|
Bee
| |
| Friday, October 19, 2007 - 8:40 am: |
| 
|
आता दसरा संपून लवकरच दिवाळी येईल. पण ती येण्यापुर्वी तिच्या जुन्या आठवणी मात्र राहून राहून येत आहेत. किती काळ लोटला असेल मी हातात फ़ुलबाज्या धरून त्या उडवल्या नाहीत. फ़ुलबाज्या माझ्या सर्वात आवडीच्या होत्या बालपणी. खूप आवाज करणारे आणि कानठळ्या बसविणारे फ़टाके मला स्वतःला फ़ोडायला जरी आवडले नाहीत तरी इतर लोक हे फ़टाके कसे उडवितात हे मला दुर उभे राहून बघणे आणि फ़टाका चेतविला की दोन बोटे कानात घालून डोळे गच्च मिटून त्याचा आनंद लुटणे खूप आवडायचे. क्षणात अवतीभवती सुतळींचा आणि कागदांच कचरा व्हायचा. कुणाची रांगोळी विस्कटून जायची. खास करून लवंगी फ़टाक्यांची लळ मला खूप आवडायची. एका मागोमाग एक फ़टाके फ़ुटायचे. ते फ़ुटून झालेत की मधेच हळुच फ़टकन फ़ुटणारा फ़टाका फ़ुटायचा आणि मजा यायची. त्या फ़टाक्यांची बारूद जळली की तिचा एक वेगळाच सुगंध यायचा. जणू नुकताच पाऊन ओसरून गेला असावा आणि तहाणलेल्या मातिचा सुगंध दरवळला असावा. फ़टाक्यांच्या अनेक आठवणी आहेत. माझी बहिण आणि मी आमचे दोघांचे फ़टाक्यांसाठी प्रचंड भांडण होत असतं. ती फ़टाके चोरुन काय ठेवायची आणि इतकेच काय सोबत शाळेत दप्तरात देखील न्यायची. कोण जाणे परत कधी कुणासोबत फ़टाके बाजूला घेऊन.. जवळ कागदांचे चिटोरे गोळा करून नि बादलीभर पाणी जवळ ठेवून मी फ़टाके उडवीन. दिवाळीचा फ़राळ.. माझ्या बाबतीत हे असे नेहमी होते की दिवाळी संपली की मग फ़राळचे पदार्थही संपतात. मग मला परत ते हवे असतात. जेंव्हा असतात घरात त्यावेळी खावेसे वाटत नाही. पण संपले की हुक्की यायची. मग आई परत एकदा फ़राळ बनवायची. आमच्या घरी फ़राळ नेहमी रात्री तयार होत आलेला आहे. मग सकाळी एकदम आई बशीभरून नवा पदार्थ द्यायची आणि आमची पहाट तिखट गोड व्हायची. कदाचित करंजी कुणाला आवडत नसेल इथे पण पिठीने टम्म भरलेली करंजी मला खूप आवडते. आई मुदाम माझ्यासाठी अधिक पिठिच्या करंजी करायची. माझा एक मित्र होता.. म्हणजे अजून आहे. मला त्याच्याकडील सर्वच फ़राळ म्हणजे ideal फ़राळ वाटायचा. अजून तसा फ़राळ कुणाकडे मी खाल्लेला नाही. एक वेगळीच चव आणि खुसखुशीतपणा असायचा त्यात. खरच केवढे आनंदी दिवस होते पुर्वीचे..
|
Bee
| |
| Friday, October 19, 2007 - 8:46 am: |
| 
|
नेमस्तक, ह्या बीबीचे नाव 'आवडीचे फ़टाके आणि फ़राळ..' असे असायचा हवे होते नाही का? जर माझे बरोबर असेल तर कृपया चुकीची दुरुस्ती करता येईल का आपल्याला? धन्यवाद नेमस्तक!!!!
|
Monakshi
| |
| Friday, October 19, 2007 - 9:03 am: |
| 
|
अहा बी, काय मस्त बीबी उघडला आहेस. सहामाही परिक्षा संपली की खरी दिवाळीची सुट्टी सुरु व्हायची. शाळेच्या शेवटच्या दिवशी आम्हाला भला मोठा पेपर द्यायचे ५ / ६ पानी. कायतर म्हणे दिवाळीतील अभ्यास. आम्ही बघायचो पण नाही त्याच्याकडे आणि तसेच धुम्म पळून जायचो घरी. २ / ३ दिवसांनी दुपारच्या वेळी स्वयंपाक घरातून घमघमाट येणं सुरु होई. आजी आणि आई फराळ बनवण्यात मग्न असत. आम्ही मध्येच जाऊन एखाद चकली तोंडात टाक, शंकरपाळा पळव असले प्रकार करायचो. मला specially बेसन भाजल्याचा वास प्रचंड आवडतो. आणि बेसनाचा लाडू खाण्यापेक्षा पातळ बेसन खायला आवडायचं. आजी आम्हाला एका ताटलीत काढून देऊन त्यावर पीठीसाखर घालून आधी नैवेद्य दाखवायला सांगायची मग आम्ही ते खायचो. आणि दिवाळीला तर पहाटे पहिला कोण तयार होऊन खाली येतो फटाके फोडायला ह्यावर आमच्यात स्पर्धा लागायची. फटाक्यांचा तो वास मलाही खूप आवडायचा. पण मी ऍटमबॉम्ब कधीच नाही लावले. मला भिती वाटायची. फटाके उडवून झाले की मग आम्ही सगळी मुलं देवळात जायचो. घरि आलो की हॉलमध्ये खाली आजी आणि आईने फराळाची सगळी तयारी करुन ठेवलेली असायची. खास आम्हाला आवडतं म्हणून चकलीबरोबर घरचं लोणीही काढून ठेवायची. मग घरातले सगळे एकत्र बसून आम्ही त्या फराळाचा आनंद घेत असू. ह्म्म, गेले ते दिवस
|
Itgirl
| |
| Friday, October 19, 2007 - 9:34 am: |
| 
|
मस्तच बाफ़ आमच्याकडे पण फ़राळाचे पदार्थ बनवायला रात्री सुरुवात व्हायची, खूप वेगवेगळे पदार्थ, भरपूर प्रमाणात तयार व्हायचे. आज्जी आणि आई, दोघींचा हातच मोठा. कितीही केल तरी कमीच वाटायच त्यांना फ़राळ, शेजार्यांबरोबरच दुधवाला, वर्तमानपत्रवाला, भाजीवाली, कामवाली, नेहमीचा इस्त्रीवाला, बिल्डींगचा रखवालदार..झाडून सर्वांना जायचा. मला सगळ्यात चकल्या, कडबोळी आणि गुळाच्या करंज्या खूप आवडायच्या, अजूनही आवडतात. चवडे म्हणून एक प्रकार करत, ते ही. दिवाळीच्या पहाटे होणारे गोड पोहे पण एकदम चविष्ट असतात. फ़टाके मात्र मला फ़ारसे कधीच नाही आवडले, फ़क्त चंद्र ज्योती अजूनही आवडतात चंद्रज्योती उडवायला भुईनळे पण, प्रकाशाच झाड निघत ते बघायला खूप छान वाटत
|
Ana_meera
| |
| Friday, October 19, 2007 - 9:47 am: |
| 
|
खरच गेले ते दिवस... माझे लहानपण अगदी २० वर्षांपर्यंत लहान गावात गेले. ते घर, घरासमोरचे अंगण, शेणाचा सडा, त्यावर एरव्ही रोजच घातलेली पांढरी व दिवाळीतली रंगीत रांगोळी, बाहेरच्या भिंतीवरचे पणत्या ठेवण्यासाठी केलेले कोनाडे.... सगळे डोळ्यासमोर लख्ख दिसायला लागले.. दिवाळीच्या दिवशी पहाटे ४ लाच उठवले जाई.. मग अंघोळी बाहेर फटाके... मामा, मामी, मामेभावंडे मुंबैहून आलेले असायचे.. सान्ग्रस्न्गीत अंघोळी, अंघोळीत मध्येच आजीने कुंकू लावून ओवाळल की आपण कुणी ग्रेट आहोत असे वाटायचे.. बाहेर फटाके फुटतच असायचे अंघोळीच्या वेळी..... सातलाच बसायचे फराळाला... लाडू, चिवडा, करंजी करुन ठेवलेले असायचे. गरम चकल्या, कडबोळया सोबत घरचे लोणी, अन शिरा केल्या जायच्या.. मला चकली कडबोळी आवडतात फक्त.. जाम मजा जायची मुंबईचे पाहूणे जाईपर्यंत पार... मोहोल्ल्यात त्यांना मान असायचा अगदी...
