मान्यच आहे मला समजणे दुरापास्त आहे
आता तुझ्याच अकलेवर सगळी भिस्त आहे!
कठीण केवढी तुझी गणिते
मी बापुडी गिरवीते कित्ते
विश्वाचे तुज प्राप्त ज्ञान अन्
मलाच मी शोधण्यात व्यस्त आहे!
तुझे बोलणे किती शहाणे
माझे अल्लड वेडे गाणे
मम शब्दांसही नाही तितकी
तव विस्मरणांसही शिस्त आहे!
इथे तिथे भटकूनी थकले
कडे कपारी शोधून आले
बाजारी तुज भेटुन कळले
ज्ञान खरे एवढे स्वस्त आहे!
अथांग आकाश आणि धरती
अशी अंतरे कोण पार करती?
कुठेतरी क्षितिजावर भेटू
अशी अपेक्षा जरा रास्त आहे!
तुझे बहरणे घमघमणारे
तुला ऋतूंचा तोटा नाही
असेन फुल मी बिनवासाचे
परंतू अगदिच काटा नाही
असल्या चिंता तुला सोपवून
तुझ्या मधाळ शब्दांनी नाही फसत श्रीराम
आजकाल आसवांनी नाही भिजत श्रीराम!
भरलेली झोळी पुन्हा पुन्हा पसरावी किती..
अशा भिकेला रे भिक नाही घालत श्रीराम!
भेट सगळ्यांची घ्यावी कुणा टाळण्याच्या पूर्वी
भेटायाला येण्याआधी नाही सांगत श्रीराम!
ताट नैवेद्य सजला तूप पुरणाची पोळी
भूक त्याची अनंताची नाही भागत श्रीराम!
करी कल्लोळ टाळांचा त्यांना ठाउकच नाही...
हल्ली तिथे गाभार्यात नाही वसत श्रीराम!
तुझ्या पुजा-भजनात सारे असे गढलेले
तुझे नाम उच्चारणे नाही जमत श्रीराम!
बिनसले आहेच थोडेफार हल्ली
कोरड्या श्वासांस असते धार हल्ली!
ठाव नसतो या मुळी चित्तास माझ्या
अन् विचारांना नसे आधार हल्ली!
बोचर्या असतात या नजरा जरा पण
सोसवत नाहीत त्यांचे वार हल्ली!
त्या तिथे मेघांत नसतो अंशसुद्धा
दाटते आभाळ डोळ्यांपार हल्ली!
भक्तिचा श्रुंगार लेउन झाक भीती
मंदिरे ही जाहली बाजार हल्ली!
तू जशी आहे तशी तुज पेलणारी
माणसे नसती अशी दिलदार हल्ली!
जे पुढे गेले तयांनी आखलेल्या
पायवाटा जाहल्या बेकार हल्ली!
दगड-मातीतून असतो 'राम' माझा
माणसातुन घेइना अवतार हल्ली!
माझ्या मनात बहर पण सडा तुझ्या दारी,
माझ्या अंगणी सावली पण फुले तुझी सारी!
तुझी ओंजळ सुगंधे तुझी शहारली माती,
मीच झाडाच्या मुळाशी होते पेरलेले मोती!
रोज वेचशील फुले तुझा सजेल देव्हारा,
जरी वाहील पोकळ माझ्या घरातून वारा...
देत राहीन तरीही सर्वस्वाचे दान तुला,
सांग देवाच्या कानात.. नाव माझे... माझ्या फुला..
तुझं स्वप्न पडतं मला
तेंव्हा पहाट झालेली असते,
काळोखाच्या रंगांमध्ये
मी चिंब न्हालेली असते.
तुझं येणं, तुझं जाणं
तुझंच असणं किंवा नसणं
माझ्यापासून मी अताशा
दूर दूर पोचलेली असते
उशीपाशी चिखल करुन
पाऊस जातो वेशीबाहेर
लख्ख कोरडी कूस माझी
तरिही तहानलेली असते
रात्र सावकाश पावलांनी
झिजत सरत निघून जाते,
उजाडताना मी मात्र
धावून धावून दमलेली असते!!
तुझ्या डोळ्यांत डोकावताना
मीच हल्ली मिटलेली असते
तुझं स्वप्नं पडतं मला
तेंव्हा पहाट झालेली असते!
सांज ढळून गेली सखे गं सर्व परतले
इथे मी एकटी उरले...
खळाळणारे यमुनेचे जळ शांत शांत झाले
दूरवर त्या वृंदावनीचे दिवे मंद झाले
सावलीच्या मागावर मन हे वेडे धाऊन दमले
इथे मी एकटी उरले...
बघ तिथे त्या पानामागे हळूच हलले काही
इथे-तिथे सर्वत्र जरी तो... तरिही कुठेच नाही
त्याला शोधत फिरताना मी स्वतःस हरवून बसले
इथे मी एकटी उरले...
कुठे वाजले पाऊल मजला वाटे आला तोच
त्या तिथे त्या नभात तिथवर माझी कुठली पोच?
तरिही इथे या यमुनेकाठी पाऊल माझे थिजले
इथे मी एकटी उरले...
कशी मी एकटी उरले? तो माझ्या आत बाहेर
हे त्याचे पसरले अंश पुसोनी माझी चाकोर
तुला सांगितले होते...
नदी जन्मास येताना
तिला पाहून बर्फाचे
ह्रदयही वितळले होते
नभातून सांज होताना
जळी काळोख होताना
कुणी प्रत्येक चिमणीला
पिलाशी सोडले होते
कसा मेघांत गुदमरतो
गिरिंशी झोंबतो-लढतो
अशा वार्यास एका
चातकाने रडवले होते
कसा बेफाम दर्या
वादळाशी झुंज देताना
उरातुन चंद्र काही
चिंब ओले जपलेले होते
रुतावी खिन्न काळ्या
कातळातील रुक्ष निर्ममता
तिथेही पावसाने काल
मोती पेरले होते
प्रेम करणं सोपंच असतं...
फक्त लागतं एक मन
मनात थोडं ओलं काही
बीज कुणाचे रुजेल सहजी
अशी कोवळी जमिन काही
नातं रुजणं, उमलुन येणं सारं सारं आपसुक घडतं...
प्रेम करणं सोपंच असतं...
फक्त लागतो एक पाट
पुजेचं ताम्हण नी नैवेद्य ताट
रिकामा गाभारा करावा स्वच्छ
सोवळ्या आशेची तेवावी वात
देवाचं येणं, श्रद्धेचं रुजणं सारं सारं आपसुक घडतं...
प्रेम करणं सोपंच असतं...
फक्त लागतं एक घर
भिंती नसल्या तरी चालेल
घरापुढच्या अंगणात
कुणीही येऊन रोप लावेल
घर भरणं, बहर फुलणं सारं सारं आपसुक घडतं...
प्रेम करणं सोपंच असतं...
फक्त लागतं एक आभाळ
गद्गदणारं, गुदमरणारं
फक्त एका हाकेसाठी
तिथे जाईन जेथे सावली दिसणार नाही
तुझ्या अन् या धरेच्या मी मधे असणार नाही
मला जातील भेदुन हात तूझे आरपार
मला तेंव्हा असे गोंजारता येणार नाही
असा आतून बाहेरून वाहील धुंद वारा
बनूनी श्वास पण छातीत तो घुमणार नाही
कसा बोलावताना आज तू अडलास ओठी
मीच येईन तेंव्हा पण तुला कळणार नाही
कसा प्रारंभ झाला... संपले... काही कळेना
पुसावे सर्वकाही तेही पण जमणार नाही
तिथे जाईन जेथे तूच तू असणार नाही
तिथे जाईन जेथे मीच मी उरणार नाही!
तिथे गेल्यावरी पण पांगळ्या माझ्या स्मृतींना
तुझ्या अस्वस्थ ह्र्दयाची व्यथा कळणार नाही...!
स्वप्नात पाहिला सूर्य उषःकालाचा,
मी वक्षी त्याच्या शांत पहुडले होते.
भगभगीत तपत्या उष्ण उदास दुपारी,
चांदण्यात न्हाउन चिंब जाहले होते.
कोणत्या दिशेतुन हाक बोलकी आली,
मी दिशाहीन आकार गळाले होते.
चाहूल रातिची मधेच ऐकू आली,
मी सोबत थोडे दिवे घेतले होते.
मी थकून अलगद नेत्र झाकले थोडे
तितक्यात किती क्षण निसटुन गेले होते.
पाहिली उशाशी एक पाकळी ओली,
माझ्याच मनी ते फूल उमलले होते...!