चिकवा धाग्यावर गोल्डफिशबद्दल अस्मिता, स्वाती आणि माधव यांच्या पोस्ट्स वाचल्या. मी मुळातच सिनेमा खूप कमी बघते, पण तरी या मंडळींच्या पोस्ट्सनी माझ्या बाबतीत, संथ पाण्यात लहानसा दगड पडून लहरी उठाव्यात, असं काहीतरी झालं. विस्मरण, स्मृतिभ्रंश, डिमेन्शिआ, अल्झायमर... एकाच कुटुंबातले आजार म्हणायचे, जे माणसाचं अस्तित्त्वच उलटंपालटं करून टाकतात. मी इथे सिनेमाबद्दल लिहिणार नाहिये, कारण तो मी अजून पूर्ण बघितला नाहिये, पहिला अर्धा तासच बघितलाय. डोळे भरून येतात असं काही बघताना, त्यामुळे एका बैठकीत तो पूर्ण होणार नाहीच. पण माझ्या घरातलं काहीतरी इथे शेअर करावंसं मात्र नक्की वाटलं मला. हे थोडं विस्कळीत, किस्से-स्वरूपात आहे, पणा आमच्या आठवणी आहेत त्या.
थोडीशी पार्श्वभूमी अशी, की माझ्या वडिलांचं कुटूंब राजापुरातलं. आजी त्याकाळी चौथीपर्यंत - म्हणजे बर्यापैकी- शिकलेली. ती सासरी सगळ्यांत मोठी सून, जावांची मोठी जाऊ वगैरे.. तशी सरळसोट वागणारी, पण वेळ पडली तर खमकी. आजोबा नाकासमोर चालणारे, उगीच वाद नको म्हणून विनाकारणच कमीपणा घेणारे. इतका कमीपणा, की स्वतः त्याकाळी (१९४५-५० च्या आसपास) सरकारी नोकरीत, खुद्द जमीनमोजणी खात्यात असूनही, भाऊ फसवतायत हे समजत असूनही ७/१२ वर नाव नाही तर जाऊदेत, कशाला भांडा, म्हणुन असलेल्या जमिनीवर पाणी सोडणारे! पगार बेताचाच, १ मुलगा (माझे बाबा) आणि २ मुली यांचं शिक्षण शहरात होऊदे म्हणून रत्नागिरीत आले. मग मला मोठेपणी आजीच्या गप्पांमधून कळलं, की आजीचे नि धाकट्या काकवांचे जमिनीवरून खटके उडायला लागले आणि आजीला फिट्स यायला लागल्या म्हणून ते चक्क घरावरचाही हक्क मनानेच सोडून बाहेर पडले! आजीला काय जमिनीचा मोह नव्हता, ती आहे त्यात समाधानी रहाणारीच होती, पण मुळात जे आपलं आहे ते आपल्याकडे असावंसं वाटण्यात काय चूक आहे? निदान कागद तरी नावावर असूदेत इतकंच तिचं म्हणणं. पण ते ना आजोबांनी मानलं, ना पुढच्या पिढीत माझ्या बाबांनी मानलं. 'इष्टेट आहे माझी तिकडे... हे एवढं मोठं आगर आहे माडांचं! आम्ही केलेलंय हो माडांना पाणी द्यायचं काम!..'' असं काहीबाही ती सांगत असे. मी तिची सगळ्यांत धाकटी नात. माझ्या सगळ्यांत मोठ्या बहिणीवर तिचा भारी जीव. जिथे जाईल तिथे ताईला काखोटी मारून जायची. पिशवीत २ ''फ्राक'' कोंबले की झालं पॅकिंग! खरंतर आम्ही तिघी बहिणीच, पण मुलगा हवा वगैरे गोष्टी तिच्या मनाला कधी शिवल्याही नाहीत.
ती ५७ वर्षांची होती तेव्हा माझा जन्म झाला. धाकटी नात म्हणून तिनं माझे लाड केले असतीलच, पण झालं असं, की मी थोड्याश्या समजत्या वयात येईपर्यंत तिला 'वयपरत्वे होणारं' विस्मरण व्हायला सुरूवात झाली होती. त्यातून मी सातवीत असताना तिला फुफ्फुसाचा टीबी झाला. ९ महिने बिनचूक ट्रीटमेंटने ती बरी झाली. पण मग नंतर हळूहळू तिचं विस्मरण वाढत गेलं. १९९५ च्या आसपास, मी वर जे आजार लिहिले त्याची आजच्याइतकी माहिती नव्हती. "साठी झाली की व्हायचंच असं!" असं म्हटलं जात होतं. आजीचे सख्खे भाऊ-बहिण डॉक्टर, अगदी मुंबईत राहून प्रॅक्टिस छान होती त्यांची, पण कोणालाच हे सुचलं नाही याचं मला कायमच कोडं पडत आलंय. "शांतू हुशार आहे, आता थोडंसं विसरली तर बिघडलं कुठे!" असं सगळ्या नातेवाईकांचं कायम म्हणणं असे. तिने विसरायला आमची कोणाचीच हरकत नव्हती, पण हे विसरणं 'नॉर्मल' नाही हे समजत होतं. कुठेतरी काहीतरी चुकतंय, पण काय ते समजत नव्हतं. तशात मी ७वी, ताई १०वी आणि मोठी ताई १२ वी एकाच वर्षी पास आऊट झालो आणि दोघी ताया पुढच्या शिक्षणासाठी घराबाहेर, मुंबई-पुण्याला गेल्या. माझी सकाळची शाळा असायची. दुपारी घरी आलं की आजीशी गप्पा मारत जेवण, मग झोप/ अभ्यास वगैरे... १-२ वर्षं बरी गेली पण आजी हळूहळू अधिकाधिक विसरत होती. डॉक्टरी सल्ल्याने समुपदेशनासाठी सुद्धा घरी सेशन घेतले पण काही उपयोग नाही झाला. (त्या समुपदेशकच कंटाळल्या!)
तिचं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं, संध्याकाळी दवाखान्यातून घरी आणलं तिला. मग पुढच्या फॉलो अप साठी गेली तेव्हा डॉक्टरांच्या वेटिंगरूममधले निम्मे पेशंट्स अर्ध्या तासात तिथून उठून इकडेतिकडे फिरायला लागले. रिसेप्शनिस्टने विचारलं तर "त्या आजी पुन्हा पुन्हा तेच तेच विचारत बसल्या आहेत. चांगल्या आहेत बिचार्या, विसरतायत सगळं, पण आता आम्ही ३-४ वेळा तेच ते सांगून कंटाळलो म्हणुन उठून फिरतोय" असं लोकांनी सांगितलं. तिच्याबरोबर बाबा होते, पण काहीतरी काम आलं म्हणून नंबर लागेपर्यंत ते खालच्या मजल्यावर गेले (डॉक्टर बाबांचेच विद्यार्थी होते, रिसेप्शनिस्ट ओळखीची होती म्हणून ते सांगून गेले होते. रत्नागिरी तसं लहान गाव-कम-शहर, त्यामुळे हे काही वावगं नव्हतं.). त्याकाळी तर मोबाईल सोडा, लँडलाईनसुद्धा सर्रास नव्हते. पण नशिबाने बाबा आले आणि काहीही गोंधळ व्हायच्या आत सगळं निपटलं. पण एकूण प्रकार हळूहळू(च) समजत होता. डोळे जपायचे सोडून ती वर्तमानपत्रातल्या बारीक प्रिंटमधल्या बातम्याही तिसर्या दिवशीपासून मलाच वाचून दाखवयला लागली होती! गॉगल तर कुठे रानोमाळ हरवला होता देव जाणे! "आगरात शोध जाऊन!" असं आईने शेवटी वैतागून म्हटलंंही होतं!
आमच्या फॅमिली डॉ. नी काही औषधपाणी सुरू केलं, पण तेही विसरलं जाऊ लागलं. आम्हीच लक्षात ठेवून द्यायला सुरूवात केली, पण आजीचा असहकार सुरू झाला. अधेमधे एकदम सगळं खणखणीत आठवायचं, एखाद दिवशी टोटल बटण बंद असायचं डोक्याचं! पण तब्येत एकदम झकास! नो बीपी, नो शुगर, नो कोलेस्ट्रॉल, नो थायरॉइड.. नथिंग! आणि काटक, शिडशिडीत होती कायम. उत्साहात आली की आगरात जायची माडांना पाणी लावायला. आमचं भाड्याचं घर होतं, कौलारू. आणि घरमालकांची नारळाची बाग होती. आजी तिच्या ''इष्टेटीच्या'' आठवणीत कायम त्या माडांच्या बागेवर प्रेम करायची. पाणी फिरवायला माणसं लावलेली असूनही "त्यांचं कसलं काम! पन्हळ अडवा म्हटलं तर काय करतील नेम नाही" म्हणून स्वतः अनवाणी पायांनी उन्हा-तान्हात जाऊन पाणी लावायची. पंप चालू-बंद करायला १० वेळा खेपा मारायची. आगर बेणायला (नकोशी रोपं आणि रान वाढलं की ते स्वच्छ करायला, बहुतेकदा पाऊस ओसरल्यावर, नवरात्रीत) खालच्या वाडीतला गडी आला नाही तर १० निरोप पाठवून आणि तो येईपर्यंत रोज जमेल तेवढं स्वतः बेणायला घ्यायची. अशी खमकी आजी केवळ आता लक्षात रहात नाही म्हणून काहीतरी वेगळीच वागतेय हे झेपत नव्हतं.
एकदा रात्री जेवायला आईने पान वाढलं. एकदम ती "अगं सरोज, ते बघ कोणतरी प्राणी फिरतायत ताटाजवळ!" म्हणून ओरडली होती. आईपण एकदम दचकली आणि बघायला लागली... काय मुंगी-झरळ आलं की काय ताटाजवळ म्हणून... काहीही नव्हतं! आईला धक्का बसला. म्हणजे आता भास होतायत की काय अश्या विचाराने ती धास्तावली. असे लहान-मोठे प्रसंग वारंवार घडू लागले. एव्हाना माझीपण १०वी झाली आणि मीही घराबाहेर पडले. १२ वी नंतर पुन्हा रत्नागिरीला आले तोवर मात्र गोष्टी हाताबाहेर जायला लागल्या होत्या! आजी आवरेनाशी झाली होती. आई उन्हाळ्यात वर्षभराचं वाणसामान वाळवून बेगमी करून ठेवत असे. तिने असाच २० किलो गूळ फोडून अंगणात कापडावर वाळत घातला होता. आजी ज्या कॉटवर बसून एकूणच सगळीकडे नजर ठेवायची (टेहळणी बुरूज!) ती कॉट अंगणातून दिसायची आणि अर्थातच कॉटवरून अंगण दिसायचं. झालं! 'हे काय चमत्कारिक वाळवण घातलंय सरोजने!' असा विचार करून डोळ्याचं पातं लवायच्या आत तिने अंगणात जाऊन खस्सकन गुळाखालची साडी ओढून काढली आणि घरात येऊन ती बादलीभर पाण्यात भिजत घातली! सगळा मिळून २० सेकंदांचा कारभार, पण ''काय चमत्कारिक वाळवण'' ते ''साडी अंगणात पडली होती ती खराब झाली असेल म्हणून पाण्यात बुडवली'' इथपर्यंत ती पोहोचली होती मनाने. आणि आईने हे वरच्या बाल्कनीतून बघितलं, ती खाली आली तोवर काम संपलंही होतं. आणि साडी मळली असं वाटलं पण त्यावरचा गूळ
आजीला दिसलाच नाही! तो गूळ तसाच अंगणात उधळला गेला होता. त्यानंतर काही दिवसांनी चांगला आवळे टोचून मुरवलेला मोरावळा 'काय नासकं काळंमिचकूट भरलेलं दिसतंय बरणीत' म्हणून पलिकडच्या भेंडीच्या मळ्यात फेकून दिला होता. एकदा ५ किलो साखर आणि ५ किलो तांदूळ "काय करायचेत दोन वेगळे डबे! नुसता तांदूळच तर आहे' म्हणून एकाच डब्यात भरून टाकला होता! आम्ही ३-४ किलो तरी वेगळं केलं १५ दिवस मान मोडून निवडकाम करून, उरलेल्या १ किलोचा साखरभात करून टाकला आईने!
