|
Psg
| |
| Wednesday, February 06, 2008 - 9:57 am: |
|
|
खरंच मुकुन्द, अप्रतिम लिहित आहेस. तुझी शैली सुरेख आहे, डोळ्यापुढे ते ते प्रसंग अगदी उभे करत आहेस. सर्वच खेळाडूंबद्दल वाचताना एक स्फूर्ती मिळत आहे. लिहित रहा..
|
मी १९९५-१९९८ मध्ये अटलांटाच्या रोझवेल या उपनगरात रहात होतो. त्या ऑलिंपिकमध्ये सहभाग घेण्याची मला संधी मिळाली होती. मुकुंदने बा.फ. सुरू केल्यामुळे जुन्या आठवणी जागृत झाल्या. ऑलिंपिक सुरू होण्यापूर्वी २-३ दिवस माझ्या घरासमोरील रस्त्यावरून ऑलिंपिक ज्योत नेली होती. ती बघण्यासाठी बरीच धडपड करून २ तासांसाठी ऑफिसमधून मी घरी आलो होतो. मला भारत-पाकिस्तान व स्पेन-अमेरिका हे हॉकी सामने प्रत्यक्ष पहायला मिळाले. ते सामने संध्याकाळी ५ वाजता सुरू होऊन नऊ साडेनऊ पर्यंत संपले. ५ वाजण्याच्या सुमाराला स्टेडियमच्या बाहेर तिकिटांचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू होता. अनेक भारतीय तिकिट आधी न काढल्यामुळे निराश होऊन परत गेले. भारत-पकिस्तानचा सामना अतिशय चुरशीने खेळला गेला व शेवटी 0-0 अशा अनिर्णीत अवस्थेत संपला. स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. अंदाजे ५-६ हजार तरी प्रेक्षक असावेत. ९० टक्के भारतीय व उरलेले पाकिस्तानी होते. एक सरदारजी पाकिस्तान्यांमध्ये बसून "खलिस्तान झिंदाबाद" अशा घोषणा देत होता. भारतीय आणि पाकिस्तानी प्रेक्षकांमध्ये तुंबळ घोषणायुद्ध सुरू होते. सर्वत्र अतिशय भारावलेले वातावरण होते. ते ४-५ तास विसरणे अशक्य आहे. माझे काही मित्र अलाबामा, कॅलिफोर्निया अशा दूरच्या राज्यातून ऑलिन्पिकचे सामने बघण्यासाठी आले होते. भारत-पाकिस्तान सामना अनिर्णीत रहिल्यामुळे आमची थोडिशी निराशा झाली. परंतु दुसर्या सामन्यात स्पेनने अमेरिकेला ७-१ असा मार दिला. त्या सामन्यात स्पेनने सर्व प्रकारचे गोल केले (फिल्ड गोल, पेनल्टि कॉर्नरवर गोल, पेनल्टी किकवर गोल . . . अमेरिकेने चुकून एक सेल्फ गोल सुद्धा केला). संध्याकाळी साडेनऊनंतर परत येताना AT&T ने निर्माण केलेली ऑलिंपिक पार्क बाहेरून बघितली. कर्मधर्मसंयोगाने त्याच रात्री साडेदहा-अकरा वाजण्याच्या सुमाराला त्या बागेत बॉंबस्फोट होऊन २ नागरिक बळी पडले होते. त्यारात्री मित्रांबरोबर गप्पा मारून रात्री अडीचच्या सुमाराल झोपलो. दुसर्या दिवशी सकाळी TV लावला तर सर्व वाहिन्यांवर फक्त बॉंबस्फोटाचीच बातमी होती. ती बघून क्षणभर विश्वासच बसला नाही की याच पार्कवरून आदल्या दिवशी फक्त एक तास आधी आपण जात होतो. नंतर ४-५ दिवसांनी त्या ऑलिंपिक पार्कलाही भेट देता आली. तिथे स्फोटाच्या घटनेचा मागमूसही नव्हता. त्या काळात संपूर्ण अटलांटा नगरी ऑलिंपिकमय झाली होती. ऑफिसमध्ये, रस्त्यावर, दुकानात सर्वत्र समस्त अटलांटावासी ऑलिंपिक अंगरख्यावर ऑलिंपिक पिन लावून अभिमानाने वावरत होते. माझ्या बॉसने व ऑफिसमधल्या इतर बर्याच सहकार्यांनी ऑलिंपिकसाठी स्वयंसेवक म्हणून उस्फूर्त काम केले होते. त्यासाठी कंपनीने त्यांना ३ आठवड्यांची खास रजा दिली होती. प्रत्यक्ष बघायला मिळालेले आयुष्यातले हे पहिले आणि बहुदा शेवटचेच ऑलिंपिक!
|
Zelam
| |
| Wednesday, February 06, 2008 - 2:01 pm: |
|
|
मुकुंद hats off to you! मस्त लिहिताय. अगदी स्फूर्तीदायक! २०१० च्या विंटर ऑलिंपिकला जावसं वाटू लागलय.
|
Chinya1985
| |
| Wednesday, February 06, 2008 - 6:14 pm: |
|
|
मुकुंद लैच भारी!!!!!!हा मी मायबोलिवर आत्तापर्यंत वाचलेल्या बीबी पैकी सर्वात भारी बीबी आहे.खुपच छान चाललय.तुम्ही हे लिखाण कुठल्यातरी पेपरवाल्यांना द्या ते छापतील कारण त्यांच्या ऑलिम्पिक विषयीच्या सदरान्पेक्षा हे फ़ारच छन आहे
|
Mukund
| |
| Thursday, February 07, 2008 - 8:19 am: |
|
|
श्रावण,हेमंतकुमार,अमृता,केदार,आर्च,अश्विनि,अखि,पुनम,झेलम व चिन्मय... तुम्ही आवर्जुन या गोष्टी वाचल्या व त्या तुम्हाला आवडल्या... नुसत्या आवडल्या नाहीत तर तुम्ही तसदी घेउन इथे त्यावर अभिप्राय लिहीलात... त्याबद्दल तुमचे मनापासुन धन्यवाद.पुनम.. तुझ्यासारख्या सुंदर गोष्टी लिहिणार्या व्यक्तीने माझ्या या आठवणीवजा गोष्टी आवडल्या असे म्हणावे यात तुझाच मोठेपणा आहे. सतिश मढेकर... तुमचेही खास धन्यवाद... तुम्ही पण आपले अनुभव इथे लिहिल्याबद्दल.तुम्ही त्यावेळी ऍटलांटालाच राहत होता त्यामुळे मी आता पुढचे जे अनुभव सांगणार आहे त्याला तुम्हीही साक्ष आहात. काही चुकले किंवा वगळले तर जरुर चुकीची दुरुस्ती करा किंवा त्या गोष्टीत भर घाला. वर सतिश म्हणाले त्याप्रमाणे सगळे ऍटलांटा शहर ऑलिंपिकमय होउन गेले होते. हे ऑलिंपिक्स दोन गोष्टींकरता आगळेवेगळे होते. एक म्हणजे १९९६ हे मॉडर्न ऑलिंपिक्सचे १०० वे वर्ष असल्यामुळे सेंटेनिअल ऑलिंपिक्स म्हणुन या ऑलिंपिक्सचा एक वेगळा मान होता. आणी दुसरे असे की हे ऑलिंपिक्सच्या इतिहासातले पहिलेच असे ऑलिंपिक्स होते की ज्यात होस्ट सिटीने स्वत:चा(म्हणजेच टॅक्स पेयर्संचा) एकही छदाम खर्च न करता या ऑलिंपिक्सला लागणारा पैसा उभा केला. त्यामुळे हे ऑलिंपिक्स पुर्णपणे स्पॉन्सरशिपच्या पैशाने उभे राहीले होते. साहजीकच हे ऑलिंपिक्स मोस्ट कमर्शियल ऑलिंपिक्स म्हणुन लोकांच्या आठवणीत राहीले. हे चांगले होते की वाइट हे बघण्यार्याच्या द्रुष्टीकोनात आहे. अमेरिकेतल्या भांडवलशाही कॉर्पोरेशनना त्यांचा ब्रॅंड खपवायची ही एक सुवर्णसंधीच होती व नायके,कोका कोला, मॅकडॉनल्ड सारख्या कंपनींनी त्याचा कुठलीही लाज न बाळगता पुरेपुर फायदा करुन घेतला. या ऑलिंपिक्सच्या वेळी सगळ्यांना भांडवलशाही ऍट बेस्ट(का वर्स्ट?) बघायला मिळाली. वर सतिश म्हणाले तसे सर्व ऍटलांटाभर जाहिरातींचे पेव फुटले होते. दिव्याचे खांब, रस्त्याच्या भिंती व बॅरीकेड्स सुद्धा व्हिजा,पॉवरेड,गेटोरेड कंपनीजच्या जाहीरातींच्या तावडीतुन सुटले नव्हते. ऍटलांटामधुन उत्तर दक्षिण जाणार्या आठपदरी इंटरस्टेट ७५ व इंटरस्टेट ८५ या दोन हायवेच्या दुतर्फ़ा कोका कोला व नायकेच्या जाहीराती झळकत होत्या.तेवढेच काय.. वर सांगीतल्याप्रमाणे ऑलिंपिक्सची मशाल जी मेन ऑलिंपिक्समधे १५ दिवस तेवत राहते त्या मशालीचा आकारसुद्धा मॅक्डॉनल्डच्या फ़्रेंच फ़्राइजच्या पुड्यासारखा होता... आता बोला.... ऍटलांटा हे कोका कोला कंपनीचे मेन हब असल्यामुळे जिथे तिथे कोकच्या जाहीराती डोळ्यासमोर फडकत होत्या. या ऑलिंपिक्सच्या आठवणीकरता बांधलेल्या सेंटेनिअल पार्कच्या एका टोकाला पिअर डी क्युबर्टीनचा पुतळा नायके पार्क, कोक, ए.टी. ऍंड टी. च्या शामीयान्याकडे बघत उभा असलेला दिसत होता. त्या पुतळ्याकडे पाहुन क्षणभर असा विचार मनाला चाटुन गेला की की पिअर डी क्युबर्टीन त्या शामियान्यांकडे व नायके पार्ककडे बघुन विचार करत असावा.... या कंपनीजचे स्टॉक घेतले तर आपण नक्कीच श्रिमंत होउ... सेंटेनिअल ऑलिंपिक्सच्या आठवणीकरता सेंटेनिअल पार्क हे एक कायमचे स्मारक उभे करण्यात आले. जवळ जवळ १५ एकरचे हे पार्क डाउनटाउन ऍटलांटामधे सी एन एन सेंटरच्या अगदी समोर बांधण्यात आले. त्याच्या खर्चाचा भार उचलण्यास मीही खारीचा हातभार लावला. या पार्कमधली जमीन खास विटांनी बनवली गेली आहे. ही प्रत्येक विट तुम्ही ३५ डॉलर्स देउन विकत घेउ शकत होता. त्या ३५ डॉलर्सच्या मोबदल्यात तुम्ही आपले नाव व १५ शब्दाचा एक मेसेज त्या विटेवर लिहु शकत होता. ऑलिंपिक्सबद्दल मला एवढे आकर्षण असल्यामुळे मी विचार केला की या सेंटेनिअल ऑलिंपिक पार्कमधे कायमची आपल्या नावाची एक विट (एक ऑलिंपिक क्रिडाप्रेमी म्हणुन) असण्यात गैर काहीच नाही. म्हणुन मग माझ्या नावाचीच नाही तर आमच्या मातोश्रींच्या नावाची व माझ्या दोन्ही भावांच्या नावाची विट खरेदी मी केली... हे ऑलिंपिक्सच्या १ वर्ष आधीच मी केले होते. ऑलिंपिक्सच्या वेळी त्या सेंटेनिअल पार्कमधे प्रत्यक्ष आमच्या नावाच्या विटा आम्हाला पाहायला मिळाल्या... ऑलिंपिक्सच्या १५ दिवसात हे सेंटेनिअल पार्क म्हणजे ऑलिंपिक्स व्हिझीटर्स साठी एकत्र जमण्याचे एक मध्यवर्ती ठिकाण होते. त्या पार्कमधे ए. टी. ऍन्ड टी. चा झगमगता भव्य शामीयाना होता एन. बी. सी. टिव्हीचा प्रचंड मोठा बुथ होता,सॅम्संगचे पॅव्हेलिअन होते, स्वाचेस चा मोठा स्टॉल होता. ३ कॉन्सर्ट स्टेजेस होती जिथे दिवसभर लाइव्ह बॅंड्स चालु असायचे.त्याचा आवाज ऐकु येण्यासाठी सर्व पार्कभर दोन मजली उंच चौथर्यावर ठेवलेले स्पिकर्स होते.(अशाच एका स्पिकर स्टॅंडखाली ज्याने तिकडे बॉम्ब फोडला त्याने बॉम्बची पिशवी ठेवली होती). त्या स्पिकर्समधुन येणार्या जॉन विलिअम्सच्या ऑलिंपिक्स फ़ॅनफ़ेअर व समन द हिरोज च्या म्युझीकने कोणाच्याही मनात संदेह राहात नव्हता की ते ऑलिंपिक्सच्या एपिसेंटरमधे वावरत आहेत! सगळीकडे जगातल्या सगळ्या देशांचे झेंडे फडकत होते, असंख्य व्हेंडर्स टीशर्ट पासुन ऑलिंपिक्स पिनांपर्यंत असंख्य सुव्हीनीअर्स विकण्यात अष्टौप्रहर बिझी होते.तिथे मीसुद्धा एन. बी. सी. ऑलिंपिक्स पिन व बर्याच वेगवेगळ्या ऑलिंपिक्स पिन्स विकत घेतल्या व माझ्या मेमोरेबीलिआच्या साठ्यात जमा केल्या. एका वृद्ध नॉर्वेजिअन जोडप्याने माझा उत्साह पाहुन गेल्या ८ ऑलिंपिक्सच्या ऑफ़ीशिअल पिन्स मला दिल्या. झालच तर खाण्या पिण्याच्या पदार्थांच्या स्टॉल्सचीही रेलचेल होती. आसमंतात बीअरपासुन हॉट डॉग,बार बी क़्यु चिकन व फ़नेल केकसारख्या खाण्याच्या पदार्थांचे वास भरुन राहीले होते.पण या पार्कमधले सगळ्यात मोठे ऍट्रॅक्शन म्हणजे पार्कच्या मधोमध असलेली कारंजी... ही कारंजी ऑलिंपिक्सच्या पाच वर्तुळाच्या आकाराची होती व ऍटलांटाच्या तिव्र उन्हाळ्यात सगळे लोक.. खासकरुन बाळगोपाळ मंडळी त्या म्युझीक वर वर खाली होणार्या कारंजातल्या थंड पाण्यात चिंब भिजुन घेत होती. अमेरिकन,आफ़्रिकन,एशिअन,हिस्पॅनीक असे सगळी मुले एकत्र त्या कारंजात बागडताना दिसणे ही एक प्रकारे ऑलिंपिक्सच्या उद्दिश्टाची पुर्तताच होती.. फरक इतकाच की इथे हे खेळाडु एकत्र येउन पार्टीसिपेट करत नव्हते तर जगभरची सर्वसामान्य माणसे एकत्र येउन मिसळत होते. ऍटलांटा ऑलिंपिक्सच्या आठवणीपैकी ती सेंटेनिअल पार्कमधील पाच वर्तुळांची कारंजी व त्यात भिजणारी मुले व माणसे ही सुद्धा एक मेमोरेबल आठवण माझ्या स्मृतीमधे कायमची घर करुन गेली आहे. सेंटेनिअल पार्कच्या जवळच नायके कंपनीने नायके ऑलिंपिक पार्क उभारले होते. त्यात त्यांनी हॅंड्स ऑन अनुभवासांठी वेगवेगळ्या गोष्टी ठेवल्या होत्या. त्यात मला एक गोष्ट फारच भावुन गेली.. ती म्हणजे सॅन्प्रासच्या टेनीस सर्व्हीसचे प्रात्यक्षीक!... कोर्टच्या एका बाजुने भिंतीतुन ताशी १३५ मैलाच्या वेगाने टेनीस चेंडु बाहेर यायचे... दर ३० सेकंदांनी... आणी आपल्याला डोळ्याचे पाते लवते न लवते त्याच्या आत ते टेनीस बॉल कोर्टाच्या दुसर्या एंडला जाउन दाणकन आपटायचे... ते पाहुन संप्रासच्या सर्व्हीसबद्दल अजुनच आदर निर्माण झाला पण त्याहीपेक्षा त्याचे जे प्रतिस्पर्धी त्याची तशी सर्व्हीस परत करण्यात माहील होते(म्हणजे ऍगॅसी,बेकर वगैरे!) त्यांच्या बद्दलचा आदरही दुणावला! सिंपली अमेझींग स्पिड! क्रमंश्:
|
Mukund
| |
| Thursday, February 07, 2008 - 11:27 am: |
|
|
सेंटेनिअल पार्कच्या एका बाजुला ऑमनी हे इनडोअर डोम्ड स्टेडीअम होते ज्यात व्हॉलीबॉल स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्या ऑमनीमधे मला इटली विरुद्ध हॉलंड या स्पर्धेतल्या बेस्ट २ टिममधला सामना बघाण्याचे भाग्य मिळाले होते त्याबद्दल दोन शब्द.... हा सामना बघायला मी माझ्या भावाच्या सासु सासर्यांना घेउन गेलो होतो. सासुला डायबिटीसचा त्रास... त्यामुळे त्यांनी बरोबर फळे वगैरे असलेली पिशवी बरोबर घेतली होती. हा सामना बॉम्बींग झाल्यानंतरचा होता त्यामुळे सुरक्षा अधिकारी सगळीकडे होते... पण सुरक्षेच्या नावाने शंखच होता... एवढी तोबा गर्दी ऑमनी इनडोअर स्टेडीअममधे जायला... वर ऍटलांटाच्या कडक उन्हाळ्याने जिव अक्षरश्: मेटाकुटीला आणला होता... त्यामुळे ते सुरक्षा अधिकारी(अधिकारी कसले? व्हॉलेंटिअर्सच होते ते !)नुसते चेक करत आहेत असा आव आणत होते.. माईंची पिशवी तर पाहीली सुद्धा नाही... त्या पिशवीत सफ़रचंदांऐवजी बॉम्ब जरी असले असते तरी त्यांना कळले नसते... मला ती सीक्युरीटी पाहुन हसु पण आले व काळजीही वाटली.. खरच एखादा माथेफिरु असाच आत आला तर? असो... आत गेलो... आम्हाला बरीच वरची सिट मिळाली होती त्यामुळे जरा निराशा झाली. पण भगव्या कपड्यातील डच टिम व निळ्या कपड्यातील इटालीअन टिम कोर्टवर आल्यावर ते इनडोअर स्टेडीअम प्रेक्षकांच्या ओरडण्याने एकदम दणाणुन गेले... माझ्या हातात दोन्ही टिमचे रॉस्टर होते... प्रत्येकाची बायोग्राफी दिली होती.त्यात मला कळले की ही इटालिअन टिम गेली सहा वर्षे विश्वविजेती व अपराजीत आहे... त्यांचा कप्तान ऍन्ड्रिआ सार्टोरेटी हा २ वेळा वर्ल्ड कप एम. व्ही. पी. आहे व मरिआ ब्रासी( मला मात्र या नावाचे गॉडफ़ादरमधील लुका ब्रासी या नावाशी साम्य असल्यामुळे या प्लेअरची उगाच भिती वाटु लागली..) हा त्याच्या बुमींग सर्व्हीस साठी फ़ेमस आहे. व आंड्रे गार्डीनी हा हॉल ऑफ़ फ़ेम मधे जाणार हे काळ्या दगडावरची रेघ आहे! आता हे वाचल्यावर मला हॉलंडच्या टीम बद्दल एकदम दया वाटु लागली की यांचा अश्या बलाढ्य इटालिअन टिमसमोर कसा टिकाव लागणार? पण जेव्हा हॉलंडच्या टीमबद्दल वाचले तर कळले की ती जगातली २ नंबरची टीम आहे. तेही काही लेचेपेचे नाहीत. त्यांचा कॅप्टन पिटर ब्लांज हाही आंड्रे गार्डीनी सारखाच होनहार खेळाडु आहे. सामना सुरु झाला. एवढे सगळे इटालिअन व डच सपोर्टर्स पाहुन मला आश्चर्यच वाटले... खरच ऑलिंपिक्समधे सगळ्या जगातले षौकीन येतात.. आपणच नाही.. याचा मला साक्षात्कार झाला. दोन्ही बाजुचे फ़ॅन्स त्यांच्या भाषेतली गाणी गाउन एंजॉय करत होते. मला दोन्ही बाजुंच्या गाण्यातला एकही शब्द कळत नव्हता.. पण तरीही एकंदरीत वातावरण मस्त एंजॉय करण्यासारखे होते. मीही मला डच व इटालिअन... दोन्ही भाषा येत नसल्यामुळे फक्त टाळ्या वाजवत दोन्ही संघाला प्रोत्साहन द्यायला लागलो. काहीही म्हणा... खेळ कुठलाही असो... पण तो खेळणारे जर वर्ल्ड क्लास ऍथलिट्स खेळत असतील तर तेव्हा प्रेक्षक असणे ही एक पर्वणीच असते... जितक्या कौशल्याने एक जण बुमींग सर्व्हीस करायचे तितक्याच कौशल्याने प्रतिस्पर्धी टिममधले खेळाडु ती सर्व्हीस उचलुन घ्यायचे व दोन पास नंतर स्पाइक करायचे.. बर त्यांनी स्पाइक केल्यावर दुसरी टिम तितक्याच शिताफ़ीने तो स्पाइक डिग करायचे. त्यांचे ते व्हॉलीबॉल मधले कौशल्य पाहुन डोळ्याचे पारणे फिटले. पण त्या दिवशी इटालिअन टीम डच टिमला खुपच भारी पडली. प्रत्येक पॉइंट जरी अटीतटीचा झाला तरी शेवटी इटालिअन टीम ३ गेम विरुद्ध ० अशी जिंकली. इथे मला हेही नमुद करावेसे वाटते की याच दोन टिम्स नंतर फ़ायनलला सुवर्णपदकासाठी खेळल्या व तेव्हा हॉलंडने बलाढ्य इटालिअन टीमला हरवुन साखळी स्पर्धेतल्या पराजयाची परतफेड केली. क्रमंश्:
|
मुकुन्दने लिहिलेले १०१ टक्के खरे आहे. १९९६ मध्ये ऑलिंपिकच्या स्पॉन्सरांनी धुमाकूळ घातला होता. ऑलिंपिक प्रसारणाचे हक्क NBC ला मिळाले होते. अमेरिकनांना अमेरिकेच्या पलिकडे जग आहे याची कल्पना नसते. NBC सुद्धा याला अपवाद नव्हते. ऑलिंपिक हा जगातल्या सर्व देशांचा सोहळा आहे हे विसरून त्यांनी फक्त अमेरिकेचा सहभाग असलेल्या खेळांचे प्रक्षेपण करण्यातच धन्यता मानली. इतर देशांच्या सामन्यांचे प्रक्षेपण तर लांबच राहिले, त्या सामन्यांचे निकाल सुद्धा NBC वर सांगितले जात नव्हते. बॉंबस्फोटामुळे अमेरिकेची विशेषतः FBI ची खूपच नाचक्की झाली. जगातला सर्वाधिक सामर्थ्यवान आणि कडक सुरक्षाव्यवस्था असलेल्या देशाशी प्रतिमा या घटनेने धुळीला मिळाली. यामुळे चवताळलेल्या FBI ने बळीचा बकरा शोधला. ऑलिंपिक पार्कमध्ये सुरक्षारक्षक असलेल्या रिचर्ड ज्युवेलला केवळ त्याच्या एका वाक्याचा बॉंबस्फोटाशी बादरायण संबंध जोडून त्याला पाच महिने पकडून ठेवले आणि त्याचे आयुष्य बरबाद केले. बॉंबस्फोटाच्या दोन-तीन दिवस आधी एका सहकार्याला तो गमतीने म्हणाला होता की, "मी काही दिवसातच खूप प्रसिद्ध व्यक्ती होणार आहे.". या एका वाक्यावरून FBI ने त्यानेच हा कट रचला होता असा ग्रह करून घेतला आणि त्याला ५ महिने आत टाकले. वस्तुतः, बॉंब ठेवणार्याने बॉंब ठेवल्यानंतर ९११ ला फोन करून बॉंब अर्ध्या तासात फुटणार आहे अशी माहिती दिली होती आणि ही माहिती पार्कमध्ये पोचल्यावर इतर रक्षकांप्रमाणे रिचर्ड ज्यूवेलने सुद्धा धावपळ करून अनेक प्रेक्षकांना पार्कच्या बाहेर काढण्यात मदत केली होती. किंबहुना स्फोटानंतर १-२ दिवस त्याला Rescuer अशी प्रसिद्धी मिळाली होती. ५ महिने अविरत छळ करून सुद्धा FBI ला रिचर्डविरूद्ध तसूभरसुद्धा पुरावा सापडला नाही. FBI च्या गुप्तचरांनी पुराव्यासाठी त्याचे घर अक्षरशः खणून काढले होते. परंतु त्यांना काहिही संशयास्पद सापडले नाही. शेवटी ५ महिन्यांनंतर त्याला मुक्त करण्यात आले. १९९६ मध्येच ऑलिंपिकच्या आसपास अटलांटाच्या काही उपनगरात गे क्लब, गर्भपात क्लिनिक अशा ठिकाणी कुणीतरी स्फोट घडवून आणलेले होते. बहुतेक कुठलातरी Conservative Christain गट यामागे असावा. ऑलिंपिक पार्कमधल्या घटनेमागे हाच गट असावा. गंमत म्हणजे सुटल्यानंतर त्याने FBI ला आणि कुठल्यातरी वाहिनीला (बहुतेक NBC ) आपली बदनामी केल्यामुळे कोर्टात खेचले आणि २० लाख डॉलर्स नुकसानभरपाई मागितली. प्रकरण आपल्या अंगलट येणार हे लक्षात आल्यावर, NBC ने त्याला आपल्या स्टुडियोमध्ये सुरक्षारक्षकाची नोकरी ऑफर करून केस मागे घेण्याचा सौदा केला. एका चित्रपट निर्मात्याने त्याच्या जीवनावर चित्रपट बनविण्याची घोषणा केली. लगेच सर्व वाहिन्यांवर रिचर्ड ज्यूवेल आता कसा दशलक्षाधीश होणार आणि त्याला एकूण किती मिलियन डॉलर्स मिळतील ही चर्चा सुरू केली. स्वतःला एक पैसा मिळणार नसला तरी, इतरांची संपत्ती किती आहे यावर चर्चा करायला या वाहिन्यांना खूप आवडते. अटलांटा ऑलिंपिकच्या समोरोपाच्यावेळी ऑलिंपिक समितीच्या अध्यक्षांनी ऑलिंपिक चांगले पार पडले असे प्रशस्तिपत्रक दिले होते. परंतु त्यापूर्वीच्या बार्सिलोना ऑलिंपिकला उत्तम असा बहुमान मिळाला होता. त्यामुळे अटलांटावसी चिडले आणि कौतुक न केल्याचा निषेध म्हणून पुढचे काही दिवस अनेक नागरिक "Damn It!" हे "Gone With the Wind" की अशाच कुठल्यातरी चित्रपटातले प्रसिद्ध वाक्य आपल्या सदर्यावर छापून घेऊन हिंडत होते.
|
Tiu
| |
| Thursday, February 07, 2008 - 7:36 pm: |
|
|
चिन्याला अनुमोदन...मी इथे वाचलेल्या सर्वोत्तम बातमी फलकांपैकी हा एक आहे... अतिशय स्फुर्तीदायक कथा आणि माहीतीपुर्ण लेख. आणि लिहिण्याची तितकीच सुंदर शैली. तुम्ही नक्की एखाद्या वर्तमानपत्रात या कथा / लेख पाठवा.
|
Sandyg15
| |
| Friday, February 08, 2008 - 9:36 am: |
|
|
"Damn it!" हे बहुतेक महेश कोठारें च्या एखाद्या चित्रपटातून घेतले असणार. मुकुंद, तु जे आॅलिम्पिक्स बद्दल लिहितो आहेस ते खरंच खूप छान आणि inspirational आहे. मी आत्ता पर्यंत फक्त भारताची कामगिरी follow करायचो. पण तु लिहिलेल्या performances बद्दल वाचल्यावर बीजिंग आॅलिम्पिक्स पूर्णपणे follow करणार आहे.
|
Mukund
| |
| Saturday, February 09, 2008 - 6:16 am: |
|
|
स्वप्निल,संदिप.. धन्यवाद. सतिश तुम्ही Gone with the wind मधल्या र्हेट बटलरने स्कार्लेट ओहारा ला उद्देशुन म्हटलेले Frankly my dear..I dont give a damn...या वाक्यातल I dont give a damn या बद्दल बोलत असाल.. असो.. मार्गारेट मिचेलच्या गॉन विथ द विंड या कादंबरीमुळे ऍटलांटा शहर जगभरच्या वाचनप्रिय लोकांना ठाउक होते. पण आजचे ऍटलांटा जगाला CNN मुळे ठाउक आहे. CNN चे मध्यवर्ती प्रसारण इथुनच होते. अजुन दोन गोष्टी इथल्या प्रसिद्ध..... एक म्हणजे जगप्रसिद्ध कोका कोला ची मेन फ़ॅक्टरी इथेच आहे व सध्याचा जगातला सगळ्यात बिझी एअरपोर्ट हॅथफ़िल्ड एअरपोर्ट हाही इथलाच! पण ऑलिंपिक्सच्या वेळी हे शहर अजुन एका कारणासाठी माझ्या कायमच्या लक्षात राहीले.. ते म्हणजे इथले"पिच ट्री" हे रस्त्याचे नाव..... ऍटलांटा हे जॉर्जिया या दक्षिणेतल्या राज्यात येते व हे राज्य तिथल्या पिच या फळामुळे पिच स्टेट म्हणुन प्रसिद्ध आहे. पण तुम्हाला काय सांगु? या पिच ट्री नावाने नुसता वैताग आणला होता.. या शहरामधे या नावाचे जवळजवळ १०० तरी रस्ते असतील.. कधी नुसतेच पिच ट्री स्ट्रीट, तर कधी पिच ट्री ऍव्हेन्यु तर कधी पिच ट्री पार्कवे तर कधी पिच ट्री लेन... नुसता उच्छाद मांडला होता या पिच ट्री नावाने.. डाउनटाउनमधे सेंटेनिअल पार्कच्या व मेन ऑलिंपिक्स स्टेडिअमच्या आसपास फिरताना या पिच ट्री नावांच्या रस्त्यांनी आम्हाला फिर फिर फिरवले... सतिश बरोबर की नाही मी म्हणतो ते या नावाबद्दल? संदिप... तुला एक सांगु? मलाही आपल्या देशाच्या खेळाडुंची कामगीरी फ़ॉलो करायला आवडत.. पण आयुष्यात मला एक गुपीत खुप आधीपासुन कळले... आपण जर आपल्या मनाची कवाड जरा जास्त उघडली तर आपल्याला या जगात अनेक गोष्टी दिसतात की ज्याने आपल्याला एक मनुष्य प्राणी म्हणुन खुप शिकायला मिळत,खुप आनंद मिळतो. आपल्या जिवनाची सुरुवात आपल्या आइवडिलांपासुन सुरु होते.. मग आपण शाळेत जातो.. शाळेतले मित्रमैत्रीणी आपल्या जगात येतात.. नंतर कॉलेजमधे जातो.. आपले विश्व अजुन मोठे होते... मग आपले व्यावसायिक जिवन सुरु होते व आपल्या विश्वाचा पसारा अजुन वाढतो.. काही जण मग आपला देश सोडुन दुसर्या देशात जातात.. अशा रितीने आपल्या विश्वाच्या कक्षा वाढतच जातात. पण असे असुनही पुष्कळशी माणसे आपल्या मनाच्या कक्षा मात्र कमालीच्या मर्यादित ठेवतात.. माझे नातेवाइक,माझे मित्र,माझा समाज,माझी भाषा,माझा प्रांत व माझा देश यामधेच ते अडकुन राहतात. त्यामुळे अशी माणसे जगातल्या अनेक सुंदर गोष्टींमधला आनंद ओळखण्यास मुकतात. मनुष्याला स्वभाषेचा,स्वजातीचा,स्वप्रांताचा व स्वदेशाचा अभिमान जरुर असावा पण दुराभिमान मुळीच नसावा.. मगच आपल्याला दुसर्यांच्या अचिव्हमेंटमधे,दुसर्यांच्या आनंदामधे,दुसर्यांच्या विजयामधे सहभागी होता येते. मी या विश्वाचा नागरीक आहे या द्रुष्टीकोनातुन जर तु जगाला बघायला लागलास तर अचानक तुला एवढे एंजॉय करण्याचा खजिना तुला तुझ्या आयुष्यात सापडेल की तुला... अलिबाबाच्या गुहेत अलिबाबाला जसे वाटले की या गुहेतल्या खजिन्यातले काय उचलु आणी काय नाही... तसेच या वैश्विक खजिन्याचे तु दार उघडलेस तर तुला वाटेल. हे इथे सांगायचे कारण की ऑलिंपिक्स स्पर्धेचा उद्देश हा असतो की ऑलिंपिक्समधे सगळ्या जगातल्या ऍथलिट्सने एकत्र येउन खेळीमेळीने स्पर्धेत भाग घ्यायचा व मे द बेस्ट ऍथलिट विन या भावनेने भाग घेउन विजेत्याचा सन्मान करायचा असतो मग तो भला कोणत्याही देशाचा असो...
|
Hkumar
| |
| Saturday, February 09, 2008 - 7:58 am: |
|
|
मुकुंद, walkathon बद्दल काही माहिती आहे? ते olympics मध्ये असते का? बाकी मस्त चाललेच आहे.
|
अगदी खरे आहे मुकुंद! अटलांटा शहरात आणि आसपास "Peechtree Avenue/Boulevard/Street/Road/Way" अशा एकसारख्या नावाचे असंख्य रस्ते आहेत. त्यामुळे खूपच गोंधळ होतो. तू अजूनही अटलांटामध्येच राहतोस का?
|
मुकुंद, मायबोलीच्या मुखपृष्ठावर "ऑलिंपिक्स" आलं आहे, पाहिलत का?
|
Itgirl
| |
| Saturday, February 09, 2008 - 4:33 pm: |
|
|
मुकुंद, तुम्ही खरोखर अतिशय सुरेख माहिती लिहीत आहात ऑलिंपिक्स बद्दल, मी रोज वाचत आहे, खूपच सुरेख. इतक सुरेख लिहिल्याबद्दल आणि डोळ्यासमोर प्रसंग उभे केल्याबद्दल खूप धन्यवाद आणि मायबोलीच्या मुख्य पृष्ठावर तुमचे लेखन आल्याबद्दल अभिनंदन
|
मुकुंद, अत्युत्तम प्रयत्न... लाख आभार... विल्मा रुडाॅल्फ ची गोष्ट आॅलिम्पिक मधलीच ना? माझ्या मते, १९६० चं ना? चुभूद्याघ्या... ती ही ऐकायला आवडेल... Its my one of the most favourite
|
Hkumar
| |
| Monday, February 11, 2008 - 5:18 am: |
|
|
जेसी ओवेन्स या गाजलेल्या आॅलिंपिकपटूच्या नावाची गंमत आहे. त्याचे खरे नाव जे. सी. ओवेन्स होते. त्याच्या शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षिकेने चुकीचे ऐकून Jesse O असे लिहीले. मग तो 'जेसी' होवून बसला!
|
Hkumar
| |
| Monday, February 11, 2008 - 5:40 am: |
|
|
जेसी ओवेन्सने १९३६ च्या स्पर्धेत एका दिवसात मिळवलेल्या ४ सुवर्णपदकांचे वर्णन '' हिटलरच्या नाकावर टिच्चून मिळवलेली'' असे केले जाते. एकूणच त्याच्या दैदिप्यमान कामगिरीमुळे कृष्णवर्णिय खेळाडूंना प्रतिष्ठा मिळाली.
|
Lampan
| |
| Monday, February 11, 2008 - 10:07 am: |
|
|
Hats Off !!! हे वाचत असताना अंगावर रोमंच आणि डोळ्यात पाणी का कुणास ठाउक .. ते झा .. टो .. पेक झा .. टो .. पेक वाचताना तर खरोखर मला stadium मध्ये असल्यासारखं वाटायला लागलं totaly hypnotized state
|
Mukund
| |
| Tuesday, February 12, 2008 - 10:13 am: |
|
|
अद्वैत,आनंदयात्री,अमेय,शैलजा... धन्यवाद.जसा जसा वेळ मिळेल तसा तसा मी माझ्या ऑलिंपिक्सच्या माहीत असलेल्या आठवणींचा साठा तुमच्यासारख्या रसिकांपुढे सादर करण्याचा प्रयत्न करत आहे.मला जसा त्या आठवणी बघताना आनंद झाला तसा तुम्हालाही होवो हाच माझा या बीबीमागचा हेतु आहे.तो हेतु पुर्ण होत आहे की नाही हे तुम्ही देत असलेल्या अभिप्रायामुळे मला कळत आहे त्यामुळे तुम्हा सगळ्यांच्या मौलिक अभिप्रायाबद्दल परत एकदा सगळ्यांचे आभार. नेमस्तकांनी हे सदर मुखपृष्ठावर उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांचेही मनापासुन आभार.... सतिश.. नाही.. मी ऍटलांटाला फक्त ऑलिंपिक्ससाठी गेलो होतो. मी कॅन्सास सिटीला असतो. हेमंतकुमार... ऑलिंपिक्समधे वॉकेथॉन हा प्रकार नसतो.. पण ५० किलोमिटर वॉक हा प्रकार असतो. हे ५० किलोमिटर चालणे हा चालण्याचा अजब प्रकार असतो.. माझ्या नजरेला ते ऑलिंपिक्समधले चालणे हे चालणे व धावणे या दोघांमधल्या हायब्रिडचा प्रकार वाटतो. त्याचे काही ठरावीक नियम आहेत व त्या नियमाप्रमाणेच तुम्ही पाय उचलु शकता. तुम्ही जे वॉकेथॉन म्हणत आहात तो प्रकार म्हणजे एखाद्या चॅरीटीसाठी जे ५ किंवा १० मैल चालण्याचा संकल्प असतो तो. अशा वॉकेथॉनमधे कॉमन माणसे भाग घेउन आपला त्या चॅरीटीला असलेला सपोर्ट दाखवतात व अशा वॉकेथॉनमधुन त्या त्या चॅरिटीसाठी निधी उभारला जातो. उदा. एड्स वॉकेथॉन किंवा डायबीटीस अवेअरनेस वॉकेथॉन वगैरे... आनंदयात्री... विल्मा रुडॉल्फ बद्दल जरुर लिहीणार आहे पण वरच्या पोस्टमधे हेमंतकुमारांनी बर्लिन ऑलिंपिक्सचा व जेसी ओवेन्सचा विषय काढलाच आहे त्यानिमित्ताने मला त्या ऑलिंपिक्सविषयीच्या २-३ अविस्मरणिय आठवणींबद्दल सांगावेसे वाटत आहे....
|
Zpratibha
| |
| Tuesday, February 12, 2008 - 12:07 pm: |
|
|
अगदि मनापासुन धन्यवाद मुकुंदा. तुमच्यामुळे चांगली माहिती कळतेय. लिहित रहा आम्हि वाचतोय.
|
|
मायबोली |
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|