यत्न करोनी दूर ठेवले होते रोमांचांना
शहारलो पण आज सखीला ओझरते बघताना
असे वाटले असंगासवे संगही बिघडताना
जणू पाहिला एक कवडसा अंधारी बुडताना
घडावयाचे घडून जाते सत्य हेच असताना
लोक तरी का दिसती इतके मनास कुरडताना
कोण म्हणे जाहला करोना मंजुळशा स्वप्नाला?
असेल रमला लताभोवती विषाणु ऐकत ताना***
साखरझोपेमधील स्वप्ने गोडच असावयाची!
कष्ट्कर्यांचे भाग्य हवे, ती पडण्या श्रीमंतांना
चाहुल देती तिची पैंजणे ती आल्या गेल्याची
पैंजण नसता वसंत देई सुचना ती येताना
माझी का डायरी म्हणू मी? सखीच पानोपानी
समासात मी दिसतो केंव्हा केंव्हा वावरताना
इतिहासाच्या पुस्तकातल्या कुठे हरवल्या व्यक्ती?
आजकालचे पिग्मी दिसती फक्त लाच खाताना
ध्यान तुला "निशिकांत" असू दे वास्तव आज मितीचे
गतकालाचा बडेजाव, विसरावा बडबडताना
***लता मंगेश्कर यांना करोना झाल्याची बातमी ऐकून सुचलेला प्रासंगिक शेर
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--लवंगलता
मात्रा--८+८+८+४=२८