|
| |
| Tuesday, March 28, 2006 - 3:49 pm: |
|
|
दुरदर्शन १९७२ साली मुंबईत दुरदर्शन आले. त्यावेळी आम्ही मालाडमधे रहात होते. तो येण्यापुर्वी माझ्या भावाचे आणि माझे बोलणे चालले होते. टिव्ही कसा दिसतो वैगरे आम्हाला काहिच कल्पना नव्हती. माझा भाऊ म्हणाला, ते एक यंत्र असणार आणि ते रेडिओच्या समोर ठेवले, कि त्यावर चित्र दिसणार. मी म्हणालो म्हणजे, रेडिओवर ओ मेरे सोना रे सोनारे लागले असेल तर आशा पारेख आणि शम्मी कपुर दिसणार का ? ( छायागीत या कार्यक्रमाचे पेटंट कुणाला मिळायला हवे होते, ते कळलं ना आता. ) तर तो म्हणाला, तसे नाही पण लता मंगेशकर गाताना दिसणार. ( त्याच्या अगाध ज्ञानाबद्दल तुम्ही त्याला ऊदार मनाने क्षमा करावी, हि विनंति. ) पण त्यावेळी टिव्ही सगळ्यांच्या आवाक्यात नव्हता, शिवाय लोकाना ते काय आहे हे माहितच नसल्याने, कुणाला फारशी ऊत्सुकताहि नव्हती. मालाडमधे दोन चार घरात टिव्ही होता, त्यांच्या खिडकीच्या बाहेर लोकांची गर्दी दिसू लागली. पण तरिही मला फारशी ऊत्सुकता नव्हतीच. आमच्या शेजारी राहणार्या बाईनी मला एकदा त्यांच्या ओळखीच्या एका घरी नेले होते. त्यावेळी किलबीलमधे, “ राजाला हवेत पंख “ नावाचे एक नाटुकले दाखवले होते. माझी आणि टिव्हीची हि पहिली नजरभेट. मग पुढे क्रिकेटचे सामने दाखवायला सुरवात झाली. मालाडला स्टेशनजवळ, गोंधळेकर म्हणुन एक कपड्यांचे मोठे दुकान होते. त्यांचे घर आमच्या जवळ होते. कुणाची तरी ओळख काढुन आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो. त्यावेळी अशी पद्धत होती. आलेल्या पाहुण्यांसाठी सतरंज्या वैगरे घातलेल्या असत. पडदे वैगरे ओढुन अंधार करावा लागे. मला त्यावेळी क्रिकेटमधे बर्यापैकी रस होता. वन डे मॅचेस सुरु व्हायच्या होत्या आणि मॅच फ़िक्सींग सुरु झालेले नव्हते. पण त्यावेळच्या मॅचचे वर्णन आता केले तर हसु येईल. कॅमेरामनला क्रिकेट कश्याशी खातात याची अजिबात कल्पना नसावी, शिवाय कॅमेरे मोजकेच असायचे. त्याला कॅमेरा कुठे फ़ोकस करायचा तेच कळायचे नाही. बॅट्समनच्या तोंडावरच कॅमेरा असायचा. त्याने एखादा शॉट मारला कि त्याच्या नजरेवरुन क्लु घेऊन, कॅमेरा बॉल शोधायला लागायचा. तो कधी कधी सापडायचाच नाही. त्यामुळे फ़ुटवर्क, शॉट असे काहि दिसायचेच नाही. क्लोजप्स वैगरे पण नसायचे. अधुन मधुन स्कोअर बोर्ड दाखवायचे. त्यावेळी भुतं ( घोस्ट ईमेजेस ) हमखास दिसत. शिवाय मधेच ऊभे असलेले खेळाडु, कमरेतुन तुटुन बाजुला होत. अजुनहि ती दृष्ये आठवली कि हसु येते. प्रक्षेपण ऐन मोक्याच्या वेळी बंद पडणे हे तर नित्याचेच. चांगले समालोचक टिव्हीकडे नसायचेच, मग टिव्हीचा व्हॉल्युम कमी करुन, रेडिओ वरचे समालोचन ऐकले जात असे. जाहिराती नव्हत्याच. त्यामुळी बाराव्या गड्याचे पाणी आणणे वैगरे सगळे यथासांग पहावे लागायचे. प्रत्यक्ष स्टेडियमवर जाऊन, सामना बघण्यात आणि त्याकाळी टिव्हीवर बघण्यात काहि फरक नव्हता. ऊलट स्टेडियममधे दुर्बीण वैगरे घेऊन जाता येत असे. मग आम्ही मालाड सोडले. मी मॅट्रीक होईपर्यंत घरात टिव्ही आणायचा नाही, असे माझ्या वडिलानी ठरवले होते. तरि पण माझा सगळा अभ्यास रेडिओ लावुनच व्हायचा. घरात टिव्ही नसल्यामुळे दुसर्यांकडे जाणे आलेच. त्यावेळी तशी पद्धतच होती. एकंदर फ़ॅमिली एंटरटेनमेंटचा प्रकार असायचा तो. गुरुवारचे छायागीत, शुक्रवारचे फुल खिले है गुलशन गुलशन, शनिवारचा मराठी सिनेमा, आणि रविवारचा हिंदी सिनेमा, हे कार्यक्रम लोकप्रिय होते. छायागीतचे आकर्षण भरपुर असायचे. साधारण सात गाणी दाखवत असत. बहुदा दोन तीन सिनेमातलीच असत. पण गाणी जुनीच असायची, व शक्यतो सम्पुर्ण दाखवली जायची. बातम्यानंतर लगेचच छायागीत सुरु व्हायचे. एका बाईचे चित्र दाखवले जायचे, आणि मग प्रोग्रॅम सुरु व्हायचा. फुल खिले है गुलशन गुलशन हा तब्बसुमचा कार्यक्रम म्हणुनच ओळखला जायचा. ती या कार्यक्रमासाठी अगदी योग्य व्यक्ती होती. तिने बालकलाकार म्हणुन खुप काम केले होते पण तरुणपणी ती सिनेमात यशस्वी झाली नव्हती. पण तिच्या स्वभावामुळे ती अजातशत्रु होती. ऊर्दु शब्दांचा सोस सोडला तर तिची मुलाखत खरोखरच श्रवणीय असायची. केवळ तिच्या मैत्रीखातर नर्गिस सारखी चित्रपट सन्यास घेतलेली अभिनेत्री मुलाखत द्यायला तयार झाली होती. पण हा प्रकार एकंदर सोज्वळ असायचा. तिने अफ़ेअर्स बद्दल कधी थेट विचारल्याचे आठवत नाही. तिचे मोहक हास्य सगळी मुलाखत प्रसन्न करत असे. या प्रोग्रॅमसाठी एकमेकांशी काटकोन केलेले दोन कॅमेरे असत, आणि समारोप करताना ती या दोन्ही कॅमेराना नमस्कार करत असे. त्यावेळी रंगीत प्रक्षेपण नसल्याने, कपड्यांची खास निवड करावी लागे. शक्यतो ऊभ्या रेघा असलेले कपडे घालत नसत. तबस्सुमच्या साड्या पण हे लक्षात ठेवुनच निवडलेल्या असत. मधे तिने हा प्रोग्रॅम सोडला होता, पण तिला लोकाग्रहास्तव परत यावे लागले होते. शनिवारचा सिनेमा बहुदा मराठी असायचा. हे सिनेमे म्हणजे बेर्डे सराफ जोडीच्या आधीचे असल्याने, एकतर ते तमाशापट असत किंवा राजा गोसावी पट असत. कोणी काहिहि म्हणो, मला तमाशापट खुप आवडत असते. जयश्री गडकर, ऊमा, ऊषा चव्हाण, लिला गांधी यांची लावणी नृत्ये आणि आशाच्या ढंगदार लावण्या मला खुप आवडत असत. ( अजुनहि माझी हि आवड कायम आहे. फ़क्त आशाने गायलेल्या या लावण्यांचे संकलन कुठे मिळत नाही, हि खंत आहे. ) शिवाय पाटिल, फरशीने पाडलेले मुडदे असा सगळा माहौल असायचा. राजा गोसावी वैगरे मंडळींचे धमाल विनोदीपट पण असायचे. सुमधुर संगीत त्यातहि असायचे. जयश्री गडकर दोन्हीकडे असायची. रविवारचा सिनेमा हा खास जिव्हाळ्याचा. फ़ारसे लेटेस्ट सिनेमे दाखवत असत असे नाही. जुनेच दाखवत असत, पण बहुतांशी ते दर्जेदार असत. निदान संगीत तरी श्रवणीय असेच. त्या काळात मॅटीनीला असे जुने सिनेमे दाखवत असत, पण तेहि थोडाफ़ार धंदा करतील असेच असत. पण टिव्हीमुळे बैजु बावरा, बसंत बहार, मदर ईंडिया, पुकार सारखे सिनेमे बघता आले. त्याकाळात साप्ताहिकी पण फ़ार लोकप्रिय असायची. रविवारि सकाळी भक्ती बर्वे हा कार्यक्रम सादर करायची. येणार्या आठवड्यातील कार्यक्रमांची यादी व काहि कार्यक्रमांची झलक असे स्वरुप असायचे. पुढच्या शनिवार रविवारच्या सिनेमांची नावे आधीच कळावीत म्हणुन आमचा आटापिटा चाले. अगदी पहिल्यांदा दुरदर्शन आणि आकाशवाणी एकाच खात्याच्या अधिपत्याखाली होती. त्यामुळे दोघांची सिग्नेचर ट्युन एकच होती. रेडिओच्या सभा सुरु होताना पण तीच वाजत असे आणि टिव्हीचे कार्यक्रम सुरु होताना पण तीच. त्यावेळी लोकांची जास्त अटॅचमेंट रेडिओशी होती. अजुनहि मला विविधभारतीचे सगळे कार्यक्रम आठवताहेत. त्यामुळे ती परिचीत धुन सुरु झाली, कि लोकाना आता कुठली रेडिओची सभा, असाच प्रश्ण पडत असे. मग कधीतरी आकाशवाणी आणि दुरदर्शन वेगळे झाले. मग ती सत्यम शिवम सुन्दरमची ट्युन तयार झाली. टिव्हीचे कार्यक्रम तेंव्हा साडेसहाला सुरु होत. त्या आधी काहि मिनिटे कलर चार्ट दिसत असे. त्या पट्ट्या नीट दिसेपर्यंत ट्युनिंग करता येत असे. आणि मग ती ट्युन वाजत असे. ईतर दिवशी दिवसभर कार्यक्रम नसत. मग रविवारी सकाळची सभा सुरु झाली. त्यात प्रतिभा आणि प्रतिमा आणि साप्ताहिकी ही मुख्य आकर्षण असत. मग शालेय कार्यक्रम सुद्धा सुरु झाले. खरे तर ते फार ऊपयुक्त होते. ( आमच्या एक प्राध्यापिका जिनेट पिंटो, ईंग्लिशचा पाठ सादर करत असत. ) युनिव्हरसिटी ग्रांट्स कमिशनचेहि काहि शैक्षणिक कार्यक्रम होत असत. आता ते सादर होतात का ते माहित नाही. टिव्हीवार्च्या बातम्या हे म्हातार्या मंडळींचे आकर्षण होते. मी पुढे युरो न्युज सारखे कार्यक्रम बघितले ( हा कार्यक्रम एकाचवेळी सर्व युरोपीय भाषात प्रसारित होत असे. पुर्णपणे दृष्यमय असा कार्यक्रम असे हा, शिवाय यात निवेदकच नसे. ) साडेसात वाजता मराठी, नऊ वाजता हिंदी व दहा वाजता ईंग्लिश बातम्या असत. मराठीसाठी भक्ती बर्वे, चारुशीला पटवर्धन, प्रदीप भिडे, अनंत भावे, शोभा तुंगारे, स्मिता तळवलकर वैगरे असत. हिंदीसाठी हरिश भिमानी, सरिता सेठी वैगरे असत आणि ईंग्लिशसाठी डॉली ठकोर, निर्मला मठन वैगरे असत. या प्रत्येकाचे एक वेगळे व्यक्तिमत्व होते. प्रत्येकाचा आवाज खास कमवलेला होता, आणि वाचनात एक गंभीरता होती. त्यांच्यावर रेडिओचे संस्कार होते. दृष्ये फ़ारच थोडी असत. मग त्याच दरम्यान ईनसॅट द्वारे मिळालेली चित्रे दिसु लागली. हळु हळु परदेशी व्हीडिओज पण मिळु लागले. या सर्व मड़अळीना बाहेरच्या क्षेत्रात पण नाव होते. त्यामुळे त्याना टिव्ही स्टार असे बिरुद मिरवायची गरज वाटत नसे. यापैकी अनेकजणाना प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला, आणि ते कलाकार अधिकच आवडु लागले. त्यावेळी बातम्यांसाठी टेलीप्रॉम्प्टर नव्हता. बातम्या लिखित स्वरुपात कागदावरुन वाचाव्या लागत. वाचताना त्यामुळे डोळे खाली असत. ( बातम्याचे भाषांतर पण याच मंडळीना करावे लागत असे. ) पण यापैकी काहि बहाद्दर असे होते, कि ते चक्क बातम्या पाठ करत असत, व थेट कॅमेराकडे बघत त्या बातम्या सांगत असत. मग पुढे टेलीप्रॉम्प्टर आला. त्यामुळे समोरच्या कॅमेराखाली एका स्क्रीनवर त्याना बातम्या दिसु लागल्या, व कॅमेराला नजर भिडवुन त्या वाचताहि येऊ लागल्या. सम्पुर्ण बातम्या पुरेश्या गांभीर्याने देऊन झाल्यानंतर. “ आणि या बरोबरच आजच्या बातम्या संपल्या, नमस्कार “ असे म्हणण्याची प्रत्येकाची स्टाईल वेगळी होती. भक्ती बर्वे खट्याळपणे हसत असे, चारुशीला पटवर्धन मानेला नाजुकसा झटका देत असे. अनंत भावे दाढीमिशीत हसत असे. या मंडळीना माश्या फ़ार त्रास देत असत. वारंवार त्याना त्या वाराव्या लागत असत. ( त्यावेळी टिव्ही सेंटरवर अगदीच सरकारी कळा होती. कीलबील कार्यक्रमाच्या निवेदकाच्या पदासाठी मी तिथे मुलाखत दिली होती. निवडहि झाली होती, पण सी ए करण्यासाठी ते सोडावे लागले. आणि तुमची सुटका झाली. ) शिवाय व्यतय हि फारवेळा यायचा. पडद्यावर सरळ सरळ व्यतय हिच पाटी झळकायची. हिंदी कार्यक्रम चालु असला तर रुकावट के लिये खेद है, अशी पाटी झळकायची. आम्ही अगदी स्थितप्रज्ञासारखी ती पाटी बघत असु. अपुर्ण....
|
| |
| Wednesday, March 29, 2006 - 3:45 pm: |
|
|
त्यावेळची टिव्हीची मॉडेल्स जरा वेगळी होती. चॅनेल्स हाताने सेट करावे लागायचे. खरं म्हणजे एकच चॅनेल होता. पण त्या मॉडेल्स्मधे आठ दहा चॅनेल्स ची सोय होती. त्याकडे नुसते बघुन सुद्धा बरं वाटायचं त्यावेळी काहि वर्षानी ईतके चॅनेल्स होतील, अशी कल्पनाहि आम्ही केली नव्हती. त्यावेळच्या कंपन्या पण आता दिसत नाहीत. ईसी, टेलीविस्टा अश्या काहि कंपन्या होत्या. आता त्या नामशेष झाल्या आहेत. पुढे घरी टिव्ही आल्यावर बाकिच्या कार्यक्रमांची ओळख झाली. त्यावेळी मराठी हिंदी बरोबरच गुजराथीला पण वेळ दिली जात असे. आपल्या कार्यक्रमांच्या बरोबरीने त्यांचे कार्यक्रम असत. मुलांसाठी किलबील हा मराठीतुन, संताकुकडी गुजराथीतुन, खेल खिलौने हा हिंदीतुन तर मॅजिक लॅंप हा ईंग्लिशमधुन कार्यक्रम असे. शेतक्र्यांसाठी, आमची माती आमची माणसं हा कार्यक्रम असे. मला तो खुप आवडायचा. त्यातले प्राध्यापक खुप आस्थेने महिती द्यायचे. शिवाय मला खास आवडणारी गोष्ट म्हणजे शेतात डोलणारी कणसे, भाज्या फळानी लगडलेली झाडे, बघायला मिळत. या चित्रीकरणाच्या वेळी मागे शेतात दिसणार्या बाया आणि बाप्ये चुकुनहि कॅमेराकडे बघत नसत. कामगारांसाठी कामगारविश्व हा कार्यक्रम असे. त्यावेळी कामगाराना खुप मह्त्व होतेच. रेडिओ वर पण सकाळी अकरा आणि संध्याकाळी साडेसहा वाजता कामगार सभा असे. आता असा कुठलाच खास कार्यक्रम नाही बहुदा. खास महिलांसाठी सुहासिनी मुळगावकर, सुंदर माझे घर हा कार्यक्रम सादर करत असत. त्या स्वता एक कलाकार असुनहि, त्यानी पुर्ण वेळ टिव्हीला दिला. त्या जरा जास्तच ऊंच होत्या त्यामुळे त्यांच्या जोडीला, त्यांच्यापेक्षा ऊंच संगीत नट मिळत नसे. यावर ऊपाय म्हणुन त्यानी एकपात्री सौभद्र केले होते. पण मग त्या टिव्हीवरच रमल्या. त्या स्वताला सदाफुली म्हणवुन घेत असत. कायम प्रसन्न असत. कॅन्सरमुळे त्यांचा अकाली अंत झाला, पण अगदी शेवटपर्यंत त्यांची विनोदबुद्धी कायम होती. शस्त्रक्रियेच्या वेळी डॉक्टरानी केलेल्या खुणांकडे बघुन, त्याना कृष्णाने राधेच्या वक्षावर चितारलेल्या नक्षीची आठवण झाली होती. त्यांच्या बरोबरीने विनया जोगळेकर धुमाळे असत. त्याहि स्वता गायिका होत्या. एका कार्यक्रमात सुहासिनीबाईनी त्याना आवर्जुन मालकंस गायला लावला होता. पण त्यानाहि ते क्षेत्र सोडावेच लागले. त्यांची मुलगी ” श्वेतांबरा ” या पहिल्या मालिकेत झळकली होती. ( त्यात विक्रम गोखले, वृषाली विक्रम गोखले, मोहन गोखले असे थोर कलाकार होते. त्यावेळी १३ भागात चाललेली हि मालिका आम्हाला फ़ारच संथ वाटली होती. यावरुन काहि व्यंगचित्रेहि झळकली होती. ) तश्या दुरदर्शनने स्वताच्या काहि मालिका पण निर्माण केल्या होत्या. चि. वि. जोशींचा चिमणराव या मालिकेतुन जिवंत झाला होता. दिलीप प्रभावळकर आणि काऊ, मोरु, मैना, राघु, गुंड्याभाऊ, आई, गुलाब हि पात्रे अगदी अस्सल होती. त्यापुर्वी दामुअण्णा मालवणकरानी तो सादर केला होता. पण दिलीप प्रभावळकरानी या भुमिकेवर स्वताचा ठसा ऊमटवला. आजहि माझ्या डोक्यात हे समीकरण आहे. या ईमेजमधुन बाहेर पडायला प्रभावळकराना बराच त्रास झाला. गजरा हा विविध करमणुकिचा कार्यक्रम महिन्यातुन एकदा सादर होत असे. याची जबाबदारी प्रत्येकवेळी वेगवेगळ्या कलाकारावर सोपवलेली असे. दया डोंगरे, अरुण जोगळेकर, सई परांजपे, आत्माराम भेंडे, आशा भेंडे, किशोर प्रधान, शोभा प्रधान आदि मंडळी हा कार्यक्रम फ़ार छान सादर करत असत. त्यावेळी स्टुडिओ ऑडियन्सची प्रथा नव्हती त्यामुळी आतासारखे हुकमी हसुहि नव्हते. या कार्यक्रमाना त्या जमान्यात पण प्रेक्षकांचा अभुतपुर्व प्रतिसाद मिळत असे. गजर्यासारखाच एक फ़ुलोरा नावाचा कार्यक्रम सादर झाला होता. पद्मा चव्हाणने सी. रामचंद्रांची मुलाखत घेतली होती. खास या कार्यक्रमासाठी गाणी लिहुन त्याना संगीत दिले होते. आणि हि गाणी त्यावेळचे सिनेकलाकार घेऊन, चित्रीत केली होती. हा कार्यक्रम प्रेक्षकाना अजिबात म्हणजे अजिबात पसंत पडला नव्हता. भरपुर टिका झाली होती या कार्यक्रमावर. सुसासिनीबाईनी खिलाडुपणे आपली चुक कबुल केली व परत कधीहि या कार्यक्रमाचे नाव काढले नाही. ( पण आधी चित्रीत केलेली गाणी वापरुन त्यानी एक गजरा सादर केला, अशी वंदता होती खरी. ) शास्त्रीय संगीत आणि नृत्याचे कार्यक्रम पण नियमित होत असत. रेडिओ संगीत सम्मेलना ईतकेच तेहि दर्जेदार असत. टिव्हीमुळेच लता, आशा रफ़ि गाताना कसे दिसतात हे आम्हाला कळले. पुर्वी तशी काहि सोय नव्हती. हे सगळे आमच्या गळ्यातले ताईत होते, त्यांची गाणीहि आम्हाला तोंडपाठ होती, पण त्यांचे प्रसिद्ध झालेले फोटो आणि ऐकत असलेली गाणी, यांची समीकरण जुळत नव्हते. म्हणजे साधासुधा लाजरा बुजरा रफ़ि, याहू अशी आरोळी कसा ठोकू शकेल. आपल्याच आत्या मावशी सारखी दिसणारी आशा, पिया तु अब तो आजा कसे गात असेल आणि चक्क काकुबाई दिसणारी लता, अवघड ताना कश्या घेत असेल, असे आम्हाला वाटायचे. रफ़िने स्वता नौशादच्या साथीने, मधुबनमे राधिका, सुहानी रात ढल चुकी वैगरे गाणी सादर केली होती. आशासाठी, खास ये है आशा, असा कार्यक्रम सादर झाला होता. त्यात डॅनी, सुनील दत्त, अमोल पालेकर सहभागी झाले होते. त्यात डॅनीने आशाबरोबर एक नेपाळी गाणे गायले होते. ( याच चालीवर मग लता आणि किशोरचे, घरसे निकले वो संगसंग मेरे, असे गाणे आले. ) लताने तर अनेक खास कार्यक्रम दिले. ना. धो. महानोराची गाणी लताने प्रत्यक्ष सादर केली होती. शिवकल्याणराजा, राम रतन धन पायो असे अनेक कार्यक्रम तिने सादर केले. पुर्णपणे एकाग्रतेने, कुठलाहि अभिनिवेश न आणता, तिला गाताना बघणे हि खरीच पर्वणी असायची. त्याचवेळी सुधीर फडके, ज्योत्स्ना भोळे, माणिक वर्मा, शोभा गुर्टु, कुमार गंधर्व, डॉ. वसंतराव देशपांडे असे अनेक कलाकार कला सादर करुन गेले. वसुंधरा पेंडसे नाईक त्यावेळी संक्रुत भाषेतील साहित्य कृतींवर आधारित, अमृत मंथन हा कार्यक्रम सादर करत असत. त्या स्वता विद्वान होत्याच तरिही आणखी एका विद्वानाला आमंत्रित करुन त्या चर्चा घडवुन आणत असत. त्याच कार्यक्रमात काहि नाट्य दृष्ये पण दाखवली जात असत. असाच एक वैचारिक कार्यक्रम असायचा परिक्रमा. कमलेश्वर हे हिंदी साहित्यिक तो सादर करत असत. समाजातल्या वेगवेगळ्या थरातल्या लोकाना स्टुडिओमधे बोलवुन त्याना बोलते केले जात असे. रेश्मा नावाची त्यांची एक सहाय्यक प्रत्यक्ष त्या जागी जाऊन मुलाखती घेत असे. ( हि आशा सचदेवची बहिण होती. आता आशा सचदेव, म्हणजे कोण ते विचारु नका. ) यात अगदी देवदासी, लिंगबदल करुन घेतलेली व्यक्ती असे अगदी वेगळेच पाहुणे असत. याकूब सईद हा निर्माता आणि बबन प्रभु यांची जोडगोळी होती. त्यांचेहि काहि निरागस विनोदी कार्यक्रम असत. ज्ञानदिप नावाचा एक कार्यक्रम आकाशानंद सादर करत असत. आधी प्रौढ साक्षरता हा विषय होता त्याचा. पुढे ती एक सामाजिक चळवळ झाली. ( आणि स्वतंत्र भारतातल्या अनेक सामाजिक चळवळींप्रमाणे, ती अकाली मरुनहि गेली. ) रंगभुमीवर सादर होणारी काहि नाटके टिव्हीवर सादर झालीच, पण खास दुरदर्शनने निर्मित केलेली लघुनाट्ये पण असत. रिमा लागु, विक्रम गोखले, भक्ती बर्वे, कानन कौशल, अरुण सरनाईक, भारती आचरेकर असे अनेक नाट्यकलाकार त्यासाठी खास आमंत्रित केले जात. आता या नावांचा दराराच ईतका आहे कि ती नाटके दर्जेदार असत, हे वेगळे सांगायची गरज नाही. बाहेरचे रत्नाकर मतकरी ते स्टाफवरचे केशव केळकर, अश्या अनेक लेखकांचा हातभार या नाटकाना लाभत असे. क्रिडांगण नावाचा एक मराठी आणि स्पोर्ट्स राऊंड अप नावाचा ईंग्लिश कार्यक्रम खास क्रिडाक्षेत्रासाठी होते. अपुर्ण..
|
| |
| Thursday, March 30, 2006 - 1:12 pm: |
|
|
ईंग्लिश कार्यक्रमात व्हॉट्स द गुड वर्ड हा कार्यक्रम खुप दर्जेदार होता. संचालिका सबिरा मर्चंट अत्यंत कौशल्याने तो हाताळत असे. टिममधे दोघे जण असत, त्यापैकी एकाला एक शब्द दाखवला जात असे आणि त्याच्या जवळपासचा शब्द सांगुन, दुसर्याला तो शब्द ओळखावा लागे. हे शब्द तसे नेहमीच्या वापरातले नसत. तिने अनेक वर्षे हा कार्यक्रम संभाळला. ( या सबिराचे वय हा आमच्या कुतुहलाचा विषय होता. ती आणि तिचा नवरा छोटु मर्चंट, चर्चगेटला स्टुडिओ २९ नावाचा एक क्लब चालवत असत. श्याम बेनेगलच्या त्रिकाल मधे तिने छोटासा रोल केला होता. ती ईंग्लिश नाटकात पण काम करत असे. स्ट्रीटकार नेम्ड डिझायर, हे तिचे गाजलेले नाटक. सध्या ती मॅनर्स आणि एटिकेट्स वर लिखाण करते. ) या सन्चलिकांचे काय किंवा नाट्यकलाकारांचे काय, त्यांचा कॅमेरासमोरचा वापर आत्मविह्वासपुर्ण तसेच संयतहि असायचा. ( आतासारखे अवघड जागी विंचु चावल्यासारखे चेकाळत किंचाळत नसत ते. ) रंगमंचावरचा अभिनय आणि टिव्हीवरचा अभिनय यांच्या पट्टीत थोडा फरक असतो. रंगमंचावर लाऊड अभिनयच करावा लागतो, पण टिव्हीवर मात्र अगदी संयंत अभिनय करावा लागतो. चेहर्यावरचा सुक्ष्म भाव देखील कॅमेरा टिपत असल्याने, अगदी नेमका भाव चेहर्यावर दाखवणे गरजेचे असे. विक्रम सारखा नट असेल तर, नाकपुड्यांची थरथर किंवा डोळ्यात आलेले कणभर पाणी पण दिसत असे. विक्रमचे फ़क्त ऊदाहरण दिले, बहुतेक मराठी नाट्यकलाकारानी हे कौशल्य आत्मसात केले होते. त्या अभिनयात एक प्रकारचा खानदानीपणा होता. जसा अभिनयाचा दर्जा होता तसा मेकपचाहि होता. सर्वच निवेदक थोडाफार मेकप करतच असत, पण तरिही कुणाचा मेकप ऊठुन दिसत नसे. हे सर्व निवेदक व निवेदिका, अत्यंत साध्या तरिहि प्रसन्न रुपात दिसत असत, त्यामुळे त्यांच्या निवेदनाला एक विश्वासाहर्ता आपसुक लाभत असे. या कलाकारांचा आत्मविश्वास पुढे त्यानाच याचा फायदा झाला. विनय आपटे, स्मिता तळवलकर वैगरे कलाकारांची अभिनयाची कारकिर्द ईथुनच सुरु झाली. स्मिता पाटिलहि काहि काळ टिव्हीवर होती. एकंदर सगळे छान चालले होते. यावर पहिला घाला पडला तो राष्ट्रिय प्रसारणाच्या रुपाने. संध्याकाळी ८.४० ला हे सुरु होत असे. त्यात दोन बातमीपत्रे आणि दोन प्रायोजित कार्यक्रम असत. त्याची पहिली गदा पडली ते हिंदी बातम्यांवर. सरिता सेठी आता दिसणार नाही, याचे मला खुप वाईट वाटले. हिंदि बातमीपत्र वीस मिनिटांचे असायचे, त्यात दोन निवेदक असत. पहिल्यांदा कॅमेरामनला त्याची सवय नव्हती. एकाचे वाचन झाले कि दुसर्यावर कॅमेरा रोखायला तो कधी कधी विसरायचा. मग त्या निवेदकाचा गोंधळ ऊडायचा. या बतम्या जरी राष्ट्रीय स्तरावरच्या असल्या तरी ते निवेदक मला आवडायचे नाहीत. त्यापैकी सलमा सुलतान नावाची निवेदिका तर अजिबातच आवडत नसे. टिपिकल देल्हिकरांचा पंजाबी ऊग्रपणा तिच्या चेहर्यावर असे. हे राष्ट्रिय प्रसारण आम्हाला अजिबात आवडत नसे. पण तरिही ते सुरवातीच्या काळात रात्री दहा साडेदहाला संपत असे. मुंबई दुरदर्शनच्या अनेक कार्यक्रमाना या वेळेमुळे आट्यापाट्या खेळाव्या लागल्या. ( हा शब्द सुहासिनीबाईंचा. ) पुढे हे राष्ट्रिय प्रसारण दोन्ही बाजुला हातपाय पसरु लागले. हमलोग हि सिरियल त्या काळातली. या कुटुंबातले बसवेसर, मा, दादी, दादाजि, बढकि, मझली, चुटकि, लल्लु, नन्हे अशी मंडळी हळु हळु लोकप्रिय होवु लागली. आठवड्यातुन तीन वेळा हा कार्यक्रम असे, त्यामुळे कथानक बर्यापैकी वेगात पुढे जात होते. पण याचा तोंडावळा टिपिकल दिल्लीचा होता. बढकीच्या मित्राचे एकमेव मराठी पात्र सोडल्यास, भारतात ईतर राज्य आहेत याची दखल नव्हती. ( दिल्लीची मग्रुरी हि पार पुरातन काळापासुनची. यमुनापार म्हणजे बाहरवाला आणि दिल्लीच्या दक्षिणेचा तो मद्रासी, असा ग्रह तिथल्या अनेक जणांचा अजुनहि आहे. ) यातला अभिनय तसा बरा होता. निदान फारसा लाऊड नव्हता. बुनियाद त्या नंतरची. अनिता कंवर आणि अलोक नाथ हे पुढे नाव काढतील असे वाटले होते, पण त्या दोघानीहि निराशा केली. या दरम्यान सोमवारी चित्रगीत नावाचा कार्यक्रम सुरु झाला. प्रादेशिक भाशांतील चित्रपटातील गाणी, असे याचे स्वरुप होते. वेगवेगळ्या भाषांतील गाणी बघायला मजा वाटायची, पण त्यातली विविधता बघुन, ती शेवटी आवळ्या भोपळ्याचीच मोट ठरली. छायागीत आठवड्यातुन दोनदा सुरु झाले. बर्यापैकी नविन गाणी दिसु लागली. याची जबाबदारी मुंबई दुरदर्शनवरच होती. रंगीत प्रक्षेपण त्यावेळी सुरु झाले. तरिहि सगळे कार्यक्रम रंगीत नसत. काहि तांत्रिक अडचणीमुळे केवळ लाईव्ह प्रक्षेपणच रंगीत करता येत असे. त्यावेळचे केविलवाणे प्रयत्न अजुन आठवताहेत. पण रंगीत प्रक्षेपण जास्त चांगल्या दर्जाचे असल्याने, काळ्या पांढर्या टिव्हीवर पण ते चांगले दिसे. तश्या रंगीत टिव्हीच्या किमती आवाक्याबाहेरच्याच होत्या. त्यावेळी टिव्हीला स्क्रीन लावाणे गरजेचे असायचे. त्याशिवाय टिव्ही बघणे सुसह्य होत नसे. हा स्क्रीन बहुदा निळ्या रंगाचा असे. तर त्यावेळी काहि असे स्क्रीन बाजारात होते, कि त्यामधेच वेगवेगळे रंग असायचे. त्यामधुन बघितल्यावर साधारण रंगीत टिव्ही बघितल्याचा भास व्हायचा. सब घोडे बारा टक्के, या न्यायाने सगळे सारखेच गोरे आणि सारख्याच कपड्यातले दिसत असत. पण हळु हळु सगळ्यांकडे रंगीत टिव्ही आले. त्याच दरम्यान बाजारात एक थ्री डी टिव्ही आला होता, तो बघण्यासाठी एक खास चष्मा लावावा लागत असे, पण तो यशस्वी झाला नाही. राष्ट्रिय प्रसारणाला हळु हळु विरोध जास्तच होवु लागला. सगळ्या देशाला पसंत पडतील असे कार्यक्रम दिल्लीहुन प्रसारित होणे शक्यच नव्हते. मग त्यावेळी मेट्रो चॅनेल सुरु झाले. आता पहिल्यांदाच प्रेक्षकाना चॉईस होता. मेट्रो चॅनेल त्या त्या दुरदर्शन केंद्राच्या ताब्यात आले. त्यापुर्वीच जाहिराती सुरु झाल्या होत्या. पण त्या जाहिराती सदा सर्वकाळ नव्हत्या. सिनेमा सुरु व्हायच्या आधीच त्या असत. शिवाय सिनेमाके ईस भागके प्रायोजक है, अशी जाहिरात आली कि सिनेमा सुरु होणार, हे सगळ्यानाच कळु लागले. त्यावेळी बायका कुकर वैगरे लावायला ऊठुन जात, व मुले जास्त लक्ष देऊन टिव्ही बघत. प्रेक्षकानीच पाठ फिरवली तर ते जाहिरातदाराना कसे रुचेल, मग सिनेमाच्या प्रत्येक अर्ध्या तासाला प्रायोजित करण्यात येऊ लागले. गाण्यान्साठी वेगवेगळे प्रायोजक मिळु लागले. आता सान्गुन खरे वाटणार नाही, पण सिनेमात जश्या स्लाईड्स असत तश्याहि जाहिराती होत्या. ( म्हणजे टिव्हीवर एकच दृश आणि कॉमेंटरी ) राश्ट्रिय प्रसारणात मालिकांचे युग सुरु झाले. खानदान ( तनुजा, रोहिणी हट्टंगडी, डॉ. ळगु, मोहन भंडरि, सुजाता मेहता, जयंत क्रिपलानी, नीना गुप्ता वैगरे होते. मतभेदामुळे सुजाताने ती मालिका मधेच सोडली व तिच्याजागी रिता भादुरी आली. ) हि पहिली सलग कथानक असलेली मालिका. करमचंद पण खुप लोकप्रिय होती. पंकज कपुर एक डिटेक्टिव्ह आणि सुश्मिता चॅटर्जी त्याची किट्टी नावाची सेक्रेटरी अशी जोडी होती. त्यातली कथानक खरोखरच पकड घेणारी होती. गाजर खात खात करमचंद नेहमी किट्टीला स्टुपीड म्हणायचा. बनते बिगडते मधुन परेश रावल पुढे आला. तर ये जो है जिंदगि मधुन सतीश शाह. यात त्याच्या जोडीला, स्वरुप संपत, शफ़ी ईनामदार, राकेश बेदी, सुलभा आर्य आणि विजय कश्यप होते. सतीश प्रत्येक भागात एक वेगळेच रुप घेऊन यायचा. हि मालिका खुपच लोकप्रिय होती. रविवारी सकाळी राज्नी नावाची मालिका होती. प्रिया तेंडुलकर त्यात होती. ती पण फार गाजली पण पुढे तिच्यात तोचतोचपणा आला. मशहुर महल हि आणखी एक छान मालिका. एका कलाकाराला बोलावुन, त्याच्या क्षेत्राशी संबंधिक प्रश्ण विचारले जात असत. त्या कलाकारांबद्दल खरोखरच अनोखी माहिती मिळत असे. ( ऊदा रोहिणी हत्तंगडीचे माहेरचे आडनाव वैगरे वैगरे ) त्यावेळी ईधर ऊधर नावाची एक मालिका रविवारि सकाळी दाखवत असत. रत्ना पाठक, सुप्रिया पाठक या दोघी भगिनी धमाल करत असत. त्यात काहि सामाजिक संदेश नाही, या कारणास्तव हि मालिका बंद पडली. पुढे ती परत चालु पण करण्यात आली होती. पण मग चालली नाही. भारत एक खोज, हि माझी अत्यन्त प्रिय मालिका. श्याम बेनेगल ने दिग्दर्शीत केली होती. पंडित नेहरुंच्या डिस्कव्हरी ऑफ़ ईंडिया या पुस्तकावर आधारित हि मालिका होती. भारताच्या महान संस्क्रुतीची यापेक्षा छान ओळख करुन देणे शक्यच नाही. शबाना आझमी, नसिरुद्दिन शहा, ओम पुरी, पल्लवी जोशी, कुलभुषण खरबंदा, ईला अरुण असे मतब्बर कलाकार होते. रामायण महाभारतापासुन टिळक सावरकरांपर्यंत अनेक कथाभाग यात सादर झाले. पल्लवीने सीता, शकुंतला, कन्नगी अश्या अनेक भुमिका केल्या. नसिरुद्दिन शहाचा शिवाजी आणि ओम पुरीचा औरंगजेब तर अविस्मरणीयच होते. या मालिकेचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे भास्कर चंदावर्करांचे CBDG संगीत. शब्द हिंदी आणि चाली मात्र प्रादेशिक अशी अवघड गोष्ट लीलया साधली होती त्यात. शाकुंतल वरच्या भागात, अजित कडकडे व फ़ैयाजची गाणी होती. मोठ्या पडद्यावरचे ईतरहि कलाकार हळुहळु टिव्हीकडे येऊ लागले. मालिकेत छोट्यामोठ्या भुमिका करु लागले. आशा पारेखने सिनेमातील नृत्यांवर आधारित मालिका केली. हेमा मालिनीने नुपुर नावाची नृत्यमय मालिका केली. तसेच तिने व गुलजारने मिळुन, तेरह पन्ने अशी तेरा ऐतिहासिक स्त्री व्यक्तिचित्रे साकार केली. श्याम बेनेगलनेच यात्रा नावाची सिरियल रेल्वेसाठी केली होती. त्यात काश्मिर ते कन्याकुमारी आणि भावनगर ते आसाम असा प्रवास घडवला होता. शाहरुख खानची सर्कस आणि फ़ौजी पण त्याच दरम्यान आल्या. नुक्कड पण अति लोकप्रिय झाली. त्यातले कलाकार रंगभुमीवरचे असले तरी तसे नावाजलेले नव्हते. या मालिकेमुळे त्याना ओळख मिळाली. त्यातले काहि अजुन त्याच छायेत वावरत आहेत तर काहि काळाच्या ओघात विमरणात गेले. दिवसाला एकच सिरियल असल्यामुळे दुसर्या दिवशी गाडीत व ऑफ़िसमधे गप्पाना तोच विषय असे. याच दरम्यान तमस सारखी अतिषय सुंदर मालिका सादर झाली. ओम पुरी, दिपा साहि, अमरिश पुरी, भीष्म सहानी अशी तगडी मंडळी होती त्यात. केवळ चारच भागात हि मालिका दाखवली गेली. मुलांसाठी ईंद्रधनुश नावाची एक मालिका सादर झाली होती. मायकल फ़ॉक्सच्या बॅक टु द फ़्युचर या सिनेमासारखा विषय होता त्याचा. थोर साहित्यकृती ईतकेच नव्हे तर प्रादेशिक लघुकथा यावर पण मालिका आल्या. अश्विनी भावे, नीलकांती पाटेकर या कलाकार अश्या मालिकातुनच पुढे आल्या. सत्यजित रे नी सुद्धा, सत्यजित रे प्रेझेन्ट्स नावाची मालिका केली होती. त्यात स्मिता पाटिलने एका भागात काम केले होते तर एका भागात चक्क एलियन्स हा विषय होता. या बहुतेक मालिका तेरा भागात संपल्या. पण त्यांच्या विषयाची विविधता आजहि थक्क करते. त्या मानाने सध्या काय दिसतय. ( असो एकदा बघायचे नाही असे ठरवल्यावर मी त्याबद्दल काहि लिहु शकणार नाही. ) पण तरिही अजुन थोडेफार लिहायचे आहेच. म्हणुन अपुर्ण...
|
| |
| Monday, April 03, 2006 - 3:43 pm: |
|
|
अगदी पहिल्यांदा रविवारी स्टार ट्रेक नावाची एक सिरियल चालु होती. तो एक पपेट शो होता. कथानक तेच, पण सगळी पात्रे पपेटच्या रुपात असत. त्या काळात ती पण अप्रुपाची होती. पुढे हिच पात्रे खर्याखुर्या रुपात आली. त्यावेळी आमच्यामधे एक जोक पोप्युलर होता. व्हाय डिड मिस्टर स्पॉक गो टु लेडिज टॉयलेट ? टु बोल्डली गो, व्हेअर नो मॅन हॅज गॉन बीफ़ोर. प्रत्येक विषयाचे एकेक दिवस असतात. ( आता सास्वा सुनांचे दिवस आहेत. ) त्याकाळी अनेक सिनेमात, सिरियल्समधे हा विषय होता. आता मात्र त्यातला चार्म निघुन गेलाय वाटतं. किंबहुना त्या परग्रहावरच्या मंडळीना दुसरी पृथ्वी सापडली असावी. त्याबरोबर सुरवातीच्या काळात टेली मॅच नावाचा एक कार्यक्रम असे. बहुदा तो जर्मनीमधुन आणलेला होता. दोन गावतल्या स्पर्धा असे त्याचे स्वरुप होते. त्यातले खेळ ईतके नाविन्यपुर्ण असत, कि प्रत्येकवेळी त्याना ईतक्या कल्पना कश्या सुचतात असे वाटायचे. त्या स्पर्धात भाग घेणारे गावकरीच असत. त्या खेळांसाठी भरपुर तयारी केलेली असे. खुप मजेशीर प्रकार होता तो. BBC च्या काहि उत्तम सिरियल्स देखील त्या काळात दाखवल्या गेल्या. डेव्हिड अटेनबरो ची लिव्हींग प्लॅनेट हि अशीच एक. अगदी सागरतळापासुन ते अवकाशापर्यंतच्या जीवसृस्टिची ओळख करुन दिली होती त्यात. या अटेनबरो साहेबांच्या अनेक मालिका त्यावेळी दाखवण्यात आल्या. आजहि त्या संग्रहि ठेवाव्यात अश्याच आहेत. या माणसाचा अभ्यास थक्क करणारा होता. प्रत्यक्ष जागी जाऊन केलेले चित्रण आणि तिथेच रेकॉर्ड केलेले निवेदन, यामुळे कार्यक्रमाची लज्जत वाढत असे. शिवाय अनेक प्राण्यांच्या तो अगदी समीप जात असे. त्यावेळी सर्फ या साबणाला, आणखी स्वस्त साबण पावडरींपासुन स्पर्धा निर्माण झाली होती. सर्फला या स्पर्धेत टिकणे अवघड होते, म्हणुन सर्फकि खरिदारीमेहि समझदारी है, असा संदेश देणारी एक जहिरात आली होती. त्यात कविता चौधरी नावाची एक कलाकार होती. तिनेच पुढे ऊडान नावाची एक मालिका केली. आजहि हि मालिका लक्षात आहे. उत्तरा बावकर, या सिरियलमधे पहिल्यांदा दिसली. जरी दोन चॅनेल्स असले तरी त्याचे प्रक्षेपण ग्रामीण भागात नीट दिसत नसे. मुंबई दुरदर्शन केंद्राने पुणे, पणजी येथे सहक्षेपण केंद्रे स्थापन केली त्यामुळे थोडीफार सुधारणा झाली खरी. आता जसे पैश्याला पासरी पुरस्कार सोहळे असतात, तसा एक खुप पुर्वी आणीबाणी असताना झाला होता. संजय गांधीने नसबंदीच्या प्रचारार्थ !!! तो आयोजित केला होता. लता पासुन सगळ्यानी त्यात हजेरी लावली होती. अमिताभ राखीचा हात धरुन आला होता. ( रेखा प्रकरण सुरु झाले नव्हते बहुदा ) या कार्यक्रमात किशोरकुमारने भाग घ्यायला नकार दिला होता, त्यामुळे दुरदर्शनची त्याच्यावर अघोषित बंदी होती. सिनेमातली त्याची गाणी दाखवणेहि बंद झाले होते. हा कार्यक्रम प्लस प्रीन नावाच्या एका डोकेदुखीच्या निर्मात्याने स्पॉन्सर केला होता, आता त्या गोळीचे कुठे नावहि ऐकायला मिळत नाही. ग्रामीण भागात त्यावेळी अनेकांकडे टिव्ही होते, ( त्यावेळी टिव्हीसाठी एरियल अत्यावश्यक होती. घरावर अशी एरियल दिसली, कि या घरात टिव्ही आहे, असे ओळखता येत असे. ) पण त्यावर काहि दिसतच नसे. मग लोकानी व्हिडिओ थिएअटर्स सुरु केली. चांगली लांब रुंद अशी ती कॅसेट. आता लायब्ररित मिळु लागली. ग्रामीण भागात ज्यांची माजघरे मोठी होती त्यानी याचा फायदा घेतला. मुंबईतपण ठिकठिकाणी व्हिडीओ लायब्ररीज सुरु झाल्या. कॅसेट बरोबर, व्हिडिओ पण भाड्याने मिळु लागला. कॅसेटचे भाडे दहा रुपये असायचे. शनिवार रविवारचा अनेक घरात व्हिडिओवर सिनेमे बघणे हा एक कार्यक्रमच होता. पायरेटेड कॅसेट्सचा सुळसुळाट होता. कॅमेरा प्रिंट हा एक अजब प्रकार होता. एखाद्या थिएटरमधे जाऊन व्हिडिओने चित्रीकरण केले जात असे, व त्यावरुन कॅसेट काढल्या जात असत. सिनेमा रिलीज झाल्याबरोबर या कॅसेट लायब्ररीत येत. यांचा दर्जा अतिषय बेकार असे. दुरदर्शनवर जुनेच सिनेमे दाखवत असत, आणि नुकत्याच रिलीज झालेल्या सिनेमाच्या कॅसेट ऊपलब्ध असत. ज्या ऑफ़िशियल कॅसेट निघत असत, त्यातहि जाहिरातींचा भडिमार असे. अगदी सिनेमा चालु असतानादेखील, अर्धा स्क्रीनभर जाहिराती चालुच असत. मग पुढे पुढे निर्मातेच या क्षेत्रात ऊतरले, व स्वताच कॅसेट निर्माण करु लागले. त्यातहि जाहिराती असायच्याच, पण कॅसेटचा दर्जा जरा बरा असायचा. या व्हिडिओचे प्लेयरमधल्या हेडशी घर्षण होत असल्याने, त्या लवकर खराब व्हायच्या. आडवा पाऊस पडल्यासारखी दृष्ये दिसु लागत. एकंदर या कॅसेट्सचे आयुष्य फार मर्यादित होते. त्याकाळी व्हिडिओ शुटिंग फार लोकप्रिय होते. लग्नाची कॅसेट काढणे अत्यावश्यक मानले जात असे. मग येणार्या जाणार्या पाहुण्याना ती दाखवली जात असे. ( हम आपके है कौन, तर म्हणे अशी कॅसेटच होती, मग पुढे कथानक जरा वाढवले ईतकेच. ) गुजराथी सिंधि घरात तर या कॅसेटचा अखंड राबता असायचा, मला तर या बघायला ज्याम वैताग यायचा. पण तरिही चतरन सारखा एखादा सिनेमा, व्हिडीओ मुळेच बघितला. ( हा एक मुळ जपानी सिनेमा होता. एक कुत्रा आणि एक मांजर यांची कथा होती. गुलजारने त्याचे हिंदी संवाद लिहिले होते. आशाने एक गाणे पण गायले होते त्यात. ) पण त्या काळात मी परदेशी असल्याने, कॅसेटचा दर्जा जरा बरा असायचा ईतकेच. त्यावेळी मस्कतमधे थोडीफार सेन्सॉरशीप होती. बॅगेत अगदी लग्नाची जरी कॅसेट असली तर ती एअरपोर्ट वर ठेवावी लागे व दुसर्या दिवशी मिळे. त्याना सौदीप्रमाणे आपल्या देवादिकांचे वावडे होते असे नाही, पण कमी कपड्यातील दृष्ये कापली जात असत. हे मी १५ वर्षांपुर्वीचे लिहिलेय. आता सगळ्याचेच मापदंड बदलले आहेत. आपल्या हिंदी सिनेमाच्या कॅसेट्स त्यावेळी पाकिस्तानातपण खुप लोकप्रिय होत्या, असे माझे पाकिस्तानी मित्र मला सांगत असत. मला आठवतय, त्यावेळी आमची सिरियल्स मधली ईनव्हॉल्व्हमेंट ईतकी होती, कि मी परदेशी गेल्यावर, घरी पत्र पाठवुन या सिरियलचे काय झाले, त्या सिरियलचे काय झाले असे विचारत असे. त्याच दरम्यान भारतात ओपन स्काय पॉलिसी आली. स्टार, झी हे चॅनेल्स त्या दरम्यान आले. डिस्कव्हरी आधी सुरु झाला. मग नॅशनल जिओग्राफिक मन आॅनिमल प्लॅनेट वैगरे. झी मराठी नंतर सुरु झाला. दुरदर्शनचेहि मग संह्याद्री असे बारसे झाले. आणि मग ऊबग आणणार्या कार्यक्रमांचा सिलसिला सुरु झाला. मी त्यावेळी केनयात होतो. त्यांचे कार्यक्रम बघण्यात मला अजिबात रस नव्हता. मी तिथे असताना, आठवड्याला एक या हिशेबाने थिएटरला सिनेमे बघितले. खलनायक, मै खिलाडी तु अनाडी असे सिनेमे तर एकापेक्षा जास्त वेळा बघितले. जुहिचा डर तर मी लागोपाठे तीन वेळा बघितला. ( शनिवारी सहाचा, मग नऊचा आणि रविवारी बाराचा असा तीन वेळा ) हम आपके है कौन पण तिथेच बघितला. त्यामुळे टिव्ही बघायची सवयच सुटली. केनयातला निसर्ग एवढा सुंदर आहे, कि टिव्ही समोर बसण्यापेक्षा, मला गावातुन फेरफटका मारणे खुप आवडत असे. त्यानंतर मी नायजेरियाला गेलो. तिथली सुरक्षितता एवढी भन्नाट कि संध्याकाळी सहा नंतर आम्हाला घराबाहेर पडायला बंदी होती. अगदी जायचे झाले तर बंदुकधारी गार्ड घेऊन जावे लागे. त्यावेळी तिथले एम नेट हाच आमचा विरंगुळा होता. तर या एम नेट बद्दल पुढच्या वेळी. अपुर्ण
|
| |
| Wednesday, April 05, 2006 - 3:31 pm: |
|
|
आफ़्रिका म्हणजे जंगल आणि जंगली लोक, असे समीकरण आपल्या डोक्यात लहानपणापासुन बसलेले आहे. पण आपण कल्पना करतो, त्यापेक्षा आफ़्रिका फ़ारच वेगळे आहे. ( पुढे मागे सविस्तर लिहिनच, सध्या फ़क्त या विषयाला धरुन लिहितो. ) आपण आफ़्रिका एक खंड असाच विचार करतो. यात अनेक देश आहेत, हे आपल्या लक्षातच येत नाही. तीन प्रचंड मोठी वाळवंटे, लेक व्हिक्टोरिया सारखी अनेक मोठी सरोवरे, व्हिक्टोरिया फ़ॉल्स सारखे धबधबे, घनदाट जंगल, लांबलचक नद्या, अदिस अबाबा, नैरोबी सारखी थंड हवेची ठिकाणे, माऊंट किलिमांजारो, माऊंट केनया सारखे बर्फाच्छादित पर्वत, वन्यप्राणी, ईजिप्त ची संस्कृती, लिबियाची प्रगती, वांशिक दंगली, जादुटोणा, भुकबळी, कॅनिबल्स, हिर्या सोन्याच्या खाणी, पेट्रोलियम काय नाही ईथे. जशी पराकोटीची गरिबी तशीच पराकोटीची श्रीमंतीदेखील. पण मग करमणुकीचे काय. बाहेरुन येणार्या गोर्याना ईथल्या गेम पार्क्स चे कौतुक, स्थानिकाना त्याचे काय ? लोकगीते नृत्ये नाहीत असे नाहीत, पण तो त्यांच्या जीवनपद्धतीचा भाग, आहे. करमणुकीचा खासच नाही. दक्षिण आफ़्रिका आणि ईजिप्त सोडल्यास, फारशी चित्रपट निर्मिती नाही. ( साराफ़िना, आणि ईपी टोंबी हे दक्षिण आफ़्रिकेचे सिनेमे छान होते, पण त्या नंतर काहि वाचले नाही मी. ) . भाषेत पण तितकीच विविधता. आपण जरी स्वाहिली हि त्यांची भाषा समजत असलो तरी, ती फक्त केनया, युगांडा आणि टांझानिया मधेच बोलली जाते. दक्षिण आफ़्रिकेची आफ़्रिकाना फक्त त्या देशापुरती. बाकि प्रत्येक देशाची भाषा वेगळी. अरेबिक बहुतेक देशात बोलली जाते, पण तीहि कॉमन भाषा नाही. अल्जीरिया, ट्युनिशिया, ईजिप्त, सुदान मधे ती जास्त बोलली जाते. यापैकी पुर्वेकडचे बहुतांशी देश ईंग्रजांच्या ताब्यात असल्याने तिथे ईंग्लिश हि व्यवहाराची भाषा तर पश्चिमेकडे फ़्रेंचचा प्रभाव. अशी विविधता असलेल्या खंडात सगळ्याना पसंत पटेल असे टिव्ही नेटवर्क असणे, हि खरीच कौतुकाची गोष्ट होती. दक्षिण आफ़्रोकेतुन हे चालवले जात असे. त्याचे नाव एम नेट. हे एक पेड नेटवर्क होते. त्यासाठी वेगळी डिश आॅन्टेना लागायची, तसेच घरी एक रिसिव्हर ठेवावा लागे, व त्यातहि एक स्मार्ट कार्ड घालावे लागे. एकदा सब्स्क्राईब केल्यावर, एकापेक्षा जास्त कनेक्शन्स घेता येत असत. यात दाखवले जाणारे कार्यक्रम, हे आफ़्रिकेत निर्माण केलेले नसत. त्यामुळे जगभरच्या कार्यक्रमांची ओळख झाली. या नेटवर्कचे एक मासिक आम्हाला आधीच मिळत असे. त्यात त्या नेटवर्कचा महिनाभराचा कार्यक्रम दिलेला असे. ९९ टक्के कार्यक्रम त्या वेळापत्रकानुसारच असत. शिवाय त्याचा एक वेगळा रिमोट असे. त्यावरचे I बटन एकदा दाबले कि सध्या चालु असलेल्या कार्यक्रमाचे नाव, तो कधी सुरु झाला आणि कधी संपणार हे कळत असे. आणखी एकदा तेच बटण दाबले तर त्या कार्यक्रमाबद्दल आणखी डिटेल्स म्हणजे, त्याचे थोडक्यात कथानक कळत असे. हिच माहिती त्यापुढच्या कार्यक्रमाबद्दलहि आम्हाला स्क्रीनवरच मिळत असे. फ़्रान्सचे कॅनल प्लस आणि कॅनल हॉरिझॉन हे दोन चॅनेल्स असत. दोन्हीवरती बरेच छान कार्यक्रम असत. अनेक उत्तम फ़्रेंच सिनेमे त्या काळात बघितले. काहि मजेदार बाबी म्हणजे, ब्रुस विलिसचा फ़िफ़्थ एलीमेंट हा सिनेमा मुळ फ़्रेंच होता. बहुतेक सिनेमात सबटायटल्स असतच. नसली तरी फार अडत नसे. त्यांचे काहि एम टिव्ही टाईप गाण्यांचे कार्यक्रम असत. त्यात कधी कधी साडी नेसलेल्या बायका पण असत. लता मंगेशकर, गांधीजी यांच्यावर पण छान कार्यक्रम झाले होते. आमची माती आमची मानसं, टाईप कार्यक्रमात, बहुदा द्राक्षबागाच दाखवत. फ़्रेंच लोकाना नग्नतेचे वावडे नसल्याने, तिथे अगदी लहान मुलांच्या कार्यक्रमात देखील, तसली दृष्ये असत. याबाबतीत माझी एका ब्रिटिश माणसाशी चर्चा झाली होती, त्याने सांगितलेला मुद्दा जरा विचार करण्यासारखा आहे. तो म्हणाला होता, यरोपात ऊन्हाळ्यात जवळ जवळ दिवसभर सुर्यप्रकाश असतो, मग आम्ही ” ते ” करायला अंधाराची वाट कशी बघायची ? त्यांच्या एम्टिव्ही बकरा टाईप कार्यक्रमात पण असाच प्रकार असायचा. त्यातल्या स्पर्धा तर अजबच असत. ( ऊदा. अनावृत्त पार्श्वभागात १०० फ़्रॅंकची नोट पाक्डुन, जास्तीत जास्त लांब पळणे वैगरे. ) त्यांचा युरो न्युज मात्र मला खुप आवडायचा. युरो चलनाचे सुरवातीचे दिवस होते ते. त्यामुळे फ़्रेंच लोकांचा विरोध, युरोचे फायदे असे विषय रोजच असायचे. हा कार्यक्रम एकाच वेळी सर्व युरोपीय भाषात प्रक्षेपित व्हाय्चा. त्यात निवेदक नसायचे. त्या त्या देशातील भाषेतले निवेदन असायचे. पण ते फक्त ऐकु यायचे, दृष्ये तीच असायची. या अश्या व्यवस्थेमुळे, प्रत्येक बातमीच नव्हे, तर बातमीतील प्रत्येक विधान, दृष्य रुपात दाखवत असत. व्हीडिओज, फ़ाईल फोटोज, आॅनिमेशन, चार्ट सगळेच प्रकार वापरत असत. पण तरिही स्क्रीनवर जंजाळ नसे. एकावेळी एकच दृष्य नेमकेपणी दिसत असे. बातम्या शक्यतो एउरपमधल्याच असत. आफ़्रिकेतल्याहि फारश्या नसत. आशियातल्या आणि अमेरिकेतल्या तर अगदीच मोजक्या असत. पण ” थोडक्यात बोला ” हा शब्दप्रयोग वा संकल्पनाच फ़्रेंच भाषेत नसल्याने, सर्वच कार्यक्रम फ़ार शब्दबंबाळ असत. BBC न्युज बरोबर BBC प्राईम नावाचा चॅनेल दिसत असे. हा माझा अत्यंत आवडता चॅनेल होता. कुकिंग आणि बागकाम यावर फार सुंदर कार्यक्रम सादर होत असत. मृदुला बाळजेकर, दावत नावाने भारतीय पदार्थांचा कार्यक्रम करत असे. ईतरहि छान कार्यक्रम असत. मान्यवर शेफस च्या अनोख्या स्पर्धा असत. दोघानाहि सारखेच घटक पदार्थ देऊन, त्याना त्यातुनच काहितरी बनवावे लागे. कधी कधी काहि सेलिब्रिटीज ना आवडते घटक पदार्थ आणायला लावुन, त्यातुन काहि पदार्थ करायला लावत. कधी कधी दहा पाऊन्डाचे घटक पदार्थ आणुन त्याचे प्रकार केले जात. त्या चॅनेलवरचे ट्रॅव्हल शो तर फारच सुंदर असत. यात युके बरोबर यरपमधल्या ईतर देशांचे तर दर्शन घडत असेच शिवाय, आफ़्रिका व आशियाचेहि छान दर्शन होत असे. संपुर्ण युकेच्या किनारपट्टीचे हेलिकॉप्टरमधुन केलेले चित्रणहि यावेळी बघायला मिळाले. स्पोर्ट्स साठी खास चॅनेल्स होते. क्रिकेट खेळणारे काहि देश आफ़्रिकेत असले तरी, फ़ुटबॉल हा तिथला सर्वाधिक लोकप्रिय असणारा खेळ. त्या स्पर्धांच्या दिवसात, सगळे वातावरण फ़ुटबॉलमय झालेले मी पाहिले आहे. तुर द फ़्रान्स या सायकलस्पर्धेच्या वेळी, तर ती पुर्ण स्पर्धा लाईव्ह दाखवर असत. काहि अरेबिक चॅनेल्स पण होते. त्यावर ईजिप्शियन सिनेमे आणि गाण्यांचे कार्यक्रम असत. अरेबिक संगीत हे बरेचसे आपल्या संगीताच्या जवळपास असणारे. भावनेने होणारे गायन, हा एक समान धागा. शिवाय या गाण्यांचे चित्रीकरणहि खास असे. यातले सेट्स, वेशभुषा तर खुपच देखणी असे. नृत्येहि छान असत. आता हि कदाचित माझी वैयक्तिक आवड असेल, पण हि नृत्ये लालित्यपुर्ण असत, पण त्यात जराहि उत्तानपणा नसे. मुख्य गायक वा गायिका हे केवळ गात असत, नृत्यासाठी ईतर कलाकार असत. एक चिनी चॅनेल पण दिसत असे. चिन तेंव्हा नुकताच जगासाठी दरवाजे किलकिले करत होता. हा त्यांचा स्थानिक चॅनेल होता, आणि बहुदा प्रायोगिक तत्वावर दाखवला जात होता. त्यावरहि संगीत आणि नृत्याचे नयनरम्य कार्यक्रम असायचे. त्या वरच्या जाहिराती पण मजेशीर असत. चिनमधे पांढर्या शेवंतीचा चहा, किंवा मोगरा जाई जुई ईत्यादी फुलांचा चहा पितात, तर या फुलांच्या जाहिराती असत. संत्री, सफरचंद आदी फळांच्या पण जाहिराती असत. ( म्हणजे मौजे पळवेवाडी खुर्द येथील भिकशेट भोसले यांच्या मळ्यातील टपोर्या ज्वारीच्या भाकर्या खा, आणि ऑलिंपीक स्पर्धा जिंका, असा प्रकार. ) या नेटवर्कवरचे सर्वात मोठे आकर्षण होते ते यावरिल सिनेमे. कुठलिही काटछाट न करता, संपुर्ण सिनेमा दाखवत असत. या सर्व नेटवर्कलाच एज लॉक बसवायची सोय होती. एखादा सिनेमा १२ वर्षांखालील मुलांसाठी नाही, वा १४ वर्षांखालील मुलासाठी नाही, ते स्पष्ट केलेले असे. तो सिनेमा थ्रिलर आहे, कॉमेडी आहे, ड्रामा आहे, हेहि दाखवत असत. तसेच त्यावरील निर्बंध हे हिंसाचार, संवाद का लैंगिक दृष्ये यांच्यामुळे आहेत तेहि दाखवत असत. तसेच या दृष्यांची ईंटेन्सिटी व फ़्रीक्वेन्सी पण दाखवलेली असे. हि सगळी माहिती सिनेमा सुरु व्हायच्या आधीच दाखवत असत. त्यामुळे सिनेमा बघायचा का नाही, ते आधीच ठरवता येत असे. प्रत्येक महिन्याचा म्हणुन एखादा कलाकार असे. ( ऊदा जिम कॅरी, सॅंड्रा बुलक वैगरे ) मग त्यांचे खास सिनेमे दाखवत. आफ़्रिकेतील टाईम झोन लक्षात घेता, प्रत्येक सिनेमा, प्रत्येकाला बघता यावा, अश्या तर्हेने वेगवेगळ्या वेळी, दाखवत असत. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे, यात कुठलाहि कमर्शियल ब्रेक नसे. सिनेमा संपुर्णपणे सलग दाखवत. लॉरेन्स ऑफ़ अरेबिया, सारखा प्रदिर्घ सिनेमाहि याला अपवाद नव्हता. अनेक दर्जेदार सिनेमे या काळात मला बघता आले. त्यामानाने आपल्याकडचे चॅनेल्स काय ऊजेड पाडताहेत ? त्यावर थोडाफार प्रकाश पुढच्या लेखात. अपुर्ण...
|
| |
| Friday, April 07, 2006 - 5:01 pm: |
|
|
मध्यंतरी बराच काळ मी देशाबाहेर होतो, त्यामुळी ईथल्या टिव्हीवर काय चाललय याची दखलच मला नव्हती. परत ईथे आल्यावर मात्र पहिले काहि दिवस ऊत्शाहाने टिव्ही बघितला, पण त्यात अजिबात मन रमले नाही. तु तु मै मै, मला आवडलेली मालिका. सचिनवर झालेले संस्कार त्यात दिसत होतेच शिवाय रिमा आणि सुप्रिया यांचे ट्युनिंगहि फार छान जमले होते. कुलदीप पवार आणि महेश ठाकुरला पण चांगला वाव मिळाला. बरिच वर्षे हि मालिका आपला टवटवीतपणा टिकवुन होती, पण मग पुढे तिच्यात तोचतोचपणा येऊ लागला. टिव्हीला हिंदी फ़िल्म ईंडष्ट्रीच्या कुबड्यांशिवाय जगणं अशक्य आहे. दुरदर्शनने काहि स्वताच्या टेलीफ़िल्म्स काढल्याहि, त्या चांगल्याहि होत्या, पण तो ऊत्साह टिकला नाही. मराठी नाटक वाडा चिरेबंदी, वर हवेली बुलंद थी हि फ़िल्म आली होती. हमिदाबाईकी कोठी पण सादर झाले होते. दोन्हींचे दिग्दर्शन विजया मेहताने केले होते. बहिणाबाई हा पण एक छान लघुपट होता. भक्ती बर्वेचा अभिनय व उत्तरा केळकरचे गायन जमुन आले होते. दुरदर्शनने बाहेरच्या दिग्दर्श्कांकडुनहि चांगली कामे करुन घेतली होती. हि फ़िल्म कुणाला आठवत असेल का जरा शंकाच आहे, पण महेश भटने पण दुरदर्शनसाठी, स्वयम नावाची एक फ़िल्म केली होती. ( त्यावेळी तो चेकाळला नव्हता ) त्यात वहिदा रेहमानची भुमिका होती. प्रौढ वयात केलेला विवाह असा विषय होता त्याचा. आणि त्याकाळची परिस्थिती बघता, हा विषय रेग्युलर हिंदी सिनेमात आला नसता. मालिकातहि काहि दर्जेदार प्रयोग झाले. मिर्झा गालिब वर गुलजारने सिरियल केली. त्यात नासिरुद्दिन शहा, तन्वी आझमी आणि नीना गुप्ता होते. त्यातल्या गझला जगजित सिंगने गायल्या होत्या. आखरी मोगल म्हणुन बहादुर शाह जफ़रच्या जीवनावर मालिका होती, त्यात अशोक कुमारने भुमिका केली होती. कच्ची धुप च्या आधी, अमोल पालेकरने नकाब नावाची मालिका केली होती. त्यात अनिल चॅतर्जी व सरिता जोशी होते. विजया मेहतानी लाईफ़ लाईन नावाची मालिका केली होती, त्यात मराठी नाट्यक्षेत्रातले रथि महारथी होते. बाईनी हॉस्पिटल आणि ते विश्व ईतक्या नेमकेपणाने मांडले होते ना कि त्या कलाकारांच्या नावलौकिकाला नजरे आड करावे लागत होते. बेंजामिन गिलानी, बाते फ़िल्मो.म्की नावाची मालिका सादर करत असे, त्यात सिनेमाच्या तांत्रिक बाजुंची ओळख करुन दिली जात होती. दुरदर्शनने स्वता, माहाराष्ट्र कि लोकधारा नावाची मालिका केली होती. आपल्या राज्यातील अनोखी लोकगीत परंपरा त्यात बघायला मिळाली होती. चारुशीला साबळे चे नृत्यदिग्दर्शन होते. आठशे खिडक्या नऊशे दारं, कुन्या वाटेनं गेली हि नार हे गाणे त्यातलेच. प्रदीप पटवर्धन भन्नाट नाचला होता त्यात. मच्छींद्र कांबळींचे पुढे गाजलेले वस्त्रहरण संक्षिप्त रुपात, आधी दुरदर्शनवरच सादर झाले होते. शास्त्रीय संगीताचेहि अनेक सुंदर कार्यक्रम असत. आकाशवाणी प्रमाणे दुरदर्शनवरहि संगीताचा राष्ट्रीय कार्यक्रम असे. शिवाय दृक श्राव्य माध्यम असल्याने, शास्त्रीय नृत्याचे पण छान कार्यक्रम असत. ईरावती हर्षे आणि महेश ठाकुर, राग रंग नावाचा एक छान कार्यक्रम करत असत. अल्फा वर सकाळी आलाप हा हि छान कार्यक्रम असे. हे दोन्ही आता बंद पडलेत. सिद्दार्थ काक आणि रेणुका शहाणे यांचा सुरभी पहिल्यांदा खुप घरगुति आणि साधासुधा, तरिहि अनोखा आणि महितीपुर्ण होता. पुढे त्यात स्पर्धा आली आणि दर्जा घसरला. नाट्यसंगीताचे छान कार्यक्रम असत. त्याकाळी मागे पडलेल्या ज्योत्स्ना भोळे, माणिक वर्मा, गजानन वाटवे ईत्यादी अनेक गायकाना दुरदर्शनने पुढे आणले होते. पंडीत जितेंद्र अभिषेकींच्या नाटकांवर आधारीत, मत्स्यगंधा ते महानंदा, हा कार्यक्रमहि दुरदर्शननेच सादर केला होता. अनेक जुनी नाटके, खास करुन संगीत नाटके दुरदर्शनने सादर केली. दिल्लीवरुन अनेक उत्तमोत्तम नाटके सादर होत असत. दिनेश ठाकुर, के के रैना आदि मंडळींची ओळख त्यामुळेच झाली. आजचा चॅनेल्स चा भडिमार, माझी यापैकी कुठलीच आठवण पुसु शकलेला नाही. हा माझ्या वयाचा वा वैयक्तिक आवडीनिवडीचा भाग असेल, पण तरिही मला न पटणार्या बाबींची नोंद करतोच. मला अत्यंत तिटकारा आणणारा प्रकार म्हणजे रिमिक्स गाणी. या प्रकाराची सुरवात कुठुन झाली, असा विचार करता काहि जुने संदर्भ आठवले. गुड्डी सिनेमात, वसंत देसाईनी मधुमति मधले लताचे आजा रे परदेसी, गाणे जया भादुरीसाठी वापरले होते. मुळ सिनेमा श्वेतश्याम होता तरिहि त्यातला निसर्ग हा एक महत्वाचा घटक होता. गुड्डीमधे ते गाणे, दिवाणखान्यात आलेय. जया राणी कलरची साडी नेसलीय, व गाणे ऊभ्याऊभ्याच म्हणते. वैजयंतीचे नृत्यकौशल्य तिच्याकडे नव्हतेच. तरिही प्रेक्षकानी हा प्रकार सहन केला, कारण गुड्डीमधली ईतर गाणी गायलेल्या वाणी जयरामच्या आवाजापेक्षा लताचा आवाज ऐकणे कधीही सुखावह होते, शिवाय ते गाणे वसंत देसाईनी, वाणी जयरामला गायला लावले नाही, हेहि सुदैवच. आणि अजुनहि हे गाणे मधुमतिचे म्हणुन ओळखले जाते, गुड्डीचे म्हणुन नाही. त्या सिनेमातील नायिकेचे फ़िल्मी दुनियेबद्दलचे आकर्षण व त्या काळात सगळ्याच ऊपवर मुलींचे हे आवडते गाणे असल्याने, फारसे खटकतहि नव्हते. कयामत नावाच्या एका सिनेमात, जयप्रदाने, गाईडमधल्या काटोंसे खीचके ये आंचल, वर नाच केला होता. वहिदा आणि जयाप्रदा, दोघीहि उत्तम नर्तिका असल्याने, तो प्रकारहि खटकला नव्हता. मग दुरदर्शनने, नया अंदाज नावाचा एक कार्यक्रम केला. जुनी गाणी त्यावेळच्या लोकप्रिय कलाकारानी सादर केली होती. नृत्य दिग्दर्शक कमल मास्टर ने हि गाणी दिग्दर्शीत केली होती. कमल हसनने, जब जब फुल खिले मधल्या अब्बु खुदा सादर केले. रेखाने, पाकिजा मधले ईन्ही लोगोने सादर केले, अमिताभ व किमी काटकरने, अलबेला मधले, भोली सुरत सादर केले. हा कार्यक्रम खुप लोकप्रिय झाला. मला वाटते आणखीही अशी गाणी सादर झाली. ( याला उत्तर म्हणुन पुराना अंदाज असा पण एक कार्यक्रम झाला, त्यात अशोक कुमार, शशिकला, ललिता पवार वैगरेनी नवी गाणी सादर केली. ) या सर्व प्रकारात मुळ गाण्याना कुठेहि धक्का लावलेला नव्हता. आणि बच्चन साहेबांमुळे सिनेसंगीतातली मेलडी हरवलीच होती. त्या काळात हि जुनी गाणी अशी सादर झालेली सगळ्यानाच आवडली होती. ईंग्लिश गाण्यांच्या चालींवर आधारित हिंदी गाणी तेंव्हाहि होती. ओ मार्गारिटा वर, रफ़ीचे ओ प्रिया होते. हे तर जुने ऊदाहरण, त्यावेळीहि वन वे टिकीट टु द मुन, वर ऊषा उत्थपने, हरि ओम हरि म्हंटले होते. डॅदि कुल डॅडि कुल वर महेंद्र कपुरने, तेरे है तेरे है सादर केले होते. पॉप गाण्यात बाबा सेहगल वैगरे मंडळी होती. ठंडा ठंडा पानी वैगरे त्यावेळीहि गाजले होते. पण मग मात्र जुन्या गाण्यांचा चक्क खुनच व्हायला लागला. काटा लगाने सुरवात झाली. मुळ समाधि सिनेमात हे गाणे आशा पारेखने सादर केलेय. त्या सिनेमात धर्मेंद्र आणि जया भादुरिहि होते. शिवाय आशाचे, जब तक रहे तनमे जिया, हे गाणे जास्त चांगले होते. त्यावर त्या बाईने जो काय धुडगुस घातला तो घातलाच. ( हि बया कुठल्या निकषावर सुंदर दिसते तेच मला कळत नाही, मेडिकल पुस्तकातल्या मंगोल चाईल्डची बरिचशी लक्षणे, मला तिच्या चर्यावर दिसतात. ) त्या निरुपद्रवी गाण्याला नको तो अर्थ चिकटवला गेला. आणि मग हा भस्मासुर हाताबाहेरच गेला. कुठले गाणे घेतील, ते कसे म्हणतील आणि त्यावर काय दाखवतील, याला काहि घरबंधच राहिला नाही. पुर्वी एम टिव्ही म्हणजे जरा अप्रुप होते. ( आठवा ताल, मधे ऐश, एम टिव्ही साठी किती हरखते ती. ) पण अशी गाणी सादर व्हायला लागल्यापासुन, मी तो चॅनेल बघणेच बंद करुन टाकले. सायरस चा बकरा वैगरे मला आवडायचा, पण फक्त त्यासाठी तो चॅनेल बघणे म्हणजे जरा अतिच. ज्युलिया रॉबर्ट्स चा एक सिनेमा मी बघितला होता. एकंदर फ़ॅशन शो वरच होता तो सिनेमा. त्यात शेवटी एक फ़ॅशन शो दाखवलाय, सगळ्याच मॉडेल्स त्यात नैसर्गिक अवस्थेत रॅंप वॉक करतात. त्यात एक नववधु आणि एक गरोदर मॉडेल पण होती. हि पातळी अजुनतरी फ़ॅशन टिव्ही वा ट्रेन्ड ने गाठलेली नाही. ( लॅक्मे शो मधे झालेले वस्त्रहरण हे पुर्वनियोजित होते का, यावर अजुन गदारोळ चाललाय. ) या शोज ना ईतके अवास्तव महत्व का आलेय हल्ली, हे माझ्या आकलनशक्तीच्या पलिकडचे आहे. मॉडेल्सच्या निवडीसाठी सडपातळ आणि ऊंच याशिवाय आणखी कुठला निकष असेल असे वाटत नाही. आधीच चेहरा भकास, त्यात बद्धकोष्थ झाल्यासारखे भाव आणि मुळव्याध ऊपटल्यासारखी चाल. ईथुन तिथे आणि तिथुन ईथे चालायचे. त्यात कशी काय ग्रेस बीस दिसते या लोकाना ? आणि ते कपडे !!! कपडे हे परिधान करण्यासाठी असतात, किंवा ती मानवाची मुलभुत गरज आहे, हेच विसरलेले असते बहुदा. किती वेळ, किती पैसा या असल्या गोश्टींवर ऊधळला जातो ? आहे कुणाला काळजी ? तश्याच त्या जाहिराती. पुर्वी त्यांचा एक ठराविक वेळ असायचा. आता त्याला काहि घरबंधच राहिलेला नाही. शिवाय अमुक एखादा प्रोग्रॅम अमुक वेळी आहे, अशी जाहिरात करताना पण त्याच्या प्रायोजकांची जाहिरात केली जाते. ज्या जाहिराती दाखवल्या जातात त्यांचे चित्रीकरण व दर्जा बर्यापैकी असला, तरी त्या कितीवेळा दाखवल्या जातात, हे बघितलेत का पेप्सी व कोकाच्या जाहिराती कितीवेळा दाखवतात. त्यांच्या निर्मितीवर व प्रक्षेपणावर नेमका किती खर्च होतो. ( कोका कोलाच्या जाहिरातीत काम करण्यासाठी, एका अधिकारी व्यक्तीने, सुश्मिता सेन कडे एका रात्रीचा सहवास मागितला होता, तिने भारतीय नट्या म्हणजे वाटले काय तुम्हाला, नको ती जाहिरात, असे, कुणाहि भारतीयाला अभिमान वाटेल, असे उत्तर दिले होते. ) हि पेये कितपत आवश्यक आहेत ? जे कोणी हि पेये पितात, त्यांचे निर्णय या जाहिरातींवर ठरतात का ? मग या जाहिराती नेमक्या कुणासाठी असतात. ? कुठलाहि विक्रेता, आपला सगळा खर्च ग्राहकाकडुन वसुल करतो, हे बाजाराचे साधेसुधे तत्व आहे. या हिशेबाने, तुम्ही या पेयांसाठी जी किम्मत मोजता, त्यात हा जाहिरातींवरील खर्च अंतर्भुत असतोच. आणि जर हा नसता तर या पेयांची किम्मत किती असती आणि हा खर्च टाळता आला असता, तर तितक्याच पैश्यात काय काय करता आले असते, याचा विचार कोण करणार ? या जाहिरातीत कधीकधी चुकीचे संदर्भ पण दडपुन दिलेले असतात. ऊदा. ICICI बॅंकेची नो चिंता ओन्ली मनी अशी कॅप्शन असलेली जाहिरात होती. त्या मंडळीना चिंतामणि या शब्दाचा अर्थ माहित असेल ? पुर्वी सरोगेट जाहिरातींवर बंदी होती. ( सरोगेट म्हणजे, वेगळ्या आवरणाखाली दारु, सिगरेट वैगरेच्या जाहिराती. ) आता तर त्या सर्रास दिसतात. मुळात ज्या ऊत्पादनाच्या, सेवेच्या जाहिराती दाखवल्या जातात, त्यापैकी किती आवश्यक असतात ? नेमका काय संदेश जातो त्यामधुन ? संध्याकाळ भर खपुन एखादा पदार्थ करणारी आई, दोन मिनिटात नुडल्स शिजवुन देणार्या आईपेक्षा कशी ग्रेट ठरते ? बोलावे तितके कमीच या बाबतीत. नॅशनल गिओग्राफिख़ आणि डिस्कव्हरी हे माझे आवडीचे चॅनेल्स होते, पण त्यावर देखील आता जाहिरातींचा भडीमार असतो. बाहेरच्या मिळाल्या नाहीत, तर स्वताच्याच कार्यक्रमांची जाहिरात केली जाते. शिवाय प्रोग्रॅमसहि तेच तेच, आणि त्याच त्याच विषयांवरचे असतात. क्वचित कधीतरी बघायला गेलो तर, तो कार्यक्रम आधीच बघितल्याचे लक्षात येते. टायटॅनिक किंवा ईजिप्तच्या पिरॅमिड्सवरचे जे कार्यक्रम लाईव्ह दाखवले होते, त्यातहि ऊगाचच सनसनाटी निर्माण केली होती. या चॅनेल्सना आपले स्थान टिकवण्यासाठी असे सगळे करावे लागतेय, याचेच वाईट वाटतेय. तसेच या कार्यक्रमात जो भारत दिसतो, तो अगदीच वरवरचा असतो. आपल्या मेघालय राज्यात, अतिषय सुंदर ऑर्किड्स फ़ुलतात, पंजाबातील बियास नदीचा प्रवाह अत्यंत रमणीय भागातुन फ़िरतो, नर्मदेची परिक्रमा थरारक अनुभव देऊ शकते, साबरीमलाईच्या जंगलात अजुनहि यात्रेच्या वेळी दिव्य ज्योत दिसते, कैलास मानस सरोवराची यात्रा आजहि स्वर्गीय अनुभव देते, यातले कधीतरी काहितरी बघितले का तुम्ही ईथे ? सिरियल्स नी कधी नव्हे ईतकी नीच पातळी गाठली आहे आता. ( सन्माननीय अपवाद वगळतो, पण ते अपवादच आहेत. ) अभिनयाचा दर्जा आणि दिग्दर्शन काय वर्णावे ? एकेका प्रश्णाचे उत्तर द्यायला पाच मिनिटे लागतात यातल्या पात्राना. विषय तर चाऊन चाऊन चोथा झालेले. कथआनकाला कुठलीच दिशा नाही, मालिकेच्या शीर्षकाचा आणि कथानकाचा काहि संबंधच नाही. तेच ते सास्वा सुना, नणंदा भावजयांचे झगडे, सवतीमत्सर. आणि या दिग्दर्शकाना, सद्यस्थितीचे काय भान असते ? आज कुठली विधवा बाई, पांढरी साडी नेसुन आपल्या वैधव्याचे प्रदर्शन मांडते ? ( मला तर विधवा आणि वैधव्य हे शब्दच नामंजुर आहेत ) पैश्याला पासरी न्युज चॅनेल्स. अश्या काय मह्त्वाच्या बातम्या देतात त्यावर. त्याना जी वाटेल ती मह्त्वाची बातमी. मग बसा तीच चघळत. आणि त्यानी काहि धाडस केले तर त्यावर आपण तरी कसली प्रतिक्रिया देतोय. नेताजी बिकता है, नंतर आपण काय केले ? शक्ती कपुर आणि अमन वर्मा अजुन होते तिथेच आहेत. आणि ते अध्यात्मिक चॅनेल्स. त्यानी तर देवच विकायला काढलाय. त्यावरहि आता जाहिराती दिसु लागल्यात. त्यांचेहि ईव्हेंट्स असतात. आणि ती ख्रिश्चन बाई, आणि तिच्या प्रवचनाचे ते भाषांतर. आता या देवाने मला वाचवा, म्हणुन धावा तरि कुणाचा करायचा ? कधी कधी वाटतं, सगळं जग सुखाने बघतय ना, मग मी कश्याला त्रास करुन घ्यावा ? पण ईथे नाही तर आणखी कुठे मन मोकळे करायचे ?
|
| |
| Thursday, April 20, 2006 - 1:49 am: |
|
|
केनयातले दिवस तुम्ही जेवढा सिनेमातुन केनया बघितला तेवढाच मी पण बघितला होता. पण एकदा तिथे जायचे ठरवल्यावर, काहि खास माहिती मिळवायचा प्रयत्न केलाच नाही. त्या आधीही भटकलो होतोच, एक घाट और सहि म्हणुन निघालो. नाहि म्हणायला अनिल कपुर आणि माधुरी दिक्षीतच्या खेल चे शुटिंग तिथे झाले होते, असे ऐकुन होतो. त्यातली काहि दृष्ये व्हीडिओ वर बघुन घेतली. जाताना काय न्यायचे अशी चौकशी केल्यावर तिथे सगळे मिळते पसुन नेता येईल तितके ने, काहि मिळत नाही, अश्या दोन टोकाच्या प्रतिक्रिया मिळाल्या. केनया एअरवेज चे तिकिट होते. तिथे स्वाहिली भाषा बोलतात एवढे माहित होते. ती भाषा अतिषय सुश्राव्य आहे हे पण माहित होते. पण व्यवहारात ईंग्लिश चालते याची खात्री करुन घेतली होती. नकाश्यात बघुन, तो देश कुठे आहे, हेहि बघुन घेतले होते. त्यावेळी लेक व्हिक्टोरिया लक्षात यायला हवे होते, पण ते नाही आले. तिथे गुजराथी लोक भरपुर असल्याने, शाकाहारी जेवणाची पंचाईत होणार नाही, हेहि कळले होते. सहा तासांचा प्रवास मजेत झाला. नैरोबी विमानतळावर आपल्याकडे पावसाळ्यात जसे हवामान असते, तसे होते. त्यामुळे विमान ऊतरताना, जरा थरथरले. हे विमान तसे जरा लांबच ऊभे राहिले, एक मोठा जिना चढुन एअरपोर्ट मधे जावे लागले. यापुर्वी गल्फमधला ईमिग्रेशनचा अनुभव होताच, तिथे आपल्याकडे जी एन ओ सी, असते ती दाखवल्यावर तिची ओरिजिनल प्रत मिळते. मग एकदा आपल्याकडे रोखुन बघितले जाते आणि दुसर्या मिनिटाला, आपण बाहेर पडतो. नैरोबीत जरा वेगळे प्रकरण होते. तिथे बरेच भारतीय बोहरा लोक माझ्याच फ़्लाईटमधुन आले होते, मला वाटले आपणहि त्यांच्याबरोबर जावे. पण मग कळले कि त्यांचा एक ग्रुप आहे, आणि त्यांचे वेगळे सोपस्कार होणार आहेत. मग परत काऊंटर शोधायला लागलो, अगदी तिथपर्यंत पोहोचलो तर तिथे कळले कि डॉलर्समधे एअरपोर्ट टॅक्स भरावा लागणार आहे. त्यावेळी जेमेतेम २० डॉलर वाटखर्चासाठी मिळायचे. वाटेत विडिकाडीचा काहिच खरच न झाल्याने, मी नैरोबीला ऊतरल्या ऊतरल्या ते बदलुन घेतले होते. आता परत ते डॉलर घ्यायला लागणार होते. त्या काऊंटरवर परत गेलो तर, तशी पद्धत नाही असे कळले. म्हणजे तिथे फ़क्त डॉलर्सचे केनयन शिलिंग मिळत होते, पण शिलिंगचे डॉलर्स मिळणार नव्हते. आत्ता काय करावं बरं ? पण हा विचार मी न करता तिथले ऑफ़िसर्सच करत होते. शिवाय त्यांच्या जांबो, हबारी आणि किटु किडोगो ना मी नीटसा प्रतिसाद न दिल्याने, शॅंपल अल्लीबागहुन आलय, हे त्यांच्या एव्हाना लक्षात आलेच होते. शेवटी आताचे जे डॉलर्स बदलुन घेतले, तेच परत द्यावेत असा ठराव झाला. त्यामुळे ओरिजिनल रिसीट परत घ्या, रद्द करा, डॉलर्स ताब्यात घ्या, असे सगळे करावे लागले. एवढे करेपर्यंत सगळा हॉल रिकामा झाला होता, व मला रॉयल ट्रीटमेंट मिळाली. सगळे ऑफ़िसर्स काळे असले तरी त्यातहि गव्हाळ छटा होत्याच. बाहेर आलो तर कंपनीचा माणुस वाट बघुन परत जायच्या पवित्र्यात होता. त्याला सगळे रामायण सांगितले तर त्याने मला का नाही बोलावले, असा भा. प्र. विचारला. आमचे सामानहि माझीच वाट बघत बसले होते. आत्ता कुठे जरा मी मोकळा श्वास घेतला. हवा अतिषय सुरेख होती. गारठा म्हणावा ईतपत गारवा होता हवेत. सकाळचे साडेदहा झाले होते, तरी सुर्य दिसत नव्हता. आधी कंपनीत गेलो. तिथे जेअलास का, वैगरे चौकशी झाली. विमानातले जेवण अजुन जिरले नव्हते, त्यामुळे वाटेत कुठेतरी जेऊ, असे ठरले. मला किसुमु या गावी जायचे होते. कंपनीतर्फे मला स्थानिक टॅक्सीत बसवुन दिले. आरामात बसता यावे, म्हणुन मी मागची सीट निवडली. आणि या नव्या देशाचे सौंदर्य बघायला मी सिद्ध झालो. शहर भागात तुरळक ईंडस्ट्रीज लागल्या, काहि देखण्या ईमारतीहि दिसल्या, पण तरिही नजरेत भरण्याईतकी हिरवाई होती. शाळेतली मुले सर्रास स्वेटर्स घालुन होती. त्या स्वेटर्सचाहि रंग एकसारखा होता, म्हणजे तो स्वेटर शाळेच्या युनिफ़ॉर्मचा भाग असावा. शहर भाग सोडुन किसुमुच्या रस्त्याला लागलो. आता थोड्फार ऊन लागु लागले होते, तरी हिरव्या रंगाची सोबत होतीच. शेतात कसावा, मका ईत्यादी पिके दिसत होती. आंबा, पपयांची झाडेपण बरिच दिसत होती. शेवंतीसारख्या फ़ुलांची शेते दिसली. ( मग कळले कि ती पायरेथ्रमची झाडे होती, यापासुन मच्छर अगरबत्ती करतात. ) मधे बराच काळ मसाई मारा नदीचे खोरे लागले. सिनेमात दाखवतात तशी अकाशियाची काटेरी पण वरुन सपाट असलेली झाडे दिसली. झेब्रा आणि जिराफहि दिसले, सिंह, बिबटे हत्ती वैगरे नाही दिसले. रस्त्याच्या कडेने प्लॅष्टिकच्या बादल्यातुन बटाटे, गाजरे, कसावा, कोबी सारख्या भाज्या विकायला होत्या, त्याचबरोबर अनेक प्राण्यांच्य फ़र्स पण. मग कळले कि तिथे अश्या फ़र्स सहज विकत मिळु शकतात, पण कुठलीच एअराअईन, त्या स्वीकारत नाही. कोळश्यांची पोती पण खुप ठिकाणी होती. वाटेत न्याहरुरु नावाचे गाव लागले. आतापर्यंत ईतर प्रवाश्यांशी गप्पा सुरु झाल्या होत्या. त्यापैकी एकाने सांगितले कि ईथे एक मोठे खार्या पाण्याचे सरोवर आहे आणि तिथे जवळजवळ वर्षभर फ़्लेमिंगोंची वस्ती असते. तिथेच टॅक्सी चहापाण्याला थांबली. मेनुमधे न्यामा चोमा, ( भाजलेले मटण ) आणि फ़िश & चिप्स एवढेच होते. दुपारचे दोन वाजत आले होते. शाकाहारी म्हणजे ज्या तेलात मासे तळत होते त्यातच चिप्स तळुन देणार होते, मी अर्थातच नकार दिला, व फ़क्त चहा घेतला. चहा मात्र अप्रतिम चवीचा होता. आणि कपहि अगदी पाव लिटरचा होता. तेवढ्यात भुक भागलीच. अजुन अर्धा टप्पाच गाठला होता. मग अचानक डोंगरदर्या लागल्या. गाडी त्यातुनहि भन्नाट वेगाने जात होती. दाट झाडींमुळे ऊन्हाचा त्रास अजिबात जाणवत नव्हता. आणि मग चहाचे मळे लागले. एकेक डोंगर या मळ्यानी व्यापलेला होता. चहाला लागतेच म्हणुन सावली देणरी झाडे होती. अगदी रेखीव आखीव अशी घरे होती. भारतात माझे अजिबात फिरणे झाले नसल्याने, हे चहाचे मळे वैगरे प्रकरण मी आयुष्यात पहिल्यांदाच बघत होतो. आणि मग एक केरिचो नावाचे टुमदार गाव लागले. अजुन तास दोन तासाचा प्रवास व्हायचा होताच. आता जरा ढग जमु लागले होते. पावसाची शक्यता जाणवु लागली होती. शेवटी सहाच्या सुमारास आम्ही किसुमुच्या बाजारात पोहोचलो. बाजार ऊठायची वेळ झाली होती. लाल, पिवळ्या, हिरव्या कपड्यातल्या बायका लगबगीने घरी जायच्या तयारीत होत्या. अश्या ठिकाणी नेहमी असतो तसा, टॅक्सीवाल्यांचा गलबला सुरु होता. मला न्यायला कंपनीतर्फे अनीष नावाचा मुलगा आला होता. त्याने हिंदीतच बोलायला सुरवात केली. आधी तो मला माझ्या फ़्लॅटवर घेऊन गेला. भरवस्तीत घर होते, तरी रस्त्यावर शुकशुकाट होता, ईमारतीला तळमजल्यावरच कुलुप, मग तीन ऊंच मजले चडुन गेल्यावर, मजल्याच्या दाराला एक कुलुप, ते ऊघडण्यासाठी हाका वैगरे मारुन झाल्यावर, घर ताब्यात आले. प्रचंड मोठा हॉल, त्याला लागुन डायनींग एरिया. एक मुख्य किच, त्याला लागुन एक ऊघड्यावरचे किचन, एक कोठीची खोली, तीन बेडरुम्स, मधला पॅसेज असा प्रचंड मोठा फ़्लॅट होता तो. भिंतीतच भरपुर कपाटे होती. सामान वर चढवायची व्यवस्था अनीषनेच केली. मग म्हणाला जरा आराम कर, आठ वाजता तुला जेवायला न्यायला येतो. विमानाचा सहा तासाचा प्रवास, मग एअरपोर्टवर झालेला खोळंबा, परत सात तासाचा टॅक्सीचा प्रवास, होवुनौद्धा मी तसा थकलेला नव्हतो. अंघोळ वैगरे आटपुन, अनीषची वाट बघत बसलो. घर परत परत फिरुन बघितले. ठरल्याप्रमाणे अनीष आलाच. त्याच्या घरी जेवायला घेऊन गेला, फुलके, तीन भाज्या, कढी खिचडि, ढोकळा, दहि, कसाव्याचे कुरकुरीत पापड, खीर असा मस्त मेनु होता. त्यांच्याकडे माझ्याच कंपनीतले ईतर काहि जण जेवायला आले होते. त्यांचा तो बिझिनेसच होता, पण त्याला न साजेसे अगत्य होते. जेवल्यावर चहा पण प्यायची पद्धत आहे तिथे. या चहाने मला वेडच लावले होते. परत येऊन आरामात झोपलो. एकंदर देश आवडला होता मला. अपुर्ण.... ... ...
|
| |
| Friday, April 21, 2006 - 12:23 am: |
|
|
दुसर्या दिवशी मला कंपनीने काहि पैसे पाठवले आणि घरातील सामान घेऊन येण्यासाठी गाडी पाठवली, आज मला जॉईन व्हायचे नव्हते. त्यामुळे पुर्ण दिवस मोकळा होता. ड्रायव्हरचे नाव ओकुसिंबा. जरा विचित्र वाटले, पण नंतर अश्या नावांची सवय झाली. आम्ही सकुनी म्हणजे बाजारात गेलो. भाज्या भरपुर होत्या. कोबी, भोपळे, वांगी, फ़रसबी, गाजरे, बटाटे, मेथी, पालक बहुतेक भाज्या दिसत होत्या. घरात फ़्रीज, ओव्हन वैगरे होतेच. जुजबी भांडीहि होतीच. भाज्या घेतल्या आणि, सुपरमार्केट मधे गेलो. त्याचे नाव बिग बाईज. नेहमीच्या लागणार्या वस्तु, किराणा वैगरे विकत घेतले. शेजार्यांच्या ओळखी करुन घेतल्या. शेजारी एक भारतीय डॉक्टर होते. घरी येऊन पहिला वरण भात केला, बटाट्याची भाजी केली. जेवलो आणि एक झोप काढली. तीन वाजता चहा प्यावासा वाटला, म्हणुन दुध वैगरे आणण्यासाठी बाहेर पडलो. केनयन शिलिंगच्या नोटा आता परिचीत झाल्या होत्या. त्यावरचा डेनियल अराप टॉरायटिच मोईचा फोटो पण परिचीत झाला होता. नाण्यांची पण ओळख करुन झाली होती. एकी किओस्कमधे दुधाची चौकशी केली. आपल्याकडे जी दुध सेंटर्स असतात असेच स्वरुप होते. बिस्किटे, काड्यापेट्या, अंडी वैगरे विक्रीला होत्या. पण वेगळेपणा म्हणजे, संपुर्ण दुकान लोखंडाच्या जाळीने झाकलेले होते. मोठ्यात मोठी वस्तु जाऊ शकेल म्हणजे सहा बाय सहा ईंचाचाच झरोका होता. तसेच त्या झरोक्यातुन हात घातला तरी हाताला कुठली वस्तु लागणार नाही, अशी मांडणी होती. डु यु हॅव मिल्क, असा साधा सरळ प्रश्ण मी केला. हकुना फ़्रेश बाना. टेक यु एच टी, असे उत्तर आले. अंदाजाने मी ओळखले, व यु एच टी म्हणजे टेट्रा पॅकमधल्या दुधाची खरेदी केली. परदेशी गेल्यावर नेहमीच आपले होते, तसा रुपयात हिशेब करुन झाला, पण त्यामानाने स्वस्ताई असल्याने, हि वाईट खोड एका आठवड्यातच सुटली. हे दुध मात्र छानच निघाले. चहा तर चवदार होताच. हे दुध गायीचे होते. आम्हाला कॉलेजमधे असताना, आमच्या सुनंदा नाथन या प्राध्यापिकेनी, केनयातील मसाई लोक, गायीला छोटीशी जखम करुन, तिचे रक्त दुधात मिसळुन पितात, असे सांगितले होते, त्याची आठवण आली. मुद्दाम पाकिटावर, एनरिच्ड विथ काऊज ब्लड, असे लिहिलेले नाही ना याची खात्री करुन घेतली. बाजारात काहि ईतर दुकानेहि दिसली, एका कडुन फ़रसाण, ढोकळा विकत घेतले, जवळच एक स्वामी नारायण मंदीर होते, तिथे जाऊन आलो. सिनेमा थिएटर वर फ़ेरी मारली. बर्यापैकी लेटेश्ट हिंदी सिनेमा लागला होता. ( मग केनयात असताना, जवळ जवळ प्रत्येक आठवड्याला एक या दराने थिएटरला जाऊन सिनेमे बघितले. ) संध्याकाळी साडेसहा सातला दुकाने बंद होवु लागली, रस्ते ओसाड पडले, मग मुकाट्याने घरी आलो. पावसाची जोरदार सर आली, मग गच्चीवर गेलो. तिथुन बराच ईलाखा नजरेच्या टप्प्यात येत होता. दुरवर लेक व्हिक्टोरियाचा एक भाग दिसत होता, त्याच्याहि पलिकडुन एक विमान ऊडताना दिसले. गावात एअरपोर्ट होता तर. रेल्वेची शिट्टी ऐकू आली, म्हणजे रेल्वेहि होती तर. बुलबुलाची जोडी वेगवेगळे स्वरसमुह आजमाऊन बघत होती. हवेत मस्त गारवा होता, तळ्याकाठी सुर्य बुडायला लागला होता. सभोवतालचे हिरवे डोंगर धुसर होवु लागले मग परत घरी आलो. घरी येऊन खिचडी टाकली, शेजारच्या डॉक्टरीणबाई चौकशी करुन गेल्या, आणलेले डाळ तांदुळ तसेच ओट्यावर होते, तर त्या म्हणाल्या माझ्याकडे औषधांच्या गोळ्यांचे डबे आहेत, ते आणुन देते. माझी सोय झाली, सगळे किराणासामान दास्तानी लावुन झाले. हवा चांगलीच गार झाली होती. पंख्याची जरुर नव्हती. आणि बघितले तर घरात पंखेच नव्हते. पुढेहि कधीहि पंख्याची जरुरी भासली नाही. दुसर्यादिवशी सकाळी कावळ्याच्या कर्कश ओरडण्याने जाग आली. माझ्या ऊघड्या किचनच्या कठड्यावर बसुन ओरडत होता तो. अगदी कोंबडी एवढा गलेलठ्ठ होता तो. मान आणि पोठ पांढरेहुभ्र होते. आधी ओरडला होता म्हणुन, नाहितर त्याला कावळा म्हणुन ओळखणे कठीण गेले असते. मग कळले कि तिथले सगळेच कावळे असे असतात. बरोबर पावणे आठ वाजता, बेल वाजली, दार ऊघडले तर दारात कुणीच नाही, परत दार बंद केले तर परत बेल वाजली, मग लक्षात आले कि सुरक्षिततेच्या कारणामुळे, ईथे कुठल्याच ईमारतीत थेट जाता येत नाही, सगळ्यांच्या बेल्सची बटणे तळमजल्यावरच असतात. तयार होतोच, मग खाली गेलो तर कंपनीने गाडी पाठवली होती. ओकुसिंबाच्या चेहर्यावर ओळखीचे हसु होते. काळ्या म्हातार्या सुरकुतलेल्या चेहर्यावर एक प्रसन्नपणा होता. पुढे अनेक काळ्या लोकांशी मैत्री झाली, माझ्या मनात कधीच पुर्वग्रह नव्हते, आणि मी मैत्रीचा हात पुढे केल्यावर, त्या लोकानी भरभरुन प्रतिसाद दिला. ओकुसिंबाने हबारी याको अशी सुरवात केली. मी त्याला लगेच अर्थ विचारला, त्यानेहि हसुन ते त्यांचे हाऊ आर यु आहे असे सांगितले. मग मीहि त्याला कसे उत्तर द्यायचे ते विचारले, त्यावर तो मझुरी साना असे म्हणाला, चला स्वाहिली भाषेची ओळख झाली. ऑफ़िसमधे जायचा रस्ता अगदी सरळ होता, एकेच वळण होते, त्यामुळे तो लक्षात ठेवला. पहिल्यांदा सामोरा आला तो लुईस नेल किपचुंबा, माझ्यापेक्षा सहा ईंच ऊंच, कुरळे केस, भारतीय वाटावा असा चेहरा, गव्हाळ वर्ण, चेहर्यावर निरागस भाव असणारा हा लुईस, लवकरच माझा जिवलग मित्र झाला. केनया सोडेपर्यंत त्याने दोस्ती निभावली. बाकिच्या लोकात, बरेच भारतीय गुजराथी लोक होते, सगळ्यानी माझे मनापासुन स्वागत केले. माझ्या खात्यात संगीता भाटिया म्हणुन माझी सेक्रेटरी होती. डॅनियल, जेकब, जेम्स असे सहकारी होते. त्यांची हिच नावे मी वापरली कारण ओलाल, ओसिक आणि ओईंडो अशी त्यांची आडनावे, मला अवघडच वाटली. त्यांच्या नजरेतला किंचीत तटस्थपणा मी लवकरच नाहिसा केला. संगीताशी जुजबी गप्पा मारल्या. तिने देश कसा आहे असे विचारले, मी लेटेश्ट बातम्या दिल्या, मग विचारले कि तु कधी गेली होतीस, तर ती म्हणाली, आमच्या तीन पिढ्या ईथेच वाढल्या, आणि त्यांच्यापैकी कुणीच कधी भारतात गेले नाही. आमच्यासाठी हाच आमचा देश. वेल थोड्याफार फरकाने तिथल्या सगळ्या भारतीयांची कथा हिच होती. पण त्यांच्यापुरता भारत त्यानी तिथेच वसवला होता. अपुर्ण
|
| |
| Friday, April 21, 2006 - 4:06 pm: |
|
|
आजवर जिथे जिथे भटकलो, तिथे गुज्जुभाई भेटलेच. आणि मला कौतुक वाटतं ते याचे कि त्या लोकानी आपले खाणे आणि ठाकुरजी, कधीहि सोडला नाही. अनेक पिढ्यांपासुन दुरदेशी राहुनहि हा धागा त्यानी घट्ट पकडुन ठेवला होता. नव्या ठिकाणी रुळायला वेळ लागायचाच, पण त्या देशातल्या काहि प्रथा मला खुप आवडल्या. पहिली म्हणजे, दिवसभराच्या सेल्स चा रिपोर्ट तयार झाला, आणि त्यावर माझी सहि झाली, कि आम्ही घरी जात असु. मी जॉईन झालो तो वार शुक्रवार होता. माझे काम आटपल्यावर मी फ़ॅक्टरी मॅनेजरच्या केबिनमधे जाऊन बसलो, कारण त्याला आणि मला घेऊन जाणारी गाडी एकच होती. अर्धा पाऊण तास थांबावे लागले, जाताना रस्त्यावर बघितले तर तुरळक भारतीय दिसतहि होते. घरी गेलो आणि पत्र लिहायला घेतले. दुसर्या दिवशी शनिवार, माझा रिपोर्ट तीन वाजताच तयार होता, आणि माझे खाते बंद झाले, मग आणखी तीन तास तिथेच बसण्यापेक्षा मी चालत घरी जायचे ठरवले. काहि धोका आहे का असे विचारले, तर तसा काहि खास नाही असे सहकारी म्हणाले. तरिही एका काळ्या सहकार्याला घेऊन निघालो. ( मी जरी काळे लोक हा शब्द वापरत असलो, तरि त्यात कुठेहि हेटाळणीचा अंश नाही. हा शब्द तिथे सर्वमान्य आहे. निग्रो हा शब्द कधीचाच बाद झालाय. ) माझे सहकारी रोज जवळ जवळ आठ दहा किलोमीटर पायी चालत येत असत व तसेच परत जात असत. वाहतुकीची साधने तशी बेभरवश्यची तसेच त्यांच्या दृष्टीने महाग होती. शिवाय त्यांच्या घरापर्यंत रस्ताहि नव्हता. त्यापेक्षा शॉर्टकटने घरी जाणे त्याना सोयीचे होते. शॉर्टकट म्हणजे, एखाददुसरा डोंगर चढुन ऊतरणे वैगरे. सठीसामाशी आम्ही एखादा डोंगर चढलो, तर आपलीच पाठ थोपटुन घेतो, आणि तिथे माझे सहकारी दिवसातुन दोन वेळा ही पायपीट करत होते. त्या दिवसापासुन मी रोजच घरी संध्याकाळी पायी जाऊ लागलो. घर तर अगदी दहा मिनिटावर होते, शिवाय संध्याकाळची हवा नेहमीच प्रसन्न असायची. त्यामुळे हे रमतगमत जाणे मला खुप आवडु लागले. किरकोळ खरेदी त्यावेळी आटपता येत असे. घरी गेल्यावर शेजारीणीशी गप्पा मारल्या. तिच्याकडुन बरीच माहिती मिळाली. तिथे कोळसे अगदी स्वस्त होते. म्हणजे साधारण १०० रुपयाला पोतेभरुन मिळत असत. पोते मात्र आपले घेऊन जायचे. मग तो माणुस घरी पोते आणुन टाकत असे. कोळश्यावरचा सैंपाक खाऊन बरिच वर्षे झाली होती. तसा मी हौशीच, मग त्याना एक पोते द्यायला सांगितले, व कोळसे जमवले. दुसर्या दिवशी रविवार, शेगडी वैगरे आणु, असे म्हणत झोपुन गेलो. सकाळीच बाजारात गेलो. दोन चार ठिकाणी भाव करत भाज्या घेतल्या, मग शेगडीहि घेतली. आपल्यापेक्षा जरा वेगळी शेगडी होती ती, या शेगडीला खाली दार असायचे, आणि ते बंद केले कि अगदी मंद विस्तवावर पदार्थ शिजत असे. बाजारात लोकल वर्तमानपत्रे होती. नेशन नावाचे एक विकत घेतले. अदभुत गोश्टी होत्या त्यात. मुलांसाठीच्या सदरात, वाळवीच्या वारुळातुन वाळव्याना बाहेर काढण्यासाठी त्यावर एक रुंद प्लॅश्टिकचा तुकडा पसरुन कसा वाजवायचा. मग वाळव्याना पाऊस पडतोय असे वाटुन त्या बाहेर कश्या येतात. मग त्याना कसे खायचे, कुठल्या वाळव्या जास्त चवदार असतात, अशी रंजक माहिती होती. पुढे केवळ हे सदर वाचण्यासाठी मी हा पेपर घेत होतो. बाकि लेख हे एड्स, मलेरिया वैगरे संबंधात होते. कला वा मनोरंजन याबद्दल काहिच नव्हते. राजकारणाबद्दल तर अगदीच त्रोटक बातम्या होत्या. तिथे वर्तमानपत्रावर सेन्सॉरशिप आहे हे लक्षात यायला अजिबात वेळ लागला नाही. हवामानाचा अंदाज बघता, सकाळी थंडी, दुपारी जरा गरम आणि संध्याकाळी पाऊस, असे वर्णन होते. किसुमु हा भाग म्हणजे लेक बेसिन. हे लेक व्हिक्टोरिया, जगातील दुसर्या क्रमांकाचे गोड्या पाण्याचे सरोवर. तब्बल ६७,००० चौ. कि. मी. एवढा विस्तार. ( म्हणजे अख्खी श्रीलंका बुडवता येईल ईतका. ) ह्या सरोवरातच युगांडा, केनया आणि टांझानिया या देशांच्या सीमा मिळतात. ईजिप्तमधील नाईल नदी या सरोवरात ऊगम पावते. साधारण सरोवर म्हंटले कि आपल्यासमोर एक साधारण लंबगोल जलाशय येतो. पण या सरोवराचे किनारे दंतुर आहेत. किसुमु गावात अनेक ठिकाणी या सरोवराचे छोटे भाग घुसलेले आहेत. त्यामुळे कुठल्याही तीरावरुन याचा पार दिसु शकतो, आणि ते आपल्या आवाक्यातले वाटते. आणि या गावात कुठेहि फिरताना हे कायम नजरेच्या टप्प्यात असते. सरोवर म्हणजे निळाशार रंग हे समीकरण ईथे नाही. याचा रंग मातकट करडा आहे. या तळ्यावर युगांडाच्या बाजुला खुप वादळे होतात. एअर फ़्रांसचे ईस्रायली प्रवाश्याना घेऊन जाणार्या विमानाचे एकदा अपहरण झले होते, तेंव्हा ते विमान युगांडा मधल्या एंटेबे विमानतळावर थांबले होते, आणि ईदि अमीन ने त्या अपहरणकर्त्याना मदत केली होती. त्यांची सुटका ईस्रायली सैनिकानीच केली होती. या अपहरणनाट्यावर एक सुंदर सिनेमा आला होता, त्यात असे वादळ दाखवले होते. केनयात असताना मात्र एकदाच असे वादळ अनुभवले. त्यावेळी आमचे ऑफ़िस लवकर सोडले होते. त्यावेळी या सरोवरावर जोरदार लाटा आल्या होत्या. एरवी हे सरोवर अगदी शांत असे. किनार्यावर चुबळुक चुबळुक बारिक लाटा दिसायच्या तेवढ्याच. या तळ्याचा ईथल्या हवामानावर फार परिणाम होतो. ईथे नियमित पडणारा पाऊस हि या तळ्याचीच देणगी. आपल्याकडे पाऊस पडतो तो मोसमी वार्यांमुळे. या वार्याना एक निश्चित दिशा असते. त्यामुळे पाऊस साधारण तिरपा पडतो. ( मुंबईत तो पश्चिमेकडुन पडतो. ) किसुमुमधे मात्र तो सरळ पडतो. त्यामुळे खिडक्याना झडपा असायची गरज नसायची. आणि हा पाऊस जवळ जवळ वर्षभर रोज पडतो. तोहि शक्यतो संध्याकाळीच. हे सरोवर ( मी सरोवर, तळे आणि लेक हे शब्द वारंवार वापरतोय, कारण हे लेक या सगळ्या शब्दात तर आहेच, शिवाय या शब्दात पकडता न येण्यासारखेहि आहे, अगदी ज्ञानेश्वरांच्या जाळ्यातील चंद्र या संकल्पनेप्रमाणे. ) हे सरोवर शांत असल्याने वाहतुकीसाठी अगदी सोयीचे आहे. मोठमोठ्या बोटी यातुन सतत ये जा करत असतात. किसुमु गावातुन एक ट्रेन या सरोवराच्या काठापर्यंत जाते, मग ती एका बोटीच्या पोटात शिरते मग ती बोट युगांडाला जाते व तिथे गेल्यावर हि ट्रेन बाहेर पडते. आम्हिहि एकदा या तळ्यावरुन सहल केली होती. हि मोठी बोट अनेक ठिकाणी थांबत थांबत जाते. होमा बे, केंडु बे, अशी या जागांची नावे आहेत. आमचा मोठा ग्रुप होता. या प्रवासाला पाण्यावरचा प्रवास म्हणावासा वाटत नाही, ईतके हे तळे शांत आहे. हि सहल जरा ओळखीपाळखी झाल्यावर केली होती. त्या आधी लुईसच्या मागे लागुन तळ्यातला फेरफटका योजला होता. त्याची आठवण तर अजुन आहे. पैसे कश्याला खर्च करतोस माझ्या मित्राची होडी आहे, तिने आपण जाऊ, असे तो म्हणाला होता. एका रविवारी आम्ही गेलो. त्याचा मित्र कुठेतरी जंगलात गेला होता, त्याला शोधुन आणले, त्या दोघांचे स्वाहिलीत बोलणे झाले. तो बहुतेक त्याच्या अडचणी सांगत होता, आणि लुईस त्याच्या गळ्यात पडत होता. होडीने बर्याच दिवसात अंगाला पाणी लागु दिलेले नव्हते. तरीपण आम्ही निघालो. मी एका टोकाला, लुईस दुसर्या टोकाला आणि त्याचा मित्र मधे वल्व्हवत होता. पाच पन्नास मीटर आतमधे गेल्यावर माझ्या पायाला पाणी लागले. खाली बघितले तर होडीत सहा ईंच पाणी साचलेले. मी लुईसला ओरडुन सांगितले, तर त्याच्या मित्राने काहि खास नाही अश्या शब्दात, तिथे असलेल्या एका टिनच्या मदतीने पाणी बाहेर टाकत रहावे, असे सुचवले. आईशप्पत तो टिनपाट पण सतरा भोकांचा होता. मी जीवाच्या आकांताने पाणी बाहेर ओतु लागलो. तेवढ्या वेळात ती होडी किती आत गेली. कुठुन परत फिरली, हे काहिच माझ्या लक्षात आले नाही. तळ दिसु लागताच मी टुणकन बाहेर ऊडी मारली. लुईसचा मित्र नको म्हणत असतानाहि, त्याला पैसे दिले. लुईस्ने विचारले, काय दिनु, मजा आलि कि नाही, त्याला तिथल्या तिथे बुकलुन काढले मी. एवढे मोठे सरोवर असले तरी मासेमारीसाठी ते फारसे ऊपयोगी नाही. कधीकाळी त्यात मासे होते, पण मग कुणीतरी गोर्या माणसाने त्यात नाईल पर्च नावाच्या माश्यांची पिल्ले सोडली. ऊभट पाठीचा, पाठीवर ऊलटे काटे असलेला, आणि जबड्यात भरपुर दात असलेला हा मासा फारच ऊग्र आणि आक्रमक असतो. या माश्याने त्या सरोवरातले बाकिचे मासे खाऊन टाकले, आणि सध्या फ़क्त तोच तिथे आहे. नाही म्हणायला कॅटफ़िश सारखे काहि मासे आहेत तिथे. हा पर्च मासा अगदीच अखाद्य आहे असा नाही, पण तो तितकासा लोकप्रिय नाही. या माश्याला भरपुर तेल सुटते आणि अंगच्या तेलातच तो तळता येतो. आम्ही पाणी प्यायचो ते याच तळ्याचे. त्याच सुमारास रवांडा मधे वांशिक दंगली चालु होत्या. त्या दंगलीतले हुतात्मे पण याच तळ्यात विसर्जित केले जात. तरिही आम्हाला त्याच तळ्याचे पाणी प्यावे लागत असे. ऊकळुन घेत असु. पण अजुनतरि काहि झालेले नाही मला. केनयावर एकदा लिहायला घेतल्यावर सुचत जातेय. फक्त यापुढे एक शिस्त लावुन घेईन, ती म्हणजे एका वेळी, एखादा विषय घेऊन लिहिन. अपुर्ण
|
| |
| Saturday, April 22, 2006 - 2:03 pm: |
|
|
घरकुल माझ्या पहिल्या फ़्लॅटचे वर्णन वर आलेच आहे. हा फ़्लॅट दुसर्या मजल्यावरती असला, तरी खाली एका कंपनीचे गोडाऊन होते, त्यामुळे एक मजला ऊंची जास्त होती. माझा फ़्लॅट रस्त्याच्या मागच्या बाजुला होता, त्यामुळे घराच्या बहुतेक सर्व खिडक्याहि मागच्या बाजुलाच होत्या. त्या बाजुला एक छोटा रस्ता होता, आणि त्या पलिकडे एक डिस्को क्लब होता. शुक्रवार, शनिवार आणि रविवार रात्रीचे तिथे ढॅणढॅण म्युझिक लागायचे. अगदी पहाटे पाच सहा वाजेपर्यंत हा गोंगाट चालु असायचा. त्यामुळे झोपेचे खोबरे ठरलेले. दोन किचन्सपैकी जे ऊघडे किचन होते, त्याची ऊघडी बाजु ईमारतीमधल्या चौकात ऊघडत होती, त्यामुळे तिथुन आभाळाचा एक छोटा तुकडाच दिसत असे. तिथे काहि झाडे मी लावली पण त्याना पुरेसे ऊन मिळेना. एवढे मोठे घर, मला खायला ऊठायचे असे नाही, पण त्याचा वापरच होत नव्हता. दोन बेडरुम्स तर मी वापरतच नव्हतो. टॉयलेट्स पण दोन होती, त्यातले एक वापरत नव्हतो. आमच्या कंपनीने त्याच दरम्यान एक कॉलनी खरेदी केली. १२ डुप्लेक्स बंगले होते तिथे. माझे सगळे सहकारी तिथे रहायला गेल्याने, मला पण तिथे जावेसे वाटु लागले. कंपनीचा तसा आग्रह नसतानादेखील, मी तिथे शिफ़्ट झालो. कुणिही प्रेमात पडावे असे ते घर होते. एकंदर सहा जोडबंगले होते. मागेपुढे बरिच मोकळी जागा होती. भरपुर खिडक्या. दरवाजे आणि खिडक्या पुर्ण काचेचे होते. दरवाजा ऊघडल्यावर एक छोटा पॅसेज. त्यात वर जाणारा जिना. ऊजवीकडे भला मोठा हॉल. दरवाज्यासमोर किचन. किचनची मागची बाजु परसात ऊतरणारी, तिथे पाण्याचा नळ व कपडे वैगरे धुण्यासाठी जागा. जिना चढुन वर गेल्यावर परत एक छोटासा पॅसेज. दोन हाताला दोन मोठ्या बेडरुम्स. पॅसेजमधे बाथ. आणि त्या समोरच, एक छोटी बाल्कनी. त्या बाल्कनीतुन समोरच्या घरातल्या लोकांशी बोलता यायचे. हि कॉलनी जरा ऊंचावर असल्याने, लेक, त्या काठावरचे डोंगर सगळेच छान दिसत असे. ( टॉयलेटमधे बसल्या बसल्या पण हा छान नजारा दिसत असे. आणि तिथुन ऊठावेसे वाटत नसे. ) त्या घराचे सगळ्यात मोठे आक्रषण म्हणजे तिथला शेजार. ( पहिल्या घराच्या शेजारीण बाई ऊशीरा घरी यायच्या दवाखान्यातुन. ) एक अनोखा भावबंध तिथे जुळुन गेला. ( मायबोलि वरची माझी पहिलि कथा, कोई नाम ना दो, हि याच भावबंधावर आधारित होती. ) आजहि तो भावबंध मी जपुन ठेवलाय. घराच्या अंगणात आणि परसात माझा वेळ खुप मजेत जायचा. शेतीचे बरेच प्रयोग मी तिथे केले. त्यबद्दल लिहिनच. केवळ माझ्याच नव्हे तर सर्व कॉलनीभर मी बाग फुलवली. खरे तर हे फार आत्मप्रौढीचे विधान झाले. नुसत्या बिया विखरुन टाकल्या, कि त्या मातीत आणि हवामानात फुलझाडे भराभर वाढत. किसुमुमधे फिरताना सगळीकडे सुंदर फुलझाडे दिसयाची. ती चोरुन आणायची एक नामी शक्कल आम्ही शोधुन काढली होती. अश्या फुलझाडांजवळ जाऊन, घराची चावी नाहितर सुटी नाणी खाली टाकायचो. चावी वा नाणी ऊचलता ऊचलता, रोपे आणि बिया पण ऊचलायचो. छत्री बरोबर असायचीच, तिच्यात ती घालुन, आपण त्या गावचेच नव्हेत असे भाव चेहर्यावर आणुन, तिथुन सुंबाल्या करायचो. आणि अशी झाडे फार छान जगायची. किसुमु गाव विषुववृत्तापासुन केवळ २० किलोमीटरवर आहे. त्यामुळे निसर्गाचा एक वेगळाच अविष्कार तिथे दिसायचा. २२ डिसेंबरला सुर्य ईतक्या दक्षिणेला आणि २२ जुनला तो ईतक्या उत्तरेला असायचा कि घराच्या एकाच खिडकितुन सुर्योदय आणि सुर्यास्त दिसायचे. मार्च आणि सप्टेंबरमधेच काय तो डोक्यावर असायचा. त्यामुळे काय व्हायचे, तर सहा महिने घराच्या एकाच बाजुला सुर्यप्रकाश तर सहा महिने दुसर्या बाजुला. ( घराचे दार उत्तरेकडे होते. ) आणि त्या दरम्यान त्या बाजुची बाग फुलुन यायची. घराच्या बाल्कनीला छप्पर नव्हते. त्यामुळे तिथे ऊभे राहुन पाऊस झेलता यायचा. तिथे गाराहि खुपवेळा पडायच्या. पण त्याहि सरळच पडायच्या. त्यामुळे दारे खिडक्यांच्या काचेला धोका नसायचा. मग लहान मुलाच्या ऊत्साहाने त्या गारा झेलणे, गोळा करणे आलेच. रात्रीच्या पावसाने हवा गारठलेली असायची. पहाटे लवकर ऊठुन, घराच्या परसात शेगडी पेटवायचा ऊद्योग करायचो. उत्तम कोळसे असल्याने ते पटकन पेटत. मग त्यावर अंघोळीसाठी पाणी तापवायचे, आणि त्या ऊबेत दात घासुन फ़क्कडसा चहा घ्यायचा, हा माझा रोजचा कार्यक्रम. तिथे असताना रेडिओवर भारतातली विविध भारती छान ऐकू यायची. पण अडीज तासांच्या फरकामुळे, सकाळच्या साडेसाताचा संगीत सरीता ऐकायला मला पहाटे पाच वाजता ऊठावे लागायचे. घर जाऊ लंगरवा कैसे कैसे, सुन पावै मोरी सास ननदिया, अशी हमीरमधली रचना ऐकत, शेगडी पेटवायला मजाच यायची. माझे पाणी तापवुन झाले, कि मागच्या बंगल्यातल्या संध्यावहिनी त्यांचे कोळसे घेऊन यायच्या, व त्याच शेगडीवर त्यांचेहि पाणी तापवुन व्ह्यायचे. एरवीहि घराच्या मागच्या पुढच्या अंगणात आमचा सांजा चुल्हा कार्यक्रम व्हायचा. शेगडी पेटवण्यात मी एक्स्पर्ट झालो होतो. खरे तर त्यातली गोम अशी होती कि, माझ्याकडे ऑफ़िसमधली वाया गेलेली कॉम्प्युटर स्टेशनरी असायची, त्यामुळे माझी शेगडी लवकर पेटायची. मला तिथे कधीहि रॉकेल वापरावे लागले नाही. शेगडीवर मंद आचेवर डाळ शिजत ठेवुन, बाजारात फेरी मारायला जायचो मी. येईस्तो मस्त फुलुन आलेली असायची डाळ. पंजाबी माखी दाल तर आम्ही अस्सल पंजाबी पद्धतीने रात्रभर शिजवुन करत असु. आणि या पद्धतीने केलेल्या रजम्याला तर शाहि चव यायची. तिथे कोळसा वापरणे अगदी सर्वमान्य असल्याने, कोळश्याचा धुर निघुन जाण्यासाठी घराच्या भिंतीना ऊंचावर बारिक झरोखे असत. माझे घर दिवसभर बंद असल्याने, त्या झरोख्यातुन पाकोळ्या ( छोटी वटवाघळे ) घरात शिरलेली असत. त्याना हाकलणे हा माझा ऊद्योग व्हायचा. हातात टाईम्स ऑफ़ ईंडियाची जाडजुड घडी घेऊन, मी बॅडमिंटन खेळायचो त्यांच्याशी. त्या पठ्ठ्या पण घरभर ऊडत असत, पण माझा नेम काहि लागत नसे. शेवटी ऊडुन ऊडुन त्या दमल्या कि त्या पडद्यावर जाऊन बसत, मग त्याना पेपरच्या मदतीने, बाहेर टाकायचो. या गडबडीत त्याना आलेली वाट काहि सापडायची नाही. संध्याकाळच्या गारठ्याला कंटाळुन फ़्रीजखाली चौपया आलेल्या असायच्या. ( चॉकलेटी रंगाची जमिनीवरची पाल. ) त्याना हाड हाड करुन हकलावे लागायचे. आपल्याकडच्या चौपयांपेक्षा त्या चांगल्याच जाडजुड असायच्या. पण त्या परवडल्या असे काहि पाहुणे मी घरी येताना पायरीवर पहुडलेले असायचे. हे पाहुणे म्हणजे मॉनिटर लिझार्ड. एक दीड मीटर लांबीचा सरडा डोळ्यासमोर आणा, ज्याची कल्पना कराल, तीच मॉनिटर लिझार्ड. चमकदार काळा रंग त्यावर पिवळी शेंदरी नक्षी, असायची. अर्ध्या फुटापेक्षा जास्त लांबीची जीभ ती आतबाहेर काढत बसलेली असायची. कॉलनीतली मुले तर तिला लिटील डायनोसॉर म्हणायची. आणि ती नेमकी माझ्याच घराच्या पायरीवर असायची. हा प्राणी तसा निरुपद्रवी आहे. त्याची नजर अधु, बोजड शरिरामुळे हालचाली मंद, जिभेनेच काय ते सभोवतालचे ज्ञान होणार तिला. आपल्या अंगावरुन गेलेला वारा तिच्याकडे गेला तरच तिला आपले अस्तित्व कळणार. तिला घालवायचे म्हणजे एक ऊद्योगच असायचा. दगड मारता येत नसे कारण दरवाजा काचेचा होता. आवाज करुन ऊपयोग नसायचा, कारण तिला फारसे ऐकु येत नाही. मग एका काळ्याला बोलवा, आरडाओरडा करा असा नुसता गोंधळ. तो काळापण, ये ग माझी बाय ती, असे त्यांच्या भाषेत बोलुन तिला सहज जिवंत ऊचलुन न्यायचा. ( त्याच्या एका वेळच्या जेवणाची सोय व्हायची. ) आणि आम्ही सगळे, ती परवा आली होती ती हिच्यापेक्षा मोठी होती नाही, अशी चर्चा करायचो. घरात नव्हती तरी आजुबाजुला बरीच वाळवी होती. एकदा एका संध्याकाळी पावसाची सर जरा लवकर आली, म्हणुन आम्ही क्रिकेटची बॅट तशीच टाकुन आलो. दुसर्या दिवशी सकाळी बघितले तर, वाळवीनी त्या बॅटच्या दांड्याचा रबर सोडुन सगळी बॅट खाऊन टाकली होती. आणि त्यापुर्वी, त्या बॅटवर माती लिंपल्यामुळे, त्या आकाराचा एक साचा मात्र तयार झाला होता. अपुर्ण
|
| |
| Sunday, April 23, 2006 - 4:10 pm: |
|
|
वर उल्लेख केलेली माझी पहिली कथा, खास आग्रहावरुन ईथे देतोय. हि १०० टक्के सत्यकथा, फक्त नावे बदलली आहेत.
|
| |
| Sunday, April 23, 2006 - 4:14 pm: |
|
|
हा कथेचा दुसरा भाग, नीट दिसण्यासाठी शिवाजी फ़ॉंट्स लागतील.
|
| |
| Monday, April 24, 2006 - 4:22 pm: |
|
|
लुईस नेल किपचुंबा ऑफ़िसमधला भेटलेला पहिलाच माणुस म्हणजे लुईस. वर लिहिल्याप्रमाणे, त्याची ऊंची साडेसहा फ़ुट, वर्ण गव्हाळ, केस कुरळे पण आफ़्रिकन नव्हेत. ( आफ़्रिकन वंशाच्या लोकांचे केस अतिकुरळे असतात. ते स्पायरल तर्हेने वाढतात, आणि त्यांचा प्रचंड गुंता होतो. ) त्याचे वय असेल जेमतेम वीसबावीस वर्षांचे. आणि चेहर्यावर बालसुलभ निरागसता. चुळबुळ्या असल्याने त्याला ऑफ़िसची बाहेरची कामे दिली जात. त्याचे ड्रायव्हींगचे कौशल्य, कुणालाहि हेवा वाटेल असे होते. फ़ोर्कलिफ़्ट पासुन बेंझ पर्यंत काहिहि, तो सारख्याच कौशल्याने चालवायचा. मला जेंव्हा कामासाठी बाहेर जायचे असेल तेंव्हा तोच माझा ड्रायव्हर असायचा. शिवाय अतिषय विश्वासु म्हणुन, मला जेंव्हा रोख रकमेची ने आण करायची असेल, तेंव्हाहि तोच असायचा. ईतर लोकांप्रमाणे मी कधीहि बॅकसीटवर बसत नसे. त्यामुळे त्याच्याशी गप्पा मारणे हे ओघाने आलेच. पैश्याची आणि माझी, अश्या दोन्ही जबाबदार्या त्याच्यावर असल्याने, त्याला पण आपल्याला महत्व दिल्यासारखे वाटायचे. साधारण महिन्यातुन दोन तीन वेळा आम्हा दोघाना असे लांबवर जावे लागायचे. त्यामुळे ओळख वाढत गेली. कितिहि दमलेला असला तरी मी सांगितलेले काम करायला तो कधीच नकार द्यायचा नाही. तसा वयाने लहानच असल्यामुले तो खट्याळपणा करायचाहि, दिलेली कामे जबाबदारीने करायचा तरी, कधी कधी दांड्या मारायचा. एकदा असाच तो आला नसताना, मला डायरेक्टरनी सांगितले जा त्याला घेऊन ये. मी म्हणालो, तो आलेला नाही आज ऑफ़िसला. आजारी असेल. तर ते म्हणाले, आजारी नाही रुसुन बसलाय तो. तु जा, फक्त तुझेच ऐकेल. आणि मग हेहि नित्याचेच झाले. मी त्याच्या घरी जाऊन नुसती हाक मारली तरी तो तयार व्हायचा. हळु हळु बाकिचे सहकारी पण मला अशी गळ घालु लागले. ईतराना काम सांगण्यात आणि त्याला सांगण्यात फरक असे, आणि सगळ्यानाच तो हवा असे. मला जरा संकोच वाटायचा. केवळ तो माझे ऐकतो म्हणुन मनाविरुद्ध, त्याला काहि करायला लावणे मला पटत नसे. मी प्रामाणिकपणे त्यालाच हे सांगुन टाकले. त्यानेहि मला सांगुन टाकले, कि तु मला मित्रासारखा वागवतोस, तुला मी कधीच नाही म्हणणार नाही. म्हणजे यातुन मलाच मार्ग काढायला हवा होता तर. मग सहकार्यांचे काहि आग्रह मी माझ्यापासुनच परतावुन देऊ लागलो. लुईसचा भाऊ, जेकब नेल ओडुंगा, पण आमच्याच कंपनीत कामाला होता. बरोबर तुम्हाला पडला, तोच प्रश्ण मलाहि पडला होता. त्याच्या भावाचे आणि त्याचे आडनाव वेगळे कसे ? ईतकेच नव्हे तर त्याचा रंग गव्हाळ का ? त्याचे केस वेगळे का ? असे अनेक प्रश्ण मला पडले होते. पण असे प्रश्ण थेट विचारायला, विश्वासाची एक पातळी गाठावी लागते. आणि लवकरच मी ती गाठली. किपचुंबा हे त्याच्या आईचे नाव. जेकबची आई वेगळी. तेंव्हा मात्र तो जेकबच्या आईकडेच रहात होता. त्याच्या आईचे घर दुर खेडेगावात होते. आईची आठवण आली कि तो तिच्याकडे जात असे. पण त्या खेड्यात राहुन तो आळशी बनेल, काम करणार नाही, म्हणुन आईने त्याला वडीलांकडे ठेवले होते. त्याच्या आईचे वडील भारतीय होते, तर त्याच्या वडीलांचे वडील जर्मन. त्यामुळे त्याचा तोंडावळा असा वेगळा होता. लहनपणी मित्रांमधे त्याला वेगळा म्हणुन हिणवत असत. तो सल कुठेतरी मनात होता. शहरातल्याच्या मानाने खेड्यात हा प्रकार जास्त असणार म्हणुनहि तो, ईच्छा असुनहि आईकडे रहात नव्हता. त्याच्या मनाचा हा दुखरा कोपरा मी पुढे कायम जपला. मी त्याच्या आईचे नाव कायम आदरानेच घेतले. अशी मिश्र संतति, केनयाला नविन नाही, पण अगदी तुरळक मुलात, ईतके वेगळेपण असायचे. आणि त्यामुळेच त्याना किंचीत मानहानी स्वीकारावी लागायची. जरी तो वडीलांकडे रहात असला तरी, अगदी लहान वयात स्वताच्या पायावर ऊभा होता. त्याने वडीलांच्या घराच्या आवारातच, स्वतासाठी वेगळी खोली बांधुन घेतली होती. त्याच्या चार गायी होत्या. गायीचे रक्त दुधात मिसळुन प्यायची प्रथा त्यांच्यातहि होती. त्यासाठी छोट्या बाणासारखे हत्यार ते वापरत. शिवाय रक्त दुधात नीट मिसळण्यासाठी कोर्हांटीसारख्या एका झाडाच्या फांदीचा घुसळण्यासाठी ऊपयोग करत. मी त्याला याबाबत खुप छेडले असता, आम्ही गायीला फार मोठी जखम करत नाही, अगदी थोडीशीच करतो, त्याने गाईला अजिबात दुखत नाही. ( गाय स्वताच मान पुढे करत असावी. ) असे सांगितले. अरे पण मुळात रक्त मिसळायची गरजच काय, असे विचारल्यावर तो म्हणाला, कि नाहीतर दुध बादते. आता काय बोलणार ? कप्पाळ ? एरवी त्याचे त्याच्या गायीवर खुप प्रेम असे. ( त्यांच्याकडे लग्नात मुलीच्या वडीलाना गायी द्याव्या लागतात. तरच मुलगी मिळते. ) मला तो रोज गायीचे कौतुक सांगत असयचा. त्याची एक गाय गाभण होती. तिला वासरु झाल्यावर, चीक आणुन दे म्हणुन मी खुप मागे लागलो होतो. तो थेट नाही म्हणाला नाही, पण त्याने तो आणलाहि नाही. एरवी माझ्यासाठी काहिहि करणारा, हे एवढे का ऐकत नाही, म्हणुन मला जरा रागच आला होता. त्याला मी एकदा चिडुनच विचारले, तर त्याने सांगितले, दिनु ते स्पेशल दुध गायीच्या बाळासाठी असते, आपण नाही प्यायचे ते. गाय शाप देते. मला एकदम गहिवरुन आले. ( लुईस चा खरा ऊच्चार लुई एवढाच आहे हे त्याला पटवुन मी त्यला फक्त लुई म्हणायचो, त्याची परतफेड म्हणुन तो मला दिनु म्हणु लागला. ) केनयामधे आंब्याला दोनदा बहर येतो. जुन आणि डिसेंबर मधे. पण ज्याने देवगड वा रत्नागिरीचा आंबा खाल्लाय त्याला तो आंबा आवडणे शक्यच नाही. कैर्या मात्र त्याच चवीच्या असायच्या. पण बाजारात कैर्या मिळत नसत. मग मी लुईसच्या मागे लागायचो, मला कुठुनतरी कैर्या आणुन दे म्हणुन, तर त्याने कच्चे फळ खल्ले तर मलेरिया होतो असे सुनावले. ( हो त्यांचा असाच समज आहे. आणि ते लोक एड्सपेक्षा मलेरियाला जास्त घाबरतात. ) पण चिकाच्या अनुभवावरुन मी शहाणा झालो होतो, आम्ही जे खास मसाले घालतो, त्यामुळे कैरी बादत नाही, असे सांगुन त्याला मी कैर्या आणयला लावल्याच. आणि मग त्यालाहि कैर्यांच्या लोणच्याची चटक लागली. एकदा त्याला आग्रहाने जेवायला बोलावले, तर माझे साधे जेवण त्याला खुप आवडले. मी त्याला तुला वाटेल तेंव्हा जेवायला ये, असे सांगितले. तो म्हणाला पैसे देत जाईन. त्याचा स्वाभिमान जपण्यासाठी मी त्याच्याकडुन पैसे घेऊ लागलो. पण मला जेवणासाठी कंपनी मिळु लागली. आमची रविवारची भटकंती पण सुरु झाली. त्याने लहानपणापासुन सदाहरित जंगल बघितल्याने, त्याला त्याचे काहि अप्रुप नव्हते. पण त्याला मी तु जिथे जिथे धबधबे बघितलेस, नद्या बघितल्यास, टेकड्या बघितल्यास तिथे मला घेऊन जा असे सांगुन ठेवल्यावर, त्याने मला अनेक सुंदर जागांची सफर घडवली. मी घरुन काहितरी खायचे करुन न्यायचो. ते खाऊन तो गाडीत एक डुलकि काढायचा, मी मात्र तिथला परिसर फिरुन घ्यायचो. त्याची डुलकि फार सावध असायची, आणि तो मला अजिबात नजरे आड होवु द्यायचा नाही. जरा बाजुला गेलो तर आरडाओरडा करायचा. एकदा त्याने मला युगांडाची सफर घडवुन आणली. कुठे जायचे हे त्याने सांगितले पण नव्हते. भन्नाट गाडी हाकत आम्ही युगांडा बॉर्डरवर गेलो. तिथे बॉर्डर रेग्युलेशन्स नसल्याने, नुसते नाव सांगुन युगांडात जाता येते. आम्हाला गाडी न्यायची परवानगी नव्हती. तिथे फ़िरण्यासाठी, एक सायकल रिक्षा होती. सायकलच्या मागच्या कॅरियरवर एक बैठक लावलेली असे, पण ती असे चालकाच्या पाठीला पाठ लावुन. त्याला म्हणतात बोडाबोडा. पण त्यावर एकच माणुस बसु शकतो. लुईसने शक्कल लढवली. त्याने त्या चालकाला पटवले आणि तो स्वता चालक बनला, आणि मी मागे. आणि आम्ही मस्त फेरफटका मारला. सकाळीच निघाल्याने, मी काहि खायला करुन नेले नव्हते. मग आम्ही फक्त तिथेच मिळणारी खास केळी खाली. चांगली फ़ुटभर लांब, पिवळीधम्मक अशी हि केळी चवीला पण खुप छान असतात. पण एक केळे खाल्ले को पोट तुडुंब भरल्यासारखे होते. तिथल्या प्रथेप्रमाणे त्याला एक गर्लफ़्रेंड पण होती, आणि लग्नापुर्वी शरिरसंबंध ठेवणे, मुले होवु देणे, हे तिथे सर्वमान्य होते. त्याला यापासुन परावृत्त करणे, मला जडच जात होते. याबाबतीत तो माझ्याशी खोटे बोलतोय, असा माझा ग्रह होवु लागला. माझा करार संपल्यावर तो मला सोडायला नैरोबीपर्यंत आला. ईमिग्रेशन काऊंटरपर्यंत त्याने माझी पाठ सोडली नव्हती. मला पण तुझ्याबरोबर ने असा धोशा लावला होता त्याने. मी फ़क्त त्याला आशिर्वाद देऊ शकत होतो. माझी आठवण म्हणुन त्याला मी एक सोन्याची अंगठी करुन दिली. तो जेवणासाठी देत होता ते पैसे मी बाजुला ठेवले होते, त्यात माझी भर घातली. अर्थात आठवण ठेवायला अश्या एखाद्या मुद्रिकेची दोघाना गरज होती, असे अजिबात नाही. अपुर्ण...
|
| |
| Tuesday, April 25, 2006 - 3:35 pm: |
|
|
त्यांची खाद्यसंस्कृति डिड यु ईट युअर क्रिस्मस वेल ? हा केनयातला अगदी कॉमन प्रश्ण. याचाच दुसरा अर्थ कि एरवी सगळे वर्षभर ते एकाच प्रकारचे अन्न खातात. आणि क्रिस्मसची मेजवानी काय तर, केक वैगरे नाही, ते आहे चपाती. येस चपाती हे त्यांचे पक्वान्न आहे. त्याला ते चपातीच म्हणतात. पण तुम्ही ऑलींपिक मधे धावण्याच्या शर्यतीत कायम केनयाचे खेळाडु आघाडीवर असल्याचे बघत असाल. याचे बरेचसे श्रेय, त्यांच्य देशातील हवामान, आणि त्यांचा आहार याला असावे. अर्थात मेहनतीचे मोल मी कमी लेखत नाही. तर सर्वसाधारणपणे केनयन लोकांच्या आहारात, मसाले नसतात, तेल हि अभावानेच असते. मीठहि आवश्यक आहे असे नाही. मग खातात काय ? तर मका, राजमा आणि कंदमुळे. मका हे त्यांचे मुख्य अन्न. त्यांची कणसे सहज नऊ दहा ईंच लांब असतात. दाणे चांगले टप्पोरे आणि पांढरेशुभ्र. पण त्याना जुन कणसे जास्त आवडतात. जुन म्हणजे ईतकी जुन कि आपल्यासारख्या लोकांच्या दाताचे बारा वाजलेच पाहिजेत. ( ते जरी काळे असले, तरी त्यांचे दात मात्र पांढरेशुभ्र असतात आणि मजबुत देखील. कुठल्याच काळ्या माणसाला मी कधी सॉफ़्ट ड्रिन्कची बाटली ऊघडण्यासाठी बॉटल ओपनर वापरताना बघितले नाही. ) तिथे कणसे सालासकट ऊकडायची पद्धत आहे. मीठ त्याना लागतेच असे नाही. बाजारात क्वचित खास ईंडियन लोकांसाठी कवळी कणसे यायची. रोजच्या जेवणात काहि कणसे ऊकडुन खात नसत. त्यासाठी मक्याचे जाडसर पीठ वापरत. त्याला शब्द होता ऊंगा. मग या पिठाची ऊकड काढत. आपण ऊकडीच्या मोदकासाठी काढतो तशीच. आणि ती ऊकड हे त्यांचे मुख्य अन्न. या ऊकडीला म्हणायचे ऊगाली. नॉर्मल भुकेचा माणुस एकावेळी दोन किलो ऊंगाची ऊकड सहज खाऊ शकतो. पण ते त्याचे कदाचित दिवसातले एकमेव जेवण असते. जर घरात दुर्भिक्ष्य असेल तर, जरा कमी ऊंगा वापरुन, पातळसर पेज केली जाते. दुकानामधे हे रवाळ पीठ दोन किलोच्या पाकिटात ऊपलब्ध असायचे. ( आम्ही पण हे पीठ आवडीने खायचो. पण त्यांच्यासारखी ऊकड वैगरे न काढता त्याचा ऊपम्यासारखा प्रकार करायचो. तो फार रुचकर लागायचा, पण मका पचवणे हे तसे येर्यागबाळ्याचे काम नाहीच. माझ्या आजोळी मक्याची भाकरी करतात. अतिशय चवदार लागणारी हि भाकरी, एक अख्खी खाल्ली म्हणजे पोट भरलेच. ) हे पीठ जरा कोंडा वैगरे काढुन केलेले असायचे, म्हणजे त्यामानाने पचायला हलके. ते लोक मात्र अख्ख्या मक्याचे सरबरीत पीठ खायचे. बाजारात ते सुटे विकायला असायचे. या ऊगालीबरोबर राजमा खायचे. मी जरी राजमा हा शब्द वापरला असला तरी आपल्याकडच्या राजम्यापेक्षा हे जरा वेगळे असायचे. दाणे त्यापेक्षा मोठे गुलाबी व किंचीत नक्षी असलेले असायचे. शिजुन ते आणखी मोठे होत. हे दाणे फ़क्त ऊकडुन ते खात असत. अर्थात आम्हीहि खायचो. खुप चवदार लागायचे हे दाणे. तिसरे आवडते खाद्य म्हणजे कसावा. कसावा हे कंदमुळ आहे. याचे झाड साधारण दोन मीटरपर्यंत वाढते. लांब देठाला सप्तपर्णीच्या झाडासारखी पाने येतात. आणि जमिनीखाली सभोवार कंदमुळे लागतात. एका झाडाला सहा ते आठ पोसलेली मुळे लागतात. दीड दोन फ़ुट लांब व दीड दोन ईंच व्यासांची हि मुळे वरुन चॉकलेटी रंगाची असतात. यांची साले सहज सुटतात व आतले मुळ पांढरे शुभ्र असते. हे मुळ ऊकडुन खातात. या मुळात थोडा सायनाईडचा अंश असल्याने, ते झाकण न ठेवता ऊकडावे लागते, व ते ऊकडलेले पाणी फेकुन द्यावे लागते. हा कंद साधारण बटाट्यासारखाच लागला तरी चवीत किंचीत फरक आहे. हा गर पांढराशुभ्र असतो व अजिबात चिकट नसतो. तसा हा कंद कच्चा असताना बराच कडक वाटला तरी सहज शिजतो. कच्छाच तळताहि येतो. तिथे कसाव्याचे आणि मक्याचे भरपुर पिक येते. या झाडाच्या वीतभर लांबीच्या काठ्या खोचुन, याची लागवड करतात. यासारखेच अरारुट पण तिकडे, खास करुन डोंगर्आळ भागात खातात. ऊकडलेली रताळी हे पण त्यांचे आवडते खाद्य. ती बाजारात ऊकडलेली मिळायची. एकेक रताळे सहज ४०० ते ५०० ग्रॅमचे. चवीला खुप गोड तरी एकापेक्षा जास्त काय खाणार. पोट गच्च होवुन जायचे. ते लोक बटाटे पण खायचे. अर्थात नुसते ऊकडुन. पण त्याना तिथे नुसते पोटॅटो न म्हणता, आयरिश पोटॅटो म्हणतात. मक्याचे दाणे आणि राजमा एकत्र ऊकडुन पण ते खायचे. आपल्या हुरड्यासारखाच प्रकार. तोहि बाजारात तयार मिळायचा. ते लोक तसाच खायचे, आम्ही त्यावर तिखट मीठ, लिंबु वैगरे घालुन खायचो. त्यांच्याकडे कोयरो नावाची एक भाजी करतात. लाल भोपळ्याच्या फोडी, लाल भोपळ्याचाच कोवळा पाला, मक्याचे दाणे, वैगरे घालुन केलेला हा प्रकार, आपल्या ऋषिपंचमीच्या भाजीसारखा लागायचा. चपाती हे त्यांचे पक्वन्न. साधारण आपल्या पराठ्यासारखीच ते करतात. पण गव्हाच्या पिठापेक्षा मैद्याची जास्त आवडीने खल्ली जाते. हॉटेलमधे खिमा चपाती असा एक प्रकार मिळायचा. खिम्याचे सारण भरुन केलेला चौकोनी पराठा असायचा तो. ऊस पण ते फार आवडीने खातात. पण आपल्यासारखी गंडेरी वैगरे करुन नाही. त्यांच्या मजबुत दातामुळे, ते अगदे अगदी पेर देखील कडाकड चावुन खाऊ शकतात. जेवणात मटणाचा वापर अगदी मर्यादित. तेसुद्धा शक्यतो बार्बेक्यु करुन. त्याला शब्द होता न्यामा चोमा. तेल,तुप वा मसाले यांचा वापर न करता, थेट आचेवर खरपुस भाजलेले हे मटण असे. आता मटण कुठल्या प्राण्याचे, हा प्रश्ण आफ़्रिकेत तरी गैरलागु आहे. हरिण, जिराफ, झेब्रा, हत्ती, मगर ईत्यादी प्राण्यांचे मटण तर हॉटेलच्या मेनुअवरदेखील असायचे. मॉनिटर लिझार्ड चा उल्लेख वर आलाच आहे. तसेच ईतर प्राणीहि खात असत. काहि प्रकारचे मासे धुर लावुन ठेवायची पद्धत त्यांच्याकडे आहे. काहि ऊन्हात सुकवुनहि खातात. पण एकंदर मासे त्यांच्या आहारात कमीच. आमच्या फ़ॅक्टरीत बरेचसे स्वॉलो पक्षी येत. आमचे कामगार, हाताच्या एका फटक्याने ते पक्षी पकडुन, लंचटाईममधे भाजुन खात असत. आधी तो पक्षी मुठभर. त्याला खाऊन त्यांचे पोट काय भरणार ? पण खात असत हे नक्की. कुठलाहि पक्षी खाताना, त्याचे पित्ताशय दुर करावेच लागते, नाहितर सगळा पक्षी कडु होवुन जातो, पण ते असे करत असत, का ते माहित नाही. गायीचे रक्त मिसळुन दुध पिणे अगदी कॉमन. ताक पण आवडीने पितात ते. ( ताकाला माला म्हणतात. बाजारात ते टेट्रा पॅकमधे तयार मिळते. ) पण दुधाची पावडर करणे मात्र त्याना अमान्य आहे. हॉलंडहुन एड म्हणुन आलेली पावडर जेंव्हा त्याना फ़ुकट वाटण्यात आली होती, तेंव्हा त्यानी त्या पावडरीने झोपड्यांच्या भिंती रंगवल्या होत्या. त्याना पिवळा मकाहि अजिबात आवडत नाही, मदत म्हणुन अमेरिकेतुन आलेला पिवळा मका, त्यानी स्वीकारला नव्हता. त्याना ब्रेड आवडतो, पण स्लाईस केलेला ब्रेड आवडत नाही. अर्धा किलो पावाचे ते दोन्ही हाताने, फ़ारतर तीन तुकडे करुन चहाबरोबर खातात. मसाले फारसे नसतात असे वर लिहिले आहेच, पण हल्ली हॉटेलात काहि प्रमाणात तिखट खायचे प्रमाण वाढतेय. मिरचीला ते पिली पिली म्हणतात. ( याबाबतीत एक विनोद सांगण्यासारखा आहे, माझ्या मित्राने बटाटा चिप्स मागवल्या, कारण मला खाता येण्यासारखा एकच पदार्थ होता. त्याने हकुना पिली पिली बाना, असे ओरडुन सांगितले. मी त्याच्या बायकोला पिली पिली चा अर्थ विचारला तर ती म्हणाली शायद, हरि मिर्चीको पिली पिली कहते है. त्यावर मी म्हणालो होतो, कैसे लोग है, हरि को पिली कहते है, कहि बीबी को साली तो नही कहते, त्यावर आम्ही खो खो हसलो होतो. ) भारतात चिकन पिरी पिरी नावाची जी डिश मिळते, त्याचे मुळ तिथे आहे. सॉफ़्ट ड्रिंक्स पण त्याना खुप आवडतात. सर्व सॉफ़्ट ड्रिंक्सना मिळुन सोडा हाच शब्द वापरतात. ते कुठले आहे याबद्दल त्याना फारशी कदर नसते. अगदी चोखंदळ असेल तोच दोडा या फ़ंटा किंवा सोडा या कोक मागतो, एरवी त्याला तो बरिडी कबीसा म्हणजे अगदी थंडगार असला कि चालतो. हि झाली त्यांची खाद्यसंस्कृति, तिथे असताना आम्ही काय खात होतो, ते पुढल्या भागात. अपुर्ण..
|
| |
| Wednesday, April 26, 2006 - 3:43 pm: |
|
|
आमचीहि खाद्यसंस्कृति गुजराथी असल्यामुळे, केनयात माझी खाण्यापिण्याचे हाल होणार नाहीत, याची खात्री होती. ( खाणेपिणे हा जोडशब्द एक रित म्हणुन वापरला, माझ्या बाबतीत पिणे या क्रियापदाला, 1d तसले 1d अर्थ चिकटलेले नाहीत. ) मी घर बदलल्यापासुन, सखी शेजारिणीच्या क्रुपेमुळे, मला सकस दुध मिळु लागले. तिथे दुधाचे प्रमाण साधारण पाऊण लिटर म्हणजे एक युनिट असे आहे. तेसुद्धा प्लॅष्टिकच्या जेरी कॅनमधुन यायचे. दुध गायीचे असायचे. खुपच दाट आणि चवदार असायचे. साय तर भरपुर यायचीच, शिवाय भांडे ईतके ओशट व्हायचे, कि तीन चार वेळा साबणाने धुवावे लागायचे. सकाळचा चहा, व रात्रीची कॉफ़ी एवढेच दुध मी प्यायचो. बाकिच्याचे विरजण लावायचो. पण ते तरी कुठे संपवणार. मग चपातीचे पीठ दुधातच भिजवायचो. आणि साय भाजीत मिसळुन घ्यायचो. भारत आणि श्रीलंका मधला चहा जगप्रसिद्ध असला तरी, मला केनयातला चहा खुप आवडायचा. पुर्ण दुधाचा चहा करत असल्यामुळे, आपल्याप्रमाणे ऊकळता यायचा नाही. मग मी रात्रीच कपभर दुधात, चहा पावडर घालुन ठेवायचो. सकाळी फ़क्त गरम केला कि झाले. काय फ़क्कड चव यायची त्याला. गावात घरगुति गुजराथी खाणावळी होत्या, आणि शाकाहारी म्हणावे असे एकच हॉटेल होते. बाकि हॉटेलात माझ्यासाठी काहि मिळायचे नाही, त्यामुळे कॉलनीतली घरे, हीच माझ्यासाठी आयते जेवण मिळायची जागा होती. महिन्यातुन दोनतीनदा आम्ही सगळे मिळुन अंगतपंगत करत असु. मी ज्या कंपनीत कामाला होतो, त्यांची व्हीट मिल होती, त्यामुळे चपातीसाठी मला छान पिठ मिळत असे. पण ते पॅकेट असायचे पंधरा किलोचे, मग शेजारणीबरोबर वाटुन घ्यायचो. मक्याची पीठ रवाळ असायचे, त्याच्या भाकर्या करता यायच्या नाहीत, पण जिरे वैगरे फ़ोडणीला टाकुन, ऊपमा करायचो, तो मात्र छान व्हायचा. केनयाच्या काहि भागात उत्तम तांदुळ व्हायचा. त्याला पेशोरी म्हणायचे. आपल्याकडच्या सुरती कोलमसारखा असायचा तो. खुप चवदार लागायचा तो. खास गुजराथी खिचडीसाठी चिकट तांदुळ पण मिळायचा. कसावा ही आमच्या हातात मिळालेली जादुची काठी होती. त्यावर आमचे खुप प्रयोग व्हायचे. त्याची खीर, वेफ़र्स, सुरळीच्या वड्या, बटाटेवडे, पॅटिस असे असंख्य प्रकार करायचो आम्ही. ईथल्याप्रमाणे गुजराथी बायका तिथेहि काहिनाकाहि करुन विकत असत. त्यामुळे कसाव्याचे पापड, भोकराचे लोणचे, सरबते, सुपार्या, असे बाजारात मिळत असे. आमच्याच कंपनीचे गुर्हाळ होते. तिथला गुळ हा बहुदा, बियरचे आंबवण करण्यासाठी वापरत असत, पण त्यातहि ए ग्रेडचा गुळ आम्ही खाण्यासाठी वापरत असु. तोहि खुप चवदार लागायचा. तुरीच्या वैगरे डाळी तिथेच पिकवल्या जात असत. पण त्या आपल्यासारख्या ग्रेडेड नसत. त्यामुळी ती फ़ार निवडावी लागे, पण तीपण खुप चवदार लागे. पांढर्या तीळाचेपण तिथे छान पिक येते. अगदी ५ शिलिंगला किलोभर मिळायचे. पण तेहि धुवुन वैगरे घ्यावे लागत. भाज्यांची मात्र चंगळच असायची. खास करुन बुधवारी आणि रविवारी, खास भारतीय भाज्या विकायला यायच्या. वांगी, फ़्लॉवर, कोबी, भोपळा, भेंडी, पातीचा कांद वैगरे छान मिळायचे. पालक, मेथी पण मिळायचे. आपल्या माठासारखी दिसणारी एक स्थानिक भाजी होती, ती खुप चवदार लागायची. सोयाबीनच्या ओल्या शेंगा मिळायच्या, या शेंगा खुप केसाळ असत, आणि सोलणे फार जिकीरीचे असे, तरिही हे श्रम वाया जात नसत, कारण त्याचे दाणे खुप चवदार लागत. मी वर ज्या राजमाचा ऊल्लेख केला, त्याच्या कोवळ्या शेंगा फ़रसबीसारख्याच दिसत, त्यापण चवदार लागायच्या. मुळा, गाजरे खुप असायची, पण तिथल्या मुळ्याची पाने खुप खाजरी असायची. खाता येत नसत. मुळा मात्र चवदार असायचा. कडीपत्ता, विकत घ्यायची गरज नसायची, कारण जागोजाग त्याची झाडे होती, तिथुन तोडुन आणला कि झाले. नविन घरात गेल्यावर भाजीवाल्या घरी यायला लागल्या. त्याना फ़ोगामामा म्हणायचे. ( फ़ोगा म्हणजे भाजी आणि मामा म्हणजे बाई ) दुपारचा वेळ त्यांच्याशी घासाघीस करण्यात जायचा. तिथे सहसा कुणी भाजीवाल्याना घरात येऊ देत नाही. घराच्या बाल्कनीमधुन दोरीने बास्केट खाली सोडुन भाज्यांची खरेदी होत असे. माझ्या पायरीवर मात्र त्या हक्काने बसायच्या, थंडगार पाणी प्यायच्या. ऊद्या काय भाजी आणु असे विचारुन हवी ती भाजी आणुन द्यायच्या. बसल्या बसल्या शेंगा वैगरे सोलुनहि द्यायच्या. तशी घासाघीस करायची गरज ऊरली नाही, मी दिलेले पैसे मुकाट्याने घेऊन जात असत त्या. कधी कधी बाजारात न मिळणारी एखादी भाजी त्या आणुन द्यायच्या मला. शेवग्याच्या पाला, पण त्यानी आणुन दिला होता मला. भाजीचा फ़णस पण असाच आणुन दिला होता, केळफुल आणुन दिले होते. या भाज्या बाजारात मिळाल्या नसत्या. किसुमुपासुन जवळ एक एलडोरेट नावाचे गाव आहे. या गावची हवा वर्षभर ईतकी छान असते, कि तिथे मश्रुमचे अमाप पिक येते. खुप चवदार असायचे हे मश्रुम्स. तेहि ताजेच मिळायचे आम्हाला. गल्फप्रमाणे फ़्रोझन भाज्या, किंवा टिनमधल्या भाज्या तिथे कधी खाव्या लागल्या नाहीत. तिथे एकंदर भाज्यांची अशी चंगळ होती तरी, आजुबाजुची सुपीक जमिन मला खुणावत होती, आणि मी तिथे शेतीचे प्रयोग केले, त्याबद्दल पुढच्या भागात. अपुर्ण..
|
| |
| Thursday, April 27, 2006 - 3:29 pm: |
|
|
शीतीचे प्रयोग. मी वर फ़ोगामामाशी घासाघीस असे लिहिले, पण त्या घासाघाशीचे काहि नमुने, तुम्हाला नक्कीच वाचायला आवडतील. त्या तिघीजणी होत्या, माझ्याकडे यायला त्या बरिच पायपिट करत असाव्यात. एकदा, तिच्या हातात शेवग्याची शेंग होती, मझुंगु मलिबु ( हे त्या गावाने मला ठेवलेले नाव. हे नाव कसे रुढ झाले, वा कुणी ठेवले हे मला माहीत नाही. मझुंगु म्हणजे गोरा आणि मलिबु म्हणजे टिचर. आता ते माझ्याबाबतीत किती अर्थहिन आहे, ते वेगळे सांगायला हवे का ? पण मला गावातली लहान मुलेहि याच नावाने ओळखत असत. ) तु हे खातोस का ? माझ्या चेहर्यावर आनंद दिसला असावा, मी म्हणालो दे आणखी असतील तर. मग त्या तिघींचे आपापसात बोलणे झाले. माझ्या अंदाजाने ती दुसरीला सांगत होती, मी नव्हते म्हणाले, हा येडा काहिहि खातो म्हणुन. दहाबारा शेंगाचे तिने फ़क्त दोन शिलिंग घेतले. ( साधारण एक रुपया ) मग ती म्हणाली मझुंगु आमच्या वाटेवर याचे झाड आहे, तिथे बकर्या आडव्या आल्या, त्याना हाकायला म्हणुन मी हि शेंग तोडली, तर हि मामा म्हणाली, आणखी घे, तो विकत घेईल. मग मी म्हणालो अरे तुमच्या वाटेवरच झाड आहे, तर ऊद्या थोडी पाने तोडुन आणा. तर ती बाई, डोळ्यात, अयायी गं, पार कामातनं गेला कि हा, असे भाव आणत म्हणाली, अरे बकर्यापण खात नाहीत हा पाला, तुला कश्याला हवा, डास वैगरे पळवणार आहेस कि झाडु म्हणुन वापरणार आहेस ? मी म्हणालो मी खाणार आहे, तर परत तिच्या डोळ्यात, ईतकी का वाईट परिस्थिती आहे याची, असे भाव आणुन ती म्हणाली ऊद्या आणते, पैसे नाही दिलेस तरी चालतील. आणि खरेच तिने आणुन दिला पाला. केळफुल आणि भाजीचा फणस यांच्याबाबतीत थोडे कमी वाद झाले. केळफुलाचे तर मी चित्र वैगरे काढुन दाखवले. ( त्याला अनुक्रमे रोपोला आणि फणसा असे शब्द आहेत. ) पण तरिही या वस्तु खाण्यायोग्य आहेत, हे तिला शेवटपर्यंत पटले नाही. मग ती शावरी याको ( जशी तुझी मर्जी ) म्हणायची, पण आणुन मात्र द्यायची. तिलाच मी कसावाच्या फांद्या आणुन द्यायला सांगितले, आता त्यापण खाणार का तु, हे विचारायचे तिने टाळले. पण विचारले असते तरी तिला काय समजावणार होतो मी सृजनातला आनंद. ? तिथे कुठेहि हि झाडे मजेत वाढत असत, म्हणुन सुरवात त्याने केली. तिथली माती कोकणासारखीच लाल. पण दगड अजिबात नाहीत. रोजचा पाऊस म्हणुन तिथे गवत आणि ईतर झाडांचे फार रान माजायचे, ते साफ करुन्न घेतले. आणि कसाव्याचे कुंपण केले. एका बाजुने मका लावला. दोन्ही झाडे जोमाने वाढु लागली. मक्याच्या झाडाला दोन तीन मोठी कणसे लागायची शिवाय न पोसलेली पण बरीच लागायची, ती आम्ही बेबी कॉर्न म्हणुन खायचो. तिथे बाजारात मुळासकट पालकाची गड्डी मिळायची. ती पण खोचली तर छान वाढली. त्याला तुरे येऊन बिया पण लागल्या. बाजाराच्या वाटेवरच कडिपत्त्याची झाडे होती. त्या झाडाखाली कायम पिल्ले ऊगवलेली असतात. त्यातली दोनतीन ऊपटुन आणली. मग तर काय फ़ोडणीला तेल तापत ठेवुन, कडिपत्ता तोडायला जायची ऐश करु लागलो. तिथल्या सुपरमार्केटमधुन मुळा, गाजर, कोबी यांच्या बिया मिळवल्या. तीहि जोमाने वाढु लागली. कोबीच्या गड्ड्याला खुप मशागत लागते, तेवढी न केल्याने गड्डे पोसले नाहीत. मुळ्याची ती जात जरा वेगळीच आहे. पाने खुप खाजरी होती त्याची. म्हणुन मी तसेच राहु द्यायचो, तर ते छान पोसुन दीड फ़ुट लांब व्हायचे, पण मग खाण्यायोग्य रहायचे नाहीत. त्याचे तुरे परत खोचल्यावर त्याला मात्र छान डिंगर्या लागल्या. मी वर जो त्यांच्या राजम्याचा ऊल्लेख केलाय तोहि पेरला. त्याचा आपल्या फ़रसबीप्रमाणे वेल न होता, केवळ फ़ुटभर ऊंचीचे झड होते. आणि त्या झाडाला असंख्य शेंगा लागतात. कोवळ्या शेंगा फ़रसबीसारख्याच दिसतात, आणि त्यांची भाजीहि छान होते. भारतातुन मी माझ्या आवडीचे म्हणुन खुटावळे ( डबल बीन्स ) नेले होते. त्याचा वेलहि खुप माजला. दर रविवारी अर्धा एक किलो शेंगा मिळु लागल्या मला. कारल्याच्या बियाहि मी नेल्या होत्या. कारली धरली कि मी त्यांच्या टोकाला दोर्याने बारिकसा दगड बांधुन ठेवायचो. त्यामुळे कारले सरळ आणि लांब व्हायचे. भरताची वांगी पण खुप लागायची. मी एकदा संगीतासाठी म्हणुन ऑफ़िसमधे वांगी घेऊन गेलो, तर माझे काळे सहकारी त्याच्याकडे कुतुहलाने बघत राहिले. जेम्सने विचारले, ते काय आहे, मी ब्रिंजल म्हणुन अभिमानाने सांगितले, आणि वर हे पण सांगितले कि ते अगदी मटणासारखे लागते, तर तो म्हणाला मग मटणच का खात नाही ? तिथे आम्हाला संध्याकाळी सुर्यास्तानंतर कुठेहि बाहेर पडता येत नसे. शनिवारी, रविवारी भरपुर मोकळा वेळ. पाणी घालायची गरज नाही, हवा ऊत्तम, या सगळ्यांमुळे माझ्या परसात भरपुर भाज्या व्हायच्या. आणि मग कॉलनीत देवाण घेवाण व्हायची. मिरची, पुदिना, आले, टोमॅटो वैगरे तर आम्ही कॉमन जागेतच लावले होते. आणि ज्याला हवे त्यानी तोडुन न्यायचे असे ठरवले होते. शिवाय कॉलनीभर मी झिनिया, चित्तरंजन, झेंडु, संक्रांत वेल, बदकाची वेल, आईसक्रीम क्रीपर, तिळाची फुले यांची बाग केली होती. खरे तर एकदाच बिया टाकल्या होत्या, आणि त्याचा अमाप विस्तार झाला होता. माझ्या फोगामामा पण कौतुकाने माझे प्रयोग बघायच्या. त्यातल्या एकीला माझी दया येऊन, तिने, मी तुला हे सगळे विकायला मदत करु का, असेहि विचारले. नारायण सुर्व्यांच्या, कविते ऐवजी रद्दी विकली असती तर, या कवितेची आठवण झाली. जशी भाज्यांची चंगळ तशीच फ़ळांचीहि. आणि अर्थात ते आता, पुढल्या भागात. अपुर्ण...
|
| |
| Friday, April 28, 2006 - 3:48 pm: |
|
|
केनयाचे हवामान, अनेक फळाना पोषक आहे. तिथली केळी खुपच चवदार असतात. आकाराने अगदी लहान, म्हणजे आपल्या वेलची केळीसारखी, पण चवीला मात्र खुप गोड. लहान असल्यामुळे, एकावेळी पाच सहा सहज खाता येतात. या केळ्यांपासुन तिथे बीयर करतात. टस्कर नावाची हि बीयर पण खुप चवदार असते. ( म्हणे. ) तिथे अननसाचे अमाप पिक येते. मी वर उल्लेख केलेया खेल सिनेमात, माला सिन्हा अननसाच्या शेतात दाखवली आहे. तिथला अननस चांगलाच गलेलठ्ठ असायचा. पानाला कडेने काटे नसायचे. डोळे आपल्या अननसाप्रमाणे खोल नसायचे, त्यामुळे तो कापताना कोरीव काम करत बसावे लागायचे नाही. गर पिवळा नसुन पांढरा असायचा. कापताना खुप रस गळायचा. चवीला पण खुप छान लागायचा. आपल्यासारखी मुरमुरणारी चव नसायची. स्वाद मात्र किंचीत कमी असायचा. या अननसापासुन पण तिथे दारु करतात. तिथे पॅशन फ़्रुटचे अमाप पिक येते. तिथे जाण्यापुर्वी भारतात मी हे फळ बघितले नव्हते, पण श्री. नंदन कलबाग यांचा लेख मात्र खुप वर्षांपुर्वी वाचला होता. ईतक्या उत्तम चवीचे हे फळ आपल्याकडे लोकप्रिय का नाही, ते कळत नाही. तसे आपल्याकडच्या हवेतहि हे फळ उत्तम येऊ शकते. या फळाचे दोन प्रकार आहेत. एक असते साल केशरी रंगाची असलेले. ( हे आपल्याकडेहि आता तुरळक प्रमाणात का होईना, मिळु लागले आहे. ) साधारण गोल्फ़च्या बॉल एवढा आकार असतो याचा. आतमधे असंख्य काळ्या बिया असुन, बियाभोवती एक जेलीसारखा गर असतो. नुसते खाल्ले तर हे फळ चवीला खुप आंबट लागते. गाळणीवर त्याचा गर चमच्याने रगडुन गर बियांपासुन वेगळा करावा लाअग्तो. मग त्यात साखर घालुन सरबत करता येते. याचा दुसरा प्रकार, जो केनयात मिळतो, तो मात्र खुपच चवदार असतो. त्याची साल अंजीरी रंगाची असते आणि गर केशरी रंगाचा. याला अननस, आंबा आणि मोसंबी याचा एकत्रीत स्वाद येतो. या फळाचा टिकाऊ ज्युस तिथे वर्षभर मिळायचा. आईसक्रिमपण मिळायचे. आपल्याकडे पण आता हे मिळु लागले आहे. तसे हे फळहि टिकाऊ आहे. खुप दिवस ठेवले तर ते सुरकुतते, गरहि सुकतो, पण तरिही तो पाण्यात कुस्करुन, सरबत करता येते. आपल्याकडे जो ज्युस मिळतो, तो स्वादात खुपच कमी पडतो. मी वर ऊपद्व्याप करुन सरबत करायची रित दिलीय खरी, पण स्थानिक लोक हे फळ तसेच खात असत. तिथे अवाकाडोची पण खुप झाडे आहेत. त्यावेळी मुंबईत हे फळ मिळत नसे, पण आमच्या कुर्गी शेजारीणीने मला ते तिथे आणुन दिले होते, ते कसे खायचे हे पण तिनेच दाखवले होते. ह्या फळाचे झाड पण खुप देखणे असते. अगदी डेरेदार आणि सदाहरित असते ते. हे फळ झाडावर पिकत नाही, हिरवे असतानाच काढतात, मग त्याची साल किरमीजी झाली कि पिकले म्हणायचे. पिवळ्या आणि हिरव्या रंगाचिही एकेक शेड या फळाच्या नावाने ओळखली जाते. आतमधे वरुन हिरवा व आतुन पिवळा लोणासारखा गर असतो. ( याला बटरफ़्रुट पण म्हणतात. ) आतमधे आक्रोडाएवढी एकच बी असते. ती काढुन त्या खळग्यात साखर दुध घालुन, त्यात तो गर कुस्करुन आम्ही खायचो. अगदी आईसक्रीमसारखे लागते ते. दुधात घालुन ब्लेंड पण करता येते. साखर न घालता लिंबु मीठ वैगरे घालुन, डिप करता येते. पण या गरात असे काहितरी घालावेच लागते, नुसता गर अगदी बेचव लागतो. केनयातले लोक मात्र हे फळ तसेच खात असत. ( मला हेवा वाटायचा त्यांचा, आपल्यासारखी त्यांची रसना मीठ साखरेला चटावलेली नाही. ) आपल्याकडचे आलु बुखार, म्हणजे प्लम्स पण तिथे भरपुर मिळायचे. आपल्याकडचे लाल असतात तर तिथले पिवळे. आपल्याकडे ते जितके काळसर तितके गोड असा प्रकार असतो, तिथे मात्र ते सगळेच गोड निघायचे. याचा सिझन थोडा असायचा, आणि तिथले भारतीय त्याची वाट बघत बसायचे. तिथल्या पपया पण गोड असायच्या. पपयाची झाडे माझ्या घराच्या मागे पण बरिच होती. पक्षीसुद्धा त्यावर तुटुन पडायचे. सुर्यपक्ष्यासारखे काहि पिटुकले पक्षी तर पपईच्या आत जाऊन गर खात असत. संत्री आणि पेरु पण आपल्यासारखेच असायचे, ( त्याना मसिंदा आणि मफेरा अशी नावे होती. ) आंबे मात्र गोड असले तरी बेचव वाटायचे, कारण त्याना ना आपल्या आंब्याचा गंध ना रंग. जांभळाना त्यांच्या भाषेत जांभळेच म्हणतात. ती मात्र आपल्यापेक्षा टप्पोरी आणि गोड असायची. करवंदे बाजारात नसत, पण आजुबाजुला त्याची झाडे होती. आणि मी ती तोडुन आणत असे. केनयामधे हॅझेलनटचे ऊत्पादन भरपुर होते. त्याला तिकडे मकाडामिया म्हणतात. त्यांची प्रमुख निर्यात त्याची आहे. ( चहा, फुले, पर्यटन हे ईतर निर्यातशील ऊद्योग. ) लुईच्या आग्रहावरुन काहि रानमेवापण चाखता आला, काहिची चव छान असायची, तर काहि लुईसाठी खावी लागली. प्रत्येकवेळी तो ते फळ आधी खाऊन दाखवायचा. पण त्यालाहि त्यांची नावे माहित नसायची. केनयाच्या समुद्रकिनार्यावर, मोंबासा, मालिंदी वैगरे शहरे आहेत, तिथुन काजुगर यायचे. बाकिची फळेहि आयात केलेली असायची, पण गल्फ़मधे ती भरपुर खाल्ली असल्याने, मला स्थानिक फळेच जास्त आवडायची. चमकदार रंगाची, सारख्या आकाराची, एकसारख्या अतिगोड चवीची आयात केलेली फळे, देशाच्या मातीत नैसर्गिक रित्या वाढलेल्या झाडाची, आंबट गोड चवीच्या फळांशी कधी स्पर्धा करु शकतील का ? अजुन केनयातील लोक, संकृति, आर्थिक व्यवहार याबद्दल लिहायचे आहेच. अपुर्ण...
|
| |
| Saturday, April 29, 2006 - 3:40 pm: |
|
|
केनयातली माणसं एका शब्दात वर्णन करायचे तर केनयन माणसाला मी साधाभोळी म्हणेन. वर्णाने काळे असले तरी त्यांचे मन निर्मळ असते. पुरुष सर्वसाधारणपणे ऊंच आणि शिडशिडीत असतात. दात शुभ्र असले तरी डोळे मात्र तसे निस्तेज असतात. हातापायाचे तळवे मात्र खुपच ऊजळ असतात. त्यांचे केस कुरळे असले तरी ते फ़ार वाढवणे त्याना आवडत नाही, कारण वाढवले तर त्याना गरम होते. पोशाख शक्यतो शर्ट पॅंट असाच असतो. त्याना सुटचे फार आकर्षण असते, आणि प्रत्येकाकडे एकतरी सुट असतोच. तो सेकंड हॅंड का असेना, पण तो असायला हवाच. आणि तो ते नियमित वापरतात देखील. खरे तर त्याना नवे कोरे कपडे घेणे परवडतच नाही. पायातले बुटहि सेकंड हॅंडच असतात. शेहर्यावर अतिरिक्त गुबगुबीतपणा नसतोच. आपल्याला त्यांची चेहरेपट्टी एकसारखी वाटली तरी, त्यात सुक्ष्म भेद असतात. आणि त्यावरुन त्यांचा मुळ वंश त्याना बरोबर ओळखता येतो. अर्थात त्यामुळे वांशिक तेढ आहेच. मलाहि त्यांच्या चेहरेपट्टीतला किंचीत फरक ओळखता येऊ लागला होता. पुरुषांच्या मानाने बायका मात्र सुदृढ असतात. मी त्याना स्थुल नक्कीच म्हणणार नाही. तरुण मुली जरा बांधा वैगरे राखुन असतात, पण मध्यमवयीन स्त्रीया मात्र, तश्या नसतात. पण याचे कारण त्याना करावी लागणारी कष्टाची कामे हे असावे. घरातील, शेतीचे, गुराढोरांचे मुलांचे असे सगळे त्यानाच बघायला लागते. अर्थार्जनाची जबाबदारी पण त्यानाच घ्यावी लागते. किसुमुमधल्या म्युझियममधे त्यांची एक टिपिकल वस्ती बांधुन ठेवली आहे. कुतुंबप्रमुखाची मुख्य झोपडी चांगली ऐसपैस. पण त्यात बिछान्याशिवाय काहिच नाही. मग पहिल्या बायकोची झोपडी, दुसर्या बायकोची झोपडी, मोठ्या मुलाची झोपडी अश्या झोपड्या आहेत. बायकांच्या झोपड्यात मात्र पाटा वरवंटा, चुल, कोंबड्यांची खुराडी असे सगळे. ( त्यांच्या कुटुंबव्यवस्था आणि संस्कृतिबद्दल वेगळे लिहिनच. ) शाळकरी मुली आणि तरुण मुली स्कर्ट ब्लाऊजमधे असतात. वयस्कर स्त्रीया मात्र अंगाभोवती गुडघ्यापर्यंत येणारे एकच कापड गुंडाळतात. या गुंडाळण्यात तसे काहि खास नसते. आपल्याकडॅ लुंगी बांधतात तसेच. डोक्याला रुमाल मात्र अवश्य असतो. त्याची मागे गाठ मारलेली असते. शहरात फिरणार्या बायका पण ढगळ स्कर्ट ब्लाऊजच घालतात. पायघोळ कपडे त्यांच्यासाठी गैरसोयीचे असतात. अंगावर आणखी एक कापड उत्तरीय म्हणुन असते. सामान वा लहान मुल पाठीवर बांधण्यासाठी त्याचा ऊपयोग करतात. अगदी एक दिवचाचे मुल देखील त्या बायका असे पाठंगुळीला बांधुन फिरत असत. माझ्याकडे येणारी एक फ़ोगामामा गरोदर होती, एक दिवशी आली नाही, आणि चौकशी केल्यावर कळले कि ती बाळंत झालीय. मी तिच्यासाठी काहि पैसे आणि बिस्किटे वैगरे पाठवली, तर दुसर्या दिवशी बाळाला पाठीशी बांधुन बाई हजर. ( तिथे बर्याच बायका झाडाखाली वैगरे बाळंत होतात. दगडाने नाळ वैगरे ठेचतात. हॉस्पिटलमधे गेल्याच तर त्याना बाळंतपणानंतरचे टाके घालतानादेखील, भुल द्यावी लागत नाहीत. ) पुरुष लोक केस खुपच बारिक ठेवतात. बायका मात्र ते वाढवतात. वयस्कर बायका ते मागे विंचरुन ठेवतात. केस विंचरायला त्याना धातुचे लांब दात असलेली फणीच वापरावी लागते. तरुण मुली मात्र केसाच्या बारिक वेण्या घालुन त्याची खास रचना करण्याकडे कल असतो. या प्रकाराला बराच खरचहि येतो आणि वेळहि लागतो. अश्या बारिक वेण्या, अगदी घट्ट डोक्यालगत बांधुन त्याची आकर्षक रचना केली जाते. हे सगळे काहि ईंग्लिश सिनेमात दाखवतात तसे भारंभार केसांचे अजिबात नसते. हे केशरचना करण्यासाठी हौसेपेक्षा गरज हे कारण आहे. त्यांचे केस स्पायरल असल्याने ते प्रचंड गुंततात. शिवाय त्यामुळे डोके गरम होते ते वेगळेच. डोक्यालगत अश्या वेण्या घालुन, त्यातुन बाहेर डोकावणारे केस जाळुन टाकतात, त्यामुळे डोक्याभोवती हवा खेळती राहते. अशी केशरचना केली तरी, केस वाढतच राहतात, व दहा पंधरा दिवसानी, ती रचना सोडवुन परत करावी लागते. खेडेगावात मुली एकेमेकांच्या अश्या वेण्या घालुन देतात. शाळकरी मुलीना मात्र केस वाढवायची परवानगी नसते. त्यांची त्वचा काळी असली तरी अत्यंत तुकतुकीत असते, सतत ऊन्हात राहुनहि त्यांच्या चेहर्यावर कधे मुरुमे दिसत नाहीत. पुरुष आणि स्त्रीया, दोघेहि अतिषय काटक असतात. सहसा मारहाणीचा त्याना त्रास होत नाही, छोट्यामोठ्या दुखापतिंकडे ते सहज दुर्लक्ष करतात. त्याना भिती वाटते ती केवळ मलेरियाची. ( आपल्याला तिथे जाताना पिवळ्या तापाची लस घ्यावी लागते, पण तो ताप तिथे तेवढा नाही आता. ) ऊष्ण हवामानामुळे मुली लवकर वयात येतात. बारा तेरा वर्षांच्या मुली, तिथे सहज आई झालेल्या दिसतात. चाईल्ड सेक्स हि तिथली सामाजिक समस्या आहे. असे संबंध ठेवणार्या प्रौढ स्त्री व पुरुषांचीहि संख्या तिथे खुप आहे. शाळकरी मुलाना अमिष दाखवुन ते आपला कार्यभाग साधतात. ( त्याना तिथे शुगर डॅडी व शुगर मम्मी असे म्हणतात. ) याबाबत स्थानिक पेपरमधे खुपदा छापुन येत असे. तिथे स्थानिक झालेले गुजराथी काहि पिढ्यांपुर्वी तिथे मजुर म्हणुन गेले होते. ते अजुनहि जुनी गुजराथी भाषा बोलतात. ( ती आपल्याला थोडी वेगळी वाटु शकते. ) पण सध्या मात्र ते अंगभुत कौशल्यामुळे चांगलेच श्रीमंत झाले आहे. किरकोळ दुकाने सोडली तर बाकि सगळे ऊद्योगधंदे त्यांच्याच ताब्यात आणि मालकिचेहि आहेत. तसेच चहाचे मोठे मळे, गव्हाची शेते हि ब्रिटिश लोकांच्या मालकीची आहेत. आणि हे दोन्ही स्थानिक लोकांवर कायम अन्यायच करत असतात. अत्यंत कमी पगारावर त्याना ते राबवुन घेत असतात. अगदी थेट संघर्ष करण्याईतकी एकजुट व साजेसे नेतृत्व त्यांच्याकडे नसल्याने, संघटित प्रतिकार ते करत नाहीत. पण तरुण पिढीच्या मनात ते असतेच. गुजराथी लोक त्यांचा ऊल्लेख अत्यंत हेटाळणीने करतात. काहि ब्रिटिश नागरिकानी काळ्या बायका केल्या असल्या तरी, गुजराथी लोकानी केलेल्या नाहीत. खोजा मुसलमान लोकांची पण तिथे खुप वस्ती आहे. तर अश्या या वातावरणात काळ्यांशी मैत्री करणे मला जरा अवघड गेले. शिवाय माझ्या भारतीय मित्रांचा देखील त्याला थोडाफार आक्षेप होता. पण मी मैत्रीचा हात पुढे केल्यावर, त्यानीहि मला भरभरुन प्रतिसाद दिला. आपल्या मनातले गुज ते मला सांगत असत. आमच्या ऑफ़िसमधे, रात्रपाळीला जे कामगार असत, त्याना मिलमधे रात्री बंद करुन ठेवण्यात येत असे. दुसर्या दिवशी सकाळी त्यांची झडती घेऊनच त्याना सोडण्यात येत असे. आमच्या ऑफ़िसमधे एकदा अचानक कुणीतरी गुजराथी पंडीत येणार होते, त्यावेळी ऑफ़िसमधया काळ्या सेक्रेटरीसकट सगळ्याना एका खोलीत बंद करुन ठेवले होते. मला असल्या पंडिताना भेटण्यात काडीचाहि रस नसल्याने, मी त्यांच्याच रुममधे जाऊन बसलो. त्यावेळी आमच्या डायरेक्टरची काळी सेक्रेटरी मला म्हणाली होती, दिनेश, त्या प्रिश्टला जे दुध देण्यात येईल, ते एका काळ्यानेच काढले असेल ना ? मी निरुत्तर झालो. पण एकंदर त्यांच्या अंगी असलेल्या भोळेपणामुळे ते कायम अन्यायाचे बळि ठरतात. शिवाय आपल्याला विचित्र वाटेल अशी त्यांची संस्कृति, तिच्याबद्दल चार शब्द पुढच्या भागात.
|
| |
| Tuesday, May 02, 2006 - 5:39 am: |
|
|
आजकाल चित्रपटक्षेत्रात मोलाचे कार्य करणारे श्री. सुधीर नांदगावकर आम्हाला मराठीचे प्राध्यापक होते. त्यानी सांगितलेली एक आठवण म्हणजे, आपल्यासाठी एक महत्वाचा असणारा सिनेमा, ” साहब, बिबी और गुलाम ” हा जेंव्हा परदेशी चित्रपटमहोत्सवात दाखवला होता, त्यावेळी अनेक स्त्री प्रेक्षकाना तो पटलाच नव्हता, मझली बहु, म्हणजे मीना कुमारीचे, पतिचे प्रेम जिंकण्यासाठी केलेले केविलवाणे प्रयत्न त्याना हास्यास्पद वाटले. त्यांच्या मते, तिने भुतनाथच्या बरोबर जाणेच योग्य होते. आम्हाला त्या वयात हा मुद्दा अजिबात पटला नव्हता. पण मग पुढे अनेक देशात राहिलो, तेंव्हा कळु लागले, कि प्रत्येक संस्कृति हि त्या त्या मातीत रुजलेली असते. आपली श्रेष्ठ व ईतर कोणाची कनिष्ठ असे मतप्रदर्शन करण्याचा आपल्याला काहिच अधिकार नाही. मुळात मी संस्कृतिचा अभ्यासक वैगरे नाही, त्यामुळे मी केनयातील संस्कृतिबद्दल लिहिन ते केवल वैयक्तिक निरिक्षण आहे. तिथे राहणार्या भारतीयांप्रमाणे मी त्यांची हेटाळणी अजिबात करत नाही. जेंव्हा आपण संस्कृति म्हणतो तेंव्हा आपल्याला आपली श्रद्धास्थाने, जीवनपद्धती खास करुन कुटुंब पद्धति आणि साहित्य हेच अभिप्रेत असते. आपली संस्कृति हि अनेक वर्षांच्या अनुभवातुन सिद्ध झालीय. काळाच्या ओघात ती पुर्णपणे टिकली नाही, फक्त एवढेच कि आपण आपल्या जीवनपद्धतीला घट्ट धरुन ठेवण्याचा प्रयत्न केला, करत आहोत. आज केनयात पुर्णपणे ख्रिश्चन धर्माचा पगडा दिसतो. पण तो त्यांचा मुळ धर्म नाही. हा धर्म त्यांच्यावर लादला गेलाय. आणि त्यामुळेच त्याना त्याची तितकिशी फिकीर नाही. जो धर्म दुर जेरुसलेम मधे निर्माण झाला, आणि युरपमधे स्थिरावला, तो केनयाचा धर्म असुच शकत नाही. त्या तिथल्या सामाजिक आणि नैसर्गिक परिस्थितीत आणि केनयाच्या परिस्थितीत जमीन अस्मानाचा फरक आहे. पण केनयातील लोकांचा मुळ धर्म कोणता, याचे त्यानाच विस्मरण झालेय. निसर्गाच्या लेकरांचा धर्म पुर्णपणे निसर्गाशी फारकत घेतलेला कसा असु शकेल ? डोंगर, नद्या, झाडे हिच त्यांची पुजास्थाने असावीत, आता मात्र त्याना तो धर्म ऊघडपणे पाळता येत नाही. कुठेतरी त्याचे संदर्भ लागतात, पण ठोस असे काहि नाही. माऊंट किलिमांजारो प्रमाणे केनयात देखील माऊंट केनया हा एक नगाधिराज आहे. जवळ जवळ वर्षभर तो बर्फाच्छादित असतो. ( कदाचित काहि सिनेमात त्याचे दर्शन तुम्हाला झाले असेल. ) तो त्यांचे श्रद्धास्थान आहे. त्यावर आरोहण करणे त्यांच्या धर्मात बसत नाही. पण गोरे लोक कायम तिथे जात असतात. त्याला विरोध करणे त्याना आजवर जमलेले नाही. हे असे कुणाला त्याच्या मुळापासुन तोडणे खरोखरच खुप वाईट आहे. मी माझ्या काळ्या मित्राना हे खुप समजाऊन द्यायचा प्रयत्न करायचो, पण त्याना ते पटुनहि काहि करता येत नसे. तांत्रिक मांत्रिक यांचा त्यांच्यावर खुप पगडा आहे. छोट्यामोठ्या आजारासाठी ते त्याच्याकडेच जातात. तो सांगेल तो ऊपाय करतात. ब्लॅक मॅजिक चा प्रभाव जबरदस्त आहे, पण भारतीयांवर त्याचे प्रयोग होत नाहीत कारण, आपले देव त्यांच्यापेक्षा समर्थ आहेत, असा त्यांचा ठाम विश्वास आहे. आज त्याना त्यांचा जो काय धर्म असेल तो अत्यंत गुप्तपणे पाळावा लागतो. त्या धर्मात कदाचित मनुष्यबळीची प्रथा असावी. ( दक्षिण अमेरिकेत देखील ईन्का लोकात ती होतीच. आपल्याकडे पण तिचे तुरळक दाखले आहेतच, ऊदा बकासुर, परशुरामाची कथा वैगरे. ) पण आज त्या सर्वावर अघोषित बंदी आहे, जर कोणी अश्या स्वरुपाचे काहि करताना आढळलेच तर त्यावल कल्ट, असा शिक्का मारला जातो आणि त्यांच्यावर पोलिस कारवाई होते. हिंदु वा मुस्लीम धर्म मात्र तिथे ऊघडपणे पाळता येतो, देवळे भरपुर आहेत, मशिदी तुरळक आहेत, पण हा धर्म तिथे बाहेरुन आलेल्या लोकांचा, तिथला नव्हेच. त्यामुळे तिथे काहि सांस्कृतिक धक्के बसतातच. पुरुष आणि स्त्री या दोघांचीहि तिथे सुंता केली जाते. ( आता आपण हा प्रकार थेट ईस्लामशी निगडीत मानत आलोय. १९४७ द अर्थ सरख्या सिनेमातहि, सच्चा मुसलमान ओळखण्याची हि खुण म्हणुन दाखवलीय. ) मुलगा साधारण दहा बारा वर्षाचा झाला कि, त्याची सुंता केली जाते, हा एक सार्वजनिक सोहळा असतो. त्यासाठी अर्थातच कुठलिही वैद्यकिय पद्धत न वापरता, अगदी गावठी हत्यारे वापरली जातात. त्यामुळे भुल वैगरे देणे, असला प्रकारच नाही. यावेळी त्या मुलाने, या प्रकाराला धैर्याने सामोरे जायचे असते, आणि त्याला ते लोक फ़ेसिंग द मॅनहुड असे म्हणतात. हा प्रकार शक्यतो वडिलांच्या पुढाकारानेच होतो. जर एखाद्याने ती केली नसेल तर तो टवाळकीचा विषय ठरतो. जर कोणाच्या खास करुन मित्रांच्या लक्षात हे आले तर, त्याची नागव्याने धिंड काढली जाते, आणि त्याला ती करुन घ्यावीच लागते. पुरुषांच्या बाबतीत, याला किंचीत वैद्यकिय आधार आहे. काहि काहि अपवादात्मक परिस्थितीत डॉक्टरच ती करुन घ्यायचा सल्ला देतात. पण स्त्रीयांच्या बाबतीत तर याला ( निदान माझ्या माहितीप्रमाणे ) कसलाच आधार नाही. पण तरिही तिथल्या लहान मुलीना ती करुन घ्यावीच लागते. तिला कामेच्छा होवु नये म्हणुन हे केले जाते. ( थांबा काहिहि प्रतिक्रिया देण्यापुर्वी, आपल्याकडचे विधवा केशवपन आठवुन बघा. ) आणि यावेळीहि कुठलिही वैद्यकिय काळजी घेतली जात नाही. त्या स्त्रीयांच्या शरिराची अनैसर्गिक वाढ होण्याचे कदाचित हे कारण असावे. मुले किती ? हा सवाल तिथे अत्यंत असभ्य मानला जातो आणि असे विचारणे तिथे अजिबात शिष्टाचाराला धरुन होत नाही. मुले हि देवाची देणगी असल्याने, ती मोजायची नाहीत यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. मुले किती हा सवाल जितका असभ्य तितकाच मुले आहेत का ? हा सवाल तिथल्या स्त्रीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. मुले पैदा करण्याची क्षमता असणे हे तिच्या अवघ्या जीवनाचे ईप्सित आहे. आणि तिला तिची हि पात्रता सिद्ध करावीच लागते. लग्न ठरल्यावर किंवा तसा होकार मिळवण्यापुर्वीच तिला हे सिद्ध करावे लागते. याबाबतीत अगदी शिक्षित आणि ऑफ़िसमधे काम करणार्या बायकांचा देखील अपवाद नाही. अनौरस वा विवाहबाह्य संतति हा तिथे अपवादाचा विषय नाही. पण तसाच तो हेटाळणीचादेखील नाही. लग्नाचा आणि मुले असण्याचा तिथे काहिच संबंध नाही. पण एखाद्या पुरुषासाठी एखाद्या स्त्रीने आपली हि क्षमता सिद्ध केली तरिहि तो तिच्याशी विवाह करेल याची कुठलीच खात्री नसते. पण त्यातहि त्याना काहि गैर वाटत नाही. मुले हि पुर्णपणे स्त्रीची जबाबदारी मानली जाते. त्या सगळ्यांचे पालनपोषण तिला एकटीलाच करावे लागते. आणि तिथल्या स्त्रीया ती जबाबदारी अगदी आनंदाने स्वीकारतात. हि त्यांचीच जबाबदारी असल्याने, परदेशी पुरुष त्यांच्या या मानसिकतेचा फायदा घेतातच. आणि हि प्रथा तिथे अनेक पिढ्यांपासुन आहे. पण अशी मुले असलेली स्त्री वैवाहिकदृष्ट्या अयशस्वी होतेच असे नाही. मुले असणार्या स्त्रीचा, पत्नी म्हणुन तिथे आनंदाने स्वीकार केला जातो. खरे तर तिची पत्नी म्हणुन, योग्यता जास्त, कारण तिने तिची स्त्रीत्व सिद्ध केलेलेच असते. शिवाय नाहितरी सगळी जबाबदारी तिच तर घेणार असते. त्यांचासाठी लग्न हि एक खर्चाची बाब आहे, गावजेवण आणि वधुदक्षिणा हे दोन्ही ज्याला परवडु शकते तोच विवाह करु शकतो. आपल्याला याचा कितीहि त्रास झाला तरी, हि त्यांची संस्कृति आहे. जेंव्हा आपल्या शाळकरी जीवनात, ” श्यामची आई ” आपल्याला अवांतर वाचनासाठी लावलेले असते तेंव्हा त्यांच्याकडे ” कॉनक्युबाईन ” नावाची कादंबरी अशीच अवांतर वाचनासाठी लावलेली असते. मृत्यु हि त्यांच्यासाठी साजरी करण्याची घटना आहे. गावजेवण घालणे, हि मृताचे दफन करण्यापुर्वी करण्याची अत्यावश्यक गोष्ट आहे. त्यावेळी किती बैल कापले, यावर त्या माणसाचे सामाजिक स्थान ठरते. मृताचा शोक करण्यासाठी रस्त्याने जाताना झाडाची एक फांदी हातात घ्यावी लागते, वा वाहनावर लावावी लागते, जितकि फांदी मोठी तितका शोक मोठा. ( राजकिय नेत्याच्या सुतकात, अशी फांदी हातात वा गाडीवर लावल्याशिवाय, कुणालाहि रस्त्यावर येण्यास मज्जाव असतो. ) दफन करण्यापुर्वी, त्या माणसाच्या संपत्तीचे त्याच्या मुलात वाटणी होने, अत्यावश्यक असते, त्याशिवाय दफन करता येत नाही. आणि त्या पुरुषाच्या स्त्रीया, हिदेखील त्याची संपत्तीच गणली जाते. ( नो कॉमेंट्स ) पण तरिही ते लोक वडीलधार्यांचा आदर नेहमीच ठेवतात. याचा अनुभव मला कायम आला. मला कुठलिहि वस्तु, अगदी एखादा कागददेखील देताना, ती दोन्ही हाताने धरुनच दिला जात असे, ती कधीहि खाली वा टेबलावर ठेवली जात नसे. या साध्याश्या गोष्टीतुन ते आदर व्यक्त करतात. वस्तु खाली ठेवणे वा एका हाताने देणे त्याना अपनामास्पद वाटते. शेकहॅंड केल्यावर तोच हात आपल्या छातीवर डाव्या बाजुला लाअव्णे हि क्रिया केल्याशिवाय त्यांचे अभिवादन पुर्ण होत नाही. मनापासुन हि कृति केलीय, याचे सुचन यापेक्षा आणखी कुठल्या रितीने होवु शकेल ? ती माणसे मनाने खरेच निर्मळ आहेत. हिंदी सिनेमा बघताना ती खुपच ईनवॉल्व्ह होतात. मारामारीच्या वेळी ऊभे राहुन आरडाओरडा करतात. करुण प्रसंगात ओक्साबोक्षी रडतात. जमिनिवर लोळतात. शाहरुख खान आणि माधुरीचा अंजाम सिनेमा बघताना, लाईट्स गेले होते, त्यामुळे शेवट कळु शकला नव्हता, तर त्या लोकानी लेटे शिवानी बाना. ( शिवानीला आणा रे बाबानो, ) असा आरडाओरडा करत थिएटर डोक्यावर घेतले होते. ( शिवानी हे माधुरीचे त्या सिनेमातले नाव. ) आता आपणच आपली त्यांच्याशी तुलना करयचा निरर्थक चाळा करायचा, हो ना ? अपुर्ण..
|
| |
| Wednesday, May 03, 2006 - 11:52 am: |
|
|
केनयन शिलिंग केनयाचे चलन केनयन शिलिंग. त्याचे सिंबॉल K.sh. . आजुबाजुच्या देशाचे म्हणजे युगांडा आणि टांझानियाचे पण शिलिंगच. पण ते त्या देशाच्या नावाने ओळखले जातात. ( खुप जणाना कल्पना नसेल पण आपले शेजारी, पाकिस्तान, नेपाळ आणि श्रीलंका पण रुपयेच वापरतात. ) ५, १०, २०, ५०, १०० आणि १००० शिलिंगच्या नोटा असत. प्रत्येकावर केनयाचे अध्यक्ष डॅनियल अराप टोरायटिच मोई, यांचा फोटो असायचा. मी तिथे होतो त्या पुर्वी या चलनाचे अवमुल्यन झाले होते. त्यामुळे सगळ्याच किमती तिप्पट झाल्या होत्या. पण मी तिथे होतो त्या काळात, हे चलन डॉलरच्या तुलनेत वधारत होते. आपल्याप्रमाणे तिथे ईनकम टॅक्स आहेच. पगाराच्या जवळ जवळ ३० % टॅक्स मधे जायचा. त्यामुळे आमचे दाखवायचे दत आणि खायचे दत अर्थातच निरनिराळे होते. आपल्याप्रमाणे कर कायदा तितकासा किचकट मात्र नव्हता. वजावटी अगदी मोजक्याच होत्या. अवमुल्यनचा ईतिहास ताजा असल्याने, आज रोख ऊद्या ऊधार असेच सर्व व्यवहार होत असत. आमच्या कंपनीकडुन माल घेणार्याना, आधी बॅंकेत जाऊन पैसे भरावे लागत, त्याची पे – ईन – स्लिप आणल्यावरच माल मिळत असे. आमची कंपनीहि ठरलेल्या दिवशी सर्व सप्लायर्सना पेमेंट देत असे. खरे तर सगळे चेक्स एका दिवशी तयार करुन, ते आम्ही सप्लायर्स ना पोहोचवत असु. त्यामुळे तसे तगादे नसायचेच. असा व्यवहार मी बाकि कुठेच बघितला नाही. या चेक्स ची पण मजा असायची. आम्ही चेक दिले कि, दुसर्या दिवशी आमच्या बॅंकेतुन मला मिसेस इबुतीती बाईंचा फोन यायचा. त्या मला चेक नंबर सांगणार, मग मी तो कुणाला दिलाय व त्याची रक्कम किती आहे हे सांगणार, ते जमले तरच त्या तो चेक पास करणार. तिथल्या चेक क्लीयरिंगची हिच पद्धत होती. पुर्वी तिथे चेकने रोख पैसे काढातना एक क्षुल्लकशी रक्कम टॅक्स म्हणुन द्यावी लागायची. आपल्या रेव्हेन्यु स्टॅंपप्रमाणेच होते ते. आम्हाला देशाबाहेर पैसे पाठवण्यावरपण बंधने होती. त्यासाठी तिथल्या सेंट्रल बॅंकेची खास परवानगी घ्यावी लागे. व तेवढीच रक्कम भारतात पाठवता येत असे. पुढे हि दोन्ही बंधने शिथील झाली. तिथे तसे बॅंकिंग महागच पडायचे, कारण प्रत्येक चेकवर ठराविक रक्कम कर म्हणुन द्यावी लागायची. शिवाय महिन्यातील एकंदर व्यवहारावर टर्नओव्हर टॅक्सहि होता. व्याजाचे दर भारताच्या तुलनेत अगदीच कमी होते. पण स्थानिक बॅंकांबरोबरच बॅंक ऑफ़ बरोडा पण होतीच. स्वाहिली भाषेत आपल्यासारखी विकसित संख्यावाचन पद्धती नाही. त्यामुले पंधराचा उल्लेख दहा आणि पाच तर सतराचा ऊल्लेख दहा आणि सतरा असा व्हायचा. ( अनुक्रमे कुमी ना टानो आणि कुमी ना नने ) . बाजारात पहिल्यांदा माझा फार गोंधळ ऊडायचा. मग त्या बायका दोन हाताचा मुठी आणि वरचे पैसे बोटाने दाखवु लागल्या. आपल्याप्रमाणे तिथे १००, १०० ची बंडल्स करण्याची पद्धत नाही. दहाच्या पुढे मोजायला त्याना जमतच नाही. त्यामुळे नोटांची बंडले वेगळ्या तर्हेने करतात. १०० नोटांपेक्षा १०० शिलिंगचे बंडल केले तरच त्याना कळते. म्हणजे १० च्या ९ नोटा घ्यायच्या आणि त्यालाच्या भोवती १० ची आणखी एक नोट गुंडाळायची. हे झाले १०० शिलिंगचे बंडल. आता हे बंडल करताना तुम्ही ५० ची एक २० च्या दोन नोटा घेतल्या आणि त्याभोवती १० ची नोट गुंडाळली तरी चालते. मग अश्या १०० ची दहा बंडल्स एकत्र केली कि झाले १०००. या अश्या नोटा मोजायची म्हणजे कसरतच असायची, कारण त्या एकदा वरुन मोजायचा व एकदा खालुन. मग दोन्हीची बेरीज करायची. आमच्या कंपनीचे गुर्हाळ असल्याने ऊस शेतकर्यांचे पैसेहि मलाच द्यावे लागत. आता शेतकरी म्हंटला कि आपल्या डोळ्यासमोर फ़ेटा घातलेला, धोतर नेसलेला बापुडवाणा गडी ऊभा राहतो. तिथले शेतकरी मात्र सुट घालुनच येत असत. आमच्याकडुन पैसे नेणे म्हणजे त्यांच्यासाठी सोहळाच असे. तिथे प्रत्येकाकडे फोटोसहित सरकारी ओळखपत्र असायचेच. ( भारतीयाना देखील असे ओळख पत्र जवळ बाळगावे लागायचे त्याला ते एलियन्स कार्ड म्हणायचे. ) मी त्याना हिशेब करुन पैसे द्यायचो. पण ते माझ्या पद्धतीने, पण त्याना ते पटायचे नाही. गुणाकार वैगरे त्यांच्या आवाक्यापलिकडची गोष्ट असायची, मग मीहि हळु हळु, त्यांच्या पद्धतीने नोटांची बंडल्स करु लागलो. पण त्यांच्या भाषेत पैश्याला पेसा, असाच शब्द आहे. दुबईतले भारतीय व्यापारी जसे धिरामला रुपये म्हणतात तसे तिथले गुजराथी व्यापारीपण शिलिंगला रुपयेच म्हणतात. याबाबतीत माझ्या सहकार्याने सांगितले ते मजेदार होते, त्याना शिलिंग म्हणजे शिवलिंग असे काहितरी वाटायचे. पण तशी भारतीय रुपयाना ( सिंगापुर वा दुबईप्रमाणे ) किम्मत नव्हती. देवळातहि कृपया पेटीत भारतीय रुपये टाकु नयेत, अशी सुचना असायची. शिलिंगचे सब युनिट सेंट असे होते, पण व्यवहारातुन ते कधीच गायब झाले होते. केनयातील सोने मात्र १०० नंबरी असायचे. त्यावेळी भारतातल्यापेक्षा तिथे ते स्वस्त होते. पण सोनाराचे दुकान शोधावे लागायचे. चोरीच्या भितीने, मोठ्या खिडक्या, डिसप्ले वैगरे काहि नसायचे. कुणीतरी सोनाराच्या ओळखीचे असेल तरच तिथे प्रवेश मिळायचा. म्हणजे जाडजुड लोखंडी दरवाजे ऊगह्डुन लगेच आपल्यापाठी बंद व्हायचे. सोने मात्र झळाळत असायचे. मऊ असल्याने त्याचे दागिने वैगरे करण्यात काहिच हशील नसायचे, मग त्याचे कडे, वळे वा जाड साखळी असेच काहितरी करावे लागायचे. तिथे अजुनहि गुप्तपणे गोल्ड हंट केले जाते, एखाद्या नदीत जाऊन दिवसभर चिखल चिवडत बसायचा आणि तुम्ही नशीबवान असाल तर तुम्हाला एखादा अस्सल सोन्याचा तुकडा मिळुनहि जातो. अपुर्ण्…
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|