Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 26, 2007

Hitguj » Rangiberangi » Members A-N » dineshvs » Archive through March 26, 2007 « Previous Next »


Wednesday, December 20, 2006 - 5:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ईतका शब्दच्छल करुन, ( शब्द माझे छळ तुमचा ) मला माझ्या मर्यादाहि जाणवत आहेत. काहि भाषाना एक अंगभुत लय असते, जशी फ़्रेंच भाषेला दादर्‍याची लय ( धा धिन ना धा तिन ना ) आहे तशी अरेबिकला असली, तर मला जाणवली नाही.
उच्चारलेल्या शब्दातली लय जिथे मला जाणवली नाही, तर लिखित शब्दातल्या लयीबद्दल काय लिहु ? मी ईथे अंताक्षरीवर अनोळखी गाणी वाचतो, तर त्याचे सुर कळते तर काय बहार आली असती, असेच वाटत राहते. लिहिलेल्या शब्दातली लय जाणवायला असामान्य प्रतिभाच लागते. नाहीतर गुलजारच्या, ईजाजतमधल्या, मेरा कुछ सामान मधली चाल, आपल्याला सुचती, तर रोजच्या वर्तमानपत्रातल्या बातम्याहि आपण तालासुरात वाचल्या असत्या.

काहि अक्षरांचे खरे उच्चार मला जरी ईथे लिहिता आले नसले तरी काहि दाखले मी देऊ शकतो. लता वा आशाचे कुठलेहि जुने गाणे हा एक वस्तुपाठ म्हणता येईल. लताच्या गुजरा हुआ जमाना, या गाण्यात हाफ़िझ खुदा तुम्हारा, अशी एक ओळ येते, त्यातले तिचे ह, झ, ख चे उच्चार अस्सल आहेत.
अरेबिक संगीत खुप ऐकले. अगदी आर्तपणे गायले जाते ते. ( लताच्या, ए दिलरुबा नजरे मिला किंवा आशाच्या यार बादशाह प्रमाणे. ) छोट्याच पण दमदार ताना असतात. स्वानंदासाठी गायन फारच कमी. भक्ती आणि विरह हेच प्रमुख भाव जाणवले. कव्वालीपेक्षा फारच वेगळ्या आणि अतिजलद टाळ्यांची साथ बर्‍याचवेळा असते.

श्रुती साडोलीकरच्या आवाजात, तिलक कामोदमधली एक रिवायत उपलब्ध आहे.

रंगीन पालना हौसेनं केला
माझा झुलनार निघुन गेला

असे शब्द आहेत. तुम्हाला संदर्भ माहित नसेल तर तो कृष्णाच्या विरहानंतर देवकीने केलेला आक्रोशच वाटेल. प्रत्यक्षात ते मोहरमच्या सुमारास गायले जाणारे हसन हुसेनच्या मातेचे रुदन आहे. मातेच्या अश्रुना कसली आलीय लिपी आणि भाषा ?
लोकलमधुन प्रवास करताना, खरे माळकरी डब्यात असले तर रुप पाहता लोचनी, किती प्रकारे गाता येते, ते सहज अनुभवता येते. मनाला भिडते त्यांचे गायन, डोळे मिटले तर प्रत्यक्ष माऊलीचे दर्शनहि होवु शकते.
स्नेह, प्रेम, भक्ति अश्या भावनाना शब्द नाही लागत. ते बापुडे केवळ वारा ठरतात. पुलंच्या लेखनातले विनोद कळायला, मराठी येणे आवश्यक आहे. त्या विनोदांचे भाषांतर नाही होवु शकत. पण आशाच्या जिवलगा, राहिले दुर घर माझे, परभाषी पाषाणहृदयी माणसालाहि पाझर फोडु शकते.

समाप्त.




Friday, December 22, 2006 - 3:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बघता बघता आज माझा रंगीबेरंगी BB सुरु होउन एक वर्ष पुर्ण झाले. त्यापुर्वीही मी मायबोलीवर लिहित होतोच. रंगीबेरंगी योजना सुरु झाल्यापासुन, माझा स्वतंत्र BB असावा, अशी माझी नव्हे तर माझ्या अनेक मित्रमैत्रीणींची ईच्छा होती. हवा हवाई, बिपिन सारख्या काहि मित्रमैत्रीणीनी, त्यांच्या BB वर मी लिहावे, असाहि आग्रह करुन बघितला. पण माझ्या लेखनाच्या दर्ज्याबाबत, माझ्या मनात कधीही गैरसमज नव्हता, त्यामुळे मी नम्र नकार देत राहिलो.
असे अनेक आग्रह निर्धारानी टाळल्यानंतर अश्याच एका मित्राने, परस्पर माझी वर्गणी भरुन, मला हा BB उपलब्ध करुन दिला. आता मला लिहिणे भागच होते. कधी सुमार तर कधी वाईट, पण लिहित गेलो, लिहिता लिहिता विषय सुचत गेले.
मी स्वतः जरी असमाधानी राहिलो तरी मित्रमैत्रीणीनी मात्र मला भरभरुन प्रतिसाद दिला. याबाबतीत माझा मलाच हेवा वाटतो. देणार्‍याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी, अशी अवस्था मी कायम अनुभवली.
आज या टप्प्यावर मात्र मला, विंदांच्या कल्पनेप्रमाणे, ” देणार्‍याचे हात ” घ्यायची ईच्छा होतेय. मी तीन वर्षांची वर्गणी भरली आहे, पण आता या ओसरीवर काहितरी विधायक घडावे असे वाटतेय. मायबोलीच्या विशाल प्रांगणात, माझीही एखादी ओंजळ असावी, हिच भावना.
याबाबत काही कल्पना मनात आहेत, मित्रमैत्रीणींशी चर्चा करतोय. कुणाला काही सुचवायचे असेल, तर अवश्य कळवा.
यापुढे माझा ईथला सहभाग निमित्तमात्र असावा, अशी ईच्छा आहे. लिहिण्यासारखे काही असले तर अख्खी मायबोली आहेच कि. पण तुम्हा सर्व मित्रमैत्रीणींबाबत माझ्या भावना दोन ओळीत व्यक्त करतो.

मालिक तू रहे, तेरी रजाभी रहे,
बाकि न मै रहु, न मेरी आरजू रहे |




Wednesday, January 03, 2007 - 1:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फड संभाळ तुर्‍याला गं आला.

tr


Thursday, January 04, 2007 - 6:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझे आजोळ, मलकापुर

mlk


Thursday, January 04, 2007 - 6:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मलकापुर माझे आजोळ. पण आज जरी हे लिहायला घेतले असले तरी याबाबतीत मला " गेले ते दिन गेले " असा सूर मुळीच लावायचा नाही. चाळीशी उलटल्यावर आजहि माझ्या आजोळी माझे तस्सेच लाड होतात आणि सत्तरी उलटलेल्या माझ्या आईची, माहेरची ओढ, तितकीच उत्कट आहे.
काळाने हिरावुन नेलेय ते माझे बालपण, आणि माझे आजी आजोबा, म्हणजेच आबा.

फार पुर्वी म्हणजे पन्नास साठ वर्षांपुर्वी, कोल्हापुर जिल्ह्यातले मलकापुर आणि कोकणातले राजापुर या दोन गावात व्यापारी संबंध होते. त्याकाळी लोक चालत जात असत हे अंतर. बैलगाडी वैगरेहि नसावी, कारण तसा गाडीरस्ता नव्हताच आता अणुस्कुरा घाटातुन मार्ग झालाय खरा, पण आजहि त्या भागात वस्ती नसल्याने, नियमित वाहतुक नाही. त्या काळात तर ते घनदाट जंगलच असणार. तर अश्या व्यापारामुळे माझ्या आई वडिलांचे लग्न ठरले.
तसे बघितले तर, या दोन गावात बरेच सांस्कृतिक अंतर आहे. भाषा, रितीरिवाज, खाणेपिणे, हवामान सगळ्याच बाबतीत दोन टोके. पण लग्नानंतर लगेचच ते दोघे मुंबईला आले.
पडिले दुरदेशी, अशी अवस्था माझ्या आईने, खुप अनुभवली. तिच्या ओळखीचे तसे मुंबईत कुणीच नव्हते. शिवाय कुणी आम्ही मलकापुरचे असे सांगितले, कि ते मलकापुर हमखास बुलढाणा जिल्ह्यातले असायचे. ( कर्‍हाड तालुक्यातहि मलकापुर आहे आणि आंध्रप्रदेशातदेखील. )
त्याकाळी वाहतुकीची साधने नसल्याने, मोठी सुट्टी आल्याशिवाय, आम्हाला गावाला जाता यायचे नाही. एप्रिल महिना लागला, कि मलकापुरहुन आमंत्रणाचे पोस्टकार्ड यायचेच. मग आम्हा सगळ्यांची शाळेच्या परिक्षा संपायची प्रतीक्षा सुरु व्ह्यायची.
बॉंबे सेंट्रलला जाऊन एस्टीचे आरक्षण करावे लागे. त्याकाळी चोरीमारीच्या भितीने रात्रीचा प्रवास नसे. तसेच मलकापुरला जायला थेट गाडीहि नव्हती.
गाडी सकाळची असल्यामुळे, आम्ही रात्रीच बॉम्बे सेंट्रलला जात असु. त्याकाळी मोल्डेड लगेज नव्हते, त्यामुळे भली मोठी ट्रंक घेऊन जावे लागे. शिवाय बेडिंग म्हणुन वेगळी वळकटी असे. बाहेर पिण्यायोग्य पाणी मिळत नसल्याने, पाण्याची बाटली वा थर्मॉस असायचाच.

मुंबईहुन कोल्हापुरला जाणारी एस्टी, सकाळीच निघायची. ठाण्याच्या खाडीवरचा पुल नव्हता. ( तो १९७४ साली खुला झाला आणि १९८६ साली, त्याचे अवसान गळाले. ) पुण्याचा मेधा ( एस्टीवाले त्याचा उल्लेख असाच करतात. ) हायवे नव्हता.
पुण्यापर्यंत पोहोचायला साडेपाच तास लागायचे. वाटेत तो खडाळ्याचा घाट मला लागायचाच. एस्टीदेखीळ डार्रडुर्र करत कसाबसा तो घाट चढायची. सातार्‍यात गाडे जेवणासाठी थांबाय्ची. आईने घरुनच डबा आणलेला असायचा, पण मला काहिच खाता यायचे नाही. शिवाय कोकण सोडुन पठारावर आलो, तरी अजुन घाट का लागताहेत, असा प्रश्ण मला पडलेला असायचा. संध्याकाळी उशीरा आम्ही कोल्हापुरला उतरुन, आईच्या आत्याकडे यायचो.
आईची आत्या म्हणजे एक भारदस्त व्यक्तिमत्व होते, तर तिचे पति, म्हणजे एक अवलिया होते. कोल्हापुरच्या शाहु महाराजानी, मराठ्यानादेखील भिक्षुकि करण्यास प्रोत्साहन दिले होते, त्यामुळे त्यानी त्याचे रितसर प्रशिक्षण घेतले होते. शिवाय त्या भागातल्या, रितीप्रमाणे, ते मिलिटरीत नोकरीला होते. पुढे राजवाड्यातल्या अंबाबाईचे ते पुजारी होते. भिक्षुकीबरोबरच सुतारकाम, लोहारकाम, गवंडीकाम, सोनारकाम सगळ्यातच ते माहिर होते, आणि या सगळ्यातले प्रयोग कायम चाललेले असत. त्यांच्याकडे आल्यावर सगळा शीणवटा निघुन जायचा. तरिही आईला ओढ असायची ती मलकापुरला जायची. त्यामुळे सकाळच्या पहिल्या गाडीनेच आम्ही निघायचो.
कोल्हापुरपासुन ४५ किमीवर, कोल्हापुर रत्नागिरी मार्गावर मलकापुर आहे. कोल्हापुरातल्या पंचगंगेवरचा शिवाजी पुल ओलांडला कि, दोन्ही बाजुने वडाच्या कमानी असलेला सरळसोट रस्ता लागतो. दोन्ही बाजुला उसाची शेती. सकाळची प्रसन्न हवा, यामुळे हा प्रवास मी एन्जॉय करायचो. डाव्याबाजुला ज्योतिबाचा डोंगर दिसायचा. पुर्वी फक्त कळस दिसायचा., आताच्या ईतके बांधकाम नव्हते शिवाय थेट वरपर्यंत गाडीरस्ताहि नव्हता. पण पुढे लागते पन्हाळा. तिथे लागते बोरपाडळे असे नाव असलेले पण उच्चारात भोरपाळं असे होणारे गाव. पिंजरा सिनेमात, संध्या, आमास्नी नगं तुमची मिसळबिसळ, आमास्नी शिर्रा पायजेल, असे ठसक्यात म्हणते, ते हॉटेल तिथले. मग पुढे गारगोटी, वाघबीळ, बांबवडे अशी गावे लागतात. बहिरेवाडीला आलो कि मलकापुरची माहदेवखडी दिसु लागते, पुढे शाहुवाडी हे तालुक्याचे गाव आणि पुढे मलकपुर.
आम्ही येतोय याचे पोस्टकार्ड आधीच गेलेले असल्याने, स्टॅंडवर मामा, आबा आलेले असायचेच. आमचे सामान परस्पर उचलले जायचे, वाटेतला शाळी नदीवरचा पुल ओलांडुन आम्ही घरच्या वाटेला लागायचो. तायनी आलीया जनु, म्हमईस्न, असे म्हणत बायाबापड्या आईला व मला कुरवाळायच्या. वाटेत बहुदा, माझी लाडकी सुमामावशी भेटायची. मी जाऊन तिला बिलगायचो.
पायरीवर आजी भाकरतुकडा घेऊन ऊभी असायचीच. जेमतेम पायावर पाणी पडले, कि मला कुणीतरी उचलुन घेऊन जायचे. मी अगदी पाचवीत जाईपर्यंत असे उचलुन घेणे होत असे.
माझी आजी, अगदी गोरीपान होती. तिला गल्लीत, गोर्‍याई असेच म्हणत असत. आणि ती चांगले रुपयाएवढे मोठे कुंकु लावत असे. त्यामुळे तिच्याकडे बघतच बसावे असे वाटे.
आजोबा सावळे असले तरी त्यांची शरिरयष्टी, तरुणाना लाजवेल अशी होती. ( त्याचे कारण पुढे लिहितोच. )
आमचे शेत त्याकाळच्या प्रथेप्रमाणे खंडाने दिले होते, आजोबा तिथल्या महाराजांच्या वाड्यात, कोठावळे, म्हणुन नोकरीला होते. तिथले महाराज पुढारलेल्या मतांचे होते. स्वातंत्र्याचे वारे वाहु लागल्यावर, त्यानी आपणहुन आबाना काहितरी उद्योगधंदा सुरु करायला सांगितला, आणि आबानी बेकरी सुरु केली.
बेकरीच का, ते मला सांगता येणार नाही, पण त्या काळात ती वेगळी वाट जरुर होती. ती बेकरी आजहि दिमाखात उभी आहे.
पण ज्यावेळी आबानी बेकरी सुरु केली तेव्हा, ती चालवणे तितकेसे सुकर नव्हते. मैदा सहजासहजी मिळायचा नाही. पण तरिही आबानी ती जिद्दिने चालु ठेवली.
आबा कायम तिथे असायचे आणि ती घराच्या मागेच असल्याने, माझी लुडबुड असायचीच. निदान बघत तरी बसायचोच.
पिठ भिजवण्यासाठी तीन फ़ुट ते सात फ़ुट अश्या लांबीरुंदीचा लाकडी फळा होता. त्यावर एकावेळी तीसचाळीस किलो मैदा आबा भिजवत असत.
त्याकाळी यीस्ट मिळत नसे. पुर्वी हॉप्स वापरत असत, पण तेहि मिळायचे बंद झाल्यावर, आबा घरीच आंब तयार करत असत. त्यासाठी रात्रीच एक डब्यात पिठ पातळसर भिजवुन, रात्रभर ठेवत असत. मग ते कोरड्या पिठात मिसळुन, पिठ मळायला घेत. आपल्याला साधा अर्धा किलो मैदा मळताना, काय त्रास होतो माहितच आहे, आबा मात्र तेवढा मैदा, एकाहाती मळत असत.
हा मैदा मळताना, त्याना जवळजवळ बॉक्सींग केल्यासारख्या हालचाली कराव्या लागत. त्यामुळेच त्यांची शरिरयष्टी तशी झाली होती.
असे पिठ भिजवुन ठेवले कि तासभर ते झाकुन ठेवत. यावेळात त्याचा छान वास सुटत असे.
बेकरी असली, तरी पाव वैगरे करायची पद्धत नव्हती. तिथे बटरच जास्त लोकप्रिय आहेत. पाव, बिस्किटे केक वैगरे आता करतात.
या बटरसाठी, मळलेल्या पिठाची ओंजळभर लोळी घेऊन, ती कडबोळ्यासारखी वळत असत. नंतर त्याच्या हातानेच लहानलहान गोळ्या करत असत. याबाबतीत त्यांचा हात ईतका सराईत झाला होता, कि प्रत्येक गोळी अगदी नेमक्या वजनाची असायची.
बटर छोटी, मोठी आणि लांबडी अश्या तीन प्रकारात बनायची. आणि त्यानुसार ते अचुक गोळ्या करत असत.
या गोळ्या ते उभ्याउभ्याच खाली पत्र्यात फ़ेकत असत. याबाबतीतहि त्यांचा नेम अचुक असायचा. बटर करण्यासाठी ट्रे असायचे, त्याना पत्रे म्हणत. दीड फ़ुट बाय दोन फ़ुट असा साधारण आकार असायचा. तर या पत्र्यात ते गोळे लावायला मामा, मावशी, आजी असे सगळेच बसायचे. असे गोळे लावुन झाल्यावर ते तेलाच्या हाताने दाबुन बसवावे लागत आणि परत फ़ुगण्यासाठी झाकुन ठेवावे लागत. पत्रे लावायला बसलेल्या तीघा चौघाना आबांच्या वेगाशी जुळवुन घेता घेता नाकी नऊ यायचे. शेवटी काहि पत्रे आबाच लावायचे. तसे हे पत्रे लावणे कौशल्याचे काम असल्याने, मला हात लावता यायचा नाही.
ते भाजण्यासाठी, भट्टी पेटवली जायची. दहा बाय बारा फ़ुटाची अशी ते बंदिस्त जागा, लाकडे पेटवुन गरम करावी लागे. भट्टी नीट तापली, कि सळीने लाकडे बाजुला करुन, जागा मोकळी करावी लागे. तेवढ्या वेळात बटर फ़ुगुन दुप्पट होत असत. मग एकेक करुन, बांबुला लावलेल्या एका मोठ्या उलाथन्यासारख्या उपकरणाने ते पत्रे एकेक करुन आत सोडले जात. हे काम असे मोठ्या मामाचे.
अर्ध्या तासात बटर भाजुन होत. पण अजुनहि ती तयार झालेली नसत. ईथपर्यंत ती पावाप्रमाने नरम झालेली असत. पुढे भाजण्यासाठी ती उलटुन ठेवावी लागत, गरमागरम पत्रे बाहेर काढुन मामा ते फटाफट उलटे करायचा, आणि मग ती एकमेकाना चिकटलेली बटर, सुटी करुन उलटी करुन परत पत्र्यात ठेवावी लागत. या बटर परतण्यात मात्र मी हौसेने भाग घ्यायचो. मी लावलेला वेडावाकडा पत्रा, आणखी कुणाला तरी नीट करावा लागे, मग परत भाजण्यासाठी ती परत भट्टीत ठेवावी लागत. अशी दोनदा भाजलेली बटर मात्र छान कुरकुरीत होत आणि खुप टिकतहि असत. अर्थात मला हव्या त्या स्टेजमधले बटर खायची परवानगी होती.
आबा खास आमच्यासाठी म्हणुन बिस्किटे करत. नान कटाई देखील करत. अत्यंत खुसखुशीत असे ते पदार्थ असत. हि सगळी प्रोसेस बघणे हेच माझ्यासाठी खुप अप्रुपाचे असे.

