|
| |
| Monday, May 07, 2007 - 4:17 pm: |
|
|
हा फ़ुलोरा आहे शोभांजन असे सुंदर संस्कृत नाव असणार्या झाडाचा. हिंदीत हा आहे सहजन तर बंगालीत सुहुंजन. काय छान नावं आहेत ना ? हि नावे वाचुन या झाडाच्या अंगावर पण मूठभर मांस चढेल. एखाद्या सद्याला, एकदम सदाशिवरावभाऊ अशी हाक मारल्यावर असेच वाटणार ना ! नाहीतर आपण ठेवलेली शेगला, शेकटा किंवा शेवगा हि काय नावं झाली ! तर हा आहे Moringa oleifera यातले मोरिंगा आलेय ते याच्या तामिळमधल्या मोरिंगाकाई या नावावरुन, आणि ऑलीफ़ेरा आलेय बियांपासुन मिळणार्या तेलामूळे. याचे हिंदी नाव सहजन किंवा सहजन कि फ़ली. कवि जावेद अख्तर यानी या नावाची छान फ़ोड करुन सांगितली होती. सहजन म्हणजे सामान्यजन. सामान्यजनाना सहज परवडणारी, पौष्टिक अशी हि भाजी. हि त्याना सहज उपलब्ध व्हावी म्हणुन याची शेती करुन नये असा संकेत होता. शेती केली कि व्यापार आलाच, मग सामान्यजनाना ती सहज कशी उपलब्ध होणार ? त्यापेक्षा याची लागवड बांधावर करावी. आणि शेजार्यापाजार्याना या शेंगा सहज आणि फ़ुकट उपलब्ध व्हाव्यात. असा हेतु. यासारखे उपयुक्त दुसरे झाड नसेल. याची पाने, फ़ुले, शेंगा आणि मूळे, सगळेच खाण्याजोगे. नखाएवढ्या पानात बेटा कॅरोटिन, क जीवनसत्व, लोह, पोटॅशियम आणि काही प्रथिने असतात. याची भाजी खुप चवदार लागते. कोकणात खास करुन श्रावणात, त्यातुनही गोकुळाष्टमीला ही भाजी आवर्जुन केली जाते. त्यानंतर ती पने कडु होत जातात, असा समज आहे. याची अगदी बारिकशी पानं निवडण्याची पण एक युक्ती आहे. या पानांची घट्ट गठळी बांधुन ठेवली, आणि दुसर्या दिवशी नुसती झटकली तरी पाने सुटी होतात. हि पाने सुपमधे किंवा आमटीत देखील घालता येतात. या शेंगाना तशी चव नसते, पण त्या घालुन केलेला पदार्थ मात्र चवदार होतो. काहीकाही झाडाच्या शेंगा मात्र कडु लागतात. आणि त्या कुणी खात नाहीत. याच्या फ़ुलांची पण चवदार भाजी होते. भाजी करण्यापुर्वी हि उकडुन पिळुन घ्यावी लागतात. चवीला बरिचशी मश्रुमसारखी लागतात. याच्या शेंगा तर सगळ्यानाच आवडतात. इतर भाज्या बघुन तोंड वाकडी करणारी मुलेही, या शेंगा आवडीने खाताना बघितली आहेत मी. भारतात बहुतेक सगळीकडे या शेंगा खाल्ल्या जातात. भाजी आमटीत तर उपयोग होतोच, पण याचे लोणचे आणि सांडगेही घालता येतात. याच्या जुन शेंगातल्या बिया भाजुन खाल्ल्या जातात. त्या खुपश्या शेंगदाण्यासारख्या लागतात. याची मूळेही खातात. ती साधारण भाजीच्या मुळ्यासारखी लागतात. पण त्यात स्पायरोचिन नावाचे एक अल्कलॉईड असते आणि त्यामुळे मज्जासंस्था बधीर होवु शकते, म्हणुन ती खाणे टाळलेलेच बरे. या झाडाच्या शेंगातल्या जुन बियांपासुन, कॅल्शियम आणि फ़ॉस्फ़ोरस मिळतो. दक्षिण भारतात, तरुण स्त्री पुरुषांची ' क्षमता ' वाढवण्यासाथी याचा उपयोग करतात. या बियांपासुन ३८ ते ४० टक्के तेल मिळते. हे खाद्यतेल आहे आणि शिवाय सौंदर्य प्रसाधनात आणि वंगणासाठीही याचा उपयोग होतो. याची पेंड खत म्हणुन वापरता येते. या झाडापासुन एक प्रकारचा गोंद मिळतो. त्यापासुन निळा रंगही करता येतो. माझ्या लहानपणी मालाडला आम्हा सात कुटुंबाचे एक सामायिक शेवग्याचे झाड होते. एखाद्या रविवारी याच्या शेंगा काढण्याचा कार्यक्रम असे. याच्या फ़ांद्या अजिबात मजबुत नसतात, त्यामूळे काठीनी शेंगा काढाव्या लागत. मग मला दोन हात आडवे धरायला लावुन त्यावर त्या शेंगा ठेवल्या जात. मग मी सातही घरी जाऊन त्या देत असे. त्या त्या घरच्या काकु त्याना हव्या तेवढ्या शेंगा घेत असत. वाटण्या वैगरे करणे प्रकारच नसायचा. त्या दिवशी सात घरात, शेंगांचे सात प्रकार व्हायचे आणि आवर्जुन वाट्या एकमेकाना दिल्या जात असत. या झाडाने आम्हा सात कुटुंबात जिव्हाळा जपला होता. अश्याच जिव्हाळ्याची कथा सांगणारा, ' शेवग्याच्या शेंगा ' नावाचा मराठी सिनेमा आला होता. त्यात बेबी नंदा होती. पुर्वी शेवग्याच्या झाडाबरोबर परसात हादगा किंवा अगस्य चे झाड असायचे. Sesbania grandiflora याची पाने शेवग्याच्या झाडापेक्षा बरीच मोठी असतात. पण याची खासियत म्हणजे याची फुले. साधारण श्रावणात याला टपोर्या पांढर्या कळ्या येतात. कळ्यांचा आकार कोयत्याप्रमाणे असतो. लांबी आठ ते दहा सेमी. मग याचे पांढरेशुभ्र भरगच्च असे फुल उमलते. या फ़ुलांची भाजी आणि भजी खुप चवदार लागते. श्रावणात ती आवर्जुन केली जात असे. आमच्याहि अंगणात हे झाड होते. पण आता हे झाड आपल्याकडे बघायला मिळत नाही फारसे. तीनचार वर्षांपुर्वी मी हैद्राबाद ते तिरुपति असा प्रवास रोडने केला होत्या. त्यावेळी आंध्रप्रदेशात शेताच्या कडेने या हादग्याची भरपुर झाडे लावलेली दिसली. तिथेही हि फुले खातात का, याची कल्पना नाही. अनेक दक्षिण आशियाई देशात मात्र हि फ़ुले आवडीने खाल्ली जातात. आणि अश्या परसातल्या झाडाचे औषधी उपयोग नसतील, तरच नवल.
|
| |
| Wednesday, May 09, 2007 - 1:00 am: |
|
|
बाभळीच्या झाडाला हिरवा हिरवा पाला सखाराम गेला, म्हणुन तुकाराम केला जरी कायम कुंपणाबाहेर असली तरी बाभुळ आपल्या लोकसाहित्यात असे स्थान पटकावुन बसली आहे. Acacia nilotica नावाने ओळखली जाणारी हि वनस्पति भारतात आणि आफ़्रिकेत सगळीकडे आढळते. अकिस म्हणजे तीक्ष्ण. त्यामुळे हे नाव. केनयातल्या जंगलातील जे फोटो आपण बघतो त्यात दाट पसारा असलेले काटेरी झाड कायम मध्यभागी असते. त्याचा पर्णसंभार बहुदा वरुन सपाट असतो. ती एक बाभळीचीच जात आहे. आपल्याकडे पठारावर शेताच्या बांधावर बाभुळ आवर्जुन दिसते. खुपदा शेताच्या सीमा बाभळीवरुन ठरतात. बाभळीच्या झाडाचा पिकाला तसा काहि त्रास नसतो. याची सावली अगदी विरळ असल्याने, पिकाचे उन अडवले जात नाही. याचा कोवळा पाला गुरे, खास करुन बकर्या आवडीने खातात. दोन पायावर उभे राहुन बकरीची सर्कस या झाडाखाली चाललेली असते. उंट आणि जिराफहि याचा पाला आवडीने खातात. याची पाने अगदी नाजुक. चिंचेसारखीच पण तिच्यापेक्षा खुपच लहान. बाभळीचे वैशिष्ठ्य म्हणजे तिचे पांढरे लांब काटे. सहज तीन चार सेमी लांबी असते याची. पायात हमखास घुसणारच याचा काटा. ( खजुरसे टपके, बबुलपे अटके, अशी म्हणच आहे. ) हे अनेकजणाना पटणार नाही, याचा काटा टोचला तर तितकेसे दुखत नाही. ( ज्यांच्या पायाला गोखरु टोचलेय, त्याना नक्कीच हे पटेल. ) या काट्यांमुळेच छोट्या पक्ष्याना हे झाड सुरक्षित वाटते. हे पक्षी इतके छोटे असतात, कि सहज या काट्याना लोंबकळु शकतात. याच कारणासाठी सुगरणीचे घरटे खुपदा याच झाडावर असते. याच्या काटेरी फांद्या शेताला कुंपण म्हणुन उपयोगाला येतात. याचे काटे जुन फांद्यावरच असतात, कोवळ्या फ़ांद्यावर बहुदा नसतात. बाभळीचे खोड अगदी खडबडीत असते. आणि बर्याचदा त्याला जखमा झालेला असतात. त्यातुन डिंक स्त्रवत असतो. खाण्यासाठी तो वापरतात. बाभळीचे लाकुड सरपणासाठी उत्तम. बराच वेळ जळत राहते ते. मजबुत असल्याने शेतीच्या अवजारासाठी, हत्यारांसाठी हे लाकुड आदर्श आहे. याच्या शेंगा पण एका खास आकाराच्या असतात. एखादे ब्रेसलेट झाडावर लटकवल्यासारखे वाटते. या शेंगाही गुरे आवडीने खातात. ओमानमधे या शेंगांचा धुर, करुन घर निर्जंतुक केले जाते. खेड्यापाड्यात बाभळीच्या कोवळ्या काड्या दात घासण्यासाठी वापरतात. याच्या सालीचे व शेंगाचे भस्म, मशेरीत वापरले जाते. एक प्रसिद्ध टुथपेस्ट तर हेच नाव मिरवते. याची खासियत म्हणजे याची पिवळी गोल फुले. तशी वर्षभर याला तुरळक फुले येतच असतात. पण पावसाच्या सुरवातीला हे झाड अगणित फ़ुलानी भरुन जाते. काळ्याशार जमिनीवर उभे असलेले, फ़ुलानी नटलेले हे झाड, मृगाचे ढग भरुन आलेल्या आभाळात अतिषय देखणे दिसते. हे झाड तुरट गुणाचे. त्यामुळे याच्या सालीचा काढा, डिंक, शेंगा या रक्तस्त्राव, अतिसार, मूळव्याध यावर गुणकारी आहेत. हा वृक्ष विषघ्नही आहे. गर्भाशयशोथनाशकही आहे. विशाखा नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींसाठी तो आराध्य वृक्ष आहे. यालाच देवबाभुळही म्हणतात. कुठल्याही जमिनीत, किंबहुना कसल्याहि प्रतिकुल परिस्थीत हा वृक्ष विनातक्रार वाढतो. यावर छोट्या निळसर फुलपाखरांच्या अळ्या पोसल्या जातात. या फुलपाखराचे नावही, अकॅशिया ब्ल्यु असेच आहे. आपल्याकडे पिवळी जात जरी कॉमन असली तरी पांढरी बाभुळही Leucena leucocephaia दिसते. पिवळ्या तांबुस फुलांची पण एक जात असते. या झाडाच्या फांद्या आडव्या पसरत असल्या तरी एक जात उभ्या फांद्याचीही असते, आणि तिला रामकाठी असे खास नाव आहे. देशावर मुबलक आढळणारी बाभुळ कोकणात अगदी क्वचितच दिसते. जंगलात फ़िरताना कधीकधी बाभळीचा Dichrostachys cinerea हा प्रकार दिसतो. डाय म्हणजे दोन, क्रो म्हणजे रंग आणि स्टॅकिस म्हणजे तुरा. सिनेरिया म्हणजे राखाडी रंगाचे खोड असलेला. कोकणात हा वृक्ष खास शोभेसाठी लावला जातो. एरवी साध्या बाभळीसारखाच दिसत असला तरी गणपतिच्या सुमारास, अश्या देखण्या फुलानी हा वृक्ष सजतो. ४ ते ५ सेमी लांबीचे हे तुरे खुपच देखणे दिसतात. यातला पिवळा भाग म्हणजे खरी फुले, गुलाबी भाग नुसताच शोभेचा. दुपारपर्यंत हा गुलाबी रंग टिकतो. संध्याकाळी हा भाग पांढराशुभ्र होतो. त्यावेळी संधिप्रकाशात झाडावर कापसाच्या फुलवाती ठेवल्यासारखे दिसते. झाडाची ओळख पटायला काहि पिढ्या खर्ची पडाव्या लागतात. त्यांच्या आणि आपल्याही. नाहितर आपल्याला इतका उपयुक्त वाटणारा वृक्ष ऑस्ट्रेलियात वीड मानला गेलाच नसता.
|
| |
| Wednesday, May 09, 2007 - 4:29 pm: |
|
|
सुपीक जमिनीत चंदनाचं झाड येतं. ते चांगलं फ़ोफ़ावतं, पण चंदनाचा आत्मा असलेला सुवासिक गाभा त्यात नसतो. समद्धीत वाढलेल्या माणसात माणूसपण नसतं. तसं अतिसमृद्धी, माणसाचं अधःपतन करते. खडकाळ जमीन, माळरान पठारातही चंदन येतो. हळूहळू वाढतो. पण सुवासिक गाभा घेऊन. प्रतिकूल परिस्थितीत वाढलेली माणसं जीवनातला सुगंध घेऊन येतात. - - - - - चकवा चादणं - - - मारुति चितमपल्ली. Santalum album असे शास्त्रीय नाव असणारे हे झाड अर्थातच सुगंधासाठी प्रसिद्ध आहे. अनेक भारतीयानी हे झाड बघितलेले नसते, पण याचा सुगंध माहीत नाही असा भारतीय माणुस नसेल. श्रीगंध, अनिन्दित, अरिष्टफल, भद्राश्रया, सर्पवास, चंद्रकांता, तैलपर्ण, मलयज अशी अनेक नावं आहेत याला. माझ्यासाठी दिवाळीच्या अभंग्यस्नानाशी या सुगंधाच्या आठवणी निगडीत आहेत. उटणे लावुन आई अंघोळ घालायची तेव्हा हमखास म्हैसुर सॅंडल किंवा मोती सॅंडल साबण असायचा. आता उटणे आणि हे साबण इतरवेळी वापरु नयेत असे नाही, पण हा सुगंध मला कायम त्या काळात घेऊन जातो. सहाणेवर उगाळलेलं शीतल चंदन, कपाळावर लावल्यावर जी अनुभुति मिळते, ती एखादा भारतीयच जाणु शकतो. हा वृक्ष प्रामुख्याने भारत, श्रीलंका, हवाई, साऊथ पॅसिफिक बेटे आणि ऑस्ट्रेलिया मधे आढळतो. Santalum ellipticum हि हवाई जात आहे तर Santalum spicatum ऑस्ट्रेलियन. पण तरिही भारतीय चंदन उच्च दर्ज्याचे मानले जाते. पुर्वापार मैसुर प्रांत या झाडांसाठी प्रसिद्ध आहे. एकुणच कर्नाटक राज्य यासाठी प्रसिद्ध आहे. केरळ आणि तामिळनाडुमधेही याची लागवड केलेली आहे. चंदनाच्या लाकडापासुन कोरीव वस्तु, पंखे, हार अश्या अनेक वस्तु तयार केल्या जात असल्यातरी यापासुन मिळणारे प्रमुख उत्पादन म्हणजे चंदनाचे तेल. या झाडाचे रुप वर बघता आहातच. पाने साधी पोपटी रंगाची. फुले चार पाकळ्यांची, अगदी छोटी असतात. याला करवंदाएवढी काळी फळेही लागतात. पक्षी ती फळे आवडीने खातात. जंगलात या झाडांचा प्रसार पक्ष्यांमुळेच झालाय. पक्ष्यांच्या पोटाची ऊब मिळालेली बी सहज रुजते. या फोटोत सौ. कोकिळा हे फळ खाताना दिसताहेत. समजा मी हे झाड तुम्हाला प्रत्यक्ष दाखवलं तर तूम्ही सहजपणे याचे पान, फुल, फळ, देठ जे हाताला लागेल ते तोडुन चुरगाळुन त्याचा वास घेऊन बघणार. आणि तुमची घोर निराशा होणार. कारण यापैकी कश्यालाच सुगंध येत नाही. याचा सुगंध असतो तो याच्या लाकडाच्या गाभ्यात आणि मूळात. आणि हा सुगंध या झाडाला प्राप्त होतो तो तब्बल चाळीस ते साठ वर्षांनंतर. त्यापेक्षाही जास्त वयाचे झाड अतिशय किमती असते. हे झाड तोडले जात नाही, तर पावसाळ्यात मूळासकट उपटले जाते. याच्या लाकडाच्या आतला गाभ्यापासुन आणि मुळांपासुन वाफ़ेच्या सहाय्याने तेल मिळवले जाते. याची किमत प्रतिकिलोला १००० ते१५०० यु एस डॉलर्स पर्यंत मिळु शकते. हिंदु धर्मात गंधलेपनासाठी तो प्रसिद्ध आहेच. पण बुद्धधर्मातही त्याला उच्च स्थान आहे. याच्या सुगंधाने ध्यानधारणा चांगली होते, असे मानतात. अग्निपुजक पारसी लोक याचे तुकडे अग्यारीत जाळतात. चीन आणि जपानमधेही त्याला पुजेत स्थान आहे. अरोमाथेरपी मधे खास करुन मानसिक तणावमुक्तीसाठी हा सुगंध वापरला जातो. आपण हा सुगंध खाण्यात वापरत नाही, पण पाकिस्तानात तयार केलेले चंदनाचे सरबत मी प्यायलो आहे. दुधात घालुन ते अप्रतिम लागते. आपल्याकडे सौंदर्यप्रसाधनात याचा खुप उपयोग केला जातो. साबणचा उल्लेख वर आलाच आहे. अनेक क्रीम्समधेही हा सुगंध असतो. शीतल गुणाचा असल्याने उष्णतेच्या विकारावर, मूत्ररोगावर, त्वचारोगावर याचा फायदा होतो. खोकल्यावरही याचा फायदा होतो. अस्सल चंदनाचे तेल खुपच महाग असल्याने, बहुतेक कृत्रिम सुगंधाचाच सगळीकडे वापर होतो. झाडाला सुगंध तयार करायला लागणारा प्रदिर्घ कालावधी आणि जेमतेम दीड ते दोन टक्के मिळणारे तेल, यामुळे याचे मूल्य बाजारात जास्त असणे स्वाभाविक आहे. भारतात तरी सर्व चंदनाची झाडे निदान कागदोपत्रीतरी सरकारच्या मालकीची आहेत. ( पुर्वी ती वीरप्पनच्या मालकीची होती. ) पण याचा चोरटा व्यापार अजुनही होतच असावा. माझा सिरसीचा एक मित्र म्हणायचा. तुला हवे तेवढे चंदनाचे लाकुड तिथे मिळेल, पण सीमेपार न्यायची जबाबदारी तुझी. हे झाड परजीवी आहे. ईतर झाडांच्या सानिध्यातच हे वाढु शकते. याची मूळे, ईतर झाडांच्या मूळातुन जीवनरस शोषुन घेतात. कधीकधी ईतर चंदनाच्या झाडांवरही हल्ला केला जातो. याच्या परिसरात सर्पाचा वास असतो, हे मला मिथक वाटते. साप असलाच तर तो सावलीसाठी असेल, सुगंधासाठी खचितच नाही. पुर्वी घराघरातुन रक्त्चंदनाची बाहुली असायची. Pterocarpus santalius or santalum rubrum हे खरे तर चंदन नव्हेच. याला सुगंधही नसतो. पण सुज कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. कपडे रंगवण्यासाठीही याचा उपयोग होतो. Amyris balsamifera सारख्या काहि झाडांपासुन साधारण असाच सुगंध मिळू शकतो. पण तो अस्सल नसल्याने, भेसळीसाठीच वापरला जातो.
|
| |
| Thursday, May 10, 2007 - 4:47 pm: |
|
|
असे म्हणतात की, कमळाच्या वेलींच्या मुळांची विलक्षण गुंतागुंत झालेली असते. पाण्याच्या पृष्ठभागावर सुंदर उत्फ़ुल्ल कमळे परस्परांपासून अंतर राखुन आपापल्या जागी आपले एकटेपण जपत असतात तर पाण्याच्या पृष्ठभागाखाली त्यांच्या मुळांमधे भयानक गुंतवणुक असते. एखाद्याचे पाय त्या जाळ्यात अडकले तर तो त्यातून बाहेर पडू शकत नाही. जो जो आपले पाय सोडवून घेण्याची तो धडपड करतो तो तो अधिकच त्यात गुरफटत जातो. माणसांमधले नातेसंबंध या कमळाच्या वेलींसारखेच असतात. सारी माणसे वर दिसायला अलग अलग, आपापल्या ठिकाणी स्वतंत्र पण आतुन नात्याची, प्रेमाची, जिव्हाळ्याची आणि या सार्यातुन पुन्हा फ़ुटत गेलेल्या द्वेषाची, वैराची, हेव्याची विलक्षण अनाकलनीय गुंतागुंत. माणसा माणसांत नकळत, रुजत, पसरत जाणारं ते गैरसमजाचं जाळं. तो भयंकर अहंकार. एकदा का माणुस या गुंतागुंतीत सापडला तर त्याला जलसमाधीच मिळायची. वर पुन्हा सारी कमळे शांत, स्थिर, सुंदर . . . . ! शांता शेळके, आनंदाचे झाड. कमळाचे शास्त्रीय नाव Nelumbo nucifera आपले राष्ट्रीय फुल. याला राजीव, सरोज, नलिनी अशी अनेक नावे आहेत. आपल्याकडे अनेक ठिकाणी लहान कमळे दिसतात. आपण त्याना कमळं म्हणतो खरे, पण त्याना वॉटर लिली म्हणणे जास्त योग्य आहे. खरे कमळ फक्त सातपुड्याच्या उत्तरेलाच फ़ुलते, असे म्हणतात. नाही म्हणायला पनवेल परिसरात अनेक अस्सल कमळे फुलतात. तिथल्या डबक्यातही आपोआप कमळे उगवतात. एस्टी स्टॅंडसमोरच्या एका मोठ्या तळ्यात, आत्ता आत्ता पर्यंत कमळाची शेती केली जात असे. हा फोटोही तिथल्याच मानसरोवरात फ़ुललेल्या कमळाचा आहे. आपल्याकडे जास्त करुन पांढरी कमळे दिसतात. क्वचित गुलाबी, जांभळी, निळीही दिसतात. ( वर लिहिल्याप्रमाणे त्या सगळ्या वॉटर लिलीज. ) पिवळी कमळे कमीच दिसतात. काश्मिरमधे मात्र जास्त दिसतात ती. कमळाला आपल्या साहित्यात अढळ स्थान आहे. कमलदलापरी मिटल्या अधरी, अश्या अनेक ओळी आठवु लागतात. ज्ञानेश्वरीतही अनेकदा कमळाचे दृष्टांत आलेले आहेत. कमळाच्या पुंकेसरातुन निघालेला वारा, डोळ्यातील बुबुळाला जितक्या हळुवारपणे स्पर्श करेल ( तसे बोलणे असावे. ) अश्या आशयाची एक ओवी आहे. शांता शेळकेनी या कमळाचा गुढपणा वरच्या उतार्यात अचुक टिपलाय. ज्ञानेश्वरांची पण कमळाचे स्कंधी, अशी एक गुढ रचना आहे. अनेक काव्यात कमळाचे संदर्भ आढळतात. महाभारतात सहस्त्र कमळे वाहण्याचा प्रकार आहे. शिवाजी महाराजांच्या चरित्रातदेखील असा उल्लेख मी वाचला. त्याकाळी रायगडावर ती उपलब्ध होती. ( आता त्याचा मागमुसही नाही. ) . कालिदासाच्या शकुंतलेने दुष्यंताला कमळाच्या पानावर नखाने कोरुन लिहिलेले पत्र पण आठवुन जाते. अनेकवेळा कमळाचा दृष्टांत दिलेला आढळतो, पण त्यात तितकेसे तथ्य नसते. उदा, हा हंत हंत नलिनी गज उज्जहार, मधे अपेक्षित आहे तसे एकदा उमलेले कमळ परत मिटत नाही, आणि मिटलेच तर परत उमलत नाही. पंकज म्हणजे चिखलात जन्म घेतलेले, ( आणि तरिही आपले अलगपण जपणारे ) लहानपणी लोकमान्य टिळकांवरील भाषणात, त्यांच्या चिखली या जन्मस्थानामूळे, याचा कायम उल्लेख करायचो मी. ( आईबाबा आपल्याच मुलाचे नाव, पंकज कसे ठेवतात, तेच मला कळत नाही !) कमळाच्या पानाच्या पाणी ठरु न देण्याच्या गुणधर्माचा पण अनेकवेळा उल्लेख केलेला असतो. पण याला कारण असते ते त्या पानाचा तेलकटपणा आणि पानावर असणारी सुक्ष्म लव. खरा तो प्रेमाला धनि, या नाट्यगीतात, नभी जनहितरत, भास्कर तापत, विकसित पहा नलिनी, अश्या ओळी आहेत. पण काहि कमळे रात्रीही उमलतात. त्या कमळाना रातोत्पल असेही म्हणतात. उत्पल हे कमळाचे आणखी एक नाव. ( माझ्या अल्प माहितीप्रमाणे जर्मन भाषेतपण कमळाला हाच शब्द आहे. ) आपल्या शिल्पकलेत कमळ आणि त्याचा मुक्त आकार अनेक ठिकाणी वापरला आहे. साड्यांवरच्या नक्षीत पण खुपदा कमळ असते. अजिंठ्याच्या चित्रातही ते आहेच. हिंदु धर्मात तसेच बुद्ध धर्मातही, याला महत्व आहे. आपल्याकडे साधारणपणे एखाद्या तळ्यातच याची लागवड करतात. अलिकडे काहि बागात मुद्दाम बांधलेल्या हौदातपण ती करतात. थायलंड मधे मात्र मी कमळाची लागवड कुंड्यात केलेली बघितली. तिथल्या बुद्धमुर्तीना खर्या कमळांबरोबर चांदीसोन्याची कमळेही वाहतात. बॅंकॉकच्या विमानतळाजवळच कमळानी भरलेले सरोवर आहे. मला लहानपणापासुन कमळाचे ऑबसेशन आहे. आपल्या हाताने कमळ खुडावे, अशी ईच्छा अनेक वर्षे मनात होती. पण ती पुर्ण झाली ओमानमधल्या सलालाहमधे. अगदी नितळ पाण्यात उमललेली कमळे बघुन मला राहवलेच नाही. मी सहज पाण्यात उतरलो. पण तिथल्या नितळ पाण्याने घात केला. आधी मांडीपर्यंत येईल असे वाटलेले पाणी माझ्या छाती एवढे खोल होते. पण तरिही मी कमळे खुडलीच. कमळाचा देठ खुपच लांब असतो. वरती एक पातळ साल असते व आतला गाभा लवचिक असतो. त्याचे तुकडे करुन आणि वरची साल अखंड ठेवुन, त्या देटाचाच हार करता येतो. याचे देठ एकमेकात गुंफ़ुन छोट्या कमळांची वेणीदेखील करता येते. कोल्हापुरच्या आंबाबाईला वहायला अश्या वेण्या तिथे मिळतात. कमळाचे पान कळीरुपातच खालुन वर येते. पाण्याच्या पृष्ठभागावर आले कि ते उलगडते. पराती एवढ्या आकाराचे, उंच काठ असणारे केसाळ पान, मी सिंगापोरला बघितले होते. ( मॉरिशियसला हि जात खुप आढळते ) पण या जातीची फुले मात्र अगदीच लहान होती. एरवीही हि पाने जाड आणि मजबुत असतात. पाणकोंबडीसारखे काहि पक्षी यावर सुखाने चालु शकतात. या पानाचा आपल्याकडे खाण्यासाठी उपयोग करत नाहीत. पण एक टिव्ही प्रोग्रॅममधे कमळाच्या पानात भात शिजवलेला बघितला होता. कमळाच्या पाकळ्या गळुन गेल्या, कि त्याच्या मधल्या भागापासुन एक फळ तयार होते. शंकुच्या आकाराचे हे फळ वरुन सपाट असते आणि त्यात खोबणीत बिया असतात. या बिया खातात. मुंबईमधे हि फळे विकायला येतात. या बिया सुकल्या कि त्याच्या लाह्या करता येतात. बाजारात मकाणे किंवा मखाणे या नावाने त्या मिळतात. यांचा दर खुप जास्त असतो, पण या लाह्या वजनाने हलक्या असल्याने, थोड्या वजनात भरपुर बसतात. या लाह्या तुपात तळुन, चुरुन दुधात घालुन त्याची खीर करतात. कमळाच्या मुळाना कमलकाकडी किंवा भेंन म्हणतात. मुद्दाम जास्तीचा चिखल माखुन या बाजारात येतात. याना आतुन छिद्रे असल्याने, याचे काप भेंडीप्रमाणे दिसतात. या उकडुन तळुन त्याची कापे करता येतात. पंजाबी लोणच्यातही याचा वापर होतो. अभिमान सिनेमात, अमिताभला कमलकाकडीके कोफ़्ते आवडतात असा, दुर्गा खोटेच्या तोंडी उल्लेख असल्याचे आठवतेय. कमळाच्या देठात दुधासारखा चीक देणारा एक धागा असतो. काहि जातीची बदके, तो धागा ओढुन काढुन खातात. त्यांच्या या क्षमतेमूळेच या क्रियेला नीरक्षीर विवेक असे म्हणतात. आपण समजतो तसे लिटरली, पाण्यापासुन दूध वेगळे काढणे, नव्हे ते.
