|
Milya
| |
| Sunday, September 03, 2006 - 5:49 am: |
| 
|
खड्ड्याधीन आहे शहरी!!! ... एक पथ(?)नाट्य पडदा उघडतो आणि सुत्रधार सांगु लागतो सुत्रधार : पुण्यनगरीत एकच खळबळ माजली आहे.... सगळीकडे एकच चर्चा (चर्चा आणि मोर्चा [घराकडे मोर्चा वळविणे ह्या अर्थी] हे पुणेकरांचे जन्मसिद्ध हक्क आहेत)...कोथरुड असो की कात्रज, मुंढवा असो की कोंढवा, हिंजवडी असो की हडपसर (नाव कसे सार्थ आहे नाही? हाडं पसर). बीपीओ म्हणू नका, आय.टी. (आयती पगार देते ती आयटी) म्हणू नका की सरकारी ऑफ़िसेस म्हणू नका सगळीकडे एकच बातमी लोक चघळत आहेत. पुण्यातील एका अग्रगण्य दैनिकाने पुरातत्व खात्याच्या मदतीने एक शोध लावला आहे... तळजाई ते कात्रज असा एक पेशवेकालीन रस्ता सापडवून त्यांनी मनपाचा अगदी कात्रज केला आहे. प्रवेश पहिला पुण्याचे प्रशासनही खडबडुन जागे झाले आहे... अमात्य श्री बधीर ह्यांनी तातडीने सर्व सरदार, भालदार, चोपदार, सेवक ह्या सर्वांची बैठक बोलावली आहे. अमात्यांना गहन प्रश्ण पडला आहे की अशी आगळीक झालीच कशी? खड्डा नसलेला एक रस्ता पुण्यनगरीत सापडतो म्हणजे काय? मिठाई खाउनदेखील असला अक्षम्य गुन्हा? त्यांना कुठे तोंड दाखवायला जागा उरली नाहीये. कुठल्यातरी खड्ड्यात जाउन लपावे असे त्यांना वाटु लागले आहे. आता ह्या समस्येतून मार्ग कसा काढावा खड्डा कसा खोदावा ह्याचा विचार ते करु लागले आहेत. तातडीने त्या भागातील खड्ड्यांची काळजी वहाणारे मुकादम खडीवाले आणि अभियंता श्री कुदळे ह्यांना बोलावणे धाडतात. अमात्य : खडीवाले मी हे काय ऐकतोय? खडीवाले : (तोंडातल्या गुटख्याच्या पिंकेने बाजुच्याच गालिच्यावर नक्षीकाम करत) काय ऐकता आहात? अमात्य : अहो मी तुम्हाला विचारतोय? मी ऐकले ते खरे का? खडीवाले : (त्याच मख्ख चेहर्याने पुन्हा एक पिंक टाकत) आता साह्येब मला वो काय माहिती तुम्ही काय ऐकले.. आम्हाला थोडाच ठेकेदाराकडुन mp3 प्लेयर असलेला लेटेश्ट मोबाईल मिळाला आहे? त्यावर तुम्ही काय ऐकता? काय ऐकले न ऐकल्यासारखे करता... आम्हाला काय ठावं? (मोबाईल आणि बाईलही.. हळुच पुटपुटतो.. तरी सर्वांना ऐकु जातेच) अमात्य : (गडबडुन) बरं बरं!!! काय वाटेल ते काय बोलता? तुमच्या जिभेला काही हाड? खडीवाले : साह्येब तेवड्ये हाड सोडुन बोला...कालच माझी 'होंडा शिटी' खड्ड्यातून जाताना मध्येच एक सरळ रस्ता आला त्यात अडकली आणि माझे कंबरेचे हाड मोडलेय बगा. अजुन दुखतेय..... हा नक्कीच त्या डांबर्याचा डांबरटपणा असणार बगा... त्याचाच एरीया होता बगा अमात्य : त्या डांबर्यांकडे मी नंतर बघुन घेईन.. आधी तुमच्या एरीआत म्हणे एक अख्खा खड्डाहीन रस्ता सापडला हे खरे आहे का ते सांगा? खडीवाले : (ओशाळवाणे हसत) आता साह्येब... तेवढ्यात कुदळे तोंड उघडतात कुदळे : साहेब मी सांगू का? अमात्य : (रागाने) अहो सांगा की. उघडा की थोबाड.. मगाचपासुन नुसते भूत बघितल्यागत चेहरा करुन उभे आहात कुदळे : (महत्प्रयासाने बोलु लागतात) साहेब अहो मी तिकडूनच येतोय... असला गुळगुळीत रस्ता आहे ना| की मी, तोंडघशीच पडलो. पूर्ण जबडा दुखतोय बघा बोलताना.... साहेब एकवेळ तुम्ही भूत पाहिले असेल पण असला रस्ता कधी पाहिला नसेल पुण्यात.. अमात्य : अहो मग तोंड वर करुन काय सांगताय? कुदळे : साहेब जबडा दुखतोय ना.. म्हणुन तोंड वर करावे लागतेय बोलताना अमात्य : (वैतागुन)... म . न . पा . च्या शाळेत शिकलात का हो तुम्ही?.. अहो जरा जनाची नाही तर मनाची बाळगा... खाल्या 'मिठाई'ला तरी जागा म्हणतो मी!!! कुदळे : अहो साहेब तोच तर प्रॉब्लेम झाला ना. मिठाई खायला न मिळाल्यानेच घोटाळा झाला हा.. अमात्य : म्हणजे? आणि घोटाळा शब्द वापरु नका. आसपास पत्रकार असले म्हणजे? सुतावरुन स्वर्ग गाठतात लेकाचे खडीवाले : साह्येब तुम्हाला string operation म्हणायचेय काय? मग तसं बोला ना सरळ. अमात्य : (डोक्याला हात लावतात) कुदळे तुम्ही बोला... कुदळे : साहेब त्याचे काय आहे?... हा रस्ता आहे ना तो कुणी कंत्राटदाराने पेशवेकाळात बांधला.. आता तो आम्हाला मिठाई कशी देणार सांगा? त्याच्याकडुन मिठाई घ्यायची म्हणजे आम्हालापण..... ('वर' बघतात आणि हसायचा प्रयत्न करतात पण कळवळल्यापलीकडे काही करु शकत नाहीत) मिठाई नाही मिळाली तर मग आम्ही तिकडे देखरेखीसाठी फ़िरकणार तरी कसे ना? तुम्हीच सांगा... त्यातून तिकडे लोकांची वहिवाट नसल्याने अशी वाट लागली बघा... अमात्य : ओके.. पण ठेकेदारांना जवाब मला द्यावा लागतो त्याचे काय? काय सांगू त्यांना मी? मी काय सर्वेसर्वा नाही. माझीही काही जबाबदारी आहे. मी ही बांधिल आहे कुणालातरी उत्तर द्यायला. कुदळे : साहेब एवढे एक वेळ संभाळुन न्या की... परत असे नाही होणार अमात्य : बर बर बघतो... रात्री बंगल्यावर एक मिठाईचे बॉक्स पाठवुन द्या म्हणजे झाले.. च्यायला घोळ तुम्ही करायचा आणि निस्तरायचा आम्ही.. बर आता ह्यावर उपाय काय करणार ते बोला? कुदळे : हे काय आत्ता जातो साहेब मुकादम, मजुर आणि हत्यारे घेउन आणि खोदकामास सुरुवात करतो बघा.. चार दिवसात नाही तळजाईचा तळ गाठला तर नावाचा कुदळे नाही अमात्य : थीक आहे. जा कामाला लागा... बैठक संपते -------- प्रवेश दुसरा इकडे पंतप्रधान बाईसाहेबा, श्रीमती संध्या भुवन ह्यांना रजनीलाच आपले रात्रीलाच ही बातमी कळल्याने त्यांचा रात्रभर डोळ्याला डोळा लागला नसतो.. अख्या 'त्रिभुवना'त पुण्याची आणि त्यांची नाचक्की होते आहे, लोकं भयंकर संतापली आहेत, 'त्या' रस्त्यावरचेच डांबर त्यांनी फ़ासायला आणले आहे, अशी भितीदायक स्वप्ने त्यांना पडत असतात.. आणि सारखे पोटात खड्डा पडल्यासारखे वाटत असते. त्यामुळे सकाळी उठल्याउठल्या, विटकरीचे तुकडे वापरुन खड्डे जसे वरवर बुजवतात तसा थोडासा ज्यूस, काही फ़ळे आणि सुकामेवा अशी हलकी न्याहारी करुन त्या पोटातला खळगा वरवर भरतात आणि म . न . पा . कार्यालयाकडे कूच करतात तिकडे सगळे मंत्रीमंडळ त्यांची वाटच पहात आहे.. पंतप्रधान साहिबा(पं.प्र.सा) : तुम्हाला माहिती आहेच आज एक मोठी गंभिर समस्या आपल्यापुढे आ ऽ ऽ वासुन उभी... खरेतर आडवी आहे. आपण सर्वांनी मिळुन तिला तोंड दिले पाहिजे.. विरोधक संधीचा फ़ायदा घ्यायला टपलेलेच आहेत. ह्या रस्त्याचा दोर करुन ते म . न . पा . चा रस्ता कधी चढतील आणि आपल्याला बाहेरचा रस्ता कधी दाखवतील हे समजणार सुद्धा नाही.. तेव्हा ही समस्या कशी सोडवायची ह्यावर चर्चा करण्यासाठी ही बैठ्क बोलाविली आहे. (एवढ्यात सहाय्यक त्यांच्याकडे एक प्रिंट्-आऊट आणुन देतो. वाचुन एकदम गंभीर होतात..) पं.प्र. सा. : बघितलेत?!!! काल रस्ता सापडला नाही तर लागले लोक आज बोलायला.. आमच्याविरुद्ध लिहायची कुठल्या वर्तमानपत्रात हिंम्मत नव्हती पण हे इंटरनेट आल्यापासुन जो तो उठतो तो ताळतंत्र सोडून लिहायला लागतो... म्हणजे ह्यांच्यासाठी आम्ही उद्योग पुण्यात आणायचे आणि ह्यांनी ऑफ़िसमध्ये बसुन हे असले उद्योग करायचे... वाचा!!! वाचा ही कविता. काय मुक्ताफ़ळे झोडली आहेत बघा... एक आडवा न उभा खड्डा काय? पडत्यात काय? खड्ड्यात कुणी कधी पडते का? किती उपहासाने लिहायचे म्हणते मी कविता वाचुन सर्वच गंभीर होतात पं. प्र. सा. : ते काही नाही ह्या लिहिणार्याला मी नंतर बघते. आधी मला ह्या रस्त्यावर काय उपाय करायचा ते सांगा. माझी बुद्धी अगदी काम देईनाशी झाली आहे (बुद्धी असेल तर काम देणार ना? असंतुष्ट मंत्र्याचा आवाज) पहिला मंत्री : माझे आत्ताच अमांत्यांशी बोलणे झाले आहे. त्यांनी तातडीने खोदकाम सुरु केले आहे. पं. प्र. सा. : ते ठीक आहे हो. पण 'बुंदसे गयी वोह हौद से नही आती' माहिती आहे ना?... उन्हाळ्यात प्यायला पाणी नाही मग पावसाळ्यात पूर येईल तेव्हा प्या असे सांगुन चालत नाही.. नुस्ता रस्ता खोदुन भागणार नाही. लोक आता आंदोलने करतील, पेपरात लिहितील. त्यांना शांत कसे करायचे? दुसरा मंत्री : (सुडोकुतून डोके वर काढत. हे महोदय जेव्हा पहावे तेव्हा सुडोकु घेउन बसलेले असतात)एक उपाय आहे. संमती असेल तर सांगतो.. पं. प्र. सा. : अहो संमती कसली घेताय इथे माझी मति कुंठित झालीय.. सांगा लवकर दु. मं. : अहो जे आपण दिल्लीत वापरले तेच गल्लीतही वापारायचे.. ह्याला त्यागाचे राजकारण म्हणत्यात (मंत्री महोदयांना मधुनच गावरान मराठी बोलायची खोड आहे) पं. प्र. सा. : हे बघा असे कोड्यात बोलु नका.. तुमचे ते सुडोकु इथे नको.. डोकु आपलं डोके चालेनासे झालेय अगदी. तेव्हा नीट, सपष्ट, सुद्ध मराठीत सांगा दु. मं : (महत्व मिळाल्याने खुशीत येत) अगदी शुद्ध मराठीत सांगतो.. अहो दिल्लीला आपल्या म्याडमने नाही का रेझिगनेशन दिले होते मागे... तसेच तुम्ही पण रेझिगनेशन द्या पं. प्र. सा. : (रागावुन) तोंड संभाळुन बोला!! माझा राजिनामा मागताय? तुम्हाला वाटलेच कसे मी राजी होईन म्हणुन? दु. मं : अहो म्याडम जरा नीट ऐकुन तर घ्या... आता विरोधक तुम्हाला सळो की पळो करुन सोडतील. तुमचा राजिनामा मागतील, काम रोखुन धरतील, मिठाईतला वाटा वाढवुन मागतील.. त्यांची तोंडे बंद करायला हा एकच उपाय आहे.. त्यांनी राजिनामा मागायच्या आधीच तुम्हीच घोषाणा करा चार दिवसात रस्ता नाही उखडला तर राजिनामा देईन म्हणुन... पं. प्र. सा. : अहो पण चार दिवसांनी खरेच राजिनामा द्यायला लागला म्हणजे? दु. मं. : अहो असे होणारच नाही.. आपला जाहिरनामा खरा असतो का? तसेच हा राजिनामा.. नुसती घोषणा करायची राजिनामा देणार आणि नंतर नामानिराळे व्हायचे... चार दिवसात खोदकाम पूर्ण होईलच तोपर्यंत विरोधकांनाही आपण शांत करु.. वाटल्यास पूरग्रस्तांना वाटायला जी मदत आलीय केंद्राकडुन त्यात त्यांनाही वाटा देउन टाकु? पं. प्र. सा. : हा हे एकदम बेस्ट आहे... सेक्रेटरी एक छानसे राजिनामापत्र लिहुन आणा बघु... दु. मं : (हळुच) पण तेवढे माझे मागणे लक्षात ठेवा.. तुमचा कार्यकाल संपला की माझी शिफ़ारस करण्याचे.. पं. प्र. सा. : अगदी बिनघोर रहा. हा रस्त्याचा प्रश्ण सोडवायला राजेसाहेब स्वत: जातीने येत आहेत संध्याकाळी. त्यांच्या कानावर घालिन मी हे, संध्याकाळच्या बैठकीत. ----------------------------------- प्रवेश तिसरा लोकांचा क्षोभ वाढत आहे... वर्षानुवर्षे खड्यातून प्रवास करुन त्यांना त्याची इतकी सवय झाली आहे की सरळ रस्त्यातून गाडी चालविणे अगदी अशक्या झाले आहे त्यांना.. इतकी सवय झालीय की त्यांनी घरीसुद्धा खास जमिनीला उंचसखलपणा देणारी खास कार्पेट्स अंथरुन घेतली आहेत. कित्येक multI national कंपन्यांनी आपल्या ऑफ़िसमध्येही तशीच व्यवस्था केली आहे. (ही कार्पेट्स बनवण्याचा कारखाना अर्थातच एका नेत्याच्या मेहुण्याचा आहे) पुण्यात असेच अजुन रस्ते सापडले किंवा खड्डे बुजले गेले, तर काय? ह्या विचाराने लोक हवालदिल झाले आहेत.. इकडे पुण्यातील हाडवैद्यांना मात्र आनंदाची उकळी फ़ुटली आहे.. असेच अजुन काही सरळ रस्ते सापडले तर त्यांच्या धंद्याला बरकत येणार असल्याने ते रस्त्यांना पाठींबा देण्यासाठी सरळ खड्यांमध्ये उतरले आहेत मोर्चा घेउन.. त्यांचे नेतृत्व हाडाचे हाडवैद्य असलेले Dr. हाडलावे करत आहेत म . न . पा . चे ठेकेदारही गप्प बसलेले नाहीयेत.. असेच सगळीकडे रस्ते दिसु लागले तर त्यांचा पोटापाण्याचा मार्गच बंद व्हायचा अशी भिती त्यांना वाटू लागली आहे. त्यामुळे तेही खड्ड्यात उतरले आहेत... पुण्यातले सगळेच खड्डे आज गजबजुन गेले आहेत... इकडे बाहेर असा गदारोळ सुरु असतानाच राजेसाहेबांच्या बंगल्यावर त्यांचा दरबार भरला आहे. राजेसाहेब 'च. ल. दाढीकर' स्वत:ची दाढी कुरवाळत चिंतातुर चेहर्याने बसले आहेत पं.प्र.सा. आणि इतर निवडक मंत्री हजर आहेत राजेसाहेब (रा. सा.): आज सकाळीच मला सेक्रेटरींनी बातमी वाचुन दाखविली. ऐकुन मला सांस्कृतिक धक्काच बसला (पुण्यातला धक्का सुद्धा सांस्कृतिक असतो.).. संध्याबाई, तुम्हाला पुण्याचे पंतप्रधानपद देउन आम्ही दिल्लीला गेलो ते ह्याच साठी? आता तुम्हीच सांगा हे आमचे खायचे आपले खेळायचे दिवस आहेत ना.. मग? आम्ही फ़ेस्टीवल कडे लक्ष द्यायचे का खड्ड्यांकडे? असेच जागोजागी रस्ते दिसु लागले तर पुण्यात उद्योग कसे येणार? अहो लोकांना आश्वासन दिल्याप्रमाणे आपण अख्खे पुणे खड्डामय केले की नाही. अगदी धावपट्टी सुद्धा सोडली नाही मग हे नविन काय? अगदी माझ्या गल्लीत सुद्धा मागच्या वर्षी मी आलेलो तेव्हा ६९३ खड्डे होते. आज फ़क्त ६९२ पूर्णांक तीन चतुर्थांश खड्डे आहेत... हे कसे? आम्ही जनतेचे सेवक आहोत. त्यांना काय उत्तर द्यायचे आम्ही? पं.प्र.सा. : महाराज काळजी नसावी... ह्यावर उपाय आहे. (कानात हळुच राजिनाम्याविषयी सांगतात) रा. सा. : वा वा आमच्या तालमीत चांगल्या तयार झाला आहात की... वा वा.. (खुषीने दाढी कुरवाळु लागतात) मॅडम एवढ्याने भागणार नाही. अजुन एक काम करा. 'ढुंढते रह जाओगे' योजना जाहिर करा आणि लोकांना सांगा की 'सरळ रस्ता कळवा आणि पन्नास हजार रुपये मिळवा' ही बघा आजच ही कविता नेटवर मिळाली आहे.. तुमच्या नावाने हिची पत्रके काढुन सगळीकडे वाटा. म्हणावे जिथे जिथे रस्ता दिसेल तिथे तिथे, मी (म्हणजे तुम्ही संध्याबाई) जातीने हजर राहिन खोदण्यासाठी. आणि मी (म्हणजे तुम्ही संध्याबाई) स्वत: प्रयत्न करेन रस्ते शोधण्याचा. घ्या छापा ही कविता
सेक्रेटरी आता नीट काळजीपूर्वक लिहुन घ्या.. "Elephant God Festival" ची वेळ साधुन "खड्ड्यात्मका खड्डेश्वरा" ही दहा कलमी योजना जाहीर करा १. पुण्याचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेउन काही अतिशय जुन्या खड्ड्यांना आम्ही ऐतिहासिक नावे देऊन जतन करण्याचे ठरवले आहे... शनिवारवाड्याच्या शेजारी त्याच्याएवढाच मोठ्ठा असा जो खड्डा आहे त्याचे नामकरण 'पहिला बाजिराव खड्डा' असे करा आणि मुख्यमंत्री महोदयांना उद्घाटनाला बोलवा...तसेच ह्याच खड्ड्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचा एक जलतरण तलाव, 'मस्तानी तलाव' ह्या नावाने बांधण्यात येईल अशी घोषणा करा.. २. विमानतळाशेजारी जो खड्डा आहे तो बराच खोल आहे.. त्याचे नामकरण 'दुसरा बाजिराव खड्डा' असे करा आणि येरवडा जेल मधल्या सर्व कैद्यांना तिकडे शिफ़्ट करा.. तो इतका खोल आहे की कुणीच पळुन जाऊ शकणार नाही आणि जेलमुळे फ़ुकटची अडलेली मोक्याची जागा बिल्डर लोकांना विकता पण येईल. ३. सिंहगड रस्त्यावरील मोठ्ठ्या खड्याला 'तानाजी मालसुरे खड्डा' नाव द्या. तो खड्डा N.D.A. ला त्यांच्या cadets ना अवघड असे प्रशिक्षण द्यायचे असेल तर उपयोगी पडेल इतका विविधतेने नटलेला आहे ४. स्वारगेट चौकातील खड्ड्याला 'स्व. राजीव गांधी खड्डा' असे नाव द्या. तिथे आंतरराष्ट्रीय मोटोक्रॉस स्पर्धेचे आयोजन करता येईल ५. लालमहाला जवळच्या खड्ड्याला 'दादोजी कोंडदेव खड्डा' असे नाव द्या.. त्यात तरुणांसाठी घोडेस्वारी प्रशिक्षण केंद्र सुरु करता येईल... माझ्या मेहुणीच्या चुलत दिराच्या साडुकडे भरपूर घोडे आहेत. त्याला ते केंद्र चालवायला देता येईल. ६. खराडी येथला खड्डा अजुन थोडा खोदायची गरज आहे. तिथे चांगली खाण तयार होईल... न जाणो तिथे जर हिरे सापडले तर सगळ्यांचीच चांदी होईल. ७. कुदळी, फ़ावडे, पहारी अश्या हत्यांरांच्या कारखान्यांना अनुदान मिळावे म्हणुन मी सरकार दरबारी प्रयत्न करीन असे अश्वासन द्या. (खासगीत - कुणाकुणाला आपल्या नातेवाईकाच्याअ नावे कारखाने काढायचे आहेत त्यांनी मला नंतर भेटा) ८. काही काही खड्डे इतके लांब, रुंद आहेत की त्यांच्यावर पूल बांधायची गरज आहे. त्यासाठी निविदा मागविण्यात याव्यात. म्हणजे जनतेची (आणि आपलीही) चांगली 'सोय' होईल ९. काही काही खोल खड्डे आतुन एकमेकांशी छान जोडले गेले आहेत. त्यांचा अभ्यास करुन त्यामधुन मेट्रो चालु करण्यात येईल असे जाहीर करा १०. पुण्यातल्या टेकड्यांवरची झाडे बिल्डर लोकांनी नष्ट केल्याने प्रेमी युगुलांची फ़ार पंचाईत झाली आहे. पण काही खड्डे असे आहेत की ज्यांच्यामध्ये झाडे उगविली आहेत. अश्या खड्ड्यांना develop करुन छानशी उद्याने तयार करा.. त्या बागांना अनुक्रमे म. गांधीं पासुन सुरुवात करुन, पं . नेहरु, इंदिरा गांधी, राजिव गांधी उद्यान अशी नावे द्या.. त्यातुन उद्याने उरलीच तर संजय गांधी, डॉ . बाबासाहेब आंबेडकर ही नावे वापरा... चुकुनही सावरकर, टिळक, भगतसिंग ह्या नावांचा उल्लेख नको. अश्या रितीने सर्व योजना कागदावर जाहीर झाल्या. जनता नेहमीप्रमाणेच भुलली... नेत्यांच्या सोयीच्या काही योजना आमलात आणायला सुरुवात झाली. सुरुवातीला जनतेने आवाज उठविला, मोर्चे काढले, वर्तमानपत्रात लिहिले, कुणी विनोदी लिहिले तर कुणी गंभीर, कुणी चिमटे काढले तर कुणी ताशेरे ओढले. पण हळुहळु जनता सर्व विसरुन गेली. अंधेर नगरी परत चाचपडत, अडखळत खड्ड्यातुन रोजचा दिनक्रम करु लागली आणि चौपट राजेसाहेबही आपल्या विमानात बसुन एका शिष्टमंडळासोबत परदेशी निघुन गेले. ---------- पदडा पडतो --------------- पाठीमागे सुत्रधार जनतेचे गार्हाणे गाऊ लागतो चाल : पराधीन आहे जगती दर वर्षी खड्डे पडता, दोष पावसाचा खड्ड्याधीन आहे शहरी, पुत्र हा पुण्याचा दोष पावसाचा || माय म . न . पा . ना दोषी, ना दोषि लोकराजा खड्यामधुन ऑफ़िसयात्रा करे नित्य प्रजा खेळ चालला से आमच्या, शूद्र ह्या जीवाचा खड्ड्याधीन आहे शहरी, पुत्र हा पुण्याचा || अंत उन्नतीचा पतनी, होई ह्या पुण्यात सर्व उद्योगांचा वत्सा, नाश हाच अंत खोदण्यार्थ रस्ता बनतो, नेम म . न . पा . चा खड्ड्याधीन आहे शहरी, पुत्र हा पुण्याचा || रस्त्यासवे जन्मे खड्डा, जोड जन्मजात दिसे भासते ते सारे, मार्ग नाशवंत काय शोक करीसी वेड्या, मोडक्या हाडांचा खड्ड्याधीन आहे शहरी, पुत्र हा पुण्याचा || कैक स्वर्गवासी झाले, कैक अंथरुणात चोळे मीठ जखमेवरती, राजा अकस्मात 'शरम' कल्पनेशी थांबे, कोश ह्या नेत्यांचा खड्ड्याधीन आहे शहरी, पुत्र हा पुण्याचा || मिठाई न खाता सुटला, कोण प्राणीजात? लाचमुक्त जगला का रे, कुणी म . न . पा . त? ठेकेदार जे जे बोले, तोच मार्ग साचा खड्ड्याधीन आहे शहरी, पुत्र हा पुण्याचा || दोन खंदकांची होते, रस्त्याखाली भेट एक कुदळ तोडी दोघां, पुन्हा नाही गाठ क्षणिक तोचि आहे मजुरा, थर डांबराचा खड्ड्याधीन आहे शहरी, पुत्र हा पुण्याचा || नको आसु ढाळू आता, पूस लोचनास खड्यातून आहे आता रोजचा प्रवास व्यय होतसे रे आपल्या भरलेल्या कराचा खड्ड्याधीन आहे शहरी, पुत्र हा पुण्याचा || नको आग्रहाने तिजला, बोलवूस व्यर्थ खड्डे बुजले घोषित करुनी, झाली ती कृतार्थ राजिनामा नाट्य हे मोठ्ठा, खेळ 'त्रिभुवनी'चा खड्ड्याधीन आहे शहरी, पुत्र हा पुण्याचा || संपल्याविना ही वर्षे, पाच, काम काय? पुण्यास ह्या नाही येणे, 'फ़ेस्टीवल' शिवाय तूच एक भोगी आता, 'खाड्य'संपदेचा खड्ड्याधीन आहे शहरी, पुत्र हा पुण्याचा || पुन्हा नका येऊ कोणी, दूर ह्या पुण्यात उद्योगांना नाही थारा, खड्ड्यांच्या जगात मान वाढला रे लोकी, पुण्यपत्तनाचा खड्ड्याधीन आहे शहरी, पुत्र हा पुण्याचा || ~ मिलिंद छत्रे कॉपी पेस्ट वाल्यांसाठी आग्रहाची, प्रेमाची, अजिजीची सुचना : तुम्हाला ह्यातले काहीही तुमच्या मित्रांना पाठवायचे असेल तर कृपया कॉपी न करता.. ह्या लेखाची लिंक त्यांना फ़ॉरवर्ड करा...
|
Athak
| |
| Sunday, September 03, 2006 - 6:07 am: |
| 
|
मिल्या , एकदम खासच पुण्यातले सगळे कार्पोरेटर्स एमेले एमल्सी एम्पी ला link देऊन काही फायदा नाही , कॉपीच पाठवतो व एक एक खड्डा advance बूक करुन ठेवतो
|
Kiran
| |
| Sunday, September 03, 2006 - 11:58 am: |
| 
|
पुण्यात काय रेट आहे सद्ध्या खड्ड्याचा? milya, खाल्या 'मिठाई'ला तरी जागा म्हणतो मी khaasach !!
|
Paragkan
| |
| Sunday, September 03, 2006 - 9:37 pm: |
| 
|
tooooo much re !
|
जबरी. सही लिहिले आहे.
|
मिल्या, अशक्य लिहिलं आहेस रे.. दोन्ही विडंबने कमाल... बरे झाले खाली तुझे नाव टाकलेस ते.
|
मिल्या, तेरेको यल्ट्याका खड्डाभरा सलाम!
|
Raina
| |
| Monday, September 04, 2006 - 12:22 am: |
| 
|
वा! मस्तं- त्या करीरांना एक प्रत पाठवाच ह्या लेखाची.
|
Himscool
| |
| Monday, September 04, 2006 - 12:34 am: |
| 
|
मिल्या टू गुड... एकालाही सोडलेले नाहीस....
|
Sanurita
| |
| Monday, September 04, 2006 - 1:49 am: |
| 
|
फ़ारच सही मिल्या, आत्तपर्यन्तच्या तुझ्या विड्म्बनात मला वाटते सगळ्यात छान. हे पेपर मध्ये यायलाच पाहिजे.ऽ आणि पूर्ण यायला पाहिजे.
|
Maudee
| |
| Monday, September 04, 2006 - 2:08 am: |
| 
|
अप्रतीम लिहिले आहे मिल्या....
|
Psg
| |
| Monday, September 04, 2006 - 2:26 am: |
| 
|
मिल्या, मस्त! हे छापून येणे शक्य नाही, लाज कोळून प्यायले आहेत सगळे! तू लिहिलेस तसेच होत असेल रोज
|
Meenu
| |
| Monday, September 04, 2006 - 2:49 am: |
| 
|
मिल्या सुंदर रे .. खरच नुसतं नाटक राजीनाम्याचं .. आणी जिथे काम केलय तीथे काय पण quality आहे कामाची वाह वाह
|
Sadda
| |
| Monday, September 04, 2006 - 3:04 am: |
| 
|
मिल्या सहि जबरि लिहिलय.. 
|
Giriraj
| |
| Monday, September 04, 2006 - 3:36 am: |
| 
|
मिल्या,तुला दहा खड्डे सप्रेम बक्षीस रे!
|
Athak
| |
| Monday, September 04, 2006 - 6:14 am: |
| 
|
काय रे गिर्या खड्ड्यांमुळे गांव शहरे ओस पडली म्हणुन का
|
Dineshvs
| |
| Monday, September 04, 2006 - 12:50 pm: |
| 
|
मिल्या, परवा म्हणे बिहारी बाबुने, एका कर नाटकी पुणेरी नेत्याला खड्ड्याबद्दल घरचा आहेर दिला, हि कविता वाचली होती वाटते, बिहारी बाबुने.
|
Moodi
| |
| Monday, September 04, 2006 - 2:51 pm: |
| 
|
मिल्या तुफान रे!! दिनेश अहो घरचा अहेर काय? शालजोडीतले जोडे हाणले म्हणा ना. भले शाबास त्या शत्रुघ्न सिन्हाची.
|
मिल्या सहीच लिहिला आहेस एकालाही सोडला नाहीस..... आत्त पर्यन्तचा सगळ्यात BEST!!!
|
Prajaktad
| |
| Tuesday, September 05, 2006 - 3:42 pm: |
| 
|
मिल्या, the best ! दोन्ही विडंबने झक्कास!
|
|
|