अभय कविता

नागपुरी तडका : सरकार म्हंजे काय असते?

Submitted by अभय आर्वीकर on 23 June, 2015 - 23:03

नागपुरी तडका : सरकार म्हंजे काय असते?

गरिबावरती गरजते, धनिकावरी बरसते
एक सांगा भाऊसाहेब
सरकार म्हंजे यापेक्षा वेगळं काय असते?

हिरवं गेलं, निळसर गेलं, भगवं आलं
अस्काऱ्याच्या म्हशीले टोणगं झालं
टोणग्याच्या पाठीवर मलमली झूल
म्हशीच्या वेणीले धोतऱ्याचं फूल
साल बदललं तरीबी हाल बदलत नसते?

सातव्या आयोगाचा तिजोरीवर डल्ला
सामूहिक लग्नाचा शेतकऱ्याले सल्ला
अकलेचे कांदे बदबद पिकले
नाकाचे नकटे प्रवचन शिकले
समज ना उमज पण खुर्चीत धसते?

'लुच्चे दिन' आले : नागपुरी तडका

Submitted by अभय आर्वीकर on 29 May, 2015 - 01:00

'लुच्चे दिन' आले : नागपुरी तडका

'सच्चे दिन' म्हणता म्हणता 'लुच्चे दिन' आले
अन शेतमालाचे भाव तमाम लंबेलाट झाले ....॥

म्हण काही श्यामराव, पण सत्य एकच हाय
शेतकर्‍यांच्या नात्यामंधी कोणताच पक्ष नाय
सत्तेमधी गेल्याबरोबर माजावरती येते
पण शेतकर्‍यांच्या नावाचं कुंकू पुसून घेते
मतं मागासाठी सारे सोंगी-ढोंगी झाले ....॥

ओला पडो, सुका पडो, सारं थ्येच असते
पंजा येवो, फ़ूल येवो, कोणी आपलं नसते
यंदाच्या बाजारात पुरी मंदी आली
शेतकर्‍यांना स्मशानात थेट घेऊन गेली
कुणास पडलं सुतूक, जरी बदाबदा मेले? ....॥

दुष्काळाच्या वार्‍यापायी शेंगा नाही झोंबल्या

लेकीसूना घेऊन नाचासाठी या : नागपुरी तडका

Submitted by अभय आर्वीकर on 26 April, 2015 - 11:19

लेकीसूना घेऊन नाचासाठी या : नागपुरी तडका

खाली करा शेतशिवार, इथून चालते व्हा
कुठं जाऊ पुसू नका, ढोड्यामंधी जा ...॥

शूद्र तुम्ही शेतकरी, ध्यानी धरा पक्के
सरकाराचे बाप आम्ही, चार पानी एक्के
वाद फालतू घालू नका, उगाच काहीबाही
कोर्टामधी जाण्याची, तुम्हांस मुभा नाही
कायदा कडक वाटतो? तर तेल माखून घ्या ...॥

घटनेमधले परिशिष्ट, नऊ वाचून पहा
शेतकऱ्यांनो तुम्ही तुमच्या, औकातीत राहा
मर्जीनुसार हिसकून घेऊ, तुमचा जमीनजुमला
कायद्यानंच बांधू तिथं, फाइव्ह स्टार बंगला
तुमच्या लेकीसूना घेऊन, नाचासाठी या ...॥

इलंक्शनच्या टायमाले, थैल्या ढिल्या करतो

गर्भपातल्या रानी .....!

Submitted by अभय आर्वीकर on 15 March, 2015 - 23:53

गर्भपातल्या रानी .....!

गारपीटीच्या अंगसंगाने
गर्भपातल्या रानी
अश्रू होऊन हवेत विरले
पाटामधले पाणी

एका एका झाडावरती
पक्षी हजारो होते
क्षणात पडले सड्याप्रमाणे
सरली सारी कहाणी

हातामधला हात सुटूनी
घरटे विच्छिन्न झाले
बुंध्याभवती जमीन नहाली
रक्ताळल्या पिलांनी

ऊस झोपला, कापूस निजला
खुरटून गेल्या बागा
जगण्या-मरण्यामधले अंतर
उरले नसल्यावाणी

शाबूत उरल्या धान्यवखारी
बंगले, महालमाडया
अन्नदात्याचे ‘अभय’ गेले

गोवंशाला अभय द्या : नागपुरी तडका

Submitted by अभय आर्वीकर on 2 February, 2015 - 16:13

गोवंशाला अभय द्या : नागपुरी तडका

बाता नोको फ़फ़लू बापू, दुभतं करुन पाह्य
तवा तुले माहित पडंन, काह्यले म्हंते गाय....!!

शेणपुंजा, दूध-दोह्यनं, मनके कड़कड़ करते
गोधन चारु चारु राज्या, मांड्या- पोटर्‍या भरते
तरीबी अमुच्या भगुण्याले, तुमचा देव पावत नाय...!!

फुक्कट चोखू, ढोंगी म्हणती, “गाय आमुची माय”
सस्त्यामंधी दूध मागती अन फुकटामंधी साय
लेकरु माह्य उपाशी; अन थ्ये तुपाशी खाय...!!

गोभक्तांनो! विकत घ्याव्या, तुम्हीच भाकड गायी
कसाब देतो त्याच्या दसपट, करुनिया भरपाई
गोवंशाला ‘अभय’ द्यावया, ह्यो एकच इलाज हाय...!!

बायल्यावाणी कायले मरतं? : नागपुरी तडका

Submitted by अभय आर्वीकर on 29 January, 2015 - 23:58

बायल्यावाणी कायले मरतं? : नागपुरी तडका

बायल्यावाणी कायले मरतं? मर्दावाणी मरं!
सरणावरुन उठ... आनं... मशाल हाती धर ...!!

तुह्यावाणी लाखो मेले... काही फ़रक पडला?
येथे सारे निगरगट्ट ... काही बदल घडला?
त्यायच्यावाणी तू बी... फ़ुक्कट जाशीन मरून
संसाराची धूळधान... व्हईन आणखी वरून
लढल्याबिगर मोक्ष नाय.. कृष्णवचन स्मर ...!!

कर्जपाणी, घेणंदेणं... आता चिंता सोड
आला दिवस तसा... मानून घे तू गोड
कुणी आला ’यम’ दारी... शब्द त्याचे छाट
“पिकलं तवा लुटलं”... झालं फ़िट्टमफ़ाट

पैसा येतो आणिक जातो

Submitted by अभय आर्वीकर on 11 August, 2014 - 05:35

पैसा येतो आणिक जातो

पैसा येतो आणिक जातो
मला केवळ मोजायला लावतो
कधी लळा लावतो, कधी कळा लावतो ...॥

कधी चिल्लर, कधी नोटा
लाभ कधी, कधी तोटा
येण्यासाठी दारे कमी
जाण्यासाठी लक्ष वाटा
माणसाच्या वचनाला
पाडतो हा खोटानाटा
येताना हा झुकूझुकू
अन्
जाताना धडधड जातो ...॥

माझी पर्स, माझा खिसा
माझ्या तिजोरीला पुसा
त्यांचे हाल असे जणू
एस टी चा थांबा जसा
बस येते, जरा थांबते
अन्
भर्रकन निघून जाते ...॥

कुणी अभय, कुणी भयभीत
पैसोबाची वेगळी रीत
कुणा देतो मलमली छत
अन्
कुणाला रस्त्यावर आणतो ...॥

निसर्गकन्या : लावणी

Submitted by अभय आर्वीकर on 22 July, 2014 - 12:43

निसर्गकन्या : लावणी

चांदणं गारा, श्रावण धारा, वादळवारा प्याली
मेघांची गडगड, विजांची कडकड, ऐकून ठुमकत आली
पावसात भिजली, तरी न विझली, ज्योत मनी चेतलेली
भान हरपली आणि थिरकली, वयाची वलसावली

आली निसर्गकन्या आली, ठुमकत आली, थिरकत आली .... ॥धृ०॥

हिरवळ ल्याली, पावसात न्हाली, न्हाऊन चिंबचिंब झाली
मुरडत आली, लचकत आली, लाजून पाठमोरी झाली ...... कोरस

निसवता जोंधळा जणू, दाटली तनू, चोळीला भार
उगवती वल्लरी जशी, कांती लुसलुशी, अंग सुकुमार
वनी विहरली, दिशांत फिरली, तरूवर पिंगण घाली .... ॥१॥

विठ्ठलाला पिणारा पाहिजे..!

Submitted by अभय आर्वीकर on 8 July, 2014 - 14:56

विठ्ठलाला पिणारा पाहिजे..!

Pandharpur

बोला! पुंडलिका वरदे हरी विठ्ठल...!!

मेल्याशिवाय जात नाही : नागपुरी तडका

Submitted by अभय आर्वीकर on 22 June, 2014 - 04:36

मेल्याशिवाय जात नाही : नागपुरी तडका

माझा बाप...
रामप्रहरी उठायचा
शेणपुंजा करायचा
नांगर घेऊन खांद्यावर
दम टाकीत चालायचा
गार गार थंडीतही
घामामध्ये भिजायचा

माझा बाप....
गायी-म्हशी चारायचा
दूधदुभते करायचा
भूमातेच्या कुशीमध्ये
मरेस्तोवर राबायचा
कांदा-मिरची-भाकर खाऊन
आला दिवस ढकलायचा....

माझा बाप....
आजारी पडला तरी
घरामध्येच कण्हायचा
औषधाला पैसा-अधला
कुठून आणू म्हणायचा
देव तरी पावेल म्हणून
पूजा अर्चा करायचा ....

Pages

Subscribe to RSS - अभय कविता