<img src="/hitguj/messages/52831/hdaimages/sampadakiya-h.jpg" border=0>


लक्षदीप हे उजळले घरी!!
दारी शोभली सडा रांगोळी!!
आली दिवाळी! आली दिवाळी!!

घराघरातून लखलखणार्‍या पणत्या, झगमगणारे आकाशकंदिल, मनमोहक रांगोळ्या, चिवडा, cअकली, लाडू, करंज्या आणि साहित्याची मेजवानी असलेला 'अंक' हे सारे काही " दिवाळी " या एका शब्दातच सामावलेले आहे.

दिवाळी अंक हा तर मराठी संस्क+ऋतीचा अविभाज्य भाग झालेला आहे. ५ वर्षापूर्वी देश - विदेशातील मराठी लोकांना एकत्र येण्यासाठी व्यासपीठ मिळवून देण्याच्या हेतूने हितगुजचा जन्म झाला. मराठी भाषा, साहित्य, कला, संस्क+ऋती यांबद्दल प्रेम, आस्था असणार्‍या आणि याच समान धाग्याने एकमेकांशी जोडल्या गेलेल्या मराठमोळ्या लोकांनी 'या मनीचे त्या मनी' पोहोचविण्यासाठी हितगुजवरील 'गुलमोहरा' च्या छायेचा विसावा केला. हितगुजवरील नव्याने बहरणार्‍या प्रतिभावंतांच्या साहित्याने नटलेला पहिला दिवाळी अंक २००० साली प्रकाशित करण्यात आला. मायबोलीकरांनी मराठी साहित्यिक विश्वात ठेवलेले हे बाळ पाऊल! ही दिवाळी अंकाची परंपरा समस्त मायबोलीकरांच्या प्रोत्साहनाने आणि सहकार्याने फुलत आहे, बहरत आहे.

यंदाच्या दिवाळी अंकात आणखी एक पाऊल पुढे जाऊन मायबोलीवरील प्रस्थापित आणि नवोदितांबरोबरच काही प्रतिथयश साहित्यिकांचे साहित्य समाविष्ट करण्याची कल्पना पुढे आली. आमच्या विनंतीला मान देऊन काही सन्माननीय साहित्यिकांनी उपक्रमाचे कौतुक केले. यंदाचा अंक हा केवळ मायबोली परिवारापुरता मर्यादित न राहता जगभरातील तमाम मराठी लोकांसाठी दिवाळीची सुखद भेट ठरेल याची आम्हाला खात्री आहे. या निमित्ताने मायबोली आणि हितगुज परिवार आणखी विस्तारेल अशी आम्हाला आशा आहे.

मराठी रसिकांच्या सारस्वतांच्या दरबारी आमच्यातर्फे आणि सहभागी साहित्यिकांतर्फे हा दिवाळीचा नजराणा!

ही दीपावली आपल्या सर्वाना सुखाची, समृद्धीची, व समाधानाची जावो ही सदिच्छा!!