Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 07, 2007

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट - अचाट आणि अतर्क्य » जिस्म व इतर असेच » Archive through September 07, 2007 « Previous Next »

Farend
Thursday, September 06, 2007 - 10:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा सगळा रिव्यू फक्त 'जिस्म' या एकाच चित्रपटाचा नाही, 'जिस्म', 'रोग', 'क्रिमिनल' व इतर अनेक महेश भट किंवा विक्रम भट आणि इतर नेहमीचेच (अ)यशस्वी यांचे चित्रपट पाहिले आणि त्यात ज्या कायम दिसणार्‍या गोष्टी आहेत त्याबद्दल हे आहे. असे चित्रपट पाहताना सतत जो वैताग येत असतो त्याचे असंबद्ध वर्णन समजा:-)

या सर्व चित्रपटांत सहसा ठोकळेबाज अभिनेते असतात, जॉन अब्राहम, अश्मित पटेल, डिनो मोरिया बरेचसे मुळचे मॉडेल्स. नायिकाही तशाच. यांना इतर कोणते रोल झेपणार नाहीत म्हणून शक्यतो उच्चभ्रू: लोकांचेच रोल त्यांना देतात, म्हणजे श्रीमंत व्यक्तींचे... फॅशन डिझाइनर, वकील, बिझिनेसमन वगैरे. फॅशन ची थोडीफार जाण असलेल्या आणि कदाचित त्यामुळेच ही मॉडेल्स आवडणार्‍या प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवून बहुधा हे चित्रपट काढण्यात येतात.

यांच्या रिव्यू मधे सुद्धा कधी कधी असा सूर असतो की काहीतरी वेगळा चित्रपट काढत आहेत. आम्ही हिन्दी चित्रपटसृष्टीला काही वेगळे चित्रपट देतो, म्हणजे आम्ही जरा वेगळे हॉलीवूड चे चित्रपट ढापतो असा अर्थ घ्यायचा.

हे चित्रपट नेहमी धूसर आणि अंधारात असतात. मुळात या पठडीतील चित्रपट म्हणजे लख्ख प्रकाश, कोणी कोणाकडे बघून प्रसन्न हसणे, आनंदी गाणी, एकही व्यसन नसलेला नायक किंवा नायिका (पूर्वी चित्रपटांत सद्गुणांचा पुतळा असलेल्या नायकांची चलती होती, मग human flaws दाखवायचे म्हणून काहीतरी वाईट सवयी दाखवू लागले, आता त्याचाही अतिरेक होतोय), फक्त नवरा बायकोचे एकमेकांशी प्रेम वगैरे अपेक्षा ठेवायच्या नाहीत. कायम उत्तर किंवा दक्षिण धृवावर हिवाळ्यात हे चित्रपट बहुधा चित्रीत होतात, कारण सतत संधिप्रकाश किंवा अंधार असतो.

त्यात M M Kreem चे संगीत, ज्यातील गाणी कायम गूढ दबल्या आवाजात म्हंटलेली वाटतात. प्रत्येक शब्द उच्चारताना अनंत यातना होत असल्यासारखे चेहरे करून जशी गाणी म्हणतात आणि म्युझिक पीस चालू असताना डोळे बंद करून 'नाही नाही' सारखी मान हलवतात तशी. अरे एक दोनदा ठीक आहे, एकदा तरी 'बचना ऐ हसीनो' सारखे अगदी आर्डीच्या दणदणाटाच्या ही वर आवाज लावलेले आणि तरीही श्रवणीय झालेले गाणे करून दाखवा? ही गज़ल युक्त गाणी आणि कथेतील विवाह बाह्य संबंध यांचे इतके समीकरण आपल्या चित्रपट वाल्यांनी करून ठेवले आहे की यातील एक असले की दुसरे असलेच पाहिजे.

'जिस्म' यातलाच. नायक, नायिका सगळेच गूढ, कसलेतरी दु:ख घेउन वावरणारे, त्यामुळे दारू, सिगरेट ओघाने आलेच. जॉन अब्राहम कायम अर्धा उघडा. ठीक आहे, व्यायाम वगैरे केला असेल, म्हणून काट्याने फळाचा तुकडा उचलताना सुद्धा जिम मधे डंबेल उचलताना स्वत:च्या दंडाकडे बघतात तशी पोज? बिपाशा बासू संपूर्ण चित्रपटभर उसासे टाकत फिरते. तिची एन्ट्री थेट त्या बॉन्डपटातल्या नायिके सारखी समुद्राच्या लाटांतून एकदम उठून फ्रेमच्या खालच्या उजव्या किंवा डाव्या कोपर्‍यात नज़र लावत त्या सगळ्या किनार्‍यावर नायक एकटाच असला (भारतात! आणि बहुधा ती तशी रोज जाते हे जगजाहीर असूनही :-) ) तरी त्याला साधे 'हाय' न म्हणता त्याच्या शेजारून जाणारी.

त्यानंतर ती त्याला कायम 'अचानक' दिसते. त्यामुळे जॉन अब्राहम चे पहिले १५-२० मिनिटे सोलो शॉट्स एवढेच आहेत की कोणतेतरी फॅशन टाईप कपडे घालून चालायचे आणि अचानक एका बाजूला बघून चमकल्यासारखे करायचे. मग ही तेथे ते ग्लासला लिंबाची चकती वगैरे लावलेले ज्यूस किंवा इतर काय काय पीत बसलेली असणार. मग पुढचे शॉट साधारण पूर्वीचे हिन्दी भटकती आत्मापट जसे पांढरी साडीवाली दिवा घेऊन चाललेली आणि नायक खालच्या मजल्यावर असताना वरच्या मजल्यावर आणि तो वरती आला की आणखी तिसरीकडेच दिसणारी नायिका दाखवत तसे काही शॉट्स. त्यात ही कायम नवर्‍याकडून hurt असलेल्या अवस्थेतील हावभाव चेहर्‍यावर आणते. एखाद्या चित्रपटात कथेप्रेमाणे तसे प्रसंग समजू शकतो. पण या (बर्‍याचश्या भट गॅंग च्या) चित्रपटांमधे प्रसन्न लोक आणि दिलखुलास प्रसंग कधी दिसतच नाहीत. कायम रोगट हवामान.

नेपथ्य ही ठरावीक्: दारू च्या वेगवेगळ्या बाटल्या, सिगरेट्स, सेन्सॉर चालवून घेईल इतपत उघडे लोक, भिंतींना निळे जांभळे रंग, Ikea, Scandinavian Designs पासून ते अगदी तुळशीबागेपर्यंत जिथुन तिथून शोधून आणलेली विचित्र आकाराची फर्निचर्स, जिथे तिथे लावलेल्या आणि मशाली सारख्या पेटलेल्या मेणबत्त्या, कोठेतरी पाण्यात फुलेच टाकलेली, उरलेल्या गोष्टी दिसतील न दिसतील एवढाच उजेड! सूर्योदयाच्या शॉटलाही संधिप्रकाश.

आता नायकाच्या किंवा नायिकेच्या मनाची अवस्था दाखवताना मागे 'डार्क' वातावरण वगैरे कधीतरी ठीक आहे, इथे त्याचा एवढा अतिरेक होतो की उलटे त्या वातवरणानेच हे लोक असे वागतात असे वाटते :-)

