रशियावर पश्विमी राष्ट्रांनी घातलेली आर्थिक निर्बंध आणि परिणाम

Submitted by अमितव on 2 March, 2022 - 13:02

रशिया युक्रेनवर हल्ला करेल वाटू लागल्यावर आणि प्रत्यक्ष हल्ला केल्यावर अनेक पश्विमी राष्टांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले आहेत. हे निर्बंध घातल्यावर अनेक बातमीपत्रांत/ रेडिओवर हे असे लादलेले आर्थिक निर्बंध कधीच काम करत नाहीत पासून निर्बंधं घालून हवे ते करुन घ्यायचे असेल तर ते कशा प्रकारचे निर्बंध हवे याबद्द्ल अनेच चर्चा, मतमतांतरे ऐकली.
ते निर्बंध काय आहेत आणि त्यांचे परिणाम काय अपेक्षित आहेत आणि ते कसे होत आहेत याची ढोबळ यादी आणि चर्चा करायला हा धागा.

हा धागा ललित लेखनात काढतोय, कारण आर्थिक नाड्या आवळून बलाढ्य राष्ट्राला नमवता येतं का? आलं किंवा नाही आलं तर ते का? या उत्सुकतेपोटी त्या विषयावर अधिक वाचायची, समजुन घ्यायची इच्छा आहे. त्याचे राजकीय परिणाम अर्थातच आहेत. पण राजकारणावर चर्चा करणे हा या धाग्याचा हेतू नाही. तरी यासाठी राजकीय व्यतिरिक्त अजुन योग्य विभाग असल्यास सुचवावे.

  • स्वीफ्ट SWIFT प्रणालीतून गच्छंती:
  • शनिवार २६ फेब्रु. २०२२ ला युरोपीयन युनियन (ईयू), अमेरिका, युके आणि कॅनडाने रशियाला SWIFT मधुन बाहेर काढायचे ठरवले. ऑनलाईन पैसे पाठवताना SWIFT कोड लागतो हे आपल्याला माहितच आहे. तर SWIFT ही आंतराष्ट्रीय मेसेजिंग सुविधा आहे, ज्या अंतर्गत ११,००० हुन अधिक आर्थिक संस्था एकमेकांशी संलग्ग्न होऊन आपले व्यवहार सुरक्षित आणि सुकर करतात.
    हे केल्याने रशियातील बँकांना, तेथील धनाढ्य लोकांना आणि सामान्य नागरिकांना व्यवहार करण्यात अनंत अडचणी येतील.

  • आंतरराष्ट्रीय मालमत्तांची गोठवणूक
  • रशियाच्या सेंट्रल बँकेची इतर चलनांत असलेली आंतरराट्रीय गुंतवणूक वापरावयास आणि चलन बदल करण्यास निर्बंध घातले आहेत.

  • सोनेरी वर्खाचा पासपोर्ट
  • युरोपिअन राष्ट्रसंघाने त्यातील देशांत गुंतवणूक करुन पासपोर्ट मिळविण्याचा रशिअन नागरिकांचा मार्ग बंद केला आहे. रशिअन धनाढ्य नागरिक इतर देशांत गुंतवणूक करुन तेथिल नागरिकत्त्व स्वीकारुन तेथील आर्थिक जालाचा गैरफायदा घेत असत. त्याला याने आळा बसू शकेल.

  • स्वित्झर्लंडचेही निर्बंध
  • स्वित्झर्लंड सारख्या जगप्रसिद्ध तटस्थ देशानेही आलगार्क बरोबरच पुटीन, सर्गे लॅव्हरॉव्ह आणि प्रंतप्रधानांच्या मालमत्ता त्वरित गोठविल्या आहेत, आणि आपला निर्बंधांवरील असलेला पूर्वीचा चष्मा बदलला आहे.

  • फ्रांसचे चैनीच्या वस्तूंवरील निर्बंध
  • रशिअन आलगार्क आणि इतरांच्या आर्थिक मालमत्ता, स्थावर मालमत्ता, यॉट्स, इतर चैनीच्या गाड्यांवर फ्रांसने निर्बंध आणले आहेत.

    ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड, जपान इ. अनेक देशांनी रशिअन मालमत्ता, पुटीच्या मालमत्तांवर टाच आणली आहे. अनेकांनी आलगार्कंना देशांत येण्यापासून रोखले आहे.

  • अमेरिकन डॉलर मध्ये व्यवहारास प्रतिबंध
  • रशिअन सेंट्रल बँकेला अमेरिकन डॉलर मध्ये व्यवहारास प्रतिबंध केला आहे. रशिअन डिरेक्ट इनव्हेंस्टमेंट फंडावर निर्बंध घातले आहेत. रशिआ आप्त्कालिन वापरासाठीचा पैसा अमेरिकन डॉलर मध्ये ठेवते. सध्या रुबल नीचांकी पातळीवर आहे, त्यात त्यांना अमेरिकी पैसाही वापरता येणार नाही.

  • तंत्रज्ञानाच्या निर्यातीवर निर्बंध
  • याद्वारे रशियाच्या सामरिक आणि वायुदलाच्या वाढीवर निर्बंध बसतील. सेमीकंडक्टर, दूरसंवाद, एनक्रिप्शन, सुरक्षा, लेसर, नेविगेशन, सेंसर्स, विमान आणि सागरी तंत्रज्ञान आणि सुटे भाग या सर्व प्रकारच्या निर्यातीवर यायोगे निर्बंध बसतील.

  • अमेरिकेत पैसे उभे करण्यापासून निर्बंध
  • Gazprom आणि Sberbank सारख्या बलाढ्य उर्जा आणि आर्थिक संस्थांना अमेरिकेत भांडवल उभे करण्यावर निर्बंध घातले आहेत.

  • बेलरूस वर निर्बंध
  • रशियाचा साथिदार बेलरुस वरही अमेरिका, न्यूझिलंड, कॅनडा इ. अनेकांनी असेच जाचक निर्बंध घातले आहेत. तेथिल नागरिकांचा प्रवेश, आर्थिक आणि इतर संस्थांची स्थगित गुंतवणूक इ. प्रकारचे हे निर्बंध आहेत.

  • विमान आणि नौका बंदी
  • कॅनडाने हवाईहद्दीवर निर्बंध घालून रशियन विमानांना प्रवेश बंद केला आहे. तसेच जहाजांनाही बंदी घातली आहे.

  • खनिज तेल
  • कॅनडाने खनिज तेल आयातीवर बंदी घातली आहे.
    जर्मनीने नव्या पाईपलाईचे सर्टिफिकेशन थांबवले आहे.

  • व्हिसा/ मास्टरकार्ड
  • व्हिसा, मास्टरकार्ड या अमेरिकी वित्तसंस्थांनी काही रशियन बँकाबरोबरीचे व्यवहार स्थगित केले आहेत.

  • स्वयंचलित वाहने
  • मर्सिडीज, वॉल्वो, फोर्ड, जीएम, होंडा, मित्सुबिशी, रेनो, बीएमड्ब्लू, माझदा, जग्वार लँड रोव्हर इ. अनेक कंपन्यांनी निर्यात आणि उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • हवाई तंत्रज्ञान
  • बोईंग, एअरबस ने स्पेअर पार्ट्स, देखभाल आणि तांत्रिक सपोर्ट बंद केला आहे.

  • खनिजतेल आणि कंपन्या
  • एक्सॉन मोबिल, शेल, टोटल एनर्जी (फ्रांस), इक्विनॉर (नॉर्वे), ऑर्स्टेड (डेन्मार्क) आणि इतर अनेक खनिजतेल, गॅस, कोळसा इ. क्षेत्रांत काम करण्यार्‍या कंपन्यांनी गुंतवणूक सोडून दिली आहे, काही विकत आहेत, काहींनी खरेदी बंद केली आहे इ.

  • चित्रपट
  • डिस्ने, वॉर्नर, सोनी इ. कंपन्यांनी रशियात चित्रपट दाखवणे बंद केले आहे.

  • दळणवळण
  • फेडेक्स, युपीएस आणि इतर अनेक कंपन्यांनी पार्सल सेवा बंद केली आहे. कंटेनर आणि शिपिंग कंपन्यांनी जाणारी आणि येणारी सेवा बंद केली आहे.

  • तंत्रज्ञान
  • अ‍ॅपलने विक्री बंद केली आहे, गूगलने अ‍ॅप स्टोरवर निर्बंध घातले आहेत, मायक्रोसॉफ्टने जाहिरात बंदी, स्टेटच्या अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे, डेल ने विक्री बंद केली आहे.

    टायर्स, घरगुती उपकरणे, रासायनिक पदार्थ, इलेक्ट्रॉनिक्स चिप्स इ. अनेक उद्योगांनी बंदी घातली आहे. रशिया जरी ७०% चिप्स चीन कडून आयात करत असला तरी अमेरिकी इलेक्ट्रॉनिक्स चिप्स निर्बंधांचा बराच परिणाम होईल असं तज्ज्ञ म्हणतात.

हे निर्बंध एकेक करुन बघितले तर येवढ्याने काय होणार असं वाटतं. पण एकजुटीने आणि सर्वसमावेशन घातले गेले तर कदाचित चमत्कारही घडू शकेल.

वरील अनेक आर्थिक निर्बधांमुळे रुबल ३०% हुन अधिक गडगडला आहे. सामान्य नागरिकांचे व्यवहार बंद झाल्याने त्यांच्या नगदी नोटा काढण्यासाठी बँकांबाहेर रांगा लागल्या आहेत, एटीएम यंत्रांतील पैसे संपले आहेत. काही लोक रुबल बाळगण्या ऐवजी घरातील उपकरणे (फ्रीज, वॉशिंग मशीन) घेत आहेत. किमान त्या उपकरणांच्या किंमती तरी गडगडणार नाहीत, कारण त्यांना डॉलर घेणे अशक्य झाले आहे. अशा आणि इतर बातम्या गेले काही दिवस ऐकतो आहे.

ही यादी वाढतच जाईल आणि सध्यातरी रशियाच्या मुसक्या आवळायची आत्यंतिक गरज आहे, पण आण्वस्त्र धमकी मुळे पश्चिमी राष्ट्रे प्रत्यक्ष युद्धभूमीवर मदत करण्यापासून सध्यातरी चार हात लांबच रहातील अशी स्थिती दिसते आहे.

रशिया हा युएसएसआर नाही, आणि आंतरराष्ट्रीय बाजाराशी खोलवर गुंतलेला आहे. अर्थात या निर्बंधांनी जी-७ देशांवरही अनुचित परिणाम/ नुकसान होईलच. हे निर्बंध कितपत अडकवतील, ते खर्‍या अर्थाने काम करे पर्यंत किती काळ जाईल? क्रिप्टोकरंसीचे काय? इ. अनेक प्रश्न मनात आहेतच. निर्बंध घालतानाही आपली कातडी वाचवण्यासाठी काही लोकांना यापासून मुद्दाम तर दूर ठेवले नाही ना? ही शंका घेण्यासारखे ही अनेक प्रसंग घडले आहेत, घडत आहेत.

आज इतिहास लिहिला जातोय, इतिहास बदलला जातोय. हेच काय ते खरं!

संदर्भ:
१. https://www.cnn.com/2022/02/25/business/list-global-sanctions-russia-ukr...
२. https://www.international.gc.ca/world-monde/international_relations-rela...
३. https://www.reuters.com/world/canada-shuts-ports-russian-ships-widening-...
४. https://www.reuters.com/business/corporate-ties-russia-uprooted-sanction...
५. https://www.reuters.com/business/mastercard-blocks-multiple-russian-fina...
६. https://fortune.com/2022/02/25/biden-ban-chip-semiconductors-exports-rus...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमितव यु नेल्ड इट. कोळसा काय किंवा हायड्रोईलेक्ट्रीसिटी किंवा गॅस यापेक्षा न्युक पावर जास्त क्लीन आहे. युरोपियन देश खरे तर जास्त योग्य होते न्युक एनर्जी हँडल करायला.

हायड्रोपेक्षा नसावी.
पण आत्ता पर्यंतच्या दोन (चेर्नोबिल आणि फुकुशिमा) दुर्घटना वि. दुसर्‍या (शत्रू) देशावर उर्जेसारख्या अन्न-वस्त्र-निवार्‍याच्याही आधी येणार्‍या गरजेवर अवलंबित्त्व यातील काय निवडायचं यात अ‍ॅग्ला मर्केलची गफलत झाली हे खरं.

Pages