|
| |
| Friday, May 11, 2007 - 4:48 pm: |
|
|
ए जी फ़ुल गेंदवा ना मारो लगत करेजवा मे चोट रुक जाओ, मान जाओ बिनति अबलाकी दुंगी दुंगी गाली, काहे झिझोरी करत हरजाई या पारंपारिक ठुमरीत ज्या फ़ुलांचा संदर्भ आलाय, तो खचितच कदंबफ़ुलांचा असणार. यमुनेत गोपी स्नान करत असताना, कन्हैया, नदीकाठच्या घनदाट कदंबतरुवर बसुन, तिथुन हे कन्दुक, गोपींवर मारत असेल. आणि या देखण्या आणि सुगंधी फ़ुलांमुळे गोपिका सुखावल्याही असतील. पण तरिही लटका राग व्यक्त करत असतील. जयपुर शैलीतील लघुचित्रात, खुपदा नदिकाठी हा वृक्ष दाखवलेला असतो. याला धुलिकदंब आणि हरिप्रिय अशीही नावे आहेत. कालियामर्दनासाठी कृष्णाने याच झाडावरुन यमुनेच्या डोहात उडी घेतली होती. तसेच त्या मर्दनानंतर झालेला दाह, याच झाडावर बसुन शमवला होता. कदंब खरा तर उत्तरेकडचा वृक्ष. उत्तरप्रदेशात, बंगालात, बांगला देशात त्याची खुप मोठी झाडे आहेत. आश्चर्यकारकरित्या तो कोकणातल्या दमट हवेतही उत्तमरित्या वाढतो. अगदी नैसर्गिकरित्याही वाढलेला दिसतो तो. मुंबईत पण अनेक झाडे आहेत याची. दादरला राजा शिवाजी विद्यालयाजवळ, कालिनाला, वांदयाच्या डायमंड बाजाराजवळ, मंत्रालयाच्याजवळ, अनेक झाडे आहेत. कणकवलीच्या एस्टी स्टॅंडच्या मागे दोन प्रचंड वाढलेले वृक्ष आहेत. सावंतवाडीलाही आहेत हे. वरचे फोटोज त्याच झाडावरच्या फुलांचे आहेत. आपल्याकडच्या हवेत कुठलाच वृक्ष प्रचंड असा वाढत नाही, पण कदंब मात्र याला अपवाद आहे. भराभर वाढतो हा. आणि याचा विस्तारही प्रचंड असतो. फांद्या आडव्या सरळ पसरलेल्या असतात. पाने सहज २५ ते ३० सेमी लांब आणि १० ते १२ सेमी रुंद असतात. रंग अगदी चमकदार हिरवा. पाने साधे आणि जोडीने येतात. पण याचा पर्णसंभार खुपच दाट असतो. पावसाच्या वेळी विसावा घेण्यासाठी आदर्श झाड आहे हे. पावसाळ्याच्या आधी गेलात तर कदाचित अश्या कळ्या दिसतील. पण त्याही, परत यायचे आमंत्रणच देतील. मी वरचे विधान केलेय ते पावसापासुन वाचण्यापेक्षा, फुलांचे दर्शन होण्यासाठी. साधारण जुलै ऑगष्टमधे याला बहर येतो. त्यापुर्वी वेगवेगळ्या अवस्थेतील कळ्या झाडावर दिसत असतात. कळ्या कसल्या छोटे छोटे चेंडुच ते. सुंदर केशरी पिवळा रंग असतो याचा. आणि एकेदिवशी या कळ्यांच्या गुच्छावर असंख्य बारिक शुभ्र फुले उमलतात. याच्या फ़ुलांमुळे याला पॉमपॉम ट्री असेही म्हणतात.तसे याचे शास्त्रीय नाव आहे, Anthocephalus cadamba . अंथॉस म्हणजे फ़ुल आणि केफ़ॅलस म्हणजे गोलाकार. कदंब अर्थातच, भारतीय नावावरुन आलय. पावसाखाली या झाडाखाली जायचे ते या फुलांच्या विचित्र सवयीमुळे. या फुलाना पानाच्या आड दडुन बसायला खुप आवडते. झाडावर अगणित फुले असतात. त्यांचा आकारही सहज चार ते पाच सेमी असतो. पण लांबुन त्यातली फारच कमी दिसतील. या फुलाना एक खुप तीव्र तरिही सुखद गंध असतो. कामभावना जागृत करण्यासाठी या फुलांचा उपयोग केला जातो. या फ़ुलात मकरंदहि असतो, त्यामुळे मधमाश्या फ़ुलाभोवती असतातच. या फुलांचा तीव्र गंध अगदी भल्या पहाटेच जाणवतो. आणि तेही नैसर्गिक आहे. वटवाघळाना आकर्षित करण्यासाठीच तर असते हे. हि फुले कायम पानांपासुन खाली झुकलेली असतात. ( भारताच्या पोस्टल स्टॅंप वर मात्र ते फुल उलटे छापलेले आहे. ) याचे फुल बर्यापैकी वजनदारही असते, त्यामुळे नेम धरुन फ़ेकुन मारायलाही आदर्श. हे फ़ुल म्हणजे अनेक लहान फुलांचा एक समुदाय असतो. ( ज्या वनस्पतिंची फुले लहान असतात, त्यांची फुलांचा गुच्छ करुन आहेत त्यापेक्षा मोठ्या फुलांचा आभास करण्याचा प्रयत्न चाललेला असतो. ) एकदोन दिवसात याच्या वरची फुले गळुन जातात, आणि आतला गोलक तसाच राहतो. त्याचे एका आंबटगोड फळात रुपांतर होते. हे फळ पिकले कि त्यालाही तसाच गंध येतो. आतला गर केशरी, अखंड असतो. त्यात सुक्ष्म बिया असतात. याची चव खुपशी गाभुळलेल्या चिंचेसारखी असते. कोकणात त्याला निवं म्हणतात. ताज्या फळांची चटणी आणि लोणचे घालतात. उत्तरेकडेही हि चटणी करण्याच्या प्रघात आहे. झाडावर असताना अनेक पक्षी, खास करुन भारद्वाज या फळांवर ताव मारताना दिसतो. रात्री वटवाघुळे यावर आलेली असतात. याच्या बियांचा प्रसार प्रामुख्याने त्यांच्यामुळेच होतो. बकर्या, ससे, गायीगुरे, अस्वलं, माकडे देखील हि फळे आवडीने खातात. याची पाने चुरल्यावर आयोडेक्ससारखा वास येतो. त्यात अस्पिरीनसारखे एक द्रव्य असते. याची साल शक्तिवर्धक, ज्वरनाशक, वेदनाशामक असते. अपेक्षेप्रमाणेच शततारका नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींसाठी तो आराध्य वृक्ष आहे. या शततारका नक्षत्रातले तारेही असेच गोलाकारात आहेत. अनेक कुळांचा हा कुलवृक्ष असतो. लग्नाच्यावेळी देवक बसवायला कुलवृक्षाची फांदी लागते. पण त्यात कळम आणि कदंब असा कायम गोंधळ असतो. हे दोन एकाच कुळातले असले तरी वेगळे वृक्ष आहेत. कदंब थोरला तर कळम धाकटा. कळमाचे शास्त्रीय नाव, Mitragyna parvifolia पारवी म्हणजे छोटी आणि फ़ोलिया म्हणजे पाने. याची पाने बरिचशी काजुच्या पानासारखी असतात. टोकाला गोलाकार. ( कदंबाची टोकदार असतात. ) याची फ़ुलेही कदंबाच्या तुलनेत अगदीच छोटी म्हणजे सुपारी एवढीच असतात. रुपाने कदंबाची छोटी आव्रुत्ती. पण सुगंध वैगरे नसतो. हा खास करुन जंगलातच आढळतो. तसे दोन्ही वृक्ष उफ़ाड्याचेच. पण पानाफुलात वेगळेपणा जपणारे. आणखी एक विदुषकी झाड असते ते चेंडुफळाचे. याची पाने असतात जकरांदाच्या पानासारखीच. पण फ़ुले मात्र कदंबासारखी. पांढरी पण जरा मळकट रंगाची. रात्री हि फ़ुले किंचीत चमकतात. याचे नाव Parkia biglandulosa या फुलांच्या देठाशी दोन गाठी असतात, त्यामुळे हे नाव. पुण्याला डेक्कनवर, कामत हॉटेलवरुन जो रोड जातो, तिथे याचे मोठे झाड आहे.
|
| |
| Monday, May 14, 2007 - 5:31 pm: |
|
|
आठवणींच्या चिंचा गाभुळ रुचतील काय तूला रे तूला ते आठवेल का सारे लहानपणीच्या आठवणीत एखादे चिंचेचे झाड हमखास असतेच. फ़ुलांची वाट बघता बघता किंवा चिंचा हाताला येत नाहीसे पासुन, पाला ओरबाडुन खाल्लेला असतो. अगदी बारिक बारिक हिरव्या चिंचा कचाकच चावुन खाल्लेल्या असतात. पौष मासातल्या गरगरीत चिंचा, शेकोटीत भाजुन खाल्लेल्या असतात. गाभुळलेली चिंच मिळाली तर लपवुन, चिमणीच्या दाताने तोडुन, एका खास माणसाला दिलेली असते. दगड मारमारुन पिकलेल्या चिंचा पाडलेल्या असतात, त्यातले दोरे चोखुन चोखुन बोटुके खाल्लेली असतात, चिंचोके भाजुन खाल्लेले असतात, आणि कट्टी झाल्यावर बारा वर्षे चिंचेचा पाला न तोडण्याची शपथ घातलेली असते. छे चिंचेशिवाय बालपणीच्या आठवणी पुर्याच होत नाहीत. तर हि आपली चिंच. Tamarindus indica . इंग्लिश नाव आलेय अरेबिक नावावरुन. तमार ए हिंद, म्हणजे भारतातला खजुर. पण या चिंचेने सगळ्याना मामा बनवलेय. हि चिंच मूळात आपली नाही. ती आलीय आपल्याकडे पुर्व आफ़्रिकेतुन. सुदान मधे चिंचेची झाडे नैसर्गिकरित्या वाढतात. पण आपल्याकडे हि फार पुर्वी आलेली आहे. आफ़्रिकेत तिचा इतका वापर होत नाही. आपल्याकडे मात्र पुर्वापार हिचा वापर होतोय. आपले पंचामृत, काकडीचा कायरस, कोळाचे पोहे. असले पदार्थ, चिंचेशिवाय होवुच शकत नाहीत. अळु, सुरण, शेवळं या भाज्याना चिंच हवीच. ( शेवळांबरोबर काकडं मिळतात खरी, पण जास्तीची चिंच घालावीच लागते. ) डाळीच्या आंबटवरणात चिंच हवीच. ( हल्ली पंजाबी प्रभावामुळे आपला टॉमॅटो, आमचुर वापरण्याकडे कल आहे, पण चिंच ती चिंचच ) दक्षिणेकडे खास करुन तामिळनाडु, आंध्र आणि कर्नाटकमधे चिंचेचा खुप वापर होतो. सांबार, रसम, पुलियो दराय अश्या पदार्थात चिंच हवीच. आपल्याकडे हॉटेलमधे मिळणार्या सांबार रसम मधे चिंच मर्यादीत प्रमाणात घालतात. पण तिकडे घरी केलेल्या पदार्थात, खुपच चिंच असते. चिंचेतल्या टार्टारिक आम्लामुळे पदार्थातील ऑक्झॅलिक स्फटिक विरघळतात त्यामुळे सुरण, अळु सारख्या भाज्यांचा खाजरेपणा कमी होतो. ( चिंचेच्या वापरामुळे दाक्षिणात्य लोकात किडनी स्टोनचे प्रमाण खुपच कमी असते. उलट उत्तरेकडे टोमॅटो पालक यांच्या अतिवापरामुळे ते जास्त असते. ) चिंचेचे बारिक पानाचे डेरेदार वाढलेले झाड आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचे आहे. याची पानगळ भुरुभुरु चालुच असते, व झाडाखाली बराच कचरा असतो पानांचा. पण तरिही झाड पुर्ण बोडके होत नाही. मे महिन्यात मात्र या नाजुक पानावर नाजुक कळ्यांची सजावट होते. नाजुक लालभडक छोट्याश्या कळ्या. हिची दोन लाल आवरणं विलग होवुन आतली चार पिवळी बाह्यदलं उमलतात. त्याच्या आतमधे छोट्याश्या होडीसारख्या तीन पिवळ्या पाकळ्या, त्यावर नाजुक लाल नक्षी आणि आत हिरवे बाकदार पुंकेसर. हि फ़ुलेही आंबट असतात. आणि झाडाखाली सुंदर पिवळा सडा पडलेला असतो. बारिक चिंचेपासुन पुर्ण पिकुन सुकलेली चिंच व्हायला सहज सहा सात महिने लागतात. मे महिन्यात साठवण करण्यासाठी मीठ लावुन काटळलेली म्हणजे, बिया काढलेली चिंच बाजारात येते. पुर्वी मातीच्या माठात, जाडे मीठ घालुन चिंचेचे गोळे ठेवलेले असत. मीठ लावुन वाळवणे हि खास भारतीय खासियत. ईतर आशियायी देशात, साखरेचा वापर होतो. आपल्याकडे फ़ुलांचा खास वापर होत नाही, पण फिलीपिन्समधे हि फुले, सुपमधे वापरली जातात. आपल्याकडे कच्ची, खास करुन पौष महिन्यातली चिंच कुटुन तिचा टिकाऊ ठेचा करायची पद्धत आहे. पण बाकि जगात सगळीकडे चिंचेचा कोळ काढुनच जेवणात वापरला जातो. थाई, इंडोनेशियन, श्रीलंकन जेवणात तो हवाच. उष्ण हवामानात तोंडाला चव आणण्यासाठी चिंच उपयोगी पडते. युरप आणि अमेरिकेत लोकप्रिय असलेल्या Worcestershire सॉस आणि HP सॉसमधेही चिंच असतेच. झिम्बाब्वे मधेही सलाडमधे याच्या फुलांचा वापर होतो, तर इजिप्तमधे चिंचेचे सरबत आवडीने प्यायले जाते. माकडाना आणि हत्तीनाही चिंचा फार आवडतात. पाळीव हत्तीना चिंचेचे पाणी दिले जाते. पुर्वी चणे शेंगदाणे विकणार्या भट्टीत भाजलेले चिंचोके मिळत असत. आम्ही आवडीने ते खात असु. चावायला खुप कडक असले तरी त्याची चव छान असते. अनेकदा गरीब वनवासी चिंचोके गोळा करताना दिसतात. ते भाजुन त्याचे पिठ ते भाकरीच्या पिठात मिसळुन खातात. चिंचोक्यापासुन केलेली खळ, कापड उद्योगात खास करुन घोंगड्या वैगरे करताना उपयोगात येते. चिंचेचे लाकुड, खास करुन गाभ्यातले लाकुड मजबुत असते. आणि फर्निचरसाठी ते वापरतात. चिंचेचे सरबत अत्यंत रुचकर लागते. अग्निमांद्य, तृष्णा, पित्त, तोंडाची चव जाणे या विकारात याचा उपयोग होतो. आपल्याकडच्या जलजिरा सरबतात चिंच वापरतात. पण त्या सरबताचा इतका प्रसार झालेला नाही. थायलंडमधे कॅन केलेले सरबत मी प्यायलो आहे. खुप छान चव असते त्याची. चिंचेच्या गरात कॅल्शियम, फॉस्फोरस, लोह, थायमिन, रिबोफ़्लविन, नायसिन असे अनेक घटक असतात. त्यामुळे हे पेय उत्साहवर्धक ठरते. चिंचेपासुन पेक्टिनही मिळु शकते. आणि जाम जेली मधे त्याचा वापर करता येतो. श्रीलंकेत चिंचेच्या गरात साखर मिसळुन केलेल्या गोळ्या खुप लोकप्रिय आहेत. आपल्याकडे पण तो प्रकार आता मिळु लागलाय. चिंचेच्या झाडावर लाखेचे किडे पोसले जातात. या झाडांच्या पानामुळे खास करुन त्यातला आम्लामुळे कपड्यावर डाग पडतात. तसेच लोखंडी वस्तु गंजु शकतात, म्हणुन पुर्वापार, खास करुन रात्री या झाडाखाली झोपणे निषिद्ध मानले गेलेय. या झाडाखाली घोडाही बांधला जात नाही. तामिळनाडु मधे, या झाडाशी भुताखेताची संगति लावली जाते. याच्या पानापासुन आणि फ़ुलांपासुन एक रंग मिळतो. लोकरीला त्याने लाल रंग येतो. तसेच निळ आणि हा रंग मिसळुन हिरवा रंग तयार होतो. माझ्या लहानपणी गोल गोल वेटोळ्यासारख्या दिसणार्या शेंगा विलायति चिंचा म्हणुन ओळखल्या जात. Pithecellonium dulce असे नाव असणार्या झाडाच्या या शेंगात काळ्या बियाभोवती पांढरा गर असतो. त्यावर कधीकधी गुलाबी छटाही असते. किंचीत खोबर्यासारखा लागणारा हा गर, जास्त खाता येत नाही. कारण त्याने घसा धरतो, शिवाय डोकेही दुखते. आता त्याची लोकप्रियता कमी झालीय, कारण बाजारात खास थायलंडची गोड चिंच मिळु लागलीय. आपल्याच चिंचेसारखी हि चिंच खास विकसित केलीय. तिची चव आंबटगोड असते. आपल्याकडेही आकर्षक बॉक्समधे ती मिळते.
|
| |
| Tuesday, May 15, 2007 - 6:00 pm: |
|
|
आवळ्याचे गुण गावेत तेवढे कमी. संस्कृतमधे " धात्री " म्हणजे आई म्हणून ओळखला जाणारा आवळा. आईप्रमाणे मायेची, आरोग्याची पाखर घालतो. ह्याच्या झाडाची जोपासना तशी कठीण नसते. जे करु ते आईसारखं गोड मानून घेणारा. ह्या वृक्षाला कविवर्य रवींद्रनाथानी शांतिनिकेतनाच्या मातृगीतात स्थान दिलं आहे. तिथले " आमलोकी बन " प्रसिद्ध आहे. ( नक्षत्रवृक्ष ) डॉ. शरदिनी डहाणुकर. Phyllanthus emblica अश्या शास्त्रीय नावाचा आवळा आपल्याला लहानपणापासुन ओळखीचा असतो, लहानपणीच्या लांबच्या प्रवासात. आवळा सुपारी आवश्यक गोष्ट होती. हे झाड तसे नेहमीच्या बघण्यातले नाही. खडबडीत खोड असले तरी याची पाने मात्र खुप देखणी असतात. चिंचेसारखीच पण प्रत्येक पान त्याहुन बारिक पण संयुक्त पान मात्र तिच्याहुन लांब असते. रंग अगदी हिरवागार असतो. पानाच्या मुळाशी अगदी छोटीछोटी हिरवी फुले येतात. नर फुले आणि मादी फुले वेगवेगळी असतात. या झाडावर मधमाश्या असतातच. आवळ्याचे फळ २ ते ३ सेमी व्यासाचे. किंचीत पारदर्शक असे असते. त्यात सहा भाग असतात. आणि फळ सुकले कि ते भाग वेगळे होतात. आत हिरवी उभ्या धारा असलेली बी असते. असे म्हणतात कि भारतीय देवळावरच्या आमलक म्हणुन ओळखल्या जाणार्या भागाची मूळ कल्पना, या आवळ्यापासुनच सुचली. या फळाची चव आंबट म्हणण्यापेक्षा तुरट म्हणायला पाहिजे. नुसता आवळा फार खाता येत नाही. म्हणुन मिठाबरोबर खावा लागतो. आवळा खाल्ल्यानंतर पाणी प्यायले कि गोड लागते. ( आवळा खावा आणि माहेरी जावे, गाजर खावे आणि सासरी जावे, असे माझी आई म्हणते. ) याला डोंगरी आवळा असेही म्हणतात. डोंगरदर्यात याची झाडे दिसतात. नैसर्गिकरित्या झाडाना जे आवळे लागतात ते आकाराने जरा लहान असतात आणि चवीला जास्तच तुरट लागतात. मुद्दाम हे झाड लावले तरी याला फार आवळे लागत नाहीत. व्यापारी तत्वावर जी लागवड केलेली दिसते, ती कलमे मलेशियामधुन आलेली आहेत. आवळ्याची सुपारी, आवळ्याचा किस, मोरावळा असे अनेक साठवणीचे प्रकार केले जातात. साधे लोणचे, फ़ेसलेल्या मोहरीचे लोणचे चटकदार लागते. अलिकडे बाजारात त्याचे सरबत, मावा, कॅंडी असे अनेक प्रकार मिळतात. आयुर्वेदातल्या च्यवनप्राशाचा मुख्य घटक आवळा. तसेच त्रिफ़ळा चुर्णात आवळ्याबरोबर हिरडा आणि बेहडा वापरलेला असतो. केसासाठी पण याचा छान उपयोग होतो. हा आवळा क जीवसत्वाचा चांगला स्त्रोत आहे. १०० ग्रॅम गरात ७२० मिलीग्रॅम क जीवनसत्व असते. रसात हे प्रमाण ९०० मिलिग्रॅम पर्यंत असु शकते. याशिवाय यात भरपुर टॅनिन असते. या टॅनिनमूळे सुकवल्यावरही यातल्या जीवनसत्वांचा नाश होत नाही. या फळाला अडॉप्टेजन असा दर्जा दिलाय, कारण यामुळे शरिरातील सर्व चयापचय क्रिया सुरळीत होतात. तसेच रोगप्रतिकारक्षमता वाढते. ( म्हणुन लहान मुलाना, आवळा सुपारी, मोरावळा नियमित द्यावा. तुरट रसाची सवय होतेच शिवाय हा फायदाही आहेच. ) आवळा उत्तम पित्तनाशक आहे. आम्लपित्तवर आणि यकृताच्या विकारावरही तो गुणकारी आहे. आयुर्वेदात आवळ्याला रसायनाचा दर्जा दिलेला आहे. भरणी नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींसाठी आवळा, हा आर्ध्य वृक्ष आहे. यातल्या टॅनिनमूळे, कपड्यावर लावलेले रंग पक्के होण्यासाठी याच्या रसाचा वापर होतो. कोल्हापुरच्या अंबाबाईच्या देवळासमोर आवळ्याचे ताजे काप विकत मिळतात. तिथल्या हवेत ते काप पांढरेशुभ्र राहतात. पुर्वी हे आवळे बाजारात क्वचितच दिसायचे. पण अलिकडे बाजारात भरपुर प्रमाणात आणि उत्तम दर्ज्याचे आवळे मिळु लागले आहेत. आपण लहानपणापासुन आवडीने खात आलो, ते हे राय आवळे. शाळेच्या बाहेर तिखटमीठ लावलेले आवळे विकायला असतच. हे आवळे मात्र झाडाला भरगोस लागतात. अगदी कोवळे तुरट लागतात आणि पिकुन फिकट पिवळे झाले कि बेचव लागतात. पण पिकायच्या आधी मात्र ते मस्त आंबट तुरट लागतात. झाड गदागदा हलवले कि झाडाखाली सडा पडतो. तसे याचे शिजवुन लोणचेहि करता येते. ठेचुन ताजे लोणचे करता येते. खोबरेमिरची घालुन चटणी करता येते. माझ्या मुंबईच्या अंगणात, वाट्याला आलेल्या दोन चौरस फुट जागेत, या आवळ्याचे झाड दिमाखाने उभे आहे. दरवर्षी न चुकता, ते माझ्या ओंजळीत दान देत असते.
|
| |
| Wednesday, May 16, 2007 - 5:47 pm: |
|
|
हि फुले कसली, असे विचारले तर आमच्याकडे याला काळा मोगरा म्हणतात पासुन, खोटी फ़ुलं आहेत झालं अशी उत्तरे मिळु शकतील. तुमच्या जवळपास जरी हे झाड असले तरी असा फुलोरा बघितला असण्याची शक्यता कमीच आहे, कारण अगदी पहाटेच असा नजारा दिसु शकतो. तर हि आहे बिमली. Averrhoa bilimbi या शास्त्रीय नावातले बिलिंबी हा बहुदा बिमलीचाच अपभ्रंश आहे. पण अनेक दक्षिण आशियायी देशात ती याच नावाने ओळखली जाते. याचे झाड राय आवळ्यासारखेच Otaheite Gooseberry असले तरी पाने खुपच नजाकतदार असतात. त्यामुळे हे झाड खुपच देखणे दिसते. उंचीला दोन ते तीन मीटर्स वाढु शकते. मे महिन्यात उभ्या खोडाला आणि जुन फांद्याना असा देखणा फ़ुलोरा येतो. याला मंद सुवासही असतो. पण उने चढली कि फुले कोमेजतात. मग याना छोटीछोटी हिरवी फळे लागतात. दिसायला तोंडल्यासारखी किंवा छोट्या काकडीसारखी. त्यामुळे क्युकंबर ट्री हे इंग्लिश नाव पडलेय. फळे ६ ते ८ सेमी लांबीची होतात. रंग चमकदार हिरवा असतो. चवीला खुपच आंबट असतात. अनेक जणाना हि खाणे अशक्य होते, इतकी आंबट चव असते याची. पण तरिही माझ्यासारखे दर्दी हि फळे खाऊ शकतात. खाल्यानंतर बराच वेळ तोंडात ती चव घोळत राहते. पण झाडाल्या ज्या प्रमाणात हि फळे लागतात त्या मानाने खुपच कमी प्रमाणात खाल्ली जातात. त्यामुळे झाडाखाली या फळांचा सडा पडलेला असतो. पिकल्यावर रंग किंचीत फ़िका होतो. कच्ची असताना पुसटच्या उभ्या शिरा दिसतात पण मग त्या नाहिश्या होतात. फळ थोडेसे पिवळसर होते आणि लगेच गळुन पडते. कोकणात याची खुप झाडे दिसतात. मुंबईतही बरिच झाडे आहेत. पण तरिही हे फळ बाजारात क्वचितच दिसते. एकतर खाणारे लोक कमी शिवाय या फळाची साल अत्यंत पातळ असल्याने, फळ पिकल्यापिकल्या मऊ पडते आणि लगेच सडायलाही लागते. या झाडाचे मूळ इंडोनेशियात असावे असा कयास आहे. पण आता सगळ्या आशियायी देशात याची झाडे दिसतात. थाई जेवणात, इंडोनेशियन जेवणात, मलाय जेवणात याचा वापर होतो. फिलिपिन्समधेही हे झाड आढळते. तिथे या बिलिंबीची एक गोड जातही आढळते. नुसती खायला जमत नसले तरी बिमली घालुन केलेली ताकाची कढी, डाळीचे वरण, माश्याची आमटी अत्यंत रुचकर लागते. मीठ लावल्यावर याच्या फोडी लगेच मऊ पडत असल्याने, लोणच्यासाठी मीठासकट सगळा मसाला तयार करुन आयत्यावेळी त्यात याच्या फोडी घालाव्या लागतात. याचा जामही रुचकर होतो. साखर जास्त घालावी लागते. फळ हिरवे असले तरी जामला सुंदर गुलाबी रंग येतो. बिमलीत बर्या प्रमाणात फॉस्फोरस असतो. आंबटपणामुळे क जीवनसत्व असतेच. चिंचेसारखाच, तांब्यापितळेची भांडी घासायला या बिमलीचा उपयोग होतो. कपड्यावर पडलेले लोखंडी गंजाचे डाग काढण्यासाठी पण हि फळे उपयोगात येतात. फ़िलिपिन्समधे हे झाड बरेच रुजले आहेत. त्यामुळे तिथे याचे औषधी उपयोग माहीत आहे. अंगाला सुटलेली खाज, सांधेदुखी, फोड यावर याच्या पानाचा लेप लावला जातो. फुलांचा काढा सर्दी खोकल्यावर उपयोगी पडतो. हे झाड फ़ुलावर असताना फळावर असताना तर देखणे दिसतेच, पण नुसती पाने असली तरी सुंदर दिसते.
|
| |
| Thursday, May 17, 2007 - 5:10 pm: |
|
|
झिनझिनाट ( हे एका मालवणी भाषेतल्या कवितासंग्रहाचे नाव आहे ) हा शब्द मला वाटते, या फ़ळाच्या चवीचे यथार्थ वर्णन करु शकतो. श्री शांगादुर्गेच्या देवळाबाहेर द्रोणात तिखटमीठ लावलेल्या चकत्या मिळतात याच्या. त्यातली एक तरी तोंडात टाकली, कि पावले क्षणभर थबकतातच. कारण हाच झिनझिनाट Averrhoa carambola असे शास्त्रीय नाव असलेले हे झाड, मूळचे श्रीलंकेतले. पण आपल्याकडे, इतर आशियाई देशात, ऑस्ट्रेलिया सगळीकडेच आढळते आता. आपल्याकडे याला छोटी करमळं म्हणतात. ( हि छोटी तर मोठी असणारच ना. आहेतच ) याचे झाड मध्यम उंचीचे. पाने कढीपत्त्याच्या पानासारखीच पण संयुक्त पानात एकंदर पानांची संख्या कमी. आकार थोडा मोठा. पाने वरुन काळपट हिरवी तर खालच्या बाजुने, थोडी चंदेरी छटा असलेली. याच्या फांद्या खुप वेड्यावाकड्या वाढलेल्या असतात. आणि झाडाला वेडावाकडा आकार आलेला असतो. याच्या खोडाना आणि जून फांद्याना अगदी छोटी गुलाबी फ़ुले येतात. आणि मग हि फळे खोडानाच लागतात. कच्ची असताना हिरवी असणारी हि फळे, पुढे पोपटी आणि किंचीत पारदर्शक होतात. आणखीनच पिकली तर केशरी रंगाची होतात. पण मग ती लगेच गळुन पडतात. आत चपट्या बिया असतात. वरच्या उठावदार पाच शिरा हि या फळाची खासियत. या शिरा सातपर्यंतही असु शकतात. बिमलीपेक्षा हे फळ जरा घट्ट असते. त्यामुळे बाजारात मिळु शकते. खास करुन शाळेच्या बाहेर असते, विकायला. चवीला रसदार आणि खुप आंबट. पिकले कि आंबट चव जरा कमी होते. याची एक गोड जातही आहे. पण तो प्रकार म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ, असला प्रकार, कारण त्यातली साखर जास्तीत जास्त ४ टक्क्यापर्यंतच असते. याच्या पाच धारांमुळे याच्या आडव्या चकत्या केल्या तर त्या तार्यासारख्या दिसतात. म्हणुन याला स्टारफ़्रुट असे नाव आहे. थायलंडमधे या चकत्या मीठ मिरची लावुन सुकवतात. त्या चवीला खुप छान लागतात. याचे लोणचे घालतात. जाम पण करतात. कोकणात याची मिरची खोबरे घालुन भाजी करतात. बाकि आशियायी देशात याचा रस पण पितात. यात क जीवनसत्व आणि बर्या प्रमाणात फॉस्फोरस असतो. पण यात ऑक्झॅलिक आम्ल पण असते, त्यामुळे काहि जणाना हे खाऊन डोकेदुखी होवु शकते. याच कारणासाठी किडनी स्टोनचा त्रास असलेल्यानी हे फळ खाऊ नये. याच्या रसामुळे काहि ड्रग्ज्सची खास करुन झोपेसाठी वापरल्या जाणार्या ड्रग्ज्सची तीव्रता वाढु शकते. तरिही या फळाची लोकप्रियता आता वाढु लागलीय. खाण्यासाठीच नव्हे तर सजावटीसाठी देखील हे फळ वापरतात. आशियायी देशात सुपमधे, माश्यांबरोबर हे फळ जेवणात वापरतात. लेमनग्रासच्या काड्यात ओवुन या फळाच्या चकत्या बार्बेक्यु करुन खाता येतात. आपल्याकडे नसले तरी इतर देशात याचे औषधी उपयोग केले जातात. नेत्रविकारात. अग्निमांद्यात याचा उपयोग होतो. याची चव कितीजणानी घेतलीय नाहिती नाही. वरचे फोटो बघुन त्यांच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटले असणारच.
|
| |
| Friday, May 18, 2007 - 4:30 pm: |
|
|
सोलकढी म्हणा, आमसुलाचे सार म्हणा, फ़ुटी कढी म्हणा, जिरवणी म्हणा किंवा कोकमकढी म्हणा, कोकणी जेवणात त्याचे अनन्यसाधारण महत्व आहे. आणि या सगळ्या कढीसाठी हवीत, आमसोले, कोकमं, सोला किंवा रातांब्याची सुकवलेली सालं Garcinia indica अश्या शास्त्रीय नावाने ओळखले जाणारे हे झाड अर्थातच मूळचे भारतातले. पण याचा वापर जास्त करुन महाराष्ट्राचा कोकणकिनारा, गोवा, कर्नाटक आणि काहि प्रमाणात गुजराथमधे होतो. बाकिच्या राज्यात हा प्रकार फारसा माहित नाही. दिल्लीकर तर, ए जी हमने ना देखी कही ऐसी गुलाबी गुलाबी कढी जी, करत यावर तुटुन पडतात. याचे झाड उंच आणि सरळसोट वाढते. या झाडाला आडवा विस्तार खुपच कमी असतो. पाने साधी आणि चमकदार हिरव्या रंगाची. पण कोवळी पाने मात्र लाल रंगाची असतात. याची फुले अगदीच छोटी असतात. पण नर आणि मादि फुले वेगळी असतात. एखाद्या झाडाला नुसतीच नरफुले येतात आणि अजिबात फलधारणा होत नाही. एप्रिल ते मे महिन्यात यावर लहानलहान हिरवी फळे दिसतात. याला रातांबे असेही म्हणतात. गोव्यात याला भिण्णा असा शब्द आहे. हि फळे आधी रक्तासारखी लाल आणि मग गर्द लाल होतात. यावरची जाड साल, हि कोकम करण्यासाठीचा कच्चा माल. अगदी पक्व झालेली फळे झाडावरुन गळुन पडतात. या फळाच्या आत मऊ पांढरा गर असतो. याचे उभे सहा ते आठ भाग झालेले असतात. फळ अगदी पक्व झाल्यावर हा गर गुलाबी होतो. असा गुलाबी गर खायला खुप गोड लागतो. पण त्यापुर्वी मात्र तो आंबटच लागतो. हा गर खायची एक खास युक्ती आहे. दाताचा स्पर्श या गराला होवु द्यायचा नसतो, त्यामुळे याचे तुकडे थेट गिळावेच लागतात. दातानी चावल्यास, दातावर एका पिवळ्या डिंकाचा थर जमतो. पक्व फळांच्या साली उन्हात सुकवुन कोकमे करतात. त्यावेळी ती परत परत त्याच फळाच्या गराच्या रसात बुडवली जातात. ताज्या कोकमामुळे बहारीचा गर्दगुलाबी रंग पदार्थाना येतो. कोकमे जुनी झाली तर रंग थोडा कमी होतो, पण स्वादात फारसा फरक पडत नाही. कोकमापासुन प्रामुख्याने कढीच केली जाते. पण माश्याच्या आमटीत, डाळीच्या आमटीत, सुरण, कच्ची केळी सारख्या काहि भाज्यातही याचा वापर केला जातो. चिवड्यात आमसुले तळुन त्याची पुड करुन घातली तर छान चव येते. आमच्या लहानपणी जिरागोळी नावाच्या गोळ्या मिळायच्या. त्या खाऊन जीभे लालभडक होत असे. त्या गोळ्यापण कोकमापासुनच तयार करत असत. कोकमाची चटणी ( मीठ साखर व वेलची घालुन केलेली ) खुप चवदार लागते. पण ती चटणी काविळ झाल्यास व सुअत्क संपल्यावर करायची रित असल्याने, एरवी सहसा केली जात नाही. कोकमाचे सरबतही फार लोकप्रिय आहे. त्याला अमृतकोकम असे खास नाव आहे. पुर्वी रातांब्याच्या वाट्यात साखर भरुन त्या काचेच्या बरणीत रचुन ती बरणी उन्हात ठेवली जात असे. अश्या अमृतकोकमाला खुपच आगळी चव येत असे. पण त्या काळी ते सरबत सामान्य लोकांसाठी बाजारात उपलब्ध नव्हते. व्यापारी तत्वावर उत्पादन करताना, साले शिजवुन व कधीकधी क्रुत्रिम प्रकारे ते सरबत केले जाते. हे सरबत पित्तशामक असते. उन्हात फिरुन आल्यावर हे सरबत प्यायल्याने खुपच बरे वाटते. ( पुर्वी अगदी परसात झाड असले तरी इतकी उस्तवार कुणी करत नसे. केवळे घरच्यापुरती कोकमं तयार करुन बाकिची फळे अक्षरशः कुजुन वाया जात असत. ) कोकमे वापरण्यापुर्वी ती जराअ वेळ कोमट पाण्यात भिजत घालावी लागतात. ते टळावे मह्णुन कोकमाना मीठ लावुन त्याचा रस काढत असत. आगळ असे त्याला नाव आहे. घरगुति स्वरुपात केलेले आगळ, खुप घट्ट आणि गुलाबी असते. बाजारात मिळणारे मात्र पातळ आणि खारट असते. अंगावर जेव्हा पित्ताचे फोड उठतात, त्यावेळी अंगाला कोकमे चोळुन अंघोळ केली तर ताबडतोब, ते फोड जातात. कोकमाच्या बियांमधे २६ ते २८ टक्के तेल असते. या बिया कुटुन पाण्यात उकळुन ते वेगळे केले जाते. या तेलाची खासियत म्हणते सामान्य तपमानालाही ते मेणासारखे घट्ट असते. या तेलाच्या गोळ्याना मुटियाल असे खास नाव आहे. या तेलामुळेच या झाडाला बटर ट्री असेही नाव पडले आहे. या तेलाचा सौंदर्यप्रसाधनात उपयोग होतो. हे तेल खाद्य आहे, आणि क्वचित याचा खाण्यासाठीही उपयोग होतो. काहि चॉकलेटमधे ते वापरलेले असते. पण कोकणात याचा मुख्य उपयोग, तळपायाला पडलेल्या भेगांवर होतो. अलिकडे या कोकमांपासुन औद्योगिक तत्वावर हायड्रॉक्सी सायट्रिक आम्ल मिळवले जाते. मानवी शरिरातील मेद कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. याच कारणासाठी कोकमापासुन केलेली दारु, जास्त लोकप्रिय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाचक म्हणुन याचा वापर पुर्वापार होतोच आहे. जेवणात शेवटच्या भातावर याचे सार घेतले जाते किंवा नुसतेच प्यायले जाते ते याच कारणासाठी. या झाडाच्या सालीच्या काढ्याने, पॅरालिसिस वर उपाय करण्याचे प्रयोग चालु आहेत. तसे हे झाड साह्ज वाढते. याला देखभालीची गरज नसते. तसेच यावर किडी वा रोग पडत नाहीत. अलिकडेच रातांब्याची पिवळी जात बघितली. पण ती लोकप्रिय होईल का, याची शंका आहे. सिन्गापुर आणि थायलंडमधे मॅंगोस्टीन नावाचे एक फळ मिळते. रातांब्यापेक्षा बरेच मोठे. काळ्या रंगाचे असते. देठही मोठा असतो. साल जाड व चिवट असते. आतला गर पाच ते सहा भागात विभागलेला असतो. गर मात्र अगदी मुलायम. चवीला कोवळ्या शहाळ्यासारखा किंवा थोडाफार लिचीसारखा. हे फळ अत्यंत लोकप्रिय आहे पण तितकेच महागही. भारतात याची लगवड होते पण बाजारात खुपच कमी दिसते आणि अर्थातच खुप महागही असते. हे फळ मी जेव्हा पहिल्यांदा खाल्ले, त्यावेळी त्याचे आपल्या रातांब्याशी असलेले साम्य माझ्या लक्षात आले. आणि माझे तर्कट लढवुन मी याच्या सालीची चव बघितली. ती इतकी कडवट होती, कि कायमचा धडा मिळाला, मला. मस्कतच्या सुपरमार्केटमधे श्रीलंकन सेक्शनमधे मला गोरका नावाचा प्रकार दिसला होता. मुद्दाम आणुन बघितला, त्याच्या कढीची चव बरिचशी कोकमासारखीच पण रंग मात्र पिवळसर आला. त्या लोकात ते माश्याच्या करीत वापरतात. थाई जेवणात असाम गेलुगोर या नावाने सुकवलेल्या आंबट फ़ळाच्या चकत्या वापरतात. ते झाड पण याच कुळातले. (Garcinia atroviridis) . आपल्याकडे कारवारमधे आणि गुजराथी लोकातही अश्या चकत्या वापरायची पद्धत आहे. थायलंडमधे याच कुळातल्या आणखी एका झाडाची फळे (Garcinia schomburgkiana) सलाडमधे वैगरे वापरतात. त्या फळाना तिथे मदन, असे नाव आहे.
|
| |
| Monday, May 21, 2007 - 4:08 pm: |
|
|
या सर्व आंबट झाडानंतर लिंबाची आठवण होणे सहाजिक आहे. पण लिंबाचे हे सायट्रस कुटुंब खुपच मोठे आहे. शिवाय त्या प्रत्येक फळात अनेक उपजाती आहेत. कोकणात हौसेने लिंबाचे झाड लावलेही जाते, पण त्याला भरभरुन फळे येत नाहीत. याच कुळातले एक वैशिष्ठपुर्ण फळ मात्र कोकणात आपले स्थान राखुन आहे. या कुटुंबातले सगळ्यात मोठे फळ आहे हे. Citrus grandis असे याचे शास्त्रीय नाव. याला पपनस असे व्यवहारातले नाव. यालाच काहिजण भंपार ( कदाचित बंपर या शब्दाचा अपभ्रंश ) असेही म्हणतात. मला खात्रीने नाही सांगता येणार, पण पुर्वी याच फळाला महाळुंग म्हणत असत असेही वाटते. हे फळ तितकेसे लोकप्रिय राहिलेले नाही. याची कारणे शोधायचा प्रयत्न करतो. लोक घेत नाहीत म्हणुन बाजारात येत नाहीत आणि बाजारात नाही म्हणुन लोक घेत नाहीत, असे दुष्टचक्र आहेच. हे फळ मोठे म्हणजे सहज १५ ते २० सेमी व्यासाचे असते. त्यापेक्षाही मोठी फळे असु शकतात. या आकाराचे जरा दडपणच येत असेल. घेतली सुरी आणि कापले हे फळ आडवे असे करता येत नाही. याची साल खुपच जाड म्हणजे जवळजवळ एक सेमी जाडीची असते. शिवाय ती चिवटही असते. सभोवताली अलगद सुरी फिरवुन हि चिवट साल हाताने वेगळी करावी लागते. ( माझ्या एका गायनिक मित्राला, या क्रियेत नेमकी सिझेरियन सेक्शनमधेली एक स्टेप आठवते. ) आणि हि साल दुर केल्यानंतर हात धुवावे लागतात. तसे केले नाही तर सगळे फळ कडु होते. या सालीच्या आतही गुलाबी कापसासारखा एक भाग असतो. तो हळुहळु ओढुन काढावा लागतो. मग आतमधे या फळाच्या मोठमोठ्या पाकळ्या असतात. एकेक पाकळी सहज आठ ते दहा सेमी लांबीची. या पाकळ्याही खुपदा घट्ट चिकटुन बसलेल्या असतात. त्या जरा जोर लावुन वेगळ्या कराव्या लागतात. त्या थोडावेळ वार्यावर ठेवाव्या लागतात. मग परत प्रत्येक पाकळीवरची जाड चिवट पांढरी साल सोलुन काढली की आतमधे चमकदार मोठ्या पाकळ्या असतात. एकेक पाकळी लसणीच्या छोट्या पाकळी एवढी असते. रंग पांढरा ते गुलाबी अश्या रेंजमधला असु शकतो. चव आंबट गोड, किंचीत मुरमुरणारी असते. साखर मीठ लावुन खाल्ले तर आणखीनच चवदार लागते. या पाकळ्या तश्या मजबुत असतात. पण एवढे सोपस्कार करुनही हे फळ अपेक्षित चवीचे निघेल असे सांगता येत नाही. कधीकधी साल अवास्तव जाड असल्याने, आतले फळ खुपच छोट्या आकाराचे निघते. कधी ते अति कोवळे असल्याने घट्ट आणि कडु निघते तर कधी अति जुन झाल्याने घट्ट निघते. काहि फळे इतकी मुरमुरतात, कि ओठ आणि जीभ चुरचुरायला लागते. पण हे सगळे झाडाचे दोष आहेत. एखाद्या झाडाची फळे खुपच चवदार, पातळ सालीची, बिनबियांची, गडद गुलाबी गराची निघतात. ( पण अशी फळे बाजारात येत नाहीत. ) आपल्याकडे याची व्यापारी तत्वावर लागवड केलेली दिसत नाही. अगदी दादरच्या बाजारातही हे फळ एकदोघांकडेच दिसते. पुर्वी वेस्टर्न दादर स्टेशनच्या प्लॅटफ़ॉर्म नंबर एक वर एक फ़्रुट स्टॉल होता. त्याच्याकडे पपनसाच्या पाकळ्या मिळायच्या. खुप वेळा खायचो मी त्या. त्याहीवेळी तो विक्रेता म्हणायचा, कि या फळाला खप नाही. कोकणात मात्र अनेकजणांच्या परसात हे झाड असते. याला फळेही भरपुर लागतात. इतक्या फळांच्या भाराने झाड वाकत कसे नाही असेच मला वाटत राहते. गणपतिच्या दिवसात या फळाचे जास्त महत्व असते. गणपतिवरच्या माटोळीत ते हवेच. शिवाय प्रसाद म्हणुनही याच्या पाकळ्या देतात. जरा माझा याच्या जुन्या नावाचा कयास बरोबर असेल, तर पुर्वी या फळाचा मोरंबा, सरबत वैगरेही करत असत. याच्या कापा पाकवुनही ठेवत असत. याची तुलना खुपदा ग्रेपफ़्रुटशी केली जाते. पण नीट कापले आणि जातिवंत असले तर पपनस अजिबात कडु लागत नाही. बाजारात हे चिनी ग्रेपफ़्रुट म्हणुन विकलेही जाते. याला Pummelo असेही नाव आहे. याची एक मऊसर जात मी मस्कतमधे खाल्ली होती. पण ती आग्दीच बेचव होती. पण तरिही चिनमधे याची खुप लागवड होते. इतर आशियायी देशात अगदी जपानमधेही याची खुप लागवड होते. अनेकवेळा फळ खाण्यापेक्षा या झाडाची शोभेसाठी लागवड होते. खास करुन देवळाच्या बाहेर याची झाडे मी बघितली आहेत. यालाच Shaddock असेही नाव आहे.
|
| |
| Tuesday, May 22, 2007 - 5:12 pm: |
|
|
रात्री जेवणं वैगरे आटपली कि भुताखेतांच्या गप्पा मारत बसणे हा कोकणातला मस्त टाईमपास असे. चढाओढीने हे किस्से सांगणे, कोकणी माणसाना सहज जमते. बरं हि मंडळी सगळीच वाईट असतात असे नाही. देवचार, म्हापुरुष, सत्पुरुष अशी मदत करणारी मंडळी पण असतात. तर आज ओळख करुन घेऊया एका भुताच्या झाडाची. याला कोकणी माणसं भुत म्हणत नाहीत. ( कोकणी माणसं एवढी कृतघ्न नसतात, झाडांशी आणि भुताखेतांशीही ) याचे इंग्लिशमधले नाव आहे, घोस्ट ट्री. रात्रीच्या अंधारात जंगलात फ़िरत असताना, असे अवाढव्य वाढलेले पांढरेशुभ्र झाड समोर आले, तर हाडांचा एखादा प्रचंड सांगाडाच समोर आल्यासारखे वाटते, म्हणुन हे नाव. तसे याला कांडोळ किंवा कराया असे नावही आहे. शास्त्रीय नाव. Sterculia urens फोटोत दिसतेय ते याचे मे महिन्यातले रुप. टोकाशी कोवळी पाने नुकतीच फुटताहेत. कापसाच्या पानासारखी याची पाने, हिरव्या पोपटी रंगाची असतात. तशी वर्षभर यावर पाने असतातच, पण मार्च एप्रिलमधे याची पाने गळुन नुसता सांगाडा उरतो. एप्रिलमधे याच्या टोकाशी, पिवळा मोहोर येतो. फोटोत दिसतोय तो फ़ुलोरा बर्यापैकी चांगल्या अवस्थेत आहे. पण याची फुले अतिशय लहान असतात, आणि खुप दाटीवाटीने येतात. कोवळ्या कळ्या, उमललेली फुले, सुकलेली फ़ुले सगळी एकाच गुच्छात असतात. यातुन एक अत्यंत चिकट असा स्त्राव बाहेर येतो आणि सुकलेल्या फ़ुलानाही धरुन ठेवतो. या सगळ्यामुळे फ़ांदीच्या टोकाशी शेवाळ्याच्या गोळा जमल्यासारखा दिसतो. शिवाय या मोहोराला अतिशय घाणेरडा वास येतो. या दुर्गंधीमुळेच त्याला हे नाव पडलय. स्टर्कस चा अर्थ शेण किंवा विष्ठा. या सगळ्या अजागळ गुंतवळीतुन, याची फळे डोकावतात. ( फोटोत नीट दिसत नसले तरी ) हि फळे पाच पाकळ्याच्या फ़ुलासारखी दिसतात. प्रत्येक पाकळी फुगीर व लाल किरमिजी रंगाची. हे फळ दिसतेही छान. पण याचे रुप दुरुनच साजरे. कारण फळावरचे कुस, तीक्ष्ण असतात, व बोटाना रुतुन खुप खाज येते. या फळाच्या प्रत्येक भागात तीनचार बिया असतात. मध्य प्रदेशातील गोंड लोक, हि फळे भाजुन त्याच्या बिया खातात. आता इतके अजागळ झाड काय उपयोगाचे असणार, असे कुणालाही वाटेल. पण An ugly tree is yet to be born या वचनाप्रमाणे, हे झाडही खुप उपयुक्त आहे. याची साल अगदी शुभ्र असते व तिचे कागदासारखे पातळ पापुद्रे निघत असतात. या पापुद्र्यांपासुन पुर्वी वस्त्र तयार केले जात असे. ( कदाचित वल्कले ? !!! ) याच्या सालीपासुन वाख करता येतो आणि त्याचे दोरही वळता येतात. याचे शुभ्र खोड वाद्ये, खेळणी वैगरे करण्यासाठी उपयोगात येते. याहुनही याचा एक खास उपयोग आहे. याच्या सालीपासुन एक पांढरा गोंद मिळतो. कराया गम म्हणुन तो प्रसिद्ध आहे. हा गोंद सारक ( लॅक्सेटिव्ह ) म्हणुन वापरता येतो. तसेच औषधी गोळ्यांमधली चुर्णे, एकसंध राखण्यासाठी याचा उपयोग होतो. दंतवैद्य कृत्रिम दात जागेवर नीट चिकटुन बसण्यासाठी हा गोंद वापरतात. आईसक्रीममधे वैगरे स्टॅबिलायझर म्हणुनही याचा उपयोग होतो. सौंदर्यप्रसाधनातही या कराया गमचा वापर होतो. पण या झाडामधे नर फुले आणि मादी फुले यांचे प्रमाण मूळातच खुप व्यस्त असते. त्यामुळे फलधारणा खुपच कमी होते आणि अर्थातच हि झाडेही आता दुर्मिळ होवु लागली आहेत. पण तरिही हे झाड भारतभर सगळीकडे दिसु शकते. आजुबाजुच्या आशियायी देशातही हि झाडे आढळतात. कोकणातले एक खास फुलही कांडोळ नावानेच ओळखले जाते. याची लागवड कुणी मुद्दाम करत नाही, पण याची वेल सहजरित्या जंगलात आणि पाणथळ जागी दिसते. याची पाने, कळ्या अगदी अजागळ असतात. पण फ़ुलाबद्दल मात्र तसे म्हणता येईल का ?
|
| |
| Wednesday, May 23, 2007 - 5:28 pm: |
|
|
पर्जन्यवृक्ष किंवा रेनट्री नावाचे हे झाड आपल्या सगळ्यांच्याच चांगलेच परिचयाचे आहे. असणारच कारण याची लागवड सगळीकडेच झालीत. अतिरेकच झालाय म्हणा ना. Pithecolobium saman नावाचे हे झाड, मूळचे मध्य अमेरिकेतले. पण आपल्याकडे हे बर्याच काळापासुन लागवले जातेय. हे झाड खुपच भराभर वाढते. त्यामुळे सावलीसाठी रस्त्याच्या बाजुने लावले जाते. याची साल खुपच खडबडीत. आणि अवाढव्य पसार्यात काही टोकाकडच्या फांद्या सुकलेल्या असतातच. कावळा बसायला आणि फांदी मोडायला, हे या झाडाच्या बाबतीत खुपदा खरे ठरते. आणि अश्या फांद्या रस्त्यावर पडलेल्या असतातच. एरवी झाडावर तुरळक फुले दिसतात. पण एप्रिल मे मधे हे झाड भरभरुन फुलते. हा बहर पाऊस सुरु झाला तरी सुरु असतो. उनात या झाडाचा गच्च पसारा, उनाला जमिनीपर्यंत पोहोचुच देत नाही. पण पावसाची चाहुल लागली कि मात्र हे झाड पाने मिटुन घेते. या झाडाच्या अश्या पाने मिटण्याच्या खोडीवरुन, पावसाचा अंदाज बांधता येतो. याच खोडीमूळे, ऐन पावसात या झाडाखाली उभे राहण्यात अर्थ नसतो. याची फुले म्हणजे अनेक लहान फ़ुलांचा गुच्छ असतो. फिक्कट हिरव्या पुषपकोषातुन अर्धे पांढरे अर्धे गुलाबी असे पुंकेसर निघालेले असतात. उत्तम मातीत हे फुल भरदार असते, पण निकस जमिनीत वाढलेल्या झाडावरची फुले मात्र निस्तेज असतात. पण दोन्ही जमिनीत हे झाड मात्र जोमाने वाधते. या झाडाच्या शास्त्रीय नावातल्या पिथेकोलोबियम चा अर्थ होतो, माकडाची कर्णफुले. पण याला रेनट्री हे नाव पडण्याचे कारण वेगळेच आहे. या झाडाखाली उभे राहिल्यास, पावसाचा मौसम नसतानाही, अंगावर शिंतोडे उडालेसे वाटतात. झाडाखाली एखादी गाडी उभी केली असेल तर काचेवर दवासारखे थेंब पडलेले दिसतात. आणि हा चक्क त्या पानावर पोसलेल्या किडींचा प्रसाद असतो. याला लांबट काळ्या शेंगा लागतात. या भरीव शेंगात काळा चिकट गर असतो, आणि त्यात तपकिरी बिया असतात. झाडाखाली रस्त्यावर या शेंगा पडलेल्या असतात, आणि त्यावरुन गाड्या गेल्या कि चिकट गरामुळे डांबरी रस्ता खडबडीत होवुन जातो. अगदी याच झाडासारखे फुल येणारे, पावडर पफ़ नावाचे एक फुल असते. याचे झाड छोटे असते. पाने लहान असतात. पण जास्त चमकदार असतात. यात गुलाबी आणि लाल असे दोन प्रकार दिसतात. या फुलाचे वेगळेपण म्हणजे यात पांढरा भाग जवळजवळ नसतोच. या पर्जन्यवृक्षाला काहि जण गुलाबी शिरीष म्हणतात तर काहिजण विलायती शिरीष. दोन्ही चुकच आहे. खरा शिरीष खुपजणानी बघितलेलाही नसतो.
|
| |
| Wednesday, May 23, 2007 - 5:37 pm: |
|
|
या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा सत्वगुण येता अंगा, विंचु उतरे भरभरा नाथांच्या भारुडातला विंचु हे रुपक आणि त्यावरचा उताराही अध्यात्मिक. पण अनेक विषांवरचा उतारा असलेला हा शिरीष. Albizzia lebbeck असे नाव असलेला हा शिरीष. यातला लब्बैक हा शब्द, इजिप्तमधल्या एका गावावरुन आलाय. याचे झाड तसे पर्जन्यवृक्षासारखेच असते. पण फांद्यांची ठेवण वेगळी असते. हि झाडे सहज २० मीटर्सपर्यंत वाढु शकतात. हा खरा तर जंगलातला वृक्ष, पण त्याच्या उपयोगामुळे मुद्दाम शहरातुन लावला जात असे. ( हो भुतकाळच वापरायला हवा मला. हे झाड शोधायला मला खुप भटकावे लागले. ) पानाच्या रंगावरुन याच्या दोन उपजाती दिसतात. एक पांढरा शिरीष तर दुसरा काळा शिरीष. कोल्हापुरला रंकाळा तलावाच्या परिसरात, नगर जिल्ह्यात पांढर्या शिरीषाची खुप झाडे आहेत. काळा शिरीष मात्र मला शोधावा लागला. आणि तो घराजवळच सापडला. याची पाने संयुक्त पण जरा गोलसर असतात. याची फुले हिरवी आणि पांढरी असतात. याला एक सुंदर गंध येतो. अनेक काव्यात या फुलांच्या नाजुकपणाचा आणि गंधाचा उल्लेख येतो. पुर्वी हे फुल कानावर अडकवायची फ़ॅशन होती. याच्या शेंगाही आठ ते दहा सेमी लांब व दोन ते तीन सेमी रुंद असतात. या सोनेरी रंगाच्या शेंगा पानझडीतही झाडाची साथ सोडत नाहीत. वार्यावर झुलत नाजुक आवाजात खुळखुळत असतात. या झाडाला एक खास आकार असतो. भारतात सगळीकडे हे झाड नैसर्गिकरित्या आढळते. राजस्थानात याची खास लागवड केली जाते. उंटाला याची पाने खुप आवडतात. याचे लाकुड कोरीवकामासाठी खास उपयोगी असते. वर उल्लेख केल्याप्रमाणे हे झाड विषघ्न आहे. आयुर्वेदाची अगदतंत्र नावाची एक शाखा, विषांचा अभ्यास करते. विष कसे देता येईल आणि त्यावरचा उतारा काय, याची सविस्तर चर्चा हि शाखा करते. या उतार्यात अनेक खनिजजन्य, प्राणीजन्य व वनस्पतिजन्य पदार्थ असतात. त्या वनस्पतिजन्य घटकात, शिरीष प्रामुख्याने असतो. ( अन्नात विष आहे का ते ओळखण्यासाठी जेडचा पेला वापरत असत, असे मी वाचले होते तसेच विषप्रयोग करण्यासाठी विषकन्या असत असेही वाचले. या विषकन्याना लहानपणापासुन विष पाजलेले असते. नागाचे वैगरे विष म्हणजे उच्च दर्ज्याची प्रथिने असतत. ती तोंडावाटे घेतल्यास पचु शकतात, फक्त थेट रक्तात मिसळल्यास रक्त गोठवतात. तर अश्या विषकन्यांचा संग आणि डंखही एखाद्याला जीवे मारण्यास पुरेसा असे. ) पण हा उपयोग सध्या मागे पडल्यासारखा झालाय. हे झाडही आता कमीच दिसते. आधुनिक जगात, कुठलेही औषध बाजारात आणायचे असेल, तर अत्यंत कडक चाचण्या कराव्या लागतात. आधी प्राण्यांवर प्रयोग करावे लागतात. मग माणसांवर प्रयोग करावे लागतात. त्यातही दोन गट करुन, एका गटाला औषध तर दुसर्या गटाला प्लासिबो म्हणजे नकली औषध द्यावे लागते. झालेला परिणाम केवळ त्या औषधानेच झाला हे पुर्णपणे तर्काच्या आणि निरिक्षणाच्या आधारे सिद्ध करावे लागते. मला नवल वाटते ते कि आपल्या पुर्वजानी, हे प्रयोग कसे केले असतील. मूळात एखाद्या झाडाचा एखाद्या विकारावर उपयोग होवु शकतो, ते कसे शोधले असेल. त्या वनस्पतिच्या पंचांगांपैकी नेमके कुठले व कसे वापरायचे, हे कसे शोधले असेल. ते तयार म्हणजे सिद्ध करायची पद्धत कशी शोधली असेल. त्याच्या प्रयोग कुणावर केला असेल. हे सर्व न्युटन किंवा आर्किमिडीज सारखे एखाद्या जादुच्या क्षणी नक्कीच घडले नसेल. मग इतक्या वर्षाच्या तपश्चर्येने मिळवलेले ज्ञान, आपण सहज विसरुन का जातो ?
|
| |
| Thursday, May 24, 2007 - 4:35 pm: |
|
|
राम म्हणु नये राम, नाही सीतेच्या तोलाचा सीता माझी हिरकणी, राम हलक्या दिलाचा लोकगीतातल्या या ओळी म्हणजे मला वाटते कि सीतेचाच हुंदका आहेत. रामभक्तांच्या सर्व आर्ग्युमेंट्स लक्षात घीऊनही, मला असेच वाटते, कि एक स्त्री म्हणुन सीतेवर अन्यायच झाला. ( लोकसाहित्यात मात्र सीतेला योग्य तो मान दिला जातो. फुलांमधेदेखील, सीतेची वेणी, सीतेची आसवं अश्या नावाची फुले आहेत. ) आणि हिच उपेक्षा सीतेच्या अशोकाच्या वाट्याला पण आलीय. अनेक जण रस्त्याच्या किंवा बंगल्यांच्या कडेला लावणार्या उंचाड्या झाडालाच अशोक समजतात. त्याला अशोकाची सर नाहीच येऊ शकणार. त्याला सावली तरी असते का ? मग अशोकवनात सीता त्याच्या सावलीत कशी विलाप करत बसली असेल ? तो आसुपाल किंवा मास्ट ट्री Polyalthia longifolia जवळपास याचे झाड असेल तर याला फिकट हिरवा फ़ुलोरा आला असल्याचे बघितला असेल. पाच पाकळ्यांची हि फुले रंगामुळे आणि फांद्याच्या ठेवणीमुळे दिसतही नाहीत. याची एक जरा आडवी वाढणारी जात असते, त्या झाडाचा फुलोरा दिसु शकतो. फ़ुलानंतर याला आधी हिरवी आणि पिकल्यावर काळी होणारी फळेही लागतात. पक्षीदेखील ती फळे खात नाहीत. खरे तर सहसा पक्षी या झाडावर बसतच नाहीत. दारात लावलेल्या रुक्मिणी किंवा ईक्झोरा ला पण काहि जण अशोक समजतात. चार पाकळ्यांच्या फुलांचे अर्धगोलाकार गुच्छ या झुडुपावर जवळजवळ वर्षभर असतात. यात लाल ते पिवळा अश्या छटा असु शकतात. याचे गजरेही करता येतात. याची फुले एकात एक ओवुन लहान मुले खेळतात. माझ्या छोट्या मैत्रिणीने याच्या देठाना बॉलपेनने भोक पाडुन त्यातच दुसर्या फुलाचा देठ ओवुन, मस्त माळ केली होती. या गुच्छात क्वचित तीन किंवा पाच पाकळ्याचे फुल दिसते. आणि ते शोधण्याचा खेळही मुले खेळतात. पण तोही खरा अशोक नव्हेच. अशोक असा नाही अशोक तसाही नाही, असे नेति नेति म्हणत, आपण अशोकाजवळ कधी पोहोचणार ? खर्या अशोकाचे वर्णन आपल्याकडे अनेक जुन्या काव्यात आढळते. अशोकानिर्भर्स्तिपद्मरागम, आकृष्टहेमद्युतिकर्णिकारं मुक्तकलापीकृतसिंधुवारं, वसंत्पुष्पाभरणं वहंती या श्लोकात अशोकाची फुले, माणकांपेक्षाही सुंदर होती, असे वर्णिले आहे. Saraca indica या नावाचा हा देखणा वृक्ष आता खुपच दुर्मिळ झालाय. याचे झाड तीन ते पाच मीटर्स पर्यंत वाढु शकते. पाने आंब्यासारखीच. पण जरा रुंद आणि टोकाला गोलाकार. फांद्या भरपुर. पानेही भरपुर. याची कोवळी पाने लाल असतात. त्यामुळे याला रक्तपर्ण आणि ताम्रपर्ण अशीही नावे आहेत. या कोवळ्या पानाची आणखी एक गंम्मत म्हणजे हि पालवी अगदी तुटल्याप्रमाणे मिटुन खाली लोंबत असते. वार्याने ते हलते तेंव्हा गरगर फिरेल कि काय असेही वाटत राहते. मग हळुहळु ती पोपटी हिरवी होते आणि जोम धरते. पण अशोकाचे खरे वैभव म्हणजे त्याची फुले. सुंदर ललनांचा पदस्पर्ष झालेल्या जमिनीतच हा वाढतो, किंवा सुंदर स्त्रीचा लत्ताप्रहार झाला तरच तो फुलतो, असा प्रवाद आहे. ( आमच्या कॉलनीत अश्विनी भावेचे माहेर आहे. आणि त्या सोसायटीच्या दाराशी भरभरुन फुलणारे अशोक आहेत. ) तो लत्ताप्रहाराचा किस्सा कितपत खरा ते नाही सांगता येणार मला, पण अशोकाच्या फुलण्यात एक उन्माद असतो एवढे नक्की. याची फुले केवळ फांद्याच्या टोकानाच येतात असे नाही तर आडव्या फांद्यानाच नव्हे तर जुन बुंध्यालाही ही फुले येतात. फुगीर पोकळ देठाची, पिवळसर रंगाची हि फुले चार गोलाकार पाकळ्यांची असतात. हा पिवळा रंग आधी केशरी आणि मग लाल होतो. एकाच गोलाकार गुच्छात हे सगळे रंग असतात. या फुलाचे लांबलांब पुंकेसर फुलाच्या बाहेर आलेले असतात. झाड जसजसे वयाने वाढते, तसा फुलांचा रंग जास्त गडद होत जातो. ऐन बहरात आलेले झाड खुपच देखणे दिसते. याच्या फुलांचा समावेश पाच मदनबाणात केला जातो. ( इतर चार म्हणजे आंब्याचा मोहोर, कमळ, मोगरा आणि नीलकमल ) मला कधीकधी हे झाड बघुन अपमानास्पद अग्निपरिक्षा देत असलेली सीताच आठवते. अशोकस्तबकांगार षट्पदस्वननिःस्वनः मां हि पल्लव्ताम्रर्चिर्वसंताग्निः प्रधक्षति ( अर्थ, हा वसंतरुपी अग्नी मला भस्म करुन टाकेल का, या अशोकाची फुले म्हणजे जणु निखारेच आहेत आणि याची नवी पालवी या अग्नीच्या ज्वाला आहेत तर या फुलांवर आलेल्या भुंग्यांचा गुंजारव म्हणजे अग्निचा चट्चट आवाजच आहे ) फुलानंतर याला लांबट शेंगा येतात. पण आणखी वेगळेपण म्हणजे, फुले सगळ्या झाडभर येत असली, तरी शेंगा मात्र पानांच्या टोकालाच लागतात. श्रीलंकेत अजुनही अशोकवन जोपासलेय. तिथे ही झाडे जोमाने वाढतात. ( तशी आपल्याकडेही जोमाने वाढतात, अर्थात लावली आणि जोपासली तर. ) एकंदर हे झाड स्त्रीसखाच म्हंटले पाहिजे. अंगनाप्रिया असे याचे नावच आहे. अशोकाच्या सालीचा काढा, अशोकारिष्ट म्हणुन प्रसिद्ध आहे. स्त्रीयांच्या अनेक विकारांवर तो वापरतात. माझ्या यादीतल्या बहुतेक झाडांच्या नावात इंडिका असुनही, आपल्याकडे हि झाडेच दुर्मिळ झालीत.
|
| |
| Friday, May 25, 2007 - 5:20 pm: |
|
|
साधारणपणे मराठी पुस्तकात जेव्हा आदिवासी लोकांबद्दल लिहिलेले असते, त्यावेळी हटकुन मोहाच्या दारुचा उल्लेख येतो. ती दारु पिऊन त्यांचे धुंद नाचणे. भुक मारणे असे उल्लेख असतात. विश्वास पाटलांच्या, झाडाझडती मधे मोहाच्या दारु गाळण्याच्या कृतिचे सविस्तर वर्णन आहे. या अश्या उल्लेखांमुळे, मोहाच्या झाडाबद्दल, ते न बघताही माझ्या मनात अढि बसली होती. फुले आणि त्याची दारु, हे समीकरणच डोक्यात जुळत नव्हते. त्यानंतर दुर्गा भागवतानी कालनिर्णय दिनदर्शिकेत, मोहाच्या फुलांच्या सुगंधी भाजीबद्दल लिहिले होते. ते वाचुन माझे मत जरा मवाळ बनले. मग आयुष्यात एक टप्पा असा आला, कि एका विशाल मोहाच्या झाडाची, मला वर्षभर साथसोबत लाभली. त्याच्या जादुने मी भारला गेलो. माझी एक कथा, मोहाचे झाड, हि त्याच काळात लिहिलेली. Madhuca longifolia या नावातले मधुका अर्थातच मोहाच्या फुलाच्या गोडव्यामूळे, आणि लॉंगिफ़ोलिया त्याच्या मोठ्या पानामूळे, आलय. हा वृक्ष हिमालयाच्या पायथ्यापासुन मध्य भारत कोकणप्ट्टी सगळीकडेच आढळतो. दक्षिणेत मात्र तो नाही. उत्तरेकडच्या आदिवासी लोकात याच्या दारुला, उत्सवात आणि धार्मिक विधीत महत्वाचे स्थान असल्याने, हा वृक्ष जीवापाड जपला जातो. याची तोड सहसा केली जात नाही. याचे झाड सहा ते आठ मीटर्स पर्यंत वाढु शकते. डेरेदार असते. मोठी पाने कोवळी असताना लाल असतात आणि मग ती हिरवी होत जातात. पाने भरपुर पण फांद्याच्या टोकानाच येतात. मार्च एप्रिलमधे या झाडाला बहर येतो. फांद्याच्या टोकाना एकाच बिंदुपासुन अनेक कळ्या येतात. ( या वर्षी हा मुहुर्त मला गाठता आला नाही. त्यामुळे फुलांचा फोटो नाही मिळु शकला. ) कळ्यांचा देठ सहा ते आठ सेमी लांब व तपकिरी रंगाचा असतो.फुलांचा बाह्यकोषही तपकिरी रंगाचा. किंचीत लव असलेला.. पुष्पकोष चार ते पाच भागात विभागलेला असतो. या कोषात असतात पांढर्याशुभ्र मांसल अश्या सहा ते आठ पाकळ्या. याच्या टोकातुन बाकदार स्त्रीकेसर बाहेर आलेला असतो. फ़ुलाच्या टोकाशी बारिकसे छिद्र असते. त्यामुळे परागसिंचन करणार्या किटकांची येजा होवु शकते. पण हे फुल पुर्णपणे उमलतच नाही. याच अवस्थेत हा पाकळ्यांचा समुदाय खाली गळुन जातो. या गोळ्याचा व्यास साधारण एक सेमी असतो. अगदी पहाटे पहाटे हि फुले झाडाखाली गळुन पडतात. आणि त्याचा तो सुप्रसिद्ध घमघमाट सुटतो. या वासाला शब्दात पकडणे कठीण आहे. अगदी नवा आंबेमोहोर तांदुळ शिजताना जसा वास येतो. त्यात किंचीत मस्क अत्तराचा वास मिसळला तर जसा वास येईल, तसा तो वास असतो. मारुति चितमपल्ली यानी आदिवासी या वासासाठी जो शब्द वापरतात, त्याचा उल्लेख केलाय. तो शब्द म्हणजे मुयान मुयान. कदाचित हा शब्द त्या वासाचे योग्य वर्णन करु शकेल. हि चार फुले जरी घरात आणुन ठेवली तर सगळे घर या सुगंधाने भरुन जाते. हा वास खुपच मादक असतो, आणि जितका वेळ घेत राहु त्या प्रमाणात तो बैचैन करत राहतो. या दिवसात वनवासी लोकांची हि फुले गोळा करण्यासाठी धडपड चाललेली असते. झाडाखालची जमिन साफसुफ करुन ठेवलेली असते. भल्या पहाटे टोपल्या घेऊन, ते लोक हि फुले गोळा करुन ठेवतात. केवळ दारु गाळण्यासाठीच नव्हे तर थेट खाण्यासाठीही या फुलांचा उपयोग होतो. ताजे फुल तर अगदी साखरेसारखेच लागते. भाजीत भर म्हणुन ते घालता येते. ती फुले सुकवुन त्याचे पिठ भाकरीच्या पिठात भर म्हणुन घालता येते. नाचणी, बाजरीच्या भाकर्याही त्यामूळे गोड लागतात. तशी हि फुले औषधीही आहेत. दुधात शिजवुन खीर करुन ती बाळंतीणीला देतात. त्याना दूध येण्यासाठी हि खीर उपयोगी आहे. याने थकवाही जातो. घश्याचा शोष शमतो. वातरोग कमी होतो. अस्वले, ससे, हरणे याना हि फुले खुपच आवडतात. अनेक पक्ष्यानाही याची फुले खुपच प्रिय. मैना, बुलबुल, पोपट, भारद्वाज खुप येतात या झाडावर. आणि भरपुर फळे खाऊन त्यांचे व्हायचे तेच होते. हि फळे खाऊन भेलकांडत चाललेला भारद्वाज मी बघितला. आधीच त्याला उडण्याचा कटाळा, त्यात हि फुले खाल्ली., मग पावले सरळ कशी पडणार ? पोपटाला तर मान वर उचलणे शक्य होत नव्हते, एवढी चढली होती, याची नशा. मी वर लिहिल्याप्रमाणे यावर्षी मला फुलांचा फोटो मिळु शकला नाही. पण या माझ्या दोस्ताने मला विन्मुख नाही पाठवले. माझ्या हातात हा खाऊ ठेवला या आहेत मोहट्या. म्हणजेच मोहाची फळे. यामधे असतात बदामासारख्या दिसणार्या दोन चार बिया. या बिया शिजवुन त्यात वालाची डाळ वैगरे घालुन, रुचकर भाजी करता येते. याच बिया सुकल्या कि त्यापासुन तुपासारखे घट्ट तेल मिळते. सुगंधी असणारे हे तेल, तुपाच्या जागी वापरता येते. आणि यामूळेच मोहाला बटर ट्री, असेही नाव आहे.
|
| |
| Tuesday, May 29, 2007 - 3:38 pm: |
|
|
माझ्या कदंबावरच्या लेखात मी कळमाच्या झाडाचा उल्लेख केला होता. नावापासुन सर्वच बाबतीत कळम धाकला. या दोन फ़ुलात आकाराचा फरक आहेच, पण त्याशिवाय आणखी वेगळेपणा आहे. कदंबाचे फ़ुल याच्या दुपटीने तिपटीने मोठे असते. कदंबाच्या फुलावर असणारी पांढरी लव, टोकेरी तर कळमाच्या पाकळ्या, थेट टाचणीसारख्या. कदंबाच्या फुलाला पानाच्या मागे दडायची खोड, तर कळमाची फुले मात्र मान वर करुन सगळीकडे बघत असतात. मी सोनचाफ्याबद्दल लिहिताना, कनकचंपा किंवा रामधनचंपाच्या फळांचा उल्लेख केला होता. थेट कर्णफुलासारखी हि फळे, अगदी कर्णफुलेच काय फुले म्हणुनही खपुन जातील.
|
| |
| Tuesday, May 29, 2007 - 3:46 pm: |
|
|
गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे, कडुनिंबाची पाने खाऊन नववर्षाला सुरवात करायची आपली पद्धत आहे. त्यादिवशी जेवणातही कडुनिंबाच्या पानाची चटणी करतात. एरवी वर्शभर आपल्याला तो आठवत नाही. Azadirachta indica असे याचे नाव. यातला अझाडिराक्टा हा पर्शियन शब्द आहे, आझाद दरख्त अशी याची फोड. आणि त्याचा अर्थ आहे राजेशाही (Nobel) वृक्ष. हे झाड म्हणजे आपला पारंपारिक खजिना आहे. सध्या तर त्याचा कुष्ठरोग आणि एडस अश्या चिवट विकारांवरच्या उपचारात याचा उपयोग केला जातो. याच्या झाडाकडे नुसते बघितले तरी नजरेला गारवा जाणवतो. याच्या झाडाखाली भरदुपारी झोपले तरी गारवा जाणवतो. आणि चांदण्या रात्री तर हे पुर्ण झाडच चांदण्याचे होवुन बसते. उगाच नाही बाळाचा चांदोबा, याच झाडामागे दडुन बसत. सरळसोट वाढणार्या कडुनिंबाचा पसाराही भरपुर असतो. लांब देठाची सयुंक्त पाने. पानालाही खास दंतुर कड आणि चंद्रकोरीचा आकार. याची पानगळ होते पण लगेच लालसर चमकदार पालवी येते याला. आणी मग नाजुक हिरवट पांढरी फुले दिसु लागतात. पाच पाकळ्या आणि मधे एका नलिकेत लपलेले पुंकेसर आणि स्त्रीकेसर. नगरसारख्या भागात तर हि फुले इतक्या संख्येने फ़ुलतात, कि एरवी हिरवेगार दिसणारे झाड, पांढरट दिसु लागते. आणि यावर प्रचंड प्रमाणावर मधमाश्या आणि किटक येतात. याला एक कडवट तरिही हवाहवासा वाटणारा सुगंध येत असतो. आणि मग येतात त्या निंबोळ्या. पोपटी पिवळ्या निंबोळ्यांचे घोसच्याघोस जाडाला लागलेले असतात. यालाहि आंबुस कडवट वास येतो. मी खाऊन बघितल्या, कडुच लागतात, पण माकडे मात्र मुठीमुठीने खातात. ईतर अनेक प्राणी, यावर ताव मारतात. याच्या बियापासुन निंब तेल म्हणजेच मार्गोस तेल काढतात. त्वचा विकारावर ते वापरतात. साबणातही वापरतात. याच्या पेंडीपासुन खत आणि किटकनाशके तयार करतात. पुर्वी धान्यात किड पडु नये म्हणुन, कपड्याना कसर लागु नये म्हणुन याची वाळलेली पाने ठेवायची पद्धत होती. आपण वर्षातुन एकदाच याची पाने खातो तरी तोंड वाईट करत खातो. गुजराथी लोक मात्र याच्या काड्यांचे दातुन करुन, दात घासतात. याच्या लांबलांब काड्या हातात घेऊन फ़िरणार्या गुजराथी बायका मुंबईत खुप दिसत पुर्वी. अडकित्त्याने ठरावीक आकाराचे तुकडे करुन देत असत त्या. ( मनपसंत नावाच्या सिनेमात टिना मुनीम, हेच दातुन विकत असते. ) पण कडुनिंब कोकणात नीट वाढत नाही. अनेक लोकानी याची झाडे हौसेने लावलीत खरी, पण ती जोम धरत नाहीत. धरली तर पानाचा पसारा भरपुर पण फुलोरा आणि निंबोळ्या, अगदीच तुरळक. म्हणुन कोकणातल्या लोकानी, एका झाडाला कडुनिंब म्हणायला सुरवात केली. Melia azadirachta म्हणजेच बकाणा निंब. कडुनिंबाशी नावात जरी साम्य असलं तरी त्याचे औषधी गुणधर्म याच्याकडे नाहीत. पण तरिही या झाडाचे स्वतःचे वेगळेपण आहेच. कडुनिंबाच्या तुलनेत, याची उंची कमी पण पानांचा पसारा दाट असतो. पाने रंगाने गर्द हिरवी. अनेकदा पुष्पगुच्छात शोभेसाठी वापरतात. पाने तशीच संयुक्त पण पानाला तो चंद्रकोरीचा आकार नसतो. चमकही नसते. याची खासियत म्हणजे याचा फुलोरा. नाजुक पाच फ़िक्कट जांभळ्या पाकळ्या. आणि मधे निळसर रंगाची उभट नळी. खरे तर ते चिकटलेले पुंकेसर. मंद सुगंधही असतो याला. याची फळे गोलाकार. बोराएवढी. आधी हिरवी मग पिवळी आणि सुकल्यावर तपकिरी रंगाची होणारी. कधी कधी पक्षी खाताना दिसतात. पण तरीही बरीच फळे तशीच झाडावर असतात. हि फळे तोडली तर त्याच्या मधे एक छिद्र दिसते. त्यामुळे ती ओवता येतात. यावरुन याला बीड ट्री असेही नाव आहे. तसेच जांभळा फुलोरा आणि पर्शियातले मूळ, म्हणुन हा पर्शियन लायलॅक.
|
| |
| Wednesday, May 30, 2007 - 5:02 pm: |
|
|
शाळेत आम्हाला वि. द. घाटे यांचा, " कॅशिया भरारला " हा लघुनिबंध अभ्यासाला होता. मुद्दाम लावलेल्या कॅशियाच्या शेजारीच एक आंब्याचे रोपटे उगवते. आई आंब्याचे झाड पवित्र म्हणून, उपटु देत नाही. कॅशियाची घुसमट होते. पुढे काळाच्या ओघात कॅशिया विसरला जातो. मग अचानक अनेक वर्षानी कॅशिया भेटतो. आंब्याचे झाड चांगलेच वाढलेले असते, पण कॅशिया त्यापेक्षाहि उंच वाढलेला असतो. खरं सांगायचे तर त्या वयात तो निबंध तितकासा आवडला नव्हता. आंब्यापेक्षा कुठलेही झाड श्रेष्ठ असुच शकत नाही, असे समजायचे ते वय. आमच्या शिक्षिका, त्या काळात शंका विचारली तर आवर्जुन उत्तरे देत असत. ( याचे उदाहरण म्हणजे एका कवितेत साडीवरच्या खडीचा उल्लेख आला तर, त्यानी दुसर्या एका शिक्षिकेला मुद्दाम खडीची साडी नेसुन यायला लावले होते. ) पण त्याना कॅशिया कसा दिसतो याचे नेमके वर्णन करता आले नव्हते. दाखवण्यासाठी कुठे आसपास तो नव्हताच. पण त्या निबंधातले वर्णन लक्षात होते आणि अचानक एका दिवशी लोकलमधुन जाताना बहरलेला कॅशिया दिसला. Cassia grandis हा वृक्ष मुंबईत सुद्धा अगदी सुखाने वाढतो. एरवी संयुक्त फ़िकट पानाचे हे झाड फारसे लक्षात येत नाही. याची पानेही अगदी विरळ असतात. पण एकंदर झाड अगदी नीटनेटके. खोडही मुलायम. एकंदर झाडाला देखणा आकार. आणि फुले काय वर्णावी महाराजा. डोळ्यानाही त्यांचा रेशमी मुलायम पोत जाणवतो. कॅशियाचे फुलण्याचे अनोखे प्रकार आहेत. कधीकधी फांद्याच्या टोकाना असे गुच्छ येतात तर कधी पुर्ण फांदीच फुलानी भरुन जाते. कधी पाने असतात तर कधी नसतातही. संपुर्ण झाड वरच्याप्रमाणे फुलानी भरलेले असेल, तर नजर ठरत नाही. कॅशियाचे ग्रांडिस, रेनिजेरा, जवानिका, मार्जिनाटा, नोडोसा असे अनेक प्रकार आहेत. वरच्या फोटोत दिसतोय तो Cassia renigeraa याची फुले जरा मोठी असतात. आणि याचीच पुर्ण पांढरी जातही असते. याची लागवड लोकानी हौसेने केलीय खरी. तरीही त्याला इतर झाडांच्या गर्दीत शोधावेच लागते. आपल्याकडे हे झाड तुलनेने अलिकडेच आलेय. बेलिझ सारख्या देशात ते खुप वर्षे जोपासले गेलेय. तिथे त्याचे औषधी उपयोग माहित आहेत. साधारण आपल्या बहाव्यासारखेच आहेत ते उपयोग. पोटांच्या तक्रारीवर तसेच लोहाची कमतरता भरुन काढण्यासाठी त्याचा काढा, रस वैगरे वापरतात.
|
| |
| Thursday, May 31, 2007 - 4:21 pm: |
|
|
केनयामधल्या किसुमु या रम्य गावातली एक संध्याकाळ. रोजच्याप्रमाणे पाऊस आपल्या संध्याकाळचा मुहुर्त चुकवणार नाही. आकाशात निळे सावळे ढग जमु लागले आहेत. दुर केरिचो मधल्या चहाच्या मळ्यात पावसाला सुरवात देखील झालेली आहे. पण तरिही सुर्य अजुनही अस्ताला गेलेला नाही कि कृष्णमेघानी झाकोळलेलाही नाही. सोनसळी किरणे अजुनही झाडांचे तुरे उजळताहेत. गावातल्या विस्तिर्ण हिरव्यागार मैदानाच्या मधे मी उभा आहे. सभोवताली मला वेढुन आभाळात पोचलेली झाडे. झाडावर निळ्या फुलांचे फुलोरे. पुर्ण झाड या निळाईने भरलेले आणि भारलेले. इवलीशीच याची पाने, पण फ़ुलांच्या उत्सवासाठी त्यानी आपणहुन रजा घेतलीय. झाडांचे शेंडे सोनसळी किरणानी उजळलेले पण बाकि झाडानी क्रुष्णमेघांशी अद्वैत साधलेलं. पावसाचे सुचन करणारा भिरभिरता वारा सुरु झालाय. झाडाना फुलांचा भार न सोसल्याने एकेक फुल जमिनीवर उतरु लागलेय. फुल अतिनाजूक आणि हलके, त्यामूळे वार्यावर हेलकावे खात खाली येतेय. जमिनीवर आधीच फ़ुलांचा गालिचा आहे. तोही साधासुधा नव्हे तर झुलता. वार्याने वरखाली हेलकावत निळ्या सागराचा आभास निर्माण करणारा. फुले कदाचित आजची किंवा कालचीही. उन वारा पावसाने, त्यांचा रंग अजिबात उतरलेला नाही. आणि हे सगळे कमी म्हणुन या फुलांचा मंद सुगंध आसमंतात भरुन राहिलेला. छाति भरभरुन घेतला तरी पुरेसा न वाटणारा. या निळाईत मी हरवुन गेलेला. सगळ्या गावाला पावसाची भिती म्हणुन गाव घरात शांत पहुडलेला. मी मात्र एकटाच तिथे उभा. आजन्मा भेटल्यासारखा वाटला मला. मीरेला भेटला होता तसाच. हा आहे Jacaranda mimosaefolia उर्फ़ झकरांदा. अनेक जण याचा उच्चार जॅकरांडा असा करतात. पण याचा मूळ देश ब्राझिल आणि केनया मधे याचा उच्चार झकरांदा असाच केला जातो. नावावरुनच याच्या पानाचे नाजुकपण जाणवते. याची पाने संयुक्त. खुपशी गुलमोहोराच्या पानासारखीच, पण त्यापेक्षा गडद रंगाची. वर्षभर हे झाड हिरवेगार असते. काहि झाडे वर्षभर अधुनमधुन थोडीफार फ़ुले देतात. पण केनयामधल्या वसंतात तर सगळे झाड निळ्या फुलानी भरुन जाते. तिथे हे झाड सहज १० ते १२ मीटर्सची उंची गाठते. पण हेच झाड नायजेरियात मात्र नीट वाढत नाही. तसेच तिथे ते भरभरुन फुलतही नाही. आपल्याकडे हा फुलतो, पण मोजुनमापुनच. कोल्हापुरमधे याची झाडे आहेत. चंदगड सारख्या आडगावातही हे झाड बघितले. याला मराठीत नीलमोहोर किंवा निळा गुलमोहोर असे नाव आहे (!!!) पण मला ते कल्पनाशून्य वाटते. याला हिरवी चपटी पुरीसारखी फळे येतात. तसे काहि औषधी उपयोग नाहीत. पण त्याचे असणेच, पुरेसे आहे.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|