|
Princess
| |
| Friday, March 23, 2007 - 12:17 pm: |
|
|
स्थळ: पल्लवीचे पाहुण्यानी गजबजलेले घर निमित्त्: अर्थातच आपल्या कथेच्या नायिकेचे म्हणजे पल्लवीचे लग्न शहनाईचे सूर कानावर पडताय. सगळे वातावरण अगदी प्रसन्नतेने भरुन गेलय. सगळ्याच लग्नात असते तशीच इथे पण सगळ्यांची लगबग चाललीये. ते पहा तिथे पल्लवीचे आई बाबा उभे आहेत. काहीतरी महत्वाची चर्चा चाललीये वाटते. पण ते आपण नंतर बघु. अजुन तुम्ही आपल्या नायकाला भेटलात की नाही? तो पाहा तोच सगळे जगच जणु आज आपण जिंकलय असे भाव ज्याच्या चेहर्यावर उमटले आहेत तोच आपला नायक म्हणजे हरीष. आणि पल्लवी आली की नाही अजुन मंडपात. हो हो ती बघा ती येतेय अगदी सलज्ज आणि हुरहुरत्या मनाने. तब्बल पंचवीस हजाराची पैठणी होती तिच्या अंगावर. खरे तर पल्लवीला शरारा हवा होता. तिच्या बर्याच मैत्रिणीनी लग्नात शराराच नेसला होता. पण तिचे सासरचे नाही म्हणाले म्हणे...तिचे सासरे तिच्या बाबाना "आपण मराठी आहोत ना, मग शरारा कशासाठी" असे बोलल्याचे सुद्धा ऐकले मी. बरे ते असो. भरपुर दागिने आणि मेकपने खुलवलेले मुळचे सौंदर्य. तिचा चेहरा मात्र मला वाचता येत नाहीये. थोडा आनंद आणि थोडे दु:ख आहे का चेहर्यावर? आणि डोळे सुजलेत का? की मला भास होतोय? अरे, चला लवकर लवकर... मंगलाष्टके सुरू झालीत."शुभ मंगल सावधान" बोलण्याचा अवकाश आणि हरीशने पटकन वरमाला पल्लवीच्या गळ्यात टाकली सुद्धा. दिवस कसा गेला कळला सुद्धा नाही ना. राहुन राहुन माझ्या मनात येतय, जगातल्या अजुन एका मुलीच्या आयुष्याचे तारु नव्या समुद्रात नव्या नावाड्याच्या हातात गेलय... आता मला जायलाच हवे घरी.मी नाही बघु शकत एका मुलीची आणि आइ वडिलांची ताटातुट. राहुन राहुन मग मला माझेच लग्न आठवायला लागते. आइ बाबा, माझे माहेर, माझी शाळा, माझे सवंगडी. हे काय मी माझ्याबद्दल बोलायला लागली. मी विसरलेच की ही कथा पल्लवीची आहे. पल्लवीची पाठवणी म्हणजे एक मोठाच दु:खदायक प्रसंग असणार आहे. हळवी, कोमल, मनमिळावु, आई बाबांची लाडकी लेक, घरातले पहिलेच लग्न आणि अशा वेळी नेमके ते बॅंडवाले "बाबुलकी दुवाये" गाणे वाजवणार. ते बघा पल्लवीच्या डोळ्यातले अश्रु कसे गालावर ओघळताय.मला निघायलाच हवे आता... पण मी येइन लवकरच पुन्हा.
|
Princess
| |
| Friday, March 23, 2007 - 3:15 pm: |
|
|
आपली पल्लवी सासरी पोहचलीय बरे का आता. आणि आज तर मधुमिलनाची रात्र... धडधाड काहीतरी आदळल्याचा आवाज येतोय. पण हरीषच्या डोळ्यावरची झोप उडत नाहीये. पल्लवी मात्र दचकुन जागी झाली. पटकन पुढे होउन दार उघडणार तर जमिनीवर अस्ताव्यस्त पसरलेली साडी दिसली तिला. ती साडी बघुन डोळ्यात पाणीच दाटुन आले तिच्या. कालपर्यंत आईच नेसवुन द्यायची साडी. बाहेर कोणीतरी जोरात दरवाजावर धडका देत होते. साडी जमेल तशी गुंडाळुन पल्लवीने दरवाजा उघडला. गेले चार पाच दिवस लग्नाच्या गडबडीत तिची नीट झोपच झाली नव्हती. आणि काल तर... पहिली रात्र होती ना... मग कसली आलीये झोप. "महाराणी, आमच्या घरात असले उशिरा उठण्याचे थेर चालणार नाहीत. पहिलाच दिवस आहे म्हणुन आम्हीच उठवले उद्यापासुन ५.३० वाजता उठत जा" सासरे कडाडले. पल्लवी किचनमध्ये सासुबाईच्या शेजारी जाऊन उभी राहिली. काय करावे या विचाराने ती फ़क्त इकडेतिकडे न्याहाळतेय तर सासुबाइनी पुन्हा एकदा माहेराचा उद्धार केला "सुन आल्यावरही चहा मलाच करावा लागणार असे दिसतेय. तरी सांगत होती तुम्हाला मोठ्या घराची मुलगी सून करून आणु नका." "आई मी करते ना चहा. तुम्ही बसा हॉलमध्ये." आता हरीषकडे बघुया... घर्र घर्र घोरतोय मस्त. इकडे पल्लवी सोबत काय होतेय यापासुन अनभिज्ञ... चेहर्यावर अजुनही स्मित दिसतय. म्हणजे स्वारी अजुनही रात्रीच्या आठवणी बघतेय की काय स्वप्नात.
|
छान लिहिले हो पुनम ताई........... लिहित राहा
|
छान वाटलं हं वाचुन................. म्हणजे लग्नानंतरच मुलीचं आयुष्य आणि मुलाचं आयुष्य यातला फरक अचूक टिपलाय.............
|
Princess
| |
| Monday, March 26, 2007 - 5:31 am: |
|
|
बरेच दिवस झालेत मी पल्लवीची काही खबर घेतलीच नाहीये. आज जाउन बघावे जरा. नव्या घरात, नव्या संसारात पल्लवी रुळली असेल एव्हाना. बघता बघता २ महिने झालेत तिच्या लग्नाला. फुलासारखी टवटवीत दिसणारी पल्लवी नव्या संसारात अजुनच फुलली असेल ना... "बाबा, स्नानाचे पाणी काढलेय." हातात सासर्यांचे कपडे आणि टॉवेल घेउन पल्लवी बथरुमपाशी उभी आहे. घरातल्या प्रत्येकाच्या स्नानाची पूर्वतयारी करण्यापासुन सगळ्यांचे डबे भरुन देण्यापर्यंत सगळे काही पल्लवी अगदी मनापासुन करतेय. हरीष आणि त्याच्या बाबांचा लंच बॉक्स देउन पल्लवी लगेच सासुबाईंच्या तयारीला लागली. त्यांची ९.१२ ची लोकल मिस नको व्ह्ययला, या विचारासरशी तिचे दोन हात अजुन जोरात कामाला लागलेत. "आई, हा घ्या डबा." "हे बघ पल्लवी, माळ्यावरचे सामान खाली काढुन घे. सगळा माळा साफ़ कर. आणि वापरात नसलेले डबे पण घासुन टाक आज." एवढे बोलुन सासुबाई घराबाहेर पडल्यात सुद्धा. "काय वो वहिनी, मघाधरन बेल वजवतीये मी. दार कशापायी नाही उघडत तुमी लवकर?" आल्या आल्या अनिताने तोंडाचा पट्टा सुरु केला. अनिता पल्लवीच्या नव्या घरातली मोलकरीण आहे. "अग अनिता ऐकशील तरी की नाही माझे? मी माळ्यावरचे सामान काढत होती उतरायला वेळ लागला जरा." " कितींदा वो माळा साफ़ करणार तुमी? एक दिवसा आड कोनाच्या घरात माळा साफ़ करताना मी नाही बा पाहिलय कधी." अनिताचे मोठे डोळे अजुनच मोठे झाले. पल्लवीला बघुन मला तर आश्चर्यच वाटतय. डोळ्याखाली काळी वर्तुळे आलीयेत. चेहाराही अगदी कोमेजलेला आहे. कोणाला सांगुनही खरे वाटणार नाही की या मुलीचे दोन महिन्या पुर्वीच लग्न झालेय आणि त्यावेळी ती आता दिसतेय तशी दिसत नसे.
|
Princess
| |
| Monday, March 26, 2007 - 7:32 am: |
|
|
मध्यंतरी दोन दिवस पल्लवी माहेरी आली तेव्हा भेटले मी तिला. हरीशबद्दल, त्याच्या घराबद्दल बोलताना किती खुष वाटत होती ती. हरीष कसा तिची काळजी घेतो, सासुबाई कसे तिचे लाड करतात ते सांगताना थकत नव्हती. तिला कदाचित कल्पना नाही, पण तिचा ओढलेला चेहरा सत्य सगळ्या जगाला ओरडुन सांगत होता. अगदी जड मनाने तिच्या आई बाबानी तिला परत पाठवले. तेव्हा घरातल्या सगळ्यांच्या डोळ्यात अश्रु आले होते. बारा तासाचा प्रवास करुन पल्लवी सासरी पोहचली तेव्हा अपेक्षेप्रमाणेच तिचे स्वागत झाले. "माहेरपण चांगलेच मानवलेले दिसतेय. आता जरा अंग झाडुन कामाला लागा. दोन दिवस अनिता येणार नाहीये. सगळी कामे तुलाच करायची आहेत." इति सासुबाई. पल्लवीने अजुन हातातली बॅगही टेकवली नव्हती तर सासुबाईनी कामांचा भडिमार सुरु केला. पल्लवीच्या मागेच उभा असलेला हरीष काही ऐकुच आले नसावे इतक्या निर्विकार चेहर्याने हातातली बॅग हलवत बेडरुमकडे निघुन गेला. "हरीष, मी काय म्हणतेय, ऐकतोस का?" "बोला बाईसाहेब, काय हुकुम आहे?" हरीष तिच्याकडे बघत म्हणाला. "अं अं कशी सुरुवात करू... कदाचित वेडेपणा वाटेल तुला पण मला मनापासुन जे वाटतेय तेच सांगतेय तुला. आता लग्नाला सहा महिने झालेत आपल्या. तक्रार नाही करत पण तुला तर माहितीय ना, तुझ्या आईबाबाना मी केलेली कुठलीही गोष्ट पसंत पडत नाही. मी माझ्या परीने खुप प्रयत्न केला त्यांचे मन जिंकण्याचा. तुला जेव्हा जेव्हा मी याबद्दल सांगितलस तु मला म्हणालास की त्याना वेळ दे." "पल्लवी, उगीच लांबण लावु नकोस. तुला काय सांगायचेय ते लवकर सांग. मला सकाळी ऑफिसला जायचे आहे." त्याच्या या वाक्याने पल्लवी थोडी वरमली. पण आज आपल्या मनातले सगळे काही हरीषला सांगायचेच असे तिने ठरवले होते. "अं अं मला ना... मला असे वाटते की आपण जर थोडे दिवस त्यांच्या पासुन दुर राहिलोत तर... म्हणजे तू जर दुसर्या शहरात नौकरी बघितलीस तर..." "तू काय बोलतेस कळतेय का तुला? या शहरात मी जन्मलो, वाढलो ते तू मला सोडुन जायला सांगतेस? ते शक्य नाही. आज बोललीस ते बोललीस पण पुन्हा हे विचारण्याचे हिम्मत करू नकोस. राहता राहिला आईबाबांचा प्रश्न तर त्यांचा असाच स्वभाव आहे. बदलायला वेळ लागेल त्याना." पल्लवीच्या हमसुन रडण्याचा आवाज येतोय मला. पण शेजारीच हरीष अगदी ढाराढुर झोपलाय. पहाटेच उठुन पल्लवी पुन्हा एकदा जोरात कामाला लागली जणु काल रात्री काही घडलेच नव्हते...
|
Princess
| |
| Monday, March 26, 2007 - 11:38 am: |
|
|
"हरीष, काल वहिनीचा फोन आला होता. मला विचारत होती, लग्नाला सहा महिने झालेत तरी आपण हनिमुनला का नाही गेलोत म्हणुन... आपण जाउया का कुठेतरी?" त्याच्या उत्तराची वाटही न पाहता पल्लवीने आपले बोलणे सुरुच ठेवले "नैनीतालला जाउया किंवा मग मसुरीला नाहीतर मनालीला?" "बघुया पल्लवी. सध्यातरी खुप कठिण दिसतेय. पण तुझी खुपच इच्छा असेल तर जवळपास जाउया कुठेतरी." त्याच्या या उत्तराने ती थोडी नाराज झाली. पण जवळपास तर जवळपास, कुठेतरी जायला मिळणार म्हणुन मनोमन आनंदली. ती आणि हरीष फक्त दोघेच... शरीरापेक्षाही मनाच्या गरजा महत्त्वाच्या असतात. खुप खुप गप्पा मारायच्या, त्याच्या आवडीनिवडी विचारायच्या, आपली स्वप्ने सांगायचीत असे खुप काही मनात आले तिच्या. सहा महिने झालेत पण कधी एकमेकांशी मन भरुन बोलणे झालेच नाही. ती इच्छा आता पुर्ण करायची होती पल्लवीला. "पल्लवी, आपण या वीकेंडला महाबळेश्वरला जाउया. ओके?" त्याच्या या प्रश्नावर पल्लवी खुदकन हसली. " पण पल्लवी... एक सांगायचेय तुला, तु आईबाबाना यातले काहीही कळु देउन नकोस. मी त्याना सांगणार आहे की आपण मित्राच्या लग्नाला जातोय." "पण हरीष, असे खोटे... आणि त्याना कळले तर..." तिचा प्रश्न पुर्ण होण्या आधीच त्याने तिला जवळ ओढले " प्यार और जंग मे सब जायाज है, समजले का जानु?" मनातुन घाबरलेली पण तरीही खुप खुष होती पल्लवी. कधी एकदा शनिवार उजाडतोय असे झाले होते तिला. हरीषच्या खांद्यावर डोके ठेउन पल्लवी विचार करत होती."हरीष, किती पटकन गेलेत न हे दोन दिवस." "पण तुला छान वाटले ना?" हरीषने विचारले. "हो तर, खुप छान वाटले. पण आता भिती वाटतेय, घरी कळले तर नसेल ना.." "नाही ग वेडाबाई. कोण सांगणार आहे घरी जाउन की आपण महाबळेश्वरला गेलो होतो म्हणुन." "आलात हनीमून करून. पल्लवी, माझ्या लेकाला तोडलस माझ्या पासुन. खोटे बोलायला लावलस." हरीषचे आई बाबा डोळ्यातुन अंगार ओकत होते. "आणि तुला काय वाट्ले, आम्हाला कळणार नाही, होय? तुझ्या सगळ्या मित्राना फोन केला मी आणि विचारले की कोणाचे लग्न आहे म्हणुन. पण सुरेश बोलला की तु महाबळेश्वरला जाणार होतास." एका क्षणासाठी पल्लवीला वाटले सीतेसारखे मलाही धरणीने आत घ्यावे. हरीषला मात्र त्याने केलेल्या एका छोट्या चुकीचा मनोमन पश्चाताप होत होता आणि आइबाबांच्या वागण्याचे आश्चर्य सुद्धा वाटत होते.
|
Disha013
| |
| Monday, March 26, 2007 - 8:52 pm: |
|
|
छान लिहितेयस हं. आता हरीष काय करतो ते बघायचं.
|
Sneha21
| |
| Tuesday, March 27, 2007 - 4:30 am: |
|
|
छान...प्लिज लवकर लिहा ना पुढे
|
Princess
| |
| Tuesday, March 27, 2007 - 6:11 am: |
|
|
"आइ, बाबा चुकले माझे... मला माफ करा. मी पुन्हा अशी चुक करणार नाही." हरीष कळवळुन आईला सांगत होता. "जे झाले ते झाले. त्यात तुझी काही चुक नाही. तुला तिनेच उकसवले असेल. आता यापुढे तिला बाहेर घेउन जाणे बंद. समजले?" हरीषच्या वडिलानी त्याला कडक शब्दात सांगितले. "पण मी काय म्हणतेय, आपला लेक माफी तरी मागतोय. आणि जिने चुक केलीय ती समोरही येत नाहीये. तुम्ही तिला आताच्या आता माझी माफी मागायला लावा नाहीतर मी अन्नाचा एक कण घेणार नाही." सासुबाईनी असे बजावल्याबरोबर हरीष आत गेला. "पल्लवी, मला माहितीय आपली काही एक चुक नाही. पण ती जुनी माणसे... आपल्यालाच बदलायला हवे. माझ्यासाठी त्यांची माफी माग प्लीज." "आई, बाबा मला माफ करा. चुक माझीच होती." एवढे बोलुन पल्लवीने अश्रुना वाट मोकळी करुन दिली. "बरे बरे आता उगीच रडुन दाखवु नकोस आम्हाला. यापुढे खोटे बोलताना दोनदा विचार कर आणि हो, आजपासुन तुझे बाहेर जाणे बंद." "वहिनी, काय वो डोळे एवडे लाल कशापायी झालेत आज? रात्रीच्या झोपत नाही की काय?" अनिता खट्याळ हसुन विचारत होती. पल्लवीने काहीच उत्तर दिले नाही तेव्हा ती पल्लवीजवळ येउन उभी राहिली आणि म्हणाली "वयनी, काहीतरी सोक्ष मोक्ष लावुन टाका बघा. इतका त्रास काढणे बरे नाही. तुमी सांगत नसलात तरी समजते मला... जनावर आहेत सगळी तुमच्या आजुबाजुला" "हरीष, मला एक मस्त idea आलीये. आपण जर लवकर बाळ होउ दिले तर... तर कदाचित सगळी परिस्थिती बदलेल ना..." पल्लवीचे डोळे तिच्याच कल्पनेने चमकत होते. "पल्लवी, मला इतक्यात बाळाची जबाबदारी नकोय. तुला मी बोललो होतो ना महाबळेश्वरला की मॅनजर होण्याचे माझे स्वप्न आहे. आणि ते लवकरच पुर्ण होइल असे वटतय. मग बघुया." "जर तुझे स्वप्न लवकरच पुर्ण होणार असेल तर आता चान्स घ्यायला काय हरकत आहे? सगळे जग बदलुन जाईल बघ. तुझ्या आईबाबाना पण आनंद होइल खुप... आणि ते नक्की बदलतील, बघ..." "ठीक आहे पल्लवी. जर तुला असे वाटत असेल तर माझी काही हरकत नाही."
|
Princess
| |
| Tuesday, March 27, 2007 - 6:24 am: |
|
|
दिवसामागुन दिवस गेलेत. माझी आणि पल्लवीच्या भेटी कमी होत गेल्या. आज खुप दिवसानी मी तिला भेटणार आहे. आणि आजच्या भेटीला एक खास कारण आहे. पल्लवी आई होणार आहे... तशी ही बातमी कळुन काहीच दिवस झालेत त्यामुळे पल्लवीला बघता क्षणी तसे काही जाणवलेच नाही. उलट तिची तब्ब्येत अधिकच खालावल्यासारखी वाटली. कदाचित morning sickness मुळे तिला अशक्तपणा आला असेल असेच मला वाटले. आणि काही दिवसानी ती अगदी टवटवीत होईल या अपेक्षेने मी तिचा निरोप घेतला. "हरीष, आज जरा लवकर येशील का ऑफिसमधुन? डॉक्टरकडे जायचे आहे." हरीषच्या स्मितहास्यातुनच पल्लवीला उत्तर मिळाले. हरीष तर या बातमीने खुप सुखावला होता. पल्लवीला खुप खुष ठेवण्याचा प्रयत्न करत होता. "कुठे निघालात?" सासर्यांच्या या प्रश्नावर पल्लवीने हरीषकडे पाहिले. "जरा डॉक्टरकडे जाउन येतो. हिचे चेकप आहे आज." त्याचा कातर आवाज पल्लवीला जाणवला. "काही गरज नाही डॉक्टरकडे जाण्याची. तीन तीन पोरे जन्माला घातलीत मी. आम्ही नाही असली काही नाटके केलीत. तिने सांगितले आणि तू लगेच बैलासारखा मान डोलावत निघालास तिच्यामागे, काय रे?" आईच्या या प्रश्नावर काय बोलावे या विचारात हरीष तसाच उभा राहिला. "आता अशी बघत उभी राहणार आहेस का आमच्याकडे? असे महिन्या महिन्याला डॉक्टरकडे मुळीच जायचे नाही, समजले?" न राहावुन पल्लवीच्या डोळ्यातुन एक अश्रु ओघळलाच. "अरे देवा, पाहिलत का तुम्ही? आता वडीलकीच्या नात्याने काही सांगण्याची सुद्धा सोय राहिली नाही. राजकुमारी लगेच घळाघळा रडतेय. माझे मेलीचे नशीबच खोटे. सुनेला जवळचे समजुन काही सांगायला गेली तर..." एवढे बोलुन पल्लवीची सासु अगदी मोठ्या आवाजात रडायला लागली. ते पाहुन चिडलेल्या सासर्यानी, कोणाला काही कळण्याच्या आत पल्लवीच्या कानाखाली थाडकन थप्पड मारली.
|
Jhuluuk
| |
| Tuesday, March 27, 2007 - 9:41 am: |
|
|
आई गं! भयंकर आहे पल्लवीची हालत!! बाकि कथेची धाटणी छान मांडतेयस प्रिन्सेस... i hope शेवट चांगला असेल...
|
Princess
| |
| Tuesday, March 27, 2007 - 12:12 pm: |
|
|
"वहिनी, कितींदा वो तुमाला सांगायचे. आता दोन जीवांच्या तुमी. असे सारखे वर चढत जाऊ नका. जास्ती काम करु नका आणि जरा चांगले खावा पिवा टणटणीत लेकरु येइल मग." माळा साफ करायला वर चढलेल्या पल्लवीला हात देउन अनिताने खाली उतरवले. तिच्या या बोलण्यावर पल्लवी फक्त खिन्नशी हसली. "पल्लवी, उद्या मला सकाळी लवकरच जायचे आहे. दुपारी माझ्या ऑफिसच्या काही मैत्रिणी तुला भेटायला येणार आहेत. जरा सगळ्या रुमचे फॅन साफ करुन घे." सासुबाईनी आज्ञा दिली. सकाळी सगळ्यांचा डबा हाती देउन झाल्यावर पल्लवी पुन्हा कामाला लागली. दुपारी आइंच्या मैत्रिणी येणार, काय बनवावे बरे त्यांच्यासाठी, हा विचार मनात करत करत तिने बरीचशी साफ़ सफ़ाई आटोपली. "कोण आहे?" देसाई काकुनी दरवाजाच्या बारिक फटीतुन विचारले. " मी आहे वो अनिता. तुमच्या शेजारचे काही सांगुन गेलेत का तुमाला?" "नाही काही सांगुन गेले नाहीत." "किती वेळ झाला बेल वाजवतीया. कुणी दारच उघडत नाही बघा." "माझ्याकडे एक चावी आहे त्यांच्या घराची. तू काम करुन परत आणुन दे मला. ते घरी आलेत की सांगेन मी त्यांना." "काकु वो काकु बगा तर वहिनी बेशुध पडल्यात इथे." अनिताच्या ओरडण्याने देसाई काका काकु धावतच आलेत. पाहिले तर पल्लवी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. जवळच स्टुलही आडवे पडले होते. कदाचित ती त्यावरुनच खाली पडली होती. हरीषला काहीच कळत नव्हते. सुन्न मनाने तो हॉस्पिटलच्या पोर्चमध्ये फेर्या मारत होता. डॉक्टर मेहतांचा आवाज त्यांच्या रुमच्या बाहेर ऐकु येत होता."सिस्टर मेक द ओटी रेडी. कॉल डॉक्टर करुणा ऑल्सो. वी मे नीड हर हेल्प." "मिस्टर हरीष, तुम्ही ताबडतोब सर्व पेपर्स वर सही करा. तुमच्या पत्नीचे ऑपरेशन करावे लागणार आहे. आणि लवकरात लवकर रक्ताची व्यवस्था करा." हॉस्पिटल मध्ये गेले तेव्हा हरीषच्या डोळ्यातली अपराधी भावना लगेच दिसली होती मला. सासु सासर्यांच्या डोळ्यात मात्र एक अनामिक भिती दाटुन आली होती.
|
Princess
| |
| Wednesday, March 28, 2007 - 4:52 am: |
|
|
"हाऊ आर यु मिसेस चौधरी?" पल्लवीच्या डोक्यावर हात ठेवुन डॉक्टर मेहतानी विचारले. या प्रश्नाच्या उत्तरादाखल एक अस्फुट हुंदका फक्त पल्लवीच्या तोंडातुन बाहेर पडला. आलिशान हॉस्पिटलच्या त्या एसी रुममध्ये खुप लोक जमले होते पल्लवी भोवती. आईवडिल, सासुसासरे, हरीष, देसाई काकु, काही नातेवाईक आणि अनिता सुद्धा. तिला रडताना पाहुन डॉक्टरानी तिच्या पाठीवर हलकेच हात फिरवला. "लूक माय चाईल्ड, मला समजु शकतेय तुला किती मोठा धक्का पोहचलाय. पण तु रडल्याने गेलेला परत येणार आहे का? आणि मी तर म्हणेन जो या जगात आलाच नाही त्यासाठी रडु नकोस." डॉक्टर उठुन उभे राहिलेत आणि त्यानी हरीषकडे वळुन सांगितले " बघा मिस्टर चौधरी, पल्लवीला आता दोन महिने कंप्लीट बेडरेस्टची गरज आहे. अजुन एक म्हणजे तिला आता किमान दोन वर्षे तरी आई होता येणार नाही." "डॉक्टर, होता येणार नाही असे नाही. मी स्वत:च एका नामर्दाची मुले जन्माला घालणार नाही. हरीष, मुल गमावल्याचे दु:ख तुला काय समजणार. पण मी खुष आहे तुमच्या सारख्या वाईट लोकांचा वंश वाढवण्याचे पातक माझ्या हातुन आता घडणार नाही. सात फेरे घेताना पत्नीच्या रक्षणाची जबाबदारी घेतात ना तुम्ही पुरुष...मग घरातल्या अन्यायाविरुद्ध का डोळे मिटुन घेतात? बायकोला उघडपणे खरे सांगुन फिरायला सुद्धा न नेउ शकणारा नवरा नकोय मला...केवळ बेडरुमच्या बंद दरवाज्या आड बायकोला खुष ठेवले तर जबाबदारी संपते नवर्याची? सांग माझे काय चुकले? तुझ्या सारख्या भेकड माणसावर प्रेम केले, हेच चुकले माझे..." "शांत व्हा मिसेस चौधरी. सिस्टर, एक झोपेचे इन्जेक्शन आणा लवकर." "प्लीज डॉक्टर आज बोलु द्या मला. आणि बाबा तुम्ही... थप्पड मारली होतीत ना. मला वाटले माझे येणारे मुल खुप आनंद घेउन येइल पण नाही... बायकोच्या एका इशार्यावर तुम्ही वाट्टेल ते करायला तयार असतात मग तुमच्या मुलाने बायकोचे काहीच ऐकु नये असे का वाटते तुम्हाला?" "आणि आई, जे तुम्ही माझ्याशी वागलात तसे कुणी तुमच्या मुलींशी वागले तर? आठवुन बघा जे तुम्ही माझ्यासोबत केले ते योग्य होते का? मुलावर एवढेच प्रेम असते तर मग लग्न तरी का करुन द्यायचे? मोठ्या घराची सुन करुन आणल्याचा वारंवार पश्चाताप व्ह्यायचा ना तुम्हाला? कधी माझ्या बाजुने विचार केलात का? मोठ्या बंगल्यात राहिलेली मी तुमच्या छोट्याशा घरात सामावुन जाण्यासाठी किती प्रयत्न करत होती... पण तुम्हाला मी कधी आपलीशी वाटलीच नाही...लग्नाच्या आदल्या दिवशी माझ्या आई वडिलाना तुमच्या स्वभावा बद्दल कळले होते. मी लग्नाला नकार द्यावा म्हणुन सगळ्यानी मला खुप समजावले. पण समाजाची भिती वाटली मला... या निर्बुद्ध समाजाची. "मी सर्वांचे मन जिंकुन घेइल" या आत्मविश्वासाने मी नव्या घरात पाऊल ठेवले. पण केवळ प्रेमाने जग जिंकता येत नाही, हे कळले मला" एवढे बोलतानाच पल्लवीला धाप लागली. "सिस्टर, इंजेक्शन आणा लवकर." डॉ.मेहतानी इंजेक्शन देण्या अगोदरच पल्लवीचे शरीर निळे पडायला लागले. अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नाना यश आले नाही. "आय एम सॉरी. शी इज नो मोअर" असे बोलुन डॉक्टर मेहता बाहेर पडले. आपल्या सगळ्यांसाठी कितीतरी प्रश्न सोडुन... अजुन किती वर्षे सुनानी नाते जोडुन ठेवण्यासाठी प्रयत्न करायचेत? लग्न होणार्या मुलीला जसे "जुळवुन घे" सांगितले जाते तसे तिच्या नवर्याला किंवा सासुला का सांगितले जात नाही? पल्लवी तुझ्या सारख्या शिकलेल्या मुलीने सुद्धा अन्यायविरुद्ध आवाज उठवु नये याचेच नवल वाटतेय मला. येणारे चिमुकले मुल जग बदलेल हा आशावाद का ठेवायचा? आपले जग बदलायचे असेल तर ते फक्त आपणच बदलु शकतो... अजुन कुणी नाही" समाप्त.
|
Psg
| |
| Wednesday, March 28, 2007 - 5:00 am: |
|
|
आपले जग बदलायचे असेल तर ते फक्त आपणच बदलु शकतो... अजुन कुणी नाही.. ह्म्म पटलं
|
Zakasrao
| |
| Wednesday, March 28, 2007 - 5:44 am: |
|
|
पल्लवीने तिच्या आई वडीलाना सांगुन त्या घरातुन बाहेर पडायला हवे होते. पण नवर्यावर विश्वास असल्यामुळे पडली नाही. आता काहीजण म्हणतील तसे सासु सासरे असतात का? हो. मी माझ्या डोळ्यानी पाहिलय. असे नीच लोक असतात जगात. फ़क्त एकच फ़रक की मी पाहिलेल्या पल्लवीला तीचा नवरा साथ देत नसल्यामुळे तिच्या आई वडलानी परत आणले होते. खुप संताप आला होता ज्यावेळी मला हे कळाले. पण काय करु शकत होतो? एका मुलीच आयुष्य वार्यावर सोडल त्या लोकानी. मला ही कथा वाचताना त्या मुलीचा चेहरा समोर येत होता.
|
Princess
| |
| Wednesday, March 28, 2007 - 6:59 am: |
|
|
धन्यवाद गणेश, धुमशान, दिशा स्नेहा, झुळुक, पूनम आणि झकासराव... झकास, ही सुद्धा सत्यकथाच आहे. मी पण असे नीच लोक पाहिलेत... पण आपण त्यांच्या विरोधात काहीच करु शकत नाही ही एक बोच राहतेच मनात. विशेष म्हणजे पल्लवी एक उच्चशिक्षित, श्रीमंत घरातली मुलगी होती. जर शिकलेल्या मुली सुद्धा असे विचार करतात तर अशिक्षित मुलीनी, गरीब घरातल्या मुलीनी काय करावे? no wonder, many of them are killed even in this era.
|
पूनम छान लिहीलीयस गं. का असे सहन करत रहातात या मुली? नवर्याला अगदी जीव ओतून साथ द्यावी. पण त्यानंही खंबीरपणे उभं रहायला हवं ना तिच्याशेजारी. एक सहज आठवलं म्हणून सांगते आमच्या क्लासमधे एकदा सिंधुताई सकपाळ नावाच्या आदिवासी बाईन्चं भाषण झालं होतं. त्यात त्यांनी सांगितलेलं. नवरा त्रास नव्हता देत पण सासरचे इतर लोक खूप त्रास द्यायचे. तर त्यांनी नवर्याला सांगितलं की जर तू सोडून इतर कुणी बोट जरी लावलं तरी तू विरोध केला पाहिजेस मग तू माझा जीव घेतलास तरी तो तुझा हक्क आहे.
|
Jayavi
| |
| Wednesday, March 28, 2007 - 12:28 pm: |
|
|
बाप रे....... किती भयानक....! हा असा आपला समाज..आणि अशी दुष्ट माणसं..! Horrible! विदारक सत्य खूप छान उतरवलं आहेस गं!
|
Chinnu
| |
| Wednesday, March 28, 2007 - 1:24 pm: |
|
|
पुनम, शब्द नाहियेत गं. मन सुन्न झालय. अजुनही अशी लोकं अस्तित्वात आहेत, याची जाणीव होउन मन सुन्न होतं. मांडणी व्यवस्थित आहे. लिहीत जा.
|
|
|