|
Akhi
| |
| Sunday, March 02, 2008 - 7:39 am: |
|
|
मला पण क्रीडाप्रकाराची इतकी माहीती आधी नव्हती पण तुमच्या मुळे कळत आहे. आनी जेव्हा down वाटत ना तेव्हा हा BB वाचायला येते. आता पुढच्या भागाची वाट बघतेय
|
Kedar123
| |
| Sunday, March 02, 2008 - 7:56 am: |
|
|
वा मुकुंद. खूप छान लीहीता आहात. हे सगळ सलग वाचायला मिळाल तर खूप खूप छान वाटेल. लिहीत रहा.
|
Mukund
| |
| Sunday, March 02, 2008 - 12:14 pm: |
|
|
या १९८४ च्या भारतिय ऑलिंपिक पथकामधे प्रथमच भारताने एवढ्या मोठ्या संख्येने ऍथलिट्स पाठवले होते. त्यात प्रामुख्याने महिला ऍथलिट्सचीच संख्या जास्त होती. उषाबरोबर,एम. डी. वलसम्मा,शायनी अब्राहम,वंदना राव व गीता झुत्शी भारतिय महिलांचे प्रतिनिधित्व करत होते. या सगळ्यात शायनी अब्राहम कडुन ८०० मिटर्समधे व ४ बाय ४०० मिटर्स रिलेमधे, व उषाकडुन ४०० मिटर्स हर्डल्स व ४ बाय ४०० मिटर्स रिले शर्यतीमधे पदकांची मोठी अपेक्षा होती. शायनी अब्राहमने ८०० मिटर्समधे उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली पण उपांत्य फेरीत एकदम पुअर रेस धावल्यामुळे तिचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले. तरीसुद्धा उषाच्या आधी तिने ऑलिंपिक स्पर्धांमधे उपांत्य फेरी गाठणारी पहीली भारतिय महिला म्हणुन मान मिळवला. गीता झुत्शीनेही ५००० मिटर्समधे अगदीच निराशाजनक कामगीरी केली. आता सर्व भारताचे लक्ष उषा तिच्या ४०० मिटर्स हर्डल्समधे कशी कामगीरी करते याकडे लागुन होते. १९८४ च्या आधी ४०० मिटर्स हर्डल्स ही स्पर्धा फक्त पुरुषांपुरतीच मर्यादीत होती पण या ऑलिंपिक्समधे प्रथमच हा प्रकार स्त्रियांसाठी पण खुला केला होता. भारतात सोडा.. पण संपुर्ण जगातसुद्धा या प्रकारात महिलांसाठी कंपॅटीटीव्ह स्पर्धा उपलब्ध नव्हत्या... त्यामुळे या वर्षीच्या ऑलिंपिक्समधे कोणालाच ४०० मिटर्स हर्डल्सचा एक स्पर्धा म्हणुन जास्त अनुभव नव्हता. जो काही अनुभव होता तो त्या सगळ्यांना त्यांच्या सरावातुनच जास्त मिळाला होता. अश्या परिस्थीतीत.... परत एकदा अमेरिकन महिलांचेच..... ज्यांना अमेरिकेत अद्ययावत सराव सुविधा उपलब्ध होत्या... पारडे या शर्यतीमधे सुद्धा वर होते. या स्पर्धेची संभाव्य विजेती म्हणुन अमेरिकेच्या मिशिगन स्टेट युनिव्हर्सीटीच्या ज्युडी ब्राउनचेच नाव पुढे येत होते.झालच तर युरोपिअन विजेत्या..... स्विडनच्या लुइस स्टॅगलंडकडेही एक डार्क हॉर्स म्हणुन बघीतले जात होते.जागतीक ऍथलेटिक्सच्या रंगमंचावर भारताच्या पी. टी. उषा व वलसम्मा यांचे नाव कोणालाच जास्त माहीत नव्हते. प्राथमिक फेरीत वलसम्मा बाहेर पडल्यावर उषा ही दोन दिवसात(शायनी अब्राहमच्या पाठोपाठ) ऑलिंपिक्समधे उपांत्य फेरीत पोचलेली दुसरी भारतिय महिला म्हणुन प्रसिद्ध झाली. उपांत्य फेरीतही उषाने आपले धावण्याचे कौशल्य सगळ्या जगाला दाखवुन दिले व अंतिम फेरीत ती प्रवेशकर्ती झाली. आता सगळ्या भारतियांचे लक्ष तिच्या फ़ायनलमधील कामगीरीकडे लागले... ४०० मिटर्स फ़ायनलचा दिवस... पायोलीमधे जन्मलेल्या व निव्वळ एका वर्षापुर्वीच ४०० मिटर्स हर्डल्स या प्रकाराचा सराव सुरु केलेल्या पी. टी. उषाला.... या ऑलिंपिक्सच्या आधी ४०० मिटर्स हर्डल्समधे केवळ २ रेसचा अनुभव होता! त्यातला एक मुंबईत झालेल्या ऑलिंपिक ट्रायलमधला व एक एशियन ट्रॅक ऍंड फ़िल्ड स्पर्धेतला! बस्स! तेवढ्याश्या तुटपुंज्या अनुभवाच्या शिदोरीवर आज उषा ही ऑलिंपिक्समधील अंतिम फेरीची शर्यत धावणार होती... जवळ जवळ ९० कोटी भारतियांच्या अपेक्षांचा भार... आपल्या खांद्यावर पेलवत... आज पी. टी. उषा धावणार होती.... तिला साथ होती ती फक्त तिच्या द्रुढ विश्वासाची... तिच्या कठोर परिश्रमांची.... तिने आजपर्यंत एक स्त्री ऍथलिट म्हणुन केलेल्या अत्यंत खडतर प्रवासाची... एक स्त्री... नाही एक गरीब स्त्री... नाही नाही नाही.... एक गरिब दलित स्त्री....! म्हणुन अनुभवलेल्या अडथळ्यांची.... ते तिने तिच्या आयुष्यात पार केलेले सगळे अडथळ्यांचे डोंगर... उषाला आज समोर दिसत होते. त्यामुळे या ४०० मिटर्सच्या शर्यतीत असलेले अडीच फ़ुट उंचीचे १० अडथळे ती सहज पार परु शकेल याची तिला खात्री होती. कोच नांबियार.. जे तिला वडिलांच्या जागी होते... जे तिला परदेशात असताना स्वत्: जेवण करुन खालु घालायचे... त्यांचे आशिर्वाद व त्यांनी उषावर घेतलेली मेहनत.. तिला या शर्यतीत विजयी व्हायला बळ देइल.... याची तिला खात्री होती.. झालच तर ९० कोटी भारतियांच्या शुभेच्छा व प्रार्थना तिच्या पाठीशी होत्या.. याचीही तिला खात्री होती... आणी सगळ्यात जास्त तिला... तिच्या स्वत्:च्या इच्छाशक्तीच्या बळावर व तिच्यातल्या एक ऍथलिट म्हणुन असलेल्या गुणांच्या बळावर... ती आज पदक मिळवु शकेल... याची पुरेपुर खात्री होती! अपेक्षेप्रमाणे स्विडनच्या लुइस स्टॅगलंडने उपांत्य फेरीत ५५.१५ सेकंदात शर्यत जिंकुन फ़ास्टेस्ट क्वालीफ़ायर म्हणुन अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. अमेरिकेची ज्युडी ब्राउनचे टायमींग फ़ायनलला आलेल्यांपैकी पाचवे होते. उषाचे टायमींग ६ वे बेस्ट होते. आठही फ़ायनलीस्ट आपापल्या लेन मधे... स्टॅगर्ड रितीने... येउन उभे राहीले. उषाला पाचवी लेन मिळाली होती... स्ट्रॅटीजीक द्रुष्ट्या ते चांगलेच होते... मधल्या २ लेन नेहमी फायद्याच्या असतात.. लेन १ मधे रुमानियाची क्रिस्टीना कोजाकरु होती. अमेरिकेच्या ज्युडी ब्राउनला ८ नंबरची लेन मिळाली होती. स्विडनच्या लुइस स्टॅगलंडला लेन २ दिली गेली होती. ही शर्यत कोण जिंकणार हे कोणीच खात्रीलायक रित्या सांगु शकत नव्हते. या सगळ्यांनाच हा ऑलिंपिक्समधला पहिलाच अनुभव होता. त्यामुळे सगळ्यांच्या मनात प्रचंड तणाव आला होता. सगळे खुपच नर्व्हस व ऍंक्शिअस होते. लॉस ऍंजेलीस कॉलोसिअमधील ८४,००० प्रेक्षकांना जेव्हा लाउडस्पिकरवर सांगीतले गेले की ही अशा प्रकाराची महिलांसाठी ऑलिंपिक्समधे होत असलेली पहीलीच फ़ायनल आहे.. तेव्हा त्या सगळ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात या आठही महिलांचे जोरदार स्वागत केले... सगळे स्पर्धक आपल्या लेनमधे वाकुन... स्टार्टींग ब्लॉकच्या स्प्रिंगला पायाचे तळवे टेकवुन... व हाताचे पंजे ट्रॅकवर ठेवत... शर्यत सुरु करणार्या ऑफ़ीशियलच्या बंदुकीच्या बारच्या आवाजाच्या प्रतिक्षेत.. ओणवे उभे राहीले... शर्यत सुरु करणार्या ऑफ़िशियलची बंदुक फाट्ट... कन वाजली... आठही जणी आपापल्या स्टार्टींग ब्लॉकमधुन उसळुन पुढे गेल्या... पाचव्या लेनमधल्या... जांभळी शॉर्ट व हिरवा पट्टा असलेला स्लिव्हलेस स्पोर्ट्स टॉप घातलेल्या.. उंच व सडपातळ उषाने.... स्टार्टर बंदुकीचे टायमींग उत्कुष्ट साधले होते व सगळ्यांपेक्षा वेगवान सुरुवात केली.. हरीणीसारखी चपळ धावुन तिने पहिला अडथळा पारही केला... तेवढ्यात! फ़ॉल्स स्टार्टचा ब्युगुल वाजला व सगळे स्पर्धक स्लो झाले.. पण सगळ्यांना त्यांचा संवेग(मोमेंटम) जवळ जवळ १०० मिटर्सपर्यंत घेउन गेला होता! सगळे नर्व्हस असल्यामुळे कोणीतरी बंदुक वाजायच्या आधीच... स्टार्टींग ब्लॉकमधुन निघाली होती. सगळ्या जणी परत हळु हळु चालत कंबरेवर हात ठेवत... धापा टाकत.. परत माघारी चालत येत... शर्यत सुरु करायला... स्टार्टींग ब्लॉकवर येउन उभ्या राहील्या.. परत एकदा ऑफ़िशियल म्हणाला... सेट!... व परत एकदा फाट्ट! असा बंदुकीचा आवाज झाला... परत एकदा शर्यतीला सुरुवात झाली... या वेळेला मात्र उषाला पहिल्या वेळेसारखे शर्यत सुरु करण्याचे टायमींग बरोबर साधता आले नाही. या वेळेला लेन ३ मधली स्पर्धक जोरात उसळी मारुन स्टार्टींग ब्लॉकमधुन सगळ्यात पुढे गेली... अमेरिकेची ज्युडी ब्राउन तिच्या नेहमीच्या स्लो स्टार्ट करण्याच्या सवयीप्रमाणे सगळ्यात शेवटी होती... उषाने पाचव्या लेनमधे दुसरा अडथळा पार केला तेव्हा ती लेन ३ मधल्या मुलीच्या बरीच मागे पडली होती... अडथळ्यांच्या मधे उषा खुपच छान धावत होती पण अडथळे पार करण्याच्या वेळी तिचा अडथळे पार करण्याचा अननुभव प्रकर्षाने दिसुन येत होता... खुपच ऑकवर्ड असे तिचे अडथळा पार करण्याचे तंत्र होते... १०० मिटर्स झाले... लेन ३ मधली स्पर्धक अजुनही सगळ्यांच्या पुढे होती.. तिचे अडथळे पार करण्याचे कौशल्य सगळ्यांपेक्षा सुंदर होते.. विशेष म्हणजे ती वळणावरती उजवा व डावा असे दोनही पाय अडथळा पार करताना आलटुन पालटुन वापरु शकत होती.. त्यामुळे तिच्या धावण्यात एक प्रकारचा सहजपणा होता.. तिचा एकही क्षण अडथळा पार करताना मिसटायमींग न झाल्यामुळे वाया जात नव्हता... उषा मात्र २ अडथळ्यांच्या मधे सगळ्यांपेक्षा वेगात व चपळतेने पळत असुन सुद्धा अडथळ्यांच्या वेळी टायमींग नीट नसल्यामुळे मोलाचे क्षण वाया घालवत होती... २०० मिटर्स.. म्हणजे अर्धी शर्यत संपली... अमेरिकेची ज्युडी ब्राउन अजुनही खुप मागे होती.. सर्वात प्रथम अजुनही लेन ३ मधली स्पर्धक होती... चट चट असे अडथळे पार करत ती वेगात सगळ्यांच्या पुढे पळत होती... ३०० मिटर्सपर्यंत.. शेवटच्या वळणापर्यंत उषाने आपला वेग वाढवला व लेन ३ च्या नाही तरी इतर काही स्पर्धकांना मागे टाकुन चौथे स्थान मिळवले... तिच्यापुढे लेन १ मधली रुमानियाची क्रिस्टीन कोजाकारु व लेन २ मधली स्विडनची लुइस स्टॅगलंड या नेक टु नेक दुसर्या स्थानावर धावत होत्या. आता क्रम होता... लेन ३ मधली स्पर्धक... मग ५ मिटर्स मागे दुसर्या स्थानावर क्रिस्टीना कोजाकरु व लेन २ मधली लुइस स्टॅगलंड... उषा एकटी चौथ्या स्थानावर... पण अमेरिकेची ज्युडी ब्राउन सुद्धा आता लांब लांब ढांगा टाकत वेगात पुढे येत होती... ती शर्यत वेगात संपवण्यात खुप प्रसिद्ध होती... त्यामुळे तिचा वाढता वेग उषाला नर्व्हस करत होता... आता फक्त ५० मिटर्स राहीले... शेवटचा सरळ स्ट्रेच... जेव्हा सगळ्यांना नक्की कळते की कोण किती पुढे आहे... लेन ३ मधली मुलगी अजुनही पहिल्या स्थानावर धावत होती... आता अमेरिकेच्या ज्युडी ब्राउननने अखेर उषाला मागे टाकलेच. जुडी ब्राउन, लेन १ मधली रुमानियाची कोजाकरु व लेन २ मधली लुइसा स्टॅगलंड... या तिघी आता नेक टु नेक दुसर्या स्थानावर धावत होत्या!..... २५ मिटर्स राहीले... लेन ३ मधली मुलगी अजुनही पहिली.... जवळ जवळ ५ मिटर्सनी पुढे! आणी आता ज्युडी ब्राउन दुसर्या स्थानावर पुढे निघुन गेली... उषाच्या चेहर्यावर... ती तिची सगळी शक्ती एकवटुन करत असलेला प्रयत्न.... सगळ्यांना स्पष्ट दिसत होता... ती थोडीसी स्ट्रगल करताना व दमछाक झालेली अशी दिसु लागली... तरीही नेटाने व जिद्दीने तिने कोजाकरुला व लेन २ मधल्या मुलीला... आपला वेग फ़ायनल स्ट्रेचमधे वाढवुन गाठलेच!.... पण आता फक्त १० मिटर्स बाकी होते... व अमेरिकेची तगडी ज्युडी ब्राउन आता एकटी दुसर्या स्थानावर वेगात बरीच पुढे निघुन गेली होती... लेन ३ मधली मुलगी सुवर्णपदक व लेन ८ मधली अमेरिकेची ज्युडी ब्राउन रजत पदक जिंकणार हे सगळ्यांना कळुन चुकले होते... आता फक्त ५ मिटर्स बाकी... लेन ३ मधली मुलगी फ़िनीश लाइन पार करुन पहिली आलीसुद्धा! ज्युडी ब्राउन दुसर्या स्थानावर होती. आता क्रिस्टीना कोजाकरु, उषा व दुसर्या लेनमधली लुइसा... या तिघी जणी आपले अंग पुढे झोकत... आपल्या अंगात असलेल्या सर्व शक्तीला एकवटुन.... फ़िनीश लाइन कडे स्वत्:ला झोकुन देत होत्या! तिकडे अमेरिकेच्या ज्युडी ब्राउनने दुसरे स्थान मिळवले... आता रुमानियाची क्रिस्टीना कोजाकरु,दुसर्या लेनमधली स्पर्धक व भारताची उषा यांमधे तिसर्या स्थानासाठी अक्षरश: जिवाचा आटापिटा चालला होता... शर्यत पुर्ण झाली... उषा व क्रिस्टीना कोजाकरु... दोघांनीही फोटोफ़िनीशमधे शर्यत एकाच वेळात संपवली!लेन २ मधली लुइसा स्टॅगलंडही फार मागे नव्हती..... तिसरा नंबर कोणाला मिळाला हे नुसत्या डोळ्याने सांगणे खुप कठिण होते... उषाने लगेच जंबोट्रोनवरच्या स्कोरबोर्डकडे आपले डोळे फिरवले... ती पुर्णपणे दमली होती... कंबरेवर हात ठेवत, धापा टाकत..... उत्कंठतेने... ऑफ़िशियल रिझल्ट्स कधी स्कोरबोर्डवर झळकतील... याची ती वाट पाहात होती... तिसर्या स्थानासाठी तिघींचा वेळ जवळ जवळ एकच होता.. त्यामुळे फोटोफ़िनीशमधे... स्लो मोशनमधे घड्याळ बघीतले जात होते... तिसरे स्थान व ताम्र पदक कोणाला मिळाले हा सस्पेंस कोणालाच सोसवत नव्हता.... आणी...... एकदाचा स्कोरबोर्डवर निर्णय झळकला.... सर्व भारतियांचे डोके तो निर्णय बघुन एकदम सुन्न झाले... सर्व देशावर त्या क्षणी निराशेचे सावट पसरले.... भारताची उषा केवळ एक शतांश सेकंदाने ऑलिंपिक पदकाला मुकली होती... रुमानियाच्या क्रिस्टीना कोजाकरुने भारताच्या पी. टी. उशाला अगदी शेवटच्या क्षणी... केवळ एक शतांश सेकंदाने मागे टाकले होते... बरोबर २४ वर्षांनी... १९६० च्या टोकियो ऑलिंपिक्समधे.. भारताचा मिल्खासिंग ४०० मिटर्स फ़ायनलमधे चौथा आलेल्याने जे दु:ख सार्या भारतियांना झाले होते.. त्याचीच पुनरावृती उषा चौथी आल्यामुळे आज होत होती.. तो रिझल्ट बघुन उषाने वाकुन आपले हात कंबरेवर ठेवले... ती तशीच वाकुन.. कंबरेवर हात ठेवुन.. खाली जमीनीकडे बघत... ढसाढसा रडु लागली.... आजुबाजुला ८४,००० लोकांचा जनसमुदाय असुनसुध्हा.. ती त्या क्षणी.... निराशेच्या भयाण एकांतात... दु:खाच्या खोल खाईत... एकटीच तिच्या नैराश्याला... आपल्या आसवांच्या रुपाने वाट काढुन देत होती... (तळटिप.... तिकडे लेन ३ मधली मुलगी आपल्या देशाचा झेंडा घेउन संपुर्ण स्टेडिअमला एक फेरफटका मारत होती... तिनेही आज इतिहास घडवला होता... ती होती मोरोक्कोची... नवल एल मोटवाकल.... अमेरिकेच्या आयोवा स्टेट युनिव्हर्सीटीमधे शिकुन.. अमेरिकेत ऍथलेटिक्सचे प्रशिक्षण घेतलेली... ऑलिंपिक्समधे सुवर्णपदक मिळवणारी पहिली आफ़्रीकन.... व पहिली अरब... व पहिली मुस्लिम महिला!)
|
पी. टी. उषा ची ही गोष्ट आधी ऐकली होती पण इथे जशी "as it happened" दिली आहे तशी नाही. दहावी च्या हिंदी पुस्तकात पी. टी. उषा वरती एक धडा होता. तेव्हा एका ओळीत उत्तरे लिहा साठी पी. टी. उषा चे संपूर्ण नाव काय होते हा प्रश्न हमखास यायचा पण त्यात थोडसं वेगळं नाव होतं पिलुवालकंडी टेकापरवील उषा म्हणुन. अर्थात, केरळी उच्चार नक्की कसा आहे ठाऊक नाही. भारताने हॉकीमधे जिंकलेल्या पदकांच्या गोष्टी आहेत का मुकुंद? सामन्यांचे डिटेल्स सोडा पण एक ध्यानचंद सोडलं तर फ़ार कुणाची नावंही ठाऊक नाहियेत त्या काळातल्या हॉकीपटूंची
|
Dinesh77
| |
| Monday, March 03, 2008 - 3:52 am: |
|
|
सर्व कथा अगदीच अप्रतिम आहेत. प्रत्येकवेळी "जो जिता वोही सिकंदर" चित्रपट बघितल्याची जाणीव होते. मुकुंद, खाशाबा जाधवांची कथा लिहाल का? मला वाटते की ते आॅलेंपिक मधे वैयक्तिक पदक पटकावणारे पहिले भारतीय आहेत.
|
Zakasrao
| |
| Monday, March 03, 2008 - 4:21 am: |
|
|
पी टी उषा ची ही कतह खरच जब्बरदस्त सा.ंगितली तुम्ही. ग्रेट. अमेय हो हो उच्चार कसा काय माहित पण पुस्तकात तु लिहिल्याप्रमाणेच नाव होते. हॉकी च्या अमेयच्या मागणीला अनुमोदन. दिनेश ७७ यानी जे लिहा अशी विनंती केली आहे ते ऐकायला मी कधीपासुनचा उत्सुक आहे
|
Bee
| |
| Monday, March 03, 2008 - 10:07 am: |
|
|
ओणवे उभे राहीले...>> लांब लांब ढांगा टाकत ..>> मुकुंद, अतिशय समर्पक शब्दयोजना, जशी हकीकत तसेच वर्णन ह्यामुळे प्रत्येक खेळाडूंची कथा वाचताना एक वेग आणि उत्सुक्ता जाणवते. ह्या कथांचे तुम्ही एक छान पुस्तक काढू शकता इतक्या मनोरंजन करणार्या व ज्ञानदायक कथा आहेत ह्या. पैसे कमवायच्या हेतूने नाही तर मराठी वाचकांसाठी.. खास करून आपल्या किशोरवयीन बालमित्रांसाठी तरी.
|
Amruta
| |
| Tuesday, March 04, 2008 - 9:28 pm: |
|
|
खरच ह्या सगळ्या गोष्टी अगदी संग्रही ठेवण्यासारख्या आहेत. खुप छान.
|
Mukund
| |
| Friday, March 07, 2008 - 7:49 am: |
|
|
झकासराव... ही गोष्ट तुझ्यासाठी... खाशाबा जाधव ही भारताला ऑलिंपिक्समधे पदक मिळवुन देणारी पहीली व्यक्ती! तुमच्यापैकी काही जणांना त्यांचे नाव ठाउक आहे हे बघुन खुप बरे वाटले. पण आपल्या देशाला ऑलिंपिक्समधे पदकप्राप्ती करुन देउन सुद्धा या माणसाने आपला उभा जन्म दारिद्र्यातच घालवला व त्यांच्या मृत्युनंतर त्यांची विधवा पत्नीही दारिद्र्यातच राहत आहे हे सध्याच्या क्रिकेटपटुंना मिळणार्या पैशाच्या पार्श्वभुमीवर फारच कारुण्यजनक आहे. खाशाबा दादासाहेब जाधव यांचा जन्म महाराष्ट्रातील कर्हाड तालुक्यात गोलेश्वर येथे झाला. कृष्णा व कोयनाच्या संगमाच्या या परिसरात जिथे यशवंतराव चव्हाण व गोपाळ गणेश आगरकर यांसारख्या व्यक्तींचाही जन्म झाला होता तिथे कुस्ती हा प्रकार लोकांच्या नसानसात भिनला आहे. सांगली, सातारा व कर्हाड परिसरातल्या लाल मातीच्या आखाड्यांमधुन मारुती माने,गणपतराव आंदळकर,हरिश्चंद्र बिराजदार,दादु चौगुले व युवराज चौगुलेंसारखे रुस्तम-ए-हिंद जन्माला आले आहेत.पण या सगळ्यांच्या आधी जगाच्या नकाशावर या भागाचे नाव प्रसिद्ध करण्याचे काम खाशाबा जाधव यांनी १९५२ च्या हेलसिंकी ऑलिंपिक्समधे कुस्तीमधे बॅंटमवेट प्रकारात ताम्र पदक मिळवुन केले होते हे आजच्या पिढीतल्या फारच थोड्या लोकांना ठाउक आहे. या पोस्टींगच्या रुपाने निदान मायबोलीच्या तरी वाचकांच्या पुढे या आयुष्यभर उपेक्षिलेल्या पहेलवानाची कथा आज मी सादर करत आहे... वर सांगीतल्याप्रमाणे कर्हाड परिसरातल्या लाल मातीमधे खाशाबा जाधवांचा जन्म झाल्यामुळे कुस्ती प्रकाराचे बाळकडु त्यांना अगदी लहान वयातच मिळाले. त्यात त्यांचे वडिल दादासाहेब जाधव हे स्वत्: उत्तम कुस्ती खेळणारे असल्यामुळे साहजीकच खाशाबांचे गुरु म्हणजे खुद्द त्यांचे वडिलच होते.खाशाबा लहानपणापासुन आपल्या वडिलांच्या खांद्यावर बसुन आजुबाजुच्या गावातील कुस्ती फडात कुस्ती बघायला जायचे. दादासाहेब जाधवांनी आपल्या पाची मुलांना कुस्तीचे प्रशिक्षण दिले पण शेंडेफळ असलेल्या खाशाबांनी शाळेपासुनच जास्त प्राविण्य दाखवुन आपल्या कुस्ती कौशल्याने सगळ्यांचे लक्ष वेधले. प्राथमिक शाळेत असे प्राविण्य दाखवल्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना घरापासुन चार मैल लांब असलेल्या टिळक हायस्कुलमधे घातले जिथे खाशाबा रोज चार मैल भरभर चालत शाळेत जात. त्या शाळेत त्यांनी कुस्तीतच नाही तर कबड्डी, धावणे,पोहणे व जिमनॅस्टिक्समधेही प्राविण्य मिळवले. कॉलेजसाठी त्यांनी कुस्तीसाठी प्रसिद्ध असलेले व जिथे त्यावेळच्या अनेक प्रसिद्ध कुस्तीगिरांनी आपले कुस्तीचे प्रशिक्षण घेतले होते अश्या कोल्हापुरच्या राजा राम कॉलेजमधे प्रवेश घेतला. त्या कॉलेजमधुन ग्रॅज्युएट होइसपर्यंत खाशाबांनी कर्हाड, सातारा, सांगली परीसरच नाही तर संपुर्ण महाराष्ट्र आपल्या कुस्तीने गाजवुन टाकला होता. १९४८ मधे लखनौ इथे झालेल्या अखिल भारतिय कुस्ती स्पर्धेत खाशाबांनी फ़्लायवेट गटात.. त्यावेळचा भारतिय चॅंपिअन.. बंगालचा निरंजन दास याचा पराभव केला व विजेतेपद मिळले. त्या बळावर खाशाबांची १९४८ च्या लंडन ऑलिंपिक्समधे निवड झाली. ऑलिंपिक्सच्या आधी लंडनला काही दिवस भारतिय कुस्तीगीरांना रीस गार्डनर या अमेरिकेच्या प्रख्यात प्रशिक्षकाचे.. एका आठवड्याचेच का होइना.. पण उत्तम प्रशिक्षण लाभले. त्या आठ दिवसात खाशाबा बरेच काही शिकले व चार वर्षांनी त्यांनी हेलसिंकी ऑलिंपिक्समधे जे पदक मिळवले त्याचे बरचसे श्रेय खाशाबांनी गार्डनर यांच्या त्या आठवड्याभरच्या प्रशिक्षणाला दिले.पण या लंडन ऑलिंपिक्समधे मात्र भारतिय कुस्तीगीरांना हे समजल्यावर प्रचंड मोठा धक्काच बसला की कुस्तीच्या आंतराष्ट्रिय नियमांमधे व व भारतिय नियमांमधे बराच फरक आहे!त्यांना कोणीच आंतरराष्ट्रिय नियमांची कल्पना व आढावा दिला नव्हता... झालच तर भारतिय कुस्तीवीर लाल मातीच्या आखाड्यात कुस्ती शिकलेले व खेळलेले होते.. त्यांना ऑलिंपिक्सच्या क्रुत्रीम मॅटवर खेळणे बरेच वेगळे व जड वाटले. तरीही त्यांच्या गटातील ४२ स्पर्धकांमधे खाशाबांनी सहावा क्रमांक मिळवला. पदक जरी मिळाले नसले तरी सर्वत्: प्रतिकुल परिस्थिती असुनसुद्धा हेही काही कमी कौतुकाचे नव्हते! १९५२ च्या हेलसिंकी ऑलिंपिक्सच्या आधी काही लोकांनी राजकारण खेळुन खाशाबांच्या ऑलिंपिक्सला जायच्या प्रयत्नाला सुरुंग लावला... मद्रास इथे झालेल्या अखिल भारतिय स्पर्धेत खशाबांची कामगीरी अव्वल असुनसुद्धा त्यांना जाणुनबुजुन दुसरा नंबर दिला गेला पण खाशाबांनी त्याविरुद्द लढा द्यायचे ठरवले व त्यांनी पतियाळाच्या महाराजांना निशेधाचे पत्र धाडले. त्यांनी मध्यस्थी करुन खाशाबांना न्याय मिळुन दिला व खाशाबांची १९५२ च्या हेलसिंकी ऑलिंपिक्ससाठी बॅंटमवेट गटात निवड झाली. त्याकाळी ऑलिंपिक्ससाठी जरी निवड झाली तरी हॉकी सोडुन बाकीच्या खेळातल्या खेळाडुंना आपल्या पदरचे पैसे मोडुनच ऑलिंपिक्सला जायला लागायचे!खाशाबांच्या घरची आर्थिक परीस्थीती जेमतेमच असल्यामुळे त्यांच्या शेजार्या पाजार्यांनी मदतीचा हात पुढे केला.झालच तर कराडच्या व्यापार्यांनी खाशाबांना लागणार्या किटच्या खर्चाचा भार उचलला... पण जाण्यायेण्याच्या प्रचंड खर्चाचे काम करण्यासाठी राजाराम कॉलेजचे त्यावेळचे प्रिंसीपॉल श्री. खर्डेकर यांनी स्वत्:चे राहते घर विकले व आपल्या कॉलेजमधील खाशाबांना हेलसिंकीला पाठवण्यात मदत केली! हेलसिंकीला खाशाबा पहिल्या पाच फेर्या प्रत्येकी पाच मिनीटांच्या आत व सहज जिंकत गेले.पण सहाव्या फेरीत मात्र त्यांची गाठ संभावीत सुवर्णपदक विजेता जपानचा शोहाची इशी बरोबर पडली. त्यांची झुंज तब्बल १५ मिनिटे चालली व शेवटी शोहाचीने खाशाबांवर फक्त एका गुणानी मात केली. याच शोहाचीने पुढे जाउन या गटातले सुवर्णपदक पटकावले.पण खाशाबांना शोहाची बरोबरची मॅरेथॉन लढत हरल्यावर ताबडतोब ५ मिनिटांच्या आत पुढची लढत खेळण्यास बोलावले गेले! ऑलिंपिक्सच्या नियमाप्रमाणे खर तर खाशाबांना कमीतकमी अर्धा तास तरी दोन कुस्तींच्या दरम्यान मिळायला हवा होता पण नेमके या वेळेला खाशाबांच्या वतीने या नियमाची अंमलबजावणी करायला एकही भारतिय पदाधिकारी किंवा प्रशिक्षक त्यावेळेला तिकडे हजर नव्हता याचे बाकीच्या देशातल्या प्रशिक्षकांना फार आश्चर्य वाटले. खाशाबांना त्यांचे कपडे बदलायला पण वेळ दिला गेला नाही व रशियाच्या मल्लाने दमलेल्या खाशाबांचा सहज पराभव केला व अंतिम फेरी गाठली खाशाबांचे अंतिम फेरीत जाण्याचे स्वप्न अश्या रितीने धुळीस मिळाले व त्यांना ताम्र पदकावर समाधान मानावयाला लागले. परत आल्यावर भारतात त्यांचे खुप ठिकाणी स्वागत व सत्कार झाले पण खाशाबांना सगळ्यात जास्त काय आवडले असेल तर त्यांच्या गावकर्यांनी त्यांची १५१ बैलगाड्या वापरुन काढलेली गोलेश्वरपर्यंतची ४० किलोमिटरची विजययात्रा!ऑलिंपिक्स पदक मिळवणारा पहिला भारतिय म्हणुन कुठलेच मानचिन्ह किंवा पैशाचे बक्षिस न मिळणार्या खाशाबांना त्यांच्या मृत्युपर्यंत ती विजययात्रा मात्र खुप लक्षात राहीली.झालच तर खाशाबा हेलसिंकीवरुन परत आल्यावर कोल्हापुरला एक भली मोठी कुस्ती स्पर्धा आयोजीत केली गेली व त्या स्पर्धेतुन उभारलेल्या पैशातुन कोल्हापुरवासियांनी श्रियुत खर्डेकर यांना त्यांचे घर परत विकत घेउन दिले व त्यांचे ऋण फेडले.पण ऑलिंपिक्समधे पदक मिळवणारा पहिला भारतिय म्हणुन खाशाबा जाधव यांना भारतिय सरकारने सोडाच पण महाराष्ट्र सरकारनेही कसलीच पैशाची मदत केली नाही, कुठलेच मानचिन्ह दिले नाही का कुठला पुरस्कारही दिला नाही. खाशाबांनी मग जन्मभर महाराष्ट्र पोलीस दलात नोकरी केली. अश्या या उपेक्षीत राहीलेल्या ऑलिंपिकपटुचे १९८२ मधे अपघाती व अकाली निधन झाले. त्यांच्या पश्च्यात त्यांच्या विधवा पत्नीने अतिशय हलाकीत दिवस काढले. शेवटी १९९६ मधे महाराष्ट्र सरकारने खाशाबा जाधवांना मरणोत्तर शिवाजी पुरस्कार दिला व भारतिय सरकारने २००२ मधे अर्जुन पुरस्कार दिला. पण २००२ मधे त्याआधी हेलसिंकीच्या महापौराने खाशाबांच्या विधवा पत्नीला खास तिकीट पाठवुन हेलसिंकी ऑलिंपिक्सच्या सुवर्णजयंती प्रित्यर्थ न विसरता बोलवले होते व मानचिन्ह व पैसे देउन तिला मोठी मदत करुन तिची कदर केली होती. ऑलिंपिक्समधे पदक मिळवणार्या अश्या या खेळाडुचे असे झालेले हाल पाहुन भारतात कोणाला बरे ऑलिंपिक्समधे जाण्याचा उत्साह वाटेल? मग वरुन आपणच... १०० कोटी भारतियांमधे एकही ऑलिंपिक विजेता निर्माण होउ शकत नाही... म्हणुन शंख करत बसतो....
|
अप्रतिम!! पण याच बरोबर लाजेने मान खाली गेली राज्यकर्त्यांच्या नाकर्ते पणास पाहून. डोळे पाणावले त्या माऊली च्या यातनांबद्दल वाचोन!! धन्य ते खाशाबा!!!
|
Zakasrao
| |
| Friday, March 07, 2008 - 10:35 am: |
|
|
मुकुंद धन्यवाद खरतर त्यानी पदक जिंकल ह्यापलिकडे काहीच माहीत नव्हत. तुम्ही सर्व माहिती दिलीत. शेवटच्या कुस्तीच वाइट वाटल नाहितर त्यानी रजत पदकापर्यंत तरी धडक मारली असतीच. कोल्हापुरात खाशाबा जाधव यांना मानवंदना देण्यासाठी एक स्मारक उभारले आहे. महालक्ष्मीच्या मंदिराच्या जवळच भवानी मंडपाला लागुनच आहे हे. हा त्याचा फ़ोटो मी काढलेला.
|
Akhi
| |
| Friday, March 07, 2008 - 10:39 am: |
|
|
धन्य ते सर स्व:त चे राहते घर विकले..... आणी धन्य धन्य ते नाकर्ते राजकारणी.......... शी लाज वाटते ह्या लोकांची... आणी पदाधीकारी काय झोपा काढत होते का तेव्हा????? का नाही कारवाई होत असल्या लोकांवर तिथे का गेले होते ते पदाधिकारी........ भारता मधे सुवीधा नाही ही समान गोष्ट आहे पी. टी. उषा आणी खाशाबा जाधव ह्याच्या मधे बाकी सगळ्या गोष्टी मधे जिद्द जास्त दिसते आणी आपण सगल्या पातळ्यांवर झिजतो, सुविधा आणी जिद्द वैगरे
|
Psg
| |
| Friday, March 07, 2008 - 10:49 am: |
|
|
छान लिहिलं आहेस मुकुंद.. तू म्हणतोस ते तंतोतंत पटलं!
|
Ankt
| |
| Friday, March 07, 2008 - 11:13 am: |
|
|
अतिशय सुंदर! डोळ्यामधे पाणी आल. लोकांनी क्रिकेटला डोक्यावर चढवला आहे. सध्या हॉकीच्या पण matches सुरु आहेत पण फार कमी लोकांच त्या कडे लक्ष असणार. भारताने Maxico चा १८-१ ने पराभव केला हे पेपरच्या पहिल्यापानावर देखील आला नसेल. keep it up Mukund we are reading
|
Zelam
| |
| Friday, March 07, 2008 - 1:33 pm: |
|
|
मुकुंद पुन्हा एकदा अतिशय सुंदर लिहीत आहात. खाशाबांच्या कहाणीने मात्र डोळ्यात पाणी आलं. केवढी ही अनास्था.
|
दुर्दैव दुर्दैव आणि दुर्दैव. इतकी पुर्ण देशाला अभिमानास्पद कामगिरी करुनही देशाने त्यांना व त्यांच्या पत्नीला काय दिले तर दारिद्र्य. राज्यकर्त्यांबरोबर आपल्यालाही लाज वाटायला हवी.
|
Mpa
| |
| Friday, March 07, 2008 - 7:13 pm: |
|
|
वा वा मुकुन्द, तुम्हि फ़ारच सुन्दर लिहिता. अजून येउतेद.
|
धन्य तो शिष्य अन धन्य ते गुरु.
|
Dineshvs
| |
| Saturday, March 08, 2008 - 3:12 am: |
|
|
छानच लिहिले आहे. खाशाबानी लढत दिलेले ते हेलसिंकीची स्टेडियम अजुन जसेच्या तसे राखलेले आहे.
|
Kedar123
| |
| Saturday, March 08, 2008 - 7:05 am: |
|
|
अप्रतीम मुकुंद, असेच जर भारतीय हॉकी पदकांबद्दल बद्दल आणि लीअंडर पेस च्या कास्य पदका बद्दल लिहू शकलात तर.....
|
|
मायबोली |
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|