Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 20, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » चैत्र » कथा कादंबरी » अघटित ! » Archive through March 20, 2007 « Previous Next »

Rahulphatak
Monday, March 19, 2007 - 7:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



अघटित !




“Love people, Use things. Not vice versa !” - Kelly Ann Rothaus


माणसांवर प्रेम करा.

वस्तू वापरा.

माणसांना वापरू नका.

***



राजेशचा मूड आजकाल सकाळी सकाळी बिघडलेला असायचा.. तसाच आजही होता.

तो चेहरा आक्रसून जवळजवळ दातओठ खात त्याच्या कॉटलगतच्या भिंतीकडे बघत होता. त्या भिंतीवरच ते घडयाळ होतं..

राजेश जितका चिडला होता तितक्याच शांतपणे भिंतीवरचे ते घड्याळ वेळ दाखवत होतं..

त्याचे निरस, निष्प्राण तास नि मिनिट काटे.. संथ लयीत काम करणारा सेकंद काटा.. त्याचा टिक टिक आवाज… तो आवाज शांत वेळी रुममधे स्पष्ट ऐकू यायचा, मोठा वाटायचा. …

टिक टिक टिक टिक.. आवर्तन चालूच होती..

साडेसात ! ठण्ण…

का होतात रोज साडेसात? होतात तर होतात हे घड्याळ का दाखवतं बरोबर वेळ?

राजेशची लोखंडी कॉट होती, तिच्यालगतच्या भिंतीवर चार एक फुटावर एक आडवी फळी ठोकलेली होती.. त्यावर काही फुटकळ सामान. आणि मग वर अजून दोन फुटावर ते जुनाट घड्याळ !

त्याने रुम भाड्याने घेतली तेव्हा जुजबी फर्निचरशिवाय फक्त हे घड्याळ होतं तिथं. अर्थातच घरमालकाच्या दृष्टीने अगदीच टाकाऊ.. शून्य किंमत असलेलं. असून नसल्यासारखं.. म्हणूनच त्याने काढून नेलं नव्हतं बहुतेक.

ते अजूनही मागे पडत नव्हतं म्हणून टाकून दिलं नव्हतं एव्हढच. बरं एखादा सुंदर नमुना असता तर ऍंटीक पीस म्हणून तरी किंमत आली असती कदाचित, पण हे होतं अगदीच मामुली.. त्यावर कसलीही कलाकुसर नाही कि रंगसंगती नाही. अगदी रेल्वे प्लॅटफॊर्मवरच्या घडयाळासारखं दिसणारं. पांढऱ्या वर्तुळावर काळे बोजड आकडे नि भाल्यांचे पाते वाटावेत असे मोठे काटे…

पण त्या घड्याळाचा निर्जीव शांतपणा राजेशला आवडायचा नाही. आपली कंटाळवाणी नोकरी, तिथे वेळेवर पोचताना होणारी तारांबळ, ऑफिसमधल मलूल वातावरण नि राजकारण.. वेळापत्रकात अडकलेलं आपल आयुष्य.. आहे ह्या मद्दड घड्याळाला ह्याचं काही ?

ते आपलं रोज खिजवतयं आपल्याला ‘उठ ! आवर भराभर. साडेसात झाले. चल.. हात उचल.. आठ दहाला डबा भरून तयार नसेल तर गेली आठ सव्वीस ची लोकल !’ मग मजेत ते घड्याळ त्याची कसरत बघत बसायच.. म्हणजे राजेशला तरी असं वाटायचं की त्याच्या असहाय्यतेची, मजबूरीची हे घड्याळ मजा बघतयं.. एखाद्या गुलामाला भाले टोचून त्याला पुन्हा एखाद्या अतिश्रमाच्या कामावर लावाव तसं ते घड्याळ आपले काटे टोचून टोचून आपल्याला हैराण करतं आहे अस त्याला वाटायचं !

आजही राजेश आपल्या भकास आयुष्यावर चरफडला.. गादीत उठून बसल्यावरही त्याने पुन्हा वर घड्याळाकडे बघितलं… पुन्हा एकदा सगळी त्या घड्याळाचीच चूक असल्यासारखा, काहितरी पुटपुटत पांघरूण बाजूला भिरकावून तो उठला..


***



त्याच दिवशी दुपारी..

एका पॊश एरियातली एक इमारत. तळमजल्याला जाड काचेचं दार असलेलं ऑफिस. आत थंडगार वातावरण. बाहेरच्या उन्हाच्या झळा, रहदारी, गर्दी ह्यापासून सुरक्षित नि अलिप्त.

त्या थंड वातावरणात गुबगुबीत खुर्चीत आपला सुटलेला अवाढव्य देह कोंबून एक माणूस बसला होता. त्याने लावलेल्या महागड्या सेंटचा उग्र वास त्या कृत्रीम थंडीत मिसळत होता… त्याने घातला होता तो ढगळ केशरी कलरचा भडक शर्ट, जेमतेम त्याच्या पोटाचा घेर झाकू शकत होता.

पुन्हा एकदा त्याने फोन टेबलावर आपटलान आणि एक शिवी हासडलीन.. गेल्या एका मिनिटात तिसऱ्यांदा अस होत होतं बहुतेक..

त्याच्या समोर टेबलापलिकडे बसलेला माणूस हसून म्हणाला
“अरे केसव भाई, कायको अश्रफ का गुस्सा फोन पे निकालता है. पैसे तर त्याला द्यावेच लागतात ना.. “

“इसकी तो.. साला चालीस हज्जार चा फोन चालत नाही. रेंजच येत नाही. हे बघ.. बघ ! आता अश्रफचा फोन आला तर त्याला वाटेल मी मुद्दाम कट करतोय..”

“केसव अरे रेंज नाही तर फोनची मिस्टेक काय त्यात ? वो कंपनी को बोलो ना..”

तेव्हढ्यात मोबाईल वाजतो. कुठ्ल्यातरी नवीन पिक्चरमधलं सवंग आयटम सॊंग रिंगटोन म्हणून वाजू लागतं. त्या लहान ऑफिसमधे तो आवाज खूपच मोठा वाटतो.

पण मोबाईल हातात असलेला माणूस उत्तर देणार एव्हढ्यात फोन बंद पडतो.

पुन्हा एकदा तो माणूस चरफडतो. चिडून अजून दोन चार वेळा फोन आपटतो. त्या फोनच्या कडा आपटून आपटून घासल्या गेल्या आहेत.. कोपऱ्यावरचे रंगाचे कोटींगही निघाले आहे. पण त्या माणसाला त्याची विशेष पर्वा नाही.

‘xxx की. अब गया मै ! आता अश्रफचा मगज सरकला असणार.. मीच त्याला सांगितल होतं की मी कदाचित ऑफिसमधे नसेन तर लेंड लाईन मधे नको, मोबाईलवरच कर फोन..”

हताश होऊन तो मोबाईल पुन्हा जोरात आपटतो आणि टेबलावर भिरकावतो.

त्या फोनच्या सुंदर मॊडेलची आपटून आपटून काहीशी रया गेली आहे. तो मोबाईल बिचारा निपचित पडून रहातो. पुन्हा उचलून आपटले जाण्याची वाट पहात..

त्या दोघांचे संभाषण चालूच रहाते.


***



तर काय सांगत होतो ? हं… त्या छान वाक्याबद्दल. Love people and Use things..

तुम्हाला आवडतात अशी वाक्य ? बऱ्याच लोकाना आवडतात ! मग लक्षात टेवून अशी वाक्य ते डायरीत टिपून ठेवतात. कधी सहज उघडून वाचण्यासाठी. शिवाय एखाद वेळी एखाद्या विशेष संभाषणात अशी वाक्य मिसळायला छानच वाटतं.
काहीना अशी वाक्य नुसती वाचून, लिहूनही समाधान वाटतं एक प्रकारचं. माणूस म्हणून आपली वाढ झाली आहे, एक प्रकारची परिपक्वता आली आहे.. असच काहितरी.


***



राजेश त्याच्या रुमवर एकटाच राहतो. म्हणजे आईवडील सोलापूरला असतात. कुणी रुममेटही नाही. आणि त्याच्या रागीट स्वभावामुळे बरोबर कुणी टिकणं शक्यही नव्हतं.. शिक्षण चालू असताना हॊस्टेलवर रहात असताना त्याच्याच लक्षात आलं होतं की आपलं सहज कुणाशी पटणार नाही. त्यामुळे पैसे वाचण्याची शक्यता असूनही त्याने भाड्याची रुम शेअर करण्याविषयी विचार केला नव्हता.

आपण चिडचिड करतो म्हणून एकटं रहाव लागतयं, का एकटं रहातोय म्हणून जास्तच चिडचिड करतो हे कधीकधी त्यालाच कळेनासं व्ह्यायच !

एकटाच रहात असल्याने बोलायला कुणी नाही. कोणाशी बोलणार ? रुमवर भकास शांतता. फक्त डोक्यावर ते घड्याळ आणि त्याची ती अव्याहतपणे चाललेली टिकटिक !

सालं अस जुनाट दिसलं तरी कधीच बिघडत नाही ते घड्याळ ! कधीच नाही ! सतत आपलं टिक टिक. टिक. टिक…

सकाळी ऑफीसला जायच्या घाईच्या वेळेस तीच टिक टिक.. रात्री थकून परत आल्यावर पुन्हा तीच ती निर्जीव टिक टिक..

आपण कितीही धुसफुसलो, कितीही चिडून बोललो तरी घड्याळ्याचे आपले टिक टिक करणे चालूच आहे.. त्याच संथ गतीने. एखादा माणूस असता तर आपलं काम थांबवून आपल्या बोलण्यावर काहीतरी प्रतिक्रिया दिली असती, अगदी उलट चिडून बोलला असता तो माणूस तरी परवडल असतं.. पण हे घड्याळ नको.

मालकाचं नसतं तर उचकटून फेकून दिलं असतन त्याने ते घड्याळ !

त्याच दिवशी रात्री तो परत आला.. त्याचं डोक पार उठलं होतं ऑफिसमधल्या कटकटीनी..

जेवून कॉटवर अंग टाकल्यावर त्या घड्याळ्याच्या टिकटिकीने हैराण झाला अगदी..

आणि मग एखाद्या भ्रमिष्टासारखा त्या घड्याळाला बोलू लागला तो.. एखाद्या माणसाशी भांडावे तसे.. अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहिली त्याने.. आणि मग एकदम त्याने म्हटले… अगदी निश्चयपूर्वक :

“बास ! आता फार झालं.. उद्या सकाळी उचकटून फेकून देतो तुला.. पार गच्चीवर जाऊन खाली टाकतो.. तिच्यायला.. दिवसरात्र टिकटिक.. टिकटिक..”

आणि एकच सेकंद ते घड्याळ थबकल्याचा त्याला भास झाला.. अर्थातच भासच ! कारण धमकीने काळजाचा ठोका चुकायला ते घड्याळ काही जिवंत नव्हतं.

असच काहीसं बरळत राजेश केव्हा तरी झोपून गेला.

तो झोपला तरी घड्याळाचं काम चालूच होतं.

टिक टिक.. टिक टिक..


***



त्याच दिवशी रात्री उशिरा …

मुंबई असली तरी दोन वाजलेले असल्याने बऱ्यापैकी शांतता.

एका आलिशान फ्लॅटची लिव्हींग रूम.. मंद चंद्रप्रकाश आत झिरपतो आहे. काचेच्या मोठ्या सेंटर टेबलवर पडलेला मोबाईल. नवीन मॊडेल आहे पण त्याच्या कडांचा रंग काहीसा घासला गेला आहे. रात्रीच्या शांततेत तो मोबाईल एकदम किंचाळून वाजल्यासारखा वाजू लागतो.
तेच ते आयटम सॊंग ! तोच रिंगटोन ! रात्रीच्या शांततेत तो अजूनच कर्कश वाटतो.

काही सेकंद जातात..

एक खूप जाडसा मनुष्य अडखळत लिव्हींग रुम मधे येतो. त्याच्या भरलेल्या पोत्यासारख्या दिसणाऱ्या देहावर ताणला गेलेला टीशर्ट आहे नि खाली शॊर्टस आहे. त्याच्या गरगरीत फुगलेल्या पोटापर्यंत आलेली गळ्यातली सोन्याची जाड साखळी अंधारात चमकते.

तो काहीसा अडखळत चालतोय. तो अर्धा झोपेत आहे आणि अर्धा नशेत.

मोबाईल किंचाळतोच आहे.

त्या आवाजाने तो माणूस थोडा अजून जागा होत मोबाईलपर्यंत पोचतो आणि एकदम त्याला धडधडायला लागतं…

अश्रफचा फोन असेल ?

तो नंबर बघतो.. आश्चर्य म्हणजे कुठलाच नंबर नाहीये.. नुसताच फोन वाजतोय.

तो थरथरत्या हाताने फोन उचलतो.

‘हालो’ तो कापऱ्या आवाजात म्हणतो.

‘केशव भगनानी !’

तो आवाज ऐकल्यावर भगनानी एकदम दचकतो. हा अश्रफचा आवाज नाही. त्याच्या गॅंगमधल्या कुणाचाही नाही. हा माणसाचा वाटतच नाहीये आवाज.. पण फार खतरनाक आहे ! जणू मृत्यूचाच आवाज !

पण तरीही… तरीही आपल्या ओळखीचा का वाटतोय ?

‘क.. कोण?’ भगनानीच्या तोंडाला कोरड पडलीये.

आता छातीवर मणाचं ओझं ठेवल्यासारखं दडपण आलय !

“मी बोलतोय !

कोण बोलतय ते कळत नाहीये.. पण तरीही कळतयं.. भगनानीला छातीत एकदम कळ आल्यासारखं होतं. हा.. आपल्या मोबाईलचा आवाज आहे ? नो ! नॊट पॊसिबल !

हा आपला फक्त भास आहे. एक भयंकर भास.

तो छातीवर डाव्या बाजूला हात दाबतो..

“आता तू पुन्हा मला कधीच आपटू शकणार नाहीस..”

आपण बरोबर ऐकल का ते भगनानीला कळत नाही. पण छातीतली कळ वाढतच जाते आणि हळूहळू तो खाली कोसळतो.


***



.. तर आपण बोलत होतो त्या वाक्याबद्दल !

ह्या वाक्यातला साधा संदेश अर्थ एव्हढाच की माणसांवर प्रेम करायच असत. त्याना स्नेह, आदर, ममता, मित्रत्व अशा सुंदर भावनांनी जोडायच असत..

सुखाची आणि यशाची नवनवीन शिखरं गाठायला एखाद्या शिडीसारखी वापरायची नसतात माणसं !

कारण माणसं म्हणजे काही वस्तू नाहीत ! वापरायला नि वापरून फेकून द्यायला !

ती आहेत जिवंत, हाडामासाची, भावभावना असलेली माणसं !

.. आणि वस्तू ? वस्तूंचं काय ?

वस्तूंचं काय ??? फक्त वापरायच्या.. बिघडल्या तर दुरुस्त करायचा प्रयत्न करायचा.. ते शक्य नसेल तर सरळ फेकून द्यायच्या.. आणि त्या जागी नवीन वस्तू आणायच्या ! ..कदाचित अजूनच उपयोगी आणि वापरायला सोप्या.

फारतर एखाद-दुसरी वस्तू जपून ठेवायची. एखाद्या आपल्या माणसाची किन्वा एखाद्या भेट दिलेल्या ठिकाणची आठवण म्हणून म्हणा … किंवा आपल्याच भूतकाळाच्या स्मृती कधी जागवाव्याश्या वाटल्या तर काहीतरी असावे म्हणून सांभाळलेल्या वस्तू ..

बास ! एव्ह्ढाच काय तो अपवाद !


***



इन्स्पेक्टर मानकामे समोर असलेली कागदपत्रं पहात होते. पंचनामा, पोस्ट मार्टेम रिपोर्टस वगैरे. त्यांच्या दहा वर्षांच्या अनुभवात एकाच दिवशी अशा विचित्र केसेस कधी आल्या नव्हत्या.

मानकामे त्या माहितीतली सुसूत्रता शोधण्याचा प्रयत्न करत होते..

नाव: राजेश चौबळ
वय : २९ वर्षे
मृत्यूची वेळ : रात्री सुमारे २.३०
मृत्यूचे कारण : रात्री कसल्यातरी धक्याने अगोदरच सैल झालेले भिंतीवरचे घडयाळ खिळ्यापासून निसटले असावे. आधी ते खिळा आणि कॉट यांच्यामधे असलेल्या फळीवर आदळले. त्या जुन्या घड्याळाचे भाग तुटून वेगवेगळे झाले आणि मग ते काहीसे अवजड घड्याळ थेट राजेशच्या डोक्यात पडले. तरीही तो कदाचित वाचला असता… पण ! विचित्र रितीने घड्याळाचे मोठे आणि अणकुचीदार दोन काटे एखाद्या हत्याराच्या पात्यासारखे त्याच्या गळ्यात आणि छातीत घुसले. तेच त्याच्या मृत्युचे कारण आहे.

विचित्र मृत्यू आहे अगदी ! नाही म्हणजे घड्याळ पडू शकतं निसटून.. पण अगदी एखाद्याने मुद्दाम खुपसावेत तसे ते काटे त्याच्या शरीरात घुसणं म्हणजे.. !

जुजबी चौकशीत तरी राजेशची कुणाशी दुश्मनी असल्याचे काही समजले नव्हते.. त्यामुळे फारच 'विचित्र अपघात' अशीच नोंद करावी लागणार बहुतेक..


आणि ही दुसरी भगनानीची केस !

केशव भगनानी.. दोनचार वेळा ह्याला आपणच वॊर्निंग दिलेली आहे. अंडरवर्ल्डशी संबंध असल्याची डिपार्टमेंटची खात्रीच आहे! बी ग्रेड पिक्चरचा हा फायनान्सर. त्यासोबत नाना धंदे आणि लफडी.

खर म्हणजे हा भगनानी एक दिवस जायचाच होता.. म्हणजे त्याच्या ऑफिसवर भाडोत्री गुंडांचा अंदाधुंद गोळीबार, काचेच्या दरवाज्याचा चक्काचूर.. आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेला भगनानी. असच काहीतरी होणार होतं एक दिवस..

काल भगनानी गेलाच… पण हार्ट फेलने !

रात्री दोन वाजता त्याच्या मोबाईलवर कॉल आला एव्हढच आठवत त्याच्या बायकोला. तो उठून फोन घ्यायला गेला आणि बऱ्याच वेळाने तिला जाग आली. बाहेर येऊन पहाते तो जमिनीवर पडलेला. निष्प्राण. जोरात ऍटॅक आला असणार त्याला.

आधी वाटलं त्याला धमकीचाच फोन आला असणार… पण तेच फार विचित्र आहे !
कारण… कारण त्याला रात्री अकरा नंतर कुणीच फोन केलेला नाही फोन कंपनीच्या रेकॉर्डप्रमाणे !
दोनदा रिपोर्ट मागवून खात्री केली आपण…

मग… त्याचा मोबाईल वाजलेला त्याच्या बायकोने ऐकला कसा ?

त्याचा मोबाईल वाजलाच कसा ?

...

विचारात असतानाच मानकामेनी घडयाळात पाहिलं.. दोन सतरा. बरीच रात्र झाली… आता घरी जावे. उद्या बघता येईल.

दुसऱ्या ऑफिसरला चार्ज देऊन मानकामे बाहेर आले. दोन कॉन्स्टेबल बसून आपसात आरामात कुजबुजत होते ते सरळ झाले.. मानकामेनी पोलिस स्टेशनच्या आवारत असलेल्या आपल्या जुन्या मोटरसायकलकडे पाहिलं..

आणि त्यांच्या चेहऱ्यावर लगेच त्रासिकपणा आला.

त्यांच्या अपेक्षेप्रमाणे दोनचार किक्स मारुनही मोटरसायकल चालू होईना..

च्यायला, आता साताठ वर्ष झाली वापरतोय ही मोटरसायकल.. आधी नीट चालायची.. आता गेल्या काही दिवसातच फार त्रास देते आहे. नवी घेऊ शकतो आपण आपल्या पैशातून.. अगदी सहज.. पण मग डिपार्टमेंटच्या डोळ्यात लगेच येतं आजकाल ..

शेवटी, तडकून त्यानी मोटरसायकलला लाथ मारली !

अजून दहा मिनिटानंतर मानकामे अगदी घामाघूम झाल्यावर, ती एकदाची चालू झाली..

मानकाम्यानी मग पुन्हा एकदा आपल्या मोटरसायकलला शेवटची एक शिवी हासडली… आणि रात्रीच्या निर्मनुष्य रस्त्यावर त्यानी ती जुनी मोटरसायकल अगदी भरधाव सोडली.


***



हां… दचकू नका हो एव्हढं.

मघाशी 'वस्तूंचं काय ?' असं विचारल ते एव्हढं मनावर घेऊ नका.

तुमचही बरोबर आहे म्हणा.. वस्तूंचं काय ?

वस्तूंचं आयुष्यच मुळी माणसांच्या उपयोगासाठी.. अर्थात आयुष्य कशाला म्हणायच म्हणा.. निर्जीव निष्प्राण वस्तू त्या !

पण म्हणून तुम्ही एखाद्या वेळेस वैतागलात आणि समजा..

समजा, तुमचा प्रोग्राम चालत नसेल म्हणून किबोर्डच्या किज आपटून आपटून रागारागाने टेस्ट केलतं.. किंवा

सर्व चॅनेलच्या भिकार कार्यक्रमांना कंटाळून अक्षरश: रिमोट फेकून द्यावासा वाटला..

.. फार कशाला नीट ठिणगी न पाडणाऱ्या स्वयंपाकघरातल्या लायटरवर भडकलात आणि आपटलात दोनचार वेळा ..

तर ?

तर काय ? तरीही त्या निर्जीव वस्तू काय करणार म्हणा.. ? निमूटपणे तुमचं वागणं सहन करण्यापलिकडे.

पण सांगता येत नाही…

आता हेच बघा ना… मानकामे भरधाव निघाले त्यांच्या मोटर सायकलला शिव्या घालतच..

आता समजा.. म्हणजे फक्त कल्पना करायची हां..

समजा, मोटरसायकल १०० च्या स्पीडला असताना एखाद्या मोक्याच्या क्षणी अगदी अनपेक्षितपणे हॅंडल लॊक झालं ! किंवा.. दाबला नसताना जर अचानक ब्रेक लागला तर..

.. तर त्या मोटरसायकलस्वाराचं काय होईल ?

छे ! मला तरी कल्पना करवत नाही…


म्हणून आपलं सहज सांगावस वाटलं...


Love people..

and if possible, love Things too !




(समाप्त)


Priyab
Monday, March 19, 2007 - 7:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Rahul छान लिहिले आहे

Lalu
Monday, March 19, 2007 - 7:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आवडली! :-)
नवीन वर्षाच्या सुरवातीलाच 'अघटित' घडले... पण त्यामुळे सुरुवात एकदम जोरदार झाली आहे! हे वर्ष मायबोलीकरांना भयकथा, हेरकथा, रोमॅंटिक कथा, सायन्स फिक्शन, गूढकथा वगैरे वगैरेंचे जावो. :-)


Maitreyee
Monday, March 19, 2007 - 7:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही राहुल, एकदम मतकरी स्टाईल वाटली :-)

Sashal
Monday, March 19, 2007 - 9:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाप रे .. !

Deepanjali
Monday, March 19, 2007 - 9:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राहुल ,
जबरी लिहिलय एकदम !
टी व्ही serial चा एकादा episode मस्त जमेल ..
:-)

Asami
Monday, March 19, 2007 - 9:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदम जबरी राव. वर्षाची सुरू वात दणकून झाली

Disha013
Monday, March 19, 2007 - 10:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त!एकदम खिळवुन ठेवले 'अघटित' ने!

Marhatmoli
Tuesday, March 20, 2007 - 2:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एखाद्या कसलेल्या लेखकाच लिखाण वाचतेय अस वाटल वाचताना. सुंदर लिहलय.

Jo_s
Tuesday, March 20, 2007 - 4:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राहुल खासच लिहील्ये, ग्रेट

Zakasrao
Tuesday, March 20, 2007 - 4:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रत्नाकर मतकरी इश्टाइल कथा चांगली लिहिली आहे. आहट सारख्या एखाद्या serial चे दोन भाग सहज होउन जातील. निवेदन नसत आणि आणखी थोड गुढ केल असत तर भय कथा झाली असती पण मग ती एव्हडी छान वाटली नसती. तसा मोह टाळल्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद.
btw हे त्रिदळातल पहिल दल का?


Psg
Tuesday, March 20, 2007 - 4:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राहुल, जबरी!! एकदम मस्त!!

Mirchi
Tuesday, March 20, 2007 - 5:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रतिक्रिया वाचुन उत्सुकता शिगेला पोचली आहे
पण मला फ़क्त डोट्स दिसत आहेत

कोणी मदत करेल का??


Swa_26
Tuesday, March 20, 2007 - 6:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राहुल... सहीच आहे कथा.. एका दमात वाचुन काढली अंगावर काटाच आला एकदम...
तुमची शैली खूप छान आहे आणि वेगळी... जी.ए. कुलकर्णी आठवले क्षणभर... खुप सुंदर :-)
असेच लिहीत रहा...



मिर्ची... मंगल font download करुन बघ... कदाचित problem solve होईल..

Suvikask
Tuesday, March 20, 2007 - 6:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तमाम मायबोलिकरांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा
राहुल, मस्तच रे!!! वेगळ काहितरी वाचण्याचा अनुभव मिळाला.


Rajkumar
Tuesday, March 20, 2007 - 7:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राहुल,मस्त जमलीये कथा.. विषय आणि मांडणी छान आहे.

Giriraj
Tuesday, March 20, 2007 - 7:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कथेचा प्रवाह आवडला.. आणि वर्णनशैली तर भन्नाट

Bsk
Tuesday, March 20, 2007 - 7:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुप भारी!! काल रात्री वाचली आणि काटाच आला.. अस प्रत्यक्षात होत नाही ते किती बरय... फार सुंदर लिहीलीय कथा!!

Jayavi
Tuesday, March 20, 2007 - 9:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आई गं.....एकदम जबरी.
राहुल, कितीतरी दिवसांनी तुझी कथा वाचायला मिळाली त्यामुळे अगदी आधाशासारखी वाचली. वोही पंच है जनाब अभी भी :-)
कुमारी गंगूबाई नॉन्मॅट्रीक बघताना अगदी निरखून लेखकाचं नाव वाचते अजूनही....तुझं नाव दिसेल ह्या आशेनं :-)

Bee
Tuesday, March 20, 2007 - 10:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला ही एक सरळसाधी कथा वाटली. भयकथा वा रहस्यकथा असे काहीच जाणवले नाही. कथेची शैली, तिच्यातील सुटसुटीतपणा आणि वाचकांना शेवटी काहीतरी सांगून जाणे खूप भावले.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators