क्षणाक्षणाला
Submitted by उमा पाटील on 26 April, 2019 - 04:38
श्रृंगार रम्य करुनी सजते क्षणाक्षणाला
फसव्या जगामधे ती मरते क्षणाक्षणाला
बेरोजगार शिक्का खोडून टाकला मी
कामात राम आहे कळते क्षणाक्षणाला
कैदेत रावणाच्या सीता अशोक रानी
रामास नित्य स्मरुनी जगते क्षणाक्षणाला
लेकीस वेळ होतो जेव्हा घरी परतण्या
आई मनात चिंता करते क्षणाक्षणाला
सारे कळून चुकले शत्रू नि मित्र माझे
खंबीर होवुनी मी लढते क्षणाक्षणाला
विषय:
शब्दखुणा: