|
| |
| Monday, March 26, 2007 - 5:03 pm: |
|
|
पहिल्यांदा या बियाच मोठ्या होत जातात. ओले काजुगर अश्याच बियातुन काढले जातात. हे गर काढणे अतिशय कौशल्याचे काम असते. या बियांचे कवच मऊ असले तरी चिकाने भरलेले असते. तो जरा जरी त्वचेवर पडला, तर लगेच फोड येतो. ( अनुभवाचे बोल, बरं का ) पण तरिही या गराची उसळ, म्हणजे कोकणची खासियत. पुर्वी हे गर खरेच दुर्मिळ होते. आता मुंबईतदेखील मिळतात. ताजे तर मिळतातच, सुकवलेलेही मिळतात. ओल्या मिरचीची वा मसाल्याची, दोन्ही पद्धतीने करतात हि भाजी. काजुची बी पुर्ण वाढली कि झाडाला काहितरी विसरल्याची आठवण होते. आणि मग काजुचे बोंड आकारु लागते. आधी हिरवे असणारे हे बोंड लाल वा पिवळ्या रंगाने रंगत जाते. एकाच झाडावर दोन्ही रंगाची फळे दिसतात. एकाच बोंडावरहि हे दोन्ही रंग दिसतात. तसे बघायला गेले तर हे फळ नाही, हा तर त्या बीचा विकसित झालेला देठच. खरे तर हे उत्क्रांतीच्या टप्प्यावर उशीरा सुचलेले शहाणपण असावे. बिया तर झाल्या, पण त्याचा प्रसार नको का व्हायला ? म्हणुन हे बोंडाचे अमिष. पण तरिही हे फळ पक्षी वैगरे आवडीने खाताना दिसत नाहीत. फ़ळाबाहेर बी असणारे, असे उदाहरण विरळाच. कोकणात स्थानिक लोक हे बोंड बिलकुल खात नाहीत. बाजारात विकायला आले तर, ते पाहुण्यांसाठीच. फळाची चव तशी गोड असली आणि फळाला गंधहि छान ( म्हणजे मादक ) येत असला तरी फळात चिक खुप असतो. फळ पुर्ण पिकलेले नसले तर तो अगदी तोंड भाजुहि शकतो. त्यामुळे खायचे झाले तर ते फळ, जरा मऊ पडलेले, गोडसर वास येत असलेले असे बघुन घ्यावे. कापुन मीठ वैगरे लावुन खावे. लहानपणी आम्ही ती फळे कापुन समुद्राच्या पाण्यात टाकत असु. त्यानंतर ती खुपच चवदार लागत असत. ( त्या वेळी मालवणातल्या मेढ्यातली वेळ तळ दिसेल ईतकी नितळ होती. आज मी तिथे पाय टाकायची सुद्धा हिम्मत करणार नाही. ) पण हा उपद्व्याप करुनही मला हि फळे खायला आवडतात. हे फळ उकडुन त्याचे भरितही करता येते. हि फळे पुर्ण पक्व होईपर्यंत पावसाला सुरवात झालेलीच असते. पावसाबरोबर मग हि फळेहि बदाबद खाली कोसळु लागतात. खाली दगड असला तर तिथल्या तिथे लगदा होतो फळांचा. मग हि फळे वेचण्यासाठी कोकणी लोकांची धावपळ सुरु होते. पहिल्यांदा जाणार ते बिया गोळा करणारे. या बीची मान जरा मुरगाळली कि ती बोंडापासुन अलग होते. अशी बी पिशवीत भरुन, बोंड तिथेच टाकतात. मग दुसरी टीम जाते ती बोंडे गोळा करायला. या फळांचा रसहि हल्ली बाजारात, बाटलीत मिळायला लागलाय. आणि तो चवीला छानहि लागतो. पण या फळांचा जास्त करुन उपयोग होतो तो फ़ेणी करण्यासाठी. फ़ेणी म्हणजे, काजुपासुन केलेली, गोव्याची प्रसिद्ध दारु. फ़ेणीला दारु म्हंटले, तर गोवेकराना आवडणार नाही, त्यांच्यासाठी ते औषध असते. तिकडे अगदी घराघरात फ़ेणी करण्याचा उद्योग चालतो. खरे तर यात अल्कोहोलचा अंश बराच जास्त असतो, आणि वासहि बराच उग्र असतो. लहानपणी एकदा सावंतवाडीच्या जंगलात काकीबरोबर फ़िरताना, एक बाई पायाने तुडवत त्याचा रस काढताना दिसली होती. ( काकी हाडाची शिक्षिका, तिने त्या बाईचा तिथल्या तिथे उद्धार केला होता. ) तशी महाराष्ट्र राज्यात हि दारु गाळायला परवानगी नाही, पण गोवा राज्यात मात्र त्याला आडकाठी नाही. यामुळे या दिवसात, अंबोली, ईन्सुली, चोर्ला घाटातुन हि काजुची बोंडे भरभरुन गोव्यातल्या पेडण्यात आणली जातात. तिथे अगदी खाडीच्या काठावरच हा उद्योग चालतो. सगळ्या आसमंतात हा वास भरुन राहतो. माझ्या वोल्व्हो बसमधेहि हा वास शिरतो आणि भरुन राहतो. या झाडांची पद्धतशीर लागवड करण्याचे प्रयत्न आता होत आहेत. ऋषि विद्यापिठाने, काहि नविन जातीहि विकसित केल्या आहेत. पुर्वीसारखे आता भाजुन गर काढत नाहीत. त्यापेक्षा वाफवुन गर काढला जातो. या पद्धतीमुळे बिया बहुतांशी अखंड मिळतात. टपोर्याहि असतात. अनेक प्रकारानी बियांचे कठिण कवच फ़ोडावे आगते, पण पहिल्या पावसात मात्र हे कवच सहज उकलते आणि आतल्या बीला मोड येतात. अश्या मोडांची पण सुरेख भाजी होते.
|
| |
| Tuesday, March 27, 2007 - 4:32 pm: |
|
|
आंब्यानंतर फणस आठवायलाच हवा. पण या फणसाला मोहोर वैगरे काहि येत नाही. नाजुकश्या आवरणात एक अंगठ्याएवढा फणस तयार होतो. तेच त्याचे फुल. यथावकाश ते आवरण गळुन पडते. आणि परागीभवन झाले नसेल तर तो फणसहि गळुन पडतो. ( त्याला कोका म्हणतात. लहानपणी खेळायचे साधन होते ते. ) पण जर सगळे जुळुन आले असेल तर मात्र बाळ चांगलेच बाळसे धरते. इंदिरा संतानी देखील त्याला लेकुरवाळा म्हंटलय. याची फळे खोडालाच लागतात. पाने कशी हिरवीगार लंबगोलाकार. स्पर्शाला किंचीत खरखरीत. तशी मजबुतहि. तांदळाच्या फ़ेण्या करायला, ताटल्यांच्या जागी वापरता येतात. चार पाने जोडुन, त्याचा शंकु करुन, त्यात ईडल्याहि करतात. ( मुंबईत किंग्ज सर्कलला रामा नायकाच्या हॉटेलमधे मिळतात. ) याचीहि पुर्ण पानगळ कधी होत नाही. झाडाला आडवा विस्तार क्वचितच दिसतो. दादरला हिंदु कॉलनीतल्या पै हॉस्पिटलजवळ असे खुप पसरलेले झाड आहे. पण तो अपवादच. झाडाचे मुख्य खोड आणि त्याच्या अंगाखांद्यावर लोंबकळणारी हि बालके, असेच दृष्य असते. खोडाला एका भक्कम देठाने बांधलेली असतात हि फ़ळे. दिसामासाने वाढत जाणारी हि फळे, झाडाला पेलवतील का नाही, अशी उगाचच काळजी वाटत राहते. पण सहसा फणस, अगदी पिकल्याशिवाय झाडावरुन पडत नाही. कधी कधी एखाद्या आडव्या फ़ांदीला ईतके फणस लटकत असतात, की ते डोक्यात पडतील कि काय असे वाटते. बुंध्याला अगदी जमिनीलगत लागलेले फणसहि बघितले आहेत मी. ( खोडाला फळे लागणारी, कोको, आवळे, करमळे, बिंबली, पपई अशी अनेक झाडे आहेत, पण एवढे मोठे फळ हेच. ) झाडाला ईतकि फळे लागतात कि प्रत्येक टप्प्यावर भाजीसाठी म्हणुन फणस उतरवता येतात. अगदी कोवळ्या कुयर्या. मग लसणीच्या पाकळ्या एवढे गरे असलेला कच्चा फणस. गरे तयार झालेला फणस, पाडाला आलेला फणस, अश्या सगळ्यांचीच भाजी छान होते. आणि हि भाजी होतेहि भरपुर. केवळ चतकोर भाकरीबरोबर ताटलीभर फणसाची भाजी, करवंदाची चटणी खाऊन दिवस काढणारे कितीतरी कष्टकरी असतात. फणस आणला कि त्यातले गरे काढणे हे अनेकाना जिकिरीचे वाटते. पण त्याचेहि तंत्र आहे. फ़णसाच्या मधोमद दांडा असतो त्याला पाव म्हणतात. गरे आणि या पावेमधला बंध जरा मजबुत असतो, पण त्यामानाने बाहेरच्या सालीला गरा तितकासा बद्ध नसतो. शिवाय बहुतेक सगळा चिक देठात आणि पावेत असतो. त्यामुळे पाव न कापता, जर गरे काढता आले तर उत्तम. ते नाहीच जमले तर फणस कापुन चिकावर एखाद्या वर्तमानपत्राचा तुकडा दाबुन ठेवायचा. थोड्या वेळाने चिक वहायचा बंद झाला कि. मग तुकडे करता येतात. आधी हाताला तेल लावले तर कापताना हात सटकतो. त्यापेक्षा नंतर तेल लावुन, चिक धुता येतो. कोकणात गरे काढण्यापेक्षा प्रत्येकाला असा एखादा तुकडाच दिला जातो. आपले आपण गरे काढुन खाता येतात. कापा आणि बरका या फ़णसाच्या मुख्य जाती. कापा फणसाचा गरा भक्कम असतो, तर बरका किंवा रसाळ फणसाचा गरा नावाप्रमाणेच रसाळ असतो. मी स्वतः अनेक आकाराचे, रंगाचे गरे असलेले फणस खाल्ले आहेत. काटे टोकदार असले तर तो कापा आणि पसरट असले तर तो बरका, असा संकेत आहे. तो पिकला कि दरवळ सुटतोच, पण टिचक्या मारल्यास, एक वेगळाच डब्ब असा आवाज येतो. पण हे सगळे समजायला अनुभव हवा. फणसाच्या गर्यापासुन, सांदणे, धोंडस, भाकरी, साटं ( फणसपोळी ) असे अनेक प्रकार करता येतात. पाडाला आलेल्या फ़णसाचे तळलेले गरे पण आता लोकप्रिय होत आहेत. मला हा प्रकार खोबरेल तेलात तळलेला, जास्त आवडतो. फ़णसाचे शास्त्रीय नाव Artocarpus integrifolia उंच वाढणारा हा वृक्ष भारतात सर्वत्र दिसतो. आणि सगळीकडे आवडीने खाल्लाहि जातो. तसे याचे मूळ स्थान दक्षिणपुर्व आशियाच आहे. आफ़्रिकेतहि मी खाल्ला. पण तिथे तो भारतीयानी नेला असावा. स्वाहिली भाषेतहि त्याला फणसच म्हणतात. फ़णस पोटभरीचा खराच. उर्मिला पवारानी आठवण लिहिल्याप्रमाणे, एखादा फणस, एखाद्या गरिबाच्या एकावेळच्या जेवणाची गरज भागवतो. फणस तसा पौष्टिक असला तरी पचायला कठीण. भूक कमी असलेल्यानी, जपुन खावा. कापा फणस खाल्ल्यानंतर पाणी पिउ नये असा संकेत आहे. ( मी तो पाळत नाही. ) फणसाचे गरे काढल्यानंतर उरलेला भाग, म्हणजेच चारकांड, म्हशीसाठी उत्तम खाद्य ठरतो. याच्या पानांचा काढा आव, अतिसार यावर देतात. सालीपासुन निघणारा चिक, गळु आणि फोड यामूळे आलेली सूज कमी करतो. चारकांड वाटुन तो लगदा, एरंडेल तेलावर परतुन सांधेदुखी, लचक, मुरगळ, हाड सरकल्याची सूज, यावर लावतात. पिकलेला फणस वात पित्तशामक आहे. मूत्रवर्धकही आहे. उत्तरा आषाढा नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींसाठी तो आराध्य वृक्ष आहे. आपल्याकडे वटपोर्णिमेच्या वाणात त्याला मानाचे स्थान आहे. खरे तर त्या सुमारास, फणसाचा बहर सरलेला असतो. त्याला निरोप देण्यासाठीच तर हा गौरव नसेल ना ?
|
| |
| Wednesday, March 28, 2007 - 5:33 pm: |
|
|
मानवी कल्पनेला खतपाणी नेहमीच निसर्गातल्या घटकानी प्रेरणा दिली आहे. पैठणीवरच्या कुयर्या, म्हणजे बाळकैर्याच ना ? देवळाच्या कळसावरचे आमलक, तर आवळ्यापासुनच सुचले, आणि देवळासमोरच्या दीपमाळा, ही रचना, नक्कीच अश्या मंजिर्यांवरुन प्रेरणा घेऊन घडवल्या असतील.
|
| |
| Wednesday, March 28, 2007 - 5:39 pm: |
|
|
फ़णासाईतक्याच आवडीने खाल्ल्या जातात त्या त्याच्या बिया. त्याला म्हणतात आठळ्या. भाजुन वा उकडुन खाता येतात. आमटीत, खास करुन मायाळुच्या आमटीत, गवारीच्या भाजीत, त्या चव आणतात. नुसत्या आठळ्यांची पण छान भाजी होते. पण एक फणस असतो, त्यात गरेही नसतात आणि आठळ्याही नसतात. आणि अश्या अप्रुपाच्या फणसाला विलायती फणसच म्हणायचे ना ? तर हा आहे कोकणातला नीरफणस. शास्त्रीय नाव Artocarpus altilis कुळ फ़णसाचेच. ईंग्लिशमधे ब्रेडफ़्रुट. ब्ल्यु लगून नीट बघितला असेल तर त्यात ती दोघे हे फळ भाजुन खाताना दाखवलेय. टॉम हँक्सच्या कास्ट अवे मधेही, तो हे फळ खाताना दाखवलाय. याचे मूळ गाव, मलेशिया. पण भारतात किनारपट्टीत सगळीकडे दिसतो. पाने भरपुर मोठी आणि वैशिष्ठपुर्ण आकाराची. फळे लंबगोल. सहा ते आठ ईंच लांब आणि चार ते पाच ईंच रुंद. पिकली कि किंचीत पिवळी होतात. पाने गुच्छात असतात आणि त्या गुच्छात हि फळे. झाडाचा विस्तार भरपुर असतो. चहुबाजुने झाड पसरत जाते. एका बाजुला अडथळा आला तर जिथे वाव मिळेल तिथे वाढते. या पानांमुळे आणि फळामुळे झाड खुपच देखणे दिसते. झाडावर वर्षभर पाने असतातच, शिवाय मोजकि फळेहि असतात. बहराच्या दिवसात, म्हणजे एप्रिल महिन्यात, तर झाड फळानी भरुन जाते. झाडाला फ़ुले नसतात. खरे तर यावरचे बोथट काटे म्हणजेच फुले. त्या अवस्थेत एका लाबुडक्या नळीच्या रुपात हे फुल, एका पातळ पापुद्र्यात दडलेले असते. मग फ़ुगा फ़ुगवल्यासारखे फ़ुगत जाते. खुपजणाना हे फळ खाण्यायोग्य असते हेच माहित नसते. नावाप्रमाणेच हे ( भाजुन खाल्ले तर ) पावासारखेच लागते. त्याला तशी चव नसते. पण तरिही गरिबांचे पोटभरीचे अन्न म्हणुनच त्याचा प्रसार झाला. या फळात गरे चारकंड वैगरे अगदिच प्राथमिक अवस्थेत असते. फ़ळाचा बराच भाग हा पांढरट गुलाबी गराने भरलेला असतो. ( मी या फळात गरे तयार झालेले बघितले आहेत, पण तो अपवाद ) याच्या काचर्या करुन, किंचीत उकडुन तेलात परतुन वरुन तिखटमीठ टाकुन खाल्ल्या तर छान लागतात. तांदुळ आणि तुरडाळ भिजवुन वाटुन, त्यात तिखट मीठ घालुन, त्यात या कापा बुडवुन तळुन भजी करता येतात. याचे तुकडे तळुन, वाटलेला कांदा, लसुण, मिरची अश्या वाटणातली भाजीही छान होते. बर्याच आशियाई देशात हे फळ आंबवुन वैगरे काहि टिकाऊ पदार्थ केले जातात. यात एकुण २५ टक्के, पिष्टमय पदार्थ असतात. थोड्या प्रमाणात पोटॅशियम आणि झिंक असते. जीवनसत्व क अणि ब१ पण असते. या फणसाबरोबर आठवतो तो काटेफणस Annona muricata . हे प्रकरण जरा वेगळेच असते. साधारण ओंजळीच्या आकारमानाचे आणि आकाराचे हे फळ आपल्याकडे फारसे प्रचारात नाही. याचे झाड मध्यम उंचीचे असते. पाने अगदी साधी व खाली झुकलेली असतात. लांबीला दोन ते तीन ईंच असतात, व पर्णसंभारहि विरळच असतो. याची कळी कापसाच्या बोंडासारखी दिसते व खुप देखणी दिसते. फळ झाडावर भाराभर वाढते. नाजुक झाड आणि नाजुक पाने, यामुळे हे फळ म्हणजे अंगापेक्षा बोंगा मोठा असा प्रकार असतो. याचे ईंग्लिश नाव Soursop . आतली रचना सिताफळाप्रमाणे असते, गर पांढरा असुन बिया काळ्या असतात. पण सिताफळासारख्या याच्या पाकळ्या वेगळ्या करता येत नाहीत. गरात फ़णसाप्रमाणे धागेहि असतात. चव आंबटगोड असते आणि एक छानसा गंध असतो. नायजेरियातहि याची झाडे होती. तिथे त्याला चपचप म्हणतात. त्यांच्या भाषेत चप म्हणजे जेवण. त्यामुळे पोटभरीच्या फळाचे हे नाव. फिलीपिन्समधे याचा, रसहि मिळतो. पण झाडेहि कमी आणि त्याना लागणारी फळेहि मोजकी त्यामुळे आपल्याकडे हे फळ बाजारात नसतेच. पण संधी मिळाली तर अवश्य खावे असे हे फळ आहे. रसहि चवीला छान लागतो. त्यात क, ब१, ब२ जीवसत्वे असतात. पण यात Annonacin असल्याने, काहि जणाना ते घातक ठरु शकते. पण संधी मिळुनहि याच्या एका भावंडाची चव मी घेतली नाही, ते फळ म्हणजे दुरियान. हे फळ आपल्याकडे नाही दिसत, पण थायलंड सिन्गापुरमधे आवडीने खाल्ले जाते. दिसायला फणसासारखेच असते, पण आकाराने बहुदा गोल असते. काटे मोठे व टोकदार असतात. याला एक अतिषय तीव्र असा वास येतो. याच कारणासाठी सिन्गापुरमधे हे फळ सार्वजनिक वाहनातुन नेता येत नाही. ( विमानातुनही ते नेता येत नाही ) आतली रचना फणसाप्रमाणेच असते. पण यात फक्त गरेच असतात. फणसाप्रमाणे पाती नसतात.
|
| |
| Thursday, March 29, 2007 - 6:02 pm: |
|
|
आजुबाजुचा पानांचा फाफटपसारा टाळुन हे जे लालपिवळं काहि दिसतय त्याच्याकडे नजर लावुन बघा बरं. काय दिसतय काहि लालकेशरी बगळे माना उंचावुन एका दिशेने बघताहेत असे वाटतय कि नाही ? तसे हे काहि फळाचे झाड नाही, मुद्दामहुन त्याची फळे कुणी खायलाहि जाणार नाही, पण मला खात्री आहे तूमच्यापैकी बहुतेक जणांच्या ओठात याच्या फळांचे वळसे भरवण्यात आलेले आहे. पावसाळ्यात जरा डोंगदर्यातुन भटकला असाल, तर हे झाड नक्कीच दिसले असेल. दिसायला हवेच, कारण हे झाड नव्हे तर झुडुप असते. सहा सात फ़ुट उंची जेमेतेम. ऐन, हिरडा, वड पिंपळ अश्या मोठ्या झाडांच्या सावलीत सुखैनेव वाढतात हि झाडे. पण नेमकी वेळ मात्र साधायला हवी, कारण एरवी हे झाड खास लक्ष वेधुन घेत नाही. पाने बघता आहात तशी खरबरीत दंतूर कडांची. खुपदा किड्यानी कुरतडुन टाकलेली असतात. गोल्डन एंजल नावाच्या फुलपाखरांच्या अळ्यांची करामत असते ही. पण पावसाळ्यातले नेमके दिवस साधलेत तर आधी यावर पिवळ्या टपोर्या कळ्यांचे घोस दिसतील. आणि मग हि अशी केशरी फुले. चारसहा दिवस हि फुले झाडावर असतात. आणि जुन झाली कि फिकट जांभळी निळसर होतात. एकाच फ़ांदीवर हे सगळे रंग दिसत असतात. याचे शास्त्रीय नाव Helicteres isora . या लॅटिन शब्दाचा अर्थ गोलाकार पिरगाळलेली समान लांबीची असा होता. इंग्लिशमधे इंडियन स्क्रु ट्री तर संस्कृतमधे आवर्तनी. अजुनहि कळले नसेल तर मराठी नाव सांगतो. हि आहे मुरुडशेंगेची फुले. बघा आता बाळपण, मायेने अंघोळ घालणारी आजी आठवली कि नाही ? याच्या शेंगा दिसतात थेट सुंभाच्या तुकड्यासारख्या. तो असतो चार पाच बारिक शेंगांचा झाडानेच विणलेला गोफ. लहान मुलांच्या जुलाब, अतिसार, गुबारा, मुरडा, अपचन अश्या सर्वच पोटांच्या विकारावर या शेंगा उपयोगी ठरतात. बाळाच्या घुटीत असतातच. आता पुढच्यावेळी पावसाळ्यात जंगलात गेलात, तर मुद्दाम हे झाड शोधा. याच्या मुळाच्या रसाचा उपयोग, मधुमेह अटोक्यात ठेवण्यासाठी करता येतो. असे प्रयोग चालु आहेत.
|
| |
| Friday, March 30, 2007 - 6:37 pm: |
|
|
माणुस, मनुष्य अश्या नावाचा माणुस बघितलाय का कधी ? नाही म्हणायला ताल मधे अक्षय खन्ना चे नाव मानव होते खरे. तसेच एखाद्या झाडाचे, झाड म्हणुनच नामांकन झाले आहे. हा आहे कॅरेया अर्बोरिया. यातला कॅरेया आलाय तो रेव्हरंड कॅरे या वनस्पतिशास्त्रज्ञाच्या सन्मानार्थ, तर अर्बोरचा अर्थ आहे झाड, म्हणजे अर्बोरिया चा अर्थ, उत्तम झाड असा घ्यायला हवा. या झाडाची उंची असते १० ते १५ मीटर्स. खोड तपकिरी खडबडीत. फांद्याहि वेड्यावाकड्याच. पाने साधारण आवारातल्या बदामासारखी, देठाशी अरुंद आणि पुढे पसरट झालेली. वसंताच्या आगमनापुर्वी, बहुतेक पाने गळुन जातात. गळताना त्यांचा रंग लाल होत जातो. आणि मग फांदीच्या टोकाशी, बोराएवढ्या टपोर्या कळ्या येतात. हळु हळु त्या मोठ्या होतात, आणि मग एका सकाळी त्यांचे असे देखण्या फुलात रुपांतर होते. फ़ुलहि चांगले तीन ईंच व्यासाचे, अगदी सलुनमधल्या पावडर फासयच्या पफ़सारखे. याच्या पाकळ्या हिरवट रंगाच्या असतात. आणि सहसा या अगणित पुंकेसरांमूळे दिसतहि नाहीत. यातली एक पोटजात आहे, त्यात या पांढर्या पुंकेसराच्या बुडाशी एक लाल वर्तुळ असते. यातला स्त्रीकेसर मात्र ताठ कण्याचा आणि ठसठशीत. अगदी फळाच्या डोक्यावरदेखील मिरवणारा. पण याचा गंध मात्र दुर्गंध म्हणावा ईतका वाईट असतो. नासलेल्या दुधासारखा वास येतो याला, पावसाळा आला तरी हि फुले फुलतच असतात, आणि त्या कुंद हवेत तर वास आणखीनच नकोसा होतो. झाडावर तर फुले असतातच, जमिनीवर पण पसरलेली असतात, आणि त्यातुनहि हा दुर्गंध येत राहतो. पण तजेलदार हिरवी पाने, भक्कम आकार आणि देखणी फुले यामूळे हे झाड नजरसुख नक्कीच देते.
|
| |
| Friday, March 30, 2007 - 6:40 pm: |
|
|
अरे, याचे मराठी नाव नाहीच का लिहिले अजुन. मराठीत आहे हा कुंभा. हे नाव पडायचे कारण म्हणजे याची फळे. खाली गोल आणि वरती नक्षीदार मडक्याचा भास करुन देणारे पुष्पकोशाचे रिंगण. शिवाय त्यातहि असणारा स्त्रीकेसर. हि फळे आकाराने सहज पाच सहा ईंच व्यासाची होतात. यात पांढरा गर आणि मोठ्या बिया असतात. बिया सहज रुजतात. असे दुर्गंधाचे झाड का लावा, असे तूम्हाला वाटणारच, पण दमा, कोरडा खोकला, प्रदररोग, पुत्रप्राप्ती, सांधेसुज अश्या अनेक विकारांवर याचा उपयोग होतो. शिवाय मधमाश्या या फुलांवर असतातच. म्हणजे मधहि आहेच.
|
| |
| Sunday, April 01, 2007 - 4:12 pm: |
|
|
एरवी भर उन्हाळ्यात भगवा रंग डोळ्याना सुखावत नाही, पण याच दिवसात म्हणजे एप्रिल मे मधे भगव्या फ़ुलांची कौशी फ़ुलते. भगवा रंग म्हंटला कि अनेक जणाना पळस आठवेल. त्याला फ़्लेम ऑफ़ द फ़ॉरेस्ट असे म्हणतातहि, पण एकतर त्याचे फुलणे सगळ्यात आधी, म्हणजे होळीच्या आसपास. ( त्याच्या पाकळ्यांपासुन रंफ़पंचमीसाठी उत्तम रंग करता येतो. ) शिवाय त्याला एक चंदेरी छटा असते. त्यामानाने कौशी जरा भडक रंगाची. पळस पांगारा शेंगा तयार करायच्या कामाला लागले कि कौशी भरभरुन फुलत राहते. निष्पर्ण पांढरट फांद्यांच्या टोकापासुन असे केशराचे तुरे ऊतु जात असतात. नीट निरखुन बघितलेत तर कळेल की हि फुले नव्हेतच. कळ्याहि नव्हेत. हे फुलांचे बाह्यकोशच आहेत. अगदी कोवळ्या कळ्यानाही हाच रंग असतो. हळुहळु कळी मोठी होत दोन ते तीन सेमी लांब होते. या बाह्यकोषावर सुक्ष्म लव असते. अगदी व्हेलव्हेटच्या कागदासारखी. यथावकाश हा बाह्यकोष उकलतो, आणि आतुन लालजर्द पुंकेसरांचा दांडा बाहेर येतो, त्याच्या टोकाशी असतो मोहरी एवढा पिवळा परगकणांचा ठिपका. पाकळ्यांशिवाय फुले अशी कल्पनाहि आपण करु शकत नाही, पण कौशीचे सगळेच आगळे. हा बहर जंगलातला एखादा कोपरा रंगवुन टाकतो. या दिवसात बहुतेक सगळ्या झाडांचे बहर ओसरलेले असतात, त्यावेळी कौशी शुष्क झाडांतुन नजरेत भरते. हे बाह्यकोष सुकले तरी रंगाने तसेच राहतात. झाडाखाली यांचा सडा पडतो. हि रंगाची उधळण ईथेच संपत नाही. फुले सरली कि याला शेंगा लागतात. त्याही क्रायसोफ़ॉयलम म्हणजे स्टाराऍपलच्या पानांच्या रंगासारख्या. ( याबद्दलहि बोलुच. अगदी मुंबईतहि याची झाडे आहेत. ) हा रंग म्हणजे गडद किरमिजी आणि हिरवा यांचे मिश्रण. या शेंगा असतात S या आकाराच्या. याची आणखी खासियत म्हणजे याची बी शेंगेच्या बाहेरच असते. या वैशिष्ठपुर्ण रचनेमुळे, हे शेंग एखाद्या होडीसारखी दिसते. शिवाय बी म्हणजे ती वल्हवणार्या माणसाचे डोकेच जणु. या शेंगा लागतात त्यावेळी पावसाळी हवा असते, त्या वार्यावर शेंगा झुलत असतात. हा रंगोत्सव ईथेच संपत नाही. यानंतर याला पालवी फुटते. पाने असतात कापसाच्या पानासारखी. आणि रंग तर हिरवा लुसलुशीत असतो. हि पाने ईतकी फ़्रेश दिसतात, कि खायची ईच्छा होते. मी नाही खाल्ली, पण पाने नक्कीच पौष्टिक असणार, कारण किड्यानी कि कायम सच्छिद्र करुन टाकलेली असतात, पानावर असताना हे झाड ओळखायला कठीणच आहे. पण या दिवसात,डोंगराळ प्रदेशात जरा उंचावर बहरामुळे सहज ओळखु येते. कर्नाळा परिसरात याची झाडे आहेत. पांगार्याप्रमाणे मुबलक नसली तरी आहेत. याला खावशी, खवस, कानशी, खानशी अशीहि नावे आहेत.
|
| |
| Wednesday, April 04, 2007 - 4:25 pm: |
|
|
बाळपणाच्या आठवणीचं एक गाठोडं आपण आयुष्यभर जपुन ठेवतो. त्या गाठोड्यात काहि चवी पण असतात. माझ्या गाठोड्यातली एक चव म्हणजे पांढर्या जामची. हे जाम म्हणजेहि कोकणची खासियत. जंगलात हि झाडे दिसतातहि, पण खुपदा घराच्या आजुबाजुला मुद्दामहुन लावलेली असतात. उन्हाळ्याच्या दिवसात हे तयार होतात. त्या पुर्वी पांढरी केसाळ फुले गुच्छात येतात याला. हिरवट पिवळसर पुंकेसरांचा गुच्छ असतो हा. त्याखाली चार छोट्याश्या पांढर्या पाकळ्या असतात.एकमेव स्त्रीकेसर मात्र मधोमध ताठ उभा असतो. मे महिन्यात हे झाड पांढर्या जामच्या फळानी भरुन जाते. तीनेक सेमी उंची आणि घेराचे हे जाम शंकुच्या आकाराचे असतात. रंग तुकतुकीत पांढरा. देठाशी हिरवी झाक. तळाशी चार फुगीर कंस आणि त्यात सुकलेल्या पुंकेसरांची गुंतवळ. चव गोडसर पण बरीच पाणीदार. झाडावर पुर्ण वाढु दिला तर हा जाम बराच गोड लागतो. पण बाजारात तो कवळाच आणला जातो. त्याला फारशी चवहि लागत नाही. पण तरिही लहानपणी याचे आकर्षण वाटायचे. दहा पैश्याला पाच सहा मिळायचे ते. याची खरेदी आमची आम्हीच करत असु. ज्यांच्या बिल्डिंगजवळ हे झाड होते, तिच मुले हि फळे विकत असत. आणि नकळत या फळांची आणि मे महिन्याच्या सुट्टीची सांगड घातली गेलीय हे लक्षात येते. त्यावेळी उन्हातान्हात खेळुन तहान लागली, कि हे जाम आम्ही खात असु. तहान तर भागेच पण थोडीफार भुकहि. याच्या आत कधीकधी बोराएवढी बी निघायची तर कधी कापसासारखे काहितरी. याचाच एक मोठा प्रकार मी थायलंड मधे खाल्ला होता. सायझिनियस जांबोस, असे शास्त्रीय नाव असलेले हे झाड मध्यम उंचीचं, खडबडीत सालीच असतं. आठ दहा ईंच लांबीची पाने हिरवीगार असतात आणि वर्षभर झाडावर टिकुन असतात. तसे याचे कुळ लवंग आणि जांभळाच्या नात्यातलं. याची पाने चुरगाळली तर छानसा सुगंध येतो. याचे तेल साबणात वापरलेहि जाते. बागेत, रस्त्याच्या कडेला लावण्यासाठी आदर्श झाड आहे हे. ( तसे बघायला गेले तर, आतापर्यंतची सगळीच झाडे तशी आहेत. )
|
| |
| Wednesday, April 04, 2007 - 4:29 pm: |
|
|
या वरच्या जामपेक्षा जरासे वेगळे झाड असते. याचे फळ तसेच पण त्याला गुलाबी झाक असते. फळे खोडालाच गुच्छाने लागतात. याला दक्षिण कोकणात साखरजाम म्हणतात. चवीला जरा जास्त गोड असतो म्हणुन. पण मला आकर्षण वाटते ते याच्या फुलांचे. ईतका सुंदर रंग, गर्द गुलाबी, यासम हाच. फुलावर आलेले याचे झाड काय देखणे दिसते म्हणुन सांगु ! याची पाने जरा पातळ असतात व वरच्या जामप्रमाणे होडीच्या आकाराची नसुन सरळ असतात. आणि रंगालाहि तजेलदार असतात. त्या रंगात हि गुलाबी देखणी फुले अगदी शोभुन दिसतात. याला नायजेरियात रोझाॅपल म्हणत असत. पण त्या नावाचे एक आणखीनच वेगळे फळ आहे. कोकणात ते मिळते. त्यालाहि जामच म्हणतात. (Syzygium jambos Alston) जांभळाच्या आकाराचे पण जांभळापेक्षा बरेच मोठे असते ते. रंग गुलाबीसर पांढरा असतो आणि चव तुरट गोडसर अशी.
|
| |
| Thursday, April 05, 2007 - 5:03 pm: |
|
|
लहानपणी कमळाचे चित्र काढताना आपण मध्यभागी एक फ़ुगीर कळा काढुन, त्याच्या दोन्हीबाजुला रोमन 7 ची उतरंड रचत असु. तसेच दिसतय ना हे फुल ? अंजन, कांचन, करवंदीच्या आपल्या महाराष्ट्र देशीचा हा कांचन वृक्ष. Bauhinia variegata जंगलात हा असतोच पण याच्या देखण्या रुपामुळे शहरात घराभोवती बागेतहि लावला जातो. लांब विस्ताराच्या फ़ांद्या मोठी पाने आणि अशी खास फुले, असे याचे वैभव. यात गुलाबी प्रकार जरा कॉमन. ( याचा फोटो मायबोलीवरच इतरत्र आहे ) या फोटोतला जांभळा देखणा असला तरी जरा दुर्मिळच म्हणायला हवा. त्यामानाने पांढरा व पिवळा त्याहुनहि दुर्मिळ. पण मला स्वतःला हाच प्रकार जास्त आवडतो, कारण असा नेटका आकार व दुरंगी साज बाकिच्या प्रकारात नसतो. एक पाकळी वेगळी, म्हणजे लिप असणे हे ऑर्किडची खासियत. पण गुलमोहोर, कांचन, आदि वृक्षानी त्याची कॉपी केलीय म्हणायची. याची पाने कशी म्हणाल तर थेट दसर्याच्या आपट्यासारखी, पण आकाराने जरा मोठी, आणि जरा खोलवर दुभंगलेली. रंगाने किंचीत फ़िकट. या पानाच्या खास आकारामुळे संस्कृतमधे त्याचे नाव आहे युग्मपत्र. हा अस्सल देशी वाण आहे. वसंताच्या आधी बहुतेक पाने पिवळी होवुन गळुन जातात. फांद्या अगदी शेलाट्या कळ्यानी भरुन जातात. कळ्या हळुहळु मोठ्या होतात आणि उमलण्याच्या एक दिवस आधी एका बाजुने उकलुन, गर्द रंगाची झलक दाखवतात. कळी अधिक देखणी का फ़ुल, असा प्रश्न पडतो. वरच्या चित्रात स्त्रीकेसर दिसतोय त्याचीच मग शेंग होते. देशी वाण असला कि अनुभवातुन आपण त्याचे उपयोग शिकलेलो असतो. कांचनाच्या कोवळ्या शेंगा, कळ्या, फुले पाने या सगळ्यांची भाजी करतात. पाने प्रथिनानी समृद्ध असतात. या पानांच्या विड्याहि वळतात. (!!!!!) . सालीपासुन धागा मिळतो. चामडे रंगवण्यासाठीदेखील सालीचा उपयोग होतो. कोविदार, कांचनार अशी याची इतर नावे. हिंदीत कचनार. ( मन्ना डे चे कच्ची कली कचनार कि, हे गाणे आठवले ना ? ) पुर्वी औषधात याचा खुप उपयोग केला जात असे. जखमा धुण्यासाठी याच्या फुलांचा काढा वापरतात. घराजवळ लावण्यासाठी हा छान वृक्ष आहे. कोकणातल्या दमट हवेत छान वाढत असला तरी कोरड्या हवेतही बर्यापैकी वाढतो. आपट्याचे झाड जरा वेगळेच दिसते. त्याची फुलेहि पिवळी व अगदीच छोटी असतात. कुळ एकच असले तरी तो Bauhinia racemosa आणि संस्कृतमधे अश्मंतक. फक्त दसर्याला वाटण्यासाठीच नव्हे तर, काहि औषधातहि याच्या पानाचा उपयोग करतात. पानांचा रस व सालीचा काढा अतिसार, आव, मुत्रविकार यावर देतात. तोंड आले तर गुळण्या करण्याकरताही वापरला जातो.
|
| |
| Sunday, April 08, 2007 - 5:25 pm: |
|
|
कांचनाच्या पाठोपाठ अंजन यायलाच हवा. हाहि एक अतिशय देखणा वृक्ष. वृक्ष तसा छोटेखानीच, पण याच्याकडे आहेत गर्भरेशमी हिरवा, राजवर्खी निळा, राजेशाहि गुलाबी आणि किंचीतसा गुलबक्षी असे रंग. आणि या रंगानी एखादे राजवस्त्र विणावे असे त्याचे रुप असते. चमकदार गर्द हिरव्या पानांचा वृक्ष कोकणपट्टीत, सह्याद्रीच्या पर्वतरांगात विपुल आहे, पण या वृक्षात कुठलाच दिखाऊपणा नसतो. त्यामुळे सहसा कुणाह्या लक्षातहि येत नाही, याचे अस्तित्व. पाने छोटी आणि चमकदार असतात. साधारण सात आठ सेमी लांब. खाली झुकलेली. हिवाळा संपता संपता याच्या फ़ांद्यांवर मोहरीच्या आकाराच्या फ़िक्कट हिरव्या कळ्या गुच्छाने येतात. मग त्या हळु हळु गुलाबी होत जातात. गुलाबी रंगाची हे अगदी वेगळीच छटा आहे. या कळ्या चांगल्या मुगाएवढ्या मोठ्या होतात. मग त्यातुन तितकीच नाजुक निळी फ़ुले उमलतात. त्यात चार नाजुक पाकळ्या आणि आठ पुंकेसर. आपल्याकडच्या फ़ुलात निळा रंग तसा दुर्मिळ. हा निळा रंग गोकर्णीसारखा गर्द निळा नव्हे आणि राखाडीच्या जवळपास जाणाराहि नव्हे. मग या नाजुक पाकळ्या गळुन पडतात. झाडाखाली निळा गालिचा. पाकळ्यांच्या जागी उमटतो एक गुलबक्षी ठिपका. मग त्याचेरुपांतर होते, चिमुकल्या हिरव्या फ़ळात. हि फ़ळेही मग गुलाबी, जांभळी आणि मग शेवटी काळी होतात. आणि हा सगळा रंगोत्सव चालतो तो पानांच्या पदराच्या आड. एखाद्या राजघराण्यातल्या स्नुषेने गर्भरेशमी शालु नेसावा. मोजकेच अस्सल मोत्याचे दागिने घालावे, काहि ईंद्रनिलाचे नाजुक अलंकार ल्यावेत. तसे हे रुप. लांबुन बघितल्यावर हिरव्या झाडात काहितरी निळे गुलाबी दिसते. या सगळ्याची मिळुन एक वेगळीच छटा दिसते. जवळ जाऊन बघितले तरच हे आरस्पानी सौंदर्य दिसणार. या वरच्या फोटोत नुसती झलक आहे. हा फोटोहि पाने बाजुला करुन काढला आहे. याचे शास्त्रीय नाव Memecylon umbelatum . गुच्छात येणार्या फ़ळांमुळे मेमेसायलॉन आणि छत्रीसारख्या फ़ुलोर्यामुळे अंबेलॅटम.
|
| |
| Monday, April 09, 2007 - 4:10 pm: |
|
|
कांचन अंजनानंतर करवंदाचे नाव घ्यायलाच हवे, कारण आपल्या महाराष्ट्र देशीचे हे तीन शिलेदार. आमच्यासारख्या वयस्कर माणसाना, जाळीमधि पिकली करवंदं, हि लावणीच आठवणार. करवंदाची जाळी नेहमी गावकुसाबाहेरच असणार. मुद्दाम घराच्या बाजुला कुणी करवंदाची जाळी लावत नाही. लंबगोल अशी पाने असलेले हे एक काटेरी झुडुप असते. याचे काटे तसे सहसा टोचत नाही, पण पसारा मात्र आटोपशीर असला तरी खुपच दाट असतो. एरवी हे झुडुप तसे दुर्लक्षितच असते. पण वसंताची चाहुल लागली कि अश्या शुभ्र फुलानी भरुन जाते. हि फ़ुले रुपाने देखणी असली तरी, याना सुवास नसतो. आणि सहसा हि फुले कुणी तोडतही नाही, कारण त्यानंतर मेवा मिळणार हे सगळ्यानाच माहित असते. मुंबईतच काय अगदी गावच्या बाजारातदेखील हि फळे मोठ्या पानात विकायला आलेली असतात. पण करवंदाची खरी मजा आहे ती, डोंगरावरच्या भटकंतीत हाताने तोडुन खाण्यात. हिरवी करवंदे अनेक जणाना आवडत नाहीत. पण मला खुप आवडतात. त्याची चटणी, लोणचे तर करता येतेच, शिवाय मिठात घालुनहि ठेवता येतात. ( माझ्या मते ती थेट ऑलिव्हसारखी लागतात. ) पिकली करवंदे म्हणजे डोंगरची मैनाच. दोन, तीन च्या समुहात हि करवंदे उंचावरच्या फांदीवरुन खुणावत असतात. कधी ती आतुन लाल निघतात तर कधी गुलाबी. तर कधी चक्क पंढरी. लहानपणीचा कोंबडा कोंबडीचा खेळ. अश्या जाळ्या दिसल्या, कि आपण अधाश्यासारखे तुटुन पडतो. पण अशी करवंदे तोडताना एखादा स्थानिक माणुस सोबत असला, तर तो एक खास जाळी दाखवतोच. या जाळीतली करवंदे त्याच्या भाषेत, थेट मनुकासारखी लागतात. ( याची ग्वाही मी देऊ शकेन ) या जाळीची करवंदे बाजारात आणली जात नाहीत. ती खास स्थानिक लोकांची मर्मबंधातली ठेव असते. त्याशिवाय वेली करवंदे म्हणुन एक वेगळाच प्रकार असतो. या वेली जवळच्या झाडाचा आधार घेतघेत वर चढत जातात. याची गोडी तर अप्रतिमच असते. सावंतवाडीला नरेंद्र डोंगराच्या वाटेवर किंवा अंबोलीला शिरगावकर पॉईंटला जाताना असे वेल लागतात. पण वर बघुन चालत असाल तरच ते दिसतील. याशिवाय करवंदाची एक पांढरी गुलाबी जात असते. माझ्या लहानपणी जेव्हा केसात फ़ुले माळायची पद्धत होती, त्यावेळी हि करवंदे खास केसात माळण्यासाठी बाजारात मिळत असत. वेणी गजर्यात पण त्याना स्थान असे. आता मात्र ती बाजारात दिसत नाहीत. पण हिच जात व्यावसायिक शेतीसाठी महत्वाची आहे. या फ़ळाना लालभडक पाकात शिजवुन, आपल्याकडे ती चेरी म्हणुन विकतात. आपल्या आईसक्रीम, केकवर बहुदा हिच असते. खरी लांब देठाची, गोल गरगरीत तरिही मऊ अशी चेरी, आपल्याकडे अभावानेच मिळते. झाडांची लॅटिन नावे, म्हणजे खुपदा एखाद्या वनस्पतिप्रेमीच्या सन्मानार्थ ठेवलेली असतात. आणि त्यातला काहि भाग वर्णनात्मक असतो, पण खुपदा स्थानिक नावाचा पण आदर राखला जातो. करवंदाचे शास्त्रीय नाव आहे, Carissa carandus
|
| |
| Tuesday, April 10, 2007 - 5:07 pm: |
|
|
जांभूळ पिकल्या झाडाखाली, हे गाणे जेव्हा पहिल्यांदा ऐकले, त्यावेळी ते पटले नव्हते. झाडावर जर पिकलेली जांभळे आहेत, तर ढोल कशाला वाजवावा जी ? पोटभरुन खावीत कि. जंगलातल्या भटकंतीत जांभळाचे ठेंगणे झाड क्वचित दिसतेही. त्यावेळी झाडावरुन अलगद तोडुन खाल्लेली जांभळे, जास्तच चवदार लागतात. एरवी जांभळाचे झाड, चांगलेच वाढलेले असते. मे महिन्यात झाडाखाली सडा असणारच. त्याशिवाय आपले लक्ष वर जाणार नाहीच. पण एरवीही हे झाड सदा हिरवेगार असते. याची पाने जरा पोपटी असतात. काहि जातीत ती जरा लहान तर काहि जातीत चांगलीच मोठी असतात. कधी जांभळाची कोवळी पाने खाऊन बघितली आहेत का ? कडवट तुरट लागली तरी त्या स्वादामूळे छान लागतात. एकदम फ़्रेश वाटते. आणि एप्रिल महिन्यात गेलात तर असा देखणा मोहोर दिसणारच. या मोहोराला एक मधाळ वास येत असतो. माझी उपमा चुकली. मधाला या फ़ुलांसारखा वास येतो, असे लिहिणे जास्त योग्य होईल. जांभळाचा मध चांगला मानतात. आपल्याकडे पिवर जांभळाचा मध मिळणे अशक्य आहे, कारण असे काहि निसर्गातच नसते. मधमाश्याना, बायानो फक्त जांभळाच्या मोहोरातला रसच गोळा करुन आणा बरं का, असे सांगता येत नाही. आपल्या कडच्या विविधतेने नटलेल्या जंगलात ते शक्यहि नसते. त्यामुळे मधात ज्या फुलांचे परागकण तुलनेने अधिक, त्याचे नाव मधाला देतात. ईथे मला गदिमांचा एक किस्सा आठवतो. त्यानी लिहिलेले, बाई मी विकत घेतला श्याम, हे गाणे ऐकुन, शांता शेळके म्हणाल्या होत्या, गाणे अगदी मधासारखे जमलेय. गदिमा म्हणाले की, ईतर कुणीहि असे म्हणाले असते, तर मी हरखुन गेलो असतो, पण तु म्हणतेस म्हणजे, त्यात काहितरी खोच असणारच. त्यावर शांता शेळके म्हणाल्या होत्या. मधमाश्यानी कुठल्या फुलातुन कुठला कण घेतलाय, ते सांगता येत नाही, पण होणारे रसायन मात्र अप्रतिम गोडीचे असते. त्यावर गदिमानी, त्याना मंचरकरीण, म्हणुन लटका राग व्यक्त केला होता. ( या गाण्यातली मूळ कल्पना, मीरेच्या एका भजनातली असुन, त्याला पुढे हाच तुक्याचा विठ्ठल आणि दासांचा श्रीराम अशी जोड दिलीय. ) तर मधमाश्यानी आपले काम केले कि मग तिथे एवलीशी हिरवी जांभळे लागतात. मग यथावकाश ती गुलाबी आणि मग जांभळी होतात. हि वरची जात खास जंगलात सापडणारी. पाने आणि फळे आकाराने अगदी बारिक. पण चवीला अप्रतिम गोड. मुठीमुठीनेच तोंडात टाकावी लागतात. त्यापेक्षा गावाजवळ जी पोसलेली झाडे असतात, ती यापेक्षा मोठी असतात. त्यासाठी कुणालातरी झाडावर चढावे लागते किंवा काठीने ती पाडावी लागतात. हि अतिनाजुक फळे, वरच्यावर झेलली तर ठिक, नाहीतर खाली पडुन फ़ुटतात. ( त्यासाठी ती पातळ कापडात झेलायची असतात. ) अर्थात खाली पडली तरी ती फ़ुंकुन खायचीच असतात. चवीला किंचीत तुरट व गोड लागतात. आणि नावाला जागल्याने, जीभ, हात आणि कपडे जांभळे करुन सोडतात.
