|
| |
| Thursday, May 04, 2006 - 4:47 pm: |
|
|
केनयावर लिहायला घेतल्यापासुन मी स्वाहिली भाषेतले शब्द सहज वापरतोय. तशी हि केनयाची तसेच टांझानिया व युगांडाचीहि भाषा, याशिवाय काहि भागात अरेबिक पण बोलली जाते. ( टांझानियाचा भाग असलेले झांजिबार बेट हे एकेकाळी ओमानच्या राजाच्या अधिपत्याखाली होते. पुढे ते बेट आणि टांगानिका देश एकत्र होवुन टांझानिया हा देश बनला, त्यामुळे अर्थातच अरेबिकचा प्रभाव आहे. ) तरिही या भाषेशिवाय अजिबात अडत नाही. तिथे सगळ्यानाच ईंग्लिश येते. नैरोबीत तर ईंग्लिशच प्रामुख्याने बोलली जाते. त्यामुळे हि भाषा मी पुर्णपणे शिकलो नाही. शिवाय लुईच्या मते मी ती भाषा बोलु नये कारण, किसुमुमधे बोलली जाणारी स्वाहिली हि ऊर्मट आहे, व अस्सल आदबशीर स्वाहिली फक्त मोंबासामधेच बोलली जाते. पण तरिही या भाषेतले शब्द आपसुक जिभेवर चढले. लुई काही बोलला तरी हि भाषा अत्यंत कर्णमधुर आहे. जर्मन, रशियन सारखी खरखरीत अजिबात नाही. जोडाक्षरे तर अगदीच कमी, आहेत ती बहुदा अनुस्वारामुळे आलेली. या भाषेला वेगळी लिपी नाही. ईंग्लिशची म्हणजेच रोमन लिपीच वापरली जाते. पण तिही अत्यंत सुलभ करुन. जोडाक्षरे नसल्याने त्याना X आणि Q वापरायची गरजच पडत नाही. शिवाय स्पेलिंग या संकल्पनेला त्यानी पुर्णपणे फाटा दिलाय. देवनागरीप्रमाणे जसा उच्चार तसे स्पेलिंग. पण तिथेहि अनावश्यक अक्षराना टाळले जाते. ऊदा आपल्याप्रमाणे विनायकचे स्पेलिंग Vinayak असे न करता Vinayk असे केले जाते. ऊच्चारात क्वचित र चा ल केला जातो, तसेच ड चा र केला जातो. पण तेहि क्वचितच. अरेबिक मधे जसे शब्दांच्या आधी अकारण अल लावले जाते तसे तिथे अनेक शब्दांमागे म किंवा न लावले जाते, पण त्याचा ऊच्चार मात्र आवर्जुन केला जातो. रोमन लिपीमधेच हि भाषा असल्याने, आमच्या तोंडात हे शब्द सहज बसले. पेपरमधे हे शब्द वापरले जात असतच. कधीकधी ईंग्लिश शब्दांपेक्षा हे शब्द आम्हाला जास्त जवळचे वाटु लागले. या भाषेतले काहि शब्द वानगीदाखल देतोय. ( अर्थात माझे नॉलेज मर्यादित आहे, हेहि तितकेच खरे. ) जांबो - हॅलो हबारी याको - कसा आहेस, काय खबरबात मझुरी साना - अगदी मजेत असांते साना - आभारी आहे करिबु - तुझे स्वागत असो चापा वेवे - तुला बदडुन काढीन वाचा ई मनेनो - मला त्रास देऊ नकोस हकुना मटाटा - काहिच त्रास नाही वेवे झिंगा - तु मुर्ख आहेस शावरी याको - तुला हवे ते कर गापी मामा - केवढ्याला दिली ईको हकुना साहि - हे काहि बरोबर नाही ईको बाया - हे वाईट आहे ईको साहिही - बरोबरच आहे चुग्वा ई पेसा - हे पैसे घे सेमा ई मझे, वेका साईन हापा - त्या माणसाला सांग, ईथे सहि कर. लेटे कलामु - पेन आण किटु किडोगो - शब्दार्थ काहितरी छोटेसे, वाच्यार्थ चायपान्याचं काहितरी बघा कि जरा. आणखी काहि शब्द मसाला - तरुण मुलगी. कबाब - तरुण मुलगा, मकारा - कोळसा, चिको - शेगडी, मकोरा - मवाली बुढा - म्हातारा माणुस, नजुगु - शेंगदाणे काझी - कामकाज डुडु - कुठलाहि किडा पंगा - गवत कापायचा मोठा कोयता उहुरु - स्वातंत्र्य गारी - गाडी रफ़िकी - दोस्त सिंबा - सिंह स्वाला - हरिण ट्विगा - जिराफ असकारी - सिक्युरिटी गार्ड सोगी - कामगार चु - टॉयलेट कू - खोकला रोबा - औषध सिगारा - सिगरेट आपल्याकडच्या मल्याळम सोडल्यास बहुतेक भाषा पुरेश्या अर्थवाहि स्वराघाताने बोलल्या जातात ( ” अहो ऐकलत का ” ” काय शिंची कटकट आहे ” , ” अरेच्च्या असं आहे का ” अशी वाक्ये वाचतानादेखील तुम्ही योग्य ते स्वराघात देता. ) तसेच स्वाहिलीत पण. त्यामुळे नीट लक्ष देऊन ऐकले तर हि भाषा सहज कळते. एकंदरच हि भाषा तशी मार्दवपुर्ण आहे. ऊगाचच आवाज चढवला जात नाही. लायन किंग सिनेमातले हकुना मटाटा हे गाणे तुम्ही ऐकले असेलच. तिथे मला बर्यापैकी गाणी ऐकता आली, ती पण जरी नादमधुर असली तरी त्यात आर्तता नव्हती. सहज मजेत गायल्यासारखी गाणी होती ती. त्यांचे ईंग्लिश उच्चार बर्यापैकी छान असतात. फ़क्त ते ट्Vएल चा उच्चार ट्वेलॉफ़ असा करतात. डब्ल्यु चा उच्चार डबल यु असा करतात आणि आय डोंट च्या आधी हमखास विथ मी लावतात, जसे विथ मी आय डोंट नो, विथ मी आय डोंट लाईक, पण त्याचीहि सवय होते. ओ येस किंवा रियली च्या ऐवजी ते, हा या असे म्हणतात. पण मग आपण कोण साहेबाचे बाप लागुन गेलो आहोत ? अपुर्ण्…
|
| |
| Saturday, May 06, 2006 - 11:01 am: |
|
|
केनयाच्या आठवणी तश्या खुपच आहेत. केनया हा देश तसा आधीपासुन, वन्याप्राण्यांसाठी माहित होता. तिथे असताना मुद्दाम मसाई मारा मधे जाणे झाले नाही, त्याची कारणे म्हणजे, जाता येता त्याचे दर्शन घडतच होते. दुसरे म्हणजे सिनेमात दाखवतात, तितका काहि तिथला प्रवास सुखाचा नाही. सिनेमात दाखवतात त्याप्रमाणे सर्व प्राणी दिसतील, याचेहि खात्री नाही. एखादा सिंह कुठेतरी बिचारा शिकार खात बसलेला असतो, तर त्याच्याभोवती दहा बारा जीप्स कोंडाळे करुन ऊभ्या राहतात. जिराफाची लांबवर हालचाल दिसली तरी, दाखवला बरं का जिराफ, असे म्हणत टिक केली जाते. पण तिथले पक्षी मात्र रोज दर्शन देत असत. आमच्या कॉलनीत भरपुर गवत माजायचे. त्यात अनेक पक्षी ऊतरत. एका पक्ष्याला सेक्रेटरी बर्ड असे नाव आहे. तोहि एकदा दिसला होता. याच्या डोक्यावर एक आडवे पिस असते आणि हा पक्षी साप मारण्यात पटाईत असतो. मला एक हरणटोळ सोडला तर कधी साप दिसले नव्हते, त्याला पण बहुतेक तोच मिळाला असावा. एक काळा पक्षी यायच्या त्याच्या डोक्याव्र मस्त तुरा असायचा. ( विश्वात्मा सिनेमात दाखवलाय हा पक्षी. ) खुपच देखणा असतो तो पक्षी. एक करडा बगळ्यासारखा पक्षी आला होता. चांगला तीन फुट ऊंच होता. त्याने तर अख्खा सरडाच गिळला होता. पण हे झाले अनियमित येणारे पाहुणे. रोजचे पाहुणे तर खुपच होते. पायरीवर भाजी वैगरे निवडत बसलो कि हे सभोवार असायचे. चिमणीसारखे पण खुप रंगीबेरंगी पक्षी यायचे. मुनियासारखे पिटुकले पक्षी यायचे. ते तर गवताच्या काडीवर दोन दोन बसले, तरी गवताची काडी वाकायची नाही ईतके लहान असायचे. आपल्या सुगरणीसारखे विणुन घरटे करणारे पक्षी झाडावर असायचे. त्यांची घरटी चेंडुसारखी गोल गरगरीत असायची. चिमणीसारखेच पण आकाराने मोठे आणि पिवळ्या रंगाचे असायचे. संध्याकाळच्या वेळी फार कलकलाट करायचे ते. आम्ही पायरीवर गप्पा मारत बसलो कि समोरासमोरच्या घरावर बसुन काहि पक्षी भांडत बसायचे. आपल्या बगळ्याएवढेच पण चॉकलेटी रंगाचे असायचे ते. काळी कावळ्याच्या चोचीसारखी चोच आणि शिवाय डोक्यामागे त्याच आकाराचा तुरा असल्यामुळे ते फार विनोदी दिसत. एका पार्टीने सवाल करायचा त्याला दुसर्या पार्टीने उत्तर द्यायचे असा खेळ चालायचा त्यांचा. शेजारीण म्हणायची लग्नाची बोलणी चाललीत त्यांची. देण्याघेण्याचे ठरत नाहिये. मग आमचा खेळ चालायचा, ते काय बोलत असतील ते ओळखायचा. खंड्या म्हणजे किंगफिशरचे दर्शन ठरलेले. आपल्याकडे निळा शेंदरीच दिसतो नेहमी, तिथे त्याचे अनेक प्रकार दिसायचे. नवजात अर्भक पक्षी घेऊन येतात अशी कल्पना, पाश्चात्य लोकात आहे, तसा एक पक्षी वरुन ऊडत जायचा. त्याचे ओरडणे म्हणजे हुबेहुब तान्ह्या बाळाचे रडणे. ब्युटिफुल पिपल, सिनेमात एका पक्ष्याचे भलेमोठे घरटे दाखवलेय. अगदी तीन फुट व्यासाचे हे घरटे जवळच्याच झाडावर होते. तो पक्षी मात्र तितका मोठा नसायचा. हे घरटे बांधायला त्याला माती चिखलापासुन, बरीच सामग्री लागते, आणि तो पक्षी बाहेर वाळत घातलेले माझे मोजे कायम पळवायचा. पोपट पण वेगवेगळ्या आकाराचे आणि रंगांचे दिसायचे. त्यांचा कलकलाट तर ईतका असायचा, कि आम्हाला बोलणे अशक्य व्हायचे. रात्रीच्या वेळी ऊंदरामागे घुबड यायची. मस्त गलेलठ्ठ असायची ते. एकतर चॉकलेटी रंगावर पांढर्या मोत्यासारखी नक्षी असलेले असायचे. आमच्या कॉलनीत सरडे पण भरपुर होते. आणि आपल्यापेक्षा बरेच मोठे असायचे ते. शिवाय त्यांच्यात निळा, नारिंगी असे रंगहि असायचे. फुले तर अगणित. तिथल्या फुलांचे रंग आपल्यापेक्षा खुपच चमकदार आणि भडक असायचे.मुद्दाम लावलेलीच नव्हे तर रानफुले पण अनेक रंगांची असायची. अगदी निवडुंगाला पण कमळासारखी फुले यायची तिथे. त्यापुर्वी गल्फमधे असताना, आम्ही पांढरे किंवा पेस्टल रंगाचेच कपडे वापरत असु, पण आफ़्रिकेत मात्र आम्ही रंगीबेरंगी कपडे घालायचो. तिथल्या वातावरणात तर ते मिसळुन जात असत. आपल्याकडे दहाबारा फुटांपेक्षा जास्त न वाढणारी कण्हेरी, टिकोमा सारखी झाडे, तिथे सहज वीस पंचवीस फुट वाढायची. आणि भरभरुन फुलायची. बाकिचीहि झाडे अशीच अवाढव्य वाढलेली दिसायची. %&%&% गणपति दुध प्यायला लागले होते त्या दिवशी मी केनयातच होतो. तिथेहि देवळात रांगा लागल्या होत्या. मला देवळाबाहेर बॅंकेतली मिसेस ईबुतीती भेटली, पुजार्याला विचारुन तिला पण आत नेले. गणपति तर दुध पितच होता, मग तिने पुजार्याला विचारले कि तिने पाजले तर चालेल का ? पुजार्याने परवानगी दिली, पण गणपतिजवळ जायला ती घाबरत होती. शेजारी असलेल्या जलारामच्या मुर्तीवर तिने प्रयोग केला. ( ह्याचा पुतळा आपल्या संत तुकारामासारखाच असतो. ) आणि तो यशस्वी झाला. %&%&% ब्रिटिश लोकांची क्लब संस्कृति तिथे पण होती. याला बरे जेवण करता येते अशी माझी अपकिर्ती तिथेहि पसरली होती. आमच्या कंपनीतील सर्व मशिनरी आयातीत असल्याने, खुप जर्मन आणि ब्रिटिश लोक येत असत. आणि त्या प्रत्येकाला माझ्या हातचे जेवण जेवायचे असे. घरी बोलावण्यापेक्षा, आम्ही त्याना जवळच्या क्लबवर घेऊन जात असु. तिथे जेवण शिजवणे हा माझ्यासाठी सुखद अनुभव असायचा. शेगडी पेटवणे, कांदा, टोमॅटो, मिरच्या कापुन देणे, आले लसुण वाटुन देणे, चिकन साफ करणे अशी सगळी कामे तिथले नोकर करत असत. शिवाय चपात्या, भात, ऊगाली वैगरे ते करुन देत. भांड्याची ऊस्तवार पण तेच बघत. त्यामुळे मला फक्त माझा टच द्यावा लागे. %&%&% केनयातल्या काळ्या बायकाना मेंदीची पण खुप हौस आहे. त्या मेंदीला हिना म्हणतात. खास सुदानवरुन येते हि मेंदी. पण ती आपल्यासारखी लाल केशरी न रंगता, काळसर तपकिरी रंगते. त्यांची डिझाईन्सहि आपल्यासारखी पानाफुलांची नसुन, भुमितीतल्या आकारांची असत. अगदी कोपरापर्यंत मेंदी काढत त्या. त्यांचा काळ्या रंगावर ती शोधावीच लागे. पण तळहातावर मात्र छान रंगत असे. %&%&% नाचणी पण ते लोक खातात. त्याची लापशी वैगरे करण्यापेक्षा ते लोक त्याचे पेय करुन पितात. त्याला ते सोरघम म्हणतात. ते पेय दिसायचे बीयरप्रमाणेच. बाटलीत मिळायचे. पण मी कधी चाखुन बघितले नाही. %%%% आपण कल्पना करु शकणार नाही, ईतके ते लोक दरिद्री आहेत. नवे कपडे वा नव्या चपला ते कधी विकत घेऊच शकत नाहीत. ते शक्यतो सेकंड हॅंडच कपडे वापरतात. दोन पायात दोन वेगवेगळ्या चपला घालणे, हे तिथे अगदी कॉमन आहे. %&%&% केवळ नावापुरतीच तिथे लोकशाहि आहे. विरोधी पक्षाच्या ऊमेदवाराला तिथे ऊमेदवारीचा अर्जच भरु दिला जात नाही. निवडणुकांच्या दिवशी सर्व ऊमेदवार एका पटांगणात जमा होतात. मतदाराने त्याच्यासमोर ओळीने ऊभे रहायचे. मग ऊमेदवाराने त्यांची शिरगणती करायची. तेवढी त्याची मते. आहे कि नाही स्वस्त आणि मस्त पद्धत ? %&%&% तिथे रस्त्यावर माणसाला टोपणनावाने हाक मारायची पद्धत आहे. म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी काम करत असाल, त्यावरुन तुमचे नाव ठरते. काहि विकत असाल तर त्या वस्तुवरुन नाव ठरते. म्हणजे एखादी बाई पपया विकत असेल तर ती पोपोमामा. आणि तिने तो धंदा सोडुन दिला तरी, तिचे नाव तेच राहते. %&%&% मी शक्यतो गाडीने किंवा विमानाने फिरायचो. तिथे तसा विमानप्रवास स्वस्त होता. पंखा असलेली छोटी विमाने असायची. त्यात आधीच अरुंद पॅसेज आणि खात्यापित्या घरची हवाई सुंदरी. माझे खांदे नेहमीच सीटच्या बाहेर येतात. त्यामुळे येता जाता तिचे धक्के खावे लागत मला. रस्ते मात्र बरे होते. वेगाने गाडी हाकता येत असे. रस्त्यावरच्या पाट्या पण ईंग्लिशमधे असल्याने, तसा त्रास नसे. पण स्थानिक लोकांसाठी असलेल्या मोटारी आणि बसेस मात्र चलती का नाम गाडी, अश्या पद्धतीच्या असायच्या. दारात बसलेल्या माणसाला दार धरुनच बसावे लागे, कारण दार कधी निखळुन पडेल, ते सांगता येत नसे. या बसना मसाला एक्स्प्रेस, ब्लॅक ब्युटी अशी नावे असायची. ट्रेनहि आहेत. पण त्याचा अनुभव घेता आला नाही. एकदा तिकिट काढायला गेलो तर या तिकिटात बेड, ब्लॅंकेट, जेवण वैगरे सर्व मिळेल असे सांगितले. किती वाजता सुटेल यालाहि समाधानकारक उत्तर मिळाले, पण नैरोबीला किती वाजता पोहोचेल याला मात्र, ते आम्ही कसे सांगु शकु, असे उत्तर मिळाले, म्हणुन मी बेत बदलला. %&%&% तिथे पोस्टल सेवा पण समाधानकारक आहे. पोस्ट बॉक्स नंबरवरच पत्रे मिळतात. पोस्तल स्टेशनरी छानच असते. आणि पत्रे वेळेवर मिळतात देखील. कार्ड टेलेफोन आहेतच. %&%&% पर्यटकांचे केनयात नेहमीच स्वागत असते. तुम्हाला संधि मिळाली तर जरुर जा. तिथे गेल्यावर तिथला चहा अवश्य विकत घ्या. तिथे दगडांचे सुरेख दागिने मिळतात. हे दगड तिथे नैसर्गिक रित्याच सापडतात. अनेक रंग आणि डिझाईन्स असतात त्यात. नैरोबी शहरहि अतिशय सुंदर आहे. दिवसभरात जमेल तितके फिरा. पण अंधार पडल्यावर मात्र हॉटेलच्या बाहेर पडु नका. अंगावर दागदागिने, किमती घड्याळे अजिबात ठेवु नका. त्यासाठी तुमच्यावर हल्ला होवु शकतो. पण पर्यटक म्हणुन गेलात तर ईतके जवळुन दर्षन घेता येणार नाही. ( मलाहि तो देश पुर्णपणे बघता आला, असा दावा नाही. ) त्या देशाला जे दाखवावेसे वाटते ते आणि तितकेच पर्यटकाना दाखवण्यात येते. पण तरिही तो देश सुंदर आहे. स्वस्तहि आहे. एकदा तरि भेट द्यायलाच हवी असा आहे. आता ईथे थांबवतो. थोडा ब्रेक घेऊन, नायजेरियावर लिहिन म्हणतो.
|
| |
| Thursday, May 25, 2006 - 3:51 pm: |
|
|
नायजेरियातले दिवस एकदा कानफाट्या म्हणुन नाव पडलं ना, ---- तशी गत झाली होती माझी. तु केनयात राहु शकलास ना मग नायजेरिया काय कठीण आहे ? असेच मला विचारण्यात आले होते. आपण अनेकदा आफ़्रिका असा एकसंध विचार करतो. पण हा एक प्रचंड मोठा खंड आहे, हे कधी आपल्या लक्षातच येत नाही. ( आपण आपल्या देशाला खंडप्राय का म्हणतो, तेहि मला कधी कळले नाही. ) जरा नकाशा डोळ्यासमोर आणुन बघा. अनेक देश दिसतील तुम्हाला. वरती आग्नेय भागात रेड सीला लागुन एथिओपिया, सुदान, सोमालिया हे देश आहेत. ईजिप्तच्या ईतिहासातले सोन्याचे पान सुदानने घडवले असे म्हणायला हवे. कारण तिथले सगळे सोने सुदानमधुनच गेले होते. सोमालियातली यादवी अजुन ताजीच आहे. ईथिओपिया दुष्काळ आणि भुकमारीसाठी तुम्हाला माहित असला तरी मानवी जीवाष्म जास्त करुन तिथेच सापडतात. दोन पायावर ऊभे राहिलेली पहिली स्त्री बहुदा तिथलीच होती. कारण सर्वात प्राचीन मानवी जीवाष्म तिथे सापडले आहे. तिथले लोकांचे चेहर्याचे फ़िचर्स खुपच शार्प असतात. आणि बांधाहि सडपातळ असतो. सुदानमधले लोक चांगलेच धिप्पाड व सहा फ़ुटांपेक्षा ऊंच असतात. ईथेच तुम्हाला ईरिट्रिया नावाचा छोटासा देश दिसेल. या देशात अतिषय कमी भ्रष्टाचार आहे, असे मागे वाचले होते. पण तरिही ईथे या सर्व भागात प्रचंड मोठे वाळवंट आहे. त्याखाली टांझानिया, युगांडा आणि केनया अशी त्रयी. या तीन देशांचा एक्त्रच विचार करायला हवा. कारण भाषा, संस्कृति वैगरे सगळे समानच आहे. वेगळा काढायचा झाला तर युगांडा बाजुला करावा लागेल कारण ईदी अमीनसारखे अत्याचार ईतर देशात झाले नाहीत. अजुनहि तो जिवंत आहे, असा प्रवाद आहे. पुर्वेला समुद्रात मादागास्कर नावाचे मोठे बेट आहे. मुख्य खंडापासुन तुटलेले असल्याने, ईथले प्राणी आणि वनस्पति पण अगदी एकमेव अश्या आहेत. ईथेच समुद्रात सेशल्स, मॉरिशियस आणि कोमोर्स अशी छोटी बेटं आहेत. अनेक हिंदी सिनेमातुन आपल्याला ती दिसली आहेत. मुख्य खंडात मालावी, बोट्स्वाना, नामीबिया असे देश आहेत. हेहि सृष्टीसौंदर्याने नटलेले आहेत. ऊर्मिला मातोंडकर आणि आफ़ताब शिवदासानीच्या मस्त नावाच्या सिनेमाचे शुटींग ईथे झाले होते. त्याखाली येतो तो नेल्सन आणि विनी मंडेलाचा साऊथ आफ़्रिका. सौंदर्याने नटलेला आणि तरिहे वर्णद्वेषाच्या शापाने ग्रासलेला देश. याच्या पोटात स्वाझिलॅंड सारखा एक देश आहे. आणखीहि एक देश टोकाला आहेच. ईतिहासाच्या पुस्तकात आपल्याला भेटलेले केप ऑफ़ गुड होप ईथेच आहे, तसेच प्रियदर्शनच्या हेराफेरी सिनेमातले ऊपरवाला जबभी देता, हे गाणे जिथे चित्रीत झालेय ते सन सिटी पण ईथेच. सोन्याच्या खाणी अजुनहि आहेत ईथे. साराफिना सारखा नितांत सुंदर सिनेमा या देशात निर्माण झाला होता. ईथेहि वाळवंट आहेच. खालच्या निमुळत्या भागात गॅबोन सारखे देश आहेत. तर मधे हिर्यांच्या खाणी असलेला झायरे, सेंट्रल आफ़्रिका असे काहि देश आहेत. मग सुरु होतो आफ़्रिकेचा पश्चिमेकडील भाग. हा भाग पेट्रोलीयमने सम्रुद्ध आहे. ईथल्या बेचक्यात नायजेरिया वसलेला आहे. त्याच्या बाजुला टोगो आणि बेनीन सारखे छोटे देश आहेत आणि मग घाना आहे. पुढे सेनेगल आयव्हरी कोस्ट सारखे देश आहेत. ईथल्या मध्य भागात नायजर, चाड सारखे देश आहेत. मग वर लागतो तो सहारा वाळवंट पोटात सामावुन घेणारा अल्जीरिया. त्याबाजुला पर्यटकांचे आकर्षण असलेला ट्युनिसीया. या देशात फ़्रेंच आणि अरेबिक बोलले जाते. आणि लोकहि अतिषय देखणे असतात. आफ़्रिकेच्या उत्तर भागात आहेत ईजिप्त आणि लिबिया. ईजिप्तची दक्षिण आणि पश्चिम सीमा एक सरळ रेष आहे. ईजिप्तबद्दल तुम्ही जाणताच. लिबीया हाहि एक प्रगत देश आहे. त्यांची प्रगती सौदी अरेबियाला सहन होत नाही आणि जर तुमच्या पासपोर्टवर लिबीयाचा शिक्का असेल तर तुम्हाला सौदी अरेबियामधे प्रवेश मिळत नाही. ( आता तुम्ही कशाला जाताय म्हणा तिथे. ) मला नीट आठवत असेल तर लिबियामधे चार मीटर व्यासाची, पुर्णपणे स्टेनलेस स्टीलपासुन केलेली एक लांबलचक पाईपलाईन आहे. ती पाणीपुरवठ्यासाठी वापरतात. या खंडाला आशियापासुन वेगळा करणारा सुएझ कालवा, ईजिप्तच्या वर आहे. तीन टोकाला तीन प्रचंड वाळवंटे असुनसुद्धा, असे म्हणतात कि आफ़्रिकेची जमीन ईतकी सुपीक आहे कि ती सर्व जगाला अन्नधान्य पुरवु शकेल. आपण लहानपणापासुन आफ़्रिका म्हणजे जंगल आणि जंगली लोक असे समीकरण वाचत आलो आहोत. पण नकाशात तुम्हाला फ़ारच थोडा भाग हिरवा दिसेल. आणि जंगली लोक. खरेच आहेत का तिथे ? बघुच. पण या ईतक्या विविधतेने नटलेल्या खंडाला सरसकट एका मापात टाकणे चुक आहे. मी तर त्यातला एक चिमुकला भागच बघितला. त्याचीच ओळख करुन देतो. अपुर्ण..
|
| |
| Friday, May 26, 2006 - 4:37 pm: |
|
|
तर एकदाचे ठरले नायजेरियात जायचे. त्यावेळी भारतात तरी नेट वैगरे नव्हते. पेपरमधे नायजेरियाबद्दल फार काहि वाचलेले आठवत नव्हते शिवाय माझ्या ओळखीचे देखील कुणी तिथे नव्हते. ज्या कंपनीत जाणार होतो, तीदेखील फ़्रेंच होती, आणि तिथेहि कुणी भारतीय नव्हते. नकाशात नायजेरिया नेमके कुठे आहे ते बघुन घेतले. शाळेचे भुगोलाचे पुस्तक काढुन बघितले, तेंव्हा राजधानी लागोस आणि तिथे फ़ुलानी हि गुराखी जमात असते असे वाचले. ( हे दोन्ही संदर्भ चुकीचे होते. ) पण बाकि काहिच कळले नाही. पेपरमधे ड्र्ग कॅरियर म्हणुन नायजेरियन नागरिकांची धरपकड झाल्याची वाचलेले आठवले. कंपनीबद्दल मात्र पुर्ण माहिती मिळाली होती. व्हिसा वैगरे दिल्लीहुन आणण्याची व्यवस्था झाली होती. एअर टिकेट ईथिओपियन कंपनीचे असणार होते, असे कळले, गेटवे समोरच्या ताजमहाल हॉटेलमधे त्या एअरलाईनचे ऑफ़िस आहे, तिथे जाऊन चौकशी केली. पण तिथे काहि पी. टी. ए. ( प्रीपेड टऍव्हल अडव्हाईस ) आलेला नव्हता. मग अचानक फ़ॅक्स आला आणि लुफ्तान्साचे तिकिट आलेय असे कळले. जायला दोनच दिवस ऊरले होते. नरिमन पॉईंटच्या त्यांच्या ऑफ़िसात पोहोचलो. तिथे खुप अगत्याची वागणुक मिळाली. तिकीट हातात देता देता त्या बाईने सहज व्हिसा घेतलास का, असे विचारले. मी म्हणालो नायजेरियाचे वर्क परमिट आहे. तर ती म्हणाली जर्मनीचा व्हिसा घ्यावा लागेल. त्यापुर्वी व्हिसा शिवाय दोन तीन देशात जाऊन आलेलोच होतो, त्यामुळे हे लक्षातच आले नव्हते. तिथुन जर्मन एंबसी जवळच होती, पण त्यांची वेळ संपत आली होती. त्या लुफ़्तांसाच्या बाईनेच एक गडी पाठवतेय असे कळवले. मग आमची वरात तिकडे गेली. पासपोर्ट आणि तिकिट याशिवाय हातात काहिच नव्हते. पण तरिही फारशी कटकट न करता फ़ॉर्म मिळाला. आणि दुसर्या दिवशी ये असे सांगितले. रितसर मुलाखत झाली. मला काय त्यांच्या देशात रस नाही, अशी त्या बाईची खात्री पटली असावी. तरीपण मिळेल कि नाही, हे सांगत नव्हती ती बया. दुसर्या दिवशी तर जायचे होते. बॅग तरी काय भरु. दोन वाजता व्हिसा हातात पडणार होता. आणि पहाटे दोनचे फ़्लाईट होते. माझ्याकडे ऑनवर्ड तिकेट तर होतेच शिवाय रिटर्न टिकेट पण होते. टऍव्हलर्स चेक्स हि होते. ते तिथे दाखवले होतेच. मग धीर करुन बॅग भरली. केनयाचा अनुभव असल्याने, भरपुर सामान घेतले. ६० / ७० किलो वजन सहज झाले असेल. दुसर्या दिवशी मुसळधार पाऊस पडत होता. तरिही तिथे गेलोच. आता मात्र तिथे छान स्वागत झाले. व्हिसा तयार होताच शिवाय तिथल्या शिपायाने, मला जर्मनीबद्दल दोन सचित्र कॅटलोग्ज न मागता दिले. ( खात्रीने सांगतो तो शिंदेच असणार. ) मी हसुन निरोप घेतला. पावसामुळे टऍफिक जॅम झालाच होता. पाच वाजता घरी पोहोचलो. आणि चक्क ताणुन दिली. माझ्या येण्या जाण्याची सवय असल्याने, घरी काहि काळजी नव्हतीच. रात्री दहा वाजता एअरपोर्टवर पोहोचलो. सराईतासारखा लाईनमधे ऊभा राहिलो. बॅगेज जास्त आहे, असे काऊंटरची बाई म्हणाली, मी पण बापुडवाणा चेहरा करुन, आफ़्रिकेत चाललोय असे सांगितले. तिने काहिही न बोलता मला बोर्डिंग पास दिला. मनात म्हणाली असेल, पोटासाठी कुठे कुठे जातात रे बाबा माणसं. नेहमीप्रमाणेच सहार मधे तोडफोड चालली होती. भिंतीला हि मोठी मोठी भगदाडं होती. एखादे बारिकसे विमान सहज आत आले असते. त्यावेळी तिथे अगदी खाली काहि बेड्स टएवले होते. तिथे जाऊन परत ताणुन दिली. झाडुवाल्या मामाला एक दिड वाजता ऊठव म्हणुन सांगितले. विमानात लुफ़्तांसाने सुखद धक्का दिला. माझ्यासाठी ठेपले, अळुवड्या, बासुंदी असा झक्क बेत होता. ( तिकीट बुक करताना, एशियन व्हेजितरेयन असे आवर्जुन सांगितले होते. ) ईतके सुग्रास जेवण जेवल्यावर अंगावर येणारच होते. मस्त ताणुन दिली. चार पाच तासानी ऊठलो. बाहेर ऊजाडायला लागले होते. युरपची हद्द लागलीच होते. हिरवीगार कुरणे, लाल कौलाची घरे, निळेशार पुल्स असे सगळे पिक्चर पोस्टकार्डसारखे दिसत होते. ठरलेल्या वेळेच्या आधीच आमचे विमान फ़्रॅंकफ़ुर्टला पोहोचले होते. तिथला ऊन्हाळा असल्याने हवा खुपच छान होते. पहिल्यांदा परदेशी गेलो होतो तेंव्हा मोजुन वीस डॉलर्स मिळाले होते. पण यावेळी तसे नव्हते. भरपुर डॉईश मार्क्स हातात होते. जीवाचे फ़्रेंकफ़ुर्ट करुन घेतले. चवीढवीची आईसक्रीम्स, फ़ळे खाऊन घेतली. ब्रेड मला खुपच चामट लागला. लागोसचे विमान दुपारी साडेबाराचे होते. त्याचा हि बोर्डिंग पास मुंबईतच मिळाला होता. त्यामुळे फक्त गेटवर जाणे एवढेच करायचे होते. फ़्लाईट नंबर बघत गेटवर गेलो तर तिथे अक्रा ची फ़्लाईट लागली होती. आता लागोसला जर्मन मधे अक्रा म्हणतात का ते कळायला मार्ग नव्हता. ( जर्मनीला जर्मनमधे ड्युशलॅंड म्हणतात तसेच असे वाटले. ) शेवटी काऊंटर स्टाफ आल्यावर खात्री करुन घेतली होती. हळु हळु प्याशिंजर्स जमु लागले. भारतीय कुणी दिसतच नव्हते. ऊडदामाजी काळे गोरे याप्रमाणे काळ्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा दिसु लागल्या. मला त्या लोकांची सवय असल्याने, काहि विषेश वाटले नाही. ती लोक मात्र आवर्जुन ईंग्लिशमधेच बोलत होती. पण फारशी गर्दी दिसत नव्हती. मी नेहमीच विंडो सीट मागुन घेतो, तशीच यावेळी पण होतीच. सकाळी घेतलेले युरपचे दर्शन पुन्हा घ्यायचे होते. ईटालीचा शुभ्र परिसर, मग भुमध्य सागराचा परिसर गेल्यानंतर अल्जीरीस चा थोडाफार हिरवा भाग लागला. आणि मग सहारा वाळवंट सुरु झाले. लुफ़्तांसाने याहि प्रवासात मला छोले, लोणचे बडिशेप वैगरे देऊन खुप लाड केले. मग मात्र बाहेर सहाराचे वाळवंट सुरु झाले. पिवळी वाळु, तुरळक दिसणारी झुडुपे आणि भगभगीत प्रकाश याशिवाय काहिच दिसत नव्हते. हा प्रवास उत्तर दक्षिण असल्याने, एकाच टाईम झोन मधुन होता. शिवाय माझी खिडकि पश्चिमेला असल्याने, ऊन्हाचा पण त्रास होत होता. बाकि बहुतेक सगळ्या लोकानी खिडक्या बंद केल्या होत्या. माझ्या बाजुला कोणीच नव्हते. पण माझी ऊत्सुकता मला खिडकी बंद करु देत नव्हती. शेवटी एअर होस्टेसने माझ्या खांद्यावर थोपटुन सांगितले, कि हज्जारदा ईथुन गेलेय पण बघण्यासारखे काहि नाही ईथे. कर तु खिडकी बंद, आणि सिनेमा बघ. लुफ्तांसाचे लाड चालुच होते. अगदी आईसक्रिम सुद्धा दिले. सिनेमा कुठलातरी बघितलेलाच होता. म्हणुन जरा डुलकी काढली. खिडकी बंद केल्यावरहि बाहेरचा भगभगीत प्रकाश जाणवत होता. तो जरा मंदावल्यासारखा वाटल्यावर, खिडकि ऊघडुन बघितली. बाहेर जरा हिरवाई दिसु लागली होती. विमानाचा अक्रा ( घानाची राजधानी ) चा डिसेंट सुरु झाला. ( स्पेलिंग वरुन आपण या देशाचा घाना असा उच्चार करतो, पण खरा शब्द गहाना असा आहे. त्याना घ हा उच्चार जमणारच नाही. ) घानात पोहोचायला सहा वाजले होते. अर्ध्याहुन अधिक विमान रिकामे झाले होते. तिथे विमान अर्धा तास थांबणार होते. एअर होस्टेसला विचारुन विमानाच्या बाहेर पडलो. बघण्यासारखे काहि नव्हते खास. दहा पंधरा मिनिटात परत विमानात आलो. आणि जोरदार पाऊस सुरु झाला. आता लागोस च्या दिशेने निघालो. अपुर्ण..
|
| |
| Monday, May 29, 2006 - 4:18 pm: |
|
|
मी वर लिहिल्याप्रमाणे विमान प्रवास हा उत्तर दक्षिण वा दक्षिण उत्तर असा क्वचितच होतो. पुर्व पश्चिम प्रवासात नेहमी आपण वेगवेगळ्या टाईम झोन मधुन जात असल्याने, वेळ बदलते व जेट लॅगचा थकवा जाणवतो. उत्तर दक्षिण प्रवासात मात्र, जितका वेळ प्रवासाला लागला, तितकाच वेळ घड्याळात गेलेला असतो. त्यामुळे या प्रवासाचा थकवा जाणवत नाही. साडेसहा तासाचा हा प्रवास, अगदी मजेत पार पडतो. अक्रा आणि लागोस, ( आता मला माझी आणि आपल्या सगळ्यांची होत असलेली चुक सुधारु दे. स्पेलिंग वरुन जरी ते लागोस वाटत असले तरी खरे नाव लेगोस आहे. तसेच ती नायजेरियाची राजधानी नाही. राजधानी आहे अबुजा. ) हि दोन्ही ठिकाणे देहु आळंदीसारखी विमान कंपन्या एकाच फ़ेरीत पार पाडतात. काहि अक्रा लेगोस करतात तर काहि लेगोस अक्रा तर अक्राला सुरु झालेला पाऊस जरा वर गेल्यावर ओसरला. आता विमान पश्चिमेकडुन पुर्वेकडे येत होते. खाली सुंदर समुद्रकिनारा दिसत होता, पण साधारणपणे समुद्रकिनार्यांवर पर्यटकांची, हॉटेलची गर्दी दिसते ती नव्हती. पण ते दृष्य एकसुरी असल्याने जरा कंटाळा आला. अजुनहि लुफ्तान्सा खाऊ घालतच होती. एअर होस्टेस तर आग्रह करकरुन, वाढत होत्या. चीज पफ़ तर एवढे सुंदर आणि हलके होते, कि प्रत्येक जण मागुन घेत होता. आणि प्रवासीहि अगदी कमी होते. शेवटी लेगोसला ऊतरलो. एअरपोर्ट अगदीच ओकाबोका होता. बहुतेक आमचे फ़्लाईट शेवटचे होते. माझे सामान ट्रान्सफर झाल्याने, बहुदा पार मागे टाकले होते, त्यामुळे त्याची पाऊण तास वाट बघावी लागली होती. ईमिग्रेशन कष्टम्स काऊंटरवर तुरळकच गर्दी होती. स्थानिक लोक तर त्या अधिकार्याशी जोरजोरात भांडुनच बाहेर पडत होते. माझ्या पुढे काहि जर्मन लोकांचा ग्रुप होता, त्यांच्या आधाराने मी ऊभा राहिलो तर एक काळा माणुस आला आणि त्याच्याकडे त्या सगळ्यानी पासपोर्ट दिले आणि ते बाहेर पडले. त्या पासपोर्टांची चळत घेऊन, त्या दोघांचे खाली मान घालुन खुसुखुसु सुरू झाले. माझ्याकडे ते लक्ष देईना. बरे दुसरा काऊंटरच नव्हता. मग सरळ पुढे गेलो आणि काऊंटरवर पासपोर्ट ठेवला. तर त्याने दुर्लक्ष केले. तुला न्यायला कुणी आले नाही का, असे त्या दुसर्या माणसाने विचारले. आता माझ्या लक्षात सगळा प्रकार आला. सरळ १० डॉईश मार्क्स ची नोट पुढे केली. मग त्याने पटकन स्टॅंप मारुन दिला. आणि अश्या रितीने माझी नायजेरियाच्या भ्रष्ट यंत्रणेची ओळख झाली. बाहेर पडलो तर सगळा आवार रिकामा. रात्रीचे आठ वाजले होते. एकजण माझ्याकडे रोखुन बघुन गेला. मी पण आजुबाजुची माणसे न्याहाळु लागलो. कुणीतरी न्यायला येणार होते हे नक्की. येऊद्याकि महमद्दाला पर्वताकडे, असे म्हणुन मी एका जागी ट्रॉली घेऊन ऊभा राहिलो. काहि टॅक्सीवाले गोंडा घोळु लागले. मग एक लक्षात आले, कि आजुबाजुला दिसणारे सगळे पुरुष चमनगोटा केलेले आहेत. पुर्वी कोल्हापुरात असे कुणी दिसली, कि घरी सगळे खुषाल ना, असे विचारत असत, ( आता तिरुपतीला जाऊन आलास का, असे विचारतात. ) पण ईथे काय मामला होता ते कळत नव्हते. तिरुपतीच काय ज़ेरुसलेम पण दुर होते तिथुन. शिवाय आईबांचे काहि बरेवाईट झाल्यावर, असे करण्याईतके हे लोक श्रधाळु नसावेत, माझे आपले विचार चालु असताना. ओगा ओ ओगा, हौनो असे विचारत एक माणुस पुढे आला. मी लक्ष दिले नाही, तशी त्याने खिश्यातुन एक कागद काढुन माझ्यापुढे धरला. तर तो माझ्याच कंपनीचा फ़ॅक्स होता. मग नेहमीप्रमाणे, तुला ईतका वेळ झाला, तर तु आलाच नसशील असे मला वाटले, पण मला खात्री होती, वैगरे वैगरे गप्पा झाल्या. माझे भरपुर सामान बघुन, त्याने तु एकटाच आहेस ना, असे विचारले. मी होकार दिल्यावर तुला बायको पाहिजे का, असे थेट विचारले. मी म्हणालो, आता नको, दमलोय. ( या परक्या देशात, अनोळखी माणसापुढे मी हतबल होतो, म्हणुन जीभ आवरली. ) शेवटी त्यानी मला आमच्या कंपनीच्या गेश्ट हाऊसवर सोडले. पण वाटेत रॉकेलच्या चिमण्या लावुन काहितरी विकत असताना बघितले. नीट काय ते दिसले नाहीच. एकदा पोलीसानी गाडी अडवली. तर त्या माणसाने, मला गाडीतच बसवुन, हवापाण्याच्या, देशाची सद्यपरिस्थिती वैगरे विषयावरच्या गप्पा ऊरकल्या. चहापाण्याची पण बोलणी झालीच असतील म्हणा. गेस्ट हाऊस मात्र सुरेख होते. आमच्या कंपनीचा बिझिनेस रिमोट साईट मॅनेजमेंट असल्याने, ते गेस्टहाऊस आमच्या कंपनीतर्फेच चालवले जात होते. थोड्या वेळाने एक ब्रिटिश माणुस येऊन चौकशी करुन गेला. त्याचे नाव जोसेफ विल्सन हिल. मग पुढे तो माझा जिवलग मित्र झाला. जोहिल, असे त्याचे टोपण नाव होते. तो स्वत : ला बॅटमॅन समजायचा. त्याने हातावर पाठीवर बॅटमॅनचे चित्र गोंदवुन घेतले होते. झोप मात्र छानच लागली. सकाळी ऊठुन बाहेर आलो, तर प्रसन्न वाटले. नुकताच जोराचा पाऊस पडुन गेला होता. आवारात भरपुर देशी बदामाची भरपुर झाडे होती. बदामांचा नुसता खच पडला होता. त्यातले चार पाच ऊचलुन घेतले. कुणी बघत नाही असे बघुन खाऊ लागलो. सकाळी अगदी प्रोफेशनल ब्रेकफ़ास्ट झाला. सकाळी लवकर निघायचे होते. माझे राहण्याचे ठिकाण पोर्ट हारकोर्ट असणार होते, म्हणजे अजुन थोडा विमानाचा प्रवास बाकि होता. आठ वाजता निघालो. बरोबर जो होताच. कालचाच माणुस आम्हाला न्यायला आला. त्याचे नाव गानी साका. पुढे त्याची भेट अनेकवेळा झाली. तो आम्हाला लेगोसच्या लोकल एअरपोर्टवर घेऊन जाणार होता. मी ऊत्सुकतेने बाहेर बघु लागलो. जो मात्र, आता येणे जाणे कसले, असे तोंड करुन बसला होता. लेगोस शहराचे प्रभात दर्शन घडत होते. अपुर्ण.
|
| |
| Wednesday, May 31, 2006 - 5:26 pm: |
|
|
लेगोस हे मुंबईप्रमाणेच एक बेट आहे. मुख्य जमिनीपासुन ते जरा दुरच आहे, आणि एका लांबलचक फ़्लायओव्हरने ते मुख्य भागाला जोडले गेलेय. तसेच अधुन मधुनहि काहि खाड्या आहेतच. नैरोबी हे शहर अत्यंत सुंदर आहे, त्यामानाने लेगोस अगदीच बकाल आहे. झोपडपट्टी आहेच. रस्ते चांगले असले तरी, रस्त्याच्या कडेला घाणच आहे. गाडी जरा कुठे थांबली कि तिला फ़ेरीवाल्यांचा गराडा पडतोच. त्यात विकायला अंडरवेअर पासुन ब्रेडपर्यंत सगळ्याच वस्तु असतात. खिडकि वा दार अजिबात ऊघडायचे नाही, अशी ताकिदच आम्हाला मिळाली होती. अनेक ठिकाणी बियर वैगरेची होर्डिंग्ज होती. जो कुठलेतरी चावट पुस्तक वाचत होता. ( तोंडावर आणलेला आव मात्र बराच अध्यातमिक होता ) त्यामुळे त्याच्याशी बोलता येत नव्हते. गानीचे ईंग्लिश जरा समजायला अवघड जात होते. त्या शहरात तसे बघण्यासारखे काहि दिसले नाही. हिरवाईहि फारशी नाही. सकाळची वेळ असुनहि ऊकाडा प्रचंड होता. पण प्रवास फार लांबचा नव्हता. एका वरती पत्रे असलेल्या चाळवजा ईमारतीसमोर गाडी ऊभी राहिली. जो म्हणाला हाच एअरपोर्ट. आपला परळचा एस्टी स्टॅंड बरा म्हणावा, ईतपत ती ईमारत वाईट अवस्थेत होती. तिथल्या खिडकिवर जोने आमची तिकिटे काढली. मग एका टेबलावर बसलेल्या बाईने आमचे हॅंड बॅगेज बघितले. एनीथिंग फ़ॉर मी ओगा, असे तिने जोला विचारले. यु मीन मनी, ओ जिझस वी हॅव नॉट ईटन फ़ॉर पास्ट कपल ऑफ़ डेज यु नो. जोने असे म्हणत यथायोग्य अभिनय केला. मीपण जोकडुन धडे घेतच होतो. एक बोळकांडे ओलांडुन आम्ही पुढे गेलो. एक बारकेसे विमान थोड्या अंतरावर ऊभे होते. राईट बंधुनी जातीने बांधले असावे अशी त्या विमानाची अवस्था होती. विमानावरचे नाव आणि तिकिटावरचे नाव वेगळे असल्याने ते विमान आपले नाही, असे जोने सांगितले. त्याचे बोर्डिंग झालेले होते आणि पायलटची आणि हवाई सुंदरीची बाचाबाची चाललेली स्पष्ट दिसत होती. शेवटी पायलट जागेवर जाऊन बसला, आणि तिने नाखुषीने शिडी वर ओढुन दरवाजा बंद केला. आम्ही ऊभे होतो तिथुन फारतर वीस फ़ुटावर हा प्रकार घडत असल्याने, सगळे व्यवस्थित दिसत होते. विमान सुरु होवुन चार पाच फ़ुट पुढे गेले असेल तेवढ्यात आमच्या मागुन सुट वैगरे घातलेला एक जाडसर माणुस, तिकिट फडकावत विमानाजवळ जाऊन ऊभा राहिला. झाले विमान थांबले. ती बाई जातीने खाली ऊतरली. भडक लाल तंग पोषाख केलेली बाई, चांगल्या खात्या पित्या घरची दिसत होती. त्या माणसाबरोबर असलेल्या एका माणसाने एक प्लांटेनचा घड ( मोठी केळी ) आणला होता, तो त्या बाईने स्वता ऊचलुन घेतला. मग तो माणुस तोर्यात विमानात बसला. मी जोकडे प्रश्णार्थक नजरेने बघितले, तर तो म्हणाला, धावपट्टीवरुनहि मागे आणतात कधीकधी. तर एकदाचे ते विमान ऊडाले. तिकिटावर लिहिलेल्या वेळेपेक्षा तासभर ऊशीराने दुसरे विमान आले. त्याचे नाव होते एडीसी. ते आमचे होते. अवस्था काहि आधीच्या विमानापेक्षा वेगळी नव्हती. फ़क्त रंग वेगळा होता. नेहमीप्रमाणे मी खिडकितली जागा मागुन घेतली होती. त्या विमानाच्या दारापर्यंत जाईपर्यंत विक्रेते पाठ सोडत नव्हते. फ़ुटबॉल पासुन केक पर्यंत वाट्टेल ते विकत होते. त्याना कोणी अडवतहि नव्हते. पण तसा नायजेरियात विमान प्रवास स्वस्त आहे. अद्भुतहि आहे. ( त्याचे किस्से येतीलच ) पण तितकाच अपरिहार्यहि आहे. माझी जागा नेमकि ईमर्जन्सी डोअरजवळ होती. विमान ऊडेल का अशी शंका मला येत होती, पण अपेक्षेपेक्षा जास्तच जोरात धाव घेऊन ते ऊडाले. एअर होस्टेस माझ्या जवळ येऊन म्हणाली, काहि अपवादात्मक स्थितीत, कदाचित तुला दरवाजा ऊघडावा लागला, तर त्याचे हॅंडल ईथे आहे. बाकि नेहमीचे ड्रिल झालेच. सॅंडविच होती पण बीफ़ किंवा चिकन एवढाच चॉईस असल्याने, मला ऊपास घडला. लेगोस ते पोर्ट हारकोर्ट हा प्रवासहि तसा समुद्राच्या काठानेच होता. रेतीचे काहि किनारे गेल्यानंतर बराच भाग दलदलीचा लागला. मनुष्यवस्तीच्या खुणा दिसतच नव्हत्या. तासाभराने समुद्रात मोठ्या मोठ्या बोटि दिसु लागल्या. मग गोदी दिसु लागल्या, पोर्ट हारकोर्ट आले होते. अगदी ऊतरताना भरपुर पामची झाडे दिसली. या विमानतळाची अवस्था, लेगोसपेक्षा वाईट होती. एक धावपट्टी आणि तिला जोडुन एक चौकोनी जागा, एवढाच पसारा. ईमारत पत्र्याची. विमानातुन ऊतरुन चार पावले चालले कि पाचवे पाऊल चिखलात. कंपनीची गाडी आलीच होती. ड्रायव्हरने ईतके सामान का, अशी चौकशी केलीच, तर जोने कंपनीचे सामान आहे, असे सांगुन वेळ मारुन नेली. ड्रायव्हरची आणि जोची चांगलीच दोस्ती दिसत होती. अमकी तुझी वाट बघतेय. तमकीचा नाद आता सोड तिने दुसरा नवरा केलाय आता. तमकीच्या बहिणीला तुझ्यात रस आहे, अश्या गप्पा चालल्या होत्या.. माझ्या नजरेतल्या सवालाला, माय एक्स्टेन्डेड फ़ॅमिली असे उत्तर दिले. पुढे या सगळ्याची सवयच झाली मला. ( नाही नाही, मी नाहि केला असला घरोबा तिथे. ) आधी घरी गेलो. एक प्रचंड मोठे लोखंडी गेट ऊघडुन एका संकुलात प्रवेश केला. अतिषय भव्य अश्या पाच व्हिलांचे ते संकुल होते. गेटच्या बाहेरुन कसलीच कल्पना येत नव्हती, पण आता आवार खुप मोठे होते. एका बाजुला सुंदर लॉन होते. पहिलीच व्हिला मला देण्यात आली. लांबरुंद पण बंदिस्त व्हरांडा. त्यात ऊघडणारे भले मोठे लाकडी दार आणि बाजुला फ़्रेंच विंडो. घरात टिव्हीसकट सिटिंग एरिया. डायनींग एरिया. बार. दोन मोठे डीप फ़्रीझर, एक मोठा फ़्रीज. किचन. बेडरुम शिवाय गेस्ट टॉयलेट असा सगळा जामनिमा होता. वरच्या मजल्यावर चार सेल्फ़ कटेंड बेडरुम्स होत्या. त्यापैकी एक जोला आणि दुसरी गेतनला दिली होती. गेतन, हि मी ठेवलेले नाव. त्याच्या नावाच्या स्पेलिंगवरुन. तो फ़्रेंच होता आणि त्याच्या नावाचा ऊच्चार बहुदा गेतॉं असा होता. पण मी कधीच त्याला या नावाने हाक मारली नाही. पुढे तोहि मित्र झाला, पण ते दोघे फिरतीवरच असायचे. त्यामुळे पुढील काहि वर्षे ती व्हिला माझ्या ताब्यात होती. सगळ्या व्हिलांभोवती, ऊंच भिंत होती. त्यावर काटेरी तारांच्या गुंडाळींचे कुंपण होते. शिवाय भिंतीवर काचांचे तुकडे लावले होते ते वेगळेच. घराच्या बाजुलाच आंब्याचे एक मोठे झाड होते. भरपुर कैर्या लागल्या होत्या. घरात, आॅन्जेला नावाची हाऊसमेड वरकामाला होती. शिकागो सिनेमातल्या, क्वीन लतिफाची बहिण शोभावी, अशी होती ती. पण घरातले सगळे काम तीच करत असे. एकंदर हेहि घर मस्तच होते. पण पुढील काहि वर्षे, त्या कंपाऊंडच्या बाहेर, सन्ध्याकाळ नंतर कधीहि बंदुकधारी गार्ड आणि ड्रायव्हर घेतल्याशिवाय बाहेर पडलो नाही. भरदिवसादेखील कधी गेटच्या बाहेर पायी गेलो नाही. अपुर्ण
|
| |
| Thursday, June 01, 2006 - 4:14 pm: |
|
|
हाऊसमेड्स पहिल्या दिवशी आरामच केला. सगळे घर बघुन घेतले. आॅन्जेला घर मात्र स्वच्छ ठेवायची. दिवसभर तिला तेच काम करावे लागत असे. आवारातच लॉंड्री होती. त्यामुळे आमच्या बेड्सवरच्या चादरी, टॉवेल्स वैगरे ती धुवुन आणायची. जर जो आणि गेतन घरी असले, तर त्यांच्यासाठी ती जेवण, ब्रेकफ़ास्ट वैगरे करायची. पण त्यांच्या येण्याजाण्याच्या वेळा आणि दिवसहि ठरलेल्या नसल्याने, महिन्यातुन आठदहा वेळाच तिला हे करावे लागायचे. मी मात्र तिला माझ्यासाठी जेवण करु द्यायचो नाही. पण दुपारी जेवण गरम करुन ठेवणे, वाणसामान भाज्या आणुन देणे, पाव आणणे अशी कामे ती मनापासुन करायची. मी तिला चपत्या वैगरे करायला शिकवल्या. ती मनापासुन शिकलीही. मी जेवण करत असताना, ती लक्ष देऊन बघत असायची. ईतर नायजेरियन मुलींच्या मानाने ती खरेच स्वभावाने खुप गरिब होती. मी शिजवलेल्या पदार्थांची चव ती आवर्जुन बघायची. पण तिला ते आवडत नसावेत. आमच्या कंपनीच्या व्यवसायामुळे मला आयात केलेल्या अनेक भाज्या फ़्रोझन किंवा टिनमधल्या मिळायच्या. पण ताज्या भाज्यांसाठी मला तिच्यावर अवलंबुन रहावे लागायचे. माझा शाकाहार तिला अजिबात पटायचा नाही. पण भारतीय काय खातात याची तिला थोडीफार कल्पना असायची. आमच्या ऑफ़िसच्या जवळच भाजीबाजार होता. शनिवारी मी कोणालातरी घेऊन तिथे जायचो. क्वचितच वेगळ्या भाज्या मिळायच्या. कोबी, गाजर, बटाटा आणि फ़रसबी एवढेच मिळायचे. एकदा कारली, दुधी पडवळ दिसले, ते घेऊन आलो. आॅन्जेला ला दाखवल्या, तर ती म्हणाली, हे काय खातोस तु ? या भाज्या तर माझ्या व्हिलेजमधे आपोआप ऊगवतात. मग मी तिला शनिवारी लाव्कर रजा द्यायचो आणि सांगायचो घरी जा आणि अश्या भाज्या घेऊन ये. ती बर्याच भाज्या आणायची. कोवळा दुधी मिळाला म्हणुन मी हलवा केला, ती सगळे बघतच होती. मग मला म्हणाली, ओगा ओईबो ( हे माझे तिथले नाव, ओगा म्हणजे चीफ आणि ओईबो म्हणजे गोरा ) ही काय खायची वस्तु आहे का, आम्ही नाहि खात. मग मी विचारले कि तुम्ही काय करता, तर म्हणाली हा चांगला मोठा होईस्तो वेलीवरच ठेवतो. मग सुकला कि पोखरुन पाणी भारुन ठेवण्यासाठी वापरतो. तु म्हणजे अगदी बुशमॅनच ( जंगली माणुस ) आहेस. तिनेच आणलेल्या कारल्याच्या काचर्या तिला खायला दिल्या, तर ती दोन तीन बाटल्या पाणी प्यायली. पडवळाची मजा तर सांगण्यासारखीच आहे. ( मी आधी लिहिला होता हा किस्सा ) मला एकदा पडवळ मिळाला तो जुन निघाला. मी घराच्या मागे सहज बिया पेरल्या तर त्या रुजल्या आणि वेल भराभर वाढु लागला. भरपुर ऊन आणि पाऊस यामुळे त्याला भरपुर पडवळ लागले. पडवळ्याच्या काचर्या, भरली पडवळं, पछडी असे बरेच प्रकार करुन झाले, पण वेलावरची पडवळे काहि संपत नव्हती. मग शेवटी अंजेला ला म्हणालो. तु पण खात जा. रोज आठवण करुन देत होतो, तरी ती काहि पडवळाना हात लावत नव्हती. विचारले तर म्हणायची, अजुन जरा मोठी होवु देत. ती अगदी जुन होवुन पिवळी पडली तेंव्हा तिने काढली. कापुन मधला लाल गर घेतला, बिया काढुन तो वाटुन मटणात घातला. मी बघत होतो, मला म्हणाली तुम्ही लोक कच्चाच खाता.पिकायची वाट पण बघत नाही ! मी तिला सहज विचारले, तुम्ही काय म्हणता याला, तर म्हणाली ईंडियन टोमॅटो. आता बोला. पुढे माझ्या ओळखी वैगरे झाल्यावर मी अनेकवेळा घरी पार्ट्या करायचो. त्यावेळी सगळी तयारी, पडेल ते काम ती करायची. कधी कधी दांड्या मारायची. अशीच पहिल्यांदा दांडी मारली तर तिने सांगितले तिची आई वारली. तोंडावर काहि दु : ख वैगरे दिसत नव्हते. मग मी विषय वाढवला नाही. परत दिड महिन्याने दांडी मारली. कारण विचारले तर म्हणाली आई मेली, मग मी म्हणालो, अगं दोन महिन्यापुर्वीच मेली ना, मग हि कुठली, तर ती म्हणाली आधी मेली ती माझ्या मोठ्या बहिणीची आई, आणि काल मेली ती माझ्या लहान बहिणीची आई. माझी आई आमच्याकडे रहात नाही. हा नात्यांचा गुंता मला कधी समजलाच नाही. एका गावात राहणार्या सगळ्याच एकमेकांच्या बहिणी, ईतका व्यापक अर्थ होता त्यांच्या नात्याना. ( आणि ते लाक्षणिक अर्थाने नाही. ) तिने एक वर्षभर नोकरी केली मग तिच्या जागी कंपनीने जॉय नावाच्या एका मुलीला नोकरीवर ठेवले. तिने आधी एका भारतीय कुटुंबात काम केले होते, त्यामुळी ती जरा चटपटीत होती. अंजेलाला नारळ फोडायला दिला तर ती जमीनीवर आपटुन एका फटक्यात चार तुकडे करत असे. शिवाय पाणी फेकुन देत असे, कारण नारळाचे पाणी प्यायले तर मलेरिया होतो, असा तिचा ठाम विश्वास होता. पण ती कामाला वाघ होती. पन्नास साठ किलो वजन ती सहज ऊचलायची. जॉय जरा लहान होती. पण कामात हुषार होती. तिने मला अनेक स्थानिक भाज्यांची ओळख करुन दिली. तिला शाकाहार म्हणजे काय ते माहित होता. तिच्या गावाच्या जंगलातुन केळफुल, केळ्याचा काला, पेरु, जाम असे अनेक प्रकार आणुन द्यायची ती मला. एकंदर आफ़्रिकेत अशी हाऊसमेडची चैन करता यायची. आमच्या पार्टीत त्यांचा विषय हमखास निघायचा. पण त्यांचे नाव थेट घेता यायचे नाही, कारण त्या आजुबाजुला वावरत असायच्या. मग आम्ही त्याना देवबाई, आंदीबाई, सुगंधाबाई अशी नावे ठेवायचो. एका वहिनीने त्यांच्या हाऊसमेडचे नाव सवालाख असे ठेवले होते. ( कारण म्हणे आताच सवालाखाचे नुकसान झाल्यासारखे तोंड असे तिचे. ) नायजेरियात जादुटोणा भरपुर चालतो. या हाऊसमेड त्यात तरबेज असतात व त्या घरच्या पुरुषाला वश करुन घेतात, असा एक समज होता. म्हणुन भारतीय बायका भिंतीवर कुंकवाने मोठे स्वस्तिक काढायच्या. गणपति, हनुमन, कालिमाता यांची मोठी चित्रे लावायच्या. आणि त्यामुळे या बाया घाबरुन राहतात. असा त्यांचा विश्वास होता. माझ्यावर कधी अशी वेळ आली नाही. मी विश्वासाने त्यांच्या ताब्यात घर द्यायचो. त्यानी कधीहि अलिबाबा ( त्यांच्या भाशेतील चोरीला पर्यायी शब्द ) केला नाही. कधीमधी काहितरी मागुन घ्यायच्या. भारतातुन काहितरी आणायला सांगायच्या ईतकेच. पण या दोघी म्हणजे नायजेरियन स्त्रीच्या प्रतिनिधी होत्या, असे मात्र नाही. अपुर्ण
|
| |
| Friday, June 02, 2006 - 4:37 pm: |
|
|
नायजेरियात विमान प्रवास स्वस्त, अद्भुत आणि अपरिहार्य आहे असे मी वर लिहिले आहे. जगात सगळ्यात कमी पेट्रोलियमच्या किमती, जुनी विमाने, देखभालीवर खर्च नाही, विमानतळावरचा खर्च नाही, अश्या अनेक कारणाने स्वस्त आहे तो. अपरिहार्य अश्यासाठी कि रस्ते नीट नाहीत. ठिकाणे एकमेकापासुन बरीच दर. दलदलीमुळे रस्ते बांधणेहि शक्य नाही. त्यामुळे विमानप्रवासाला पर्याय नाहीच. शिवाय ट्रेन किंवा ईतर साधनेहि नाहीत. आता एक विशेषण राहिले ते म्हणजे अद्भुत. त्याचे किस्से बघुया. तश्या तिथे अनेक विमान कंपन्या होत्या. त्यामुळे अनेक पर्याय ऊपलब्ध होते. आमच्या कंपनीचे एम डी एकदा पोर्ट हारकोर्टहुन लेगोसला गेले. साधारण तासाभराचा हा प्रवास. पण तीन तास ऊलटुन गेले तरी ते पोहोचल्याची बातमी वायरलेस वर कळली नव्हती. ( हो वायरलेस रेडिओच वापरत असु आम्ही ) सगळे काळजीत. त्या विमान कंपनीचा पण काहिहि संपर्क होत नव्हता. आधी ते गेले कि नाही, याचीहि खात्री नव्हती. ते विमान रात्री ऊशीरापर्यंततरी सापडले नव्हते. दुसर्या दिवशी आमचे एम डी सुरक्षित असुन ते दुसर्या विमानाने गेल्याचे कळले. पण त्या हरवलेल्या विमानाचे काय झाले ते खरेच अद्भुत होते. ते विमान वाटेत भरकटले आणि एका दलदलीत बुडले. ते एका माणसाने बघितले, पण त्याने आयुष्यात कधी विमानच बघितले नसल्याने, त्याला तो भुताटकीचा प्रकार वाटला. त्याला रात्रभर झोपच आली नाही. मग पहाटे ऊठुन तो धावत सुटला, जवळचे गाव चार पाच तास धावल्यानंतर लागले. मग त्याने ती खबर दिली. मग त्या विमानाचा शोध लागला. या प्रकारानंअर आम्ही चार्टर्ड विमानाने जाऊ लागलो. त्यांचे विमान जरा नविन होते. शिवाय विमा वैगरे काढलेला होता. तेल विहिरीमुळे मी रहात होतो ते पोर्ट हारकोर्ट पण मह्त्वाचे गाव होते. एअर आफ़्रिक सारख्या काहि कंप्न्यांची विमाने गेबॉन मधुन तिथे ऊतरायची. पण ती दिवसाच. रात्री ऊतरायची सोय नव्हती. त्याहि विमानाचा एक किस्साच आहे. एकदा अगदी पासपोर्टवर शिक्का मारुन, विमानात बसलेल्या प्रवाश्याना ऊतरवले होते, कारण काय तर विमानात ईंधन नव्हते. आणि प्रत्येकाच्या पासपोर्टावरचा शिक्का अधिकृतरित्या खोडण्यात आला. तिथे एअर फ़्रान्सचे विमान आठवड्यातुन दोनदा थेट पॅरिसहुन यायचे. फ़्रेंच लोक भरपुर असल्याने हि खास सेवा सुरु केली होती. ते विमान रात्री पॅरिसहुन निघुन सकाळी तिथे पोहोचायचे आणि परत रात्री तिथुन निघायचे. सहसा कुठलेहि विमान असे दुसर्या देशात ईतका वेळ ठेवत नाहीत. पण तरिही माझ्या फ़्रेंच सहकार्याना ती विमानसेवा अजिबात आवडत नसे. एअर फ़्रान्सच्या हवाई सुंदर्या ईतक्या सुंदर नसतात आणि शिवाय त्या फार ऊद्धटपणे वागतात, यावर सगळ्यांचे एकमत होते. त्यामुळे पोर्टहुन लेगोसला आणि तिथुन स्विस एअरने झुरिकला आणि तिथुन स्विस एअरनेच पॅरिसला असा प्रवास ते करायचे. वर्ल्ड्स मोस्ट रिफ़्रेशींग एअरलाईन अशी अगदी यथार्थ जाहिरात केली जात असे तिची. त्यामुळे माझे पुढचे सगळे प्रवास स्विस एअरनेच झाले. तो प्रवास अविस्मरणीय असला तरी, त्या विमानात पोहोचेपर्यंत लेगोस विमानतळ नावाच्या दिव्यातुन जावे लागे. खुपदा तिथले एसी चालु नसत त्यामुळे भयंकर ऊकडत असे. आजुबाजुला काळे लोक जमिनीवर झोपलेले असत. त्यांच्या गलेलठ्ठ बायका, प्रचंड कलकलाट करत असत. फ़ेरीवाले त्रास देत असत. त्यामुळे पटक्न ईमिग्रेशन पार पडुन, आतमधे जात असु. तिथे तर साधे पाणी मिळायची सोय नवती. स्विस एअरचे फ़्लाईट लागलेले असेल तर ते लोक बाहेर ज्युस वैगरे आणुन देत असत. बोर्डिंग हे पण दिव्य असे. ड्रग वाहतुकीमुळे प्रत्येक एअरलाईन अतिशय सावधगिरी बाळगत असे. एका टेबलावर आमच्या हॅंड बॅगेजमधली प्रत्येक वस्तु पसरुन ठेवावी लागे व त्याची तपासणी होई. अर्थात स्विस एअरचे लोकच हे काम करत असत, व नंतर परत बॅग भरायलाहि मदत करत असत. पण त्यामुळे बोर्डिंगला सहज दोन तीन तास लागत. लेगोस विमानतळावर नेहमी नायजेरियन एअरलाईन्सचे मोठे विमान दिसे. पण ते कधी ऊडताना वैगरे दिसत नसे. त्याचा किस्सा तर आणखीनच अद्भुत आहे. नायजेरियाने विमान कंपनी सुरु केली खरी, पण त्या विमानांची देखभाल करणे त्याना परवडत नसे. ती विमाने लंडनला जाऊन नेहमी बिघडत. मग ब्रिटिश एअरवेज ला त्यांची दुरुस्ती करावी लागे. या दुरुस्तीचे बिल बरेच थकले होते, म्हणुन ब्रिटिश एअरवेजने नायजेरियन एअरवेज ला युके मधे यायला बंदी घातली. या बंदीनंतर ब्रिटिश एअरवेजचे एक विमान अक्राहुन लेगोसला यायला निघाले, तर त्याला ऊतरायची परवानगी दिली गेली नाही, ईतकेच नव्हे तर विमानतळावरचे सगळे लाईट्स बंद करण्यात आले. ते विमान दोन तीन फ़ेर्या मारुन अक्राला परत गेले. पण त्या विमानात लेगोसला ऊतरणारे काहि प्रवासी होते. स्विस एअरचे एक फ़्लाईट अक्राला होते, तर ब्रिटिश एअरवेजने त्यांचे प्रवासी न्यायची विनंति केली. स्विस एअरने ती मानली. पण हि बातमी लेगोस विमानतळाला कळली. स्विस एअरलाईनचे विमान ऊतरायच्या बेतात असतानाच, त्याला पण परवानगी नाकारली. त्यांच्याकडे तर परत जाण्याईतके ईंधनहि नव्हते. पायलटने अनेकवेळा विनंति केली, पण घालवलेले लाईट्स लावले गेले नाहीत. त्याने बिचार्याने अंदाजाने विमान ऊतरवले. ने नेमके घसरले. एक टायर निकामी झाला. तो दुसर्या विमानाने झुरिकहुन आणेपर्यंत ते विमान तिथेच रखडले होते. अपुर्ण
|
| |
| Sunday, June 04, 2006 - 5:24 pm: |
|
|
माझ्या कंपनीचा बिझीनेस रिमोट साईट मॅनेजमेंट हा असल्याने, ऑईलफ़िल्ड्स क्षेत्रातल्या साईट्स, म्हणजे रिग्ज वैगरे खुप दुरच्या ठिकाणी असायच्या, आणि त्या ठिकाणाना नियमित भेटी देणे, हा माझ्या कामाचा भाग होता. माझ्या कंपनीतर्फे माझ्या प्रवासाची चोख व्यवस्था व्हायची, पण तो प्रवास मला एकट्यानेच करावा लागायचा. आणि प्रत्येक वेळी नितनुतन अनुभव यायचा. गाडीने वैगरे जायचे असेल तर सोबर ड्रायव्हर आणि गार्ड असायचेच. पण समुद्रमार्गे किंवा जलमार्गे प्रवास असला तर तो नेहमीच थरारक व्हायचा. एकदा अश्याच एका रिमोट ठिकाणी जायचे होते. विमानाची व्यवस्था झाली होती. पण ते विमान म्हणजे त्या मार्गावर नियमित फेरी मारणारे विमान होते. दोन तासभर ताटकळल्यावर एकदाचे विमान आले. माझ्यासमोरच ते खाली ऊतरले त्यामुळे, विश्वास ठेवावा लागलाच. नाहितर ऊडत होते तेंव्हा ऊतरु शकेल असे वाटत नव्हते आणि ऊतरल्यावर परत ऊडेल असे वाटत नव्हते. ऊतरल्यावर विमानाचे पंख दोरीने जमिनीला बांधुन ठेवले होते. त्या ठिकाणी काम करणारे कर्मचारीच प्रवासी म्हणुन होते. सगळे बसलो तरी विमान काहि घरघरु लागले नव्हते. विमानाचे दार ऊघडे असल्याने भयंकर ऊकडत होते. मी पायलटला विचारले तर एक हाजी येणार आहे असे कळले ( हाज यात्रा करुन आलेल्या माणसाला तिथे सरसकट हाजी म्हणतात. ) आणखी १५ मिनिटाने, थेट विमानापर्यंत एका बेंझमधुन एक काळा माणुस आला. पायलट त्याला न्यायला खाली गेला. तो वर येऊन बसला, तरिहि त्यांचा गप्पा संपत नव्हत्या. मग त्याचा नोकर वाटेल असा एक माणुस आला, आणि त्याच्या हातात चक्क कुर्बानीचा बकरा होता. तोहि विमानात आला. ( तो म्हणजे बोकड ) मग परत काहितरी खुसपुस होवुन, त्या माणसाचा नोकरहि विमानात थांबला. त्या बोकडाने फार काहि गडबड नाही केली. ( जात्या जीवाला कसला होणारे त्रास ) त्यामुळे तो शांपणे ऊभा राहिला, आणि त्याच्याबरोबरचा माणुसहि विमानात ऊभाच होता. बसायला जागाच नव्हती. माझ्या प्रवासाला पाऊण तास वैगरे लागणार होता. पण ऊडल्यानंतर १५ मिनिटाने विमान ऊतरले. मी ऊठु लागलो, तर बाकिच्यानी सांगितले कि आपले ठिकाण दुर आहे अजुन. तिथे तो माणुस, त्याचा बोकड आणि नोकर ऊतरुन गेले. पायलट त्याना सोडायला खाली गेला. माझ्या मुक्कामी पोचल्यावर एकच हाजी आणि एकच बोकड आणि एकच ऊभा प्रवासी होता, यावर समाधान माग असा सल्ला देण्यात आला. दुसर्या ठिकाणे वॉटर प्लेनने जायचे होते. त्यावेळी माझ्याकडे फारच थोडे सामान होते. तर तिथल्या माणसाने मलाच वजनकाट्यावर ऊभे रहायला सांगितले. आता मी त्यावेळीदेखील ईतका काहि जाडजुड नव्हतो. मी विचारल्यावर मला खुलासा केला तो असा, त्या विमानाची कपॅसिटी मर्यादित असते, त्यामुळे सगळ्या कार्गोचे वजन करुन कपॅसिटीच्या बाहेर लोड होत नाही ना ते पहावे लागते. एका ठिकाणी हेलिकॉप्टरने जायचे होते. पण ते हेलिकॉप्टर सिनेमात दाखवतात तसे झॅकपॅक नव्हते. वर पंखा होता, म्हणुन हेलिकॉप्टर म्हणायचे ईतकेच. त्यात पायलट, आणखी तीन प्रवासी आणि बरेच सामान होते. माझ्याच कंपनीचा सप्लाय असल्याने, मी काय तक्रार करणार ? आणि कार्गो तरी कसला, ड्राय फिश, गारी ( म्हणजे काय ते लिहितोच ) आणि फ़्रेश क्रे फिश. मासे खाणार्या काहि लोकानादेखील ड्राय फिशचा वास सहन होत नाही, मग मला तर नाक आणि जीवदेखील मुठीत धरुनच जावे लागणार होते. ( क्रे पिश हा मासा भारतात मी बघितला नाही. मोठ्या कोलंबीसारखा असतो तो आणि खेकड्यासारख्या नांग्या असतात. ) शिवाय हेलिकॉप्टर प्रचंड हेलकावे खात होते. नशीब एवढेच कि मासे खायला पक्षी येत नव्हते. एका रिगवर मला स्पीडबोटीने जायचे होते. त्यासाठी मला स्विमिंग पासपोर्ट लागणार होता. कसलीहि परिक्षा न देता माझ्या कंपनीने त्याची पण व्यवस्था केली. प्रत्यक्ष स्पीडबोटीत चढण्यापुर्वी, हा प्रवास मी माझ्या जबाबदारीवर करतोय असे लिहुन घेण्यात आले. लाईफ जॅकेट वैगरे घालुन मी बसलो. आधी बराच वेळ एका चॅनेलमधुन बोट जात होती. पाणी संथ होते, त्यामुळे काहि वाटले नव्हते. तिवरांची जंगले आपण ईथे बघतो, तेंव्हा ती झुडुपेच असतात. तिथे मात्र प्रचंड मोठे वृक्ष होते. वरती त्यांची एवढी गुंतवळ होती, कि एखाद्या बोगद्यातुन गेल्यासारखे वाटत होते. त्यांची खोडे पण पाण्यात पाय न बुडवता प्रचंड मुळ्यांवर अधांतरी होती. मी आपला मगर ओटर वैगरे दिसतात का ते बघत होतो. पण काहि दिसले नाही. बराच वेळ दुसरी बोट दिसली नाही. मग अनेक चॅनेल्स येऊन मिळु लागले, आणि काहि बोटि दिसु लागल्या. पुढच्या बोटीने निर्माण केलेली लाट ओलांडताना आमची बोट एकदम घोड्यासारखी ऊभी रहायची. समोतुन एक बार्ज आली तर आमची बोट थांबवावीच लागली. ऊभी राहिल्या ठिकाणीच ती आदळली. खुल्या समुद्रात शिरल्यावर तर समुद्राच्या लाटा त्रास देऊ लागल्या. समोर एक मोठी बोट आडवी जात होती. म्हणुन परत आमची बोट थांबली. त्या बोटीच्या कॅप्टनने रेडिओवरुन आमची चौकशी केली. वाटेत आम्हाला काहि अगदी छोटी छोटी बेटे लागत होती. छोटी म्हणजे अगदी ५० मीटर लांबरुंद एवढीच आणि तिथेपण झोपडी बाधुन माणसे रहात होती. ती काय खातात पितात अशी चौकशी केली तर मासे वैगरे आणि कधीकधी तुझ्यासारखा एखादा गोरा गोरा माणुस, असे आमचा सारथी म्हणाला. त्याने ते थट्टेने सांगितले असावे, असा मी ग्रह करुन घेतला खरा, पण ते अगदीच खोटे असावे, असे नाही. माझा प्रवास तसा व्यवस्थित आखलेला असे. प्रत्येक टप्प्यावर माझी खबर कंपनीतर्फे घेतली जात असे. पण तरिही त्या प्रवासात धोका असेच. सागरी चाचे लुटालुट करत. पण तिथे त्या गोष्टी अगदी नॉर्मल समजल्या जातात. आमच्या अकाऊंट्समधे थेफ़्ट बाय सी पायरेट्स नावाचे खातेच होते. लेगोसमधे तुम्ही रहायला गेल्यानंतर सहा महिन्यात तुमच्या घरी चोरी झाली नाही तर ती बातमी होते. अपुर्ण
|
| |
| Monday, June 05, 2006 - 4:13 pm: |
|
|
मी वर जी प्रवासाची साधने सांगितली आहेत ती काहि खास लोकच वापरु शकतात, नायजेरियातली आम जनता पायीच प्रवास करते. बसेस तर अगदी थोड्या दिसायच्या. काहि टॅक्सीज होत्या. त्याना काहि खास रंग वैगरे होता असे नाही. मी फारतर एखाद दोन वेळा टॅक्सीने प्रवास केला असेल, तोसुद्धा कुणाच्या तरी सोबतीने. या टॅक्सींची अवस्था फक्त एका वाक्यात सांगतो. दरवाज्यात बसणार्या माणसाला, दरवाजा धरुन बसावे लागते, कारण ---- दरवाजा कधी निखळुन पडेल ते सांगता येत नाही. त्याहिपेक्षा सोयीचे वाहन म्हणजे ओकाडा. ओकाडा म्हणजे मोटर सायकल. पण ओकाडा हा शब्द फारसा वापरात नाही. ( आपण कुठे दुचाकी, हा शब्द वापरतो, ईतका चपखल असुनहि. आणि बायसिकलचा शब्द्शः अर्थ कुठे वेगळा होतो ? ) तर तरुण मुले या ओकाडाला म्हणतात मशीन. हे मशीन मात्र बर्यापैकी स्वस्त असे वाहतुकीचे साधन. त्या ड्रायव्हरचे काम फक्त ते मशीन चालवणे असे नसुन, आणखी बरेच काहि असायचे. मागे बाई असेल तर तिच्या काहि मुलांपैकी एखाद दुसरे तो टाकिवर बसवतो, आपल्याकडे रैल्वेच्या रुळाखाली स्लीपेर्स असतात तसा एखादा ओंडका न्यायचा असेल तर तो आपले डोके त्याला टेकु म्हणुन देतो. एखादे भरलेले पोते वैगरे वाहुन न्यायचे असेल तर, तो आपल्या पुढ्यात हॅंडलवर ठेवतो, आणि त्यावरुन मान ताठ करत बघत मशीन चालवतो. मोठ्या काचा, आरसे, गाड्यांचे स्पेअर्स, सिलिंडर्स असे अनेक प्रकार तिथले लोक लीलया या मशीनवरुन वाहुन नेतात. या बाईक्स म्हणजे काहि दणकट असतात असे नाही, आपल्या लुना सारख्या वैगरे असायच्या त्या. ऑफ़िसला जाताना असे अनेक प्रकार आम्हाला बघायला मिळायचे. हसुन हसुन पुरेवाट व्हायची. एका दृष्यानंतर तर आम्ही गाडी रस्त्यात बाजुला ऊभी करुन, बराच वेळ हसत बसलो होतो. बघितले ते असे. तिथल्या बायका कधीही आपल्या ईथल्या प्रमाणे दोन्ही पाय एका बाजुला ठेवुन बसत नाहीत. त्या दोन्ही बाजुला पय टाकुनच बसतात. आम्ही बघितले तेंव्हा एक बाई अगदी तंग ड्रेस घालुन ऊभी होती. काहि केल्या तिला गाडीवर तसे बसता येत नव्हते. मग त्या ड्रायव्हरने शक्कल लढवली ती अशी. तिला त्याने दोन दगडावर पाय ठेवुन ऊभे केले. स्वतः बाईक जरा पुढे नेली. आणि नेम धरत रिव्हर्स घेत त्या दोन दगडाच्या माधे आणि त्या बाईच्या पायात बाईक घातली. मग ती बाई अलगद बसली. या प्रकारात त्या दोघाना काहिच वावगे वाटले नव्हते, मला मात्र हसुन हसुन ठसका लागायची वेळ आली होती. आमची कंपनी फ़्रेंच असल्याने तसेच तिथे बरेच फ़्रेंच असल्याने पिज्यॉं गाड्या बर्याच दिसत. बेंझ पण खुप दिसायच्या. गेतॉं म्हणायच्या कि त्या डुप्लिकेट आहेत म्हणुन. तिथे डुप्लिकेट या अर्थाने मेड ईन बेल्जियम असा शब्द वापरतात. एखादा बेंझ चालवत असला तर तो कुठलेहि नियम पाळत नाही. बाकिचे चालक पण बेंझला घाबरुन असायचे. माझा ड्रायव्हर जरा स्मार्ट होता. त्याने एका बाईशी माझ्यासमोरच पंगा घेतला.. ती बाई समोरुन आली आणि अजिबात बाजुला होत नव्हती. शेवटी अगदी समोरासमोर अर्धा फुट अंतरावर दोन्ही गाड्या थांबल्या. पाच मिनिटे ते दोघे एकमेकांकडे न बघण्याचे नाटक करत होते. मग याने हळुच हॉर्न वाजवला. तिने तिच्या गाडीला पण हॉर्न आहे याची जाणीव करुन दिली. दहा मिनिटे अशी जुगलबंदी. मी त्याला घाई करु लागलो, कारण मला मित्राकडे जायचे होते. शेवटी तो नाईलाजाने गाडीच्या बाहेर पडला. त्यापुर्वी मला सांगुन गेला काहि झाले तरी गाडीतुन बाहेर पडायचे नाही. त्याने तिच्या काचेवर टकटक केले. तिने सावकाश आपला मेकप आवरला आणि जेमेतेम एके ईंच काच खाली केली. तो तिला शक्य तितक्या नम्रतेने सांगत होता, कि ती रॉंग साईडला आहे, तिचे म्हणणे कि तिला त्या बाजुला जायचे आहे म्हणुन ती त्या बाजुने चाललीय. बराच वेळ वाद घातल्यानंतर माझा चालक वैतागुन परत आला, व मुकाट्याने रिव्हर्स घेऊ लागला. ती बाई पण रोखुन बघत पुढे गाडी घेत होती. शेवटी माझा धीर खचला व माझ्या चालकाला विचारले, का रे बाबा, माघार का घेतलीस, तर तो म्हणाला, ती म्हणतेय, गाड्या त्या बाजुने चालवायच्या असे कुठे लिहिलेय ते सांग. तोच काय मीहि निरुत्तर झालो असतो. पाण्यात बनाना बोट म्हणुन एक प्रकार असायचा. त्यातुन केळ्यांची वाहतुक व्हायची. आमच्या बोटि वेगळ्या असल्याने मी कधी त्यात बसलो नाही, पण एकददा आमच्या कंपनीतल्या एका दिडशहाण्याने त्यामधुन यायचे धाडस केले होते. अन्धार पडल्यावर त्या सर्व प्रवाश्यानी त्या एकट्या गोर्या माणसावर हल्ला केली, सगळे पैसे, घड्याळ वैगरे काढुन घेतले. अगदी जीवावर बेतले होते त्याच्या. तिथे आम्हाला गाडी चालवायची अजिबात परवानगी नव्हती कारण रस्त्यात ऊदभवु शाक्णार्या प्रसंगाना तोंड देणे खरोखरच अवघड व्हायचे. असे आदेश असतानाहि, माझ्या एका फ़्रेंच मित्राने मला रात्री पित्झा खायला नेण्याचा घाट घातला. ते हॉटेल घरापासुन फार लांब नव्हते, म्हणुन मी तयार झालो. आम्ही पित्झा खाऊन बाहेर येईस्तो बराच ऊशीर झाला. ( फ़्रेंच माणसाने एकदा बोलायला तोंड ऊघडले तर मिटणे मुष्कील असते. ) बाहेर येऊन बघतो तर काय, गाडी गायब. कुणाला विचारले तर कुणीच धड उत्तरे देत नव्हते. मग आम्ही दोघानी एकमेकांचे हात घट्ट धरुन, धावतपळत घर गाठले. दुसर्या दिवशी ऑफ़िसतर्फे पोलिस तक्रार केली तर मासलेवाईक उत्तर मिळाले. अरे काल रात्री चोरी झाली ना मग आत्तापर्यंत तिचे सगळे स्पेअर्स पार्ट्स वेगळे झाले असतील. ईन्सुरंसमधे हात ओले करा, तुम्हाला सगळे पैसे मिळतील. तिथला आरटिओ सारखा जो प्रकार होता तो तर आणखीनच और. माझ्या गाडीचा, आमच्या ऑफ़िसच्या एका ट्रकचा आणि माझ्या मित्राच्या गाडीचा नंबर एकच होता. या तिन्ही गाड्या एकाच ऑफ़िसात नोंदवल्या होत्या. या सगळ्या गोष्टींमुळे तिथे कुणीही परदेशी माणुस लांबचा प्रवास गाडीने करत नसे. पण मी तब्बल आठ तासाचा प्रवास गाडीने केला, त्याबद्दल पुढे कधीतरी. अपुर्ण.
|
| |
| Tuesday, June 06, 2006 - 4:50 pm: |
|
|
जर मी केनयाच्या माणसाला भोळाभाबडा असे विशेषण लावत असेन तर नायजेरियन माणसाला बेरकि असेच विशेषण लेअवेन. असे सर्व समुहाला एका शब्दात बांधणे बरोबर नाही हे मला कळतय, पण जसे आपण सरदाराना, आणखी काय सरदारच म्हणतो, तसेच हे आहे. माझ्या हाऊसमेड्स, ड्रायव्हर्स आणि सहकारी यांच्यापेक्षा फार कुणाशी आमचा संबंध येत नसे. थोडाफार भाजीपाला विकणारे वा सुपरमार्केटमधले विक्रेते यांच्याशी जेव्हढ्यास तेवढा येईल तो. पण फार मैत्री करावी असा ना त्यांच्या प्रयत्न असे ना आमचा. याची कारणेहि अनेक होती. यातली काहि ओघाने येतीलच. नायजेरियन माणुस हा थापा मारण्यात पटाईत. अगदी आयत्या वेळी ष्टोर्या रचण्यात त्यांचे तोंड कुणी धरु शकणार नाही. दांडी मारल्याबद्दल, चोरी केल्याबद्दल ज्या काहि सबबी ते सांगायचे, त्याला तोड नसायची. ऑफ़िसचा बॅज का लावला नाहीस, ईतक्या साध्या प्रश्णाला मिळणारे उत्तर किती मासलेवाईक असे ते बघा. व्हॉट टु टेल यु ओगा, ( अश्यावेळी कमरेत वाकुन सुलट्या हाताची टाळी वाजवली जात असे. ) मी सांगितलं नव्हतं का माझ्या बहिणीची आई आजारी होती ती. मलेरियाच झाला तिला. आमच्या गावात कुठला आलाय डॉक्टर. तरी नदीवर जायची. अशीच गेली. सकाळी बहिणीने बघितले तर बया जाग्यावर नाही, मग मी गेलो शोधायला. आमच्या गावात जंगल केवढं ते काय सांगायचे तुला. ( ईथपर्यंत ष्टोरी आली कि माझा धीर खचायचा, मग मी आठवण करुन द्यायचो, बाबा रे मी बॅजबद्दल विचारतोय. तर परत कथा पुढे सुरु व्हायची. ) नदीवर जाऊन बघितले तर बया पाण्यात पडुन मेलेली ना. मग मी तिला तशीच घरी आणली. मग माझी बहिण नदीवर गेली होती ( हि नदी दुसरी आणि बहिण तिसरी, हे मी समजुन घ्यायचे. ) मग ती आली. मग माझा बाप ओगुनाबालीला गेला होता, तो आला आणि रात्र व्हायला आली. बाप म्हणाला आत्ताच बयेला पुरायची. मग रात्री आम्ही खड्डा खणायला घेतला. मी एकटाच खड्डा खणत होतो. मग माझी बहिण मदतीला आली. मग आम्ही बयेला त्यात ठेवली. वरुन माती टाकली. खड्डा खणता खणता पाऊस आला ना ओगा. ( तरी बॅजचे काय झाले ते मला कळलेले नसायचे, त्याचे आठवण करुन दिल्यानंतर, ष्टोरीचा शेवट असा व्हायचा ) खड्डा खणताना किंवा माती टाकताना माझा बॅज त्यात पडला. मग घरी आलो तर लक्षात आले. मग कुठे परत जाणार ? डुप्लिकेट बॅजसाठी कंपनी आकारत असलेली नाममात्र फी टळावी, म्हणुन अश्या कहाण्या रचल्या जात. नायजेरियन माणसाचे हसणे हा एक सोहळाच असतो. अगदी क्षुल्लक गोष्टींसाठीपण ते खोखो हसत राहतात. माझ्या टेबलावर मोठा बेडुक आला यासारखा क्षुल्लक ( हो हि घटना तिथे क्षुल्लकच आहे. ) घटनेवर पण माझा सगळा स्टाफ पाच मिनिटे कमरेत वाकुन भिंतीवर हात आपटुन हसत बसायचा. तसा नायजेरियन माणुसच काय बायकाहि तब्येतीने धडधाकट असतात. सामान्यपणे पुरुष शर्ट पॅंट घालत असले तरी चीफ असणारा माणुस सलवार, सोनेरी बटने लावलेला कुडता. डोक्यावर हॅट आणि त्यात खोवलेले एक पीस, डोळ्यावर काळा गॉगल आणि हातात काठी अश्या वेषात असतो. ( चार्लीज एन्जल्स मधे पहिल्याच विमानातल्या प्रसंगात ड्र्यु बॅरिमोर ने जे रुप घेतलेले दाखवलेय, तो म्हणजे नायजेरियन माणसाचा अवतार. आता त्या माणसापेक्षा तुम्हाला ड्रेयु जास्त आठवणार हे मन्य आहे मला, तरी पण. ) त्यांच्या या ड्रेससाठी तपकिरी वा निळा रंग जास्त आवडीचा. मुली आणि बायका अगदी भडक रंगसंगतीचा आणि तंग ड्रेस घालतात. डोक्यावर आपल्या फ़ेट्याप्रमाणे कापड बांधलेले असते व त्याच कापडाचे मोठे गुलाबाचे फुल वैगरे केलेले असते. पुरुष सहसा डोक्यावर केस ठेवत नाहीत. अगदी चमन केलेला असतो. बायकांचे केस निदान खांद्यापर्यंत तरी असतात. पण त्या त्यांची हेअरस्टाईल सारख्या बदलत असतात. अगदी बारिक वेण्या तर घालतातच, पण त्याहिपेक्षा वेगवेगळ्या तर्हा करतात. वेगवेगळ्या रंगाचे कृत्रिम केस वापरलेले असतात. पण एकंदर बॉडी लॅंग्वेज मात्र अरेरावीचीच असते. त्यामुळे आम्हालाहि तसेच वागावे लागे. त्या लोकांचे अगदी पदवीधर लोकांचेहि सामान्य ज्ञान यथातथाच असायचे. जगाच्या नकाश्यात भारत, फ़्रांस काय, त्याना नायजेरिया, आफ़्रिका खंड पण दाखवता येत नसे. माझ्याकडे माणसापासुन माणुस झाल्याच्या वेगवेगळ्या टप्प्यातील चित्रांची मालिका होती. ती बघुन आमच्या कंपनीतील एक माणुस मला म्हणाला होता. दिनेश, मला नाही वाटत हे खरे असेल असे. ( मला जरा शंकाच आली होती. डार्विनच्या सिंद्धांताचा प्रतिवाद याला कसा माहित असेल म्हणुन, तेवढ्यात तो पुढे म्हणालाच ) ईतकी माकडे बघितली, पण मी कुठल्या माकडाचा माणुस झालेला बघितला नाही कधी. खरे तर यात त्यांचाहि फारसा दोष नाही. त्या देशातील शिक्षणपद्धतीच याला जबाबदार आहे. तिथे पदवीपरिक्षेतदेखील बायबल स्टडीज सारखा विषय अनिवार्य आहे. त्यातल्या त्यात समजुतदार सहकार्याना मी त्या देशातील भ्रष्टाचारबद्दल पोटतिडीकेने बोलायचो. मला उत्तर मिळायचे. नो वरी ओगा, जिझस ईस कमिंग सुनर दॅन एक्स्पेक्टेड. ही ईस गॉन्ना सेट एव्हरिथींग राईट. आता काय बोलणार ? अपुर्ण
|
| |
| Wednesday, June 07, 2006 - 4:01 pm: |
|
|
आपण नेहमी आपल्या देशात मिशनरी लोकानी केलेल्या सक्तीच्या धर्मंतराबद्दल बोलत असतो, पण आफ़्रिकेतील देशांची परिस्थिति बघता, आपण कैक पटीने सुदैवी आहो असे वाटते. धर्म हि अफुची गोळी आहे, याचे प्रत्यंतर तिथे पदोपदी येते. मुळात जो पंथ त्या मातीतला नाही तो त्यानी का स्वीकारावा, हेच कोडे मला कधी सुटले नाही. रस्त्यावरुन जाताना चर्चच्या मोठमोठ्या जाहिराती दिसत. " आमच्याकडे या म्हणजे, जिझस लवकर येईल, " असा संदेश देणार्या. पॅस्टर होणे हा तिथला किफायतशीर धंदा. आणि परकिय धर्म स्वीकारला तो स्वीकारला, तोहि ईतक्या अंधपणाने ? नायजेरियातले खनिज तेलाचे साठे बघितले तर ते आखाती देशांपेक्षाहि वरताण आहेत, पण जसे आखाती देश सोयीसुविधाने परिपुर्ण आहेत, तसे तिथे अजिबात नाही. अगदी मुलभुत सुविधांचा अभाव आहे. रस्ते, टेलिफोन, शिक्षण, पोस्ट सगळ्याच गोष्टी अविकसीत आहेत. एवढे खनिज तेल असुनहि तिथे रिफायनरीज नाहीत. जगातील सगळ्यात कमी किमतीला पेट्रोल मिळत असुनहि, अनेकदा पेट्रोल पंपावर त्याचा तुटवडा असतो. आखाती प्रदेशात जे नंदनवन फुलवले ते पाहुन आल्यानंतर नायजेरियाची हालत अक्षरशः बघवत नाही. लौकिक अर्थाने परकिय चक्रापासुन नायजेरिया मुक्त झालेला असला तरी छुप्या पद्धतीने त्या देशाची लुटालुट चालुच आहे. या क्षेत्रातील सगळ्या नावाजलेल्या कंपन्या तिथे डेरा टाकुन आहेत, पण त्या सगळ्याच लुटालुट करतात. खनिज तेलाची रॉयल्टी थकवली जाते. तिथल्या स्थानिक कामगाराना अत्यंत कमी पगारावर राबवले जाते. परकिय लोकाना भरमसाठ पगार दिला जातो. तोसुद्धा देशाच्या बाहेर. त्यामुळे स्थानिक कर सर्रास चुकवले जातात. सरकारी यंत्रणा अत्यंत भ्रष्ट आहे. देशाचा अध्यक्षच तसा आहे. देश विकुन खाणे म्हणजे काय, ते तिथे कळते. राश्ट्रिय भावनेचा पुर्णपणे अभाव आहे. आपल्याला कल्पनाहि येणार नाही, ईतका तीव्र वंश संघर्ष तिथे आहे. ( रवांडातील दंगल याच कारणाने झाली होती. ) आपल्याला जरी सगळे काळे एकाच तोंडावळ्याचे दिसत असले तरी, त्यांच्या चेहरेपट्टीत सुक्ष्म भेद असतो. आणि त्यावरुन त्याना एकमेकांचा वंश नीट कळतो. तु कोण या प्रश्णावर ते मी नायजेरियन असे उत्तर देणे संभवतच नाही. ते आपल्या वंशाचेच नाव घेतात. मग एकाद्या शहरात जरी ते एकत्र रहात असले तरी स्वतःचे गट जमवुन ईतरांवर हल्ला करणे, त्यांची पिळवणुक करणे हे ओघाने आलेच. माझ्या जायच्या यायच्या वाटेवर एकदा एका माणसाला, दोन तीन टायरमधे कोंबुन जिवंत पेटवल्याचे मी बघितले होते. आणि तीन दिवस ते अर्धवट जळालेले शरीर तसेच पडुन होते. याबाबत माझ्या ऑफ़िसमधल्या सहकार्यांची प्रतिक्रिया, विचित्रच होती. मग त्याने तिथे यावेच का, असे ते म्हणाले. त्याने कदाचित चोरी वैगरे केलीहि नसेल, निव्वळ त्याचे वेगळ्या वंशाचे असणे हाच त्याचा गुन्हा होता. एखादा माणुस चीफ झाला. कि अत्याचार करायला मोकळा. बायकाहि चीफ होवु शकतात. यासाठी गावजेवण घालणे, त्या क्षेत्रासाठी काहि खर्च करणे अश्या अटि असाव्यात. मग या अधिकाराला चीफटेनशिप असे म्हणायचे. हे अत्याच्यार आर्थिक आणि लैंगिक असे दोन्ही स्वरुपाचे असतात. आणि बायकाहि त्यात मागे नसतात. ( अश्या काहि मंडळींना मी ओळखत होतो. माझ्याशी ते नाटकी अदबीने बोलत असले तरी गुर्मी लपत नसे. ) पण वर उल्लेखलेल्या कंपन्या करत असलेल्या आर्थिक अत्याचारांपुढे, हे अत्याचार परवडले. ( नोन डेव्हिल्स आर बेटर, एनी डे. ) स्थानिक आणि परदेशी लोकाना मिळणार्या मानधनाततील फरक तब्बल चाळीस पन्नास पटीत असे. आहे रे आणी नाही रे यातली दरी तिथे खुपच खोल आहे. पैश्याचा माज त्या लोकाना लवकर चढतो. चीफ पुरुष असेल तर त्याने बायका " करणे " आणि स्त्री असेल तर पुरुष " ठेवणे " हे ओघाने आलेच. तिथले श्रीमंत ईतके श्रीमंत आहेत कि दरवर्षी नवीन बेंझ घेऊ शकतात. आणि गरिबाला अक्षरशः दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असते. मग मादक पेयांच्या आहारी जाणे हेहि आलेच. आणि मग सुरु होते ती ईझी मनी मिळवणाची अभिलाशा. आणि त्यासाठी ड्रग ट्राफिकींगसारखा सोपा ऊपाय नाही. नायजेरियन म्हणजे ड्रग ट्राफिकर हे समीकरणच आपल्या डोक्यात बसलेले आहे. मुळात या मादक द्रव्यांची ऊत्पादन होते ते अफगाणिस्तान, भारत, चीन या क्षेत्रात किंवा दक्षिण अमेरिकेत. धडधाकट तब्येतीचे नायजेरियन, हे ड्रग्स कंडोम्स मधे घालुन गिळतात. आणि विमानाने प्रवास करतात. ( या दरम्यान ते काहिहि खात पित नाहीत. ) एकदा नियोजित क्षेत्रात पोहोचले कि ते बाहेर काढले जातात. पकडले गेलेच तर शिक्षा भोगतात. ( मुंबईत पकडलेल्या एका माणसाने तब्बल ७२ कंडोम्स गिळले होते. ) शिवाय कुठल्याहि कारणाने पोटात जर तो कंडोम फुटला तर मृत्यु अटळ. पण जर का हि ट्रिप यशस्वी झाली तर आयुषभराची नाही, पण बर्याच काळाची ददात मिटुन जाते. लेगोस विमानतळावर मी कितीतरी नायजेरियन प्रवाश्याना संपुर्ण हॅंड बॅग भरुन डॉलर्सच्या नोटा घेऊन येताना पाहिले आहे. जास्त करुन अलितालियाच्या फ़्लाईट्समधे असे प्रवासी असत. पण नायजेरियन स्वतः मात्र क्वचितच ड्रग आॅडिक्ट असत. अपुर्ण.
|
| |
| Thursday, June 08, 2006 - 4:56 pm: |
|
|
नायजेरियन व्यसने करतच नाहीत असे नाही. लोकल ब्र्यु असतातच. शिवाय त्याना कोलानटचे व्यसन असते. ( या कोलानटबद्दल पुढे बोलुच. आता हि अशी यादी वाढतच चाललीय माझी. ) चीनने पोलादी दरवाजे किलकिले पासुन आपल्याला एक नवल कळले कि तिथल्या तरुण मुलाना दोन नावे असतात, एक त्यांच्या भाषेतील आणि दुसरे पर्यटकांसाठी. नायजेरियात पण असाच प्रकार असतो. ते लोक त्यांची खरी नावे क्वचितच आपल्याला सांगतात. जेम्स, जेरोम, सनी हि मुलांची तर लिंडा, रोज, हेलन अशी मुलींची नावे असतात. चीची हे मुलीचे नाव पण खुप कॉमन. ( चचा उच्चार फ़्रेंचाना जमत नसल्याने, मग तिचे नाव शीशी होते. ) अकपान, बरिले, ओकेके, ओमांग, ओबिनोहा, चिडा अशी आडनावे असतात. पण अशी ईंग्लिश लोकप्रिय नावे संख्येने कमीच असल्याने तीचतीच नावे ठेवली जात. त्यामुळे मग सारख्या नावाच्या दोन व्यक्तींमधे फरक असावा म्हणुन, नावामागे स्मॉल, टॉल अशी विशेषणे लावली जातात. आमच्या रिमोट साईट्सवर काम करणारे लोक हे छोट्या गावातुन आलेले असत, त्याना अशी ईंग्लिश नावे फार माहित नसत. त्यामुळे मुलांची नावे फ़्रायडे, मंडे अशी असत तर मुलींची मे, एप्रिल, जुन ईतकेच नव्हे तर चायना, ईंडिया आणि ईस्राएल अशी पण असत. गॉड्स ओन, गॉड्स गिफ़्ट अशी पण नावे असत. त्यांच्या वंशागणिक त्यांची भाषा बदलते. आपापसात ते त्याच भाषेत बोलतात. दोन वंशातले लोक एकमेकांशी एका खास भाषेत बोलतात, त्याला ते ब्रोकन ईंग्लिश म्हणतात. नीट लक्ष देऊन ऐकले तरी ती नीट कळत नाही, ती दुरान्वयेहि ईंग्लिशशी संबंधित असावी, अशी शंकाहि येत नाही. एक ऊदाहरण देतो. वाय्युनो दे एंत मोतो, असे काहि ऐकलेत तर काहि पत्ता लागेल ? ठिक आहे हे ईंग्लिशमधे लिहायचे तर व्हाय यु नो डे एंटर मोटर ? म्हणजे तु मोटारित का बसला नाहीस ? आता वाय्युनो दे एंत मशीन, याचा अर्थ कळेलच तुम्हाला. हो जसे मोटारीत शिरायचे तसेच बाईकमधे पण शिरायचे. आपल्याशी बोलताना ते आपल्याला समजेल अश्या ईंग्लिशमधे बोलतात. पण त्यानी ईंग्लिशची अशी काय मोडतोड केलीय, कि साहेबांचे कधीच न वासणारे तोंड पण वासेल. ( बाकि चिनी, बिहारी, अरबी, फ़्रेंच लोकानी पण त्या आंग्लभाषेचे जे केलेय ते केलेय. आपणच साहेबाची रि ओढत राहिलो. ) परत काहि नमुने बघु. मेकागो ओगा, याचे शुद्ध रुपांतर मेक आय गो ओगा आणि याचे ईंग्लिशमधे भाषांतर मे आय गो, सर असे होते. त्यांची शब्दाना हेलकावे द्यायची तर औरच तर्हा आहे. को sssss म, गो sss कम ना, असे बोलले तर त्याचा अर्थ, अगदी लवकर ये. हौनौ म्हणजे आता कसा आहेस, हे त्यांचे ग्रीटिंग. मग हाऊ फार नाऊ, याचे उत्तर व्हेरी नीयर, नथिंग स्पॉईल्ड, असे द्यायचे. एव्हरीथिंग बामबाम म्हणजे सगळे अगदी मजेत. मुळ भाषेत नसलेले एक डे नावाचे अव्यय त्यानी प्रचारात आणलेय. या शब्दाचा नेमका अर्थ सांगणे शक्य नाही. कारण अनेक अर्थाने वापरला जातो. कधी त्याचा अर्थ कामकाज असतो तर कधी टु बी, असा असतो. ऊदा, युअर फोन डे रिंगो, म्हणजे तुझा फोन वाजतोय. हाऊ यु डे नाऊ, म्हणजे कामकाज कसे चाललेय, आणि याचे उत्तर आय डे स्मॉल स्मॉल ( म्हणजे चाललेय कसेबसे ) किंवा आय डे फ़ॉर यु ओगा ( म्हणजे तुझ्या सेवेत आहे किंवा तुझ्या कृपेने बरे चाललेय. ) त्याना आणखी एक वाईट खोड म्हणजे प्रत्येक वाक्याचा शेवट ते अनावश्यक ओ ने करतात. म्हणजे वॉतापनो चा अर्थ व्हॉट हॅपन्ड, असा होतो. त्याशिवार R या अक्षराचा उच्चार ते आरो असा करतात. त्यामुळे मारियाचे स्पेलिंग विचारले तर एम ए आरो वाय ए, असे सांगतात. त्यांची गाणी वैगरे खास ऐकली नाहीत. पण माझा चालक गाडीत त्याची गाणी लावायचा. ती शक्यतो जिझस वरच असायची. ” जिझस ईस कमिंग टुडे टुडे ओ ” अश्या टाईपची. चाल आपल्या आरतीसारखी. अश्या गाण्यांवर बेभान होवुन नाचणारे समुह रविवारी बरेच वेळा दिसत. त्या गावात फारशी मोठी चर्चेस वैगरे दिसली नाहित. किंवा एखादे बांधकाम हे चर्च आहे, असे ओळखताहि आले नसेल मला. असे नाचणारे समुह दिसायचे ते, ऊघड्या मैदानावर किंवा एखाद्या छोट्याश्या मंडपात वैगरे. आपली अशी समजुत आहे, कि तिथे मुस्लीमांचे प्राबल्य असेल म्हणुन, पण मला तसे जाणवले नाही. माझे सहकारी म्हणायचे, कि हा राज्यकर्त्यानी केलेला अपप्रचार आहे. मुस्लीम तिथे फारच कमी दिसायचे, ते उत्तरेकडे आहेत असे सांगितले जायचे, पण तो भाग वाळवंटाचा असल्याने व तिथे आमच्या कंपनीचे काम नसल्याने माझे जाणे झाले नाही. नायजेरियात फ़्रेंच आणि ब्रिटिश अश्या दोन्ही लोकांच्या वसाहती होत्या. त्यामुळे या दोन्ही भाषेंचा प्रभाव जाणवायचा. तरिपण ईंग्लिश जास्तकरुन बोलली जायची. पण फ़्रेंचाच्या वळणाप्रमाणे ती बरिच बोबडी बोलली जायची. पोर्ट हारकोर्टचा उच्चार या फ़्रेंच कनेक्शनमुळे पोहाको, असा केला जायचा. पण एकंदर नायजेरियन माणुस मैत्री वैगरे करणारा नाही. माझा चालक मुस्लीम होता, त्याचे नाव ईझे, तो मात्र माझ्यासाठी जीव टाकायचा. तसा मीहि त्याला काहिबाहि देत असायचो, पण तरिही त्याच्या भावना, प्रामाणिक होत्या. मला तिथे फ़्रेंच, भारतीय मित्र बरेच असल्याने, नायजेरियन लोकांशी फार जवळिक मी साधली नाही. पण अजुनहि त्या सहकार्यांची पत्रे येतात. आमचा ओगा ओईबो तिथे आहे असे सांगुन काहि नायजेरियन स्टुडंट्सना माझ्याघरी पाठवलेहि जाते. अपुर्ण
|
| |
| Friday, June 09, 2006 - 4:45 pm: |
|
|
नायजेरियामधे असताना हॉटेलमधे जाऊन खाणे क्वचितच घडले. एकतर हॉटेल्स मर्यादित, शिवाय शाकाहारी काहि मिळण्याची मारामार. त्यामुळे घरीच सगळे करुन खावे लागायचे. मी बराच गोतावळा जमवला होता. घरी पार्ट्या व्हायच्या. मग त्या पार्टीतले पदार्थ शिकण्यासाठी माझ्या वहिन्या, माझ्या घरी यायच्या. पण ते सगळे सविस्तर लिहायला हवे. आधी तिथली खाद्य संकृति बघु या. हॉटेल नव्हती असे जे मी लिहिलेय, ते माझ्या दृष्टीने, पण त्या लोकांसाठी खाणावळी बर्याच दिसायच्या. बाहेर फ़ुड ईज रेडी, अशी पाटी लटकत असायची. मेनु मधे गारी असायला हवीच. गारी म्हणजे कसाव्याचे जाडसर पीठ. ते दिसायला साधारण कुसकुस सारखे किंवा जाड्या रव्याप्रमाणे दिसते. कसावा किसुन किंचीत आंबवुन, सुकवुन ती करतात. गारीला आंबुस वास येतो. गारी अजिबात शिजवावी लागत नाही. त्यात थोडेसे मीठ व ऊकळते पाणी घातले आणि लाकडी चमच्याने घोटले कि झाली गारी तयार. असे शिजवल्यावर तिला ईतका विचित्र वास येतो कि मला कधी चवहि बघावीशी वाटली नाही. पण त्या लोकांचे ते रोजचे जेवण. त्यांच्या तब्येतीकडे बघता, गारी फार पौष्टिक असावी, असा माझा कयास आहे. या गारीचे हाताने गोळे करुन ते सुप्मधे बुडवुन खातात. ( आपल्या कर्नाटकमधे कुर्ग नावाचा भाग आहे. त्यांची भाषा व संकृति जरा वेगळीच आहे. त्या बायकांची साडी नेसायची पद्धत पण बरीच वेगळी आहे. निर्या मागे असतात व पदर खांद्यावरुन पुढे घेतलेला असतो. पण ते लोक दिसायला अतिषय देखणे असतात. नाक खुप धारदार असते. जनरल करिअप्पा त्यांच्यापैकीच. तर आता विषय काढायचे कारण कि ते लोक पण असे गोळे करुन खातात, पण ते तांदळाच्या पिठाचे केलेले असतात. खुप चवदार लागतात ते. तिथे पिकणारे तांदुळ पण बारिक आणि सुवासिक असतात. तर नायजेरियन गारीचे गोळे बघुन मला ते आठवले खरे. पण साम्य फक्त रुपातच होते. ) तर गारीबरोबर जे सुप पितात वा खातात ते अनेक पदार्थांचे बनलेले असते. ओक्रा सुप तर आता अमेरिकेतहि लोकप्रिय आहे. ओक्रा म्हणजे मोठी भेंडी. आअप्ल्याकडच्या भेंडीला आपण लेडीज फ़िंगर म्हणतो कारण ती तशीच लांबसडक आणि नाजुक असते, पण हि ओक्रा मात्र बरिच बुटकी आणि जाड असते. चवीत तसा फरक नसतो. पण ते लोक तशीच ऊकळुन खातात. त्या सुपला तारा येतात हे वेगळे सांगायला नको. ( शक्यतो नायजेरियन आपल्यासमोर जेवत नाहीत, आणि जेवले तरी कुणाला बघवेल ? ) मग दुसरे लोकप्रिय सुप म्हणजे मिरच्यांचे म्हणजेच पेपर सुप ( उच्चार पेप्पेसु ) त्यांच्या मिरच्या बुटक्या, लालभडक आणि सुरुकुतलेल्या असतात. हे सुप ओल्या लाल मिरच्यांचेच करतात. चवीला भयंकर तिखट असतात या. मी आणुन बघितल्या होत्या एकदा, पण वास घेतला तरी ठसका लागला. ते मात्र आवडीने पितात. काऊ टेल सुप पण लोकप्रिय आहे. खाद्यप्रकारात फ़ॉक्स टेल सुप म्हणुन एक प्रकार असतो, त्यात कोल्ह्याची शेपुट वैगरे काहि वापरत नाहीत, पण नायजेरियन सुपमधे मात्र खरोखरच गायीची शेपटी वापरतात. गायीचाच काय कुठल्याच प्राण्याचा कुठलाच भाग त्याना वर्ज्य आहे असे नाही. ( जंगलातील वाघ बिबटे जेंव्हा एखादे जनावर मारतात त्यावेळी जठर आणि आतडे अजिबात खात नाहीत, ईतकेच नव्हे तर ते लांब नेऊन टाकतात. ) मुळात गायच काय, कुठलाच प्राणी त्याना वर्ज्य नाही. तिथे मटणात बुशमीट नावाचा एक प्रकार असतो. तो म्हणजे जंगलातील अनेक प्राण्यांचे मिश्र मटण असते. आणि तेहि फार लोकप्रिय आहे. कुठलाहि प्राणी खातात हे मी सांगितलेच, गेतॉं ची मैत्रीण कधीकधी माझ्या घरात रहायची. एकदा मी घरात आहे हे तिला माहित नव्हते, तर तिने काहितरी शिजत ठेवले. त्याचा ईतका घाण वास येत होता कि मला झोपणे अशक्य झाले. मी ते भांडे ऊचलुन दाराच्या बाहेर ठेवले. थोड्या वेळाने परत तोच वास, मग मात्र मी ज्याम भडकलो. तिला बोलता येणे शक्य नव्हते, म्हणुन मी राग जॉयवर काढला. आधी जे काय शिजत लावले होते ते भांड्यासकट फेकुन दिले आणि जॉयला म्हणालो, परत असले काय शिजवलेस तर तुलाच कापुन शिजवीन, माझा तो अवतार बघुन, ती ज्याम घाबरली होती. अर्थात नंतर मी तिला समजावले. आणि जे काय शिजत लावले होते, ते म्हणजे शेकरु ( राक्षसी खार, भीमाशंकरच्या जंगलात दिसते, गोव्यातहि दिसते. ) होते. मला दहि विरजण्यासाठी तुरटी हवी होती, तर मी जॉयकडे ईथे तुरटी मिळेल का अशी चौकशी केली तर तिला Alum माहित होते. तिने मला तिच्याकडचे दिलेहि. मी सहज विचारले कि तुम्ही कश्याला वापरता तर म्हणाली, स्नेलचा चिकटपणा घालवण्यासाठी. ( मग माझी काहि हिम्मत झाली नाही, त्या तुरटीने दहि विरजण्याची. ) या स्नेल्स म्हणजे आपल्या समुद्रकिनार्यावर सापडतात त्या गोल गोल घुला नाहीत, तर या म्हणजे झाडावर चढणार्या मुठी एवढ्या मोठ्या शंखासारख्या दिसणार्या गोगलगायी. या गोगलगायी कडुनिंबाचे झाडदेखील फस्त करु शकतात. तर त्या स्नेल्स ते लोक फ़ोडुन त्यातले मास खातात. त्यांच्या जेवणात मीठापेक्षा सुप क्युब्ज वापरण्याकडे त्यांचा कल असतो. या क्युब्जची त्याना ईतकी चटक लाअग्लीय, कि त्याशिवाय जेवणाची कल्पनाच त्याना करता येत नाही. माश्यांमधे मोठे मोठे मासे त्याना प्रिय. बाराकुडा नावाचा लांबट निमुळत्या तोंडाचा मासा अत्यंत आवडता. हा मासा मी आपल्याकडे बघितला नाही. सुकवलेले, खारवलेले मासेहि खातात. त्यांच्या जेवणात तेलाचाहि वापर भरपुर असतो. शेंगदाण्याचे व पामचे तेल जास्त वापरतात. शेंगदाण्याच्या तेलात पिवळाधमक रंग तर पामच्या तेलात लालभडक रंग घातलेला असतो. ( का ते माहित नाही. ) ज्या पामच्या फळापासुन तेल काढतात ती झाडे तिथे भरपुर होती. त्यांच्या सुपमधे वेगवेगळा पाला मात्र ते आवर्जुन घालतात. त्यापैकी काहि मीहि आवडीने खायचो. वॉटर लीफ म्हणजे आपले मायाळुच असायचे. सेंट लीफ म्हणजे, माझ्या मते माईनमुळ्याचा पाला असावा, कारण त्याला ओव्यासारखा वास यायचा. ( खर्या ओव्याची पाने शेपुसारखीच असतात. आणि ओव्याची पाने म्हणुन आपण ज्याची भजी खातो, त्या पानाना ओव्याचा वास येतो ईतकेच, ते झुडुप काहि ओव्याचे नसते. ) बिटर लीफ़ नावाची एक जाडसर मेथीसारखी दिसणारी पाने असायची, ती बरिचशी मेथीसारखीच लागायची. पंपकिन लीफ म्हणुन एक पाला मिळायचा. पण तो आपल्या भोपळ्यासारखा नसायचा. त्याला एक लांबुडके मोठे फळ लागायचे. त्यावर दोडक्यासारख्या पण मोठ्या शिरा असायचा. त्या फळाचा गर खात नसत, पण त्याच्या बिया मात्र आवर्जुन वापरत. पाने त्रिशुळासारखी दिसत. तिथले भारतीय या भाज्या खात नसत, मी मात्र जॉयला आणायला सांगायचो. या भाजीला पण छान चव असायची. त्यांच्या भाज्याच्या जुड्या सहज आपल्या वैरणीच्या जुडी ईतक्या असायच्या. पहिल्यांदा मला कल्पना नसल्याने मी जॉयला दोन जुड्या आणायला सांगितल्या, तर बिचारीला खांद्यावर भारा आणावा लागला होता. मी आपली माझ्यापुरती पसाभर पाने घेतली, आणि बाकिची पालेभाजी, तिलाच दिली. अपुर्ण
|
| |
| Sunday, June 11, 2006 - 5:55 pm: |
|
|
अळिव कसे दिसतात, ते बघायचे होते ना ? ते असे दिसतात.
|
| |
| Sunday, June 11, 2006 - 5:59 pm: |
|
|
आणि अळिवाचे लाडु, असे दिसतात. सॉरी दोस्तानो, ईथे फ़क्त कसे दिसतात तेच दाखवु शकतो. कसे लागतात ते बघायचे असतील तर, घरी या.
|
| |
| Monday, June 12, 2006 - 4:51 pm: |
|
|
मग मात्र मी त्या पालेभाज्या नियमित खाऊ लागलो. त्यांच्या जेवणात पाऊंडेड याम हि पण लोकप्रिय डिश होते. याम म्हणजे सुरण हे आपल्याला माहित आहेच, पण हा याम कंद असला तरी वेगळा असतो. सहा सात ईंच परिघाचा आणि एक ते दीड फ़ुट लांब असा हा कंद असतो. वरुन चॉकलेटी रंगाची साल असते व आतला गर पांढराशुभ्र असतो. आपल्याला ऊचलुन घेताना तो दोन्ही हातानेच ऊचलावा लागतो. अगदी कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या, सारखा. या यामचा वेल असतो. याची पाने पुत्रंजीवीच्या पानासारखी असतात. ( पुत्रंजीवी म्हणजे फ़ायकस कुटुंबातले एक झाड. रस्त्याच्या कडेला खुपवेळा लावलेले असते. याला बारिक पारंब्या येतात. तसेच ऑगस्ट सप्टेंबरमधे छोटी छोटी हिरवी दोन सेमी लांबीची फ़ळे येतात. या फळांचा आकार सोललेल्या नारळाप्रमाणे असतो. हि फळे खात नाहीत पण याच्या माळा करुन लहान मुलांच्या गळ्यात घालतात. त्याने नजर वैगरे लागत नाही असे म्हणतात. या माळा पंढरपुरला विकायला असतात. ) हा वेल मांडवावर चढवतात. हा कंद मात्र खुपच स्वादिष्ट लागतो. गर अजिबात खाजरा नसतो. याची कापे करता येतात. भाजीहि करता येते. ते लोक मात्र तो ऊकडुन कुस्करुन खातात. त्यालाच पाऊंडेड याम म्हणायचे. आपल्या अरवीला ते कोकोयाम म्हणतात. पण त्यांचे अळु आणि अरवीहि चांगलेच मोठ्ठे असतात. याला थोडी खाज असते. तिकडे प्लान्टेन खुप आवडीने खाल्ले जाते. प्लान्टेन आणि केळ्यात साम्य असले तरि फरकहि आहे. प्लांटेन पिकले तरी ते शिजवुनच खावे लागते. एक भाजलेले वा ऊकडलेले प्लान्टेन खाल्ले तर एका वेळचे जेवण होते. सोलुन तेलात परतुनहि खाता येते ते. छान सोनेरी रंग येतो याला तळल्यावर. ते लोक स्ट्यु म्हनुन एक प्रकार करतात. शेंगदाणा तेलात कांदा व टोमॅटो परतुन त्यात तिखट मीठ घातलेले असते. हा प्रकार पण चांगला लागतो. एरवी वाटणात वर उल्लेख केलेल्या भोपळ्यातल्या बिया आणि बारिक कोलंबी यांचे वाटण असते. या बिया सोललेल्या बाजारात मिळतात. त्या बायका पटापट सोलत असतात या बिया. कोलंबी आपल्यापेक्षा जरा वेगळी असते. पण हे वाटण आरोग्यदृष्ट्या अगदी योग्य आहे. नायजेरियातली फळे पण वेगळीच असायची. तिकडे काजुचे पिकहि भरपुर येते. आपल्यापेक्षा तिथले काजु खमंग भाजलेले असतात. ते विकताना दारुच्या रिकाम्या बाटलीत भरुन सीलबंद करुन ठेवेलेले असतात. काजुप्रमाणेच शेंगदाणेपण भरपुर. तेहि आपल्यापेक्षा खमंग भाजलेले असत. तेहि सोलुन बाटलीमधे भरलेले मिळत. तिथ साधी केळी आणि भाजलेले शेंगदाणे खायची पद्धत आहे. आमच्या ऑफ़िसच्या बाहेरच ते विकायला बसलेले असत. मी तिथे असताना भरपुर मोसंबी खाल्या. त्याला ते ऑरेंज म्हणतात. आणि आपण ज्याला ऑरेंज म्हणतो त्याला ते टॅंगरीन म्हणतात. संत्रीहि खुप गोड आणि रसाळ असत. मोसंबी खाण्याची त्यांची रित मात्र वेगळी आहे. मोसंबीची वरची पिवळी साल ते सुरीने तासतात. हे काम मात्र त्या मुली फार कौशल्याने करतात. अश्या सोलुन पांढर्या झालेल्या मोसंबीची वरची चकती कापुन मग ती चोखुन चोखुन खायची. मोसंबी खरेच खुप गोड असायची आणि असे खायला मला आवडायचेहि. तिथले लोक नुसता रस पिवुन चोथा टाकुन देतात. अननस पण भरपुर असायचे. अवाकाडोची खुप झाडे होती तिथे. सदा हिरवेगार असणारे हे झाड देखणेहि असते. या फळाचे काय असेल ते असो, ते झाडावर कधीच पिकत नाही. तिथली काहि अनोखी फळे पण मी आवर्जुन खल्ली. त्याला ते म्हणतात चपचप. ओंजळीच्या आकाराचे व काटेरी असे हे फळ, सिताफळ आणि फणस यांच्या एकत्र स्वादाचे असते. याची पाने नाजुक आणि झाडहि लहानखोर असायचे. त्या मानाने हे फळ म्हणजे अंगापेक्षा बोंगा जड असा प्रकार असायचा. कोकोची फळे पण बाजारात विकायला असायची. पिवळसर गुलाबी रंगाचे हे फळ दोन्ही बाजुने टोकेरी असते. आत पांढर्या गरात चिंचोक्यापेक्षा थोड्या मोठ्या बिया असतात. चव मात्र कडवट असते. त्या बियाना ना कोकोचा स्वाद ना रंग असतो. ( या बियांपासुन कोको करण्यासाठी त्या केळीच्या पानात घालुन पाच सहा दिवस आंबवाव्या लागतात. मगच त्याना तो रंग व चव येते. कोकोचेहि पिक अमाप येते तिथे. स्विस काय किंवा फ़्रेंच काय सगळ्या युरपियन चॉकलेट्स्मधला कोको आफ़्रिकेत पिकलेला असतो आणि व्हॅनिलाहि तिथलाच. ) त्यांचे ऊदारा नावाचे फ़ळ मला फार आवडायचे. गोल पिवळ्या रंगाचे हे फळ आकाराने चिकुपेक्षाहि छोटे असायचे. याचे बाह्यरुप साधारण सुपारीच्या ओल्या फळासारखे असते. आत बिया चिकुसारख्याच असायच्या. चव मात्र आंबट गोड असायची. आणखी एक खास फळ म्हणजे अचिचा. मूठभर आकाराचे हे फळ, केशरी पिवळ्या गराचे असायचे. याचा फ़र दिसायला अर्धपारदर्षक म्हणजे मेणासारखा दिसायचा. याच्या वर सापाच्या कातडीसारखी खवल्याखवल्यांची साल असायची. आत एक करड्या रंगाची बी असायची. याची चव मात्र थेट ऊसासारखी असायची. या फळांची ओळख मला अन्जेला आणि जॉयमुळे झाली. कारण याचे विक्रेते वेगळे असायचे. मुख्य बाजारात मात्र हि फळे नसायची. मी कुठलेहि फळ वा भाजी चाखुन बघायला मागेपुढे बघत नाही. पण मला माझ्या ऑफ़िसमधल्या मैत्रिणीने कोलानटचा एक तुकडाहि खाऊ दिला नव्हता. तोंडात टाकलेला नखभर तुकडाहि तिने थुकायला लावला. या कोला नटचे झाड चाफ्याच्या झाडाप्रमाणे असते. वर गुच्छात हि फळे लागतात. लंबगोल आकाराची, साधारण दीड ईंच लांबीची हि फळे पिवळ्या रंगाची असतात. याला चव साधारण ओल्या सुपारीसारखीच असते. म्हणजे तुरट कडवट अशी. याचे नखाने बारिक बारिक तुकडे करुन ते चघळले जातात. मग ब्रम्हानंदी टाळी लागते, आणि त्याचे व्यसन लागते. ( म्हणुन माझ्या मैत्रिणीने ते थुकायला लावले ) तिथल्या समाजात त्याला आपल्या सुपारी सारखेच मह्त्व आहे. लग्न जमवताना, गावच्या चीफला भेटायला जाताना हे हवेच. ( “ सुपारी ” देताना पण हेच फळ वापरतात का ते मात्र कळले नाही. ) आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे सगळ्या कोला पेयात या कोला नटचा अर्क असतो. कोला या शब्दाचे मूळच हे आहे. आणि सवय लागणे हा परिणाम तर, फ़ॉर्म्युला ऊघड न करणे हे घेतलेले सोंग आहे. अपुर्ण.. दोन दिवसानी परत भेटु.
|
| |
| Thursday, June 15, 2006 - 4:19 pm: |
|
|
नायजेरियात आजुबाजुला फुलेहि खुप असत. सोनटक्क्यासारखे दिसणारे पण खुप ऊंच वाढणारे एक झाड असे. त्याला जमिनितुनच एक वेगळा दांडा ऊगवुन त्याला आर्टिचोकसारखे एक लाल आणि गुलाबी रंगाचे फुल लागायचे. कमळासारखे दिसायला असले तरी पाकळ्या खुपच जाड आणि मांसल असायच्या. हे फुल कापुन घरी आणले तरी बरेच दिवस टिकायचे. हळु हळु पाकळ्या ऊलगडत जायच्या पण ते पुर्ण ऊमलायचे नाही. आपली मधुमालती तिथे वेगळ्याच रुपात भेटली. आपल्या मधुमालतीचे देठ लांब असले तरी अगदी लवचिक असतात. फुले कायम जमिनीकडे बघत, आमी नाई जा, करत बसलेली. पण तिथली फुले मात्र अगदी ताठ असत. पाकळ्या पण चांगल्याच भरदार व रंगहि जास्त गडद असे. केनयाचा जकरांदा तिथेहि होता, पण तिथे त्याचे रुप जरा वेगळे असायचे, केनयाप्रमाणे पुर्ण पाने झडायची नाहीत, पाने असतानाच तुरे यायचे. पण तेहि अगदी टोकाला, केनयासारखे सगळे झाड निळे नाही व्हायचे. हिरव्या आणि निळ्या रंगाचे ते कॉम्बीनेशन छान दिसायचे, पण त्यापुर्वी केनयाचा जकरांदा डोळेभरुन पाहिला असल्याने, मला तो तितका आवडायचा नाही. नायजेरियात पाऊसहि भरपुर पडायचा. झिरमिर नव्हेच पण धोधो शब्दहि अपुरा पडेल. अगदी बदाबदा कोसळायचा पाऊस तिथे. अर्ध्या तासात भरपुर पाणी व्हायचे सगळीकडे. छपरावरच्या पाईपमधुन जिथे पाणी पडायचे तिथे सिमेंत कॉंक्रीटचा भरावा घालावा लागायचा नाहितर त्या झोताने भला मोठा खड्डा तयार व्हायचा. पण या पावसानंतर ऊनहि लगेच आणि कडक पडायचे. ऊनपावसाने ईंद्रधनुष्य कधी निर्माण झालेले मात्र दिसायचे नाही. तसा मला निसर्ग कमीच अनुभवायला मिळाला. एकतर ऊघड्यावर जाता यायचे नाही. दुसरे म्हणजे गाडीच्या काचाहि कायम बंदच ठेवाव्या लागायच्या. त्या परिसरात नावालाहि डोंगर नाही. नाजजेरियाच्या मध्य भागात काहि डोंगर आहेत आणि ते हिरवाईने नटलेलेहि आहेत, पण त्या परिसरात पेट्रोलियम नसल्याने, माझे तिथे जाणे व्हायचे नाही. त्या डोंगरांच्या उत्तरेला मात्र वाळवंट आहे. मी रहात होतो त्या परिसरात मोठमोठ्या व्हिलाज होत्या. त्याभोवती ऊंच भिंत आणि भक्कम लोखंडी दार. त्यामुळे आतले काहि दिसायचेच नाही. शिवाय पावसामुळे सगळ्या घरांचे छप्पर ऊतरते असायचे त्यामुळे गच्ची वैगरे नसायचीच. अगदी पहाटे ऊठत असलो तरी कधीहि तिथे सुर्योदय वा सुर्यास्त बघता आला नाही. नद्या भरपुर असल्या तरी माझ्या येण्याजाण्याच्या वाटेवर नव्हत्या. समुद्र होता पण तो सगळा पोर्ट एरिया असल्याने, समुद्रकिनारे वा चौपाट्या नव्हत्या. पण त्या सगळ्यांची कसर भरपुर झाडानी भरुन काढली होती. अवाकाडो, आंबे, वर वर्णन केलेले काटेफणस म्हणजेच चपचप, यांची झाडे खुप दिसायची. केळी, कसावा पण दिसायचे. संत्री, मोसंबी, ईडलिंबु, पपनस अश्या लिंबुवर्गीय फळांची झाडे भरपुर होती. ऊदारा, कोला नट सारखी झाडे, कोको पपयाची झाडे जागोजागी होती. हि झाडे रस्त्याच्या कडेला वैगरे असली तरी झाडावरच्या फळाना कोणी हातदेखील लावत नसे, अगदी झाडावरच पिकुन, सडुन जात असत ती फळे. जो म्हणायचा त्याना आळस आलाय पण मला वाटते त्याना फळे हि खाण्याजोगी वस्तु आहे असे वाटत नसावे. तशी जमीन बघायला गेलो तर ती रेताडच होती, पण ती अतिशय सुपीक होती. तिथेहि माझे शेतीचे प्रयोग सुरु होते. ईथुन अनेक प्रकारच्या बिया मी नेल्या होत्या, आणि बहुतेक भाज्या छान पिकायच्या. तिथे आम्ही कधीहि नळाचे पाणी प्यायचो नाही, कायम मिनरल वॉटरच प्यायचो, त्यामुळे त्या बाटल्या घरात असतच. त्या बाटल्यातहि मी भाज्या लावायचो. मुळा, आणि ईतर पालेभाज्या तर अगदी छान व्हायच्या त्यात. माझ्या पार्ट्याना नेहमी घरी पिकवलेल्या भाज्या वापरायचो मी. झाडे भरपुर असली तरी तिथे पक्षी फारच कमी दिसायचे. सुर्यपक्षी, शिंपी असे पिटुकले पक्षी दिसायचे किंवा गिधाडे तरी, पण बाकि कुणीच नाही. अगदी कावळे चिमण्याहि नाहीत. ( तिथले सगळे पक्षी त्या लोकानी खाऊन टाकले हा आम्हा भारतीय मंडळींचा आवडता शेरा होता. ) तिथेहि मला माझासारखाचे एक वृक्षप्रेमी भेटला. संदीप गायकवाड हे त्याचे नाव. संदीपच नव्हे तर त्याचे आई बाबा, बायको, मुले, भाऊ, वहिनी, सगळेच माझे मित्र झालेत. आता संदीप थायलंडला असतो, मुद्दाम वाकडी वाट करुन, माझ्या घरी येऊन, मला तो हल्लीच भेटुन गेला. त्याच्यामुळे मला अनेक मराठी लोक ओळखु लागले. जवळजवळ १६ वर्षे त्याने नायजेरियात काढली. त्याने मला अनेक झाडांची ओळख करुन दिली. शिवाय तो त्याचे घर, त्याने पाळलेला सरडा, त्याची छोकरी गायत्री, त्याला झालेला अपघात याबद्दल सगळे, पुढच्या भागात. अपुर्ण..
|
| |
| Saturday, June 17, 2006 - 12:57 am: |
|
|
मी जेंव्हा तिथे नवा होतो तेंव्हा ईथे कुणी भारतीय वैगरे आहेत का याची मला कल्पनाच नव्हती. माझ्या कंपनीत मी एकटाच भारतीय होतो. आमच्या सप्लायर्सने चालवलेल्या, चानराय नावाच्या सुपरमार्केटमधे मी जात असे. त्याचा मालक राजु मिरचंदानी हा माझा मित्र झाला. त्याला मी सांगुन ठेवले होते कि कोणी भारतीय भेटला तर माझी ओळख करुन दे, म्हणुन. तशी त्याने मला एके दिवशी विजय नायर नावाच्या माणसाशी ओळख करुन दिली. त्याची कंपनी चोबा नावाच्या गावात होती. हॉरिझॉन फ़ायबर्स नावाच्या कंपनीत तो होता. त्या नंतरच्या रविवारी ते लोक ओणम साजरा करणार होते, त्याचे मला त्याने आमंत्रण दिले, ईतकेच नव्हे तर गाडी पाठवतो म्हणुनहि सांगितले. मी त्या प्रमाणे तिथे गेलो. ते गाव पोर्ट पासुन अर्ध्या तासाच्या अंतरावर होते. त्या कंपनीचा परिसर अत्यंत रम्य होता. खुप मोठे बंदिस्त आवार होते. त्यांचा एक कम्युनिटी हॉलपण होता. तिथेच ओणम साजरा होणार होता. तिथल्या बायकानी अगदी केरळ स्टाईलने फुलांच्या रांगोळ्या घातल्या होत्या. मग अनेकजणानी गाणी वैगरे सादर केली. मलाहि आग्रह झाला, मी पण एक तेलगु गाणे गायले. मग खास त्यांच्या पद्धतीने आडव्या केळीच्या पानावर जेवण झाले. केळ्याचे चिप्स, भात अवियल हे अगदी अस्सल चवीचे, ईतकेच नव्हे तर अवियलसाठी वापरलेल्या भाज्याहि परसातच पिकवलेल्या होत्या. खुप मजा आली, आणि मी तृप्त मनाने घरी आलो. त्यानंतर चारच दिवसानी संदीप आणि त्याचे सहकारी मला शोधत ऑफ़िसमधे आले. एक मराठी माणुस पोर्टमधे येतो आणि आम्हाला भेटत नाही म्हणजे काय, शिवाय त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या भाषेत गाणे म्हणतो, आणि हे आम्हाला त्यांच्याकडुन कळावे म्हणजे काय ? असा एकंदर अविर्भाव होता. ही सगळी मंडळी पुण्यातली होती. त्याच हॉरिझॉन फ़ायबर्स मधे काम करत होती. त्या लोकानी माझा ताबाच घेतला. पण सगळ्यात जास्त आवडला तो संदीप. माझ्यापेक्षा थोडा मोठा असेल तो, पण त्याच्या नजरेत मी केलेल्या आगळिकिची निषेध अगदी स्पष्ट होता. त्यानंतर दोनच दिवसानी संदीप परत आला. यावेळी एकटाच होता. मला म्हणाला मी दर गुरुवारी तुला न्यायला येईन. तो त्याचा बाजारहाटीचा दिवस असे. त्या कंपनीतील लोकानी असे दिवस वाटुन घेतले होते. मग दर गुरुवारी आमची बाजारहाट व्हायची. त्याने त्यावेळी तिथे दहा वर्षे काढल्याने, त्याला सगळे बाजार माहित होते, तो मला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जायचा. एरवी अश्या ठिकाणी मी गेलोहि नसतो, पण त्याच्या सोबतीने जायचो. मग बोलता बोलता कळले कि तो पण मालवणचाच. पुण्याला राहिला असला तरी मनाने तो अस्सल कोकणीच होता. तसा तो अबोल होता, पण माझ्याशी मात्र भरभरुन बोलायचा. तो एकटाच रहात होता. वहिनी बाळंतपणासाठी पुण्यात आल्या होत्या. त्याचा मोठा मुलगा प्रणवला तो खुप मिस करत होता. मी त्या दरम्यान भारतात येणार होतो. मी त्याला त्याच्या घरी जायचे वचन दिले. त्याचे घर म्हणजे पुढे मोठ्या चार रुम्स, मधे अंगण आणि मागे परत मोठ्या चार रुम्स. मागचा भाग तर तो वापरतच नव्हता. त्याचे वावरणे सगळे पुढच्या चार रुम्समधे आणि मागच्या बंदिस्त अंगणात. तिथे त्याने बाग केली होती. आणि झाडे पण कसली तर तुळस, ओवा, कडिपत्ता वैगरे. त्याने कुठुनतरी नागवेलीची वेल आणली होती, आणि तिही त्याच्या अंगणात व्यवस्थित वाढत होती. तो गुरुवारी माझ्या घरी आला कि मी त्याच्यासाठी काहितरी खास पदार्थ करुन ठेवत असे. मग बहुतेक रविवारी, किंवा शनिवारी रात्री मी त्याच्या घरी रहायला जात असे. मग तो माझ्यासाठी जेवण करत असे. अगदी ठरवुन साबुदाणा खिचडी वैगरे करायचो आम्ही. मग पान खाण्याचा कार्यक्रम व्हायचा. काय त्या मातीचा गुण असेल तो असेल तिथली पाने जरा तिखट लागायची. शिवाय पानात घालायला आमच्याकडे काहिच नसायचे, मग आम्ही शक्कल लढवुन त्यात, चक्क च्यवनप्राश वैगरे घालुन खायचो. माझ्या ड्रायव्हर तिथुन येताना नेहमी एका हिरव्या फुलांची झाडाची फांदी तोडुन आणायचा. खुप घमघमाट असायचा त्या फुलाना. मी आणि संदीपने ते झाड शोधुन काढले. ऊतरत्या फ़ांद्याचे ते झाड खुप देखणे दिसायचे. त्याला दर पानाआड हिरवी मोठी फुले यायची. फुले साधारण हिरव्या चाफ्यासारखी असली तरी, बराच फरक होता. साम्य होते ते रंगात आणि वासात. हिरव्या चाफ्याचे झाड सकर पद्धतीने वाढते म्हणजे त्याला मुळातुनच धुमारे फुटत राहतात. त्याची पाने मोठी असतात. हिरव्या चाफ्याची कळी नसते. थेट फुलच लागते त्या झाडाला. पण त्या फुलाना पाना आड दडायची वाईट खोड असते. हिरव्या रंगामुळे ते फुल पटकन दिसत नाही, ते फुल पिकुन पोपटी व पिवळे होते. आणि त्याचवेळी त्याला न लपणारा सुगंध लाभतो. पण तरिही निराशा आहेच कारण खुडु जावे तर त्याला देठ नसतो, आणि पिकल्यावर पाकळ्या गळुनहि जातात. हे सगळे दोष या झाडात नव्हते. या झाडाची पाने खालच्या बाजुला वळलेली तर फुले वरच्या दिशेने येतात. सगळी फांदी भरुन जाते. पण या फुलाला कोह SS म हे कोडे सुटलेले नसावे बहुतेक. कारण त्याच्या पाकळीला आकार असला तरी फुलाला आकार नसतो. प्रत्येक पाकळी मनमानी करत हवी तशी वळलेली असते. त्यामुळे लांबुन बघितल्यावर ती कोवळी पालवीच वाटते, पण सुवास मात्र अजिबात लपत नाही. याला फळे लागतात तिही, सोनचाफ्याला लागतात तशी. हिरव्या चाफ्याला मात्र घोसात टोकेरी फळे लागतात. चवीला गोडसर लागतात. या झाडाचे फोटो वैगरे आम्ही काढले होते. ( तोच फोटो डॉ. डहाणुकराना आम्ही पाठवला होता, आणि त्यानंतरच त्यांच्या भेटीचा आणि आशिर्वादाचा लाभ आम्हाला झाला. ) त्याने ओळख करुन दिलेले आणखी एक झाड म्हणजे स्टार आॅपल. क्रायसोफ़ॉयलम असे या झाडाचे नाव आहे, कारण याची पाने वरुन हिरवीगार तर खालुन किरमिजी रंगाची असतात. शिवाय त्यावर लव सते त्यामुळे ती सोनेरीहि दिसतात. मुंबईत फ़्लोरा फ़ाऊंटनला याची झाडे आहेत. पण त्याकडे मान वर करुन बघायला आपल्याला फुरसत नसते. मुंबईत या झाडाबद्दल मला माहित होते, पण या झाडाची फळे मात्र संदीपनेच चाखवली. ( मुंबईत हि फळे मिळत नाहीत, झाडावर देखील दिसत नाहीत. ) किरमीजी रंगाची हि फळे दोन तळव्यात फिरवुन मऊ करावी लागतात. मग वरची साल ऊकलुन आतला गाभा काढायचा. तो दिसतो एखाद्या काचेच्या आमलकासारखा. ( आमलक म्हणजे देवळावर आवळ्यासारखा कळस असतो तो ) या आकारामुळेच त्याला स्टार आॅपल म्हणतात. चवीला साधारण ताडगोळ्यासारखे लागते ते. अशीच रोझ आॅपलची ओळखपण त्यानेच करुन दिली. प्रेमळपणा हा संदीपच्या अंगभुत भाग आहे. त्याची मुले तिकडे नसल्याने, त्याला बराच एकटेपणा जाणवत होता. त्यावेळी त्याने चक्क एका सरड्याशी दोस्ती केली होती. जेवण झाले कि तो हातात भात घेऊन अंगणात बसायचा. त्यावेळी एक सरडा तुरुतुरु पळात येऊन त्याच्या हातातला भात खाऊन जायचा. त्या सरड्याला भात खायला बराच वेळ लागायचा आणि संदीप अगदी प्रेमाने त्याच्याकडे बघत बसायचा. ( हे नवल मी प्रत्यक्ष बघितले, मला थेट, सखाराम बाईंडरमधल्या लक्ष्मीची आठवण आली, तीदेखील मुंगळ्या कावळ्याना असेच खाऊ घालत असते. ) अपुर्ण
|
| |
| Sunday, June 18, 2006 - 2:01 pm: |
|
|
मला तो परिसर खुप आवडायचा. माझ्या घरी मी एकटाच असल्याने, कधी कधी वीकेंडला मी तिथे रहायलाच जात असे. संदीप तेक्स्टाईल ईंजीनियर होता, त्यामुळे त्याला जास्त वेळ फ़ॅक्टरीमधे थांबावे लागे, मी मग त्या परिसरात भटकत असे. बंदिस्त आवार असल्याने तिथे सुरक्षित होते, संदीपचे घर माझेच असल्यासारखे होते. तो खुपदा संध्याकाळी जॉगींगला जायचा. मी आलेलो असलो तरी त्याचा तो नियम चुकायचा नाही. मग बोलण्यातुन त्याला झालेल्या भीषण अपघाताबद्दल कळले. एक्दा तो गाडीत बसत असताना, त्याच्या ड्रावव्हरला तो बसलाय कि नाही ते कळले नाही. व त्याने गाडी रिव्हर्स घेतली. संदीप तेंव्हा बाहेरच ऊभा होता आणि त्याच्या पायावरुन गाडीचे चाक गेले. मल्टिपल फ़्रॅक्चर झाले. त्यांच्या डॉक्टरने तात्पुरते ऊपचार केले, पण त्याचा पाय सुजतच चालला. त्याचे मित्र त्याला घेऊन अनेक ठिकाणी फिरले. शनिवार असल्याने, कुणीच डॉक्टर जाग्यावर नव्हता, आणि तश्या तिथे सोयीहि नव्हत्या. मग शेल कंपनीच्या खाजगी डॉक्टरला विनंति केली, त्याने त्याची परिस्थिति बघितली आणि त्या देशात काहिहि होवु शकणार नाही असे सांगितले. संदीपला भारतात पाठवायचे ठरवले. त्याचा पाय सुजलेलाच होता, चालताहि येत नव्हते. चोबा हुन पोर्ट हारकोर्टला, तिथुन विमानाने लेगोसला, तिथुन ईथियोपियन एअरलीन्सच्या विमानाने अदिस अबाबाला, तिथे ६ तास ट्रांझिट, तिथुन मुंबईला, तिथुन पुण्याला असा द्राविडि प्राणायाम केल्यावरच त्याला वैद्यकिय मदत मिळाली. तिथे त्याच्या पायात रॉड्स वैगरे घालुन ट्रिटमेंट देण्यात आली. तीन महिने त्याला झोपुन काढावे लागले. तेवढे दिवस त्याला घराबाहेरहि पडता आले नाही. आणि तेवढ्या काळात स्नेहावहिनीहि घराबाहेर पडल्या नाहीत. ( त्याहि काळात पुण्यातील भोचक बायका, त्याना तेंव्हा मुल नसल्यावरुन टोचत असत. त्यांची दोन मुले जन्मल्यानंतर काहि दिवसातच दगावली होती. पुणेकरांबद्दल हा सल संदीपने कायम ठेवला. ) पुढे तो नीट हिंडुफिरु लागला. डॉक्टरने त्याला सांगितले एकवेळ तुझा पाय मोडेल पण पायतल्या सळ्याना काहि होणार नाही. ( डॉक्टर पुण्याचा होता. ) आणि त्यामुळे संदीप जिद्दिने रोज जॉगिंग करत असे. त्याच्या धैर्याचे आणि वहिनींच्या प्रेमाचे मला खुप कौतुक वाटते. ( हे मुद्दाम सविस्तर लिहायचे कारण, नायजेरियत वैद्यकिय क्षेत्रात काय परिस्थिति आहे ते कळावे एवढेच आहे. ) माझ्या पाककलेचे कौतुक तिथेहि होत होते. खरे तर त्याची गंम्मतच झाली. माझ्या आणि संदीपच्या गप्पा ईतक्या विषयावर व्हायच्या कि आमच्या कामाबद्दल बोलायला आम्हाला सवडच व्हायची नाही. त्याने मला मी काय काम करतो असे विचारले असता मी फ़्रेंचमधे शेफ़ कॉम्प्टेस असे म्हणालो होतो. त्याला वाटले मी शेफ़ आहे. मालवणीच तो, त्याला मी मासे वैगरे पण करुन द्यायचो. मग हि खबर सगळ्या पोर्टमधल्या भारतीयात पसरली, आणि आमच्या वीकेंड पार्ट्या सुरु झाल्या. त्या वन डिश पार्ट्या असायच्या. मी काय करुन आणलेय यावर सगळ्यांचा डोळा असायचा. मग मी माझ्याहि घरी पार्ट्या ठेवु लागलो. पण त्यावेळी मात्र सगळे जेवण मीच एकटा करायचो. त्यावेळी ऊरलेले सगळे जेवण पाहुणे आनंदाने पॅक करुन घेऊन जायचे. नायजेरियातली परिस्थिति बघता, बहुतेक जण तिथे एकेकटेच रहात होते. बायका मुले सुट्टीत येत असत. त्यामुळे एखादी वहिनी यायची असली किंवा एखादी परत जाणार असली कि पार्टि ठरलेली. मग गप्पा, गाणी, नकला असा छान कार्यक्रम व्हायचा. प्रत्येकाचे घर मोठे असल्याने, काहि प्रश्ण नसायचा, शिवाय हाताखाली मेड्स असायच्याच. स्नेहावहिनी तेंव्हा पुण्याला होत्या. त्याना मुलगी झाली होती. तीन महिन्याची झाली होती ती. संदीपने मला गळ घातली, कि तिला प्रत्यक्ष बघुन ये. मी दिवसभर त्यांच्याकडे राहिलो. प्रणव तर दोस्त झालाच होता पण गायत्रीहि मला चिकटली होती. पुढे तीन महिन्यानी वहिनी तिथे आल्या तरी त्या चिमुरडीने माझी ओळख ठेवली होती. मला बघितल्यावर ती हात पुढे करुन झेपावायची, बाकि कुणाकडेच जायची नाही. आणि तिला घेतले कि प्रणवला राग यायचा, मग तो मला बोचकारुन ठेवायचा. अलोकडेच संदीप मुलाना घेऊन आला होता, याच काकाच्या अंगाखांद्यावर खेळलात असे त्याने मुलाना मुद्दाम सांगितले. तिथे भारत सरकारतर्फे शाळा चालवल्या जात होत्या. तिथे सेंट्रल स्कुलचा सिलॅबस होता, पण तिथल्या अस्थिर परिस्थितिमुळे कुणी कुटुंबाला तिथे ठेवत नसे. त्या परिस्थितीला आम्ही एकट्याने तोंड देतच होतो. अपुर्ण
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|