कशाला त्या सायकियाट्रिस्टच्या डोंबल्यावर पैसे घालायचे? घडा घडा बोलावं. धडाधडा काम करावीत. रिकाम मन सैतानाचे घर. रिकामटेकडेपणातून हे नसते उद्योग सुचतात. तो काय सांगणार? आम्ही जे सांगतो तेच ना! मित्रमंडळींशी, घरच्यांशी शेअर करा, बोला. कामात गुंतवून घ्या! पण फी देउन हेच ऐकल की बरं वाटत. आम्ही सांगितलं तर त्याची किंमत नाही. प्रत्येक गोष्टीवर शंका घेत बसले की मग नस्ते आजार मागे लागतात. हे होतय ते होतयं. लवंग खाल्ली कि उष्णता होती आन वेलची खाल्ली की सर्दी होते. आम्ही बघा! जातो का उठसुट डॉक्टर कडे? आपली रोगप्रतिकार शक्ती असतेच ना! एकदा औषध गोळ्या मागे लागल्या कि घेत बसा आयुष्यभर. हा डॉक्टर पटला नाही तर कि तो डॉक्टर. दुष्टचक्रात अडकायच. सगळे मेले लुटायलाच बसलेत. इथेतर बकरा स्वत:हून येतोय. त्या आरोग्य पुरवण्या वाचल्या की प्रत्येक रोग आपल्यालाच झाला आहे असे वाटायला लागते. मी नाही वाचतं हे असल काही! स्वत:चे फाजील लाड करायचे नाहीत. भरपुर पैसा कमवावा.भरपुर खर्च करावा. कशाला आंथरुण पाहून पाय पसरायचे? आंथरुण वाढवा ना! आनंदी जगावं. मौजमजा करावी. काही केमिकल लोच्या वगैरे नसतात. सायकियाट्रिस्ट लोकांनी पसरवलेल खूळ आहे.हे सगळे रिकमटेकड्या मनाचे खेळ आहेत. खाजवायला फुरसत नाही मिळाली की सगळं बरोबर होतय. हातावर पोट असणार्यांना होत का काही? झक्कत रोज काम कराव लागतं. त्यांना बर काही होत नाही? असल्या फालतू गोष्टींसाठी त्यांच्याकडे वेळच नसतो. ही सगळी नाटकं संपन्नतेची देणगी आहे. पैसा जास्त झाला की मग असले उद्योग सुचतात. आम्हा बायकांच बर असत. त्या निसर्गत:च चिवट असतात परिस्थितीशी तोंड द्यायला. घरचंही सांभाळायच शिवाय बाहेरचही पहायचं.मी शेवटपर्यंत काम करत राहणार. पैशापरी पैसा मिळतो शिवाय वेळही मजेत जातो. वेगवेगळी माणसे भेटतात आमच्या धंद्यात. तुमच्या त्या व्याखान, चर्चासत्र, वेबिनार यात काय ते पुस्तकी किडे सांगणार? नुसते अकॅडमिस्ट! व्यवहारात शून्य! असो! मला फालतू वेळ नाही. भरपूर कामे पडली आहेत.
मनोनाट्य
Submitted by प्रकाश घाटपांडे on 24 December, 2021 - 06:15
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आय बी एस (इरिटेबल बाऊल
आय बी एस (इरिटेबल बाऊल सिंड्रोम) या रोगात तुमच्या पचनसंस्थेतील स्नायू अनियंत्रित पणे वरचेवर काम करतात आणि त्यांना मानसिक संकेत देखील उत्तेजित करतात.. उदा... तणाव इ. त्या मुळे वाटेल तेव्हा शौचाची भावना किंवा बध्दकोष्ठ असे विकार होतात. मनः शांती व त्या बरोबरच आपल्या पोटाला इरिटेट करणारे पदार्थ टाळणे अशी मानसिक उपचार व औषधे (विष्ठा पुढे ढकलणारे स्नायू नियंत्रित करण्यासाठी )अशी ट्रीटमेंट दिली जाते.... मला झाला होता व प्रयत्नांती पूर्ण बरा झाला..... याचे कारण ओसीडी आहे हे मी आजच ऐकले.... कदाचित माझ्या बाबतीत ते लक्षण नव्हते पण असू शकते
यात आयुर्वेदात खूप उत्तम उपाय आहेत... स्वानुभव !!!
याचे कारण ओसीडी आहे हे मी आजच
याचे कारण ओसीडी आहे हे मी आजच ऐकले.... नसावे.
मलाही निदान कोलायटीस म्हणून सांगितले होते.शेवटी शेवटी Ibs सांगितले.मानसिक ताण महत्त्वाचा असतो.
Slip disk chya दुसऱ्या अटॅकमध्येही मेडीटेशन करायला सांगितले होते.
याचे कारण ओसीडी आहे हे मी आजच
याचे कारण ओसीडी आहे हे मी आजच ऐकले.... नसावे.>>>>>> देवकी, ते कारण नसून परिणाम आहे असे माझे मत आहे. टॉयलेटला जाण्याची कृती अनेक वेळा करावीशी वाटणे. त्याशिवाय स्वस्थता न वाटणे, हा भाग ओसीडी आहे. मला आयबीएस हे मुलत: शारिरिकच आहे असे सांगणारे अनुभवी व सेवाभावी डॉक्टर भेटले होते. वरील नाट्यछटेतील बकरा हा शब्द त्यांचाच आहे. मी वर प्रतिक्रियेत म्हटलेच आहे की आजूबाजूला पहात ऐकत अनुभवत असलेल्या निरिक्षणांवर आधारित ही दिवाकरांच्या नाटयछटेच्या धर्तीवर सुचलेली मनोनाट्यछटा आहे. मला ट्रीट केले त्या सायकियाट्रिस्ट ने सायकोमेट्री ही टेस्ट करताना जी चिठ्ठी पाठवली होती. त्यात ओसीपीडी? असे लिहिले होते. ते म्हटले मी देखील ओसीपीडी कॅटॅगरीतला आहे.माझ्या चिकित्सक स्वभावामुळे त्यांनी मला त्या कॅटॅगरीत टाकले असावे. विचारांचा ओसीडी मला नक्की आहे. हात धुणे, स्वच्छता या प्रकरातला मी नाही. भटक्या कुत्र्यांना लावलेले हात सुद्धा मी धुण्याचे लक्षात ठेवत नाही. शिवाय मी मूलत: खूप आळशी व अल्पसंतुष्टी आहे.
माझ्या वैद्यांनी सकाळी
माझ्या वैद्यांनी सकाळी उठल्याबरोबर १० मिनिटे डोळे बंद करून बसणे व झोपतांना शांत मुद्रेत आधी १५मिनिटे बसावे असा सल्ला दिला होता, तसेच मी बरा होईन , मला काहीही झालेले नाही असे ही बजावत होते.
आयबीएस याला आयुर्वेदात शौचास जाण्याची भावना दूर करण्यासाठी औषधे आहेत... ती मूलतः मन स्थिर करण्यास मदत करतात. तसेच पंचकर्माचा खूप फायदा होतो.... पाश्चात्य औषधोपचारात कोलास्पा इ. औषधे देतात त्या मुळे भावना कमी होते..... मनः शांती ठेवणे, संगीत आइकणे हे उत्तम उपाय आहेत
रेव्यु, माझा एक वैद्याचा
रेव्यु, माझा एक वैद्याचा अनुभव सांगावासा वाटतो. वैद्य प्रामाणिक व आयुर्वेदावर श्रद्धा असणारा. मला काही काळ औषधे दिली. मी ती प्रामाणिकपणे घेतली. काही फरक वाटतो का? असे विचारल्यावर मी नाही असे सांगितले. म्हटल माझ्या दृष्टीने हा प्रयोग आहे, गुण आला तर आला म्हणणार नाही तर नाही.मी तसा अश्रद्ध माणूस असल्याने आयुर्वेदावर असो वा ऎलोपॆथिवर सुद्धा माझी "श्रद्धा" अशी नाही असे सांगितल्यावर मला आयुर्वेदावर श्रद्धा हवी तर गुण येणार असे काहीसे चिडून सांगितले मग मी ते बंद केले. हाच प्रकार पहिल्या सायकियाट्रिस्ट बाबत झाला. अगदी प्रथितयश व जुने व अनुभवी सायकियाट्रिस्ट होते.त्यांचा अनुभव मायबोलीवर लिहिला आहे पण सापडत नाही आता.
माझी श्रध्दा केवळ स्वानुभवावर
माझी श्रध्दा केवळ स्वानुभवावर आहे. मला फेब्रुवारी १९ मध्ये टर्कीला जायचे होते... मी वैद्याना जून मध्ये भेटलो... खूप त्रास होत होता.. त्यानी नोव्हेंबर पर्यंत बरे करण्याची हमी घेतली आणि तसे झालेही.... असो!!
मी अॅलोपाथचे उंबरठे झिजवले आणि त्यातील बहुतेकानी काहीच शाश्वती दिली नाही... हा सिंड्रोम आहे.... रोग नाही.... मला सायक्यियॅट्रिस्ट कडे सुध्दा जाण्यास सांगितले होते.... मी गेलो नाही.... माझी आडकाठी नव्हती पण तसे झाले नाही
असो आता उत्तम आहे
अन हो!!! आपला उपचार करणार्^यावर विश्वास असला तर आपली सहनशक्ती वाढते आणि रिकव्हरी देखील लवकर होते
माइंड बॉडी रिलेशन आहेच
आयुर्वेदाचा याबाबतचा माझा
आयुर्वेदाचा याबाबतचा माझा अनुभव उलटा आहे.आयुर्वेदिक औषधे घेतल्यावर त्रास अजूनच वाढला.अॅलोपेथिक डॉक्टरांनी कलवळून सांगितले की सद्या आयुर्वेदिक औषधे बाजूला ठेवा.आयुर्वेद पोट साफ करण्यावर भर देतो इ.इ. मलाही त्यावेळी पटले आणि फायद्याचे वाटले.काही काळ अॅलोपॅथिक औषधे घेतली.मानसिक त्रास अॅक्सेप्ट केला.नंतर एकाने सांगितल्याप्रमाणे कुटजारिष्ट २-३ वर्षे सातत्याने दोन वेळा घेत राहिले.
>>>मी कुटजारिष्ट घेतले नाही/
>>>मी कुटजारिष्ट घेतले नाही/ ते प्रिस्क्राइब केले नव्हते
रेव्यु तुमचा माईंड बॉडी
रेव्यु तुमचा माईंड बॉडी रिलेशनशिपचा मुद्दा मान्यच आहे. तेव्हाही तो मान्य होता. फक्त श्रद्धा ही काय वस्तू आहे का? जी ठेवा म्हणल्याने ठेवता येते असं माझ म्हणणं होत. ती असते किंवा बसते. नंतर सीबीटी (cognitive behaviour therapy ) साठी मी सायकोथेरपीस्ट कडे गेलो होतो. सायकियाट्रिस्टनेच तसे सांगितले होते.सुरवातीला मी दुर्लक्श केले पण नंतर गेलो. मग तिथे mind diverting techniques मधे स्तोत्र,पाढे,श्लोक कविता,संगीत हे सांगितले. ते वापरले. मूलत: मी श्रद्धाळू, धार्मिक व पारंपारिक वातावरणात ग्रामीण भागात वाढलो आहे. थेरपीस्ट होमिओपाथ पण होते. मग होमिओपथीला पण आम्ही विज्ञान मानत नाही अशी अंनिस तील उदाहरणे त्यांना दिली. पुढे मी निवळत गेलो.
श्रद्धा ही काय वस्तू आहे का?
श्रद्धा ही काय वस्तू आहे का? जी ठेवा म्हणल्याने ठेवता येते असं माझ म्हणणं होत. ती असते किंवा बसते. >>>>>>> अशाच शब्दांत माझ्या शेजारणीशी वाद(?) झाला होता.आपल्या गुरुंवर किंवा देवावर श्रद्धा ठेव म्हणाली होती.त्यावेळी तिला म्हटले की श्रद्धा म्हणजे काय एखादी बरणी आहे की एके ठिकाणी ठेव म्हटल्यावर ठेवली जाते.ती आतून यायला लागते.
प्रघा तुमच्या या धाग्याचा
प्रघा तुमच्या या धाग्याचा विलक्षण उपयोग होइल तिला. शिवाय ओसीडी असलेल्या व्यक्तीच्या जोडीदारांकरतादेखील साईटस आहेत, सपोर्ट ग्रुप्स आहेत. दोज आर वर्थ एक्सप्लोरिंग.
काल आवर्जुन अगदी कुतूहलाने,
काल आवर्जुन अगदी कुतूहलाने, गाणगापूर घोस्ट व्हिडीओज पाहीले. क्लिअरली मानसिक व्याधी. जरी रुग्ण अगदी खांबां वरती चढून थयथयाट करत होते तरी कोणी खाली पडत नव्हते अगदी जपून जपून उड्या मारणे चालले होते. मास हिस्टेरियाचा प्रकार. कसलं भूत डोंबल्याचं. हिस्टेरिया बद्दल एक वाचलेलं आहे खखोडॉजा. की या रुग्णांना ऑडियन्स लागतो. असं सुमडीत हिस्टेरिया होत नाही. हिइस्टेरिकल होण्याकरता प्रेक्षक लागतात.
मध्यंतरी 'सायकॉलॉजी ऑफ
मध्यंतरी 'सायकॉलॉजी ऑफ पेडोफाइल' संदर्भात एक लिखाण वाचनात आले. 'पेडोफाइल' असणे ही विकृती मेंदूतच इनग्रेनड असते. ती बदलता येत नाही. हां जरी पेडोफाइल असणे हा चॉइस नसला तरी लहान मुलांशी गैरवर्तन न करणे - हा चॉइस असतो. काही 'जेन्युइन' पेडोफाइल हे लहान मुलांना शारीरीक इजा करतही नाहीत.
याबाबतीत अभ्यास चालू आहे.
यापूर्वी एका गुन्हेगाराची केस वाचनात आलेली होती - पकडल्यानंतर त्याला castrate का काहीतरी केलेले होते मला नक्की काय ते आठवत नाही पण त्याच्यात हार्मोनलच बदल घडवुन आणलेला होता. व इनकेपेबल ऑफ सेक्श्युअल डिझायर केलेले होते.
वाचनातून, सर्वात भयंकर आणि विचार करण्याजोगा मुद्दा मला हा मिळाला की - या अशा लोकांना , मदत मिळणं हे जिकीरीचं असतं. कारण वैद्यकिय (मानसोपचारतज्ञ) मदत मागायला गेल्यास त्यांच्यावरच आळ आदि येण्याची प्रचंड शक्यता निर्माण होते. त्या भीतीमधून उपचार घेतले जात नाहीत.
>>>>>>श्रद्धा ही काय वस्तू
>>>>>>श्रद्धा ही काय वस्तू आहे का? जी ठेवा म्हणल्याने ठेवता येते असं माझ म्हणणं होत.
मला वाटतं 'श्रद्धा' हा काही लोकांचा निर्णय असू शकतो. माझा आहे. इट इज अ कॉन्शस डिसीजन. तसेच अध्यात्म हा छंद म्हणुन जोपासलेला आहे. मनाला एक ओढ, एस्केप, विसावा.
मला वाटतं 'श्रद्धा' हा काही
मला वाटतं 'श्रद्धा' हा काही लोकांचा निर्णय असू शकतो.>>>>>> म्हणजे आता मला श्रद्धा ठेवायची आहे असा निर्णय घेता येतो असा त्याचा अर्थ झाला. संस्कार,अनुभव,समजुती यातून तयार होत गेलेली ती एक भावना आहे. दाभोलकर आपल्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा या पुस्तकात म्हणतात कि " श्रद्धा म्हणजे भावनेचे विचारामध्ये विकसित झालेले सत्याधिष्ठीत कृतीशील मूल्यात्मक रुप."
"उपलब्ध वस्तुस्थितीला ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या सहाय्याने प्रश्न विचारल्यानंतर जी टिकते त्याला विश्वास किंवा श्रद्धा म्हणतात.जी टिकत नाही त्याला अंधश्रद्धा म्हणतात"
आता कुणी म्हणेल की या शाब्दिक कसरती आहेत. मला ते एका अर्थाने ते मान्यही आहे. जोपर्यंत आपल्या मेंदूत भावना नावाचा घटक आहे तो पर्यंत माणुस कमी अधिक प्रमाण अंधश्रद्ध असणार आहे.
आपल्या तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट या न्यायाने माझी ती श्रद्धा इतरांची ती अंधश्रद्धा! माझी श्रद्धा ही समाजाला हानिकारक नाही म्हणून ती अंधश्रद्धा ठरत नाही. श्रद्धा ही आत्मिक बळ देते. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. या पद्धतीची मांडणीही समाजात होताना दिसते.
परंतु तसे पाहिले तर श्रद्धा ही मुळातच अंध असते. त्या मुळे अंधश्रद्धा म्हणजे पिवळा पितांबर म्हटल्या सारखे आहे. चिकित्सेशिवाय ठेवलेला विश्वास म्हणजे श्रद्धा.आता श्रद्धेची सर्वसमावेशक, सर्वमान्य स्थल,काल,व्यक्ती निरपेक्ष अशी व्याख्या होउ शकत नाही हे मान्य केले पाहिजे.थोडक्यात श्रद्धेला व्याख्येत बंदिस्त करणे अवघड आहे. आपण त्याला फार तर मनाच्या धारणा म्हणु यात. पण ती टिकून असण्याचे कारण त्याची माणसाच्या सर्वायवल साठी असलेली त्याची उपयुक्तता.
>>>>> नवनाथ भक्तीसार मध्ये अ
नवनाथ भक्तीसार मध्ये अ तिरं जित, फार फेचड कथांचा प्रचंड सुळसुळाट आहे. माशाने वीर्य गिळून तिला गर्भ रहाणे, मारुतीच्या भु:भु:काराने स्त्रियांना गर्भ रहाणे, संजीवनी विद्येने पात्रे जिवंत करणे.
पैकी भयंकर अंगावर आलेली कथा - मीननाथास(कोवळा लहान मुलगा), गोरक्षांनी रागाच्या भरात दगडावर आपटून ठार मारुन त्याचे मांस मगरींना घालून, कातडे उन्हात वाळविणे हा आहे. मग पुढे संजीवनी विद्येने जिवंत वगैरे.
याच अध्यायाची फलशॄती आहे - मुले कर्तुत्ववान/ कीर्तीवान/आयुष्यमान निघतील.
आता या सर्वावरती श्रद्धा नसतेच कोणाचीच. पण अनुभव अगदी विपरीत येतो - पोथी/अध्याय वाचल्यावर मन शांत होणे, आत्मविश्वास येणे, एक सकारात्मक व्हाइब जाणवणे.
आणि मग या अनुभवाचे स्पष्टीकरण सापडत नाही तिथे 'निर्णय' केला जातो - मी ही पोथी वाचणार. डोकं बाजूला ठेउन. मनाने. विश्वासाने.
-------------------------
गोंदवलेकर महाराजांचे तेच. त्यांनी कधी लोभीपणा, दुष्कृत्य केले आहे का याची त्यांच्या चारित्र्यात तपासणी केली असता एक लक्षात येते की नाही ते तर फक्त 'रामनामाचे' कट्टर/ स्टाउंच प्रवक्ते आहेत त्यात त्यांचा स्वार्थी हेतू तर दिसत नाही. मग निर्णय होतो - हां विश्वास ठेउन, रामनाम ठेउन बघू यात. ही व्यक्ती वेगळीच आहे, फार वेगळे जीवन जगलेली आहे. डोळे मिटुन श्रद्धा ठेउ यात. हा झाला निर्णय.
सामो,मला हा मेंदुचा डिफेन्स
सामो,मला हा मेंदुचा डिफेन्स मेकॅनिझम वाटतो. बर्याचदा मेंदु आपल्या नकळत स्वत:च निर्णय घेत असतो. हा त्यातलाच एक मेकॅनिझम असावा.एक मन विचार करते तर दुसरे मन भावनेच्या आहारी जाते. अशा वेळी मेंदु सोयीस्कर निर्णय घेत असताना तो भावनेच्या आहारी बर्याचदा जातो. कधी संघर्षाची ताकद संपली असते. असहाय्य असतो. कधी अस्तित्वाची लढाई असते. लोक काय म्हणतील या पेक्षा अस्तित्व टिकवणे महत्वाचे असते. अस्तित्व ही जैविक प्रेरणा आहे ते टिकवण्यासाठी मेंदु काही निर्णय चक्क तुमच्या नकळत घेत असतो. एक प्रकारची प्रतिक्षिप्त क्रिया म्हणा ना! fight or flight रिस्पॊन्स मधे मेंदु असे निर्णय घेत असतो. या अर्थाने घेतल्यास श्रद्धा हा निर्णय असतो हे म्हणणे पटण्यासारखे आहे.
>>>>>>>>डिफेमेकॅनिझम वाटतो.
>>>>>>>>डिफेमेकॅनिझम वाटतो. बर्याचदा मेंदु आपल्या नकळत स्वत:च निर्णय घेत असतो. हा त्यातलाच एक मेकॅनिझम असावा.
करेक्ट डिफेन्स मेकॅनिझम नावाची चीज असते खरी. आपण श्रद्धेच्या संदर्भात लिहीलेले आहे. मी दुसर्या संदर्भात मांडते.
एका लहानशा पेडोफाइल, व्हिक्टिम अनुभवानंतर व्यक्ती प्रचंड ऑब्सेस व डिस्टर्बड होते. क्वचित आयुष्यभर! का माझ्याबरोबर असं का व्हावं?
आणि मग त्या टॉर्चरपासून, मेंदू किती प्रकारांनी वाचवण्याचा प्रयत्न करतो -
- मीच गेल्या जन्मी काहीतरी केलेले असेल
- मे बी दॅट पर्सन डिड नॉट हॅव्ह अ चॉइस. ऑल्सो ही डिड नॉट हर्ट मी. अ रिझनेबल नाइस गाय!! (Yeah!!! Well how crooked can brain get to survive)
- मे बी मला जगातल्या विकृतीचा जास्त अवेअरनेस आला. सो अल्टिमेटली चांगलच झालं ना!
- आपणच जास्त बाऊ करतोय. ते कृत्य तितकसं वाईट नव्हतच इन द फर्स्ट प्लेस.
- आय मस्ट हॅव्ह डिझर्व्हड इट इन अ क्रुकेड वे.
---------------------------------------------------------------------
काय हे!!! किती प्रकारांनी आपण आपली कातडी बचावत असतो. पराकाष्ठेचा प्रयत्न - पराकाष्ठेचा. पण ती आठवण कधीच कमी कटू अगदी कमी विषारी तसूभरही होत नाही.
----------------------------------------------------------------------
>>>>>>या अर्थाने घेतल्यास
>>>>>>या अर्थाने घेतल्यास श्रद्धा हा निर्णय असतो हे म्हणणे पटण्यासारखे आहे.
जिथे तुलसीदास "ढोल-नारी-गवांर (कधी कधी शूद्र असे वाचनात आलेले आहे) सब ताडन के अधिकारी ......" असे दोहे लिहीतात * तिथे सामान्य जनतेला (खरे तर सवर्णेतर) मानसिक आधार देणार्या श्लोकांची रचना नवनाथांची. साबरी विद्येच श्लोक ग्राम्य (= गावंढळ) भाषेत असतात, ज्याला आपण क्वचित अशुद्ध म्हणतो. हे खूप कौतुकास्पद वाटते. या संदर्भातील लेखांची लिंक मी नवनाथांच्या लेखात दिलेली आहे - https://www.maayboli.com/node/63454
तेव्हा श्रद्धा हा निर्णय असतो तसेच तो फक्त भावनिक निर्णय असतो-नसतो................. पण भावनाही विविध रुपाच्या व व्यामिश्र असू शकतात.
>>>>>साबरी मंत्रांचा उगम असा आहे - द्वापारयुगात अर्जुनाने पाशुपत अस्त्र मिळवण्यासाठी शिवाची आराधना केली. शंकर प्रसन्न तर झाले पण त्यांनी अर्जुनाची परीक्षा घ्यायची ठरवली. अर्जुनाने एक डुक्कर बाणाने मारले तेच डुक्कर त्याच वेळी एका पारध्याने मारले. आणि मग अर्जुनात व त्या पारध्यात झाले युद्ध सुरु. शेवटी कृष्णानेच अर्जुनास सहाय केले की अरे जे तुझे आराध्य दैवत त्यावरच बाण चालवतोस? अर्जुनाने शंकरांना साष्टांग दंडवत घालुन माफी मागीतली व शंकरांनी त्याला पाशुपत अस्त्राचा वर दिला. आता झाले काय याच वेळी हे युद्ध पहात होती पार्वती. तिने भिल्लीणीचा वेश धारण केलेला होता. युध पहात असतेवेळी तिने अन्य भिल्ल जमातीबरोबरच मांसही ग्रहण केलेले होते. युद्धोपरांत ती आपल्या मूळ रुपात आली तेव्हा तिने त्या भिल्ल-पारध्यांना वर मागण्यास सांगीतले. तेव्हा ते ग्राम्य, अडाणी पारधी म्हणाले की माते ना आम्हाला व्याकरण येतं ना आमची भाषा शुद्ध आहे. संस्कृत तर दूरच. पण तेव्हा तू असे मंत्र दे की जे सोपे, आमच्या भाषेत असतील तसेच त्यांना सिद्ध करणे अत्यंत सोपे असेल. पार्वती प्रसन्न झाल्याने शंकर म्हणजे आदिनाथांनी हेच मंत्र भिल्लांना दिले. जे की नंतर मत्स्येंद्रनाथांनी विस्तारीले. कानिफनाथ, चर्पटीनाथांनीही विस्तार केला. या मंत्रांचे मुख्य ५ प्रकार आहेत - प्रबल, बर्भर, बराटी,डार आणि अढैय्या आणि प्रत्येका प्रकाराची काही विशेषता आहे.
नवनाथांचे चरित्र तसेही नाजूक-साजूक नाहीच. ते विद्रोही, बंडखोर, 'अरे ला कारे' , कंप्लिटली पुराणातील 'बॅड बॉइज' असे आहे. तेही मला आवडते मग भले कोणी चर्वितचर्वण करोत - श्रद्धा काय अंधश्रद्धा काय. ' सुशिक्षित' लोक कसे कमी अंधश्रद्धाळू असतात यंव न ट्यंव. करा बाबांनो तुम्ही तेच करा आणि समाजाला पुढे न्या आम्हाला आमची श्रद्धा, प्यारी. पूर्वी चार वर्ण होते आता काय झाले आहे - विज्ञानवादी विशेषतः नवीनच कन्व्हर्ट झालेले लोक सर्वात जोरात बांग देतात. आपणच श्रेष्ठ असा काहीसा अविर्भाव असतो. असो.
प्रघा तुम्हाला काही बोलाय चे नव्हते, बोललेले नाही. फक्त हे मांडले की श्रद्धा हा फक्त भावनिक विषय नाही त्याला सामाजिक कंगोरे आहेत. शिवाय तो निर्णय असू शकतो.
पण भावनाही विविध रुपाच्या व
पण भावनाही विविध रुपाच्या व व्यामिश्र असू शकतात. >>> सामो हे अगदी मान्यच आहे. आधुनिक विज्ञान या भावनांचे जैवरासायनिक कारण ( बोले तो केमिकल लोच्या) मेंदुत शोधते. यावर एकदा साधारण लोकसत्तेमधे विज्ञानानंद व नरेंद्र दाभोलकर यांचा वादविवाद झाला होता. त्यात इंजेक्शनने स्वभाव बदलता येतो हा मुद्दा होता. हे आपल सहज आठवल म्हणून यात विज्ञानात निर्णायक असे अद्याप काही नसावे.
विज्ञानवादी विशेषतः नवीनच कन्व्हर्ट झालेले लोक सर्वात जोरात बांग देतात. आपणच श्रेष्ठ असा काहीसा अविर्भाव असतो.>>>>>>> हॅ हॅ हॅ.अगदी अगदी! बर्याच लोकांची ही फेज आयुष्याच्या उत्तरार्धात निघून जाते. अत्यल्प लोकांची ती टिकत असावी. आन टिकत नसली तरी त्यांची स्वप्रतिमेतून सुटका नसते. सहन ही होत नाही व सांगताही येत नाही.
मंत्र या मुद्द्यावर इथेच लिहिले आहे कुठेतरी. तरीही थोडक्यात सांगायचे तर माईंड डायव्हर्टिंग टेक्निक या कोनातून पहाता येते.
अवांतर- या सामोची किती विविध रुपे, विविध नामे!
हाहाहा
हाहाहा
Pages