चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
लाकडासाठी आणि औषधी म्हणुनही महत्वाचा असा एक वृक्ष म्हणजे अर्जुन. हा देखील आपल्या नेहमीच्या बघण्यातला वृक्ष. जंगलात तर तो दिसतोच पण शहरातही दिसू शकतो. हा ओळखायची महत्वाची खुण म्हणजे, या झाडाची हि फ़ळे. अशी फळे झाडावर घोसाघोसानी लगडलेली असतात. Terminalia tomentosa असे याचे शास्त्रीय नाव. संस्कृतमधेही अर्जुन असेच याचे नाव आहे. याचे झाड खुप उंच वाढते. २५ ते ३० मीटर्स उंची असते. झाडाचा विस्तारही खुप असतो. रस्त्याच्या कडेने असतात ते अंग चोरुन घेतात, पण जंगलात मात्र ते भरपूर पसरतात. याची पाने वीतभर लांबीची व चंद्रकोरीप्रमाणे मागे झुकलेली असतात. याची साल वरुन पांढरी असते आणि झाडाचे खोड आतुन लाल असते. ( ऐनाचे झाड पण असेच असते. त्याची साल मात्र आधी पांढरी असली तरी सुकल्यावर लालसर असते. अर्जुनाची पांढरीच राहते. ) अर्जुनाची साल वर्षातून एकदा आपोआप गळून पडते. याला वरच्या फोटोतल्याप्रमाणे पंचधारेची फळे येतात. हिरवी असली तरी पानापेक्षा वेगळ्या छटेमुळे सहज दिसतात. हि फळे मात्र चवीला कडवट असतात. याचे लाकूड मजबूत असते. घरबांधणीत त्याचा उपयोग होतो. अर्जुनाची साल औषधी आहे. तिच्या राखेत ३४ टक्के शुद्ध चुना सापडतो. अर्जुनाच्या सालीपासून अर्जुनारिश्ट हे प्रसिद्ध औषध तयार करतात. त्याचा हृदयविकारात छान उपयोग होतो. याच्या सालीचे चूर्ण दूधात उकळुन देतात, त्याने रक्तवाहिन्या मजबूत होतात, व हृदयाला बल मिळते. याची सालीत व्रणलेखनाचा गुणही आहे त्यामूळे, जखमा भरुन येण्यास तिचा उपयोग होतो. हाडाच्या बळकटीसाठी, क्षयरोगावर, मुरुमावर या सालीचा उपयोग होतो. सातार्याला ठोसेघर परिसरात याची अनेक झाडे आहेत. कोकणात जागोजागी दिसतो हा. मुंबईत देखील बीकेसी मधे याची झाडे आहेत.
|
पुर्वी हिंदी सिनेमात एक बालकलाकार असायची. आता नया दौर रंगीत झाल्यामूळे, नव्या पिढीला पण ती माहित असेल. तीच ती मोठ्या मोठ्या डोळ्यांची, डेझी ईराणी. तिच्या डोळ्याना, नेहमी भोकराची उपमा दिली जायची. म्हणजे डोळे केवढे, तर भोकराएवढे. मस्कतमधला जो मुख्य टेक्सी स्टॅंड आहे, म्हणजे रुवी प्लाझा, तिथे मधोमध एक हिरवी बिल्डिंग आहे आणि त्याला खेटुन के मोठे झाड आहे. बाकिची झाडे तिथल्या उन्हाळ्यात निस्तेज झाली तरी, ते मात्र आपला चमकदार हिरवेपणा मिरवत असायचे. टॅक्सीची वाट बघताबघता, नुसते त्या झाडाकडे बघत बसले तरी नजर निवायची. याचे शास्त्रीय नाव आहे कॉर्डिया मिक्सा. पण ते जरा गोंधळात टाकणारे आहे, कारण कॉर्डियाफ़ोलिया असे नाव असले म्हणजे पाने हृदयाकृति असतात. भोकराची पाने मात्र गोल असतात. पानांचा पोत जाडसर मांसल असतो. या झाडाकडे बघितल्यावर काहितरी वेगळेच जाणवते. हे झाड असण्यापेक्षा झाडावर चढलेली एखादी वेल असावी, असे वाटत राहते. याच्या बहुतेक फांद्या खाली जुकलेल्या, म्हणजे वरुन खाली झेपावणार्याच असतात. शिवाय लवचिकही असतात आणि वारा आला कि झुलतातही. झाड मात्र गच्च भरलेले असते त्यामूळे झाडाखाली उभे राहुन बघितले तरी, फांद्या झाडाच्याच आहेत, असे वाटत नाही. याची फुले अगदी छोटी आणि हिरवीच असतात, त्यामूळे ती सहसा नजरेत भरत नाहीत, फळे मात्र आधी छोटी असतात, हळुहळु वाढत चांगली मोठ्या बोराएवढी होतात. पिकली कि जरा मऊ पडतात व रंगाने गुलाबी वा लालसर होतात. गुजराथी लोकांचे अथाणु म्हणजे लोणचे घालायचे दिवस आले कि मुंबईत खास गुजराथी बाजारात म्हणजे पार्ला, घाटकोपर, मुलुंड सारख्या ठिकाणी हि भोकरे घोसाघोसाने दिसु लागतात. ते लोक याला गुंदा म्हणतात, आणि त्याचे लोणचे आवडीने खाल्ले जाते. पंजाबी लोकात पण याचे लोणचे आवडीने खातात. त्याला ते लसोडा म्हणतात. हे लोणचे नुसते करता येत नाही, त्यात कैरी घालावीच लागते, नाहीतर ते बुळबुळीत होते. दोन्ही प्रकारची लोणची मी खाल्ली आहेत. मला काहि खास चव वाटली नाही, पण ते लोणचे चवीपेक्षा औषधी गुणांसाठी खाल्ले जाते, कसे ते बघुच. हौस म्हणुन मी देखील एकदा भोकरे आणली होती. विदर्भात बेसन भरुन ढेमश्याची भाजी करतात, तशी भाजी केली होती. ठिक लागली, पण भोकरे साफ़ करणे खुप जिकिरीचे असते. बाजारात येतात ती कच्ची असतात, तरी आतमधे खुपच चिकट असा द्रव आणि बी असते. ( चिकटपणाला उपमा देत नाही, जाणकार ओळखतीलच. ) पिकलेली भोकरे झाडाखाली पडलेली असतात, आणि त्यावर पाय पडला, तर बिया पायाला चिकटुन बसतात. तशी हि फळे झाडाला खुप संख्येत लागतात. हिरवी असल्यामूळे पानात दिसत नाहीत. या फळांचा चिकटपणाच औषधी आहे. याचे संस्कृत नाव आहे, श्लेष्मांतक. या फळात संग्राहक गुण असतो. आतड्याच्या त्वचेला बळ देऊन, मल बांधण्याच्या कार्यात याने मदत होते. अतिसारात या फळाचा काढा देतात. सर्दीपडश्यात सुकलेला कफ़ पातळ होण्यासाठी या काढ्याचा उपयोग होतो. या झाडाची बाह्यसाल आम्लपित्तात आणि तापावर वापरतात. महाराष्ट्रात अनेकठिकाणी हे झाड दिसते, पण तरिही मराठी लोकात याचे प्रकार काहि लोकप्रिय असल्याचे दिसत नाहीत.
|
हे खास स्वाती साठी. स्वाती, हुतात्मा चौकात तो पुस्तकवाला बसतो ना, त्याच्याजवळ आणि तिथुन जो रस्ता धोबीतलावाकडे जातो, त्या रस्त्यावर सुवर्णपत्राची बरिच झाडे आहेत. तिथे टिपलेला हा फ़ुलोरा. त्यावेळी काहि फळेही दिसली होती, जरा मोठी झाल्यावर येऊ असा विचार केला, आणि पुढच्यावेळी झाडावर काहिच दिसले नाही.
|
एक अत्यंत देखणा असा वृक्ष म्हणजे वारस. याचि खासियत म्हणजे याची पानगळ, फ़ुलणे सगळेच वेळेच्या आधीच असते. त्यामुळे बाकिची झाडे, वसंताची वाट बगह्त असतात, त्यावेळी हा आपल्याला नजरसूख देत असतो.. हेट्रोफ़्रॅमा अडेनोफ़ायलम असे याचे शास्त्रीय नाव. जंगलात तो दिसतो पण शहरातही क्वचित दिसतो. मुंबईत मात्र किंग्ज सर्कलच्या फ़्लायओव्हरच्या शेजारी जे दोन भलेमोठे पडॉकचे वृक्ष आहेत, त्यांच्यावर या नावाची पाटी होती. पण ती बहुदा चुकीची आहे. त्याला पिवळी छोटी फुले येतात. या वारसची फुले वर बघता आहातच. हि फ़ुले चांगली पाच सेमी लांब व तीन चार सेमी व्यासाराची असतात. गुलाबी टॅबेबुया आपण पाहिलाच, याची फुले तशीच असतात पण यात जरा पिवळसर छटा असते. याच्या पानावर, कळ्यांवर इतकेच नव्हे शेंगावरही लालसर लव असते, पुढे ती नाहिशी होते. पाने हिरवीगार असतात आणि लांबलचक फांद्यांच्या टोकावर चक्राकार आलेली असतात. फ़ुलांचे गुच्छ वरच्याप्रमाणे देखणे असतात आणि त्यावेळी झाड खुपच देखणे दिसते. यांच्या शेंगाही ३० ते ४० सेमी लांबीच्या असतात आणि त्यांचा आकार असतो तलवारीप्रमाणे. फुले नसताना फांद्याच्या टोकाशी या तलवारी दिसतातच. याचे वृक्ष मला मुंबईत दिसले नाहीत. गोव्यात मात्र हौसेने याची लागवड केलेली दिसते. याच्यासारखीच फुले येणार्या रिओ द ग्रॅंडची पण आपण ओळख करुन घेऊ.
|
रुईया कॉलेजच्या सिग्नलवरुन पारसी कॉलनीत गेलो, कि समोरच फ़ाईव्ह गार्डन्स लागतात. त्यावेळी खुपदा तुम्हाला एखादे फ़िक्कट गुलाबी रंगाचे फ़ुल, पायापाशी घोटाळताना दिसेल. वर नजर करुन अवश्य बघा, तूम्हाला त्याचा स्त्रोतही कळेल. पण तरिही एक प्रॉब्लेम आहेच, हे फ़ुल कुठेही दिसु शकेल, पण वर झाड असेलच असे नाही. पुर्वी कसे राजाची स्वारी आली कि त्याच्या वाटेत फुलांच्या पाकळ्या पसरत असत, तसे हे झाड तूमच्या पायाशी फुले टाकत असते. तसे झाडाखाली सडा असणे नविन नाही. प्राजक्ताचा सडा आपल्याला माहित आहेच, वड, पिंपळ आणि उंबराखाली पिकलेली फळे असणार, रतनगुंजेखाली गुंजा असणार, वडाच्या पालवीचे दिवस असले कि कोवळ्या पालवीची लालचुटुक आवरणं असणार, आसुपालाखाली स्वल्पविरामचिंहासारखे दिसणारे पुंकेसर असणार, पण या रिओ द ग्रॅंडचे तसे नाही. याची फुले चहुबाजुने उधळलेली असतात. क्वचित ती तूमचा पाठलागही करतील. फ़ावीव्ह गार्डनमधे उंच वाढलेले, अगदी राजेशाही असे पाच वृक्ष आहेत याचे. दादर टीटी लाहि एक झाड आहे. लंबगोलाकार हिरवी चमकती पाने या झाडावर कायम दिसतात. झाड नेहमी हिरवेगार. झाडावरही वर्षभर फ़ुले असतात पण पानाच्या गर्दीत नीट दिसत नाहीत. जरा दिवस वर चढला, कि फुलानी जमिनीवर उडी घेतलीच समजा. तशी संध्याकाळपर्यंत हि फुले हळुहळु रस्त्यावर पडत असतात. या झाडाची आणखी एक खासियत म्हणजे, या झाडाना नेहमी रस्त्याच्या बाजुने जास्त फ़ुले येतात. नावावरुन हे झाड ब्राझिल मधुन आलेय हे उघड आहे, पण याला ट्रंपेट फ़्लॉव्हर असेही नाव आहे, ते अर्थातच फ़ुलाच्या रुपावरुन. निळसर गुलाबी रंगाची हि फुले, झालरीच्या पाकळ्यामूळे खुलुन दिसतात. तसा सुगंध वैगरे नसतो, पण त्याची उणीव जाणवत नाही. आणि याचे शास्त्रीय नाव, बिग्नोनिया मेगॅपोटमिका.
|
मुंबईत काही जमातीना त्यांच्या खाण्यावरुन अगदी अशिष्ठपणे चिडवले जात असे. कावडाखाव, घोडेखाव असे विचित्र शब्द वापरत असत. त्यापैकी घोडे खाणार्यानी म्हणे, एका मोठ्या झाडावर जाऊन घोडा कापला, आणि त्या झाडाची कोवळी पाने हातावर चोळली कि मेंदीसारखा लाल रंग तयार होतो. ती झाडे असतात, Tectona grandis म्हणजेच सागाची. साग आणि सागवानी लाकुड तसे आपल्याला ऐकुन माहितच असते. पण केवळ ऐकुनच कारण त्या लाकडाच्या किमती कधीच सामान्याच्या आवाक्याबहेर गेल्यात. ( कारण अर्थातच बेसुमार जंगलतोड ) आणि सध्या जे लाकुड उपलब्ध आहे ते बहुतांशी म्यानमार, मलेशिया आणि थायलंड मधुन आयात केलेले. तसे आफ़्रिकेतल्या जंगलातही ते उपलब्ध आहेच. पण तरिही हे झाड दुर्मिळ नाही. भारतातल्या बहुतांशी जंगलात ते दिसतेच. शिवाय मुद्दाम लागवडही केलेली दिसते. पण तरिही त्याचे लाकुड सहजासहजी उपलब्ध होणार नाहीच, कारण उत्तम लाकुड मिळण्यासाठी, झाडाचे वय किमान ६० वर्षे तरी असावे लागते. खरे तर अश्या स्वार्थी नजरेने या झाडांकडे बघणे गैर आहे. तशी हि झाडे काही कमी नजरसुख दिसत नाहीत. उंचाडी झाडे, त्यांची ओबडधोबट खोडे, आणि मोठाली पाने यामुळे हि झाडे सहज ओळखता येतात. जंगलात आपसुक वाढणार्या झाडांची पाने इतकी मोठी नसतात पण मुद्दाम लावलेल्या आणि व्यवस्थित पाणी वैगरे मिळणार्या सागाच्या झाडाची पाने सहज दीडदोन फ़ुट लांबी गाठतात. रुंदीही तशीच. या पानांचे द्रोण करवंदे जांभळे गोळा करण्यासाठी फार उपयोगी पडतात. उन्हाची झळ लागु नये म्हणुन याच्या पानाची टोपी करता येते, कारण तेवढा त्यांचा आकार असतोच. पुर्वी फुलपुडी बांधण्यासाठीही हि पाने वापरत असत. उन्हाळ्यात जंगलात बहुतेक सगळीकडे याच्या पानाचा सडा पडलेला असतो. पाने पायाखाली कर्रमकुर्रुम वाजत असतात. झाडावर असली तरी याची पाने खुपदा किडलेली कुरतडलेली दिसतात. क्वचित पिंपळाच्या पानाप्रमाणे याच्या पानाच्या जाळ्याही झालेल्या दिअसात. पावसाळ्याच्या आधी सर्वदुर या झाडांचे मोहोर दिसतात. मोहोरांचा गुच्छ सहज तीस ते साठ सेमी उंचीचा, आडवाही तसाच. दुरुन फ़िक्कट हिरवा दिसणारा हा मोहोर इवल्या इवल्या पांढर्या फ़ुलानी भरलेला असतो. पण इतक्या मोठ्या झाडाची फुलेही मोठी असावीत, अशी आपली अपेक्षा मात्र पुर्ण होत नाही. फ़ुले जेमतेम ३ ते ४ मिमी व्यासाची. जराशी झुळुक आली किंवा पावसाची सर आली कि झाडाखाली याचा सडा पडतो. जंगलातल्या जमिनीवर हि दिसतही नाहीत पण एखाद्या डांबरी सडकेच्या कडेला हे झाड असेल तर त्या रस्त्यावर मात्र या फुलांची रांगोळी दिसते. या फ़ुलाना मंद सुगंधही असतो आणि यावर मधमाश्याही असतात, पण तरिही इवल्याश्या आकारामुळे प्रत्येक फ़ुल सुटे नीट दिसत नाही. फ़ुलानंतर याला आवळ्यासारखी दिसणारी पण आतुन पोकळ असणारी फळे लागतात. फ़ुलांच्या तुलनेत हि फळे कमी असतात. या फळात एकदोन केसाळ बिया असतात, पण त्या सहज रुजत नाहीत. जंगलातल्या वणव्यात मात्र याचे आवरण जळुन गेले कि त्या रुजतात. निसर्गाची अजब योजना आहे ही. या बियांपासुन तेल काढतात व ते केशवर्धक आहे. त्वचारोगावरही उपयोगी आहे. सालीचा लेप ड्केदुखीवर वापरतात. पानाचा लेप नखुरड्यावर उपयोगी ठरतो. तसे यात कफनाशक, रक्तस्तंभक. मूत्रल, कृमिघ्न असे औषधी गुणही आहेत. सुतारकामासाठी आदर्श असे लाकुड सहसा कसरीला वा इतर किटकाना बळी पडत नाही. त्यात असणार्या नॅप्थालिन व अंथ्रोक्विनोन या द्रव्यांमूळे हे शक्य होते. नावातल्या टेक्टोनाचा अर्थ सुतार असा आहे तर ग्रॅंडिस आलेय याच्या महाकाय आकारामूळे.
|
सर्व मायबोलीकराना, दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आपलाच, दिनेश
|
Ice Age हा माझ्या आवडीचा सिनेमा. त्यातला तो मोठ्या दाताचा मजेशीर प्राणी, एक फ़ळ जीवापाड जपत असतो, ते बघितलं असेलच. ते फळ म्हणजे अकॉर्न, आणि ते ज्या झाडाचे फळ असते ते झाड म्हणजे ओक. हे झाड अर्थातच थंड प्रदेशातलं. तसे ते आशियामधे आहे पण तेही थंड प्रदेशातच. हे ओकचे झाड मुंबईत दिसेल अशी अपेक्षाही कुणी करणार नाही, पण आहे हे झाड, चक्क मुंबईत आहे. ते ज्या ठिकाणी आहे, तिथे म्हणुनच ते टिकले आहे बहुदा. हॅंगिंग गार्डन म्हणजे कमल नेहरु पार्काची, मागच्या बाजुची भिंत आहे, त्या भिंतीच्याही मागे, जरा खाली प्रचंड वाढलेला ओक वृक्ष आहे. त्याला फळे वैगरे लागलेली दिसली नाहीत. मुंबईत काहि परकीय झाडे वाढली तरी जरा रुसुनच असतात, पण मी मात्र त्याचा मागोवा घेणार आहे. Fageceae Quercus असे याचे शास्त्रीय नाव. खरे तर हे खुप मोठे कुळ आहे. याची पाने फांद्याना चक्राकार गतिने असतात. झाड हिरवेगार दिसते. पानाना एक वेगळीच चमक असते. आणि सुर्याचा कोन नीट साधला गेला, तर अक्षरशः नजर ठरत नाही. या झाडाचे फळ म्हणजे अकॉर्न. एका छोट्याश्या कोंदणात एखादे तपकिरी रंगाचे शाळीग्राम बसवलेले असावे तसे ते दिसते. यावर छोटीशी शेंडी पण असते. हा एक प्रकारचा नट म्हणायला हवा आणि चवीला तो गोडसर लागतो. झाडावर हे तयार व्हायला मात्र अर्धा ते दीड वर्षाचा काळ जावा लागतो. पण या फळापेक्षा हे झाड प्रसिद्ध आहे ते लाकडासाठी. लाकुड अर्थातच खुप कठिण असते. आणि याला शक्यतो वाळवी लागत नाही. याच्या खोडात एक अंगभूत अशी नक्षी असते. आणि सजावटीच्या कामात याचा छान उपयोग होतो. लंडनच्या हाऊस ऑफ़ कॉमन्स मधे या लाकडाचा भरपुर वापर केलाय. अगदी पुर्वापार ते लाकुड फ़र्निचरसाठी वापरले जातेय. या लाकडाचा आणखी एक महत्वाचा उपयोग म्हणजे वाईन मुरवण्यासाठी जे बॅरल्स बनवलेले असतात ते ओकपासुन बनवतात. यात वाईन ज्यावेळी मुरत असते त्यावेळी उन्हाळ्यात हे लाकुड प्रसरण पावल्याने त्यात काही वाईन शोषली जाते आणि थंडीत ते लाकुड आकुंचन पावत असल्याने. ती बाहेर येते. या प्रक्रियेत वाईनला एक खास रंग आणि स्वाद मिळतो. याबाबतीत फ़्रेंच ओक, अमेरिकन व्हरायटीपेक्षा दर्जेदार मानले जाते. रेड वाईन बरोबरच, शेरी, ब्रॅंडी आणि स्कॉच व्हिस्की साठी हे लाकुड वापरतात. सुतारकामात या लाकडाचा जो तास व भुसा निघतो, तोही वाया जात नाही. मासे, मटण आणि चीजला स्मोक करण्यासाठी त्याचा वापर होतो. एका खास प्रकारच्या ओकपासुन वाईनच्या बाटल्यांचे कॉर्क्स बनवले जातात. या झाडाच्या सालीत बरेच टॅनिन असते आणि चामडे कमवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. याच्या डिंकापासुन पुर्वापार शाई बनवली जाते. जपानमधे आढळणार्या ओकपासुन ड्रम्स बनवले जातात, आणि या लाकडामुळेच त्याना तो घुमारा मिळतो. ( जॅपनीज ड्रम्सचे वादन ऐकले असेलच. ) या झाडाची पाने मात्र घोड्यांसाठी विषारी असतात. आणि शक्यतो घोड्याना या झाडापासुन दूर ठेवले जाते. ओकचे झाड पुर्वापार पवित्र मानले गेलेय तसेच ते सामर्थ्य आणि सातत्याचे प्रतीक मानले गेलेय. इंग्लंड, एस्टोनिया, फ़्रान्स, जर्मनी अश्या अनेक देशांचा तो राष्ट्रीय वृक्ष आहे.
|
वरचा फोटो बघितलात ? असा शांत जलाशय, आजुबाजुला झाडी, सगळे मुंबईबाहेरच असणार, असेच वाटले असेल ना ! पण हा जलाशय आहे, चक्क धारावी मधे. ( मला माहित आहे, आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणुनच आपण धारावीकडे बघतो, पण आपण खातो ती बहुतेक लोणची, पापड वैगरे धारावीतच बनतात. चामड्याच्या बहुतेक वस्तु तिथेच बनतात. ) तर धारावी बस डेपोच्या समोर महाराष्ट्र नैसर्गिक उद्यान आहे, बाहेरुन अंदाज येत नाही, पण आत खुप विस्तार आहे त्याचा. अगदी आत शिरल्या शिरल्या, तपमान कमी असल्याचे लगेच जाणवते. आत अनेक वृक्ष जोपासले आहेत. बहुतेक सगळे नैसर्गिकच आहेत. मुद्दाम लागवड केलेले, गुलमोहर, पीतमोहर, वगैरे नाहीत. बाकि बहुतेक सगळे दिसलेच. पण आज काळजी करण्यासारखे जाणवले ते, म्हणजे आंब्याना फुटलेला मोहोर. मुंबईत निदान दिवाळीच्या दिवसात तरी थंडी पडते. यावर्षी अभ्यंगस्नानाला गार पाणी घ्यायची वेळ आली होती. पण हवामानातल्या या फरकाने, झाडेही गोंधळली आहेत. मला तर आज कोकिळ पक्ष्याचा आवाहजी ऐकू आला. कोकिळ, साधारण फ़ेब्रुवारी पासून सरावाला सुरवात करतो, मार्च एप्रिल पर्यंत त्याचा घसा चांगला सरावतो, आणि ऐन वसंतात तो सुप्रसिद्ध, कुहु कुहु चा आवाज घुमु लागतो. पण यावर्षी हे काय झालेय ? असो, पण मुंबईत कुणी निसर्गप्रेमी पाहुणा आला तर त्याला इथे घेऊन यायला विसरु नका. अगदी बस स्टॉपच्या समोरच आहे हे उद्यान. खाण्यापिण्याची काहीच सोय नाही, पण बाकि बघण्यासारखे खुपच आहे. अगदी पायाखालीही असे काहीतरी दिसु शकते.
|
जंगलात चालताना नजर पायाखाली ठेवावीच लागते आणि अश्यावेळी खुपदा पायवाटेच्या शेजारी आपल्याला चित्रकाची साधीशी फुले दिसु शकतात. वरचा फोटो जरा जास्तच डिटेलमधे घेतलाय, कारण हे फुल जेमेतेम १ सेमी व्यासाचे असते, आणि यासारखी दिसणारी अनेक फुले असु शकतात. पण पुष्पकोषावरच्या लहान लहान ग्रंथी या, चित्रकाची खासियत, यामूळे हे झुडुप सहज ओळखता येते. याची निळसर राखाडी फ़ुले येणारी जात दिसते शिवाय क्वचित लाल फुले येणारी जातही दिसते. यापैकी निळी करडी जात खुपदा शोभेसाठी लावलेली दिसते. वरचा फोतो बघुन अनेकजणाना जे झुडुप ओळखीचे वाटले असणारच. पण वाटते तितके हे झुडुप साधे नाही बरं का. Plumbago zeylanica असे याचे शास्त्रीय नाव. याचे छोटेसे झुडुप असते आणि सदा हिरवेगार दिसते. याचा दांडा गोल असतो आणि याला पुष्कळ फांद्या फ़ुटलेल्या असतात. पानाना देठ नसतो. पाने एका आड एक येतात आणि साधारण मोगर्याच्या पानासारखी दिसतात. झुडुपाच्या मानाने मुळे मोठी, आणि लांब असतात. याच्या मूळात एक दाहजनक द्रव्य असते. चित्रकाची ओली साल ठेचुन अंगाला लावली तर त्या भागावरील कातडीचा खुप दाह होतो आणि ती भाजल्यासारखी दिसते. पण तरिही चित्रक खुप औषधी आहे. ( परत एकदा सूचना, कुठलेही आयुर्वेदिक औषध जाणकार वैद्याच्या सल्ल्यानेच घ्यायचे असते. आयुर्वेदिक औषधे करण्याची प्रक्रिया हि खुपदा गुंतागुंतीची असते. या प्रक्रियेनंतर वनस्पतिंचा विखार नष्ट होतो, व केवळ उपयोगी सत्व शिल्लक राहते. ) चित्रक वात आणि पित्तावर खुप उपयोगी आहे. गुप्तरोगात आणि तत्सम विकारात चित्रकाचा वापर करतात. खरुज, मूळव्याध व पांडुरोगावरही त्याचा उपयोग होतो. बाजारात चित्रक हा घटक असलेली अनेक औषधे उपलब्ध आहेत. पण आपण मात्र या फुलांचे सौंदर्य नजरेने टिपून घेऊ या. यात मात्र कुठलाच धोका नाही.
|
विद्या सिन्हा नामक एक नटि होती आणि तिचा रजनीगंधा नामक सिनेमा येऊन गेला, हे आता फ़ारसे कुणाला आठवत असेल असे वाटत नाही. पण त्या काळात, लताचे रजनीगंधा फ़ूल तुम्हारे, हे गाणे बहुतेक लग्नाळु मुलींच्या ओठावर असे. या फ़ुलाना रजनीगंधा हा शब्द वापरायचा प्रघातही त्यावेळेपासूनचाच. खरे तर हा बंगाली शब्द आहे, हिंदीत गुलछबु असा शब्द आहे. पुर्वी मराठी लोक याला निशीगंध असेच म्हणत असत. बाजारात याला गुलछडी असा शब्द होता Polianthes tuberosaa असे याचे शास्त्रीय नाव. याचे कंद असतात आणि याची लागवड कंदापासुनच करतात. जाडसर गवतासारखीच पाने असतात. पुरेशी वाढ झाली कि त्यातून एक उभा दांडा येतो आणि त्याला पांढर्याशुभ्र कळ्या लागतात. खालपासुन एकदोन अशी फ़ुले आठदहा दिवस फ़ुलत राहतात. रातराणी सारखा मादक गंध नसला तरी खुप छान गंध असतो याचा. अगदी घरी ठेवली तरी हि फ़ुले पाच सहा दिवस टिकतात. हारासाठी अगदी उपयोगी असतात. लवकर कोमेजत नाहीत. पाकळ्यांची दुहेरी रांग असणारी आणि भरगच्च दिसणारी याची एक जात आहे. मुळ रंग पांढरा असला तरी यावर क्वचित गुलाबी पिवळसर झाक दिसते. रंगीत पाणी करुन त्यात या छड्या ठेवल्या तर फ़ुले रंगीत होतात. अश्या छड्या खुपच छान दिसतात. बाजारात अलिकडे याच्या छड्या फारश्या दिसत नाहीत, सुटी फ़ुलेच दिसतात. तसे याचा कंद औषधीही आहे. लहान मुलांच्या अंगावर जे पुरळ उठते त्यावर हा उगाळुन लावतात. इतर त्वचारोगावर पण याचा उपयोग होतो. पण मला वाटते घरात एखादा फ़ुलणारा गुच्च असला तर बाकी कुठल्या औषधाची गरजच नाही. तसे हे झाड अगदी घरातही सहज वाढते. एखादा कंद लावला तर दरवर्षी फ़ुले येतात. एकाच कंदातून अनेक कंदही निर्माण होतात. याचे उगमस्थान बहुतेक मेक्सिको असावे. तिथे अझटेक संस्कृतीमधे यापासुन काढलेल्या तेलाचा वापर होत असे. लॅटिन नावाचा अर्थ सुजलेल्या कंदाचा असा होतो. अरेबिकमधे याला मरियम म्हणतात आणि हे मुलींचेही नाव असते.
|
tumacaI dad Aaplaa saMvaad |
Archive through March 25, 2006 |
Archive through May 03, 2006 |
Archive through June 18, 2006 |
Archive through July 02, 2006 |
Archive through August 03, 2006 |
Archive through August 17, 2006 |
Archive through October 07, 2006 |
Archive through December 20, 2006 |
Archive through March 26, 2007 |
Archive through April 13, 2007 |
Archive through May 06, 2007 |
Archive through May 31, 2007 |
Archive through July 03, 2007 |
Archive through August 08, 2007 |
Archive through September 11, 2007 |
Archive through October 29, 2007 |
Owner dineshvs Type HTG0001
|
|
|