अपुर्ण.




Sunday, January 07, 2007 - 4:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आबा जरी हे पदार्थ करण्यात निपुण असले तरी जेवणघरात मात्र आजीचे राज्य होते. माझी आजी साखरप्याची. साखरपा म्हणजे मलकापुर ते संगमेश्वर मार्गावरचे एक गाव. डॉ. काशिनाथ घाणेकर ईथलेच, आणि ते माझ्या आजीचे बालपणचे खेळगडी होते.
आजीमुळे आमच्या घरात कोल्हापुरी भाषा बोलली जात नसे. माझ्या लहानपणी आजी तसे रोजचे जेवण फारसे करत नसे. ते आधी मावशी आणि मग मामी करत असे. पण आम्ही गेल्यावर मात्र आम्हा सगळ्यांचा तिनेच भाकर्‍या कराव्यात असा हट्ट असे. आमच्या घरात मक्याच्या भाकर्‍या खातात. हा मका पांढरा असतो, पण या भाकर्‍या ज्वारीच्या भाकर्‍यापेक्षा जरा वेगळ्या लागतात. आम्हा सगळ्याना त्या खुपच आवडतात.
आजी भाकरी करायला बसली, ( आमच्या घरी कधीहि भाकर्‍या बडवणे वा थापणे, असे शब्द वापरत नाहीत. ) कि आम्ही सगळे कोंडाळे करुन बसत असु. तिच्या गप्पा चाललेल्या असतच, पण माझे सगळे लक्ष तिच्या हालचालीकडे असे. तव्यात कडकडीत पाणी करणे, त्यात पिठ भिजवुन मळणे. हातावार भाकरी विस्तारुन मग ती अगदी गोल थापणे. पटकन उचलुन झटकुन तव्यावर टाकने, तिला पाणी फ़िरवणे, मग परतुन टाकणे, बाहेर निखारे ओढुन त्यावर ती शेकणे, या सगळ्यात एक कला होती. तिच्यासारख्या भाकर्‍या कुणालाच जमत नाहीत, यावर आम्हा सगळ्यांचे एकमत होते.
आजीची भाकरी म्हणजे सहज दहा बारा ईंच व्यासाची होते. तिची चौतच ( चतकोर ) आमच्या एका चपाती एवढी असे. पण तरिही मी दोन तीन चौत खात असे.
मे महिन्यात तिथे फारश्या भाज्या मिळत नसत. वांगी, सिमला मिरची, गवार, बटाटा अश्या मोजक्याच भाज्या मिळत. कोबी आणि पावटा हि मात्र मलकापुरची खासियत. शेताच्या बांधावर अनेक जणानी पावटा लावलेला असे, तिथला कोबी देखील घट्ट आणि चवदार असतो.
तर अशी भाजी आणि डाळीची आमटी असा रोजचा बेत. खास माझ्यासाठी म्हणुन दहि आणि तुप वाढले जात असे. तिथले दहि म्हणजे मुंबईच्या लोण्या ईतके घट्ट आणि तुपाचा ओशटपणा तर दोनतीनदा हात धुतल्याशिवाय जाणार नाही असा. पण तरिही मला त्या भाजी आमटीतच जास्त रस असायचा.
कोल्हापुरी जेवण म्हणजे तिखटजाळ जेवण असे एक चुकीचे समीकरण, हॉटेलवाल्यानी करुन टाकले आहे, वास्तविक कोल्हापुर भागात घराघरातुन केलेले जेवण अत्यंत चवदार असते.
याला कारण असते ती चटणी म्हणजे कांदा खोबर्‍याचा मसाला. हा मसाला तिथे घरघरातुन केला जातो, तसा तो आता बाजारात मिळतोहि, पण तो सगळ्याचा ल सा वि काढुन तसेच, टिकण्याच्या हिशेबाने बनवला असल्याने, त्याला ती चव येत नाही.
या मसाल्याचे पदार्थ, आम्हाला मलकापुरलाच खायला मिळत असत, कारण मुंबईच्या हवेत तो मसाला अजिबात टिकत नाही. ( त्यावेळी घरोघरी फ़्रीज नव्हते. )
हा मसाला घातला कि भाजी आमटीत वेगळे कोथिंबीर खोबरे वैगरे घालायची गरज नसे.
आमच्या घरात, खास जिरेसाळ किंवा धणेसाळ तांदळाचा भात करतात. आणि चुलीच्या वायलावर तो मस्त शिजत असे. चुलीवर शिजवल्यामुळे त्या भात खालुन जरासा करपत असे.
आणि असा करपलेला भातच मला हवा असे. आजी मात्र तो सहजासहजी मला द्यायची नाही. एकतर माझी पंगत पहिलीच असल्याने, ती करप वाढणे जरा जिकीरीचे असे आणि त्यापेक्षा मला करप वाढण्यात आजीला फार कमीपणा वाटत असे. पण मी हटुनच बसल्यामुळे तिला तो वाढावाच लागे. अगदी तेवढ्यासाठी मी परत तिच्या पंगतीलाहि बसत असे.

आमची पंगत म्हणजे आजीच्या अभिमानाचा विषय असे. आम्हाला कधीहि काहि मागायला लागु नये, पदार्थ संपण्यापुर्वीच ताटात वाढला जावा यावर तिचा कटाक्ष असे.
मलकापुरच्या हवेत कडकडुन भुक लागायची देखील. आणि हे असे साधे जेवणच मला खुप आवडायचे. पण आम्ही आलो म्हणुन पाहुणचार म्हणुन काहि पदार्थ व्हायचेच.
आपल्याला पुरणपोळ्या म्हंटलं कि खटाटोप वाटतो. पण देशावरच्या बायका, पायली पायलीच्या पुरणपोळ्या सहज करुन टाकतात. त्यातहि कुकर, मिक्सर अशी उपकरणे हाताशी नसताना.

आजीच्या पुरणपोळ्या म्हणजे तेलपोळ्या असत. त्यासाठी नेहमीचा पोलपाट न घेता ती एखादा थाळा उपडा घालुन घेत असे. पुरणपोळी तर भाकरीपेक्षाहि मोठी असे. ती लाटणं आणि लाटण्यावरच अलगद उचलुन तव्यावर टाकणे अगदी बघत रहावे असे. ईतकी पातळ लाटल्यामुळे ती पटकन भाजली जात असे. आणि तेवढ्या वेळात तिची दुसरी पोळी लाटुन तयार असे.
त्या भागात घराघरावर भोपळ्याचे, काकडीचे वेल पावसाळ्यात चढवळेले असतातच. त्यापैकी एक भला मोठा भोपळा, खास आमच्यासाठी देवळीत राखुन ठेवलेला असे. आमच्यासाठी त्याचे घारगे केले जात. एका भोपळ्याचे घारगे म्हणजे प्रचंड मोठा घाट असे. पण तरीहि माझा भाकरीसाठी हट्ट असेच.
त्या काळात, उरलेले अन्न साठवण्यासाठी भल्यामोठ्या लाकडी पेट्या असत. मोठ्या म्हणजे, आत एखादा मोठा माणुस सहज बसेल ईतक्या मोठ्या. तर हे घारगे, वैगरे त्या पेटीत ठेवले जात. दुसर्‍या दिवशी तर ते घारगे जास्तच चवदार लागत.
सकाळी न्याहारीला मी ताजे बटर वा पाव खावे, असा आजीचा आग्रह असे पण मला मात्र शिळी भाकरी आणि आमटीच आवडत असे.
त्या भागात हरभरे, चवळी, मटकी अशी कडधान्य खाल्ली जात असली, तरी काळे वाटाणे फारसे प्रसारात नव्हते. आम्ही गेलो कि माझ्या आईला, त्या काळ्या वाटाण्याची आमटी करायची फ़र्माईश होत असे. आईला तशी चुलीची सवय राहिली नव्हती, त्यामुळे मावशीच्या मदतीने, ही आमटी आणि आंबोळ्यांचा बेत असे. मामा आणि मावशी त्यासाठी जीव टाकत, मला मात्र त्यात खास काहि वाटत नसे.
काहि खास पदार्थांसाठी तिथे चुलीत कांदा भाजुन घ्याची पद्धत आहे. असा भाजलेला कांदा म्हणजे माझा जीव कि प्राण. मग मावशी माझ्यासाठी एखादा कांदा जास्तच भाजुन ठेवत असे.

हि माझी मावशी, म्हणजे माझी खास मैत्रिण आहे. आजहि माझे लाड करत असते ती.

अपुर्ण




Monday, January 08, 2007 - 4:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मलकापुरची हवा थंड आहे. मे महिन्यातहि तिथे गरम पाण्यानेच अंघोळ करावी लागते. अंघोळीचे पाणी तापवण्यासाठी एक वेगळी चुल कायम पेटलेली असे.
त्यावर तापलेले कडकडीत पाणी घेऊन, परसात अंघोळ करायला मजा येत असे. चारी बाजुने आडोसा केलेली न्हाणी असली तरी वरुन ती उघडीच असे, अश्या वातावरणात अंघोळ करायला फारच मजा येत असे. माझी अंघोळ बहुदा शेवटची असे.
अंघोळ आणि न्याहारी झाली कि मी मावशीची पाठ धरायचो. ती मग सगळ्यांचे कपडे घेऊन विहिरीवर धुवायला जात असे. मी तिच्या मागे. आमच्या घरापासुन शांभर पावलावर आडवा रस्ता लागतो, तो ओलांडला कि सरळ खाली नदीवर वाट जाते. त्यापुर्वी आमची विहिर आहे, पण तिचे पाणी फक्त पिण्यासाठी वापरत. मग तसाच धुळभरला रस्ता नदीत उतरत असे. मलकापुरला दगड धोंडे फारच कमी, जवळजवळ नाहीतच. या नदीत उतरायला मस्त उतार होता, नदी जेमतेम वीस पंचवीस फ़ुट रुंद. दोन्ही बाजुच्या उतारावर अगदी मऊमऊ माती. त्या मातीत घोट्यापर्यंय पाय बुडायचा. आणि त्या उतारावरुन धावत जायचे मला फार आकर्षण वाटायचे.
मे महिन्यात नदीला अजिबात पाणी नसायचे. ( आता नदीवर बंधारा घातल्यामुळे पाणी असते, व त्या बंधार्‍यावरुन रस्ता आहे. )
त्या नदीपलिकडे गोगट्यांची विहिर आहे. ती मावशीची धुणी धुवायची जागा. तिथे एक भलेमोठे बेलाचे झाड आहे. त्याला खुप बेलफळे लागलेली असत. पण मला त्यावेळी त्याची चव कळली नव्हती. बाजुलाच एक महादेवाचे मंदीर आहे. तिथे कुणीतरी साधुबैरागी वसतीला असे. पण मला सगळ्यात जास्त आवडायचे ते डोणीच्या काठावर बसुन राहणे. मावशीला ईतके कपडे धुवायला बराच वेळ लागे. तितका वेळ मी तिथे बसुन असे. विहिरिच्या रहाटावरुन मावशी पाणी काढु लागली कि मी एका बाजुला हात धरुन ओढायचा आव आणायचो. माझे हात तिथे जेमतेम पुरायचे, त्यामुळे माझी काडीचीही मदत तिला होत नसे. तरिही ती मला सहन करत असे. घागर पुर्ण वर आल्यावर किंचीत झोका देऊन, वाकुन घागर बाहेर ओढावी लागते, त्यावेळी मात्र मी घाबरुन लांब होत असे. प्रत्येक घागरीतले ओंजळ भर पाणी मला तोंडावर मारण्यासाठी लागत असे.
सगळे धुणे आटपले कि परत आम्ही घरी जात असु. कपड्यांची बादली, एक घागर आणि दोर ईतके सावरत मावशी चालत असे. तो दोर मी हौसेने घ्यायचो, पण तो मला लगेच टोचायला लागायचा. हौसेने मी घरुन एखादी लहान घागर घेऊन येत असे, पण तीही मला पेलवत नसे. भरुन घेतली तरी मी ती पाडत असे.
परत त्या मातीच्या उतारावरुन धावत मी उतरत आणि चढत असे. ( त्या वाटेवरुन बैलगाड्याही अश्याच जोरात धावत येत जात असत. )
घरी येईपर्यंय माझे पाय चांगलेच मातीने भरलेले असत. त्या मानाने मावशीचे पाय मात्र स्वच्छ असत. मग तिला माझ्या पायावर पाणी द्यावे लागे. ईतक्या कष्टाने आणलेल्या पाण्याचा असा गैरवापर मी करत असे, याची आता खुप लाज वाटते.
मग जेवणं वैगरे झाली तरी मी तिची पाठ सोडत नसे.
त्याकाळी सर्रास पुरुषांची पंगत आधी बसत असे. आणि बायकांच्या पंगतीला भाजी वैगरे मोजकीच उरत असे. पण मग काहितरी आयत्यावेळी करावे लागे, आणि त्यातहि माझा वाटा मला हवे असे.
दुपारी सगळे जरा आडवे होत. मग मी घरामागच्या शेतात पळत असे. तिथे चिंचेचे प्रंचंड मोठे झाड आहे. त्याखाली कांबळ टाकुन एखादा मामा आडवा झालेला असे. आणि माझे त्याच्या भोवतीने चिंचा शोधणे चालु असे. मलकापुरच्या जेवणात चिंचेचा क्वचितच वापर होतो, त्यामुळे चिंचेचं कौतुक कुणालाच नसे, मला मात्र त्या खुप आवडतात. ( अजुनहि आवडतात. ) तिथेच काहि आंब्याची झाडेहि होती. त्यावरच्या कैर्‍याहि पडायच्या, त्या गोळा करुन मी परत मावशीला कापुन द्यायला लावत असे.
समोरच्या घरामागे एक साखरगोटी आंब्याचे झाड आहे. ते खुपच मोठे असल्याने, त्यावर चढता येणे केवळ अशक्य होते. पण वारा आला कि आम्ही सगळी मुले, त्या झाडाखाली धाव घेत असु. झाडावर पिकलेला साखरगोटी आंबा म्हणजे, अमृताहुनी गोड प्रकार असतो. याचा आकार जेमेतेम लहान बाळाच्या मुठी एवढा असतो. पिकला तरी हिरवाच असतो, किंचीत पांढरट छटा असते. पण चव मात्र अप्रतिम. खायला गर मात्र अगदीच कमी, त्यामुळे कोय चोखुन चोखुन अगदी पांढरीशुभ्र करत असु आम्ही.
सगळ्या गल्लीचा मी भाचा असल्यामुळे सगळ्यांच्याच घरात मला मुक्त प्रवेश होता. मावशी चहा करेपर्यंत माझे असे हुंदडणे चालु असे.
कोकणातल्या घरापेक्षा कोल्हापुर भागातली घरे खुपच वेगळी असतात. पडवी, झोपाळा वैगरे नसतोच. एका मागोमाग एक अश्या लांबट खोल्या असतात. चोरांच्या भितीमुळे खिडक्या अगदीच लहान, जेमतेम दोन फ़ुटाच्या. दर्शनी भागावर बहुतेक पत्रा असे. त्याचा वापर वाळवण वैगरे घालण्यासाठी. त्यावर चढायला बाहेरच्या बाजुने एक शिडी. तिथल्या बायकाहि नऊवारी नेसुन अगदी सहज या शिड्यांवर चढतात. ( प्रपंच सिनेमात पहिल्याच प्रसंगात सुलोचना अशी शिडीवर चढताना दाखवलीय. ) अंगण असायचे. गुरे असतील, तर गोठा घराच्या बाजुला. बकर्‍या वा कोंबड्या असतील तर त्या घरातच असत. भिंतीना कोनाडे आणि देवळ्या भरपुर. घरावर शक्यतो माडी असणार, पण त्याचा वापर फारच कमी. खुपदा अडगळ ठेवण्यासाठीच तिचा वापर. घरावर दर्शनी भागात कौले आणि मागच्या बाजुला शक्यतो नळे असत. माकडांच्या उच्छादामुळे कौले फ़ुटण्याचे प्रमाण फार असे.
कौलातच एखादी काच, त्यामुळे घरात वावरण्यापुरता प्रकाश असेच. टेबल खुर्च्यांपेक्षा जमिनीवर एखादी घोंगडी कायम अंथरलेली असे.
दुपारच्या वेळी पत्र्याच्या छिद्रातुन उन्हाचे गोल कवडसे पडत. त्या कवडश्यात आरसे भिंग वैगरे धरुन, माझा सिनेमा सिनेमा खेळ चालत असे. मालाडला, आमच्या शेजारी फ़िल्मसेंटरचे रंगतज्ञ अच्युत गुप्ते रहात असत, त्यामुळी माझ्याकडे फ़िल्मचे भरपुर तुकडे असत. बर्‍याच खटाटोपानंतर मला भिन्तीवर एखादी प्रतिमा पाडता येत असे. मग कुणाला तरी ते सगळे धरायला लावुन, मी सगळ्याना आरडा ओरडा करुन उठवत असे.

पण तरिही मलकापुरच्या सिनेमाची गंम्मत न्यारीच होती.

अपुर्ण.





Tuesday, January 09, 2007 - 5:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या घराच्या मागे फार मोठे वावर होते. आता तिथे एस्टी स्टॅंड आहे. त्यापलिकडे कोल्हापुर रत्नागिरी हमरस्ता आणि त्या पलिकडे लगेच, ओपन एअर सिनेमा थिएटर.
त्याचे नाव काय होते ते आता आठवत नाही. कदाचित नाव नसावेच. त्याला सगळे तंबुचा सिनेमा म्हणत.
खरे तर तो तंबुहि नव्हता, कारण वर छत वैगरे नव्हतेच. चारी बाजुला पुरुषभर उंचीचे पांढरे कापड लावले असे. एका बाजुला पडदा आणि दुसर्‍या बाजुला प्रोजेक्टर.

पडदा मोठा असे आणि रस्त्यावरुन सिनेमा सहज दिसे. तरिही तिकीट केवळ २५ पैसे असल्याने, त्या दिवसात जवळ्जवळ सगळा गाव सिनेमाला जात असे.
रात्री आठ नऊ वाजता सिनेमा सुरु होत असे. गर्दी फारच वाढली तर कापड लावलेले खांब उचलुन जरा पुढे लावत.
आमच्या मुक्कामात तीनचारदा तरी आम्ही सिनेमाला जात असु. बसायची काहिच व्यवस्था नसल्याने, घरुन सतरंजी वैगरे घेऊन जात असु. तशी रितच होती. नाहि म्हणायला अगदी मागे काहि बाकडे ठेवलेली असत, पण त्यावर कुणी बसलेले मी कधीच बघितले नाही.
मधोमध दोरी बांधुन, स्त्री आणि पुरुषांसाठी विभाग केले जात असत. एखादा शेतीविषयक माहितीपट दाखवुन, मुख्य चित्रपट दाखवत असत.
अगदी रस्त्यालगतच थिएटर असल्याने, रस्त्यावरच्या ट्रकच्या हेडलाईट्सचा प्रकाश थेट पडद्यावरच पडत असे. पण त्याकाळी रात्रीची रस्त्यावर वाहतुकच कमी असल्याने असे व्यत्यय फार नसत.
प्रत्येकवेळी रिळ बदलताना मात्र तीन चार मिनिटे मध्यंतर असे.
त्याकाळी जयश्री गडकर तिथे अफ़ाट लोकप्रिय होती. त्यामुळे तिचा सिनेमा असला कि भरपुर गर्दी व्हायची. पण तामशापटच लागत असत असे नाही. मधुचंद्र सारखे सिनेमेहि लागत. डोंगरची मैना, वारणेचा वाघ, सारखे सिनेमे तिथे बघितलेले आठवताहेत. हिंदी पण लागत, त्यालाहि आम्ही जात असु. मुमताज आबांची खुप आवडती नटी होती, त्यामुळे तिचा सिनेमा असला तर आबाहि येत. त्यावेळी अर्थातच आम्हाला तिकिट काढावे लागत नसे.
झाला महार पंढरीनाथ हा सिनेमा तर चांगलाच लक्षात आहे. त्या सिनेमात सुधीर फडकेंचे, निजरुप दाखवा हो, हरि दर्शनास द्या हो, असे एक सुंदर भजन आहे. त्यावेळी शाहु मोडक, विष्णुच्या अनेक अवतारात पडद्यावर दाखवला आहे, त्यावेळी तिथे लोक पडद्यावर पैसे फेकत, उभे राहुन नमस्कार करत.
वरती मोकळे आभाळ असल्याने, चांदणे, चंद्र काजवे सगळेच दिसत असे. खुपदा मी मामाच्या नाहितर मावशीच्या मांडीवर डोके ठेवुन झोपुनहि जात असे. पण तरिही मला घरी ठेवुन कधीहि कुणी सिनेमाला जात नसे.

रात्री अंगणात झोपणे याचे मला खुप आकर्षण वाटायचे. खास लाकडी पलंगावर मऊमऊ गाद्या आणि शुभ्र चादरी घालुन रात्री अंगणात आम्ही झोपत असु. आकाशात तर मुंबईत कधीहि दिसत नसत ईतक्या चांदण्या असत. काहि अंतरावर पिंपळाचे दोन भलेमोठे वृक्ष होते, त्याची सळसळती पाने, चांदण्यात चमचमत असत. पण मला कुणी रात्रभर बाहेर झोपु देत नसे. मला झोप लागली कि, मामा नाहितर मावशी मला उचलुन घरात नेत असत, कारण पहाटे तिथे खुप थंडी वाजत असे. ( आमच्या घरात आता फ़्रीज वैगरे सगळे असले तरी आजहि पंख्याची गरज वाटत नाही. )

मे महिन्यात असला तर क्वचितच कुणाच्या वाफ्यात मक्याचे पिक उभे असे. नदीकाठी थोडाफार उस असे. त्या परिसरात साखरकारखाना नसल्याने, त्यावेळी उसाचे एवढे प्रस्थ नव्हते. आजहि उस लावतात, तो फक्त गुर्‍हाळापुरताच.
बहुतांशी पिक घेऊन झालेले असे. शेतात बहुदा कापलेल्या पिकांचे बुडखे असत. त्याकाळी वैभव विळ्याचा शोध लागला नसल्याने, बोटभर बुडखे असत. ( वैभव हे एका विळ्याचे नाव आहे. ऋषी विद्यापिठाने तो विकसित केलाय. त्याच्या दांड्यापेक्षा पाते जरा खालच्या पातळीत असल्याने, पिक अगदी जमिनीलगत कापले जाते, व खोडकिडीच्या प्रादुर्भाव होत नाही. आपल्या वैभवचा काहि संबंध नाही त्याच्याशी. )
मे महिन्यात पावसापुर्वीच्या मशागतीची कामे चाललेली असत. आमचे शेत लांब असले तरी, घराच्या मागचे शेत, शेजार्‍यांचेच होते, आणि या कामात माझी लुडबुड चालेच.
आधी खोल नांगरट करुन, हे सगळे बुडखे वेचुन काढले जात, व त्याची जाळुन राख केली जात असे.
शेत असे नांगरले कि हमखास कुणाच्या तरी शेतात साप निघत असे. त्याकाळी सापाला मित्र वैगरे मानत नसत, त्यामुळे दिसला साप कि मारा, अशीच पद्धत होती. तिथले सापहि वेगळे व चांगलेच गब्दुल असत.
साप मारायची पद्धत पण कोकणापेक्षा वेगळी. ( कोकणात गडग्यात शिरलेला साप शेपटीला धरुन गरगर फ़िरवुन किंवा काठीने झोडपुन मारतात. खाली दगड असल्याने, थोडक्या घावातच साप मरत असे. ) मलकापुरला मात्र दगडच नसल्याने, असा साप मारता येत नसे, मग त्यासाठी बर्चा नावाचे अवजार लागे. बर्चा म्हणजे जेवणाच्या फ़ोर्कसारखे दिसणारे एक अवजार. एखाद्या चिव्याच्या टोकाला ते जोडलेले असे. ( चिवं म्हणजे बांबुची एक जात. तिथे बहुतेकांच्या परसात चिवारीचे बन असतेच. शिड्या वैगरे करायला, टोपल्या, बुरड्या विणायला त्याचा उपयोग होतो. ) गल्लीत एकादोघांकडे तरी तो असे. मग कुणीतरी तो पळत जाऊन आणत असे. माझा मामा याबाबतीत अतिउत्साही, त्यामुळे तो सगळ्यात पुढे. सापाला बर्चा लावुन ठेवण्याचे काम त्याचे. आणि बाकिचे एकदोघेजण काठ्या मारत असत. आणि हे सगळे बघायला भोवति कोंडाळे करुन सगळे. खालच्या भुसभुशीत मातीमुळे सापहि बराच वेळ मरत नसे. त्याला मारला कि त्यावर आवर्जुन अग्निसंस्कार करत.
आणि मग दोन दिवस गल्लीत त्याचीच चर्चा. आताचा तर काहिच नाही परवाचा भला दांडगा होता. त्याच्या फ़ण्यावर दहाचाच आकडा नव्हे तर चक्क त्रिशुळ होते, असे काहिही सांगितले जात असे. तवढे दोन दिवस मी जरा जपुन पाऊल टाकत असे, पण ती भिती फार टिकत नसे.

मलकापुरच्या धुवांधार पावसात शेताच्या बांधाची पार वाट लागते. त्यामुळे नांगरट झाली कि ते बांध परत रचण्याचे काम करावे लागे. बहुदा बांधावर बाभळीची झाडे असत. त्या सीमा धरुन बांध घालत असत. मग लाकडी हातोड्याने ढेकळे फोडायचे काम चालत असे. ती ढेकळे फ़ोडुन झाली कि जमिन सपाट करण्यासाठी बैलाने फळी फ़िरवणे, असे एक काम असे. आणि या फळीवर बसायला मला खुप आवडत असे. जमिन सपाटच असल्याने, स्केटिंग केल्यासारखे वाटे. अर्थात सगळे कपडे, केस धुळीने भरुन जात, मग मावशीला माझे डोके परत एकदा धुवावे लागे.

अपुर्ण





Wednesday, January 10, 2007 - 4:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता चार दिवस मी घरी नाही, म्हणुन खंड.

हि आहे पाण्यावरची रांगोळी, सर्वश्रेष्ठ कलाकाराने काढलेली.

pr


Monday, January 22, 2007 - 4:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आंबा घाट, साखरपा या भागात जंगले असली तरी मलकापुरला तसे जंगल नाही. सपाट सुपीक जमिनीमुळे सगळी जमिन लागवडीखाली आहे.
पण या घाटमाथ्यावरच्या टोकाच्या गावाची ( उदा राधानगरी, गगनबावडा, बेळगाव वैगरे ) खासियत म्हणजे ईथे काजु फणसाची झाडे भरपुर आहेत.
त्यामुळे उन्हाळ्यात कच्च्या फणसाची खास करुन गर्‍याची भाजी व्हायचीच. काजुच्या बिया मला खेळायला मिळायच्या. अगदी परत यायचा दिवस आला कि त्या भाजण्याच्या कार्यक्रम व्हायचा. त्यासाठी अर्थातच मावशीला त्रास देणे, भाग असायचे.
काजुच्या बिया भाजणे, हा खरेच एक कटकटीचा भाग असतो. त्याचा एक उग्र वास येत राहतो. शिवाय विस्तवानी एखाद्या बीचा भडकाहि उडायचा.
वेल्डिन्ग करताना जशी ज्योत वापरतात, तशी ज्योत एखाद्या बीतुन निघायची.
त्यातला चिक जळुन गेला, कि त्या बीची आग विझवावी लागे. मग जाडजुड फ़ुंकणीने ती शक्यतो अलगद फोडायची. अगदी मोजक्याच बिया, अखंड निघत, आणि त्या हटकुन मला दिल्या जात.
देवरुख भागात, माम्या, ओल्या काजुच्या बिया सहज काढतात, पण ते कौशल्य, सगळ्यांच्या हातात असतेच असे नाही, त्यामुळे तसे काजु, खास देवरुख वरुन मागवले जात, आणि त्याची खास भाजी होत असे.
माझ्यासाठी जरी अनेक प्रकार केले जातात, तरी त्या भागात मासांहार आवडीने केला जातो.
चिकन खाणे जरा कमीपणाचे मानले जाते. बाजाराच्या दिवशी बहुतेक सगळ्यांच्या घरी मटण असतेच. तिथला मटणात रस्सा भरपुर असतो. आणि कोकणातल्या प्रमाणे तो खोबर्‍याने थबथबीत झालेला नसतो. तेलकटहि नसतो, पण पाणीदार असतो. तिथल्या लोकाना फ़ोडींपेक्षा रस्सा खाण्यातच जास्त रस आहे. असा रस्सा, कांदा आणि लिंबु असले कि झाले. त्या भागात पांढरा कांदा खाल्ला जात नाही. कांदा लालच लागतो. वाटणात चुलीत भाजलेले कांदे अवश्य असतात.
बकर्‍याच्या मटणाबरोबर रान डुक्कर, लावे, अशी काहि शिकार आत्ता आत्ता पर्यंत होत असे.
चिकन फारसे खात नसले तरी, अंडी आवडीने खाल्ली जातात. उकडलेली अंडी फारशी आवडत नाहीत. अंड्याचे ऑम्लेट, ज्याला तिथे अंड्याची पोळी म्हणतात, ती जास्त खातात. खमंग व जरा तिखट प्रकार असतो तो. त्यापेक्षा आवडीने खातात तो अंड्याचा गब्रा. गब्रा म्हणजे भुर्जीचा जरा तिखट प्रकार.
शिवाय अंड्याची आमटी पण आवडीने खातात. यात अंडी उकडुन न घालता, उकळत्या रस्श्यात अंडी फोडुन तशीच घातली जातात.

शेतातले खेकडे वैगरे दिसत नाहीत तिथे, खायचाहि प्रघात नाही. क्वचित कधीतरी नदीतला वाम नावाचा मासा बाजारात येतो. पण सगळ्यात आवडीने खाल्ला जातो तो गोलीम किंवा जवळा. हा प्रकार म्हणजे सुकवलेली बारिक कोलंबी. कांदा परतुन त्यावर तिखट घालुन, जवळा परतला कि भाकरीबरोबरचे छान तोंडीलावणे होते. बहुतेक घरी तो संग्रहात असतोच. तिथल्या गारठणार्‍या पावसाळी हवेत. तो आवडीने खाल्ला जातो.

हा जवळा अर्थातच कोकणातुन आणला जातो. अनेक बायका तो खेडोपाडी विकत फिरतात. अश्याच एक बाई, आमच्या घरी नियमित येत असत. मोळावडे नावाच्या गावातुन पायपिट करत त्या येत असत. भरपुर उंची, पांढरेशुभ्र तरीहि भरपुर केस, गोरा गुलाबी रंग, घारे डोळे, वर खोचुन नेसलेली गर्द हिरवी नऊवारी साडी, आणि पायात जाडजुड वहाणा अश्या रुपात येणार्‍या त्या बाई, आमच्या घरातल्याच झाल्या होत्या. आबानी त्याना बहिण मानले होते, त्याना आम्ही आत्ती म्हणत असु. सगळा बाजार झाला कि, त्या आमच्या घरी, पाणी वैगरे पिण्यासाठी थांबत. दोन घटका आराम करत. आजी जेवण्याचा आग्रह करी. मनात असले तर जेवत, आणि तश्याच चालत घरी जात.
आम्ही आलेलो असलो, कि माझ्यासाठी मडक्यातले घट्ट दहि घेऊन येत. अगदी शुभ्र, गोड घट्ट दहि, कितीहि खाल्ले तरी पुरे पडत नसे. आम्हीहि त्यांच्या घरी जात असु. खरे तर त्याना असा बाजार करायची गरज नव्हती, पण आवड म्हणुन त्या करत असत.
घरात एखादा गंभीर प्रसंग असला. कुणाच्या बाळंतपणात वा आजारपणात, त्या हटकुन आमच्याकडे असत.

मलकापुरात शुक्रवारी आठवड्याचा बाजार भरतो. त्या दिवशी सगळ्या गावावत एक अनोखा उत्साह संचारतो. गावातल्या मुख्य रस्त्यावर वेगवेगळी पाले पडत. एका मैदानात बैलांचा बाजार भरतो. त्या बाजारासाठी बैल आमच्या दारावरुन नेले जातात. देखणे पांढरेशुभ्र बैल जोडीजोडीने उधळत, घरासमोरुन जात. विक्रेत्यांचा उत्साह बैलातहि संचारे, आणि शर्यत लावल्यासारख्या बैलजोड्या आमच्या दारावरुन जात. अर्थात त्यावेळी मला रस्त्यावरच काय, अंगणातहि उभे रहायची परवानगी नसे.
बाजारात आमचे एक कायमस्वरुपी दुकान आहे, तरिही बाजाराच्या दिवशी रस्त्यावर वेगळे दुकान लावले जाते. तिथे बसायला मी हौसेने जात असे. बाजारात त्याकाळी खास वस्तु असत. धान्य, गुळाच्या ढेपा, पेंड, थोड्याफार भाज्या, घोंगड्या असा वेगवेगळा माल असे.
बाजाराला येणार्‍या बायका येताना, डोक्यावर मोठ्या पाटीत, घरातली भजी, मिरच्या, भोपळा, कोंबडी, करवंदे, अळु, जांभळे वैगरे विकायला आणत असत.
परत जाताना धान्य, भाजी, बाटलीत तेल, बटर, कंगवे अशी सटरफटर खरेदी करत असत. अनेक धनगर अंगात भारीपैकी शर्ट, डोक्याला भलामोठा फेटा आणि खाली फक्त लंगोट अश्या अवतारात फिरत असत. माझा मामा त्यांची चेष्टा करत असे, त्याना त्याचे काहिच वाटत नसे, लेकरा अजुन बारिक हैस, असे म्हणत पुढे जात असत.

आजहि त्यांच्या अवतारात फार काहि बदल झालेला आहे असे नाही. गेल्याच महिन्यात, अश्याच एक बाई एस्टीत माझ्या बाजुला बसल्या होत्या. जरा वेळाने माझ्या जवळुन मोबाईलची रिंग वाजली, तर आजीनी लगेच चंचीतला मोबाईल काढला, आणि व्यवस्थित बोलुन झाल्यावर परत नीट तो ठेवुन दिला.
मी विचारले, मामी, फोन करता येतो का ? तर त्या म्हणाल्या, आपण कश्याला करा. समोरुन करत्यो कि करनारा, मला फकस्त चालु करायचं आणि बंद करायचं बटन म्हाईत हाय.


प्रगति झालीय.

अपुर्ण




Monday, February 26, 2007 - 3:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल १० मायबोलीकर आणि २ सौ. मायबोलीकर यांचे एक प्रीतीभोजन झाले. त्यावेळी आम्ही सगळ्यानी घेतलेला एक विलक्षण अनुभव.
ज्या ठिकाणी आम्ही जमलो होतो, तिथे एक जादुगार काहि जादुचे प्रयोग करत होता. त्याने दोन मायबोलिकरणींवर त्याचे दोन प्रयोग केले. ( त्यावेळचे त्या दोघींचे संभ्रमावस्थेतील फोटो मी काढले आहेत, पण त्यांच्या परवानगीशिवाय ईथे पोस्ट करणार नाही. ) पण हा किस्सा मात्र माझ्याच बाबतीत घडला.
हा प्रयोग म्हणजे त्या जादुगाराचा कळसाध्यायच होता.
प्रयोग उघड्यावर होता. आम्ही त्या जादुगारापासुन केवळ ८ ते १० फ़ुटावर बसलो होतो. त्याने आमच्यापैकी काहि जणाना, आमच्या आवडत्या फुलांची नावे घ्यायला सांगितली. मी गुलाब सांगितले, कुणी मोगरा तर कुणी चाफा सांगितले. आम्हाला त्याने हाताची ओंजळ करायला सांगितले. आणि काहि क्षणानंतर आमच्या हाताचा वास घ्यायला सांगितला.
आम्ही ज्या फुलांची नावे घेतली होती, तो सुगंध आमच्या हाताला येत होता. अत्तर लावल्याचे कोणतीही खुण नव्हती. ( म्हणजे तेलकटपणा वैगरे ) तसेच माझी स्किन ईतकी सेन्सिटिव्ह आहे, कि तसा काहि लावले वा फवारले गेले असते तर मला त्याचक्षणी जाणवले असते.
हा सुगंध नंतरहि बराचवेळ येत होता, आणि ज्यानी ज्यानी माझ्या हाताचा वास घेतला, त्यानाहि तोच सुगंध जाणवला.
आपण खानदानी जादुगार असुन, करतोय ती केवळ हातचलाखी आहे, असे त्याने प्रारंभीच सांगितले होते.
हाताला लागेल ती नोट त्याला बक्षीस दिली मी !!!



Sunday, March 04, 2007 - 6:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

होली खेलनको चले कन्हैया..

mn


Sunday, March 11, 2007 - 11:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्या गझल कार्यशाळेतली जी पहिली ओळ होती, त्यावरुन मला हे गाणे आठवले


ऋतु आए ऋतु जाए सखी री
मन के मीत न आए
जेठ महीना जिया घबराए
पल पल सूरज आग लगाए
दूजे बिरहा अगन लगाए
करूँ मैं कौन उपाय
ऋतु आए ऋतु जाए सखी री

बरखा ऋतु बैरी हमार
जैसे सास ननदिया
पी दरसन को जियरा तरसे
अँखियन से नित सावन बरसे
रोवत है कजरा नैनन का
बिंदिया मोरी सरकाय
बरखा ऋतु बैरी हमार

पी बिन सूना जी
पतझड़ जैसा जीवन मेरा
मन बिन तन ज्यूँ जल बिन नदिया
ज्यों मैं सूनी बिना साँवरिया
औरों की तो रैन अँधेरी
पर है मेरा दिन भी अँधीयारा
पी बिन सूना जी

आई मधु ऋतु बसंत बहार री
फूल फूल पर भ्रमर गूँजत
सखी आए नहीं भँवर हमार री
आई मधु ऋतु बसंत बहार री
कब लग नैनन द्वार सजाऊँ
दीप जलाऊँ दीप बुझाऊँ
कब लग करूँ सिंगार रे
आई मधु ऋतु बसंत बहार री
आई मधु ऋतु बसंत बहार री, बहार री, बहार री

हमराज मधले हे गाणे अनिल बिस्वासच्या संगीतात लता आणि मन्ना डे ने गायलेय. ( पडद्यावर निम्मि आणि शेखर होते )
यातले प्रत्येक कडवे वेगळ्या रागात आहे. गौड सारंग, गौड मल्हार, जोगिया आणि बहार असे ते राग आहेत.
सर्व गाणे मिळुन सहा सात मिनिटाचेच असेल, पण या एवढ्या अवधीत, त्या दोघानी हे चारहि राग, आलापी, बोलताना ची आतिषबाजी करुन खुलवले आहेत.
लताने, ती शास्त्रीय संगीत शिकु शकली नाही, असा न्युनगंड कायम बाळगला. खरे तर तो तिचा विनय आहे, हे गाणे ऐकले तर कुणालाहि ते जाणवेल.





Thursday, March 22, 2007 - 9:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अलिकडे जास्वंदीत वेगवेगळे रंग दिसु लागले आहेत. माझ्या अंगणातला हा एक नमुना.

js


Thursday, March 22, 2007 - 9:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि हा दुसरा

js2


Sunday, March 25, 2007 - 4:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजुनहि माझे मलकापुरला नियमित जाणेयेणे असते. आताश्या घाटाची वैगरे भिती वाटत नाही. उलट घाटातला प्रवास मी एन्जॉय करतो.

कोल्हापुरहुन अर्ध्या अर्ध्या तासाने मलकापुरसाठी गाड्या सुटतात. तसेच रत्नागिरी, देवरुख ला वैगरे जाणार्‍या गाड्या मलकापुरहुनच जातात. आता जाणे होते ते मलकापुरलाच आणि मलकापुरसाठीच. ( ज्योतिबा, पन्हाळा, विशाळगड, पावनखिंड, मार्लेश्वर हि सगळी ठिकाणे जवळपास असुनहि, अजुनहि माझे तिथे जाणे झालेले नाही. पुर्वी वाहतुकीच्या सोयी नव्हत्या, आणि आता …. ) . कोल्हापुरहुन जाताना वाटेत पन्हाळा, ज्योतिबा दिसतात, पण लहानपणीच्या अधीरेतेने मी अजुनहि, महादेवखडी कधी दिसु लागतेय याची वाट बघत बसतो.

शहरातील सुखसोयी, म्हणजे सिमेंटची पक्की घरे वैगरे खेड्यात असु नये, असा स्वार्थी विचार मी करत नाही. त्यामुळे मलकापुरात अनेकानी दुमजली घरे बांधली यात मला काहिच गैर वाटत नाही. मामानेहि दुमजली पक्के घर बांधलेय.

मध्यंतरी व्हीडिओ बूम होता तेव्हा, मलकापुरात अनेक व्हीडिओ थिएटर्स झाली होती. पुढे केबल टिव्हीचे प्रस्थ वाढले, तर तोहि आलाच. आता सगळे घर मालिका बघत असले, तरी मी मात्र छोट्याछोट्या दोस्ताना गोळा करुन, जुन्या धूळभरल्या रस्त्याने फ़ेरी मारतो.
शेतातले लोक अजुनहि, तायनीचा ल्येक जनु, म्हणत विचारपुस करतात. शेतात जे असेल ते हातावर ठेवतात.

शेतातहि आता सुर्यफ़ुलासारखे अपारंपारिक पिक दिसते. नदीला बांधारा घातल्यापासुन पाण्याची सोय झालीय, त्यामुळे अनेक पिके घेता येतात. लहनपणी ज्या झाडांच्या कैर्‍या खाल्ल्या, जांभळे खाल्ली ती अजुनहि आहेत. पण आता त्या झाडांखाली धिंगाणा घालायचे वय नाही. मामेबहिणी आता करवंदे, जांभळे आणुन देतात.
शेताच्या बांधावरची बाभळीची झाडे मात्र कमी झालीत. बांधावर लोकानी निलगिरीची झाडे लावलीत.
घराच्या मागे मोठा एस्टी स्टॅंड झालाय. पुर्वीपेक्षा गाड्यांची वाहतुक खुपच वाढलीय. पण तरी त्याचा तसा त्रास नाही.

मोठी मामी सुगरण आहे. मी गेल्यावर हे करु का ते करु, असे विचारत राहते. मी मात्र भाकरीचाच आग्रह धरतो. आजीच्या माघारी घरचे कर्तेपद तिच्याकडे आलेय, आणि ती ते तितक्याच कुशलतेने संभाळते. माझी सगळीच मामेभावंडे तिलाच आई म्हणतात.

बेकरी अजुनहि सुरळित सुरु आहे. आता पुढच्या पिढीने तिची जबाबदारी घेतलीय. पिठ मळायचे मशीन आलेय. आता बटराना तेवढी मागणी नाही. शहरी पद्धतीचे स्लाईस ब्रेड केले जातात. माझ्या मावसभावाने, तिथेच या कलेचे प्राथमिक धडे घेतले आणि सध्या तो पंचतारांकित शेफ झालाय. परदेशी असतो.

मलकापुरची बाजारपेठ अजुनहि दिमाखात उभी आहे. पुर्वीसारखाच बाजार भरतो. त्यात आता आधुनिक वस्तु म्हणजे एम्पीथ्री वैगरे विकायला असतात. पण लहानपणीहि मला बाजाराचे आकर्षण नव्हते, आताहि नाही.

पुर्वी आमच्या मुक्कामात, एकदा सगळ्याना घेऊन महादेवखडीवर जायचा प्रोग्रॅम असे. त्यावेळी कुंभार आळीतुन वर जायचा रस्ता होता. तशी ती टेकडी फार उंच नाही, पण वरती भन्नाट वारा असतो, आणि आजुबाजुचा परिसर छान दिसतो. पुर्वी ती बोडकि होती, आता तिच्यावर निलगिरीची भरपुर झाडे आहेत.
मलकापुरात घरीच जेवणाखाण्याचे लाड होत असल्याने, कधी हॉटेलमधे जायचा प्रसंगच आला नाही. पण पुर्वीपासुन तिथे, बालुशाहि, म्हैसुर, कटवडा ( म्हणजे मिसळीच्या कटातला बटाटावडा ) वैगरे प्रकार लोकप्रिय आहेत.
मोठा मामा सरपंच होता, त्यामुळे त्याचा थोडाफार राजकारणात शिरकाव झालाय. तरिही माझ्यासाठी तो अजुन लाड करणारा मामाच आहे. ( अजुनहि तो बाहेरुन आलाय कि माझ्यासाठी पिशवीत काय आहे, याची उत्सुकता असते, फक्त लहानपणासारखी धावत जाऊन मी त्याच्या हातातली पिशवि घेत नाही. ) आता लहान मामेभावंडांसाठी खाऊ न्यायची जबाबदारी मी घेतलीय.

माझ्या आजी आबाना ज्यानी बघितलेय, त्याना त्यांच्यामधे विठोबा रखुमाईचा भास होत असे. दोघेहि दिर्घायुष्य भोगुन, तृप्त मनाने गेले. जाईपर्यंत आपला भार कुणावर पडु दिला नाही त्यानी, कि कसली सेवा करुन घेतली नाही.
आता ते फोटोत आहेत. पण त्यांची प्रेमळ नजर घरावरुन आणि आम्हा सगळ्यांवरुन अजुनहि फिरत असते.





Sunday, March 25, 2007 - 4:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओळख, जुन्याच सोबत्याच्या, नव्या मोहोराची.

mohor


Sunday, March 25, 2007 - 4:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झाडे खरीच सुदैवी म्हणायची, आपल्यासारखी त्या हवे ते मिळवण्यासाठी जगभर वणवण करावी लागत नाही. एका जागी ठाम राहुन, त्याना सर्व काहि मिळवता येते.
मला ती नेहमीच आकर्षित करत आलेली आहेत, खरे तर त्यानी माझी साथ कधीच सोडली नाही. आपले काहि हात माझ्या दिशेने तर काहि हात आभाळाकडे फैलावत राहिली. मी मुद्दामच हात पसरत राहिली असे लिहिले नाही. कारण झाडे कधीच याचना करत नाहीत. ती कायम देत असतात. मलाहि देतच राहिली, ओंजळीत न मावेल ईतके दान देत राहिली, आणि आभाळाकडे फैलावलेल्या हातातुन हा संदेश देत राहिली, कि कधीकाळी आभाळ कोसळलेच, तर ते आम्ही वरच्यावर झेलु.

तर अश्या काहि सोयर्‍यांची ओळख सगळ्याना करुन द्यावी म्हणतोय.

भारतातल्या एखाद्या खेडेगावात तूम्ही बाळपणीचे काहि दिवस घालवले असतील, तर एखादे आंब्याचे झाड, नक्कीच तुमच्या मनात घर करुन राहिले असेल. कलमी वैगरे नसणारच ते, कारण कलमी आंबे कसे कायम रखवालदाराच्या नजरबंदीत असतात. हे झाड असणार ते मुक्त वाढलेले. असंख्य आंब्यानी भरुन गेलेले. आणि तूम्ही मारलेले दगड झेलुन तुमच्या हातात कैर्‍या, आंबे असे दान देणारे.
असेच एक झाड, आजहि माझ्या खिडकी बाहेर मला खुणावत असते. त्यातले काहि आंबे माझ्या आमटी भाजीची सोय करणार आहेत. पण याला तशी फळावण्याची घाईच झालीय.


kairya

बाकिची मंडळी अजुन मोहोरावरच आहेत.

अलिकडे प्रदुषणयुक्त हवेत, मोहोराचा वास वार्‍यावर स्वार होवुन येणे जरा दुर्मिळच झालेय. आता तर अशी परिस्थिती आहे, कि आंब्याच्या मोहोराचा वास कसा तर, आंबेमोहोर तांदळासारखा, असे सांगावे लागेल.

हापुस आंबा आपला नाही, तो पोर्तुगीजानी आणला, आपल्याकडे, पण भारतभर आंब्याची झाडे आहेत. मुंबईसारख्या ठिकाणी तर देशभरातील आंबे चाखायला मिळतात. माझ्या परदेशी वास्तव्यात मी देशोदेशीचे आंबे खाल्ले. पण देवगड तो देवगड आणि रत्नागिरी तो रत्नागिरीच. तिथल्या कातळावरहि तो छान वाढतो.
हल्ली पावडर वैगरे मारुन रोगट फळ माथी मारले जाते हे खरेय, पण आत्या, मावशीच्या बागेतुन अजुनहि अस्सल, हापुस आवर्जुन पाठवला जातो.
हापुसईतकाच मला गोव्याचा मानकुराद आवडतो. त्याचा रंग केशरी नसुन पिवळा असतो. कोयीला काटे असतात. पण गर मात्र मऊमुलायम. त्याच्या आणि हापुसच्या चवीची तुलना करणे म्हणजे, लता आणि आशाच्या गायनाची तुलना करण्या ईतके निरर्थक आहे. पण हा आंबा गोव्याबाहेर फारसा मिळत नाही.
पण हे दोन्ही आंबे तसे महागच. प्रत्येकवेळी कापताना, चांगला निघेल कि नाही, याची धाकधुक असते. त्या मानाने बाकिचे आंबे मात्र नखरे करत नाहीत. एखादा चिकाळ निघेल तर एखादा आंबट, तेहि आपल्या कुळाला जागुन. पण क्वचितच खराब निघतात.

आपल्याकडे अगदी बाळकैर्‍यापासुन आपण वापरतो. खारवलेला आंबा, असला कि पेजेला आणखी कश्याची जोड लागत नाही. कैरी डाळ, मसुर, कच्ची कैरी सरबत, असे अनेक प्रकार करतात. लोणच्यात तर तो हवाच. अगदी ताजे असो वा मुरवलेले, लोणचे ते लोणचे. आणि चैत्रातले पन्हे आणि आंबा डाळ ! त्याशिवाय आपला गुढीपाडवा साजराच झाल्यासारखा वाटत नाही.
आंबा तसा अगदी आता वर्षभर या ना त्या रुपाने मिळत असला तरी मोसमात ताजे आंबे भरपुर खाल्ले कि आपल्या वर्षभराच्या ब जीवनसत्वाची सोय होते.

आंब्याचा वृक्ष खराच देखणा. त्याचा विस्तारच मनाला मोहवतो. शिवाय त्याची खासियत म्हणजे, तो एकदम सगळी पाने गाळत नाही. वर्षभर थोडीथोडी पाने गाळुन तो पाण्याचे उत्तम नियोजन करतो. यामुळे ऐन उन्हाळ्यात, तो आपला पर्णभार राखुन असतो.
त्यामूळे, सहज सख्या एकटाच येई सांजवेळी, पाहिन मी वाट तुझी त्या आम्रतरुखाली, असे भावगीत सहज लिहिले जाते. आणि हा मोहोर आणि वसंत ऋतु, याची पुर्वापार सांगड घातली गेलीय. कोयलिया बोले अंबवा डालपर, अशी बंदीश रागदारी संगीतात असणारच.
तसे आंब्याच्या झाडावर पक्ष्याना खाण्यासारखे काहि नसते, तरिही घरटे बांधण्यासाठी त्यांचे हे आवडते झाड. कावळा हमखास घरटे बांधणार यावर. आणि या दिवसापर्यंत कोकिळभाऊंचा स्वरहि पक्का झालेला असतो, आणि कोकिळेचा तगदा संपलेला असतो. कावळे दांपत्याने कोकिळ जोडप्याची पाठ धरलेली असते, या झाडाच्या आसपासच.
ईतकी युगं असा त्रास सहन करुनही, कोकिळ दांपत्य मात्र अजुनहि घरटे बांधायला शिकलेले नाही.

खरे तर झाडांचे माणसाशी काही देणेघेणे नसते. त्यांची फळे फुले असतात, ते त्यांचे परागीभवन करणार्‍या किटकाना, पक्ष्याना आणि प्राण्याना आकर्षित करण्यासाठी. ( मानवाने हस्तक्षेप करुन, त्यांच्या आयुष्यात प्रचंड ढवळाढवळ केलीय, ते वेगळे ) आंब्याच्या कोवळ्या पानाची कढी करतात, कैर्‍यांचे अनेक प्रकार करतो, पण आफ़्रिकेत मात्र कुठलेहि कच्चे फळ खाल्ले जात नाही. झाडावर पुर्ण पक्व झालेले फळच खाल्ले जाते. आंब्याच्या बाबतीत तर पिकलेय कि नाही, हे बघण्याचा मान खुपदा एखाद्या पक्ष्याला मिळतो, आणि त्याची चोच लागलेले फळ, खुपच चवदार लागते.

कलमी आंब्याचे कौतुक फळावण्यापेक्षा न फळण्याचेच जास्त. यावर्षी आंबा नाय हो. गुदस्ता बरां होता, हि रड दरवर्षीचीच. या वर्षीहि अश्या बातम्या येतच आहेत. पण तरिही तुम्हा आम्हा सर्वाना, पोटभर आंबा खायला मिळो, हि सदिच्छा.





Monday, March 26, 2007 - 4:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी ओळख करुन देतो, असा आव आणलाय खरा. पण माझा नक्षा काल एका चिमुकल्या बाळाने, पुरता उतरवला.
असाच फोटो काढण्यासाठी एका अवघड जागी शिरलो होतो, पायाखाली साप वैगरे नाही येत असे बघायला गेलो, तर एक चिमुकला दोस्त खुणावत होता. काका, आमचा पण फ़ोटो काढा की, म्हणु लागला.
आणि मलाहि त्याचा हट्ट पुरवावाच लागला. ओळख ना पाळख, मैत्री जुळुन गेली.
शेवटी ओळख म्हणजे काय हो ? नावगाव माहीत असणं, कूळमूळ माहित असणं, म्हणजे ओळख का ? हे सगळे माहित असणार्‍या मंडळींची ओळख पटली असे आपल्याला म्हणता येईल का ?
हे फुल रानफुल का मुद्दाम लावलेले, ते माहित नाही. एकदा एका बागेत, मी आणि गिर्‍याने, या फुलाचा फ़ोटो काढायचा खुप प्रयत्न केला होता. पण काहि जमले नव्हते तेंव्हा. कालचे हे फुल मात्र अगदी रस्त्याच्या कडेला होते. आत्ता हा फ़ोटो बघताना, त्यातली कलाकुसर बघुन भान विसरायला होतेय. शिवाय रंगहि कसा, आपल्याकडे जरा दुर्मिळ असलेला निळा, जांभळा. तर अशी काहि मंडळी पण तुमच्या भेटीला येतील.


dost


Monday, March 26, 2007 - 4:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

km

हा मोहोर कसला ते ओळखलात ? या दिवसात तूम्ही कोकणातल्या डोंगरदर्‍यात भटकत असाल तर या मोहोराचा मादक मादक गंध, तूम्हाला नक्कीच जाणवला असेल.
खरे तर हि चांदणीफ़ुले, अगदी अर्ध्या नखाच्या आकाराची. रंगही तसा खास म्हणावा असा नाही, आणि हा फ़ोटो बघायच्या आधी, तूम्ही या मोहोराकडे, निरखुन बघितलेही नसेल.

जाऊ द्या, कोडं नाही घालत. हा मोहोर आहे काजुचा. कोकणातले लाडाचे नाव 1d काजी 1d चा.
काजुचे झाडहि तसे आपल्याकडे पोर्तुगीजानीच आणले. आता मात्र ते आपल्याकडे चांगलेच स्थिरावलेय. हि झाडे अनेक वर्षांपासुन डोंगरदर्‍यात उभी आहेत. मुद्दाम म्हणुन लावलेल्या याच्या बागा तश्या तुरळकच. पण हि झाडे असलेली क्षेत्रे, पिढ्यानपिढ्या एखाद्या कुटुंबाच्या मालकीची असतात.

डॉ. डहाणुकर म्हणत असत, कि निसर्गाने आपली कलाकुसरीचे कौशल्य परिपुर्ण झाल्यावरच, सिताफ़ळ, डाळिंब, केळ्याच्या घड अशी फळे निर्माण केली असावीत. सुरवात मात्र चिकुसारख्या ढोबळ आकाराच्या फळापासुन केली असावी. काजुच्या बोंडाला त्या कळासाध्याय म्हणत. बघा ना काय तो मोहक आकार. लाल पिवळ्या रंगाचे बोंड आणि त्याखाली कोंदणात बसवल्यासारखी मोहक आकाराची बी.

काजुचे झाड एरवी तसे खास लक्ष वेधुन घेत नाही. पाने साधीच. आखुड देठाची, टोकाला रुंद होत जाणारी. काजुची झाडेहि कधी सगळी पाने गाळत नाहीत.
पण या झाडाची एक खोड आहे. याच्या फांद्या कायम जमिनीच्या दिशेने झेपावत असतात. पाठीच्या कणाच नसल्यासारख्या. त्यामुळे झाडाचा विस्तार बराच दिसतो. बेळगावला अनेक शेतात हि झाडे दिसतात. पण अशी शेतात पसरु दिली तर शेती कुठे करायची, म्हणुन त्याना चहुबाजुनी, काठ्याकामट्यांचा आधार दिलेला असतो. ( काजु कोकणातच होतो, हा एक गैरसमज. गगनबावडा, बेळगाव ईतकेच नव्हे तर जव्हारलाहि काजुची भरपुर झाडे आहेत. )

काजुचा विस्तारहि तसा विरळच. त्यामुळे सावली तशी दाट नसते. ( झाडाखाली जपुनच शिरा. खुपदा मोठेमोठे डोंगळे असतात ) या मोहोराचा मादक गंध दर्‍याडोंगरात भरुन राहिलेला असतो. मग हळुन बियांच्या कुयर्‍या दिसु लागतात.



चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators