नको छंद स्वप्नात हरवावयाचा

Submitted by निशिकांत on 16 January, 2022 - 05:59

करू सामना आजच्या वास्तवाचा
नको छंद स्वप्नात हरवावयाचा

लगडल्या फुलांना सदा प्रश्न छळतो
हवेविन कसा गंध पसरावयाचा?

उधारी जरी माय असते जगाची
तिथे प्रश्न नसतो परत द्यावयाचा

जरा पारदर्शकपणा सोडल्याने
किती, आरसे छान, बनतात काचा!

कसे विघ्नहर्त्यासही विघ्न आले?
करोनात कैदी स्वतः मंदिराचा

क्षमाशील व्हा! धर्म सारे शिकवती
बनावा तरी प्रश्न का कायद्याचा?

प्रजेला तुम्ही काय देणार सांगा!
तुम्ही रंगवा खेळ सत्तांतराचा

कुणी वार केला छुपा, खंजिराने?
असावा पराक्रम कुण्या आपुल्याचा!

तुला रोज "निशिकांत" का प्रश्न पडतो?
जरा शोध घे ना! कधी उत्तराचा

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--भुजंगप्रयात
लगावली--लगागा X ४

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गझल छान आहे, आवडली.

कवी आणि लेखकांचे एक बरे आहे, की एकदा सांगायचे की छान मोठी स्वप्ने बघा आणि काही दिवसांनी बरोब्बर उलटे सांगायचे की अरे, स्वप्नात काय रमता, जरा वास्तवाचे भान ठेवा.

तुला रोज "निशिकांत बोक्या" का प्रश्न पडतो?
जरा शोध घे ना! कधी उत्तराचा.