|
सुट्टी या शब्दाइतका स्फूर्तीदायक दुसरा शब्द नसेल. आणि दरवर्षी नेमानं उन्हाळा आणि दिवाळीच्या सुट्टीत धमाल करायचं वय एकदा संपलं की हाच शब्द एकदम nostalgic करून टाकतो. सुट्टी म्हटलं की मला आठवतो आमचा गावातला वाडा. पुढच्या दारात उभं राहून जोरात ओरडलं तरी मागच्या दारातल्याला ऐकू जाणार नाही इतका मोठा जुना पण दणकट. परिक्षा संपली की लगेच पप्पा आम्हाला ३ तासांवर असलेल्या आजोळी न्यायचे. जसजशा परिक्षा संपतील तसतसे आमच्या टोळीचे सभासद (म्हणजे इतर आत्ये, चुलत भावंडं) येऊन दाखल व्हायचे. दिवाळीच्या सुट्टीला फटाक्यांची, फराळाची, पहाटेच्या पणत्या रांगोळ्यांची जोड असायची तर उन्हाळ्यात त्याची जागा घरभर आढी पसरून बसलेले आंबे घ्यायचे. पण बाकी उद्योग सारखेच. आणि तेही कितीतरी. एकतर आईला सुट्टी नसल्याने आम्ही आजीच्या ताब्यात. ती काही सकाळी हाका मारून उठवायला यायची नाही. वर्षभर उठावंच लागतं वगैरे कनवाळू विचार करून. त्यामुळं गच्चीवर अंथरुणं असतील तर उन्हं अगदी अंगावर आली, चादरीतूनही आत पोचून चटके द्यायला लागली की मगच उठणे व्हायचे. मग पप्पा अजून मळ्यात गेले नसतील तर त्यांच्याबरोबर जीपमधे बसून आमच्या स्वार्या मळ्यात निघायच्या पोहायला. बरोबर एखादी आत्या. छोटी मुलं हौदात आणि मोठी विहिरीत. एवढं असूनही मला कित्येक वर्षं पोहता येत नव्हतं. त्यामुळं मी दादा लोकांचं टारगेट. आत्याबाईंचं लक्ष नसलं की पाण्यात बुडवायचे मुंडी दाबून. अर्ध्या मिनिटात प्राण कंठाशी यायचे. तरीही मी पोहायला शिकले ती शाळेच्या swimming team मधे दाखल झाल्यावर. शेतातल्या विहिरी, हौद आपले नुसते डुंबायला. यथेच्छ जलविहार झाल्यावर मळ्यात जे काही काहीही प्रक्रिया न करता पोटात ढकलण्यासारखे असेल त्याचा शोध चालू व्हायचा. डाळिंबं, बोरं, कैर्या, चिंचा, चिकू, ऊस. जे जे मिळेल ते. त्याला मळ्यात रहाण्यार्या गड्यांच्या घरच्या पाट्यावर वाटलेल्या मिठाची जोड असे. या मिठाची चव काही औरच. त्या मिठाला आधी वाटलेल्या मिरची लसणाचा वास असे. कधी उशीर झाला तर याच गड्यांच्या बायका मळ्यातल्याच मक्याची भाकरी आणि काळं तिखट किंवा चटणी खाऊ घालत. त्यांना आम्ही तिथं जेवतो आणि त्यांची मक्याची भाकर खातो हे कौतुक आणि आम्ही तयारच असायचो. परातीच्या कडेपर्यंत थापलेली चुलीवर भाजलेली भाकर. दोघात एक पुरेल इतकी. यथेच्च हुंदडून झाले की मग आम्हाला आठवण होई की पप्पांना शोधून घरी जायची व्यवस्था करायला हवी. घरी पोचल्यावर भूक असेल तर जेवण नाहीतर दुपारचे प्लॅन्स. घरघर नावाचा एक अजब खेळ असतो लहानपणी. एका Theatre workshop मधे improvization चे धडे घेताना मला हा खेळ आठवला. तासन्तास चाले हा खेळ. पप्पांच्या एका मित्राच्या घरी मोठा झोपाळा होता. कधीकधी आम्ही त्याच्यावर बसायला जायचो. आता वाटतं भर दुपारी आमरस खाल्ल्यानंतर जी अनावर झोप येते ती मोडायला येणार्या आमच्यासारख्या बालराक्षसांच्या गॅंगला त्या काकू कधी कशा रागवल्या नाहीत. आणि बर्याचदा त्या झोपलेल्या असतानाही आम्ही बिनदिक्कत खेळत बसायचो. कारण घरच्या दरवाजाला दिवसा आतून कडी लागायचीच नाही गावात. आणि बाहेरून कुलुपही अगदी गावाबिवाला किंवा जत्रेला अगर हुरडापार्टीला जातानाच लागायचे. इतरवेळी थोडी तरी माणसे घरात असायची. गावातल्या गावात जाताना बायका नुसती कडी अडकवून जात. अजूनही त्यात फारसा बदल नसेल झाला. दुपारच्या कार्यक्रमात फारच विविधता असायची. खरंतर आजी, आई, आत्या यांना दुपारी आम्ही थोडे झोपावे असे वाटायचे. पण छे! परिक्षेच्या काळात हातात पुस्तक धरता क्षणी अनावर होणारी दुपारची पेंग सुट्ट्या लागल्या की गायब व्हायची. त्यावेळी एका वर्तमानपत्रात 'होय मी भूत पाहिले आहे' नावाचे एक रोमांचक सदर येई. ते वाचण्यात आणि त्यावर मौलिक विचारमंथन करण्यात बराच वेळ जाई. गावतल्या मैत्रिणी यात अजून गावातल्या तालमीतल्या, पडक्या वाड्यातल्या मसाला गोष्टी सांगून रंगत आणत. हे ऐकायला खूप मजा येई. पण मग दिवसा सुद्धा मधल्या खोल्या ओलांडून सोप्यात किंवा सैपाकघरापर्यंत एकटे जायला भिती वाटे. मधल्या खोल्या sprint मारून ओलांडल्या जात. वर्तमानपत्रं दुकानात म्हणजे हॉलमधे आजोबांच्या टेबलावर असत. तिकडं घराच्या पुढच्या खोलीला by default दुकान म्हणतात. दुकानापलीकडे मधली खोली होती. इथं आजोबांचं कपाट आणि एक पुस्तकांचं मोठं जुनं लाकडी कपाट होतं. आजोबांनी कधीतरी मोफत वाचनालय चालू केलं होतं. त्यातली कपाटभर पुस्तकं उरली होती. बाकीच्यांचं काय झालं आणि वाचनालय कसं लयाला गेलं हे सांगायला नकोच. त्या खोलीला नेहेमीसारख्या खिडक्या नव्हत्या. उंचावर छताच्या थोडं खाली दोन झरोके होते. आणि इतर सगळ्या खोल्यापेक्षा इथं शेतातलं धान्य बिन्य ठेवलेलं असायचं. तिथंच आजोबांची कॉट होती. वामकुक्षीसाठीची. उन्हाळ्यात सुद्धा दगडी बांधकामामुळं गार वाटणार्या त्या खोलीत कॉटवर लोळत, अर्धवट प्रकाशात, लाकडी कपाटातली पानं पिवळी पडलेली कित्येक पुस्तकं वाचत रहाण्यात माझ्या सुट्टीतल्या कैक दुपारी सरल्यात. बाकीच्यांना एक पुस्तक परत केल्याशिवाय दुसरं मिळायचं नाही. पण मला कुठलीही आणि कितीही पुस्तकं घ्यायची full permission होती. आणि त्याचा मी पुरेपूर फायदा उठवत असे. बाबूराव अर्नाळकर, चि. वी. जोशी, गोट्या, चिंगी, साने गुरुजी असे कितीतरी. नावं सुद्धा आठवत नाहीत आता पुस्तकांची. शिवाय वेगवेगळी जुनी मासिकं. सत्यकथा पण असायचं. आणि आजोबांना जोतिषशास्त्राची आवड असल्यानं ग्रहांकितचे अंकही असायचे. पण ग्रहांकित हे काही एकट्यानं वाचायचे पुस्तक नाही. ते वाचून कुणाची भाग्यरेषा किती सरळ वगैरे चर्चा झडत. मग आईशप्पत हिला आयुष्यरेषाच नाहीये. ही जिवंत कशी. असले तंग़डीखेच प्रयोग अर्थातच लहान गटावर उरकून घेण्यात येत. शिवाय आजचे भविष्य या सदरात मोठ्यांचे ऐकले नाही तर दुःखी होण्याचा संभव आहे असले आडाखे सांगून लहांनाना राबवून घेण्याचा प्रयत्न होई. पण बालगटातला एखादा चुणचुणीत जीव ही योजना उधळून सैपाकघरात तक्रार नेई. मग एखादी पोक्तीपुरवती( हा शब्द वापरायचं फार दिवस मनात होतं) येऊन 'हे नाही ते उद्योग कुणी सांगितलेयत? मुलांनी या असल्या गोष्टीत रस घेऊ नये' अशा अर्थाचे काहीतरी ऐकवून जाई. याशिवाय पत्ते, कॅरम हे नेहमीचे उद्योग होतेच. ते पत्ते अगदी फाटके, विटके होऊन जाईपर्यंत आम्ही वापरायचो. खरंतर इतके वापरायचो की नवीन पत्ते एका दिवसात असा फाटका तुटका अवतार धारण करायचे. मग उजवं टोक दुमडलंय ती चौकट दश्शी, मधे निम्मी चीर पडलीय तो किलावर गुलाम, अर्धंच पान उरलंय तो इस्पिक एक्का असं प्रत्येकच पान वेगळं ओळखू यायला लागलं की मग एखाद्या गावातल्या चुलतभावाला नवा कॅट आणण्यासाठी पिटाळण्यात येई. थोडं मोठं झाल्यावर एका चुलतभावाला शोध लागला की कुठल्या तरी संकेतस्थळी पत्ते खेळत बसणारे काही लोक दर चारपाच डावानंतर कॅट बदलतात आणि ते अगदी नव्यासारखे दिसणारे पत्ते फक्त एक रुपयाला मिळतात. वा किती श्रीमंत लोक असतील ते असे वाटायचे. कॅरमच्याही सोंगट्यानी रंग सोडून दिले होते. पांढरी कुठली काळी कुठली हेही ओळखू यायचे नाही. ते पत्तेवाले श्रीमंत लोक कधीकधी कॅरम का नाही खेळत म्हणजे आमची पत्त्यांसारखी सोंगट्यांचीही सोय झाली असती. पण 'न्हाई बाबा पत्ते खूप लोक खेळत्यात पाराबिरांवर बसून पन क्यारम खेळनारं कुनी दिसलं न्हाई' अशी निराशाजनक माहिती मिळाल्यावर मग आम्ही सोंगट्यांवर पेनाने खुणा करून ठेवलेल्या. शिवाय प्रत्येक सुट्टीत एक नाटक बसवण्याचा प्रयत्न होई. एकदा ते खरेच व्य्वस्थित बसले होते तेंव्हा आम्ही लहान मुलांसाठी तिकिट लावून प्रयोग करायचे ठरवले होते. पण आजोबांना सुगावा लागल्याने तो बेत बारगळला. मग नाईलाजाने आम्ही आमची नाटकाचे commercial वरून amateur मधे रूपांतर केले. म्हणजे फुकट दाखवले याशिवाय प्लॅंचेट नावाचा अद्भुत प्रकार आम्ही करायला शिकलो. त्याबद्दल तर बरेच सांगण्यासारखे आहे. पण त्याबद्दल नंतर कधीतरी. संध्याकाळी सडकेवर फिरायला जायचो कधीकधी नाहीतर अंगणात भेंड्या खेळायच्या. टीव्हीची कमतरता तिथं जाणावायची नाही. लाईट्स बहुतेकदा दिवसातून एकदा तरी जायचेच. आणि अनेकदा दोन दोन दिवस यायचे नाहीत. मग दुकानात एक, सोप्यात एक, सैपाकघरात एक असे कंदील लागायचे. पण तो वाडा गूढ कधी वाटला नाही. तुमच्या घरात भूत आहे असं माझी गावातली एक मैत्रीण मला म्हणाली होती. पण आम्हाला ते कधीच खरे वाटले नाही. मोठ्या वाड्यांबद्दल अशा अफवा गावात असतातच. माझ्या कर्तबगार पूर्वाजांच्या कहाण्या घेऊन तो वाडा उभा होता. आणि माझी आवाडती माणसं होती ना तिथं. एकेकाळी चाळीस पन्नास माणसं पाव्हणेरावळे यांना वागवणारा वाडा आता आम्ही गेल्यावरच सुट्टीत गजबजायचा. त्याच्या कोपर्याकोपर्यात आम्ही खेळलो, लपलो, भातुकलीचे डाव मांडले, आमची गोट्या, सागरगोटे, बांगड्या, बाहुल्या, पिगी बॅंका, खेळणी असली दौलत सुरक्षित ठेवली. आता वर्षातून एकदा तिथं जाणं होतं. आणि पुन्हा गच्चीच्या जिन्यात बसून भुताच्या गोष्टी सांगाव्या वाटतात. अंगतपंगत मधला स्वतः केलेला कच्चा भात खावा वाटतो. भान विसरून तासंतास पत्ते खेळावे वाटतात. राजाची, त्याच्या नावडत्या राणीची आणि विदुषकाची नाटकं बसवावी वाटतात. आजोबांच्या समोर पिगी बॅंक नेऊन हप्तावसूली करावी वाटते. पण वाड्यात रहायचा प्रोग्रॅम नसतोच. आजोबांबरोबर वाड्याचे माणूसपण आणि आमचे लहानपण गेलेय. ते काहीही केले तरी परत येणार नाहीये. हल्ली सुट्टी पाहिजे तेंव्हा घेता येते पण लौकर संपते. सुट्टीत करण्यासारखे काही नसतेच ना.
|
Moodi
| |
| Friday, March 31, 2006 - 5:34 am: |
| 
|
खुपच गोड लिहीलस संघमित्रा. बालपणीचा काळ सुखाचा. अग पण आजोळ कुठे आहे ते तरी सांग की, कारण शहरात असे काही अनुभवायाला मिळतच नाही. निसर्गाचा खरा मेवा लुटलास की मनसोक्त. 
|
sangha... far masta lihila ahes. pan ata rahanyacha program ka nasto?
|
Zelam
| |
| Friday, March 31, 2006 - 8:33 am: |
| 
|
छान लिहिलय ग. बालपणीची मजा औरच असते नाही? जन्मभर जपून ठेवायच्या या आठवणी.
|
Charu_ag
| |
| Friday, March 31, 2006 - 8:42 am: |
| 
|
सन्मे, आपण दोघीही एकाच ठिकाणी जायचो की काय सुट्टीला! पत्ते, आणि कॅरम तर हुबेहुब तस्सेच. आणि मिठाची मिरचीची चव पण. छान लिहीलयसं
|
Champak
| |
| Friday, March 31, 2006 - 8:51 am: |
| 
|
सन्मी! छान लिहिलेस! आता मला सुट्टी चे वेध लागलेले हे च
|
Ldhule
| |
| Friday, March 31, 2006 - 9:56 am: |
| 
|
मित्रा, छान लिहिलय. बालपणीच्या आठवणी मनावर खोल बिंबलेल्या असतात हे खरय.
|
Chinnu
| |
| Friday, March 31, 2006 - 10:55 am: |
| 
|
सन्मी ग, खुपच nostalgic केलस!
|
Ninavi
| |
| Friday, March 31, 2006 - 11:42 am: |
| 
|
सन्मी, मस्त. लयाला गेलेलं वाचनालय, खुणांचे पत्ते आणि ' हे पत्तेवाले श्रीमंत लोक कॅरम का नाही खेळत'.. सहीच! मलाही सगळ्याच वाचकांप्रमाणे माझ्या सुट्ट्या आठवल्या.. नव्हे घडल्या पुन्हा. आता अगदी हेच सगळं करत नसले तरी दरवर्षी भारतात जाते तेव्हा हरवलेलं लहानपण भेटतं गं पण. जाता जाता.. प्लॅंचेट मात्र आम्ही भावंडं अजून भक्तिभावाने (!!!!) करतो. ( पुढच्या वेळी तुला बोलवीन म्हणते.) 
|
मस्त ग सन्घा specially ती आंब्याची खोली किन्वा साधारण अंधारी खोली ही असतेच वाटते प्रत्येक घरात.. तिथे ते फणस, आंबे,जुने तांदूळ याचा वास असे. पडवीत बांधलेले नुकतच झालेले वासरु तो झोपाळा. अगदी आठवणिंना उजाळा दिलास तु.. माझी पण अशीच अतिशय वात्रट मावसभांवडे त्रास देत १०-१५ जणे असु मामाची ४, २ मोठ्या मावशीची ६,बरिच मोठी gang . सगळ्याना आजी control मधे ठेवायची. planchet ची भीती वाटायची कारण वात्रट मोठी मावस भांवडे घाबरवत की हा आत्मा जर आमचा एकलस नाही तर त्रास करेल तुम्हाला. मला आठवतं की मी सेवा करायची जेव्हा ते carom खेळत तेव्हा,पाणी आणुन दे, आंबा share कर,आंब्याची साठं आण आणी दे त्यांना. झोपाळ्याला सुद्धा number लावायचा.. असली वाट्रत मावस भांवंड. शेवटी एक दिवस आजीला सांगितले आणी आजी चांगला समाचार घेतला होता त्यांचा. माझी पण आजी गेली आणी तिच्याबरोबर ते घरची ओढ ही कमी झाली. लहानपण देगा देवा
|
खास सन्मि ... निनावी प्लॅंचेट वर कविसंम्मेलन का ?
|
Dineshvs
| |
| Saturday, April 01, 2006 - 10:08 am: |
| 
|
संघमित्रा, छान. आपल्यापैकी बहुतेकानी अश्या सुट्ट्या अनुभवल्या आहेत. पण कोकणात, या दिवसात शेतात काहिच नसायचे. आंबे, फणस आणि काजु मात्र आजुबाजुला असायचे. शिवाय जवळ समुद्र असायचा. पण लेखातले गाव कुठल्या भागातले होते ते मात्र विचारावेसे वाटतेय.
|
Saj
| |
| Saturday, April 01, 2006 - 6:06 pm: |
| 
|
aajchi sagali sandhyakal gulmohar vachnyat chanch geli pan abhyas kahich kela nahi tyache tension sagale mansokt vachun zalyavarch aale. sanghmitra khupach chan lihiles ga. mazyahi unhalyatlya (babanchya gaavi) aani divalitlya (aaichya maheri) suttyanche saglya bhavandanbarobarche divas aathvale aani hya saglya anamol aandala mazya muli anubhavu shakat nahit hyane man bharun aale
|
सन्मि....
|
संघमित्रा, ........ ......... ........... ............. काय प्रतिकिया लिहू...... i lost all my words..... बघ, शेवटी " माय " च्या भाषेत शब्द सापडले नाहित म्हणून " सायबा " च्या भाषेत लिहिलं ! निव्वळ अप्रतिम ! अगदी जसेच्या तसे चित्र उभे केलेस बघ डोळ्यांपुढे !! मला तर एकदा वाटून गेले हिपण होती कि काय आपल्यासोबत बालपणी...... चौकटचा राजा
|
सन्मि, अप्रतिम लिहिलयस!! भाग्यवानच आहेस तू, अजून तुला तिथे वर्षातून एकदा का होईना जाऊन निदान आठवणींना उजाळा देता येतो आहे
|
Jayavi
| |
| Sunday, April 02, 2006 - 9:48 am: |
| 
|
संघमित्रा........खरंच अप्रतिम लिहिलं आहेस गं ! लहानपणीच्या सगळ्या आठवणींना मस्त उजाळा मिळाला. इकडे सुट्टी, तिकडे सायकल.......वा आज मज्जा आहे नुसती !
|
अरे वा! संघमित्रा केव्हा लिहिलेस हे? मस्तच... चला चारू, चौकटराजा, मी.. चार टाळकी जमली! मेंढीकोट मांडायचा का? हुकूम मी लपवणार! कॅट माजा हाय मंग! आणखी दोन आले तर सहा जणांत! चारी दुर्या बाजूला काढून! हा हा हा. कैरी खाऊन झाल्यावर तिची कोय चिमटीत धरून उडवायची आणि आपल्या बायकोचे / नवर्याचे गाव कोणत्या दिशेला असणार हे बघायचे...
|
Divya
| |
| Sunday, April 02, 2006 - 11:45 am: |
| 
|
सन्मी छानच ग... मला आठवतय मला पोहायला शिकवायला मी किती लोकांना त्रास दिला आहे. बिन्डा लावुन पोहायला सुद्धा पहिल्यांदा दोन गडी माझ्या मागे पकडायला अणि मी जीवाच्या आकांताने तीन चार मैल पळाले होते. आणि ते आंब्याच्या झाडाचा चिगुर खायचा अगदी दात आंबुन जाइ पर्यन्त. दुपारी रोज गारेगार खायचा, गारेगार वाल्याला तो बर्फ़ाचा चुरा करुन छान गोळा तयार करताना बघायच आणि ते प्रयोग घरी पण करायचे आणि ओरडा खायचा. दर सुट्टीत ते नथणी आणि बिन्दीचे पाकीट मिळायचे बघ आठवत त्या नथणी ला नाकात घालुन तिची दुसरी बाजु गालावरुन केसात लावायची. काय पण तो अवतार आज आठवल तरी हसु येते कशावरही घालायचो आम्ही स्कर्ट ब्लाउज काय पेटीकोट काय. घर घर, भातुकलीच्या खेळात तर विटांची चुल मांडुन त्यावर खरा भात शिजवताना खाल्लेला ओरडा आठवतो, जाळ पेटेना म्हणुन केरोसिन घालायचा गाढवपणा तेही आम्ही गोळा केलेल्या लाकुडफ़ाट्यावर सगळ्या बारीकबारीक काड्या, जाड पेपर. शेतात जाताना येताना ते बैल गाडीत बसुन जाण, त्यातही पाय सोडुन मागच्या बाजुला बसायला मिळाव म्हणुन भांडण. बाहुलीच लावलेल लग्न आणि तिला सासरी पाठवायच म्हणुन रडण, पत्त्यांच्या डावात चाललेल नॉटेऍटे ठोम पुरे आता संपायचच नाही लिहुन पण तुझे आभार मानले पाहिजेत या आठवणी जाग्या केल्या बद्दल.
|
दर सुट्टीत ते नथणी आणि बिन्दीचे पाकीट मिळायचे बघ आठवत त्या नथणी ला नाकात घालुन तिची दुसरी बाजु गालावरुन केसात लावायची.अगदी सेम टू स्सेम आणि कहर म्हणजे लांब केसाची भारी हौस, म्हणून पंचे किन्वा टॉवेल क्लिप्स ने डोक्यावर लावायचो आम्ही! आणि उगाच मानेला झटके देत ते केस(?!) मागे सारत " घर घर " मधले ड्वायलाक बोलायचे 
|
मित्रा, छानच सुट्टी म्हणजे पोहणे, गोट्या, विट्टीदांडू, पतंग वाह!! पुस्तकांमधे गुलबकावली, फास्टर फेणे (अनेक वर्ष टॉक.. करत होतो), टारज़न कसे विसरता येईल. 
|
Badbadi
| |
| Sunday, April 02, 2006 - 11:46 pm: |
| 
|
सन्मे, छान गं पण ते गाव कुठलं ते सांग ना!!
|
पुन्हा हे वाचुन अजुन एक आठवण जागी झाली.. एक दिवस कोणाचं लक्ष नसताना आम्ही काजुच्या बिया भाजायचा उपद्रव केला अंगणातल्या चुलीत. ती कच्ची काजुची बी लहान भावाला फोडायला सांगितली चीक लागुन जो त्याला त्रास झालेला आणी पाठीत बसलेला मावशीचा रट्टा विसरले नाही. .. सर्व चुल घाण करुन जाळ केला होता त्यात परात ठेवायचा प्रताप कारण बीया टनाटना उडत आनी परातीत आपटुन खाली चुलित पडत मजा वाटायची घरात नुकत्याच झालेया मांजरिच्या पिल्लांना विहिरिवर अंघोळ घालायचा प्रकार आंब्याच्या पानात मीठ भरुन तोबरा करुन घरातील कामाला येण्यार्या पैरीणीची नक्कल केली तेव्हा आजीचा खाल्लेला शब्दिक मार... .. आजोबांच्या पकडीने सुपारी फोडताना कापलेला अंगठा,तुटायचा बाकी होता अंगठा, सुंदर उजाळा दिलास सन्घे पुन्हा एकदा बाकी ती वेगवेगळ्या पिना लावुन लांब केसाची आवड अगदी अगदी हां मैत्रीयी काय same गं
|
संघमित्रा, छाऽऽऽन लिहील आहेस.. nostalgic व्ह्यायला झालय ! सुंदर ! ते दिवसच खरे अस वाटत ना बर्याच वेळा .. सुट्टीसाठी सगळे कष्ट सोसायचे वर्षभर !
|
दोस्त्स, इतक्या छान प्रतिक्रियांबद्दल आभार. खरं तर हा इतक्या वेळा लिहून झालेल्या विषयावर मी लिहिलं ते यासाठी की काहीतरी सुरुवात करायची होती मला. सव्यसाची अरे वाडा मेंटेन्ड नाहीये आता. इतक्या लोकांना रहाता येईल इतका. एक चक्कर मारून येतो फक्त. आणि आता शेतातच घर बांधलं ना. म्हणून प्रोग्रॅम नसतो आता. माझं हे गाव आहे सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यात. सातारा जिल्ह्याच्या सीमेवर. पंढरपुरापासून अर्ध्या तासावर. एकदम दुष्काळी भाग. पण आमचं लहानपण हिरवाईनं भरून टाकणारा. माझ्या आयुष्याची पहिली सहा वर्षं खरं तर तिथं गेली. मग शिक्षणासाठी शहरात. घराचा बारदाना मोठा असल्यानं शहरातही मोठी बिल्डींग होती आणि तिथं खूप चुलत भावंडं होतीच. ती मजा वेगळीच. हे सगळे लिहिले ते वडलांच्या शेताबद्दल होते. शिवाय आजोबांचा मळा होता ती मुख्यतः पेरूची मोठी बाग होती. तिथं तर आम्ही दिवस घालवायचो. चित्रं पण काढायचो पेरूच्या झाडावर बसून. दिनेश हे तुमच्यासाठी.. तिकडे एप्रिलात चिकू, चिंचा, कलिंगडं, डाळिंबं, कधी एखाद्या चुकार झाडाची बोरं हे मिळतं असं आठवतंय. कैर्या तर असतातच. शिवाय आंबे पिकायला लागले की जांभाळांनाही बहर येतोच. संक्रांतीलाही आम्हाला दहा दिवस सुट्ट्या असायच्या. तेंव्हा तर सुगीचेच दिवस असायचे. हुरडा, ऊस, बोरं हे सगळंही. दिव्या अगं काय आठवण काढलीस. आगदी सही. तो अवतार आठवला स्कर्ट ब्लाऊज वर बिंदी आणि नथणी. मला वाटायचं की ते तसलं पाकीट आमच्या सोलापुरातच मिळतं की काय. आणि ते बिंदी आणि नथणी किंवा नथ घालून आम्ही कोळीडान्स पण करायचो सुट्टीत. शिवाय ते सेट मिळायचे खड्याचे. कानातलं गळ्यातलं वाले. मैत्रेयी केसांना टॉवेल, पंचे अगदी अगदी. घर घर साठी तर मस्ट.
|
|
|