Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 07, 2006

Hitguj » Rangiberangi » Members A-N » dineshvs » Archive through October 07, 2006 « Previous Next »


Sunday, August 20, 2006 - 12:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्कतमधे जायच्या आधी मला माझे शाकाहारी असणे त्यागावे लागणार अशी मला भिती घालण्यात आली होती. मी तर अगदी लहानपणापासुनच शाकाहारी होतो. पुढे काहिजणानी खिजवल्याबर एकदा प्रयत्न केला होता खरा, पण ते मला अजिबात पचवता आले नव्हते.

मस्कतमधे मात्र ते चालणार नाही, असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्ष तिथला अनुभव मात्र अगदी विपरित होता. ( त्या काळात नेट वा मायबोलि नसल्याने, माहिती मिळवण्याचा काहि आधारच नव्हता ) माझे सहकारीच तामिळ होते, आणि घराशेजारीच शुद्ध शाकाहारी हॉटेल होते. त्यामुळे मी सुस्कारा टाकला, तरिहि महिनाभरातच मी घरी जेवण शिजवु लागलो.

घराशेजारीच ऑफ़िस असल्याने अक्षरशः दोन मिनिटात आम्ही घरी येत असु. समजा कामानिमित्त बाहेर गेलो असलो तरी घरी यायला लागणारा वेळ १० ते १५ मिनिटेच असायचा.
आमचे कामाचे तास सकाळी आठ ते एक व दुपारी चार ते सात असे होते. मधल्या वेळात दीड ते साडेतीन अशी गाढ झोपायची सवय लागली होती. या वेळी सगळे मस्कतच गाढ झोपलेले असते. आम्हाला तर गजर लावुन उठावे लागे.
तर या अश्या दुपारच्या झोपेमुळे घरी आल्यावर काहितरी करायचा उत्साह असायचा.
घरात जेवण करायची सगळी सोय होती. भांडी वैगरे पण होती. त्यामुळे फक्त किराणा सामान आणायचीच काय ती कमी होती.
( तशी तिथली हॉटेल्स अजिबात वाईट नव्हती, त्यबद्दल स्वतंत्रपणे लिहिनच. ) फ़क्त जसजसा उन्हाळा सुरु झाला तसा, परत बाहेर पडायचा कंटाळा येऊ लागला. घराशेजारचे हॉटेल तामिळ होते, त्यामुळे रोज त्याच त्याच चवीचे रसम सांबार खाऊन कंटाळा आला होता.
गुरवारी आम्हाला अर्धा दिवसच ऑफ़िस असायचे, त्यावेळी सुरवात करायचे ठरवले, आणि आता रोजचे जेवण घरीच बनवु लागलो.
तिथे जेवण बनवणे हा अनेक अर्थाने सुखाचा अनुभव होता. मी तिथे जाईपर्यंततरी भारतात, अपना बाजारचा अपवाद सोडला तर सुपरमार्केट्स नव्हती. तिथे घराच्या आजुबाजुलाच अनेक सुपरमार्केट्स सामानानी खचाखच भरलेली होती.

माझ्या आवडीच्या अनेक भाज्या तिथे अगदी उत्तम प्रतीच्या मिळत असत. दुधाचे अनेक प्रकार, दह्याचे चीजचे अनेक प्रकार, जगभरातील फळफळावळ, अगदी अल्प दरात उपलब्ध होती. खसखस सारख्या एखाद्या घटकाचा अपवाद सोडल्यास, कुठलाहि घटक पदार्थ मिळत नाही. असे नव्हते.

भारतात पदार्थ करताना, आपल्याला घटकांची जुळवाजुळव करावी लागते. सुका मेवा वैगरे जमवताना जरा विचार करावा लागतो. ( काहि पाककृतित तर कुवतीप्रमाणे सुका मेवा घ्या, असा अपमानास्पद उल्लेख असतो. ) तिथे मात्र बहुतेक सगळे सुके मेवे अगदी नाममात्र किमतीत उपलब्ध होते.

आपल्याकडे अनेक वेळा दुध आटवणे वैगरे वेळखाऊ काम असते, तिथे आटवलेले दुधच ( एव्हॅपोरेटेड दुध ) तेहि वेलची आणि आले यांच्या स्वादात इपलब्ध होते.

फ़्रोझन भाज्यांचे अनोखे प्रकार तिथे मिळायचे. आपल्याकडच्या हिरव्या वाटाण्याच्या शेंगा सोलणे हा प्रकारच तिथे नव्हता. सामोसे, स्प्रिंग रोल्स सारखे अनेक पदार्थ तिथे फ़्रोझन रुपात मिळत होते. ( मी हे मुद्दाम लिहितोय कारण त्यावेळी आपल्याकडे यातले काहिच नव्हते. )

आपल्या जेवणात सगळ्यात वेळखाऊ प्रकार म्हणजे चपात्या करणे. तिथे हा प्रश्णहि नव्हता. खरपुस भाजलेले, आणि अखंड पापुद्रा असणारे खबुस ( भाकरीसारखा त्यांचा प्रकार ) सहज उपलब्ध होता. मैदा आणि हवा तर कणीक याहि प्रकारात तो मिळायचा.
त्यामुळे येऊन जाऊन काय करायचे, तर भाजी आणि आमटी. त्यावर वेगवेगळे प्रयोग मी करु लागलो.

आमच्या घरात राईस कुकरहि होता. भारतात सिमरमॅटिक या नावाने हॉकिन्सने ने हे उत्पादन बाजारात आणले होते, पण ते तितकेसे लोकप्रिय झाले नव्हते. तिथे मात्र नुसता भातच नाही तर अनेक प्रकार मी त्यात करायचो. लक्ष द्यायची गरज नसल्याने, तसे ते प्रॉडक्ट मला फार सोयीचे होते. त्यात पदार्थ टाकुन अंघोळ वैगरे उरकता येत असे.
त्यावेळी मायक्रोवेव्हहि नव्याने बाजारात आले होते. तेव्हा हे तंत्र अगदी प्राथमिक अवस्थेत होते. आताप्रमाणे गोल फ़िरणारी प्लेट नसायची आणि ग्रिल करण्याची सोय पण नसायची, तरिही आमच्या लाईफस्टाईलला ते जुळणारे होते. सगळे ताट एकदम वाढुन घेऊन, कपडे बदलेपर्यंत वाफाळलेले जेवण मिळायचे.
तिथल्या पद्धतीप्रमाणे घरात भला मोठा फ़्रिजहि होता, मी तर मुगाच्या खिचडीसकट अनेक प्रकार शुक्रवारी करुन ठेवायचो. रोज लागेल तसे गरम करुन खायचो.

एकाद्या दिवशी कंटाळा आला वा कुठे बाहेर जायचे असले तर हॉटेलमधुन सगळे जेवण पॅक करुन मागवता येत असे. असे पॅक केलेले जेवण ईतक्या क्वांटिटीमधे असायचे कि दोन वेळा जेऊनहि उरायचे.

या सगळ्याचा परिणाम काय झाला सांगु. जाताना माझे वजन ५८ किलो होते ते तिथल्या तीन महिन्यांच्या वास्तव्यानंतर तब्बल ७६ किलो झाले. तीन महिन्यात चक्क १८ किलोनी वाढ. आजहि अंगावर मी ते वजन बाळगुन आहे. ( माझ्याकडे बघताना जाणवत नाही ते सोडा. )

अपुर्ण.




Monday, August 21, 2006 - 4:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्कतमधे खाद्यपदार्थाबाबतचे नियम अतिशय कडक आहेत आणि ते कठोरतेने पाळलेहि जातात. उदा, तळण्यासाठी एकदा वापरलेले तेल, तिथे परत वापरता येत नाही, ते फेकुनच द्यावे लागते. तिथल्या बलदियातर्फे याची सतत तपासणी होत असते. त्यामुळे तिथे रस्त्याच्या बाजुच्या टपरीत मिळणारे पदार्थहि किमान दर्जा राखुन असतात.

तिथे भारताच्या अनेक प्रदेशाची रेस्टॉरंट्स आहेत. खरे तर बाह्य रुपावरुन ते अजिबात कळत नाही, पण डिस्प्ले ला ठेवलेले पदार्थ आणि वेटर्सचे कपडे यावरुन आडाखे बांधता येतो.

आपण तिथल्या हॉटेल्स्चा फेरफटका मारुच, पण त्यापुर्वी तिथली एक खास पद्धत म्हणजे, मंथली खात्याची. महिनाभराचे नास्ता आणि दोन्ही वेळचे जेवण यांचे एकदाच पैसे दिले कि झाले. तिथे जेवण अनलिमिटेडच असते, शिवाय जायला वेळ नसेल तर पॅक करुनहि मिळते.

आमच्या घराशेजारी तामिळ पद्धतीचे होतेल होते. आपल्या उडीपीपेक्षा जरा वेगळे पदार्थ असत. पण मला लवकरच त्याचा कंटाळा आला.
मत्राह आणि रुवीमधे अनेक गुजराथी हॉटेल्स होती. तिथले जेवण म्हणजे फुलके, बटाटा रस्सा भाजी, एक दुसरी भाजी, फरसाणाचा एखादा प्रकार, कच्ची केळी घालुन केलेला झुणका, गुजराथी डाळ, दहि आणि हवे तेवढे ताक. असे रोजचे जेवण असायचे. थंडीच्या दिवसात बाजरीची भाकरी आणि वर तुप व गुळ असायचा. शुक्रवारी खास पदार्थ म्हणजे खांडवी, दुधपाक, शिरा, ऊंधियो, समोसा असे काहितरी असायचे. रोजच्या जेवणातदेखील, दाल ढोकळी, गवारीची रसभाजी असा एखादा खास प्रकार असायचा. रोजच्या जेवणात कढी खिचडी असायचीच. अगदी घरगुति चव असायची जेवणाला आणि आग्रह करकरुन वाढले जात असे. एखादा पदार्थ कधी मागावा लागला असे कधीच होत नाही. एखाद्यावेळी भुक नसल्यास कमी जेवलो, तर आवडले नाही का, अशी चौकशीहि केली जात असे. जेवणवेळ सोडल्यास तिथे समोसा, भजी, फाफडा, जिलेबी असे काहितरी मिळायचेच. कोर्निशला एका हॉटेलात तर हे पदार्थ खाण्यासाठीच आम्ही जात असु. या बरोबर तिथे कच्च्या पपईची खास भाजी दिली जायची. खास गुजराथी पद्धतीची पुरी भाजी पण मिळायची तिथे.
काय असेल ते असो, या हॉटेल्समधे बायका क्वचितच दिसायच्या.

केरळी पद्धतीची पण हॉटेल्स होती. तिथे खास प्रकारचे डोसे आणि शेवया वैगरे मिळायचे. तिथे खास पद्धतीचा परोट्टा ( त्यांचा उच्चार ) मिळायचा. गरम असताना बरा लागणारा हा परोठा, थंड झाला कि अगदी चामट व्हायचा.

रुवीत एक सिंधी हॉटेल होते. तिथे पालकपनीर, दाल पकवान, साई भाजी, वैगरे छान मिळायचे. रुवीतच पंजाबी घसीटराम हलवाईचे हॉटेल होते, तिथलीहि थाली दर्जेदार असायची. जेवणावर गुलाबजाम, दहिवडा वैगरे असायचे.

माझे सगळ्यात आवडते हॉटेल म्हणजे, ओमर अल खय्याम. तिथे खास करुन पंजाबी, मोगलाई जेवण छानच मिळायचे. त्यांच्या मेनुवरचा एकुणएक शाकाहारी पदार्थ मी खाल्ला आहे. आणि सगळे पदार्थ एवढे पोटभरीचे असायचे, कि संपवणे मुष्कील व्हायचे. तिथला चना मसाला, तर ईतका अप्रतिम असायचा, कि ती चव मला अजुन माझ्या चना मसालात आणता येत नाही, याची खंत वाटते. प्रत्येक पदार्थातला कांदा ईतका सुंदर तळलेला असायचा कि पदार्थ अगदी खमंग होवुन जायचा. एकदा फार भुक नव्हती म्हणुन मी मिक्स्ड व्हेजीटेबल पराठा मागवला, तर त्यातले सारण म्हणजे खमंग परतलेली मिश्रभाजी होती, आणि वरचा पापुद्रा तर रुमालाईतका तलम होता.

तिथे पित्झा हट मधे पण आम्ही जायचो. पण तिथले मुख्य आकर्षण असायचे ते तिथला सलाड बार. क्रीममधल्या भाज्या, ऊकडलेले बटाटे, बर्फातले सेलरीचे दांडे, मऊसुत ऊकडलेले बीट, चेरी टोमेटो, चीज, ग्रीक सलाड, व्हीनीगरमधल्या भाज़्या, अशी रेलचेल असायची. पण त्या बारला एकदाच भेट देता येत असे. मग आम्ही दिलेल्या डिशच्या कडेने काकडीचे लांब तुकडे लावुन, तिच्या व्यास वाढवत असु. एकाने ती डिश दोन्ही हातात तोलायची आणि दुसर्‍याने त्यावर ढिग रचायचा असा ऊद्योग चालायचा. लाज वाटायचे काहि कारणच नव्हते, कारण सगळेच तसे करत असत.

मी तिथे असताना कुरुमला बॉलिवुड चाट नावाचे हॉटेल नुकतेच सुरु झाले होते. त्याचा शोधहि मीच लावला. चौपाटीवरचे सगळे चाट प्रकार, शिवाय ग्रिल सॅंडविच, वेगवेगळे डोसे अशी रेलचेल होती तिथे. शिवाय कुल्फी, रसमलाई, चमचम अशी मिठाई. तिथले ईंटिरियर खास जुन्या सिनेमांच्या पोस्टर्सने सजवलेले होते आणि मोठ्या स्क्रीनवर हिंदी कार्यक्रम दाखवत असत. आडबाजुला असुनदेखील तिथे भरपुर गर्दी व्हायची.

आमच्या ऑफ़िसच्या ईमारतीतच मग एक प्रशस्त हॉटेल सुरु झाले. तिथले जवणहि खास असायचे. शिवाय बर्फाचा गोळा, कॅंडी फ़्लॉस वैगरे प्रकार मिळायचे.

तिथे श्रिलंकन, बांगला देशी, लेबनानी हॉटेल्स पण होती. पण मी तिथे जायचे धाडस केले नाही. कारण तिथे शाकाहारी काहि मिळायची शक्यता नव्हतीच शिवाय श्रिलंकन लोक जेवतात तो प्रकार आपल्याला बघवणारा नसतो. ( मी कदाचित सर्व श्रिलंकन लोकांबद्दल असे विधान करणे चुक ठरेल, पण मी माझ्या मित्राला भातात चिकनचा रस्सा आणि श्रीखंड कालवुन खाताना बघितले. )

पण एकदा पाकिस्तानी मित्राबरोबर पाकिस्तानी हॉटेलमधे मात्र गेलो होतो. मला खाण्यासाठी फक्त डाळ होती. ती मात्र अप्रतिम होती. ( पुढे एका पाकिस्तानी माऊलीच्या घरी पण ती खाल्ली, तिची कृति, शत्रुची डाळ, म्हणुन मी दिली होती. ) सब्जी म्हणजे उगाचच भरपुर गरम मसाला घातलेला प्रकार होता, तो मला आवडला नाही. जेवणावर दिलेले ताक मात्र अप्रतिम होते. आले आणि पुदिना लावलेले पातळ ताक, किंचीत खारट असले तरी भुक वाढवणारे होते.

मराठी पदार्थ मात्र बाहेर मिळायचे नाहीत. गणपति वा दिवाळीच्या मेळ्यात काहि स्टॉल्सवर मिळतील तेवढेच.

आणि ओमानी पदार्थ, ते हि अवश्य चाखुया.

अपुर्ण



Tuesday, August 22, 2006 - 4:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उभ्या उभ्या काहि खायचे असेल तर तिथे नाक्यानाक्यावर पांढर्‍या रंगाच्या टपर्‍या आहेत. त्यानाहि अर्थात सर्व नियम पाळावेच लागतात.
तिथले खास पदार्थ म्हणजे, साधे समोसे आणि डाळवडे. ( यालाच काहि जण बिस्कुट अंबाडा पण म्हणतात ) आणि सुलेमानी चहा. सुलेमानी चहा म्हणजे बिनदुधाचा चहा. उत्तम प्रतीच्या टी बॅग्ज मुळे तोहि फार छान लागतो आणि प्यायल्यावर रिफ़्रेशींग वाटते.

एकदोन ठिकाणी शहाळ्याचे पाणी पण मिळायचे. उसाच्या रसाचेहि एक दुकान होते. पण तिथली मशिनरी चकाचक होती. एका बाजुने साफ केलेला ऊस टाकला कि त्याचा भुसा व्हायचा आणि एका बाजुने गाळलेला रस बाहेर यायचा. ऊस बाहेरुन आणल्यामुळे तो तितका गोडहि लागायचा नाही. शिवाय आपल्या नवनाथ रसवंती गृहाच्या घुंगरु लावलेल्या चरकाची मजा नसायची.

तिथे पाकिस्तानी फ़्रुटज्युसची दुकाने होती. साधारण आपण रस पितो तो मिक्सरमधुन फ़ळे वाटुन काढलेला, पण फळे प्रेस करुन काढलेला नितळ ज्युस वेगळाच लागतो. स्टीलची एक वाटी व त्याला खाली फ़नेल जोडलेले, त्यात एक जाळी आणि त्यावर वजन देणारा दट्ट्या, असे त्या यंत्राचे स्वरुप असे. त्यात अगदी मोजक्या फळांचा म्हणजे, संत्री. मोसंबी, अननस, डाळिंब अश्या फळांचा रस काढला जात असे. तो महाग असला तरी अप्रतिम चवीचा असे.

ओमानमधे भरपुर बेकर्‍या आहेत. तिथे ताजे खबुस मिळत असत. ( त्याबद्दल परत लिहितो ) त्याशिवाय वेगवेगळ्या पेस्ट्रीज मिळत असत. दर्जेदार घटक पदार्थ आणि काटेकोर बेकिंग यामुळे ते पदार्थ खुप छान लागत.
तिथे त्यांचेहि खास पदार्थ असत. त्यात मस्कती हलवा असे. ( हलवा, हलवाई हे अरेबिक शब्द आहेत. हवा पण अरेबिक शब्द आहे. ) साबुदाण्याच्या पिठापासुन केलेला हा हलवा, आपल्या बदामी हलव्यासारखा लागत असे. आपल्या रव्याच्या केकसारखा पण एक प्रकार ते करतात. बकलावा असायचा. शिवाय तीळ आणि पिस्त्यापासुन केलेला एक पांढराशुभ्र हलवा मिळायचा. तो आकर्षक तर दिसायचाच, शिवाय त्याला कस्तुरीचा गंध असायचा. हा हलवा डब्यात मिळायचा, शिवात वड्यांच्या रुपातहि मिळायचा.
राजस्थानी लोक गुलगुले नावाचा एक प्रकार करतात. आपल्यागुलाबजाम सारखा दिसत असला तरी तो कुरकुरीत असतो. तसाच प्रकार तेहि करतात.
आपल्या मांड्याप्रमाणे पण त्यांचा एक प्रकार असतो. फक्त तो गोड नसतो. करायची, हातावर विस्तारायची आणि भाजायची पद्धतहि तशीच. दोश्याप्रमाणे पण एक प्रकार करतात ते. दोन फ़ुटापेक्षा जास्त व्यास असलेला हा प्रकार तसाच अखंड मिळतो. आपल्या डोश्यापेक्षा जरा कडक व किंचीत चामट लागतो तो. तो मैदा आंबवुन करतात आणि विशेष म्हणजे मोठ्या सपाट तव्यावर तो हातानेच विस्तारतात. त्या बायकांचे हे कौशल्य बघत बसावे असे असते.

खबुसची तुलना पिटा ब्रेडशी होत असली तरी, खबुस आपल्या भाकरीला जास्त जवळचे आहेत. कारण त्याचे पिठ आंबवलेले नसते, व चांगल्या भाकरीप्रमाणे त्याला छान पापुद्रा असतो. हे आता यंत्राने केले जातात, व आकाराप्रमाणे तीन किंवा चार अश्या पॅकेटमधे मिळतात. परत गॅसवर शेकुन घेतले तर भाकरीचीच लज्जत आणतात. माझे आणखी प्रयोग म्हणजे मी त्याचे पापुद्रे उघडुन त्यात सारण भरुन, त्याचे वेगवेगळे पराठे करायचे. श्रम अर्धे व्हायचे.

तिथे जागोजाग शेवरामा चे स्टॉल्स दिसतात. हा शब्द मी नंतर ऐकला, कारण तिथे त्याला संदावितश म्हणतात. ( हा सॅंडविचचा अपभ्रंश, अरेबिकमधे सॅ, ड आणि च नसल्याने, हे रुपांतर ) एका सळीत बीफ़चे मोठेमोठे बोनलेस तुकडे ओवुन, ती सळी गॅसने पेटवलेल्या जाळीसमोर उभी फिरवत ठेवली जाते. त्या धगीने ते मास खरपुस भाजले जाते व त्यातली चरबी खाली गळत राहते. धारदार सुरीने त्याचा खरपुस झालेला पापुद्रा बारिक तुकड्यात कापला जातो. मग तो पापुद्रा एका खबुस मधे भरुन, त्यात व्हीनीगरमधे मुरवलेल्या बीट, गाजर, शलगम सारख्या भाज्या, कापलेला कोबी टोमॅटो आणि चिली सॉसचे काहि थेंब घालुन ते देतात. पुढे पुढे खास भारतीयांसाठी चिकनचा वापर पण होवु लागला.
फ़लाफ़ल हि काबुली चणे आणि मेथी यांची भजी पण तिथे आवडीने खाल्ली जातात. ती करण्यासाठी तिथे एक खास उपकरण असते. त्यावर पीठ लावले कि आणि मागच्या दांड्याने तेलात ढकलले कि आपसुक, व्यवस्थित गोल आकाराची भजी तयार होत असत. हिरव्या रंगाची कुरकुरीत भजी छान लागत असत.

ओमानी पदार्थात अर्थात माश्यांचा वापरहि जास्त असतो. बीफ़ आणि मटण असतेच. चिकनहि असते. पण त्यांच्याकडे तेलाचा वापर फार कमी असतो. अलिकडेच त्याना तळलेल्या पदार्थांची चटक लागलीय. भात पण खातात.

शक्यतो गव्हाचा जाड रवा, कांदा, लाल भोपळा, यांचा वापर जास्त असतो. मंद आचेवर बराच वेळ शिजवुन हे पदार्थ केले जातात. तेलापेक्षा लोणी आणि तुप जास्त वापरतात. काबुली चणे, मेथी, टोमॅटो यांचाहि वापर असतो. वेगवेगळी सरबते ते पितात. गुलाबजल, संत्र्याचे पाणी स्वादासाठी वापरतात. काहि ओमानी घरात, पाहुणचार घ्यायचा पण योग आला. त्याबद्दलहि लिहायला हवेच.

प्रदुषणमुक्त हवेमुळे तिथे भुक फार लागते. आणि दुकानात खाद्यपदार्थ विकायला खुपदा ओमानी बायका असत. एकदा असाच एका पेट्रोलपंपावरच्या सुपरमार्केटमधे गेलो होतो. तिथे समोसे घ्यायला गेलो ( समोसा हा देखील अरेबिक शब्द आहे ) विक्रेती एक हसर्‍या चेहर्‍याची ओमानी बाई होती. गिव्ह मी टु समोसाज, असे मी सांगितल्यावर, तिने ” ओन्ली टु ?” , हे असे काहि प्रेमळपणाने विचारले, कि पुढे मी खास तिच्यासाठी म्हणुन, तिथे जाऊ लागलो. समोसा खाऊन होईपर्यंत गप्पा होवु लागल्या. पुढे असे कळले कि तिचा भाऊ, माझ्याच कंपनीत कामाला होता. अगदी हसतमुख असणारी हि भावंडे नफिसा आणि साजिद, माझे मित्रच झाले होते.

अपुर्ण




Wednesday, August 23, 2006 - 4:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रत्येक देशाला आपल्या आतिथ्यशीलतेचा अभिमान असतोच. दारी आल्याला पाहुण्याला विन्मुख पाठवायचे नाही, असा शिरस्ता अनेक संस्कृतीत आढळतो. आपल्याकडेहि तो होताच. चिलया बाळाच्या कथेसारखा अतिरेक वगळला, तरी या आतिथ्यशीलतेचे अनुभव आजहि आपल्याला छोट्याछोट्या गावात येतात.
पण मला वाटते आपल्याकडच्या एकेकाळच्या संपन्न भुमीत, अन्नधान्याची कमतरता तशी कधी नव्हतीच. एकत्र घरात शिजवल्या जाणार्‍या जेवणात, दोन चार पैपाहुणे सजज जेवु शकतात. पण ओमानसारख्या देशात, जिथे मुळातच कधी अन्नधान्याची सुबत्ता नव्हती, तिथे हे आदरातिथ्य जोपासले गेले त्याचे कौतुक आहे.
नमाज पढताना शेवटी एकदा उजव्या आणि डाव्या बाजुला मान वळवुन पाहिले जाते. त्याला प्रतीकात्मक अर्थ आहे. तुझ्या आजुबाजुला कुणी तहानलेला, भुकेलेला असेल तर त्याला आधी खाऊ पिऊ घाल, त्याशिवाय तुझी प्रार्थना अल्लापर्यंत पोहोचणार नाही, असा त्या कृतिचा अर्थ आहे.
मला आलेला एक विलक्षण अनुभव ईथे नोंदवावासा वाटतोय. कामाच्या निमित्ताने मी आणि माझा मित्र अगदी आडगावात गेलो होतो. ( गाव ईतके आडबाजुला होते कि त्या गावाने टाय घातलेली आणि ब्रीफकेस घेतलेली दोन माणसे एकत्र पहिल्यांदाच बघितली असावीत. ) अगदी जेवण वेळ होती. पत्ता शोधायचा होता आणि काम होते बॅंकेच्या कर्जवसुलीचे.

तिथे रस्त्याना नावे नसली तरी क्रमांक असतात. त्यामुळे घर शोधणे अवघड गेले नाही. घराचा दरवाजा ऊघडाच होता. दारात एक छोटा गोड पोरगा खेळत होता. त्याला आम्हाला येत होते त्या मोडक्यातोडक्या अरेबिक भाषेत विचारले, ” सौद अली मौजुद ?” त्यावर त्या छोकर्‍याने, ” मेरा बाप घरमे नही है ?” असे शुद्ध हिंदीत उत्तर दिले. आम्हाला काय करावे ते सुचत नव्हते. तेवढ्यात आतुन त्या माणसाची बायको बाहेर आली. तिने आपणहुन आम्हाला शेकहॅंड केला, व सांगु लागली कि बसा, एवढ्या उन्हाचे बाहेर का ऊभे राहता. आम्ही आत शिरलो.

साधारणपणे ओमानी घरात भारतीय बैठकच असते. गादीवर नक्षीदार चादरी, त्यावर लोड आणि तक्के असतात. त्यावर किंचीत भडक, पण तरिही आकर्षक रंगाची कव्हर्स असतात. मध्यभागी छोटासा का होईना गालिचा असतो.
घराचा रंग बाहेरुन पांढरा किंवा पिवळाच असतो. अगदी जाड भिंती, धाब्याचे छप्पर. अगदी छोट्या खिडक्या आणि दारे, यामुळे बाहेरचा उन्हाळा घरात जाणवत नाही.

त्या बाईने आम्हाला लगेच थंडगार गुलाबाचे सरबत व खजुर आणुन दिला. आम्ही तहानलेले होतोच. ती पण आमच्याहि गप्पा मारतच होती.
दहा पंधरा मिनिटानी सौद अलि आला. त्यानेहि आल्या आल्या आम्हाला काहि थंड दिले कि नाही याची चौकशी केली. खरे तर आम्हाला विषय काढायला जरा संकोच वाटत होता, पण तरिही आम्ही कामासंबंधी बोलुन घेतलेच. त्यानेहि आम्हाला सहकार्य केले. बोलणे झाल्यावर आम्ही उठु लागलो. त्याबरोबर त्याने आम्हाला हाताला धरुन खाली बसवले. म्हणाला जेवायची वेळ आहे, कुठे जाताय. आम्ही म्हणालो, जेऊ कुठेतरी. तो म्हणाला, माझ्याघरी आलात, तर आणखी कुठे कसा जाऊ देईन. शिवाय बाहेर जेवायचे म्हणत असाल, तर गावात हॉटेलहि नाही.
बायकिनेहि जरा बसा, जेवण तयारच आहे, असे सांगितले. आतुन खरेच मसाल्याचा छान दरवळ येत होता. आम्ही शाकाहारी आहोत, माटण वैगरे खात नाही, हे सांगुन बघितले. तिला ते कळले नसावे.
एका पसरट थाळ्यात बासमती तांदळाचा पुलाव. त्यात सढळ हाताने घातलेले बदाम पिस्ते आणि केशराच्या काड्या. आणि वर चिकनचे तळलेले लेग्ज अशी डिश समोर आली. हे दिजाज ( चिकन ) फक्त वर ठेवलेय, भात वेगळा केलाय, असे सांगायला ती विसरली नाही. सोबत शोरबा ( सुप ) पण होते, ते मात्र आम्हाला चालणार नव्हते, म्हणुन तिने चहा केला होता. सौद अलि, त्याचा छोकरा आणि आम्ही दोघे एकाच थाळ्यात जेवावे अशी अपेक्षा होती. आम्ही दोघानी एकमेकांकडे एकदाच बघितले, आणि आम्ही मुकाट्याने जेवु लागलो. आजहि मला ती चव आणि त्या बाईच्या चेहर्‍यावरचा आनंद विसरता येत नाही. आम्हा चौघांच्या मानाने भात खुपच जास्त होता. आमचे झाल्यावर घरच्या बायका, पण त्याच खोमच्यात जेवल्या. आज आपल्या कल्पनेप्रमाणे हा प्रकार घृणास्पद वाटेल, पण ती त्यांची पद्धत आहे. आणि त्यानंतरहि आम्हाला त्याने कामाबाबत पुर्ण सहकार्य केले. त्या छोट्या मुलाला काहि देण्याचेहि आम्हाला सुचले नाही. आजहि ती रुखरुख आहे.

आणखी एकदा ओमानी पाहुणचार घ्यायची वेळ आली होती. एका ट्रिपला आमच्यासोबत आमचा ओमानी सहकारी होता. त्याचे घर वाटेवरच्या गावातच लागणार होते. त्याने तर माझ्या घरी आलेच पाहिजे अशी गळ घातली होती.

त्याच्या घरी आम्ही, आठदहा जण गेलो होतो. नाश्त्याला उकडलेले काबुली चणे. त्यासोबर कापलेला कांदा आणि टोमेटो. ओमानी हलवा. ज्याना हवी त्याना ऑम्लेट्स. आणि अगदी आपल्या पद्धतीच्या पुर्‍या असा बेत होता. शिवाय सोबतीला घरचा खजुर. कंपनीतले पाहुणे आले, म्हणुन त्याच्या बहिणी, आजी आजोबा, आमच्या सोबतीला येऊन बसले होते. अगदी घरगुति कार्यक्रम असल्यासारखे आम्ही मिसळुन गेलो होतो त्यांच्यात.

हि तर ओमानी संकृतीची झलक झाली.

अपुर्ण





Thursday, August 24, 2006 - 3:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओमानी घराची झलक, हे फोटो नेटवरुन घेतले आहेत. माझ्या संग्रहातले मग सवडीने पोस्ट करीन.


ghar

kumbh


Thursday, August 24, 2006 - 3:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संस्कृति, संस्कृति म्हणजे काय रे भाऊ ? असा भाबडा प्रश्ण मला करायचा नाही.
समाजाची एकुण धारणा, आहार विहार पद्धति, कौटुंबिक व्यवस्था, चालीरिती असा सर्वसमावेशक अर्थ घेतला, तर मग त्यालाहि धर्मच म्हणावे लागेल. ( कारण तोच अर्थ आपण आपल्या धर्माला लावलाय. ) त्यामुळे बाहेरुन लादलेला धर्म नेहमीच मूळ संस्कृतिशी फटकुन राहतो.

आज बहुसंख्य ओमानी जनता, ईतकेच नव्हे तर राष्ट्र म्हणुनहि ओमान मुस्लीम, असला, तरी आपल्या या धर्माच्या पुर्वग्रहाना, तिथे पार तडा जातो. ( आणि त्यामुळेहि माला ओमानबद्दल विशेष ममत्व आहे. )
आपलाच धर्म तो श्रेष्ठ आणि ईतर ते सर्व जगण्यासाठी नालायक, हा द्रुष्टिकोन तर तिथे कुठेहि जाणवत नाही.

कुणी जर नव्याने मुस्लीम धर्म स्वीकारला, तर त्याची पेपरमधे बातमी येते हे निश्चित, पण बातमी येण्याईतकी हि घटना दुर्मिळ आहे, हेहि तेवढेच सत्य आहे. आपल्याकडच्या चर्चेसमधे अजुनहि मिशनर्‍यांचे छुपे आग्रह चालु असतात, पण तिथे तसा अनुभव कधीही येत नाही. ( सौदीतले अनुभव वेगळे असतील. त्या अनुभवांवर आधारित एक पुस्तक हल्लीच बाजारात आलेय. )

ओमानी माणुस असा खुल्या दिलाचा असायला काहि कारणे आहेत. एकतर अन्नधान्याचा तुटवडा असल्याने, आयात केलेल्या धान्यावरच त्यांची पुर्वापार मदार होती. त्यामुळे जगात ईतरहि संस्कृति नांदताहेत, याची त्याना कायम जाण होती, ईतकेच नव्हे तर त्या संकृतींशी त्यांचे व्यवहार होते.

अरब म्हणजे मुस्लीम, असे एक आपल्या डोक्यात समीकरण तयार झालेले असते. पण ते तितकेसे बरोबर नाही. अरब लोक ख्रिश्चनहि असु शकतात. तसे बघायला गेले तर ओमानी हे पुर्ण अरबहि नाहीत. ईतर अरब देश त्याना, कदाचित हिन समजत असावेत. भौगोलिक स्थानामुळे, तिथे पुर्वापार अनेक लोक जाऊन राहिले आहेत. त्यात बलुची, सिंधी आणि कच्छीदेखील आहेत. ते लोक अजुनहि तीच नावे लावतात. व्यवहारात ते अरेबिक बोलत असले तरी घरात, वा आपापसात ते त्यांच्या मूळ भाषाच बोलतात. त्यांची आपापसातली भाषा ऐकली वा पुर्ण नावे कळली तरच हा बदल लक्षात येतो, एरवी नाही.

या सरमिसळीमुळे, तिथे पहिल्यापासुनच अनेक संस्कृतींची सरमिसळ आहे. याशिवाय लग्न करुन आणलेल्या बायका, भारतातुन, पाकिस्तानातुन आणि झांझिबारमधुन आणल्यामुळे, त्यानीहि आपली संस्कृति आणलीच. ( झांझिबार हे पुर्वी ओमानच्या अधिपत्याखाली होते. असा उल्लेख मी पुर्वी केला आहेच. आता ते टांझानियाचा भाग आहे. तरिहे तिथुन बायको आणायची, ईच्छा अनेक जण बाळगुन असतात. )

या सर्व लोकांच्या चेहरेपट्टीतपण सुक्ष्मसा फरक असतो. शिवाय मिश्रविवाहातुन झालेली मुले, आणखीनच वेगळा तोंडावळा घेऊन येतात.

मुसलमान धर्म म्हंटला कि बायकांवर अनेक बंधने असाहि एक समज आहे. तुर्कस्तानाईतके नसले तरिही, ओमानमधे सामाजिक बदल खुपच झालेत. बायका तिथे अजिबात बुरखा घेत नाहीत. त्या अर्थार्जनहि करतात. शिकतातदेखील. कायद्याने योग्य ते संरक्षण दिल्याने, त्याना तशी कोणाची भितीहि नाही.

मुसलमान म्हणजे किमान चार बायका करायच्या, असाहि आपला ग्रह. तोहि तिथे खोटा ठरतो. मला नक्की सांगता येणार नाही, पण लग्नाच्या वेळी, बायकोच्या नावाने सरकारकडे त्याना काहि निश्चित रक्कम ठेव म्हणुन ठेवावी लागते. या रक्कमेवर फक्त तिचाच हक्क असतो, आणि हि रक्कम बर्‍यापैकी मोठी असते. त्यामुळे अनेक लग्न करणे त्याना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही.

मुसलमान म्हणजे संगीत नृत्यावर बंदी असेहि नाही. तिथले संगीत बर्‍यापैकी श्रवणीय असते. आर्त असले तरी रडके नसते. आवाज लावण्याची पद्धत आणि आलापी बरिचशी आपल्यासारखी, आणि टाळ्यानी दिलेला ताल तर ठेका धरायला लावणारा. नृत्याचे कार्यक्रमहि होत असतात आणि त्यात बायकाहि सहभागी होतात. बेली डान्ससारखा प्रकार नसला, तरी आपल्या काश्मिरी नृत्याईतका लयबद्ध प्रकार असतो तो.

तिथे जागोजाग देखण्या मशिदी आहेत. प्रत्येक पेट्रोल पंपावर मशिद हवीच असा नियमहि आहे, पण तिथे पाचवेळा नमाज पढायची अजिबात सक्ती नाही. सौदीप्रमाणे तिथे कुणीहि काम टाकुन नमाज पढायला जात नाही. टिव्ही व रेडिओवर कार्यक्रम दोन मिनिटे थांबवुन नमाजाची प्रार्थना केली जाते, हे खरे पण तो केवळ उपचार आहे.
मशिदी असल्या तरी पुर्वापार असलेल्या संकृतीतली लोकगीते व लोकनृत्ये अजुनहि तग धरुन आहेत. आपल्या हादग्याप्रमाणे मध्यभागी मखर रचुन, तिथेहि बायका फ़ेर धरुन टाळ्या वाजवत गाणी म्हणतात. खरीपाच्या पिकाच्या सुगीचा उत्सव तिथेहि होतो. ( खरिफ़ हाहि अरेबिक शब्द आहे. )

तिथे जाऊन राहिलेले गुजराथी लोकहि तिथल्या सुलतानाशी जिव्हाळ्याचे संबंध राखुन आहेत. नवल म्हणजे ते लोकहि जरी हिंदु धर्म पाळत असले तरी वेशभुषा त्या लोकांसारखीच करतात. या परस्पर जिव्हाळ्यामुळे, भारतीयांबद्दलची आत्मियता आणि त्यांच्या धर्माची चालीरितींची कदर राखली जाते.

तिथे देवादिकांच्या तसबिरी, पुजेचे सामान अगदी सहज मिळु शकते. दिवाळीला तिथल्या राजातर्फे हिंदु लोकाना शुभेच्छा दिल्या जातात.

कुठलाहि सण, उत्सव साजरा करण्यावर कुठलीच बंधने नाहीत. फक्त ईतराना त्रास होणार नाही वा रस्त्यावर वा सार्वजनिक जागी धुडगुस घालायचा नाही, याची काळजी घ्यावी लागते. आणि असलेच तर हे बंधन मुस्लीमांवरहि आहे. धर्म हि अगदी खाजगी बाब मानली जाते तिथे.

शुक्रवारी अनेक मशिदीतुन कुराणपठणाचे आवाज ऐकु यायचे. ते पठण आपल्यकडच्याप्रमाणे एकसुरी न करता, किंचीत गेय रुपात केले जायचे. आणि त्याची सुरावट चक्क आपल्या सत्यनारायणाच्या कथेप्रमाणे वाटायची.

आपण तिथे मुस्लीम सण कसे साजरे होतात, याबद्दलहि बोलुच.

अपुर्ण




Sunday, August 27, 2006 - 8:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शु s s s आमी किनई मम्माला न सांगता, आंबट आंबट बिमली खातोय.
manu

आता १० दिवस माझी रजा बरं का.


Friday, September 08, 2006 - 5:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आकाशातला ऊंट आणि सुर्य
on

sur


Monday, September 11, 2006 - 3:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओमानमधे रमदान म्हणजे आम्हाला पर्वणीच वाटायची. ( आपण जरी रमझान म्हणत असलो तरी मुळ शब्द रमदान असाच आहे. निदान अरेबिकमधे तरी तो तसाच लिहिला जातो. )
मुसलमान लोकात चांद्रवर्ष मानले जाते. त्यामुळे प्रतिपदेला त्यांचा नवा महिना सुरु होतो. त्यापैकी रमदान हा सगळ्यात पवित्र महिना. या महिन्यात संयम पाळावा व प्रार्थनेत वेळ घालवावा अशी अपेक्षा असते.
ते जरी चांद्रवर्ष मानत असले तरी नमाजाच्या पाच वेळा मात्र सुर्याच्या स्थितीवर ठरतात. क्षितिजावर सुर्य असल्याची वेळ, कक्षेतील उच्चतम बिंदुवर येण्याची वेळ आणि ४५ अंशावरच्या दोन वेळा, अश्या नमाजाच्या पाच वेळा.
सौर वर्ष आणि चांद्रवर्ष यामधे वर्षभराकाठी फरक पडतच जातो. आपण अधिक महिना पाळुन हा फरक कालांतराने मिटवतो. पण मुस्लीम कालगणनेत तशी प्रथा नसल्याने. रमदान महिना दरवर्षी साधारण १० दिवसाने मागे पडत जातो.

असे होत होत, काहि वर्षानी तो वेगळ्याच ऋतुमधे पण येऊ शकतो. आणि तो जर तिथल्या ऐन उन्हाळ्यात आला, तर ते रोजे ठेवणे खुपच कडक होत जाते.
रमदानमधे सुर्योदय ते सुर्यास्त, काहिहि खायचे नसते. पाणीहि प्यायचे नसते. उन्हाळ्यात दिवस मोठा असल्याने, उपासाचा कालावधि लांबतो.
पण तरिही ओमानमधे रमदान म्हणजे पर्वणी असायची. एकतर ईतरवेळीहि तितकासा आग्रहि नसणारा तिथला राजा, रमदानच्या वेळीहि फारशी बंधने घालत नाही. या काळात सर्व हॉटेल्स दिवसभर बंद असतात, पण ज्याना हवे असेल त्याना, मागच्या दाराने पॅकबंद जेवण मिळु शकते. ( त्यात काहिहि बेकायदेशीर नसते. राजाच तशी परवानगी देतो. ) . हे जेवण आपापल्या घरी जाऊन खावे अशी अपेक्षा असते. अर्थातच सार्वजनिक ठिकाणी खाणेपिणे यावर बंधने असतात. तशी धुम्रपान करण्यावरहि बंधने असतात. बायकानी गळ्यापासुन निदान गुडघ्यापर्यंत कपडे घालावेत, अशी अपेक्षा असते. ( एरवी असे बंधन नाही ) मुसलमान बायका मात्र या काळात केस झाकुन घेतात, म्हणजेच हिजाब वापरतात.
साधारण दुपारचे चार पाच वाजले कि हॉटेल्सच्या बाहेर भजी, फलाफल, सामोसे असले पदार्थ विकायला तयार ठेवले हातात. बाजार गजबजु लागतो. बायकांची जेवण रांधायची धावपळ सुरु होते. बागांमधुन लोक घोळक्याने जमा होतात. टेबलवर वा सतरंजीवर खाण्याचे पदार्थ मांडले जातात. आणि सुर्य अस्ताला जाण्याची वाट बघितली जाते. तो अस्ताला गेला कि नमाज पढुन लगेच जेवायला सुरवात केली जाते. आणि यावेळी समोर जो कोणी असेल, त्याला पहिल्यांदा जेवायचे निमंत्रण दिले जाते. हे आमंत्रण अगदी मोकळ्या मनाने दिले जाते. पहिल्या वर्षी मी लाजुन, नाही म्हणायचो, पण दुसर्‍या वर्षीपासुन मात्र त्यात सहभागी होवु लागलो. आपण एक तुकडा जरी खाल्ला तरी त्या लोकाना खुप आनंद होतो.
हे जेवण आटपले कि मात्र बाजारात उत्साह संचारतो. आम्ही आमची मोठी खरेदी या दिवसातच करायचो. या काळात अनेक दुकानात सेल लागलेले असत. अगदी ४० टक्क्यापर्यंत डिस्काउंट मिळत असे. ( नेहमीच्या किमती आम्हाला माहित असतच, त्यामुळे हि सुट हि अगदी खरी असे, हेहि आम्हाला कळत असे. अशी सुट देण्यात व्यावसायिक कारणांपेक्षा धार्मिक कारणे जास्त असत. )

आम्हाला हरखुन जायचे आणखी एक कारण म्हणजे या काळात ऑफ़िसच्या वेळा कमी केल्या जात. संध्याकाळच्या सत्रात जावे लागत नसे. त्यामुळे आम्हीहि दुपारी जरा जास्तच वामकुक्षी घेऊन, संध्याकाळी मनसोक्त भटकत असु. तशी आमच्यावर ऑफ़िसमधे काहिहि बंधने नसत, आणि आम्ही चहाकॉफ़ी पिऊ शकत असु.
स्थानिक ओमानी लोक पण फार कडवे नसत. वयस्कर लोक मनापासुन उपास करत, पण तरुण मुले मात्र, खुशाल खातपित असत.
याच दरम्यान स्थानिक वर्तमानपत्रात रमदान संबंधी प्रश्णोत्तरे येत असत. त्यातुन काहि नविन माहिती मिळत असे.
उदा. प्रवास करत असताना, लहान मुलानी, गरोदर स्त्रीयानी उपास केले नाहीत तरी चालत असे. काहि कारणामुळे जर उपास ठेवणे शक्य होत नसेल तर एखाद्या गरिब माणसाला पैसे देऊन, त्याला आपल्या वतीने उपास करायला सांगता येते.
आपल्या पंचांगात साधारण चंद्रदर्शनाच्या वेळा दिलेल्या असतात. ( अंगारिकेला त्या वेळेनंतर बरेच जण जेऊन घेतात. मुंबईतील उंच ईमारतींमुळे खुपदा त्या वेळेला चंद्र दिसत नाही. ) त्यांच्याकडे तशी सोय नाही का ते प्रत्यक्ष चंद्रदर्शनालाच महत्व देतात का ते माहित नाही, पण तसे प्रत्यक्ष दर्शन झाल्याशिवाय ईद साजरी केली जात नाही.
सौदी अरेबियात त्यासाठी मून सायटिंग कमिटी आहे. कुणालाहि चंद्र दिसल्यास त्याने या कमिटीला कळवावे अशी अपेक्षा असते. ( अमावस्येला चंद्र आणि सुर्य यांच्या ऊगवण्याच्या आणि मावळण्याच्या वेळा सारख्याच असतात. त्यानंतर येणार्‍या प्रतिपदेला या वेळांत अगदी थोडासाच फरक पडतो. उन्हाळ्यात दिवस मोठा असला तर कधी कधी चंद्रकोर दिसत नाही. )
असे दर्शन झाले कि ईद साजरी केली जाते. मिठाया वाटल्या जातात. आणि त्याच वेळेस आम्हाला मोठी सुट्टि दिली जात असे.
ओमानमधे आपल्यासारख्या जयंत्या मयंत्यांच्या फुटकळ रजा नसायच्या. पण ईद आणि नॅशनल डे ला मात्र तीन चार दिवसांची रजा मिळायची. शक्यतो हि रजा शुक्रवारला जोडुन दिली जायची. आणि याच दरम्यान आम्ही दुरवरच्या भटकंतीचे बेत आखायचो.

अपुर्ण.




Tuesday, September 12, 2006 - 4:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओमानचे चलन ओमानि रियाल. त्याचे संक्षिप्त रुप RO . मी पहिल्यांदा ओमानला गेलो तेव्हा, एक ओमानि रियाल बरोबर चव्वेचाळीस भारतीय रुपये असा विनिमयाचा दर होता. पुढे वाढत वाढत तो एक ओमानि रियाल बरोबर एकशेवीस भारतीय रुपये पर्यंत गेला. गेली अनेक वर्षे, तो या पातळीवर स्थिर आहे.
( कुवैती दिनार, बहारिनी दिनार अश्या काहि मोजक्याच करन्सीज, ओमानी रियालापेक्षा वरचढ आहेत. झुरिक विमानतळावर मी एकदा ओमानि रियाल बदलुन घेतले, तर या चलनाचा दर बघुन तिथल्या मुलीला फार नवल वाटले होते. तिला अर्थातच ओमानि रियाल माहित नव्हता. तिने तिच्या कॅटलॉगमधे बघुन नोटांची खात्री करुन घेतली होती. )

गल्फ़मधल्या बहुतेक चलनांप्रमाणे ओमानि रियालदेखील डॉलरशी असलेल्या विनिमय दरात, गेली अनेक वर्षे स्थिरता राखुन आहे. गेल्या १५ वर्षांत रुपयाचे अवमुल्यन झाल्याने, भारतीय रुपयाच्या संदर्भात त्याचा दर वाढला आहे.
एका ओमानी रियालात शंभर नव्हे तर एक हजार सबयुनिट्स आहेत आणि त्याला बैसा म्हणतात.
२५ बैसे, ५० बैसे, १०० बैसे अशी नाणी असतात आणि १०० बैसा, २०० बैसा, २५० बैसा, ५०० बैसा, एक रियाल, ५ रियाल, १० रियाल, २० रियाल आणि ५० रियाल अश्या नोटा असतात.
या नोटांची छपाई अत्यंत दर्जेदार कागदावर झालेली असते. शर्टाच्या खिश्यात राहिलेल्या नोटा, वॉशिंग मशीनमधे धुवुन निघाल्या तरी फाटत नाहीत. त्याचा रंगहि जात नाही. ( स्विस आणि फ़्रेंच फ़्रॅंकच्या नोटानी मी खिसा रंगवुन घेतला आहे. )
प्रत्येक नोटेवर सुलतान काबुस बिन सैद म्हणजे तिथल्या राजाचा फोटो असतो, आणि एका बाजुला एखादा किल्ला वा डोंगराचे वैगरे चित्र असते. या नोटा अर्थातच बॅंक अल मर्कझी तर्फे छापलेल्या असतात. नोटांवर अरेबिक आणि ईंग्लिश अश्या दोन्ही लिपीत माहिती असते. खास अंध व्यक्तींसाठी म्हणुनहि खुणा असतात.

या चलनाचे भरपुर मुल्य, करांचा अभाव आणि अर्थातच तिथली स्वस्ताई यामुळे आमचा फारसा खर्च व्हायचाच नाही. गेली अनेक वर्षे ओमानमधली भावपातळी स्थिर आहे. मी तिथे असताना कुवैत वॉर सुरु झाली. त्याच दिवशी, सुलतानाने सर्व सुपरमार्केट्सना तंबी देऊन, कुणालाहि भाव वाढवता येणार नाही, अशी सक्त ताकिद दिली होती.

सहज गम्मत म्हणुन काहि भाव बघा. २५ बैश्यात स्थनिक फोन कॉल करता येत असे. ५० बैश्यात सुलेमानी चहा मिळत असे. १०० बैश्यात अख्खा स्लाईस ब्रेड, तीन ते चार खबुस, कोल्डड्रिंकचा टिन वा बाटली असे मिळत असे. २०० बैश्यात १ किलो सफरचंद, दोन किलो ओला खजुर, तीन चार समोसे, तीन बटाटेवडे वैगरे मिळत असत.
६०० बैश्याना अनलिमिटेड गुजराथी थाळी मिळत असे. कुठल्याहि भारतीय जेवणाचा दर तोच होता. शुक्रवारी खास थाळी ७०० बैश्यात मिळत असे. ३० किलोमीटरचा बसने प्रवास २०० बैश्यात करता येत असे.
एक रियालमधे उत्तम प्रतीचा शर्ट, मिळत असे. दीड ते दोन रियालात, शर्ट आणि पॅंट पीस मिळत असे.
मल्टिप्लेक्सचे तिकीट ८०० बैसा असे. साध्या थिएटरचे तिकिट ६०० बैसा असे.
बदाम पिस्ते वैगरे, २ रियालला किलोभर मिळत. भाज्या वैगरे २०० ते ४०० बैसे किलो दराने मिळत असत.
भारतात पाठवायच्या पत्राचे पोस्टाचे तिकिट २०० बैसे होते.
१२ रियालात, महिनाभर हॉटेलात एका वेळचे जेवण मिळत असे. २० रियालमधे दोन्ही वेळचे जेवण मिळत असे. १० रियालात ३० व्हिडीओ कॅसेट्स, भाड्याने मिळु शकत असत.

साधारणपणे आमचे बहुतेक फ़ुटकळ व्यवहार बैश्यातच पार पडत असत. एक रियाल खर्च झाला म्हणजे फार खर्च झाला असे वाटत असे.

१००० सबयुनिट्समुळे १ रियाल ४०० बैसे, असे भाव बघायला मिळत असत. ( आधी हे ऐकायलाहि विचित्र वाटायचे. ) भक्कम मुल्यामुळे भरपुर नोटा बाळगायची गरज नसे, पाकिटात पाच दहा रियाल असले कि राजासारखी चैन करता येत असे.

ओमानची अर्थव्यवस्था पुर्णपणे मुक्त आहे. तिथे बाजारात कुठलेहि चलन म्हणजे नोटा, कुठल्याहि बंधनाशिवाय मिळु शकतात. कुठल्याहि चलनातील
ड्राफ़्ट मिळु शकतो. पुढे पुढे फक्त आपले लेबर कार्ड दाखवणे गरजेचे ठरु लागले.

तिथल्या चेकबुकवर चलनाचे नाव छापलेले नसते. तुम्हाला हव्या त्या चलनात चेक लिहु शकता. ओमानि रियालमधला चेक लिहिताना मात्र जरा वेगळा प्रकार होतो. कधी कधी बैश्यातली रक्कम रियालातल्या रकमेपेक्षा ( आकड्यात तरी ) जास्त असु शकते. म्हणजे अक्षरी रक्कम लिहिताना रियाल ओमानी पंचवीस आणि बैसे दोनसे पन्नास फ़क्त असे लिहावे लागले असते. ( फ़क्त हा अरेबिक शब्द आहे. ) पण तसे न करता रियाल ओमानी पंचवीस आणि व बैसे २५० / १००० फ़क्त असे लिहिले जाते. ( व पण अरेबिक मधे आपल्या अर्थानेच वापरला जातो. )

बाजारातील बहुतेक सगळे व्यवहार रोख रकमेनेच होतात. ( रकम हादेखील अरेबिक शब्द आहे. )

साधारणपणे उत्तम दर्ज्याच्या कागदामुळे रियालच्या नोटा खराब होत नसत. पण जरी खराब झाल्या तरी कुणीहि त्या स्वीकारणे नाकारु शकत नाही. तसे केल्यास तो देशाचा व राजाचा अपमान समजला जातो.

ईतर गल्फ देशातल्या नोटाहि तिथे अगदी सहज स्वीकारल्या जातात. अमरातीचे दिरहॅम्स तर सहज स्वीकारले जातात. एका ओमानी रियालला दहा दिरहॅम्स असा व्यवहारातला दर आहे.

तिथले बॅंकेचे व्यवहार हा देखील एक सुखद अनुभव असायचा, आमच्यासाठी. त्याबद्दल लिहिनच.

अपुर्ण.




Wednesday, September 13, 2006 - 4:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुवीजवळचा एक मुख्य रस्ता, सी. बी. डी म्हणुन ओळखला जातो आणि तिथे अनेक बॅंका आहेत याचा उल्लेख वर आलाच आहे. ब्रिटिश बॅंक ऑफ़ द मिडल ईस्ट, बॅंक ऑफ़ मस्कत, बॅंक मेल्लि ईरान, स्टॅंडर्ड चार्टर्ड, बॅंक ऑफ़ ओमान बहारिन व कुवैत, अश्या काहि प्रमुख बॅंका. या सगळ्या बॅंकांच्या अतिषय देखण्या ईमारती आहेत ईथे. अर्थात प्रत्येक टाऊनमधे यांच्या शाखा आहेतच.

स्वतःचे खाते उघडण्यासाठी आम्हाला एकदाच बॅंकेत जावे लागे. एकदा लेबर कार्ड मिळाले कि अनेक व्यवहार सुकर होत. मग मात्र पैसे भरण्यासाठी वा काढण्यासाठी बॅंकेत जायची गरज नसायची. आपल्याकडे ए टी एम कार्ड येण्यापुर्वीच तिथे ती प्रचारात होती. त्याद्वारे सगळेच व्यवहार करता येत.
तिथे खाते उघडताना, व्याज हवे कि नको असा एक रकाना भरावा लागतो. मुस्लीम धर्मात व्याज घेणे गैर मानले गेल्याने, हि पद्धत पडली असावी.

तिथे बहुतेक सगळे काऊंटर्स मल्टीपर्पज असत. रांग एकच असे. आपला नंबर आला कि जो काऊंटर रिकामा झाला असेल तिथे जायचे. पैसे काढताना लेबर कार्ड दाखवावे लागे. चेक भरायचा असो कि रोख रक्कम, आपल्या पे ईन स्लीपवरच त्याची कॉम्प्युटराईज्ड एन्ट्रि करुन मिळत असे. त्या प्रिंटमुळे तिथल्या तिथे आपली खात्री करुन घेता येत असे.

काऊंटरवरचा बहुतेक स्टाफ़ अत्यंत नम्र असे व आम्ही त्याना नावाने ओळखत असु. वादावादी कधी होतच नसे. काऊंटरवरच्या मुली पण अगदी मनमोकळेपणी बोलत असत. चेष्टामस्करी होतच असे. ( एकदा सहज कंपनीच्या कामाला गेलो असताना एका मुलीने तुझे खाते कुठल्या बॅंकेत आहे असे विचारले. तिच्या बॅंकेत नसल्याने ती अर्थातच लटक्याने रागावली. मी म्हणालो कि आमच्या मुंबईत तुमची शाखा नाही ना, म्हणुन तुझ्याकडे नाहि उघडले, त्यावर ती म्हणाली कि अशी शाखा उघडली तर तु माझ्याकडे येशील का ? मी हो म्हणालो आणि योगायोगाने त्या बॅंकेची शाखा ईथे निघाली, त्या बरोबर तिने मला खाते उघडायला लावलेच.
ईथे सहज एक आठवण देतोय, १९९२ साली झालेल्या बॉम्बस्फोटात एका ओमानी बॅंकेचे नुकसान झाले होते. ओमानचा दशहतवादाला अजिबात पाठिंबा नाही, याचा आणखी वेगळा पुरावा, काय हवा. )

BBME मधल्या एका वृद्ध स्त्रीचा अनुभव तर खुपच विलक्षण होता. आम्ही सगळे तिला दिदी म्हणत असो. पन्नाशी उलटलेली हैद्राबादी बाई होती ती. कुठलेहि कटकटीचे काम तिला आम्ही सांगत असु. तिच्या टेबलवर विश्वासाने खुशाल आम्ही पैसे ठेवुन जात असु. ती कधीच कुणावर चिडत नसे.
तिची आणखी एक खासियत म्हणजे तिला नोटा मोजायची गरज कधीच भासत नसे. चिमटीत धरुन ती ज्या नोटा काढत असे, त्या नेमक्या तेवढ्याच असत. सुट्टे दे, बंदे दे, नव्या नोटा दे अश्या मागण्या ती न कंटाळता पुर्‍या करत असे. माझ्या ईतक्या वर्षांच्या अनुभवात मी तिच्यासारखी दुसरी स्त्री बघितली नाही.

तिथल्या स्पेशियल क्लीअरिंग बद्दल तर लिहायलाच हवे. हे क्लीअरिंग आपण स्वतः करायचे असे. पाच हजार रियालापेक्षा मोठ्या रकमेच्या चेकसाठी हि सुविधा असायची. हा चेक आणि पे ईन स्लीप घेऊन आपण आपल्या बॅंकेत जायचे. आणि त्याना सांगायचे कि आम्हाला हा चेक स्पेशियल क्लीअरिंग करायचा आहे. ती बॅंक आपल्याला एक पत्र देत असे, हे पत्र ज्या बॅंकेवर तो चेक काढलाय त्या बॅंकेच्या नावे असे. पे ईन स्लीप ते ठेवुन घेत असत. मग आपण तो चेक आणि ते पत्र घेऊन स्वतः त्या दुसर्‍या बॅंकेत जायचे. तिथे ताबडतोब बॅलन्स आणि सहि बघुन, त्या पत्रावर तसा शेरा मारला जात असे. आणि चेक ठेवुन घेतला असे. मग ते पत्र घेऊन आपण आपल्या बॅंकेत यायचे. व त्या पत्राने आपल्याला ताबडतोब क्रेडिट मिळत असे. अर्थातच याला वेळेचे बंधन असे. त्यामुळे सकाळी अकरा वाजायच्या आत हे सगळे पुरे करावे लागे. पण तिथल्या रस्त्यांमुळे आणि भन्नाट बेगामुळे आम्ही हे सहज पार पडत असु. या निमित्ताने माझे अनेक बॅंकेत जाणेयेणे होत असे.
माझ्या माहितीप्रमाणे आपल्याकडे अजुनहि अशी प्रथा नाही. पण तिथल्या परस्पर विश्वासाची पातळीहि गाठणे आपल्याला कठीण आहे.

वेळेच्या बाबतीत पण तिथला स्टाफ, लवचिक असे. आधी फोन केला, फ़ॅक्स केला तर ते आपल्यासाठी पैसे काढुन ठेवत असत. आणि हे सगळे कुठल्याहि भेटवस्तुची अपेक्षा न ठेवता केले जात असे.

काहि बॅंकांमधला स्टाफ नवखा असे, त्यावेळी तर मी स्वतः त्यांच्या कॉम्प्युटरवर मला हवे तसे बॉंड्स वैगरे टाईप करत असे.

त्यांच्यापैके बहुतेक जण भारतात शिकुन गेलेले असत. काहि जण तर माझ्याशी चक्क मराठीत बोलत असत. तिथे काऊंटरवर फार ऊंच काच वैगरे नसे. त्यामुळे संवादात मोकळेपणा असे. सुरक्षा रक्षक वैगरे पण नसत तिथे कधी.

अपुर्ण





Thursday, September 14, 2006 - 4:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओमानमधे काम करण्यापुर्वी आपला करार एंबसीमधे दाखवावा लागतो. त्यात आपले नाव असणे आवश्यक असते. सौदीप्रमाणे ब्लॅंक व्हिसा दिला जात नाही.
या करारात शक्यतो राहण्याची व्यवस्था, येण्याजाण्याचे तिकिट, वैगरे बाबी नमुद केलेल्या असतातच. तिथे शक्यतो राहण्याची व्यवस्था कंपनीतर्फेच केली जाते. त्यासाठी एखादा फ़्लॅट भाड्याने घेतला जातो, वा कंपनीचे स्वतःचे कॅंप्स असतात. नेमक्या कुठल्या अधिकारपदावर आपण रुजु होत आहोत यावए फ़ॅमिली अकॉमोडेशन मिळणार कि बॅचलर अकॉमोडेशन ते ठरते. कसलेहि असले तरी एसी हि तिथे अत्यावश्यक बाब आहे. हे अकॉमोडेशन बहुदा फ़र्निश्ड असते. फ़्रीजहि असतोच. अनेक कंपन्या सुसज्ज किचनहि देतात.
साधारणपणे करार दोन वर्षाचा असतो. येण्याजाण्याचे विमानाचे तिकिट दिले जातेच. उच्च पदावर असल्यास प्रत्येक वर्षी तिकिट मिळते. नाहितर दोन वर्षातुन एकदा मिळते.
नोकरीच्या संधी तश्या भरपुर आहेत, कामाच्या थिकाणी तसा काच नसतो. अंगभुत कौशल्यावर ईन्क्रिमेंट्स सहज मिळवता येतात. अनेक कंपन्यामधे उच्चपदावर भारतीय माणसे आहेत. अगदी कमीत कमी म्हणजे साधारण १५० ते २०० रियाल पगार असु शकतो.
एकट्या माणसाला आरामात राहण्यासाठी ६० ते ७० रियालच्या वर खर्च येत नाही. ( घरभाडे धरलेले नाही यात. )
भारतीयाना स्वतंत्रपणे व्यवसाय करता येत नाही. स्थानिक भागीदार घ्यावाच लागतो. पण तसा मिळवणे फार कठीण जाते असे नाही. अनेक भारतीय व्यावसायिक असा व्यवसाय करतातच.
कामगारांच्या कल्याणासाठी कायदे आहेत. कराराप्रमाणे सोयी सवलती मिळत नसल्यास तक्रार करता येते. आणि न्याय अवश्य मिळतो. कामगार चळवळ वा संप मात्र बेकायदेशीर आहे. ( आपल्याकडच्या कामगार चळवळीचे काय झाले हे बघता, अश्या नियमात मला तरी काहि गैर वाटत नाही. )
काहि प्रमाणात स्थानिक लोकाना नोकर्‍या द्याव्या लागतात. आणि त्या लोकांसाठी कामगार विमा योजना आहे. पण परदेशी कामगारांसाठी मात्र अशी योजना नाही. तरिही कंपनीतर्फे खुपदा वैद्यकिय सेवा दिली जाते. विमाहि उतरवला जातो. ( तिथे गेल्यावर रक्ततपासणी करावी लागते याचा उल्लेख आला आहेच. )
तिथल्या ईमारती, रस्ते बगिचे हे भारतीय कामगारांच्या श्रमातुनच उभे राहिले आहेत. या सर्व कामात भारतीय, खास करुन राजस्थानी, आंध्रप्रदेशी, गोवन, पंजाबी लोकाना प्राधान्य दिले जाते. पाकिस्तानी आणि बांगलादेशीहि असतात, पण तुलनेने त्यांचे प्रमाण कमी आहे.
यांची व्यवस्था एखाद्या मोठ्या कॅंपमधे केलेली असते. जेवणाची सोय कंपनीतर्फे केली जाते. दिवसाकाठी आठ तासाच्या वर काम केल्यास दुप्पट दराने ओव्हरटाईम मिळतो. शुक्रवारी मात्र सक्तीने रजा द्यावी लागते.
त्या वातावरणात दिवसभर काम करणे खरेच शारिरीक क्षमतेची कसोटी बघणारे असते. तासाकाठी त्याना काहि वेळ विश्रांति घेता येते. पण तरिही अत्याधुनिक मशिनरी, काटेकोर दर्जा नियंत्रण व सुरक्षिततेचे उपाय असल्याने, भारतातल्यापेक्षा श्रम कमी असतात.
या कामगारांचा पगार सहसा ५० ते १०० रियाल असतो. ओव्हरटाईम वेगळा.
पण तरिही सगळे आलबेल आहे असे नाही. तिथल्या सरकारने आवश्यक तेवढी काळजी घेतली असली तरी, त्यांचा छळ होतो तो भारतीयांमुळेच.
तिथे नोकरी मिळवुन देण्यासाठी ते लोक ईथे एजंटला भरपुर पैसे देतात. ( तिथे उच्चपदावर असणारे भारतीय देखील मलिदा खातात. ) त्यासाठी घर, शेती, दागदागिने वैगरे विकुन आलेले असतात. तिथली कमाई ईथल्यापेक्षा जास्त असली तरी, ते खर्च केल्याईतकी रक्कम जमा करु शकत नाहीत.
याबाबतिक त्यांची मानसिकताहि विचित्र होते. आपलाला झालेला त्रास घरी वा मित्राना कळवुन ते कामगार ईतराना सावध करत नाहीत. आणि एजंटाचे गुर्‍हाळ व्यवस्थित चालु राहते. हा खरोखरीच दुर्दैवी प्रकार आहे.
पण तरिही हा प्रकार फक्त कामगार वर्गाच्या बाबतीतच होतो. ईतराना असा अनुभव येत नाही.

माझा अश्या अनेक कामगारांशी संबंध यायचा. त्यांची सुखदुःखे ते मला सांगत असत. ( माझी एक कथा कायबोलि डॉट कॉम, अश्याच एका अनुभवावर आधारित होती. ) त्यानी केलेल्या श्रमामुळेच मला सुख मिळतेय, याचे भान मला सदोदित रहात असे.

पगार देणे, रजेवर जाताना हिशोब चुकता करणे, या निमित्ताने माझा त्यांच्याशी संबंध येई. मला ते आपलाच मानत. त्यांच्या घासातला घास मला देऊ करत. मीहि त्यांच्याबरोबर एखादेवेळी जेवत असे.

अपुर्ण.




Monday, September 18, 2006 - 4:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्कतमधे अनेक देशातील नागरिकांशी संपर्क येत असे. तसा तो ईतर देशातहि येतो, पण ओमानची खासियत म्हणजे, तिथे हे सगळे लोक, आपापल्या देशाची संस्कृति जपु शकत होते. तर त्या सगळ्या मंडळींची हि तोंडओळख.

मजुर वर्गात भारतीयांबरोबर पाकिस्तानी लोक पण खुप असत. शक्यतो कष्टाची कामे ते करत. अगदी मजुर असले तरी त्यांचे देखणेपण लपत नसे. बर्‍यापैकी उंची, मजबुत बांधा, गोरापान रंग, तरतरीत नाक, भेदक डोळे अशी त्यांची शरिरयष्टी असे. त्यांचा वेष बहुदा कफ़्तान, म्हणजे खाली ढगळ सलवार आणि वर पुर्ण बाह्यांचा कुडता असा असे. रंग साधारण फ़िकटच असत. खरे तर ते लोक तिथे फार दबुन असत. नाजुक विषयाना हात घातला नाही, तर मोकळेपणी बोलत असत.
त्यापेक्षा वरच्या दर्ज्याच्या कामात ते क्वचितच असत. त्याना ईंग्लिश बोलणे फारच अवघड जात असे. त्यानाहि अरेबिक शिकावे लागत असे, कारण उर्दुपेक्षा अरेबिक फारच वेगळी आहे. अश्या अधिकार्‍यांचीच असली तर कुटुंबं तिथे असत. त्या बायकांचा ड्रेस म्हणजे सलवार खमीस आणि ओढणी. पण हे तिन्ही बहुदा तीन वेगवेगळ्या रंगाचे असे. क्वचित त्या साड्याहि नेसत.

बांगलादेशी पण असत. त्यांच्या हिंदी बोलण्यावरुन त्याना ओळखता येत असत. ते स्वतः मात्र स्वतःला बंगाली म्हणुन घेत असत. ( आपल्या देशाच्या पुर्वेला असलेल्या राज्याला पश्चिम बंगाल का म्हणायचे, ते मला लहानपणी कळायचे नाही ) या दोन्ही लोकांची संस्कृति किती मिळतीजुळती आहे, हे बघितल्यावर बंगालची फाळणी झाली हे कटु सत्य पचवावे लागत असे. भाजीविक्री, मासे विक्री, ईस्त्री, टेलर अशी कामे ते करत असत. त्यांचा ड्रेस एरवी शर्टपॅंट असा असला तरी शुक्र्वारी मात्र ते लुंगीत दिसत असत. बांगला देशी बायका क्वचितच दिसत. त्यापण आपल्यासारखीच साडी नेसतात, पण कपाळ झाकेल असा घट्ट पदर घेतात.

नेपाळी कामगार पण खुप असत. बहुतेकांच्या नावात बहादुर असेच. अगदी नेक आणि कष्टाळु जमात. पण त्यापैकी सगळ्यांचा तोंडावळा एकसारखा असे असे नाही. काहिजण तर भारतीय म्हणुन पण खपतील असे दिसत. त्यांची भाषा नेपाळी असली तरी त्या भाषेची लिपी देवनागरीच आहे. ती वाचायला पण खुप मजा यायची.

आपला चौथा शेजारी श्रिलंका. तिथलेहि अनेक नागरिक तिथे होते. ते बहुतेक सगळे उंचीला कमी असत. बायका रंगाने सावळ्या आणि तरतरीत असल्या तरी, आपल्या नजरेतुन देखण्या नसत. त्या बहुदा हाऊसमेड किंवा टेक्स्टाईल वर्कर्स म्हणुन काम करत. एरवी त्या स्कर्टब्लाऊजमधे असल्या तरी शुक्रवारी देवळात वा चर्चमधे जाताना खास साडी नेसुन जात असत. त्यांची साडी दोन तुकड्यात असते. कमरेभोवती आणखी झालर काढलेली असे, पण वर पदर आपल्यासारखाच. आमच्या देवळाच्या अंगणाच्या एका कोपर्‍यात त्यानी गौतम बुद्धाची स्थापना केली होती. मला त्यांचे कौतुक वाटायचे कारण त्या चर्चमधे पण जायच्या आणि त्याच पावलाने देवळातहि तितक्याच नम्रपणे नतमस्तक व्हायच्या. कुठल्याहि परिस्थितीत देवाकडे पायाचे तळवे येणार नाहीत, अशी काळजी घेतच त्या बसायच्या.

फीलिपीन्सचे नागरिक तिथे खुप दिसत. गोरापान रंग. किंचीत स्थुल शरिर, मंगोलियन वंश असला तरी डोळे मिचमिचे नाहीत. असे त्यांचे रुप. या बायका हाऊसमेड, नर्स, सेल्सगर्ल म्हणुन कामे करायच्या. त्यामानाने पुरुष फार कमी होते. त्या देशाची अर्थव्यवस्था, या नागरिकानी मायदेशी पाठवलेल्या पैश्यावर बर्‍यापैकी अवलंबुन आहे. त्यांचा नॅशनल ड्रेसकोड असल्याप्रमाणे ते बहुतेक सगळे फ़िक्कट निळी जीन्स आणि पांढरा टीशर्ट या वेशात असत. त्यांच्या गोर्‍या रंगामुळे त्याना हाऊसमेड म्हणुन बरिच मागणी होती.

चिनी माणसे तिथे फारच थोडी दिसत. परंपरागत चिनी उपचारपद्धतीला त्यावेळी नुकतीच मान्यता मिळाल्याने, काहि डॉक्टर्स होते. त्या शिवाय चिनी बनावटीच्या कलाकुसरीच्या वस्तु विकण्याच्या व्यवसायातहि त्यापैकी काहि होते.

ईजिप्तचे लोक पण तिथे संख्येने भरपुर. ( ईजिप्त हे नाव मागाहुन ठेवलेले, त्या देशाचा उल्लेख मिस्र असाच केला जातो. ) पुरुCः धिप्पाड, गोरे, भव्य कपाळ असलेले असत. बहुतेकांचे केस कुरळे असत. ते बर्‍यापैकी उच्चपदावर असत. ईन्जिनीयर्स, डॉक्टर्स अश्या व्यवसायात ते होते. बायकाहि बर्‍याच दिसत. त्या जरा स्थुल, मध्यम उंचीच्या, गोर्‍या असत. मॅक्सी सारखा एक प्रकार आणि डोक्यावर हिजाब असा त्यांचा वेष असे. आपल्या बायकाना लाज वाटेल, ईतक्या मोठ्या प्रमाणात त्या बडबड करतात. त्यांच्या देशाच्या मानाने ओमानमधे बरिच स्वस्ताई असल्याने, त्या बहुतेक वेळ शॉपिंग करत असत. आणि त्यांच्या ” आखिर केम ” या घासाघीशीमुळे दुकानदार कावलेले असत.

सुदानी पुरुष आणि बायका तिथे मोठ्या संख्येने आहेत. सुदान हा लाल समुद्राला लागुन असलेला आफ़्रिकन देश. एकेकाळी अत्यंत श्रीमंत पण ईतिहासात सदोदित लुटला गेलेला. ( ईजिप्तच्या पिरॅमिड आणि थडग्यातले बहुतेक सोने सुदानमधुन लुटुन नेलेले आहे. ) सुदानी माणसाची सरासरी उंची सहा फुटांपेक्षा अधिक. ते लोक अंगात अघळपघळ झगा घालत असले तरी डोक्यावर भली मोठी पांढरी पगडी घेतात. ती खुपशी आपल्या फ़ेट्यासारखी असते. रंगाने ते काळेकुळकुळीत असतात आणि त्यांचे केस मात्र आफ़्रिकन माणसांप्रमाणे स्पायरल कुरळे असतात.
बायका पण तश्याच उंच आणि धिप्पाड. एकदा माझ्यासमोर तिथल्या बागेतला एक मोठा बाक, दोन सुदानी बायकानी लीलया उचलला होता. या बायका अंगाभोवती एक कापड साडीसारखेच गुंडाळतात. डोक्यावर पदरहि असतो, पण हे नेसु ईतके बेंगरुळ असते, कि सारखे ईथुन तिथुन खाली घसरत असते.

लेबनॉन, पॅलेस्टाईन. ( अरेबिक मधे अनुक्रमे लुबनान आणि फ़िलीस्तान ) ईथले नागरिक पण बरेच. ते अरेबिक भाषा बोलतात आणि वंशाने अर्थातच अरब आहेत. ( अरब म्हणजे मुसलमान हे एक चुकीचे समीकरण आहे. अरब क्रिश्चन पण असतात. तसेच नावावरुन त्यांचा धर्म जाणणे कठीण असते. सलीम क्रिश्चन असु शकतो आणि जॉन मुसलमान. ) पण त्यांची चेहरेपट्टी खास वेगळी नसते. अरेबिक भाषा हि त्यांचीहि मातृभाषा असल्याने, त्याना तिथे नोकरी मिळणे सोपे जाते.
सगळ्या युरप वासीयाना तिथे सरसकट गोरे म्हंटले जाते. अनेक कंपन्यात ते उच्चपदावर असले तरी, त्याना तिथे तेवढी किम्मत दिली जात नाही.

या सगळ्या मंडळींशी आमची रोज गाठभेट होत असायची. मैत्रीचे धागेहि जुळले.

अपुर्ण.




Friday, September 22, 2006 - 4:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओमानकडचे खनिज तेलाचे साठे, ईतर आखाती देशांच्या तुलनेत कमी प्रमाणात आहेत. खरे तर ओमानमधले उद्योगधंदे तसे प्राथमिक अवस्थेतच आहेत.
आमच्या वापरातल्या फ़ारच थोड्या वस्तु, सनाफ़ी सल्तनते ओमान म्हणजेच मेड इन ओमान, असत. पण त्यात आता काहि बदल होत आहेत.

उद्योगधंद्याच्या विकासासाठी, सरकारचे धोरण खुपसे जबाबदार असते. ओमानमधे कामगार कल्याणाचे काहि नियम, पर्यावरणाचे संरक्षण करणारे काहि नियम सोडल्यास फ़ारसे कायदेकानुन नाहीत. ( कानुन हा हि अरेबिक शब्द ) आपल्यासारखे ईन्स्पेक्टर राज नाही. कर वैगरे नसल्याने, फ़ारसे रिटर्न्स वैगरे भरावे लागत नहईत. क्वचित सर्व्हे रिपोर्ट्स भरावे लागतात तेवढेच.
जे नियम आहेत त्यांची अपरिहार्यता कुणालाहि पटेल अशीच आहे. उदा. कुठेहि खोदकाम करण्यापुर्वी, पुरातत्व खात्याची परवानगी घ्यावी लागते. ओमानमधे प्राचीन संस्कृतीचे बरेच अवशेष सापडत असतात, याचा उल्लेख वर आलाच आहे. बांधकाम चालु असल्यास, सभोवती प्लायवुडची संरक्षक कुंपण घालावे लागते. बांधकामासाठी वापरायच्या सिमेंटच्या प्रत्येक ब्लॉकच्या लॉटमधील काहि ब्लॉक्सची प्रयोगशाळेत चाचणी करावीच लागते. असे काहिसे नियम आहेत.
एक्स्पायरी डेट उलटुन गेलेली कुठलीच वस्तु दुकानात ठेवता येत नाही. ती बलदियाच्या ताब्यात द्यावी लागते, आणि बलदिया ती नष्ट करते, आणि तसे रितसर प्रमाणपत्रहि मिळते.

ओमानमधले उद्योगधंदे नुकतेच बाळसे धरु लागले आहेत. आपल्याकडे मुलभुत उद्योगात, टाटा मंडळीनी पहिले पाऊल उचलुन, आपल्या प्रगतिचा पाया घातला, पण पोलाद, सिमेंट आदी उद्योगाना लागणारा कच्चा माल, कामगारवर्ग आपल्याकडे सहज उपलब्ध होता हे विसरुन चालणार नाही.
ओमानमधे सुरवातीच्या उद्योगधंद्यात गव्हाच्या पदार्थांचे उत्पादन करणारी ओमान फ़्लोअर मिल, हि एक जुनी कंपनी. या कंपनीचे मोठे सायलोज, कोर्निशला आहेत. या कंपनीतर्फे आटा, मैदा, साबुदाणा असे अनेक प्रकार बाजारात आणले जातात. ओमानमधे बेकरी उद्योगपण बर्‍यापैकी तेजीत आहे. पारंपारिक पदार्थांबरोबर, पेस्ट्रीज, मिठाया यांचेहि उत्पादन होते.
सिमेंट, ईलेक्ट्रिक केबल्स यांचे कारखाने आहेत. ओमानमधे नैसर्गिक रित्या संगमरवर सापडतो. तोहि उद्योग आहे. मक्यापासुन तेल काढले जाते. मासेमारी आणि खजुराची शेती, हे पारंपारिक उद्योग. त्यात प्रगति आहेच.
ओमानी कलाकुसरीच्या वस्तु पण देखण्या असतात. ओमानी खंजर ( अरेबिक शब्द ) हे त्यांचे मानचिन्ह आहे. अनेक ओमानी माणसाच्या कंबरपट्ट्यात हा असतो. हा पट्टा आणि खंजराची आवरण शुद्ध चांदीचे असते. अगदी नाजुक काम असते त्यावर. चामड्याच्या वस्तु, मातीच्या वस्तु पण चांगल्या असतात.

दुध आणि दुधाचे पदार्थ यांची निर्मिती होते. दुध, दहि, ताक, चीज, क्रीम असे अनएक पदार्थांचे उत्पादन होते. आईसक्रीम आणि कुल्फ़ी पण असते. पण या पदार्थाना अमरात आणि सौदी मधुन आलेल्या वस्तुंशी स्पर्धा करावी लागते. कोकाकोला आणि पेप्सी ( अरेबिक उच्चार बेब्सी ) बाटल्या भरण्याचे उद्योग आहेतच.

बहुतेक गाड्या आयात केलेल्या असल्या तरी त्यांची डिलरशिप आणि सर्व्हीस हा एक प्रगतीशील उद्योग. विमानकंपन्यांची तिकिटविक्री हा बर्‍यापैकी स्थिरावलेला उद्योग. बाहवान ग्रुपची त्यात जवळजवळ मक्तेदारी आहे.
बांधकाम व्यवसायहि तेजीत आहे. नव्याने शहरे वसत आहेत. रस्ते निर्माण होत आहेत.
रेस्टॉरंट्स हा पण एक चांगला उद्योग. यातहि अजुन बराच वाव आहे. नव्याने उघडलेले रेस्टॉरंटदेखील व्यवस्थित चालते.
एकंदर उत्पादनापेक्षा व्यापारात जास्त प्रगति आहे. घाऊक बाजारातुन माल आणायचा वा आयात करायचा असाच व्यवहार चाललेला असतो. याबाबतीत खीमजी रामदास ग्रुपकडे बर्‍याच एजन्सीज आहेत.

ओमानी लोकाना महागड्या वस्तुंचा षौक आहे. त्यामुळे रोलेक्स, बेंझ वैगरे ब्रॅंड्सची पण चलती आहे.
( पण तरिही ते षौक तसे स्वस्तच आहेत. आप्ल्याडे जेंव्हा लेक्झस गाडी ५५ लाख रुपयाना मिळत होती तेव्हा ती तिकडे १७ लाख रुपयाना मिळत असे. )

ओमानमधे पर्यटन उद्योगाला भरपुर वाव असुनदेखील, त्याबाबतीत फारसे प्रयत्न होत नाहीत. तिथे रितसर ओमान फ़ेस्टिव्हल सारखे उपक्रम राबवले जातात, पण त्याची फारशी जाहिरात केली जात नाही. ( बघा ना मी लिहिपर्यंत तुम्हाला ओमानचे कुठे ओळख होती ?) याचे आम्हाला उमगलेले कारण म्हणजे, या उद्योगातुन अपरिहार्यपणे येणारी संस्कृति, ओमानला नको आहे.
( दुबईमधे कुठल्याहि ठिकाणी पाच मिनिटे उभे राहिल्यावर, खांद्यावर रशियन मुलीचा हात पडतो, आणि टेक मी होम, असे आर्जव केले जाते. याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे. असे प्रकार ओमानमधे होत नाहीत. )
दुबईमधे सिनेमा थिएटर्स व्यवस्थित चालत असली तरी, सिनेमाचे शुटिंग झालेले दिसत नाही. अलिकडे अक्षय कुमार आणि लारा दत्ताचे एक गाणे तिथे चित्रित झालेले बघितल्याचे आठवतेय. या बाबतीतदेखील तिथे चांगला वाव आहे.

पण तरिही सगळेच आलबेल आहे असे नाही. ओमानी उद्योगांचा एक प्रश्ण म्हणजे, अतोनात स्पर्धा. बाजारात बहुतेक वस्तुंचे दर सारखेच आहेत. ( कुवैत वॉर सुरु झाल्यानंतर, तिथल्या सुलतानाने दिलेल्या तंबीचा उल्लेख वर आलाच आहे. ) त्यामुळे ग्राहकाना आकर्षुन घेणे, कठीण जाते. दुसरे म्हणजे, ओमानी रियाल भक्कम असला तरी स्थिर असल्याने, ऊधारीची वसुली हा एक मोठा प्रश्ण असतो. ( आफ़्रिकन चलन सदोदित घसरत असल्याने, उद्या चलनाची किंमत काय असेल याची शाश्वती नसते, त्यामुळे बहुतेक सगळे व्यवहार रोखीने होतात. )

पण एकंदर सगळे छान चाललेले असते.

अपुर्ण



Monday, September 25, 2006 - 3:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओमानच्या पोलिसाना आरोपी म्हणतत. ( हो मी पुर्ण शुद्धीवर आहे ) आरोपी म्हणजे आर. ओ. पी. म्हणजेच रॉयल ओमान पोलिस. अरेबिक भाषेत शब्द आहे शुर्ता.
कुवैतवरती हल्ला झाला त्यावेळी तिथल्या राजाचे बॉडिगार्ड्स एवढे स्थुल होते कि त्याना पळणेच अवघड झाले होते.
ओमानमधले पोलिस कधीहि तसे दिसले नाहीत. त्यांचा योग्य तो दरारा असायचा, पण त्यांचा मैत्रीचा हातदेखील मिळायचा.
कामाच्या निमित्ताने त्यांच्याशी अनेकवेळा संबंध यायचा. पण त्यांची अरेरावी, भ्रष्टाचार कधीच अनुभवाला आला नाही.
त्यांचा ड्रेस खाकी शर्ट पॅंट असा असतो तर ट्रफ़िक पोलिस पांढरा शर्ट घालतात आणि वर पॅरट ग्रीन रंगाचा, चन्देरी फ़्लुरोसंट पट्ट्या लावलेला कुडता घालतात. पण त्यानी देखील कधी रस्त्यावर गाडी अडवुन, चायपानी मागितले असे कधी झाले नाही.
तिथे सीट बेल्ट लावला नाही तर जबरदस्त दंड करण्याची तरतुद आहे, पण तोहि सहसा वसुल केला जात नाही. हाताने खुण करुन, तो घालायची विनंति केली जाते.
आजकाल आपल्याकडच्या कुठल्याहि देवळात जे पोलिस असतात, ते कायम पुढे सरा, पुढे सरा असा पुकारा करत असतात. पण रांग तोडणार्‍यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात.
मस्कतमधे महाशिवरात्रीला प्रचंड गर्दी होते. एरवी निवांत रस्ता असल्याने पोलिस बंदोबस्त नसतो, पण त्यावेळी तिथे पोलिस असायचे. त्या ज्या तर्हेने गर्दीचे आणि गाड्यांचे नियंत्रण करायचे, त्याला खरेच तोड नाही.
तिथला अगदी पहिलाच अनुभव देखील फार सुखाचा आहे. मत्राहला आम्ही दोघे मित्र गरबा नाचायला गेलो होतो. खुपच उशीर झाला म्हणुन आम्ही दोघे जरा लवकर निघालो. रस्त्यात आम्ही दोघेच होतो. मत्राहच्या गल्ल्या भरभर ओलांडताना, एका गल्लीच्या टोकाशी आम्हाला दोन पोलिस दिसले, आम्ही भरकन माघारी फ़िरलो, तर त्या दोघानी आम्हाला बोलावले. ( आम्हाला चांगलाच घाम फुटला ) तर त्यानी आम्हाला सांगितले, तुम्हाला या गल्लीने जायचे असेल तर खुषाल जा. आम्हाला बघुन रस्ता बदलु नका, आमची काहिच हरकत नाही. ( विश्वास बसणे कठिण आहे, पण हे सत्य आहे. )
रात्री अपरात्री रस्त्यावरुन एकटे चालायला तिथे कधीच भिती वाटायची नाही. रात्रपाळीच्या नर्सेस देखील मध्यरात्री रस्त्यावरुन खुषाल जातात. नजरेच्या टप्प्यात कायम गस्त घालणारे पोलिस असतात.
तिथे अपघात झाल्यावर मात्र पोलिस आल्याशिवाय गाड्या हलवता येत नाहीत. माझ्या गाडीला पण एकदा बारिकसा अपघात झाला होता. केवळ सीटबेल्टमुळे मी वाचलो. मागुन एका टॅक्सीने ठोकरल्याने, माझी गाडी पुढच्या गाडीवर आपटली. माझा हात डॅशबोर्ड्वर आपटला, पण बाकि काहि झाले नाही. पोलिस आल्यावर मी हात चोळत होतो, तर त्याने येऊन पहिल्यांदा माझी चौकशी केली. अगदी खांद्यावर हात ठेवुन, काहि दुखतेय का, पाणी वैगरे हवेय का, डॉक्टरकडे घेऊन जाऊ का, अशी चौकशी केली. आणि पुढील चौकशीसाठी माझी गरज नसल्याने, तु जा असे सांगितले.
एरवी रस्त्यावर फारसे पोलिस दिसत नाही, पण लांबच्या प्रवासात त्यांच्या गस्त घालणार्‍या गाड्या अवश्य दिसतात.
ओमानमधे सैन्याची तशी फार जरुरी नाही. यु ए ई शी मैत्रीचे संबंध आहेत. ओमानचा एक भुभाग तर चक्क यु ए ई मधे आहे.
सौदी आणि ओमानची बहुतेक सीमा वाळवंटातुन जाते, आणि ती सरळ रेषा आहे. दक्षिणेकडे येमेनशी कधीकाळी सीमावाद होता, पण येमेनमधेच अंतर्गत यादवी आहे.
पण तरिही ओमानकडे तिन्ही दले आहेत. सुलतान त्यांचा प्रमुख आहे. पण त्या सैन्याने कधी युद्धात भाग घेतला नसावा. कधीतरी त्यांचे संचलन वैगरे व्हायचे.
सुलतान काबुस बिन सैद तर स्वतःअची गाडी स्वतःच चालवतो.
मी तिथे असताना, एकदा फ़्रान्सचा राष्ट्राध्यक्ष तिथे आला होता. रस्त्यावरची वाहतुक थांबवली होती, पण आम्ही तिथे गेल्यावर, पोलिसानी तुम्हाला रस्ता क्रॉस करायचा आहे का, अजुन त्याना यायला वेळ आहे, तुम्ही जा असे आपणहुन सांगितले.
लक्षात घ्या हि सुरक्षा परदेशी पाहुण्यांसाठी होती, स्थानिक मंत्राना कधीही अशी गरज भासत नाही.
कुवैत वॉर सुरु असताना, गल्फ़ एअरने, सुरक्षिततेच्या कारणासाठी आपली सर्व विमाने, मस्कतला आणुन ठेवली होती.

अपुर्ण.




Thursday, September 28, 2006 - 4:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्कतला पुर्वी उत्तम कॅसेट्स मिळत. हिंदी गाण्याचे अप्रतिम कलेक्शन असे.
पण तिथे जसे कलेक्शन मिळत असे तसे भारतात मिळणे शक्यच नव्हते. उदा नुरजहाॅं आणि लता यांची एकत्रिक कॅसेट मिळत असे. म्हणजे दोघींचे साधारण एकाच विषयावरचे गाणे एकापाठोपाठ एक, असे कलेक्शन.
( नुरजहाचे गायन पाकिस्तानात गेल्यावर फारच उग्र झाले होते. त्यामानाने लताने गोडवा आत्ता आत्ता पर्यंत टिकवला होता. )
मीराबाईची गाणी घेतली तर लताची सगळी गाणी असायचीच शिवाय, जुथिका रॉय, गीता दत्त, सुमन कल्याणपुर, सुबलक्ष्मी, माणिक वर्मा, लक्ष्मी शंकर आदी गायिकानी गायलेली गाणीहि एकत्र मिळायची.
ही सगळी गाणी साऊंडट्रॅक वरुन रेकॉर्ड केली असल्याने अगदी सुस्पष्ट असत.

त्यावेळी आपल्याकडे HMV , EMI सारख्या कंपन्या कॅसेट्स काढत असत. पण त्यांचा दर्जा अगदी वाईट असे. दोनचारदा वाजवल्यावर कॅसेट गाण्यात स्वतःचा सुर मिसळत असे. शिवाय एका बाजुची वेळ पुर्ण अर्धा तास देखील नसे.
त्यामुळे तिथल्या कॅसेट्स आम्हाला पर्वणी वाटत. भरपुर कलेक्शन केले होते मी.
त्यावेळची मजा म्हणजे, गाणी कुठलिही असो, कव्हरवर रेखा, श्रीदेवी, माधुरी किंवा सोनम याच नट्यांची चित्रे असत. या नट्या खुप लोकप्रिय होत्या तिथे.
पण या सगळ्या कॅसेट्स पायरेटेड असत. पुढे ओमानमधे याविरुद्ध कायदा झाला. आणि दुकानातील सगळ्या कॅसेट्स जप्त करुन, जाहिररित्या नष्ट करण्यात आल्या.
त्यावेळी व्हीडीओ कॅसेट्स चे पण फार प्रस्थ होते. आपल्याकडे लायब्ररीत मिळणार्‍या कॅसेट्स अगदी वाईट दर्ज्याच्या तर असतच शिवाय त्यात भरमसाठ जाहिराती असत. तिथे त्याहि दर्जेदार मिळत. तिथे लायब्ररीज पण होत्या.
बघायचे राहुन गेलेले अनेक जुने सिनेमे तिथे बघता आले.
पुढे सीडींचा जमाना आला, मल्टिप्लेक्स आले त्यामुळे हे सगळे मागे पडले.
पण भारतात बघितले नसतील असे गाण्यांचे, मनोरंजनाचे कार्यक्रम मी तिथे बघितले.

अपुर्ण



Tuesday, October 03, 2006 - 3:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओमानमधे तशी मोजकीच वर्तमानपत्रे प्रसिद्ध होतात. ओमान आणि ओमान डेली ऑब्झर्व्हर असे दोन मुख्य पेपर. ओमानच्या सुलतानाचा फोटो, रोज असायचाच. त्याशिवाय काहि स्थानिक बातम्या, हवामानाचा अंदाज, फ़्लाईट स्केड्युल्स, बंदरात येणारी जहाजे, एक्स्चेंज रेट्स, सरकारी टेंडर्स, घोषणा असतच. भारतासंबंधी बातम्या असतच. त्यामानाने ईतर देशांच्या बातम्या कमी असत.
बातम्या देताना कुठलाहि पुर्वग्रह ठेवल्याचे जाणवत नसे. हे दोन्ही पेपर आम्ही रोज चाळायचोच, पण आम्हाला आकर्षण असायचे ते दुबईहुन प्रसिद्ध होणार्‍या खलीज टाईम्स आणि गल्फ़ न्युज या पेपर्सचे. हे दोन्ही पेपर्स मस्कतमधे दुपारी मिळत. त्यांच्या किमती नाममात्रच होत्या, पण पाने भरपुर असत. अनेक जाहिराती, छोट्या जाहिराती असतच. छोट्या जाहिरातीत नोकरीसंबंधी, पी जी अकॉमोडेशन, सेकंड हॅंड कार्स, कुत्रे मांजरी अश्या अनेक जाहिराती असत.
ओमानमधे समजा आपल्या स्पॉन्सरशी वादावादी होवुन जॉब सोडायची वेळ आली, तर त्या व्यक्तीला ब्लॅकलिष्ट करुन ओमानमधे प्रवेशबंदी करता येत असे. समजा जॉब बदलायचाच असेल तर मुळ स्पॉन्सरचे ना हरकत प्रमाणपत्र लागे.
माझ्या माहितीप्रमाणे अमरातीत तसा नियम नव्हता. त्यामुळे मुळ स्पॉन्सरला खल्लीवल्ली ( आठवतोय हा शब्द ? मधे खुपच वापरात होता आपल्याकडे. याचा अर्थ साधारण आय डोन्ट केअर, किंवा गेलास उडत असा. ) करुन बरेच जण जॉब बदलत असत. त्यावेळी त्या व्यक्तीच्या फोटोसकट मुळ कंपनी, सदर ईसम ( अरेबिक शब्द ) वा स्त्री आमच्या नोकरीत नाही, त्याच्याशी व्यवहार केल्यास कंपनी जबाबदार नाही, अश्या जाहिराती दिल्या जात. त्या बर्‍याच जाहिराती या दोन्ही पेपर्समधे असत. टाईम्स ऑफ़ ईंडियामधली काहि सदरे त्या पेपरमधे परत छापत असत.
या पेपरबरोबरच गुरुवारी खास स्त्रीयांसाठी पुरवणी मिळत असे. त्यात हौशी लेखकाना स्थान असे. पाककृति वैगरे असतच पण मजेशीर स्पर्धादेखील असत. हिट नावाचा स्प्रे बाजारात नव्याने आला तर तो वापरुन, सगळ्यात जास्त वजनाचे झुरळ मारणार्‍या व्यक्तीला बक्षीस ठेवण्यात आले होते. मारलेले झुरळ पेपरसोबत मिळणार्‍या प्लॅश्टिकच्या पिशवीत भरायचे. त्यांच्या केंद्रावर जाऊन, वजन करायचे आणि रितसर पावती घ्यायची. ( झुरळाचे काय करायचे, ते मात्र लिहिलेले नव्हते. ) ती स्पर्धा एका गोवन बाईने जिंकली होती. आणि ती म्हणाली होती, ईथे दुबईत कसली मरतुकडी झुरळे असतात हो, आमच्या गोव्यात हि एवढी असतात.

याच पुस्तकात हे करुन पहा, अश्या स्पर्धाहि ठेवल्या जात. पण मला मुद्दाम एक नमुद करावेसे वाटते, कि अश्याच एका अंकात एका बाईने भाजल्यावर करायचा एक घरगुति उपाय दिला होता, आणि बक्षीस पण जिंकले होते. त्याला एका भारतीय डॉक्टरने जोरदार आक्षेप घेतला होता, आणि त्या उपायाचा अशास्त्रीयपणा दाखवुन दिला होता. त्याची दखल घेऊन, खलीज टाईम्सने ती स्पर्धा तात्काळ रद्द केली होती.
याच साप्ताहिकात काहि उल्लेखनीय लेखहि यायचे. कुवैत वॉरच्या काळात, दिवस भरल्याने, विमान प्रवास करता न आल्याने, तिथेच एका स्थानिक कुटुंबाच्या आधारे राहुन, बाळाला जन्म देणार्‍या एका भारतीय बाईचे मनोगत फारच हृदयस्पर्षी होते.
या पेपरसोबत अनेक देशांच्या स्वातंत्र्यदिनी खास पुरवण्या निघत असत. त्या देशासंबंधी लेख, माहिती व जाहिराती असत. दुबईमधे जवळजवळ सर्वच देशाचे नागरिक रहात असल्याने, बहुतेक देशांबद्दल घरबसल्या माहिती मिळे. १५ ऑगष्टला निघणारी भारताची पुरवणी सगळ्यात मोठी असे, हे अभिमानाने सांगावेसे वाटतेय.
गल्फ़ न्युज मात्र त्या मानाने कमी लोकप्रिय होता.
ओमानमधे भारतीय भाषातली नियतकालिके सहज मिळत. अगदी लोकसत्ता, मटा पण मिळत. पेपर टाकुन जाणारे बहुदा बांगला देशी असत, आणि ते बाईकवरुन येत असत. ओमानमधे एरवी बाईक फारच कमी वापरात आहेत. तिथल्या हवेत, बाईक चालवणे तसे कठीणच आहे.

ओमानमधे काहि स्थानिक नियतकालिके पण निघत. अल शबीबा ( अर्थ तरुणाई ) नावाच्या एका साप्ताहिकाशी माझा जवळुन संबंध होता. हे साप्ताहिक दोन भाषातुन निघत असे. अरेबिक आणि ईंग्लिश. पण ते एकत्रच छापले जात असे. वरुन ईंग्लिश आणि खालुन वाचल्यास अरेबिक असा प्रकार. यात मानापमानाचा प्रश्णच नव्हता, कारण दोन्ही भाषा आपापल्या जागी अव्वल ( अरेबिक शब्द ) स्थानीच होत्या.

अपुर्ण



Thursday, October 05, 2006 - 4:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऊन्हाळ्याच्या दिवसात आमच्या भटकंतीवर खुप बंधने असायची. घरी बसुन व्हीडिओवर सिनेमे बघणे, वाचन करणे, साफसफाई करणे नाहितर चक्क झोपा काढणे असे करत वेळ काढावा लागे.
गुरुवारची देवळाची फेरी कधी चुकत नसे. त्या निमित्ताने आठवड्याची खास खरेदी पण होत असे. पण हवा जरा निवु लागली, कि आमचे भटकंतीचे बेत जमु लागत. मस्कतच्या आजुबाजुला असणार्‍या काहि ठिकाणांची ओळख करुन घेऊ. रुवीजवळ समुद्रकिनारा नाही. कोर्नीश ते मस्कत हा एक बांधीव किनारा आहे. मधे अगदी थोडीशीच अरुंद चौपाटी आहे. कोर्निशजवळची गर्दी बागेपर्यंतच टिकते, पुढे मात्र किनारा अगदी निवांत आहे. समुद्राच्या किनार्‍याने बरेच दुरवर जाता येते. अगदी रात्रीहि तिथे फ़ेरफ़टका मारता येतो. मस्कत भाग मात्र रात्रीच काय संध्याकाळीहि निर्जन वाटतो.

पण मस्कतहुन जवळच आहे तो कंताब बीच Qantab किनारा फारसा विस्तीर्ण नाही, पण मनोहारी आहे. दोन्ही बाजुने डोंगरानी वेढला आहे. तिथले डोंगर नेहमीसारखे काळे नसुन सोनसळी पिवळे आहेत. संध्याकाळच्या वेळी तर ते छानच झळाळुन उठतात. तिथेच काय ओमानच्या कुठल्याच समुद्रकिनार्‍यावर खाण्यापिण्याच्या स्टॉल्सची गर्दी नाही. एखादे दुकान असलेच तर. कंताब किनार्‍याच्या समोरच एक नैसर्गिक बोगदा आहे. ( मी मागे उल्लेख केलेले अक्षय कुमार आणि लारा दत्ताच्या गान्याचा काहि भाग ईथे चित्रित केलाय. ) त्या बोगद्यापलिकडे समुद्रच आहे, पण त्या बोगद्याखालुन जायची अनिवार ईच्छा मात्र होतेच. एकदा धाडस करुन एका कोळ्याला आम्ही त्यातुन पलिकडे न्यायची विनंति केली. योग्य पैश्यात तो तयार झाला. हि आमची पहिलीच सहल असल्याने, मुख्य किनार्‍यावर पोहायची परवानगी आहे का, अशी आम्हाला शंका होती. पण आमच्या नावाड्याने एका किनार्‍यावर सोडायचे कबुल केले, व काहि वेळाने तो न्यायला परत येणार होता. त्या बोगद्याखालुन जाण्यात खरेच थरार होता. ओमानमधला समुद्र अतिस्वच्छ असल्याने, सतत तळ दिसतो, पण त्यामुळेच तळ वर उचलल्याचा भास होतो आणि खोलीचा अंदाज येत नाही.
आम्हाला त्याने नेऊन सोडले ती जागा खरेच रमणीय होती. दोन्ही बाजुला उंच कडे व मधे अगदी छोटा वाळुचा भाग. आम्हाला हवा तसा एकांत मिळाला तिथे. मग काय सगळेच पाण्यात उतरलो. पाणी जेमेतेम कमरेला लागत होतो. लाटा अजिबात नव्हत्या, पाणी स्वच्छ त्यामुळे चालत चालत बरेच आतवर गेलो. पाण्याची खोली जरा वाढली तसे परत फिरलो. आता भरतीचे पाणी वाढु लागले आणि आमची जागा आटु लागली. आमचा नावाडी सांगितल्याप्रमाणे येतो कि नाही याची धाकधुक होती, पण तो आला. आणि आमच्या भटकंतीचा श्रीगणेशा झाला. पुढे अनेकवेळा गेलो तिथे. मग वर्दळहि वाढु लागली. पण पुढे एकदा माझ्या काहि मित्राना, तिथे जेली फ़िशचा दंश ( हा शब्द बरोबर नाही, स्पर्ष म्हणणे योग्य आहे. ) झाल्याने ते आजारी पडले. त्यामुळे तो किनारा उगाचच मनातुन उतरला.
त्या पुढचे ठिकाण म्हणजे, कुरुम बीच. Qurum तिथे जाताना गुलाबाच्या बागेजवळुन जावे लागते. त्या बागेच्या मागेच विस्तिर्ण उद्यान आहे. तिथे कृत्रिम धबधबे, सरोवर सगळेच उपलब्ध आहे. संगीतावर नाचणारे कारंजे आहे. तिथे अनेकवेळा जत्रा भरतात. एरवी बाजारात विकायला नसणारे पदार्थ म्हणजे आंबाडीची ताजी बोंडे, विलायती चिंचा वैगरे तिथे विकायला असत. तो मोह टाळुनच बीच वर जावे लागते. वाटेत दोन्हीबाजुने बकुळीची झाडे आहेत. त्या हवेत भरभरुन फ़ुलते बकुळी. दोन्ही बाजुला प्रयत्नपुर्वक राखलेली हिरवळ आहे. आणि त्या हिरवळीवर फिरायला, टेकायला, लोळायला कुठलीच आडकाठी नाही.
प्रत्यक्ष बीच विस्तिर्ण आहे. काहि हॉटेल्स आहेत. एक मोठे सुपरमार्केट आहे. किनारा अगदी स्वच्छ आहे, आणि तिथुन सुर्यास्त फार छान दिसतो.

तसा रुवीपासुन सीबपर्यंतचा रस्ता हा समुद्राला समांतरच जातो. त्यामुळे एका बाजुला दुरवर समुद्र दिसतच असतो. आणि स्थानिक लोक तिथे फेरफटका मारायला जातातच. ( अरेबिक मधे समुद्राला बहार असा शब्द आहे. कपडे धुण्याच्या एका पावडरीचे तेच ट्रेडनेम आहे. त्याचा कारखानाहि याच परिसरात आहे. ) सीबपासुन मात्र काहि फाटे फुटतात. एक रस्ता जातो सोहारला, तोच पुढे दुबईला जातो.
दुसरा जातो निझवा, नाखल या गावांकडे. आणखी एक जातो दक्षिणेकडे, सलालाहला.
सोहारपर्यंत माझे अनेकवेळा जाणे व्हायचे. तिथेहि वाटेत नझीम पर्क म्हणुन एक मोठी बाग लागते. तिथुन जवळच जेल आहे. या रस्त्यावर अनेक बंगले लागतात. त्यांच्या खजुराच्या बागा आहेत. सुलतानाचा खाजगी विमानतळ, स्टड फ़ार्म वैगरे ईथे आहे.
ईथे अनेकानी हौसेने चिकुची झाडे लावलेली आहेत. ह रस्ता अगदी दुबईपर्यंत सरळसोट आहे. गाडी चालवताना डुलकी लागणे टाळावे लागते. सोहारमधे मक्याची शेते आहेत. लिंबाचीहि शेते लागतात. ईथुन दुबईला रस्त्याने जाता येते पण त्यासाठी ईमिग्रेशनचे सोपस्कार पार पाडावे लागतात.

निझवा गावाला गरम पाण्याचे नैसर्गिक झरे आहेत. पिवळ्या दगडात बाधुन काढलेली गरम पाण्याची विहिर आहे. पाणी निळेशार असुन त्यात सतत बुडबुडे येत असतात. पण तिथलिही स्वच्छता वाखाणण्याजोगी आहे. प्रत्यक्ष त्या विहिरीत उतरता येत नाही. त्यातले गरम पाणी पाटाने बाहेर नेलेय व दोन्ही बाजुने छोट्या छोट्या बाथरुम्स बांधलेल्या आहेत.

नाखल गावात एका नदीचा उगम आहे. ते आमचे खास आवडीचे ठिकाण. तिथे दोन उंच कबर्‍या रंगांच्या मधुन एक झुळझुळ नदी वहात असते. पाणी ईतके नितळ आहे कि सतत तळ दिसत असतो. शेवाळे, माती सुद्धा नाही तिथे. त्यामुळे त्या पाण्यात डुंबायला फारच मजा येते. उंच डोंगरामुळे उन्हाचाहि त्रास होत नाही. तिथे शुक्रवारी अनेक जण सहकुटुंब जातात. नदीकिनारी जेवण शिजवण्यासाठी, निवांतपणे बसण्यासाठी सोयी आहेत. तिथे जेवण करुन, खास करुन कबाब भाजुन खाण्यात सगळेच आनंद मानतात. ( कबाब हा देखील अरेबिक शब्द. शब्दशः अर्थ, कमी पाणी ) . ईजिप्शियन लोकांचे उद्योग म्हणजे तिथे स्वतः तयार केलेले फटाक्याचे बाण सोडायचे. त्याचा प्रतिध्वनि तिथे घुमत राहतो. ते बाण त्याना स्वतःच तयार करावे लागतात, कारण ओमानमधे फटाक्याना, केवळ सुरक्षिततेच्या कारणासाठी बंदि आहे.

याशिवाय वेगवेगळे मॉल्स, शॉपिंग सेंटर्स हि आमची भटकण्याची ठिकाणे होतीच. प्रत्येक ठिकाणी काहितरी आकर्षण असायचेच. उदा कुरुमला एक पाळीव प्राणी विकणारे दुकान होते. तिथे पाळीव सापापासुन कासवापर्यंत सगळेच विकायला असे.

हि सगळी ठिकाणे एका दिवसात होण्यासारखी. पण ओमानचा अंतर्भाग मात्र खुपच प्रेक्षणीय आहे, पण तो पालथा घालायला निवांत वेळ आणि साधने हवीत. तिथले गोरे लोक, अद्यावत 4WD घेऊन अशी मुशाफ़िरी करत असत. आणि त्याबद्दल सविस्तर लेखहि लिहित असत. त्यांचे लेखन अगदी परिपुर्ण असे. अमुक ईतक्या किमी अंतरावर डावे वळण घ्या, तिथे दोन फाटे फुटतील. डावीकडचा कच्चा रस्ता पकडा. तिथुन दक्षिणेकडे सरळ सात किमीवर एक वादी आडवी लागेल, अशी वर्णने असत. प्रत्यक्ष ठिकाणाचे सुंदर वर्णन करणे मात्र त्याना जमत नसे. पण हि वर्णने वाचुन तिथे जाण्याचा अनिवार मोह होत असे एवढे नक्की. असे काहि तुरळक प्रयत्न आम्ही केलेदेखील.

पण त्याहुन मोठ्या आणि अविस्मरणीय, अश्या काहि सहलीना सोबत घेऊन जाईन म्हणतोय.

अपुर्ण




Friday, October 06, 2006 - 4:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा एक जुना लेख, ” कासवांचे सुर ” इथे परत पोस्ट करतोय. त्यामुळे काहि प्रमाणात द्विरुक्ती आहे. पण मुळ लेखाच्या सलगतेसाठी ती कायम ठेवतोय.

डॉ. मीना प्रभु जेव्हा, ” माझं लंडन ” म्हणतात, तेव्हा त्याना लंडनबद्दल जी आत्मीयता वाटते, तिच आत्मीयता मला मस्कतबद्दल वाटते. मस्कत हि ओमान देशाची राजधानी. नुसते मस्कतच नाही तर बहुतांशी ओमान मी उभा आडवा फ़िरुन बघितलाय.

आफ़्रिकेतल्या छोट्या छोट्या खेड्यात मी जिथे भारतीय
लोकांचा गोतावळा जमवला होता, तिथे मस्कतमधे मला समान आवडीनिवडीची माणसे गोळा करणे अजिबात कठीण गेले नाही. तिथल्या काहि कंपन्या तर पुर्णपणे भारतीय लोकांच्या ताब्यात आहेत. अश्या कंपन्यांपैकी एक म्हणजे SSB ग्रुप. म्हणजेच सुहैल व सौद बाहवान ग्रुप. ( लगान सिनेमात राशेल, भुवनचा उच्चार बाहवान, म्हणुन करते, त्यावेळी तिथल्या थिएटरमधे जोरदार हशा येत असे. ) या दोन भावांपैकी सुहैल हे आपल्या लता मंगेशकरचे मानलेले बंधु.
तर या कंपनीत माझे अनेक दोस्त होते. त्यापैकी भटकंतीची आवड असणारे म्हणजे मोंगिया आणि व्हीक्टर. दोघेहि देवु गाड्यांच्या सेल्स मधे होते. मोंगिया जातीचा सरदार ( सर्वार्थाने ) . त्यामुळे गाडी चालवणे त्याच्या अंगातच भिनलेले. पठ्ठ्या आठ आठ तास ड्रायव्हींग करुनहि, अजिबात दमत नसे. शिवाय त्याच्यावर केलेले प्रॅक्टिकल जोक्स देखील तो, खेळकरपणे स्वीकारत असे.

व्हीक्टर हा मल्याळी. त्याच्या मल्याळीपणाचा आम्हाला खुप फायदा होत असे. ओमानमधल्या अगदी आडगावीदेखील रस्ता वैगरे विचारायला एखादा मल्याळी उपलब्ध असेच. या व्हिक्टरचा आणखी एक गुणविशेष म्हणजे मल्याळी असुनदेखील, ( हे अगदी महत्वाचे आहे ) अतिशय निरागस होता. त्याच्या निरागसपणाचा एक किस्सा मला ईथे आवर्जुन लिहावासा वाटतोय. तो काजोलचा निस्सिम चाहता होता. आणि तनुजाचा बंगला आमच्या शाळेला लागुनच होता, या एवढ्या बारिकश्या सत्यावर, काजोल माझी शाळामैत्रिण आहे, असे मी त्याला सांगितले होते. ईतकेच नव्हे तर मी स्वित्झरलंडला गेलो होतो तेंव्हा तिथुन त्याच्यासाठी काजोल, शाहरुखसाठी ( दिलवाले दुल्हनीया ले जायेंगे सिनेमात ) जशी गायीच्या गळ्यातली घंटा बांधुन ठेवते, तशी आणली. आणि त्याला, ” लुझर्न मधे मला काजोल भेटली होती, तु तिचा कसा फ़ॅन आहे ते सांगितल्यावर, तिने तुझ्यासाठी छोटीशी भेट दिली. ” अशी लोणकढी ठोकुन दिली. तो बिचारा एवढा हरखुन गेला, कि सगळ्याना, ” हमारे दिनेशभाई कितने ग्रेट है, ” वैगरे सांगु लागला. सांगायचा मुद्दा हा कि तो निरागस आहे. आणि मी - - - - - ( मोकळी जागा !)

ओमानमधे तश्या सुट्ट्या अगदि मोजक्या. पण ज्या असतात त्या सलग तीनचार दिवस जोडुन दिल्या जातात. पण त्या उन्हाळ्यात म्हणजे, एप्रिल ते सप्टेंबर महिन्यात आल्या तर घरी बसुन ” हा S S S रि विठ्ठल ” करण्याशिवाय गत्यंतर नसे. कारण हे महिने म्हणजे भयंकर उकाड्याचे. ( नाविलाज को क्या विलाज, भाई ) पण त्या जर एरवी आल्या तर मात्र आम्ही घरी बसत नसु. चल रे, चल रे म्हणत आम्ही मेंबर्स गोळा करत असु.

तर अश्याच एका व्हेकेशनमधे ” सुर ” या गावी जायचे ठरले. बाराजण तयार झाले. कुठल्याहि आऊटिंगचे कॅटरिंग हि माझी जाबाबदारी, हा अलिखित नियम असे. काहि काहि सहली तर निव्वळ त्या कारणासाठी आखल्या जात. मलाहि करायची, खिलवायची हौस आहेच. हि सुरची सहल मात्र अविस्मरणीय ठरली.

ओमान जे जरी वाळवंट असले तरी मस्कत हा भाग वालुकामय नाही. तो भाग आहे अतिशय डोंगराळ. हे डोंगरोबा नावाला जागुन दुरुनच साजरे दिसतात. त्यावर चढाई करणे शक्यच नहई, कारण एकतर ते खुप टइसुळ आहेत आणि काळे असल्याने खुप तापलेलेहि असतात. खरं तर तिथल्या हवामानात या डोंगरांचा सहभाग फार महत्वाचा आहे. दिवसा ते भयंकर तापतात आणि राती उष्णतेचे उत्सर्जन करतात. अश्या रितीने हवामानाचा समतोल साधला जातो. ( म्हणजे चोवीस तास उकडते. )

शहर भागात अनेक उद्याने, मॉल्स सिनेमा थिएटर्स आहेत. पण ती आमच्या रोजच्या पायाखालची. त्यामुळे सहलीला जायचे ते मस्कतपासुन दुर, हे ओघाने आलेच. गाद्या आणि ड्रायव्हर्स हाताशी असतच. रस्ते अतिशय उत्तम त्यामुळे सहलीचे ठिकाण किती दुर आहे, हा मुद्दाच निकालात निघालेला असायचा.

तर सुर हे गाव मस्कतपासुन, ५५० किलोमीटर्स वर आहे. तिथे जवळच म्हणजे ३० किलोमीटर्स वर कासवे अंडी घालायला येतात, अशी माहिती आम्हाला मिळाली होती. तर ते ठिकाण बघायला जायचे ठरले. रात्री तिथेच राहणे भाग होते, कारण कासवे रात्रीच अंडी घालतात. तिथे सरकारने कहै सोयी केल्या आहेत, पण जाण्यासाठी परवानगी वैगरे घ्यावी लागते. तिही घेतली.
सुट्टीच्या दिवशी मस्कतवासीयांचा सकाळचा प्रोग्राम असतो, तो म्हणजे झोपायचा. बहुतेक ऑफ़िसेस सकाळी आठ वाजता उघडतात. त्यामुळे रोज सकाली लवकर उठावेच लागते. तो वचपा शुक्रवारी भरुन काढला जातो. शुक्रवारी दुपारी अकरा वाजता दुकाने वैगरे बंद होतात, म्हणुन नाईलाजाने साडेदहाला वैगरे उठायचे. एरवीहि दुपारी १ ते ४ असा लंच ब्रेक असतोच. त्यावेळी लोक चक्क गजर लावुन झोपतात. ४ वाजता ऑफ़िसमधे गेले कि, ” काय झोप नीट झाली का ?” असे आवर्जुन विचारणे हा तिथल्या शिष्टाचाराचा भाग आहे.
त्यामुळे सहलीच्या दिवशी सुद्धा, सकाळच्या झोपेचा मोह सुटत नव्हता. मला मात्र जेवणाची व्यवस्था बघायची असल्याने, सकाळी लवकर उठावे लागले. रवा ईडल्या केल्या. जिरा राईस, राजमा आणि बह्रली अंडी केली. ते व्यवस्थित, एखाद्या विमान कंपनीप्रमाणे प्रत्येकाच्या नावे पॅक केले. आणि सगळ्यांची वाट बघत बसलो.
ठरल्याप्रमाणे अकरा वाजता सगळे माझ्या घरी जमले. अगदी शेवटची खरेदी म्हणजे, टिश्यु पेपर्स, पाणी, सॉफ़्टड्रिंक्स वैगरे घेतली. आणि साडे अकराला निघालो. देवुच्या नव्या कोर्‍या तीन सलुन गाड्या होत्या. वाटेत दोघा जणाना पिकप केले आणि निघालो.

मस्कतचा पन्नास साठ किलोमीटर्सचा भाग आमच्या नेहमीच्या पाहण्यातला, त्यामुळे तो टप्पा बघताबघता पार पडला, आणि सुरच्या रस्त्याला लागलो.
तुम्ही मुंबईहुन पश्चिमेकडे उड्डाण केले कि जे पहिले जमिनीचे टोक लागते ते सुर गाव. भारताला ईतके जवळ असल्याने तिथे पुर्वापार गुजराथ्यांची वस्ती आहे.
मस्कतचा डोंगराळ भाग मागे पडला आणि खरेखुरे वाळुचे वाळवंट सुरु झाले. डोंगर गायब झाले असे नाही, तर ते जरा बॅकसीट वर गेले. थंडीचा मौसम नुकताच सुरु झाला होता. त्यामुळे हवा फारशी अग्रम नसावी. एसी गाडीत बसुन आम्हाला बाहेरचे तापमान कळतच नव्हते. चालत्या गाडीत न्याहारी वैगरे उरकली. पण चालत्या गाडीत करता न येणार्‍या गोष्टींसाठी आम्हाला गाड्या थांबवाव्याच लागल्या.

ओमानमधे आडोसा मिळणे तसा कठिणच. वाळवंटात वाळुच्या टेकड्या असतातच. हि वाळु अतिशय मुलायम आणखी सारखी भुरुभुरु उडत राहते. त्याच्या नीटसपणे रचलेल्या टेकड्या रस्त्याच्या आजुबाजुला दिसत होत्या. पण त्या स्थिर नव्हत्या. त्यांच्या माथ्यावरुन हळुहळु वाळु उडतच होती. त्या टेकड्यांपैकी एकिच्या आडोश्याला कार्यभाग उरकावा म्हणुन थांबलो. जेमेतेम आठ दहा फ़ुट उंच टेकडी. वळसा घालण्यापेक्षा चढुनच पलिकडे जाऊ असे ठरवले. पहिले पाऊल टाकले तर पाय घोट्यापर्यंत आतच गेला. पुढचे पाऊल आणखी खोल गेले. मग आम्हाला मजा वाटायला लागली. त्यातच मस्ती सुरु झाली. मी आणि व्हीक्टरने मोंगियाला त्या वाळुन, तोंडावरच आपटलं. ” क्यु बे सीधी तरह चल नही सकता क्या, ” असे म्हणत पाठीवर बुकललं. त्याला वर उचलले तर कार्टुन फ़िल्ममधे दाखवतात तसा त्याच्या आकाराचा खड्डा पडला होता. त्याचा बदला म्हणुन त्याने आम्हा दोघाना टेकडीवरुन दुसर्‍या बाजुला ढकलुन दिलं. आम्ही सिनेमातल्यासारखे घरंगळत खाली गेलो. तिथे बरीच धुळवड खेळलो. कार्यभग उरकला, तर त्या वाळुत त्याची काहि निशाणीहि उरली नाही. मग वाळु झटकायच्या निमित्ताने, एकमेकाना व्यवस्थित बदडुन घेतलं.
वाटेत वाहिबी सॅंड्स म्हणुन एक जागा लागली. तिथे डेझर्ट सफ़ारीचे आयोजन केले जाते. वाळुत गाडी चालवायला फार कौशल्य लागते. सगळ्याना ते जमतेच असे नाही. शिवाय फ़ोर व्हील ड्राईव्ह गाडी असणे गरजेचे असते, त्यामुळे तिथे थांबता आले नाही.

अपुर्ण




Saturday, October 07, 2006 - 4:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असेच वाटेत एके ठिकाणी थांबुन आम्ही जेवुन घेतले. ओमानमधे सगळीकडे ईतकी स्वच्छता असते कि कुठेहि कचरा करायचा धीरच होत नाही.
असे करत आम्ही संध्याकाळी ५ वाजता सुर या गावी पोहोचलो. म्हणजे ५५० किलोमीटर्सचा टप्पा आम्ही साधारण ५ तासात पार पाडला होता.

तिथे एका हॉटेलमधे चहा घेतला. आणि तयार भात, डाळ, मॅरिनेटेड चिकन वैगरे विकत घेतले. प्रत्यक्ष जागेवर बार्बेक्यु करायचा प्लान होता.

रस्त्याची वैगरे चौकशी करुन मार्गाला लागलो. सुर गाव मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे. तिथला किनारापण छान होता. समुद्रात मोठी भिंत बांधुन बोटींसाठी आडोसा केला होता.

सुर गाव सोडले आणि आम्ही केलेली घोडचुक लक्षात आली. तो रस्ता मुळीच सलुन कारसाठी नव्हता, त्या रस्त्यावर फ़ोर व्हील ड्राईव्हला पर्याय नव्हता. मोंगियाची कसोटी लागली. रस्त्यावर बारिक बारिक दगडधोंडे भरपुर होते. गाडीच्या टायर्समुळे ते उडतहि होती. नवी कोरी गाडी म्हणुन फार जपुन चालवावी लागत होती. हळु हळु त्या वेगालाही सरावलो. सरासरी ताशी १० किलोमीटर्सचाहि वेग नव्हता. आजुबाजुला अति उंच कडे होते. ओमानमधे असतोच तसा पाण्याचा ओहोळहि अधुनमधुन दिसायचा. ( त्याला अरेबिकमधे फ़लाज म्हणतात. त्याबद्दल सविस्तर लिहिले होतेच. ) झाडझाडोरा अगदीच तुरळक आणि त्यातहि खजुराची झाडेच जास्त दिसत होती. पण उंच कड्यावर मात्र एखादे हिरवेगार झुडुप दिसत असे. ईतक्या उंचीवर त्याला पाणी कुठुन मिळत असेल याचे नवल वाटत राहिले. आजुबाजुचे कडे पण दखल घेण्याजोगे होते. वारा आणि उडती वाळु यामुळे त्यात काहि शिल्पसदृष्य आकृति निर्माण झाल्या होत्या. त्यात वेवेगळे परिचीत आकार शोधायचा प्रयत्न करत होतो.

आता मात्र प्रवासाचा कंटाळा येऊ लागला होता. डोळ्यावर झापड येत होती. त्या डेड स्लो स्पीडने जाण्याचा ऊबग आला होता. एकदातर थोड्यावेळापुर्वी डाव्या बाजुला दिसणारा मावळता सुर्य, अचानक उजव्या बाजुला दिसु लागला. ( व्हीकटरने त्या बाजुला लावलेला नॅपकिन, याचा पुरावा होता. ) वळण घेतल्याचे मला आठवत नव्हते. मोंगियाला पण आठवत नव्हते. ” तु जरुर नींदमे गाडी चला रहा है बे. ” असे त्याला बोलुन घेतले.
शक्यतोवर तीन्ही गाड्यानी एकमेकांच्या नजरेच्या टप्प्यात रहायचे, असे ठरले होते. पण त्या पेंगुळल्या अवस्थेत आमची गाडी मागे पडली होती. पण जोपर्यंत दुसरा रस्ता फुटत नव्हता, तोपर्यंत काळजी करण्याचे कारण नव्हते. पण लवकरच तेहि संकट समोर ठाकले. गाडी थांबवण्याशिवाय पर्याय नव्हता. पुढच्या दोन गाड्या कुठल्या रस्त्याने गेल्या होत्या, ते कळायला मार्ग नव्हता. अश्यावेळी नेहमी जो स्वार्थी विचार मनात येतो, तोच आमच्याहि मनात आला. ” खाना तो अपने पास है, जायेंगे कहा ?” आम्ही हातावर हात चोळत उभी राहिलो. सुर्य मावळुन गेला होता. संधीप्रकाश जेमतेम होता.
थोड्याच वेळात पुढे गेलेल्या दोन्ही गाड्या माघारी आल्या. कुठला रस्ता पकडायचा यावर बराच खल झाला. आधी कुणीच आलेले नसल्याने, कुणालाच खात्री देता येत नव्हती. दुसरी गाडी येण्याची वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता. पण फार वेळ वाट बघावी लागली नाही. समोरुन एक मिनिष्ट्रीची गाडी आली. आम्ही थांबवण्यापुर्वीच त्यानी स्वतःहुन गाडी थांबवली व योग्य ते मार्गदर्शन केले. आता पुर्ण अंधार पडला होता. परत चुकामुक व्हायचा धोका अजिबात घेता येत नव्हता. आमच्या पेंगुळल्या गाडीला पुढे घालुन सगळे निघालो. अर्ध्या तासातच काहि दिवे दिसु लागले. आणि मुक्कामाला पोहोचल्याची खात्री झाली. आमच्या आधी बरेच लोक आले होते. आठ वाजत आले होते. आम्ही तिथल्या मोकळ्या मैदानात गाड्या लावल्या. सरकारने पाणी, लाईट वैगरेची सोय केली होती. पण ती आवश्यक तितकीच होती. आजुबाजुला मिट्ट काळोख होता. त्यामुळी आपल्या भोवती काय आहे याचा अजिबात अंदाज येत नव्हता. दहा वाजता कासवे बघायला जायचे असे तिथला अधिकारी सांगुन गेला. मी विस्तव पेटवला. तयार बार्बेक्यु किटमुळे ते अजिबात अवघड गेले नाही. चिकन लेग्ज चांगलेच मुरले होते. त्यामुळे फटाफट भाजुन देत होतो. मी भाजुन द्यायचो आणि पटकन कुणीतरी तो मटकवायचा, असे चालले होते. मला ते खायचे नव्हते पण दुसरे काहितरी खायला हवे होते ना. ते लक्षात घेऊन मोंगियाने मला राईसदालची डिश तयार करुन दिली. पण तरिही माझे काम चालुच होते. सगळ्याना मी भाजलेलाच लेग हवा होता, त्यामुळे ईतर कुणाला कुणी हात लावु देत नव्हते. आजुबाजुला असे अनेक ग्रुप्स दिसत होते.

तेवढ्यात कासवे बघायला जाण्याचा ईशारा झाला. बघता बघता शंभरावर माणसे जमली. तेवढी तिथे आलीच होती. त्या माणसाने आम्हाला पुर्ण शांतता पाळायला सांगितली. आणि त्याच्या मागोमाग चलायचा ईशारा केला. त्याने ओमानी कंदुरा घातला होता. हा पायघोळ अंगरखा डोळ्याना खुपण्याईतका शुभ्र असतो, त्यामुळे अंधारात त्याची पाठ धरुन चालणे कठिण नव्हते. पण पायाखालची वाळु फ़सवी होती. त्यात भरपुर खड्डे होते आणि त्यात आम्ही धडपडत होतो. ( नंतर कळले कि ते कासवानी केलेले खड्डे होते. ) चंद्र अजुन उगवला नव्हता. आमच्याकडे बॅटर्‍या होत्या, पण शक्यतो त्या न वापरण्याचा सल्ला दिला होता. असे पंधरावीस मिनिटे चालल्यावर आम्ही समुद्रकिनार्‍यावर आल्याचे जाणवले. आम्ही उतरलो होतो ती जागा जरा दुर होती, पण समुद्राची गाज ऐकु न येण्याईतकि दुरवर खचितच नव्हती. तरिही आपण समुद्राच्या ईतक्या जवळ आहोत, याचा अजिबात अंदाज येत नव्हता. आपल्याकडे समुद्राच्या लाटांची गाज, गावभर ऐकु येते. रात्रीच्या निवांत वेळी तर ती येतेच येते. ( गुहागरला वैगरे जाऊन आलेल्याना, माझे म्हणणे खचितच पटेल. )

पण एकंदर मस्कतमधे फारश्या लाटा नसतात. ईथेहि नव्हत्या. ( मस्कतचे मुख्य बंदर असलेल्या मिना काबुसचा समुद्र, तर चक्क, निळा तालवच वाटतो. ) गल्फ़ ऑफ़ ओमानपासुन थेट सुएझ कालव्यापर्यंतचा समुद्र असा शांत आहे.

आमचा ओमानी वाटाड्या आधी पुढे जाऊन कुठे कासव अंडी घालतय ते बघणार होता, आणि आम्हाला तिथे घेऊन जाणार होता. आता नजर हळु हळु अंधाराला सराऊ लागली होती. समोरच्या लाटा अंधुक अंधुक दिसु लागल्या. किनार्‍यावर काहि निळे हिरवे ठिपके चमकत होते. अगदी घड्याळ्यातल्या रेडियमप्रमाणे ते दिसत होते. ते एक प्रकारचे मासे होते. समुद्राच्या पाण्यातहि, त्यांचा एक प्रकाशमान पट्टा अधुनमधुन दिसत होता.

थोड्याच वेळात तो ओमानी माणुस आमच्याजवळ आला. व अजिबात आवाज न करता, त्याच्या मागोमाग आम्हाला यायला सांगितले त्याने.
आमच्या अंगात प्रचंड उत्साह संचारला होता.

अपुर्ण



चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators