मॉलबाहेर बसतो भिकारी सदा
Submitted by बेफ़िकीर on 22 January, 2019 - 11:27
गझल - मॉलबाहेर बसतो भिकारी सदा (२२.०१.२०१९)
=====
मॉलबाहेर बसतो भिकारी सदा
मी तसा या जगाच्या किनारी सदा
ते सुधारायचा मार्ग देते खरा
बोलणे लागते जे जिव्हारी सदा
श्वास झोपेत बहुतेकदा थांबतो
जाग येते नि जाते उभारी सदा
जीव माझा न देतो न घेतो कधी
देत घेतो स्वतःची सुपारी सदा
मोकळ्या पाखरांना भुरळ पाडते
पिंजऱ्यातील माझी भरारी सदा
मोल मिळतेच साधेपणाचे इथे
येत कामास नाही हुशारी सदा
सांज सांजावल्यांची कराया सुखद
मावळत राहतो भरदुपारी सदा
दुःख देऊन जग दुःख घेते इथे
आमची या ठिकाणी उधारी सदा
विषय:
शब्दखुणा: