|
Supermom
| |
| Wednesday, November 14, 2007 - 7:56 pm: |
|
|
दिवाळीचा दिवस. माझं देवघर अगदी छान सजलेलं. देवासमोर बसून नवरा साग्रसंगीत पूजा करतोय. त्याच्या मागे छोट्याछोट्या आसनांवर मुलं बसली आहेत...किंवा शांत बसून रहायचा प्रयत्न करताहेत. मुलीचं लक्ष तिच्या चमचमत्या घागर्याकडे अन हातातल्या हैद्राबादी बांगड्यांकडे आहे तर मुलगा त्याच्या चुडीदार कुर्त्यावरची... म्हणजे त्याच्या भाषेत 'शाहरूख खान ड्रेसवरची' नक्षी निरखून बघतोय. नाकातली नथ नि अंगावरची पैठणी सावरत माझीही लगबग सुरू आहे. पूजा आटोपली तशी नवर्यानं प्रसादाचं ताट आणायची खूण केली. मी स्वैपाकघराकडे वळणार तोच एवढा वेळ महत्प्रयासानं दाबून धरलेला प्रश्न मुलानं विचारलाच, 'इज इट फ़ूड टाईम?' 'नैवेद्य म्हण रे बाळा... फ़ूड काय?' माझं हलकेच उत्तर. 'बट इट इज फ़ूड... राईट?' (एरवी झिंज्या उपटल्या तरी अशा वेळी भावाच्या मदतीला धावल्या नाहीत तर त्या बहिणाबाई कसल्या?') मी काहीतरी उत्तर देणार तोच नवर्यानं आरतीची घंटा जोरजोरात वाजवायला सुरुवात केलेली. त्याचा अर्थ 'बोलणं पुरे आता. प्रसाद आणा लवकर...' हा आहे हे कळायला मला वेळ लागत नाही. घाईघाईनं मी वाढलेलं ताट नेऊन देवासमोर ठेवते. पूजा, जेवणं उरकतात तसा मुलं त्यांच्या खोलीत पत्त्यांचा डाव मांडतात. गोडधोड जेवून 'दमलेला' नवरा टी व्ही समोर बसल्या बसल्या पेंगायला लागलेला असतो. मागचं आवरून, डिशवॉशर लावून मी रिमोट हातात घेते खरी, पण मनात थैमान घालणारे, आजकाल रोजच छळणारे प्रश्न काही शांत व्हायला तयार नसतात. या उन्हाळ्यात भारतात जायचा बेत आम्ही दोघांनीही आखला आहे. तीन वर्षं झालीत भारतवारी होऊन. केव्हाही फ़ोन केला की 'कधी येताय..' हा प्रश्न ऐकावा लागणार हे ठरलेलंच. पण या वेळी जायची माझी इच्छा जरी नेहमीइतकीच प्रबळ असली तरी अनेक पण आणि परंतुची किनार त्या इच्छेला हैराण करून सोडतेय. या तीन वर्षात भारतातल्या आमच्या कुटुंबात अनेक बदल झालेत. ते वेळोवेळी आम्हाला कळतही गेलेत. पण एक मोठा बदल आमच्या इथल्या कुटुंबात झालाय... तो म्हणजे माझी दोन्ही मुलं मराठी बोलणं जवळपास विसरली आहेत. खरंतर असं का व्हावं हे आम्हा दोघांनाही कळत नाही. घरात आम्ही त्यांच्याशी मराठीच बोलतो... आपापसात आम्ही दोघं चुकूनही इंग्लिश बोलत नाही. पण हा बदल हळूहळू पण निश्चितपणे होत गेलाय हे मात्र खरं. तसं आमचं बोलणं त्या दोघांनाही पूर्णंपणे कळतं. फ़क्त बोलायला ते तयार नसतात. या गोष्टीचं मला अनिवार म्हणजे अनिवारच दुख होतं. नवर्याशी बोलून काही उपयोगच नसतो. कुठलीही गोष्ट 'सिरीयसली' घ्यायचीच नाही हे त्याचं ब्रीदवाक्य. ते तो अगदी कटाक्षाने पाळतो. कितीही गंभीर गोष्ट असली तरी ती विनोदात घेण्याचा त्याचा स्वभाव लग्नाच्या बारा वर्षांनतरही त्याने टिकवून ठेवलाय. बहुतेक वेळा मला ते बरंही वाटतं. पण कधीकधी मी त्यानं वैतागतेदेखिल. अगदी माझ्या बाळंतपणाच्या वेळीही मला ऑक्सिजन लावलेला, डॉक्टर्स प्रचंड काळजीत अन मी अगदी डोळ्यात पाणी आणून त्याला सांगतेय, 'माझं काही बरंवाईट झालं ना तर....' 'अजिबात काळजी करू नकोस तू. मी माझी मुळीच आबाळ होऊ देणार नाही. ताबडतोब दुसरं लग्न करीन....' त्या तशा क्षणीसुद्धा मला इतकं हसू लोटलं की बस्स... कधी रागावून मी म्हणतेही, 'अहो, कधीतरी गंभीरपणे विचार करत जा ना....' तर यावर... 'झालं... घरात एक तू कायम तोंड लटकावून बसणार... मीही तेच करू? म्हणजे संपलंच.' तर अशा स्वभावामुळे नवरा ही गोष्ट हसण्यावारी उडवणार हे मला माहीतच असतं. अपूर्ण.
|
Supermom
| |
| Thursday, November 15, 2007 - 12:19 am: |
|
|
तीन वर्षांपूर्वी आम्ही इथे आलो तेव्हा मी नुकतीच भारतात वर्षंभर राहून आले होते. त्यामुळे जेमतेम 'यस नो' सोडलं तर मुलांना इंग्रजीचा गंधही नव्हता. घरात बोलली जाणारी मराठी, शाळेतल्या टीचरची हिंदी अन शेजारच्या मैत्रिणीची गुजराती अशी अनेकाविध भाषांची कॉकटेल ते तेव्हा बोलत असत. पहिल्यांदा त्यांना जेव्हा न्यूयॉर्कच्या शाळेत घातलं तेव्हा शाळेत टीचरशी कसं बोलतील, काही लागलं सवरलेलं कसं सांगतील या काळजीनं मी तेव्हा अगदी हैराण झाले होते. मनातले ते विचार मी त्यांच्या टीचरजवळ बोलूनही दाखवले. 'डोंट वरी डियर... वी हॅव लॉट ऑफ़ पेशन्स..' म्हातार्या शिक्षिकेनं तोंड भरून आश्वासन दिलं तरी माझी बेचैनी कमी होत नव्हती. त्यातच एक दिवस सुकन्येनं 'आई, हा टीचरशी मराठीत बोलत असतो ' अशी गुप्त बातमी पुरवली त्यामुळे मायबोलीचा झेंडा न्यूयॉर्कच्या शाळेत रोवला गेल्याचा सुप्त आनंद झाला तरी त्या मराठी विरुद्ध अमेरिकन इंग्रजी अशा शब्दसंग्रामाचं चित्र डोळ्यासमोर उभं राहिल्यानं अधिकच असहाय वाटायला लागलं. शेजारी राहणारा नवर्याचा मद्रदेशीय मित्र मुंबईकर असल्याने अस्खलित मराठी बोलत असे. त्याच्याशीही दोघांची चांगलीच गट्टी जमली होती. तिथेही इंग्रजीचा प्रश्नच नव्हता. अगदी शाळेतून आल्यावर जिन्यातूनच 'आई,आज पोहे केलेस की सांजा...' असं ओरडतच दोघं घरी येत असत. त्यामुळे न्यूयॉर्कर झालो तरी 'मायमराठी'च जोरात होती. तेव्हा एकदोन भारतीय कुटुंबांमधली मुलं फ़ाडफ़ाड इंग्रजी बोलताना बघून आपल्याही मुलांना असं कधी बोलता येईल असं वाटत असे. पण त्यात मुलांना शाळेत बोलता यावं, बरोबरीच्या मुलांशी संवाद साधता यावा ही एकमेव इच्छा होती तेव्हा. पण कुठलंही मागणं विचार करून मागावं म्हणतात ते काय खोटं आहे? बघता बघता तीन चार महिने उलटले नि इंग्रजीत जाणवण्याइतकी प्रगती होऊ लागली. आई बाबांचे मॉम नि डॅड केव्हा झाले ते आम्हालाच कळलं नाही तर त्या चिमुरड्यांना काय कळणार होतं? घरात नवीन खेळणं आणल्यावर अन 'आवडलं का' विचारल्यावर 'इट्स कूल डॅड...' असं उत्तर जेव्हा पहिल्यांदा आलं तेव्हा मराठीच्या र्हासाची जाणीव झाली. पण हा बदल इतका भराभर घडत गेला की हळूहळू मराठी फ़क्त आम्हा दोघांच्याच संभाषणात उरली. त्यातून मुलगा एखादेवेळी मराठी बोललाच, तर इतकं तुटकं मोडकं नि अगाध बोलत असे की तो ज्ञानेश्वरांच्या काळात जन्मला नाही याबद्दल देवाचे आभार मानण्यापलिकडे आमच्या हातात काहीच रहात नसे. मुलगी तशी बर्यापैकी मराठी बोलणारी पण मुळातच अतिशय लाजाळू, त्यामुळे तसंही तिचं बोलणं तोळामासा.(आता मात्र ही परिस्थिती उरली नाहीय हो...) तेव्हा तिच्याही बाबतीत सारा आनंदीआनंदच होता. अपूर्ण.
|
Anaghavn
| |
| Thursday, November 15, 2007 - 10:56 am: |
|
|
मॉम ची काळजी...काळजा पर्यंत पोहोचली. अनघा
|
Supermom
| |
| Friday, November 16, 2007 - 10:59 am: |
|
|
भाषेच्या बाबतीतला हा बदल पाहून मला बरं वाटत नसे. इंग्लिश यावी हे ठीक आहे, पण म्हणून मराठी पूर्ण विसरावी हे का म्हणून? हे म्हणजे एखाद्या साध्यासुध्या आईला पार विसरून,एखाद्या टिपटॉप, मॉडर्न मावशीच्या मागे धावत जाण्यासारखं झालं. अन असाच विचार केला तर भारतात आपण सारे लहानपणापासून कमीतकमी तीन भाषा बोलतोच ना. अपली मातृभाषा, राष्ट्रभाषा नि इंग्लिशही येतेच. मग इथेही निदान इंग्रजी न मराठी, दोन्ही बोलायला हरकत काय आहे? मग नीट विचार केल्यावर वाटायला लागलं, आपणच चुकतोय की काय...सकाळी साडेसात ते दुपारी अडीच पर्यंत शाळा, घरी आल्यावर टी व्ही चे कार्यक्रम बघणं, नि उद्या पुन्हा शाळा आहे म्हणून लवकर झोपणं, या सार्यात मराठी अशी कानावर पडतेच किती? बरं, मित्रमैत्रिणी सगळी अमेरिकन, चिनी स्पॅनिश,अशा प्रकारातली. जे देसी आहेत त्यात मराठमोळे फ़ारच कमी. सगळा तेलगू, पंजाबी, गुजराती असा क्राऊड. साहजिकच ती मुलं पण आपापसात इंग्रजीच बोलणार. मनाला असं कितीही समजावलं, तरी थोडी बोच ही जाणवतच होती. आपण इथे कायम राहणार की नाही हे जरी नक्की नसलं, तरी जर उद्या इथेच स्थायिक झालो, तर आपली मुलं किती सुरेख अनुभूतींना मुकतील याची. पु.लंचं लिखाण वाचायचं नाही, 'मोगरा फ़ुलला' ऐकून बहरायचं नाही, शांता शेळकेंच्या कविता ऐकून डोलायचं नाही...यातलं काही म्हणता काहीच नाही... हे कसलं मराठमोळेपण? नाही म्हणायला माझ्या लहान बहिणीच्या लग्नात मी लेकीचा नऊवारी कल्पना साडी नेसवून, कपाळावर इवलीशी चंद्रकोर नि हनुवटीवर काजळाचं गोंदण लावून हौसेनं काढलेला फ़ोटो अल्बममधे आहे. तिच्या बाकी सार्या पाश्चात्य परिधानांमधल्या फ़ोटोत त्या फ़ोटोची सर कशालाच नाही असं मला राहून राहून वाटत राहतं. ढगांचा गडगडाट कानावर येतो तशी मी दचकून भानावर येते. पावसाचे टप्पोरे थेंब तडतडायला लागलेले असतात. मुलगा नि मुलगी दोघंही त्या आवाजाने घाबरून माझ्याजवळ येतात. 'चला, चार वाजले रे. काय खायचंय दुधाबरोबर आज?' 'आय वांट दॅट राउंड थिंग...' 'आय वांट दोज येलो व्हील्स...' 'अनारसा नि चकली...' मला हसूच येतं. दोघांना हलकेच थोपटून मी स्वैपाकघराकडे वळते. दूध गरम करताकरताच अचानक एक आठवण माझ्या मनात गिरक्या घ्यायला लागते. -अपूर्ण.
|
Supermom
| |
| Friday, November 16, 2007 - 2:16 pm: |
|
|
माझ्या माहेरी नि सासरी ब्रम्हचैतन्य श्री गोंदवलेकर महाराजांवर सार्यांचा खूप विश्वास. महाराजांच्याच कोणातरी भक्ताकडून ऐकलेली ही गोष्ट. एकदा एका प्रवचनानंतर(हे प्रवचन महाराजांचं होतं की त्यांच्या कोणा भक्तांचं ते आठवत नाहीय.) एका श्रोत्यानं विचारलं होतं की 'आपण इतकं सुरेख सगळं सांगता. पण वरून हौदात नळ सोडावा नि खाली तो हौद गळका असल्याने सगळं वाहून जावं तसं काहीसं आमच्या मनाचं होतं...तेव्हा...' यावर प्रवचन करणार्यांनी फ़ार मार्मिक उत्तर दिलं होतं. ते म्हणाले, 'ते सगळं खरं, पण शेवटी ओल तर राहतेच ना...' भरून आलेल्या पावसानंतर आभाळ स्वच्छ झालं की जसं होतं तसं क्षणात माझ्या मनाचं झालं. आम्ही जरी परदेशात स्थायिक झालो, मुलं इथेच घडली, वाढली, तरी हे संस्कारांची ओल कधी वाळायचीच नाही. आईवडिलांकडून आलेला हा वारसा कुठल्या ना कुठल्या स्वरूपात ते मनात जिवंत ठेवतीलच. बाहेर जरी कितीही इंग्रजाळलेलं वातावरण असलं, तरी घरात तेवणारी ही मायबोलीची ज्योत त्यांच्या मनाचा एखादा छोटासाच का होईना, कोपरा उजळल्याशिवाय राहायची नाहीच. म्हणूनच की काय, वडील पूजेला बसले की हळूच दोघंही येऊन बसतात. 'आई, आय ऑल्सो लाइक इट...' म्हणत बाबांसारखंच उभं गंध माझा लेक हौसेनं लावून घेतो. 'आई, पुढच्या वेळी इंडिया ट्रिपला जाऊ तेव्हा मला नेहासारखं हिरवं परकरपोलकं घेशील का?' असं लेक आर्जवानं विचारते. हॅलोवीनच्या सणानंतर दिवाळीच्या तयारीत दोघंही हौसेनं भाग घेतात. माझ्यासारखंच दिवाळीच्या दिवशी भल्यापहाटे आंघोळी झाल्यावर गरमागरम चकल्या नि सायीचं दही दोघं आवडीने खातात. अशा एक ना दोन, अनेक गोष्टी. वार्याच्या हळुवार झुळकीसारख्या मनाला प्रफ़ुल्लित करणार्या. फ़ार काय, या दिवाळीला नेहमीचं डव नि करेस साबण बाजूला ठेवून मी मोती साबण वेष्टणातून काढला तसा त्याचा वास खोलवर छातीत भरून घेत लेक म्हणाला...'धिस सोप इज सो नाइस..' दोघांनीही सांगूनच टाकलं... 'आता रोज हाच साबण हवा आम्हाला...' अशा वरवर लहान वाटणार्या पण मनाला आभाळाएवढं मोठं करणार्या गोष्टींनी सुखावून जाऊन मी बाहेरच्या काचेच्या दाराशी येते. सकाळी उठून मी हौसेनं काढलेली फ़ुलांची रांगोळी पावसात किंचित विस्कटली आहे... नवरा टक लावून त्या रांगोळीकडे बघत होता.. अन एकदम म्हणाला, 'पावसानं सगळे रंग एकत्र झालेत तरी किती सुरेख दिसतेय ग रांगोळी. मला वाटलं होतं पाण्यानं पार बिघडली असेल, पण उलट त्या पाकळ्या नि सारे रंग एकातएक मिसळून आणखीच खुललेत बघ. नि मूळ डिझाईन कायमच आहे...' मी हलकेच हसते. आयुष्याचं असंच तर आहे. मनापासून,सारं कौशल्य पणाला लावून रेखायची असते रांगोळी. मग ती नीट येईल की नाही, सुरेख दिसेल की नाही ही चिंता न करता. म्हणजे मग पाऊस, वारा कसल्याही मार्यात मूळ कलाकृती टिकूनच राहणार असते.... एकमेकात मिसळलेल्या रंगांची खुलावट आणखीनच वाढवत. माझ्या गूढ हसण्याकडे नवरा आश्चर्यानं पहात असतानाच मी खायचं घेऊन मुलांच्या खोलीत जाते. दोघांबरोबर मिकी माऊसचा सिनेमा बघायला.... समाप्त.
|
Gautami
| |
| Friday, November 16, 2007 - 3:43 pm: |
|
|
खूपच छान. इथं वाढणारी मुलं आणि त्यान्च्या पालकान्च मन्:स्थिती छान टिपली आहेस. माझ्या मुलीलाही मराठी कळत, ती दर रविवारी मराठी शाळेतही जाते. त्यामुळे मराठी बोलू ही शकते, पण प्रयत्न पूर्वक मी तिला रोज ५-१० वाक्य मराठीतून बोलायची आठवण करून देते. कारण या मुलान्च बेसिक विचारच इन्ग्रजी तून होत असल्याने आपण जरी मराठीतून बोललो तरी पटकन उत्तर इन्ग्रजीत येत. त्यामुळे तू म्हणतेस तसं हौद जरी गळका असला तरी कोरडा होणार नाही हे नक्किच.
|
अगदी अगदी सुमॉ!!
|
Amruta
| |
| Friday, November 16, 2007 - 5:29 pm: |
|
|
छान लिहिलयस ग सुमॉ. मी हि माझ्या मुलीला घरी मराठीत बोलायची सतत आठवण करत असते. आणि मला बघ कशा इंग्लिश, मराठी, हिंदी भाषा बोलता येतात अस म्हंट्ल कि ति मस्त इंप्रेस होते व मराठीत बोलते. तिला भारतात किती भाषा बोलतात हे सांगितल तेव्हा तिला खुपच आश्चर्य वाटल. मधेच मुड येतो तेव्हा वेगवेगळ्या भाषांची नाव विचारते.
|
Prajaktad
| |
| Friday, November 16, 2007 - 7:23 pm: |
|
|
' गुज माझीया मनिचे..शब्दात उतरवलेस तु! ' ...आमच्याकडे सध्या मिग्लिश चालु आहे अधुन्-मधुन..त्याच पुर्णच विग्रजी होणार अस दिसतय.. नेहमिप्रमाणे उत्तम..
|
Chinnu
| |
| Friday, November 16, 2007 - 8:35 pm: |
|
|
सुमॉ, आईचे विचार मांडले आहेस. मुलं ज्या cultural खिचडीमधून जात आहेत त्याची कल्पना आहे. काळजी करु नका. निवडीचे स्वातंत्र्य मुलांवर सोपवा. ओल तर राहणारच. त्यात प्रश्नच नाही. आज मला इतर भारतीय भाषा मराठीइतक्याच जवळच्या वाटतात, ह्याचे श्रेय ह्या स्वातंत्र्याचेच आहे. कृपया तेलगू न लिहीता तेलुगू लिहीत चला, धन्यवाद!
|
Manuswini
| |
| Friday, November 16, 2007 - 9:40 pm: |
|
|
अग सुमा, हे काही नवीन नाही. माझा अनुभव सांगायचा म्हणजे माझी भाची इथेच जन्मली नी वाढतेय. कीतीही कोकणीतून बहीणीने विचारले तरी उत्तर english मधूनच. मध्ये आईकडे होती तेव्हा आईने बर्यापैकी कोकणी कानावर घालून ती अगदी एक दोन authentic कोकणी शब्द उचलले(मात्र) जे आम्ही सुद्धा बोलत नाही. सगळे अगदी व्यवस्थीत कळते जे काही बोलले जाते ते. spanish मात्र बोलते हो. कारण baby sitter मुळे. 7- 2 school 2-7 baby sitter च्या ताब्यात, 6-8 Tv मग झोप. बहिण 7- 7:30 PM ला येणार तोपर्यन्त झोपायची तयारी. ह्यात सांगायचा मोठेपणा नाही पण काय करणार ते वातावरण तरी नाही ना आजुबाजुला. दोघेही नोकरी करतात. baysitter spanish . आजुबाजूला no indians ,शाळेत बहुधा गुज्जु,पंजू,मल्लु असे indians . कुठे कोकणी नी कुठे काय. खरे तर माझा नी आम्हा भावंडाचा सुद्धा हा problem होता अगदी मी मुंबईत राहून सुद्धा लहानपणी. आजुबाजूला पंजाबी, सिंधी,गुजराती, तामीळ अगदी हेच. मराठी तर नाहीच मग कोकणी दुरची गोष्ट. शाळेत सुद्धा हेच भरलेले. आई working , माझे पप्पा पण फक्त सुट्टीवर यायचे. तेव्हा कोकणी कमीच बोलले जायचे आजूबाजूला. माझी आई धरून घरातील बहुतेक सगळे तामीळ,पंजाबी, गुजराती अगदी चांगले बोलतात. कारण वस्ती मुळे ते बोलावे लागते बहुधा. आम्हा भांवाडांना सांभाळणारी तामीळ आजी होती कीती तरी वर्षे तेव्हा मी अगदी ८-९ वर्षे आईला अम्मा म्हणायची. आई कीतीतरी वेळा सांगून मला ते नाव का आवडायचे देवालाच माहीती. आईने छंद सोडून दील्यावर मी स्वतच सोडून दीले अम्मा म्हणणे. bottomline आजूबाजूचे surroundings पण कारणीभूत असते. जेव्हा तुम्ही लहान असता you get influenced quickly by new thing, adapt quickly to new thing , be it a language मला तरी असे वाटते. माझ्या एका US च्या मित्राची मुलगी कायम मराठी बोलते. बायको घरीच असते. आजूबाजूला मद्रासी,तेलगू ज्यास्त. पण जेव्हा बाहेर खेळायला लागली तेव्हा butterfly ला ती फुलपाखरू म्हणत दाखवे तेव्हा मद्रासी पोरे confused मग ही confused . मित्राची बायको मग चिंतेत की हीला अगदीच english येत नाही. चार वर्षे झाली तरी घरीच, playschool ला पण घातली नाही. मग दोघेही डॉकटरकडे गेली. इथील डॉकटर म्हणाली काहीही problem नाही, you continue speaking in your mothertoungue at home. give her little intro of few english words, numbers but she would definitly speak english once she goes to school here. kids dont take much time. ता. क : . मी मराठी,कोकणी भले धेडगुजरी बोलत असेन पण माझ्याशी तामीळ, गुजराती बोला तुम्ही,फाडेन (असेच गमतीत लीहीते)
|
चांगल लिहीलय सुमॉ. माझी मुलगी गेल्या तिन वर्षापासुन शाळेत जाते. पण आमच्या सोबत बोलताना मात्र अस्खलीत मराठीतच बोलते. ती जेव्हा प्रि के मधे जात होती तेव्हा मला अर्धांगीनीने तिला इंग्रजी बोलन्यात मदत होइल म्हणुन इंग्रीत बोलायचका हे विचारले तेव्हा मी आपण इंग्रंजीत बोलायच नाही हाच स्टन्ड घेतला. नंतर ती आपोआप आम्च्याशी मराठीत व इतरांशी (जर मराठी नसले तर) इंग्रजी बोलते. शाळेत तीने एकदा मला जोरात बाबा अशी हाक मारली तिच्या मिस ने तिला विचारले की व्हॉट इज बबा, तिने त्यावर मिश्कील उत्तर दिले होते. बाबा इज डडी. तिला बोलायला काही अडचन नाही मात्र मराठी वाचायचा वा लिहायचा मात्र कंटाळा करते कधी कधी. त्यावर सध्या जोरदार मोहीम हाती घेतलीय. माझे काही रशीयन, पोलीश मित्र आहेत. ते त्यांचा भाषा घरी बोलतात. गंमत म्हण्जे त्यांची मुल घरी रशीयन, जर्मन व बाहेर इंग्लीश अशी विभागनी आपोआप करतात.
|
if I remember right, our admin's daughter, aabha, speaks fluent marathi. u can take his advice
|
Zakki
| |
| Saturday, November 17, 2007 - 12:34 am: |
|
|
आमची मुले लहान होती त्यावेळी, इथे भारतियांचे प्रमाण अगदीच कमी. भारतीय मित्रांमधे सुद्धा मराठी मित्र जवळ जवळ नाहीच. त्यामुळे मराठी बोलण्याचा प्रश्नच नव्हता. त्यातून जेंव्हा मुले भारतात जात नि मराठीत बोलायचा प्रयत्न करीत तेंव्हा तिथली मुले त्यांना हसायची. त्यामुळे माझ्या मुलीने मराठी बोलणे एकदम सोडून दिले. मुलगा जरा घट्ट कातडीचा आहे, त्याने मनाला लावून घेतले नाही. पण तिकडची मोठी माणसे मात्र कौतुकाने मुलांशी मुद्दाम इंग्रजीत बोलायची त्यामुळे तिथेहि मराठी नाही. हळू हळू, त्यांच्या मावशीवरील प्रेमामुळे ते मावशीशी मराठीतून बोलतात. त्यातून आता ती 'मुले' म्हणजे तुम्हा लोकांच्या वयाची झाली असल्याने ते बरेच मराठी शिकली आहेत नि आता ते बोलू शकतात. पण काय करणार, आजकाल त्यांच्या वयाच्या भारतातल्या मुलांनाच मराठी येत नाही!
|
Sayonara
| |
| Saturday, November 17, 2007 - 4:05 am: |
|
|
सुमॉ, तुझं ललित म्हणजे इथली 'घर घर की कहानीच' आहे. माझ्या मुलीलाही फार काही ग्रेट मराठी येत नाही आणि बोलताना आपण चुकू आणि इतर हसतील ह्या complex मुळे तर ती बोलणं अगदीच टाळते. कधीतरी जरा शिकण्याचं कुतुहल दाखवते. पण तेवढ्यापुरतंच. तू म्हणतेस तसं 'ओल राहिली' तरी खूप आहे.
|
Zakasrao
| |
| Saturday, November 17, 2007 - 4:15 am: |
|
|
मस्तच लिहिलय सुमॉ. सुपर मॉम तिच्या बाळाना मराठी शिकवल्या शिवाय राहणार नाहीच. त्याशिवाय का ती सुपर मॉम आहे. प्रयत्न सुरु राहुदेत.
|
Psg
| |
| Saturday, November 17, 2007 - 5:13 am: |
|
|
if I remember right, our admin's daughter, aabha, speaks fluent marathi. u can take his advice सव्या, हे मराठीत असं लिहायचं- "मला वाटतं आपल्या ऍडमिनची मुलगी आभा अस्खलित मराठी बोलते, तुम्ही त्यांचा सल्ला घेऊ शकता " दिवे घे रे! मुद्दाम इंग्लिशमधे लिहिलंस ते समजलं सुमॉ, गोड लिहिलं आहेस.. रांगोळीची उपमा आवडली
|
Daad
| |
| Saturday, November 17, 2007 - 5:58 am: |
|
|
सुपर माता, किती किती मनातलं लिहिलयस? आणि किती सुंदर! रांगोळी- अगदी अगदी! माझा लेकही दोन वर्षांचा असताना आम्ही ऑस्ट्रेलियात आलोय. सुंदर मराठी बोलायचा. एक दिवस रात्री झोपेत इंग्रजीत बरळला. तेव्हाच लक्षात आलं की हातातून सुटला. मला खूप वाईट वाटलं होतं. पण नाही गं. तू म्हणतेयस तेच खरं. संस्कारांची ओल खरी.... त्यात मुळं रुजायचीच.
|
Manuswini
| |
| Saturday, November 17, 2007 - 7:55 am: |
|
|
psg आता मी पण हेच लिहिणार होते, इथे इतकी काळजी पडलीय की मराठीचा वापर कसा कमी होत चाललाय आणि सव्या, तु एकदम फॉर्मात येवून ईंग्लिंश झाडलेस... एकदमच बोळा फिरवलास ना.(आता हे सांगू नकोस मुद्दमच लिहीले म्हणून) ते सुद्धा मायबोलीवर हे म्हणजे लोकां सांगे.. प्रकार ना... दिवे घे रे...
|
Divya
| |
| Saturday, November 17, 2007 - 2:27 pm: |
|
|
सुमॉ. छान लिहीले आहेस. पण हा बदल न टाळता येणाराच आहे. कबुल आहे या बदलाचा कुठे ना कुठे पालकांना त्रास होणारच, पण तु म्हणतेस तस ओल रहाणारच. कालच नेमसेक पाहीला त्यामुळे फ़ारच पटल, भाषेच्या बाबतीत माहीत नाही पण पुढच्या पिढीत संस्कृतीची ओढ तरी नक्कीच राहणार.
|
|
|