|
| |
| Tuesday, April 10, 2007 - 5:11 pm: |
|
|
यापेक्षा अलिकडे शहरात खास विकसित केलेली एक जात दिसते. मुंबईत हि जांभळे बहुतांशी बदलापुरहुन येतात. आकाराने बरीच टप्पोरी, आणि चवीलाहि खुप गोड लागतात. पण आतला गर मात्र गुलाबी असतो. त्यामुळे जीभ जांभळी वैगरे होत नाही. जांभळाचे फळ नीट बघितले तर त्याच्या देठाच्या विरुद्ध बाजुलाहि देठासारखा एक भाग असतो. काहि फळात तो हिरवा असतो तर काहि फळात काळा. निसर्गातल्या अश्या अप्रुपाचे, लोकसाहित्यात प्रतिबिंब पडले नसते तरच नवल. महाभारत लिखित स्वरुपात असले तरी त्याचे एक रुपांतर लोककथातुनही दिसते. लिखित स्वरुपातील पांढरपेशी औपचारिकपण तिथे नसते. जांभूळाख्यान म्हणुन हि कथा प्रसिद्ध आहे. या कथाभागावर आय एन टी ने एक देखणा नाट्यप्रयोग केला होता. शाहिर विठ्ठल उमप यांच्या अप्रतिम अभिनयाने तो प्रयोग नटला होता. त्याचे कथानक थोडक्यात असे. पाच पांडव घरी नसताना एकदा कर्ण घरी येतो. त्याच्या सौंदर्याकडे बघुन, द्रौपदीचे मन पाघळते. हाही आपला पति असता तर, असा विचार तिच्या मनात तरळतो. कृष्णाला ते जाणवते. तिच्याकडुन ते कबुल करण्यासाठी, तो सर्वानी वनभोजनाला जाऊ या अशी टुम काढतो. फक्त फलाहार करुन राहु या, असे तो सांगतो आणि त्याचवेळी मायेने वनातली सर्व फळे गायब करतो. फक्त एका झाडावर एकच जांभूळ उरते. अर्जुन ते अचुक खाली पाडतो. ते सर्वजण ते वाटुन खाणार, एवढ्यात एक ॠषी तिथे येतो. तो म्हणतो, कि तो तपश्चर्या करत आहे, आणि फक्त फ़लाहार करुनच जगतोय. सगळे जण त्याला ते एकमेव जांभूळ देऊ करतात. पण तो म्हणतो, कि त्याने स्वतः झाडावरुन तोडलेले फळच, तो खाऊ शकतो. मग पांडव आपले स्वत्व पणाला लाऊन, ते फळ झाडाला परत चिकटवायचा प्रयत्न करतात. प्रत्येकवेळी ते जांभूळ काहि हात वर जाते. शेवटी द्रौपदीच्या सत्वाची परिक्षा घ्यायची वेळ येते. त्यावेळी ती हे पाच पांडव सोडले, तर ईतर कुणाबद्दल माझ्या मनात अभिलाषा नाही, असे म्हणते. त्यावेळी ते जांभूळ उलटे होवुन झाडाला चिकटते. तर असे हे जांभूळ. याचे शास्त्रीय नाव Syzygium Cumini आपल्याकडे सर्वत्र याची झाडे आहेत. मी आफ़्रिकेत सुद्धा खाल्ली. स्वाहिली भाषेतहि त्याला जांभळा असेच म्हणतात. माझी भाजीवाली ती जेव्हा पहिल्याना ती घेऊन आली, तेव्हा मला ती जांबो म्हणाली असे वाटले. ( जांबो म्हणजे स्वाहिलीत हॅलो ) पण परिचित जांभळे बघुन, एक जुना मित्र भेटल्याचा आनंद झाला. आणि आफ़्रिकेतल्या सर्वच फळासारखी, ती चवीला उत्तम होती. जांभळाचे मूळ भारतच आहे, तरी सध्या अनेक देशात याची लागवड होते. पानाचा उपयोग दात आणि हिरड्या मजबुत करण्यासाठी होतो. सालीचा काढाहि मूत्रविकारावर वापरतात. जांभळाचे सरबत, जेली वैगरे छान होते. मधुमेहावर त्याचा नेमका काय आणि किती उपयोग होतो, हे जरा गूढच आहे. तसे काहि सिद्ध झाल्याचे माझ्या वाचनात नाही.
|
| |
| Wednesday, April 11, 2007 - 5:07 pm: |
|
|
वर्ल्ड कप सारख्या काहि मोठ्या स्पर्धा जवळ आल्या कि ऑफ़िशियल गोष्टींच्या जाहिराती झळकु लागतात. म्हणजे ऑफ़िशियल पेय, ऑफ़िशियल कॅरियर वैगरे. आजचा आपला लेखनविषयदेखील असाच ऑफ़िशियल आहे. हा आपल्या महाराष्ट्र राज्याचा राजवृक्ष, तामण अर्थात Lagerstoremia flos-reginae हा तसा किनारपट्टीचा वृक्ष पण पठारावरहि तुरळक दिसतो. तिथे मात्र त्याची वाढ जरा मंदावते. पण किनारपट्टीवर मात्र तो छानच पोसतो. याची पाने लांबरुंद आणि हिरवीगार असतात. याची पानझड होते, पण झाड अगदीच ओकेबोके होत नाही. मग त्याला सुंदर तुरे फ़ुटतात. यातल्या कळ्यादेखील एखाद्या शिल्पकृतिसारख्या असतात. हळु हळु मोठ्या होत, एका सकाळी तिचे एका देखण्या फ़ुलात रुपांतर होते. सात पाकळ्यांचे हे फ़ुल गडद गुलाबी किंवा जांभळ्या रंगाच्या सात पाकळ्यानी बनलेले असते. या पाकळ्या मुख्य भागाशी एका नाजुक भागानी जोडलेल्या असतात, त्यामुळे पाकळ्या मुख्य फ़ुलाभोवती अधांतरी असल्यासारख्या दिसतात. मधे काहि नाजुन पुंकेसर आणि एक ताठर स्त्रीकेसर असतो. याच्या शास्त्रीय नावातल्या फ़्लॉस रेगिना चा अर्थ राणीचे फ़ुल असा होतो. ईंग्लिशमधे याला क्वीन फ़्लॉवर असेहि नाव आहे. तसेच याला प्राईड ऑफ़ इंडिया असेहि नाव आहे. याची पांढरी जात जंगलात क्वचित दिसते. पण मुद्दाम लावलेल्या या गुलाबी जांभळ्या जातीच जास्त देखण्या आहेत. हि फ़ुले उमलताना गडद रंगाची असली तरे एक दोन दिवसानी हळुहळु फ़िकट होत जातात. अश्या दोनतीन छटेची फ़ुले एकाचवेळी झाडावर एकाच गुच्छात असतात. आणि झाड असे देखण्या तुर्यानी भरुन गेलेले जातात. अगदी पावसाळ्यातदेखील हा बहर टिकुन असतो. फ़ुले गळुन गेली कि तिथे सुपारी एवढे एक टणक फळ लागते. या फळाला पुष्पकोश आणि स्त्रीकेसराची अखंड साथ असते. हे फळ सुकुन तपकिरी रंगाचे होत जाते, आणि शेवटी सात कप्प्यात उकलते. बिया पडुन गेल्या तरी असे उकललेले फळ झाडावरच राहते. तेहि एखाद्या घडीव कलाकृतीसारखे दिसते. या सगळ्यात एक वर्ष निघुन जाते. आणि नव्या वर्षीचा फ़ुलोरा आणि गतसालातली फळे, एकाचवेळी झाडावर दिसतात. हे सुकलेल्या फळांचे घोस घरात ड्राय फ़्लॉवर अरेंजमेंट करण्यासाठी वापरले जाऊ शकतात. या फ़ुलाना क्रेप फ़्लॉवर्स असेहि म्हणतात. पाकळ्या तश्याच दिसतात म्हणुन. याची आणखी खास भारतीय जात, लाजरस्टोमिया इंडिका, अश्या नावाची आहे. पण ती जरा दुर्मिळ आहे. याचे लाकुड खार्या पाण्याला चांगले तोंड देते, त्यामुळे होड्या वैगरे करण्यासाठी वापरतात. पण अश्या देखण्या वृक्षावर कुर्हाड चालवणारा, फारच निष्ठुर असला पाहिजे. फिलिपीन्समधे याच्या पानाचा काढा ब्लड शुगर कमी करण्यासाठी वापरतात. पण त्याचे संशोधन झाल्याचे वाचले नाही.
|
| |
| Thursday, April 12, 2007 - 5:15 pm: |
|
|
गं तू सुंदर चाफेकळी, धमक गं पिवळी किती कांति तुझी कोवळी, कां तू नंदनवनीची चुकुन अप्सरा, आलीस गं भूवरी प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊलीने ज्याचे वर्णन, अमृताचा पुतळा, असे केलेय तो हा सोनचाफा. Michelia champaca हे झाड चांगलेच उंच वाढते. आकाराने साधारण शंकुसारखा असला तरी काही झाडे विस्तारतातही. पाने पोपटी रंगाची, व रंगाने जरा फ़िक्कट असतात. आठदहा सेमी लांब आणि पाच सहा सेमी रुंद. एरवी हे झाड साधेसुधेच असते, पण एप्रिल मे महिना आला की पानापानाच्या मुळाशी दोनतीन कळ्या दिसु लागतात. फ़िकट हिरव्या पातळ आवरणात असलेली हि चाफेकळी, एका सकाळी हे असे देखणे रुप धारण करते. याची बाह्यदलं आणि पाकळ्या एकाच रंगाच्या असतात. त्यामुळे पाकळ्यांच्याच दोन रांगा असल्यासारखे दिसते. दिवस चढला कि झाडावर हे फुल पुर्ण फुलते, पण तोडले कि परत मिटते. याचा गंध माहित नाही, असा मराठी माणुस विरळा. अगदी मादकसा गंध असला तरी झाडाच्या परिसरात, गंध फारसा दरवळत नाही. त्यासाठी फुलच हुंगावे लागते. पण एकतर याला पानामागे दडायची वाईट खोड. खालुन बघितले तर दिसणारच नाही. ( हे असे रुप बघायला जरा खटपट करावी लागते महाराजा, पण मी आहे ना. ) शिवाय फुलाला म्हणावा असा देठ नाही. त्यामुळे खुडणे जरा जिकिरीचेच. याच्या वासाच्या अगरबत्त्या, अत्तरे वैगरे खुपच लोकप्रिय आहेत. पावसाळा आला तरी याचे बहरणे चालुच असते. वास आपण टिकवतोच, पण याचे रुपहि टिकवता येते. तुरटीचे संप्कृत्त द्रावण बाटलीत करुन त्यात सोनचाफ्याची ताजी फुले, भरली आणि त्या बाटलीला लाखेचे सील केले, कि ती फुले अनेक वर्षे टिकतात. पुर्वी घरोघरी अश्या बाटल्या असत. फुले गळुन गेली कि झाडाला हिरव्या चपट्या चौकोनी फळांचे घोस लागतात. ते पिकुन तपकिरी सोनेरी झाले कि त्यात लालभडक बिया तयार होतात. पण मुद्दाम झाड लावलेले असेल तर हि फळे काढुन टाकणेच योग्य. कारण हि फळे बरेच दिवस झाडावर असतात, आणि त्याना पोसण्यात झाडाची बरिच शक्ती खर्च होते. आणि त्याचा परिणाम फुलांच्या संख्येवर होतो. आमच्या पोद्दार कॉलेजच्या समोर अशी दोन झाडे होती. मी त्या फुलांकडे हरखुन बघत असे. पण त्यावेळी एका मुलाने, असे फुलांचे वेड घेणे, एटिकेट्स मधे बसले नसते ना ! याच सोनचाफ्याच्या दोन वेगळ्या जाती आहेत. एक यापेक्षा लालसर रंगाची आणि एक पांढरीशुभ्र. पांढरे फुल जास्त नजाकतदार असते. त्याची पानेहि मोठी असतात. शिवाय याचा एक वेगळा प्रकार म्हणजे कवठीचाफा. त्याचे फुल म्हणजे फ़ुगीर कळाच असतो. ते फुल पुर्ण उमलतच नाही. त्यातहि पांढरी व पिवळी अश्या दोन जाती आहेत. त्या फुलाला पण पानाच्या मागे लपायची वाईट खोड असते. कनकचंपा म्हणजे आपल्याला सोनचाफ्याचे हिंदी नाव वाटते, पण तो एक वेगळाच प्रकार आहे. Ochna squarrosa असे नाव असणारे ते झाड, तीन चार मीटर उंच वाढते. पालवी लालसर जांभळी असते. फ़ुले आठ पाकळ्यांची व ५ ते ६ सेमी आकाराची गोलाकार असतात. यालाच रामधन चंपा असेहि म्हणतात. रंगाने पिवळीधमक असतात. फुलानंतर येणारी फळेही खुप देखणी असतात. हि फळे थेट कानातल्या कुड्यांसारखी दिसतात. मधल्या फ़ुगीर भागाच्या सभोवती येणारी फळे आधी पिवळी, मग लाल आणि नंतर काळी होतात. तिन्ही रंगात ती सुरेख दिसतात.
|
| |
| Friday, April 13, 2007 - 4:34 pm: |
|
|
आपण सगळ्याना सरसकट चाफा म्हणत असलो तरी हे कुळ वेगळेच. यात प्रामुख्याने पांढरा, पिवळा आणि लाल, असे तीन रंग. पण हेच तीन रंग घेऊन रंगाचे आणि आकाराचे अप्रतिम नमुने पेश केलेले असतात. आपल्याकडे अनेक वर्षांपुर्वीपासुन स्थिरावला असला तरी हा मूळ मेक्सिको मधला. याचे शास्त्रीय नाव Plumeria acutifolia हि पांढरी जात ( अक्युटफ़ोलिया म्हणजे टोकदार पानांचा आणि plumeria rubra हि लाल जात, रुभ्रा म्हणजे लाल रंग. मराठीत याला खुरचाफा म्हणत असले तरी तो क्षीरचंपा, या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश आहे. पुर्वापार कोकणात, गडग्याशेजारी आणि देवळाशेजारी चाफ्याचे झाड लावायची प्रथा आहे. वर्षभर हमखास फ़ुले येत असतात. उन्हाळ्यात तर पाने नसतातच, सगळे झाड फ़ुलानी भरुन गेलेले असते. याची अगदी ताजी फुले हवी असतील तर जरा खटपट करावी लागते, पण एरवी झाडाखाली मुबलक सडा पडलेला असतो. देवळातला देवाला वहायला मात्र ताजी फ़ुले तोडायची. अंगण सारवले कि त्यावर कोकणात या फुलांची मोहक नक्षी काढायची पद्धत होती. कुठल्याहि रचनेत हि फुले पालथी ठेवली, तरी त्याच्या खास आकारामुळे, शोभुन दिसतात.
|
| |
| Friday, April 13, 2007 - 5:16 pm: |
|
|
याच फ़ुलांच्या पाकळ्याना नखाने भोक पाडुन त्या उलट्या देठात ओवुन त्याच्या अंगठ्या, करणे हा लहानपणीचा खेळ. पण याचा मंद सुगंध तेव्हाहि मोहुन टाकायचा. अलिकडे आमचे मूळ गाव, राजापुर येथे गेलो होतो, तिथे उन्हाळ्यावर अगदी पुरातन झाड दिसले. आमच्या घराण्याच्या अनेक पिढ्या त्या झाडाने बघितल्या असाव्यात. या झाडाला क्वचित वडासारख्या पारंब्याहि फ़ुटलेल्या दिसतात. एरवी हे खोड गाठीगाठीचे आणि अगदी वेडेवाकडे वाढलेले असते. पण तरिही झाडाला फार मोहक आकार असतो. याच्या इंग्लिश नावात खुपच विविधता आहे. आपल्याकडे देवळाजवळ लावला जातो, म्हणुन तो टेंपल ट्री, तसेच म्यानमार मधे तो पॅगोड्याजवळ लावला जातो, म्हणुन तो पॅगोडा ट्री. चाफ्याची जाडसर फांदी पावसाळ्यात खोचली, कि पुढच्या वर्षीपासुन त्याला फुले यायला सुरवात होते. या गुणामुळे तो लाईफ़ ट्री, रेल्वेतुन जाताना भायखळ्याच्या कब्रस्तानातली दोन चाफ्याची झाडे कायम लक्ष वेधुन घेतात. मृत व्यक्तींच्या कबरीवर सावली धरुन फ़ुलांची पखरण करणारा म्हणुन तो डेड मॅन्स फ़्लॉवर देखील आहे. आणि मोगर्यासारख्या सुगंधामूळे त्याला जास्मिन ट्री देखील म्हणतात.
|
| |
| Friday, April 13, 2007 - 5:20 pm: |
|
|
चाफ्याच्या फ़ुलात, देठ आणि पाकळ्या सोडल्या तर बाकिचे भाग अगदीच सुक्ष्म असतात. त्यामुळे त्याला काहि फळे वैगरे लागत असतील का, अशी शंका येते. पण त्याला गवारीसारख्या दिसणार्या पण काळ्या रंगाच्या शेंगा लागतात. केनयात या शेंगा मी बघितल्यादेखील. आपल्याकडे मात्र त्या क्वचितच दिसतात. याची कारणे भौगोलिक असावीत, पण लोकककथात मात्र एक विलक्षण कारण दिले जाते. या शेंगा म्हणजे नागाच्या विषावरचा रामबाण उपाय, पण हे नागालाहि माहित असल्यामुळे, तो रात्रीच येऊन या शेंगा खुडुन टाकतो. शास्त्रीय नावापेक्षा इंग्लीशमधले फ़्रॅंजिपनी हे सर्वसमावेषक नाव जास्त लोकप्रिय आहे. हे नाव आलेय एका ईतालियन अत्तरियामुळे.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|