पुढचा नंबर लागला मिठाच्या फरीचा. अशीच २० किलोची मिठाची फरी आईने शेजारच्या काकूबरोबर शेअरिंगमधे घेतली होती. सगळी वाळवणं झाली आणि तिने फरी उघडून मीठ वाळवत ठेवायला पोतं बाजूला केलं. आत १-१ किलोच्या मिठाच्या पिशव्या होत्या. पोतं बाहेरूनही चिकचिकीत झालं म्हणून एक दिवस पोतंच उन्हात ठेवू, मग उद्या मीठ सुटं करून पसरू असा विचार करून नुसतं पोतं आईने उन्हात ठेवलं. आई शाळेत गेली. भर दुपारी आजीने ते पोतं उचललं आणि थेट खांद्यावर टाकून शेजारच्या अण्णांच्या बागेतून पलिकडे उडी मारून (अंगणाला मेन गेट होतं, चांगली चारचाकी येईल एवढं, ते विसरून) मधल्या बोळातून विहिरीवर गेली. सुदैवाने बाबांनी हे बाल्कनीतून बघितलं. तिला हाका मारून थांबवलं. त्यांचा आवाज ऐकून विहिरीवर शेजारच्या वहिनी होत्या त्या सावध झाल्या आणि आजीला काहीबाही विचारून बोलण्यात गुंतवलं. तोवर बाबा गेले आणि ५-५ किलोच्या पिशव्या उचलून घेऊन आले. २० किलोचं पोतं उचलून, खांद्यावर घालून, बागेच्या लहान गडग्यावरून उडी मारायला ७५ वर्षांच्या आजीला जमलंच कसं ते कळेना!
आई रोज विहिरीवर जायची धुणं धुवायला. आता आजीवर लक्ष ठेवणं हे काम वाढलं होतं. पण कधीकधी ते तिला समजलं की चिडायची ती. मग तिची समजूत पटावी म्हणून आई थोडं दुर्लक्ष केल्याचं भासवायची. एकदा आई विहिरीवर गेली आणि घरात बाबा पूजा वगैरे करून कामासाठी बाहेर पडले होते. देवाजवळ निरांजन तेवत होतं. आईच्या एका क्षणात लक्षात आलं आणि ती धुणं तसंच टाकून धावत घरात आली, सगळं आलबेल होतं, पण 'आपल्यावर हिची नजर नाहिये ना' म्हणून आजीच तिच्यावर लक्ष ठेवायला नेमकी तेव्हाच मागच्या अंगणाकडे निघाली होती. नशिबाने त्या दिवशी काही झालं नाही. त्यानंतर एकदा ती आईलाच विसरली. 'ही कोण बाई आपल्या घरात वावरतेय' अशी संशयाने ती आईकडे बघत होती. पण बाकी सगळे (म्हणजे तिचाच मुलगा!) आईशी नीट वागतायत म्हणून तिचा विश्वास बसला आणि संध्याकाळी आईवर बॉम्ब पडला. "बरं का हो बाई, तुम्ही आमच्या घरात दिसताय आणि तशा चांगल्या वाटताय म्हणून सांगते. माझा मुलगा लग्नाचा आहे आणि त्याच्यासाठी मी मुलगी बघतेय. असली एखादी माहितीतली तर सांगा!" आई अवाक! पण तीपण ग्रेट, म्हणाली "बरं झालं मलाच बोललात ते. मी ओळखते तुमच्या मुलाला. मला माहितेय कशी बायको हवी त्यांना ते. नका काळजी करू!"
दुपारी ती चहा करायची तेव्हा माझी आत्ते (बाबांच्याच शाळेत शिकवायला होती) मधल्या सुट्टीसाठी म्हणून रोज यायची. तीपण मग मुद्दाम लुडबुड करून लक्ष ठेवायला लागली तर तिच्यावरही आजी उखडली! आजी एव्हाना गॅस बंद करायचा रोजच विसरायला लागली होती. औषधातला असहकार खूप वाढला होता. बाकीचेही उद्योग वाढले होते. एकदा अशीच भर दुपारी बाहेर पडली. मागच्या अंगणातून आगरात गेली. आगराच्या एका बाजूला चिव्यांचं (म्हणजे बांबूंचं) छोटंसं झुडूप होतं. ती तिथून सरपटत जाऊन पुन्हा उंच गडग्यावरून उडी मारून खालच्या वाडीत गेली. वाडीत जायचा सरळ रस्ता आहे हे विसरलीच. मग सगळंच विसरली. मग तिने 'मी रायकर सरांची आई, घरातून आगरात पाणी लावायला आले पण आता रस्ता चुकले. मला घरी सोडता का' असं सांगितलं. वाडीतले सगळे आमचे शेजारी होते, त्यांनी आणून सोडलं आणि आम्हाला सांगितलं. एकदा पहाटे तीन वाजता शेजारच्या दादाची हाक ऐकू आली. आम्ही जाम घाबरलो. बाल्कनीत आलो आणि बघतो तर त्याच्या शेजारी आजी उभी! पटकन बाबा खाली गेले. मग कळलं ते असं, की आजीने (का माहिती नाही) मजबूत कडीकोयंडा उचकटून, दाराला लावलेले सगळे अडसर फेकून देऊन घर सोडलं. म्हणजे मुद्दाम नव्हे, झोपेत होती ती. मग चालत सुटली सरळ. मग ऑलमोस्ट दीड-दोन किलोमीटरवर एका माणसाला शंका आली म्हणून त्याने हटकलं. एव्हाना ती जागी झाली होती आणि सुदैवाने तिने बाबांचं नाव नीट सांगितलं. मग त्या माणसाने अंदाज घेऊन तिला शेजारी त्या दादाकडे आणून सोडलं आणि त्याने आमच्याकडे आणून सोडलं!
हे मात्र फार झालं. एकाच आठवड्यात इतके प्रकार घडल्यावर बाबा थेट मानसोपचार तज्ज्ञांकडे गेले. तिथे समजलं की हा अल्झायमर नावाचा आजार आहे. मेंदूतल्या पेशी मरतात आणि मग सगळं हळूहळू मेंदूतून नाहिसं होतं. बाबा हे ऐकून सुन्न झाले. उपचार ठरले, पण धक्का बसला होता खूपच. अफाट शक्ती यायची तिला कारण मेंदूचं विवेकाचं दार बंद झालं होतं आणि त्याचं त्या अफाट शक्तीत रूपांतर झालं होतं. आजीला औषधं चालू झाली. दूध पोळी कुस्करून त्यावर गोळी ठेवून खाऊ घालायला सुरूवात झाली. आणि आजी एकदम मलूल झाली. सगळं विसरली. तिची नजर हरवली. डोळे बंद राहू लागले. नऊवारी नेसणारी ती, लुंगी गुंडाळायची वेळ आली! कारण अशीच एकदा तिने बाहेर जाताना गोंधळून मला हाक मारली होती आणि कपाटातून काढून खोलीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत साडी पसरून 'नेसव गं जरा... मी विसरलेच कसं लुगडं नेसू ते' असं म्हणून मलाच ते नेसवायला सांगितलं होतं. आता तर सगळेच देहधर्म एका जागी होऊ लागले. लुंगी सोयीची झाली मोठे केस कापून बॉबकट केला. आजी सतेज गहूवर्णी होती, भिंतीपाशी उभी राहून एक पाय गुडग्यात दुमडून त्या गुडघ्याभोवती लांबसडक केस वेढून मग गुंता सोडवावा लागे तिला, तिची पार पार रया गेली! अल्झायमरने माझी आजी गिळलीच!
फार हुशार होती ती, मुलींनी शिकलंच पाहिजे म्हणायची. तिची ही अवस्था झाल्यावरही हळूहळू आम्ही सावरलो आणि मग तिच्या उपजत बुद्धीची चमक मधूनमधून मिळायला लागली. एव्हाना ती फक्त "शांतूआजी" या हाकेला "ओ" द्यायची आणि चहा हवाय ना म्हटलं की हुंकार भरायची. बाकी बाबांनी तिला "आई" म्हटलं तरी तिला ते समजण्यापलिकडे गेली होती ती. पण, "गो शांतूआजी, मी पेपरला जातेय हां काय... नमस्कार करते, चांगला जाईल म्हण" असं मी म्हटलं की " हां हां.. जाईल" असं म्हणायची. आणि हे कधीच चुकलं नाही. कसं ते देवाला ठाऊक!
एकदा गंमत झाली. मोठी ताई आणि आत्ते गप्पा मारत होत्या. तशात आजीने काहीतरी मधेच हुं केलं. मग आत्तेने तिला एकदम "काय गो आई, नाक-डोळे कुठेत तुझे!" असं विचारलं तर "पूर्वी होते ना तिथ्थेच आहेत!" असं अख्खं वाक्य बोलली ती! आणि आत्ते आणि ताई हसूहसून खुर्चीतून पडायच्या बाकी होत्या.
हे असं थोडंफार गमतीचं काही घडलं तरी आतून सारखं वाटत राहिलं, की इतकी बुद्धिमान बाई, असं कसं झालं हिचं!
आजोबा गेले आणि तीन महिन्यांत बाबांचं लग्न झालं. आजीने सगळी हौस बाजूला सारली. तसं काळाच्या मानाने सुधारक विचारांची होती ती, पण सहज संसारातून बाजूला झाली हळूहळू आणि आईकडे सोपवलं सगळं. स्वतःला वाचनात गुंतवलं. बाबांनी तिच्यासाठी लायब्ररीची मेंबरशिप काढली वेगळी आणि तिला वाचायला काहीनाकाही आणून द्यायचे. राजकारण भयंकर आवडीचं. रोज न चुकता बातम्या ऐकायची, पेपर सुरूवातीपासून शेवटपर्यंत वाचून मगच उठायची. हे तर मी बघतच होते, पण मग आईच्या गप्पांमधून मला आजी कळायला लागली जास्त. मी स्वतः तर तिथे होतेच, पण आई-बाबांची आजीच्या बाबतीत असलेली पालकत्त्वाची भूमिका मी बघत होते. तिला हात धरून आंघोळीला नेणं, छान चंदनी साबणानी तिला आंघोळ घालणं, ती मनासारखी झाली की नकळतच आजीच्या चेहर्यावर पुसटसं येणारं हसू.. गरम गरम चहा पाजला की तृप्त होणारा तिचा चेहरा, एखाददिवशी भाजी भरवली तर तोंड वाकडं करणं, बटाटेवडा भयंकर प्रिय म्हणून न रहावून एक तुकडा भरवला तिला मी तर डोळे उघडायचा प्रयत्न करून 'अजून हवाय' ची लहान मुलासारखी निरागस मागणी... सगळंच आठवतं आता.
मी या आठवणी का लिहिल्या सांगू? गोल्डफिशमधे दिप्ती नवल छान तयार होऊन रेकॉर्डिंगसाठी निघते, मग थंडीमुळे तिचे पाय दुखतात आणि मग ती ते विसरते... हा प्रसंग अंगावर आला माझ्या कारण क्षणात मला माझी आजी आठवली. तिच्या आजारामुळे काही नाट्यपूर्ण घटना जरी घडल्या नाहीत तरी आमचं सगळ्यांचं भावविश्व पार ढवळून निघालं. बाबांना हे स्वीकारणं जड गेलं. ज्या अगदी मोजक्या प्रसंगात बाबा पूर्ण हतबल झालेले मी बघितले त्यात आजीच्या ट्रीटमेंटबद्दल जेव्हा डॉ. नी त्यांना संपूर्ण कल्पना दिली तो दिवस लख्ख आठवतोय. दिवसभर ते अस्वस्थ होते आणि रात्री खूप रडले होते. इथून परतीचा मार्ग नाही, आपली आई आता आपल्याला ओळखणार नाही, तिच्यासाठी आता आपलं अस्तित्व नाही हे पचवणं फार जड गेलं त्यांना. आणि सुरूवातीला तर तिचा आपल्यावर विश्वासच नाही, उगाच समुपदेशन का काय ते करतायत, मलाच शिकवायला माणसं आणली घरी, असं ती काहीतरी मनात धरून बसली तेव्हा समजूत काढताना नाकी नऊ आले होते!
आपलं माणूस असं आपल्या डोळ्यासमोर मनाने विस्कटतं, अस्तित्वहीन होत जातं हे बघणं क्लेशकारक असतं. सुदैवाने खूप मोठे म्हणावेत असे काहीही कुटुंबकलह नव्हते. पण कठीण प्रसंगात एकमेकांबरोबर असताना विणला गेलेला अगणित आठवणींचा गोफ होता. मायेचे पाश कोणाला सुटले आहेत! आजही मला आणि तायांना आजीच्या अनेक गोष्टी, तिचं काळाच्या मानाने आधुनिक असणं, तिची शिकवण हे खूप खूप आठवतं. पण स्वतःच्या हयातीतच आजी हे सगळं पार करून अज्ञाताच्या परिघात गेली होती. शरीराने निरोगी पण मनाने सगळ्यातून वजा झाली होती. 'मन म्हणजे माणूस' अशी एक व्याख्या मी वाचली होती. आम्हाला माणूस म्हणून घडवणारी आजी स्वतः मन हरवून गेली, जाताना तिचं माणूसपण मात्र आमच्यात रुजवून गेली.
आपलं माणूस असं आपल्या
आपलं माणूस असं आपल्या डोळ्यासमोर मनाने विस्कटतं, अस्तित्वहीन होत जातं हे बघणं क्लेशकारक असतं >> मला असे चित्रपट पहातानाही अस्वस्थ वाटत तुम्ही तर अनुभवलंय .तीव्रता जाणवतेय लेखातून .मला अस्तु मधला तो सीन आठवला ज्यात घरभर लपवलेले कागदाचे चिटोरे, औषधांच्या गोळ्या खाण्याच्या वस्तू पाहून इरावती चिडते तो सीन अंगावर आला होता.
तुमची आजी हुशार आणि आधुनिक होती ही जमेची बाजू अश्या आजीला विस्मरणाने हरवत जाणं किती क्लेशकारक असेल हे जाणवतंय.
अईगं प्रज्ञा. . तुटलं
अईगं प्रज्ञा. . तुटलं आतमध्ये वाचताना.
वाचताना डोळे भरून आले
वाचताना डोळे भरून आले
बाबांची अशीच अवस्था झाली होती
बाबांची अशीच अवस्था झाली होती शेवटच्या काही आठवड्यात, डॉक्टरने स्मृतिभ्रंश, डिमेन्शिआ, अल्झायमरचे निदान केले आणि हेवी डोस सुरु केले, १५ दिवस खाणे-पिणे करायला उठवत असू, अगदी लहान बाळासारखे. मग डॉक्टरांशी बोलून डोस कमी केल्यावर थोडे नॉर्मल झाले. पण काही वेळा विसरत, कधी सगळे काही आठवत असे. अगदी भरून आले वाचताना.
वाचताना डोळे भरून आले...
वाचताना डोळे भरून आले...
मन म्हणजे माणूस' अशी एक
मन म्हणजे माणूस' अशी एक व्याख्या मी वाचली होती. आम्हाला माणूस म्हणून घडवणारी आजी स्वतः मन हरवून गेली, जाताना तिचं माणूसपण मात्र आमच्यात रुजवून गेली. >> सलाम!
भावलं, भिडलं, हलवून गेलं.
खूपच सुंदर लिहिले आहे. माझी
खूपच सुंदर लिहिले आहे. माझी आई पण थोडीफार याच परिस्थितीतून गेली आहे, पण सुदैवाने आता गोळ्यांच्या आधारे, ठीक आहे.
भयंकर अस्वस्थ असायचे मी , तिला भास व्हायचे तेव्हा. मला एकदा म्हणाली होती फोनवर, "मला काही समजतच नाहीये ग, कुठली दुनिया खरी, कुठली खोटी. सगळा गोंधळ गोंधळ होतो आहे.. "
एकवेळ शारीरिक दुखणे परवडले, पण हे नको. शेवटपर्यंत प्रज्ञा शाबूत हवी, संवेदना जागृत राहाव्यात....!!!
शुभेच्छा तुम्हाला.
अगदी भिडले मनाला! आमच्याकडे
अगदी भिडले मनाला! आमच्याकडे गेले दीड वर्ष आईची डिमेंशियाशी लढाई सुरु आहे. सुरुवातीची स्टेज असे डॉकचे म्हणणे. औषधे सुरु आहेत आणि जोडीला प्रार्थना .
खूपच सुंदर लिहिले आहे प्रज्ञा
खूपच सुंदर लिहिले आहे प्रज्ञा.
तुम्हा सगळ्यांच खूप कौतुक वाटलं सगळं समजून घेऊन आजीला सांभाळल्याबद्दल.
प्रज्ञा तुटलं वाचताना.
प्रज्ञा तुटलं वाचताना.
प्रज्ञा छानच लिहिलं आहेस.
प्रज्ञा छानच लिहिलं आहेस. अस्वस्थ झालं. इतक्या हुषार, पुढारलेल्या विचारांच्या आजींना ह्या सगळ्यातून जावं लागलं ह्याने मन भरून आलं. तुमची काय अवस्था झाली असेल ह्याची कल्पनापण करवत नाही.
So sad.
So sad.
एकवेळ शारीरिक दुखणे परवडले, पण हे नको.>> हा विचार अनंतवेळा येऊन गेला आहे.
हा लेख वाचताना मला माझी आजी
हा लेख वाचताना मला माझी आजी आठवली. किती क्लेशकारक असतात ह्या आठवणी पण.
ती पण तिच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात अशीच कापरासारखी विरून गेली. बघवत नव्हते. आजही एक दिवसही तिच्या आठवणी शिवाय जात नाही.
सारखे वाटते की ह्यावेळी ह्या प्रसंगावर तिची प्रतिक्रिया, तिचे वागणे, तिचा निर्णय काय असता.
मी तिच्या अल्झायमर अवस्थेवर एक कविता लिहिली होती. मागे कधीतरी मायबोली वर शेअर पण केलेली आहे.
मला एकदा वाटले की इथे लिहावे तिच्या बद्दल, पण तिचे आयुष्य इतक्या घडामोडींनी भरलेले आहे की अख्खी लेखमाला बनेल. मी वेळ मिळाला की मी लिहायचा प्रयत्न करेन.
वाईट वाटलं वाचताना, पण काय
वाईट वाटलं वाचताना, पण काय जबरदस्त लिहीले आहे!
आपली आई आता आपल्याला ओळखणार
आपली आई आता आपल्याला ओळखणार नाही, तिच्यासाठी आता आपलं अस्तित्व नाही हे पचवणं फार जड गेलं त्यांना..
>>>>
इथे पाणी आले डोळ्यातून..
लिखाण फार ताकदीचे आहे.. .आजी इतक्याच
आणि वेगळे काय बोलू...
चांगलं कसं म्हणू,अतिशय उत्कट
चांगलं कसं म्हणू,अतिशय उत्कट लिहिले आहे.
सगळ्यांच खूप कौतुक वाटलं सगळं समजून घेऊन आजीला सांभाळल्याबद्दल........+१.
वाईट वाटलं वाचून. हे असं
वाईट वाटलं वाचून. हे असं लिहायलाही धैर्य हवं. मला माझ्या आजीची आठवण झाली. मात्र तिचं विस्मरण इतक्या पुढच्या थराला गेलं नाही आणि जेव्हा जायला लागलं तेव्हा ती शारीरिकदृष्टीनेही इतकी थकली होती की घराबाहेर पडणं वगैरे तिच्या आवाक्यात नव्हतं. साधारणपणे मला वाटतं काळही तू लिहिलायस तोच असेल. १९९६-९७ च्या आसपास तिला विस्मरण म्हणा, गोंधळून जाणं म्हणा, असा त्रास व्हायला लागला. आम्हीही 'वयानुसार होत असेल' असं गृहीत धरलं. तीही बुद्धिमान, कर्तबगार होती. शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी केलेली. पण अधूनमधून शारीरिक तब्येतीच्या इतर तक्रारी येत गेल्या. प्रत्येक वेळी विस्मरण आणखी आणखी झपाट्याने वाढत गेलं. असो.
>>> आपलं माणूस असं आपल्या
>>> आपलं माणूस असं आपल्या डोळ्यासमोर मनाने विस्कटतं, अस्तित्वहीन होत जातं हे बघणं क्लेशकारक असतं.
हो, वाचायलादेखील अवघड वाटलं, तर प्रत्यक्ष अनुभव कसा असेल!
काय प्रतिक्रिया द्यावी खरंच समजत नाही. चांगलं लिहिलंय असं तरी कसं म्हणायचं यावर!
आईगं जीवघेणं लिहीलंयस. काय
अल्झायमरने माझी आजी गिळलीच!
>>>>>> आईगं जीवघेणं लिहीलंयस. काय बोलू.
काय बोलू ?
काय बोलू ?