|
Dakshina
| |
| Friday, October 19, 2007 - 10:07 am: |
| 
|
आमच्या घरी दिवाळीत फ़राळाचे पदार्थ कमी प्रमाणातच बनवले जात. पण शेजारी पाजारी खूप मोठ्या प्रमाणात बनवले जायचे त्यामूळे आमची चलती असायची. दिवाळीचं वातावरण हे खरंतर घटस्थापने अगोदर पासूनच सुरू होत. प्रत्येक घराबाहेरची जागा धुतलेल्या चादरींनी भरलेली असायची. गाद्या, उशा, जुन्या साड्या, ट्रंका.. सगळं बाहेर पडायचं उन्हं दाखवण्यासाठी. शिवाय घरात नवरात्र म्हटल्यावर त्यासाठी जागा हवी, त्यमुळे ट्रंका, टेबलं बाहेर. कोल्हापुरला, तर दसर्याअगोदर कडाकण्या करतात. आमच्याकडे ती पद्धत नाही, त्यामूळे आम्ही सगळ्या शेजार्यांकडे मदतीला जात असू. आणि त्यांच्यात पण आपापसात ठरलेलं असायचं की कोणाकडे कधी करायच्या ते. पाटावरच्या शेवया म्हणजे सुद्धा दिवाळीचं आकर्षण. ते पाट पण अदला बदली करून एकदा यांच्याकडे तर एकदा त्यांच्याकडे असे फ़िरत. पाटावर बसणार्या बायका किंवा मुली म्हणजे एकदम Expert समजल्या जायच्या काराण त्यात खरे कौशल्यं असते ना... ताटावर बसणार्या काही फ़ार कुशल नसल्या तरी चालायचं. मग नुसते बघे, आणि ताटं पाडून झाली की वाळत घालायला कौलांवर चढणारी एक गँग.... अशा प्रकारे दिवाळी जवळ आली, की बायकांची फ़क्त फ़राळाबद्दल चर्चा, आमचे काय राहीले, तुमचे काय झाले.... इत्यादी..बुंदी पाडून लाडू केले, कि रव्याचे, चिवडा पोहे फूलवून केला की तळून... अनेकानेक तोंडाला पाणी सुटवणार्या चर्चा.... चकल्या वगैरे जर करताना खाल्ल्या नाहीत तर त्यात काही मज्जा नाही त्यामूळे अमच्या शेजारच्या काकवा तर जास्तीचं पीठ करत, म्हणजे ते प्रमाण बरोब्बर होई...
|
Dakshina
| |
| Friday, October 19, 2007 - 10:24 am: |
| 
|
शेवटी शेवटी तर बायकांची खूप धांदल होई.. मग रात्रं रात्रं जागून फ़राळ करून संपवायचा... पण खरंतर तोपर्यंत तो करून करून नॉशिया... आलेला असायचा... तळकट वास, तुपकट ढेकर.... दिवाळीच्या आदल्या रात्री आमच्या गल्लीतली मोठी मुलं VCR आणायची आणि आम्ही अंगणात कुणाचा तरी TV लावायचो आणि सिनेमा पहायचो. त्यादिवशी कोणी झोपायचं नाही. एकतर रात्री उशिरापर्यंत फ़राळंच सुरू असायचा. मग उशिरा केव्हातरी तो सिनेमा लावायचा. तो संपला की मुलं अंघोळीच्या पाण्याची तयारी आणि मुली रांगोळीची तयारी करायच्या. पणत्या लावायच्या... रांगोळी तर ही मोठ्ठी... आणि ते पण सगळीकडे. कोल्हापूरला दिवाळीच्या आदल्या दिवशी बाजार रात्रभर उघडा असतो. उटणं, उदबत्त्या आणि रांगोळीचे रंग ही खरेदी स्पेशल त्याच दिवशी करायचो आम्ही. आणि दिवाळीच्या दिवशी पहाटे उठून तेल बिल लावून अंघोळ झाली की नविन ड्रेस घालायचा... जो घेऊन बरेच दिवस घालायची वाट पहात ठेवलेला असतो... मग आम्ही, अंबाबाईच्या देवळात जायचो.. भाऊसिंगजी रोडला झेंडूच्या फूलांच्या राशी हे माझं दिवाळीशी असलेलं मोठ्ठं asociation आहे. दिवाळी म्हटलं की मला त्या झेंडूच्या फूलांच्या राशीच आठवतात. दिवाळीतलं ते वातावरण मी पूण्यात कधीच अनुभवलं नाही. देवळात खूप नातेवाईक भेटायचे, ओळखीचे लोक भेटायचे, किन्वा परतताना आम्ही कुणाकडे तरी जायचो. साधारण १० वाजता घरी परत आलं की खाणं, म्हणजे, सगळा फ़राळ आणि दही भात....खाऊन जे झोपायचं ते संध्याकाळीच उठायचं.... माझ्याबरोबरीची सगळी मुलं संध्याकाळची अगदी आतूरतेनं वाट पहात, कारण फटाके उडवण्याची वेळ... मला मात्रं लहानपणापासूनच फटाक्यांची प्रचंड भिती वाटते. तुमचा विश्वास नाही बसणार पण मी कधी एक साधी केप पण नाही उडवलेली....
|
Zakasrao
| |
| Friday, October 19, 2007 - 10:28 am: |
| 
|
बी मस्त बीबी उघडलास रे. दक्षिणा महाद्वार रोड बद्दल नाय लिहिलस? कडाकण्या संपल्या तरी वाइट नाही वाटायच कारण तोवर दिवाळीची तयारी हळुहळु सुरु झालेली असायचीच.
|
Dakshina
| |
| Friday, October 19, 2007 - 10:37 am: |
| 
|
फ़राळात विशेष आवडणारा असा काही पदार्थ नाही पण त्यातल्या त्यात मला चकली आणि चिवडा जास्तं आवडतो. आम्ही येता जाता चिवड्याचा डबा उघडून त्यातलं खोबरं खायचो, खोबरं संपलं की शेंगदाणे... आणि ते ही संपले की मग नाईलाजास्तव डाळं...
|
Dakshina
| |
| Friday, October 19, 2007 - 10:40 am: |
| 
|
झकास, महाद्वार रोडची आठवण करून देऊन अजुन Nostalgic केलेस. खरंच रे मी कोल्हापूरची दिवाळी फ़ार मिस करते.. माझ्याकडून राहीलं तू लिही की महाद्वार रोडबद्दल...
|
Sush
| |
| Friday, October 19, 2007 - 10:46 am: |
| 
|
bee सर्वप्रथम तुझे धन्यवाद मानायला हवेत एव्हडा छन bb उघड्ल्याबद्दल. वाचुन जुने दिवस आठवले. ५ दिवसान्ची दिवाळी म्हणुन बाबा फटाक्यांचे ५ भाग करुन देत असत. रोज एक भाग उडवायचा. दिवाळि-दसर्याच्या खुप आठवणी आहेत.
|
Bsk
| |
| Friday, October 19, 2007 - 12:15 pm: |
| 
|
व्वा.. मस्त बीबी! दिवाळी,फटाके आणि फराळ..आणि किल्ला! दिवाळीच्या थोडंसं अगोदर आमचा किल्ला करणं चालू होई..बिल्डींग मधील सगळी पोरं-टोरं जमून आधी माती शोधून आणयची. ती माती चाळायचे काम माझ्याकडे! मग हळू हळू किल्ला तयार व्हायचा..फटाके आणले जायचे. नरकचतुर्दशीला तर काय धमालच उडायची! सगळ्यात पहीला फटाका कोण उडवणार, ही पैज तर नेहेमीचीच..मी सगळ्यात लहान असल्याने,(आणि लहानपणापासून कधीच लवकर उठणे न जमल्याने, पहीला फटाका फुटला की मी दचकून जागी व्हायचे.. आंघोळ पण उरकावीशी वाटयची.. ती थंडी.. बापरे बाप.. त्यात आईला ओवाळायचं असते.. कसं-बसं आवरून खाली आलं की मस्त्-पैकी २ एक तास फटाके उडवायचो आम्ही.. लहान असून सगळ्यात आधी फटाके मीच उडवले! बिल्डींगमधले सगळे मित्र-मैत्रीणी घाबरत असताना तोर्यात पुढे जाऊन सुतळी किंवा लक्श्मी,लवंगी फटाका लावून यायचे मी! शेवटी मोठ्ठ्यांच्या हाका आल्या की घरी पळयचो..८च्या सुमारास.. मग शेजारचे आणि आम्ही, एकत्र फराळ करायचो..आणि मग मी,दादा आणि आई-बाबा दशभुजा गणपतीच्या दर्शानाला जायचो..दादा नंतर त्याच्या ग्रुप बरोबर सारसबागेत जायचा.. मला कधीच नाही जाता आलं तसं.. लहान असताना दादाच आईला मदत करायचा फराळ करायला, पण तो अमेरीकेत गेल्यावर मी करायला लागले.. चकळी पाडून देणं,शंकरपाळ्या किंवा करंजी लाटून देणं..कधी काम केलं नाही, पण दिवाळीमधे आवर्जुन करायचे! आवडीचा फराळ म्हणजे, बेसनाचा लाडू, दही-चकली आणि आईच्या हातचा चिवडा.. तो पातळ पोह्यांचा असेल तर जास्तच! खूप खूप मस्त दिवस होते ते! आता कुणी मित्र-मैत्रिणी पण नाही राहीले इथे.. वातावरण फारसं काही उत्साही नसतं.. i really miss those days! 
|
Aditih
| |
| Friday, October 19, 2007 - 12:30 pm: |
| 
|
खरंच रे बी, छान बीबी चालू केलास. आताही दिवाळी छान असते. उत्साह असतो, आनंद असतो पण लहानपणीची दिवाळीची मजा आता नाही येणार.आता ना ते घर राहिलं आणि ती माणसं आहेत आजुबाजुला. आता फक्त आठवायचं ते सगळं. मी लहानाची मोठी कोकणात झाले.तिथे दिवाळी ही घाटावर होते तेवढी मोठी नसायची.पण आमच्या घरी व्ह्यायची मात्र मोठी. एकतर आमचं गाव गोव्याच्या खुप जवळ होतं. त्यामुळे आमच्याकडे शाळांना सुट्टी लागली की बरेच पाहुणे यायचे. गोवा, कोकण फिरायला म्हणुन. त्यामुळे घरी भरपूर मंडळी असायची. नरक चतुर्दशी च्या आदल्या रात्री गावात नरकासुर करून त्याचं दहन. मग पहाटे उठून अख्ख्या गच्चीच्या कडेने मेणबत्त्या लावायच्या.अंगणात पणत्या लावायच्या. घर कसं लख्ख उजळून निघायचं. घराचं ते देखणं रुप अजुन आहे मनात, डोळ्यात. मग तेल, उटणं लावून अभ्यंगस्नान.अंगण खुप मोठं होतं त्यामुळे आईची रांगोळी पण भलीमोठी असायची. कधी विष्णूलक्ष्मी, शंकर पार्वती, गणपती असे बरेच देवदेवता तिच्या रांगोळीतुन उतरायचे अंगणात. तेही मोजक्या वेळात. फराळाआधी फटाके उडवणे कार्यक्रम असायचा. दादाचं बघून मीही हातात माळ पेटवून फुटायच्या आत फेकायची असले प्रयत्न करायचे.मजा असायची. फुलबाज्या पेटवून त्याची काडी वाकवायची आणि झाडावर फेकायची. कुणाची जास्त ऊंच जाते तो सही. ते झालं की पुढची फराळाची तयारी. आई बाबा मुळात घाटावरचे असले तरी कोकणात रहायला येउन दशक लोटलं होतं. त्यामुळे कोकणातल्या रितीभाती आपोआप घरात आल्या होत्या. कोकणात दिवाळीच्या पहिल्या दिवशी फराळ तर करतातच पण नॆवेद्य असतो तो पोह्यांचा. त्याच असं आहे की त्या वर्षीचा भाताचा हंगाम नुकताच संपलेला असतो. त्या नवीन भाताचे पहिले पोहे देवाला ह्यादिवशी नेवेद्य दाखवूनच मग खाल्ले जातात. गूळ खोबर्याचे पोहे, फोडणीचे पोहे, हिंग खोबर्याचे पोहे असे बरेच पोह्याचे प्रकार केले जातात.त्यांचा आणि फराळाचा नॆवेद्य . सर्वात सही प्रकार म्हणजे हे पोहे म्हणजे आपले नेहमीचे दिसणारे पांढरे पोहे नसतात.हे लाल गावठी पोहे असत्तात. चवीला अत्यंत सरस ह्या नेहमीच्या पोह्यांपेक्षा. आमच्या घरासमोरच एक पोह्याची गिरणी होती. दिवाळी जवळ आली की तिथे खुप गर्दी असायची. आम्ही मुलं खेळता खेळता त्या गिरणीत लपायलाही जायचो आणि येता येता काका मूठभर गरम गरम भट्टीतले पोहे द्यायचे हातात तेही खाऊन यायचो. खुप आवडायचे ते ताजे पोहे. (बहुतेक म्हणून ती जागाही आवडायची लपायला.गिरणी पण भली मोठी असल्याने कोणाला त्याचा त्रास नाही व्हायचा.आई बाबाच रागवायचे कधीतरी सारखे नका तिकडे जाऊ म्हणुन.) तर असा पोहे आणि चकली, चिवडा, लाडू, शंकरपाळी असा सगळा फराळ व्हायचा. संध्याकाळी लक्ष्मीपूजन असायचं. मस्त नवीन कपडे घालून मिरवायचं. बाकी पूजेपाशी माझी लुड्बूड नसायची.बाहेर अंगणात मॆत्रिणी किंवा आलेल्या पाहुण्यामधले समवयस्क मिळून धिंगाणा चालू असे. पाडव्याला मला लहानपणी काही खास मॊज वाटत नसे. सहाजीक आहे म्हणा पाडव्याची खरी मॊज आता. कमाई असते ना... आई छान छान पदार्थ करायची मात्र.बाबाही येइल त्याला आत बोलावून काही ना काही तरी खायला लावायचे. आमच्या घरासमोर एक गॅरेज होत. तिथे काम करणारी मुलं बाहेर गावची होती. ती दिवाळीला त्यांच्या घरी नसत जात. मग बाबा त्यांना घरी बोलवायचे फराळाला. खुश व्ह्यायची ती मुलं एकदम. आईच्या हाताला चवच तशी आहे म्हणा. तेव्हा भाऊबीजेला मात्र खुप मजा यायची. दादाला तेल लावून अंघोळ. चांगला रगडून घ्यायचा माझ्याकडून.पण मलाही मजा वाटायची. मग ओवाळायचं, ओवाळणी घ्यायची. मजा होती. अशी जायची आमची दिवाळी. आता देशाबाहेर असतो. घरी सगळं करते मी फरा्ळाचं. मित्र, मॆत्रीणी जमतो, मजा करतो. पण मन मात्र आठवत बसतं ते दिवस. आता बांद्यातलं ते घर पण नाही आणि बाबाही नाहीत म्हणजे ते दिवस पुन्हा कधीच दिसणार नाहीत. म्हणून की काय माहीत नाही पण त्या रम्य आठवणी असूनही मन त्यात न रमता कातर होतं. ते ही नो दिवसः गत:!!!!
|
Dakshina
| |
| Friday, October 19, 2007 - 12:43 pm: |
| 
|
मोठे होत जाऊ तशी दिवाळीची मनातली रंगत कमी होत जाते आणि आठवणी मात्रं तशाच रहातात. बोचरं वातावरण सुरू झालं, सकाळी थोडं थोडं धुकं पाडायला लागलं की समजावं दिवाळी आली... सुर्य लवकर बुडायला लागला, रात्रं मोठी झाली, सकाळी लवकर उठावसं वाटेना झालं की समजावं दिवाळी आली... दिवाळीची खूप लक्षणं आहेत.गरम गरम खाणं, गरम गरम पांघरूण.. दुरून येणारा फटाक्यांचा आवाज, धूर.....फटाक्यांवरून आठवलं... कसं काय माहीती पण मला पहील्यापासूनच फटाकड्या उडवायला आवडत नाहीत. आवाजाची प्रचंड भिती वाटते. पुढच्या दरवाज्यात कोणी उडवत असेल तर मी थेट मागच्या दरवाज्यात. एकदा दिवाळीच्या सुट्टीत आम्ही माझ्या आत्याच्या सासरी, तळेगावला गेलेलो, तिथे मला जबरदस्तीने काकांनी माळ उडवायला लावली होती, मी उदबत्ती टोकाला लावल्या न लावल्या सारखी केली आणि धूम, बाथरूम मधे आणि कानावर गच्चं हात..... माझ्या बाबांच्या मते मी अत्यंत खर्चिक आहे, पण ते मान्य करतात की 'फटाकड्या' ही एकंच गोष्टं आहे ज्यावर मी त्यांना कधीच खर्चं करायला लावला नाही..... शाळेत असताना मात्रं मला दिवाळीची सुट्टी फ़ार नाही आवडायची, कारण सहामाहीच्या रिझल्टची धाकधूक असायची ना मनात कुठेतरी... आणि मुख्य म्हणजे वर्गशिक्षकांनी 'घरचा अभ्यास' नावाचा (डोक्याला ताप) प्रकार दिलेला असायचा... तो आज करू, उद्या करू, असं करत मी तर अगदी शेवटच्या दिवशी पर्यंत सुद्धा ढकलायची...
|
अग दक्षिना तुला " फटाकड्यां " वर खर्च करायची गरजच नाही. ते भोग आम्हा मुलांनाच. ~D दिवाळी आधी दसरा. दसर्याची तयारी करन्यासाठी माझे वडील मला बाजारात पाठवायचे. (म्हनजे अजुनही मी जर देशात असेल तर मलाच जावे लागते). ते फुल घेन वैगरे भारी असायच. मी एकटाच न घासघीस करता पैसे दयायचो त्यामुळे (आमच्या बाजुला राहनारी माझी मावशी म्हणायची केदार ला व्यवहार ज्ञान नाही, आता बायको म्हणते). अरे त्यांचाशी या वेळी काय घासाघीस करता. फुल बिल लावायचे, तोरन लावायचे वैगरे झाले की दसर्याच्या दिवशी सकाळी पाच ला वैगरे उठुन वडिल व आम्ही भावंड प्रसिध्द अशा बालाजी मंदीरात दर्शन घ्यायाला जायचो. तिथे जबरी रांग असते. निदान ३ तास लागतात दसर्याच्या दिवशी. नंतर सिमोलंघन. जेवनात हमखास वारणा व नंतर चितळे श्रिखंड. संध्याकाळी रावन दहन असला भरगच्च कार्यक्रम असायचा. आता परदेशी राहात असल्यामुळे वडिल ही रावन दहनाला जात नाहीत पण बाकी कार्यक्रम तोच. ड्रेस ही नविन असायचे. आम्ही तिघ व वडील असे चोघही सलवार कमीज मध्ये असायचो बहुतेक. नंतर ओवाळने वैगरे. जबरीच असायच. (माझी पोरगी मात्र हे सर्व मुकतेय). दिवाळीच्या पहील्या दिवशी मात्र कोण सुतळी बॉम्ब पहीले फोडेल (लावेल) यात शर्यत असायची. साधारन रात्री २ किंवा अडीच ला पहीला बॉम्ब फुटायचा मग नंतर चालुच. आम्ही तिघे ही आवाजचे शोकीन म्हणुन निदान २०० सुतळी बॉम्ब ( गावठी) आम्ही घेतो. २००६ च्या दिवाळीत मात्र १०० च घेतले. आता बॉम्ब जास्त फोडावेसे वाटत नाहीत. एक गोष्त मात्र आम्हा भावंडात कधीही घडली नाहे ती म्हणजे फटाके चोरने. (जाम मजा असेल त्यात ही) कारण वडील खुप सारे फटाके आनायचे ते नंतर संपत नाहीत म्हणुन आम्ही एकाच वेळी सुतळी बॉम्बची लहड करुन (एकमेकांना जोडुन) लावुन पाहायचो. गेले ते दिन गेले.
|
Manuswini
| |
| Friday, October 19, 2007 - 11:40 pm: |
| 
|
यार झकास बीबी आहे हा! बरेच नंतर लिहीन... पण पहाटे चार वाजता मोठ्या बहिणीने शेवटी मस्करीत ओढून काढलेली चादर नी चेहर्यावर ओतलेले थंड पाणी अजून लक्षात आहे. कारण काय तर सगळ्यात शेवटी घरात मीच एक आळशी बाकी होती अंघोळ करायची. वय वर्षे १०. पहीला फटाका friends मध्ये कोणी लावला ह्याचा record , कोणाच्या चकल्या चांगल्या असायच्या वगैरे वगैरे.
|
Itgirl
| |
| Saturday, October 20, 2007 - 3:04 am: |
| 
|
छान लिहिल आहेस ग आदिती सगळ्यांनीच छन लिहिलय
|
CKP लोकांचे रंगीबेरंगी चिरोटे जबरदस्तं असतात !! करंज्या ओल्या नारळाच्या , खवा घालून केलेल्या आणि एकदम ठासून भरलेल्या आवडतात नाही तर काही लोकांच्या करंज्या खुळखुळ्या सारख्या चमचा भर सारणात केलेल्या असतात ! शिवाय उगीच भरमसाट साखर किंवा बेदाणे न टाकता केलेला crispy तिखट चिवडा , त्यातून चावुन खाल्ले जातील असे हिरव्या मीरचीचे एकदम बारीक तुकडे असतील तर अजुन चांगले ! चिवड्या मधे खोबरं मला फ़ारसं आवडत नाही , दाणे डाळं असावं पण भरमसाट नाही !! चिवड्या मधे अगदी थोडे तीळ आणि खसखस मस्तं लागते !! चकल्या 2 प्रकारच्या आवडतात , एक typical भाजणीच्या कुरकुरीत आणि विदर्भात करतात तशा लसुण चकल्या , लसुण शेव पण अतिशय आवडती !! आनारसे गुळाचे च आवडतात , विदर्भात करतात ते साखरेचे नाही आवडत अजिबात ! लाडु फ़क्त बेसनाचा , छान साजुक तूपातला , वरुन काजुचा तुकडा लावलेला . शंकरपाळी गोड आणि खारी दोन्ही खूप आवडतात !! दिवाळीत लक्ष्मी पूजना नंतर building मधे सगळे फ़राळाची ताटं exchange करतात .. काही ताटं बघूनच चविष्ट आहेत ते कळतात .. मस्तं सुबक मांडलेली !! मुंबाईला अत्या कडे दिवाळीला गेलं कि building अम्धले non hindu लोकही तेवढीच उत्साहानी दिवाळी celebarte करताना दिसतात .. त्यांच्या कडूनही फ़राळाची ताटं येतात , त्यात जास्त करून sweets, imported chocolates, salty snacks जास्त असायचे ! दिवाळीचा फ़राळ खाउन कंटाळा आला कि मग friends ना घरी बोलावुन इडली सांबार - डोसे - बाटाटे वडे अशा snack parties करायचो आम्ही गये वोह दिन
|
Manuswini
| |
| Sunday, October 21, 2007 - 2:41 am: |
| 
|
दिवाळीच्या गोड आठवणी बर्याच आहेत. इथे आल्यावर अशी दिवाळी मजा नाहीच येत. ह्या सर्व खालील आठवणी लहानपणीच्या आहेत. आता जमेल तशी दिवाळी करतो पण सर्व जण पसरलेले असल्याने फोनवर wish करून fedex जाते फराळाचे. असो. बरेच लिहिण्यासारखे आहे. आईचे ते घर साफ़ करून घेणे, सर्व कपाटे पुन्हा सुंदर रीतीने लावणे. जोरदार shooping घरातील bank manager aka पप्पा फक्त money source असायचेआहेत. अजूनही मी तरी पैसे मागते त्यांच्याकडे दिवाळी shooping ला . आई अजूनही हे पदार्थ प्रामुख्याने करते न चुकता. *आईचा फ़ेव पदार्थ साठ्याच्या करंज्या आणि हा एक असा पदार्थ आहे के मला फक्त माझ्या आईच्या हातचा'च' आवडतो. टम्म पंचसारणाने भरलेली साठाची त्री रंगी करंजी,तीचे अतीशय खुसखुशीत पारी आहाहा.(मी ह्याची रेसीपी इथे दीलीय). मग त्या दिवशीच चीरोटे करणे प्रकार, हे सर्व रात्रीच चालायचे. थोडेसे मोठे झालो तेव्हा मग आईला मदत करायला लागलो नाहीतर आईच एकटी करायची. सर्व आधीच ठरले असायचे आईचे कधी कोणत्या दिवशी काय काय करायचे, कीती वाजता चकली करायला बसायचे त्या अंदाजाने ती जेवणं आटपून बसायची. * चकली हा दुसरा प्रकार *मग तिखट शेव *चिवडा,पातळ पोह्याचा. *नानकटाई हमखास आई करायची नी भट्टीतच भाजून आणायची. मावशी वगैरे मिळून करायचो. *गोडच शंकरपाळ्या आवडतात. *आईच्या हातचा जाळीदर अनारसा specially गावच्या जुन्या तांदूळाचा. ह्याचा वास खुप सुंगध येतो. जेव्हा थापून तळताना. * लाडवांमध्ये मूग, बेसन नी रवा असा क्रम आहे आवडीचा. कोकणात मूगाचे लाडू असतातच. बेसन लाडू हा मला अजीबात कुणाकडचा आवडत नाही, this may sound arrogant पण बहुतेकदा बेसन हे कच्चे नाहीतर तूपकट गोळाच असतो लोकांकडे हा माझा अनुभव. मला रवेदर खुसखुशीत लाडू आवडतो चहाबरोबर. मी केलेला बेसन लाडू मात्र मला आवडतो आईनंतर self prasing here मला कधीच लोकांच्या घरचा पदार्थ आवडले नाहीत for whatsoever reason . आईच्या पदार्था व्यातिरीक्त दुसरा नंबरात माझी आजी, माझी मोठी मावशीकडचा मूगाचा लाडू,दुसर्या आत्येकडची कुरकुरीत चकली,दुसर्यामावशीकडची नानकटाई,मोठ्या आत्येचा रवा लाडू हा प्रमुख्याने मस्तच.दुसर्या मावशीकडचा जाड्या पोह्याचा घरी तळून केलेला चिवडा हा मला जबर्दस्त आवडायचा. आई पातळ पोह्याचा करायची कारण तीला तो आवडायचा. माझ्या सर्व मावशी नी आत्येकडचा फराळ चविष्ट असायचा. त्या तर एकदम सुग्रण त्यामुळे भाऊबीजेला आत्येकडे गेलो की तिकडचे पदार्थ खण्यात मजा. फराळ वाटप काम आई आमच्यावर सोपवायची जर जवळच्या तिच्या मैत्रीणींना द्यायचे असेल तर. फटाके मला अजीबात कधीच आवडले नाही, माहीत नाही पण एकदा लहानपणी चुकून चप्पल न घालता दिवाळीत खेळायला गेले नी पुर्ण पावूल जळले होते नी मोठा खड्डा पडून पाय भाजला होता. न जळलेला बॉम एकदम उडाला नी पाय त्याच्यावर असल्याने खड्डा पडला. अजूनही ती तळव्यावर खूण आहे. बरेच दिवस चालु शकत न्हवते, त्यामुळे मला फट्यांकाचा तसा रागच आहे. त्याच्यामुळेच फटाके हे तसेही मला कधीच आवडले नाही; ध्वनी प्रदूषण नी air pollution ह्याच्याशिवाय काहीच अर्थ नाही असे मला वाटते. दिवाळीच्या दिवशी आई नारळाचा रस काढून तीळ कुटून उटण्यात mix करून आधी आम्हा भांवडाना अंघोळ घालायची. कार्टे डाव्या पायाने तुळशीसमोर त्याआधी आईचे ओवाळणे,नवीन dress घालून पप्पांना दाखवणे आद्धी वगैरे वगैरे.मग फराळाला सुरवात. अर्थात सगळ्यात शेवटी माझीच अंघोळ असायची(आळशी नं: १ होते लहानपणी,म्हणजे भरपूर झोपायला आवडायचे ). गोड पोहे मला,बहिणीला तिखट पोहे, गावचे लाल जाडे पोहे खुप चविष्ट लागतात्ए नुसते चहात बूडवून पण छान लागतात. गावी तर आजी हे घरी बनवायचे आधी सुरवातीला. दुपारी जेवणात वेज बिर्यानी कायम असा मेनु असायचा दिवाळीच्या दिवशी. संध्याकाळी लक्ष्मीपूजनाची तयारी. वगैरे वगैरे. माझ्या मोठ्या बहिणी पन एकदम उस्ताड फराळ बनवण्यात. त्यामुळे माझ्या हातचे खण्यापेक्षा त्यांचा हातचे छान वाटते इथे खायला. आई अजुनही बनवते पण खुप कमी प्रमाणात. आता इथे काय चक्क १० ला अंघोळ,जमेल तसे तीन चार पदार्थ आम्ही बहिणी करतो. बाकी जुन्या आठवणींवर आवंढे गिळतो. अरे हो एक महत्वाचे राहीलेच, त्यात मला मिरवायला मिळायचे, "रांगोळी" काढणे हा माझा हक्क होता. बहिणीनी काढली तरी आई अगदी मनु तुच काढ ग, संध्याकाळी परत नविन छानशी. कारण हा प्रकर मला खुप आवडतो नी मी खरोखर छान काढते ही माझ्या अईचे नी मावशीचे म्हणणे. सकाळी माझ्या घरी झाली की फराळ आटपून दर दिवाळीत पाच दिवस दुपारी मावशीची रांगोळी असे माझ्याकडून करवोन घेतले जायचे, तेव्हढेच कौतूक म्हणून मी पण अगदी पुढे पुढे.
|
Ana_meera
| |
| Monday, October 22, 2007 - 5:22 am: |
| 
|
मनू किती ग छान, सविSSSस्तर लिहीलस.. आठवणींना उजाळा मिळाला..
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|