अशीच रात्र राहूदे, तुझ्यात खोल वाहूदे
तुझ्या लिपीत बोलूदे, तुझ्या सुरांत गाऊदे..
जरा सकाळ होऊदे नी उतरू दे जरा धुके
तोवरी मला तुझ्या मिठीत चिंब नाहूदे...
कशामुळे सख्या असा उगाच सैरभैर तू
उषा अजून कोवळी... तिला वयात येऊदे!
कुणी न आज यायचे इथे अश्या खुळ्या क्षणी
तु टाक सर्व वंचना, मला तुला सुखावू दे...
ही रात्र संपता सख्या उरेल काय ते पहा
नकोस वेळ घालवू, जे जायचे ते जाऊदे...
पुन्हा मिळायची कधी, ही स्वस्थता नी रात्र ही...
तुझ्या मिठीत ही अशीच कैद रात्र राहूदे!
किती घोळ घालतेस?
बस ना जरा शांत!
प्रश्नांनाही वेळ दे की
थोडासा निवांत...
घाई सगळीच जगण्याची
सोड अल्गद वार्यावर...
जीव उडून गेल्यावरच
मन येतं थार्यावर!
कुठेही बस... देवघरात...
किंवा उघड्या खिडकिशी
एकलकोंड्या कोनाड्यात
वा झाडाच्या बुंध्याशी...
काहितरी असतंच तिथे
ठार भूल पाडणारं...
चक्क उघड्या डोळ्यांसाठी
सगळं जग मिटणारं!
दिव्याची केशरी थरथर किंवा
मुंग्यांची तालात धावपळ बघ
गरगरणारं पिवळं पान..
ढगांचं रांगतं हलतं जग!
तल्लिन होशील चढेल नशा
नशा... शुद्ध हरपणारी...
तुझ्यापासून तोडून तुला
तुझ्याच आतून जपणारी!
नशा हीच खरी राजा...
बाकी सारं झूठ झूठ!
असले माझे उगा बरळणे मानु नका रे खरे... अता मी नशेत आहे!
ऐका माझे मला अता एकटे सोडणे बरे... अता मी नशेत आहे!
कसे रात्रभर अंधाराशी दोन हात केले मी?
नक्की कुठल्या प्रहरी जाणे अशी शांत निजले मी?
तुझे नाव पुटपुटले तेंव्हा उरी जाग होती का?
तुला पाहीले ती स्वप्नांची खुळी रांग होती का?
मलाच काही उमगेना ठग कोण कुणाचे खरे... अता मी नशेत आहे!
ऐका माझे मला अता एकटे सोडणे बरे... अता मी नशेत आहे!
इथे उशाशी ओल... छातीही खोल खोल भिजलेली...
स्वप्नांचा लगदा पायांशी, व्यथा क्लांत थिजलेली!
खरेच आलेले वादळ की तो फक्त भास झालेला...?
मला स्मरेना शेवटचा पाऊस कधी आलेला...
असतेच देवळात देव तर...
केवढे उत्पात घडले असते!
नसतेच मनात भेव तर...
केवढे उत्पात घडले असते!
रस्ते ठाऊक असते तर अन्
वळणे आंधळी नसती तर...
पोचायचे कुठे ते कळते तर...
केवढे उत्पात घडले असते!
प्रत्येक नजरेत असती नशा,
धुंदच असत्या सगळ्याच दिशा
सत्यच स्वप्न असती तर...
केवढे उत्पात घडले असते!
नाती आतून धगधगणारी
वरून शांत डोहागत...!
मुखवटे नसतेच आपल्याजवळ तर...
केवढे उत्पात घडले असते!
मी न बोलणं, तुला न कळणं...
हेही ठीक, तेही ठीक...
मनातलं सगळंच कळतं तर...
केवढे उत्पात घडले असते!
झाकून घेतलाय जाळ तरिही
पोळतेय त्यांना माझी धग!
नग्न उसळले असते तर...
सांग सांग बाई तुला जमतंय का?
आतातरी मन सालं रमतंय का?
कंटाळा कंटाळा सारा दिस चोळामोळा
रोज रात्री फिरवावा ना पाटीवरती बोळा...
अक्षरेही तीच तीच गिरवावी किती?
गिरवले किती तरी नाही होत मोती!
पुन्हा तरी नव्यानेच गिरवावे सारे
पुन्हा पुन्हा आवरावे मनाचे पसारे
उगवणे मावळणे जन्म सारा शीण
एकच कळले - ’नाही कुणासाठी कोण!’
कळले ना आता?... तरी वळतंय का?
आतातरी मन सालं रमतंय का?
’रात्र झाली फार आता मिट डोळे नीज’
बजावतो मेंदू तरी डोळे भिज भिज
दिसभर पेंगूळते मन वेड्यागत
रातभर मन नाही मनात रमत
कण कण उजळते अंधाराची वात
कुणीतरी काळोखतं खोल आत आत
अशावेळी नेमकी ती तडकावी काच
आठवांचा जाळ होतो
त्यात मी पोळून जाते
सांज होते... राख स्मरणांची
मला चोळून जाते!
तो इथे नव्हताच तेंव्हा
मी कुठे उध्वस्त होते?
कल्पना तो हरवल्याची
का मला जाळून जाते?
गीत जगण्याच्या स्वरांचे
त्यातला वर्जित स्वर मी!
मी मनाशीही स्वत:ला
नेमके गाळून गाते!
रात्र होताना उशाशी
ठेवते खंजीर नेहमी
स्वप्नभ्याली नीज माझी
रोज मज टाळून जाते!
रोज जी अस्वस्थ होते,
निघून जाताना घरी मी...
रोज मी केसांत माझ्या
नजर ती माळून जाते!
साठवूनी ठेव सार्या त्या खुणा माझ्या...
राहिले काहीच नाही मी जवळ माझ्या!
तो असा आला जवळ उत्पात हा झाला...
जीव जाउन मोकळ्या झाल्या व्यथा माझ्या!
दोन श्वासांनीच सारी वाचली गाथा...
अन् शहार्यांनी मिठीला ऐकले माझ्या!
वाफ झाली वेदनांची काय उष्मा हा...!
घे कवे अन् पावसाला मुक्त कर माझ्या!
समजला आहे मला व्यभिचार सुष्टांचा..
नीतिमत्तेला पुन्हा आव्हान दे माझ्या!
उभी स्तब्ध आहे नदीच्या किनारी तिच्या सौम्य लाटांत नादावुनी
खडे पावलांशी, धुके काळजाशी, जिथे टोचते त्यास सांभाळुनी!
असे मोकळे केस पाठीवरी की जसे चांदणे रान-पानांवरी,
जरा सार रात्रीस हलक्या करांनी... तळाशी तिच्या मीच मी दाटुनी!
जरा रात्र चढते.. नशेचा प्रवाह.. अनाकार एकेक पेशी अशी...
मुकी स्वैर बोली खुळ्या शांततेची मला व्यापते गल्बला होउनी!
तुला काय सांगू किती या जीवाने मुके साहिले पोळते उन्ह ते...
तुझे पावसाळे किती दूर होते... मला तेच भिजवायचे मन्मनी!
अनंतात आहे तुझे गीत राजा... सुटा त्यातला एकटा सूर मी,
जरा थांबते ना तुझ्या सांद्र ओठी, मला यापरी ना विसावा कुणी!
तुझ्या आधी कुणालाही कधी का गवसले नाही
सुरंगी स्वप्न जे नेत्रांत माझ्या दडसले होते...
मला व्यापून उरला एक क्षण तो रात्रभर ओला
तुझे आभास बनुनी मेघ गात्री बरसले होते...!
उन्हाळी गीत आगीचे, धुक्याच्या गार साथीचे...
तुझ्या पाऊस दादिस आजवर हे तरसले होते!
खुळे अवकाश माझे... रम्य तरीही भोळसट आहे
स्वत:ला हरवुनी भोळे... तुला ते गवसले होते!
तुझ्या आधी इथे कोणीच नाही उत्खनन केले
तळातील द्वारकेला गाळ समजुन उपसले होते!
दिवस संपून जाण्याचे
अणू-रेणू वितळण्याचे
उन्हाळे चिंब होताना
धगीला चेव येण्याचे!
दिवस भिजर्या स्वभावाचे
जरा हळवे कुढाव्याचे
जराश्या गार वार्याने
शहारे कुंद थिजण्याचे!
दिवस माझे न उरण्याचे
कुणा काही न कळण्याचे
तुझ्या गर्दीत हरवून मी
मुका एकांत जगण्याचे!
दिवस आजार स्वप्नांचे
दिवस आकार नसण्याचे
दिवस बेफाम वाटांनी
कुठेही ना पोहोचण्याचे!
दिवस बेभान गाण्याचे
उसास्यांचे नि पाण्याचे...
मने टाचून मेघांना
तुझ्या पाऊस होण्याचे!