Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 15, 2008

Hitguj » Views and Comments » General » बिजींग ऑलिंपिक्स २००८ » Archive through February 15, 2008 « Previous Next »

Mukund
Tuesday, February 12, 2008 - 5:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१९३६ चे बर्लिन ऑलिंपिक्स जेसी ओवेन्स,ध्यानचंद व नाझी भस्मासुर ऍडॉल्फ़ हिटलर या तिन नावांनी खुप गाजले हे सर्व जगाला ठाउक आहे पण आज मी त्या ऑलिंपिक्समधल्या ३ अश्या व्यक्तींबद्दल सांगणार आहे की ज्यांचे पराक्रम काळाच्या ओघात धुसर होउन जगाला त्याचा विसर पडला आहे. त्या तिन महान ऑलिंपिकपटुंच्या कामगीरीला परत एकदा (वेल डिझर्व्ह्ड!)उजाळा देउन त्यांना अर्पिलेली ही माझी भावपुर्ण श्रद्धांजली....

हे तिघेही जण जरी अतिशय वेगवेगळ्या पार्श्वभुमीमधुन बर्लिनला पोहोचले होते तरी त्या तिघांना एकाच सुत्राने एकत्र गुंफ़ले होते... ते सुत्र होते.... "दे डिड नॉट हॅव्ह अ चॅन्स!"

या तिनपैकी कुणाची गोष्ट प्रथम सांगायची याचा मला संभ्रम पडला कारण त्या तिनही गोष्टी अतिशय नाट्यमय घडामोडींनी ओतप्रोत भरल्या आहेत!

ही पहीली गोष्ट आहे अमेरिकेच्या एलिझाबेथ रॉबिन्सनची.१९३६ मधे बर्लिन ऑलिंपिक्समधे तिने काय केले हे सांगायच्या आधी आठ वर्ष आधी... थोड तिच्या भुतकाळात जाउ.. वर्ष होते १९२८... स्थळ ऍमस्टरडॅम ऑलिंपिक्स... या ऑलिंपिक्समधे महिलांना प्रथमच भाग देण्यात आला होता. १८ वर्षाच्या एलिझाबेथ रॉबिन्सनला तिच्या हायस्कुल जिम टिचरने ऑलिंपिक्सच्या फक्त ३ महिने आधी सांगीतले... तु ऑलिंपिक्साठी ऍमस्टरडॅमला जाणार आहेस! तयारीला लाग!... बिचार्‍या १८ वर्षाच्या शाळकरी एलिझाबेथला ऑलिंपिक्स म्हणजे काय हेही ठाउक नव्हते लेट अलोन ऍमस्टरडॅम कुठे आहे! तिचे विश्व फार वेगळे होते पण ते ३ महिन्यात एकदम बदलणार होते... त्या काळात महिलांसाठी कुठल्याच स्पर्धेत भाग घ्यायची संधी नसल्यामुळे ती एकटीच सरावाला लागली.. व ऑलिंपिक्सच्या आधी ती १०० मिटर्स स्प्रिंटची शर्यत फक्त २ वेळा धावली होती... त्यातली एक तिने पुरुषांबरोबर धावलेली व एक ऑलिंपिक्स ट्रायल्स मधे!.... बस त्या दोन अनुभवांच्या तुटपुंज्या शिदोरीवर १८ वर्षाची हसरी खेळकर एलिझाबेथ ऍमस्टरडॅमला येउन पोहोचली... पहिले महायुद्ध फक्त ८-९ वर्षापुर्वीच संपले असल्यामुळे अमेरिकेने आपले पथक यु एस एस रुझव्हेल्ट या प्रचंड मोठ्या नाविक दलातल्या क्रुझरमधुन जनरल आयझेनहॉवरच्या संरक्षणाखाली पाठवले होते. महिलांनी असे बाहेरच्या जगात स्पर्धेत भाग घ्यायला जाण्याचा हा पहिलाच प्रसंग असल्यामुळे त्यांच्या पालकांना त्यांच्या सुरक्षेची हमी दिली होती. प्रत्येक महिला खेळाडुंना पुरुष शॅपेरोन दिले होते. १८ वर्षाच्या एलिझाबेथचा शॅपेरॉन होता त्यावेळचा अमेरिकेचा जगप्रसिद्ध जलतरणपटु जॉनी व्हॅसमुल्लर जो लवकरच ऑलिंपिक्सनंतर हॉलीवुडमधे जगातल्या पहिल्या टारझन चित्रपटात टारझन म्हणुन पदार्पण करणार होता.... साहजीकच १८ वर्षाची एलिझाबेथ एकदम हुरळुन गेली होती... पण तिच्या आइवडिलांनी तिला बजावले होते की मिळालेल्या संधीचा पुरेपुर फायदा करुन घे व आपले नाव उज्वल कर. तो सल्ला लक्षात ठेउन एलिझाबेथने १०० मिटर्स शर्यत जिंकुन ऑलिंपिक्समधली पहीली महिला ट्रॅक ऍंड फ़िल्ड ऍथलिट म्हणुन मान मिळवला.. ती एवढी इनोसंट होती व शर्यतीवर एवढी केंद्रीत होती की शर्यत धावत असताना तिने आजुबाजुच्या स्पर्धकांकडे पाहीलेच नाही त्यामुळे तिला हे कळलेच नाही की शर्यत ती जिंकली आहे म्हणुन!... प्रेक्षकातुन एका उत्साही अमेरिकन माणसाने मैदानावर धावत येउन तिचे पुष्पगुच्छ देउन अभिनंदन केले व तिला सांगीतले की ती शर्यत जिंकली आहे!.... तिला मग खुप खुप आनंद झाला. ऑलिंपिक्समधे जिंकणे एवढे सोप्पे असेल याची तिला कल्पनाच नव्हती....

पण हे वाटते तितके सोप्पे नसते हे नियतिच्या एका फटकार्‍यात एलिझाबेथला लवकरच कळणार होते... ऑलिंपिक्स सुवर्णपदक मिळवणारी पहीली महिला म्हणुन परत आल्यावर तिचे खुप मानसन्मान व कोडकौतुक झाले. तिने कॉलेजमधे प्रवेश घेतला.. १९३२ चे ऑलिंपिक्स अमेरिकेतच असल्यामुळे आपल्या आइवडिलांसमोर १९२८ च्या आपल्या पराक्रमाची पुनरावृत्ती करायच्या निर्धाराने ती कसुन सरावाला लागली. पण १९३१ मधे तिच्या काका बरोबर सिंगल इंज़ीन विमान उड्डाण करायला गेली असताना तिच्या काकांच्या विमानाला अपघात झाला व त्यांचे ते छोटे विमान कोसळुन भिषण अपघात झाला... एलिझाबेथ मरता मरता वाचली... पण तिच्या पायांना व मणक्याला प्रचंड मार बसला. बर्‍याच शस्त्रक्रियांनंतर एलिझाबेथ वाचली पण आता तिचे पाय २ इंचांनी शॉर्ट झाले होते! ती परत चालेल की नाही.... लेट अलोन धावेल का... याची सगळ्यांना शंका होती. अर्थातच त्यामुळे एलिझाबेथच्या १९३२ ला लॉस ऍंजलीस ऑलिंपिक्समधे भाग घेउन परत एकदा सुवर्णपदक मिळवायच्या स्वप्नावर पाणी फिरले...

एखाद्याच्या आयुष्यात एवढ्या सुद्धा नाट्यपुर्ण गोष्टी घडणे म्हणजे खुप होते... पण एलिझाबेथच्या आयुष्यात १९३६ च्या बर्लिन ऑलिंपिक्स मधल्या एका ग्रेटेस्ट अपसेटला हजर असणे विधिलिखीत होते!त्यामुळे तिची गोष्ट इथेच संपत नाही. तिने खुप मेहनत घेउन निर्धाराने आपले रिहॅबिलेटेशन चालु ठेवले. परत चालायची तिला जबरदस्त आकांक्षा होती. ४ वर्षांच्या भगिरथ प्रयत्नानंतर एलिझाबेथ परत एकदा नॉर्मल चालु लागली. तिचा आनंद गगनात मावेनासा झाला.. पण ती तेवढ्यावरच थांबली नाही. तिने पुढचे ३ वर्ष धावण्याचा कसुन सराव केला. १९३६ च्या ऑलिंपिक्स ट्रायल्समधे तिने भाग घेतला.... इंडिव्हिज्युअल स्पर्धेत भाग घेण्यास ती असमर्थ ठरली पण ४ बाय १०० मिटर्स रिलेसाठी तिची चौथ्या स्थानावर निवड होण्याइतकी प्रभावी कामगिरी तिने त्या ट्रायल्स मधे केली! तिच्या आनंदाला पारावार राहीला नाही... ती परत एकदा ऑलिंपिक्सला जाणार होती... या वेळेला हिटलरच्या बर्लिनला...

क्रमंश्:




Itgirl
Tuesday, February 12, 2008 - 5:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुंद, पुढचा भाग टाका लवकर, लवकर :-)

Mukund
Tuesday, February 12, 2008 - 8:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बर्लिन ऑलिंपिक्सचा उपयोग हिटलरने आपल्या नाझी विचारसरणीच्या प्रॅपोगॅंडासाठी करुन घेतला हे सगळ्या जगाला ठाउक होते. त्याने आपल्या माइन कांफ़ या पुस्तकात जर्मन हे प्युअर आर्यन वंशाचे असल्यामुळे जगात सर्वश्रेष्ठ असल्याचा दावा केला होता. तो जेव्हा १९३२ मधे जर्मनीचा चॅन्सेलर झाला तेव्हा सगळ्या महिलांना तंदुरुस्त होण्यासाठी त्याने सुद्रुढ मुलांच्या सुद्रुढ माता या घोषवाक्याखाली सक्तीचे शारीरीक शिक्षण देण्याची योजना आखली. तसल्या प्रॉजेक्टमुळे १९३६ च्या ऑलिंपिक्सपर्यंत जर्मन महिला १०० मिटर स्प्रिंट शर्यतीत जगातल्या इतर सगळ्या महिलांना मागे टाकुन जग्गजेत्या झाल्या. त्यांच्या नावावर वैयक्तीक व रिले चा जागतिक विक्रम होता. हिटलरच्या मनात किंचीतही संदेह नव्हता की या जर्मन महिलाच नव्हे तर सर्व जर्मन खेळाडु त्यांची वांशीक सुपिरिऑरिटी या ऑलिंपिक्समधे सगळ्यात जास्त सुवर्णपदके पटकावुन सिद्ध करतील.

पण हिटलरच्या आपण वांशीक सुप्रीम आहोत या क्विक्झॉटिक कल्पनाविलासाला या स्पर्धेत जबरदस्त तडाखा मिळाला. एकापाठोपाठ एक धक्के त्याला व जर्मनीला या ऑलिंपिक्समधे मिळत गेले. ते तडाखे देण्यास भारताच्या ध्यानचंदने व अमेरिकेच्या क्रुष्णवर्णिय ऍथलिट जेसी ओवेन्सने मोट्ठा हातभार लावला. संपुर्ण स्पर्धेत जर्मनीला भालाफेक, गोळाफेक अशा फेकाफेकीच्या शर्यतींशिवाय एकही सुवर्णपदक ट्रॅक ऍंड फ़िल्ड मधे मिळाले नव्हते. जर्मन पुरुष पुर्णपणे अपेशी ठरले होते. हिटलरच्या मनात त्यामुळे भयंकर चरफड होत होती. त्याची वांशीक थिअरी त्याच्या डोळ्यासमोर बाराच्या भावात चालली होती....

आता स्पर्धेचा शेवटचा दिवस होता. महिलांची १०० मिटर्स फ़ायनल शर्यत... हिटलर खुद्द जातीने त्या विश्वविजेत्या जर्मन महिलांचा संभावीत विजय पाहण्यास उपस्थित होता.. त्याच्याबरोबर स्टेडिअम मधले १ लाख जर्मन दर्शक या शर्यतीची आतुरतेने वाट पाहत होते. ही शर्यत जर्मनीच्या व हिटलरचा दाव्याला आव्हान देणारी शेवटची स्पर्धा होती. हिटलरला व सगळ्या जगाला माहीत होते की ही स्पर्धा जर्मन महिलाच जिंकणार. त्या जिंकल्या नंतर जल्लोश करण्यासाठी हिटलर व पुर्ण जर्मनी तयार होते... तोफ़ा व बंदुकांच्या सलामी द्यायला तोफ़ा व बंदुका तयार होत्या.. रेडिओवर जगातले असंख्य लोक कान देउन या रेसचे धावते समालोचन ऐकायला आतुर झाले होते...


शर्यतीच्या पहिल्या लेगला आठ देशांच्या महिलांनी आपापल्या लेनमधे जागा घेतल्या.. स्टेडिअम मधे एक लाख दर्शक असुनही एकदम पिनड्रॉप सायलंस होता...टाचणी जरी पडली असती तरी त्याचा आवाज ऐकु येईल एवढी शांतता स्टेडिअममधे पसरली होती... झाल... स्टार्टर बंदुकीचा फाट!.... असा जोरात आवाज झाला... शर्यतीला सुरुवात झाली. जर्मन महिलांनी पहिल्या तिन लेगमधे खरोखरच बाकी जगातल्या सगळ्या महिलांना बरेच मागे टाकले... प्रत्येक लेग-गणीक स्टेडीअम मधला प्रेक्षकांचा आवाज लॉगेरिथमकली वाढत होता.... जर्म... नी! जर्म... नी!... असा एकच ध्वनी बर्लिन ऑलिंपिक्स स्टेडिअम मधे दुमदुमत होता... हिटलर आपल्या दुर्बीणीतुन हसत व आनंदाच्या उकळ्या फुटत शर्यत बघायला आपल्या सिटवरुन उठुन उभा राहिला होता... बाकीसुद्धा कोणीच आपल्या सिटवर बसले नव्हते... सगळे उभे राहुन... टाचा उंचाउन.... शर्यत संपण्याकडे डोळे लावुन बसले होते. जर्मनीची तिसर्‍या लेगमधील मेरि ट्रॉलीन्जर जेव्हा तिचे १०० मिटर पुर्ण करुन तिच्या हातातले बटान चौथ्या लेगमधल्या एल्सा डोलफ़ोर्थला देण्यास पोहोचली तोपर्यंत जर्मन महिलांनी बाकीच्यांना जवळजवळ ७ मिटर्सने मागे टाकले होते.... आता फक्त बटान पास करायचे बाकी होते....आणी... अचानक स्टेडिअम मधल्या प्रेक्षकांच्या आवाजाचा क्रिशेंडो..... ओह नो!..... असा आवाज करत परत एकदा पिनड्रॉप सायलंसमधे परीवर्तीत झाला.... मेरी ट्रॉलीन्जर व एल्सा डोलफ़ोर्थच्या हातुन बटान पास होताना बटान खाली पडले..... खाली पडुन ते बटानच नाही... तर हिटलर.. व संपुर्ण जर्मनीचे सुवर्णपदकाचे व जर्मन सुपिरीऑरिटीचे स्वप्न त्या बटानच्या रुपात धुळीत जाउन पडले होते!

शर्यत संपली.... पदक वितरण समारोह चालु झाला.. सुवर्णपदकाच्या चौथर्‍यावर ज्या चार महिला होत्या त्या चौघींच्या डोळ्यातुन आनंदाश्रु भरभरुन वाहात होते. त्यापैकी एकीला लोकांनी ऑलिंपिक्सच्या आधी १ वर्षच आधी.... "शी डझन्ट हॅव्ह अ चांस!"असे म्हणुन तिच्या ऑलिंपिक्सला जाण्याच्या प्रयत्नाला वेड्यात काढले होते... त्या चार विजेत्या महिला अमेरिकेच्या होत्या व त्यातली एक होती....यु गेस्स्ड इट राइट!...एलिझाबेथ रॉबिन्सन!



Akhi
Wednesday, February 13, 2008 - 4:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त............... hats of ..... अजुन काय लिहु???

Ameyadeshpande
Wednesday, February 13, 2008 - 4:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुर्रेख! मुकुंद, एक उत्सुकता म्हणुन, तुमच्या कडे इतक्या जुन्या स्पर्धांची माहिती कुठल्या स्वरूपात आहे? म्हणजे टेप्स, ऑडीओ की लिखित? इतक्या सगळ्या गोष्टी वाचून बिजींगला जावसं वाटू लागलंय :-)

Manjud
Wednesday, February 13, 2008 - 6:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुंद, तुमच्या प्रत्येक पोस्टला अंगावर काटा उभा राहतोय. 'ऑलिंपिकस्य सुरस्या कथा' अजून भरपूर येऊ देत.

Hkumar
Wednesday, February 13, 2008 - 7:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुंद, धन्स walkath. ब.
हाॅकीचे जादूगार ध्यानचंदनी १९२८- ५६ या काळात आॅ. मध्ये एकट्याने ५१ गो. केले होते. त्यांचे dribbling इतके अप्रतिम होते की त्यांच्यावर जळणार्‍या विदेशी खेळाडूंनी त्यांच्या स्टिकची तपासणी करण्याची माग़णी केली होती!


Hkumar
Wednesday, February 13, 2008 - 7:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१९७६ चे आॅ. खर्‍या अर्थाने गाजवले ते नादिया कोमानेसीने. gymn च्या ७ही विभागात तिने १०१० गुण मिळवले होते. तेव्हा माझ्या आठवणीत ती खरोखर जागतिक superstar झाली होती. तरूणाई 'नादिया' नावाची अगदी fan झाली होती.

Psg
Wednesday, February 13, 2008 - 8:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रोमांचकारी!!!! काय लिहिले आहेस मुकुन्द.. सुरेख! तुझी शैली अशी आहे की डोळ्यासमोर ते स्टेडियम, हिटलर आणि ती पळणारी एलिझाबेथही उभे राहिले! :-)

खूप जण हा बीबी वाचत आहेत. जे वाचत नाहीयेत त्यांना मी तरी 'जरूर वाचा' म्हणून सांगत आहे, तेव्हा तूही असंच भरभरून लिहीत रहा :-)


Sanghamitra
Wednesday, February 13, 2008 - 11:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा मुकुंद तुमची पोस्ट्स नेहमीच वाचनीय असतात. माहिती तर आहेच आणि शैली किती interesting आहे!
हे पोस्ट तर फारच रोमांचकारी होते.
लिहा ना अजून.


Chyayla
Wednesday, February 13, 2008 - 12:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुंद, सध्या मायबोलीवरील सगळ्यात उत्सुकतेने वाट बघितल्या जाते ती ह्याच BB मधे तुमच्या पोस्टची. खरेच ह्या BB मधे Sporting Spirit , मनोरंजक माहितीसह रोमांच, उत्सुकता पुरेपुर भरली आहे. अजुन काय लिहिणार तुमच्याच ओघवत्या शब्दांची वाट पहातोय

Ashwini
Wednesday, February 13, 2008 - 3:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुंद, सुरेखच लिहीतो आहेस. तुला खेळांची आवड आहे हे माहित होते पण मला वाटायचे की ती आवड क्रिकेट, बेसबॉल, फूटबॉलशी निगडीत आहे. हे माहित नव्हतं की तुला एकंदरीत खेळ या प्रकाराचेच वेड आहे. आणि ते अनावर वेड तुझ्या शब्दाशब्दातून जाणवतय. मस्त लिहीतो आहेस! :-)

Meeradha
Wednesday, February 13, 2008 - 5:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अप्रतिम, खरच माझ्याहि अंगावर काटा आला वाचताना. पुढच्या पोष्टाची वाट पहाताना अजिबात धीर धरवत नाहिये. Please लवकर टाका.

Mukund
Wednesday, February 13, 2008 - 9:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रतिभा,शैलजा,दिपाली,अमेय,मंजिरी,पुनम,संघमित्रा,समीर,अश्विनि व राधा.... तुम्हीही या गोष्टी उत्सुकतेने वाचत आहात हे बघुन मी लिहीत असलेल्या खेळाडुंच्या अद्वितिय पराक्रमांना न्याय मिळत आहे याचाच मला जास्त आनंद होत आहे.

या सगळ्या गोष्टीतले बहुतेक सगळे ऍथलिट्स करोडो डॉलर्सच्या एंडॉर्समेंट्सच्या काळापुर्वीचे असल्यामुळे त्यांच्या प्रयत्नाला व पराक्रमांना पैशाचे अमिष नव्हते... आपण काहीतरी ध्येय गाठायचे.... ते गाठताना आपल्यातल्या चिकाटी,परिश्रम व प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर आपल्यातल्या क्रिडानैपुण्याला व आपल्या मानसिक शक्तिला एका उच्च पातळीपर्यंत न्यायचे... प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन आपल्यातल्या शारीरीक व मानसिक मर्यादेची सिमा उंचवत फ़ास्टर.. हायर... स्ट्रॉन्गर या ऑलिंपिक्सच्या ब्रिदवाक्याला खर्‍या अर्थाने जगायचे... या सगळ्या उदात्त गोष्टींचे हे सगळे पराक्रमी वीर म्हणजे मुर्तीमंत उदाहरणच होते. त्यामुळेच या सगळ्या गोष्टी आपल्या मनाला एका व्हिसरल लेव्हलवर स्पर्शुन जातात व आवडतात. आपणही या गोष्टींमधे स्वत्:ला शोधत असतो... आपण सगळे जरी गिफ़्टेड ऍथलिट्स नसलो तरी वरील उदात्त गोष्टी आपल्या जिवनात अमलात आणायची सुप्त इच्छा आपल्या मनात सदैव जागृत असते. आपण सगळे आपापल्या परीने आपल्या निजी आयुष्यात आपापल्या क्षेत्रात व जिवनात तसा प्रयत्न करतच असतो. म्हणुनच आपण या ऍथलिट्सनी दाखवलेल्या गुणांमधे आपल्याला स्वत्:चे प्रतिबिंब कुठे दिसते का ते पाहात असतो. कुठे ना कुठे तरी ते अशा गोष्टींमधे ते आपल्याला दिसतेच व मग या गोष्टी आपल्याला एकदम जवळच्या वाटु लागतात व आवडु लागतात.... असो...

परत एकदा शैलजा व राधा... मुकुंद पुढचे पोस्ट लवकर टाका हो... असे म्हणायच्या आत मी हे माझे अवांतर लिखाण थांबवुन पुढची गोष्ट लिहायला घेतो....:-) बाय द वे... तुम्ही मला अहो जाहो नका हो म्हणु.. आठवणी जरी जुन्या काळच्या असल्या तरी मी अजुन तेवढा जुना नाही हो झालो.....:-))

अरे अमेय... तु माझे या बीबीवरचे पहिलेच पोस्टींग नीट वाचलेले दिसत नाही.. त्यात मी या गोष्टी मी कुठे पाहील्या आहेत त्याचा संदर्भ दिला आहे. अश्या गोष्टींचा खजिना व्हिडीओ कॅसेट्सच्या रुपाने जतन करुन ठेवणार्‍या बड ग्रिनस्पॅनला शतश्: धन्यवाद! मी फक्त त्या आठवणींना या गोष्टी लिहुन शब्दरुप देत आहे.......एवढच!


Mukund
Thursday, February 14, 2008 - 12:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१९८८... सेउल ऑलिंपिक्स स्टेडीअम.....ऑलिंपिक्सची ओपनींग सेरीमनी... स्टेडीअममधील ऑलिंपिक्स मशाल कोण पेटवणार या उत्सुकतेत एक लाख दर्शक हातात हात घालुन जंबोट्रॉनकडे व स्टेडीअमच्या प्रवेशद्वाराकडे आलटुन पालटुन उत्कंठतेने पहात होते..... ऑलिंपिक्सची मशाल कोण पेटवणार हे गुपीत त्यांना अस्वस्थ करत होते...२ मिनिटे...... जी त्याक्षणी २ युगांसारखी भासत होती... वाट बघुन झाल्यावर स्टेडिअमधे एका सत्तरीतल्या व्यक्तीने ऑलिंपिक मशाल घेउन प्रवेश केला.... सगळ्या स्टेडीअममधे लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.... जंबोट्रॉनवर तो ऍथलिट कोण आहे हे ओळखायचा प्रयत्न दर्शक करु लागले. हळुहळु हलक्या आवाजात कुजबुज सुरु झाली व जेव्हा त्या व्यक्तीने मेन स्टेडिअमच्या ट्रॅकवर पदार्पण केले तेव्हा जंबोट्रॉनवर त्याचा क्लोज अप व त्याचे नाव झळकले गेले.... आणी स्टेडिअमधे एकमुखाने सगळ्यांच्या तोंडुन मोठा जल्लोशाचा आवाज निघाला व त्या आवाजाने सगळे स्टेडीअम दुमदुमुन गेले.. त्या व्यक्तीचे नाव होते..... सॉन की जॉन्ग....! सगळ्या कोरियात त्याचे नाव घरोघरी कोरियाचा पहिला ऑलिंपिक चॅंपिअन म्हणुन माहीत होते.... पण जगातले सगळे वार्ताहर जोमाने त्यांच्या खेळांच्या इतिहास पुस्तकात त्या नावाची शोधाशोध करु लागले....बर्‍याच जणांना त्यात अपयश आले... कोण होता हा सॉन की जॉन्ग?

आता जाउयात ५२ वर्षापुर्वीच्या भुतकाळात... परत एकदा १९३६ बर्लिन ऑलिंपिकला!... ऑलिंपिक्सच्या मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात... जगातले ३४ ऍथलिट्स या दिर्घ पल्ल्याच्या शर्यतीची सुरुवात करायला तयार होते.... एका पाथोपाठ एक असे ६-६ च्या थव्याने टाळ्यांच्या गजरात ते शर्यतीला सुरुवात करत होते. स्टेडिअमधे एक चक्कर टाकुन झाल्यावर एक एक करत ते सगळे स्टेडिअमच्या बाहेर पडले. सगळ्यात आधी गेला १९३२ चा ऑलिंपिक विजेता.. अर्जेंटिनाचा वान कार्लोस झबाला... आणी परत एकदा तोच संभाव्य विजेता होता. त्यात २६ व्या स्थानावरुन जो खेळाडु बाहेर पडला तो होता जपानचा किटे सॉन...

झप झप पावले उचलत सगळ्यांनी आपापला वेग पकडला. झबालाने गेली ३ महीने या मार्गावरच सराव करुन त्या मार्गाचा चांगलाच अभ्यास केला होता. त्यामुळे सुरुवातीपासुनच ब्लिस्टरींग वेगात त्याने शर्यतीला सुरुवात केली. त्या वेगामुळे सगळे जण एक एक करत झबालाच्या मागे पडु लागले. बर्लिनच्या उन्हाळ्यात अर्ध्या शर्यतीपर्यंत झबाला तसा वेग राखु शकला परंतु तो जेव्हा शहरातल्या बर्लीन हाइट्स या स्लोप असलेल्या भागात पोहोचला तोपर्यंत त्याने स्वत्:लाच त्याच्या ब्लिस्टरींग वेगाने दमवुन घेतले होते... आणी शर्यत पाउण संपेसपर्यंत त्याला शर्यतीतुन चक्क अंग काढुन घ्यायला लागले.

इकडे दुसर्‍या स्थानावर जपानचा किटे सॉन रप रप करत स्टेडी र्‍हिदम ठेउन न दमता येत होता.३० किलोमिटरनंतर आपण एकटेच आघाडीला आहोत हे किटे सॉनला कळुन चुकले.त्याने नेटाने त्याचा वेग कायम राखला. पायात गोळे येत असुनसुद्धा पाणी प्यायला थांबले तर वेग कमी होइल म्हणुन त्यासाठीही न थांबता तो भरभर पावले टाकत होता.

किटे सॉनला एवढी घाई असण्याचे एक मोट्ठे कारण होते.... त्याला त्याच्या देशाचे नाव सगळ्या जगात उंचवायचे होते. तुम्ही म्हणाल तसे तर सगळ्याच ऍथलिट्सना वाटत असते... किटे सॉनला तसे वाटण्यात वेगळे असे काय आहे?

ते समजुन घ्यायला तुम्हाला किटे सॉनची नाट्यमय पार्श्वभुमी समजुन घ्यायला लागेल!

या किटे सॉनचा जन्म कोरिआमधे प्यॉन्गप्यॉन्ग मधे झाला होता. त्या काळात १९१० पासुन कोरिअन पेनिनसुल्यावर जपानचे राज्य होते. कोरिअन लोकांना अतिशय हिन वागणुक जपानी सत्ताधार्‍यांकडुन दिली जात होती. जपानचा सम्राट एंपरर हिरोहिटो याचे विचार युरोपमधल्या नाझी हिटलरच्या वांशीक सुपीरिऑरीटी सारखेच जपानी वंशाला सुपीरिअर मानणारे होते.जपानने कोरियाच्या सगळ्या ऍथलिट्सना २५ वर्षे कुठलीच संधी दिली नव्हती... कुठल्याच सरावाची मदत केली नव्हती. पण बर्लिन ऑलिंपिक्सला मात्र त्यांनी काही कोरिअन ऍथलिट्सना ऑलिंपिक्सला जाण्याची परवानगी दिली होती... पण एका अटीवर!..... त्यांनी स्पर्धेत जपानी म्हणुन जपानचे प्रतिनिधित्व करायचे... तेवढेच नाही तर त्यांनी त्यांची नावेसुद्धा जपानी घ्यायची...

किटे सॉन हा असाच एक जपानी नावाच्या बुरख्याखाली असणारा एक कोरिअन ऍथलिट होता. सहा पहिन्यापुर्वी तो या स्पर्धेत भाग घेईल की नाही याची पण शाश्वती नव्हती... त्याच्या संपुर्ण आयुष्यात त्याला व्यवस्थीत प्रशिक्षणाच्या सोयी सुद्धा उपलब्ध नव्हत्या... आज तो फक्त आपल्या मानसीक बळावर ऑलिंपिक्सच्या मॅरेथॉन शर्यतीत सगळ्यात पुढे होता. आयुष्यभर त्याच्या मनावर बिंबवले गेले होते की त्याचा कोरिअन वंश हिन आहे..... ते जिंकण्याच्या लायकीचे नाहीत.... जपानी लोक त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत....

किटे सॉनच्या मनात या सगळ्या अपमानीत विचारांचे काहुर माजले होते. त्या चिड आणणार्‍या विचारांचे इंधन करुन तो ते इंधन त्याच्या थकलेल्या शरीराला व मनाला देत होता... त्या इंधनाच्या बळावर तो वेगात पावले उचलत ऑलिंपिक्स स्टेडिअममधल्या फ़िनीश लाइनकडे कुच करत होता... सगळ्या जगाला त्याला दखवुन द्यायचे होते की कोरिअन वंश हा हिन नाही. त्या देशातही माझ्यासारखे ऑलिंपिक्स विजेते जन्म घेउ शकतात......

असा विचार करत करत त्याने बर्लिन ऑलिंपिक्स स्टेडिअमधे पहिल्या स्थानावर प्रवेश केला. स्टेडिअममधले सगळे जर्मन दर्शक तो स्पर्धक जपानचा आहे हे बघुन टाळ्यांच्या कडकडाटात उभे राहीले कारण त्यावेळेला जपान जर्मनी युती होती. पण त्या दर्शकांमधे एकालाही किटे सॉनच्या मनात काय चालले आहे याची व त्याच्या पार्श्वभुमीची तसुभरही कल्पना नव्हती!किटेने फ़िनिश लाइन पार केली... थोडे पुढे जाउन... थकुन त्याने त्याचे हात गुढग्यावर टेकवले.. तो थोडा पुढे वाकला... व आनंदाश्रु काढत तो ट्रॅकवर आडवा झाला.... जपानच्या प्रशिक्षकांनी लगेच त्याला मधोमध लाल गोळा असलेल्या जपानी ध्वजाने गुंडाळले... ते पाहुन इतक्या दमलेल्या अवस्थेत असुनसुद्धा किटे सॉन ताडकन उभा राहीला व जोरात.... जणु काही त्याला विजेचा शॉक बसला आहे... त्या प्रमाणे त्याच्या अंगावरुन... शिसारी आल्यासारखे.... त्या जपानच्या ध्वजाला त्याने दुर लोटुन दिले.....

पदक वितरण सोहळा सुरु झाला.. जपानचे राष्ट्रगीत वाजवले जात होते.. किटे सॉन मात्र त्याच्या अंगावर असलेल्या जपानी जर्सीवरचा जपानी फ़्लॅग.... आपले दोन्ही हात एकत्र करुन... त्यात पदक पकडुन...झाकुन टाकत व डोळ्यातुन अश्रु वाहात उभा होता... त्याला जगाला ओरडुन ओरडुन सांगावेसे वाटत होते की तो एक जपानी नसुन एक प्राउड कोरीअन आहे....

परत एकदा.. १९८८... सेउल ऑलिंपिक स्टेडिअम... आज जो कोरियाचा सत्तरीतला ऍथलिट ऑलिंपिक्सची मशाल पेटवणार होता... त्याला मात्र तो कोरिअन ऑलिंपिक्स चॅंपिअन आहे हे कोणाला ओरडुन सांगायची जरुर नव्हती...स्टेडीअममधल्या सगळ्या कोरीअन माणसांना हे ठाउक होते की आज त्यांच्या समोर जो सॉन की जॉन्ग उभा आहे तो म्हणजे दुसरा कोणी नसुन १९३६ च्या बर्लिन ऑलिंपिक्स मधला मॅरेथॉन विजेता किटे सॉनच आहे!




Ramani
Thursday, February 14, 2008 - 1:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुंद, तुझे शतश्: आभार!! हा अत्यंत उत्तम बा. फ. उघडला आहेस. मी तर सगळे लिखाण संग्राही ठेउ इच्छीते. अर्थात तुझी परवानगी असेल तरच. खजीनाच आहे तुझ्याकडे ह्या कथांच्या रूपाने. पुस्तकच का नाही प्रसिद्ध करत तू?

Hkumar
Friday, February 15, 2008 - 2:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एमिल झोटोपेक हा लांब पल्ल्याच्या शर्यती जिंकणारा झेक धावपटू. त्यामुळे त्याला ''झेक लोकोमोटिव्ह'' म्हणत. १९५२ च्या स्पर्धेत त्याने ५ व १० हजार मी. व मरेथाॅन जिंकून इतिहास घडविला.

Itgirl
Friday, February 15, 2008 - 3:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुंद, किती अचूक रीत्या तू किटे सॉनची मन:स्थिती उलगडली आहेस!! खरच, किती मानसिक कोंडमारा झाला असेल त्याचा जपानी जर्सी घालून जपानी म्हणवून घेण्यामधे... किती अपमान वाटला असेल...
खूपच छान लिहिले आहेस, आता कोणाबद्दल सांगणार? :-)


Manish2703
Friday, February 15, 2008 - 7:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अप्रतिम मुकुंद.. this is one of the best BBs on Hitguj

Amruta
Saturday, February 16, 2008 - 1:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुंद, केवळ अप्रतिम... अगदी सगळे प्रसंग डोळ्यांसमोर उभे रहातात. मस्तच लिहितोयस.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators