जन्मला आहे नव्याने आज राखेतून तो बघ, उद्या येईल पुन्हा आणखी बहरून तो तो कुठे भयभीत झाला होऊनी घायाळही मनगटाला राहिला आहे उभा परजून तो या तमाचा वेध त्याने घेतला होता कधी आजही जाणार आहे हा तमस भेदून तो घेतली आहे भविष्यानेच त्याची काळजी वर्तमानालाच आहे चालला समजून तो घातली आहे कुठे त्याने दग्यांना भीकही चालला आहे दिशांनाही दिशा देऊन तो कोरतो आहे युगावर तो उद्याचा दिग्विजय झुंजतो आहे पराभव आजचा पचवून तो
|
पाणी तवंगलेले बदलायला हवे दुनियेस एकदा या उपसायला हवे लागेल जंगलाला वणवा हळूहळू एकेक झाड आधी पेटायला हवे क्षण एकही न माझा ते वाचती कधी आयुष्य मात्र माझे चाळायला हवे आपापल्या व्यथांचे होतील सूर्य ते आतून रक्त आधी तळपायला हवे टाकून कात आता झालीस तू नवी डोळे अता मलाही बदलायला हवे
|
हरवलेली वाट माझी मी अशी शोधायचो एकटा तंद्रीत माझ्या दूरवर भटकायचो जो दिवस उगवे मला फेकायचा चुरगाळुनी सांज झाली की मला मी रात्रभर हुडकायचो ही तिची तक्रार की मी सापडत नाही तिला चूक माझी एवढी की मी तिला शोधायचो भ्यायचो मीही स्वत:चे एकटेपण पाहुनी जाऊनी बाहेर मग गर्दीमध्ये मिसळायचो एक हिम्मत घेऊनी मी जायचो झुंजायला अन घरी ठिकय्रा हजारो घेऊनी परतायचो चेहय्रांची खूप भीती सारखी वाटायची उत्तरे शोधायला मी पुस्तके वाचायचो
|
नेमके समजे न मजला मी कसा आहे खरा मीच आहे नाव आणि मीच आहे भोवरा थांबलो नाही कधी पण धीर खचतो सारखा चालतो आहे तरीही जीव होई घाबरा कोण तो आहे प्रवासी? कोणती त्याची दिशा? श्वास ज्याचे वावटळ अन पाय ज्याचे भोवरा थांबतो मग काळ माझा वाट बघताना तुझी अन तुझ्या एका क्षणाचा जन्म मागे आसरा शोधतो आहेस तेथे तू भविष्याच्या खुणा वर्तमानालाच जेथे राहिला ना चेहरा सावरु शकलो न आपण तोल दोघांचे कधी गाठही होती चुकीची,दोरही नव्हता खरा भेद दृष्टीचाच आहे,सर्व सृष्टी सारखी आंधळ्याला तीर दिसतो,डोळसाला भोवरा
|
कुठेतरी मग भरकटलेला वणवणणारा प्रवास होतो तुझी आठवण येते तेव्हा तुझी शपथ मी उदास होतो दिसूनही मी दिसलो नाही,जवळ तुझ्या मी होतो इतका बघूनही तू नजर फसावी असा तुझ्या आसपास होतो श्वास करावे मुक्त मोकळे,लाख लाख मग गुंतून घ्यावे जुळले नाही सूर असे तर जन्म उभा बंदिवास होतो धीर समजलो ज्या हाकेला केवळ तो आवाज निघाला सदैव स्वप्ने बघणाय्राचा असाच का भ्रमनिरास होतो जुळूनही जुळणारच नाही,तुटूनही तुटणारच नाही तुझासुद्धा हा कयास आहे,मलासुद्धा हाच भास होतो स्वप्ने बघता बघता सारी हयात अमुची सरुन जाते चण्याफुटाण्यांमध्येच सगळा पगार अमुचा खलास होतो किती किती ते जिवंत होते जगणे माझे झपाटलेले मनात नव्हते तवंग कुठले,भणंग पण दिलखुलास होतो
|
तरळले डोळ्यांत पाणी, पापणी झुकवू नको अंतरीच्या पावसाच्या तू सरी लपवू नको मी उन्हांच्या पाकळ्यांचा एक जळणारा ऋतू सावली देऊन माझी आग तू विझवू नको सोबती आहेस तोवर हात हाती राहू दे दूर गेल्यावर उगाचच हात मग हलवू नको मी मुळी आहे सुखाने हासणारा हुंदका मी स्वत:ला जाणतो पण तू तुला फसवू नको एक मी आहे उतरणीतून सुटलेली शिळा दूर राहूनी पहा तू, पण मला अडवू नको आंधळी आहेत सगळी माणसे वस्तीतली तू असे समजून अपुले काजवे खपवू नको मी कसा बेचैन आहे... तू जरा समजून घे जे मला पटणार नाही ते कधी सुचवू नको
|
सावरु शकलोच नसतो मग तुला स्पर्शून मी याचसाठी चाललो नाही तुला बिलगून मी आरशाच्या सारख्या भेटी मला देऊ नको पाहिला आहे स्वत:चा चेहरा जवळून मी वाळवंटी वाढलेले एक आहे झाड मी जन्मभर तृष्णाच माझी घेतली शोषून मी राहिला नाही अता आवाजही माझा नवा एक किंकाळी मघाशी पाहिली फोडून मी एकदा मी पाहिला अंधार माझ्या आतला मग कधी ना पाहिले माझ्यात डोकावून मी दोस्त जेव्हा आपले खोट्यात सामिल पाहिले अर्थ सत्याचाच तेव्हा घेतला बदलून मी मी कधी भेटेन आता हे कसे सांगू तुला आजवर नाही कुणाला भेटलो ठरवून मी तू दरी होतीस आणि मी कड्यावरती उभा यात माझे काय चुकले जर दिले झोकून मी नग्न झालेली मला तेव्हा खरी दिसलीस तू पाहिले जेव्हा शरीराला तुझ्या नेसून मी
|
डोळ्यांतुनी मनाचे सांगायला मला ती रोज रोज येते भेटायला मला आहे विखूरलेला दाही दिशांस मी एकांत गाठ माझा वेचायला मला कुठल्याच मी फुलाचा झालो न सोबती होताच वाव कोठे बहरायला मला मजला रडायचीही आहे मुभा कुठे एकेक दु:ख येते हसवायला मला समजू नकोस काही इतक्यात तू खरे लागेल वेळ थोडा ठरवायला मला आहेस आरसा तू, मी बिंब त्यातले जाणून घे तुला तू समजायला मला जाईन साथ अंती सोडून मी तुझी लावू नकोस इतके धावायला मला असतो तिच्याच जेव्हा मी मैत्रिणींसवे ती त्या क्षणीच येते भेटायला मला चाखून तोवरी घे गाभूळली मिठी दे ओठ अर्धकच्चे पिकवायला मला
|
पाहिले नव्हते तिला पण मी तिला माहीत होतो मी कधी काळी तिच्याही यौवनाचे गीत होतो खूप काही हारलो पण काय हरलो नेमके मी? हे तरी कळले कुठे की काय मी मिळवीत होतो सोबती होता खरा तो, त्यास का नाकारले मी? नेमका तेव्हा कुणाचा हात मी शोधीत होतो? पाहिजे होती जराशी ऊब मायेच्या घराची पण घराच्या कल्पनेने जन्मभर मी भीत होतो हेही झाले जन्मभर तू सोबती होतीस माझी हेही झाले जन्मभर मी सोबती शोधीत होतो
|
लाविला नाही दिवा मी पण कुठे अंधार नाही वेदना आहे अघोरी पण मुखी चित्कार नाही शोधतो आहे दिशा,जी पाऊले समजेल माझी सारखी तडजोड वाटांशी मला जमणार नाही शेवटी फोडून टाहो फेकूनी देईन ओझे सोसण्यासाठी मुक्याने मी कुणी अवतार नाही याचसाठी थांबलो की तो तुझा आवाज होता अन्यथा थांबेन जेथे मी... असे हे दार नाही व्यर्थ सारे सिद्ध झाले बोललो जे जे तुझ्याशी शेवटी इतकेच कळले मीच समजूतदार नाही पाहिजे आहे तुला तो,जो तुझी राखील मर्जी अन तुझे दुर्दैव हे की मी तसा लाचार नाही प्रश्न नाही हा कि तेव्हा नेमके चुकले कुणाचे प्रश्न आहे त्या क्षणाचा जो परत फिरणार नाही खूपसे दिसतात हल्ली भोवती अस्वस्थ टाहो पण नभाला भेदणारा एकही उदगार नाही
|
मी लागलो बोलायला तू बोल वा बोलू नको हाती तुझ्या हा फैसला तू बोल वा बोलू नको मी जाणतो आहे तुझ्या डोळ्यातल्या हिरव्या खुणा पण शब्द दे ओठांतला तू बोल वा बोलू नको विसरुन तू जाशीलही माझे ऋतु, माझे बहर होतोच मी कोठे भला तू बोल वा बोलू नको बोलेन मी रंगातुनी हृदयातली भाषा तुझी आहे तुझा मी कुंचला तू बोल वा बोलू नको आता नको मागे वळू, आता न मी तो राहिलो दे हाक ती माझी मला तू बोल वा बोलू नको सांगुनिया माझी व्यथा मी मोकळा झालो अता मज साधली माझी कला तू बोल वा बोलू नको
|
भुकेसारखी सोबत असते तुझी आठवण धगधगणारी होऊन जातो मीच भिकारी जेव्हा येतो माझ्या दारी सगळ्या मित्रांसाठी अंती होऊन गेलो गहाणखत मी ज्याची त्याची होती माझ्या नावावरती खूप उधारी मुळी न याची खंत मला की तहान माझी शमली नाही पण आशेने आलो होतो तहानलेला तुझ्याच दारी कधी न त्याची उमेद जगली ज्याच्या डोळां अश्रू येती ज्याच्या डोळां असती स्वप्ने त्याची जगते उपासमारी
|
Saavat
| |
| Tuesday, January 16, 2007 - 8:53 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
>>>टाकून कात आता झालीस तू नवी डोळे अता मलाही बदलायला हवे<<< व्वा! युवराज,सुंदर संग्रह!!धन्यवाद!
|
पुन्हा वाटते की तुला गुणगुणावे तुला गुणगुणाया तुझे ओठ व्हावे तुला पाहिजे तो मला रंग दे तू तुला पाहिजे ती मला ठेव नावे दिले कोवळे स्वप्न मी जीवनाला तुझे स्वप्न माझ्या उशाला असावे असा आज एकांतही गप्प आहे जणू काय बोलायचे ते न ठावे दिव्याला जसे छळावे वादळाने तुझे श्वास देती तसे हेलकावे इथे वाहतो गंध बदनाम माझा फुलांनी जरा वेगळे दरवळावे कुठे राहिलो मी मला ओळखीचा अता टाळतो मी तुझेही सुगावे मला जीवना तू नको साथ देऊ तुझे मानले मी कधीही न दावे मला पाहिजे ती दिशा लाभली, पण अता वाटते की दिशाहीन व्हावे अशी रात्र आहे जिला सूर्य नाही अता काजव्यांनी निखारेच व्हावे
|
मी खरा आहे, असे मी म्हणत नाही पण कधी माझे कुणाशी पटत नाही खूप वेळा चूक नसते आपली, पण ऐनवेळेला खुलासा सुचत नाही फटकळांचे मौनही समजून येते साळसूदांचीच भाषा कळत नाही आपला संबंध म्हणजे एक पत्ता जो तुला आणि मलाही मिळत नाही चेहरे असले जरी गर्दीत लाखो चेहरा गर्दीस केव्हा असत नाही तू फसव आता मला सावधपणाने मी अता पहिल्याप्रमाणे फसत नाही सोसण्याने घडत जाते जिंदगी, पण सोसण्यासाठीच कोणी जगत नाही दे खबर आता मला दुनिये तुझी तू मी घराबाहेर हल्ली पडत नाही
|
करपुन गेले स्वप्न फुलांचे संपुन गेले गीत मनाचे हिशेब चुकते झाले सारे देणे फिटले ज्याचे त्याचे जीवन नसते इतके साधे गाता येईल आनंदाने वैर स्वरांशी होऊन जाते ओठी आलेल्या गाण्याचे बांधुन भिंती ज्याने त्याने आडोसे नात्यांचे केले तेव्हापासुन वणवण फिरती बेघर होऊन पाय घराचे वसंत होता ज्याकाळी, तो किंचीतही सळसळला नाही अखेर गुलमोहर झाला पण झाले जेव्हा रान जिवाचे कातरवेळी अशी जिवाला टोचू लागे घोर निराशा भरदिवसाही जळणाय्राला भय वाटावे अंधाराचे वाय्रावरती उडताउडता जीवन झाले भटका वारा आणि भटक्याला मग काही वाटत नाही घरदाराचे दिशादिशांना भोवळ येई इतकी वणवण केली कोणी? वाटेलाही ठणका लागे इतके थकले पाय कुणाचे?
|
मी तुझा आकांत नाही की मुका आघात नाही कोरडा मी थेंब आहे जो तुझ्या डोळ्यात नाही एवढे मी चाललो की वाटती रस्तेच साथी कोणत्याही सोबतीच्या मी अता शोधात नाही मागता आली न आम्हां दाद प्रेषीताकडेही एक साधा हुंदकाही आमच्या कंठात नाही ठीक झाले, सर्व काही मी जुने विसरुन गेलो अन तुझ्याही आज काही मागचे लक्षात नाही एकटी असशील तेव्हा तू स्वत: ऐकव स्वत:ला जो तुझी ऐकेल गाणी तो ऋतू शहरात नाही जर म्हणावे एकटा तर सोबती आहेत लाखो अन पहावे तर स्वत:चा हातही हातात नाही जर कुणी जगले इथे तर ते जुने आश्चर्य आहे जर कुणी मेले इथे तर तो नवा अपघात आहे
|
स्पंदने या माणसांची येऊ दे शब्दात माझ्या चांदणे संवेदनांचे राहू दे रक्तात माझ्या मी तुझे आरोप तेव्हा मान्यही केलेच होते भेटली तेव्हा तुलाही उत्तरे प्रश्नात माझ्या वागलो तेव्हा तुझ्याशी मी खरे परक्याप्रमाणे राहिली होतीस तेव्हा तू कुठे लक्षात माझ्या घेतल्या नाही भराय्रा मी जरी तेव्हा दिशांनो एक मी आभाळ आहे ठेविले पंखात माझ्या व्यर्थ मी सांगू कशाला खूण तुजला ओळखीची दे तुझा तो हात गोरा एकदा हातात माझ्या लाभली मज वाट माझी हेच त्यांना मान्य नाही आडवे येतात काही पांगळे रस्त्यात माझ्या रोज हल्ली ऐकतो मी हाक एका सावलीची कोण जाणे कोण आहे सारखे शोधात माझ्या झेलल्या झुळका तुझ्या मी अन मला तेव्हा कळाले धूळ होती वासनेची केवढी देहात माझ्या सारखी करती प्रशंसा लोक माझ्या चेहय्राची पण कुणीही देत नाही आरसा हातात माझ्या
|
ओळखीचा वाटल्यावर वाट तो बदलून गेला तो तसा घाईत नव्हता पण मला टाळून गेला एकटा आहे मुळी मी हीच सोबत खूप आहे अन कुणा मग दोष देऊ हात जर निसटून गेला तो कधी झाला न माझा, जो कधी नव्हता कुणाचा एक होता चेहरा जो आरसे चुकवून गेला वाटले त्याला, बघावे एकटा जगतो कसा मी एवढ्यासाठीच मजला तो घरी भेटून गेला जो तुझा आहे दिवाणा तो तुझ्या शहरात आहे सांग मग तो कोण होता जो शहर सोडून गेला टाळला मी आरसा तर चेहरा विसरून गेलो पाहिला, तर सर्व पारा आतला निखळून गेला आजही सांगू न शकलो त्यास माझी यातना मी आजही जखमेवरी तो आसवे बरसून गेला शेवटी अश्रूंत माझ्या चेहरा माझाच दिसला जो दिलासा भेटला तो आरसा देऊन गेला तो तुझा नव्हता कुणी तर का तुला मंजूर होता? तो तुझा होता कुणी तर का तुला जाळून गेला? प्रश्न मी साधेच केले टाळले ज्यांना असे तू की खुलाशांचाच साय्रा अर्थ मग बदलून गेला
|
अरे वा.. बरंच काम केलंस की युवराज. छान आहेत या गज़ल.
|