरपल्या श्रेयाची खंत, रूढीप्रवादांनी लादलेली हतबलता, या सगळ्यांची जाणीव तिच्या शब्दांतून, देहबोलीतून व्यक्त होत होती. सशक्त तरीही अबला, ह्या विरोधाभासी वास्तवाची दाहकता मिहिरला पहिल्यांदाच जाणवली.
"त्या वर्षी‌ कलकत्त्यात नॅशनल्स होत्या. शायनीचं पहिलंच नॅशनल असेल. आमचा कॅम्प चालू होता. त्या वर्षी मी फेव्हरिट होते. मलाही कॉन्फिडन्स होता. इस साल जीत के ही जायेंगे! इरेग्युलर हर्डल्सवर आमचं ट्रेनिंग चाललं होतं. आणि मी पाय अडकून पडले. डोक्याला मार लागला. दोन दिवस टेंपररी अम्नेशिया होता. पाय तीन ठिकाणी‌ मोडला होता. मला शुद्ध आली तेंव्हा मी हॉस्पिटलमधे होते! मला,... मला शंकाय माझ्या मागच्या मुलीनं मला ढकललं. नाही, मला खात्री आहे. माझा स्वतःचा तोल जाऊन पाय अडकला असता ना, तर मी सजग झाले असते. मी काय पहिल्यांदा अडखळून पडत होते का? इतक्या वर्षांत शंभर वेळा तरी पडले होते, जखमी झाले होते, मसलस्ट्रेन झाला होता, स्ट्रेस फ्रॅक्चर झालं होतं. सगळं भोगलं होतं. पण हे? हे नवं होतं. दोन दिवसांनी भानावर आल्यावर मी सांगायला गेले, पण ऐकणार होतं कोण? गेम्स चालू झाल्या होत्या... तुझ्या एवढी होते रे मी! यंग ॲन्ड अपकमिंग, स्ट्रॉंग, वेल-ट्रेन्ड, खमकी होते. माझ्याही डोळ्यांत एशियाडची, ऑलिम्पिकची स्वप्न होती.  आसमां छूनेकी आशा... आणि काय मिळालं? रेल्वेत नोकरी, आणि... आणि हे लग्न..."
आता तिच्या डोळ्यांत अश्रू होते. इतक्या वेळ ती त्या अवकाशात स्टेडियम बघत होती, ट्रॅक बघत होती, प्रेक्षकांचा कोलाहल ऐकत होती, चाहत्यांची प्रशंसा ऐकत होती, न जाणो काय काय ऐकत बघत होती. पण आता मात्र ते डोळे शून्यात बघत होते.. न राहवून मिहिरनं तिच्या हातावर थोपटलं. त्यानं ती भानावर आली. एकदम लटक्या रागाने त्याला म्हणाली, "ये कहां ले गये थे मुझे? बघ सगळं तुझ्यामुळे.. बापरे, किती वेळ‌ गप्पा मारतोय आपण! कमल चिडला असेल, चल चल.."
ती बोलता बोलता गडबडीनं उठली. चालता चालता मागे वळून म्हणाली, "पण हे सगळं तुझ्या माझ्यातच ठेवं हं! इथे कुणालाच माहित नाहिये या बाबत..."
मिहिर तिच्या मागे मागे चालला होता. कुठून कोण जाणे त्याच्या डोक्यात गाणं वाजायला लागलं होतं,
दिलं है छोटासा
छोटीसी आशा
मस्ती भरे मन की
भोलीसी आशा
चांदतारोंको छूने की आशा
आसमानोंमें उडनेकी आशा

दोनचारंच अपार्टमेंट मधे आता दिवे दिसत होते. वाढलेल्या अंधारात आकाशातल्या चांदण्या चमकत होत्या. त्यातली एक... जणू त्यातली एक त्याच्या पुढे लगबगीनं चालली होती...

---

घरासमोरच्या कॉरिडॉरमध्ये सरोज थांबली. समोर स्विमिंग पूलचं निळशार पाणी चमकत होतं. वाऱ्यामुळे उठणारे हलके तरंग लखलखत चहू दिशांना परावर्तित होत होते. थकल्यासारखी सरोज एका खांबाला टेकली, रेलली.
"क्या पाया मैने इतने साल स्पोर्ट्स करके? अभ्यासात तशी मी चांगली होते. अभ्यास केला असता तर... सात वर्षं झाली, आम्ही आता प्रॉजेक्ट टू प्रॉजेक्ट भटकतो आहे. चांगला पैसा मिळतो, मान्य आहे. पण माझं काय? रेल्वेत होते तर डिव्हिजनचं खेळ बघायचे. इथे मी काय करू?”
प्रश्न तसाच हवेत लोंबत राहिला, अनुत्तरित.. तिच्या सर्वांगावर प्रकाशलहरींचे कवडसे नाचत होते, जणु पाण्याबाहेर काढलेल्या मासोळीची तगमग दाखवत.

(क्रमशः)

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults
नवीन प्रतिसाद लिहा