आत्मनिर्भर

आत्मनिर्भर

Submitted by कुमार जावडेकर on 3 February, 2021 - 14:01

मार्ग खडतर, लक्ष्य दुर्धर होत गेले
आणि अंतर आत्मनिर्भर होत गेले

शब्द जितके आत्मनिर्भर होत गेले...
अर्थ सारे अस्थिपंजर होत गेले

सुख जगू शकलेच नाही त्या ठिकाणी...
दुःखसुद्धा फक्त जर्जर होत गेले

बांधण्यासाठी नवे सेतू फुकाचे
माणसांचे स्वस्त पत्थर होत गेले

चालणे नशिबात होते का म्हणू मी...
राहण्यासाठी कुठे घर होत गेले?

प्रश्न पुसणे बंद केले मी कधीचे
मौनही माझे निरुत्तर होत गेले

- कुमार जावडेकर

Subscribe to RSS - आत्मनिर्भर