आता कथा म्हणजे कोणत्यातरी इंग्रजी चित्रपटावरून घेतली असावी (पण लेखक महेश भट). जॉन अब्राहम म्हणे वकील आहे. तो अमिताभचे शराबीचे पिण्याचे रेकॉर्ड पहिल्या १०-१५ मिनीटातच मोडतो. हा एका पकडलेल्या गुन्हेगाराला 'गुन्हा कर पण पकडला जाऊ नको' असे तत्त्वज्ञान ऐकवतो. वकिलाने भावी 'गिर्‍हाईकास' पकडले जाऊ नये म्हणून सल्ला देणे हे अफलातून मार्केटिंग आहे! पण त्याने तसे बरे काम केले आहे. बिपाशा गुलशन ग्रोवर ची बायको, गुलशन ग्रोव्हर श्रीमंत बिझिनेसमन म्हंटल्यावर पुढचे सांगायलाच नको. ही प्रचंड मोठ्या घरात एकटीच रहते, फारसे कोणी नोकर वगैरे नाहीत. आणि हे सर्व तिची सांगायची स्टाईल हॉरर पिक्चर मधे जिवंत असावी असे वाटणारी व्यक्ती पडक्या वाड्याबद्दल ज्या उत्साहाने माहिती देते तशी. आणि घर एव्हढे की नुसत्या मेणबत्त्यांचा मेन्टेनंस करायला एक पूर्णवेळ नोकर लागेल. आणि वेळ कशी घालवते तर म्हणे तिच्याकडे windchimes आहेत. एरव्ही सदैव अफेअर करण्याच्या तयारीत बारमधे किंवा रेस्टॉरंटमधे एकटीच बसलेली असते.

जॉन अब्राहम व तिला एकदम साक्षात्कार होतो की 'यू छुप छुप कर कबतक...'. त्यामुळे ते तिच्या नवर्‍याला मारायचा बेत आखतात. त्याने म्हणे तिच्याकडून लिहून घेतलेले असते की जर त्याला तिने घटस्फोट दिला, तर तिला एकही पैसा मिळणार नाही. हे बरे आहे, म्हणजे एखाद्या गुंडा टोळीने त्यांच्या नवीन मेंबर कडून लिहून घेतले की 'टोळी सोडल्यावर सदरहू इसमास मारून टाकणेत येईल', तर ते कायद्याने मान्य झाले काय? मग अशा पद्धतीचे एकदम predictable शॉट्स. मी अधून मधून अंदाज लावत होतो पुढच्या डॉयलॉग बद्दल आणि ते अचूक ठरत होते. उदा: या विषयावर बोलताना ती एकदा म्हणते 'मुझे डर लगता है'. मग जॉन अब्राहम विचारतो 'किस से?' अशा कॉम्प्लेक्स व्यक्तिमत्त्वांच्या संवादात तो डर कोणापासून असतो हे उघड असते, मी अन्दाज लावला आणि बरोबर निघाला: तो डर तिला 'अपने आपसे'च होता :-) आणि मुळात गुलशन ग्रोव्हर ला मारायचे कारण या दोघांना मुक्तपणे भेटता येत नाही म्हणून की त्याची इस्टेट हवी म्हणून की दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते म्हणून तेच कळत नाही.

आणि मग उरलेला अर्धा चित्रपट जॉन अब्राहम आपले प्रेमात पडल्याने कसे नुकसान झाले हे आळवत बसतो, प्रत्येक पोज थेट Sheraton, Hyatt च्या बीच हॉटेल्सच्या जाहिरातीसारखी, फक्त रडका चेहरा सोडून. रडण्याचा अभिनय ही थेट पूर्वी दिलीप कुमार ची स्टाईल मारणारे इतर नायक डोले किलकिले करून ओठ थरथरवत रडायचे तशी.

आणखी एक शॉट ही खूप विनोदी आहे, कारण डबिंग चुकलेले वाटते. बिपाशा फोनवर उत्तर देत नाही म्हणून हातातील दारूचा ग्लास तो खाली आपटतो. मग काहीतरी फुटल्याचा आवाज यायला पहिजे, पण प्रत्यक्षात तो ग्लास उसळत्या चेंडूसारखा परत वर उडतो आणि तो खाली पडत (फ्रेम मधे दिसत) असतानाच काच फुटल्याचा आवाज येतो. म्हणजे आपल्याला दिवाळीत लांबचा एखादा आकाशात उडालेला फटाका आधी फुटताना दिसतो आणि नंतर त्याचा आवाज येतो, हे त्याच्या उलटे.




Mahaguru
Friday, September 07, 2007 - 12:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लै भारी! ..एकदम भन्नाट लिहले आहे.

Mrinmayee
Friday, September 07, 2007 - 1:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ग्लासला लिंबाची चकती वगैरे लावलेले ज्यूस किंवा इतर काय काय पीत बसलेली असणार.
कायम रोगट हवामान. :-)
Ikea, Scandinavian Designs ..
..इतकं सुसंबध्द लिखाण दुसरं असुच शकत नाही!! :-) फारच मस्त लिहिलंय!!!!


Deepanjali
Friday, September 07, 2007 - 1:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिहिलय झकास पण आमच्या जॉन ला ठोकळा म्हंटल्या बद्दल तीव्र निषेध !

Badbadi
Friday, September 07, 2007 - 3:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज ब री!!!!! भट गँगचा "गँगस्टर" पण काहिसा असाच आहे.

ठीक आहे, व्यायाम वगैरे केला असेल, म्हणून काट्याने फळाचा तुकडा उचलताना सुद्धा जिम मधे डंबेल उचलताना स्वत:च्या दंडाकडे बघतात तशी पोज? >> अगदी अगदी... हे अशा लोकांचे biceps वगैरे लोकांना खरंच आवडतात का?

Mi_anu
Friday, September 07, 2007 - 3:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जबरा लिहीले आहे.यात एक उल्लेख आणखी करावासा वाटतो तो म्हणजे महेश भटाचा चित्राप्ट अगदी अंतराळवीराबद्दल असो वा उझबेकीस्तानातल्या शेंगदाणे लागवडीवर आधारीत, तो रिलीज झाला की भटोबा तो चित्रपट म्हणजे 'सत्यकथा आणि माझ्याच जीवनात घडलेली कहाणी आहे' अशा वावड्या पसरवून देतो!

Zakasrao
Friday, September 07, 2007 - 4:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़ारेंद
खास लिहिल आहेस.
त्यातील तो अंधार मला वाटत की पुढे काहितरी हिरो आणि त्या हिरॉइन मधे होणार आहे थेटर सोडुन जावु नका अशी आशा प्रेक्षकाना लावण्यासाठी असेल.
अनु तुझी प्रतिक्रिया पण भन्नाट आहे :-)
जिस्म मधे सगळ्यात छान काय होत तर "जादु है नशा हे". ऐकायला, पहायला नव्हे :-)
इम्रान हास्मीचे सर्व पिक्चर ह्याच कॅटेगरीत येतात.
ह्या इम्रान हाश्मीच्या फ़िल्म्सच बायप्रोडक्ट पण तितकच खतरनाक आहे रे.
ओळखा पाहु............
.....................................
.......................................

अरे हिमेश रेशमिया


Bee
Friday, September 07, 2007 - 5:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हणजे आपल्याला दिवाळीत लांबचा एखादा आकाशात उडालेला फटाका आधी फुटताना दिसतो आणि नंतर त्याचा आवाज येतो, हे त्याच्या उलटे.>>>
Far End खूपच छान!

Shraddhak
Friday, September 07, 2007 - 6:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Far end , शेवटी बघितला तर ' जिस्म ' ! :-P अचूक वर्णन केलंय असल्या सिनेमांचं.

मध्ये मी भट्ट गॅंगचाच जहर बघितला होता. ( जहरच नं तो? शमिता शेट्टी आणि इम्रान हाश्मी वाला? आणि हो उदिता गोस्वामी वाला? :-P )
तर आता त्यामध्ये कुठल्याकी कारणाने शमिता आणि इमरानमध्ये बेबनाव. तरी बरं, ह्यांनीच आधी प्रेमविवाह केलेला असतो. नंतर तो एकटा राहत असतानाच्या काळात उदिता गोस्वामी त्याला रात्री घरी बोलावते, काय तर म्हणे घरी चोर आलाय वगैरे. ( आणि अख्ख्या शहरात जणू हा एकच पोलीस.) खरा पोलीस असता तर तक्रारीचा एरिया आमच्या पोलीस टेशनच्या हद्दीत येत नाही, दुसरीकडे तक्रार करा, म्हणून मोकळा झाला असता. आता असंख्य हिंदी सिनेमे पाहून याला कळायला नको, चोर बीर काही आला नाहीये ते. पण तो जातो. माणूस हा स्खलनशील प्राणी असल्याने पुढे जे होणार ते साहजिकच आहे. तरी त्याला शमिताची आठवण येते ती येतेच!
मग तोच खुनाच्या आरोपात अडकला असताना शमिता त्याच गुन्ह्याचा तपास करणारी पोलिसीण असली तरी सत्य कळल्यावर आर्यस्त्रीप्रमाणे त्याला सुखरूप सोडवते.
' रोग ' बघितलाय का कुणी? त्यातली हिरॉईन खरंच रोग झालेली दिसते आणि चेहरा दगडासारखा. काही म्हणजे काहीच भाव नाहीत. त्यापेक्षा जास्त भाव महेश कोठारेच्या ' झपाटलेला ' मध्ये त्या बाहुल्याच्या चेहर्‍यावर असतील.

कसक, चॉकलेट, गॅंगस्टर, वो लम्हे... न संपणारी यादी आहे.



Hems
Friday, September 07, 2007 - 6:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

farend , पटेश अगदी ! ... आणि बिपाशा,जॉन वगैरे लोक अभिनय केल्यासारखा चेहरा करतात तेव्हा अगदी हताश वाटतं !

"जिस्म" मध्ये खरच फक्त श्रेया घोशालचा आवाज तेवढा छान वाटला !


Nandini2911
Friday, September 07, 2007 - 8:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़ारेंड.. एकदम सही.
महेश भट्ट आम्हा मीडीयावाल्याचा आवडता प्राणी. कारण काही भान्गड झाली की मान्यवराच्या "प्रतिक्रिया" लागतातच. आणि महेशसर कुणालाही आरामात प्रतिक्रिया देतात. नवीन असताना एकई सेलेब्रिटी ओळखीची नव्हती. तेव्हा दरवेळेला त्यालाच फोन करायचो. आणि तो चांगला तासभर बोलायचा. :-)

आणि मजेची गोष्ट म्हणजे त्याला बाकीच्या स्टार्सचे नंबर विचरले की बिनधास्त द्यायचा.

त्याचे काही चित्रपट छान होते. पण retirement चे जे नाटक त्याने केले ते बघून चीड आली.

"रोग"ची प्रेस कॉन्फ़रन्समधे ती आफ़्रिकन हीरॉईन पाहिली होती. तिला म्हणे पूज भट्टने एका मासिकाच्या कव्हरवर पाहिलं. आणि लगेच आपल्या फ़िल्मची नायिका हीच हे नक्की केलं म्हणे. तिला धड इंग्लिश पण येत नाही. :-)

आणि कुणाला "साया" आठवतो का? त्यामधे महेश भट्टने कतरीना कैफ़ला तीन दिवसाचे शूटिंग झाल्यावर काढून टाकलं. आणि तारा शर्माला घेतलं.. :-) मला तरी अजून फ़रक कळला नाही.

जिस्म मधे "आवारापन" गाणं चांगले होते. जादु है नशा है आणि चलो तुमकओ ले चले पण सही होती.
बिपाशा मधे मधे चकणी दिसते. :-)




Psg
Friday, September 07, 2007 - 9:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कायम रोगट हवामान.
घर एव्हढे की नुसत्या मेणबत्त्यांचा मेन्टेनंस करायला एक पूर्णवेळ नोकर लागेल.
सही लिहिलं आहेस फ़ारेंडा.. :-) अचूक वर्णन. मजा आली.. सर्व लिखाणास मोदक :-)

माणूस हा स्खलनशील प्राणी असल्याने पुढे जे होणार ते साहजिकच आहे
श्र!!

Lampan
Friday, September 07, 2007 - 10:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एवढं सगळं माहित असुनही लोकं हे पिक्चर कसे काय बघतात ??
मलातर हे पिक्चर differentiate ही करता येत नाहीत .. एकदम सुरुवातीलातर मला इम्रान हाश्मीच गाणं म्हणतो असं वाटायचं मग तो माणुस आपला HR म्हणजे हिमेशदा आहे हे कळालं .. जसं लहान असताना सरकार हा कोणीतरी माणुस आहे आणि त्याचं आडनाव गांधी आहे वाटायचंना तसं


Aashu29
Friday, September 07, 2007 - 1:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

' रोग ' बघितलाय का कुणी? त्यातली हिरॉईन खरंच रोग झालेली दिसते आणि चेहरा दगडासारखा. काही म्हणजे काहीच भाव नाहीत. त्यापेक्षा जास्त भाव महेश कोठारेच्या ' झपाटलेला ' मध्ये त्या बाहुल्याच्या चेहर्‍यावर असतील. >>>>
श्र, काय हे किती हसवशिल?

Aashu29
Friday, September 07, 2007 - 1:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला आधी म्हणजे जिस्म मधे john मुळीच आवडायचा नाहि, धुम पासुन आवडायला लागला!! पण फ़ारेंड,वर्णन सहीच, मी पण किती तो डोळ्यांना ताण देउन पाहिला!! आयला, कायम अंधार!!

Maanus
Friday, September 07, 2007 - 1:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महेश भट म्हणजे पुजा भट चे बाबा च ना?

खुप पुर्वी म्हणजे जेव्हा मला पुरळ वैगेरे यायला लागलेली आणि दिल है के मानता नही च्या काळात, ती मला आवडायची. तीच्या मुलाखती मी गृहशोभीका मधुन चोरुन चोरुन वाचायचो तेव्हा,

तेव्हा तिची एक मुलाखत आलेली, तीच्या birthday ला ती काहीतरी वेगळ करायच म्हणुन बॉडी पेंटीग करुन तशीच party ला आलेली. त्यात ति म्हणाली की तुम्हा लोकांना असले चित्रपट आवडत नाही तर येताच कशाला बघायला. जोपर्यंत लोक येनार तोपर्यंत असे चित्रपट येत रहाणार.

नंतर म्हणे मला महेश भट खुप आवडतात, आणि ते माझे वडील नसते तर मी त्यांच्याशी लग्न केले असते.


Maitreyee
Friday, September 07, 2007 - 1:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'टोळी सोडल्यावर सदरहू इसमास मारून टाकणेत येईल', >>>

सदैव अफेअर करण्याच्या तयारीत बारमधे किंवा रेस्टॉरंटमधे एकटीच बसलेली असते. >>>
काट्याने फळाचा तुकडा उचलताना सुद्धा जिम मधे डंबेल उचलताना स्वत:च्या दंडाकडे बघतात तशी पोज?

माणूस हा स्खलनशील प्राणी


आई गं सही मजा आली सगळं वाचून :-)


Savyasachi
Friday, September 07, 2007 - 1:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>अगदी अगदी... हे अशा लोकांचे biceps वगैरे लोकांना खरंच आवडतात का?
अजून काय आवडण्यासारख आहे ते तुझ्या वरच्या पोस्टवालीलाच विचार :-)

>>तेव्हा अगदी हताश वाटतं

उत्तम शब्द... हताश... आवडला :-)

फ़ारेन्ड, मस्त लिहील आहेस.


Lopamudraa
Friday, September 07, 2007 - 2:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़ार एन्ड मस्तच..
महेश भट्ट च्या सिनेमात गाणी सुंदर असतात पण त्या गाण्याचं त्याने वाटोळ केलेल असत नेहमी. पिक्च्राय्सेशन इतक वाइट असत ना आणि कधीही छान निसर्ग दाखवत नाहीत सगळी गाणी त्या घाण हिरोइनवर.. तेही अंधारात.


Vinaydesai
Friday, September 07, 2007 - 3:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तिच्याकडून लिहून घेतलेले असते की जर त्याला तिने घटस्फोट दिला, तर तिला एकही पैसा मिळणार नाही
याला इकडे Prenup म्हणतात.. फॉरेन Idea आहे, येईल भारतातही...



चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators