|
| |
| Friday, August 04, 2006 - 5:10 pm: |
|
|
मस्कतमधे कुणी असले, कि बाहेरचा माणुस त्याला विचारतो तो रुवी मधे राहतोस का ? कारण बहुतेक जणांचा पोस्टाचा पत्ता, रुवीचाच असतो. ओमानमधे होम डिलिव्हरी नसल्याने, पोस्ट बॉक्सवरच पत्रे येतात. रुवीतले पोस्ट ऑफ़िस मध्यवर्ती जागी असल्याने, अनेक जण तिथलाच पत्ता घेतात. तर आपण या परिसराची ओळख करुन घेऊ. सीबमधुन मस्कतच्या दिशेने निघाले, कि वाटेतच रुवी लागते. ईथे एक मोठी मशीद आहे. त्यासमोर एक गार्डन व त्या समोर प्लाझा नावाचे थिएटर आहे. हे थिएटर बरिच वर्षे बंदच आहे. ( मशिदीच्या अगदी ईतक्या जवळ थिएटर नसावे, असा नियम निघाला. ) हि वास्तु जणु शापित असावी, कारण या वास्तुत सुरु केलेले दुकानहि चालले नाही. पण तरिहि तो भाग रुवी प्लाझा म्हणुनच ओळखला जातो. त्या समोर मुख्य बस स्टॅंड आहे, लांब पल्ल्याच्या बसेस तिथुन सुटतात. प्लाझाला लागुनच टॅक्सी स्टॅंड आहे. या प्लाझा ईमारतीत तळाला काहि रेस्टॉरंट्स आहेत. प्लाझावरुन आपण पुढे निघाले कि परत एक कारंजे लागते, त्या समोर म्युझिक सिस्टीमचे मोठे शो रुम आहे. त्या समोर पोलिस स्टेशन आहे. आणि तिथुन एक सदा गजबजलेला रस्ता सुरु होतो, त्याला म्हणतात रुवी हाय स्ट्रीट. कपड्यांची, किचन एक्विपमेंट्स अश्या अनेक दुकानांची रेलचेल आहे ईथे. ईथेच काहि गुजराथी रेस्टॉरंट्स आहेत. ( तशी ती ओमानभर आहेत. त्य बद्दल स्वतंत्र लिहावे लागेल. ) या रस्त्यावरच अगदी डवरलेले असे शिरिषाचे झाड आहे, आणि पुढे प्राज्क्ताचेहि झाड आहे. रस्ताभर कारंजी आहेतच आणि फुलझाडेहि असतातच. निशिगंधाचीहि झाडे लावलेली असतात. ईथे कपड्यांची दुकाने सर्वात जास्त संख्येने आहेत. मुंबईत वैगरे आता डॉलर शॉप वैगरे सुरु झालीत. मस्कतमधे पुर्वापार वन रियाल शॉप होती. ति दुकाने म्हणजे भुलभ्लैयाच असत. गरज नसताना तिथे खरेदी केली जात असे. टिव्ही, कॅमेरा यांची अद्यावत मॉडेल्स तिथे बघायला मिळत. त्याकाळी व्हीडिओ कॅमेरांची क्रेझ होती, त्यामुळे त्याची दुकानेहि होती. ओमानमधे चलनावर कुठलेच निर्बंध नसल्याने, एक्सेंज हाऊसेस पण होती. तिथे कुठलेहि चलन, ड्राफ़्ट्स, ट्रॅव्हलर्स चेक्स वैगरे मिळत असे. ईतके सगळे असल्याने, हा भाग कायम गजबजलेला असे. एरवी तर असेच आणि खास करुन शुक्रवारी रात्री तर या रस्त्याला जत्रेचे रुप येत असे. अनेक कामगारांचे भेटण्याचे हे ठिकाण होते. त्यामुळे या रस्त्यावर वाहतुक अगदीच कुर्मगतीने होत असे. ईथे काहि वेंडर्स मशीन पण होती, त्यात अनेक स्वादाची, थंड वा गरम पेये, हव्या त्या प्रकारात, ( साखर कमी जास्त, बर्फ़ हवा नको वैगरे ) मिळत असत. बराच लांबवर पसरलेला हा रस्ता मग पुढे वत्ताया ला जात असे. त्याला एक आडवा रस्ता मिळत असे, त्याचे नाव होते होंडा रोड. त्यावर अनेक स्पेअर पार्ट्सची दुकाने होती. टायर्स वैगरेची दुकाने तिथे होती. या रस्त्याला असलेल्या आडगल्ल्यात श्रिलंकन, बांगला देशी, पाकिस्तानी रेस्टॉरंट्स पण होती. तिथेच जरा आडबाजुला अल नासर नावाचे थिएटर होते. त्यात एक मिनी थिएटर पण होते. मोठ्या थिएटरला हिंदी सिनेमा आणि मिनी मधे ईंग्लिश सिनेमा दाखवत असत. मस्कतमधे जवळजवळ दर आठवड्याला मी सिनेमा बघितले. हिंदी सिनेमात काहि काटछाट केलेली नसे, पण ईंग्लिश सिनेमात मात्र बरीच काटछाट केलेली असे, त्यामुळे ते सिनेमा ईतके छोटे होत, एक एका तिकिटात दोन सिनेमा दाखवत असत. त्यामुळे ते सिनेमे फारच कमी बघितले. मग दुसर्या वेळी गेलो तेंव्हा चार मिनि थिएटरचे मल्टिप्लेक्स सुरु झाले होते. ते पण या रस्त्याच्या जरा बाजुलाच होते, आणि त्या थिएटरमधे अद्यावत ध्वनियंत्रणा वैगरे असल्याने, तिथे कायम गर्दी असे. टॅसी स्टॅंडवरच एक कॅमेराचे मोठे दुकान होते तसेच तिथे भोकराचे एक मोठे झाडहि होते. कोपर्यावर एक तुर्की ओपन एअर रेस्टॉरंट होते. तिथे हुक्का वैगरे ओढायची सोय होती. मग एक आडवा रस्ता पार केला कि एक मोठी वादी म्हणजे नदी आडवी जात असे. हि नदी कोरडीच असे. त्यामुळे त्यात स्थानिक मुले फ़ुटबॉल वैगरे खेळत असत. माझ्या ईतक्या वर्षांच्या वास्तव्यात फक्त एकदाच या नदीच्या पात्रात पाणी बघितले. ती नदी ओलांडली कि एक मोठे ओपन एअर थिएटर लागत असे. तिथे मधोमध एक मोठा स्तंभ होता. आणि जेंव्हा तो बांधला तेंव्हा त्यावर सिनेमा दाखवायची सोय होती. पहिले काहि दिवस तिथे मोफत सिनेमा दाख्वतहि असत, पण तो बघायला तिथे कावळाहि नसल्याने ते पुढे बंद झाले. पण ती जागा मात्र अजुनहि उत्तमरितीने राख्ली गेलीय. त्याला लागुनच मस्कतचे स्टॉक एक्स्चेंज आहे. आणि रस्त्याच्या पलिकडे ओमान शेरेटन हे फ़ावीव्ह स्टार हॉटेल आहे. मस्कतमधे अगदी मोजक्याच ईमारती ऊंच आहेत, हि त्यापैकी एक. त्या आधी जो रस्ता जातो, तो जातो मस्कतच्या सी. बी. डी म्हणजे, सेंट्रल बिझिनेस डिस्ट्रिक्टला. या रस्त्यावर अनेक बॅंकांच्या देखण्या ईमारती आहेत. एकेक वास्तु राजमहालासारखी आहेत. आणि सगळ्यात देखणी आहे ती बॅंक अल मर्कझी म्हणजे तिथल्या सेंट्रल बॅंकेची ईमारत. गुलाबी दगडात बांधलेली हि वास्तु खुप देखणी आहे, आणि त्यावरची रोषणाई पण तितकीच देखणी असते. ईथे काहि एअरलाईन्स, टऍव्हल एजंट्स वैगरेंची पण ऑफ़िसेस आहेत. माझा बराचसा वेळ या ठिकाणी जायचा. या रस्त्याच्या टोकाला होते स्टार थिएटर. बाहेरुन गोल दिसणारे हे थिएटर आतुन चांगलेच प्रशस्त होते. तिथे रविवारी ईंग्लिश आणि ईतर दिवशी, दाक्षिणात्य भाषातले सिनेमा दाखवत असत. मित्रांच्या सोबतीने काहि दाक्षिणात्य सिनेमाहि मी बघितले तिथे. अपुर्ण
|
| |
| Sunday, August 06, 2006 - 4:07 pm: |
|
|
ईथुन एक रस्ता समोर मत्राह ला जातो. हा रस्ता जेमेतेम एक लेनचा. ईतका अरुंद रस्ता ओमानमधे दुसरा नसेल. ईथले स्पीड लिमिटहि ४०. तेहि सगळ्यात कमी. हा ओमानचा जुना भाग. ईथेहि दोन्ही बाजुला अनेक दुकाने आहेत. पार्किंगची जागा आहे. हा प्रामुख्याने निवासी भाग. ईथे बैत ओमान, म्हणजेच ओमान हाऊस हि एक ऊंच ईमारत आहे. त्या समोर आणखी एक तेवढीच ऊंच ईमारत आहे. ओमन शेरेटन धरुन ह्या ईन मिन तीन ऊंच ईमारती. या रस्त्यावर पुढे एक भुताची ईमारत आहे. अगदी बांधल्यापासुन तिथे कुणीच कधी राहिले नाही. ईतकेच नव्हे तर उदघाटनाला लावलेल्या दिव्यांच्या माळाहि कुणी कधी काढल्या नाहीत. त्या ईमारतीत म्हणे लोकाना विचित्र अनुभव येत. त्यांच्या कॉट्स हलवल्या जात असत. पुढे पोलिसानी पण याचा अनुभव घेतला, आणि त्यावर शिक्कामोर्तब झाले. त्या ईमारतीचा काहि फ़ुट अंतरावर आणखी ईमारती होत्या, आणि तिथे लोक सुखाने रहात होते. मी अनेकवेळा रात्री अपरात्री या ईमारतीजवळुन गेलो. मला कधीहि विपरित अनुभव आले नाहीत. पुढे आपण एका कापलेल्या डोंगरातुन जातो आणि टॅक्सी स्टॅंडवर येतो. आणि लगेच सुरु होतो. मत्राह सुक. सुक म्हणजे बाजार. ( या सुकचा उच्चार लिहिणे जरा कठीण आहे. यातला क जरा जोरकस असतो. ईंग्लीश स्पेलिंग souk जास्त समर्पक आहे. ) हा सुक म्हणजे लहान लहान गल्ल्यांचा एक भुलभुलैया आहे. या संपुर्ण बाजाराला वरुन छप्पर असल्याने, यात फिरताना एक वेगळीच गम्मत येत असे. ईथे दोन्ही बाजुला अनेक छोटीमोठी दुकाने आहेत. त्यात किराणासामान, भांडीकुंडी, अत्तरे, कपडे, कृत्रिम फुले, शाली, ओमानी हस्तकलेच्या वस्तु, चांदी सोन्याच्या वस्तु असा विविध माल मिळत असे. सुपरमार्केटपेक्षा ईथला अनुभव वेगळा असे. कारण ईथे घासाघीस करायला वाव असे. हा भाग कायम गजबजलेला असे. या सर्व गल्ल्या मग कोर्निश ला येऊन मिळतात. कोर्निशला अनेक महत्वाची ठिकाणे आहेत. ईथे समुद्रकिनारा आहे. आणि ईथला समुद्र फार खोल असल्याने, ईथे सुलतान काबुस पोर्ट आहे. परदेशातुन आलेला माल ईथेच उतरवला जातो. अनेक मोठमोठ्या बोटी ईथे कायम दिसतात. कोरीयातुन गाड्या घेऊन येणारी, पाच सहा मजली बोट ईथे नियमित येते. ईथेच भाजीपाला आणि फळफळावळ यांचा घाऊक बाजार आहे. ईथे बहुतेक माल बॉक्सच्या दरात घ्यावा लागतो, पण तो खुप स्वस्तहि असतो. याला लागुनच आहे, फ़िश मार्केट. मी स्वतः कट्टर शाकाहारी असलो तरी या बाजारात नियमित जात असे. एकतर हा बाजार अतिषय स्वच्छ ठेवला जात असे. ईतकेच नव्हे तर तो रोजच्या रोज धुतलाहि जात असे. ईथे अनेक प्रकारचे मासे बघायला मिळत असत, आणि तिथे कधीही हिवळाण वास येत नसे. ( तिथे मासे विकणार्याना तिथे मासे कापायची परवानगी नाही. त्यासाठी वेगळी सोय आहे. ) आपल्यासारखे बारिक सारिक मासे ते लोक खात नाहीत. ओमानी किंग फ़िश नावाचा एक मासा सहज दोन तीन फ़ुट लांब असे. त्याहुन मोठे मासेहि तिथे विकायला असत. काहि धार्मिक कारणांमुळे ओमानी लोक खेकडे खात नाहीत. पण तरिही ते तिथे विकायला असत. त्या लोकाना ते हाताळायची पण सवय नसल्याने, विक्रेत्याची त्रेधातिरपिट उडत असे. ( मी खुपदा मित्रांसाठी तिथुन मासे खरेदी करत असे. खेकडे त्या माणसाला फांगड्या तोडुन दे म्हणालो तर, त्याला ते जमणार नाही असे त्याने सांगितले. मग त्या खेकड्यानी मी घरी आणले आणि, स्क्रु ड्रायव्हरने त्याच्या फांगड्या वेगळ्या केल्या. ) तिथेच एक छोटा बस स्टॅंडहि होता.तिथुन एक बांधीव कठडा होता. ती आमची फिरायला जायची जागा होती. तिथे समुद्र खोल असला तरी, खुप स्वच्छ होता. तसेच तिथे अजिबात लाटा येत नसत. त्यामुळे तो समुद्र म्हणजे एक सरोवर वाटत असे. सहज वाकुन बघितले तरी अनेक मोठेमोठे मासे तिथे किनार्याजवळ पोहताना दिसत असत. या परिसरात गुजराथ्यांची भरपुर वस्ती होती. यातल्या काहि ईमारतीत तर मांसाहाराला अघोषित बंदी होती. अश्याच एका ईमारतीच्या खाली, एक छोटेसे हॉटेल होते. तिथे अप्रतिम सामोसे, फाफडा आणि जिलेबी मिळत असे. केवळ हे पदार्थ खाण्यासाठी मी तिथे जात असे. तिथे जरा पुढे आणखी एक भुतबंगला होता. त्या ईमारतीतहि कुणी रहायला तयार नव्हते. पुढे त्या ईमारतीत एक होतेल सुरु करण्यात आले. तेहि अजिबात चालले नाही. हा समुद्रकाठचा रस्ता एक झोकदार वळण घेऊन तसाच पुढे जात होता. तिथे डाव्या बाजुला समुद्रकिनारा आणि उजव्या बाजुला एका टेकडीवर उत्तम रितीने फुलवलेली बाग होती. लहान मुलांसाठी खेळण्यातली ट्रेन वैगरे होती, तसेच टेकडीच्या सर्वात ऊंव्ह भागावर मश्रुमच्या आकाराची ऑब्झरव्हेटरी होती. अपुर्ण. वि. सु. या भागाचा एक फोटो मला मिळालाय. पण माझ्या पीसीवरुन तो अपलोड करता येत नाहीये. नेहमीप्रमाणेच आता चिंगुताईला गळ घालतोय.
|
| |
| Monday, August 07, 2006 - 4:31 pm: |
|
|
( ओमानबद्दल लिहिताना माझा किंचीत गोंधळ ऊडतोय. भुतकाळात लिहावे का वर्तमानकाळात याचे भान रहात नाही. ) तिथे जायच्या आधी ऊजव्या हाताला आपल्याला एका टेकडीवर सुस्थितितला किल्ला दिसतो. त्यावर रात्रीची रोषणाई केलेली असते. असे किल्ले आणि गढ्या ओमानमधे अनेक जागी दिसतात. त्यांच्याकडे बघितल्यावर मन नकळत आपल्या किल्ल्यांच्या सद्यकाळातील दुर्दशेची चिंता करु लागते. पुढे जी बाग लागते त्यात अनेक बकुळीची झाडे आहेत. फुलांचा सडा पडलेला असतो झाडाखाली. तिथल्या कोरफडीला पण छान केशरी रंगाची फुले येतात. लवकरच हा रस्ता मस्कत गावात शिरतो. ईथे जुन्या पद्धतीची घरे आहेत. अगदी टोकाला एक जुने बंदर आहे, सध्या ते वापरात नाही, पण पुर्वी ईथे गलबते लागत असावीत. तिथे जायला ओमानमधला एकमेव बोगदा पार करावा लागतो. तिथे समुद्र जरा खोल आहे आणि निळाशारदेखील. दोन टेकड्यांच्या मधे असल्याने, नैसर्गिकरित्या सुरक्षित आहे ते बंदर. त्या दोन टेकड्यांवर आवळे जावळे किल्ले आहेत. तेहि अजुन सुस्थितीत आहेत. पण एकंदर जागा लहान असल्याने, सध्या ते वापरात नाही. ईथेच सुल्तानाचा राजवाडा आहे. तो मात्र आधुनिक पद्धतीने बांधलाय. पण त्याचा फार भपका नाही. सुलतानाचे वास्तव्य अजुनहि तिथेच असते. या राजवाड्यालाच लागुन, एक शिवालय आहे. ईथले लिंग स्वयंभु आहे. एक छोटासा दिंडी दरवाजा पार करुन, आपण छोट्याश्या प्रांगणात येतो. पुर्वी ईथले देऊळ अगदीच साधे होते. बाजुला एक धर्मशाळा सदृष्य बांधकाम होते. आता मात्र तिथे भपकेबाज मंदीर आहे. तरिहि मूळ मुर्तीला हात लावलेला नाही. महाशिवरात्रीला ईथे जत्रा भरते. अनेक भारतीय तिथे हजेरी लावतात. प्रसाद म्हणुन ठंडाई दिली जाते. यावेळी राजातर्फे वाहतुकीची व्यवस्था पाहण्यासाठी खास पोलिस तैनात केले जातात. अनेक वर्षांपुर्वी या देवळावरुन वाद झाला होता असे म्हणतात. भारतीयांची जत्रा वैगरे प्रकार अगदी राजवाड्याजवळ होताना बघुन, काहि जणानी सुलतानाला ( आपल्याकडे सुलतान या शब्दाला किंचीत वाईट अर्थाची छटा आहे, म्हनुन मी अधुनमधुन राजा हा शब्द वापरतोय. ) ते मंदीर तिथुन हलवायची सुचना केली. सुलतानाने काहि गुजराथी व्याप्याराना चर्चेसाठी बोलावले. त्यानी सांगितले कि हे लिंग स्वयंभु आहे. ते तिथुन हलवल्यास दैवी कोप व्हायची शक्यता आहे. सुलतानाने ऊदार मनाने, आपला आग्रह मागे घेतला. आजहि तिथे सर्व उत्सव आनंदाने साजरे होतात. तिथे बाहेर अगरबत्ती, दुध वैगरे विकणारा माणुस ओमानी आहे, ईतकेच नव्हे तर स्थानिक लोक भक्तीभावाने त्या देवळात येतात देखील. आता मस्कतमधे तसे विशेष काहि नाही. जुन्या बांधकामामुळे तशी विस्ताराला जागाहि नाही. त्यामुळे रुवीकडे सगळा आर्थिक व्यवहार गेला आहे. स्टार सिनेमावरुन आणखी एक रस्ता दारसेत गावाअक्डे जातो. वाटेत आर्म्ड फ़ोर्सेस म्युझियम लागते. ( ते मात्र वेळ न जमल्याने मला कधीही बघता आले नाही. ) मग दारसेत कडे रस्ता जातो. या दारसेत नावाची मजाच आहे. मी जो शब्द लिहिलाय, तो अरेबिक अक्षरांवरुन, तिथल्याच पाट्यांवर याचे ईंग्लिश स्पेलिंग Darset, Darsait, Darshet असे अनेक प्रकारे केलेले आहे. मराठी लोक याचा उच्चार दारशेत असाच करत असत. ईथेच मस्कत बलदिया म्हणजे म्युनिसिपालिटीची देखणी ईमारत आहे. या बलदियाचा माझ्यासमोर घडलेला किसा मोठा मजेदार आहे. एकदा एक बांगलादेशी बसमधे शिरला. ड्रायव्हरने विचारले, किधर जानेका है. तो म्हणाला, बोल दिया. ड्रायव्हरने परत विचारले तरी परत तेच उत्तर. ड्रायव्हर म्हणाला अरे बोल दिया होगा, मैने सुना नही. फ़िरसे बोलो. तरी पार्त तेच उत्तर. मग एका पाकिस्तान्याला दया आली आणि त्याने बलदिया चा बंगाली उच्चार बोलदिया असा होतो, असे सांगितले. ( यात ड्रायव्हरने मस्करी केली असण्याची शक्यता आहे, पण हा किस्सा माझ्यासमोर घडला हे नक्कि. ) ईथेच भारतीय शाळा आहे. आणि त्यांच्या प्रांगणात मराठी मंडळाचे आणि ईतरहि अनेक कार्यक्रम होत असत. फ़न फ़ेअर वैगरे ईथेच होत असत. या रस्त्यावर कडुनिंबाची अनेक झाडे लावली आहेत पण गेली अनेकवर्षे ती अजिबात वाढलेली नाहीत. या रस्त्यावर मधेच एक हिरवे बेट केले आहे. आंब्याची वैगरे मोठी झाडे आहेत आणि बसण्यासाठी बाके वैगरे ठेवली आहेत. सगळ्या भारतीयांचे ते आवडीचे ठिकाण कारण तिथेच एक चर्च आणि तीन देवळे आहेत. चर्चची रचना सुरेख आहे. देवळांच्या संकुलात ठाकोरजी चे मुख्य मंदीर. बाजुला गणपती व देवीची छोटी मंदीरे आहेत. ठाकोरजी म्हणजेच कृष्णाचे देऊळ फारच प्रशस्त आहे. तसा त्याचा भपका नाही. पण ठाकोरजीची मात्र मजा असते. अगदी लहान बाळाप्रमाणे त्याचे लाड केले जातात. ऋतुप्रमाणे त्याला कपडे घातले जातात. नवसाच्या पुजा बांधल्या जातात. त्यात कधी फुलांची, तर कधी फळांची आरास असते. सुका मेवा, कडधान्य यांची सजावट असते. शुक्रवारी तर तिथे जत्राच भरते. पण ईतर दिवशी मात्र तिथे अगदी निवांत वातावरण असते. या देवळाच्या मागे मोठा हॉल आहे, आणि ईथेहि अनेक कार्यक्रम होत असत. ईथे प्रसाद स्वतःच्या हातानेच घ्यायचा असतो आणि तिथे सुका मेवा वैगरे ठेवलेला असतो. या देवळात श्रिलंकन लोक पण येतात. त्यांचा नैवैद्य म्हणजे फळांची आरास असे. आपल्याप्रमाणे फळे अखंड न ठेवता ते लोक, थोडी कापुन ठेवतात. मग त्या फळांचीहि खिरापत केली जाते. अपुर्ण
|
| |
| Thursday, August 10, 2006 - 3:48 pm: |
|
|
मूळात एक मुस्लीम राष्ट्र ईतर धर्मियाना, ईतक्या सवलती देते, याचेच मला खुप नवल वाटायचे, आणि हि सहिष्णुता, अनेक प्रकारे जाणवत रहायची. ओमान शेरेटनच्या समोरुन आपण डावीकडे वळलो होतो, त्या ऐवजी ऊजव्या बाजुला वळलो तर आपण वादी कबीर या ठिकाणी येतो. वादी म्हणजे नदी हे आपल्याला माहित आहेच, कबीर म्हणजे मोठी. तशी तिथे मोठी नदी आहेहि, पण ती कोरडीच असते. या ठिकाणे भाजीपाला आणि ईतर वस्तुंचा घाऊक बाजार भरतो. तसेच ईथे एक मोठी बाग आहे. ईथे जरा आतमधे एक मोकळे मैदान आहे. त्याला मलबारो ग्राऊंड म्हणतात. ( त्याला लागुनच मलबारो या सिगरेटचे गोदाम आहे. ) है मैदान ( मैदान हा अरेबिक शब्द आहे ) आमचे खास जिव्हाळ्याचे कारण ईथे नवरात्रातला गरबा दणक्यात साजरा व्हायचा. तिथे मुंबईसारखा धागडधिंगा न चालता अगदी पारंपारिक पद्धतीने गरबा खेळला जातो. हाच रस्ता पुढे मस्कतला येऊन मिळतो. आता आअप्ण परत जरा सुलतान काबुस रोडवरती एक फेरफटका मारु. रुवीहुन निघालो कि आपण लगेच्च वताया या जागी येतो. तिथे एक हॉस्पिटल आहे पण त्याहुन मह्त्वाचे म्हणजे तिथे टोयोटा, लेक्झस, देवु, फ़ोर्ड अश्या अनेक गाड्यांची शोरुम्स आहेत. त्यामुळे हा भाग कायम गजबजलेला असतो. गाड्यांची लेटेस्ट मॉडेलस ईथे बघायला मिळतात हि सगळे शोरुम्स सुहैल आणि सौद या बाहवान बंधुंची आहेत. या ग्रुपला तिथे SSB या नावाने ओळखले जाते. ईथे मी कामानिमित्त जात असेच, त्याशिवायहि त्या कंपनीत माझे अनेक मित्र होते. हे सुहैल आणि सौद हे ओमानी असले तरी आपल्या लता मंगेशकरचे मानलेले बंधु आहेत. आणि माझ्या कल्पनेप्रमाणे त्यानी पुण्यातले दिनानाथ हॉस्पिटल बांधायला मदत केली आहे. त्यापुढे लागते कुरुम Qurum ईथे अल फ़ेअर नावाचे फिलिपिनो सुपरमार्केट आहे. ईथे खास तिथले पदार्थ मिळतात, पण आपलेच पदार्थ कसे वेगळे रुप घेऊन येतात ते बघा. आपले केळफुल, सुकवुन तिथे बनाना ब्लॉसम म्हणुन मिळते, तर कोनफळाचा सुंदर जॅम मिळतो. ( ओमानमधे पोर्क विकायलाहि बंदी नाही, फक्त ते वेगळे ठेवावे लागते, आणि या ठिकाणी ते असते. ) तसेच ईथे काहि ईतरहि शॉपिंग सेंटर्स आहेत. त्यापुर्वी मर्सिडीसचे शोरुम आहे, आणि त्या समोर सुलतान सेंटर हा एक मोठा मॉल आहे. या ईमारतीचा कळस मोदकासारखा आहे. पुर्वी तिथे शॉपिंग सेंटरच होते. पण रस्त्याच्या त्या बाजुला ते एकच असल्याने, तिथे लोक जात नसत. पण नंतर सुलतान सेंटरमुळे सगळेच बदलले. खाद्यपदार्थांपैकी हवे ते तिथे उपलब्ध असे. ऊकडलेल्या कणसापासुन भरलेल्या पारव्या ( एक कबुतरासारखा पक्षी, पंजाबीत बत्तुर. ) पर्यंत तिथे तयार पदार्थहि मिळत असत. कुरुमला काहि प्रशस्त बागाहि आहेत. तिथली गुलाबाची बाग हे माझे मुख्य आकर्षण. त्या बागेची ऊभारणी माझ्या डोळ्यासमोरच झाली. त्या हवामानात गुलाब लावणे व ते जगवणे हे खरेच आव्हान होते. पण आज तिथे वर्षभर फुलणारे विविधरंगी गुलाब बघुन, त्यांची दाद द्यावीच लागते. हि बाग जमिनीतच वाढवली आहे व त्याला कसलेहि आच्छादन नाही. हाच रस्ता पुढे कुरुम बीचवर जातो. ओमानमधे काम करणार्या प्रत्येक नागरिकाला कुरुमला जावेच लागते, कारण ईथे पोलिस मुख्यालय आहे आणि कामाला सुरवात करण्यापुर्वी, ईथे आपल्या बोटांचे ठसे द्यावे लागतात. त्या देशाचा कायदा असल्याने, त्यात कुणाला काहि अपमानकारक वाटण्याचे काहि कारणच नाही. पण या नियमाची अंबलबजावणी कशी केली जाते, ते बघणे महत्वाचे आहे. ओमानधे आल्यानंतर दोन आठवड्याच्या आत, रक्त तपासणी करावी लागते. तो रिपोर्ट घेऊन कुरुमला जावे लागते. यावेळी आपल्याबरोबर स्थानिक पी आर ओ असतोच त्यामुळे आपल्याला काहि अडचण येत नाही. आणि तो नसला तरीहि ओमानमधे सहसा कुठेहि अडचण येत नाही. आपल्याला हात धुवावे लागतात आणि एक पोलिस अधिकारी आपल्या हाताला आवश्यक तेअव्ढीच शाई लावतो. त्या नंतर तोच आपली बोटे धरुन, आपले ठसे घेत्तो, आणि त्याहुन कौतुकाची गोष्ट म्हणजे, एक खास द्रावण वापरुन तो आपली बोटे स्वच्छहि करुन देतो. हे सगळे दोन मिनिटात होते आणि तेहि सुहास्य वदनाने. प्रत्येकवेळी हा सोपस्कार पार पाडावाच लागतो. कुरुमच्या पुढे अलखुवैर नावाचे गाव लागते. तिथे आधी लिहिल्याप्रमाणे वेगवेगळ्या वझारा म्हणजेच मिनिष्ट्रीजच्या ईमारती आहेत. ओमानमधे सुलतान असला तरी हुकुमशाहि नाही. वेगवेगळ्या खात्यांचा कारभार या वझारा बघतात. माई व कहरबात ( माई म्हणजे पाणी आणि कहरबात म्हणजे वीज ) , शबाब ( तरुण ) तालीम ( शिक्षण ) अश्या अनेक खात्यांच्या ईमारती ईथे आहेत. त्या फ़ारतर तीन मजली आहेत, पण त्यांची रचना मात्र सुरेख आहे. तिथेच सुलतानाने बांधलेली एक अजोड मशीद आहे. याचेहि बांधकाम माझ्यासमोरच झाले. पुर्णपणे गुलाबी दगडात हि बांधलेली मशीद आपल्या ताजमहालाची प्रतिकृति वाटावी, अशी आहे. ( अमरातीत हल्लीच चक्क ताजमहालच बांधल्याचे वाचले ) ईथे पुढे आईस स्केटिंग ची सोय एका बंदिस्त ईमारतीत आहे. पुढे अल खौद, घाला, अथैबा अशी काहि गावे लागतात. मोजक्या ईंडष्ट्रीज, काहि दुकाने काहि घरे असे या सर्व भागाचे स्वरुप आहे. सीबच्या जवळ ओमान एक्झिबिशन सेंटर नावाची एक मोठी ईमारत आहे, ईथे अनेक प्रदर्शने भरत असतात. भारतीय नटनट्यांचे अनेक कार्यक्रम ईथे सादर होत असतात. हा हॉल एवढा प्रचंड आहे कि यातल्या पाव हिश्श्यातच, आपले कार्यक्रम होतात. मग अर्थातच लागतो मतार, म्हणजेच एअरपोर्ट. याचीहि ईमारत अगदी साधी आहे. पुर्वी ईथे मोजकीच विमाने उतरत असत. दिवसातुन फक्त दहाबारा. आता मात्र ईथला व्याप वाढलाय. आखाती देशातल्या बहुतेक देशानी स्वतःची वेगळी एअरलाईन सुरु केलीय. एमिरेट्स, कातार एअरवेज, ओमान एअरवेज, एतिहाद, एअर अरेबिया अश्या अनेक नव्या कंपन्या निघाल्यात. हा एअरपोर्टपण आमचा आवडता अड्डा. कुठलाहि मित्र जायचा वा यायचा असला कि सगळे जण एअरपोर्टवर जमत असु. तिथे सिक्युरिटीचा फारसा बाऊ नसल्याने. व्यवस्थित गप्पाटप्पा होत असत. प्रत्यक्ष सीब गाव मात्र एअरपोर्टच्या जरा मागे आहे. तिथेहि बीच आहेच. ईथपर्यंतच्या भागाला कॅपिटल एरिया असे म्हणतात. अपुर्ण
|
| |
| Friday, August 11, 2006 - 11:29 am: |
|
|
ओमानबद्दल लिहितना ओमानी माणसाबद्दल लिहिल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. ओमानी म्हणजे त्या देशाचे नागरिक असा व्यापक अर्थ घ्यावा लागेल, कारण अनेक पिढ्यांपासुन तिथे स्थाईक झालेले भारतीय गुजराथी पण सध्या ओमानी नागरिक आहेत. खीमजी रामदास, शा पुरुषोत्तम कानजी असे काहि लोक आहेत. शिवाय त्यांचे वंशज आहेतच. हे सगळे कधीकाळी व्यापारी म्हणुन तिथे गेले असतील. त्यावेळच्या अत्यंत कठीण परिस्थितीत त्यानी तिथे व्यापार केला. आणि अर्थातच तिथल्या सुलतानाच्या व आम जनतेच्याहि मनात त्याना आदराचे स्थान आहे. या लोकांमुळेच भारतीयांचे तिथले वास्तव्य सुकर झाले आहे. ओमानी माणसाचे बाह्यरुप म्हणजे कमरेला लुंगी, वरुन पांढराशुभ्र पायघोळ तंदुरा म्हणजेच झगा. डोक्यावर विणलेली टोपी किंवा काश्मिरी कपड्याचा फेटा असा पोषाख असतो. ( लोकरीचे कापड गरम असा आपला एक गैरसमज आहे. खरे तर ते कापड उष्णतेचे दुर्वाहक आहे. त्यामुळे शरिरातील उष्णता बाहेर जात नाही. याच न्यायाने बाहेरच्या उष्णतेपासुन देखील संरक्षण होते. ) हा सैल सुटसुटीत पोषाख तिथल्या हवामानात अत्यंत सुखकर असतो. या तंदुरासाठी वापरलेले कापड फार उच्च दर्ज्याचे असते, आणि गळ्याजवळ थोडीशी कलाकुसर असते. तसेच एक गोंडादेखील घोळत असतो. त्यावर बहुदा उंची अत्तर असते. हा तंदुरा बहुदा पांढराशुभ्र असला तरी क्वcइत तो करडा, हिरवा, निळा वैगरे असु शकतो. ओमानी लोक बर्यापैकी उंच, धिप्पाड आस्तात. नाक तरतरीत असते व डोळे काळे असतात. त्यांच्यामधे बलुची आणि ओमानी असे दोन गट आहेत. बलुची लोक अजुनशी पुश्तु भाषा बोलतात तर ओमानी अरेबिक. तसा त्यांच्यात संघर्ष वैगरे काहि नाही. आम्हाला अनेक वर्षाच्या सरावाने, या दोघांतले फरक ओळखता येत असे. बहुतेक बलुची आणि बर्याचश्या ओमानी लोकाना हिंदी येतेच. त्यामुळे त्यांच्याशी बोलण्यात कसलीच अडचण येत नाही. त्याना ईंग्लिश पण बर्यापैकी येतेच. मला तर मराठी बोलणारे पण ओमानी भेटले शिक्षणासाठी मुंबईत पुण्यात राहिल्यामुळे त्याना ती भाषा येत असे. आणि माझ्याशी आअव्र्जुन ते मराठीत बोलत असत. तशी ती माणसे मनमिळाऊ असत. शक्यतो वाद न घालता काम करण्याकडे त्यांचा कल असे. जुनी माणसे कष्टाळु असत. प्रतिकुल परिस्थितीत काम करायची त्याना सवय असे. तरुण पिढीपैकी मात्र काहि व्यसनी आहेत. ते रंगीबेरंगी कपडे घालतात. खरे तर त्याना शिक्षणासाठी अनेक सोयी सवाल्ती आहेत. परदेशी शिक्षण घ्यायचे असेल तरिही आर्थिक सहाय्य दिले जाते. त्याचा फायदा ( हाहि अरेबिक शब्द आहे ) अनेकजण घेतात. पण तरिहि काहि भरकटलेले तरुण आहेतच. नोकरीच्या क्षेत्रात त्यांच्यासाठी काहि पदे राखीव असतात. पी आर ओ सारखे पद त्यानाच मिळु शकते. सरकारी आस्थापनेत बहुतांशी तेच लोक असतात. टेक्सी वैगरे तेच लोक चालवु शकतात, तरिही हे प्रयन तोकडे आहेत, असे वाटते. तिथे पहिल्यावेळी गेलो होतो त्यावेळी स्थानिक मुली क्वचितच काम करताना दिसत असत. दुसर्यावेळी मात्र अनेक ठिकाणी त्या काम करताना दिअस्ल्या. आणि त्यांच्याशी रोज आमची गाठ पडे. ओमानी बायका बुरखा घेत नाहीत. तरुण मुली पुर्ण अंग झाकणारा पण रंगीत पोषाख करतात. त्यातला एक हिस्सा नाममात्र डोक्यावरुन घेतात. फक्त रमदानच्या महिन्यात केस झाकतात. ( हिजाब घेतात. ) वयस्कर स्त्रिया मात्र काळा झगा घालतात. पण त्याहि बुरखा घेत नाहीत. सुपरमार्केटमधे, दुकानात, बॅंकांमधे त्या असतातच. तिथे स्त्रीने तक्रार केली तर कुठल्याहि पुरुषाला चौकशीशिवाय शिक्षा होवु शकते. हा कायदा जरी असला तरी त्याचा गैरफायदा घेतला जात नाही, पण यामुळे स्त्रीया निर्भयपणे वावरु शकतात. बॅंकांमधे काऊंटरवर त्यांच्याशी आमचा संबंध येत असे. आणखी काहि काअगद्पत्रांसाठी त्यांची मदत लागत असे. तिथे स्त्रीया आअव्र्जुन शेक हॅंड करतात. आणि त्यानाहि व्यवस्थित हिंदी वैगरे येत असल्याने, गप्पा, थट्टामस्करी चालत असे. एकंदर ओमानी माणसांच्या भारतीयांवर विश्वास असल्याने, दोन्ही बाजुने आगळिक होत नसे. तरुण स्त्रीया हेल्थ बाबत वैगरे संवेदनशील असायच्या. वयस्कर स्त्रीयांप्रमाणे त्या क्वचितच स्थुल वैगरे असायच्या. माझे ऑफ़िस उघडायला वेळ असला तर मी खुषाल समोरच्या ऑफ़िसमधल्या ओमानी बाईशी गप्पा मारत बास्त असे. खरे तर तीच मला सांगत असे, दारात कश्याला ऊभा आहेस, आमच्या ऑफ़िसमधे ये. मला तर अनेकवेळा ओमानी मुलीनी लिफ़्ट पण दिली आहे. त्यावेळी अरे दिनेश, आगे बैठ, पीछे बैठेगा तो लोग मुझे तेरी ड्रायव्हर समझेंगे, असा दम पण द्यायच्या. स्त्रीयाना ड्रायव्हींग शिकवण्यासाठी तिथे स्त्री शिक्षकाची सोय असायची तसेच पोलिसातदेखील स्थानिक स्त्रीया असत. स्थानिक स्त्रीया सोडल्या तर भारतीय ( शिक्षिका, नर्स ) , फिलिपिनो ( हाऊसमेड, सुपरमार्केट सेल्सगर्ल ) , स्रिलंकन ( हाऊसमेड, टेक्स्टाईल ऊद्योगात ) स्त्रीयादेखील नोकरी कार्त असत. त्याहि मोकळेपणी वावरु शकत. नर्स वैगरे असणार्या बायका, रात्री अपरात्री एकट्या रस्त्यावरुन चालल्या तरी त्याना काहि धोका नसे. हिंदी सिनेमालादेखील स्थानिक बायका येत असत. काहि भारतीय बायका, खास करुन हैद्राबादच्या वैगरे, ओमानी नागरिकांशी लग्न करुन तिथे स्थायिक झाल्या आहेत. त्याहि नोकर्या वैगरे करतात. मला तरी कुठे काहि आक्षेपार्ह दिसले नाही. अपुर्ण
|
| |
| Monday, August 14, 2006 - 2:02 pm: |
|
|
ओमानच्या हवामानाबद्दल मला खुप भिती घालण्यात आली होती. अति उष्ण हवामान. जीव नकोसा होतो, वैगरे वैगरे. ओमान हा आखाती प्रदेश असल्याने तिथले हवामान अति उष्ण आहे हे सत्य असले तरी अर्धसत्य आहे. साधारण मार्च ते सप्टेंबर तिथे हवा अतिषय गरम असते. ऑक्टोबर पाहुन हवा थंड होवु लागते. डिसेंबर जानेवारी मधे चक्क थंडी वाजते. तिथे वर्षातुन अगदी तुरळक म्हणजे पाच सहा वेळा पाऊस पडतो. ( पावसातले मस्कत अगदी बहारदार असते. ) मार्चमधे, जेव्हा तिथल्या उन्हाळ्याला सुरवात होते तेव्हा, हळु हळु तपमानात वाढ होत जाते. पहिल्यांदा तपमान अगदी असह्य होते. भुक मंदावते. बाहेर पडायची सोय नसते, मे ते ऑगष्ट मधे तपमान कमाल मर्यादा गाठते, पण तोपर्यंत आपल्याला त्याची सवय झालेली असते. तपमान चढे असले तरी ऐन उन्हाळ्यात एखादा दिवस ढगाळ ऊगवतो. त्यावेळी मात्र तपमान उतरते. काहि दिवस तर असे असतात कि ऐन माध्यानीचा सुर्य, चंद्राप्रमाणे शीतल वाटतो. पण जेव्हा गरम होते तेव्हा मात्र चोवीस तास गरम होते, आणि याला कारण सुर्य नसुन, तिथले डोंगरोबा आहेत. ओमान जरी वाळवंट असले तरी मस्कत परिसर हा वालुकामय नाही. तिथे जागोजाग हे डोंगर आहेत. जी काही गवे वसली आहेत ती डोंगराच्या मधल्या सपाट जागेत वा डोंगर फ़ोडुन. हे डोंगर आहेत ते पुर्ण दगडाचे आहेत. त्यावर गवताचे पातेदेखील उगवत नाही, पण ते आपल्या कातळाप्रमाणे कठिणहि नाहीत. त्याचे तुकडे सारखे पडत असतात. ( तपकिरी ते निळा जांभळा असे अनेक रंग दिसतात या डोंगरांचे ) हे डोंगर उन्हाळ्यात दिवसभर तापतात आणि रात्री उष्णतेचे उत्सर्जन करतात. त्यामुळे पहाटेचा एखाददुसरा तास सोडला तर हवामान गरमच असते. दिवसभर ईतका भगभगीत प्रकाश असतो कि खिडकिचे पडदे बाजुला देखील करवत नाहीत. एखादा कांदा चिरुन खिडकित ठेवला, तर दिवसभरात तो ईतका वाळतो, कि त्याचा भुगा होतो. सुर्यहि अगदी लवकर उगवतो आणि उशीरा मावळतो. पण तरिही आम्हाला त्या उन्हाळ्याचा काच जाणवत नसे कारण, घर, ऑफ़िस आणि गाडी सगळेच एसी असायचे. क्वचित काहि वेळ रस्त्यावर जायचे असेल तरच थोडा त्रास जाणवायचा. हा त्रास सुसह्य व्हावा म्हणुन, हॉटेलमधे जेवणावर पाण्याच्या जागी थंडगार ताक देत असत. तसेच जागोजाग कोल्ड ड्रिन्क्स व्हेंडर मशीन्स असायचीच. उन्हाळ्यात भरभरुन पिकणारा खजुर खाणे हा पण त्यावर उतारा होता. या उन्हाळ्यातहि तिथली हिरवळ, बागा टिकविण्याचे अतोनात प्रयत्न केले जायचे. आणि त्यात ते यशस्वीदेखील व्हायचे. याच उन्हाळ्यात तिथे भरभरुन मोगरा फुलतो. बॅंकेत वैगरे काऊंटरवर मोगर्याची फुले ठेवली जातात. ( त्या लोकाना मोगर्याचे अत्तर फार आवडते. ) सप्टेंबरमधे मात्र तपमान हळु हळु निवळु लागायचे. याच दरम्यान येणारा ओमानचा नॅशनल डे साजरा करण्यासाठी संपुर्ण मस्कत सजायचे. अनेक फुलझाडे नव्याने लावली जायची. एकदोन आठवड्यातच सगळीकडे रंगीबेरंगी फुलांचे ताटवे दिसु लागत. बाहेर पडायला उत्साह वाटे. हि सजावट आणि होणारे कार्यक्रम बघण्यासाठी आम्ही मुद्दाम बाहेर जात असु. या दिवसात ओमानचा दक्षिण भाग किती छान दिसत असेल, याची आम्ही कल्पना करत असु. ( नेणारच आहे तिथे मी तुम्हाला ) ओमानचा पाऊस खुप वाट बघायला लावणारा. त्याचे ठराविक असे काहि दिवस नव्हते. पण डिसेंबर जानेवारीत तो पडायचाच. सगळे वातावरण कुंद होवुन जायचे. डोंगर नितळ दिसु लागायचे. एखाद्या रात्री फारच पाऊस पडला तर डोंगरावरचे दगड ओघळुन रस्त्यावर यायचे. ( अगदी पहाटे पहाटे बलदियाची माणसे येऊन ते साफ करुन जायची. ) समुद्रावरचे सीगल्स मोठमोठ्याने ओरडत रहायचे. रस्त्यावरुन पाण्याचे ओघळ वहायला लागायचे. या पावसाने ते लोक वेडे होवुन मुद्दाम गाड्या घेऊन फ़िरायला बाहेर पडत. वाद्याना म्हणजेच नद्याना पाणी येत असे. तिथे प्रत्यक्ष वस्तीच्या ठिकाणी पाऊस नाही पडला तरी दुर डोंगरात पडत असे, आणि त्यामुळेहि नद्याना पाणी येत असे. मी तिथे असताना एका डोंगरावर थोडासा बर्फ़ पडल्याची बातमी आली होती. मीही मग तिथे पावसात भिजुन आनंद साजरा करायचो. अपुर्ण
|
| |
| Tuesday, August 15, 2006 - 4:15 pm: |
|
|
ओमानच्या भुगोलासंबंधी आणखी थोडेसे. सौदि, येमेन, यु. ए. ई., कातार, बहारिन, कुवैत आणि ओमान या सलग भुभागाला आपण आखाती प्रदेश म्हणतो. ओमानचा आणि येमेनचा समुद्र हे दोन्ही पुर्वापार सागरी वाहतुकीचे मार्ग होते. भारतीय किनारा सोडल्यानंतर पहिली जमीन लागायची ते येमेनची किंवा ओमानची. त्यामुळे हे दोन्ही देश व्यापारात अग्रेसर होते. या भुभागाचा ऊजवीकडील कोपरा म्हणजे ओमान. शिवाय ओमानचा एक भाग बुरैमी हा यु ए ई च्याहि वरती आहे. त्यामुळे उत्तर टोकहि ओमानचेच आहे. आजहि आपण पश्चिमेकडे विमानाने गेलो, आणि आपले विमान अफ़गाणिस्तान आणि पाकिस्तानवरुन उडत नसेल, तर पहिली जमीन दिसते ती ओमानचीच. या पुर्वेकडच्या किनार्याचा बराचसा भाग ओमानकडे असला तरी तो तसा निरुपयोगी आहे. मी वर्णन करतोय ती बहुतेक गवे ओमानच्या उत्तर भागात आहेत, आणि ओमानचे दक्षिण टोक म्हणजे सलालाह. मधले ८०० किलोमीटर्स हे निर्जन वाळवंट आहे. ( या निर्जन शब्दाची एक आठवण. शाळेत निष्पर्ण, निष्कांचन असे समास सोडवताना, निघुन गेली आहेत पाने ज्यापासुन ते झाड, किंवा निघुन गेले आहे सोने ज्यापासुन असा मनुष्य असे उत्तर लिहावे लागत असे. पण ते उत्तर निर्जन या शब्दाला लावता येणार नाही. ) या भागात कधीकाळी लोकवस्ती असेल अशी कल्पनाहि करणे जरा कठिण आहे. ( या भुभागाचे वर्णन ओघात येईलच ) पण तरिही ओमानमधे प्राचीनकाळी काहि संस्कृति नांदत होती, असे पुरावे अनेक ठिकाणी सापडतात. काहि बांधकामे अजुनहि दिसतात, पण त्याबद्दल पुरेसे संशोधन झालेले नसावे, वा माझ्या वाचनात ते आलेले नसावे. तसा ओमानचा परिसर बघताना, तिथल्या वाद्यांचे मला नेहमीच कोडे पडते. ( जसे मंगळावरच्या कालव्यांचे पडते तसेच. ) या नद्यांची पात्रे विस्तिर्ण आहेत. सध्याचे पर्जन्यमान बघता एवढे पात्र भरुन पाणी वाहणे अशक्य आहे. मग एवढी मोठी पात्रे का ? कधीकाळी तिथे पाणी वाहिले होते का ? जर पाणी होते तर जंगले होती का ? तसे काहिच आता दिसत नाही. आधुनिक बांधकामात पण पाणी असण्याची शक्यता गृहित धरलेली नाहीच. या नद्यांवर तुरळक ठिकाणीच पुल आहेत, नाहितर वदी ओलांडताना रस्ता सरळ पात्रातुनच जातो. रस्त्याच्या बाजुला मोठे खांब असतात व त्यावर लाल रंगाचे पट्टे असतात व खाली पांढरा रंग असतो. पांढरा भाग पाण्याखाली असेल तर वाहने तिथुन नेऊ नयेत, असा नियम आहे. ओमानमधे नद्या अजिबातच नाहीत असे नाही, अश्या अनेक नद्या शोधत आम्ही त्या पाण्यात डुंबायला जायचोदेखील. पण त्यांचा प्रवाह अखंड दिसायचा नाही. पाऊस नाही, नद्या नाहीत तर मनुष्यवस्ती कशी शक्य आहे, असा प्रश्ण तुमच्या मनात नक्कीच येईल. तर त्याचे उत्तर फ़लाज असे आहे. फ़लाज समजण्यासाठी जर तुम्ही कोकणापैकी रत्नागिरी, राजापुर भागातले असाल, आणि एखाद्या उंचावरच्या जुन्या घराला भेट दिली असेल, तर तुम्हाला परसात एखादा पाण्याचा अखंड स्त्रोत नक्की दिसला असेल. वरच्या डोंगरातुन येणारा हा पाण्याचा प्रवाह अखंड वहात असतो. त्याला फारसा जोर नसतो, पण पाणी मात्र हमखास असते. जर तो प्रवाह बंद झाला तर वर कुठेतरी कचरा पडला असावा हेच कारण असते. साधारण असाच असतो फ़लाज. फ़लाज म्हणजे थोडक्यात झरा. डोंगराच्या पोटातुन जोरात उसळी मारुन पाणी बाहेर येत असते, आणि ते व्यवस्थित पाट काढुन आजुबाजुच्या खेड्यातुन खेळवलेले असते. शेती, गुरे आणि माणसे सगळ्यांचे जीवन या फ़लाजवर अवलंबुन असते. या पाण्याचे पारंपारिक नियोजन, हि एक अत्यंत सुंदर अशी सामाजिक व्यवस्था आहे. या पाण्याचा कुणीहि गैरवापर करत नाही. या वाहत्या प्रवासाह कुणीहि धुणीभांडी करत नाहीत. त्या प्रवाहातले आवश्यक तेवढे पाणी काढुन घेऊन, बाजुला नेऊन वापरले जाते. हा प्रवाह अस्वच्छ झाला तर पुढील गावाना त्रास होईल, याची जाणीव सतत ठेवलेली असते. हा पाण्याचा अखंड स्त्रोत असला तरी, काहि कारणास्तव पाणी कमीजास्त होवु शकते, यावेळी पाण्याचे प्रमाण बघुन, पिण्यासाठी, गुरांसाठी, शेतीसाठी, पुरुषांच्या अंघोळीसाठी, मुलांच्या अंघोळीसाठी आणि शेवटी बायकांच्या अंघोळीसाठी, अश्या क्रमाने पाणी वापरले जाते. रस्त्यावरुन जाताना दुरवर खजुराची झाडे व थोडीफार शेती दिसली कि तिथे हमखास फलाज असणार असा आडाखा बांधता येतो. अजुनहि लहान गावातले व्यवहार याच फ़लाजवर अवलंबुन असतात. शहरात मात्र सरकारतर्फे पुरेसा पाणीपुरवठा केला जातो. आम्हाला कधीहि पाण्याचे दुर्भिक्ष जाणवले नाही. कि कधी भरुन ठेवावे लागले नाही. ( भरुन ठेवायचो ते वेगळ्या कारणासाठी. उन्हाळ्यात नळाला येणारे पाणी ईतके गरम असायचे कि चटका बसायचा, त्यावेळी बादलीत भरुन ठेवलेले पाणी, थंड असायचे. व त्याने हातपाय धुता येत. ) सांडपाण्यावर प्रक्रिया करुन ते पाणी, रस्त्यावरील फुलझाडे जगवण्यासाठी वापरले जायचे. या फ़लाजचे पाणी इतके नितळ आणि चवदार असायचे, कि कितीहि प्यायले तरी समाधान होत नसे. आजहि तो खजुराच्या बागेत वा आमराईत फ़लाजच्या काठी बसुन केलेला फलाहार आठवतोय. डिड आय से आमराई ? येस. बघुयाच आपण. अपुर्ण
|
| |
| Wednesday, August 16, 2006 - 3:29 am: |
|
|
हे आहे फ़लाज
|
| |
| Wednesday, August 16, 2006 - 5:33 pm: |
|
|
ओमानमधे खजुराची झाडे सगळीकडेच दिसतात. हा खजुर म्हणजे निसर्गाची एक किमयाच आहे. तिथे रस्त्याच्या कडेने ती झाडे लावली आहेतच, शिवाय नैसर्गिकरित्याहि तिथे खजुराचे झाड कुठेहि उगवु शकते. बागायती वेगळ्याच. खजुराचे झाड पाम कुळातले. म्हणजे एक सरळसोट उंच खोड, त्यावर गुच्छाने येणारे संयुक्त पाने आणि घोसाने लागणारी फळे, हे गुणविशेष. झाड अगदी लहान असल्यापासुनच त्याला फळे यायला सुरवात होते. साधारण मार्च मधे मोहोर येतो. हळु हळु करवंदाएवढी हिरवी फळे तुर्यात दिसु लागतात, मग ती मोठी होत जातात. हळु हळु पिवळा ( किंवा लाल ) रंगाची होत जातात. हा रंग चमकदार असतो. मग तो रंग निस्तेज होतो व वरुन हळुहळु तपकिरी रंग येत जातो. ( या अवस्थेत तो खुपच चवदार लागतो. गोड पिठुळ चव असते त्याची. आपल्याकडे ओला खजुर मिळतो तो टिकवण्याच्या दृष्टीने अगदी कच्चा असतानाच खुडलेला असतो. अगदी कडक असुन, जेमतेमच गोड असतो. शिवाय तो खल्ल्याने निदान माझातरी घसा धरतो. ) तिथे असा अर्धवट पिकलेला खजुर आवडीने खल्ला जातो. यापुढे तो पिकत जातो व गळुन पडतो. खजुराला गोडी येण्यासाठी कडक उन्हाची आवष्यकता असते. जितका उन्हाळा कडक तितकी खजुराची प्रत उत्तम. वनस्पति सुर्यप्रकाशात प्रकाशसंश्लेषण करुन अन्न तयार करतात, हे शाळेत शिकलेले सत्य, तिथे अगदी प्रत्यक्षात बघायला मिळते. तिथे सगळीकडे खजुराची झाडे आहेत हे वर लिहिले आहेच. रस्त्याच्या कडेला लावलेली झाडे सरकारच्या मालकिची आहेत, पण खजुर पिकायला लागला, कि सुलतानतर्फे, पेपरमधे खास निवेदन येते. खजुर पिकु लागले आहेत, समस्त जनतेला तो खाण्याचे आमंत्रण आहे. अर्थातच तो फुकट असतो. फुकट जरी असला, तरी त्या कडक उन्हाळ्यात मुद्दम खजुर खायला कोण जाणार. शिवाय बाजारात तो नाममात्र दराने मिळतो. एरवीही झाडावरुन खजुर काढुन खाणे जिकिरीचेच असते. ” बबुलसे टपके, खजुरपे अटके ” हि म्हण उगाचच नाही. खजुराची पाने अर्धगोलाकार व तीन चार फ़ुटाची असतात. त्यावर खरेतर एकच टोकेरी पानांची दोन्ही बाजुला रांग असते. पण हि पाने नारळाच्या पानाप्रमाणे एका प्रतलात नसुन दोन तीन प्रतलात विखुरलेली असतात. त्यामुळे पान भरगच्च दिसते. या अश्या रचनेमुळे, कसाहि हात घातला तरी पान टोचतेच. अगदी काट्याप्रमाणे ते टोचते. खजुर त्यांचे मुख्य पिक असल्याने, त्याची फार काळजी घेतली जाते. त्यावर संशोधनहि होत असते. अगदी लहान बोरा एवढ्या आकारापासुन दोन ईंच लांबीच्या फळापर्यंत अनेक आकार व प्रकार त्यात असतात. अत्यंत गोड असलेला एक वेगळ्याच जातीचा खजुर मी तिथे चाखला. जिभेवर ठेवताच तो विरघळतो. नीट पिकल्यावर खजुर झाडावरुन गळुन पडतो. रस्त्या शेजारचा खजुर तर मातीतच मिळुन जातो. बागायतीमधे मात्र तो झाडांच्यामधे ताडपत्री अंथरुन, काळजीपुर्वक गोळा केला जातो. असा नैसर्गिक रित्या पिकलेला खजुन खुपच गोड लागतो. त्यातल्या साखरेच्या प्रमाणामुळे खजुर ओलसर असला तरी, सहसा खराब होत नाही. खजुराचे तसे तिथे फारसे खाद्यप्रकार मी बघितले नाहीत. त्यातली बी काढुन त्यात काजु वा बदाम भरुन तो खाल्ला जातो. उपास सोडताना खजुर आणि दुध घेतात. एरवी पाहुणचारासाठी काहवा आणि तमार म्हणजेच कॉफी व खजुर दिला जातो. पुर्ण पिकलेला खजुर अति गोड असल्याने, पाच सहापेक्षा जास्त खाता येत नाही. काहवा म्हणजे अतिदाट बिनदुधाची कॉफ़ी, त्यात साखर आणि वेलची घातलेली असते. अशी कडवट कॉफ़ी आणि खजुर, हि जोडी छान जमते. खजुराचे झाड तसे चिवट असते. त्याला फारसे पाणी लागत नाही. पुर्ण वाढलेले झाड उपटुन, दुसरीकडे खोचले तरी व्यवस्थित तग धरते. त्याची पाने एकत्र बांधुन क्रेनच्या सहाय्याने ते झाड मुळासकट उपटले जाते. फारशी मुळेच नसल्याने, ते सहज उपटले जाते. नव्याने केलेल्या बागांमधे अशी झाडे लावली जातात. तसा या झाडाचा नारळाच्या झाडाप्रमाणे अनेक प्रकारे ते उपयोग करतात. पानांचा सरपण म्हणुन उपयोग करतात. त्याची धगहि व्यवस्थित असते आणि ते भुरुभुरु जळुन जात नाही. पानांचा उपयोग झाडलोट करण्यासाठी पण केला जातो. त्या पानांच्या विणुन छोट्या टोपल्या वैगरे करतात. खोडाचा उपयोग घराचे वासे वैगरे म्हणुनहि केला जातो. अखंड सरळ लाकुड असल्याने, त्याचे बसण्यासाठी बाक वैगरेहि करता येतात. तिथे नुसता खजुरच नाही, तर ईतरहि अनेक प्रकारची झाडे आहेत. अपुर्ण.
|
| |
| Wednesday, August 16, 2006 - 6:08 pm: |
|
|
हे आहे कोर्निश. डाव्या कोपर्यात टेकडीवर किल्ला दिसतोय.
|
| |
| Thursday, August 17, 2006 - 1:10 am: |
|
|
खजुराने लगडलेले झाड
|
| |
| Thursday, August 17, 2006 - 1:12 am: |
|
|
हे आहेत डोंगरोबा
|
| |
| Thursday, August 17, 2006 - 1:13 am: |
|
|
हि आहे नितळ पाण्याची वादी
|
| |
| Thursday, August 17, 2006 - 4:36 pm: |
|
|
वाळवंट म्हंटलं कि जमीन नापिक असणार असा आपला एक ग्रह असतो. पण पाणी मिळालं तर तिथे काहिहि पिकु शकतं. मी पहिल्यांदा ओमानमधे गेलो तेव्हा तिथे चिकु अजिबात मिळायचे नाहीत. दुसर्यावेळी मात्र भरपुर चिकु मिळु लागले होते, आणि ते चक्क ओमानमधे पिकवलेले होते. सोहारच्या रस्त्यावर अनेक जणानी चिकुच्या बागा केल्या आहेत. चिकु हे काहि तिथले नैसर्गिक पिक नाही. तशी तिथे आता अनेक पिकेहि घेतली जातात. लिंबु हे एक मह्त्वाचे पिक. ताज्या पिवळ्याधमक लिंबाचे सरबत करुन पिण्यापेक्षा ते एक वेगळे पेय करतात. अखंड लिंबु सुकवुन त्याची सालासकट पावडर करतात. मग त्यावर कढत पाणी ओतुन, चवीपुरती साखर घालुन सकाळी ते पितात. हे पेय आरोग्याच्या दृष्टीने अतिशय हितकारी असते. याबरोबर तिथे जागोजाग विलायती चिंचेची झाडे दिसतात. विलायती चिंच तशी अजिबात आपल्या चिंचेसारखी नसते. गोल गोल वेटोळ्यांची शेंग असते. आत काळ्या बिया असतात आणि त्या बियांवर एक जाडजुड पांढरे आवरण असते. ते थोडेफार खोबर्यासारखे लागते. त्यातला फक्त तेवढाच भाग खाण्यासारखा असतो. पण त्या शेंगाहि बहुदा खाली पडुन मातीत मिसळुन जातात. बाजारात क्वचित त्या विकायला असतातहि. बोराची झाडे पण तिथे दिसतात. पण तिही तिथे कुणी खात नाहीत. मी मुद्दाम काढुन खायचो. आपल्या गावठी बोरांसारखीच चवीला आंबटगोड लागायची ती. मस्कतच्या वाटेवर समुद्रकिनार्यावर काहि नारळाची झाडे लावलेली आहेत. पण तिथे ती अजिबात तग धरु शकलेली नाहीत. नारळ धरणे तर सोडाच, त्या झाडांची वाढहि खुंटलीय. देवळाच्या रस्त्यावर तशी कडुनिंबाची झाडे लावली आहेत, पण तीदेखील तिथे वाढु शकली नाहीत. बकुळीची आणि बुचाची झाडे मात्र तिथे छान वाढली आहेत. तुतीची ( मलबेरी ) झाडे पण तिथे दिसतात. आणि त्याला भरपुर तुती लागतातदेखील. मस्कतच्या दक्षिण भागात मात्र केळी, पपया, नारळ यांचे भरपुर पिक निघते. सुलतान काबुस रोडवर वतायानंतर वादी हतात कडे जाणारा रस्ता आहे. तो रस्ता पुढे कुरियत या गावाला जातो. ते आमचे नेहमी फिरायला जाण्याचे ठिकाण. त्या गावात समुद्रकिनारा होता, एक पुरातन गढी होती, पण तिथले आकर्षण म्हणजे, वाटेवर लागणारा एक छोटासा घाट. एक डोंगर चढुन उतरावा लागे. कोकणी माणसाला घाटांचे काय कौतुक असणार, पण तरिही तिथे जायचो एवढे खरे. तिथले आणखी एक आकर्षण म्हणजे, रस्त्यालगत असणारी आमराई. प्रचंड वाढलेली आंब्याची झाडे आहेत तिथे. आंब्याची अढी वैगरे घालणे त्याना माहित नाही, झाडावर पिकलेली फळेच ते काढतात. तिथे एका रियालला चाळीस पन्नास आंबे मिळायचे आणि कमीत कमी तेवढे घ्यावेच लागायचे. तिथेच रस्त्याच्या बाजुने वाहणारा फ़लाज होता. चार पाच मित्रात मिळुन आम्ही तेवढे आंबे फस्त करायचो. आपल्या गावठी आंब्याप्रमाणे पण चवीला किंचीत कमी गोड असायचे ते. पण ओमानी आंबे खाण्याचे समाधान जास्त असायचे. खजुराच्या बागेत गेलो कि पण ताजा ताजा खजुर खायचा आग्रह व्हायचा. खजुर आणि दुध असा छान बेत असायचा. ओमानमधे थोडेफार मका आणि गव्हाचे पिक देखील येते. मक्याचे तेल ते वापरतात. ( पण बहुतेक अन्नधान्य त्याना आयात करावे लागते. ) मक्याचे ताजे उकडलेले कणीस आणि वर बटर घालुन तिथे खायची पद्धत आहे. सोहारच्या हॉटेलमधेहि असे कणीस मिळते. चार्याचे पिक पण तिथे घेतले जाते. थोडीफार मेथी घेतात. ओमानच्या शेतकर्यानी पिकवलेल्या भाज्या विकण्यासाठी खास दुकाने होती, आणि आम्ही आवर्जुन त्या भाज्या घ्यायचो. टोमॅटो, वांगी, कांदा अश्या काहि भाज्या असायच्या. भोपळा पण असायचा. आंबाडीची भाजी पण कधीतरी दिसायची, पण त्या भाजीपेक्षा त्या लोकाना आंबाडीच्या बोंडाचे जास्त कौतुक. त्या बोंडाच्या पाकळ्यांचे सरबत ते उपास सोडताना पित असत. मला जेवण रांधायची कला शिकवण्यात, ओमानचा मोठा हातभार आहे. कसे ते बघुयाच. अपुर्ण.
|
| |
| Thursday, August 17, 2006 - 4:38 pm: |
|
|
परवा म्हणजे १५ ऑगष्टला माझे आणि अजयचे भटकंतीचे ठरले होते. पण सातार्यातल्या तुफान पावसामुळे, बेत आयत्यावेळी रद्द करावा लागला. पण मुड होता, म्हणुन मी गगनगडावर गेलो होतो. अगदी दाट धुके होते, पाच फ़ुटावरचेदेखील दिसत नव्हते. तरिही मी गडावर गेलोच. माझे मुख्य आकर्षण होते ते या दिवसात फुलणारी रानफुले. खरे तर हि फक्त सुरवात असते. पण आजचा खेळ उद्याला नसतो, त्यामुळे तिथली काहि रानफुले तुमच्यासाठी पेश करतोय. हि आहे कुळी. अगदी एवलीशी हि फुले कातळावरच उगवतात. हा फोटो काढताना, मला खुप कसरत करावी लागली, कारण या फुलावर कॅमेरा फोकस करणे कठीण जात होते.
|
| |
| Thursday, August 17, 2006 - 4:42 pm: |
|
|
या कुळीप्रमाणेच हा पानतेरडा पण कातळावर, अगदी उभ्या कातळावरदेखील उगवतो. अगदी वेगळ्याच आकाराचे हे फुल, कातळाला शहारे आणत असावे.
|
| |
| Thursday, August 17, 2006 - 4:44 pm: |
|
|
हा आहे ढालतेरडा. चांगले दीड ईंच व्यासाचे हे फुल असते. आपल्या मनमोहक रंगाने आणि आकाराने ते नजर खिळवुन ठेवते.
|
| |
| Thursday, August 17, 2006 - 4:50 pm: |
|
|
आपल्याकडे बागेत वा घराच्या आजुबाजुला तेरडा असतो, तो बराच टपोरा असतो. हल्ली तर अगदी गुलाबाचा भास व्हावा असे आकार आणि रंग दिसतात, पण हा आहे चिमुकला रान तेरडा, याला बोरपुडी म्हणतात.
|
| |
| Thursday, August 17, 2006 - 4:52 pm: |
|
|
हि आहे निळी पापणी. एक क्षण चिमुकला बॅटमॅन वाटला कि नाही हा. तसे अजुन हिचे दिवस नाहीत. त्यामुळे हि फुले फकत एकाच ठिकाणी दिसली.
|
| |
| Thursday, August 17, 2006 - 5:54 pm: |
|
|
हि गडाची वाट आणि गडाचा कडा, परवा दिसला तसा.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|