Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 14, 2008

Hitguj » Views and Comments » General » बिजींग ऑलिंपिक्स २००८ » Archive through March 14, 2008 « Previous Next »

Dinesh77
Monday, March 10, 2008 - 4:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मुकुंद,
खाशाबा जाधव, यशवंतराव चव्हाण हे माझ्याच शाळेचे माजी विद्यार्थी.
श्री. खर्डेकर यांची मदत ही मलापण नवीन माहिती आहे.
धन्यवाद. खरच खुप सुरेख लिहिता आहत.


Mandard
Monday, March 10, 2008 - 5:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मुकुंद खाशबा जाधव यांच्या बद्दल लिहिण्यासाठी. मी पण टिळक हायस्कुलला होतो.

Tanyabedekar
Monday, March 10, 2008 - 7:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारतीय हॉकी संघ १९२८ नंतर पहिल्यांदाच ऑलिंपिक स्पर्धेसाठी पात्र होण्यास अयशस्वी ठरला. आपण ब्रिटन कडुन २-० अश्या फरकाने हारलो.

Raviupadhye
Monday, March 10, 2008 - 10:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज पहाटेच हॉकीत ब्रिटन कडून दोन गोलांनी पराभवाची बातमी १९२८ नन्तर पहिल्यांदा ऑलिम्पिकच्या हॉकी मध्ये भारत खेळणार नाही-फार फार वाईट वाटले

Mukund
Monday, March 10, 2008 - 10:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्रिकेट म्हटले की डॉन ब्रॅडमन,हॉकी म्हटले की ध्यानचंद, बास्केटबॉल म्हटले की मायकेल जॉर्डन, गॉल्फ़ म्हटले की टायगर वुड व टेनीस म्हटले की रॉजर फ़ेडरर ही समिकरणे आपल्या डोक्यात पक्की बसली आहेत... पण धावण्याच्या बाबतीत आतापर्यंत सर्वश्रेष्ठ म्हणुन कोणाचे नाव तुमच्या डोळ्यासमोर येते? झेकोस्लोव्हाकियाचा एमिल झाटोपेक? की इथियोपियाचा अबेबे बिकीला? की फ़िनलंडचा लास्से विरेन अथवा पावलो नुर्मी? की अमेरिकेचे कार्ल लुइस,जेसी ओवेन्स व मायकेल जॉन्सन?...... सर्वोत्कृष्ट धावपटु म्हणुन या सगळ्यांची नावे जरुर विचारात घेतली पाहीजेत... पण यापैकी कोणीच जगातला आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट धावपटु नाही हे तुम्हाला सांगीतले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल ना? पण आज मी तुम्हाला अश्या माणसाबद्दल सांगणार आहे की जो आज जगातला आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलु धावपटु म्हणुन ओळखला जातो...

या माणसाची कहाणी ऐकुन तुम्हाला कळेल की आपण कुठे व कुठल्या परिस्थीतीत जन्म घेतो हे आपल्या हातात नसते पण नशिबाला दोष न देत बसता..... प्रचंड इच्छाशक्ति व अविरत मेहनतीच्या बळावर माणुस यशाचे सर्वोच्च शिखर गाठु शकतो...

या माणसाचा जन्म इथियोपियातील असेला या अतिशय लहान खेडेगावात झाला. याचे आईवडिल अत्यंत गरीब असे कुळाची शेती करणारे शेतकरी होते. शेणाने सारवलेली जमीन व मातीच्या भिंती असलेल्या एका खोलीच्या घरात याची अजुन ९ भावंडे याच्याबरोबर लहानाची मोठी होत होती. ही सगळी मुले लहानपणापासुनच आईवडिलांना शेताची कामे करायला मदत करत असत. त्यासाठी हा सकाळी ५ वाजता उठुन त्याच्या प्रेमळ आईभोवती सावलीसारखा तिला मदत करायला फिरत असायचा... मग अशी ५ तास... कुठे गवताच्या गंज्या करुन उचल तर कधी घरातल्या गाढवे,बकर्‍या,गाई यांना चरायला ने तर कधी गावापासुन चार मैलावर असलेल्या ओढ्यावर पाणी भरायला बाभळीच्या काट्याकुट्यातुन व दगड धोंड्यातुन अनवाणी चालत जा.... अशी मेहनतीची कामे करुन हा मुलगा मग १० वाजता... सहा मैल दुर असलेल्या शाळेत अनवाणीच... परत बाभळीच्या काट्याकुट्यातुन... दप्तर नसल्यामुळे हातातच वह्या पुस्तकांचा गट्ठा घेत... शाळेत पळायचा. शाळेत उशिरा पोचला तर शिक्षकांच्या पट्टीचा मार हातावर घेत.. त्या हाताच्या वेदना व पायाला टोचलेल्या बाभळीच्या काट्यांच्या वेदना... सहन करत तो दिवसभर शाळेत मन लावुन अभ्यास करायचा.परत संध्याकाळी पाच वाजता वडिलांचा मार चुकवायला तो पळत पळत घरी यायचा व अंधार पडेपर्यंत परत वडिलांना शेतावर तो मदत करायचा. असा दिवसभर दमुन मग संध्याकाळचे.... एक वेळच घरात मिळणारे.... अंजेराचे(डोस्यासारखा तांदळापासुन बनवलेला इथियोपियन पदार्थ!) जेवण जेवुन हा मुलगा दमुन भागुन झोपी जायचा. आईच्या कुशीत रोज झोपताना तो विचार करायचा... उद्या मला शाळेत लवकर पोचायलाच हवे... मास्तरांची पट्टी खुप लागते हाताला.. घरुन लवकर तर वडिल सोडणार नाहीत... पण जरा जास्त जोरात धावलो तर मी शाळेत वेळेवर पोचु शकतो....... देवा.. मला जोरात पळण्याची शक्ती दे... म्हणजे माझा शाळेतला मार वाचेल... अशी प्रार्थना करुन त्याचा दमलेला जीव कधी गाढ झोपी जायचा... ते त्याला समजायचे सुद्धा नाही...

पाणी भरायला रोज जाउन येउन आठ मैल व शाळेत जायला जाउन येउन १२ मैल... असे अगदी लहान वयापासुन याला पळण्याची सवय झाली. सुरुवातीला गरज म्हणुन धावणार्‍या याला... थोड्या वर्षांनी खरोखरच धावणे आवडु लागले... तशात याचा जन्म इथियोपियासारख्या देशात... (ज्या देशात अबेबे बिकिला,मामो वाल्डे व मिरुट्स यिफ़्टर सारखे जगप्रसिद्ध धावपटु निर्माण झाले होते व ज्यांनी इथियोपियाचे नाव जगामधे प्रसिद्ध केले होते)...... झाला होता. त्यामुळे असेला हे त्याचे गाव अतिशय लहान असुनसुद्धा.... गावाच्या पारावर गावातली लोक... या महान धावपटुंच्या गोष्टींची पारायणे करायची. यानेही गावकर्‍यांनी रंगवुन रंगवुन सांगीतलेली ती पारायणे.... लहानपणापासुन बर्‍याच वेळेला ऐकली होती.व रोज शाळेत जाताना धावत असताना त्याच्या डोक्यात विचार यायचे.. आपण सुद्धा अबेबे बिकीला किंवा मामो वाल्डे सारखे अपल्या देशाचे नाव मोठे का नाही करु शकणार? माझी आई तर मला रोज सांगत असते की खुप मेहनत व देवावरची श्रद्धा... या दोन्ही गोष्टी एकसाथ केल्या.... तर कुठलीच गोष्ट अशक्य नाही... मी नक्कीच रोज शाळेत जाताना जोरात पळायचा मनापसुन प्रयत्न करतो... एक दिवस... माझ्या देवावर असलेल्या श्रद्धेला व माझ्या या धावण्याच्या मेहनतीला.... आई सांगते त्याप्रमाणे जरुर यश येईल व मी कोणीतरी मोठा बनीन.... अशी स्वप्न बघत हा मुलगा त्या पारावरच्या गोष्टी ऐकत त्या गोष्टीत हरवुन जायचा... कधी कधी विरंगुळा म्हणुन.. वडिलांची नजर चुकवुन... शनिवार्-रविवारी होणार्‍या.. ४ मैल लांब असलेल्या गावातल्या धावण्याच्या शर्यती बघायला... हा मुलगा शेतावरुन पोबारा करायचा. त्या शर्यती बघत असताना.. आपणही अश्या शर्यतीत एक दिवस भाग घ्यायचा असा तो मनोमनी निश्चय करायचा..

असे वर्षामागुन वर्षे जात होती व अचानक तो १४ वर्षांचा असताना त्याच्या डोक्यावर असलेल्या त्याच्या प्रेमळ आईचे छत्र त्याच्या डोक्यावरुन अचानक नाहीसे झाले... त्याची आई.... अती काम केल्यामुळे व १० मुलांना जन्म देउन व त्यांचे व शेताचे काम करुन करुन थकल्यामुळे... स्वर्गवासी झाली. या मुलाचे आईच्या स्वर्गवासानंतर शेतावरच्या कामात अजिबात लक्ष लागेनासे झाले... वडिलांच्या तो मुळीच जवळ नव्हता. आई गेल्याचे दु:ख विसरायला त्याने आता मैलोन मैल... गावाच्या आसपासच्या रेताड व बाभळीच्या काट्याकुट्याने भरलेल्या टेकाडावरुन एकटेच धावण्याचा सराव करण्यास सुरुवात केली... वडिलांनी धाकट दपाशा दाखवला... पण त्याचा याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. त्यांनी मग समजावुन सुद्धा सांगीतले... की बाबा... धावुन कोणाचे भले झाले आहे? बिकेला व मामो वाल्डे सारखे दहा लाखात एक निपजतात.. तु आपल मुकाट्याने मला शेतीला मदत कर... त्यातच तुझे भले आहे... पण याला काही ते पटत नव्हते... याने आता स्वत्:ला धावण्यामधे पुर्णपणे झोकुन दिले होते... धावण्यात त्याला आता आईच्या मृत्युचे दु:ख विसरायचे होते... लहानपणापासुन पाहीलेली व मनात रंगवलेली स्वप्ने... त्याला आता आपल्या धावण्याच्या मेहनतीने पुर्ण करायची होती... व असेच एकदा.... एकटाच अनवाणी धावत असताना.... जवळच्या एका मोठ्या गावातल्या एका प्रशिक्षकाचे लक्ष याच्यावर पडले.... याची धावण्याची ढब बघुन त्या प्रशिक्षकाला लगेच कळले की या मुलामधे नैसर्गीक देणगी आहे. त्याने याला हाक मारुन जवळ बोलवुन घेतले व विचारले की त्याला धावण्याचे प्रशिक्षण कोण देत आहे? त्यावर याने म्हटले कोणी नाही... त्याने विचारले की तु तुझा डावा हात असा वाकडा ठेवुन का धावतोस? त्यावर हा म्हणाला.... मी लहानपणापासुन शाळेत जाउन येउन १२ मैल धावायचो.. त्यावेळेला माझ्या डाव्या हातात वह्या पुस्तकांचा गट्ठा असायचा.. तो गट्ठा पकडुन पकडुन माझा हात आता असा कायमचा वाकडा झाला आहे.. त्या प्रशिक्षकाने सांगीतले की जर त्याला धावण्याचे यथोचीत प्रशिक्षण हवे असेल तर त्या गावात दर गुरुवारी सरावाला ये.याचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याने नेमाने त्या गावात दर गुरुवारी जायला सुरुवात केली.. अर्थातच ते गाव व याच्या गावा दरम्यानचे अंतर हा धावुनच काटायचा... व लवकरच याची निवड त्या प्रशिक्षकाने त्या गावातील अजुन २ धावपटुंबरोबर.... इथियोपियाची राजधानी... अदिस अबाबा इथे.... मोठ्या क्लबमधे प्रशिक्षण घ्यायला जाण्यासाठी केली.वडिलांच्या विरोधाला न जुमानता मग याने आपले चंबुगबाळे एका कापडी पिशवीत भरुन अदिस अबाबाला कुच केले...

उपजतच धावण्याचे कसब व त्यात इतक्या वर्षांची स्वत्: केलेली मेहनत... या दोन गोष्टींच्या बळावर हा मुलगा अदिस अबाबाच्या प्रशिक्षण केंद्रात झपाट्याने प्रगती करु लागला. पण त्याला जागतीक दर्जाचा धावपटु व्हायला अजुन बराच पल्ला गाठायचा होता. अदिस अबाबाच्या क्लबतर्फ़े त्याला निरानिराळ्या शर्यतीत भाग घ्यायला मिळणार होता. पण याने भाग घेतलेल्या मॅरेथॉनच्या पहिल्याच शर्यतीत हा ९९ वा आला... व त्याला त्याच्या प्रशिक्षकांनी १०००० मिटर्स शर्यतीवर लक्ष केंद्रीत करण्यास सांगीतले. त्या सल्ल्याचे पालन करुन मग याने पुढची २ वर्षे मॅरेथॉन ऐवजी ५००० व १०,००० मिटर्सच्या शर्यतीवर सगळी मेहनत घेण्यास सुरुवात केली. आता १९९३ साल उजाडले व याच्या प्रशिक्षकांच्या मते हा आता जागतीक स्पर्धांना तयार झाला होता... त्याची ५००० व १०,००० मिटर्समधली वेळ जागतीक विक्रमाच्या वेळेशी शिवाशिवीचा खेळ खेळु लागली होती... पण ही तर तो पुढे जाउन गाजवणार्‍या त्याच्या विक्रमी कारकिर्द्रीची नुसती नांदीच होती.... व अदिस अबाबाला... या गरीब शेतकर्‍याच्या घरात जन्म घेतलेल्या एका साध्या मुलाचे..... एखाद्या सुरवंटाचे जसे सुंदर फुलपाखरात रुपांतर होते तसे... आपल्या धावण्याने पुढे जग गाजवुन टाकणार्‍या एका कुशल,जागतीक दर्जाच्या व जिद्दी धावपटुमधे रुपांतर झाले.... या जिद्दी मुलाचे नाव.............. हेली गेब्रसलास्सी!

क्रमंश:



Mukund
Monday, March 10, 2008 - 11:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तर असा हा हेली १९९३ च्या स्टटगार्ट,जर्मनी इथे होत असलेल्या जागतीक ऍथलेटिक्स स्पर्धांना... ज्या दर दोन वर्षांनी होतात.... येउन पोहोचला. त्याची ही जगाच्या रंगमंचावर शर्यत धावण्याची पहीलीच वेळ होती... जगातल्या इतर धावपटुंचे कौशल्य त्याला प्रथमच दिसुन येत होते व १०,००० मिटर्स फ़ायनल्सला..... त्याच्यात व केनियाच्या मोझेस तनुई मधे अटितटीची लढत झाली... शेवटच्या ४०० मिटर्समधे हेलीचा मोझेसबरोबर धक्का लागुन मोझेस तनुईचा एक शु बाहेर आला व त्या वादग्रस्त शर्यतीत.... हेली गेब्रसेलास्सीने आपले १०,००० मिटर्समधले पहिले जागतीक विजेतेपद मिळवले व जागतीक रंगमंचावर आपल्या आगमनाची यशस्वी तोफ़ डागली. हेलीच्या विक्रमी कारकिर्द्रीची सुरुवात अशी वादग्रस्त शर्यतीने झाली असली तरी त्याने यानंतरची १५ वर्षे.... दिर्घ पल्ल्याच्या शर्यतींमधले गाजवलेले निर्विवाद वर्चस्व.... वॉज एनिथींग बट कॉन्ट्रोव्हर्शियल!

असे स्टटगार्ट मधे आपले १०,००० मिटर्सचे पहिले जागतीक विजेतेपद मिळवल्यावर हेलीची कामगीरी दिवसागणीक तोंडात बोटे घालण्यालायक होत गेली. १९९४ मधे हॉलंडमधील हेंजेलो येथे गेब्रसेलास्सीने ५००० मिटर्समधे आपला पहिला जागतीक विक्रम नोंदवला.... जगात एक तरी जागतीक विक्रम करणे म्हणजे केवढे कौतुकास्पद व महा कर्मकठिण काम असते..... पण हेली गेब्रसेलास्सीने मात्र पुढची १४ वर्षे..... धावण्याच्या शर्यतीत..... १५०० मिटर्सपासुन ते मॅरेथॉन शर्यतीपर्यंत.... सर्व पल्ल्याच्या शर्यतीमधे तब्बल २५ जागतीक विक्रम नोंदवुन...... जगातला आतापर्यंतचा सर्वोत्तम धावपटु म्हणुन सर्व जगात... मानमान्यता मिळवली... याच्या अष्टपैलुत्वाची जाण यायला कुठल्या कुठल्या पल्ल्याच्या शर्यतीत याचे जागतीक विक्रम आहेत हे पहा... १५०० मिटर्स,२००० मिटर्स,३००० मिटर्स,५००० मिटर्स,१०,००० मिटर्स,२०,००० मिटर्स,२ मैल,५ मैल,१० मैल,हाफ़ मॅरेथॉन व मॅरेथोन!अश्या या गेब्रसेलास्सीच्या प्रत्येक शर्यतीवर एक अक्खे पुस्तकच लिहीता येईल.... पण आज मी तुम्हाला फक्त त्याच्या पहिल्या ऑलिंपिक अनुभवाबद्दल सांगणार आहे.त्यासाठी आपल्याला आज जावे लागेल..... १९९६ च्या ऍटलंटा ऑलिंपिक्सला....

तर असा हा गेब्रसेलास्सी १९९६ ला जेव्हा ऍटलांटा ऑलिंपिक्समधे येउन पोहोचला... तोपर्यंत सगळ्या जगाला माहीत झाला होता. १९९३ मधली याची केनियाच्या मोझेस तनुइ बरोबरची शर्यत ही त्याची केनियाच्या महान धावपटुंबरोबर पुढे होणार असलेल्या चकमकींची नुसती सुरुवात होती.... गेब्रसेलास्सीच्या निर्विवाद वर्चस्वाला कोणी जर यशस्वीरित्या आव्हान दिले असेल तर केनियाच्याच धावपटुंनी.... १९६८ मधे किपचॉंग किनो पासुन केनियाने सुद्धा सतत जागतीक दर्जाचे.. दिर्घ पल्ल्याचे धावपटु जगाला दिले आहेत. ऍटलांटा ऑलिंपिक्समधे गेब्रसेलास्सीला १०,००० मिटर्समधे आव्हान होते... केनियाच्या पॉल टेर्गट याचे....

जागतीक रंगमंचावर धावण्याची गेब्रसेलास्सीची ही पहीलीच वेळ नसली तरी... इथियोपियामधे त्याच्या शर्यतीचे थेट प्रक्षेपण होण्याची ही पहीलीच वेळ होती.... हेलीच्या काळजात त्यामुळे खुपच कालवाकालव होत होती... शर्यत सुरु करायला तो जेव्हा तयार होउन ऑलिंपिक्स स्टेडिअममधे... ८०,००० दर्शकांसमोर उभा राहीला.... तेव्हा त्याच्या डोक्यात अनेक विचारांचे काहुर माजले होते.... आपल्या लहान गावातील लोक ही शर्यत.... आपण जसे लहानपणी मिरुट्स यिफ़्टरचा मॉस्को ऑलिंपिक्समधला पराक्रम ऐकायला.... छोट्या ट्रांझिस्टरभोवती... गावाच्या पारावर.... गावातल्या इतर लोकांच्या बरोबर... कोंडाळ करुन बसायचो... तसे आपल्या छोट्या गावात असलेल्या एकमेव टीव्हीसमोर... आज आपले वडील, भाउ बहीणी, गावातील सर्व बाळगोपाळ मंडळी व वृद्ध लोक...... ही आपली आजची शर्यत बघत बसली असतील का? या व अश्या विचारांनी हेलीला खुप गहीवरुन आले.... आज त्याला अबेबे बिकिला व मामो वाल्डे यांच्या त्याच्या गावातल्या पारावर सांगण्यात येणार्‍या कहाण्यांमधे..... स्वत्:च्या ऑलिंपिक्स पराक्रमाच्या कहाणीची भर टाकायची सुवर्णसंधी मिळत होती.... ही सुवर्णसंधी त्याला वाया घालवायची नव्हती...

पण त्याच्या या विचारांनी पाणावलेले डोळे..... गेब्रसेलास्सीने चटकन पुसुन टाकले व आपल्यासमोरच्या शर्यतीवर लक्ष केंद्रित केले... त्याला माहीत होते की केनियाचे ३ स्पर्धक या फ़ायनल्समधे आहेत व ते तिघे मिळुन.... कळप करुन....... त्याला दमवुन टाकायच्या प्रयत्नाची पराकाष्ठा करणार... त्याला कशी टक्कर द्यायची याचा विचार त्याने शर्यती आधीपासुनच केला होता.... पण आता तो त्या स्ट्रॅटीजीची त्याच्या मनात उजळणी करु लागला...

शर्यत सुरु झाली....... तिस स्पर्धकांचा घोळक्याने.. ऑलिंपिक्स स्टेडिअमला २५ फेर्‍या मारायला सुरु केले. अपेक्षेप्रमाणे गेब्रसेलास्सी,केनियाचा टेर्गट,केनियाचे इतर दोन स्पर्धक व मोरोक्कोचा एक स्पर्धक... असे हे पाच जण त्या कळपात पुढे होते... गेब्रसेलासी टेर्गटला आपल्या पुढे ठेउन धावत होता... १,२,३..... १०,११,१२..... २०,२१,२२.... अश्या फेर्‍या संपत गेल्या. अजुन कोणीही लिड घेत नव्हते... सगळा घोळका जवळजवळ बरोबरीनेच चालला होता. पण २३ फेर्‍यानंतर मात्र पहिल्या पाच स्पर्धकांनी... आपला वेग पुढच्या गिअरमधे टाकुन.... बाकीच्या घोळक्यापासुन आपल्याला वेगळे करायला सुरु केले. ८०० मिटर्स बाकी होते... या ५ जणांनी ब्लिस्टरींग वेगात धावण्यास सुरुवात केली.. टेर्गट व केनियाचे स्पर्धक गेब्रसेलासीला दमवायचा प्रयत्न करु लागले... आलटुन पालटुन असे ते वेग वाढवुन स्पर्धेचा वेग वाढवत राहीले... गेब्रसेलास्सीला हे आधीपासुनच माहीत होते... त्यानेही त्यांच्याशी... पुढे न जाता.... बरोबरी ठेवली...

शेवटच्या २५ व्या फेरीची घंटा वाजली.... त्या घंटेने गेब्रसेलास्सीच्या छातीतली धडधड वाढली.... या शर्यतीची भिती वाटत होती म्हणुन नाही... तर त्याला त्या घंटीने.... त्याच्या लहानपणी जात असलेल्या शाळेच्या घंटेची एकदम आठवण आली... शाळेत त्याच्या हातावर...उशिर झाला म्हणुन... पट्टी मारणार्‍या कडक शिक्षकांची त्याला आठवण झाली..... ते शाळेत धावत जात असताना लागलेल्या बाभळीच्या काट्यांच्या वेदनांनी त्याला झालेल्या कळवळीची त्याला एकदम आठवण झाली.... त्याच्या प्रेमळ आइबरोबर.. गावाबाहेर ४ मैल लांब मैलावरच्या ओढ्यावर जाउन पाणी आणण्याची त्याला आठवण झाली... या सगळ्या आठवणींनी त्याला एक वेगळेच बळ आले... त्याला या शर्यतीत तो का धावत आहे... याची जाणीव झाली... व दुसरे इंजीन लावुन जसे आगगाडीचा वेग एकदम वाढतो... तसा त्याचा वेग एकदम वाढला... त्याने १०० मिटर्स बाकी असताना बाकीच्या स्पर्धकांना मागे टाकले...... त्याला अंतिम रेष दिसत होती... त्या अंतिम रेषेवर त्याला त्याची प्रेमळ आइ व त्याच्या गावातील बाकीचे लोक... पारावर बसुन.. त्याची वाट पाहात बसलेले दिसु लागले... जणु काही त्यांना भेटायला आतुर झाला आहे असाच त्याने... जिव तोडुन आपला वेग अजुनच वाढवला... प्रत्येक सेकंदाला आपल्या दोन्ही बाजुला आलटुन पालटुन बघत... तो खात्री करुन घेत होता... की आयत्या वेळेला...त्याच्यावर कोणी कुरघोडी तर करत नाही ना... ७५ मिटर्स.. अजुनही तोच पुढे... ५०मिटर्स... टेर्गटनेही आता एक शेवटचा प्रयत्न करुन आपला वेग वाढवायचा प्रयत्न केला... पण गेब्रसेलास्सीच्या इच्छाशक्तीच्या पुढे आज साक्षात ब्रम्हदेवाला पण त्याला गाठणे अशक्य होते!

इकडे गेब्रसेलास्सीच्या छोट्या गावात सगळे गावकरी... त्याच्या वडिलांबरोबर व इतर भावंडांबरोबर.. गावातल्या एकमेव टिव्हीवर... या शर्यतीचे थेट प्रक्षेपण...जीव मुठीत घेउन पाहात होते.... सगळे जण जमीनीवर एका ठिकाणी स्वस्थ बसुन... या शर्यतीचा शेवट बघुच शकत नव्हते!..... चुळबुळ चुळबुळ करत... आपले बुड कधी डावीकडे तर कधी उजवीकडे हलवत... हाताच्या मुठी करुन... त्या चावत... अतिशय उत्कंठतेने... त्यांच्याच गावातल्या एका मुलाची... शर्यत बघत ते सगळे बसले होते... शेवटचे १० मिटर्स... त्यांचा हेली अजुनही शर्यतीत सगळ्यांच्या पुढेच होता... अंगातली सगळी शक्ती एकवटुन... त्यांचा हेली शेवट्ची ३-४ पावले जिवाच्या आकांताने टाकत होता... गावातील सगळे जल्लोश करायला टिव्हीपुढे उभे राहीले होते... तेही त्यांच्या अंगातली सगळी शक्ती हेली गेब्रसेलास्सीला देत होते.... म्हणुनच त्यांच्या सगळ्यांच्या पायातील त्राण जणु काही गेले आहे.... असेच त्या उत्कंठावर्धक शर्यतीच्या शेवटी.... त्या लोकांना वाटत होते... पण त्यांना त्यांच्या पायातील त्राणाची त्यावेळेला अजिबात पर्वा नव्हती... आणी हेलीने तिकडे अंतिम रेषेवरची दोरी... पहिल्या स्थानावर येउन एकदाची तोडली..... व इकडे सगळे गावकरी... उत्स्फुर्तपणे उभे राहुन... जल्लोश करु लागले.... गेब्रसेलास्सीचे वडिल.... क्रुतार्थ होउन... डोळ्यातले अश्रु आवरत... आपल्या गावकर्‍यांना प्रेमाने अलिंगन देत होते.... आज त्यांचा मुलगासुद्धा...... अबेबे बिकिला व मामो वाल्डेसारखा... दहा लाखातला एक असा ठरला होता... असे आपला मुलगा करु शकेल याची गेब्रसेलास्सीच्या वडिलांना स्वप्नात सुद्धा कल्पना नव्हती... पण...... इथियोपियातल्या त्या गरीब लोकांच्या छोट्याश्या गावातील इतर गरीब लोकांबरोबर... गेब्रसेलास्सीचे वडिल... आज ते स्वप्न प्रत्यक्ष जगत होते.........


Paluskar
Tuesday, March 11, 2008 - 4:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार मुकुन्द,

क्रिकेट शिवाय इतर खेळात रस घेणारे एवढे लोक आहेत हे माहीत नव्हत. ज़ानेवारिपासूनची सर्व आर्काइवस वाचली. मी नवीन मायबोलीकर आहे. BB म्हणजे काय

सर्व गोष्टी नवीन आणि मती गुन्ग करणार्या वाटल्या. आगामी ऑलिम्पिक्सच्या पार्श्वभूमीवर हे सगळ वाचताना मजा आली.


Hkumar
Tuesday, March 11, 2008 - 4:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पलुस्कर, BB म्ह. bulletin board , मराठीत बातमी फलक ( बा.फ.)

Akhi
Tuesday, March 11, 2008 - 4:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दर वेळेल काय प्रतिक्रिया द्यायची???
बहोत खुब...........


Giriraj
Tuesday, March 11, 2008 - 7:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुंद,आपणही असे काही करायला हवे असं मनात येतं आणि नसानसांमध्ये रक्त सळसळू लागतं! तुमचे लेखन खूपच प्रेरणादायी आहे!

Raviupadhye
Tuesday, March 11, 2008 - 8:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दे ई छन्द करी धुन्द
प्रिय हा मुकुन्द
क्रीडा कथा जणू मधुसेवनानंद
स्वछ्छंद करी धुन्द
वा शब्द पुरेसे नाहीत


Psg
Tuesday, March 11, 2008 - 9:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुरेख! खूपच रोमांचकारी! मुकुंद, अजून एक मागणी.. इतकं उत्कंठावर्धक लिहित आहेस, तर प्रत्येक वेळी त्या त्या खेळाडूचा फोटोही टाकता येईल का? म्हणजे त्याला डोळ्यासमोर ठेवून सगळं वाचता येईल.. अर्थात हे फ़क्त तुझं लिखाण पर्फ़ेक्ट व्हावं म्हणूनच विचारत आहे.. तू नं. १ लिहित आहेस, याद वादच नाही :-) पुस्तक काढणार असलास, तर यावर नक्की विचार कर :-)

Giriraj
Tuesday, March 11, 2008 - 10:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हेली गेब्रसलास्सी



Giriraj
Tuesday, March 11, 2008 - 10:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


मुकुंद यांनी वर्णन केलेल्या शर्यतिचे विजेते!
(डावीकडून)मोरोक्कोचा हिस्सु(कास्य),इथिओपिआचा गेब्रसल्लसि(सुवर्ण) आणि केनियाचा टेर्गट (रजत)



Psg
Tuesday, March 11, 2008 - 11:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्स गिरी :-)

.... .... ....


Marathifan
Tuesday, March 11, 2008 - 1:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा वा वा किती अभार मानावे मुकुंद तुमचे... thank U for posting such great inspiring stories.. अजुन खूप वाचायचे आहे तुमच्याकडून

Zakasrao
Tuesday, March 11, 2008 - 3:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुंद परत एकदा जबरदत कहाणी :-)
गिर्‍या फ़ोटो लावुन चांगल काम केलस रे :-)
पुनम ( psg ) च्या सुचनेला अनुमोदन :-)


Farend
Wednesday, March 12, 2008 - 1:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुंद एकदम जबरी आहे या मॅचेस आणि तेवढेच हे वर्णन सुद्धा. अजून कॅच अप चालू आहे (७२ च्या बास्केटबॉल मॅच पर्यंतच आलोय), मस्त आहेत सगळी वर्णने.

अमेरिकेच्या बास्केटबॉल टीम चा आता आंतरराष्ट्रीय सामन्यांमधे जोर राहिला नाहे असे वाचले मधे. म्हणजे ते dream team वगैरे गेले का सगळे?


Chinya1985
Wednesday, March 12, 2008 - 3:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुंद फ़ारच छान वर्णन!!!!

Mukund
Friday, March 14, 2008 - 7:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेघधारा,अमेय देशपांडे आणी रवि उपाध्ये... तुम्हाला मेल केली आहे...

पुनम... (तुझे उत्तेजन व सजेशन इज ऑलवेज ऍप्रिशिएटेड!) अग मला हे फोटो वगैरे कसे टाकायचे हे मुळीच माहीत नाही.. उपासला कॉल करुन विचारायला पाहीजे... गिरीराज... तु ते फोटो टाकलेस त्याबद्दल धन्यवाद.

रवि उपाध्ये.. अहो तुमच्यासारखे दर्दी वाचक असताना मलाही या गोष्टी तुमच्यापुढे सांगाव्याश्या वाटतात.... तुम्ही,दिपाली व माझ्या गोष्टींवर अभिप्राय लिहिणारे बाकी सगळे..... मी जितके मनापासुन या गोष्टी लिहीत आहे...... तितक्याच मनापासुन तुम्हा सगळ्यांचे अभिप्राय आलेले आहेत..... हे मला माहीत आहे. त्यामुळे ज्यांना कदर आहे अश्या तुम्हा सर्वांपुढे... मी मला माहीत असलेल्या गोष्टींचा खजिना रिकामा करायला तयार आहे.

केदार.. मंजुला बास्केटबॉलच्या २ पॉइंट्सबद्दल समजवल्याबद्दल धन्यवाद... मंजु.. या वेळेला बैजींग ऑलिंपिक्समधे बास्केटबॉल बघायचा गृहपाठ तुला... (बाय द वे.. मंजु... आपल्या शाळेतला.. कॅंटीनमधला संजुचा फ़ेमस वडा तुमच्यावेळेला पण होता का?:-))

आणी हो... तुम्हाला सगळ्यांना मी वरच्या गोष्टीतल्या हेली गेब्रसेलास्सीला बैजींग ऑलिंपिक्सच्या मॅरेथॉनमधे बघायला सांगणार होतो.. पण आजच कळले की बैजींगमधे अतिशय पोल्युशन असल्यामुळे हेली गेब्रसेलास्सी या ऑलिंपिक्सच्या मॅरेथॉनमधे धावणार नाही :-( पण इथियोपियातर्फ़े १०,००० मिटर्समधे जर तो क्वालीफ़ाय झाला तर अजुनही तो आपल्याला त्याच्या शेवटच्या ऑलिंपिक्समधे बघायला मिळेल...

आणी ज्यांनी ज्यांनी आपल्या हॉकीच्या सुवर्णकाळाबद्दल लिहायला सांगीतले आहे त्यांना.... हो.. त्याही गोष्टी सांगणार आहे... पण "ऍज इट हॅपन्स"च्या रुपात नाही. आणी परवाच झालेल्या हॉकीमधल्या पराभवाच्या पार्श्वभुमीवर हॉकीबद्दल लिहायचा मुडच निघुन गेला :-( पण त्याही आठवणी जरुर लिहीणार आहे...

परत एकदा... नंदिनी,मंजु,दिनेश ७७,मंदार,अरुण,दिनेश,अमोल,झेलम,अमृता,चिन्मय,दोन्ही केदार,दिपाली,मराठीफ़ॅन,बी,अनिकेत,अभि,मेघधारा,एक मुलगी,स्वाती आंबोले,झकास,पूनम,रवि उपाध्ये,गिरीराज,पलुस्कर... तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators