Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 20, 2006

Hitguj » Rangiberangi » Members A-N » dineshvs » Archive through December 20, 2006 « Previous Next »


Monday, October 09, 2006 - 5:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्याच्या मागुन आम्ही शक्य तितक्या झपझप पावलानी चालु लागलो. तिथे एक कासव अंडी घालत होते. ( आता अंडी घालत होते, म्हणजे कासवीण असणार नाही का ? कॉमन सेन्स. ) ती जवळजवळ चार फ़ुट लांब होती. तिने केलेला खळगा बारा फ़ुट व्यासाचा नक्कीच होता. त्या खळग्याच्या काठावर आम्ही बसलो. त्या माणसाने माहिती सांगायला सुरवात केली.
त्याची सिन्सियॉरिटी शब्दाशब्दातुन जाणवत होती. कासवे कुठल्या दिवसात थिथे येतात. ( ऑक्टोबरमधे ) तिच जागा निव्डण्याचे कारण काय ( ऊष्ण व उथळ समुद्र ) एका वेळी किती अंडी घातली जातात. ( दोनशे ते अडिजशे ) किती दिवसानी अंड्यातुन पिल्ले बाहेर येतात, ( साधारणपणे ८ ते १५ दिवसानी, ) कासवे कुठपर्यंत स्थलांतर करतात. ( तिथुन मलेशियापर्यंत ) अशी भरपुर माहिती तो देत होता.
आमचे त्याच्याकडे अर्धवट लक्ष होते कारण आम्ही कासवीणीकडे पुर्ण लक्ष देत होतो. साधारण अर्धा तास अंडी देणे चालले होते. आमच्या अस्तित्वाने तिला काहि फरक पडलेला दिसत नव्हता. शिवाय एकदा चालु झालेली प्रोसेस मधेच थांबवणे, तिच्या हातात नसावे. ( सॉरी पायात, ओके, जे काय असेल त्यात. ) आम्ही तिच्या पाठीवर टकटक करुन बघितले. ( अर्थात त्या अधिकार्‍याच्या परवानगीने. ) हात फ़िरवुन बघितला. आमच्या अंगावर शहारे आले, तिच्या अंगावर आले, का ते कळले नाही.

तिचे काम आटोपल्यावर तिने अंड्यासाठी केलेला खड्डा बुजवला. तो बुजवताना तिच्या पुढील पायाच्या हालचालीने पुढे दुसरा खड्डा तयार झाला आणि प्रत्यक्ष जिथे अंडी घातली होती, ती जागा पुर्वीसारखी सपाट झाली होती. अंड्याना अनेक धोके असतात, तर त्यासाठी घेतलेली हि काळजी. पण याउप्पर कासवीणी फार काळजी करत नाहीत. अंडी आणि पिल्ले केवळ निसर्गनियमानुसार वाढतात. ती कासवीण मागे फिरली आणि हळुहळु पाण्याच्या दिशेने जाऊ लागली. आम्ही पाण्यापर्यंत तिची सोबत केली. ती आता परत ईथे येणार नव्हती. याचे आम्हालाच फार वाईट वाटत होते.

आता परत फ़िरणे भाग होते. आता अंधाराची डोळ्याना चांगलीच सवय झाली होती. ईतरत्रहि कासवीणी अंडी घालत होत्या, पण तिथे जाण्याची परवानगी नव्हती.
आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी परत आलो. हवा सुखकर होती. डास वैगरे नव्हते. सगळ्याना लगेच झोपा लागल्या.
मधेच मला जाग आली. आभाळात बारिकशी चंद्रकोर दिसत होती. सर्व आभाळ चांदण्यानी भरुन गेले होते. खुप दिवसात असे चांदण्याने भरलेले आभाळ बघितले नव्हते. क्षितिजापर्यंत चांदण्याच चांदण्या होत्या. त्यात पडल्या पडल्या परिचीत नक्षत्रे शोधु लागलो. क्षितिजावर अचान्क दोन हिरव्या चांदण्या दिसल्या. थोड्या अंतरावर आणखी एक हिरव्या चांदण्याची जोडी दिसली. चांगल्याच प्रखर होत्या. आणखी काहि जोड्या दिसल्या.
मनात अनेक शंका आल्या. पण मग लक्षात आले कि ते कोल्हे असावेत. आता मला झोप लागणे शक्यच नव्हते. चिकनची हाडे जवळच बांधुन ठेवली होती, त्या वासावर आले असावेत. मग वाटले कि कासवाच्या अंड्यासाठी आल्याची शक्यता जास्त असेल. मधेच त्यातली एखादी जोडी अदृष्य व्हायची. कदाचित ते डोळे फ़िरवत असावेत. शिवाय मी त्यांच्याकडे ईतके डोळे फाडफाडुन बघतोय, तेहि त्याना जाणवले असावे. ते नेमके कोल्हेच होते, का ईतर कुणीतरी, खरेच हे विचार मनात आले, पण अजिबात भिती वाटली नाही.
लांबवर एक उंटाची आकृतीपण दिसली. ओमानमधे उंट दिसणे नित्याचीच बाब म्हणा, पण ते सगळे रानटी उंट असतात. ओमानमधे त्याना पुर्ण संरक्षण असल्याने, मोकाट हिंडतहि असतात. सैरावैरा धावतहि असतात. आता समोरचा प्राणी जर धावत आला, तर आम्ही सगळे त्याच्या पायाखाली नक्कीच आलो असतो. तेवढ्यात आठवले, कि उंटाचे पाय फार मऊ असतात म्हणुन. पण म्हणुन काय, त्याच्या पायाखाली जायची माझी तयारी नव्हती.

अपुर्ण




Tuesday, October 10, 2006 - 5:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ईतक्यात आजुबाजुची माणसे ऊठु लागली. यामधे बायकामुले पण होती. ओमानमधे कसलाच धोका नसल्याने, असे उघड्यावर झोपायला कुणालाच भिती वाटली नव्हती. नुकतेच फटफटायला लागले होते. मीपण सगळ्याना उठवले. लगोलग आवरुन आम्ही समुद्राच्या दिशेने निघालो. सगळेजण तिथेच निघाले होते. डोळ्यासमोर निसर्गाचे एक नाट्य सुरु होणार होते. अतिशय उत्सुकतेने आम्ही तो खेळ सुरु व्हायची वाट बघत बसलो.
जरा दिसु लागल्यावर, तो खेळ सुरु झाला. आधी घातलेल्या अंड्यातुन छोटी छोटी पिल्ले बाहेर पडु लागली होती. अगदी जन्मताच त्यांच्या जीवनसंघर्षाला सुरवात होत होती.
निळसर करड्या रंगाची, जेमेतेम चारपाच सेंटिमीटर लांबीची हि पिल्ले, समुद्राच्या दिशेने कुठल्यातरी अनामिक ओढीने जात होती. पदोपदी त्यांच्या जीवाला धोका होता. समुद्रपक्षी डोक्यावर घिरट्या घालत होते. खाली माणसांची गर्दी बघुन, ते खाली उतरत नव्हते. त्यामुळे आजच्यापुरता तरी तो धोका टळला होता. आजच्यापुरता म्हणायचे कारण म्हणजे, सुट्टी होती म्हणुन आम्ही सर्व ईथे जमलो होतो. एरवी ते पक्षी त्या पिल्लाना उचलतच असतील. कोल्हेहि असणारच. ( खरे तर त्याबद्दल मला हळवे व्हायचे काहि कारण नाहि. हा निसर्गनियमच आहे. जन्मलेल्या हजारो पिल्लांपैकी, अगदी मोजकीच जीवनसंघर्षात यशस्वी होतात. पक्ष्यांचेहि ते अन्नच असते. )

हळु हळु सर्व किनारा पिल्लानी भरुन गेला. आम्ही पण जपुन पावले टाकत पुढे सरकलो. पायाजवळच रेतीत हालचाल व्हायची आणि एखादे पिल्लु वर यायचे. व्हीक्टरच्या तर तळपायालाच गुदगुदल्या झाल्या. त्याने पाय उचलला तर त्याखालुन पिल्लु बाहेर आले.

हि पिल्ले रेतीतुन वर आल्याबरोबर भराभर चालु पडत. ईतरांचा घास होण्यापुर्वी जर ती समुद्रात पोहोचली तर ती जगण्याची शक्यता जास्त. अर्थात समुद्रातहि धोके होतेच. आमच्या डोळ्यादेखत एक पिल्लु समुद्राच्या विरुद्ध दिशेने बाहेर पडले. मी त्याला उचलले आणि समुद्राच्या पाण्यात सोडुन आलो. ( दिशा फिरवली असती तरी कासवाच्या चालीने, त्याला पोहोचायला वेळ लागलाच असता. ) मग आम्ही सगळ्यानी हा उद्योग सुरु केला. लहानपणीच्या बटाटा शर्यतीची आठवण झाली. जे दिसेल ते पिल्लु उचलुन आम्ही पाण्यात सोडु लागलो. आमचे बघुन ईतरानीही हे समाजकार्य सुरु केले.

तिथे आलेल्या एका युरोपीयन माणसाने, एक बादली पैदा केली. त्यात समुद्राचे पाणी भरुन आणले. आणि आम्हाला म्हणाला पिल्ले या बादलीत टाका, मग सगळी एकदम पाण्यात सोडु. बघताबघता बादली पिल्लानी भरुन गेली. तो ती पाण्यात सोडुन आला. परत आम्ही त्याची बादली भरुन दिली. तो मात्र ती सरळ गाडीत घालुन निघुन गेला. त्याच्या हेतुबद्दल शंका घेण्यास भरपुर वाव होता. आम्ही चरफडण्याशिवाय काहिच करु शकत नव्हतो. मस्कतच्या बाजारात अधिकृतरित्या कासवांची जिवंत पिल्ले पाळण्यासाठी प्रत्येकी दोन रियाल म्हणजे साधारण पाच यु एस डॉलर्सना मिळतात. त्या माणसाने नक्कीच असा काहितरी सदुपयोग केला असावा.
जसा सुर्य वर आला, तशी पिल्ले यायचे थांबले. आम्ही परत फ़िरलो. वाटेत मला काहि मेलेली पिल्ले दिसली. पिल्ले म्हणजे नुसतेच सांगाडे होते. समुद्राच्या विरुद्ध दिशेने आलेल्यांची हि गत होती तर. त्यातला एक सांगाडा मी आठवण म्हणुन घेतला.
सगळा कचरा आवरला. बाकिच्या फ़ोर व्हील ड्राईव्ह गाड्या भराभर निघुन गेल्या. आमचं वरातीमागचं घोडं ठेचकाळत निघाले. मागे वळुन बघितले तर सांगण्यासारखा एकहि लॅंडमार्क नव्हता. मेकॅनोज गोल्ड मधे कसा डोंगरांची चित्रे काढलेला नकाशा असतो, तसा काढावा लागला असता.

मी व्हिक्टरला म्हणालो, ” यार ये टर्टल फ़िर ईसी जगह कैसे आते होंगे ?” काल त्या माणसाने आम्हाला असेच सांगितले होते. हि कासवे पार मलेशियापर्यंत भटकतात, पण अंडी घालायला मात्र परत तिथेच येतात. व्हिक्टर विचारात पडला.

वाटेक एक छोटीशी मस्जिद लागली. मस्जिद म्हंटली कि वज्जु करण्यासाठी पाण्याची सोय असणारच. आम्ही तिथे थांबलो. एक छोटीशी विहिर होती. दोरी बादली सगळीच सोय होते. कालपासुन हातापायाला पाणी लागले नव्हते. हात पाय धुवुन घेतले. मग व्हिक्टर मला म्हणाला, ” दिनेशभाई ये जो टर्टल होते है ना, वो ईतने स्लो स्पीडमे जाते है, कि उनको हर एक पत्थर, हर एक चट्टान, हए एक किनारा अच्छी तरह याद रहता होगा. ईसिलिये उनको यहा वापस आनेमे कोई प्रॉब्लेम नही आता होगा. ”
असा विचार फक्त व्हिक्टरच करु जाणे. आम्ही खो खो हसत सुटलो. अश्या ठिकाणाहुन परतीचा प्रवास नेहमीच उदासवाणा होतो, तसाच तोहि झाला.

अपुर्ण

मित्रानो, दिवाळी ऐन तोंडावर आलीय. हितगुजचा भरगच्च दिवाळी अंक येतोय. तिथे लिहायला आणि तो वाचायला सवड हवी ना, म्हणुन काहि दिवस विश्राम घेतोय. अजुन ओमानवर बरेच लिहायचे आहे.
हि दिपावली समस्त मायबोलिकराना आणि त्यांच्या कुटुंबीयाना आनंदाची आणि सुखसमृद्धीची जाओ, अशी शुभेच्छा.

आपलाच,

दिनेश







Tuesday, November 07, 2006 - 3:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यांचे दिवाळी अंक वाचुन झाले असावेत. योग्य त्या प्रतिक्रियाहि दिल्या गेल्या असाव्यात, अशी आशा आहे. आता आपण आणखी एक सहलीसाठी निघु या. हाहि माझा जुना लेख आहे.
सलाम सलालाह
” काशीस जावे नित्य वदावे ” इतक्या असोशीने मी सलालाहला जायच्या ध्यास घेतला होता. पण प्रत्येकवेळी ” सलालाह १,२०० कि. मी. ” हि मस्कतमधली पाटी निराश करायची. इतका दुरचा वाळवंटातला प्रवास, कल्पनेनेच धडकि भरवायचा. पण सलालाहचे आकर्षणहि गप्प बसु देत नव्हते. सलालाह म्हणजे ओमानचे पार दक्षिणेकडचे टोक. मस्कत आणि ईतर मोठी शहरे आहेत ती उत्तरेला. हा सगळा भाग आहे डोंगराळ. मधला सगळा भाग आहे तो वाळवंटाचा. आणि सलालाह आहे हिरवेगार ओअसिस.

मस्कत डोंगराळ असले तरी, आमच्या रोजच्या बघण्यातले आणि त्यामुळेच परिचीत. आपल्याला सर्वच म्हशी सारख्या दिसत असल्या, तरी तबेलावाल्या भैयाला त्या कश्या वेगवेगळ्या ओळखता येतात, तसे आम्हाला इथले डोंगर ओळखता येत. पण तरिही त्या डोंगराळ भागात शक्य तिथे सुलतानसाहेबानी नंदनवन फुलवले आहे. याबद्दल आधी लिहिले आहेच.

मस्कत सलालाह हा रस्ता फ़ार सुंदररित्या राखलेला आहे. पण तो बहुतांशी वाळवंटातुन जातो. ओमान आणि सौदी अरेबियाची सीमा याच भागातुन जाते. ( हि सीमारेषा म्हणजे एक सरळ रेषा आहे. का कुणास ठाऊक, पण सरळसोट सीमा असणारे देश, एकमेकात सीमावाद घालत नसावेत, असे मला उगाचच वाटत असते. ) सलालाहबद्दल आम्ही स्थानिक वृत्तपत्रात नेहमी वाचत असु. तिथला निसर्ग आणि नैसर्गिक चमत्कार. खरिफ़ सोहळा. ( मुळ अरेबिक शब्द खरिफ़ चे आपण खरिप केले, अर्थ तोच. ) सलालाह मी लिहितोय ते त्या शब्दातल्या अरेबिक अक्षरावरुन. ईंग्लिश स्पेलिंगमधेहि शेवटी एच आहेच. पण उच्चारात मात्र शेवटचा ह बराच क्षीण आहे. ( हा जो ह आहे ना, तो आपल्या वर्णमालेत जरासा फटकुन आहे. म्हणजे त्याचा उच्चार करण्यासाठी ओठ, दात, टाळु यापैकी कश्याचाच वापर करावा लागत नाही. याचा उच्चार गळ्यातुन होतो. त्यामुळेच त्याचा ईतर कुठल्याहि व्यंजनासोबत संयोग सहज म्हणजे जोडाक्षर न वापरता होतो. जसे ब अधिक ह म्हणजे भ, वैगरे. अरेबिक मधे अशी शेवटचा ह क्षीण असणारी बरीच गवे आहेत. मराठीत शेवटी ह असणारे शब्द फार कमी आहेत, जसे तह, दाह वैगरे. असो माझी गाडी भरकटायला लागली. )

शेवटी एकदाचे जमवलेच आम्ही. कलाकार नेहमीचेच यशस्वी, म्हणजे व्हीकटर, मोंगिया आणि मी. पण यावेळी काहि पाहुणे कलाकार जमवले होते. एकंदर १४ जण जमलो. बायकाहि होत्या. ८ महिन्यांची एक गोड छोकरी होती, ती साडेचौदावी.

१,२०० कि. मी. म्हणजे विश्रांति धरुन बारा तासाचा प्रवास होता. ( तिथल्या हिशोबाने ) त्यासाठी मोंगियासारखे कसबी ड्रायव्हर्स तर हवे होतेच, शिवाय सक्काळी सक्काळी म्हणजे अगदी भल्या पहाटे निघणे आवश्यक होते. शक्यतोवर प्रवास दिवसा उजेडी करायचा असे ठरले, कारण या रस्त्यावर ड्रायव्हरला डुलकी लागणे सहज शक्य आहे. ( रस्त्याबद्दल लिहितोच. )

ओमानच्या नॅशनल डेच्या सुट्टीत हा बेत आखला होता. सुट्टी चांगली सलग चार दिवस होती. आमच्याबरोबर श्री व सौ मेनन येणार होते. ते आम्हा सगळ्याना सिनियर. त्याचे जरा दडपण आले होते खरे, पण अगदी भेट झाल्याझाल्याच ते दडपण गायब झाले.

सकाळी लवकर निघायचे असल्याने, यावेळी कॅटरिंगची जबाबदारी माझ्यावर नव्हती. तरिही ब्रेकफ़ास्टची जबाबदारी मी आपणहुन घेतली. पहाटे पाच वाजता सहाजण माझ्या घरी जमले. चहा वैगरे आटपुन आम्ही २० मिनिटात निघालो. श्री मेनन यांची नवी कोरी लिमिटेड एडिशन टोयोटा यावेळी आम्हाला मिळाली होती. ती चालवायची जबाबदारी मोंगियावर होती. आणि त्याला झोपु न देण्याची जबाबदारी माझ्यावर.

म्हणजे मला त्याच्याशी अखंड गप्पा मारायच्या होत्या. बोलुन चालुन तो सरदार. त्याला समजेपर्यंत जोक सांगावा लागतो. तसेच त्याला ज्या शंका येतील, त्याचे निरसन करावे लागते. म्हणजे तुम्हाला जो जोक सांगायला मला अर्धा मिनिट लागेल, तोच जोक त्याला सांगायला पाच मिनिटे लागतील. ( माझ्या कल्पनेप्रमाणे मायबोलिवर सरदार नसावेत. ) शिवाय तो जोक त्याला हसण्याजोगा वाटेलच, याची अजिबात खात्री देता येत नाही.

अपुर्ण.




Wednesday, November 08, 2006 - 3:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एखादे उदाहरणच द्यावे लागेल
मी : मोंगियाजी आपको मालुम है, कि एक सरदारको घंटोतक कैसे बिझी रख्खा जा सकता है ?
तो : नही आप बताओ.
मी : एक कोरा कागज लेना है.
तो : और
मी : उस कागजके दोनो तरफ कुछ लिखना है.
तो : क्या लिखना है जी ?
मी : अरे भाई कुछभी. उसके कोई मायने नही है.
तो : और उसके बाद ?
मी : उस कागजके के नीचे दोनो तरफ लिखना है, P.T.O.
तो : मतलब ?
मी : अरे यार, P.T.O. का मतलब है, Please Turn Over
तो : और उसके बाद ?
मी : वो कागज एक सरदारके हाथमे थमा देना है.
तो : वो क्या करेगा ?
मी : अरे यार वो पढेगा ना.
तो : कौनसी भाषामे लिखोगे आप ?
मी : असे कौनसीभी. मुझे गुरुमुखी सिखादो तो उसमे लिखु.
तो : अच्छा तो वो पढेगा. फिर पन्ना पलटेगा. फिर पन्ना पलटेगा. लेकिन ऐसा कितनी बार करेगा वो ?
मी : वो आप जानो.
तो : आठदस बार बार पलटनेके बाद तो उसको पता चलेगा ना ?
मी : मुमकिन है और नही भी.
तो : दिनेशभाई मुझे एक आयडिया है, अगर आप उस कागाज्पर एक गाना लिख दो, तो पढते पढते याद हो जायेगा.
मी : हां भाई, आयडिया बहुत अच्छा है.

बघितलत ? वेळ मजेत गेला कि नाही. अस्सेच तो माझ्या सगळ्या जोक्सचे तीन तेरा ( सॉरी, बारा ) वाजवायचा. तरीपण मित्र म्हणुन जीव लावणारा आहे तो.
परत नेहमीचा ५० / ६० किलोमीटर्सचा टप्पा आमच्या नेहमीच्या पाहण्यातला, त्यामुळे तो सहज पार पडला. नुकतेच उजाडु लागले होते. हिवाळा असल्याने सुर्योदय जरा उशीरा होत होता. एरवी सुर्य महाराज अगदी पहाटेलाच ड्युटीवर हजर असतात.

तुरळक दिसणारी घरेहि आता दिसेनाशी झाली होती. क्षितिजापर्यंत जाणारा सरळसोट रस्ता. आणि नजर पोहोचेल तिथपर्यंत पांढरी वाळु. नावालासुद्धा हिरवे झुडुप नाही. एखादे खुरटलेले रोपटे दिसले तर दिसले.

प्रत्येक दहा किलोमीटर्सवर कचर्‍याचा डब्बा होता. आणि ते सगळे डब्बे रिकामे होते, ओसंडुन वहात नव्हते. अर्थातच रस्त्यावर नावालादेखील कचरा नव्हता. भारताबाहेर कुठेहि जागा, हि स्वच्छता डोळ्यात भरते.

आम्ही सर्वात पुढे होतो. मागेपुढे वाहने दिसत नव्हती. मोंगियाला मी और तेज म्हणुन चिडवत होतो. मला सौ. मेनननी पण दुजोरा दिला, त्या म्हणाल्या, ” देखे तो कैसा लगता हे, २०० के उपर जाके. ” गंम्मत म्हणुन आम्ही २२० पर्यंत गेलो. रस्ता इतका सुंदर कि, त्या वेगालाहि गाडी अजिबात थरथरत नव्हती. अगदी बाटलीतुन पाणी ओतुन बघितले. आता मला मेनन पतिपत्नींशी बोलायला चांगलाच मोकळेपणा आला.

गाडीसमोर बघताना कुठलाच दृष्यबदल होत नव्हता. ( म्हणजे पळती झाडे पाहु या, असे काहि नव्हते. ) वाळवंटातील मृगजळ मात्र चांगलाच चकवा देत होते. दुरवरुन पाण्याचा लोंढा गाडीकडे वहात येतोय, असा सतत भास होत होता. या जगात फक्त आपणच उरलो आहोत, किंवा आपला प्रवास एखाद्या अंतराळयानातुन चालला आहे, असे वाटत होते. एकमेकांशी सतत गप्पा मारणे, हि मानसिक गरज होवुन बसली होती. ” हम दिल दे चुके सनम ” मधे अगदी पहिल्या लगोरीच्या गाण्याच्या आधी काहि अशी छान दृषे टिपली आहेत, त्याची आठवण आली. आम्ही फक्त आठवणच काढु शकत होतो, कारण कितीहि ईच्छा केली तरी ऐश्वर्या काहि तिथे येणार नव्हती.

त्या वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा, म्हणुन गाडी थांबवली. पाय ऊतार झालो. गाडीपासुन फार दुरवर जाववत नव्हते. तिथे उभे राहणे हाच एक सुन्न करणारा अनुभव होता. हिवाळा असल्याने सुर्य तितकासा दाहक नव्हता. आसमंतात अपारदर्शकता भरुन राहिली होती. काळ थबकला आहे अशी भावना होत होती. हवा गरमहि नव्हती वा थंडहि नव्हती. वारा अजिबात नव्हता. दुरवर मृगजळाचे भास होत असले तरी तिचे काहि नाही, हे समजत होते. एकमेकांपासुन फार दुर जाणे आम्हाला अशक्य झाले. ऊभ्या राहिलेल्या का होईना, पण गाडीत सुरक्षित वाटत होते.

तिन्ही गाड्यात मोबाईल फोन होते. त्यामुळे आम्ही सतत एकमेकांच्या संपर्कात होतो. मधेमधे आम्ही मोबाईलच्या रेंजच्या बाहेर जात होतो, पण तश्या स्पष्ट सुचना देणारे फलक असल्याने, आम्ही एकमेकाना सुचना देत होतो. रस्त्याला फाटे वैगरे फुटत नसल्याने, रस्ता चुकण्याचा प्रश्णच नव्हता. मी ब्रेकफास्ट तिन्ही गाड्यात वाटुन दिला होता. पान्याचीहि सोय होती. पण जेवणासाठी कुठेतरी थांबणे भाग होते.

अपुर्ण.




Thursday, November 09, 2006 - 4:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दुपारी साडेबारापर्यंत आम्ही अर्धा टप्पा पार पाडला होता. तिथे एक छोटेसे गाव लागले. मलबारी हॉटेल होते. सगळ्या गाड्या तिथेच जेवणासाठी थांबत असाव्यात, कारण संपुर्ण रस्त्यावर दुसरे काहि दिसले नव्हते.
मस्कत शहरात आधी लिहिल्याप्रमाणे भरपुर चॉईस आहे. गुजराथी, मल्याळी, कर्नाटकी, श्रीलंकन, अरेबिक. लेबनीज, चायनीज, पाकिस्तानी अशी अनेक हॉटेल्स आहेत. बलदियाच्या कडक धोरणांमुळे पदार्थांचा दर्जा उत्तमच असतो. ईथे मात्र मलबारी म्हणजे मल्याली जेवण जेवावे लागणार होते.

आणि माझे नेहमीचे तुणतुणे. मी बा शाकाहारी. तिथे मलबारी पराठे, ( उच्चार परवठा ) उपलब्ध होते. हे प्रकरण मला नेहमीच जड जाणारे. मूळात केरळ आणि पराठा याचा अर्था अर्थी काहि संबंध असावा असे मला वाटत नाही. ( नाही म्हणायला केरळमधे पथरी हा भाकरीचा प्रकार केला जातो. पथरी हा पतलीचा अपभ्रंश. नावाप्रमाणेच तांदळाची ऊकड काढुन केलेली भाकरी, खाल्ली होती खरी पण ती एका मित्राच्या घरी, हॉटेलात नाही. ) शिवाय केरळमधे रबराचे उत्पादन होते हे सिद्ध करणारा तो प्रकार. चक्री पराठ्याप्रमाणे लाटत असले तरी, ते चामटच असतात. बरोबर सब्जी असे सर्वसमावेशक नाव असलेला आणि त्या नावाला जागणारा पदार्थ. पण काहितरी पोटात ढकलणे भागच होते. अजुन बराच टप्पा गाठायचा होता.
सर्व चालकाना थोडीफार विश्रांतिची गरज होती. ती त्यानी घेतलीच. आम्ही नव्या जोमाने प्रवासाला लागलो. मागील पानावरुन पुढे चालु, असाच प्रकार असेल असे वाटले होते. पण कादंबरीतील ट्वीस्टप्रमाणे काहि वेगळी दृष्ये दिसायला लागली.
तुम्ही कधी मिठागरे बघितली आहेत का ? अगदी त्या ढिगांची आठवण व्हावी, अश्या काहि टेकड्या दिसु लागल्या. पण त्या वाळुच्या असल्याने एका जागी स्वस्थ बसणार्‍या नव्हत्या. रस्त्यावरच्या वाहतुकीतुन वाट मिळाल्यास त्या रस्ता ओलांडणार होत्या. त्यासाठीच त्या जणु दबा धरुन बसल्या होत्या. रस्त्यावर प्रचंड अजगराप्रमाणे दिसणारे वाळुचे पट्टे पसरलेले होते. ते हलतहि होते. असा कणाकणाने त्या टेकड्यांचा प्रवास चालला होता. तिथे गाडी जपुन चालवावी लागत होती. आम्ही मागच्या गाड्याना तश्या सुचना दिल्या. पण तोपर्यंत ते पट्टे गायब झालेले होते. मधेच कधीतरी एखाद्या एअर स्ट्रीपकडे जाणारा रस्ता दिसत होता. दुरवर एखादी तेलविहिर दिसु लागली.
समोरुन तुरळक वाहतुक सुरु झाली होती. समोरुन येणारा एखादा ट्रक वा ट्रेलर, वेगवेगळे दृष्टिभ्रम निर्माण करत होता. चढ उतार नसल्याने आधी दुरवर एक काळा हलता ठिपका दिसायचा. मग त्याची मृगजळामुळे काळी पोकळ चौकट तयार व्हायची. तिचा आकार वाढत जायचा. खुप जवळ आल्याशिवाय ते काय आहे ते कळत नव्हते. पण समोरुन येणारा आवर्जुन हेडलाईट्स्ने ग्रीट करत होता. ( ओमानमधे हि प्रथा आवर्जुन पाळली जाते. )
काहि ऊंटहि दिसु लागले. या परिसरात त्याना काय खायला मिळणार होते, ते त्यानाच माहित. सौ मेनन म्हणाल्या, ते अलिबाबाचा खजिना शोधताहेत. खरोखर असे एखादे मिशन असल्याशिवाय. कुणीहि त्या ठिकाणी जाणार नाही. ओमानमधे ऊंट हा बे अकलेचे प्रतीक आहे.
आता दुरवर डोंगर दिसु लागले. धोफार परिसर जवळ आला असावा. वाळवंट आम्ही पार केले होते. हे डोंगर आमच्या मस्कतमधल्या डोंगराप्रमाणे बोडके नव्हते. लक्षणीय झाडझाडोरा होता तिथे. फुलोराहि होता. मस्कतमधील मानवनिर्मित बागांमधील फुलोर्‍यापेक्षा ते खुपच वेगळे दृष होते. आम्ही गाडीचा एसी बंद केला आणि खिडक्या उघडुन त्या गंधाला सामोरे गेलो. ईथुन पुढे एसीची गरज नव्हती.
बोरांची झाडेहि बरीच होती. पिवळ्याधम्मक बोरानी नुसती लगडलेली होती ती. मस्कतमधे विलायती चिंचा आणि खजुराची झाडे अशीच बहरतात. भर रस्त्यात मी बिनदिक्कत ती फळे तोडत असे. पण मस्कतमधे बोरांची झाडे अगदी तुरळक आहेत. म्हणुन तिथली झाडे बघुन माझ्या तोंडाला पाणी सुटले. शिवाय ऊंटमंडळीहि मनसोक्त बोरे चरत होती. मी मोंगियाच्या मागे लागलो. सौ. मेननपण मला दुजोरा देऊ लागल्या. पण घाटसदृष्य रस्ता सुरु झाल्याने, गाडी उभी करायला जागा नव्हती. तरी एका ठिकाणी त्याला आम्ही गाडी थांबवायला भागच पाडले. बोराचे झाड जरा उंचावर अवघड जागी होते.
मी वर चढुन गेलो खरा. चार सहा बोरे तोंडातहि टाकली. पण घोर निराशा झाली. बोरे गोड वा आंबट नव्हती, चक्क कडु होती. खालुन सौ मेनन मलाहि दे म्हणाल्या. त्यांच्यासाठी थोडी तोडली. आणि त्यानीहि तोंड पोळुन घेतले. आता फजिती लपवायची कशी ? ये बेर हमारे लिये नही, सिर्फ उंटोंके लिये असे म्हणत, स्वतःची समजुत काढली.
मी असा अवघड कड्यावर चढलेला बघुन, आमच्या मागच्या गाड्याहि थांबल्या. त्याना काय सांगणार ? फोटो निकालनेके लिये ठहरे थे, असे सांगुन वेळ मारुन नेली.

अपुर्ण




Monday, November 13, 2006 - 5:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता सलालाह जवळ येऊ लागले होते. तुरळक वस्ती व घरे दिसु लागली होती. हवेत सुखावह बदल झाला होता. एकंदर बारा तासांचा प्रवास झाला होता.
सलालाहमधे आम्ही तीन बेडरुम्सचा फ़्लॅट बुक केला होता. तिथे असे फ़्लॅट्स सहज उपलब्ध आहेत. किचन वैगरे सगळ्या सोयी असतात. भाडे अगदीच नाममात्र असते.
त्या फ़्लॅटच्या मालकाकडुन आम्ही चावी घेतली व फ़्लॅटवर गेलो. मोंगिया चावी घेऊन सर्वात पुढे होता. तो दार उघडणार तेवढ्यात मागुन व्हिकटर ओरडला, अबे, पहले बेल तो बजा. परत एकदा बिच्चारा मोंगिया, एका प्रॅक्टिकल जोकचा शिकार झाला होता.

नाही म्हंटलं तरी सर्वाना प्रवासाचा शीण आला होता. मी आणि श्री मेनन बाहेर गेलो आणि जेवण घेऊन आलो. भराभर जेवुन आम्ही आडवे झालो. सगळ्यांचा लगेच डोळा लागला. रत्री हवा जरा जास्तच थंड झाली. रात्री कधीतरी सौ मेनन यानी आम्हा सगळ्यांच्या अंगावर ब्लॅंकेट्स पांघरली.
मला माझ्या सवयीप्रमाणे पहाटे पाच वाजताच जाग आली. कुठल्याहि गावी गेलो कि मला पहाटेच उठुन तिथे फेरी मारायला आवडते. भराभर आटपुन, पाऊल न वाजवता. बाहेर पडलो. गाव हळुहळु जागे होत होते. त्यापुर्वीच निसर्ग जागा झाला होता. घराभोवती हौसेने लावलेले देशी गुलाब बहरुन आले होते. अरब जेवणात गुलाबपाण्याला खुप महत्व आहे. तशी मसकतमधेहि परिश्रमपुर्वक फुलवलेली बाग आहेच. त्याचा उल्लेख वर आला आहेच.

फुले तोडायचा मोह कटाक्षाने टाळला. काहि दुकाने नुकतीच उघडु लागली होती. एका ट्रकमधुन फळांचे ट्रे खाली उतरवले जात होते. तिथे लेबनानी संत्री घेतली. ( हि संत्री अगदी आपल्या लिंबाएवढीच असतात. भडक केशरी रंगाची, अगदी पातळ सालीची पण अतिषय सुंदर स्वादाची असतात. हि संत्री पानासकट तोडलेली असतात, त्यामुळे दिसतातहि छान. ) पपयाहि घेतल्या. त्या मात्र सलालाहच्याच होत्या. मस्कतमधे देशोदेशीची वेगवेगळ्या चवीढवीची आणि रंगरुपाची फळे मिळतात. त्यामुळे सलालाहच्या पपया आणि केळी आमच्याकडुन दुर्लक्षित रहात असत. ( मस्कतमधे, मस्कती डाळिंबं मात्र मिळत नाहीत. )
परत आलो तर सगळे उठलेलेच होते. चहाची जबाबदारी मी स्वतःवर घेतली. तिथे चहाचा तसा खटाटोप नसतोच. टी बॅग्जच वापरल्या जातात. मुमताज टी बॅग्ज खुप लोकप्रिय आहेत. त्यात वेलचीच्या स्वादाचे दुध घातले, कि फक्कड चहा तयार होतो.

संत्री टेबलावर रचुन ठेवली. आणि थायलंडमधे बघितलेल्या फ़्रुट कार्व्हींगचा प्रयोग पपईवर करत बसलो. तिच्यावर कोरुन खवले केले. सॅंडविचसाठी आणलेल्या काकडीचे कले वैगरे केले. ते सगळे ईतके साजिरे दिसायला लागले, कि कुणी ते मला कापुच देईना. मीच शेवटी त्याचे तुकडे केले.
फ़्लॅटवर टिव्ही होता, पण तो अजिबात लावायचा नाही, असे सर्वानुमते ठरवले होते. तो फ़्लॅट अगदी मोक्याच्या जागी असल्याने, सगळीकडुन छान दृष्ये दिसत होती.
सगळे आवरुन फ़िरायला बाहेर पडलो. मस्कतपेक्षा गाव बरेच निवांत होते. एके टिकाणी ब्रेकफास्ट केला आणि गावात फिरु लागलो. सगळीकडे केळी, नारळ आणि पपईच्या बागा होत्या. आमच्यापैकी जे केरळीय होते, त्याना आपल्या गावी गेल्यासारखे वाटले.

उमर अल खय्यामची शाखा बघुन मला खुप बरे वाटले. तिथेच दुपारचे जेवण घेतले. आणि परत फ़्लॅट्वर येऊन जरा आराम केला. दुपारचा चहा घेऊन तिथल्या समुद्रावर गेलो.
तिथे एक नैसर्गिक चमत्कार आहे. किनार्‍याजवळच एक भला मोठा सपाट कातळ आहे. त्याच्या मागे प्रचंड ऊभा कडा आहे. त्या कातळावरच्या सपाट जागेत अनेक नैसर्गिक विवरे आहेत. काहि तर अगदी एक मीटर व्यासाची आहेत. सुरक्षिततेसाठी त्यावर जाळ्या लावलेल्या आहेत. त्याहुन जी छोटी आहेत, ती तशीच आहेत. समुद्राच्या प्रत्येक लाटेबरोबर त्या विवरातुन पाण्याचे जोरदार फवारे उडतात.
आम्ही पोहोचलो तेंव्हा भरतीला नुकतीच सुरवात झाली होती. प्रत्येक लाटेसोबत त्या विवरातुन हवेचा क्षीण झोत यायला लागला. हळुहळु त्या झोताचा वेग वाढु लागला. मग आमचे खेळ सुरु झाले.
त्या विवराच्या जालीवर एक प्लॅश्टिकची रिकामी पिशवि बांधुन ठेवली तर त्यातुन फ़र्रफ़र्र असा आवाज यायला लागला. त्यात पेप्सीचा रिकामा कॅन टाकला तर, तो टम्मटम आवाज करत वर येऊन हवेत भिरकावला जायचा. बराचे वेळ आम्ही हा खेळ खेळलो आणि शेवटी त्या उंच कड्याखाली निवांत बसलो. पण प्रत्यक्ष पाण्याचा फवारा उडायला अजुन बराच वेळ होता.
आता हवेचा जोर आणखी वाढु लागला. दिवाळीत एखादा अनार फुसका निघतो, तेंव्हा जसा आवाज येतो तसा आवाज येऊ लागला. आमच्या व्यतिरिक्त फारच थोडी माणसे तिथे होती. काहि पाकिस्तानी माणसे तिथे आली, आणि त्यांच्यापैकी एक त्या जाळीवर जाऊन उभा राहिला आणि त्याला काहि कळायच्या आतच खालुन जोरदार फवारा आला. त्याची अवस्था फारच दयनीय होवुन गेली.
प्र्त्येक लाटेबरोबर त्या विवरातुन पाण्याचे फवारे उडु लागले. काहि काहि वेळा तर दहाबारा फ़ुट उंच पाणी उडायचे. खाली बसल्यामुळे समुद्र दिसत नव्हता आणि ते फवारे जरा जास्तच गुढ वाटु लागले. कितीहि बघितले तरी समाधान होत नव्हते. जरा अंधार पडु लागल्यावर निघालो. परतपरत मागे वळुन बघत होतो.

अपुर्ण.




Tuesday, November 14, 2006 - 4:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्ही बसलो होतो त्याच्या मागे एक प्रचंड उभा कडा होता आणि त्यावर काहि उंट दिसत होते. तिथे जायचे का, असे नुसते म्हणायचा अवकाश, सगळे एका पायावर तयार झाले. ( होतील नाहितर काय, पायी थोडेच जायचे होते. )

तो प्रचंड घाट आम्ही चढायला सुरवात केली. रस्ता नुकताच केलेला दिसत होता. आपल्याकडे बहुतांशी घाटात असते तशी हिरवाई वैगरे अजिबात नव्हती. निव्वळ कातळातुन रस्ता काढला होता. माझ्या आयुष्यातल्या, अविसमरणीय प्रवासात मी त्या रस्त्याची गणना करीन. अर्ध्या पाऊण तासानंतर एक सपाटी लागली. तिथे खास मोकळी जागा ठेवली होती. संरक्षक कठडा होता. ( ओमानमधे अशी रसिकता, अनेक वेळा दाखवलेली होती. ) गाड्या पार्क करुन आम्ही त्या ठिकाणी धाव घेतली.
तिथले दृष्य काय वर्णन करु महाराजा ? अगदी समुद्राजवळ तो कडा होता. नजर पोहोचेल तिथपर्यंत अथांग सागर होता. खरेतर सागराचा अथांगपणा म्हणजे काय ते तिथे उभे राहिल्यावर कळत होते. तो कडा जरा पुढे झुकलेला असल्याने, खाली बघवत नव्हते. तरी मी गुडघ्यावर बसुन खालचे फवारे दिसताहेत का ते बघितले, पण नजर तिथपर्यंत पोहोचु शकत नव्हती. भन्नाट वारा वहात होता. समुद्रपक्षी नजरेच्या खाली विहरत होते. आणि गंम्मत म्हणजे खाली किनार्‍यावरुन अस्ताला जाताना दिसलेला सुर्य, ईथुन बराच वर दिसत होता. आपल्याला डोळे आहेत याचा अभिमान वाटला. स्वतःचाच हेवा वाटला.
मी सहज मागे वळुन बघितले तर वेगळाच नजारा. तिथल्या कातळावर निवडुंगाचे अनेक प्रकार मजेत डोलत होते. तुम्ही बॉन्झाय प्रकारात नेहमी एक रुंद खोडाचे आणि गुलाबी फुले आलेले झाड बघितले असेल. ( याची फुले साधारण पिवळ्या कण्हेरीच्या आकाराची असतात. पाने पण कण्हेरीसारखीच. ) तशी झाडे तर तिथे ठायीठायी होती. नैसर्गिक बॉन्झायच होते ते. बुंध्याचा व्यास सहज दोन फ़ुटभर. आणि उंची जेमतेम तीन फ़ुट. पान एकहि नाही, पण झाड मात्र फुलानी भरलेले. स्तंभित होवुन बघतच बसलो. तुमच्या घरात एखादी छोकरी असेल आणि तिच्या हातात मेकपचे सामान मिळाले, तर ती जशी रंगरंगोटी करुन घेईल, तसे ते दृष्य होते. कारण ती उंची, ते वातावरण, त्या झाडाचा एकंदर अवतर या सगळ्यांशी अगदीच विसंगत आशी त्या फुलांची संख्या आणि रुप होते.
कुठली उर्जा, त्या छोकरीला नटवत होती ? कितीतरी वेळ ती फुले निरखत कुरवाळत बसलो होतो. ” हजारो साल नर्गिस अपनी बेबुनियादी पर रोती है, के मुष्कीलसे होता है चमनमें दिदावार पैदा ” हा शेर आठवला. ( नर्गिस नावाचे अतिदुर्मिळ फुल आपल्या अद्वितीय रुपासाठी अश्रु ढाळते, कारण ते जिथे फुलते तिथे जाऊन तिचे सौंदर्य न्याहाळणारा रसिकच त्याहुन दुर्मिळ असतो. )
पण खरेच का नर्गिस अश्रु ढाळत असेल ? त्या फुलाचे फुलणे होते केवळ स्वतःसाठी. त्याहुन रुक्षपणे लिहायचे तर काहि किटकांसाठी. मी तर त्या किटकांच्याहि योग्यतेचा नव्हतो. त्या फुलण्याचे प्रयोजन मी खचितच नव्हतो.
तोडु नयेत हे कळत होतं तरिही काहि फांद्या तोडुन घ्यायचा मोह आवरला नाही, मला.

अपुर्ण




Thursday, November 16, 2006 - 4:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़्लॅटवर येऊन आम्ही बराच वेळ बैठे खेळ खेळत बसलो. गावाच्या नावाच्या भेंड्या. आपल्या मातृभाषेतली गाणी. पर्सनालिटी माईमींग वैगरे. ( या प्रकारात एरिन ब्रोंकोविच पासुन अयातुल्ला खोमेनी पर्यंत सगळी थोर माणसे आमच्या अंगात संचारुन गेली. ) आणखी एक बैठा खेळ म्हणजे एका कोकाकोलाच्या रिकाम्या बाटलीवर काडेपेटीच्या काड्या रचुन त्याचा मनोरा रचणे. यात प्रत्येकाने एक काडी आधीच्या ढिगावर रचायची पण आधी रचलेल्या काड्या पाडायच्या नाहीत. खुप मजा येते हा खेळ खेळायला.
दुसर्‍या दिवशी आणखी एका चमत्काराचा अनुभव घ्यायचा होता म्हणुन सकाळी लवकर निघालो.
तिथुन जवळच अयुबची कबर आहे. ठिकाण जरा उंचावर आहे. अजुनहि त्याचे दैवतीकरण झाले नाही. पण त्यांच्या भक्तीची थोरवी मात्र अजुन सांगितली जाते. त्यांची कबर साधीशीच आहे. पण वेगळेपण आहे ते आकारात. हे अयुबसाहेब फार धिप्पाड असावेत. कबरीच्या आकारावरुन त्यांची उंची नऊ फ़ुट वैगरे असली पाहिजे असे वाटते.
ते अल्लाचे परमभक्त होते. त्याच ठिकाणी म्हणजे उंचावर वास्तव्य करुन होते. म्हातारपणामुळे खाली जाऊन पाणी वैगरे आणणे कठिण जाऊ लागले. अल्लाची करुणा भाकली. अल्लाने सांगितले आहेस तिथे नुसता पाय टेकव, तिथेच पाणी मिळेल. ( थेट शरशय्येवर पडलेल्या भीष्माचार्यांची आठवण झाली कि नाही ?) त्यांच्या पायाचा ठसा पण दाखवतात, तो ठसाहि आकाराने असाच थोराड आहे.
पण आम्हाला अनुभवायचे होते, त्या ठिकाणाची पाटी वैगरे तिथे नाही. अश्यावेळी चौकशी करण्यासाठी व्हिकटरचे मलबारीपण उपयोगाला आले. अयुबचा कबरीपासुन जवळच एक नेहमीसारखा दिसणारा रस्ता आहे.

साधारण १०० मीटर्स लांबीचा हा रस्ता रहदारीचा आहे. अगदी नजरेलाहि जाणवेल असा चढ आहे याला. पण हा चढ फक्त नजरेलाच जाणवतो, गाडीला नाही, गाडीला ईथे काहि वेगळेच दिसते, आणि हाच ईथला चमत्कार आहे.
या क्षेत्रावर गुरुत्वाकर्षणाचा नियम उलटा फिरवला जाता. उताराखाली तुम्ही गाडी उभी केली कि ती आपोआप चढावरुन वर जाते. उतरताना मात्र ती चालवतच आणावी लागते. गाडी उलटी उभी केली तरी ती रिव्हर्समधे वर जाते. आम्ही चार पाच जण गाडीत बसलो होतो तरी हाच अनुभव येतो. मोंगिया तर मांडी घालुन हाताची घडी घालुन ड्रायव्हरच्या सीटवर बसला होता, तरिही तोच अनुभव आला. चारपाचवेळा आम्ही हा अनुभव घेतला. मजा म्हणजे आपण पायीपायी गेलो तर काहिच फरक जाणवत नाही. गाडीबरोबर धावत जाऊन हा अनुभवहि घेतला. ( हो धावत जावे लागावे, ईतक्या वेगात गाडी वर चढुन जाते. )

या प्रकाराबद्दल स्थानिक पेपरमधे बर्‍याचवेळा वाचले होते, पण मन विश्वास ठेवायला तयार नव्हते. पण प्रत्यक्ष अनुभव घेतल्यावर मात्र, आता ते खरेच मानावे लागतेय. ( तुमचाहि विश्वास बसणे कठिण आहे म्हणा, पण संधी मिळाली तर अवश्य जाऊन या. )
जेऊन परत जायच्या आधी सगळ्याना पान खायची ईच्छा झाली.
खुद्द मस्कतमधे पान विकणे, खाणे आणि थुंकणे हे दखलपात्र गुन्हे आहेत. ( मला नाही वाटत आलम दुनियेत आपले सख्खे शेजारी देशांतील नागरिक सोडले तर कुणी पान खाऊन पचापचा थुंकत असेल. )
तरिही मस्कतमधे काहि ठराविक ठिकाणी पान विकत मिळते. त्याचा एक सोहळाच असतो. एखादे जारकर्म करायला गेल्यासारखे चोरुन चोरुन जावे लागते. त्या दुकानदाराने पानाचे विडे कुठेतरी लपवुन ठेवलेले असतात. तुमच्या ओळखीचा असेल तरच. ( म्हणजे आधी तुमचे रंगवलेले थोबाड, सॉरी रंगलेले तोंड बघितलेले असेल तरच ) तुम्हाला तो पान देणार. मग ते तुम्ही गाडीत किंवा घरी नेऊन खायचे. तिथे उभे राहुन खाता येत नाही.
सलालाहमधे पानाचे मळे दिसत असल्याने तिथे तरी पान उघडपणे खाता येईल असे वाटले होते. पण तिथेहि चोरुनच खावे लागले. पान मात्र अगदी ताजे, नुकतेच वेलीवरुन तोडलेले होते.
सलालाहमधे केळी आणि शहाळी मात्र भरपुर खाल्ली. शहाळी अतिशय मधुर चवीची आणि खोबरे तर स्ट्रॉने खरवडुन खावे, ईतके मुलायम. मग दुपारी समुद्रावरुन गाडीने फेरी मारली. एकाबाजुला पांढरा शुभ्र वाळुचा किनारा. त्यामागे पिवळे पांढरे डोंगर आणि दुसर्‍या बाजुला निळाशार समुद्र. अगदी चित्रातल्यासारखा देखावा होता. पण आम्हाला समुद्रात जायचे नव्हते. पण तिथल्या नदीवर जायला मात्र सगळेजण तयार झाले.
एका डोंगराच्या कुशीत हि नदी आहे. तिथे पात्रात काहि कमळे फुललेली दिसली. हि कमलपुष्पं मला नेहमीच मोहात पाडतात. पाणी अगदी नितळ होते. बायकानी भरीस पाडले म्हणुन मी पाण्यात उतरलो. पण नितळ पाण्याने दगा दिला, आधी मांडी एवढेच खोल असेल असे वाटणारे पाणी माझ्या कमरेच्याहि वर आले. पण तसाच पुढे गेलो आणि बरिच कमळे लांब देठासकट खुडुन आणली. त्याच्या देठाच्या माळा करुन एकमेकांच्या गळ्यात घातल्या. नदीचा काठ बांधुन काढल्याने, पाण्यात पाय सोडुन बसलो, बराचवेळ.
येताना समोरच डोंगरात काहि नैसर्गिक गुहा दिसल्या. त्याचे दार वैगरे नीट बांधुन काढले होते. सौ मेनन म्हणाल्या, ” अरे वो देखो पांडवलेणी ” ( त्या बरिच वर्षे नाशकात राहिल्या होत्या, त्यामुळे कुठल्याहि लेण्याना पांडवलेणी म्हणायचे असा त्यांचा समज झाला होता. )

रात्री बराच वेळ गप्पा मारत बसलो होतो. परतीच्या प्रवासात कुणातच उत्साह उरला नव्हता. मी मुद्दाम वाळवंटात गाडी थांबवायला लावली. मुठभर वाळु उचलुन घेतली. कितिही घट्ट धरली तरी, गेल्या दिवसाप्रमाणे हातातुन ती ओघळुन गेली.
आजहि त्या वाळुचा मऊमुलायम स्पर्ष आठवतोय. या लेखाचा निमित्ताने ती सगळी सहल परत घडली. सगळे कसे कालच अनुभवल्यासारखे आठवले.
मनात उगाचच विचार येतोय, त्या वाळुतली आमची पावले, किती काळ टिकली असतील ?




Thursday, November 16, 2006 - 5:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सलालाहचा एक छान फोटो नेटवर मिळाला.
sal

कासवांचे वैगरे फोटो ईथे आहेत.
http://www.hansrossel.com/fotos/fotografie/oman/om_s12.htm



Thursday, November 30, 2006 - 4:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवनागरी लिपीवर माझे नितांत प्रेम आहे. निव्वळ लेखन करणे मला आवडते. छानश्या कागदावर कुणी एखाद्या पुस्तकातली काहि पाने उतरवुन द्यायला सांगितली, तर मी आनंदाने देईन.
माझ्यासारख्याच अक्षरांवर प्रेम करणार्‍या लोकाना, ( अर्थात त्यात तुम्ही आलातच ) सुलेखनाची म्हणले कॅलिग्राफीची आवड असतेच. आजकाल बोरुने कित्ता गिरवणे काहि उरले नाही, फक्त हा वाकप्रचार तेवढा उरलाय. पण त्यातली मजा ज्याना माहित आहे, ते त्याचा आनंद पेंटब्रशनेदेखील घेऊ शकतात. आपली बांगला लिपी देखील सुलेखनासाठी अगदी योग्य आहे तशीच फ़ारसी लिपी देखील. आता त्याच फ़ारसी लिपीची ओळख करुन देतोय.
मी या लिपीचा जाणकार नाही. तसा माझा दावा अजिबात नाही. मला अरेबिक भाषा पुर्णपणे येते असेहि नाही. पण निव्वळ कुतुहल म्हणुन मी जे शिकलो ते तुमच्यापुढे ठेवतोय.
मुस्लीम धर्मात मुर्तीपुजा नसल्याने, त्यांच्यासाठी सुलेखन हा एक भक्तीचा मार्ग आहे. मूळ फारसी लिपी सुलभ करुन वापरली जाते. अरेबिक टायपिंग करताना, हे सुलभीकरण फारच केले जाते.
मूळ फारसी लिपीत असलेली अनेक अक्षरे जसे प, च, ग वैगरे अरेबिक मधे नाहीत. हि अक्षरे गाळुनच हि भाषा अस्तित्वात आहे. तसेच ट, ठ, ड, ढ, ळ अशी कठोर व्यंजनेदेखील नाहीत. पुढेपुढे हे स्पष्ट होत राहिलच.
ही लिपी माझीमीच शिकलो. गुरु करण्यात ना एकलव्याचा आदर्श ठेवला ना दत्तगुरुंचा उदारपणा. गल्फ़मधे राहताना ही लिपी वा भाषा तुम्हाला येणे आवश्यक आहे, असे अजिबात नाही. तिथे बहुतेकजणाना हिंदी येतेच, आणि सर्व व्यवहार हिंदी आणि ईंग्लिशमधेच होतात. तरीपण दुकानाच्या पाट्या वैगरे ईंग्लिश आणि अरेबिक अश्या दोन्ही भाषांत असतात. तिथुनच मी सुरवात केली.
ही लिपी उजवीकडुन डावीकडे लिहिली जाते, याची कल्पना होतीच. ( या पद्धतीवरुन आपण त्यांची टिंगलहि करतो. पण उजव्या हाताने लिहिणार्‍याला हे फारसे कठीण जात नाही. आपल्याला त्याची सवय नसते, इतकेच. )

दुकानाच्या पाट्या वाचताना, प्रथमग्रासे मक्षिकापात झाला तो असा, कि ते लिप्यांतर नसुन भाषांतर होते. म्हणजे ईंग्लिशमधली, Brother Neil Armstrong 19s Saloon हि पाटी मराठीत, निळुभाऊ भुजबळ यांचे केस कापण्याचे दुकान, अशी लिहिली तर कसे वाटेल, तशी गत. अगदी ईतका नाही, तरीपण जवळजवळ असाच प्रकार. तरीपण मी चिकाटी सोडली नाही.
अपुर्ण




Friday, December 01, 2006 - 5:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अक्षरे जरी उजवीकडुन डावीकडे लिहिली जात असली तरी आकडे मात्र आपल्याप्रमाणेच डावीकडुन उजवीकडे लिहिली जातात. अरब व्यापार्‍यानीच आपली गणितपद्धति जगभर नेली असल्याने, त्यानी आपली रीत स्विकारली असावी. शिवाय अधिक वजाबाकिचे वेगळे नियम बनविण्याईतकी त्यांची प्रगति झाली नव्हती. तिथे जाणार्‍या भारतीयाला आकडे शिकावेच लागतात. आणि ते फारसे कठीण नाही. तरिहि त्याच्या काहि गमतीजमती आहेतच, पण त्या स्वतंत्रपणे लिहाव्या लागतील.

इतक्या वर्षांच्या सरावानंतर हे लिखाण तुमच्यापुढे ठेवण्याइतका आत्मविश्वास आला आहे. जे जे आपणासि ठावे, ते ईतरांसी सांगावे, एवढाच हेतु. शहाणे करुन सोडावे सकलजन, असा आवेश मात्र अजिबात नाही.
जरा चिकाटी दाखवलीत तर काहि कठीण नाही. हि लिपी शिकण्याचा एक फायदा म्हणजे, अरेबिक बरोबरच उर्दु, सिंधी, पुश्तु वैगरे भाषा वाचता येतात.
आपल्या वर्णमालेत जसे तार्किक वर्गीकरण झालेय, तसे ईतर कुठल्याच लिपीत नाही. जे जाणत नाहीत, त्यांच्यासाठी आपल्या देवनागरी लिपीवर चार शब्द. जाणकारानी, हे गाळुन पुढे जायला हरकत नाहीत. ( अर्थात वैतागला असाल तर हा BB हि सोडुन जायला हरकत नाही म्हणा. )
आपल्या लिपीत स्वर अ ते अं पर्यंत स्वतंत्र दिले आहेत. क, च, त, ट आणि प हे प्रत्येकी पाच अक्षरांचे गट हे उच्चार पद्धतिवर आधारीत आहेत. उदा. प चा प, फ, ब, भ आणि म हा ओष्ट्य गट. हि अक्षरे उच्चारताना फक्त ओठांचा वापर होतो. दातांची गरज नसते. म्हणुन संवेदनशील ओठ असणारे लहान बाळ, पहिल्यांदा हिच अक्षरे शिकते. ( म्हणुन बाबा, पप्पा हि बाबा लोकांची नावे. ) या प्रत्येक गटातले शेवटचे अक्षर हे अनुस्वाराचे. म्हणजे या गटातल्या ब च्या आधी अनुस्वार आला तर त्याचा उच्चार, म असा करायचा ( जे या गटातले शेवटचे अक्षर आहे. )

या पाच गटानंतर जी अक्षरे येतात ती वैशिष्ठपुर्ण आहेत. या अक्षरांच्या पुर्वी सहसा अनुस्वार येत नाही, आणि आलाच तर त्याचे एकापेक्षा जास्त उच्चार होवु शकतात. उदा, हन्सध्वनि आणि हम्सध्वनि हे दोन्ही उच्चार प्रचलित आहेत. किंवा माला सिन्हाला काहि जण माला सिन्व्हा असेहि म्हणतात. या सुट्या अक्षरातली य आणि र हि खास जोडाक्षराची अक्षरे. यांचा संयोग इतर अनेक अक्षरांशी होतो. ह चा उच्चार तोंडातल्या कुठल्याहि अवयवाने न होता, थेट घश्यातुन होतो. त्याच्या या खासियतीमुळे तो, अनेक अक्षरांशी एकरुप होवुन, नवेच अक्षर जन्माला घालतो. वरील पाच गटातले, दुसरे आणि चौथे अक्षर असे तयार होते. म्हणजे च अधिक ह मिळुन, छ होतो. अश्या अक्षरांचे उच्चार अनेकजणाना कठीण वाटतात. त्याना हे संयोग जमत नाहीत. उदा. तुमच्या एखाद्या दाक्षिणात्य मित्राला, भावनगरचा उच्चार करायला लावा, तो बहावनगर असा करायची शक्यता जास्त आहे.
अपुर्ण




Sunday, December 03, 2006 - 5:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुर्वी ख, असा न जोडता र च्या समोर व, असा लिहिला जायचा. म्हणुन वानखेडे चे अत्र्यानी, वानर वेडे करुन टाकले होते. मराठीतला ल आता पेक्षा वेगळा ( लसणीतला, व लसणीसारखाच ) असायचा.

आपली लिपी बरीच परिपुर्ण असली, तरी इतर भाषांतले काहि उच्चार, देवनागरीत नीट लिहिता येत नाहीत. उदा. तामिळमधे ळ चे काहि वेगळे उच्चार आहेत. अक्षरावरच्या चंद्रकोरीमुळे, ईंग्लिशमधले काहि उच्चार, आपल्याला लिहिता येतात. पण हि चंद्रकोर गुजराथीत नाही, त्यामुळे मॉल चा उच्चार ते मोल असाच करतात, आणि मरिन लाईन्सच्या कुणा, सुंदराबाईला, कायम मान खाली घालायला लावतात.

आपण जसे लिहितो तसेच वाचतो. आपल्या अक्षराना त्यांच्या उच्चारापेक्षा वेगळे नाव नाही, म्हणजे आपल्या भाषेत, स्पेलिंग वैगरे नाहि. ( ईंग्लिशमधली हि गैरसोय आपण सहन करतोच आहोत. आपल्या देवनागरीतल्या, ट ला टिवल्या आणि ब ला बावल्या म्हणालो तर ? ) पण च आणि झ या दोन अक्षरांचे, अनुक्रमे च्य आणि झ्य असे दोन उच्चार आहेत, आणि सवयीने आपण ते बरोबर करतो. उदा चमचा मधले दोन्ही च सारखेच असले तरी ते चाणक्य मधल्या च पेक्षा वेगळे आहेत. ( नाहि म्हणायला जन्म चा उच्चार काहि जण जल्म असा करतात, असे आणखी काहि शब्द आहेत, पण ते उच्चार प्रमाण मानले जात नाहीत. )
शुद्धलेखनाच्या नविन नियमांप्रमाने, अनेक अनुस्वार लिहिले जात नाहीत. आपण ते गृहित धरतो. पण नव्याने भाषा शिकणार्‍याला ते शिकावे लागतीलच. उदा. कसं गं ते माझं सोनं, हे वाक्य आपण कस ग ते माझ सोन, असे लिहितो. पण एखाद्या कॉन्व्हेन्टमधे शिकणार्‍या मुलाला हे वाचायला सांगा. आणि ते तो कसे अनुस्वाराशिवाय वाचतो ते ऐका.
अनुस्वारांचे वेगेवेगळे उच्चार आपण नीट करत नाही उदा. चिंगी आणि चिंटुने खालेल्या चिंचेचेमधे तिन्ही अनुस्वारांचे तीन वेगवेगळे, तरिही नैसर्गिक उच्चार आहेत.
श आणि ष चे वेगेळे उच्चार, ज्याबाबतीत स्व. सुधीर फडके, अत्यंत आग्रही होते. ते आपल्या बोलण्यात जाणवतातच असे नाही. कालांतराने हि अक्षरे केवळ अंकलिपीतच शिल्लक राहतील.
हे मी फक्त मराठीबद्दल लिहिले आहे. आपल्या भाषाभगिनीच्या तर्‍हा आणखी वेगळ्या आहेत. तुमची एखादी गुजराथी मैत्रिण, जर असे म्हणाली, हाडी हारी छे, हाहुए आपी, हाहु हवारे हवारे आवी हती, असे म्हणाली तर ती तरुण तुर्क म्हातारे अर्क, या नाटकातली ह ची भाषा बोलत नसुन, सकाळीच आलेल्या सासुने दिलेल्या छानश्या साडीबद्दल बोलत असते, ते तुम्हाला समजुन घ्यावे लागते. ( सिंधुचे, हिंदु कुणी केले ?) स चा असा गोंधळ घालणारे, हुरतवासी, स आणि श ची पण अदलाबदल करतात. असामी लोक स चा चक्क च करतात. सिटी बस, चिटी बस करतात.
ज आणि य ची पण अदलाबदल केली जाते. यमुना जमुना, यशवंत जसवंत, यशोदा जसोदा, अशी दोन्ही नावे वापरात आहेत. दक्षिणी भाषेत, द चा थ होतो, आपला दहि भात त्यांचा थईरसादम होतो. व चा उच्चार बरेचसे बोंगालीच नव्हे तर हिंदी भाषिकहि, ब असाच करतो. दिल्लीतल्या वसंत विहारचे, हटकुन बसंत बिहार होते. विहंग म्हणजे पक्षी असा अर्थ असलेला शास्त्रीय गायनातला एक राग, बिहाग नावाने ओळखला जातो.
बोलीभाषातेहि हा प्रकार होतोच. बहिणाबाईंच्या ओव्यांचे प्रमाणीकरण झाले नसते तर आपण त्यातल्या साध्या भाषेतल्या प्रतिभेच्या उंच भरार्‍यांच्या आनंदाला आपण मुकले असतो.
माझ्या मायमराठीवर इतकी टिका, करणे मलाहि जीवावर आलेय दोस्तानो. हे म्हणजे उटणे लावुन नहायला घालणार्‍या आईच्या हातातल्या, पाटल्या टोचतात, असे म्हणण्याईतके नतद्रष्टपणाचे आहे. पण हे सगळे लिहायचा हेतु, ईतकाच कि, फ़ातिमामावशीदेखील तितकीच प्रेमळ आहे, फक्त तिच्या हातले गोठ जरा, वेगळ्या घाटाचे आहेत, हे लक्षात ठेवायचे.

अपुर्ण.




Monday, December 04, 2006 - 4:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या तोकड्या ज्ञानामूळे मला शब्दार्थांच्या फार गमतीजमती सांगता येणार नाहीत. समान लिपीमुळे आपल्याला हिंदी आपलीच वाटते. त्यामुळे एका शब्दाला दोन्ही भाषेत एकच अर्थ असावा, असे गृहित धरतो. मराठीत यात्रा या शब्दाला तीर्थाटनाबरोबर, प्रेतयात्रा असाहि अर्थ आहे. पण हा तसा सौम्य भेद. यातायात, चेष्टा आणि अंदाज या शब्दाना अनुक्रमे प्रवास, प्रयत्न आणि अदा असे अर्थ आहेत. इंदुरकर तर या दोन्ही भाषाना वाकवुन, एक वेगळीच बोली तयार करतात. उदा. भैयासाहेबांना हव्या झाल्या म्हणुन, एखादी शरयु, शकुला कढीत घालायला फ़ळ्या काढुन ठेवायला सांगुन राहते, तेंव्हा तिला कढीला फुटलेली पाळ अडवायला लाकडांच्या फळ्यांची अपेक्षा नसुन शेवग्याच्या शेंगा हव्या असतात. हिंदीत त्या सहजनकि फली असतात ना. ( हरदासाची कथा मुळपदावर आली. आता नाव निघालेच आहे म्हणुन लिहितो. सहजन म्हणजे सामान्यजन. त्यांच्या शेंगा त्या शेवग्याच्या शेंगा. त्याची शेती करु नये, ती झाडे बांधावरच किंवा घराजवळ लावावीत, असा संकेत आहे. जीवनसत्वाने समृद्ध अश्या शेंगा, पाने आणि फ़ुले देणार्‍या या झाडाचा व्यवसाय न होता, सर्वसामान्यजनाना त्या पैसे न मोजता मिळाव्यात, हा हेतु. पुढच्यावेळी भाजीवालीकडे जाल, तेव्हा हे तत्वज्ञान ऐकवुन बघा. काय सांगावे, चार शेंगा फुकट मिळतील. )

या लिपीला निष्कारण मुसलमान धर्माशी जोडले गेले आहे. माझे शाखेत जाणारे एक मित्र, माणुस आहेस का मुसलमान, असे विचारायचे.
सिंधि लोक तर हिंदुच आहेत ना, मग ती भाषा देखील या लिपीत लिहिली जाते. उर्दु तर आधी ईथली बोली होती, तिने या लिपीचा वापर नंतर केला. त्यामुळे तुमच्या डोळ्यावर जर असे चष्मे असतील, तर ते दुर करावे लागतील.
मला वाटते नमनाला एवढे तेल पुरे. आता मला तूमच्या सोयीसाठी एक तक्ता तयार करायचा असल्याने, काहि दिवसांचा विराम.
मग पुढे लिहिनच.




Monday, December 18, 2006 - 3:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाण्यातले पाहता, प्रतिबिंब हासणारे
kl


Monday, December 18, 2006 - 3:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आनंदाचे डोहि
klk


Monday, December 18, 2006 - 3:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोबतच्या तक्त्यात तुम्हाला देवनागरी अक्षरासमोर दोन फारसी अक्षरे दिसतील. ईंग्लिशच्या कॅपिटल आणि स्मॉल अक्षरांसारखाच हा प्रकार.
हि लिपी लिहिताना प्रत्येक अक्षराला जोडले जाते. प्रत्येक शब्दातले शेवटचे म्हणजे आपल्या डाव्या हाताकडचे अक्षर, हे मोठे म्हणजे न जोडता लिहायचे असते. अक्षरे अशी एकमेकाना जोडुन लिहिली, कि लेखन भराभर होते, कारण लिहिताना लेखणी उचलुन घ्यावी लागत नाही. आपल्या मोडी लिपीतहि हाच विचार होता. ईंग्लिशमधे पण रनिंग लिपीमागे हाच विचार आहे.
पण या नियमाला काहि अपवाद आहेत, कारण र, द, झ सारखी अक्षरे, त्याच्या स्वरुपामुळे, पुढच्या अक्षराना जोडता येत नाहीत. किंबहुना मी असे म्हणेन, जर ती जोडली, तर त्यात वेगळ्याच अक्षरांचा भास होईल. या अक्षराना आलिफ़, बे, दल अशी नावेहि आहेत, पण त्या नावांची चर्चा ईथे करत नाही.
हि लिपी शिकताना, आपल्याला इंग्लिशपेक्षा देवनागरीची पद्धत वापरावी लागते. आपण इंग्लिश स्पेलिंगमधे, जे अनावश्यक a वापरतो त्याची ईथे गरज नसते. म्हणजे आपण विनायकचे स्पेलिंग Vinayak असे करतो त्या ऐवजी, vinayk असे केले असते, तर जी अक्षरयोजना करु, तसेच ईथे करायचे. कुठलिही नविन लिपी शिकताना, आपल्या डोक्यात रोमन लिपीच असते, त्याची ईथे गरज नाही.

खरा तर हा तक्ता, फारसी अक्षरे लक्षात ठेवायच्या दृष्टिने सोयीचा नाही. अक्षरे लिहिण्याच्या रितीवरुन त्याचे सुलभीकरण करता येते. म्हणजे U सारखा आकार काढुन त्यात एक टिंब दिले कि तो होतो न. दोन दिली कि होतो त आणि तीन दिली कि होतो थ. तसेच त्या U च्या खाली एक टिंब दिले कि तो होतो ब, दोन दिली कि होतो य, आणि तीन दिली कि होतो प. पण हा प अरेबिकमधे वापरात नाही. अनेक प असणार्‍या शब्दांचे अरबी उच्चार वेगळे आहेत, किंवा तो शब्दच वापरात नाही, उदा आपण पॅलेस्टाईन म्हणत असलो तरी ते त्याला फ़िलीस्तान म्हणतात. तपशील या शब्दाचे मुळ अरेबिक रुप, तफ़सील असे आहे. ईजिप्त हा शब्दच अरेबिक मधे नाही, त्या देशाला मिस्र असे म्हणतात.
प, च, ग अशी अक्षरे नसल्यामुळे, नावात हि अक्षरे आली तर कसे लिहायचे हा प्रश्णच असतो. त्यासाठीचे काहि सर्वमान्य पर्याय आहेत ते असे. च च्या उच्चाराला जवळचा म्हणुन, तश असा उच्चार केला जातो. प च्या जागी ब वापरतात. पेप्सी चे बेब्सी होते. ग तसा क्षीण रुपात आहे, पण तो उच्चार घ च्या जास्त जवळचा आहे. आपल्या पद्धतीच्या नावात ग आला तर त्याचा ज केला जातो. उदा गुरुनाथचे जुरुनाथ होते. पण सरावाने ते लोक, बराचसा जवळपास उच्चार करतात. प हे अक्षर उर्दुत आणि बलुची भाषेत मात्र वापरात आहे.

आता हि एक, दोन, तीन टिंबं टाईप करताना व्यवस्थित देता येत असली तरी लिहिताना, दोन टिंबांच्या जागी - अशी रेषा काढतात आणि तीन टिंबाच्या जागी ^ असा आकार काढतात. हि तीन टिंबे असाणारी श आणि थ अशी दोनच अक्षरे आता वापरात आहेत. ह सारखा आकार काढुन त्या खाली तीन टिंबे दिली तर च हे अक्षर होते आणि ते उर्दु आणि बलुची भाषेत वापरात आहेच. क च्या तिरप्या रेघेवर आणखी एक समांतर रेघ काढली कि ग होतो, आणि तो उर्दु मधे आहे.
क चे दोन उच्चार आहेत. ते देवनागरीत नीट दाखवता येणार नाहीत. उदा मस्कतमधला क जरा कठोर आहे, त्या मानाने कोडाक मधले दोन्ही क एकाच प्रकारचे आणि जरा सौम्य आहेत.
तचेहि दोन प्रकार आहेत. मस्कतमधला त जरा क्षीण आहे तर ताहिनी मधला थोडा कठोर आहे. ह चे अनेक प्रकार वापरात आहेत, त्यातले बदलहि असे लिहुन दाखवता येणार नाहीत.
ह च्या मदतीने तयार होणारी अक्षरे मात्र फारशी प्रचारात नाहीत. ख, घ असला तरी भ नाही. तो उर्दुतहि नाही. भ लिहिण्यासाठी ब आणि ह असेच लिहिले जाते.
नेमकी अक्षरे नसल्याने, अनेक भारतीय नावांच्या बट्याबोळ होतो. त्यांच्यासमोर कुणी ते नाव उच्चारले तर ते नीट लक्षात ठेवतात, पण जर छापील नाव वाचले तर घोळ होतो. प्रभाकरचा अबुबाकर तर माझ्या डोळ्यासमोरच झाला, आणि प्रणवचा बुर्नो.

अपुर्ण.




Tuesday, December 19, 2006 - 4:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या लिपीत स्वरांचा तितकासा नेमकेपणाने विचार झालेला मला तरी आढळला नाही. आपल्या देवनागरीप्रमाणे र्हस्व आणि दीर्घ प्रकार तसे थेट नाहीत, पण काही रेघा वाढवुन तसा भास निर्माण केला जातो. काना देणासाठी अक्षराच्या डावीकडे एक उभी रेघ शक्यतो जोडुनच लिहायची. मात्रा आणि वेलांटीसाठी एकच अक्षर वापरतात आणि तेच अक्षर य साठी वापरतात. उकारासाठी उलट्या नऊसारखे एक अक्षर वापरतात पण तेच अक्षर ओ आणि व साठीदेखील वापरतात. ऐ आणि औ साठी आपल्या देवनागरीप्रमाणे वेगळी सोय नाही तर रोमन लिपीप्रमाणेच अनुक्रमे अ आणि ई व अ आणि उ चा वापर करतात.
र्हस्व आणि दीर्घ असे फरक नाहीत असे मी लिहिले आहे खरे पण खरे तर र्हस्व स्वर लिहिलेच जात नाहीत. उच्चारातला फरक, अक्षरांचा जोरकसपणा दाखवण्यासाठी अक्षरांवर काहि खुणा वा काहि अक्षरेच लिहितात, पण टाईप करताना त्या देता येणे शक्यच नसते. त्या आता समजुनच वाचाव्या लागतात. उदा गाडीच्या नंबरप्लेटवर दुबई जे लिहिलेले असते, ते नवखा माणुस म्हणजे ज्याला दुबई हा शब्दच माहीत नाही तो दबी असेच वाचेल.

प, ग आणि च हि अक्षरेच नसल्याने, त्या लोकाना ते उच्चारच जमत नाहीत. पार्किंगला ते बार्किंग म्हणतात आणि चोर ला शोर म्हणतात. ( माझ्या माहितीप्रमाणे फ़्रेंच लोकानाहि च चा उच्चार जमत नाही. स्पेलिंगवरुन जे चेरी वाटते ते उच्चारात शेरी होते. पण ती भाषा माझ्या आवाक्याबाहेरची आहे. उद्या ते पटवर्धन असे लिहुन त्याचा उच्चार लेले असा करतील. नाहीतरी Vignaud चा उच्चार विन्यु असा करतातच ना. )
या लिपीतली काहि अक्षरे राखीव आहेत. परदेशी नावासाठी ती वापरली जात नाहीत. उदा थ, ध अशी काहि अक्षरे आहेत. उदा शंभुनाथ असे नाव असले तरी ते लिहिताना शंबुनात असेच लिहितील. कदाचित मी समजतो त्यापेक्षा त्या अक्षरांचे त्यांचे उच्चार भिन्न असतील.
आपल्याला जाणवणार नाहीत असे अक्षरांचे सुक्ष्म भेद ते करतात. होंडा आणि हयात मधले ह वेगवेगळे आहेत.
अनेक अरेबिक शब्दांच्या आधी तुम्ही अल जोडलेले तुम्ही बघितले असेल. या अल चा उच्चार प्रत्येकवेळी केला जातोच असे नाही. ईंग्लिशमधल्या a, an, the प्रमाणे त्याचे काहि ठोस नियम असल्याचे मला आढळले नाही. त्यांच्या मताप्रमाणे ल हे मानव उच्चारु शकत असलेले पहिले अक्षर. लहान मुल रडताना याच अक्षराचा वापर करते. त्यांच्या मताप्रमाणे लहान बाळाने जगात आलेला पहिला टाहो, हा अल्लाच्या नावाने असतो. ( अक्षरात न लिहिता येणार्‍या आवाजांचे असे रुपांतर नेहमीच वेगळे होते. आपला मराठमोळा भुभु विंग्रजीत woof करतो आणि आपली हम्मा, त्यांच्या भाषेत moo करते, तसेच ) जसा जर्मन भाषेत झ चा आणि रशियन भाषेत ख चा सढळ वापर होतो, तसाच अरेबिकमधे व आणि ल चा होतो.

शब्दांबद्दल मी अधुनमधुन लिहिले आहेच. या अरेबिक भाषेत तारिख, तफसील, हवा, वकालत, वझीर, हैवान, अननस, बताता, ईसम, जुनुन, मिनार, रकम, सराफ़, फ़क्त, जोहारत, मालुम, तामिल, मैदान, शबाब असे अनेक शब्द भेटतात. आपण मराठीत व हे अक्षर जसे शब्द म्हणुन वापरतो, ते त्याच अर्थाने अरेबिकमधे पण येते. काहि शब्दांचे मात्र वेगळे अर्थ आहेत. उदा मिना म्हणजे किनारा, बहार म्हणजे समुद्र, मतार म्हणजे विमानतळ. माफ़ी चा अर्थ नाही असा होतो. उदा अरबी माफ़ी मालुम, म्हणजे अरेबिक येत नाही.

मराठीत जशी क ला प्रश्ण विचारायची खोड आहे तशीच या भाषेतहि आहे. कैफ़ हालक म्हणजे कसा आहेस. फ़लुस केम, म्हणजे पैसे किती ?

काहि विशेषनामांचेहि अरेबिक रुप आहे. खास करुन देशांच्या नावाचे तसे आहे. ईजिप्तला ते मिस्र म्हणतात, याचा उल्लेख वर आलाच आहे. भारताला ते हिंद म्हणतात. जर्मनीला अल्मान तर जपानला याबान म्हणतात. ( त्याला बिचार्‍याला निप्पॉन म्हणुन कुणी हाकच मारत नाही, बहुदा. )
उर्दुचे मी तेवढे निरिक्षण केलेले नाही. पण तिचे सुलभीकरण झालेले माझ्या बघण्यात नाही. शिवाय तिला बरिच अक्षरे वर्ज्य आहेत असेहि नाही. ळ, ण सारखी काहि अक्षरे सोडल्यास बहुतेक अक्षरे आहेतच. भ, थ सारखी काहि अक्षरे ह चा वापर करुन लिहिली जातात. ट, ठ, ड सारखी अक्षरे पण काहि खुणा करुन लिहिली जातात. र्हस्व दीर्घ थोड्या प्रमाणात दाखवता येते. अनुस्वारांच्या जागी जोडाक्षरेच वापरतात. ( आधीच ईतके नुक्ते, त्यात आणखी अनुस्वार कुठे द्यायचे ?) शब्दात पहिले अक्षत स्त किंवा स्ट आले तर मात्रे त्या अक्षराच्या आधी ई लिहिले जाते. या जोडाक्षरांचा स्वतंत्र उच्चारहि त्याना जमत नाही. म्हणुनच बहुदा स्त्री ची ईस्त्री होते आणि स्टेट चे ईस्टेट.

उद्या काहि शब्द लिहुन बघु.




Wednesday, December 20, 2006 - 5:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायबोलिकर हिमांशु ने मला हा तक्ता, नीट करुन दिलाय. आता बराच स्पष्ट दिसतोय.

chart


Wednesday, December 20, 2006 - 5:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ईथे काहि शब्द पेश करतोय.
अगदी वरती आहे ते निळ्या अक्षरात, माझे नाव, दिनेश.
त्याखाली गुलाबी अक्षरात आहे ते कोडाक.
त्याखाली लाल अक्षरात, तुमच्या उजव्या बाजुला ओमान, हस्ताक्षरात किंवा लोगो स्वरुपात, आणि तुमच्या डाव्या बाजुला, सुलभ टाईप केल्याप्रमाणे.
त्याखाली हिरव्या अक्षरात, आहे ते दुबई. ईथे लक्षात घ्या, द चा उकार लुप्त अहे आणि बई, हे बी पासुन वेगळे करण्याच्या खुणा गायब आहेत.
त्याखाली जांभळ्या अक्षरात आहे ते बहार. हा शब्द जरा विस्ताराने समजावुन देतो. वरची आडवी रेघ, सुटी बघितली तर अर्थहिन आहे. त्यामुळे खालचा नुक्ता घेऊनच ते अक्षर ब असे पुर्ण होते. त्याला जोडुन खेकड्याच्या नांगीसारखा आकार आहे तो, आहे ह. त्यावर एक छोटीशी खुण आहे, त्यामुळे ह चा उच्चार हा, असा करायचा, आणि त्यानंतर येणारे शेपुट म्हणजे र.
लोगो मधे अश्या अनेक करामती असतात. बिस्मिल्ला अल रेहमान अल रहीम, मधली सगळी अक्षरे सुटी करण्याचा माझ्या डोळ्याना चाळाच लागला होता.


chart1


Wednesday, December 20, 2006 - 5:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या दुसर्‍या तक्त्यात, आहेत कोका कोल, पेप्सी ( म्हणजेच बेब्सी ) आणि आपली मायबोली.
chart2

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators