|
हुश्श ऽऽऽ! योगीचे लिखाण वाचताना धाप लागली. योगीने लिहीलेले सर्व पूर्णपणे खरे आहे. मराठीचे आणि महाराष्ट्रीय संस्कृतीचे खरे नुकसान हिंदीने आणि हिंदीभाषिकांनीच केलेले आहे. महाराष्ट्रात मराठी आणि इंग्लिश अशा दोनच भाषा शाळेत शिकवायला हव्यात. हिंदी हा बिनसक्तीचा पर्यायी विषय पाहिजे. महाराष्ट्रात हिंदी शिकण्याची काहिही गरज नाही. दक्षिणेत आणि इतर अनेक राज्यात हिंदी हा ऐच्छिक विषय आहे. मराठीशी अतिशय साधर्म्य असल्यामुळे मराठी बोलणार्यांना हिंदी आपोआप येऊ शकते. यशवंतराव चव्हाणांपासून शरद पवार आणि विलासराव देशमुखांपर्यंत सर्वांनीच मराठीचे नुकसान केले आहे. महाराष्ट्राच्या सध्याच्या मंत्रीमंडळात जवळपास २० टक्के अमराठी मंत्री आहेत. इतर कुठल्याही राज्यात परप्रांतीयांना एवढे प्रतिनिधित्व नाही. बाळ ठाकर्यांनी सुद्धा चंद्रिका केनिया, प्रीतीश नंदी, राम जेठमलानी, संजय निरुपम अशा अनेक अमराठी लोकांना राज्यसभेवर पाठविले. दुर्दैवाने यातला एकही जण शिवसेनेशी एकनिष्ठ राहिला नाही. मराठी वाचविण्याचे अगदी सोपे उपाय म्हणजे कायम मराठीतच बोलण्याचा प्रयत्न करणे, हिंदी किंवा इंग्लिशमधील प्रश्नांना मराठीतूनच उत्तर देणे, अमराठीभाषिकांना मत न देणे आणि अमराठीभाषिकांना उमेदवारी देणार्या पक्षाला मत न देणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मुलांना मराठी माध्यमातुनच शिक्षण देणे!
|
Yogy
| |
| Monday, January 29, 2007 - 8:45 am: |
|
|
बाळासाहेब ठाकर्यांनी लावलेले दिवे आजच्या सकाळमध्ये वाचा. अशा मतलबी पुढार्यांनीच मराठीचे आणि मराठी माणसाचे नुकसान केले आहे. http://www.esakal.com/esakal/01292007/C3101EC2C0.htm यांना आता महापालिका वगैरे स्थानिक निवडणुकांमध्येही परप्रांतीयांची मदत लागते. उद्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला मोदी, अमरसिंग वगैरेना प्रचारासाठी घेऊन येतील. सगळे राजकारणी लोक एकसारखेच नालायक आहेत. मराठी वाचवण्यासाठी यांच्यावर अवलंबून न राहता आपल्याला जमेल तेवढे तरी आपण करु शकतो. पोटापाण्यासाठी आजकाल इंग्रजी शिकणे हे गरजेचे आणि महत्त्वाचे आहे. इंग्रजीचा बागुलबुवा उभा करुन हिंदीचे शेपूट धरणे (अहो लालभाई लांगुलचालनला हा पर्यायी शब्द चालेल का?) चुकीचे आहे.
|
Mandard
| |
| Monday, January 29, 2007 - 10:00 am: |
|
|
मी दिल्लीत रहातो आज पासुन हिन्दी बन्द इन्ग्लिश चालु घराबाहेर. जय महाराष्ट्र
|
Himscool
| |
| Tuesday, January 30, 2007 - 6:05 am: |
|
|
सर्वात महत्वाचे म्हणजे मुलांना मराठी माध्यमातुनच शिक्षण देणे! पुण्यात चांगल्या मराठी शाळा किती आहेत ते कोणी सांगू शकेल.. जेणेकरून ह्या विधानाला जरा पुष्टी मिळेल.. मी स्वत: मराठी माध्यमातूनच शिकलो आहे पण सध्या शाळांची अवस्था बघता मुलांना मराठी शाळेत शिकायला पाठवण्याचे धाडस किती जण करतील? मराठी शाळेत शिकवणारे किती शिक्षक व्यवस्थित मराठी बोलू शकतात हाच मोठा प्रश्न आहे. आणि सध्या English शाळांमध्ये शिकयला पाठवणे हे Status symbol झाल्यासारखे आहे... तसेच.. जर पालक IT मध्ये असतील आणि पुढे मागे कधीतरी भारताबाहेर जाऊन स्थायिक होण्याचा प्रश्न आला तर मुलांना English येणे गरजेचे आहे असे वाटून बरेच पालक पाल्याला English शाळेतच पाठवतात.
|
हिम्स्कुल, पुण्यात अभिनव विद्यालय, अक्षरनंदन, विमलाबाई गरवारे, आपटे प्रशाला इ. चांगल्या मराठी शाळा आहेत. फक्त मुलींसाठी असलेल्या रेणुकास्वरूप, नू.म.वि. इ. शाळा चांगल्या आहेत. बाकी सर्व मराठी शाळांचा दर्जा घसरला आहे. नवश्रीमंत वर्गाचा इंग्लिश शाळांकडे असलेला ओढा आणि अपात्र शिक्षकांची मराठी शाळेत केलेली भरती ही त्याची प्रमुख कारणे आहेत. फक्त इंग्लिश शाळेमध्येशिकूनच चांगले इंग्लिश येते व मराठी शाळेत शिकल्यास इंग्लिश कच्चे राहते हा गैरसमज आहे. पुण्यात अभिनव, ज्ञानप्रबोधिनी इ. मोजक्याच इंग्लिश शाळा चांगल्या आहेत. बाकी शाळांचा दर्जा मराठी शाळांपेक्षाही वाईट आहे. इंग्रजी माध्यमाच्या प्रचंड मागणीमुळे त्यांच्या मालाला उठाव आहे. वाटल्यास चौकशी करा. बहुतेक इंग्लिश शाळांमध्ये एका वर्गात ६०-८० विद्यार्थी, अपात्र शिक्षक, भरमसाठ शुल्क, बिनापावतीच्या प्रचंड देणग्या, भयंकर बोजड अभ्यासक्रम, आणि शिक्षणाव्यतिरिक्त बूट-मोजे, स्वेटर, गणवेष, वह्या-पुस्तके इ. बाजारभावापेक्षा जास्त भावाने घेण्याची सक्ती अशा अनेक संतापजनक गोष्टी चालतात. - सतीश माढेकर
|
Mahesh
| |
| Tuesday, January 30, 2007 - 6:48 am: |
|
|
हे अगदी खरे आहे की आजकाल लोक केवळ करिअर करिअर करत ईंग्रजी माध्यमात घालतात मुलांना. कारण काय तर म्हणे इंग्रजी फाडफाड बोलता येऊन स्पर्धेत टिकायला नको का. पण स्वाभिमान, स्वत्व, स्वदेश आणी स्वभाषा यांचा गळा दाबला जातोय ते कोणालाच जाणवत नाहीये. अजुन काही पिढ्यांनंतर काय होईल देव जाणे. कदाचित तेव्हा या असल्या अवघड भाषा पुर्वी का होत्या god knows असे म्हणतील सगळे.
|
Yogy
| |
| Tuesday, January 30, 2007 - 8:26 am: |
|
|
पोटापाण्यासाठी इंग्रजी शिकणे हितावह आहे. सुदैवाने महाराष्ट्र सरकारने मराठी माध्यमांच्या शाळांमधून पहिलीपासून इंग्रजी शिक्षण उपलब्ध करून दिले आहे. इंग्रजीला दूर लोटून मराठी माणसांचे भले होणार नाही. मात्र रोजच्या व्यवहारात मराठीचाच आग्रह हवा.
|
Zakki
| |
| Tuesday, January 30, 2007 - 1:14 pm: |
|
|
खरे तर लहानपणापासून मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषा शिकणे सहज शक्य आहे. कुणितरी काही वर्षांपूर्वी एक मूर्खासारखे विधान केले की मेंदूला उगाच त्रास नको, गोंधळ होतो वगैरे! नि त्यामुळे हे सगळे झाले. योगी म्हणतो तसे असेल तर बरे. BTW , म्हणूनच अमेरिकेत पाढे शिकणे बंद केले नि आता २३ साते म्हंटले की कॅल्क्युलेटर शोधत हिंडतात ही पोरे, नि मग SAT ला बसली की घाईघाईत २३ साते ९२ लिहीतात, पण कळत नाही की यात काही चुकले आहे! आपल्याकडे पण तसे न करोत म्हणजे झाले!
|
झक्की, अगदी बरोबर! महाराष्ट्रात पहिलीपासून मराठी आणि तिसरी पासून इंग्लिश शिकविले पाहिजे. हिंदी आवर्जून शिकण्याची आवश्यकता नाही. हे त्रिभाषा सूत्र रद्द केले पाहिजे. रोजच्या व्यवहारासाठी मराठी आणि व्यवसायासाठी इंग्लिश योग्य ठरेल. त्यातून कोणाला खरोखरच हिंदी शिकायची इच्छा असेल तर त्याने ती भाषा शिकावी, इतरांवर सक्ती करू नये. हा विषय ऐच्छीक असावा.
|
माझ्या एका मित्राने (तो CA आहे) हट्टाने त्याच्या मुलीला मराठी शाळेत घातलं (ती तिच्या शाळेत Topper आहे)... एक दिवस ते दोघे रिक्षातून जात असताना, शाळेवरून काहीतरी विषय चालला होता, तेव्हा रिक्षावाल्याने मुलीला विचारलं 'तू या शाळेत जातेस?' आणि 'होकारार्थी' उत्तर मिळाल्यावर 'साहेब, तुम्ही तुमच्या पोरीचं आयुष्य बरबाद केलत,' तो मित्राला म्हणाला... (रिक्षावाल्याची पोरं इंग्रजी शाळेत जात होती)
|
Yogy
| |
| Tuesday, January 30, 2007 - 4:29 pm: |
|
|
इंग्रजी भाषा शिका! ती आता मराठी शाळेतही शिकायला मिळते. त्यासाठी इंग्रजी शाळा(कॉन्व्हेंट) नको. त्रिभाषा सूत्र रद्द केले पाहिजे. हिंदी भाषा सक्तीने शिकण्याची गरज नाही... मेंदूला उगाच त्रास नको, गोंधळ होतो
|
Chyayla
| |
| Tuesday, January 30, 2007 - 6:46 pm: |
|
|
माझा विरोध कोणत्याच भाषेला नाही, उलट जितक्या भाषा शिकाल तितके चान्गलेच. शिक्षणातही ईन्ग्रेजी शिका काही हरकत नाही. पण घरात व आपल्या लोकात तरी मराठीत बोला. पण ईथे भाषेसोबत आपण मम्मी व, पप्पा व म्हणुन त्यान्चे अनुसरण करुन देढगुजरीपणा करतो त्याला माझा विरोध.
|
Deemdu
| |
| Wednesday, January 31, 2007 - 6:01 am: |
|
|
मैत्रेई ड्याडी पुरी आल्या आठवल का ग?
|
Chyayla
| |
| Friday, February 02, 2007 - 7:18 pm: |
|
|
बापरे... योगी तुझ लिखाण वाचुन धस्स झाल रे, अरे बाबा मी या BB वरचा खलनायक नाही... मला वाटत अजुन पर्यन्त या BB वर खलनायक मिळला नाही. चल काही हरकत नाही तु मलाच खलनायक बनवुन सगळी भडास काढुन टाकलेली दीसते सगळ्या भाषा शिका असे मी म्हणालो पण आधी आपली मातृभाषा आपल्याच घरी आपल्याच मुलाना शिकवावी असे नाहे का वाटत? मी खर सान्गतो मुम्बईतच काय ईकडे अमेरिकेतही आई-वडील त्यान्च्या मुलान्शी ईन्ग्लिशमधुनच बोलतात. मुल शाळेत जातात तेन्व्हा या आई-वडीलान्पेक्षा चान्गल ईन्ग्लिश बोलतात त्यान्च्याशी परत त्याच भाषेत बोलायच हे बरोबर आहे का? वरुन फ़ुशारकीनी सान्गतात हो आमच्या मुलाना मराठी बोलताच येत नाही. म्हणुन कायम ईन्ग्लिश मधुन बोलतात. अमेरिकेच जाउ द्या पण अस नाही का वाटत की जर आपली भाषा आधी आपण आधी चान्गली शिकवली तर ईतर भाषा समजायला सोप्या जातात? भारतात असताना शेजारी कॉन्व्हेन्ट मधे शिकणार्या मुलीली उन्दीर नव्हता माहिती जेन्व्हा तीला उन्दीर दाखवला तेन्व्हा ती म्हणाली तो तर Rat आहे.
|
Yogy
| |
| Saturday, February 03, 2007 - 4:33 am: |
|
|
मला कोणालाही खलनायक करायची इच्छा नाहीये. तो माझा हेतूही नव्हता. एकूण मराठी माणसाची राजापेक्षा राजनिष्ठ (Loyal than the king) असण्याची प्रवृत्ती. मराठीपेक्षा हिंदीचा जास्त उदोउदो केल्यामुळे होणारे महाराष्ट्राचे नुकसान हे मला सांगायचे होते. अमेरिकेत राहणार् 0dया लोकांनी आपल्या घरी कोणती भाषा शिकवावी हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी घरी इंग्रजी किंवा मराठी किंवा इतर कोणतीही भाषा बोलली तरी महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात काही मोठा फरक पडणार नाही. मात्र महाराष्ट्रात राहून मराठी न बोलण्याने मराठी कायमची संपणार आहे. (जे आधी मुंबई-नागपूरमध्ये घडले... आणि आता पुणे-नाशिक येथे घडत आहे.) इंग्रजीचे शिक्षण हे अतिशय आवश्यक आहे. उलट इंग्रजीचा आत्मविश्वास नसल्यामुळेच मराठी लोक हिंदीचा सार्वजनिक ठिकाणी जास्त वापर करतात असं म्हणता येईल. मराठी भाषेच्या आग्रहाविषयी मराठी जनांनाच आस्था नसल्यामुळे तिची सर्व आघाड्यांवर पीछेहाट होतच राहणार आहे. सकाळमध्ये आलेली खालील बातमी पहा. मराठीपेक्षा (७ कोटी) कमी भाषिकसंख्या असलेल्या कन्नड (६ कोटी), मल्याळम(४.५ कोटी) आणि गुजराती(४.५ कोटी) या भाषांचा या यादीत समावेश आहे. (कदाचित भोजपुरी, मैथिली, अवधी वगैरे भाषांप्रमाणे मराठी देखील हिंदीचीच एक बोलीभाषा आहे असा त्यांचा समज झाला असावा) महाराष्ट्र वगळता इतर सर्व अहिंदीभाषक राज्यात ठिकाणी हिंदीच्या सार्वजनिक वापरास होणारा नकार, आणि हिंदीभाषकांचा इतरत्र होणारा तिरस्कार (व महाराष्ट्रात खुल्या मनाने होणारे स्वागत) यामुळे हा प्रश्न अधिकच गंभीर होत राहणार आहे. कालपरवापर्यंत मराठी माणसांच्या हक्कासाठी आग्रही असणारे बाळासाहेब आता मतांसाठी भाषेच्या भिंती तोडून हिंदुत्वासाठी उभे राहा वगैरे म्हणतात, महाराष्ट्रात निवडणुका जिंकण्यासाठी नरेंद्र मोदी, शत्रुघ्न सिन्हा वगैरे लोकांची मराठी राजकारण्यांना गरज भासते यावरुन काय बोध घ्यायचा तो घ्या. हिंदीचा आग्रह धरल्यामुळे तामिळनाडुतून कॉंग्रेस पक्षाचे कायमचे उच्चाटन झाले. तामिळनाडूत हिंदीचा आग्रह धराल तर आम्ही नवीन देश मागू वगैरे म्हणतात. बांगलादेशात उर्दूची सक्ती करण्याचा पाकिस्तानने प्रयत्न केला तर "आमार शोनार बांगला" म्हणत सगळे बंगाली भाषिक एकत्र येऊन त्यांनी वेगळा देश मागितला. आपण मात्र अजूनही तू मुसलमान, तू ब्राह्मण वगैरे भांडणं करत राहून आपल्याच मराठी भाषिकांच्या नुकसानासाठी बाहेरच्यांना इथे निमंत्रण देत आहोत. जातीधर्मापेक्षाही भाषा हाच एकमेकांना जोडणारा दुवा आहे. आज आपण जे खातो, जे सण साजरे करतो हे सर्व मराठी भाषेचीच देणगी आहे. भाषा टिकली तरच आपले मराठीपण टिकेल. एवढे लक्षात ठेवले तरी पुरे.
|
Yogy
| |
| Saturday, February 03, 2007 - 4:36 am: |
|
|
http://www.ibnlive.com/blogs/bijoysankarsaikia/369/31229/the-hindi-haters.html हा एक दुवा पहा म्हणजे भारतातल्या इतर राज्यात काय चाललं आहे याची झलक मिळेल.
|
Zakki
| |
| Saturday, February 03, 2007 - 1:41 pm: |
|
|
मराठी लोक लई हुश्शार, त्यानले कंचीबी भाषा येते. अहो याहू इंग्लिश वर काय फाड फाड के विंग्लिश लिवत्यात, सायब बी म्हणल आर्रं तिच्या! किंवा विंग्रजीत आर्रं तिच्या ला काय म्हन्तात त्ये! त्यान्ले हिंदीबी लय चंगा चंगा आता है! त्यान्ले याहू मर्हाटी काहून लागतय्!! योगी, च्यायला, खलनायक पण येतील हळू हळू. थोडी कळ काढा!
|
Yogy
| |
| Saturday, February 03, 2007 - 4:43 pm: |
|
|
अरुण साधूंचे भाषण सकाळच्या सौजन्याने येथे वाचा: लोकहो, सार्वजनिक ठिकाणी मराठीतच बोला... नागपूर येथे सुरू झालेल्या ८० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अरुण साधू यांच्या अध्यक्षीय भाषणाचा हा संपादित अंश.. एखाद्या समाजाची भाषा त्याचा इतिहास, भूगोल, संस्कृती, उद्योग-व्यवसाय, दैनंदिन व्यवहाराच्या पद्धती आणि त्यामधून घडलेली त्याची सामूहिक मानसिकता यापासून अलग काढता येत नाही. आपणा सर्वांचे मराठी भाषेवर प्रेम आहे. मराठीत बोलताना, लिहिताना, ऐकताना, वाचताना जो मनमोकळा व निर्मळ आनंद वाटतो तो आपल्याला दुसऱ्या कोणत्याही भाषेत मिळत नाही. आपले प्रेम किती मनःपूर्वक आणि खोल, आपला अभिमान किती सार्थ व खरा, तसेच या प्रेमासाठी व अभिमानासाठी आपण आपल्या भाषेला काय देतो, तिला कसे वागवतो, ही गोष्ट वेगळी. भाषा ही जिवंत वस्तू नसून, ते एक साधन आहे; साध्य नव्हे. भाषेला समाजाशिवाय स्वतंत्र अस्तित्व नसते. समाजाचे न्यून ते भाषेचे न्यून आणि समाजाचा पराक्रम तो भाषेचा पराक्रम. तलवारीचा स्वतंत्र पराक्रम कसा असू शकतो? एक तलवार मोडली तर योद्धा ती फेकून दुसरी उचलतो. भाषेची निगा राखली नाही तर ती अराजकी होते. भाषेची उपयुक्तता कमी झाली तर आपण तिच्यात दुरुस्ती करतो, बदल करतो किंवा प्रसंग पडला तर त्या त्या व्यवहारापुरती दुसरी उपयुक्त भाषा स्वीकारतो. या गोष्टी स्पष्ट केल्यावर व्यापक परिप्रेक्ष्यात मराठी भाषेची स्थिती काय आहे, ते जोखून घेतले पाहिजे. आज जगामध्ये सुमारे सहा हजार भाषा बोलल्या जातात. त्यातील वीस लाखांच्या वर लोक बोलतात अशा भाषा साडेतीनशेच्या आसपास आहेत. २००४ मध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या साडेनऊ कोटींच्या आसपास होती आणि मराठी प्रथमभाषा असणाऱ्यांची ८ कोटींच्या आसपास. मराठी ही स्वतंत्र लिपी, १२०० वर्षांच्या वर इतिहास व आठशे वर्षांपासून प्रगल्भ काव्य व साहित्य असलेली जगातील बारा-पंधरा प्रमुख भाषांपैकी एक आहे. मराठीत आज साडेतीनशेच्या वर नियतकालिके प्रसिद्ध होतात. दैनिके १२७ निघतात व त्याबाबतीत मराठीचा देशात चौथा क्रमांक आहे. पाठ्यपुस्तके सोडून वर्षाला चार-पाच हजार मराठी पुस्तके बाजारात येतात. गेल्या दोन-तीन वर्षांत नवे मराठी चित्रपट पडद्यावर झळकण्याचे प्रमाण वाढले आहे हे खरे. मराठी भाषा चांगली जोमदार असून, तिचे नीट चालू आहे, असे म्हणायला हरकत नाही. भाषातज्ज्ञांच्या मते, तीन शतकांपूर्वी ६००० पेक्षा अधिक भाषा जगात बोलल्या जात होत्या. पंधरा-सोळाव्या शतकापासून दर्यावर्दी व्यापारी जगभर हिंडू लागले. प्रक्रियेत जास्त संख्येने बोलल्या जाणाऱ्या समृद्ध, प्रगल्भ, लष्करी बळ व व्यापारी समृद्धी असलेल्या देशांच्या भाषा कमजोर भाषिक गट स्वीकारू लागले किंवा जेत्या साम्राज्यकर्त्यांची भाषा हळू हळू नुसती बोलीभाषा नष्ट होऊ लागल्या. १९९० च्या सुमारास वर्षाला अंदाजे २०० भाषा लयास जात होत्या. संज्ञापन व डिजिटल क्रांतीमुळेभाषिक संस्कृत्यांमधील संपर्क व आदानप्रदान एवढ्या वेगाने वाढते, की दरसाल अस्तास जाणाऱ्या भाषांची संख्याही वाढली. बलदंड अर्थव्यवस्था असलेल्या देशांतील समृद्ध भाषा ज्या विविध शास्त्रांमध्ये संचार करू शकतात त्या टिकतील. येत्या शतकाच्या आत जागतिक व्यवहाराची, राजनीतीची, व्यापाराची, संवादाची, संगणकाची भाषा इंग्रजीसारखी एकच असेल. पण ती शेक्सपिअरची, इंग्लंडच्या राणीची, जवाहरलाल नेहरूंची किंवा सलमान रश्दींचीही इंग्रजी नसेल. जागतिक व्यवहारात थोड्याफार प्रमाणात कदाचित चिनी, हिंदी, स्पॅनिश, पोर्तुगीज, रशियन इत्यादी भाषा अस्तित्व टिकवून ठेवतील. जो तो तक्रारखोर साहित्यिक वा मराठीप्रेमी फक्त सरकारकडे बोटे दाखवून स्वतः नामानिराळा राहात होता. मराठीची उपेक्षा मराठी माणूसच करतो आहे. मराठी माणसाचे स्वभाषेविषयीचे प्रेम ढोंगी आहे, त्याची अस्मिता बेगडी आहे आणि भाषेविषयीचा अभिमान पोकळ आहे. हे असे होण्यामागे पुष्कळ ऐतिहासिक, समाजशास्त्रीय, राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक कारणे असू शकतील. तरीही एक गोष्ट निःसंदिग्धपणे सांगितली पाहिजे, ती अशी की, आपल्या दहा कोटी लोकांची मायमराठी मरणपंथाला वगैरे निश्चितच लागलेली नाही. मराठी मृत्यूपंथाला लागलेली नसेल तर ठिकठिकाणच्या व्यासपीठांवरून, चर्चासत्रांमधून, संमेलनांमधून असा केविलवाणा आक्रोश का बरे सुरू आहे? ती आजारी पडलेली आहे काय? तसेही दिसत नाही. मराठी भाषेचे अराजक माजल्यासारखे का वाटते? मराठी समाजाचा मूलभूत न्यूनगंड, व्यापार-उद्यम व संपत्ती साधनेविषयीची उदासीनता, अतिरेकी सहिष्णुता व फाजील आत्मविश्वास यांचे जालीम मिश्रण; हिंदी भाषकांचे गेल्या वीस-पंचवीस वर्षांत महाराष्ट्राच्या खेड्यांसह सर्व भागात वेगाने होत असलेले स्थलांतर; जागतिकीकरणाची प्रक्रिया, डिजिटल तंत्रज्ञान, दळणवळणाची साधने, चित्रवाणी वाहिन्या यांमधील प्रगतीमुळे जगाचे जवळ येणे व परस्परावलंबन वाढणे; कल्पनातीत वेगाने होणारे जगाचे सांस्कृतिक सपाटीकरण; भाषारक्षणासाठी, अस्मितारक्षणासाठी एवढेच नव्हे तर घटनेने दिलेले भाषिक अधिकार बजावण्यासाठीदेखील शासकीय पातळीवर आणि मराठी भाषा अभ्यासकांमध्ये व साहित्यिकांमध्ये गांभीर्याचा, चिंतेचा इच्छाशक्तीचा, जिद्दीचा आणि रचनात्मक धोरणांचा अभाव.. या शक्ती मराठी भाषेवर प्रभाव टाकत आहेत. मराठी मातृभाषा असलेले लोक आपल्याच महानगरांमध्ये व शहरांमध्ये सार्वजनिक ठिकाणी मराठी बोलायला कचरतात. बहुभाषिक पंचतारांकित वर्तुळामध्ये उच्चवर्गीय मराठी भाषकांना एकमेकांशी मराठीत बोलण्याची शरम वाटते. इतर भाषक तसे करीत नाहीत. हा सनातन न्यूनगंड. महाराष्ट्रात येणाऱ्या परभाषिकांना मराठी शिकण्याची आवश्यकता वाटत नाही आणि मराठी लोकही त्यांनी मराठी शिकू नये अशीच वागणूक त्यांना देतात. शिखरस्थाने आणि संपन्न करियर क्षेत्रे इंग्रजी शिक्षित शहरी मध्यमवर्गाने बळकाविली असून त्यामुळे मराठी माध्यमाच्या ग्रामीण तरुणांची प्रगतीची बंद झालेली दारे उघडायची असतील, तर ग्रामीण मुलांनी इंग्रजीचाच आश्रय घेतला पाहिजे. प्रगतीसाठी यापुढे मराठी उपयोगी नाही आणि मराठीला भविष्य नाही अशी तीव्र भावना जी मध्यम व उच्चवर्गीयांमध्ये होती ती आता सर्वच मराठी समाजात वाढू लागली आहे. एकूणच महाराष्ट्र व मराठी समाज गेल्या अनेक दशकात सर्वच आघाड्यांवर मागे का पडू लागला आहे हे पाहायला हवे. त्यासाठी मराठी समाजाने, मराठी विचारवंतांनी व साहित्यिकांनी कठोर आत्मपरीक्षण करणे करजेचे आहे. त्यासाठी गेल्या ऐंशी- नव्वद वर्षांत एकूणच मराठी माणसाची मानसिकता कशी बदलली हे तपासले पाहिजे. खरे तर इंग्रजीच्या प्रभावशाली वर्तुळाने सर्व भारतीय भाषांवर जणू चेटूकच टाकले आहे; पण इतर बहुतेक भाषातील लोक इंग्रजी शिडीचा उपयोग करून घेतात. मराठीतील सर्वसामान्य जनता इंग्रजीत कच्ची असेल; पण महाराष्ट्रातील बुद्धिवादी उच्चवर्गीय महाजन इंग्रजी भाषेत कमी पडतात असे कोण म्हणेल? ते देखील भारतीय बुद्धिवादी वर्तुळामध्ये प्रवेश करू शकत नाहीत किंवा त्यावर ठसा उमटवू शकत नाहीत. आजच्या क्षणी मराठी भाषेच्या भवितव्याची रेषा कोणत्या दिशेने जाते आहे, त्याचे निदान असे करता येईल. आठशे वर्षांचे समृद्ध काव्य व साहित्य लाभलेली, नऊ कोटी लोकांची प्रगल्भ व सुंदर मराठी भाषा सहजासहजी नाहीशी होणे शक्य नाही, लवचिकता व प्रवाहीपणा ही लक्षणे तिने आत्मसात केली असल्याने संक्रमण काळातील आव्हाने स्वीकारण्यासाठी ती सक्षम आहे. त्यामुळे ती बदलते आहे. पुढील एक-दीड शतकात मराठी समाज जसा बहुभाषिक आहे तसाच राहील. मात्र त्यात गुणात्मक फरक असेल. ज्ञानभाषा म्हणून मराठी विकसित करण्याची संधी आपण गमावल्याने पुढच्या काळात मराठी समाज इंग्रजीचा किंवा जागतिक भाषेचा आधार ज्ञानभाषा म्हणून घेईल. ज्ञानेश्वरांपासून तो ढसाळापर्यंतचे उत्तमोत्तम मराठी साहित्य-संचित या बदललेल्या भाषेत त्यापुढील पिढीसाठी कसे न्यायचे हा प्रश्न आपल्या व पुढच्या पिढ्यांना सोडवावा लागेल. मराठी भाषेची लवचिकता आणि प्रवाहीपणा यांना उत्तेजन देऊन नवनवी शब्दसंपदा आत्मसात करीत असताना मराठीचा आत्मा गमवायचा नसेल तर एक साधी गोष्ट मात्र करावी लागेल. आपला आळस व न्यूनगंड सोडून ज्ञानेश्वर - तुकारामाचे स्मरण करीत थोडीशी हिंमत धरून महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी जिद्दीने शक्य तेथे मराठीत बोलायचे. आपल्याच राज्यात आपलीच भाषा बोलायला कसला आला आहे संकोच किंवा शरम? तेव्हा या व्यासपीठावरून मराठीप्रेमी लोकांना एकच आवाहन करता येण्यासारखे आहे. लोकहो, महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी मराठीत बोला. बदलणाऱ्या जगात आणि बदलणाऱ्या भाषेत मराठीचे जे संचित आपल्याला टिकवायचे आहे आणि पुढे न्यायचे आहे त्यासाठी मराठी साहित्यिकांनी थोडे तरी प्रगल्भ झाले पाहिजे, आपली क्षितिजे विस्तारली पाहिजेत, क्षितिजाच्या पलीकडे पाहणाऱ्या संजमस ऊर्जेला मुक्त सोडले पाहिजे. त्याचबरोबर लहान बालकाची जिज्ञासा, कुतूहल, ग्रहणक्षमता, निष्पाप पारदर्शकता आणि प्रज्ञावान योग्याची नम्रता याही गोष्टी आत्मसात करायला हव्यात. तरच ज्ञानेश्वर-तुकारामांनी मायमराठीच्या वतीने समस्त विश्वाला जे वचन दिले त्याला आपण जागू शकू.
|
किती जण एटीएम वर पैसे काढताना मराठी भाषेचा पर्याय वापरतात? सन्शोधनाचा विषय हे, नाही का? की असा पर्याय असतो हेच माहीत नसते???? DDD आपुन तर बोवा मराठीच वापरतो एटीएम वर देखिल!
|
मी वापरतो. पण तिथली मराठी भयावह असते.
|
Yogy
| |
| Monday, February 05, 2007 - 8:12 am: |
|
|
भारतीय स्टेट बँकेच्या एटीएम मध्ये मराठी पर्यायात. "पैसे काढा" या पर्यायात कोणत्या तरी ढ माणसाने "ढ" ला दोन काने दिले होते. याबाबत चिंचवड शाखेच्या व्यवस्थापकांकडे तक्रार केली असता त्यांनी "तुम्हाला इंग्रजी कळत नाही का?" असा उलट सवाल केला. मात्र ही तक्रार दाखल करुन घेऊन पुढे त्यात सुधारणाही झाली. असाच अनुभव बॅंकेत पैसे भरताना आला. अर्जावर मराठीत रक्कम "एक हजार शहाऐंशी रुपये फक्त" असे लिहिले तर शेजारच्या माणसाने "एवढा 'जंटलमन' दिसतो पण साधं इंग्रजीत अर्ज लिहिता येत नाही" अशा अविर्भावात, "अर्ज भरायला मी मदत करु का?" विचारलं होतं. आर्थिक व्यवहारात व सर्वच सार्वजनिक ठिकाणी मराठीचा वापर वाढला पाहिजे. नाहीतर केवळ उंबरठ्याच्या आतच तिचे अस्तित्व मर्यादित राहील. केंद्र सरकारची कार्यालये उदा. पोस्ट व डाक खाते, भारतीय रेल्वे, बॅंका हे लोक हिंदी ही राष्ट्रभाषा आहे इंग्रजीऐवजी तिचाच व्यवहारात वापर करा असा खोटारडा प्रचार करतात. महाराष्ट्रातील बहुतेक बॅंका, विमा कंपन्या यांच्या कॉल सेंटर्सवर हिंदी व इंग्रजी हे दोनच पर्याय उपलब्ध असतात. मात्र दक्षिण भारतात स्थानिक भाषेचा अंतर्भाव करुन तीन पर्याय उपलब्ध असतात. मात्र आपण कधीही "मला मराठीत संभाषण करणारा कोणी मिळेल का?" असे या कॉलसेंटरवर विचारत नाही. असा आग्रह धरल्यास तुम्हाला नक्कीच मराठी संभाषण करणारा माणूस दुसर्या बाजूस मिळेल. मी स्वत: आयसीआयसीआय प्रु. च्या विमा सेवेबाबत चौकशी करताना मराठीचा आग्रह धरला असता त्यांनी मराठी संभाषणकर्त्याशी जोडून दिले होते. सर्वांनीच नियमितपणे आग्रह धरल्यास त्यांना तीन भाषा सुरु कराव्याच लागतील.
|
योगी, अगदी खरे आहे तुझे. आय सी आय सी आय च्या मदतसेवा केंद्राशी बोलताना मी कायम मराठीतच बोलतो. त्यांचे प्रतिनिधी सुरवात हिंदी किंवा इंग्लिश मधून करतात, पण आपण मराठीत बोलायला लागल्यावर मात्र मराठीत बोलतात. दूरदर्शनवरील सह्याद्रि वाहिनी मराठी असली, तरी, सर्व आकडे मात्र इंग्रजीत दाखवितात. मराठीत आकडे लिहायची शरम वाटते का काय कोणास ठाऊक? ई-टीव्ही च्या मराठी वाहिनीवर मात्र सर्व आकडे मराठीत असतात. लोहगाव विमानतळावर सर्व घोषणा हिंदी आणि इंग्लिशमधून करतात. मराठीतून नाही! पुर्वी (५-६ वर्षांपूर्वी) मी एकदा तिथले सूचनापत्र भरून मराठीत घोषणा सुरू करण्याची विनंती केली होती. काही दिवसांनी तिथल्या अधिकार्याचे मला उत्तर आले होते. त्यात त्याने मराठीची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले होते. मला वाटते की काही दिवसच मराठीत सुद्धा घोषणा होत होत्या. परंतु थोड्या दिवसांनी हा उपक्रम बंद पडला. आता परत सूचनापत्र भरून दिले आहे. बघू काय होते ते! जे महाराष्ट्रातल्या विमानतळावरून प्रवास करतात, त्यांनी जर प्रत्येक वेळी अशी सूचना केली, तर, कायमस्वरूपी व्यवस्था होऊ शकेल. माझा असा सर्वसाधारण अनुभव आहे की, महाराष्ट्रात तुम्ही जर दामटून मराठीत संभाषण केलेत, तर, तुमच्या समोरची बहुसंख्य (अमराठी आणि आश्चर्य म्हणजे मराठी सुद्धा!) माणसे मराठीत (मोडक्या-तोडक्या का होईना) संभाषण करतात.
|
Yogy
| |
| Monday, February 05, 2007 - 5:02 pm: |
|
|
माझा असा सर्वसाधारण अनुभव आहे की, महाराष्ट्रात तुम्ही जर दामटून मराठीत संभाषण केलेत, तर, तुमच्या समोरची बहुसंख्य (अमराठी आणि आश्चर्य म्हणजे मराठी सुद्धा!) माणसे मराठीत (मोडक्या-तोडक्या का होईना) संभाषण करतात. हे अगदी खरे आहे. असाच अनुभव मला MIN क्रमांकासाठी अर्ज देताना एचडीएफसी मध्ये आला. आपण मराठीतून सुरुवात केली तर ९०% वेळा प्रतिसाद मराठीतूनच येतो. दुर्दैवाने मराठी माणूस (बहुधा भाषेची लाज वाटते म्हणून की काय) सुरुवात मराठीतून करतच नाही.
|
मेढेकर,योगि तुमच्या सगळ्या पोस्टना माझे अनुमोदन! आमच्या दुर्दैवाने भारताबाहेर असल्याकारणाने इंग्रजि शाळेत मुलांना घालण्यावाचुन पर्याय नव्हता पण मनाशी ठरवुन घरात फ़क्त आणि फ़क्त आपल्या माय मराठितुनच बोलतो,त्यामुळे मुलांना मराठि अस्खलित बोलत येत.किंबहुना आता मराठी लिहिण्याचा प्रयत्न देखिल मुले करु लागलि आहेत. जेंव्हा भारतात सुट्टी मधे जातो तेंव्हा बहुतेक लोकांना आमचि मुले शुद्ध मराठी बोलतात याचे आश्चर्य वाटते.पण माझा ऊर मात्र अभिमानाने भरुन येतो. माझा अनुभव सांगायचाच झाला तर पहिल्या वेळेस सुट्टि साठि जाताना मुंबई विमानतळावर हिंदि आणि इंग्रजिचाच प्रयोग केला जातोय हे लक्षात आल्यावर मी फ़क्त मराठितुनच बोलायचे असे ठरवले, मग समोरचा अधिकारि मराठी नसला तरि त्याला येत असेल तशा मराठीतच संभाषण करणे भाग पडते(पाडायचे) हा माझा अनुभव. आपल्य मातृभाषेचे संवर्धन करणे हे प्रत्येक मराठी भाषिकाचे आद्य कर्तव्य आहे असे मी मानते. जय हिंद! जय महाराष्ट्र!
|
|
मायबोली |
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|