|
Harishchandra gad.. ek anubhav Indrabhanu pramanech amhalahi asach anubhav aala hota. Amhi 7/8 jana parlyahun nighalo hoto. Kalyanhun ST pakadun gava javal utarlo. Dupary sadharan 3/4 vajata(aata serva timmings athavat nahit karan 10 versha zaly) chalayla survat kely. Pavsaly divas hote. Pan dupary changala oon hota. Teesaryanda gada var jaat hoto tyamule sadharan ratsa mahiticha zala hota. Pan group madhe kahi jan navin hote tyamule chalanyacha veg kamy karava lagat hota. madhe madhe thambat java lagat hota. sadharan 5 vaje paryant aamhi ardha antar kapala hota. Aanni achanak adharun yayala lagala. Thanda hava sutaly. jasjase aamhy phude jaat hoto tastasa havecha veg vadhat hota. aakashat kalya kutta dhagaany gardy karayla survat kely hoti.Aata thambana shakyach nahota. andharun aala hota. Pavasala survat zaly hoti. Pan ajun purna andhar zala nahota. Manat thody bhity hoty ty arros disale nahit tar kay. Aani jyachy bhity hoty tech zala. Purna andhar zala aani payvaat desenashy zaly. Pavasala jor chadhala hota. Joracha vara thandy aani duvandhar pavus. Ajun pahila rock patch pan aala nahota. Aani naeelajane aamhala vaatetach thambava lagala. Hya ashevar ki kony gaavkary magun aala tar tyacha barobar phude jaoo mhanun. Aani tya Shankarachy krupa ki kay ek gaavkary achanak tya andharuntun aamcha samor aala. Aamhala baghun tyane yevadhach vicharla ki gadavar janar ki khaly utarnar. Arthatach aamhy gadavar jayacha mhanun sangitala. Tyane aamhala magun yayala sangitala. Tya bhayankar kaalratry tya deva manasachya magun thody thatta masakary karat aamhy phudchya pravasala survat kely,Aani pahila rock patch gathala. yevadha soppa rockpatchpan tya vely to chadhan pharcha kathin zala hota. Pavasala mule shooj ghasarat hote. Pan sudayvane konala kahi zala nahi. Pan aamchy thatta maskary thodyacha velat band zaly. to dev manus aamhala arrowschya vate paryant sodun dusray vaatene kuthe gayab zala. tyala kuthalyatary dusarya gaavy jaycha hota. Aata rasta soppa aahe tumhy khadakanvarche baan shodhat ja yevadha sangun to nighun gela. Sadharan torch madhe arrows shodhat amhi vaatchaal suru kely. Yevhana je navin hote tyanchy bolaty band zaly hoti. Map asun sudha kahi upayog nahota. Kiran samant, Nandu kelkar, Atul dhongade aani me aamhy teesryanda gadavar yet hoto tyamule thoda confidence hota. Amhala bakinchyana aata sambhalaycha hota. Tyaparistytit sudha aamhy kahina kahi vinod karot hoto aani achanak khadak disenase zale. aata matra amhy choughehy manatun thode ghabarlo. Pan tasa kahi na dakhavata me kiran aani Nandune torch gheoon phude jaycha aani bakichyany tethech thambaycha tharvala. Aamhi thode phude jatach tya andharat aani torchchya prakashat ek shota dagadatla deool disala aani aamhi tighaee khush zalo. Mazya andaja pramane ashi 2 shoty devala vaatet lagatat. Aamhy tighaee parat mage aalo aany bakichyana gheoon phudachy vatchal suru kely. Thodya velane parat ek shota deool aala aani Kiran ne bomb takala ki aapan parat tyacha devala pashi aalo aahot mhanun. Torchane neet check kela tevha kalal ki Kirane devul olkhanayt chuk kely hoti pan tya gadbadit aamhy parat vaat chukalo. Pavus vadhatach hota. Tyat dhuka pasrayala survat zaly hoty. aata matra paristyty bikat zaly hoty. Je kahi torchcha prakashat disat hota aata tehee dasaycha banda zala. Pan maza aani Nanducha andaj asa hota ki Shankarach deool 10 te 15 minitanvar asava. Parat me aani Nandune phude jayacha tharavala. Kiran aani Atul bakinchan barobar rahile. Torch gheoon me aani nandu 5 minit andaje chalalo aani aamcha aananda tya dhukyat mavenasa zala. Karan kahi antaravarun amhala kuthalyatary group cha mothamothyany gaany gatanacha aawaj aala. ajun phude njata aamhy tasech mage aalo aani bakichayna dilasa dila ki aamhala deool disala aahe 10 minitat aapan devalat asu mhanun. He sangitalyavar tya andharat sudha servanchya cheharyavar ananda pasarala. Aani 10 /12 minita chalayavar aamhala devalacha sadharan kalas disala. Pan ajun vishavas nahota ki to devalacha kalas aahe mhanun aamhy jorjarat ordayla survat kely aani aamhalahi dusrya bajune pratutar aala. Aani sarvanchya jeevat jeev aala. Tee kaal ratra aamhy kadhyhy visaru shakat nahi. To ek afalatun anubhav hota. Devalachya bajula je kunda aahe tyasambhadi ek katha mhanje, tya kundat ek shankarachy pinda aahe aani tya pindychya bajula char khamb aahet. tyatil teen khamb he madhech tutalele aahet. Pan ek khamb ajun aahe. Asa mhanat ki te char khamb mhanaje ek ek yug aahe. Teen khamb je tutale aahet te teen yuga sampalyachee khun aahe. Aani ek khamb jo aajun aahe to mhanaje aatacha kalyyug aahe. arthat hee katha aahe. Khara khota devaalacha mahit
|
Gs1
| |
| Monday, May 15, 2006 - 5:44 pm: |
|
|
हरिश्चंद्रगड ! खरे म्हणजे शीर्षकात दिलेले उद्गारचिन्ह ही एवढी एकच प्रतिक्रिया होउ शकते हरिश्चंद्रगड या अनुभवाचे यथार्थ वर्णन करायला. बाकी कितीही लिहिले तरी शब्द तोकडे पडतील, पण डोंगरयात्रांची नोंदवही ठेवायची असे ठरवले आहे त्याप्रमाणे लिहितो.. शुक्रवार १२ मे. एक मेच्या जोडुन आलेल्या सुटीमध्ये दोन दिवसांची डोंगरयात्रा करायची राहिलीच होती. त्यामुळे कधी नव्हे ते दोन तीन दिवस आधीच ठरवून कोयनेच्या घनदाट जंगलातला महिमंडणगड किंवा डोंगरयात्रींची पंढरी मानला जाणारा हरिश्चंद्रगड करावा असा बेत होता. महिमंडणगडाच्या घनदाट जंगलात शिरायचे धाडस करायचे तर किमान पाच सहा साथीदार पाहिजेत, ते नाही जमले त्यामुळे मग मी आणि कूल असे दोघेच रात्री साडेनऊच्या पुणे नाशिक आरामगाडीने निघालो. आळेफाट्याला (९० किमी) उतरलो, आता माळशेजघाटमार्गे कल्याण मुरबाडकडे जाणारे एखादे वाहन शोधणे आवश्यक होते. त्याप्रमाणे काही ट्रकमध्ये प्रयत्न करेपर्यंत बारा वाजता महामंडळाची लाल बसच मिळाली. वाटेत कधीतरी गेल्या एक मेपासून सुरू केलेल्या डोंगरयात्रांची उजळणी केली आणि लक्षात आले की ही आमची चक्क रौप्यमहोत्सवी डोंगरयात्रा / गड होता. माळशेज घाटाच्या अलिकडे खुबी फाटा लागतो, तिकडे उतरलो. एक वाजून गेला होता पण रस्त्यावर दोन तीन टपऱ्यांवर जाग दिसत होती. तिथुन रस्त्याची खात्री करून घेतली आणि खिरेश्वर या पायथ्याच्या गावाकडे चालू लागलो. एका बांधावरूनच कच्च्या रस्त्याने दूरवर दिसणाऱ्या अक्राळविक्राळ डोंगरांच्या पायथ्याशी मिणमिणणाऱ्या दिव्यांकडे चतुर्दशीच्या चंद्रप्रकाशात आमची वाटचाल सुरू होती. पाठीमागे एक उंटाच्या आकाराचा पहाड सोबत करत होता. रात्री अडीचला सहा किमी चालून गावाजवळ आलो तसे गाण्याचे सूर ऐकू आले. कोणाकडे तरी अजून जाग होती आणि लग्नानिमित्ताने गाणी चालू होती. तिथूनच बाहेर पडलेल्या दोघांनी जिल्हा परिषदेची शाळा दाखवली, तिच्या ओसरीतच आम्ही पथारी पसरली. पहाटे साडेपाचला उठलो, थोडे बाहेर रस्त्यावर आलो आणि समोर बघतो तर पुणे खिरेश्वर एस्टी !! गावातल्या अक्षय नावाच्या एकमेव टपरीसमोर थांबली होती. चालकही उठतच होता, ही दुपारी चार वाजता पुण्यातून सुटते आणि खिरेश्वराला मुक्कामी राहून पहाटे पुण्याला परतते. तसेच ओतूरहून सकाळी एक गाडी येते आणि दहा वाजता परत ओतूरला जाते. याव्यतिरिक्त साधन नाही, आणि पावसाळ्यात या सुद्धा येत नाहीत. अक्षयच्या मालकांना घरातून उठवून आणले आणि पोहे खाऊन सव्वा सहाला मार्गस्थ झालो. त्यांच्याकडूनच वर चारपाचजणांचे दोन गट गेल्याचेही कळले. दाट रानातल्या पण सुस्पष्ट पायवाटेने रमत गमत चढण चढत दोन तासात तोलार खिंड गाठली. वाटेत एकदाच दोन फाटे फुटले, बरेच बाण डावीकडे जा असे दाखवत होते तरी तो रस्ता दरीत उतरतो म्हणून आम्ही ( नेहेमीप्रमाणे शहाणपणा करून ) उजवीकडे गेलो आणि कातळाचा एक थोडा अवघड ( आणि पावसाळ्यात अशक्य) ट्रॅव्हर्स सामोरा आला. तो केला आणि मग ती डावीकडची वाट पण पुन्हा येउन मिळाली. मध्ये केवळ एकाच ठिकाणी थोडे पाणी होते आणि पुढे तर अजिबातच नाही, तेंव्हा भरपूर पाणी घेउन निघणे क्रमप्राप्तच आहे. तोलारखिंड ओलांडुन पुढे न जाता, तिथेच व्याघ्रशिल्पाच्या डाव्या बाजूने थेट उभा कातळ चढायला सुरूवात केली, हाच तो हरिश्चंद्रगडाचा सुप्रसिद्ध 'रॉक पॅच' ! सहाशे फुट उभे चढुन जायचे होते. मध्ये काही ठिकाणी तुटके रेलिंग तर काही ठिकाणी अरुंद खोदीव पायऱ्या आहेत. पण पावसाळा व नंतर लगेचचा काळ सोडल्यास फारशी अवघड नाही ही चढाई. एव्हाना उनही तापले होते, पण आम्ही तयारीत होतो, त्यामुळे विशेष त्रास नाही झाला. तर पहाटे निघाल्यापासून तीन तास, आठ किमी आणि पंधराशे फूट उंची एवढे मार्गक्रमण करून आपण हरिश्चंद्र पठारावर पोहोचतो, पण हा परिसर एवढा प्रचंड विस्ताराचा आहे की 'दिल्ली तो बहोत दूर है' अशीच परिस्थिती असते. अजून दोन तास साधारण पर्वतीएवढ्या पाच लहान मोठ्या टेकड्या चढुन उतरल्या तेंव्हा कुठे त्या हरिश्चंद्रेश्वराचे दर्शन झाले. जागोजागच्या खुणा आणि सुस्पष्ट पायवाट यामुळे रस्ता चुकलो नाही, पण चुकलो तर दिवसभर भटकत ठेवण्याचे 'पोटेन्शियल' या भागात आहे. बालेकिल्ला, तारामती, रोहिदास ही शिखरे डाव्या हाताला ठेवत मंदिर दिसेपर्यंत चालत रहायचे ही सोपी युक्ती म्हणता येईल. शेवटची पर्वती उतरलो आणि समोरचे एखाद्या प्राचीन वैभवशाली नगरीच्या अवशेषांसारखे दिसणारे दृश्य बघून हरखून गेलो. पूर्ण काळ्या पाषाणातले हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे. देवळाला समोरासमोर दोन दरवाजे, त्यांच्या समोर दोन नंदी आणि आत दोन शिवपिंडी. बाजूला सर्वत्र कोरीव खांब व शिला, मंदिराला मागे एक काळा पहाड उतरत येऊन बिलगलेला. त्या पहाडात कोरलेल्या दुमजली गुहा, वरच्या गुहांमध्ये रहायचे तर खालच्या गुहांमध्ये त्या कडाक्याच्या उन्हातही शीतकपाटासारखे थंडगार आणि स्फटिकासारखे निर्मळ पाणी. हे वैभव कमी म्हणून की काय, बाहेरच पाण्याचे एक मोठे रेखीव कुंड, त्याच्या एका बाजूला काळ्या पत्थरातील देखण्या देव्हाऱ्यांची रांगच. वर टेकाडावर विश्वामित्राचे मंदिर, समोर अजून एक शिवमंदिर. हे बघुन पुढे केदारेश्वराच्या गुहेकडे गेलो आणि भारावून मटकन त्या गुहेच्या छोट्याशा दारातच बसलो. पन्नास फूट लांब , चाळीस फूट रूंद आणि पंधरा फूट उंच अशी बरोबर चौकोनी सुबक गुहा आमच्या पुढ्यात होती, मधोमध चार कोरीव खांब होते, तीन भग्न तर एक सुस्थितीत. त्यांच्या मधोमघ एका पुरुषभर उंचीच्या चौथऱ्यावर अर्ध्या पुरूष उंचीचे शिवलिंग होते, आणि संपूर्ण गुहा कमरेच्या वर येईल एवढ्या पाण्याने दरवाजापर्यंत भरलेली होती, त्या पाण्यात शिवलिंगाचे, खांबाचे, गुहेच्या कानाकोपऱ्याचे लख्ख प्रतिबिंब दिसत होते. डोंगरयात्रेची आवड असो वा नसो , केवळ या केदारेश्वरासाठी इथे यायला हवे असे हे स्थळ आहे. हे सर्व बघुन मन तृप्त झाले होते, पण पोटाची भूक मात्र भागली नव्हती. जवळच श्री भगवान यांची छोटी कुटी आहे ते शनिवार, रविवार गडावर येउन रहातात, चहा, नाश्त्याची सोय करतात अशी माहिती होती. त्यांच्याकडे पिठले, रस्सा, गव्हाची भाकरी असे यथेच्छ जेवलो आणि तिथेच बाहेर आडवे झालो. समोर कळसूबाई, रतनगड दिसत होते. मुख्य गुहेत आदल्या रात्री आलेले उतरले होते म्हणून मग दक्षिणेकडे जरा वर असलेल्या गणेश लेण्यांकडे गेलो. गणपतीची विशाल मुर्ती असलेली एक गुहा आश्रयासाठी निवडली, तिकडे आमचा सर्व संसार मांडला, आणि हरिश्चंद्रगडाला पाय लागल्याचा आनंद खालच्या गुहेतून थंड पाणी आणून, ग्लुकॉन डी पिऊन साजरा केला. निवांत हरिश्चंद्र अनुभवायचा असे ठरवूनच आलो होतो, त्यामुळे बालेकिल्ला, तारामती, रोहिदास या प्रत्येकी एक तासाच्या वाटचालीच्या शिखरांकडे जाण्याचा विचार अधुन मधुन बोलून दाखवला तरी फारशा गांभीर्याने घेतला नाही. एव्हाना चंपीराणी नावाच्या एका कुत्रीशी आमची चांगलीच दोस्ती झाली होती, तिला घेऊन सायंकाळी कोकणकड्याकडे निघालो. अर्ध्या तासाच्या पश्चिमेकडच्या नागमोडी वाटचालीनंतर कोकणकड्याला पोहोचलो, चालतांना समोर कडा आहे ते जाणवत होते, पण शेवटाच्या पाच पावलांपर्यंत सुद्धा समोर काय डोळे दिपवणारे जग मांडून ठेवले आहे याचा अंदाज आला नाही. एक किमी लांबीचा इंग्रजी C आकाराचा, उंचीतही अंर्तवक्र असलेला, सरळ कोकणात कोसळणारा कोकणकडा हा एक मंत्रमुग्ध करणारा आविष्कार आहे. किमान पंचवीस लोकांनी काढलेले फोटो पाहिले होते मी, पण या भव्यतेची, सौंदर्याची कल्पनाही आली नव्हती त्यावरून. कड्यापलिकडचे कोकणातून उगवलेले चित्तथरारक सुळके, दोन्ही बाजूला पसरलेल्या सह्याद्रीच्या भिंती, एका रूद्र पहाडातून कोरलेला माळशेजचा घाट, काय पाहू, किती पाहू असे झालेले, त्यात मलाही हलवणारा भन्नाट वारा.. या सगळ्यातच झालेला सूर्यास्त. मिट्ट काळोख पडला, पण तिकडेच बसून राहिलो अजून तासभर. आता पश्चिमेचा खेळ संपला होता, आणि पूर्वेचे नाट्य सुरू झाले होते. रोहिदास आणि तारामतीच्या मधुन पौर्णिमेचा चंद्र उगवत होता. सुर्योदयाची रंगांची उधळण पाहिली आहे अनेकदा, आज चंद्राची पाहिली. तेवढी रंगीत नाही अर्थात, पण तेवढीच उत्कंठा ताणणारी आणि सुंदर. कुणी माधव आचवलांचे 'किमया' वाचले आहे का ? तेच जगलो असे म्हणता येईल.. परत फिरलो, आणि साराच माळ, साऱ्या टेकड्या एकसारख्या भासू लागल्या, कुठे पायवाट आहे, कुठे जायचे आहे काही समजेना, बरे हा परिसरही एवढा विस्तीर्ण की एकदा भटकलो की काही खरे नाही, पण नेटाने पुढे जात राहिलो. चंपी मदतीला धावून आली. आम्ही संभ्रमात पडलो की ती जाईल तिथे आणि ती थांबली की आम्ही जाऊ त्या दिशेला असे करत करत अखेर ओळखीच्या खाणाखुणा दिसू लागल्या आणि आम्ही पुन्हा भगवान कडे पोहोचलो, वरणभात आणि बरोबर आणलेली पुरणपोळी खाऊन आमच्या गुहेकडे रवाना झालो. बिबट्या आम्हाला उचलून नेण्याच्या शक्यतेवर जरा चर्चा केली आणि निद्राधीन झालो. सकाळी उठून बघतो तर खाली देवळासमोर मैदानात एक तंबू. रात्री दोन बहाद्दर गड चढुन आले होते, ही त्यांचीच करामत. त्यांनी बरोबर स्वयंपाकाची भांडी वगैरे पण आणली होती. प्रत्येकी पंधरा किलो वजन नक्कीच आणले असावे. थोर आहेत, नाहीतर आम्ही नुसते वर येउन आयते खाउन दमतो.. परतीची तयारी सुरू केली, पाचनई या गावात उतरणाऱ्या एका वेगळ्या वाटेने जायचे ठरवले होते. वेगळी वाट बघून होईल म्हणून आणि दीड तासातच खाली उतरता येईल म्हणूनही. ही वाटही मस्तच आहे, एका वेगळ्याच कोनातून हरिश्चंद्रगडाचे दर्शन घडवणारी आहे. बारकू नावाच्या तिथल्या एका गुहामानवाबरोबर खाली उतरायला सुरूवात केली, चंपीही पार पाचनईपर्यंत सोबत आली. पाचनईहून सकाळी सहाला आणि अकराला अशा दोनच बस सुटतात, भंडारदऱ्याजवळच्या राजूर या गावाला जायला. इथे मात्र जरा चूक झाली, हे गाव भलतेच दुर्गम आहे, सर्व बाजूंनी डोंगराने वेढलेले आहे. बस काही बारा वाजले तरी येईना तेंव्हा आम्ही जरा गडबडलो, पुन्हा हरिशचंद्र चढायचा, खिरेश्वराला उतरायचा आणि पुढे सहा किमी खुबी फाट्याला चालत जायचे हे सर्व डोळ्यासमोर दिसू लागले. पण अखेर बस आली, अरूंद घाटातून घरघरत दीड तासात राजूरला पोचलो. पुण्याला जायला बस होती अडीचला. इकडुन लोक का येत नाहीत ते नीटच कळले. राजूरचे प्रसिद्ध पेढे घेतले. तिकडे वर्तमानपत्रात कालच बिबट्याने घराबाहेर झोपलेल्या एका मुलीला मारल्याची बातमी. रात्रीची चर्चा आठवली, गेले दोन वर्ष या ओतूर, कोतूळ, राजूर या भागात नरभक्षक बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. डोंगरयात्रींना नाही अनुभव आला अजून काही, पण तयारी असावी. खचाखच भरलेल्या बसचा सहा तासाचा अत्यंत कंटाळवाणा प्रवास करून पुण्यात पोहोचलो, ते पुन्हा लवकरात लवकर हरिश्चंद्रगडावर नक्की यायचे असे ठरवूनच. एक रॉक पॅच सोडला तर इतर सर्व बाबतीत जे जे ऐकले होते त्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभव फारच सरस आले, त्यातली एक एक गोष्टही हरिशचंद्रावर पुन्हा पुन्हा निवांत जावे अशी मनाला ओढ लावणारी. काही प्रकाशचित्रे व चलतचित्रे घेतली आहेत, ती लवकरच कुठेतरी देईन, पण अनुभवाची सर त्यातल्या कशालाच नाही...!
|
Dhumketu
| |
| Tuesday, May 16, 2006 - 4:37 am: |
|
|
मस्त रे... मिस झाला... पाण्यातील शिवलिंगाचे खासच आहे. बर्फ़ासारखे थंड असते पाणी. १ मिनिटही राहवत नाही. प्रदक्षीणा घातली तर कमरेखालचा भाग आहे का नाही हेच कळत नाही. उन्हाळ्यात मस्त वाटते. तिथले लोक सांगतात की छताला आधार देणारे चार खांब हे चार युगांचे प्रतीक आहे... गडावर चढताना एक नेढे आहे.. तिथुनही वाट आहे...पण मुरुमाची वाट आणी बिबट्याचे भय ह्यामुळे कोणी त्या वाटेवरून चढल्याचे ऐकीवात नाही.. काय रे कुल १ तारखेला जमवले असतेस तर मस्त झाला असता ट्रेक...
|
Bee
| |
| Tuesday, May 16, 2006 - 5:29 am: |
|
|
गोविंदा, खरच अप्रतीम वर्णन केले आहेस आणि तुमची जिद्द, तुमचे साहस, भटकंतीचे तुमचे वेड प्रशंसणीय आहे. ह्या वेळेसचे वर्णन खूप जिवंत जाणवले. आता हे सर्व नीट जपूण ठेवा. पुढे चालून सगळे सचित्र लेख एकत्रीत करून पुस्तक रुपाने प्रसिद्ध करा आणि इतरांनाही गड सर करण्याची प्रेरणा द्या. असेल तर तो काळ्या पाषाणातून घडवलेला राजा हरिश्चद्राच्या पुतळ्याचा फोटो कृपया इथे पोष्ट करा. एक विचारावेसे वाटते, हे हरिश्चन्द्र तेच का जे सत्य बोलण्यासाठी उल्लेखले जातात? वर्णनात हरिश्चन्द्राचा फ़ारसा उल्लेख आला नाही. म्हणजे हे नाव का पडले, हरिश्चन्द्र हे कोण होते ई. ई. गोविंदा तुझ्याकडे जर Digital camera नसेल तर खरच एक घेऊन टाक आणि घेताना memory size minimum 1 GB तरी असू दे. मी सुरवातीला 256 MB memory stick विकत घेतली होती ती नंतर मला 1GB वाढवावी लागली. कारण 256 मध्ये फ़क्त ७० ते ८० फोटो मावतात. 1 GB मध्ये बरेच फोटो मावतात.
|
Cool
| |
| Tuesday, May 16, 2006 - 7:09 am: |
|
|
हरिश्चन्द्र गड, मी ट्रेक सुरु करण्याच्या अगोदर पासुन ज्या किल्ल्याविषयी अनेकदा ऐकले होते, तो हरिश्चन्द्र गड अनुभवण्याचा योग असा अचानक जुळुन येईल असे वाटले नव्हते. हा ट्रेक पुर्ण दोन दिवसांचा असल्यामुळे खरं म्हणजे अजुन तीन चार साथीदार हवे होते, पण सर्वच जण आपापल्या कामात व्यस्त असल्यामुळे आम्हाला दोघांनाच जावे लागले. टोलार खिंडीपर्यंत पोहोचण्यासाठी असलेल्या घनदाट जंगलातुन चालायला लागल्या बरोबरच एकुणच या गडावर आपल्याला किती आनंद मिळणार आहे याची कल्पना येते. टोलार खिंडीनंतर येणारा Rock patch ही त्याचीच पुढची झलक, आणि तो पुर्ण केल्याबरोबर दिसणार गड अप्रतीम, गडाच्या मुख्या भागात पोहोचण्या अगोदरच तुम्ही त्याच्या प्रेमात पडु लागता. पुढे अत्यंत सुंदर असे हरिहरेश्वराचे मंदीर, आणि बाहेर असलेले पुष्करणी तिर्थ या सर्वांचं दर्शन डोळ्यांच पारण फेडणारं, थोडसं पुढे उतरुन गेलं की केदारेश्वराचं प्रचंड मोठे शिवलिंग, आणी त्याची पाण्यात दिसणारी प्रतीमा याचं तर शब्दात वर्णन अशक्य. स्वतः ला विसरायला लावण्याचं कसब त्या परिसरात नक्कीच आहे. हरिश्चंद्र गडाचा सर्वात भावनारा भाग म्हणजे कोकण कडा, त्या कड्यावर पोहोचे पर्यंत काहीही जाणवले नाही, आणि कड्यावर पोहोचताच ते दृश्य बघुन मी हरखुनच गेलो. अंगावर सरसरुन काटा येणे म्हणजे नेमके काय याचा मी प्रत्यक्षात अनुभव तिथेच घेतला. त्या कड्यावरुन दिसणार्या दृश्यावरुन नजर हटत नव्हती. संध्याकाळच्या वेळेला कातरवेळ म्हणतात, त्याच वेळेत मनाची अस्वथता वाढते, पण अशाच त्या संध्याकाळी देहभान हरपवुन आम्ही सुर्यास्त बघितला. सुर्याने दिलेला अनुभव कमी होता की काय म्हणुन तो गेल्याबरोबर चंद्राने आपलं अस्तित्व दाखवुन द्यायला सुरुवात केली. पौर्णिमेच्या चंद्र प्रकाशात उजळलेला कोकणकडा काय दिसतो ते खरच तिथे गेल्याशिवाय कळणे अशक्य. हरिश्चंद्र गडावर काढलेले ते ३० तास या गडाला ट्रेक ची पंढरी का म्हणतात हे सांगुन गेले, अविस्मरणिय अशा आठवणी मागे ठेवुन, आणि वारकर्याप्रमाणे पुढच्या वारीची ओढ लावुन हा ट्रेक संपला. आता वाट बघतोय पुढच्या वेळी कधी जायला मिळेल याची..
|
Cool
| |
| Tuesday, May 16, 2006 - 7:27 am: |
|
|
Sorry रे धूम्स, त्यावेळी नाही जमवु शकलो, पण पुढच्या वेळी नक्की...
|
Bee
| |
| Tuesday, May 16, 2006 - 7:55 am: |
|
|
छानच रे कूल, संक्षिप्त पण सुंदर रेखाटलस. त्या कोकणकडेचा फोटो असल्यास तोही टाका मंडळी.
|
Abhay
| |
| Tuesday, May 16, 2006 - 5:37 pm: |
|
|
masta re GS and cool, amhi pan May1 (7-8 varsanpurvi) kelelya trek chi aathvan zhali.., amhi pan ratri mukkam karun sakali 6.30-7 la survat keli ani 9.30la gadavar hoto, (khoop avaghad rockpatch aahe, ase aaikle hote!!). konkankada mastach, kothlihi halki vastu kahi darit padnar nahi yacha purepur anubhav ghetla.......
|
Moodi
| |
| Friday, May 19, 2006 - 10:12 pm: |
|
|
जी एस अन कूल एवढी अवघड कामगिरी पार पाडत आहात त्याबद्दल अभिनंदन. इथे पण भेट द्या हो एकदा अन हे प्रदर्शन पण पाहुन या आमच्यातर्फे. बाकी मायबोलीकरांनी पण याचा लाभ घ्यावा. http://www.loksatta.com/daily/20060520/mvrt.htm ह्या वज्रगडाला पण भेट द्या जमेल तेव्हा.
|
Itsme
| |
| Tuesday, May 27, 2008 - 11:42 am: |
|
|
मी सर केलेला २५ वा गड हरिश्चंद्र्गड असावा असे खुप मनात होते पण अखेर ५८ वा ठरला. थोडा वेगळा अनुभव या ट्रेक ने दिला. पुण्याहुन संध्याकाळी ७ वाजता निघालेले आम्ही, सकाळी सातास गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. गाडी सुरु झाल्यावर चर्चेअंती (एकमताने) हरिश्चंद्र्गडाला जायचे ठरले. रात्री चढाई करण्याचे पण निश्चीत झाले. मधे एक dinner ब्रेक घेउन साधारण बाराच्या सुमारास पायथ्याच्या गावी, खिरेश्वर ला, पोहोचलो. झटपट बॅगा पाठीला लाउन चालायला सुरुवात केली. थोड्याच वेळात डोंगर पायथा आणि पाठोपाठ घनदाट झाडी लागली. सरळ की डावीकडे ? डावीकडे वळालो आणि चालायला लागलो. GS आणि cool आधी जाउन आलेले असल्याने वाट चुकल्याचे त्यांच्या लगेच लक्षात आले, परत मागे फिरलो आणि दुसरी वाट घेउन त्याच उत्सहात चालू लागलो. आणि परत एकदा वाट चुकल्याचे लक्षात आले. झाडीत थांबणे योग्य वाटे ना म्हणुन अर्धा कीमी मागे मोकळ्या पठारावर आलो. GS आणि cool ने थोडे पुढेपर्यंत जाउन वाट confirm करावी आणि तो पर्यंत मी,तात्या आणि फदी ने आराम करावा (किंवा बोटे मोडावी) असे ठरले. अखेर योग्य रस्ता सापडला. खात्री दाखल ३ बाण ही दिसले. [तेंव्हा कुठे तात्या पुढे यायला तयार झाले.] बरेच पुढेपर्यत आल्यावर घनदाट झाडी लागली. गप्पांच्या तालावर चढाई चालु होती. आणि एकदम cool ओरडला 'थांबा'. सगळेच स्तब्ध झालो आणि ऐकु लागलो. पानातुन चांगलीच खसखस ऐकु येत होती. चार पावल पुढे टाकली, तर खसखस आमच्या दिशेने सरकु लागली, दोन वेळा प्रयोग केला आणि तिसर्या वेळेस तात्यांनी जोरात हुकुम सोडला, मागे फिरा .... आणि या वेळेस, पहील्यांदाच असेल कदाचीत, बहुमताने आम्ही मागे वळालो दोन तासांचा मस्त night walk मात्र झाला. गाडी पाशी येई पर्यंत, उद्या सकाळी किती वाजता चढायला सुरुवात करायची, झोप किती तास होईल वगैरे चर्चा चालू होती. इतक्या उशीरा झोपल्यावर आम्ही सकाळी उठणार नाही याची खात्रीच असल्याने GS ने पाचनई गावातुन चढुया असे सुचवले. पडत्या फळाची आज्ञा समजुन आम्ही लगेच गाडीत बसलो, कारण पाचनई कडुन चढायला २ च तास लागतात असे ऐकुन माहीती होते. आम्ही सगळे गाडी चालु झाल्या बरोबर झोपलो. प्रश्न फक्त GS चा होता. संध्याकाळी ७ ते दुसर्या दिवशी सकाळी ७ असे सलग १२ तास driving करुन त्याने आम्हाला सुरक्षित पोहोचवले. नंतरही विश्रांती साठी थांबण्याचा आग्रह नाही. पायऊतार होउन लगेच आम्ही चालायला सुरुवात केली. हा रस्ता खरच खुपच छान - सुखद आहे. सुरुवातीला विरळ झाडी आहे, मग कातळाच्या कडे-कडेने traverse आहे आणि नंतर पुर्ण रस्ता दाट झाडीतुन आहे. सुरुवातीचा अर्धा तास सोडला तर आपण पुर्णवेळ छान सावलीतुन चालत असतो, आणि बाजुला उंचच ऊंच कडे आणि पाउस - वार्या मुळे तयार झालेल्या असंख्य गुहा आणि खळगे. नैसर्गीक चमत्कार बघत बघत कधी गडावर दाखल झालो समजलेच नाही. आम्ही पोहोचेपर्यंत तात्यांनी 'भगवानला', लींबु सरबत - पोहे, order देउन ठेवली होती. बरेच ग्रुप आलेले असल्याने आम्ही आपले गुहा book करण्याच्या कामाला लागलो. बरीचशी प्रशस्त अशी आणि शेजारीच पाण्याचे टाके असलेली 'गणेश' गुहा निवड्ली आणि पथार्या पसरल्या. तो पर्यंत पोहे-लिंबु सरबत पण आले. ताव मारला आणि आडवे झालो. ट्रेक ला जाउनही आम्ही हा week end अगदी घरच्या सारखा आरामात घालवला. २ तास झोप, भर दुपारी आंघोळ, गरम - गरम शेव भाजी-भाकरी चे जेवण, पत्ते, परत अर्धा तास झोप आणि मग संध्याकाळचे आवरुन सावरुन निघालो कोकण कड्याकडे. कोकण कड्याची भव्यता, थरार, वारा, सुर्यास्त हे सगळे अनुभवण्या साठी एकदा तरी हरिश्चंद्र गडावर जायलाच हवे. दोन - तिन तास तिथेच रेंगाळलो. सुर्य पुर्ण अस्ताला गेल्यावर परत यायला निघालो. भरपुर फोटो काढले, कड्याचे, सुर्याचे आणि अर्थातच स्वताचे दुपारी मधे शिवलिंगाला प्रदक्षीणा पुर्ण केली. पाणी थंड होते, पण २ डिगरी नाही जाणवले. कदाचीत बाहेर उन्हाळा असल्याने असेल. संपुर्ण ताजेतवाने मात्र झालो. दुसर्या दिवशी सकाळीच, रोहीदास आणि तारामती केले. शिखराच्या टोकावरुन पलीकडे दिसणारे द्रुश्य डोळ्यात साठवुन घेत बराच वेळ तीथेच बसलो. कड्याच्या मध्यावर डोंगराच्या या टोकापासुन त्या टोकापर्यंत बाहेर आलेला अर्धवर्तुळाकार एक भु भाग घनदाट झाडांनी व्यापलेला. त्याच्या वर खाली सगळा कातळच कातळ. पलीकडे खोल दरी. भर उन्हाळ्यातती तीच्यातुन वर येणारे धुक्याचे - ढगांचे लोट च्या लोट. अप्रतीम द्रुश्य होते. साधारण साडेचार हजार फुट उंचीवर भगवा झेंडा फडफडत होता. त्याच्या समोरच महाराजांचा जयजयकार केला, काही स्तोत्रांची उजळणी केली. संघाची प्रार्थना म्हंट्ली आणि परत फिरलो. बरोबर आणेलेले, कैरी, लिंबु, कांदा, फरसाण आणि मुरमुरे आमची वाटच बघत होते. मस्त भेळ केली, पोटभर खाल्ली आणि उतरायला सुरुवात केली. GS पाठोपाठ स्फुर्ती गीते म्हणत nonstop खाली आलो. जेंव्हा जेंव्हा आम्ही ट्रेक ला जातो, तेंव्हा निसर्गाच्या सहवासा मुळे जेव्हडे refresh होतो, तेव्हडेच एकमेकां बरोबर घालवला वेळ आम्हाला refresh karato. या ट्रेक च्या बाबतीतच, निघाल्या बरोबर एकमेकांचे हाल्-हवाल [एरवी फारश्या भेटी गाठी, फोन होत नसल्याने] विचारुन झाले. आणि खास तयार करुन घेतलेली 'कभी-कभी, सिलसिला, love-story etc. ' अशी mix गाणी ऐकली, रात्री जगजित सिंग आणि सकाळी जाग आल्या बरोबर 'अभंगवाणि'. आमचा प्रवासातला वेळ आम्ही सगळेच एक सारखे enjoy करतो. या वेळी प्रवास लांबचा होता, आणि नंतर तो अजुनच लांबल्या मुळे जाताना 'पावन खिंड' आणि येताना 'अफजलखानाचा पराभव' अशा दोन लढायां ऐकता आल्या [CD पुरंदरे प्रकाशन]. गुहेत बसुन 'बाळासाहेब' ऐकले. इतिहासावर चर्चा केली. तात्यांकडुन management tips घेतल्या. कोकण कड्यावर 'सांज ये गोकुळी' ऐकले आणि शांत पणे बसुन सुर्यास्त अनुभवला. यातली कुठलीच गोष्ट आठवडाभर करणे शक्या नसते. त्यामुळेच एक सारख्या आवडी निवडी असलेले मित्र-मैत्रीणी बरोबर असल्याचा एक वेगळाच आनंद मिळतो. असो, तर असा हा हरिश्चंद्र्गड आणि तिथे असलेल्या गुहा, week end home म्हणुन एकदम योग्य ठिकाण आहे
|
Dineshvs
| |
| Tuesday, May 27, 2008 - 12:24 pm: |
|
|
अरे वा, छानच झाला कि कार्यक्रम. फोटो येतीलच ना.
|
Gs1
| |
| Tuesday, May 27, 2008 - 12:24 pm: |
|
|
छान. पुन्:प्रत्ययाचा आनंद मिळाला. एक दोन फोटोही टाका. पाचनईला पुणे संगमनेर अकोले राजुर असे जावे लागते, इतके डोंगरांच्या आत आत वसलेले गाव आहे की शेवटचे २७ किमी जायला दीड तास लागला. पावसाळ्यात जाता येत असेल असे वाटत नाही.
|
Itsme
| |
| Tuesday, May 27, 2008 - 2:01 pm: |
|
|
कुंडातले नितळ पाणी
|
Itsme
| |
| Tuesday, May 27, 2008 - 2:05 pm: |
|
|
कोकण कडा
|
Itsme
| |
| Tuesday, May 27, 2008 - 2:09 pm: |
|
|
तारामती,रोहीदास
|
Itsme
| |
| Tuesday, May 27, 2008 - 2:14 pm: |
|
|
सुर्यास्त
|
Giriraj
| |
| Wednesday, May 28, 2008 - 5:48 am: |
|
|
निषेध! निषेध!! निषेध!!! .. .. ..
|
Dineshvs
| |
| Wednesday, May 28, 2008 - 6:07 am: |
|
|
गिर्या, आत्ताच्या आत्ता पळत गडावर जा, आणि तिथे जी एस, कूल, आरती, यांचे झेंडे असतील ते काढून टाक. खडूने नावे लिहिली असतील ती पुसून टाक. आणि माझे नाव लिही.
|
Girivihar
| |
| Wednesday, May 28, 2008 - 11:29 am: |
|
|
खिरेश्वर गावाजवळच खिरेश्वरचे सुन्दर मन्दिर आहे, त्याच्या छतावरील कलाकुसर बघाण्यासारखी आहे.
|
अरे वा इथे लिहिले आहे काय ? मी वरचे इंग्रजी पाहिले आणि परत फ़िरले (दिनांक बघितलाच नाही वेंधळेपणाने ). छानच झाला कि दौरा...फोटो पण मस्त आलेत. हे सगळे फोनवर काढले आहेत ?
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
|
|