Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 09, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » कार्तिक » ललित » आठवणीतले मालवण » Archive through November 09, 2006 « Previous Next »

Dineshvs
Wednesday, November 08, 2006 - 6:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरे तर आमचे मूळ गाव, राजापुर. पण माझे आजोबा मालवणला येऊन स्थाईक झाले, आणि माझे वडिल मुंबईला.
त्यामुळे मे महिन्याच्या सुट्टीत मालवणला जात असु.
माझे आजोळ कोल्हापुरजवळचे मलकापुर. म्हणुन सुट्टीचे दिवस, या दोन गावात वाटुन टाकावे लागत.

मधे एक काळ असा होता, कि मालवणी भाषेत बोलणे, खुद्द मालवणातच कमीपणाचे मानले जात असे. त्यामुळे आमच्याघरी शुद्ध मराठीतच बोलत असत. शिवाय आजी राजापुरची, काक्या आणि आत्या वेगवेगळ्या गावच्या त्यामुळे, मालवणी सगळ्याना कळायचीच नाही. आणि आम्ही तसे हेल काढुन बोललो तर सगळे आम्हाला ओरडायचे.
मुंबईत तशी हि भाषा, खास करुन लालबाग परळ भागात बोलली जात होती. पण त्याला खरी प्रतिष्ठा मिळवुन दिली ती मछिंद्र कांबळींच्या नाटकानी. आज मायबोलिवर बरेच जण आवर्जुन मालवणीत लिहितात, ते वाचुन मला हे लिहायची स्फुर्ति झाली.

तिथे लिहिणारे सरसकट मालवणी असे बोलत असले तरी, सावंतवाडी, कुडाळ, कणकवली ईथे बोलल्या जाणार्‍या भाषेपेक्षा मालवणी निदान उच्चारात तरी किंचीत वेगळी आहे. मला ते नेमके सांगता येणार नाही, पण विनयचे बोलणे ऐकुन मी त्याला तसे सांगितले होते.

अगदी लहानपणी आम्ही मालवणला बोटीने जात असु. आमचे घर खुद्द मालवणातच असल्याने, आम्हाला बोटीतुन उतरुन आणखी प्रवास करावा लागत नसे. त्यावेळी मालवण बंदरातला भोंगा आमच्या घरात ऐकु येत असे, आनि मग आम्ही बोट बघायला पळत जात असु.
तरी प्रत्यक्ष बोट मात्र खुपच आत ऊभी रहात असे. तिच्यातुन उतरुन छोट्या पडावातुन बंदरावर यावे लागत असे. मालवणला जरी घर समुद्राजवळ असले तरी आमच्या मालाडच्या घरापासुन फ़ेरी वार्फ़ म्हणजे भाऊच्या धक्क्यापर्यंत जाणे, तेसुद्धा सामानाच्या बॅगा, घेऊन जरा अवघडच होते. त्याकाळी मोल्डेड लगेज नव्हते. मोठमोठ्या पत्र्याच्या बॅगा असत.
मग आम्ही कोल्हापुरमार्गे जाऊ लागलो. आजोळी जाण्यासाठी कोल्हापुरला जाणे भागच होते, कारण मलकापुरला जायला मुंबईहुन थेट एस्टी नव्हती.
कोल्हापुरला जायलादेखील दिवसाचा प्रवास करावा लागत असे. रात्रीच्या एस्ट्या सुरु झाल्या नव्हत्या.
दिवसाचा प्रवास हेहि एक दिव्यच होते. अगदी सकाळी मालाडहुन बॉम्बे सेंट्रलला जाणे शक्य नसल्याने, आम्ही रात्रीच तिथे वस्तीला ( त्या काळातला शब्द ) जात असु. बाहेर स्वच्छ पाणी मिळायची शाश्वती नसल्याने, पाण्याचा मोठा जग भरुन घेत असु. पुढे पुढे थर्मासमधुन चहा वैगरे पण नेत असु. मोठी बॅग असायचीच.
मुंबई पुणा हायवे नव्हताच. ठाण्याच्या खाडीवरचा पुलहि नव्हता. त्यामुळे ठाणा वैगरे करत गाडी जायची. सातार्‍याला जेवायला थांबत असु. तोपर्यंत माझा जीव मेटाकुटीला आलेला असायचा. अर्धा प्रवास तर मी आईच्या मांडीवर डोके ठेवुनच करायचो.
त्याकाळच्या एस्ट्या म्हणजे खर्‍या अर्थाने लाल डब्बा होत्या. खिडक्या अगदी छोट्या. त्याहि केवळ अर्ध्याच उघडत, सीट अगदी कडक. कधीकधी खिडक्याना काचांच्या जागी ताडपत्री असे. ढर्रढुर्र करत, धापा टाकत त्या घाट चढायच्या. बाहेरची धूळ, डिझेलचा वास आणि धुम्रपान बंदी नसल्याने आतमधे चालणारे विडीपान, सगळा माहौल कसा जमुन यायचा. कोल्हापुरला उतरेपर्यंत आमचा अक्षरशः अवतार झालेला सायचा. जास्तीत जास्त दिवस मलकापुरला काढुन, आम्ही मालवणला निघायचो. ( मलकापुरबद्दल मग कधीतरी )
कोल्हापुरहुन अगदी पहाटे सहा वाजता आणि संध्याकाळी सहा वाजता अश्या दोन गाड्या मालवणसाठी सुटत. अजुनहि त्याच वेळा आहेत. त्यावेळी करुळचा घाट वापरात नव्हता. त्यामुळे राधानगरी, दाजीपुर फोंडा कणकवली असा एकच मार्ग होता. दाजीपुअरचे जंगल तेंव्हाहि खासच होते पण त्याचा आनंद घेण्याईतकी परिस्थिती नसायची. हा घाट उतरताना आणि चढतानादेखील मला लागायचा. माझा आणि आईचा जीव हैराण होत असे. ( त्या घाटाचे सौंदर्य आत्ता आत्ता आकळायला लागले आहे. आता मुद्दाम सवड काढुन त्या घाटात जातो मी. ) गाडी लागते म्हणुन मी सकाळी काहि खात नसे, राधानगरीला गाडी थांबली तरी तिथे काहि खात नसे. आणि त्या काळात असे बाहेर विकत घेऊन खाण्यासारखे काहि मिळतहि नसे.

राष्ट्रिय महामार्ग झाल्यापासुन, कोकण रेल्वे झाल्यापासुन ओरोस हे नाव कानावर पडायला लागले आहे. त्या काळी कधी हे नाव ऐकले नव्हते. कणकवलीनंतर कसाल गावातुन मालवणचा फाटा फुटे. त्यामुळे कसालला जास्त महत्व होते. आता हे गाव अगदीच बापुडवाने दिसते.
ते आले, म्हणजे मला जरा हायसे वाटायचे. पुढे कट्टा आले, कि पोहोचलोच असे वाटायचे.

मालवणला आमचे घर खुद्द मालवणात म्हणजे मेढ्यात आहे. त्या काळी पाच काकांपैकी चार काका तिथेच रहात होते. पाचवे सावंतवाडीला, पण तेहि येत असत. त्यामुळे सगळे घर भरुन जात असे.
आमच्या घरापासुन शंभर मीटर्सवर समुद्र होता. मालवणला जायचे मुख्य आकर्षण म्हणजे तो समुद्र. सकाळ संध्याकाळ माझा वेळ त्या वेळेवरच जात असे.
समुद्राला भरती नसताना, पाण्यात शिरायची आम्हाला बंदी होती, काका मंडळीना त्या वेळा बरोबर माहीत असत, पण आमचा ससेमिरा चुकवण्यासाठी, जा भरती आली का ते बघुन ये असे म्हणुन पिटाळत असत. तिथे गेल्यावर वाळुन किल्ले करत बसणे हा एक खेळ असायचा. तिथुन समोरच सिंधुदुर्ग दिसतो.
त्यामुळे त्याच्यासारखे काहितरी करायला बघायचो.
भरती आली असे सांगायला जातानाच काका वाटेतच भेटायचे. तिथले पाणी त्यावेळी खुपच स्वच्छ होते. समुद्रहि सुरक्षित आहे. फारसा खोल नाही, खड्डेहि नाहीत. खडक आहेत पण ते वरुन कळतात.
त्यामुळे तिथे डुंबत बसायला खुप मजा यायची, काकांची नजर आमच्यावर असायचीच. क्वचित कधी चुलत भाऊ काजीची बोंडे म्हणजे फळे घेऊन येत असे. ती कापुन समुद्राच्या पाण्यात टाकली कि त्यातला चीक सगळा निघुन जात असे. मग ती सहज खाता येत.
अगदी जेवायची वेळ झाली असे सांगत एखादी चुलतबहिण तिथे येईपर्यंत आम्ही पाण्यातुन बाहेर येत नसु.
घरी येईपर्यंत अंगाला खार्‍या पाण्यामुळे खाज सुटलेली असे. मग दारच्याच विहिरीवर जाऊन भराभरा घागरी काढुन डोक्यावर ओतुन घेत असु.
दुपारच्या वेळीहि घरात पाय ठरत नसे. घराच्या मागे चिवल्याची वेळ होती. तिकडचा समुद्र आम्हाला पाण्यात जाण्यासाठी निषिद्ध होता. एकतर तो किनारा खुप उतरता होता. त्या समुद्रात भोवरे होते असा समज होता.
अगदी भर दुपारीहि तिथे उभे राहणे भितीदायक वाटायचे. अगदी आडवे वाढलेले एक नारळाचे झाड होते तिथे. दुर उंचवट्यावर एक पडके चर्च होते. ब्रम्हदेशाच्या राजाचा स्मृतिस्तंभ होता. हे सगळे वातावराण मनात धडकी भरवायचे. त्यामुळे मोठ्या चुलतभावाची सोबत असल्याशिवाय आम्ही तिथे जात नसु.

मेढ्यातुन वेळेवर गेले कि उजव्याबाजुला राजकोट आहे. तिथे पुर्वी एक भलेमोठे लोखंडी यंत्रासारखे काहितरी पडलेले होते. ते बुडलेली बोट वर काढायचे मशीन असे आम्हाला सांगत असत. अगदी सोपी चढण चढुन तिथे जाता येते. तिथे अगदी लगेचच अगदी छोटीशी घुमटी लागते. ती देवचाराची किंवा महापुरुषाची, असे मला काकानी सांगितले होते.
तिथे थोडी सपाट जागा आहे. आमच्या काका मंडळींची ती क्रिकेट खेळायची जागा होती. अंपायरला बसायला म्हणुन तिथे एक खडकातुन तयार झालेली नैसर्गिक खुर्ची होती. तिथे एका घराचे अवषेश आहेत. पुर्वी तिथे एक कुटुंब रहात असे, ते जरा गर्विश्ठ होते आणि त्या परिसरात कुणाला येऊ देत नसत पण गोड्या पाण्यासाठी मात्र त्याना मेढ्यात यावेच लागे. राजकोटात गोड्या पाण्याची सोय नाही.
तिथे पुढे जरा उंच जागा आहे आणि तिथुन खाली खडपात उतरता येते. भरतीच्या वेळी तिथे उंच पाणी उडत असे. तिथुन सुर्यास्त सुद्धा छान दिसत असे. काका, काक्या वौगरे सगळे तो बघायला जात असत.
संध्याकाळी बाजारात जायचा एक कार्यक्रम असायचा. पण मला त्याहि वयात बाजारात जायचे आकर्षण नव्हते. मी आपला वाळुतच खेळत रहायचो. तिथे किनार्‍यावर ठेवलेली एखादी होडी असायचीच. तेच आमचे खेळणे.
किनार्‍यावर खुप घुला म्हणजे गोगलगायी मिळत. त्या घरी आणायची खुप ईच्छा असे, पण त्या जिवंत असल्याने, घरी आणुन ठेवल्या कि त्यातला प्राणी मरुन घाण वास येत असे. एक काकी त्या घुलांमधला प्राणी सुईने काढुन त्याची आमटी करत असे.
बाजारात मुळ्ये म्हणजे शिंपल्या त्या दिवसात येत असत. ( माझ्या आईच्या या नावाने आधी गोंधळ उडत असे. ) खडपात कालवेहि मिळत असत. सुकतीच्या वेळी मोठी काकी ते आणायला जात असे. उथळ पाण्यात काळ्या सापासारखा रेचण नावाचा प्राणी असे. दगड मारला कि तो एक पांढरा द्राव बाहेर टाकत असे. माखल्याच्या पाठी पण मिळत. पाळलेल्या लव्हबर्ड्सना खायला मी त्या गोळा करत असे. सुकलेल्या समुद्रफण्या पण मिळत. हा एक काळा सपाट झाडासारखा प्रकार असे. क्वचित कधीतरी मेलेला केंड मासा किनार्‍यावर दिसत असे. हा मासा मेला तरी फ़ुटबॉलसारखा फ़ुगतो. त्यावरच्या उलट्या काट्यांमुळे त्याला ईतर मासे खात नाहीत.
त्यावेळी मालवणला बांगडे भरपुर मिळत. आणि आमच्या घरात ते बर्‍याचवेळा आणलेहि जात. पण मला त्याचे काहि देणेघेणे नव्हते.
माझ्यासाठी मग, जिरे खोबरे घालुन केलेले वरण, भज्यांची आमटी, गोड घावणे, नारळाच्या रसातल्या शेवया, चुनकापं, अशी पक्वान्ने केली जात.
काका मग माझ्या आईला कोल्हापुरी मसाल्याची भरली वांगी करायला सांगत असत. आणि त्या भाजीत अगदी ओंजळी ओंजळीने काजु घातलेले असत.
त्या दिवसात काजु फ़ॅक्टरीमधे पण आम्ही जात असु.तेंव्हा खास ओव्हनमधे बिया भाजुनच काजुगर काढले जात. ते फोडण्यासाठी खास लाकडी फळी आणि एक खास तंत्र वापरले जात असे. हे सगळे काम बायका हातानेच करत असत. या प्रोसेसमुळे त्या काजुना एक वेगळीच खुमारी येत असे.
माझे आजोबा हयात असताना घरात चहावर बंदी होती. सकाळी सगळ्यानी पेज प्यायची हि पद्धत. त्या पेजेला खुप चव यायची. पितळीत हि पेज, सोबत खारातला आंबा. किंवा खोबरे. छान पोटभर न्याहारी व्हायची. तेच तांदुळ आम्ही मुंबईला आणुन पेज करत असु. पण ती चव येत नसे.
मग एखादी काकी फणस फोडुन आमच्यासमोर ठेवत असे. आम्ही तो भराभर संपवावा म्हणुन ती मागे लागत असे, कारण त्याची चारकांडे तिच्या म्हशींसाठी हवी असत. या दिवसात म्हशीच्या चिकाचा खर्वस देखील आमच्यासठी केला जात असे.
आमचे सगळे एकत्र कुटुंब असल्याने जेवणाचा मोठा कारभार असायचा. एका काकीकडे केवळ चपात्या करण्याचे काम असे तर एका काकिकडे निव्वळ वाटपाचे. तरिही सवड काढुन सगळ्या काक्या समुद्रस्नानाला जायच्या. माझी मोठी काकी नऊवारी साडी नेसुनदेखील पोहत असे.

त्या दिवसात करवंदे जांभळे यांचे खास कौतुक नसे, कारण मलकापुरला ती भरपुर खाल्लेली असत. समोरच आवळ्याचे झाड होते. त्याचे आवळे वेचुन काकीकडे दिले कि ती चटकदार चटणी करुन पानात वाढत असे. दिन्या माझा साधा भोळा, असे म्हणत ती माझ्या मासे न खाण्याबाबत हळहळत असे. पण माझ्यासाठी असे काहिबाहि करतच असे.
मालवणला मिळणारा खास एक मेवा म्हणजे. जगमं. तशी हि फळे मुंबईतहि मिळत असत, पण, ती अगदी थोडेच दिवस मिळत असत. करवंदासारखीच पण आकाराने जरा मोठी अशी हि फळे असत. आतला गर पारदर्षक हिरवा. अप्रतिम आंबट गोड चव असे याची. अगदी तुलनाच करायची तर किंचीत किवीशी करता येईल. पण तरिहि किवीला ती सर नाही. गेल्या कित्येक वर्षात हि फळे बघितलीदेखील नाहीत.

अपुर्ण


Manya2804
Wednesday, November 08, 2006 - 7:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद दिनेश मालवणाच्या आठवणी काढल्याबद्दल!

माझं आजोळ पण मालवण जवळ मसुर्‍याचं. खुप जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

तू म्हणातोस ते खरं आहे. कोकणातल्यासारखे जांब कुठेच मिळत नाहीत. तसेच तांबोशी आणि बांदोशी हे मासे पण मला मालवण परिसराच्या बाहेर कुठेच मिळाले नाहित!



Dineshvs
Wednesday, November 08, 2006 - 9:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग एक दिवस किल्ल्यात जायची टुम निघायची. त्यावेळी किल्ल्यात वस्ती होती तरी पर्यटक फारसे जात नसत. त्यामुळे होडी वैगरे सांगुन ठेवावी लागे.
किल्ला समोरच दिसत असला तरी होडीने जरा वेळ लागायचा, शिवाय त्याचे ते फसवे दार. त्यावेळीहि तटबंदी जरा ढासळायलाच आली होती. महाराजांचे मंदीर हाताचा ठसा वैगरे त्याहि वेळी खास आकर्षण होते. ( महाराजांच्या हाताच्या ठश्यावर हात ठेवुन केलेला अगोचरपणा पण आठवतोय. ) दुधबाव दहिबाव मात्र कोरड्या होत्या. फांद्या फ़ुटलेला माड अजुन आठवतोय. किल्ल्यावर थोडीफार शेतीहि करतात, पण राजांची भुमि म्हणुन तिथे नांगर फिरवला जात नाही. मला सगळ्यात आवडायची ती राणीची वेळ. तिथे समुद्रस्नान करणे फारच कल्पनारम्य वाटायचे. पण ते घडु शकत नसे.

मालवणात दुरवर एक सिनेमाचे थिएटर होते. तिथे रात्रीचा शो बघायला आम्ही चुलतभावंडे जात असु. सिनेमा सुटल्यानंतर पाय ओढत मेढ्यापर्यंत यायला नकोसे व्हायचे. मेढ्यात एक पडके घर होते. ( अजुनहि आहे ) तिथुन जाताना मला दिवसाहि भिती वाटायची. तिथेच एका घरावर कृष्णकमळाचा वेल होता. त्यातलि फुले शोधायला आम्ही सगळे जात असु. ( कुणाला सांगुनहि पटणार नाही, मुंबईला फ़ोर्टमधे पारश्यांच्या विहिरीसमोरच्या रस्त्यावर असाच एक वेल आत्ता आत्तापर्यंत होता. )

नाटकाचे थिएटर पण होते. स्टेज फक्त पक्के बांधलेले बाकि आवार झापानी बंदिस्त केलेले. असे ईको फ़्रेंडली, हवेशीर आणि किफायतशीर मटेरियल दुसरे नसेल. तिथे काहि नाटके अगदी पहिल्या रांगेत बसुन बघितलेली आठवताहेत.
अशीच कधीतरी चांदण्या रात्री खेकडे पकडायला जायची टुम निघायची. ढोपरभर पाण्यात भटकत शोधलेले खेकडे अजुन आठवताहेत.खरे तर आम्हा मंडळींचा त्या कामात काहि उपयोग नसायचा. ना आम्ही खेकडे पकडत असु ना पेटोमॅक्सची बत्ती धरत असु. या बत्तीकडे बघत खेकडे दिपुन स्तब्ध होतात, आणि मागुन त्याना सहज पकडता येतात. अर्थात त्याला खुप अनुभव लागतो. अश्याच एका वेळी आम्ही खुप दमलो होतो. मग अशीच लांबची ओळख काढुन एका घरी घुसलो. तिथे त्या माऊलीनी वाफ्यातले कलिंगड कापुन ठेवले. आम्हाला ईतकी भुक लागली होती ति त्यातला पांढरा भागहि गट्टम केला होता.
त्यावेळी मालवणात फिरताना बाळुचो झील रे, असे सगळे गावकरी चौकशी करत असत. त्या दिवसात माझे वडील खुप खुष असत. त्याना ती भाषा बोलायची संधी मिळत असे. कधीकधी रात्रीच्या वेळी ते मला घेऊन वेळेवर जात असत. त्या दिवसात तिथे अजिबात दिवे नसायचे. मिट्ट काळोखात आम्ही किनार्‍यावरच्या होडीत बसत असु. समुद्रात बारिक लाटा येत असत. प्रत्येक सातवी लाट मोठी असते असे ते मला सांगत असत. मी त्या मोजत बसत असे. त्याना कुणीतरी सवंगडी भेटलेला असे.
शाळा सुटल्यावर मालवणला जाणेहि थांबले. अजुनहि आमचे ॠणानुबंध मजबुत आहेत. सगळे कुटुंबीय या ना त्या निमित्ताने भेटत असतो. पण मालवणला जाणे मात्र होत नाही.
नाही म्हणायला वडीलांची अंतिम ईच्छा म्हणुन त्यांच्या अस्थि तिथल्या समुद्रात सोडायला तीन वर्षांपुर्वी गेलो होतो.
गजालीवर जरा डोकावलो तर हे सगळे आठवले.



Swaatee_ambole
Wednesday, November 08, 2006 - 9:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान लिहीलंयस दिनेशदा. आपल्या पदार्थांसारखीच आपल्या भाषेची ' चव'सुद्धा जिभेला किती हवी हवीशी असते! :-)

Vinaydesai
Wednesday, November 08, 2006 - 11:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, परत एकदा मालवणात न्हेलस...

बाजारात शिरताना एक घड्याळाचा दुकान होता. थंय एक फोटो लावलेलो होतो बाईचो.. जाता येताना तो फोटो डोळो मारी... आठावता?

त्या वाळूक पाय बुडवान तासंतास मी काडलेत...
:-)

Gurudasb
Wednesday, November 08, 2006 - 11:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश , आठवणीतल्या उमाळ्यातला लिखाण ! शब्दचित्रान नजरेसमोर उभ्या केलस आमचा मालवण मरे .

Neelu_n
Wednesday, November 08, 2006 - 1:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो दिनेश केवळ अप्रतिम.. आम्ही तिथे रोज एवढ्या गजाली करुन पण एवढे लिहु शकलो नाही. खरच अगदी अगदी मालवण फिरुन आल्यासारखं वाटले. पेज आणि खारातली कैरी आणि वालीची भाजी अहाहा :-)
'जगम' मला काही आठवत नाही पण 'तोरण' ही फळ खालीयत. ती पण आकाराने करवंदासारखी पण सफेद रंगाची. आणि जांब तर भरपुर खाल्लेयत. जाळी लावलेल्या दांड्याने ते झाडावर्चे काढुन आणि तिथेच झाडाखाली बसुन खाल्येत.. सगळच आठवले :-)
दिनेश धन्यवाद तुम्हाला आठवणींना उजाळा दिल्याबद्दल.
काजु फॅक्टरी कुठली हो. कामतांची का? आमचे घर तिथेच आहे.



Prajaktad
Wednesday, November 08, 2006 - 3:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा!आम्हा देशावरच्या लोकांना अशि सफ़र घडवल्याबद्दल दिनेशदा तुमचे आभार!.. चुनकापं म्हणजे काय?

Bhagya
Wednesday, November 08, 2006 - 6:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिवाळी अंक वाचू की हे वाचू? सध्या खूपच आहे वाचायला.

दिनेशदा, खारातला आंबा म्हणजे लोणच्यातला का?


Dineshvs
Wednesday, November 08, 2006 - 8:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनय, माझ्या वडीलानी तो फोटो आमच्या घरी आणुन लावला होता.
नीलु, जगमं ती जगमंच. आता दाखवायलाहि शिल्लक नाहीत ती. तोरणं पिठुळ लागतात. ती अजुन मिळतात.
फ़ॅक्टरी बहुतेक तीच असावी. तिथे माझे काका मॅनेजर होते. त्यावेळी काजीच्या बिया भाजुन गर काढत असत. भाजल्याचा एक छान वास परिसरात येत असे. आता बिया स्टीम करुन गर काढतात.
प्राजक्ता चुनकापं म्हणजे खोबर्‍याच्या वड्या. त्यात बटाटा घातलेला असतो
आणि भाग्य खारातला आंबा म्हणजे नुसत्या मीठाच्या पाण्यात मुरवलेला आंबा. काहि जण त्याचे मग लोणचं घालतात. पण पेजेबरोबर खायला हा असाच आंबा छान लागतो.
त्याकाळी संपुर्ण मेढ्यात एकहि दुकान नव्हते. एका घरात एक आजी. मुगाचे, शेंगदाण्याचे लाडु ५ पैश्याला एक असा विकत असत. मी स्वतः पाच पैश्याचा लाडु खाल्ला आहे.
मालवणी भाषेत वेळ म्हणजे समुद्र किनारा.
पुर्वी मालवणात पक्षी वैगरे बघितल्याचे आठवत नाहीत, पण राजकोटात उंचावरुन हाडे खडकावर टाकुन फ़ोडणारे पक्षी बघितले होते. आता माझ्या आत्याच्या अंगणात भारद्वाज आणि हॉर्नबील्सचा नुसता धिंगाणा चाललेला असतो.
अलिकडे चितमपल्लींच्या पुस्तकात मालवणात भरपुर हुदाळे म्हणजे ओटर्स असल्याचे वाचले. मला कधीहि ते दिसले नाहीत. डॉल्फ़िन्सहि दिसले नाहीत. पण तेहि आहेत असे वाचले.


Ashwini
Wednesday, November 08, 2006 - 9:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, मस्त लिहिलय. कोकण, समुद्र, भाताची पेज ही सगळी वर्णनं पहिल्यांदा तुंबाडचे खोतमध्ये वाचली होती. मोठं होताना, तिथे प्रत्यक्ष वावरणं हा एक निराळाच अनुभव असेल नाही का?
छान वाटलं वाचून.


Bhramar_vihar
Wednesday, November 08, 2006 - 11:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, अप्रतिम. ... निज शैशवास जपणे ते हेच!

Mrdmahesh
Thursday, November 09, 2006 - 1:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश,
भारी डीटेल वर्णन केलंत हां. सगला डोल्यासमोर उभा रवला. तुमचो बालपण थंय कसो गेला असतला ह्येची एक झलक बगूक मेळली. बाकी तुमी कोकणातली मंडळी भारी लकीच हां :-). कोकणाचा असाच कायतरी अजून असतला तर लिवा. वाचूक छान वाटता.. :-)


Dineshvs
Thursday, November 09, 2006 - 4:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मालवणमधे घराना कुंपण म्हणुन गडगे असायचे. हा शब्द कदाचित खुप जणाना कळणार नाही. गडगा म्हणजे वेगवेगळे दगड नुसते एकावर एक रचुन केलेली भिंत. सहसा तो कोसळायचा नाही. पण कोसळला तरी परत लगेच रचता यायचा. ( आंध्रमधे कडप्पा नावाच्या गावाजाव्ळ कडप्पाचे मोठे मोठे तुकडेच कुंपण म्हणुन वापरलेले असतात तर राजस्थान राजसमंदी भागात संगमरवरांचे छोटे छोटे तुकडे एकावर एक रचुन कुंपण केलेले असते. )
गडग्यातुन साप निघणे हि तर नित्याचीच बाब. त्या गडग्यात फटी असायच्या आणि त्यात सापाना लपायला चांगली जागा मिळायची. त्याची वळवळणारी शेपटी धरुन त्याला ओढणारे बहद्दर तिथे असत. मला मात्र त्या गडग्यातली काडी सुद्धा सापाच्या शेपटीसारखीच दिसे.
तिथले बहुतेक घरे चिर्‍यांची. चिर्‍याच्या खाणी तिथे आहेतच. हा चिरा दगड बांधकामासाठी आदर्श आहे. हव्या त्या आकारात तो कपता येतो सच्छिद्र असल्याने, फारसा तापत नाही, आंइ मुळचाच सुंदर रंग आणि दीझाईन असल्याने, गिलावा नाही केला तरी चालतो. मालाव्णातल्या बहुतेक घरांचे स्वरुप असेच असे. निदान समोर तरी पडवी आणि त्यात झोपाळा असायचाच.
शक्यतो घराला लागुन बाव म्हणजे विहिर असायचीच. मालवणात पाणी अगदी मचुळ. ( चारी बाजुनी समुद्राने वेढलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यातच तेवढे गोड पाणी आहे. ) त्या पाण्याने माझी तहान अजिबात भागायची नाही. मग अगदी जेवायची ताटे वाढली कि, काका तिथुन घागर भरुन पाणी आणत असत. ते पाणी मात्र थंडगार लागत असे.

बहुतेक घरात चाफ्याचे झाड असे. सकाळी सडा सारवण झाले कि त्या फुलांची सुंदर रांगोळी काढली जात असे. पिवळी कण्हेर म्हणजे गोविंदवृक्षहि घरोघर असायचा. त्याच्या बिटक्या मुलीना खेळायला मिळत असत.

घराच्या आजुबाजुला माडाची म्हणजे नारळाची झाडे नाहीत, असे घरच नसायचे. काकाना मुड आला तर आम्हा सगळ्याना शेळी म्हणजे शहाळी मिळायची. तरी लोकाना वाटतो तितका नारळाचा अतिवापर मालवणी जेवणात नसतो, तसेच आता हॉटेलमधे मिळते तसे मालवणी जेवण तिखटजाळहि नसते. धाकट्या काकिची सोलकढी तर फारच सुंदर होत असे. त्यासाठी ती नारळहि निवडुन घेत असे. ताज्या नारळाची हि सोलकढी दोन्ही वेळा ताजीच करावी लागे, कारण ती टिकत नसे.
क्वचित वादळ झाले तर माडाची झाडे अंगात आल्यासारखी घुमत असत. झावळ्या पडणे नित्याचेच पण कधीकधी माडहि पडत असत. एकदा माड पडला किंवा त्याचा शेंडा जरी पडला तर ते झाड पार्त वाढत नाहि. पण त्याच्या शेंड्याकडचा कवळा भाग मात्र चवीला अप्रतिम लागतो. बराचसा ओल्या खोबर्‍यासारखा पण जरा करकरीत अशी चव असते. ज्यानी तो खाल्लाय त्यानाच हि चव कळेल.

आजीला आवडायची म्हणुन आम्ही मुंबईहुन सुतरफेणी नेत असु. आजी अगदी प्रत्येकाचा वाटा काढायची. अगदी एक तुकडा का होईना, पण प्रत्येकाला तो मिळावा यावर तिचा कटाक्ष असे. माझ्या आजीनी अजोबानंतर जेवनघरातुन निवुत्ति घेतली. पण त्यांच्यामागे ती २८ वर्षे जगली. तरी घरावर तिचा वचक असायचा. एवढे मोठे घर तिच्या नजरेखाली नांदते असायचे.

त्याकाळी मालवणात कुठलाहि समारंभ लाऊडस्पीकरशिवाय पुर्ण होत नसे, मग ते बारसं असो कि तेरावं. अगदी मोठमोठ्याने गाणी लावली जात. कुणालाहि त्यात काहि वावगे वाटत नसे.

मेढ्यात जायच्या वाटेवर एक जुने देऊळ लागे. बहुतेक रामाचे होते ते. तिथे किर्तन वैगरे चालु असत. पण त्यावेळी किर्तनाकडे कुचेष्टेने बघत असत. राजापुरमधे जसे मुसलमान दिसत, तसे मालवणात दिसत नसत. मालवणातले क्रिश्चन लोकहि वेगळे भासत नसत. ज्याला आम्ही परश्या म्हणत असु त्याचे नाव फ़्रांसिस आहे आणि जिला आम्ही पेमला म्हणत असु तिचे नाव पामेला आहे, हे मला बर्‍याच ऊशीरा कळले.

मालवणातुन निघताना हमखास सुक्या बांगड्यांची खरेदी होत असे. केरसुण्या, कोकमे यांची पण भेट असे. काजुगर आणि खाजा, हवाच. पण परतीचा प्रवास तर माझ्यासाठी संकटच असे. एकतर दुपारचा प्रवास शिवाय यावेळी फोंडा घाट चढायचा असे. परत एकदा रंकाळा दिसायला लागला कि मला हायसे वाटे.

दोस्तानो, या सगळ्या आठवणी किमान तीस वर्षांपुर्वीच्या आहीत. काक्या, आत्या आता म्हातार्‍या झाल्यात. तरिही मला तिकडे येण्याचा आग्रह होत असतो. मला खात्री आहे, मी गेलो तर परत त्या सगळ्या थकल्या हातानी माझ्यासाठी पक्वान्ने रांधतील. आणि माझ्या तोंडावरुन त्यांचा सुरकुतलेला हात फ़िरवतील.
समाप्त


Bhramar_vihar
Thursday, November 09, 2006 - 5:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मालवणि भाषा ही हर एक ठीकाणी बदलते हे खरय. मालवण ते सावंतवाडी पर्यंत बघ!. मालवण कडली, ज्याला खालाटपट्टा म्हणतात, तिथे जास्त हेल काढुन बोलल्ली जाते.

Lopamudraa
Thursday, November 09, 2006 - 6:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुप खुप सुंदर सफ़र.. मी कोकण अजुन नकाशातच बघितलय एकदा.. फ़क्त अलिबाग.. आक्क्षी पालव पर्यन्त जाउन आलेय..,
आणि या भारत भेटीत पहिल्यानदाच कोल्हापुर पाहीले....
अजुन लिहा..


Shivam
Thursday, November 09, 2006 - 6:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, खुप सुंदर लिहिलंत. या वर्षी गणपतीमध्ये मी मालवणला घालवलेल्या ३ दिवसांमधील काही आठवणींना उजाळा दिलात.
तुम्ही वापरलेली भाषा अन काही शब्द यावरुन एक गोष्ट लक्षात येते, कि तुमच्यावर मालवण पेक्षा कोल्हापुरचाच प्रभाव जास्त आहे. :-) तुम्ही वापरलेले काही शब्द जर विश्लेषण केलं नसतंत तर मालवणकरांना समजलेही नसते.
मीही कोल्हापुरीच. तेव्हा यावरही थोडसं येऊदेत. :-)


Srk
Thursday, November 09, 2006 - 9:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी सुद्धा कोकण नकाशातच पाहिलय फक्त. पण 'सारे प्रवासी घडीचे' आणखी कोकणी पार्श्वभुमी असलेली काही थोडी पुस्तकं आणि मचिंद्र कांबळींची नाटकं यातुनच कोकणचा मजा घेतलाय. दिनेश तुमच्या आठवणी वाचल्यावर मात्र आत्ताच्या आत्ता तिकडे जावसं वाटतय. मालवणी भाषेची गंमत काही औरच! दूरदर्शनवर अनंत जोग,विक्रम गोखले, रोहिणी हट्टंगडी अभिनीत कुछ खोया कुछ पाया' सिरीयल येत असे. ती मंगेशकर कुटुंबियांनी बनविली होती. ती कुठच्या कादंबरीवर आधारीत होती ते कुणाला आठवतय का?

Swaatee_ambole
Thursday, November 09, 2006 - 10:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गो. नी. दांच्या ' पडघवली' वर आधारित होती ती.

Dineshvs
Thursday, November 09, 2006 - 11:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिवन, असणारच मलकापुर आजोळ ना.
Srk त्या मालिकेची चर्चा झाली होती. त्यात स्मिता जयकर, सीमा पोंक्षे, सुमन धर्माधिकारी पण होते. तसेच माधव वझे म्हणजे श्यामची आई, सिनेमात श्यामची भुमिका केलेले कलाकारहि होते.
आता सिंधुदुर्ग जिल्हा, पर्यटकांसाठी सज्ज झालाय. अनेक सोयी झाल्यात. मुंबईकडे नोकरीसाठी धाव घेण्याचा जमाना मागे पडलाय. तिथल्या तरुणानी, तिथेच उद्योग सुरु केले आहेत. केरळलाहि स्पर्धा करायची मनीषा आहे, त्यांची.
आरामदायी बसेस आहेतच, शिवाय रेल्वेमुळे प्रवास सुखकरहि झालाय. पावसाळ्यात कोकण रेल्वेचा प्रवास, खुपच आनंदायी ठरतो.
नुसतीच मोठी गावे न बघता, जरा आतमधे गेलात तर काहि अनोखे किनारे आणि मनोरम निसर्ग अनुभवता येईल.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators