|
Supermom
| |
| Thursday, August 30, 2007 - 12:55 pm: |
| 
|
'आत्या, मी कशी दिसतेय ग?...' स्वत भोवती एक गिरकी घेऊन गौरीनं मान वेळावून सरलाताईंकडे बघितलं. सायंपूजा करून घाईघाईत देवघराबाहेर येणार्या सरलाताईंनी जरा चमकूनच तिच्याकडे नजर टाकली. 'अगदी वहिनीची प्रतिकृती.... तेच रेखीव नाकडोळे, तसाच गोरापान रंग नि केसांचा भरदार पिसारा.....' त्यांच्या मनात आलं. न बोलता गौरी अशी समोर येऊन उभी राहिली असती तर आपल्या दिवंगत भावजयीच्या आठवणीने त्या क्षणभर दचकल्याच असत्या. मोरपिशी रंगाची जरीची साडी,त्यावर शोभणारे नाजूक सुवर्णालंकार नि केसात माळलेलं एकच पांढर्याशुभ्र गुलाबाचं फ़ूल यात ती आज एकदमच गोड दिसत होती. हातातली पूजेची पात्रं जागेवर ठेवताठेवता सरलाताईंनी खिन्नपणाने हसून मान हलवली. 'हं, पोरीला काही कल्पना दिलेली दिसत नाहीय दादानं.... तिच्या स्वातंत्र्याला थोड्याच वेळात साखळदंडात जखडलं जाणार आहे याची....' 'अग आत्या, आज बाबांचे ते जुने मित्र येणार आहेत ना ग, तात्या इनामदार... त्यांच्या जेवणाखाण्याच्या वेळी जातीने लक्ष द्यायला सांगितलंय मला बाबांनी....' एक क्षणभर सरलाताई घुटमळल्या. 'सांगावं का पोरीला खरंखरं? तिनं काही गोंधळ केला रडून तर दादा अगदी धारेवर धरेल आपल्याला. पण नाहीच सांगितलं, तर या मोठमोठ्या डोळ्यातली आपण विश्वासघात केल्याची भावना,तिला तोंड देऊ शकू आपण? किती खात्री आहे तिला आपल्याबद्दल....' सरलाताईंचं विचारचक्र जागीच थांबलं. 'तात्या नाही. तात्यासाहेब इनामदार म्हण गौरी. जुन्या चालीरीतींची समज यायला हवी आता...' दादासाहेब केव्हा दारात येऊन उभे राहिले ते दोघींना कळलंच नाही. चपापून सरलाताईंनी डोक्यावरचा पदर उगाचच सारखा केला. गौरीच्या खळखळत्या उत्साहालाही तटकन बांध घातल्यासारखी ती जागेवरच थबकली. 'आटपा लवकर, सात वाजता येतील ती मंडळी...' एवढंच बोलून ते तडक बाहेर गेलेही. घरातल्या बायकांशी याहून जास्त बोलायची गरज त्यांना कधीच वाटत नसे. 'आत्या, तू सांगितलंच नाहीस ग... कशी दिसतेय मी?....' दादासाहेबांची पावलं दूर गेली तसा गौरीनं पुन्हा प्रश्न केला. आवेगानं तिच्याजवळ येऊन त्यांनी तिला जवळ ओढलं. 'ही साडी बदल आधी... अन ते केस असे मोकळे का सोडलेत? ये...तेल लावून अंबाडा घालते चांगला... चल लवकर. थोडाच वेळ उरलाय आता...' 'हे ग काय आत्या... इतकी छान तयार झालेय अन आता तेल लावून अन अंबाडा घालून पुरती बावळट करून टाकशील मला...' फ़णकार्यानं गौरीनं आपले केस त्यांच्या हातातून हिसडा मारून सोडवून घेतले. 'आता कसं सांगू या पोरीला? सुरेख दिसायलाच नको आहेस ग पोरी तू आज मला...' 'म्हणजे काय? आत्या... नीट सांग आधी मला... लवकर सांग. काहीतरी लपवतेस तू माझ्यापासून....' 'अग वेडे, तुला बघायला येताहेत सगळे इनामदारांकडचे... बघायला कसले, सारं ठरवूनच टाकलंय तुझ्या बापानं...' गौरीच्या चेहर्यावरचे भाव सरलाताईंना पाहवेनात. 'आत्या... आत्या. हे कसं शक्य आहे ग? मी सुजयशिवाय कोणाशी लग्न नाही करणार आत्या. बाबा खोटं बोलले म्हणजे माझ्याशी.. सुजयच्या आईबाबांना भेटायला बोलावीन म्हणाले मला या महिन्याअखेरीस.... नाही आत्या.. मी जीव देईन ग... सुजयशी लग्न झालं नाहीतर....' देवघराच्या खांबाला धरून गौरी खालीच बसली. येणारे उमाळे दाबायचा निष्फ़ळ प्रयत्न करीत. 'गप पोरी. आधी गप. तुझ्या बापानं ऐकलं तर जीव द्यायची गरजच उरणार नाही बघ तुला. शांत हो नि तयार हो आधी. आत्ताचा प्रसंग तर पार पाडायला हवाच... मग बघू या...' 'काही बघत नाहीस तू.. मागे कॉलेजच्या ट्रिपलाही मुलं सोबत होती म्हणून जाऊ दिलं नाही त्यांनी. तेव्हाही बघेन म्हणाली होतीस तू...काय केलस शेवटी? नाही ना जाऊ शकले मी?' या भाबड्या पोरीला आता कसं समजवावं हेच कळेना सरलाताईंना. अपूर्ण
|
Itgirl
| |
| Thursday, August 30, 2007 - 2:11 pm: |
| 
|
सुमॉ, छान केली आहेत सुरुवात अजून एक चांगली कथा वाचायला मिळणार तर आम्हाला
|
Supermom
| |
| Thursday, August 30, 2007 - 4:14 pm: |
| 
|
रडून रडून शेवटी झोपी गेलेल्या गौरीच्या डोक्यावर सरलाताई हळू हळू थोपटत होत्या. संध्याकाळचा सगळा समारंभ नीट पार पडला होता. घट्ट आवळून बांधलेल्या चपचपीत खोप्यात अन जुन्या पद्धतीच्या काठपदराच्या साडीतही गौरीचं सौंदर्य लपलं नव्हतंच. अगदी दृष्ट लागण्यासारखी सुरेख दिसत होती ती. तिला बघितल्याबरोबरच मंडळींनी एकमेकांकडे बघून पसंतीच्या माना डोलावल्या होत्या. इनामदारांचा मुलगा तसा दिसायला देखणा होता, पण चेहर्यावरची गुर्मी नि ताठा अगदी स्पष्ट दिसत होता. शिक्षणातही गौरीपेक्षा एक वर्ष मागेच होता. एका इयत्तेत किती वर्षं काढली होती देवालाच ठाऊक. अर्थात त्याला गरजही नव्हती म्हणा शिक्षणाची. 'इस्टेट पाहणे' हा मोठ्ठा उद्योग होताच की त्याला. गौरीला झोप लागली तरी सरलाबाईंच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. विषादानं त्यांचं मन अगदी भरून आलेल्या आभाळागत जड झालं होतं. 'अशीच लावण्यखनी, सुरेख होती आपली वहिनी. गौरीची आई. पण दादानं काय कदर केली तिची? या वाड्याच्या चार भिंतीत जशीकाही चिणून मारली त्याने तिला. तिच्या गुणांची कदर यापेक्षा एखाद्या सर्वसाधारण परिस्थितीच्या माणसानं जास्त केली असती. कधी धड वागला नाही तिच्याशी. सतत दुर्लक्षित जीवन जगली बिचारी नि झिजून झिजून गेली शेवटी. गौरीच्या लहानपणीच. डोळ्यानं बघत होतो आपण दादाचे बाहेरचे नाद नि बेताल वागणं. पण काय करू शकणार होतो आपण? बालविधवा, नि कोणाचा आधार नाही. दादाने घराबाहेर काढलं असतं, तर दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत पडली असती आपल्याला.....' 'अन आता पोटच्या पोरीवरही अन्याय करतोय तो. काय कमी आहे खरंतर सुजयमधे? शिकलेला, अनुरूप, नि निर्व्याज प्रेम करणारा आहे गौरीवर. अगदी सुखात राहील बिचारी त्याच्याबरोबर... हं आता शहरातलं छोटंसं घर नि साधेसुधे आईवडील यापलिकडे काही नाही त्याच्याकडे. नोकरीही मध्यमच आहे. पण का कोण जाणे, गौरीला आयुष्यभर फ़ुलासारखी जपेल ही खात्री वाटतेय आपल्या मनाला....' सुजय अन गौरीची ओळख कॉलेजमधलीच. सुजयचे म्हातारे आजोबा शेतीवर एकटेच रहात, नि ते शहरात यायला तयार नव्हते म्हणून त्याला गावात आजोबांजवळ शिकायला ठेवलं होतं एक वर्षभर. तेव्हाच दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. सगळ्यांपासून दूर राहणारा, किंचित लाजरा सुजय गौरीला बेहद्द आवडून गेला. नि गौरी आपल्याकडे खास लक्ष देतेय हे कळल्यावर तिच्या मोठमोठ्या डोळ्यात बुडून न जाणं सुजयला शक्य नव्हतंच. दुर्दैवाने सुजयचे आजोबा गेले अन त्यालाही शहरात परत जावं लागलं. पदवी घेऊन तो आता नोकरीबरोबरच एम. बी. ए. पूर्ण करत होता. इकडे गौरी पदवीधर झाली तशी तिच्यासाठी स्थळांची रांगच लागली होती. पण या सार्यातून सुजय अन गौरीचं प्रेम अबाधित राहिलं होतं. फ़ोनवर चोरून बोलणं, शहरी जाणंयेणं करणार्या मित्रमैत्रिणींबरोबर पत्रं पाठवणं.. असे अनेक मार्ग शोधून काढले होते दोघांनी. सरलाताईंना सुजय एकदम पसंत होता. पण वडील भावाला कळलं तर घरात काय तुफ़ान येईल या भीतीनं त्या नेहमी धास्तावलेल्याच असायच्या. या हळुवार प्रेमाचा सुगावा दादासाहेबांना लागला होता की काय कोण जाणे. पण गेल्या महिन्यापासूनच गौरीसाठी वरसंशोधनाला धडाक्यानं प्रारंभ केला होता त्यांनी. गौरीला हे कळलं तसं कधी नव्हे ते धीर धरून सुजयबद्दल सारं तिनं त्यांच्या कानावर घातलं होता. त्या वेळचा भावाचा चेहरा आठवून सरलाताईंच्या उरात आत्ताही धडधडलं. पण एक क्षणात त्यांच्या मुद्रेवरचे भाव झरझर पालटले होते. अन गौरीला तोंड भरून आश्वासन दिलं होतं त्यांनी... लवकरच सुजयच्या आईवडिलांशी बोलण्याचं. अन शेवटी थंड डोक्यानं हे सारं ठरवून मोकळे झाले होते ते. या विश्वासघाताचं गौरीला कितीही वाईट वाटलं असलं, तरी सरलाबाईंसाठी हे नवीन नव्हतंच. दादासाहेबांच्या उलट्या काळजाचा अनुभव त्यांनी आयुष्यात अनेकदा घेतला होता. आता काहीही करणं त्यांच्या हातात नव्हतं. गौरीचं दुखही पाहवत नव्हतं, नि त्या असहाय होत्या. विचार करून करून पार थकवा आला त्यांना. तोच वाड्याचं भलंमोठ्ठं दार करकरल्याचा आवाज झाला. 'काय रे महादू, कोण आहे?....' वरूनच ओरडून विचारलं त्यांनी. 'काय नाय ताईसायेब. रातच्याला चोर, दरवडेखोरांचा तरास लई वाडलाय. जरा जास्तीचं कुलूप लावीत हुतो बगा...' 'हो रे बाबा. लक्ष असू दे जरा... फ़ारच सत्र वाढलंय या दरोडेखोरांचं....काहीबाही ऐकतेय आजकाल...' 'तुमी बिनघोर र्हावा ताईसायब.... आमी आहोत राखनीला...' महादूनं दिलेल्या आश्वासनानं सुखावून जात त्या परत झोपायला आल्या. निद्रादेवीनं लवकरच त्यांच्या शिणलेल्या मनाचा नि शरीराचा ताबा घेतला. अपूर्ण.
|
Tiu
| |
| Thursday, August 30, 2007 - 6:39 pm: |
| 
|
Interesting पण... योगायोगाने सुजयचे आजोबा गेले ??? 
|
Supermom
| |
| Thursday, August 30, 2007 - 7:14 pm: |
| 
|
म्हणजे सुजयला आजोबांजवळ सोबत म्हणून शिकायला ठेवलं नि विचित्र योग असा की तेच गेले असं म्हणायचं होतं मला. चुकलं का काही?
|
Runi
| |
| Thursday, August 30, 2007 - 7:37 pm: |
| 
|
सुमॉ मला वाटते योगायोग हा शब्द बर्याचदा अनपेक्षित चांगले काही घडले तर वापरतात. तिथे दुर्दैवाने असे म्हणायचे असेल तुला .
|
Supermom
| |
| Thursday, August 30, 2007 - 7:40 pm: |
| 
|
अरेरे, चुकलं खरं. सुधारणा केलीय.
|
Supermom
| |
| Friday, August 31, 2007 - 1:42 pm: |
| 
|
दोन आठवड्यांनी वाड्यातच गौरीचा साखरपुडा पार पडला. सगळ्या समारंभात गौरी एखाद्या निर्जिव पुतळीसारखी वावरत होती. इनामदारांकडून बर्याच जरीच्या साड्या,दागिने नि एक हिरेजडित अंगठी आली होती. वधूला आलेल्या वस्त्रालंकारावरूनच त्यांच्या श्रीमंतीची सहज कल्पना येत होती. पण गौरीला या कशातच रस नव्हता. दोन्ही घराणी तोलामोलाची असल्याने साखरपुडा अगदी थाटात पार पडला. रात्री खोलीत आल्यावर मात्र गौरी मेंदीनं लालचुटूक झालेले हात आत्याच्या गळ्यात टाकून अगदी ऊर फ़ुटेस्तोवर रडली. सरलाताई अगदी कावर्याबावर्या होऊन गेल्या. खोलीतल्या वहिनीच्या फ़ोटोकडे बघून त्यासुद्धा अनिवार रडल्या मग. 'माफ़ कर मला वहिनी. गौरीवर कुठल्याही दुखाची सावलीही पडू देणार नाही असं वचन दिलं होतं ग मी तुला. नाही पाळू शकले मी ते... असहाय आहे ग मी...' सगळी रात्र अशीच अस्वस्थ गेली त्यांची. सकाळी उठून सरलाताई देवघरात आल्या. नेहेमीप्रमाणे देवाला त्यांनी मनोभावे हात जोडले. महादेवाच्या पिंडीकडे बघता बघता त्यांच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं. 'देवाधिदेवा,माझ्यासाठी काही मागायची वेळ निघून गेलीय रे आता. पण त्या पोरीसाठी जीव तुटतोय. जहागिरदार घराण्यातल्या बायकामुलींचा हा शाप कधी रे संपणार? मनासारखं, सुखाचं आयुष्य कधी वाट्याला येणारच नाही का त्यांच्या?...' देवघराजवळ हलकीशी चाहूल ऐकू आली तसे त्यांनी डोळे उघडले. गौरीच होती. रात्रीच्या वादळाच्या सगळ्या खुणा चेहर्यावर स्पष्ट दिसत होत्या. तिची रडवेली मुद्रा बघून त्यांचं काळीज फ़ाटून जाईल की काय असं वाटलं त्यांना. तिच्याशी काहीतरी बोलायला तोंड उघडणार तोच महादू सांगत आला.... 'धाकट्या ताईसायबांची कोनीतरी मैतरीन आलीया खाली...' 'इतक्या सकाळी?...' त्यांना आश्चर्यच वाटलं. पटकन केस सारखे करून त्याही गौरीबरोबर खाली आल्या. गौरीच्या वर्गातली जान्हवी खाली वाटच बघत होती. काही न बोलता तिनं एक चिठ्ठी हळूच गौरीच्या हातात सरकवली...... 'सुजय वाट बघतोय गौरी, देवळात. सगळं कळलंय बघ त्याला...तुला भेटायला आलाय तो...काल रात्रीच. तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय त्याला' 'आत्या...?' गौरीनं भरलेल्या डोळ्यांनी सरलाताईंकडे बघितलं. सरलाताई काही बोलणार तोच वरून दादासाहेबांचा भरदार आवाज आला... 'कोण आहे? काय गडबड आहे तिकडे महादू?....' वरच्या खिडकीत दादासाहेब येण्याआधीच जान्हवी सटकली होती. 'जरा देवळात जाऊन यायचं म्हणत होतो आम्ही दोघी....' सरलाताई चाचरतच म्हणाल्या. 'आत्ता? इतक्या भल्या पहाटे? काही गरज नाहीय....महादू घेऊन जाईल संध्याकाळी. अन आता लग्न होईस्तोवर बाहेर पाय टाकायची गरज नाहीय गौरी. आत्तापर्यंत उधळले ते रंग खूप झाले...खोलीत जा मुकाट्यानं...' ओठात येणारा हुंदका गळ्यात दाबून गौरी धावतच जिन्यावरून वर गेली. तिच्या पायातल्या साखळ्यांचा एरवी गोड वाटणारा आवाज अगदी नकोसा वाटला सरलाताईंना... अपूर्ण.
|
कधि पुर्ण होणार आहे हि कथा?
|
Supermom
| |
| Wednesday, September 05, 2007 - 1:25 pm: |
| 
|
डोक्यावरचा पदर आणखीनच ओढून घेत सरलाताईही गौरीच्या पाठोपाठ जायला निघाल्या. त्याआधी वरच्या खिडकीत एक चोरटी नजर टाकायला त्या विसरल्या नाहीत. पण दादासाहेब तिथे थांबलेच नव्हते. जिन्याजवळ गेल्या गेल्या पूजेच्या फ़ुलांची आठवण झाली सरलाताईंना. महादूला परडी आणायला सांगून त्या वाड्यामागच्या बागेकडे वळल्या. विमनस्कपणे फ़ुलं तोडू लागल्या. परडी फ़ुलांनी भरत आली तशा विहिरीजवळच्या कठड्यावर टेकल्या त्या थोड्याशा. बसल्या बसल्या त्यांचं लक्ष बागेच्या मागच्या दरवाजाकडे गेलं. चहूबाजूंनी भक्कम भिंत, समोर भला थोरला दरवाजा नि मागे हे छोटसंच पण मजबूत दार अशी रचना होती वाड्याची. त्या जुनाट दाराला भलंमोठं कुलूप लटकत होतं. बिजागर्यांच्या फ़टीतून दारापलिकडे माजलेली जंगली झुडपं नि तण दिसत होतं. रात्रीच्या वेळी तर त्या जुनाटपणानं नि अपुर्या प्रकाशानं एकप्रकारचा भीतीदायक गूढपणा त्या दाराकडे बघितल्यावर जाणवत असे. 'या दरवाज्यानं काढता येईल का गौरीला बाहेर?....' मनातल्या विचारांनी त्या केवढ्यातरी दचकल्या. 'महादू, या कुलपाची किल्ली कुठे आहे रे?...' 'त्ये ना, मालकांकडे असती बगा. आनू का?...' महादूला वाटलं दारापलिकडे उगवलेला आघाडा तोडायचाय पूजेसाठी. 'नाही रे. किल्ली नकोय मला...' क्षणभर त्या घुटमळल्या तसं त्यांच्या मनातले विचार ओळखल्यासारखा महादू धास्तावूनच गेला.. 'कायबाय मनात नका आनू थोरल्या ताईसायेब. मालकास्नी कललं तर जीवच घेतील बगा तुमचा नि माजाबी...' तो हलकेच म्हणाला. 'हो रे. जास्त बोलू नकोस...' त्यांनी चिडचिडून त्याला तोडूनच टाकला. महादूच्या ओशाळलेल्या चेहर्याकडे बघून मग त्यांना उगाचच वाईट वाटायला लागलं. 'त्याचा काय दोष? नोकर माणूस तो बिचारा. हुकमाचा ताबेदार. जुना अन विश्वासू नोकर आहे तो. धन्याशी द्रोह करणार तरी कसा?..' 'रागावू नकोस रे बाबा. सध्या डोकं ठिकाणावरच नाही बघ माझं...' किंचित वरमून त्या म्हणाल्या तसा महादू त्यांच्या पायाशीच खाली बसला. 'न्हाय ताईसायेब. रागावू कशापायी? आम्हास्नी सगलं दिसत न्हाय का? वाड्यात उमर गेली माजी. पन काय करनार. श्येवती मालकांचा शबुद परमान. मंग तो बराबर असला न नसला तरी आमी गडीमानसं...' धोतराच्या शेवाने त्याने डोळे पुसले. 'खरंय रे बाबा तुझं. चल, फ़ुलं नेऊन दे मला वरती... पूजेची वेळ होतेय...' गुडघ्यांवर हात टेकतच त्या उठल्या. जिना चढताचढता त्यांचं मन विचार करत होतं. 'म्हणजे मागच्या दारानंही गौरीला बाहेर जाता येणार नाहीच. दादाच्या सार्या किल्ल्या चोवीस तास त्याच्या कमरेलाच असतात नाहीतर उशीखाली. त्या घेणं शक्यच नाही कोणाला. सुटकेचे सारेच मार्ग खुंटलेत आता.... महिन्याभरानं लग्न.. बिचारी माझी गौरी... वहिनीसारखंच दुर्दैवी आयुष्य जगणार ती फ़ुलासारखी पोर...' सोनार, कापडवाला, सगळे यायला लवकरच सुरुवात होणार होती. अपूर्ण.
|
Please lav kar tak na kai zale Gouriche, supermom he kai nav ahe??? Sahi story ahe.
|
Runi
| |
| Saturday, September 08, 2007 - 6:55 pm: |
| 
|
*सुमॉ, कथा लवकर पुर्ण कर अन्यथा तुला बा. रा. बा.फ. च्या सगळ्यांसाठी लाडु करुन पाठवायचे फर्मान देण्यात येईल. 
|
Supermom
| |
| Thursday, September 13, 2007 - 3:58 pm: |
| 
|
गौरीच्या लग्नाची तयारी धडाक्यात सुरू झाली. तर्हेतर्हेच्या साड्या, दागदागिने यांच्या खरेदीला नुसता पूर आला होता. जराही हात राखून ठेवीत नव्हते दादासाहेब. अर्थात त्यात गौरीवरच्या प्रेमापेक्षाही स्वत चा बडेजाव राखण्याचा जास्त प्रयत्न होता. वरचेवर सोनाराला बोलावणं जात असे नि गौरीला द्यायच्या दागिन्यांमधे एकेका नव्या दागिन्याची भर पडत असे. ते सारे अलंकार तिजोरीत अगदी नीट ठेवण्यात आले होते. दादासाहेब अगदी जातीने लक्ष ठेवून होते सगळीकडे. साड्या नि दागिने पसंत करायला गौरीला मुलाकडच्यांकडून बोलावणं आलं तेव्हा सरलाताईंनीही तिच्याबरोबर जायचं ठरलं. 'महादू घेऊन जाईल तुम्हा दोघींना. अन तिथून सरळ घरी यायचं. बाकी कुठेही जायची मुळीच आवश्यकता नाही. समजलं ना?...' दादासाहेबांच्या प्रश्नावर दोघींनीही यांत्रिकपणे मान हलवली. नऊवारी साडी नेसून, दोन्ही खांद्यांवर शाल घेऊन गौरी तयार झाली तसं सरलाताईंना जरासं हसूच आलं. 'हे काय ग बाळ? अन आईची साडी काढलीस आज नेसायला?...' पण गौरी गंभीर होती. 'आत्या, माणसाला हवं ते मिळत नसेल, तर आपल्याजवळ आहे ते आवडून घ्यायला शिकावं, असं तूच ना सांगत असतेस मला नेहमी? आता त्या घरात जायचं, तर त्यांच्या पसंतीने वागायला नको?....' पोरीच्या समजूतदारपणाने सरलाताईंचं काळीज आणखीच हेलावलं. दागिने अन कपड्यांची पसंती करून त्या दोघी घरी आल्या. दादासाहेब त्यांची वाटच बघत होते. दोन्ही घरांच्या परिस्थितीत सरलाताईंना वेगळं असं काही वाटलं नाही. उलट इनामदारांकडचे नोकरचाकर त्यांना नि त्यांच्या मुलाला अगदी थरथर कापतात हे लक्षात आलं नि दोघांच्या तापट स्वभावाची खात्री पटली तशा त्या मनातून आणखीच अस्वस्थ झाल्या. रोज दिवसातून दहादा त्या शंभू महादेवाला विनवीत असत. आपल्या विनवणीला आता काहीच अर्थ उरला नाहीय हे समजूनही. गौरीच्या आयुष्याची काळरात्र लवकरच सुरू होणार होती. अन त्याला कोणाचाच इलाज चालणार नव्हता. अशाच एकदा देवासमोर त्या हात जोडून बसल्या असताना महादू तिथे आला. 'द्येवालाच मागनं मागा ताईसायेब...' दादासाहेब आंघोळीला गेल्याची संधी साधून तो हलकेच म्हणाला. 'सारखंच विनवतेय रे बाबा मी. त्याला कधी दया येईल कोण जाणे. का येणारही नाही....' सरलाताईंनी हलकेच डोळे पुसले. 'येनार ताईसायेब. अहो, त्याच्या मनास्नी आलं, तर कायबी हुईल बगा......' महादूच्या डोळ्यात पाणी तरळत होतं. एक सुस्कारा सोडून सरलाताईंनी पुन्हा डोळे मिटून घेतले. आठवड्याभरानं पाहुणे यायला सुरुवात होणार होती. दागदागिने, वस्त्रप्रावरणं सार्याची खरेदी आटोपली होती. आता प्रतिक्षा होती फ़क्त गौरीच्या बळी जाण्याची.... रात्र पडायला सुरुवात झाली तसा सारा वाडा निद्रादेवीच्या स्वागताची तयारी करू लागला. गौरीच्या मनस्थितीत आता जाणवण्यासारखा बदल झाला होता. ती विलक्षण शांत झाली होती. समोर येणारे भोग फ़क्त उघड्या डोळ्यांनी स्वीकारायची तिच्या मनाची जणू तयारीच झाली होती. तिची अवस्था सरलाताईंना बघवत नव्हती. खरंच, जहागिरदार घराण्याच्या लेकीबाळींची आयुष्यं एखाद्या दुर्लक्षित बागेतल्या फ़ुलांसारखीच आहेत....' त्यांना वाटून गेलं. एकदा झाडावरून गळली, की मग ती पायतळी तुडवली जाणार हे नक्कीच. गडद काळ्या रंगाची साधीच सुती साडी नेसलेली गौरी खिडकीबाहेरच्या अंधारात बघत होती. 'आत्या, आईलाही खूप वाईट वाटत असेल ना ग... माझं मनाविरुद्ध लग्न होतंय हे पाहून...?' तिच्या अचानक आलेल्या भावहीन प्रश्नाने सरलाताई चांगल्याच दचकल्या. 'आता काय म्हणावं या पोरीला? कुठून कुठून हे विचार येतात बाळ तुझ्या डोक्यात....' 'नाही आत्या... तूच तर म्हणायचीस ना ग नेहेमी, आपल्या गेलेल्या माणसांचा आत्मा आपलं रक्षण करत असतो म्हणून.... मग ....?' गौरीच्या प्रश्नाला सरलाताईंकडे उत्तर नव्हतं. तिचा हात धरून त्यांनी तिला पलंगावर आणून निजवलं अन हलक्या हाताने त्या तिला थोपटू लागल्या. पहाटेचा पहिला प्रहर असेल, कसलीशी विचित्र स्वप्नं त्यांना पडत होती. मधेच गौरी एका उंच कड्यावरून धडपडत, ठेचकाळत खाली जाताना दिसली त्यांना.... नि सरलाताई त्या धाड धाड आवाजाने खडबडून जाग्या झाल्या. डोक्यापासून पायापर्यंत त्या घामाने भिजल्या होत्या. 'पण.... हा धाड धाड आवाज खरंच येतोय. म्हणजे हे स्वप्न नाही तर...' खोलीच्या खिडकीतून त्या बाहेरच्या चौकात डोकावल्या. 'महादू...कोण....' त्यांचं वाक्य पूर्ण झालंच नाही. 'ताईसायेब, दारं लावून आत बसून र्हावा..... दरोडा.... दरोडा पडतोया वाड्यावर.....खाली येऊ नका ताईसायेब...येऊ नका खाली.....' एव्हाना आवाजानं जागी झालेली, घाबरलेली गौरी खिडकीशी आली होती. तिच्या विस्फ़ारलेल्या डोळ्यांना ते भयंकर दृश्य दिसलंच. तोंडाला काळं फ़डकं बांधलेले दहा बारा दरोडेखोर समोरचा दरवाजा तोडून आत शिरले होते. काहींच्या खांद्यांवर बंदुकाही होत्या..... महादू, आणखी दोन गडी नि दादासाहेबांची एकच बंदूक या सार्यांचा निभाव त्यांच्यासमोर लागणं कठीणच नव्हे, तर अशक्यप्राय होतं. तेवढ्यात दादासाहेबांच्या भरदार आवाजातलं दरडावणं नि त्यांच्या बंदुकीचा बार ऐकू आला नि मग सगळीकडे एकच हलकल्लोळ माजला. त्या धावपळीत विजेच्या वेगानं सरलाताईंच्या मनानं उसळी घेतली. फ़डताळातलं छोटं मखमली पाकीट उचलून त्यांनी गौरीचा हात धरला... 'चल माझ्याबरोबर गौरी...' 'कुठे नेतेस आत्या मला? ...खाली नकोस ना जाऊ आत्या... मला भीती वाटतेय ग...' 'चल, पोरी चल. बोलू नको एक शब्दही......' घाबरून थरथर कापणार्या गौरीला जवळ जवळ ओढतच त्या मागचा जिना उतरल्या. बाहेर कोलाहल नि ओरडणं ऐकू येतच होतं. विहिरीजवळची पहार उचलून त्या गौरीला घेऊन मागच्या दाराशी आल्या. त्यांच्या कृश हातात कुठून एवढी शक्ती आली होती ते कोणास ठाऊक, पण सारं बळ एकवटून ते कुलूप त्यांनी तोडलं. 'जा बाळ.... मागे वळूनसुद्धा बघू नकोस ग.... इथून दहा मिनिटं सरळ धावत जा गौरी. ही झुडपांमागची पायवाट संपली की बस स्टॅंड आहे पोरी. ठाऊकच आहे तुला...शहराकडे जाणारी पहिली बस सुटेलच आत्ता... हे थोडे पैसे असू दे जवळ...सुजयकडे जा...जा लवकर...' हाताने बाहेर ढकललंच त्यांनी गौरीला... 'नाही आत्या....तू...मी तुला सोडून...' 'जा पोरी जा.. ही संधी पुन्हा येणार नाही ग. जा. वहिनीची शपथ आहे तुला...' बंदुकीची एक फ़ैर झडल्याचा आवाज पुन्हा घुमला. भरल्या डोळ्यांनी आत्याकडे बघणार्या गौरीचं पाऊल एक क्षणभरच घुटमळलं.... अन मग विजेच्या वेगाने धावत ती झुडपांमागे अदृश्य झाली. संथ पावलांनी चालत सरलाताई विहिरीजवळ आल्या. निर्विकार मनानं त्यांनी हात जोडले. विहिरीचं काळंभोर पाणी क्षणभर डहुळलं नि पुन्हा पहिल्याप्रमाणेच शांत झालं. .समाप्त.
|
Devdattag
| |
| Thursday, September 13, 2007 - 4:02 pm: |
| 
|
मस्त जमलीये.. .. .. .. ..
|
Chinnu
| |
| Thursday, September 13, 2007 - 5:09 pm: |
| 
|
बापरे सुमॉ! सही जमल्ये Twists & turns!
|
Supermom
| |
| Thursday, September 13, 2007 - 6:32 pm: |
| 
|
धन्स देवदत्त, चिनू. मॉड्स, तो आधीचा भाग या महिन्यात टाकाल का प्लीज?
|
Disha013
| |
| Thursday, September 13, 2007 - 6:40 pm: |
| 
|
काय हे?शेवटी एकदम धक्काबुक्की! गौरीला तिची आत्या पळायला लावणार याचा अंदाज आलेला,पण तो प्रसंग असा असेल असे न्हवते वाटले हं! सही जमलिये......
|
Prajaktad
| |
| Thursday, September 13, 2007 - 6:49 pm: |
| 
|
जबरी जमलिय ही कथा... या आधीची बंदीनी ही खुप आवडली होती.
|
Maanus
| |
| Thursday, September 13, 2007 - 8:45 pm: |
| 
|
चांगल आहे हो... या वरुन एक किस्सा आठवला, थोडाचा comedy आहे म्हणुन सळ्यांच्या प्रतिक्रिया येवुन गेल्यावर लिहीतो.
|
Bhagya
| |
| Friday, September 14, 2007 - 12:24 am: |
| 
|
सुंदर! मस्तच जमलीये... ताईसाहेब!
|
|
|