ड्रीमलँड-४
पुढचे काही दिवस रोज साधारण तीन तास त्यांच ओरिएंटेशन सेशन व्हायचं. त्यात त्यांना इथली सगळी माहिती देणं, वेगवेगळे व्हीडिओज दाखवणं.. इथल्या जगण्याच्या पद्धती… ह्या बद्दल माहिती दिली जायची.
किचन गार्डन हा इथल्या नियमानुसार अत्यावश्यक भाग होता. त्यात घरी लागणाऱ्या फळं, भाज्या पिकवणं हा उद्देश तर होताच, शिवाय त्यामुळे हिरवाई वाढत होती. इथे कुणीही एयर कंडिशनर वापरत नव्हतं. शिवाय घरीच भाज्या पिकवण्यामुळे, भाजी मार्केट मधली अनावश्यक गर्दी टाळता येत होती आणी घरच्या घरी ताजा भाजीपाला मिळत होता.
घरच्या बागे करता लागणारं खत, घरीच निर्माण होत होतं. रस्त्याच्या बाजूला कुठेही कचरा कुंडी ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती. कचरा टाकण्या करता बागेतच खड्डे करावे लागत होते. त्यातच खत तयार होत होतं. कुठल्याही पॅकिंगची वेष्टनंही घरच्या बागेतल्या खड्ड्यातच विल्हेवाट लावता येण्यासारखी होती. इलेक्ट्रोनिक कचरा वर्षातून दोनदा फक्त कुटुंब प्रमुखाच्या नावावर जमा करता यायचा. आणी त्या करता फी भरावी लागत होती.
रौनक ने “प्लॅस्टिक ची विल्हेवाट कशी लावायची?” असं विचारल्यावर तर तो माणूस हसत हसत म्हणाला, “लोकांनी प्लॅस्टिक वापरू नये, असं आम्हाला कधी सांगावच लागलं नाही..”
“सगळे एवढे जागरूक आहेत लोकं ..? म्हणजे स्वत:हुन ठरवतात तसं..?” रौनक ने आश्चर्याने विचारलं.
“पर्यावरणा बद्दल लोकं जागरूक आहेत हे तर खरंच.. पण जी गोष्ट कुणी वापरायची नाहीच आहे, ती आम्ही निर्माणच करत नाही.. त्यामुळे प्रश्नच येत नाही मग..”
“खरच नं.. मलाही नेहमी प्रश्न पडतो.. सिगरेट एवढी वाईट आहे.. तर मग तयार कशाला करतात..? आधी वस्तु तयार होऊ द्यायच्या.. त्या मार्केट मध्ये आणायच्या.. आणी मग ते वापरू नका असं सांगायला करोडो रुपये खर्च करायचे.. शिवाय जीवाला धोका..!” सारिका म्हणाली.
“इथले वयस्क लोकं कसं जगतात? त्यांना तर जीम, बागेची देखभाल वैगेरे शक्य नसेल. आणी हे करणं तर आवश्यक आहे..” सारिकाने विचारले.
“काही लोकं एकत्र कुटुंबात रहातात. इथे ‘असिसटेड लिविंग फॅसिलिटी’ पण चांगल्या आहेत. किंवा ज्यांना एकटं घरातच रहायचं आहे, अशा लोकांना ‘स्टूडेंट्स हेल्प’ मधून मदत मिळते. जसं तुमच्याकडे ‘कमवा आणी शिका’ योजना असते ना.. तसच. फक्त इथे स्टूडेंट्स असतील तर त्यांच्या रजिस्टर नंबर वर तेवढ्या तासांचे पॉईंट्स अॅड होतात.. आणी फक्त वयस्क असं नाही, तर इतर गरजू लोकं पण अशी सर्विस घेऊ शकतात.. ” ट्रेनर ने सांगितलं.
इथले एक एक नियम ऐकतांना समीर ने विचारलं,
“पण लोकांना मान्य असतात असे सगळे नियम..? आता शाळे च्या बाबतीत बघा नं.. कुणाला तरी अमूकच एक शाळा क्लास हवा असू शकतो.. मग ‘व्यक्ती स्वातंत्र्या वर गदा येते..’ असं म्हणत नाही कुणी..? काही आंदोलन वगैरे..?”
“अहो, माणसाचं अस्तित्व धोक्यात आलेलं असतांना.., हे सगळे नियम पाळले नाही तर पृथ्वी नष्ट होणार हे महित असतांना.., कसलं आलंय व्यक्ति स्वातंत्र्य..? येणाऱ्या पिढ्यांनाही जन्माला यायचा आणी जगण्याचा अधिकार आहे की नाही..? त्यांच्या करता पृथ्वी शिल्लक ठेवायला नको..? आमच्या देशात लहान असल्यापासून मुलांना ही शिकवण दिल्या जाते.
झाडं लावणं, त्यांची निगा राखणं, कमीत कमी पाण्याचा वापर, नो पोल्यूशन हे प्रत्येकाच्या रक्तातच भिनलेलं असतं.”
“हो.. त्यावरून आठवलं, आपण बंद नाही केला ना, तर इथला बेसिन चा नळ दहा सेकंदा नंतर आपोआप बंद होतो. मग पूर्ण एक मीनीट बंदच राहतो.” रौनक म्हणाला.
“त्यामुळे लोकं पटापट हात तोंड धुतात. पाण्याचा वापर कमी होतो. शॉवर पण कंटिन्यूअस चालवला तर दहा मिनीटेच चालतो नंतर दहा मिनिटे बंद..” समोरून माहिती आली.
लवकरच तिघांचही रुटीन आयुष्य सुरू झालं. रौनक रॉन जातो, त्याच क्लास ला जायला लागला होता. त्यामुळे त्याला सायकल ने जायला यायला छान सोबत मिळाली होती. समीर चं बरचस काम घरून व्हायचं. आठवड्यातून दोन तीन दिवस फक्त तो बाहेर ऑफिस मध्ये जायचा, सायकल वर. सारिका घर काम.. शेजाऱ्यांशी ओळखी करणं.. जमेल तितकं लिखाण, ह्यात वेळ घालवत होती. येथे मिळणारे अनुभव खूपच लोकविलक्षणं होते. त्यामुळे तिला लिहायला भरपूर मटेरियल मिळत होतं.
जीम तर ते तिघही वापरायचेच. त्यामुळे त्यांचं इलेक्टरीसिटी जनरेशन चांगलं चालू होतं. कारण विकत घेतलेली इलेक्टरीसिटी खूपच महाग पडायची. स्वयंपाक वगैरे तर डायरेक्ट सोलर एनर्जी वर व्हायचा.
एका सेशन मध्ये त्यांना इथल्या वीजनिर्मिती बद्दल सांगितल्या गेलं. इथे वीजनिर्मिती ही जास्तीत जास्त सूर्या ची उष्णता, वाऱ्याचा वेग, धो धो बरसणारा पाऊस, समुद्राच्या लाटा.., येणारी तूफान वादळ.. ह्यातून होते..
“कशा कशातून वीज निर्मिती करतील इथे.. काही नेम नाही..” सेशन संपल्यावर संध्याकाळी गप्पा मारताना सारिका हळूच कौतुकाने म्हणाली.
“हो ना. आता तर मोठ्याने हसण्या बोलण्यातून ज्या साऊंड वेव्हज तयार होतात, त्यातून पण इलेक्टरिसीटी निर्माण करण्यावर रिसर्च चालू आहे.” अनिश म्हणाला. तो रोज संध्याकाळी एक चक्कर टाकायचाच त्यांच्याकडे. आता तो तर त्यांचा फॅमिली फ्रेंडच झाला होता.
“हे रिसर्च यशस्वी झालं ना.., तर आमच्याकडे तर सकाळच्या वेळी सगळ्या जेष्ठ नागरिक संघातून भरपूर इलेक्टरिसीटी निर्माण होईल. आमच्या कडे म्हण आहेच.., ‘उगाच तोंडाची वाफ दवडू नको’.. म्हणजे तोंडाच्या वाफेत खरंच एनर्जी असते.. ” सारिका हसत हसत म्हणाली.
“डोन्ट वेस्ट यॉर ब्रेथ मॉम.. तुमच्या किटी पार्टीज पण वाया नाही जाणार..” रौनक ने सिक्सर मारला.
****************************
(क्रमश:)
पुढील भाग:-
https://www.maayboli.com/node/85094